इतिहासप्रसिध्द वाक्ये या नावाने मी पूर्वी एक पान उघडले होते. पण त्या फारशी भर घातली गेली नाही म्हणून मी ते पान या पानात विलीन करीत आहे. दि.१८-१२-२०२१
प्रसिद्ध वाक्ये
१६-६-२०१३
इतिहासातील थोर व्यक्तींनी काढलेले उद्गार –
लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे – बाजीप्रभू देशपांडे (पावनखिंड )
घोडा पाणी पिताना बुजला तर मोघलांचे स्वार त्यांना विचारतात ‘तुला पाण्यात संताजी धनाजी दिसतात का?”- सटवाजी डरफळे
वीराचे जीवन म्हणजे अळवावरचे पाणी. आज आहे आणि उद्या नाही- सेनापती संताजी घोरपडे
सर्फरोशी कि तमन्ना अब हमारे दिलमे है। देखना है जोर कितना बाजू-ए-कातील मे है। रामप्रसाद बिसमिल
अनेक विजय मिळवूनही जो समाधानी होत नाही तोच इतिहास घडवतो – डॉ. अब्दुल कलाम.
जय जवान जय किसान, जय विज्ञान – अटल बिहारी वाजपेयी
माझ्या शब्दकोशात ‘अशक्य’ हा शब्दच नाही -नेपोलियन.
एखादा निर्णय घेताना १००० वेळा विचार करा पण एखादा निर्णय घेतल्यानंतर १००० संकटे आली तरी मागे फिरू नका .- हिटलर
—————————————————
प्राण जायि पर वचन न जायी ….. श्रीरामचंद्र (गोस्वामी तुलसीदास)
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ….. श्रीरामचंद्र (ग.दि.माडगूळकर)
कर्मण्ये वाधिकारस्ते ना फलेषु कदाचन । …. भगवान श्रीकृष्ण (भगवद्गीतेत)
अश्वत्थामा मृतः नरो वा कुंजरो वा …… युधिष्ठिर
माझा म-हाटाचि बोलू कवतुके, तरी अमृताते पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन .. संत ज्ञानेश्वर
सामर्थ्य आहे चळवळीचे, जे जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे … समर्थ रामदास
आधी लगीन कोंडाण्याचं, नंतर रायबाचं …… नरवीर तानाजी मालुसरे
गड आला पण सिंह गेला ……. छत्रपती शिवाजी महाराज
हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा. ……. छत्रपती शिवाजी महाराज
बचेंगे तो और भी लडेंगे। …. (रणझुंझार दत्ताजी शिंदे)
मेरी झाँसी नही दूँगी । ……. राणी लक्ष्मीबाई
स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे ….. लोकमान्य टिळक
माझ्या (अमेरिकेतल्या) बंधु आणि भगिनींनो” ……. स्वामी विवेकानंद
तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूँगा ….. नेताजी सुभाषचंद्र बोस
चले जाव, …… करेंगे या मरेंगे ….. महात्मा गांधी
परमेश्वर फांसे खेळत नाही (God does not play dice) ……. आल्बर्ट आईन्स्टाईन (पुढे त्याला देवाचा जुगार मान्य करावा लागला)
आपल्याला भयाशिवाय कशालाही भिण्याचे कारण नाही (Only Thing We Have to Fear Is Fear Itself) .. प्रेसिडेंट रूझवेल्ट
आज आपला नियतीशी संकेत आहे. (Today, we have trist with destiny) …. पं. जवाहरलाल नेहरू
देश तुमच्यासाठी काय करू शकेल असे विचारू नका, तुम्ही देशासाठी काय करू शकाल हे स्वतःला विचारा (Ask not what your country can do for you – ask what you can do for your country.) …. प्रेसिडेंट केनेडी
माझे एक स्वप्न आहे ( I have a Dream) ……. मार्टीन ल्युथर किंग
जय जवान जय किसान ….. पं.लालबहादुर शास्त्री
साहित्यातील प्रसिद्ध काव्ये आणि वाक्ये
दोन कवि आणि राजकारणी
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात ज्यांनी गांवोगांवी काव्यवाचनाचे प्रयोग करून मराठी कवितांना लोकप्रियता मिळवून दिली त्या कवींमध्ये विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर हे प्रमुख होते. राजकारणी लोकांचे वागणे त्यांच्या संवेदनशील मनाला कसे खुपत होते हे त्यांनी असे व्यक्त केले आहे.
१.विंदा करंदीकर : सब घोडे बारा टक्के!
जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट; कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!
गोड गोड जुन्या थापा (तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के, सब घोडे बारा टक्के!
जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी) ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता; पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार; याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!
सब घोडे! चंदी कमी; कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा, मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के; सब घोडे बारा टक्के!
__विंदा करंदीकर
२. मंगेश पाडगांवकर
१९८१ सालातील मंगेश पाडगावकर रचित ही कविता कालबाह्य कधी होईल ???
थोर आपण मानिली
ही भ्रष्ट सारी माकडे…
अन् दिले हातांत त्यांच्या
पेटलेले काकडे !
कां अता छाती पिटावी
लागतां आगी घरां…
देव येइल कोणता
हे निस्तराया सांकडे !
धर्म यांचा मारणे
सोयीप्रमाणे या उड्या…
याचसाठी लाभलेले
पाय यांना फाकडे !
काल ज्या झाडांवरी
ही आश्रयाला थांबली…
आज ही शत्रूप्रमाणे
पाहती त्यांच्याकडे !
जा कुठेही हीच तेथे
चेहरे फेंदारुनी…
पाय जेथे टाकिती
ते सर्व रस्ते वाकडे !
पक्ष यांचा कोठला,
टोळी तयांची कोठली ?
जात यांची एक अंती,
प्रश्न सारे तोकडे !
हालवोनी शेपट्यांना
घोषणा यांनी दिल्या…
आणि तुमच्या चितेस्तव
शोधुनी ही लाकडे !
🙉🙈🙊
——————————
-मंगेश पाडगांवकर : १० मार्च, १९८१ 🙏🏻
वॉट्सअॅपवरून साभार दि. ११-११-२०१९
————————————————-
बिन भिंतीची उघडी शाळा
बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू…
झाडे, वेली, पशु, पाखरे यांशी गोष्टी करू!
बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकुया या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवील फिरते फुलपाखरू…
बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू!
सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिन पायांचे बेडकिचे लेकरू…
बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू!
कसा जोंधळा रानी रुजतो, उंदीरमामा कोठे निजतो
खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू
बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू!
भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पर्ह्यात पोहू
मिळेल तेथून घेउन विद्या अखंड साठा करु
बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू!
– ग. दि. माडगूळकर (गदिमा)
२२ ऑगस्ट २०१८
व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, जात पुढेच रहाणे. माझे जीवनगाणे।
हाती नाही येणे, हाती नाही जाणे, हसत जगावे, हसत मरावे, हे तर माझे गाणे!
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे।
————————————————————————————————————————————————-
वासूअण्णा : काकाजी, मला आधी सांगा स्थितप्रज्ञ कसा दिसतो ते!
काकाजी : स्थितप्रज्ञ! तो बघ, तो गधा चाललाय ना सडकेवरून, तसा दिसतो स्थितप्रज्ञ!
ज्याला आनंद नाही, दु:ख नाही, लाज नाही, लज्जा नाही, जो आंब्याच्या फोडी आणि कागद एकाच चवीने खातो, तसा दिसतो स्थितप्रज्ञ!
नाटक-तुझे आहे तुजपाशी (पु ल देशपांडे)
——————————————————————————————————————————————
आचार्य अत्रे म्हणाले होते
मेल्यावर अमुचे सगळे, उभारतील दगडी पुतळे |
भवताली धरतील फेर, आज परी करती जेर ||
———————————————————————————————–
अरे मानसा मानसा, तुझी नियत बेकार |
तुझ्याहून बरं, गोठ्यातलं जनावर ||
मतलबासाठी मान मानुस डोलये |
इनामाच्यासाठी कुत्रा शेपुट हालये ||
Bahinabai
नवी भर दि. २३-०७-२०१९
कोकिळा गा
भूलोकीच्या गंधर्वा तू, अमृत संगीत गा ।
गा रे कोकिळा गा ।।
सप्तसुरांचा स्वर्ग उभारुन
चराचराला दे संजीवन
अक्षय फुलवित हे नंदनवन पर्णफुलातुन गा ।।
कुहुकुहु बोलत मधुर गायनीं
मोहित होता सारी अवनि
कुसुमकोमला ही वनराणी नाचत थयथय गा ।।
मन्मथ मनींचा इंद्रधनूला
शर पंचम तो लावुनी आला
प्रीत भेटता अनुरागाला मीलन होऊन गा ।।
गीत – पी. सावळाराम , संगीत – वसंत प्रभू
स्वर – आशा भोसले, चित्रपट – बायकोचा भाऊ
राग – हमीर, केदार
आकाशी झेप घे रे
आकाशी झेप घे रे, पाखरा
आकाशी झेप घे रे, पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या, घेसी आसरा
घर कसले ही तर कारा
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा, उंबरा
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि, डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुन या सरिता, सागरा
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते, परि, ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा
घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला, साजिरा
गायिका: आशा भोसले
गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – आराम हराम आहे
आखजी ( अक्षय्य तृतीया )
आखजीचा आखजीचा
मोलाचा सन देखा जी
निंबावरी निंबावरी
बांधला छान झोका जी
माझा झोका माझा झोका
चालला भिरभिरी जी
माझा झोका माझा झोका
खेयतो वार्यावरी जी
गेला झोका गेला झोका
चालला माहेराले जी
आला झोका आला झोका
पलट सासराले जी
माझा झोका माझा झोका
जीवाची भूक सरे जी
भूक सरे भूक सरे
वार्यानं पोट भरे जी
आला वारा आला वारा
वार्यानं जीव झुले जी
जीव झुले जीव झुले
झाडाची डांग हाले जी
डांग हाले डांग हाले
नजर नहीं ठरे जी
झाली आता झाली आतां
धरती खालेवर्हे जी
आंगनांत आंगनांत
खेयती पोरीसोरी जी
झाल्या दंग झाल्या दंग
गाऊनी नानापरी जी
झाला सुरू झाला सुरू
पहिला माझा पिंगा जी
फुगड्यांचा फुगड्यांचा
चालला धांगडधिंगा जी
दारोदारीं दारोदारीं
खेयाची एक घाई जी
घरोघरी घरोघरीं
मांडल्या गवराई जी
गवराई गवराई
सजव सजवल्या जी
संगातीनी संगातीनी
बोलव बोलवल्या जी
बोलवल्या बोलवल्या
टिपर्या झाल्या सुरूं जी
टिपर्याचे टिपर्याचे
नादवले घुंगरू जी
कीती खेय कीती खेय
सांगूं मी काय काय जी
खेयीसनी खेयीसनी
आंबले हातपाय जी
चार दीस चार दीस
इसावल्या घरांत जी
आहे पुढें आहे पुढें
शेतीची मशागत जी
सन सरे आस उरे
आखजी गेली व्हय जी
सांग सई सांग सई,
आखजी आतां कही जी?
– बहिणाबाई चौधरी
आजी आणि तिची नातवंडं यांच्या नात्यावरची एक खूप सुंदर कविता आहे, संदीप खरे यांची…
आजी आणि तिची नातवंडं
आजी म्हणते जन्मभर
काढल्या खस्ता केले कष्ट
‘तू’ म्हणजे त्या सगळ्याची
शेवट गोड असलेली गोष्ट
नुसतंच कथा पुराण झालं
देव काही दिसला नाही
कुशीत येतोस तेंव्हा कळतं
कृष्ण काही वेगळा नाही ….
– संदीप खरे
One addition to the entry:
Samajwadachya gaffa ahet gaffa.samajwad ala mhanun ramane vanarache sheput nahi lavle! To narach rahila ani wanar ,wanar arch rahila.
(From “antoo barva”pu la deshpande)
समाजवादाच्या गप्पा आहेत गप्पा, समाजवाद आला म्हणून रामाने वानराचे शेपूट नाही लावलं ! तो नरच राहिला आणि वानर ….
पुलंचे वाक्य .. मस्तच!
great sir
प्रथमच पहिला खूप छान वाटला शुभेच्छा
nice
aaj kharch khup chan survat zali ………………:>
खूपच छान कल्पना आहे । अचानक खजिना गवसलासे वाटला ।
‘तुझे आहे तुजपाशी’ ची पूर्ण ओवी काय आहे? चारही चरण हवें आहेत । आणि ती तुकारामांचीच आहे नं ?
Real treasure! Thanks for sharing!