भारतरत्न लता मंगेशकर

मला समजायला लागल्यापासून मी लता मंगेशकरांची गाणी ऐकत आलो आहे, आजही ती आवडीने ऐकतोच आणि पुढेही ऐकतच राहणार आहे यात तिळमात्र शंका नाही. लता मंगेशकर हे नाव मी कदाचित थोडा मोठा झाल्यावर पहिल्यांदा ऐकले असेल, पण त्यानंतर ते नाव आणि तो आवाज कानावर आला नाही असा एक दिवसही गेला नसेल. पु.ल.देशपांडे यांनी एका सभेत असे सांगितले होते कीआकाशात देव आहे की नाही हे मला नाही, पण या आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लता मंगेशकरांचा आवाज आहे. दिवस असो, रात्र असो, कुठल्याही क्षणी तो कुठून तरी आणि कुठे तरी तो आवाज जातच असतो. हे अगदी खरे आहे. पूर्वीच्या काळी तो दिव्य आवाज रेडिओलहरींमधून आकाशात सगळीकडे पसरत असेल, आता इंटरनेटमधून जात असतो. त्यांनी पन्नास साठ वर्षांपूर्वी किंवा त्याच्यही आधी गायिलेली सुमधुर गाणी आजही ऐकत रहावीशी वाटतात. निदान तीन पिढ्या तरी ती ऐकत आणि गुणगुणत आल्या आहेत. अगदी आज काल होणाऱ्या सारेगमसारख्या संगीतस्पर्धांमधल्या मुलीसुद्धा लता मंगेशकर यांची गाणी गाऊन स्पर्धा जिंकत असतात, इतकी त्या गाण्यांची मोहिनी किंवा महती आहे.

मी जेंव्हा जेंव्हा टीव्हीवर त्यांची एकादी मुलाखत किंवा त्यांचा सार्वजनिक कार्यक्रम पाहिला आहे तेंव्हा त्यांच्या अत्यंत शालीन अशा व्यक्तीमत्वानेही भारावून गेलो आहे. मला नेहमी त्यांच्याबद्दल अतीव आदर वाटत आला आहे. मी जेंव्हा जेंव्हा पेडर रोडवरून जात होतो तेंव्हा तेंव्हा प्रभुकुंजकडे पाहूनच त्यांना हात जोडून नमस्कार करत होतो त्यांना इस्पितळात ठेवले असल्याच्या बातमीने मन बेचैन झाले होते, पण त्यांची प्रकृति सुधारत असल्याच्या बातम्याही येत होत्या. त्या पूर्ण बऱ्या होऊन घरी परत येतील अशीच आशा वाटत असतांना अचानक त्यांची प्राणज्योत मावळल्याची दुःखद वार्ता आली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि. या निमित्याने त्यांच्या जीवनातील घडामोडींची माहिती देणारा एक लेख आणि इतर काही लेख, छायाचित्रे व कविता मी या पानावर संग्रहित करत आहे. मी हे सर्व लेख वॉट्सॅपवरून घेतले आहेत.सर्व मूळ लेखकांचे मनःपूर्वक आभार.

लतादिदींच्या ९२ वर्षातील माहितीपूर्ण गोष्टी !!

( संकलन : हेमंत कोठीकर. ) (खालील विविध पुस्तकातून ह्या संकलित केलेल्या आणि मराठीत लिहून काढलेल्या माहितीपूर्ण गोष्टी आहेत. या शिवाय काही मुलाखती, नेटवरील ब्लॉग्स आणि लेख यातूनही माहिती घेतली आहे. चूकभूल द्यावी घ्यावी. काही गोष्टी चुकीच्या आढळल्या तर कृपया कळवाव्या. )

१) १९२९ साली या दिवशी जन्मलेल्या लतादिदींचे नाव खरे तर हेमा हर्डीकर राहिले असते. पण ते झाले लता मंगेशकर !. का ? ते खालील ६७ व्या माहितीत बघा 🙂

२) दिदींच्या वयाच्या १३ व्या वर्षी म्हणजे १९४२ साली त्यांचे वडील म्हणजे मास्टर दीनानानाथ हे जग सोडून गेले. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत याच वर्षी वयाच्या १३ व्या वर्षी दिदींनी त्यांचे पहिले गाणे ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटात म्हटले. पण दुर्दैवाने ते चित्रपटात घेतले गेले नाही !

३) याच वर्षी म्हणजे १९४२ साली ‘पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटात ‘नटली चैत्राची नवलाई’ हे दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केलेले गाणे दिदींनी म्हटले आणि ते त्यांचे प्रथम गाणे म्हणून मानले गेलेय.

४) पुढच्या वर्षी म्हणजे १९४३ साली त्याचे प्रथम हिंदी गाणे आले. मात्र ते आले मराठी चित्रपट ‘गजाभाऊ’ या चित्रपटात ! ‘माता एक सपूत’ असे त्याचे शब्द होते !

५) याच दरम्यान ‘गजाभाऊ किंवा ‘माझे बाळ’ या चित्रपटात त्यांनी छोट्याशा भूमिका देखील केल्या.

६) दिदींचे पहिले हिंदी चित्रपटातील गाणे १९४६ साली ‘आप की सेवा मे’ या चित्रपटात दत्त डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘पाव लागू कर जोरी’ हे आले !

७) अभिनेता महिपाल, जे नंतर नवरंग आणि इतर चित्रपटांमुळे नायक म्हणून प्रसिद्धीस आले, ते दिदींच्या वरील प्रथम हिंदी चित्रपट गाण्याचे गीतकार होते !

८) पण या आधी किंवा या दरम्यान प्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर यांनी दिदींचा आवाज ओळखला तो एका स्पर्धेत. या स्पर्धेत लहानग्या लताने ‘खचांजी’ चित्रपटातील नूरजहाँने गायिलेले गाणे गायले होते.

९) या स्पर्धेत जिंकल्याबद्दल लतादीदींना दिलरुबा हे वाद्य बक्षीस म्हणून मिळाले. पण नंतर जेव्हा गुलाम हैदर यांनी प्रसिद्ध निर्माते शशधर मुखर्जी यांना लताचा आवाज ऐकवला, तेव्हा त्यांनी तो फार पातळ आवाज आहे म्हणून सरळ नाकारला !

१०) १९४८ साली जिद्दी चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी जेव्हा लतादीदी लोकल आणि बस ने फेमस स्टुडिओत जात होत्या तेव्हा एक तरुण त्यांच्याच पाठीपाठी पार स्टुडिओ पर्यंत पोचला. दिदींना नंतर कळले की हा तरुण किशोर कुमार आहे आणि स्टुडिओच शोधतो आहे ! त्या दिवशी दोघांचे पहिले द्वंद्वगीत रेकॉर्ड झाले !

११) दिदींची भारतभर खरी ओळख झाली ती १९४९ साली आलेल्या ‘महल’ चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ या गाण्याने !. पण हे गाणे रेकॉर्ड झाल्यावर जेव्हा निर्माता सेवक वाच्छा यांनी ऐकले तेव्हा त्यांना ते अजिबात आवडले नाही आणि त्यांनी चक्क ते चित्रपटुन काढून टाकायचे ठरवले. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी आग्रह केल्याने गाणे चित्रपटात राहिले आणि दिदींचा आवाज घराघरात पोचला.

१२) ‘आयेगा आनेवाला’ या गाण्याच्या सुरवातीच्या ओळी ‘खामोश है जमाना….’ या दूर कुठून तरी गूढपणे येतात असा इफेक्ट हवा होता. पण तेव्हा तंत्रज्ञान फारसे प्रगत नसल्याने आणि रेकॉर्डिंग साठी एकच माइक्रोफोन असल्याने तो रेकॉर्डिंग रूम च्या मध्ये ठेवून दिदींना या ओळी दुरून माइक्रोफोन पर्यंत चालत चालत येत म्हणायला लावल्या, जेणेकरून असा दुरून कुणी गात असल्याचा इफेक्ट यावा !. आता हे गाणे आणि या ओळी ऐकताना ही कसरत केली असेल असे वाटणार सुद्धा नाही !

१३) हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले तरी या गाण्याच्या रेकॉर्ड वर गायिका म्हणून लता मंगेशकर नव्हे तर ‘कामिनी’ हे नाव होते. ! कारण त्यावेळी रेकॉर्ड वर गाणे चित्रपटातील ज्या भूमिकेवर चित्रित झाले त्याचे नाव द्यायची पद्धत होती ! आणि या चित्रपटात मधुबालाने केलेल्या भूमिकेचे नाव ‘कामिनी’ होते ! पुढे ही पद्धत बदलली !

१४) मराठी चित्रपटांना दिदींनी ‘आनंदघन’ या नावाने संगीत दिले आहे. हा शब्द त्यांना रामदास स्वामींच्या लिखाणातुन सुचला. आधी भालजी पेंढारकर यांनी दीदींना ‘जटाशंकर’ हे नाव सुचवले होते, पण ते त्यांना फारसे आवडले नाही !

१५) हृषीकेश मुखर्जी यांनी त्यांच्या ‘आनंद’ या सुप्रसिद्ध चित्रपटासाठी लताजींना संगीतकार म्हणून विचारणा केली होती. पण तेव्हा पार्श्वगायनात संपूर्ण व्यस्त असल्याने त्यांनी नकार दिला. नंतर ह्या चित्रपटाचे संगीत सलील चौधरी जी यांनी दिले.

१६) सचिन देव बर्मन यांच्याशी पाच वर्षे अबोला राहिल्यानंतर बंदिनी चित्रपटातील ‘मोरा गोरा अंग लै ले ‘ हे गाणे दोघांच्या दिलजमाईचे प्रथम गाणे !

१७) रेकॉर्डिंगच्या आधी बहुतेक वेळा लता दीदी व्हायोलीन वादकास शेजारी बसवून गाण्याची पूर्ण चाल ऐकतात. गाणे व्यवस्थित लयीत गाण्यासाठी त्याचा उपयोग होतो असा त्यांचा विश्वास आहे.

१८) संगीतकार चित्रगुप्त यांचे छोटे सुपुत्र आणि प्रसिद्ध संगीतकार आनंद-मिलिंद जोडीतील मिलिंद यांचे जन्मनाव लतादीदींनी सुचवले होते. मिलिंद माधव असे त्यांनी सुचवलेले नाव पुढे मिलिंद असे झाले !

१९) ७० च्या दशकातील ‘इंतेकाम’ सिनेमातील ‘आ, जाने जा…’ हे कॅब्रे गीत गाण्यासाठी त्यांनी नकारच दिला होता. पण संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सतत प्रयत्नामुळे आणि हे गाणे छचोर होणार नाही या ग्वाहीमुळे त्यांनी ते गायले. आज लताजींनी गायिलेल्या थोडक्या क्लब गीतांमध्ये हे एक प्रमुख आणि लोकप्रिय गाणे मानले जाते.

२०) ‘वोह कौन थी ?’ या चित्रपटातील ‘लग जा गले’ हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय गीत रेकॉर्ड झाल्यानंतर दिग्दर्शक राज खोसला याना मात्र पसंत पडले नव्हते आणि त्यांनी ते चक्क चित्रपटुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. संगीतकार मदन मोहन यांनी अभिनेता मनोज कुमार करवी राज खोसला याना समजावून सांगितल्यावर हे गाणे चित्रपटात ठेवले गेले ! आज ते लताजींच्या अत्यंत लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे !

२१) ७० च्या दशकाच्या मध्ये लतादीदी आणि हृदयनाथजी यांनी संगीतकार जोडी म्हणून काम करायचे म्हणून जवळपास नक्कीच केले होते पण मग पुन्हा लताजींच्या अती व्यस्त पार्श्वगायनामुळे हा बेत बारगळला !

२२) ४० च्या दशकात अगदी सुरवातीला दिलीप कुमार यांनी लताजी यांना त्यांच्या उर्दू उच्चाराबद्दल ‘ तुम्हारे उर्दू मे मराठी दाल भात की बू आती है’ असे गमतीने म्हटल्यावर, लताजी यांनी ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार अगदी परफेक्ट केले.

२३) आणि नंतर जेव्हा ‘महल’ चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ हे गाणे लोकप्रिय झाले तेव्हा नर्गिसची आई आणि तेव्हाची प्रसिद्ध अभिनेत्री, संगीतकार जद्दन बाई यांनी लताजींना शाबासकी देत म्हटले की या गाण्यात ‘बघैर’ हा शब्द ज्या तऱ्हेने उच्चारला आहे त्यावरून वाटत नाही की एका मराठी मुलीने हे उच्चारण केलेय !

२४) प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक मेहबूब खान जेव्हा गंभीर आजारी होते तेव्हा त्यांच्या अंतिम काळात त्यांनी हॉस्पिटलमधून लताजींना ‘रसिक बलमा’ हे गाणे फोनवरून ऐकविण्याची विनंती केली होती. हे गाणे ऐकल्यावर खूप शांतता आणि समाधान मिळते यावर त्यांचा विश्वास होता.

२५) बैजू बावरा चित्रपटातील ‘तू गंगा की मौज मैं जमुना की धारा’ हे गाणे रेकॉर्ड करताना लताजींना १०२ डिग्री ताप होता. रेकॉर्डिंगच्या अखेरीस तर तापामुळे त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. पण हे गाणे ऐकताना हे कुठेही जाणवत नाही !

२६) ४०च्या दशकाच्या सुरवातीला ‘बडी माँ’ या चित्रपटात लताजींनी एक छोटीशी भूमिका केली होती. या चित्रपटाच्या अभिनेत्री नूरजहाँ होत्या. त्याआधी त्यांचेच ‘खाचांजी’ चित्रपटातील गीत एका स्पर्धेत गाऊन लताजींनी बक्षीस मिळवले होते. त्यांची आणि नूरजहाँची प्रथम भेट या ‘बडी मां’ चित्रीकरणादरम्यान कोल्हापूरला झाली आणि नूरजहाँ ने लहानग्या लताला ‘तू पुढे खूप मोठी गायिका होशील’ असा आशीर्वाद दिला, तो पुढे अत्यंत खरा ठरला.

२७) १९४७ नंतर भारत सोडून गेल्यावरही नूरजहाँ आणि लताजींचा स्नेह कायम होता. पाकिस्तानवरून बऱ्याचदा नूरजहाँ लताजींना फोन करताना ‘धीरे से आजा री अंखियन मे’ हे गाणे ऐकवण्याची विनंती करायच्या आणि अर्थात लताजी त्या पूर्ण करायच्या.

२८) एके निवांत रात्री उस्ताद बडे अली खान रेडिओ ऐकत असताना लताजींचे ‘ये जिंदगी उसिकीं है’ हे अनारकली सिनेमातील गाणे लागले, तेव्हा ‘कम्बख्तत, ये लडकी कभी बेसुरी नही होती !’ हे प्रशंसेचे उद्गार त्यांनी काढल्याचे सर्वविदित आहे.

२९) ‘महल’ आणि इतर चित्रपटातील रेकॉर्डस् वर जरी गायिका म्हणून लताजींचे नाव नसले तरी नंतर अभिनेत्रींच्या भूमिकेचे नाव रेकॉर्डस् वर देण्याची ही पद्धत नंतर बदलली आणि बरसात ह्या १९४९ च्या चित्रपटापासून लताजींचे नाव पहिल्यांदा रेकॉर्डस् वर आले !

३०) लताजींनी गाण्याचे शब्द छचोर वाटतात म्हणून ‘संगम’ चित्रपटातील ‘मैं का करू राम मुझे बुड्ढा मिल गया’ हे गाणे गायला नकार दिला होता. राज कपूर यांनी ‘हे गाणे फक्त गंमत म्हणून चित्रपटात आहे’ हे समजावून सांगितल्यावर त्यांनी ही गाणे गायिले.

३१) गाण्यांच्या शब्दांच्या याच कारणास्तव त्यांनी १९५३ सालच्या ‘बूट पॉलिश’ या चित्रपटातील ‘मैं बहारों की नटखट रानी’ हे गाणे पण गायिले नाही. हे गाणे नंतर आशाजीनी गायिले !

३२) हिंदी सिनेमाच्या सर्व प्रमुख संगीतकारांपैकी फक्त ओ.पी. नय्यर यांनी लताजींचा आवाज कधीही आपल्या संगीतात वापरला नाही !

३३) संगीता व्यतिरिक्त लताजींना फोटोग्राफीची आवड आणि मुळापासून माहिती आहे. कॅमेरा आणि त्याची तांत्रिक अंगे त्यांना चांगल्या रीतीने ठाऊक आहेत. ज्वेलरी डिझाईन ही त्यांची दुसरी प्रमुख आवड !

३४) सामान्यतः स्त्रिया चांदीचे पैंजण वापरतात पण लताजींचे पैंजण हे नेहमी सोन्याचे असतात. श्रेष्ठ गीतकार आणि मंगेशकर कुटुंबाचे स्नेही पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सांगण्यावरून त्यांनी पैंजण कधीही चांदीचे घातले नाहीत.

३५) लताजींना शक्यतो माईकसमोर जाण्याच्या आधी आपली पादत्राणे काढून ठेवायची सवय आहे. लंडनच्या अल्बर्ट हॉल येथे कार्यक्रम करताना त्या हे करायला गेल्या तेव्हा तेथील थंडीमुळे आयोजकांना त्यांना पादत्राणे घालायची विनंती करावी लागली !

३६) अभिनेत्री मधुबाला बऱ्याचदा तिची सर्व गाणी फक्त लताजी म्हणतील असा आग्रह निर्माता/दिग्दर्शकांकडे करायची. अनेकदा आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ती तसे नमूद करण्याचा आग्रह करायची !

३७) ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट संगीतकार म्हणून राज कपूर यांनी हृदयनाथजी याना देतो म्हणून कबुल केल्यावर नंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल याना दिला. या कारणामुळे या चित्रपटाची गाणी गायला लताजीची इच्छा नव्हती . राज कपूर आणि स्वतः हृदयनाथ जी यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी या चित्रपटाची गाणी गायली.

३८) १९४२ ते १९४८ पर्यंत संघर्ष करताना आणि वेगवेगळ्या स्टुडिओत पोचताना लताजी लोकल आणि बसनेच जायच्या. १९४८ साली त्यांनी त्यांची पहिली कार ‘ग्रे हिल्मन’ घेतली आणि हा लोकलचा प्रवास थांबला.

३९) त्यांची सध्याची कार मर्सिडीज आहे. वीर झारा या चित्रपटाकरिता त्यांनी एक पैसाही मानधन घेतले नाही तेव्हा निर्माते दिग्दर्शक यश चोप्रा यांनी ही मर्सिडीज त्यांना भेट दिली.

४०) सगळ्या संगीतकारांशी लताजींचे संबंध सौहार्दाचे असले तरी मदन मोहन यांच्याशी मात्र भावाचे नाते होते. मदन मोहन यांची मुले संजीवजी आणि संगीताजी यांना सुद्धा त्यांनी मुलासारखा लळा लावला.

४१) मंगेशकर हे त्यांचे आडनाव जगात प्रसिद्ध असले तरी त्यांच्या वडिलांच्या घराण्यात हर्डीकर हे नाव होते. काहीजण ‘अभिषेकी’ हे आडनाव होते असेही सांगतात.

४२) लताजी २० वर्षाच्या आसपास असताना त्यांना एक स्वप्न सारखे यायचे ज्यात त्या एका मंदिराच्या पायऱ्यांवर बसल्या आहेत आणि खाली समुद्राच्या लाटा येऊन त्यांच्या पायाला स्पर्श करताहेत ! लताजींच्या आई, माई मंगेशकर यांनी याचा अर्थ ‘तुला देवाचा आशीर्वाद आहे. एक दिवस तू खूप मोठी होशील’ असा सांगितला. ही घटना १९४८ च्या आसपासची असावी.

४३) त्यांचे नाव ४०च्या दशकाच्या शेवटी बऱ्यापैकी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या रेडिओवरच्या बऱ्याच प्रशंसकांनी ‘लारा लप्पा लारा लप्पा लाई रखदा’ आणि ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ या गाण्यांबद्दल मात्र ‘त्यांनी अशी सुमार आणि हलक्या अर्थाची गाणी गाऊ नयेत” म्हणून तीव्र नापसंती दर्शवली होती. अर्थात आज ही गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत.

४४) लहान असताना लताजी थोर गायक के. एल. सैगल यांच्या गायनाबद्दल वेड्या होत्या. त्या लहान वयात लग्नाचा अर्थ माहिती नसताना सुद्धा ‘मी लग्न करीन तर के.एल. सैगलशीच’ असा त्यांचा बालहट्ट होता ! मात्र १९४७ मध्ये सैगल साहेबांचा मृत्यू होईपर्यंत त्यांची आणि सैगल साहेबांची कधीही भेट झाली नाही.

४५) लताजींनी शोभना समर्थ , नंतर त्यांच्या मुली नूतन आणि तनुजा आणि नंतर तनुजाची मुलगी काजोल अशा तीन पिढ्यांसाठी गाणी म्हटली. तीन पिढ्यांतील नायिकांसाठी एकाच गायिकेने गाणी म्हटल्याचे हे बहुधा एकमेव उदाहरण असावे ! ( शोभना समर्थ : सिनेमा : नृसिंह अवतार १९४९ )

४६) गाणे रेकॉर्ड करायच्या आधी लताजी आपल्या हस्ताक्षरात गाणे हिंदीत लिहून घेतात. कागदावर सुरवातीला श्री लिहिलेले असते. मग त्या लिहिलेल्या गाण्यात कुठे पॉज घायचा, कुठल्या शब्दांवर जोर द्यायचा, कुठे श्वास घ्यायचा याबद्दल खास त्यांचा खुणा असतात.

४७) गाण्यातील शब्दांचे महत्व, त्यांचे उच्चारण आणि कुठल्या शब्दांवर त्याच्या अर्थानुसार जोर द्यायचा याचे प्राथमिक महत्व संगीतकार गुलाम हैदर साहेबानी त्यांना सांगितले. तेव्हापासून शब्दोच्चरावर लताजींचा नेहमी कटाक्ष आहे.

४८) लताजींच्या विरह गीतांनी श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू येत असले तरी स्वतः लताजींना दुःखी चित्रपट फारसे आवडत नाहीत. उलट त्यांना खेळकर, गंमतीप्रधान चित्रपट जास्त आवडतात. सीआयडी ही त्यांची आवडती सिरीयल होती/आहे. आणि माता हारी हा ४०च्या दशकातील गुप्तहेरप्रधान इंग्रजी चित्रपट त्यांचा पाहिलेला पहिला इंग्रजी चित्रपट आहे.

४९) लताजी गाणी गाताना श्वास कसा आणि कुठे घेतात याबद्दल पुष्कळ लोकांना कुतूहल आहे, कारण त्यांच्या गाण्यात अशी श्वास घेतल्याची जागाच आढळत नाही. श्वासोश्वासाचे हे तंत्र त्यांना अगदी सुरवातीला संगीतकार अनिल बिश्वास यांनी शिकवले होते आणि ते त्यांनी समर्थपणे हाताळले.

५०) संगीतकार सज्जाद हुसेन हे अगदी परखड आणि फटकळ बोलण्यासाठी प्रसिद्ध होते. पण लताजींबद्दल बोलताना मात्र त्यांनी काढलेले उद्गार ‘एक लता गाती है, बाकी सब रोती है’ प्रसिद्ध आहेत !

५१) १९५९ सालापर्यंत फिल्मफेअर अवॉर्ड्स मध्ये गायकांकरिता कुठलेही अवॉर्ड नव्हते. याचा निषेधार्थ लताजींनी १९५७च्या फिल्मफेअर अवॉर्ड्स कार्यक्रमात ‘रसिक बलमा’ ही गाणे गायला नकार दिला. पुढे १९५९ सालापासून गायकांकरिता असे अवॉर्ड आले. आणि १९६७ पासून स्त्री आणि पुरुष गायकरिता स्वतंत्र अवॉर्ड्स सुरु झालीत.

५२) ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम’ या ‘वह कौन थी’ सिनेमातील गाण्याचे शूटिंग साधनावर करायची तयारी झाली पण लताजी लंडनला असल्याने गाणे लताजींच्या आवाजात तोपर्यंत रेकॉर्ड झाले नव्हते. शूटिंग वाया जाऊ नये म्हणून मग संगीतकार मदन मोहन यांनी स्वतःच्या आवाजात ही गाणे रेकॉर्ड केले आणि या पुरुषी आवाजावर साधनाला गाणे शूट करावे लागले ! नंतर हे गाणे लताजींच्या आवाजात रेकॉर्ड होऊन चित्रपटात आले !

५३) फोटोग्राफी प्रमाणेच लताजींना क्रिकेटची सुद्धा प्रचंड आवड आहे आणि सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर त्यांचे अत्यंत आवडीचे खेळाडू आहेत. सचिन तर त्यांना आईसमानच मानतो !

५४) ८०च्या दशकात कॅनडा दौऱ्यात असताना त्यांनी तेथील प्रसिद्ध गायक ऑने मरे याने गायिलेले ‘यु निडेड मी’ हे संपूर्ण इंग्रजी गाणे गायिले होते. त्यांनी गायिलेले हे बहुधा एकमेव इंग्रजी गाणे !

५५) हिंदी सिने संगीतात त्यांचे नाव जगविख्यात असले तरी त्यांना पाश्चात्य शास्त्रीय संगीत आणि त्यातील बीथोवन आणि मोझार्ट यांच्या सुरावटी ऐकायला फार आवडतात.

५६) सुरवातीच्या संघर्षाच्या काळात स्टुडिओ ते स्टुडिओ अशी पायपीट त्यांनी केली असली तरी आज त्यांचा स्वतःचा स्टुडिओ आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांचा लता मंगेशकर स्टुडिओ आणि ‘एल. एम. म्युजिक’ नावाने त्यांची कंपनी देखील आली आहे.

५७) सध्याच्या काळात त्यांनी हिंदी सिने संगीत जवळपास बंदच केले असले तरी भक्तीगीतांचे अल्बम त्या गातात. अगदी अलीकडे वयाच्या ८८-९० व्य वर्षी त्यांनी भक्तीगीतांच्या अल्बम मध्ये आवाज दिला आहे.

५८) कुणाही स्त्रीला आवड असावी तशी त्यांना हिऱ्यांची खूप आवड आहे आणि स्वतःचे हिऱ्यांचे दागिने त्या स्वतःच डिजाईन करतात.

५९) ४०च्या दशकात हिंदी सिनेमात गायन सुरु केल्यानंतर सगळी मंगेशकर बहीण भावंडे आईसोबत मुंबईतील नाना चौक येथे दोन खोल्यांच्या घरात राहायचे. १९६० मध्ये त्यांनी प्रभुकुंज या पेडर रोडवरील बिल्डिंग मध्ये एक पूर्ण मजला घेतला आणि गेली ६० वर्षे त्या तिथेच राहताहेत.

६०) ४० दशकातील सुरवातीची काही वर्षे हिंदी सिने संगीतात लताजींचा सूर काहीसा अनुनासिक वाटेल. कदाचित त्यावेळच्या प्रसिद्ध गायिकांचा किंवा त्या वेळच्या ट्रेंडचा तो परिणाम असेल. पण काही काळातच लताजी आपल्या मोकळ्या आवाजात गाऊ लागल्या. १९४६ सालच्या ‘सौभद्र’ चित्रपटातील ‘सांवरिया हो, बांसुरीया हो’ हे गाणे याचे द्योतक आहे. १९४९ पासून हा आवाज पूर्णपणे मोकळा झाला !

६१) १९४९ साली राज कपूर यांच्या बरसात चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी उद्या या म्हणून एक देखणा तरुण लताजींच्या घरी सांगायला आला. तेव्हा लताजींनी आशा ताईंना ‘राज साहेबांच्या ऑफिसची निरोप देणारी माणसे सुद्धा स्मार्ट दिसतात’ असे गमतीने म्हटले. दुसऱ्या दिवशी रेकॉर्डीं करताना कळले की तो घरी आलेला स्मार्ट युवक म्हणजे संगीतकार शंकर-जयकिशन मधील जयकिशन होते !

६२) ९०च्या दशकात आलेला आणि उस्ताद झाकीर हुसेन यांनी संगीत दिलेला ‘साज’ हा चित्रपट त्यांच्या आणि आशाताईंच्या जीवनावर असल्याचे म्हटले जाते. अर्थात चित्रपटात तसे कुठे म्हटलेले नाही किंवा लताजी किंवा आशा ताई यांनी सुद्धा तशी काही वाच्यता केली नाही.

६३) लताजींनी पिता-पुत्रांच्या अनेक संगीतकार जोड्यांच्या गाण्यांना आवाज दिला आहे. सचिनदेव बर्मन-आर डी बर्मन, रोशन-राजेश रोशन, चित्रगुप्त-आनंद मिलिंद, शंभू सेन-दिलीप समीर सेन, कल्याणजी-आनंदजी-विजू शाह,मदन मोहन-संजीव कोहली अशा आणि इतरही संगीतकार पिढ्यांसोबत गायन केलेय !

६४) त्यांच्याशी नामसाध्यर्म्य असलेल्या इतर गायिकांसोबत त्यांची गाणी आहेत. अगदी सुरवातीच्या काळातील ‘पहिली मंगळागौर’ चित्रपटात स्नेहलता प्रधान या गायिकेसोबत, ‘चूप चूप खडे हो’ या गाण्यात प्रेमलता सोबत तर कच्चे धागे या आणि इतर चित्रपटात हेमलता सोबत त्यांची द्वंद्व गीते आहेत !

६५) जंगली चित्रपटातील ‘एहसान तेरा होगा मुझपर’ हे गाणे गायला कठीण गेल्याचे लताजी यांनी एकदा सांगितले होते. कारण मुळात हे गाणे प्रथमतः पुरुषी आवाजाकरिता तयार केल्या गेले होते आणि त्यात मुखडा आणि कडवे यात खूप चढ उतार आहेत !

६६) लेकिन हा चित्रपट लताजींनी निर्मित केलेला चित्रपट आहे. चित्रपटाच्या नामावलीत मात्र हृदयनाथजी यांचे नावसुद्धा निर्माता म्हणून आहे.

६७) इंदोर येथे २८ सप्टेंबर १९२९ रोजी जन्म झाल्यानंतर त्यांचे नाव हेमा ठेवल्या गेले. असे म्हणतात की तेव्हा आडनाव हर्डीकर असे होते. नंतर त्यांचे नाव बदलून ‘लतिका’ असे ठेवल्या गेले कारण दीनानाथजींच्या भावबंधन या संगीत नाटकातील एका स्त्री पात्राचे ते नाव होते. नंतर गोव्याच्या मंगेशी या कुलदैवताचे स्मरण म्हणून आडनाव सुद्धा हर्डीकर वरून मंगेशकर झाले असे सांगतात. म्हणून हेमा हर्डीकर याचे रूपांतर लता मंगेशकर असे झाले !

६८) लताजींना ६ वेळा फिल्फेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर त्यांनी त्या स्पर्धेतून दुसऱ्या गायिकांना संधी मिळावी म्हणून माघार घेतली. याशिवाय त्यांना ३ वेळा राष्ट्रीय पारितोषिक, भारतरत्न आणि किमान १० विद्यापीठांची डी.लिट.ही पदवी मिळाली आहे.

६९) हृदयनाथजी यांच्या म्हणण्यानुसार लताजींचा आवाज सातही स्वरात आणि सगळ्या २८ श्रुतींना स्पर्श करू शकतो. अशी किमया असणाऱ्या त्या बहुधा एकमेव गायिका असाव्यात. पुरुषी आवाजामध्ये बडे गुलाम अली खान साहेब यांच्या बाबत असे म्हटले जाते.

७०) त्यांचे ‘जिस देश मे गंगा बहती है’ या चित्रपटातील ‘आ अब लौट चले’ या गाण्यातील ‘आजा रे…. आ जा ..’ ही तान ऐकली तर मानवी आवाज अंतिमतः जिथे पोहचू शकतो त्या सप्तकाच्या शेवटच्या ठिकाणास स्पर्श करणारा आणि तरीही तेथे स्थिर राहून अजिबात विचलित न होण्याची किमया साधणारा हा अद्भुत आवाज आहे.

७१) ‘आझाद’ चित्रपटातील ‘अपलम चपलम’ ही गाणे उषा मंगेशकर यांचे हिंदी सिनेमातील दुसरेच गाणे आणि लताजींसोबत प्रथम द्वंद्व गीत. पण हे गीत गाताना उषाजी खूप नर्वस होत्या. त्यांना लताजींनी समजावून धीर दिला तेव्हा हे गाणे रेकॉर्ड झाले आणि आता ते या चित्रपटातील एक प्रमुख लोकप्रिय गाणे आहे !

७२) हिंदी सिनेमात लताजी आणि आशाजी यांची जवळपास ९३ द्वंद्व गीते आहेत. दोघींचीही शैली वेगवेगळी असली तरी दोन स्त्री गायिकांनी गायिलेली द्वंद्वगीतांची ही महत्तम संख्या म्हणावी लागेल !

७३) ‘अंदाज’ चित्रपटात ‘डरना मुहब्बत करले’ या गाण्याच्या वेळी गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची लताजींची प्रथमतः भेट झाली, त्यावेळी संगीतकार नौशाद यांनी ‘बिलकुल नूरजहाँ की तरह गाती है, लेकिन पतली आवाज मे’ अशी ओळख करून दिली. पुढे मजरुह साहेब लताजी आणि कुटुंबियांचे घनिष्ठ मित्र झाले.

७४) ६० च्या दशकाच्या मध्यात लताजींना अचानक आवाजाचा त्रास आणि सतत उलट्या होऊ लागल्या. अन्नातून विषप्रयोग केल्या गेल्याच्याही बातम्या तेव्हा आल्या. त्याचा स्वयंपाकी सुद्धा तेव्हा अचानक घर सोडून निघून गेला. या घटनेनंतर बरीच वर्षे उषाजींनी स्वयंपाकघर सांभाळले !

७५) ‘आज फिर जिने की तमन्ना है’ हे लताजींचे गाईड सिनेमातील अतिशय लोकप्रिय गाणे तेव्हा मात्र देव आनंद याला आवडले नव्हते आणि ते चित्रपटात न ठेवण्याचा निर्णय त्याने घेतला होता. त्याचा लहान भाऊ आणि गाईडचा दिग्दर्शक गोल्डी उर्फ विजय आनंद याने त्याला शूट केलेले गाणे पाहून एकदा निर्णय घे असे सांगितले आणि देव आनंद चे मत बदलले !

७६) अगदी सुरवातीच्या काळात लताजींचे गुरु अमानत खान साहेब यांनी एकदा संगीतकार सज्जाद हुसेन साहेबाना सांगितले की त्यांच्याकडे लता नावाची विद्यार्थिनी आहे आणि अतिशय हुशार आणि काहीही सांगितले तरी चटकन आत्मसात करणारी आहे. कुठलीही तान, मुरकी असो, ती कधी चुकत नाही. पुढे ‘हलचल’ या सिनेमाच्या वेळी सज्जाद हुसैन साहेबाना लताजींच्या गाण्यात याचा पूर्ण प्रत्यय आला !

७७) मन्ना डे यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की सामान्यतः पुरुष गायकांचा पीच हा स्त्री गायिकांपेक्षा जास्त असतो. पण लताजी आणि आशाजी बाबत असे अजिबात नाही. त्या कुठल्याही पीच वर पोहोचू शकतात. ‘दैया रे दैया रे कैसो रे पापी बिच्चूवा’ या ‘मधुमती’ सिनेमातील गाण्यात माझ्या ओळींनंतर ज्या प्रकारे लता ‘ओये ओये ओये ओये’ करीत गाण्यात येते ते ऐकून मी स्तंभित झालो होतो असेही त्यांनी यात म्हटले होते !

७८) बऱ्याच संगीतकारांचे असे म्हणणे होते आणि आहे की लताजींच्या आवाजात प्रसाद गुण आहे. त्यामुळे भक्तिगीते, हळुवार प्रेमगीते, भावगीते या प्रकरण त्यांचा आवाज अगदी चपखल आहे. त्यामुळे या प्रकारातील त्यांची गाणी विशेष लोकप्रिय आहेत.

७९) संपूर्ण जग जरी लताजींची गाणी दररोज ऐकत असले तरी स्वतः लताजी घरी असताना पंडित भीमसेन जोशी, उस्ताद बडे गुलाम अली खान किंवा मेहदी हसन साहेब यांचे गायन ऐकणे पसंत करतात.

८०) यश चोप्रा यांचा ‘चांदनी’ हा चित्रपट आणि त्यातील गाणी हीट झाल्यानंतर त्यांनी त्याचा तेलगू रिमेक बनवला. त्यात लताजींनी प्रत्येक तेलगू शब्द काळजीपूर्वक शिकून पूर्ण चार गाणी गायली. आज कुणाही तेलगू व्यक्तीस विचारले तर या गाण्यातील तेलगू शब्दोच्चरात बारीकशी सुद्धा चूक आढळणार नाही !

८१) १९७२ च्या ‘मीरा’ सिनेमासाठी संगीतकार आणि थोर सतारवादक पंडित रविशंकर याना खरे तर लताजींचाच आवाज हवा होता. पण त्याआधीच लताजींनी गायिलेल्या मीराबाईच्या भाकीतीगीतांचा अल्बम आला असल्याने ते होऊ शकले नाही. मग या सिनेमाची गीते वाणी जयराम यांनी गायिली.

८२) प्रभुकुंज या त्यांच्या इमारतीतील घराच्या दरवाजावर त्यांच्या इंग्रजी सहीची नेम प्लेट आहे. ही सही त्यांच्या देवनागरी सहीसारखीच पल्लेदार आणि लयदार आहे !

८३) लताजींचे स्वतःचे नाव असलेले १९५१ च्या ‘दामन’ चित्रपटातील के दत्त यांनी संगीतबद्ध केलेले ‘गाये लता गाये लता’ हे गाणे असे एकमेव असावे ! याच चित्रपटाततील ‘ये रुकी रुकी हवायें’ हे लता-आशा यांचे पहिले द्वंद्व गीत आहे !

८४) लताजींवर अनेक पुस्तके निघाली असली तरी दोन वर्षांपूर्वी त्यांच्याच धाकट्या भगिनी मीना खडीकर यांनी ‘मोठी तिची सावली’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्याच धाकट्या भगिनींनी लिहिले असल्याने कदाचित यापेक्षा जास्त अधिकृत माहितीचा स्रोत असणारे दुसरे पुस्तक नसावे. याचा इंग्रजी अनुवाद मीनाजींच्या कन्या रचना शाह या करताहेत ! याच्या आधी ‘Lata : In her own voice ‘ हे नसरीन मुन्नी कबीर यांचे पुस्तक लताजींच्या मुलाखतींवर आधारित आहे आणि म्हणून अधिकृत आहे. .

८५) लताजींच्या आवाजाच्या अतिशय उंच पीच आणि रेंज मुळे हिंदी सिनेसंगीतात बऱ्याच संगीतकारांनी त्यांची बव्हांशी गाणी उंच सप्तकात ठेवली. पण त्यांची अतिशय हळुवार आणि मंद्र सप्तकातील गाणी ‘कुछ दिल ने कहा’, ‘दिल का दिया जला के गया’, ‘अपने आप रातो में’ किंवा ‘ऐ दिल ए नादान’ ही गाणी सुद्धा अमाप लोकप्रिय आहेत.

८६) संयोगवश ‘लता मंगेशकर’ या नावात सात सुरांप्रमाणे सात अक्षरे आहेत. आणि ल-ता या अक्षरांचा लय आणि ताल यांच्याशी दृढ सांगीतिक संबंध आहे !

८७) जवळपास २१०० हिंदी चित्रपटात गायन, १७५ संगीतकारांकडे गाणी, आणि अंदाजे २५० गीतकारांची गीते लताजींनी गायिली. त्यांच्या हिंदी सिनेसंगीतातील गाण्यांची संख्या ५१०० चे वर आहे आणि एकूण गाण्यांची संख्या साधारणतः ७००० चे वर आहे.

८८) अमर अकबर अँथनी या चित्रपटातील ‘हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे’ या गाण्यात, चित्रपटाच्या तीन हिरोना ( अमिताभ, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर ) तीन पुरुष गायकांचे आवाज आहेत ( किशोर, मुकेश आणि रफी ) मात्र सोबतच्या तीनही हिरोइन्स साठी फक्त एकच आवाज आहे आणि तो लताजींचा ! विशेष म्हणजे या तीनही हिरोईनच्या भूमिकांचे स्वभाव वेगवेगळे असल्याने या गाण्यात लताजींचा आवाज प्रत्येकीकरिता वेगवेगळा वाटतो !

८९) मदन मोहन आणि लता यांची गाणी सगळ्यांना जीवापाड प्रिय आहेत. मदनजींकडे लताजींनी एकूण २२७ गाणी गायली त्यातही १७५ चे वर सोलो गाणी आहेत ! पण मदनजींच्या पहिल्या चित्रपटात ( आँखे १९५०) लताजींचे एकही गाणे नव्हते !

९०) १९४८च्या मजबूर चित्रपटातील ‘अब डरने की कोई बात नाही, अंग्रेजी गोरा चला गया’ या गाण्याच्या वेळी लताजी आणि मुकेश यांची प्रथम भेट झाली आणि १९७४ मध्ये अमेरिका दौऱ्यावर असताना डेट्रॉईट येथील कार्यक्रमाच्या आधी शेवटची भेट !. याच कार्यक्रमात हार्ट अटॅक येऊन मुकेश यांचा मृत्यू झाला !

९१) लताजींनी एकूण ३६ भारतीय भाषेत तर गाणी गायिली आहेतकेच. पण डच, फिजियन, रशियन, स्वाहिली आणि इंग्रजीत सुद्धा गायिले आहे ( मुख्यत्वे कार्यक्रम दरम्यान).

९२) आणि याशिवाय आपण सर्वजण आपल्या हयातीत हा दैवी आवाज प्रत्यक्ष ऐकला/ऐकतो आहोत ही सर्वात मोठी आणि अहोभाग्याची गोष्ट !!

संदर्भ: :

1) Lata : Voice of the Golden Era : Dr Mandar Bichu
2) Gandhar : Vishwas Nerurkar
3) Lata in her own voice : Nasreen Munni Kabir
4) Hindi film songs : Music and Boundaries : Ashok Ranade
5) On stage with Lata : Mohan Deora and Rachana Shah

6) Mothi Tichi Sauli : Meena Khadikar

********************************************

निरनिराळ्या मोठ्या व्यक्तींचे अभिप्राय

( Courtesy Pramod K Khandelwal )

●जो माहौल पैदा करते हुए हमें तीन घँटे लगते हैं, वह काम लता तीन मिनट में कर दिखाती है।
(उस्ताद अमीर ख़ान)
●सुर जब सही लगता है, तो आत्मा और परमात्मा का मिलन होता है। लता जी को सुन कर हमेशा यही अनुभव होता है।
(अमिताभ बच्चन)
●अगर ताज महल दुनिया का सातवाँ अजूबा है, तो फिर लता मंगेशकर को आठवाँ अजूबा मानना पड़ेगा।
(उस्ताद अमजद अली ख़ान)
●लता जब आई, तो हम संगीतकार आश्वस्त हो गए कि अब हम धुनें बनाते समय, संगीत की किसी भी गहराई तक डूब सकते हैं, और अगर हमारी धुन पेचीदा भी हुई, तो भी उसमें मिठास बनी रहेगी, क्योंकि लता के लिए कुछ भी गाना असम्भव नहीं है।
(अनिल बिस्वास)
●जो मिठास उनकी आवाज में है, वह उनके स्वभाव में भी है। उन्हें जानना और उनके साथ काम करना एक अनोखा अनुभव है।
(बी. आर. चोपड़ा)
●कमबख़्त कभी बेसुरी नहीं होती
(बड़े ग़ुलाम अली ख़ान)
●लता की ही वजह से आज जनसामान्य में शास्त्रीय संगीत लोकप्रिय हो चला है।
(पंडित भीमसेन जोशी)
●जिस क्षण लताजी ने मेरा पहला गीत गाने की शुरुआत की, उसी क्षण मैं जान गया था कि वह गीत अमर होगा। उनके लिए धुनें बनाना, अरे उनकी शताब्दि में जन्म पा कर उनका गायन सुन पाना भर सौभाग्य से कम नहीं।
(डॉ. भूपेन हज़ारिका)
●वैसे तो वह चन्द फ़ुट और चन्द इंच की, सफ़ेद साड़ी में लिपटी हुई, सहमी-सी एक लड़की है। पर उसकी आवाज़… वह तो रौशनी है, जो आलम के गोशे-गोशे में मौसीकी का उजाला फैलाती है। और आपके जो यह टेप और सी.डी. है, इनकी तो आनेवाली नस्लें अहसानमन्द होंगी कि इन्हीं पर लता का फ़न कुरेदा हुआ है। लेकिन दरहक़ीक़त ख़ुशकिस्मत तो वह हैं, जिनका उसके साथ उठना-बैठना रहा है…
(दिलीप कुमार)
●आज से 500 साल बाद, भारतीय संगीत के दो ही नाम याद किये जाएंगे—तानसेन और लता।
(छायाकार गौतम राज्याध्यक्ष)
●बुजुर्गों से सुना था कि सरस्वती और लक्ष्मी साथ नहीं रहतीं, लेकिन लताजी को देखिए…
(पंडित हरि प्रसाद चौरसिया)
●बड़ी खुशियाँ तो जिंदगी में चार-पाँच बार ही आती हैं। हमें ध्यान देना चाहिए जीवन के उन लाखों-करोड़ों क्षणों पर, जो लता के गीतों से प्रफुल्लित हैं।
(हृषिकेश मुखर्जी)
●हर किसी वस्तु का पर्याय मिल ही जाता है। अगर नहीं मिलता, तो लता जी की दैवी आवाज का।
(इल्लैयाराजा)
●बीसवीं शताब्दी की तीन ही बातें याद रहेंगी :

 1. लता मंगेशकर का जन्म
 2. चन्द्र पर मानव का पहला कदम
 3. बर्लिन दीवार का ध्वंस
  (जगजीत सिंह)
  ●लताजी ने हम पर बड़ा अहसान किया है कि वह क्लासिकल नहीं गातीं!
  (पंडित जसराज)
  ●हमारे पास एक चाँद है, एक सूरज है और एक लता मंगेशकर है।
  (जावेद अख़्तर)
  ●पार्श्वगायन की शुरुआत से पहले जो गीत गाए जाते थे, वह ‘गीत’ केवल इसीलिए कहे जाते थे कि उन्हें हम (अभिनेत्रियाँ) गाती थीं। लेकिन लता जब से गाने लगी, उसे असल में ‘गाना’ कहते हैं।
  (कानन देवी)
  ●बचपन से लताजी को सुनते-सुनते मुझे विश्वास हो चला है कि संगीत केवल मनोरंजन का जरिया नहीं, ईश्वर तक पहुँचने का मार्ग है।
  (कविता कृष्णमूर्ति)
  ●तानपुरे से निकलनेवाला गंधार शुद्ध रूप में सुनना चाहो तो लता का “आयेगा आनेवाला…” गीत सुनो।’
  (पंडित कुमार गन्धर्व)
  ●मेरे गीतों में रद्‌दो-बदल करने का हक़ गायकों में सिर्फ़ लता को ही हासिल है।
  (मजरूह सुलतानपुरी)
  ●लताजी के गाए करुण गीतों पर अभिनय करते हुए मुझे कभी ग्लिसरीन इस्तेमाल करने की जरूरत नहीं पड़ी।
  (नर्गिस दत्त)
  ●मैं नहीं जानता कि मदन मोहन लता जी के लिए बने थे, या लता जी मदन मोहन के लिए, लेकिन आज तक मदन मोहन जैसा संगीतकार नहीं हुआ, और लता जी जैसी गायिका नहीं हुई।
  (ओ. पी. नय्यर)
  ●लोता गायेगा न? फिर हम सेफ है।
  (एस. डी. बर्मन)
  ●लता गाती है, बाकी सब रोते हैं
  (सज्जाद हुसैन)
  ●सालों से मैंने लता को इतनी नजदीक से जाना है कि मेरा ख्याल था कि मैं उसे खुली किताब की तरह पढ़ सकता हूँ। लेकिन जब कभी मैं उसे माइक्रोफोन के सामने खड़ी देखता हूँ, तो लगता है कि यह व्यक्ति कौन है…? क्योंकि तब वह एक देवी की तरह हो जाती है। वह गाती है, तब उसके पैर छूने को मन करता है।
  (सलिल चौधरी)
  ●कामयाबी की चोटी पर तो कई पहुँचे, पर लता जी की बात और है। लता जी एक बार वहाँ पहुँचीं तो वहीं रहीं।
  (सलीम ख़ान)
  ●कई गायक तानपुरे के साथ सुर नहीं लगा पाते। दीदी का सुर इतना पक्का है कि आप दीदी के सुर पर तानपुरा मिला सकते हैं।
  (श्रीनिवास खळे)
  ●लताजी एक ही ऐसी हैं जिनकी फिल्म इण्डस्ट्री में हर कोई इज्जत करता है।
  (तलत महमूद)
  ●आम आदमी को इससे कोई मतलब नहीं कि राग मालकौंस था और ताल त्रिताल। उसे तो चाहिए वह मिठास, जो उसे आह्‌लाद दे, जिसका वह अनुभव कर सके। यही लता की लोकप्रियता का मुख्य मर्म है।
  (वि.स. खाण्डेकर)
  ●मेरी जीवनसंध्या के इन वर्षों में आजकल जब मैं शाम को टहलने निकलता हूँ, तब पश्चिम में डूबते सूरज की कलात्मक लालिमा मन को अवश्य आनंद देती है। पर लौटते वक्त, मेरी वृद्ध आँखों के सामने गहराते अँधेरे में, मुझे किसी कला की अनुभूति नहीं होती। निराशा की उस मनःस्थिति में भी मुझे दो ऐसी बातें मिल जाती हैं, जिससे विषाद की छाया छँट जाती है: एक तो रजनीगंधा फूलों की सुगन्ध और दूसरे, कहीं से आ रहा लता का मीठा स्वर।
  (वि.स. खाण्डेकर)
  ●उसमें आत्मविश्वास कूट कूट कर भरा हुआ है। लेकिन, साथ-साथ वह अन्तर्मुखी भी है, इसीलिए अभिमानी नहीं है। हाँ, स्वाभिमानी है और उसके गायन में गर्व खनकता है।
  (वसन्त ज़ोगलेकर)
  ●यदि किसी से पूछा जाए “क्या आपने अमृत चखा है”, तो तीन पीढ़ी के लाखों लोग जवाब देंगे, “जी हाँ, लता के गीतों के रूप (वसन्त साठे)
  🌻🌺🌸🥀🌹

श्री.रवी खोत यांच्या फेसबुकच्या फलकावरून साभार दि.०८-०२-२०२२

**********************************

तो एक दिवस मी जगलो…

. . . . . . . शिरीष कणेकर

मी मनाशी पक्क ठरविलं होतं की, काही झालं तरी मी या एका विषयावर लिहिणार नाही. नो म्हणजे नो! आलेल्या प्रत्येक अनुभवाचं लेखनासाठी भांडवल करायलाच हवं का? निदान एखादा तरी विषय, एखादा तरी अनुभव असा असू दे की, जो वाचकांबरोबर ‘शेअर’ करण्याचा अनावर मोह मी आवरलाय. आता इतक्या दिवसांनंतर वाटतंय की, माझ्या आनंदडोहापासून वाचकांना कटाक्षानं दूर ठेवणं योग्य नाही. माझ्या आनंदात आनंद शोधणाऱ्या दिलदार वाचकांना त्यापासून वंचित ठेवणं उचित नव्हतं. हा नवा विचार बदलण्याच्या आत मी लेखणी उचलल्येय व आता लेख संपवूनच खाली ठेवीन.

तीसएक वर्षे झाली असतील. हो, बरोबर. साल १९८७. काय माझ्या डोक्यात किडा वळवळला देव जाणे, मी साक्षात लता मंगेशकरला फोनवरून जेवणाचं निमंत्रण दिलं. तेव्हा आजच्यापेक्षाही मला अक्कल कमी असावी. डायरेक्ट लता? देवाकडे फोन नाही, नाहीतर त्यालाही बोलवायला मी कमी केलं नसतं. अर्थात लताला बोलावणं हे देवाला बोलावण्यापेक्षा कुठे कमी नव्हतंच. माझ्या महत्त्वाकांक्षेनं सगळय़ा सीमा ओलांडल्या होत्या. खरं आश्चर्य पुढेच होतं. तिनं तात्काळ माझं निमंत्रण स्वीकारलं. दिवसही ठरला. फोन ठेवल्यावर मी सुन्न बसून राहिलो. हे काय घडत होतं? लता भाटिया बिल्डिंगच्या पायऱ्या चढून माझ्या खोपटात येणार? ती अशी सामान्य माणसांच्या घरी जाते? तेही जेवायला? लताबरोबर मी इंग्लंडच्या राणीला पंक्तीला बोलावू का? नसेना का माझी ओळख, लता येत्येय म्हटल्यावर ती धावत येईल.

अनेक काळज्यांनी माझ्या मेंदूला मुंग्या आणल्या. मेनूतील पदार्थांचं काँबिनेशन काय असावं? कालवणं फिलवणं असे वहाते प्रकार नकोत. शाकाहारी जिन्नसाचा तोंडी लावण्यापुरताही चर्चेत उल्लेख नव्हता. लताला बोलावून काय चिंचगुळाची आमटी द्यायची? तेदेखील सी.के.प्या.च्या घरी? काय म्हणेल ती? काय म्हणेल जात? मला सी.के.पी. फुड फेस्टिव्हलला येऊ देतील का? मला ज्ञातीबाहेर नाही टाकणार? मला सुटसुटीत हवं होतं कारण मला ती बेडरूम-कम-डायनिंग रूम-कम-पसारा रूममध्ये यायला नको होती. तिथलं सगळं विहंगम दृश्य पाहून लताची वाचा बसली असती व पुढे काही महिने ती गाऊ शकली नसती. तेव्हा म्हटलं जे काही रणकंदन व्हायचं ते बाहेरच्या खोलीत होऊ दे. ती आदर्श होती अशातला भाग नाही, पण दुसरा पर्याय काय होता?

सुनील गावसकर आला होता तेव्हा बायको शेजारच्या घरातून टेबल फॅन आणायला निघाली होती. नशीब तिनं रातोरात अख्खं घर ए.सी. नाही करून घेतलं. स्टिल बेटर, तिनं लोखंडवाला काँप्लेक्समध्ये भलामोठा फ्लॅट घेण्याचं टुमणं नाही लावलं. गावसकर येऊन गेला की, फ्लॅट विकायचा. एका दिवसापुरता घ्यायचा. लताच्या शाही स्वागतासाठी तिनं मला दारात हत्ती म्हणून उभं केलं नाही हे काय कमी झालं? सुनील काय किंवा लता काय, माझ्याकडे येत होते, माझ्या ऐश्वर्याची वर्णने वाचून नव्हे हे तिला कोण सांगणार? आपण जसे आहोत तसे आहोत. त्यापेक्षा लताला ‘इंप्रेस’ करायला तिला गाऊन दाखवायचं का?… गावसकर आल्या आल्या माझ्या छोटय़ा मुलानं दारातच त्याला विचारलं होतं- ‘‘तुझा हात मोडू का?’’

‘‘नको.’’ गावसकर म्हणाला, ‘‘राहू दे काही दिवस.’’

त्यानं एकाएकी असा प्रश्न का विचारावा हेच मला कळत नव्हतं. इतके दिवस तो बापावर गेलाय असं मी अभिमानानं मिरवत होतो. ‘‘तुझा गळा आवळू का?’’ असं त्यानं लताला विचारलं तर? माझ्या तळहातांना घाम सुटला.
एका गोष्टीबाबत मात्र मी निःशंक होतो. जेवण, स्वयंपाक बायको जे काही करेल ते अप्रतिम असेल याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही संदेह नव्हता. त्रिभुवनात तिच्यासारखे खिमा पॅटिस कोणी करीत नसेल.

त्या दिवशी सकाळीच लताचा फोन आला. ‘‘मला किनई बरं वाटत नाही.’’ तिनं सुरुवात केली, ‘‘पहाटे मला उलटी झाली. अॅसिडिटी फार वाढल्येय.’’ माझं मन मटकन खाली बसलं. तोंड एकदम कडू झालं. असंच व्हायचं आमच्या बाबतीत. तरी म्हटलं लता कुठली यायला माझ्या गरीबाच्या घरी?

‘‘नाही-नाही. मी येत्येय तुमच्याकडे.’’ लता मनकवडी असल्यागत म्हणाली, ‘‘मी हे सांगायला फोन केला की, मी काही खाणार मात्र नाही. तुम्ही उगीच काही करत बसाल म्हणून सांगितलं.’’

‘‘ठीक आहे- ठीक आहे.’’ मी जीव भांडय़ात पडून म्हणालो. लता येणं महत्त्वाचं होतं. दुपारी तीन-चारच्या सुमाराला लताच्या सेक्रेटरीचा फोन आला- ‘‘दीदी निकल पडी है स्टुडियों से. बस्स, पहुँचही गयी होगी आपके यहाँ.’’

मी घाईघाईनं फोन ठेवला व चपला पायात सरकवून धावलो. मी खाली पोहोचायला व लताची गाडी फाटकातून आत शिरायला एकच गाठ पडली. माझी छाती धडधडत होती. तो गाडीच्या इंजिनाचा आवाज आहे असं मी मनाला समजावलं. आमच्या सिंधी कॉलनीत काहीच ‘हलचल’ झाली नाही. मला नेहमी वाटत आलंय की, मधल्या चौकात जर पाटपाणी घेतलं तर माणसं घरातून बाहेर पडून पाटावर मांडी घालून जेवायला बसतील. लताच्या हातात एक कागदाचं पुडकं होतं. ती आत्ताच गाऊन आलेल्या गाण्याचं मानधन तर त्यात नसेल? ‘बावर्ची’मध्ये हरिंद्रनाथ चटोपाध्यायच्या खोलीतल्या तिजोरीकडे राजेश खन्ना वारंवार तिरका कटाक्ष टाकतो तसा अर्थपूर्ण कटाक्ष मी लताच्या हातातल्या पुडक्याकडे ती जाईपर्यंत टाकत होतो. लतापेक्षा तो यःकश्चित पैसा मला मोलाचा वाटला होता का? स्टुपिड कुठला! लता स्थानापन्न झाल्यावर मी तिला म्हणालो, ‘‘हे बघा दीदी, काही खाणार नाही हे तुम्ही आधीच सांगितलंय, पण खायला काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलं नाही तर थुत् आमच्या जिंदगानीवर. तुम्ही नका खाऊ, पण-’’

‘‘पण आता मी काहीही खाईन. मला बरं वाटतंय. शिवाय सॉलिड भूक लागल्येय. सकाळपासून पोटात काहीही नाही. त्यातून त्या कोरसवाल्या बायांनी हैराण केलं.’’ लता एका दमात पटदिशी म्हणाली.

त्यानंतरची आमची धावपळ बघण्यासारखी होती. स्टूल सरकवा… त्याच्यावरचे पेपर व पुस्तकं दिवाणावर ठेवा… कपाटाची फळी पाडा व अन्न त्यावर ठेवा… आमची त्रेधा पाहून लता उत्स्फूर्तपणे आम्हाला जॉइन झाली. ती पण कुठे काय ठेवा हे हिरिरीनं सांगू लागली. एकदम मी भानावर आलो. अरे, काय करतोय आम्ही? या रेटनं आम्ही लताला स्वयंपाकघरात पाठवून पापड तळून आणायला पाठवलं असतं आणि वर डिशेस किचन कॅबिनेटमध्ये खालच्या ड्रॉवरमध्ये आहेत हेही सांगायला कमी केलं नसतं.

आम्ही जेवण-कम-खाणं केलं होतं. पुरणपोळी (तेलपोळी बरं का, ती कामचलाऊ पीठपोळी नाही) करायचं सुचलंच नाही. कोलंबीची खिचडी व खिमा पॅटिस असा टिपिकल सी.के.पी. मेनू होता. गोड म्हणून खोबऱयाच्या वडय़ा. ती काही खायचंच नाही म्हणाली तर केशरयुक्त मसाला दूध व लिंबाचं सरबतही. लताला वाढल्यावर तिनं विचारलं, ‘‘तुम्ही नाही जेवत?’’ तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की, नवसाच्या, देवदुर्लभ पाहुणीच्या आधीच मी माझ्या वेळेला जेवून घेतलं होतं. माझ्या आजारांनी माझ्या जेवणाच्या वेळा ठरविल्या होत्या. लताही त्याला काही करू शकत नव्हती. मी उत्तरादाखल तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटलो. झोपेतून उठून बंद पडद्याआड उभी राहून फटीतून बघत माझी नखाएवढी चिमुरडी मुलगी म्हणाली, ‘‘ओ लता मंगेशकर (माझ्या छातीत धस्स झालं!), तुमचा आवाज गोड आहे.’’

‘‘गाण्याचा की बोलण्याचा?’’ लतानं विचारलं.

‘‘बोलण्याचा’’ माझी मुलगी उत्तरली. एवढय़ा गोड आवाजात बोलणारं तिनं कोणी ऐकलंच नव्हतं. पहिल्याच भेटीत लताबरोबर तिची जी गट्टी जमली ती आधी शिक्षणासाठी व नंतर लग्न करून अमेरिकेत निघून जाईपर्यंत कायम होती. तिच्या लग्नाला लता आली तेव्हा न राहवून मी विचारलं, ‘‘तुम्ही आवर्जून कशा आलात?’’

‘‘म्हणजे काय?’’ लता म्हणाली, ‘‘लहानपणापासून ती मला फ्रेंड म्हणत आल्येय. मग फ्रेंडच्या लग्नाला जायला नको?’’

कोलंबीच्या सुरमट खिचडीचा घास घेत लतानं विचारलं, ‘‘तुमची ‘ए’ बिल्डिंग ना? आशा ‘बी’मध्ये राहायची.’’

तो धागा पकडून मी विचारलं, ‘‘दीदी, तुमचं आशाचं सगळय़ात आवडतं गाणं कोणतं?’’

‘‘रोशनलालचं ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ ‘‘ती म्हणाली व लगेच गायलाच लागली. मी थरारलो व श्वास रोखून ऐकू लागलो. लता मंगेशकर माझ्या घरात बसून आशाचं गाणं गात होती. किती लोकांच्या भाग्यात हा सुवर्णयोग असेल? अण्णा असते तर म्हणाले असते- ‘‘मिस्टर शिरीष, सारखे रडत असता ना? आयुष्यातील या अपूर्व सुवर्णक्षणांची जाण ठेवा.’’

त्यानंतर लता गुणगुणतच होती. घराची वास्तुशांती झाली. आता वेगळी पूजा कसली? मी माझ्या संग्रहातले लताचे फोटो काढले. लता कोचावर मांडी घालून अगदी घरच्यासारखी बसली. पर्समधून चष्मा काढून तिनं चढविला व एकेक फोटो बघत बोलू लागली- ‘‘तलत, सलीलदा ‘रिमझिमके ये प्यारे प्यारे गीत’च्या वेळचा… हा मदनभैयांबरोबर. बहुधा ‘अकेली मत जईयो’च्या रेकॉर्डिंगचा… (एक गायक बशी चाटताना) जास्त झाली असावी… तिनं खिमा पॅटिस मागून खाल्ला. आम्हाला काय, शक्य असतं तर आम्ही पॅटिसचं तिच्याभोवती वारूळ उभं केलं असतं. ती हात धुवायला गेली. नेहमीप्रमाणे वॉश बेसिनला पाणी नव्हतं. मी लोटय़ानं तिच्या हातावर पाणी घातलं. ती म्हणाली, ‘‘असं कोणाच्या हातावर पाणी घालू नये. तुमची इस्टेट त्याला जाते.’’

‘‘मग तुम्ही माझ्या हातावर घाला.’’ मी म्हणालो.

लता खळखळून हसली. मला वाटलं, आपण आपल्या नसलेल्या आवाजात म्हणावं, ‘‘न हंसो हमपे हम है जमाने के ठुकराये हुवे’’ हे आपलं उगीच. ज्याच्याकडे साक्षात लता येते तो कसला जमान्यानं ठुकरवलेला?…

खोबऱयाची वडी तोंडात टाकत लता सहज म्हणाली, ‘‘मला आंबा घालून केलेल्या खोबऱयाच्या वडय़ा फार आवडतात.’’ काही दिवसांनी मी तिला आवडतात तशा आंब्याच्या खोबऱयाच्या वडय़ा तिच्याकडे घेऊन गेलो. माझ्या समोरच तिनं बॉक्स उघडला व आत कुंकवाची पुडी पाहून ती म्हणाली, ‘‘वहिनींनी केल्यात खोबऱयाच्या वडय़ा?’’

‘‘म्हणजे काय? अहो, विकतच्या वडय़ा आणण्यात काय मतलब? त्या काय, तुम्हीही आणू शकता.’’ माझ्यासमोर लतानं बॉक्समधल्या एक सोडून चार वडय़ा खाल्ल्या व मगच उरलेल्या वडय़ा आत नेऊन ठेवायला सांगितले. तिनं वडय़ा खाल्लेल्या बघण्यात मला किती आनंद, किती समाधान आहे हे तिला कळलं होतं. सामान्यांचं मन जाणण्याइतके तिचे पाय जमिनीवर होते. अत्युच्चपदी जराही न बिघडलेली ती थोर होती. लता माझ्याकडे येऊन (रीड ऍज ‘जेवून’) गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या बायकोनं तिला फोन केला व ती गलबलून म्हणाली, ‘‘अहो दीदी, आमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा. आम्ही हडबडून गेलो हो. साधं तुम्हाला ओवाळायचंही सुचलं नाही. सो सॉरी!’’

‘‘असं काय करता वहिनी?’’ लता तिची समजूत घालत मायाळूपणे म्हणाली, ‘‘अहो, किती मजा आली. मी खूप एंजॉय केलं. खिमा पॅटिसची चव अजून माझ्या जिभेवर आहे…’’

माझी बायको घळघळा रडायला लागली. आणि सातासमुद्रापलीकडे माझ्या एकपात्री प्रयोगानंतर रात्री ‘बेसमेंट’मध्ये गप्पा रंगल्या असताना माझ्या स्थानिक यजमानांनी मला विचारलं, ‘‘लता मंगेशकर वागायला अतिशय वाईट आहे हे खरं का?…’’

shireesh.kanekar@gmail.com

एक श्रद्धांजलि

प्रिय गानसरस्वती,

सकाळी सकाळी जाग यायची ती तुझ्या पहाटेच्या
उठा उठा हो सकळिक गाण्याने …

आणि सायंकाळ व्हायची ते
या चिमण्यांनो परत फिर रे ने

कधी एकटं वाटलं की तुझा आधार होता..

निज माझ्या नंदलाला ऐकवत कित्येक वेळा तुझ्या कुशीत नकळतपणे झोपलो…

पहाटे च्या भक्ती गीता पासून,
दिवाळी च्या पहिल्या दिवसापासून…

गणेशोत्सवात गणराज रंगी नाचतो
म्हणत तूच असायचीस..

प्रत्येक पूजेला तू घराघरात उपस्तीत होतीस…

अगदी प्रेमात पडलेल्या प्रत्येकाच्या मनामनात तू तुझ्या गाण्याने
त्यांच्या भावनेला आकार दिलास…

अगं,
प्यार किया तो डरना क्या,
प्यार किया तो कोई चोरी नही की

हे तूच तर शिकवलंस,

शायद मेरी शादी का खयाल,
म्हणत आजही बऱ्याच तरुणी स्वप्न रंगवत असतील,

लगजा गले म्हणत तू आजही कित्येक जणांना रडवतेस,

मुलगी सासरी जाताना च्या दुःखावर
लेक लाडकी या घरची होणार सून..
या गाण्याने तू कित्येक मनांवर फुंकर मारलीस…

अगं आई (लतादीदी),

कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या,
झुलतो बाई राज झुला म्हणत ,

कित्येक बाळांना तूच तर पाळण्यात ठेवलस,
कदाचित त्यात मी पण असेंन,

चंदा है तू,
मेरा सुरज है तू,
म्हणत आजही कित्येक आनाथांच्या ओठी हसू आणतेस,

यशोमती मैय्या से बोले नंदलाला
हे ऐकून कदाचित साक्षात श्रीकृष्ण ही तुझ्या प्रेमात पडला असेल,

ए मेरे वतन के लोगो म्हणत
इतक्या वर्षांनी आजही अंगावर काटा तूच आणतेस,
तुझ्या शिवाय आपला स्वातंत्र्य दिन अपुराच,

पाऊस पडला की तुझ्या मेंदीच्या पानावर ऐकण्याची मज्जाच वेगळी

सकाळी कामावर जाताना,
संध्याकाळी घरी परतताना,
सुखाच्या, दुःखाच्या,
आयुष्याच्या प्रत्येक-प्रत्येक क्षणात तू आहेस,
आणि राहशील…

कलेची अशी सेवा कधी कुणी केली नाही

मनाच्या गाभार्यात असे कुणी आजवर उरतले नाही,

तू अनेक पिढ्यावर राज्य केलयंस,

कसली उपमा द्यावी तुला
आई,

अगं खरचं
आम्ही किती नशीबवान आहोत..

तुझ्या सारख्या लोकांचा कलेच्या साहाय्याने सहवास लाभला..

खूप खूप खूप लिहावंसं वाटतंय
पण शब्द अपुरे पडतात

फक्त एवढंच सांगते
की तू कोणत्याही अवतारापेक्षा कमी नव्हतीस

असा आवाज दुसरा नाही
असा लाजाळू स्वभाव दुसरा नाही..

तू इथे, आमच्या मध्ये आलीसच होतीस आनंद वाटायला…

आता देवाने त्याच्या आवडत्या बाळाला पुन्हा बोलावून घेतले..

आणि कित्येक मने पोरकी झाली…

🙏🏼 तुझे आशीर्वाद नवोदित कलाकारांवर सदैव राहुदेत..🙏🏼
तुझी कला त्यांना साध्य होऊदेत
हीच ईश्वर चरणी प्रार्थना..

देवबाप्पा हिला पुन्हा पाठव
नव्या रूपाने पुन्हा आनंद पसरवायला…

गानसरस्वती लता मंगेशकर.. love you…

आपल्या आत्म्यास शांती लाभो 🙏

**************************

एकदा आचार्य अत्रेंना लताबद्दल लिहायला सांगितलं तेव्हा शब्दप्रभू अत्रे म्हणाले:

“केवळ लोखंडाच्या निपातून उतरल्या शाईनं, जाड्या भरड्या कागदावर लताला अभिवादन करणं म्हणजे एखादया अप्सरेच्या मृदुल चरणकमलाखाली गोणपाटाच्या पायघड्या अंथरण्यासारखं आहे.”

लताच्या प्रतिभेला साजेसं अभिवादन करायचं असेल तर..

“पहाटकाळची कोवळी सुवर्ण किरणं दवबिंदूमध्ये भिजवून कमलतंतूच्या लेखणीने फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र तिला गुलाब कळीच्या करंडकातून अर्पण करायला हवं.”

“लताचा आवाज हा मानवी सुष्ठीतला एक अद्भुत चमत्कार आहे. साक्षात विधात्याला सुद्धा असा चमत्कार पुन्हा घडवता येणार नाही.”

“श्रीकृष्णाच्या मुरलीचा साद, उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि सरस्वतीच्या वीणेचा झंकार हे तिन्ही एकवटून विधात्याने आपल्या लताचा कंठ घडवला असेल.”

“सूर, लय, ताल, सिद्धी आणि प्रसिद्धी या गोष्टी जिथे एकत्र येतात त्या जागेला आपण लता मंगेशकर असं म्हणावं. कारण संगीतातील सात सूर म्हणजे फक्त आणि फक्त आपली

ल ता मं गे श क र

. . .

गीतकार आणि संगीतकार श्री.यशवंत देव यांनी लता मंगेशकर यांच्याबद्दल असे लिहिले आहे.

सगळे गाती सूर लावूनी
जीव लावूनी गातो कोण
कवितेच्या गर्भात शिरूनी
भावार्थाला भिडतो कोण

गीतामधली भाव वादळे
सबल स्वरांनी झेली कोण
अहंकार फेकून स्वरांना
ममतेने कुरवाळी कोण

नाभीतूनी ओंकार फुटावा
तैसे सहजच गातो कोण
गाता गाता अक्षर अक्षर
सावधतेने जपतो कोण

शब्दांच्या पलीकडले स्पंदन
सुरातुनी आळवितो कोण
गीतामधली विरामचिन्हे
तीही बोलकी करतो कोण

विश्वामधल्या रसिक कुळाशी
सुरेल हितगुज करतो कोण
निज स्वरांचा पहिला श्रोता
आपला आपण होतो कोण

या सर्व प्रश्नाचे उत्तर एकच
लता मंगेशकर

यशवंत देव

. . . .

लता मंगेशकर यांची काही तुफान लोकप्रिय गाणी

आएगा आएगा आने वाला…
पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है…
जब प्यार किया तो डरना क्या प्यार किया कोई चोरी नही की छुप छुप आहें भरना क्या..
चलते चलते यूहीं कोई मिल गया था..
अजीब दास्तान है यह कहां शुरू कहां खतम्…
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो…
यारा सिली सिली …
यशोमती मैया से बोले नंदलाला…
सत्यम शिवम् सुंदरम…
रहें न रहें हम यूहीं महका करेंगे…
ऐ मालिक तेरे बंदे हम…
ये शमा …..शमा है ये प्यार का…
ये कहां आ गए हम साथ चलते चलते..
आज फिर जीने की तम्मन्ना है…
मेरे हाथों में नौ नौ चूड़ियां है…
हमने देखी है उन आंखों में महकती खुशबू,,,
मेरे खाबों में जो आए …
हमको हमीं से चुरा लो…
कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए..
रूठे रूठे पिया मनाऊं कैसे …
तू जहां जहां चलेगा …..
लग जा गले ….
तुम मुझे यूं भुला ना पाओगे….
कोई भला उनको कैसे भुला सकता है।

उफ्फ अनगिनत गाने, शायद ही कोई ऐसा दिन हो जिस दिन उनकी आवाज ना सुनी हो
पता नही कौन सी सिद्धि प्राप्त थी कि हर दिल अजीज थी लता जी।
कॉलेज के दिनो से लेकर जीवन के पांच दशक उनके गाने सुन कर कैसे निकल गए पता ही नहीं चला।
जीवन का एक अटूट हिस्सा थी लता जी। धन्यवाद जीवन को संगीत रस से सराबोर करने के लिए। आज मन सच में भारी है।
जरा आंख में भर लो पानी….
अश्रुपूरित श्रद्धांजलि बुलबुले हिंदुस्तान लता मंगेशकर जी।
💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

“आता, विसाव्याचे क्षण……”

लेखिका: सौ. रेखा दैठणकर
२८ दिवसापूर्वीच ह्या सगळ्या गोष्टींची सुरवात झाली….. कामवाल्या बाईचे निमित्त झालं…. खरंतर या वयात काय, काहीही छोटं कारण पुरतं म्हणा….. काहीतरी ‘लेबल’ तर लागलं पाहिजे ना….. मग नेहेमीचीच धावपळ…… ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये भरती…..(तिथल्या नर्सला विचारलं हॉस्पिटल चं नाव)…. सुहास्य मुद्रेच्या डॉ समदानींनी आश्वस्त केलं, “सगळं काही ठीक होणार दीदी”….. मी मनातल्या मनात हसले….आता ही बहुदा ‘शेवटच्या प्रवासाची’ नांदी च असावी…..
मग सुरु झाले सगळे उपचार….. नाकातोंडांत नळ्या, सतत अस्थिर ऑक्सिजनची पातळी…… कधी कधी शुद्ध असायची, कधी नसायची…… शुद्ध असेल तेंव्हा सगळा ‘जीवनपट’ डोळ्यांसमोरून सरकायला लागायचा…… थोड्या थोडक्या होत्या का आठवणी?…. 92 वर्षांपैकी, 87-88 वर्षांच्या तरी आठवत होत्या….. एकामागून एक नुसती आठवणींची भेंडोळी…… कधी कधी संदर्भ लागत होते, कधी कधी नाही…..
लहानपणीचे दिवस आठवताना चेहऱ्यावर नकळत स्मित येत होतं …. माई, बाबा आम्ही सगळी भावंड….. बाबांचं स्वर्गीय गाणं…. समजत नसलं तरी कानांना तेच छान वाटायचं…. बाबांकडे गाणं शिकायला येणारे विद्यार्थी…. त्यांच्या शिकवणीकडे माझं असणारं लक्ष….. आशाची मस्ती, दंगेखोरपणा जो मला अजिबात आवडायचा नाही…. बाळचं दुखणं….. आणि मग एक दिवस आम्हा मुलांना कुणीतरी वरच्या मजल्यावर नेलं…. खाली येऊ दिलं नाही….. त्या दिवशी ‘बाबा’ आम्हांला सोडून गेले होते….. मी अचानक मोठी झाले, व्हावंच लागलं….
मग सगळ्या परिवाराला सांभाळायचा केलेला निश्चय…. नाईलाजाने सिनेमाकडे वळलेली पाऊले….. स्टेज शो करून मिळवती झाल्याचा आनंद….. काय काय आठवत होतं…… आणि परत शुद्ध गेली….. काही कळेनासं झालं…..
आयुष्यभर किती माणसं जोडली गेली….. गणनाच नाही…. शुद्ध येत होती, जात होती…… अनेक चेहरे समोर येत होते….. नौशादजी, सज्जादजी, रोशनजी, खय्यामजी, मदन भैया, हेमंतदा, सचिनदा, फडके साहेब, खळेकाका, अनिल विश्वासजी, मुकेश भैया, किशोरदा, रफी साहेब……. सगळ्यांनी जणू फेर धरलाय…… काही जणांशी वाद ही झाले….. आत्ता हसू च येतंय सगळ्यांचं, नको होते ते व्हायला….
आज परत सगळ्या तपासण्या केल्या गेल्या….. आता अजून काय काय सहन करायचंय काय माहित?……
आज सकाळपासून आठवतायत, मिळालेले सत्कार, पदव्या, अनेक अवॉर्ड्स…. विशेष म्हणजे ‘भारतरत्न’ पुरस्कार…. फारच प्रेम दिलं लोकांनी…. देशात – परदेशात केलेले शोज….. कशी उतराई होणार यांची?…..
किती परीक्षा बघणारे प्रसंग, किती संकटं, पण मंगेशाच्या कृपेने आणि माई-बाबांच्या आशीर्वादाने सगळं निभावून नेलं…..
पण आता जीव थकलाय…. काही नको वाटतंय…. 7-8 वर्ष झाली, गाणं पूर्ण थांबवलंय….. बाहेर पडणंच बंद झालंय….. घरात बसून TV वर बघत असते, आजूबाजूला काय चाललंय ते…..
घरातले सगळे स्थिरावलेत….. फारशी कुणाची काळजी राहिली नाहीये….. आता ही ‘यात्रा’ संपावी असं मनापासून वाटतंय….. पण ‘त्या’ ने बोलावले पाहिजे ना?….. मन अगदी तृप्त आहे…. हजारो नाही, लाखो नाही तर करोडो लोकांचे प्रेम मिळालंय…. आदर मिळालाय….. अजून काय पाहिजे….. परत विचारांची भेंडोळी……..
कालपासून डॉ समदानींच्या चेहऱ्यावर चिंता दिसतीये…. श्वास जड झालेत…. आता तर एकेक श्वास घ्यायलाही कष्ट पडतायत…. मंगेशा, सोडव रे आता…… हे कुठलं गाणं रुंजी घालतंय, ” *तुझ्या शिवारी जगले, हसले, कडी कपारी अमृत प्याले! आता हे परि सारे सरले….. उरलं मागं नाव “…… परत सगळं भोवतीचं फिरतंय…. काही समजत नाहीये…. खूप खोल खोल, खड्ड्यात किंवा भोवऱ्यात फिरतीये असं वाटतंय….. थांबता येत नाहीये….. सहन होत नाहीये……
मगाशीच आशा येऊन गेली…. बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे ही येऊन गेले…… आज काहीतरी विशेष दिसतंय….. सचिनही बघून गेला…. आज ‘सुटका’ दिसतीये…. आज श्वास जास्तच जड झालेत….. आशाच्या गाण्याप्रमाणे ‘जड झाले ओझे ‘ असं वाटतंय….. सोडवा कुणीतरी…. डॉक्टर, डॉक्टर…………
आता एकदम हलकं वाटतंय…. पिसासारखं…… सगळ्या नळ्या काढल्यात….. उंचावरून खाली सगळ्यांकडे बघतीये असं वाटतंय…..
सगळीकडे असं का वातावरण आहे? सुतकी, दुःखी?…. म्हणजे…. म्हणजे….. मी……. बहुतेक तसंच असावं…… आज माईची, बाबांची खूप आठवण येतीये…. त्यांना कधी एकदा भेटते असं झालंय……
माझ्या डोक्यावरून पांघरूण घातलंय…. पण ही काय जादू आहे? मला सगळं दिसतंय…… मला न्यायला आलेत हे 4-5 जण…. रोजचेच हॉस्पिटल मधले….. रडताहेत…. मी विचारतीये त्यांना, पण लक्ष देत नाहीयेत….. त्यांच्या बोलण्यावरून कळतंय, मला घरी नेताहेत…. प्रभुकुंजवर….. कधी एकदा घर आणि घरातली माणसं दिसताहेत, असं झालंय…. आली, आली गाडी…. हे उलट्या अक्षरात काय लिहिलंय? ऍम्ब्युलन्स….. हं….. घरी सगळे वाट बघत असतील नाही? उषा, आशा, हृदयनाथ, सगळी मुलं…. घाबरले असतील बिचारे….. पण आता त्यांच्या डोक्यावर हात ही फिरवता येणार नाही…… ह्याचं मात्र वाईट वाटतंय…..
सगळीकडून कानावर पडतंय, मी अनंताच्या प्रवासाला निघून गेलीये म्हणे…. नाही नाही, अजून इथेच घुतमळतीये मी….. इतकं सोपं आहे का, इतक्या लोकांचे प्रेमपाश इतक्या चटकन सोडवणं….. किती मोठी मोठी लोकं येताहेत प्रभूकुंजवर…. मी तर पार संकोचून गेलीये….. हे काय, हे इतके मिलिटरी आणि पोलीस कशाला?….. तिरंगा दिसतोय…. मला फार अभिमान आहे या तिरंग्याचा आणि त्याची प्राणपणाने रक्षा करणाऱ्या सैनिकांचा…. तुम्हाला आवडतं ना माझं ते गाणं,’ए मेरे वतन के लोगो…… “….. ते गाताना नाही आता ऐकताना अजूनही घशात हुंदका दाटतो….. पण आज तुम्हा सगळ्यांचा हुंदका अडकलाय् हे पाहून खूप भरून येतंय…. किती प्रेम कराल माझ्यावर? मी काय केलंय? फक्त गाणी तर म्हटलीत…..
आत्ताच कानावर आलंय, मोदी साहेब येताहेत, मला पाहायला…… बापरे, मोठ्ठा माणूस… पंतप्रधान असावा तर असा….. मला भेटायला खास येताहेत, सगळे कार्यक्रम रद्द करून…. हे मात्र अति होतंय हं…… आज त्यांना परत एकदा डोळे भरून, सॉरी, बंद डोळ्यांनी पाहता येईल…..
आता मला तिरंग्यात लपेटलंय….काय वाटतंय म्हणून सांगू?… ‘साऱ्या भारताची शान आहोत आपण’ असं काहीतरी feeling आलंय….. मिलिटरी व्हॅन पण काय सुंदर सजावलीये…. यातून जायचंय आता….. माझा खूप हसरा फोटो लावलाय समोर…. खरंच वाटत नाही, मी अशी होते….. आत्ताही, बहिणींनी साथ सोडली नाहीये…. आशा, उषा दोन्ही बाजूला उभ्या आहेत….. मी हळूच बघतीये त्यांच्याकडे….. रडवेल्या झाल्यात अगदी….. आमची गाडी मुंबईच्या रस्त्यावरून धिम्या गतीने चाललीये…. दुतर्फा खूप लोक उभे आहेत, साश्रू नयनानी मला एकदा, शेवटचं बघायची इच्छा ठेऊन….. किती हे प्रेम?…. कशी उतराई होणार यांची?…. खूप संकोचून गेलीये मी….
अच्छा, शिवाजी पार्क वर आणलंय वाटतं…. म्हणजे बाळासाहेबांच्या इथेच…. असतात असे ऋणानुबंध काही काही….. मिलिटरी चे जवानानी ‘सलामी’ देऊन आता, ‘guard of Honour’ म्हणून मला अत्यंत आदराने खांद्यावरून घेऊन चाललेत…. जणू काही लहानपणी बाबांच्या खांद्यावरून जत्राच बघतीये….. हो जत्रा च….. इतकी माणसं जमलीत इथे….. नजर टाकावी तिकडे माणसंच…… आणि आणि हे काय?… मला खांद्यावरून खाली एका पांढऱ्या चौथऱ्यावर ठेऊन, हे सगळे कुठे चाललेत?…..पण एक मात्र खरं…. माझ्या पांढऱ्या रंगावरच्या प्रेमाची आठवण ठेवलीये यांनी….. पण खूप एकटं वाटतंय….. मला इथे सगळ्यांच्या मध्ये ठेवलंय…. कुणीच नाही आजूबाजूला…… लांब खुर्च्यावर बाळ, आशा, उषा, आदिनाथ, भारती वहिनी सगळे दिसतायत….. पार कोलमडून गेलेत…. कसं समजावू त्यांना…. खूप थकले आहे मी….. आता ‘विसाव्याचे क्षण’ हवेत मला…..
ही अचानक गडबड कसली? मोदीजी आले वाटतं? हं….. बापरे, ते माझ्यापुढे नतमस्तक होतायत…. आत्ता मात्र वाटतंय, उठून त्यांना नमस्कार तरी करायला हवा होता….. देशाचे पंतप्रधान आपल्यापुढे वाकतायत…… धन्य झाले मी….. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून मन भरून आशीर्वाद दिलाय मी, तुम्हीच माझ्या या भारत देशाला प्रगतीपथावर नेऊ शकता….. माझा लाडका सचिन ही दिसतोय….डोळे पाणावलेत त्याचे ही… मानसपुत्रच माझा….. सुखी रहा…..
आता कानावर पडतंय मंत्रपठण!…. म्हणजे वेळ आली वाटतं……. चंदनाची शय्या….. वाट बघतीये…..माईला, बाबांना भेटण्यासाठी आतूर झालीये मी….. खूप हलकं वाटतंय…. आता लाखो, करोडो हृदयात कायमचं ‘ज्योत’ बनून रहायचंय्….. आपल्याच आवाजाची जादू त्यांच्या हृदयातून ऐकायचीये……. सर्वाना त्यांच्या सुख-दुःखांच्या प्रसंगी आपल्या सुरातून साथ द्यायचीये….. याच साठी तर आपल्याला माई-बाबांनी इथे ठेवलं होतं ना….. बाबा, तुम्ही कल्पवृक्ष होऊन मला सर्व काही दिलंत…. आता तुमचाही शब्द नाही मोडवत…. येतीये मी… आले…. सगळीकडे ज्वाळा उसळल्यात…. आणि मला तुमच्या भेटीची आस लागलीये……
सर्वांना ‘नमस्कार’ आणि ‘आशीर्वाद’!…. कधीही आठवण करा, मी हजर असेन…… पण आता जाऊदे…..
“अखेरचा हा तुला दंडवत 🙏, सोडून जाते गाव……….. दरी दरितून, मावळदेवा, देऊळ सोडून धाव रेऽऽऽऽऽऽऽ ………
(आपल्या सर्वांच्या लाडक्या लतादीदींचे मनोगत)

सौ. रेखा दैठणकर

*********************************

अपमान करण्याची संधी देऊ नका…

डॉ. धनंजय केळकर
| महाराष्ट्र टाइम्स |

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निमित्ताने लता मंगेशकर यांच्याशी अधिकाधिक परिचय होत गेला. या परिचयातून त्यांचे साधे; परंतु काही जीवनसूत्रे पाळणारे व्यक्तिमत्व उलगडत गेले. कोणाला अपमान करण्याची संधी द्यायची नाही, हे त्यांचे वाक्य ठळकपणे ठसले.

दीनानाथ मंगेशकर यांना वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांचे निधन झाले; त्यामुळे कोणत्याही स्थितीत अशी वेळ इतर कोणावर येऊ नये, या भावनेतून एक चांगले रुग्णालय पुण्यात उभारावे हा संकल्प लता मंगेशकर; तसेच मंगेशकर कुटुंबीयांनी मनात केला होता. तशा हालचालीही सुरू केल्या होत्या.

वैद्यकीय शिक्षण संपल्यानंतर, मी मुंबईच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात काम करत होतो. तेथे मोठी संधी होती; पण एकूणच मुंबईचे आयुष्य मला आवडले नव्हते. आपण पुण्यात जाऊन वैद्यकीय सेवा करावी, असे मनाने घेतले. पुण्यात आल्यानंतर, येथे सुरू असलेल्या वैद्यकीय सेवांमध्येही समाधान मिळत नव्हते. काही तरी आपले उभे केले पाहिजे, म्हणजे तेथे आपल्या मनासारखे काम करता येईल, हा निर्णय झाला होता. अर्थात, असे काही उभारण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेच पाठबळ आमच्याकडे नव्हते. एका ओळखीच्यांच्या माध्यमातून, १९९०मध्ये मी माझ्या काही सहकाऱ्यांसोबत थेट ‘प्रभुकुंज’वर धडकलो. सगळे मंगेशकर कुटुंबीय तेथे होते. आम्ही आमची योजना त्यांना सांगितली. पुण्यामध्ये अशा मोठ्या रुग्णालयाची गरज असल्याचेही त्यांना सांगितले; पण त्या वेळेस आमच्याकडे अनुभव नव्हता, हे सत्यच होते. लता मंगेशकरांनी अतिशय शांत शब्दांमध्ये आम्हाला ते सांगितले. ते सांगताना आम्ही दुखावणार नाही, याची इतकी काळजी घेतली होती, की आम्हालाच त्याचे आश्चर्य वाटत होते. एखाद्या आईची माया त्यामध्ये होती. तेव्हा त्यांच्याबरोबर इतके ऋणानुबंध जुळतील, असे वाटले नव्हते; पण त्यांच्या स्नेहाने आम्हाला जिंकले होते.

पुण्यात परत आल्यावर, आम्ही संजीवन रुग्णालयामध्ये काम सुरू केले. बघता बघता सहा वर्षे उलटली. आमच्या गाठी भरपूर अनुभव जमला. पहिल्या भेटीत लता मंगेशकरांनी थेट सांगितले नसले, तरीही त्यांना काही तरी भव्य उभे करायचे होते, छोटे रुग्णालय उभारण्यात त्यांना रस नव्हता. त्यानंतर मात्र त्यांनी मला स्वतःहून निरोप पाठविला. मी गेल्या कालावधीत काय करतो आहे, यावर त्यांचे लक्ष होते. माझी प्रगती समाधानकारक आहे, हे बघितल्यावर त्या बैठकीत त्यांनी सांगतले, डॉक्टर आता हा प्रकल्प तुमचा आहे. तुम्हीच तो तडीला न्यायचा आहे. त्या दिवसानंतर आजपर्यंत त्यांनी नेहमीच मदतीची भूमिका घेतली. मला त्यांनी सांगितलेले एक वाक्य आजही आठवते, ‘आयुष्यात आपला अपमान करण्याची संधी कधी कोणाला मिळणार नाही, असेच काम आपण करायचे.’ शॉर्टकट घ्यायचा नाही, कायदा मोडायचा नाही, अनावश्यक सवलती मागायच्या नाहीत, आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवायचे व सामान्यांसाठी झोकून देऊन काम करायचे, ही सूत्रे त्यांनी आयुष्यभर सांभाळली. तीच सूत्रे सांभाळत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चालविण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असायचा.

रुग्णालयाची उभारणी सुरू झाली, त्या वेळेस आम्ही त्यांना प्रत्येक तपशील कळवायचो. त्या शांतपणे ऐकून घ्यायच्या, कधी तरी एखादी सूचना करायच्या; पण आग्रह नसायचा. उलट माझी काय मदत होईल, असे विचारायच्या. त्यांच्या मोठेपणापुढे आणि तितक्याच साधेपणापुढे सुरुवातीला दबून जायला व्हायचे. नंतर लक्षात आले, की तो साधेपणा ओढून ताणून आणलेला नव्हता, तर तो त्यांचा स्थायीभाव होता. आपल्या वागण्यातूनच त्या आमच्यापुढे आदर्श उभा करीत होत्या.
रुग्णालयाच्या मदतीसाठी आम्ही पुण्यासह अनेक शहरांमध्ये संगीत रजनीचे कार्यक्रम केले. त्या कार्यक्रमाच्या तयारीबद्दलही त्या कमालीच्या दक्ष असायच्या. आपल्या वादकांची, सहकलाकारांची सोय नीट होते आहे ना, याकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे. इतकेच नव्हे, तर कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री जाऊन, तिथली ध्वनिक्षेपक यंत्रणा नीट आहे ना, याची खात्री त्या करून घेत. त्या वेळेस मी त्यांना सहज म्हटले होते, की दीदी तुमची स्मरणशक्ती अफाट आहे. सगळी गाणी तुम्हा तोंडपाठ असतात, तरी प्रत्येक वेळेला तुम्हाला गाण्याचे नोटेशन असलेला कागद समोर का लागतो? त्यावर त्यांचे उत्तर फार समर्पक होते. त्या म्हणाल्या, ‘गाणे मी गात असले, तरीही गीतकाराने लिहिलेले, संगीतकाराने परिश्रमपूर्वक चाल लावलेले आणि वादकांनी जीव तोडून वाजविलेले असते. ते टीम वर्क असते. मग त्यामध्ये बदल होऊन कसे चालेल. तो अधिकार आपल्याला नाही. म्हणून गाणे पाठ असले, तरी त्याचे बारीक तपशील असलेला कागद समोर असलेला बरा असतो; म्हणजे चूक होत नाही.’ खरे तर त्यांच्याकडून चूक होण्याची शक्यता नव्हतीच आणि झाली असती, तरी त्यांना कोणी विचारलेही नसते; पण आपल्या सहकाऱ्यांच्या श्रमांचीही इतकी मनापासून दखल घेत, त्यांना प्रत्येक वेळेस त्याची पोचपावती देण्याची त्यांची सवय खरोखरच प्रत्येकाने आचरणात आणण्यासारखी होती.
‘रजनी’च्या पाठोपाठ, रुग्णालयाच्या मदतीसाठी भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामना घेता येईल का, अशी कल्पना आम्ही त्यांच्यापुढे मांडली. त्यांनी त्याला होकार देत, मला तेव्हाच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची भेट घेण्यास सांगितले. मी मुंबईत दालमिया यांना भेटायला गेलो, तेव्हा ते मला म्हणाले, ‘भारतीय क्रिकेट संघ असे धर्मादाय सामने खेळायला लागला, तर पुढील दहा वर्षे पुरणार नाहीत, इतके चांगले काम करणाऱ्या संस्था आपल्या देशात आहेत; त्यामुळे हे शक्य नाही.’ मी थोडासा खट्टू झालो होतो. सहजच मी म्हटले, ‘हे खरे असले, तरी मंडळाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, तेव्हा लतादीदीच धावून यायच्या ना…’ दालमिया हसून म्हणाले, ‘हो ना. म्हणूनच, अपवाद म्हणून तुम्हाला सामना द्यायचे आम्ही ठरविले आहे.’ भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा एकमेव सामना असेल. तसाच तो झालाही. त्या सामन्याच्या आयोजनाची बैठक, दिल्लीत एनकेपी साळवे यांच्या घरी झाली. शरद पवारांपासून बीसीसीआयचे सगळे पदाधिकारी व माजी अध्यक्ष त्याला उपस्थित होते. त्या बैठकीत नियोजनामध्ये या सगळ्यांनी अनेक मोलाच्या सूचना केल्या, जबाबदाऱ्या घेतल्या. अखेर वानखेडे स्टेडिअमवर तो सामना पार पडला. सामन्याच्या दिवशी सकाळपासून राजसिंह डुंगरपूर, शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह लतादीदी उपस्थित होत्या. त्या शेवटपर्यंत थांबल्या. त्यांच्यामुळे सगळेच थांबले.
असाच प्रसंग सौद बाहवान यांच्याबाबतचा आहे. सौद बाहवान हे मस्कतमधील अतिशय मोठे व प्रतिष्ठित उद्योगपती. त्यांची बरोबरी आपल्याकडील टाटा समूहाशी करता येईल. त्यांच्या धर्मादाय संस्थेचा व्यापही तितकाच मोठा होता. ते लतादीदींना आपली बहीण मानत; अगदी राखी बांधण्यापर्यंत. अडचण आली किंवा एखादा नवीन प्रकल्प सुरू करायचा असला, की आम्ही त्यांना हक्काने पत्र पाठवायचो. पुढच्या अठ्ठेचाळीस तासांत रुग्णालयाच्या खात्यात पैसे जमा झालेले असायचे. त्या काळात त्यांनी आम्हाला कोट्यवधी रुपयांची मदत केली. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना फोन केला, तर ते सहजपणे एवढेच म्हणाले, ‘माझ्यासाठी काही करू नका; रुग्णांची मनापासून सेवा करा. ती माझ्यापर्यंत पोहोचेल.’ ही सगळी लता मंगेशकर या नावाची जादू होती.
अशा अनेक आठवणी सांगता येतील. गेल्या तीस-बत्तीस वर्षांत त्यांनी मलाच नव्हे, तर मंगेशकर रुग्णालयातील सर्वांनाच आपल्या कुटुंबाचा भाग बनवून टाकले होते. एखादी तक्रार त्यांच्याकडे गेली, तर त्या त्याचा आवर्जून पाठपुरावा करायच्या. चूक झाली असेल, तर ती पुन्हा होऊ नये, यासाठी आग्रह धरायच्या. रागावल्या कधीच नाहीत; पण त्यांनी विचारण्याचा धाकही आम्हा सगळ्यांना पुरेसा होता. मला त्या कायम धाकटा भाऊ म्हणायच्या; पण माझ्या मनातील त्यांचे स्थान आईचे होते. त्यांची मायाही आईचीच होती.
रुग्णालयाच्या प्रारंभीच्या काळात, ‘सीजीएचएस’ची मान्यता मिळविण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो. जाताना फक्त दिल्लीला जातो आहे, एवढेच त्यांना सांगितले होते. त्यांनी मी नक्की कशासाठी जातो आहे, याची चौकशी माझ्या सहकाऱ्यांकडे केली. दिल्लीत उतरल्यावर, मला थेट लालकृष्ण अडवानींचाच फोन आला. मला तो धक्का होता. अडवानीजींनी मला तातडीने भेटायला बोलावले. काय काम आहे, असे विचारले. थेट आरोग्य मंत्र्यांना फोन करून, आवश्यक मान्यता तातडीने देण्याचे आदेश दिले. वास्तविक, अडवानींनी माझी दखल घेण्याचे काहीच कारण नव्हते; पण ती घेतली गेली, याचे एकमेव कारण होते, ते म्हणजे लता मंगेशकर हे नाव.
नवीन रुग्णालयाच्या उभारणीच्या वेळेस मात्र त्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास होता. भूमिपूजनाला सचिन तेंडुलकरला बोलवावे, अशी सूचना माझ्या सहकाऱ्यांनी केल्यावर, त्यांनी तेथूनच सचिनला फोन करून विनंती केली. एका आठवड्यात इमारतीचे भूमिपूजन सचिन तेंडुलकरांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्या वेळेस नरेंद्र मोदींना बोलविण्यावरही एकमत झाले. त्या वेळेस मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. लतादीदींचे पत्र घेऊन अहमदाबादमध्ये मोदींना भेटल्यावर, त्यांनी तातडीने वेळ दिली. तोपर्यंत मोदी राष्ट्रीय राजकारणात येण्याची चर्चाही नव्हती. त्या कार्यक्रमातच लता दीदींनी, देशाचे पंतप्रधान व्हावे अशा शुभेच्छा मोदींना दिल्या होत्या. पुढचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे.
गेल्या तीन-साडेतीन वर्षांत मात्र त्यांनी हळूहळू सगळ्यांतूनच निवृत्ती घेतली. आपली मानसिक तयारी केली होती. एकदा बोलताना, तर त्यांनी मृत्यूबद्दल इतक्या सहजपणे माझ्याशी चर्चा केली, की त्याने मीच काहीसा हादरलो. त्या शांत होत्या. मृत्यूलाही आपलेसे करण्याची प्रगल्भता त्यांच्यात होती. त्यांच्या जाण्याने मंगेशकर रुग्णालयाचा परिवार एका अकृत्रिम स्नेहाला, काळजी करणाऱ्या व्यक्तीला आणि आईच्या मायेला मुकला आहे, अशीच माझी भावना आहे. त्याचबरोबर, त्यांनी आपल्या वागण्यातून निर्माण केलेली जीवनसूत्रे हाच आदर्श म्हणून बाळगण्याचाही एक धडा त्या देऊन गेल्या आहेत. त्यांच्या गाण्याबाबत बोलण्याबाबत मी मोठा नाही; पण एक माणूस म्हणून त्यांची झालेली ही ओळख मला तितकीच मोठी वाटते; किंबहुना सगळ्यांत मोठी वाटते.
(लेखक दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक आहेत.)

*****************

तेरी आवाज ही पहेचान है!

शिरीष कणेकर

अनेक संगीतकार आले आणि गेले… अनेक गायिका आल्या आणि गेल्या… लता होती तिथेच आहे.. ध्रुवपदासारखी अढळ, दीपगृहासारखी मार्गदर्शक… गंगाजलासारखी पवित्र! असा भाव नाही, जो तिने गाऊन व्यक्त केला नाही… असा देव नाही, जो तिच्या कंठातून गात नाही… असा माणूस नाही, ज्याचे कर या नादब्रह्माच्या साक्षात्कारापुढे जुळले नाहीत…

या पलीकडे जाऊन मी आता तिच्याविषयी नव्यानं काय लिहिणार आहे? ‘आवाज कुणाचा? – लता मंगेशकरचा’ अशी आरोळी आम्ही वर्षानुवर्षे मारत आलो आहोत.
‘म्हातारा झालो हो, दीदी.’ मी अलीकडेच तिला फोनवर म्हणालो.
‘तुम्ही?…मग माझं काय?’ ती उद्गारली.
‘अहो, तुमच्या आवाजाने तुम्हाला ‘आवाजी’ बहुमताने तरुण ठेवलं. तुमची गाणी ऐकण्याइतपत कान शेवटपर्यंत शाबूत राहावेत एवढीच या क्षणाला मागणी आहे. लई नाई मागणं.’
‘काय होतंय हो तुम्हाला?’ तिनं आस्थेनं विचारलं. तिच्या स्वरातील कळवळय़ानं मला गलबलून आलं. मी स्वतःला फार एकटा समजतो. माझ्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात नाना पाटेकरनंही माझ्या एकटेपणाचा ओलाव्यानं उल्लेख केला होता. लताची सोन्यासारखी गाणी माझ्याभोवती फेर धरून बागडत असताना मी माझ्या संपन्न गोतावळय़ात असतो; मग आडमुठय़ा अट्टहासानं मी स्वतःला एकटा का म्हणवून घ्यावं? हा तिच्या गाण्यांचा व तिचा अवमान नाही का? अनेकदा मला वाटत आलंय की कुणी विचारलं की तुम्ही काय करता, तर अभिमानानं छाती ठोकून सांगावं – ‘मी लताची गाणी ऐकतो.’
चाळीस वर्षांपूर्वी नव्हाळीतल्या उमाळय़ानं मी ‘यादों की बारात’ या माझ्या सदरात ‘तेरी आवाज के सिवा इस दुनिया में रख्खा क्या है’ या शीर्षकाखाली लिहिलेला मजकूर आजही न कोमेजता मला खुणावतोय. तुमच्या परवानगीनं तो सादर करतो.

28 सप्टेंबर 1929 रोजी एका गंधर्वलोकीच्या दैवी स्वरानं पृथ्वीवर अवतार घेतला. गवयाची पोर. तिनं जन्मल्यावर टाहो फोडला नसेल, एखादी नाजूक लकेर छेडली असेल. ‘कोहं?’ असा सवाल पुसणारा आक्रोश न करता ‘मी आल्येय हं!’ अशी करोडो कानसेनांना दिलासा देणारी लाजवट सुरावट पेश केली असेल. आईबापांची काय पुण्याई असते, ज्यामुळे प्रत्यक्ष देव आवाजरूपानं त्यांच्या अंगणात बागडतो?

बाप म्हणाला, ‘पोरी, तुझ्या गळय़ात गंधार आहे.’ बापाच्या पश्चात पोरगी हेलावून गायली, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला.’ सज्जाद हुसेन म्हणाला, ‘लता गाती है, बाकी सब रोते है.’ लता त्याच्याकडे गायली, ‘वो तो चले गये ऐ दिल, यादसे उनकी प्यार कर.’ अनिल विश्वास म्हणाला, ‘लता या क्षेत्रात आली आणि आम्हाला देवदूत आल्यासारखं वाटलं. लता त्याच्याकडे देवदूतासारखीच गायली, ‘बदली तेरी नजर तो नजारे बदल गये.’ मदन मोहन म्हणाला, ‘लहानपणी ज्योतिषानं माझं सर्व भविष्य अचूक सांगितलं होतं. पण लता मंगेशकर नावाचा दैवी आवाज तुझ्याकडे गाईल हे नाही सांगितलं.’ लता मदनकडे गायली, ‘अब गमको बना लेंगे जीने का सहारा.’ लताच्या थट्टामस्करीनं कातावून गुलाम महंमद एकदा म्हणाला, ‘लताजी हंसीये मत. ठीक तरहसे गाईये.’ मग लता गायली, ‘दिल देके सनम तुम्हे पछताए हम.’ एस. डी. गेंगाण्या आवाजात व बंगाली ढंगात लताला पुकारायचा आणि लता गायची, ‘रोते रोते गुजर गयी रात रे.’ सी. रामचंद्र धुंद चाली बांधायचा आणि लता ऊर फुटून गायची, ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोये.’ पंजाबी आणि बंगाली संगीतकारांच्या गोतावळय़ात के. दत्ता हा मराठमोळा माणूस लताला वडिलकीच्या अधिकारात बोलावून घ्यायचा आणि मग लता म्हणायची, ‘बेदर्द जमाने से शिकवा न शिकायत है.’

मोगरा तिच्या गळ्यात फुललाय. त्या कोणा लवंगिकेचं लटपट लटपट चालणं तिच्या अवखळ जिभेनं नेमकं टिपलंय. ‘मालवून टाक दीप’ असं आर्जव करणाऱ्या मीलनोत्सुक रमणीची अधीरता तिच्या आवाजातून जाणवलीय. ‘साजन की गलियाँ छोड चले’ हा निषाद तिच्या स्वरातून पाझरलाय. ‘सावरी सुरत मन भायी रे पिया’ हा लाजरा आनंद तिच्या सुरातून ठिबकलाय. ‘तारे वही है, चाँद वही है, हाय मगर वो बात नही है’ ही व्यथा तिच्या तोंडून साकार झालीय. ‘बेचैन करनेवाले तू भी न चैन पाये’ हा भंगलेल्या हृदयाचा तळतळाट व ‘कोई किसीका दीवाना न बने’ ही पोळलेल्या अंतःकरणाची उपरती तिच्या अजोड कंठातून वेदनेसारखी ठणकत आलीय. ‘दिले बेकरार सो जा, अब तो नही किसीको तेरा इंतजार सो जा’ हा रडवा, अश्रूपूर्ण ‘गिला’ तिनं केलाय. ‘बनायी है इतनी बडी जिसने दुनिया, उसे टूटे दिल का बनाना न आया’ ही बोचरी विसंगती दुखऱ्या आवाजात तिनं दाखवून दिल्येय.

केवळ हिंदी चित्रपटांपुरतं बोलायचं तर 1947 साली वसंत जोगळेकरांच्या ‘आपकी सेवा में’मध्ये दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लताचा स्वर प्रथम उमटला. त्यानंतर गुलाम हैदरनं ‘मजबूर’मध्ये या दोन शेपटेवाल्या, कृश पोरीचा आवाज घेतला. जोहराबाई अंबालावाला, अमीरबाई कर्नाटकी, शमशाद बेगम या मातब्बर गायिकांना डावलून गुलाम हैदरनं या घाटी पोरीला गायला लावलं याचं फिल्मी दुनियेला उपहासात्मक आश्चर्य वाटलं. पण अशा एखाद्या अद्भुत आवाजाची देणगी मिळावी व नसीम बानूसारख्या बेसूर नायिकेला गायला लावताना कर्तृत्वाला जखडून टाकणाऱया शृंखला तटातट तुटाव्यात म्हणून परमेश्वराची करुणा भाकणारे खेमचंद प्रकाश, ज्ञानदत्त, हंसराज बहेल, के. दत्ता, श्यामसुंदर, अनिल विश्वास, सी. रामचंद्र, बुलो सी. रानी आणि नौशाद यांच्यासारखे अभिजात संगीतकार खडबडून जागे झाले. ‘आयेगा आनेवाला’नं जाणकार थरारले. ‘चुप चुप खडे हो’नं लताचा आवाज झोपडी झोपडीतून पोहोचवला. तो आजतागायत तिथून बाहेर पडलेलाच नाही. अनेक संगीतकार आले आणि गेले. अनेक गायिका आल्या आणि गेल्या. लता होती तिथंच आहे. ध्रुवपदासारखी अढळ, दीपगृहासारखी मार्गदर्शक, गंगाजलासारखी व पवित्र! ‘गाये लता, गाये लता’ हे गाणं एकावन्न साली ती के. दत्तांसाठी गायली. त्यातला आशय तिनं सहीसही आचरणात आणलाय…

असा भाव नाही, जो तिनं गाऊन व्यक्त केला नाही. असा देव नाही, जो तिच्या कंठातून गात नाही. असा माणूस नाही, ज्याचे कर या नादब्रह्माच्या साक्षात्कारापुढे जुळले नाहीत. आज मी ठाम ठरवून लिहायला बसलोय की लताच्या अवीट गोडीच्या अविस्मरणीय गाण्यांची जंत्री द्यायची नाही. (यादी द्यायला ती काय वाण्याची यादी आहे?) होतं काय की एक गाणं दिलं की पाठोपाठ दुसरं गाणं आपसूक येतं. मग तिसरं. मग चौथं. हा सिलसिला चालूच राहतो. अमर संगीताचा माहोल निर्माण होतो. रसिक वाचक मोहोरून येतात. धुंदफुंद होतात. त्यांची संगीतसमाधी लागते ते लतामय होतात. माहीत नसलेली गाणी ऐकण्याची मनाशी खुणगाठ बांधतात. मग त्यांना असे भास होतात की, आपल्याला लेख बेहद्द आवडलाय. माय फुट, आवडलाय. त्यांना लताची गाणी आवडलेली असतात. मला फुकटचं श्रेय मिळतं. असो.

मी समग्र लता ऐकलीय असं मला वाटत असताना एखादं लताचं अफलातून गाणं माझ्या कानी पडतं व माझं गर्वाचं घर खाली होतं. उदाहरणार्थ, बाबूजी सुधीर फडके यांचं ‘रत्नघर’मधलं ‘ऐसे है सुख-सपन हमारे’ लतानं ते चौसष्ट वर्षांपूर्वी गायलं होतं. ‘हैद्राबाद की नाजनीन (1952) मधील हे वसंत देसाईंचं लताचं लाजवाब गाणं तसं मी अलीकडेच ऐकलं आणि वेडावून गेलो. काय गायलंय बाईनं! काय त्या हरकती, मुरक्या, आलाप, पुन्हा एकदा मला माझ्या लेखणीचा थिटेपणा जाणवतोय. आस्वाद घेण्यात व त्याला शब्दरूप देण्यात आपण फारच कमी पडतोय या विचारानं मनाला क्लेश होतात. बघा, गाणंच सांगायचं राहिलं. मन कुठं थाऱयावर आहे? – ‘जाओ, चमका सुबह का सितारा, फिर जुदाईने आ के पुकारा’… मी सावरतो स्वतःला. नाहीतर पुन्हा लताच्या अजरामर गाण्यांची जंत्री सुरू व्हायची. काय शिंचा त्रास आहे? लतामय होण्यापूर्वी मी चांगला शहाणासुरता होतो.
संगीतकाराची करामत व त्याच्या गाण्यात लतानं ओतलेली जान यांचं विश्लेषण करायला मी असमर्थ आहे. ती माझी कुवत नाही. ‘कागा रे’मध्ये विनोद व लतानं काय गंमत केल्येय याची मीमांसा न करता येताही जर मला ते बेहद्द आवडत असेल तर तेवढं मला पुरेसं आहे. मला मिळणारा कुंडलिनी जागृत करणारा संगीतानंद समधर्मींबरोबर वाटून घेणं मला आवडत आलंय. लतानं आम्हाला एका रज्जूनं बांधून ठेवलंय. लताविषयी हा भक्तिभाव काही लोकांना खटकतो. का खटकतो? देवळात जाणाऱयाकडून भक्तिभाव सोडून कोणता भाव अपेक्षित असतो? लताचा आवाज तुम्हा एकटं व एकाकी राहू देत नाही एवढी एक गोष्ट मनात तिच्याविषयी श्रद्धा निर्माण करायला पुरेशी नाही का? ‘लता व दिलीपकुमार यांना शिरीष कणेकरांनी मोठं केलं’ असा अप्रतिम आरोप एका वाचकानं केला होता. चंद्र व सूर्य मी निर्माण केले, हे म्हणायचं तो विसरला.
एकदा मी कुठल्याशा गाण्याचा संगीतकार तिला विचारला. तिला पटकन आठवेना. गाणंच आठवेना. (हे सहसा होत नाही.) ‘तुम्ही चाल म्हणून दाखवा. म्हणजे लगेच आठवेल मला.’
‘भ्रम आहे हा तुमचा.’ मी म्हणालो, ‘मी कोणाची नक्कल करीत नसतो. कुठलंही गाणं मी माझ्या चालीत गातो.’
मी लतासमोर गाण्याची संधी सोडायला नको होती, असं माझ्या मुलीचं मत पडलं. पण त्यानंतर मला धक्के मारून घरातून बाहेर काढण्यात आलं असतं हे तिला कुठे माहीत होतं? बरं, बाहेर पडून शेजारच्या घरात आसरा शोधावा तर तिथं साक्षात आशा भोसले राहते. ‘जाये तो जाये कहाँ?’
‘दीदी, तुम्ही करण दिवाणबरोबरही द्वंद्वगीत गायलात. मग माझ्या बरोबर का गात नाही?’ मी विचारले.
‘गाऊया की’ लता म्हणाली, ‘लोकांना सुरात कसं गातात हे तरी कळेल.’
आचरटासारखं बोलल्यावर शालजोडीतले खावे लागतील एवढं तरी मला कळायला हवं होतं. पण शहाणपणाबद्दल मी कधीच प्रसिद्ध नव्हतो. लतानं कुठला गुण माझ्यात पाहिला देव जाणे. ती एकदा मला म्हणाली, – ‘मी तिघांनाच फोन करून गप्पा मारते. राजसिंगजींची वहिनी, गुलझार व तुम्ही.’
माझी अक्षरशः वाचा बसली. या बहुमानाचं मी काय करू हेच मला कळेना. वाटलं रफीला बोलावून गायला सांगावं – ‘बहोत शुक्रीया, बडी मेहेरबानी.’
‘हॅलो.. मी लता बोलत्येय…’ हा टेलिफोनवरच्या लतावर मी लेख लिहिला. तो प्रसिद्ध झाल्यावर आमचं टेलिफोनवर बोलणं झालं.
‘लेखात काही खटकलं का तुम्हाला?’ मी सावधपणे विचारले. ‘काय?’
‘काय असं नाही.’ मी जास्त सावधपणे म्हणालो, खटकण्यासारखं काय असू शकतं हे ती माझ्याकडूनच काढून घेऊ इच्छित होती. मी गळाला लागलो नाही.
मग तीच दिलखुलासपणे म्हणाली, ‘तुम्हाला काय हो, लिहा दडपून. कोण विचारायला बसलंय?’
‘हा काय काँप्लिमेंट म्हणायचा?’ माझा प्रश्न तिच्या खळखळून हसण्यात विरून गेला. ‘लोटा इज लोटा!’ असं आमचा बंगाली फोटोग्राफर म्हणाला होता ते मला नेहमीच आठवत असतं.
लताला जवळची माणसं लांब जाऊ नयेत हे जपण्याची विलक्षण हातोटी आहे. कार्यक्रमात वगैरे सगळय़ांशी बोलणं सर्वथा अशक्य असतं. पण एखादा कटाक्ष, एखादं मंद स्मित, एखादं वाक्य समोरच्याची जिंदगी बनवून टाकते. ‘दीनानाथ’ नाटय़गृहात ती कशाला तरी आली होती. तिच्याभोवती गर्दी होती. मी लांब भिंतीला टेकून गंमत बघत उभा होतो. एकाएकी तिनं खुणेनं मला बोलावलं. मी गेलो.
‘तो स्वतःला अमिताभ बच्चन समजतोय तो कोण आहे हो?’ तिनं कुजबुजत्या आवाजात विचारलं. मी हसलो. तिचा हेतू साध्य झाला. मी तिच्या गोतावळय़ातला होतो या भावनेनं माझ्या काळजाला ठंडक पोहोचली होती. कोणाची टिंगल करायला तिला मी योग्य वाटलो होतो हेही खरंच. आता पुन्हा माझ्याकडे लक्ष देण्याची तिला गरज नव्हती.
ताडदेवला शशांक लालचंदच्या स्टुडिओत मी तिच्या रिहर्सलला गेलो होतो. तिथं सुरेश वाडकर, शब्बीर कुमार, अनिल मोहिले सगळे होते.
‘कुठलं गाणं म्हणावं मला कळत नाही.’ शब्बीरकुमार लताला म्हणाला.
‘का बरं?’ लता बोलली, ‘रफीसाहेबांचं एखादं गा. वर्षानुवर्षे तुम्ही तेच करत आलायत.’
शब्बीरचा पडलेला चेहरा बघावा लागू नये म्हणून मी त्याच्याकडे बघण्याचं टाळलं.
‘तिथं बसू नका हं.’ लतानं मोर्चा माझ्याकडे वळवला, ‘तिथं कोरसवाले बसतील. तिथं बसलात तर तुम्हाला गायला लागेल.’
‘गाईन की. भितो की काय!’ मी हुशारी दाखवत म्हणालो.
‘तुम्ही कशाला भ्याल हो; मी भिते.’ लतानं ‘नॉक् आऊट’ पंच टाकला. या वेळेला शब्बीरकुमारनं माझ्याकडे बघणं टाळलं असावं.

अफलातून विनोदबुद्धी
लताच्या गाण्याखालोखाल जर तिच्याकडे काही असेल तर ती तिची अफलातून विनोदबुद्धी.
‘वेस्टर्न आऊटडोअर’ला ‘लेकिन’मधल्या ‘मै एक सदीसे बैठी हूँ’ या लताच्या गाण्याचं रेकॉर्डिंग चालू होतं. एक कडवं पुन्हा रेकॉर्ड करायचं ठरलं. त्यात कडव्याचा शेवट होता – ‘सबको कुछ दे जाता है.’ गाता गाता लता त्या ओळीपाशी आली आणि म्हणाली, ‘लेकिन फर्नांडिस खाना खाता है…’ रेकॉर्डिंगला सन्नाटा पसरला. कोणाला काही कळेना. लताच्या मागे कोपऱयात डबा उघडून जेवत बसलेला कोणी फर्नांडिस दचकला. घाईघाईनं त्यानं डबा बंद केला.
‘आराम से – आराम से’ लता त्याला म्हणाली, ‘जेवणाची कधी घाई करायची नाही. सावकाश जेवा. मी थांबते. पाच-दहा मिनिटांनी काही फरक पडत नाही.’
झाला प्रकार कळल्यावर हास्यस्फोट झाला. सर्वांचं लक्ष वेधल्यामुळे फर्नांडिस नरमला, ओशाळला. त्याला तिथून निघताही येईना व लता समोर उभी असताना जेवताही येईना. मात्र लतानं त्याचं जेवण झाल्यावरच रेकॉर्डिंग सुरू केलं.
‘मध्यंतरी xxxx बाईंची तब्येत बिघडली होती.’ लतानं मला ‘गॉसिप’ पुरवलं. शेवटी ती माणूसच होती. बारा महिने, चोवीस तास लता मंगेशकर बनून जगणं कसं शक्य आहे? जिभेला कधीतरी चाकोरी सोडून वळवळावंसं वाटणारच. ऐकणाऱ्यावर मात्र मणामणाचं ओझं येतं. लताच्या विश्वासाला जागण्याचं कठीण काम त्याला करायचं असतं. ‘लता काय म्हणत होती, माहित्येय?’ असं वचा वचा बोलून आपण आतल्या गोटातील असल्याचं धादांत खोटं सत्य म्हणून मिरवत कॉलर ताठ करून फिरणारे जे कोणी असतील ते असतील. हम तो ऐसे नही है, भैया!
‘काय झालं बाईंना?’ मी विचारलं.
‘ब्लडप्रेशर, दुसरं काय होणार?’
‘का?’
‘अवघड – अवघड गाणी म्हणायला लागतात ना, म्हणून.’ आता मला बऱ्यापैकी कळायला लागलेला ‘लता-पंच’ अखेर आलाच.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या खलीद महंमदनं तिची न्यूयॉर्कमध्ये मुलाखत घेतली. त्यात त्यानं विचारलं, ‘करीअरच्या या स्टेजलाही तुम्हाला मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतात का?’
‘हो तर. लागतात ना!’ लता म्हणाली.
‘उदाहरणार्थ?’
‘उदाहरणार्थ, तुम्हाला ही मुलाखत देणे.’ लतानं एक ठेवून दिली. हा भाग छापलेल्या मुलाखतीत मात्र नव्हता.
माझ्या मुलीच्या लग्नाला येऊन लतानं (आणि आशानंही) लग्नाला चार चाँद लावले. मी आभाराचे कृत्रिम शब्द पुटपुटत असताना ती म्हणाली- ‘अहो, असं काय करता? ती लहान असल्यापासून मला तिची ‘फ्रेंड’ म्हणत आलीय. मग फ्रेंडच्या लग्नाला जायला नको?’
माझी मुलगी आनंदानं रडली. लतानं तिला भेटवस्तू दिली. ‘नो प्रेझेंटस् आहे.’ माझी मुलगी म्हणाली. ‘मला चालतं,’ लता म्हणाली, आशानं तिच्या गाण्याचा आल्बम दिला. लता बोलली तेच शब्द आशाही बोलली – ‘मला चालतं.’
बरोबरच होतं. हे दुनियेचे नियम त्या दोघींना कसे लागू पडतील?
त्यांच्यापासून आमचं जग सुरू होत होतं. माझ्या मुलीला लतानं दिलेला फ्रॉक तिने जपून ठेवला व आता ती तो तिच्या मुलीला घालते. ‘हा लतानं दिलाय’ असं ती अमेरिकेतल्या हिंदुस्थानी लोकांना सांगते तेव्हा त्यांना वाटते की ही (बापाप्रमाणे?) फेकते आहे.

आवडती नावडती गीते
तुमच्या आमच्यासारखीच लताला स्वतःच्या गाण्यापैकी काही आवडती, काही नावडती असू शकतात, असं का कुणास ठाऊक मला कधी वाटलंच नव्हतं. परकरी मुलीनं सागरगोटय़ांवरून भांडावं त्या आविर्भावात ती बोलते तेव्हा धमाल येते. उदाहरणार्थ, तिला ‘असली नकली’मधलं आपल्याला आवडणारं ‘तेरा मेरा प्यार अमर’ आवडत नाही. का? ‘शीः मला ते दळण दळण्यासारखं वाटतं.’ ती नाक मुरडून म्हणते. अगं मावशे, पण तू काय भन्नाट गायल्येस ते, हे कोणी सांगायचं? ‘संगीता’मधील सी. रामचंद्रचं ‘नाउमीद होके भी दुनिया में’ तिच्या आवडत्या गाण्यात मोडत नाही हे कळल्यावर मला धक्का बसला होता. तिनं इतकं सुंदर म्हटलेलं सुंदर चालीचं गाणं तिला आवडत नाही? मग तिनं तिच्या नापसंतीचा रहस्यभेद केला, ‘ती चाल ओरिजिनल नाही. अण्णांनी वहाब या अरेबियन संगीतकाराची रेकॉर्ड माझ्या हातात ठेवली व सांगितलं की आपल्याला हे गाणं करायचंय. तेच ‘नाउमीद होके भी’ त्या गाण्याविषयी माझं मन थोडं कलुषित होणं स्वाभाविक नाही का?’ एकदा तिनं मला सामान्य वाटलेलं लक्ष्मीकांत-प्यारेलालचं ‘तकदीर’मधलं ‘सात समुंदर पार’ तिला आवडतं असं म्हणाली तेव्हा मी उडालो होतो.
‘हे आवडतं?’ मी उद्धटपणाच्या प्रांगणात पाऊल टाकत आगाऊपणानं बोलून गेलो.
‘मला स्वतःची आवडनावड असू शकत नाही का?’ तिनं चिडीला येत विचारलं. मी जीभ चावली. मी एखाद्या शाळूसोबतीबरोबर वाद घालत नव्हतो याचं भान मी विसरलो होतो. गाढवा, ती लता आहे लता, मी स्वतःला बजावलं.
तरीही एकदा मी तिला फोनवरून म्हणालोच, ‘कोणा कोणा संगीतकारांशी भांडलात हो तुम्ही? सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, एस. डी. बर्मन… आणखी कोण कोण?’
‘अहो, मी काय तुम्हाला भांडकुदळ वाटले का?’ तिनं उसळून विचारलं. वाघीण क्षमाशील मूडमध्ये आहे, ती एक पंजा मारून फडशा पाडणार नाही याची खात्री असल्यामुळे हा उंदीर बिनधास्त तिच्या आसपास बागडत होता. पण आपण उंदीर आहोत हे मी स्वतःला विसरून देत नव्हतो.

लताच्या हस्ताक्षरातील गाणी
माझ्या ‘गाये चला जा’च्या सुधारित तिसऱ्या आवृत्तीच्या (प्रकाशन 30 मार्च 1992) मुखपृष्ठावर व मलपृष्ठावर तिच्या हस्ताक्षरातील तिच्या सांकेतिक खुणा असलेली ‘अनाडी’तील दोन गाणी टाकली आहेत. त्यातील ‘वो चाँद खिला’वर कोपऱ्यात 3 डिसेंबर 1957 अशी तारीख आहे व 30 नोव्हेंबर 1957 अशी तारीख ‘बन के पंछी गाये’ या गाण्यावर आहे. 3 डिसेंबरच्या गाण्यावर ‘अनाडी’ असे चित्रपटाचे नाव लिहिलंय तर 30 नोव्हेंबरच्या गाण्यावर ‘मिसेस डीसा’ असं आहे. याचाच अर्थ तीन दिवसांत चित्रपटाचं नाव बदललं होतं. फोकस ललिता पवारवरून राज कपूरवर आला होता. गंमत आहे की नाही? कुठलंही गाणं गाण्यापूर्वी लता ते स्वतःच्या अक्षरात लिहून घ्यायची. म्हणूनच मला ही दोन गाणी मिळू शकली. आपण लताला पलंगाखालची ट्रंक काढायला लावली याची बराच काळ मला बोचणी लागून राहिली होती. आजही ते जीर्ण झालेले व फाटायला आलेले दोन कागद मी प्लॅस्टिकच्या कव्हरमध्ये जपून ठेवलेत. कुणाला पाहायचे असतील तर त्यानं बाहेरून व लांबून पाहावेत. तो अमूल्य ठेवा प्लॅस्टिकमधून बाहेर काढायचा नाही. कमसे कम जब तक मैं जिंदा हूँ…

(अर्थात ओ. पी. सोडून) झाडून सर्व संगीतकारांकडे ती गायल्येय. नुसतीच गायली नाही तर भरपूर गायल्येय. पण शंकर-जयकिशन तिचे खरे यारदोस्त होते. सवंगडी होते. तिने त्यांच्याकडे तब्बल 311 ‘सोलो’ गाणी गायली. गाणं, भांडणं, अबोला, समेट व त्यानंतर चौपाटीची भेल खाणं या चक्रातून त्यांचं नातं फिरत राहिलं. ‘फिल्मफेअर’ पारितोषिकात पार्श्वगायनाला मान्यता नाही या कारणास्तव लतानं पारितोषिक समारंभावर बहिष्कार टाकला.
‘तुला आमच्या आनंदात आनंद नाही का?’ जयकिशननं चिडून विचारलं.
‘आहे ना.’ लता म्हणाली, ‘प्रश्न तो नाही. संगीतकाराला जसं पारितोषिक असतं तसं पार्श्वगायकाला किंवा पार्श्वगायिकेला असायला नको का? मलाच द्या असं मी कुठं म्हणत्येय? कोणालाही द्या, पण द्याल की नाही? तुम्ही वास्तविक आमच्या हक्कांसाठी भांडायला पाहिजे. पण तुमच्या आनंदात आनंद मानून आम्ही आमचा अपमान विसरून स्टेजवरून तुमच्यासाठी गावं अशी तुमची अपेक्षा आहे. आमच्याशी तुम्हाला काही देणंघेणं नाही.’
शब्दानं शब्द वाढत गेला. तिरीमिरीत लता जयकिशनला म्हणाली, ‘तुम झाडू हो!’

मग अबोला, समेट फॉलोड बाय चौपाटीची भेळ!
एका होळीला ‘शास्कीन’चा पांढराशुभ्र सूट घालून शंकर व जयकिशन सकाळी सकाळी लताच्या घरी आले. दारातच तिनं त्यांच्या अंगावर रंगाचं पाणी बादलीतून ओतलं. त्यांच्या सुटाचा सत्यानाश झाला. त्यांचा त्या वेळचा चेहरा आठवून लताला आजही हसू लोटतं.
मुलाखती देण्यातलं तिचं इंटरेस्ट मागेच संपलंय. काही वर्षांपूर्वी ‘मसंद की पसंत’ या टीव्हीवरच्या कार्यक्रमात मसंदनं तिला विचारलं, ‘तुमची बहुतेक सगळी चांगली गाणी साठ सालानंतरचीच आहेत ना?’
लतानं कळेल न कळेल इतपत मान डोलावली. वाचा बसल्यावर ती तरी दुसरं काय करणार? पन्नास ते साठ या संगीताच्या सुवर्णकाळातील लताची अजरामर गाणी या तथाकथित समीक्षकाला माहीतच नव्हती. आपल्याला माहीत नाही हेही त्याला माहीत नव्हतं. मला वाटलं की तो तिथंच एकावन्न सालच्या ‘तराना’मधलं अनिल विश्वासचं गाणं गायला लागेल- ‘वो दिन कहाँ गये बता…’
‘अलीकडे मला मुलाखत देण्यातही स्वारस्य राहिलेलं नाही.’ ती माझ्याजवळ म्हणाली, ‘यांना ना संगीतात इंटरेस्ट ना जुन्या आठवणीत. येऊन जाऊन विचारणार काय, तर पांढरी साडी का नेसता, लग्न का नाही केलं, दारू पिता का, आशाशी संबंध कसे आहेत…’
आशाचं नाव निघालंय तो धागा पकडून मी विचारलं, ‘तुम्हाला आशाचं सर्वाधिक आवडणारं गाणं कोणतं?’
‘रोशनचं ‘दिल ही तो है’मधलं ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ क्षणाचाही विलंब न लावता लता म्हणाली अन् लगेच ‘निगाहे मिलाने को’ गायला लागली.
मी श्वास रोखून धरला. लता माझ्या घरात कोचावर पाय दुमडून बसून मजेत आशाचं गाणं गात होती. लताच्या आवाजात प्रत्यक्ष समोर बसून आशाचं गाणं कोणी ऐकलंय? मी आणि फक्त मी. मला माझ्या डोळय़ांचा आणि कानांचा हेवा वाटला. हे नक्की खरंच घडत होतं ना? माझ्या नशिबात वाढून ठेवलेल्या दुःखांबद्दल देवाला दूषणे देताना या सुखाच्या व आनंदाच्या दैवी वर्षावासाठी मी त्या जगन्नाथाचं ऋणी राहायला नको का? अरे, दुःखं तर कोणालाच चुकलेली नाहीत, पण सुखाचा एवढा ठेवा कोणाच्या पदरात पडतो?
रुपारेल कॉलेजमध्ये आशा भोसलेच्या जाहीर मुलाखतीच्या कार्यक्रमात एक अकलेच्या कांद्यानं तिला विचारले- ‘रात्री नीट झोप लागते का?’
हा प्रश्न मी लताला सांगितला तेव्हा ती म्हणाली, ‘मग आशानं उत्तर दिलं की नाही, की नाही येत झोप, तुम्ही रोज अंगाई गीत म्हणायला येत जा म्हणून? अकारण आशाला डिवचलं तर ती सुपडा साफ करील.’
लताविषयी कंड्या पिकवणाऱ्या वृत्तपत्रांनी भूतकाळात लताला भरपूर मनस्ताप दिला. (गेली अनेक वर्षे ती या सगळय़ाच्या पलीकडे गेल्येय.) का करतात ही माणसं असा उपद्व्याप? दुसऱ्याला किती त्रास होतो, मनस्ताप होतो, बदनामी होते याची त्यांना काहीच पडलेली नसते. दडपून लिहायचं व तमाशा बघत बसायचं…’
लतासकट सगळय़ा भावंडांना त्यांची आई माई मंगेशकरांचं विलक्षण कौतुक आणि अभिमान होता. लताच्या दिवाणखान्यात भिंतीवर माईंचं भलंमोठं ‘पोर्ट्रेट’ आहे. त्याच्याकडे बघत मी लताला म्हणालो, ‘तुमच्या माई तरुणपणी काय सुरेख दिसायच्या हो!’
‘मग?’ लताचा चेहरा अभिमानानं डवरला होता.
पण हीच माई कशावरून तरी रागावली की या भावंडांची पळापळ व्हायची. ‘कुःसंतान असण्यापेक्षा निःसंतान असणं चांगलं’ ती गरजायची. लता, आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ म्हणजे ‘कुःसंतान’ बरं का!
‘अहो, ती डोक्यात राख घालून घर सोडून निघायची.’ आशा मला हसत हसत सांगत होती, ‘वर म्हणायची, तुम्हाला काय वाटतं, मी माझं पोट भरू शकणार नाही? तिची समजूत काढता काढता आमच्या नाकीनऊ यायचे. दीदीदेखील तिला थांबवण्यासाठी तिच्या पायावर अक्षरशः लोटांगण घालायची तेव्हा कुठे माई आम्हाला क्षमा करायची. हा नाटय़प्रयोग अधून मधून व्हायचाच.’
‘लहानपणी माई आम्हाला जेवण्याच्या वेळेला कोणाकडे जाऊ द्यायची नाही.’ लता म्हणाली, ‘यांची परिस्थिती वाईट आहे. म्हणून आले जेवणाची वेळ साधून, असं कोणी म्हणू नये म्हणून!’ लताच्या डोळय़ांच्या कडा ओल्या झाल्या होत्या.
लता आताशा सहसा घराबाहेर पडत नाही. (भगिनी मीना खडीकरनं तिच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनालाही ती गेली नव्हती.) तिला गरज काय बाहेर पडण्याची? प्रत्येक संगीतप्रेमींच्या मनात तिनं घर केलंय. या न्यायानं हिंदुस्थानात आणि बाहेर जगभरही तिचे किती फ्लॅटस् – आय मीन, घरं हो- झाली सांगा. सिकंदर तलवारीच्या बळावर व खूनखराबा करून जगज्जेता झाला होता. लता गळय़ाच्या बळावर व रसिकांच्या हृदयाला हात घालून जगज्जेती झाली. कोण मोठं? तिचा आवाज व तिची गाणी ही आमच्यासारख्या असंख्य पामरांच्या ‘जीने का बहाना’ आहे. तिनं रडवलंय व डोळेही पुसलेयत.
लता दीनानाथ मंगेशकर आज रोजी नव्वद पूर्ण झाली. तरीही आपण तिचा उल्लेख अरे-तुरेनंच करतो. आवाजाला काय माणसासारखं वय असतं? परमेश्वराच्या अस्तित्वाचा साक्षात्कार घडवणारा स्वर असा दिवसांच्या, महिन्याच्या आणि वर्षांच्या हिशेबात मोजायचा असतो? उद्या आईची माया किलोत मोजाल. पतिव्रतेची किंमत तिच्या गळय़ातील काळय़ा पोतीच्या दामावरून कराल. काळजातलं दुःख सेंटीमीटरमध्ये मोजाल. अश्रूंचं मोल लिटरच्या भावात कराल..?

मला नेहमी असं वाटत आलंय की, तिचा स्वर कानी पडत असताना माझा शेवटचा दिस गोड व्हावा. त्या वेळेला तीन-जास्त नाही, फक्त तीन-गाणी माझ्या कानावर पडावीत- विनोदचं ‘वफा’मधलं ‘कागा रे’, सज्जादचं ‘खेल’मधलं ‘जाते हो तो जाओ’ आणि श्यामसुंदरचं ‘आलिफ लैला’मधलं ‘बहार आयी खिली कलिया’! त्यानंतरही माझ्याकडे मिनिट-दोन मिनिट शिल्लक असेल तर तेवढं सी. रामचंद्रचं ‘शिनशिनाकी बुबलाबू’मधलं ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोये’ लावा प्लीज…

लता आणि आशाचे मनोहर किस्से
लता आणि आशाचे काही मनोहर किस्से आहेत. त्यात दोन महान गायिका बोलत नसून दोन जिवाभावाच्या बहिणी बोलताहेत हे ध्यानात असू द्या. आशाची ‘माधुरी’ या हिंदी सिने-पाक्षिकात मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यात तिनं म्हटलं होतं की आमची दीदी कधी कोणाला काही प्रेझेंट दिलं तर ते कदापि विसरत नाही. नेव्हर. त्यानंतर आशा एकदा लतानं दिलेली साडी नेसली होती. लतानं चष्मा खाली करून तिच्याकडे पाहिलं, पण ती काहीच बोलली नाही.
‘दीदी, तूच दिलेली साडी आहे.’ आशा म्हणाली.
‘मला वाटलंच होतं. पण मी बोलले नाही, कारण तू मुलाखतीत सांगतेस.’ लता म्हणाली.
एकदा दोघी बहिणी एक द्वंद्वगीत गात होत्या. लता आशाच्या कानाशी लागून म्हणाली, ‘आशा, अर्धा सूर कमी लागलाय.’
‘मरू दे गं’ आशा म्हणाली, ‘त्या संगीतकाराचीही काही हरकत नाही. तू कशाला खुसपट काढतेस?’
‘तसं नाही,’ लता म्हणाली, ‘चकाकतं ते सगळं सोनं नसतं.’
एकदा लतानं आशाला अकस्मात विचारलं, ‘तू काय स्टेजवरून गाताना नाचतेस?’
‘‘नाही गं.’’ आशा चिवचिवली, ‘मी कसली नाचत्येय? उगीच जरा पाय थिरकवते.’
‘त्यालाच नाचणं म्हणतात.’ लता थंडपणे म्हणाली.
आशा लतासंदर्भात म्हणाली होती, ‘आम्ही दोघी दोन डोळय़ांसारख्या आहोत. जर एका डोळय़ात काही गेलं तर दुसऱयात पाणी येतं.’
एच. एम. व्ही.नं लताची साठी साजरी केली. आशानं मुळात भाषणासाठी नाव दिलं नव्हतं. पण ती आर. डी.सह आली व तिनं उत्स्फूर्त भाषण केलं. ती म्हणाली, ‘आजही माझ्या डोळय़ांपुढून ते चित्र हलत नाही. तिच्यापेक्षा मोठा असलेला तंबोरा घेऊन तिच्याच लांबसडक केसांवर बसून दीदी रियाज करत्येय. देवळाच्या गाभाऱ्यातील घंटानादासारखा तिचा स्वर माझ्या कानात घुमतोय…’ मी लताला भारावलेलं पाहिलं.
आशाला लताची नक्कल करायला सांगा. आधी ती पदर अंगभर लपेटून घेईल आणि मग सुरू. तिला दाद देण्यावाचून गत्यंतर नसतं. लताही नकलाकार आहे. एका संगीतकाराची (नावात काय आहे?) तिनं केलेली अफलातून नक्कल मी पाहिली आहे. कधी कधी मनात येतं की दोघींनी ‘लता-आशा मिमिक्री नाईट’ करायला हरकत नाही.

काही क्षणचित्रे
‘अनपढ’मधली ‘आपकी नजरों ने समजा’ ही गझल रेकॉर्ड केल्यावर मदन मोहन लताला मिठी मारून ढसढसा रडला होता. त्याचं सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर पडत होतं.
लताबरोबरचं भांडण मिटल्यानंतर रफी उत्साहानं म्हणाला होता, ‘अब गाने में मजा आयेगा.’
‘नूरजहाँन हिंदुस्थानात राहिली असती तर लताला काही फरक पडला नसता. पण नूरजहाँनचं मात्र कठीण झालं असतं,’ असं तलत महेमूद पाकिस्तानात म्हणाला होता.
अमूक एक गाणं संध्या मुखर्जीकडून गाऊन घेतलं होतं का, असं विचारल्यावर विक्षिप्त संगीतकार सज्जाद हुसेन म्हणाला होता- ‘हम किसी संध्या या सुबह को नहीं जानते. हम सिर्फ लतासे गवा लेते है.’ तो लताचा उल्लेख प्रेमानं ‘मेरी काली कोयल’ असा करायचा.
‘रफी, किशोर, मन्ना डे वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर राज्य करतील. लता कोणाच्या लक्षात राहणार आहे?’ इति. शारदा ‘स्टारडस्ट’ मासिकात.

‘लता ही एकच गायिका अशी आहे की जिचा अर्धा सूरही कमीजास्त होत नाही’
– पुण्यातील सत्कारात ओ. पी. नय्यर

‘लता मंगेशकरला एवढी मोठी गायिका का मानतात माहित्येय? माझ्यासारख्या बेसुऱया गायकाबरोबरही ती सुरात गाते’
– मुकेश

कंबख्त कभी बेसुरीही नही होती
बडे गुलाम अली खाँ

shireesh.kanekar@gmail.com

*****************

पेडर रोडवर ‘प्रभुकुंज’वरून जाताना सहज वर नजर टाकायची इतक्या वर्षांची सवय आजपासून सोडावी लागणार.
‘देव नाही देव्हाऱयात’चा अर्थ आज कळला.

लताबद्दल वेळोवेळी कुणी काय म्हणून ठेवलंय वाचा-
सज्जाद हुसेनः लता गाती है, बाकी सब रोती है।
बडे गुलाम अली खान ः कंबख्त कभी बेसुरीही नहीं होती।
ओ. पी. नय्यर ः साली ऐसी आवाज तो सौ साल में नहीं होगी।
आशा भोसले ः देवानं एक परफेक्ट नरडं तयार केलं आणि मग तो साचाच मोडून टाकला. मग दुसरी लता मंगेशकर कशी तयार होणार?
नौशाद ः लता गायची व आमचा सारंगीवादक कादरबक्ष याला रडूच फुटायचं.
पु. ल. देशपांडे ः आकाशात चंद्र-सूर्य आहेत व खाली जमिनीवर लता मंगेशकर आहे.
मीना मंगेशकर ः आम्ही सगळी मास्टर दीनानाथांची मुलं. आम्ही सगळेच गातो, पण लता ती लता.
मदन मोहन ः लहानपणी ज्योतिषानं माझं सर्व भविष्य अचूक सांगितलं होतं, फक्त लता मंगेशकर नावाचा दैवी सूर तुझ्याकडे गाईल हे सांगितलं नव्हतं.
अनिल विश्वास ः लता मंगेशकर आली आणि आम्हा संगीतकारांना देवदूत आल्यासारखं वाटलं.
शिरीष कणेकर ः दीदी, तुझा आवाज साथीला व सांत्वनाला नसता तर कबके मर चुके होते.
…… भरत व्यासप्रभृती पितृतुल्य व्यक्तींनी रदबदली केल्यामुळे लता नाइलाजाने गायला तयार झाली. तिनं एक अट घातली. रेकॉर्डिंगला राज कपूरचं तोंड दिसता कामा नये. स्वतःच्या चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला राज कपूर स्टुडियोच्या बाहेर उभा होता. आत लता जीव ओतून गात होती – ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’. गाण्यात लाड नाहीत, उफराव गाणं उरकून टाकलं असं कदापि नाही.
ती हॉस्पिटलमध्ये जायच्या दोन-तीन दिवस आधीच आम्ही फोनवर यथेच्छ गप्पा मारल्या होत्या. फोन ठेवता ठेवता ती म्हणाली, ‘भरलं ना पोट? मिळाला ना भरपूर मसाला?’
ती मूर्तिमंत गाणं जगली. रडगाणं तिनं आसपास फिरकू दिलं नव्हतं. ती चोवीस तास नर्सेसच्या पहाऱयात होती, पण कधी प्रकृतीविषयी चकार शब्द काढला नाही. एकदा तिचा आवाज ठणठणीत झाला. तो ऐकून मी उत्साहाने म्हणालो, ‘आवाजावरून तब्येत चांगली वाटत्येय.’
‘आवाजाला काय धाड भरल्येय?’ लता जोशात म्हणाली.
‘दीदी, हे वाक्य तुम्ही बोलू शकता’ मी म्हणालो व दोघंही हसलो.

एकदा मी तिच्याशी फोनवर बोलत असताना बाजूचा दुसरा फोन वाजला. ‘दुसरा फोन येतोय वाटतं? घ्या, मी मग बोलीन’
‘अहो दीदी’, मी जेरीला येत म्हणालो, ‘तुमचा फोन बंद करून मी भाजीवाल्याचा फोन उचलला हे बाहेर कळलं तर लोक मला दगडांनी चेचून मारतील.’

लता खुदकन् हसली.

दोन-तीन दिवसांत माझा तिला फोन असायचा. सकाळी 11 ही वेळ ठरलेली होती. साधारणपणे तेव्हा तिची कुठली ट्रीटमेंट चालू नसायची. एकदा फोनवर मी तिला म्हणालो, ‘दीदी, खरं सांगतो, तुमच्याशी बोलताना टेन्शन येतं, दडपण येतं, भीती वाटते.’

‘आपण असं करूया’ लता समजावणीच्या सुरात म्हणाली, ‘मी तुम्हाला आधी सांगत जाईन की आज टेन्शन घ्या, आज नको, आज घाबरा, आज नको. कशी वाटते कल्पना?’

सर्व टेन्शन दूर होऊन मला हलकं वाटलं, हसू आलं. ब्याण्णवव्या वर्षी ही विनोदबुद्धी?
‘दीदी, तरुणपणी तुम्ही अशाच विनोदी होतात का हो?’

‘नाही नाही, भलतीच तापट होते. एक घाव दोन तुकडे करून टाकायचे. एका भांडणानंतर मी संतापून जयकिशनला ‘तुम झाडू हो’ असं म्हणाले होते. बिच्चारा. त्याच्या शेवटच्या आजारात कल्याणजीभाईचा फोन आला होता – ‘जयकिशनला हॉस्पिटलात भेटून या. तो खूपच जास्त आजारी आहे. मी धावले. त्याला कावीळ झाली होती. दारूने ती बळावली होती. अहो, रात्री जागा आली की आपण पाणी पितो ना, त्याप्रमाणे तो दारू प्यायचा……
‘कुठल्या नायिकेशी तुमचं सूत होतं?’ मी विचारलं.
‘मीना कुमारी.’ लता हरखून म्हणाली. ‘भारी स्वभावानं गोड होती. गीता दत्तशी माझी जिगरी दोस्ती होती. जुन्या काळची गायिका जोहराबाई अंबालावाले मला मुलीसारखी प्रेमाने वागवायची.’

‘महंमद रफी?’

‘रफीसाहेबांची एक गंमत सांगते. मला मेहंदी हसनच्या गजला भारी आवडायच्या. मी रेकॉर्डिंगला आले तरी मेहंदी हसनच्या गजला कायम गुणगुणत असायचे. एकदा मेहंदी हसन मुंबईत आला होता. त्याच सुमारास माझं रफीसाहेबांबरोबर एक द्वंद्वगीताचं रेकॉर्डिंग होतं.

रफीसाहेब मला म्हणाले, ‘आपके चहीते मेहदी हसन बंबई में पधारे है। मिल आइए उन्हे। आपको इतने पसंत जो है।’

लताला गंमत वाटली. हसू आलं. रफी चक्क जेलस झाला होता.

‘लेकीन आपको क्या प्रॉब्लेम है?’ लता हसू आवरत म्हणाली, ‘वो मुझे पसंत तो है। वैसे आप भी मुझे काफी पसंद है।’

मी बोलत असताना मागून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता.

‘कोणी आलंय?’

‘नाही, आमचा स्वयंपाकी. विचारतोय बिर्याणी करू का? आता कोण खाणार आहे बिर्याणी? मला बघायला येणारे डॉक्टर्स व वेढा घालून बसलेल्या नर्सेस यांनाच खिलवावी लागेल. मी खिचडीपुरती उरल्येय.’
आजारी बिछान्यावरून हा विनोद आला होता…….
‘दीदी, आपलं द्वंद्वगीत गाण्याचं राहून गेलं.’ मी वात्रटपणे म्हणालो.

‘हो ना!’ लता तत्परतेनं सहमत झाली, ‘आता मला पूर्वीसारखं गायला कितपत जमेल शंका आहे. तुम्ही संभाळून घ्याल ना?’

‘ऑफ कोर्स! सुनील गावसकरबरोबर फलंदाजी करताना मी त्याला नेहमीच ‘शील्ड’ करायचो. तुम्ही ऐन भरात होतात तेव्हाही मी तुम्हाला संभाळून घेतलं असतं.’

लता ठसका लागेपर्यंत हसली. डॉक्टरांनी तिचं मीठ बंद केलं होतं. हसायला तर बंदी नव्हती? ती फोनवरून माझ्या कानात ‘अलिफ लैला’मधलं ‘बहार आयी खिली कलिया’ गायली होती आणि माझ्या मनात आलं की, आमची लता नव्वदी पार केल्यावरही कोणाहीपेक्षा चांगली गाते.…..
पृथ्वीला पोरकं करून स्वर्ग आबाद करण्याची ही कसली दळभद्री देवकरणी?
माझी आई गेली तेव्हा मला काही कळत नव्हतं. आज माझी ‘गॉडमदर’ गेली तेव्हा मला काही कळून घ्यायचंच नव्हतं. तिची हजारो गाणी ती आपल्यासाठी मागे ठेवून गेल्येय. तिच्या अजर गाण्यांचे मधुघट माझ्या घरात व मनात ओसंडून वहातायत. अगदी मोजक्या लोकांना देव अमरत्व का देत नाही?
https://www.saamana.com/article-on-lata-mangeshkar-by-shireesh-kanekar/

******

कुणाची आठवण कुठल्या गाण्याने होते ?

लता मंगेशकर – तेरा जाना दिलके अरमानोंका मिट जाना
अभिनेते
राज कपूर – मेरा जूता है जापानी , मेरी पटलून इंग्लिस्तानी
देवानंद – मै जिंदगीका साथ निभाता चला
दिलीपकुमार – मधुबनमे राधिका नाचे रे
शम्मीकपूर – या हू – चाहे मुझे कोई जंगली कहे
शशीकपूर – एक था गुल और एक था बुलबुल
राजेश खन्ना – मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू
जोंनी वॉकर – जंगलमे एक मोर नाचा
मेहमूद – हम काले है तो क्या दिलवाले है
प्राण – सपने वादे प्यार वफा सब बाते है , बातोंका क्या –
राजेद्रकुमार – तेरी प्यारी प्यारी सूरतको किसीकी नजर ना लगे , चश्मे बद्दू
अभिनेत्री
मीनाकुमारी – रुक जा रात ठहर जारे चंदा –
वहिदा रहेमान – आज फिर जीनेकी तमन्ना है
वैजयंतीमाला – आ जा SS रे , परदेसी
नर्गिस – राजाकी आयेगी बारात , रंगीली होगी रात
मधुबाला – जब प्यार किया तो डरना क्या
बीना रॉय – ये जिदगी उसीकी है , जो किसीका हो गया
रीना रॉय – डफलीवाले , डफली बजा
नूतन – सुनो छोटीसी गुडियाकी लंबी कहानी
सायरा बानू – जा जा जा मेरे बचपन
साधना – नैना बरसे रिमझिम
अभिनेते – अभिनेत्री ( मराठी )
रमेश देव – सूर तेच छेडिता , गीत उमटले नवे
सुधीर फडके – स्वये श्रीराम प्रभू ऐकती
सीमा – नाचनाचुनी अति मी थकले
शंकर महादेवन – सूर निरागस हो
राजा परांजपे – एक धागा सुखाचा
संगीतकार
शंकर जयकिशन – ओ बसंती पवन पागल
रोशन – जो वादा किया वो निभाना पडेगा
हेमंतकुमार – तन डोले मेरा मन डोले
राहुलदेव बर्मन – ओ हसीना जुल्फोवाली
सचिनदेव बर्मन – होठोपे ऐसी बात
गायक
किशोरकुमार – जिंदगी एक सफर है सुहाना
महमद रफी – बहुत शुक्रिया , बडी मेहेरबानी
हेमंत कुमार – निशाना चूक ना जाये , जरा नजरोसे कहदोगी
मुकेश – सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी
मन्ना डे – लागा चुनरीमे दाग
गायिका
आशा भोसले – राधा कैसे न जले
सुमन कल्याणपूर – तुमने पुकारा और
परवीन सुलताना – हमे तुमसे प्यार कितना हम नही जानते
गीता दत्त – वक्त ने किया क्या हसी सितम
शमशाद बेगम – लेके पहला पहला प्यार
संगीतकारा
उषा खन्ना – छोडो कलकी बाते
अशा शेकडो गोष्टी आमच्या हृदयात कोरलेल्या आहेत .
कशाला पाहिजेत वेगळी स्मारके ?
अगदी आजची नवीन पिढी सुद्धा यातलीच शेकडो गाणी गुणगुणते – जोपर्यंत हिंदी / मराठी भाषा जिवंत आहे तोपर्यंत ही गाणी टिकणार आहेत .


श्याम केळकर

*****

06-02-2022

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची सर्वोत्तम गाणी याच नावाच्या कितीतरी याद्या मी पाहिल्या आहेत. कुठलीही यादी न पाहता फक्त स्मरणातून मला जी दहा गाणी चटकन आठवतात ती अशी आहेत.
१.आ जा रे परदेसी
२.ओ सजना बरखा बहार आयी
३. पिया तोसे नैना लागे रे
४. ऐ मेरे वतन के लोगो
५. कल्पवृक्ष कन्येसाठी
६. जरासी आहट होती है तो दिल सोचता है
७.लगजा गले के फिर ये हँसी रात ना हो
८. तेरा जाना, दिलके अरमानोंका
९. रेहते थे कभी जिनके दिलमे
१०. आपकी नजरोंने समझा

ही आणि अशी गाणी मी कितीही वेळा ऐकली तरी मी पुन्हा पुन्हा ऐकतच राहणार आहे. स्व.लतादीदींना साश्रु दंडवत आणि भावपूर्ण श्रद्धाजलि. ॐ शांति.

07/02/2022
काल सकाळी आम्ही सगळे न्याहारी करत असतांना अचानक ती दुःखद बातमी समजली. आम्ही लगेच टीव्ही लावून निरनिराळ्या चॅनेलवरच्या बातम्या पहायला लागलो. त्याच वेळी आपापल्या हातातल्या मोबाइलवर वॉट्सॅप आणि फेसबुकवरले संदेश पहायला लागलो. सगळीकडे शोककळा पसरली होती. प्रत्येकजण भावविव्हल होऊन हृदयद्रावक संदेश प्रसृत करत होता. लतादीदींच्या जाण्यामुळे देशाचे, जगाचे, सिनेजगताचे, संगीताच्या क्षेत्राचे किती अपरिमित नुकसान झाले आहे, कधीही न भरून येऊ शकणारी अशी पोकळी निर्माण झाली आहे, त्या नसल्या तरी त्यांच्या आठवणी चिरकाल येत राहणारच आहेत वगैरे वगैरे. हे ऐकत असतांना माझ्या शंकेखोर मनात काही शंका उठत होत्या. “त्यांची आठवण येणार नाही असा एक क्षण ही नसेल” असे म्हणणाऱ्याला विचारावे की तुला लताबाईंची कोणती गाणी आठवतात ते पटकन सांगशील का ? मग मी स्वतःलाच हा प्रश्न विचारला आणि आठवतील त्या गाण्यांचे मुखडे कीबोर्डवर टाइप करत राहिलो. दहा गाणी लिहिल्यानंतरही अनेक गाणी मी येऊ का असे विचारत ओठावर येत होती, त्यांना थांबवले. एकादी यादी समोर ठेऊन यातली तुझी आवडती दहा गाणी निवड असे मला कुणी सांगितले तर माझी पंचाईत झाली असती. कारण त्यांची संख्या खूप मोठी झाली असती आणि त्यांची एकमेकींशी तुलना तरी कशी करावी हे मलाच समजल नसते. म्हणून मी हे काम बुद्धीला न देता स्मरणशक्तीवर सोपवले.

या यादीकडे पाहिल्यावर हे जाणवते की ही सगळी गाणी पन्नास वर्षांहूनही जुनी आहेत. मग मला तीच गाणी का लगेच आठवली किंवा तीच गाणी माझ्या स्मरणात जास्त रुतून का बसली असतील? याचे एक कारण असे असणार की त्या काळातली लोकप्रिय गाणी ऐकण्याची मला तेंव्हा मनापासून आवड होती आणि दुसरे कारण म्हणजे त्यानंतरच्या पन्नास वर्षांमध्येही ती गाणी अनेक वेळा माझ्या कानावर पडली आहेत. गेल्या चारपाच वर्षांतली कुणाचीच गाणी मला सांगता येणार नाहीत कारण मी ती फारशी मनापासून कधी ऐकलीच नाहीत. हा माझा दोष आहे, की माझ्या वयाचा की बदलत जाणाऱ्या काळाचा ? कोण जाणे.

०८-०२-२०२२
एकादा खेळाडू धडाकेबाज खेळी करत सामने जिंकत असतो, एकादा नटश्रेष्ठ आपल्या अभिनयाने रंगभूमी किंवा चित्रपटसृष्टी गाजवत असतो, एकाद्या संगीत दिग्दर्शकाची किंवा गायकाची गाणी ज्याच्या त्याच्या ओठावर असतात, अशा वेळी त्याने अचानक एक्झिट घेतली तर त्याची उणीव सगळ्या रसिकांना तीव्रपणे जाणवते. पण बहुतेक कलावंतांच्या बाबतीत असे होते की वयोमानानुसार त्यांची शारीरिक क्षमता कमी होत जाते आणि ते पहिल्यासारख्या जोमाने काम करू शकत नाहीत. यामुळे निर्माण होत असलेली पोकळी ते स्वतःसुद्धा भरून काढू शकत नाहीत. हळूहळू त्यांच्याजागी नवे चेहेरे यायला लागतात. त्यातले काही त्यांचेच सहकलाकार किंवा प्रतिस्पर्धी असतात, काही त्यांचे शिष्य असतात, काही जणांनी एकलव्याप्रमाणे दुरून पाहून किंवा ऐकून त्यांचे अनुकरण केलेले असते, तर काही जण पूर्णपणे स्वतंत्र प्रज्ञेने पुढे आलेले असतात. काही वेळा लोकांची अभिरुचि बदलते आणि कलेचा तो प्रकारच तितकासा लोकप्रिय रहात नाही. हे सगळ्याच क्षेत्रात होत असते. अलीकडच्या काळात हे जग सोडून गेलेले रामदास कामत, रमेश देव आणि लतादीदी हे सगळे एका काळी आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर असलेले अत्यंत गुणी आणि लोकप्रिय कलाकार गेली किती तरी वर्षे नवनिर्मिति करत नव्हते. त्यामुळे त्यांच्या निघून जाण्यामुळे कुठली वेगळी पोकळी तयार झाली असे मला तरी वाटत नाही. पण तसे म्हणण्याची पद्धत आहे. या सर्व कलाकारांची उत्तमोत्तम निर्मिती इलेक्ट्रॉनिक्सच्या किमयेमुळे अमर झाली आहे आणि त्यांचे चहाते त्याचा आस्वाद पुढेही घेत रहाणारच आहेत.

०९-०२-२०२२
रामदास कामत रंगमंचावर नाटकातली गाणी गात असतांना मी प्रेक्षकात बसून त्यांना ५-६ वेळा पाहिले असेल आणि रमेश देव स्टेजवर असतांना फक्त एक दोन वेळा आणि तेही त्यावेळी नाटकातली पात्रे म्हणून. लतादीदींना दुरूनसुद्धा प्रत्यक्ष पाहण्याची संधी मला कधी मिळाली नाही. या तीघांनाही व्यक्ती म्हणून मुलाखत देतांना मी टी.व्ही.वर पाहिले आहे. माझी यातल्या कुणाशीच प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही किंवा मी कधी त्यांना एकादे पत्र पाठवले नाही. त्यांच्या कानावर माझे नाव जावे असे कुठलेच चांगले किंवा वाईट कृत्य माझ्याकडून घडले नाही. त्यामुळे त्यांनी ते कधी ऐकले असण्याची सुतराम शक्यता नाही. पण मला मात्र या सर्वांबद्दल मनातून एकतर्फीच खूप आपुलकी वाटत आली होती आणि पुढेही वाटत रहाणार आहे. लतादीदींची सुरेल गाणी ऐकणे हा तर माझ्या नित्य जीवनाचा भाग झाला होता. त्या पेडर रोडवर प्रभूकुंजमध्ये रहातात अशी ऐकीव माहिती होती, इतर दोघे कुठल्या गावात रहात होते हेसुद्धा मला माहीत नव्हते. गेली काही वर्षे त्यांची खबरबात ऐकली नव्हती. त्यामुळे आता हे लोक या जगात नाहीत म्हणून मला काही काळ वाईट वाटण्याशिवाय काय फरक पडणार आहे?
कवीवर्य भा.रा. तांबे यांनी लिहिलेल्या आणि लतादीदींनी गायल्यामुळे प्रसिद्ध झालेल्या गीतातच म्हंटले आहे, “जन पळभर म्हणतिल हाय हाय । मी जातां राहिल कार्य काय ?”


डॉ.अनिल अवचट यांचे लेख

लहानपणी शिकत असतांना आपण जुन्या काळातल्या थोर समाजसेवकांची चरित्रे वाचत मोठे होत असतो. त्या सगळ्या लोकांच्याबद्दल मनात एक आदराचे स्थान निर्माण होत जाते. पण का कुणास ठाऊक, आपल्या काळातल्या आपल्या वयाच्या अशा लोकांची आपण विशेष दखलही घेत नाही. असेच डॉ.अनिल अवचट यांचे नाव अधूनमधून माझ्या वाचनात येत होते, पण मी त्यांची माहिती कधी घेतलीच नाही. गेल्या आठवड्यात त्यांचे दुःखद निधन झाल्यानंतर मात्र सगळ्या सामाजिक माध्यमांमधून त्यांच्यावर भरभरून लेखन समोर आले. तसेच त्यांचे काही लेखही प्रसिद्ध झाले. त्यांचे हे लहानसे संकलन. ही सर्व माहिती फेसबुक आणि वॉट्सॅपवर देणाऱ्या सर्वांचे आणि विशेषतः श्री.प्रकाश घाटपांडे यांचे मनःपूर्वक आभार. दि. ०१-०२-२०२२
मनापासून कलेवर आणि माणसाच्या सामाजिक कार्यावर श्रद्धा असणारा पत्रकारिता जगणारा उत्तम माणूस डॉ. अनिल अवचट गेल्याचे अतीव दुःख होत आहे.. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी आपल्या पुण्यातील पत्रकार नगरात अखेरचा श्वास घेतला.. भावपूर्ण श्रद्धांजली.

काही दिवसांपूर्वीच मी वॉट्सॅपवर डॉ.अनिल अवचट यांचा ‘थांबणे’ या मथळ्याखाली लिहिलेला एक लेख वाचला. त्याची सुरुवातच अशी होती, “कुठे, केव्हा, कसे थांबावे ही एक कला आहे.” पुढे त्यांनी काही मान्यवर लोकांची उदाहरणे दिली होती. हा लेख त्यांनी कधी लिहिला होता हे काही माहीत नाही. अलीकडचा नसावा कारण त्यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले अशी दुःखद बातमी आज आली. क्रिकेटर मंडळी तिशीमध्येच रिटायर होऊन खेळणे थांबवतात कारण त्यांची शारीरिक क्षमता कमी झालेली असते. सिनेसृष्टीतल्या बऱ्याचशा नायकनायिकांना काही काळानंतर काम मिळत नसल्यामुळे ते पडद्यावर दिसेनासे होतात, काहीजण मात्र वर्षानुवर्षे टिकून राहतात. काही कलाकार स्वेच्छेनेही ‘थांबत’ असतील. लेखक, कवी, नाटककार वगैरे सृजनशील मंडळींना वयाचे बंधन नसावे, उलट त्यांचे लेखन अधिकाधिक परिपक्व होत जावे अशी अपेक्षा असते. पण अवचटांचा लेख मुख्यत्वे त्यांच्यावरच होता. पहायला गेल्यास शंभर वर्षांपूर्वीच कविवर्य भा.रा तांबे यांनी “मधुघटचि रिकामे पडति घरी” ही कविता लिहून ठेवली आहे. “आता माझ्या प्रतिभेचा बहर ओसरला आहे” असे त्यांना म्हणायचे होते. ही प्रतिभा कशी लहरी असते हे आरती प्रभू यांनी “ती येते आणिक जाते” असे सांगितले आहे. त्यामुळे ज्या दर्जाचे लेखन वाचकांनी डोक्यावर घेतले तसे आता होत नाही हे वेळीच ओळखून थांबणे ही एक कला आहे असे अवचटांनी सांगितले आहे. त्यांनी स्वतः या बाबतीत काय केले हे मला माहीत नाही कारण माझे फारसे वाचनच नाही. पण त्यांनी आपल्या लेखाची अखेर अशी केली होती, ” हे सगळे ‘मायाजाल’ न संपणारे आहेत त्यातून आपणच ठरवून विरक्त होणे केव्हाही चांगलेच.. विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण तेवढा पण वेळ आपल्याला नाही..”
डॉ.अवचटांनी सुरू केलेले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी पुढची फळी निर्माण केली असणारच. मी एकदा असे वाचल्यासारखे आठवते की त्यांनी किंवा एका त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याने असे म्हंटले होते की माझे कार्य बंद पडावे, त्याची गरजच उरू नये (मुलांनी व्यसनाधीन होऊच नये) अशा शुभेच्छा द्या. डॉ.अवचटांनी केलेले समाजकार्य आणि लेखन यांचे ऋण तर समाजावर राहणारच आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि. . . . आनंद घारे

डॉ.अनिल अवचट यांनी डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांच्यावर लिहिलेला लेख इथे पहावा.
https://anandghare.wordpress.com/2021/10/20/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a4%be/


डॉ.अनिल अवचट हे अखेरच्या काळात इस्पितळात असतंना ते औषधोपचारांना अजीबात प्रतिसाद देत नव्हते आणि त्यांची प्रकृति क्षीण होत चालली होती. त्यावेळी डॉ.आनंद नाडकर्णी त्यांच्या सोबत होते. काहीही आशा उरली नव्हती तेंव्हा त्यांना घरी नेण्यात आले आणि त्यांचे निधन झाले. या काळात मनात आलेल्या भावना या कवितेत व्यक्त केल्या आहेत.

————————————

ऐंशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या श्री. अनिल अवचट ह्यांचा एक अप्रतिम विचारप्रवर्तक लेख, खरच प्रत्येकाने वेळच्या वेळी थांबावेच,त्यातच ग्रेस आहे🙏🙏🙏

थांबणे…..

कुठे, केव्हा, कसे थांबावे ही एक कला आहे. ती सर्व कलांमध्ये लागू होते.

कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते. माझ्याभोवती तरुणपणी अलौकिक माणसे होती. त्यांच्यामुळेच ही जाणीव मला होत गेली. विंदा करंदीकर माझे शेजारी आणि प्रतिभावंत कवी. एकदा त्यांनी ठणकावले की, आता मी लिखाण बंद करतो आहे. आणि त्यांनी शब्द पाळला.

स्वत:शी प्रामाणिक राहून या निर्णयापर्यंत यावयास धारिष्टय़ तर लागतेच; पण विसर्जनाची बूजही लागते. तसेच तात्या माडगूळकरही होते. तेही माझे मित्र होते. आयुष्याच्या उताराला लागले तेव्हा या उमद्या लेखक, चित्रकार, शिकारी आणि प्रवासी माणसाने हाच मार्ग अवलंबला. ते म्हणायचे, ‘‘गडय़ा, जगण्याची आतून उमेद राहिली नाही.’’ विंदा शेवटपर्यंत प्रसन्न राहिले. भाजी, मासे आणायला आम्ही सोबतीने जात असू. मासेवाल्या बाईशी घासाघीस करायला त्यांना मजा येत असे. तेव्हा त्यांच्यातला कवी बहुदा त्यांच्या पिशवीत त्यांनी लपवून ठेवलेला असे. तितक्याच आत्मीयतेने ते संगीतात रमत. तसेच तात्या होते. संध्याकाळी आम्ही गप्पा मारीत फेरफटका मारीत असू. तेव्हा त्यांच्यातल्या अद्भुत लेखकाची सावली कुठेही त्यांच्याबरोबर चालत नसे. उरलेले जीवन एखाद्या कवितेसारखे गुणगुणत ही माणसे कुठलेही आविर्भाव न घेता जगले.

पु.ल.देशपांडे य़ांनीही वेळेनुसार आवराआवर केली. देणग्या देऊन, पुस्तके/ पुस्तकांचे हक्क त्यांनी वाटून टाकून ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य एक गिफ्ट मिळाल्यासारखे हसत जगले. ‘‘जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते..’’ हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे. विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे आमचे आबा. त्यांचा व्यासंग, प्रभुत्व, त्यांची जाण, अभ्यास, समाज सुधारण्यासाठीचे त्यांचे दीर्घ कार्य सर्वानाच ठाऊक आहे. त्यांच्या सहवासात मला हेच जाणवते. या प्रचंड ज्ञानाच्या ग्रंथसंग्रहालयातून ते अचानक जुन्या महाबळेश्वरच्या घरी गेले. ड्रायव्हरला सांगितले, ‘‘सकाळी काही घाई नाही.’’ ड्रायव्हर जेव्हा आत आला तेव्हा छातीवर हात ठेवून आबांचे विसर्जन झाले होते.

ज्ञानी आणि भक्कम जीवनाचा अर्थ कळलेले हे ऋषीच म्हणावे लागतील. साहित्य सहवासात संध्याकाळी फिरताना गंगाधर गाडगीळ एकदा भेटले. गाडगीळ हे ब्रिटिश शिस्तीतले होते. सगळं नीटनेटके, वेळेवर असायचे, जसे त्यांचे वाङ्मय आणि आयुष्य होते. त्या संध्याकाळी त्यांचा ड्रेसदेखील इस्त्री केलेला, तंतोतंत होता. त्यांच्या मदतीला बरोबर नोकरही होता. मला त्यांनी थांबवले आणि म्हणाले, ‘‘मिस्टर अवचट, बरे झाले आत्ताच भेट झाली! आता पुढे भेट शक्य नाही.’’ ‘‘परदेशी चाललाय का?’’ मी विचारले. ‘‘नाही. आत्ता सारे थांबवले आहे. लिखाण आणि इतर गोष्टी व्यवस्थित आवरल्या आहेत. औषधे बंद केली आहेत. आता एकेक मित्रांना भेटतो आहे. थँक्यू, तुमचा सहवास लाभला.’’ ते शांतपणे नोकराबरोबर फाटकापाशी चालत गेले. त्याच आठवडय़ात ते गेल्याचा निरोप आला. या लोकांनी हे विसर्जन किती समजूतदार आणि अलिप्तपणे स्वीकारले होते. ओशोंनीही अत्यंत वेगळ्या संदर्भाने विसर्जनावर लिहिले आहे. Abandoning करणे, सोडून देणे अशी सारी अंगे या विसर्जनात येतात. ओशोंनी शेवटी सांगितले, ‘‘माझ्या गळ्यात घातलेल्या माळा फेकून द्या. संन्याशी भगवे कपडे काढून टाका. स्वत:चा संन्यास स्वत: शोधा. जे मौनात विसर्जित होते तेच चांगले संगीत!’’ त्यांच्या या वाक्यातच जीवनाच्या संगीताचे अर्थ सामावले आहेत. जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो; जो भाग एखादा गुरू प्रसाद म्हणून तुमच्या हातात देत नाही. वयाप्रमाणे जीवनाशी सामील होणे यातच खरी ग्रेस आहे. अंगणात उन्हात तांदूळ निवडत बसलेल्या, साईसारखी त्वचा झालेल्या प्रेमळ आजीमध्ये ती ग्रेस असते. कोऱ्या हॅण्डमेड पेपरवर रंगाचा पहिला ठिपका टाकल्यावर तो हळुवार पसरत जातो. पुन्हा अनेक रंगांत तो मिसळत जातो. त्याच्या कंट्रोल्ड ओघळांनी किंवा छटांनी एक चित्र बनते. कधी ते देखणे दिसते, कधी जमत नाही. हे महत्त्वाचे नाही. ती प्रोसेसच दैवी असते. त्या कागदावरच्या रंगाच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.. बदलत राहतात. विघटन हे अलौकिक अ‍ॅबस्ट्रॅक्ट नॅचरल चराचरातील मौनच असते.

‘समतया वसुवृष्टि विसर्जनै:’ जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो.. हे विसर्जन! झाडाचे पिकले पिवळे पान फांदीवरून निसटते. हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखे जमिनीवर अलगद टेकते आणि विसर्जित होते. अगदी हळुवारपणे. विसर्जन ही मौलिक गिफ्ट आहे. आजकाल लोकाना कुठे थांबावे हेच समजत नाही,जीव संपला तरी हावरट पणा जात नाही छाती फुटेपर्यंत लोक धावत असतात मागे वळून बघत नाही, स्वत:ची पर्वा नसते का तर जेवढे कमवता येईल तवढे पदरात पाडून घ्यायचे पण एक दिवस सर्व असुनही सर्व संपल्या सारखे दिवस येतात तेव्हा हातात फक्त निराशा आणि अंधारच दिसतो.ऐश्वर्य येते पण ते भोगायची मनस्थिती नसते.मग जीवनभर एवढे पळून काय उपयोग झाला. शेवटी हे सगळे ‘मायाजाल’ न संपणारे आहेत त्यातून आपणच ठरवून विरक्त होणे केव्हाही चांगलेच.. विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण तेवढा पण वेळ आपल्याला नाही.

अनिल अवचट 🙏🙏

. . . . . . . . . . . .

अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे’
अनिल अवचट
प्रास्ताविक-
(अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र – डिसेंबर 1995 मध्ये ही अनिल अवचटांची मुलाखत प्रकाशित झाली होती. मुलाखत घेणारे दोघेही माझे अंनिस चळवळीतील हितचिंतक आहेत. 2019 मधे म्हणजे मागील वर्षी या मुलाखतीच्या अनुषंगाने अवचटांशी गप्पा मारायला गेलो होतो. त्यांना या मुलाखतीची प्रत दिली व 24 वर्षांच्या कालावधीनंतर आपल्याला यात काही बदल करावासा वाटतो का? आपल्या विचारांच्या छटेत काही बदल करावा वाटतो का? हे अजमावणे हा हेतु बाळगून मी आलेलो आहे असे सुरवातीलाच सांगितले. एकूण गप्पांनतर असे जाणवले की अंधश्रद्धा निर्मूलन वा तत्सम विषयी त्यांना आज काही वेगळे म्हणायचे नाही.माणसांना समजून घेणे हा मूळ गाभा कायम आहे)
[अनिल अवचट आहेत सव्यसाची पत्रकार, कलाकार, लेखक, व्यसनमुक्ती चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, पण आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते आमच्या चळवळीचे जिव्हाळ्याचे मित्र आहेत. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचे विषय प्रभावीपणे लोकांसमोर आले ते अवचटांच्या लेखणीतून. त्या संदर्भात त्यांची संभ्रम, धार्मिक ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. प्रत्येक प्रश्नाकडे चिकित्सक आणि स्वत:च्या खास वेगळ्या दृष्टीने पहाचे हे अवचटांचे वैशिष्ट्य आहे. टी. बी. खिलारे आणि प्रभाकर नानावटी यांनी घेतलेल्या या मुलाखतीत तुम्हाला त्याला प्रत्यय येईलच..]
व्यसनमुक्तीचं कार्य करीत असताना अंधश्रध्देच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर आपल्याला काय आढळले?
अमली पदार्थाने दारुने व्यसनग्रस्त असे जे लोक येतात ते अनेक अंधश्रद्धेचे प्रकार करूनच आलेले असतात. देवऋषाकडे मांत्रिकाकडे जाऊन आलेले असतात. सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे या गावात एक बाबा आहे. त्याच्याकडे बरीच व्यसनग्रस्त माणसे जाऊन नंतर आमच्याकडे आलेली असतात, आम्ही जेंव्हा त्यांच्या पूर्वायुष्याची माहिती घेतो, तेव्हा त्यांना विचारतो, ‘डोणजे रिटर्न का ?’ तर ते ‘हो’ म्हणतात. ‘काय झालं तेथे ? फायदा झाला का?’ असे विचारल्यावर सांगतात की, ‘बाबाकडे गेल्यावर सुटते असे ऐकले होते, त्यामुळे तिथ जायच्या अगोदर आम्ही भरपर पिऊन घेतली, त्यामुळे तिकडे काय झालं ते मला आठवत नाही. तिकडून आल्यानंतर काही जणाचे काही दिवस पिण बंद होतही. परंतु नंतर चालूच रहात. मला अस वाटत का सायकॉलोजिकल शॉकचा परिणाम म्हणून काही दिवस ते दारू घेत नाहीत. गळ्यात माळ घालणे, शपथ घेणे याचा मानसिक परिणाम होऊन सुटतही असेल, पण ते थोडे दिवस टिकत. पण व्यसनाच्या मागचं कारण शोधून काढणं किंवा प्रश्नाला स्वत: तोड द्यायला शिकवणं, नातेवाईक-मित्र याची मदत त्याला मिळवून देणं हे सगळं आम्ही करतो. ही प्रक्रिया काही तेथे झालेली नसते. बाबा, महाराज याच्याकडे गेल्यावर काहींना फायदा होतो काहींना होत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना तिकडे जाऊ नका असे सांगत नाही.
चळवळीचा आदर्श कार्यकर्ता कसा असावा असे आपल्याला वाटते?
हजारों वर्षे रूजलेल्या कल्पनांशी लढा देताना फार आक्रमक पद्धतीने बोलून चालत नाही. लोक अंधश्रद्धेचा एखादा प्रकार करतात तो का ? हे कार्यकर्त्याने समजून घेतले पाहिजे आणि त्यास पर्याय सुचवला पाहिजे, जे मांत्रिक, गुरू, महाराज आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही कडक बोला परंतु जे त्यात सापडलेले लोक आहेत, त्यांना तुम्ही शत्रू समजू नका. सर्वसामान्य लोकांविषयी जर प्रेम असेल तरच तो चांगला कार्यकर्ता होऊ शकतो, माणसं अंधश्रद्धेमधे का गुरफटतात, एका टोकाला का जातात, हा आपल्याला वरकरणी जरी वेडेपणा वाटत असला तरी त्यांचं जीवन आपल्याला काहीही माहिती नाही. तो कुठल्या परिस्थितीत एखाद्या बुवाकडे, एखाद्या विधीकडे आकर्षित झाला हे आपल्याला काहीही माहिती नसताना त्याची निर्भत्सना करण हे फार क्रूर आहे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे शास्त्रीय दृष्टी कशी उपयुक्त आहे हे लोकांना दाखवून देऊ शकले पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यात अभय बंग व राणी बंग यांनी जे आरोग्यविषयक काम केले आहे त्यामळे तेथील लोकांच्या नाही.’आरोग्यविषयक दृष्टिकोनात फारच बदल झालेला आहे. अरूण देशपांडे यांनी कणकवली येथे शेतीच्या कामात उत्कृष्ठ अशी प्रगती केली आहे
अभय बंग व राणी बंग यांच्या कार्याविषयी सांगा,
अभय बंग याने लहान मुलांच्या आजारांची पाहणी करून असा निष्कर्ष काढला की चालमत्यूचं प्रमाण न्यूमोनियामुळे सर्वात जास्त आहे. सरकार व WHO/ (जागतिक आरोग्य संघटना) यांच्या अहवालानुसार डायरिया (हगवण) हे बालमृत्यूचं प्रमख कारण आहे असं मानलं जात होतं. या निष्कर्षास धक्का देणारा असा हा निष्कर्ष होता, त्याने ९७ टक्के बालमृत्यूचं प्रमाण कमी केलं व अनेक न्यूमोनियाग्रस्त मुले वाचवली. राणी बंगने स्त्रियांच्या आरोग्याविषयी पाहणी केली. स्त्रियांचे आरोग्य हे नेहमीच दुर्लक्षित केलं जातं. सरकार किंवा WHO यांचे कार्यक्रमही प्रसूतिपूर्व व प्रसुतिनंतरची काळजी किंवा कुटुंबनियोजन यावर आधारलेले असतात. म्हणजे मुलाच्या जन्माशी संबंधित तेवढ स्त्रीचं क्षेत्र आहे अस मानलं गेलं आहे परंतु स्त्रीच्या आरोग्य विषयक ज्या समस्या असतात त्या बघितल्या जात नाहीत. दोन गावातील पाचशे-सहाशे स्त्रियांची त्यांनी पाहणी केली . प्रयोगशाळेतील चाचण्या करून असा निष्कर्ष काढला की ९२ टक्के स्त्रिया ह्या कुठल्या ना कुठल्या आरोग्य विषयक समस्येने ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी दवाखाना काढला.सुईणींना प्रशिक्षण देऊन त्याच्यामापत रोगनियंत्रण केले . लोकांच्या श्रद्धांचा आदरही ठेवला आणि त्याचबरोबर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्यही सहजगत्या केल.
पांडरंगशास्त्री आठवलेंनी लाखों लोक व्यसनमुक्त केली असं सांगतात. मोठ्या प्रमाणात माणस अशा व्यसनमुक्त करता येतात का?
खरोखरी व्यसनात ग्रस्त असलेले लोक मुक्त करणे आणि लोकांनी म्हणणे आम्ही व्यसनमुक्त झालो यात फरक आहे. व्यसनात सापडलेल्या माणसाला बाहेर काढणं ही फार कठीण गोष्ट असते. घाऊकपणे लोक व्यसनमुक्त होत नसतात. पण व्यसनविरोधी वातावरण निर्माण होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे..
ध्यानधारणा (meditation) आपण करता का? त्याबद्दल आपलं मत काय?
ध्यानधारणा म्हणजे माणसाचे स्वत:शी काही काळ असणे. स्वत:च्या वर्तनाच, जीवनशैलीचं एकातामध्ये तो निरीक्षण करतो. मग त्याला काही नवीन गोष्टी सुचतात, आपण जे केलं ते बरोबर केल का याचा तो विचार करू लागतो. कोणाला काही आपण बोललो असेल तर त्याचा आपणाला विचार करता येतो. ध्यानधारणा म्हणजे धार्मिक किंवा आत्म्याच्या जवळ जाणारी गोष्ट असेच समजायला पाहिजे असे नाही. ध्यानधारणा बसूनच करता येते असं काही नाही. तस्लीनता – मग ती कुठेही येऊ शकते – माणसाच्या जीवनातला एक मोठा आनंद आहे. इगतपुरीच्या आश्रमात विपध्वनामध्ये दहा दिवस लोक. न बोलता राहतात. पहिले काही दिवस मनामध्ये खूप विचार येतात. पत्तु नंतर मात्र मनाची एक वेगळीच अवस्था येते. त्याचा एक अनुभव माणसाने घ्यावा कधीतरी. त्यात बाईट काही नाही. आपले ब्यबहारातले जे आनंद असलात, त्याच्यापेक्षा वेगळ्या रीतीने आनंद घेण्याची ताकद आपल्या मनामध्ये असते. ती आपण स्वत पुरती. शोधून काढू शकतो, त्यातून आत्मविश्वासही येऊ शकतो.
योगासने आपणा करता का? त्याबद्दल आपले मत काय आहे?
योगासने मी करतो, ती एक जगण्याची वृत्ती आहे. आपल्या ज्या अतिरिक्त गरजा असतात, (उदा. टीव्ही मंग रिमोट कंटोलटी व्ही डी सी आर कार त्याला अंतच नाही आपल मन जे सैरभैर असतं त्यामुळे आपण निसर्गापासून आणि स्वत:पासून दूर राहतो. योग हे स्वत:ला स्थिर करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे शारीरही नीट राहतं आणि मनही. योग ही गोष्ट माणसाला व्यायामासारखी एकदम करता येत नाही. हळू हळू आत्मसात करावी लागते. यात स्पर्धा नसते. कुठल्याही खेळात जी स्पर्धा असते ती माणसाचं मन खाऊन टाकते. खेळ म्हणजे मनसोक्त आनंद, स्पर्धा असेल तर ती माफक असावी.
योगामुळे निरनिराळे रोग बरे होतात, सिध्दी प्राप्त होतात असा दावा केला जातो….
योगामुळे काही रोग बरे होतात, रोग न होण्याची शक्यता वाढते हे मला मान्य आहे. योगासनाच्या निरनिराळ्या आसनांमुळे आपले न वापरले गेलेले शारीराचे भाग आपण वापरतो. औषधाची गरजच भासू नये अशा त-हेची जी काय शारीरिक अवस्था ठेयायची असते ती योगासनामळे येऊ शकते. योगामळे सिडी प्राप्त होतात असे मी मानत नाही.
कुठल्या रोगासाठी कुठली पॅथी वापरावी हे कसं ठरवावं?
शास्त्राने सिद्ध झालेली असतात ती अॅलोपॅथिक औषधे असतात. परंतु अजून शास्त्राने सिद्ध झाल्या नाहीत अशा होमिओपॅथीपासून अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक पॅथीचे दावे खूप असतात. आणि त्या मानाने ते सिद्ध करू शकत नाहीत. त्यामध्ये काही नाही असेही म्हणता येत नाही, होमिओपथिचा काही तोटा तरी मला दिसत नाही. होमिओपॅथीने आजार बरे झालेले मी पाहिले आहेत.
जीवघेण्या आजारात, ज्या रोगाचे निदान झाले नाही अशा आजारात किंवा खात्रीचे ॲलोपॅथीचे उपाय उपलब्ध असताना केवळ रोग मुळातून बरा होतो या आधार नसलेल्या श्रध्देपायी होमिओपॅथी वापरावी का?
शेवटी प्रत्येकानं ठरवावं कोणती पॅथी थापराची, उलट अॅलोपंथीकडे जाणाऱ्यांना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे की विनाकारण ॲटीबायोटिक्स घेऊ नका वाट्टेल तशी ऑपरेशन्स् करू नका
रिकी (Reiki) उपचार पद्धतीचा आपण कोर्स केलेला आहे असे कळले. त्यातून आपल्याला काही फायदा झाला का?
रिकी उपचार पद्धतीचा कोर्स मी केला, परंतु मी ते सोडून दिलं. उपचार पद्धतीवाले असे म्हणत होते की वैश्विक उर्जा (cosmic energy) असते, ती आपण आपल्या शरीरात घेऊ शकतो. लहान मुलांना ती लवकर मिळू वायते, कारण त्यांची ‘ओपनींगज् (शरीराची ‘द्वारे’) जास्त खुली असतात, मोठ्या माणसांची बुजलेली असतात. ही वैश्विक उर्जा आपल्या शरीरात न भिनल्यामुळे शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होतात,आपण जर ही बश्यिक उजो आपला चनल्स (मार्ग) खुली करून घेतली तर सर्व रोग दूर होतील असा त्यांचा सिद्धांत आहे. एकदा चैनेल्स खुली दोऊन वैश्विक उर्जा मिळाल्यानंतर तुम्ही ती दुसऱ्याला देऊ शकता. संबंध शरीरावरील प्रत्येक भागावर तीन-तीन मिनिटे हात ठेवून त्याचं अवस्थांतर करायचं असतं. त्यामुळे रोग निवारण होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे.
वैश्विक उर्जा असते. आणि तिचा आपला संपर्क तुटलेला असतो, इथपर्यंत ठीक होतं. त्या उर्जेचा संपर्क पुन्हा सुरू झाल्यावर रोग जाऊ शकतील हे एकवेळ आपण मान्य करू. परंतु या माणसाने माझी चॅनेल्स खुली केली. हा भाग न कळण्याजोगा आहे. ते असं म्हणतात की तुम्हाला आलेल्या परिणामावरून तम्ही ते ठरय शकता. आता या गोष्टी सिद्ध होणार नाहीत, परंस त्याचे जर परिणाम मिळत असतील तर तुम्ही का मान्य करीत नाही? असे ते म्हणतात. मला स्वत:ला आपण विशेष वेगळा अनुभव घेतला असे वाटले नाही. शरीराच्या निरनिराळ्या भागावर काही मिनिटं हात ठेवल्यामळे थोडं बरं वाटणं साहजिक आहे. ही रिकी उपचार पद्धती मला आता मिळणार आहे. त्यामुळे त्याचा मला फायदा होणार अशी लोकांची श्रद्धा झालेली असते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या बरं वाटत असाव.
पब, बार याबद्दल काय म्हणता येईल?
उपभोगवाद घातक आहे. पण तो आता आपण स्वीकारलेला आहे. खुल्या आर्थिक धोरणातुन तो आलेला आहे.. आपल्या बिघडलेल्या तब्येतीवर आपण ‘मल्टिनॅशनल कंपन्या’ (बहुराष्ट्रीय कंपन्या) हे जहरी औषध आपण मागवलं आहे. त्याचा उपयोग होणार की नुकसानच जास्त होणार हे अजून ठरायचं आहे. पब, नग्न जाहिराती ही सर्व उपभोगवादाची अंग आहेत. प्रत्येकजण या उपभोग संस्कृतीमध्ये कुठे ना कुठे अडकलेलाच आहे. या संस्कृतीमधून तुम्हाला काही निवड करता आली पाहिजे, एखादी गोष्ट आवश्यक किती आहे? अमुक इतक्या मर्यादपर्यंत मी ते वापरेन असं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे
तुम्ही आत्मसात केलेल्या निरनिराळ्या कलांविषयी सांगा ?
माणसांन स्वत:पुरत करायचं म्हंटले तर खूप करता येण्याजोग आहे. प्रत्येक माणस हा कमी-अधिक प्रमाणात कलावंत असतोच प्रत्येक माणसाच्या बाबतीत केलेल्या क्षेत्रात निर्मितीशील अशी वृत्ती असते. तिचं खच्चीकरण हे लहानपणी व पुढे शाळेत गेल्यावर होत असतं. ही वृत्ती जर जागी ठेवली तर स्वत:ला रमेल असं काही ना काही करता येतं. ओरिगामी, काष्ठतक्षण (Wood carving) बासरी यामध्ये मला आनंद मिळतो. विकणे प्रदर्शन करणे अशी वृत्ती मी कलेला आजपर्यंत लावलेली नाही, त्यामुळेच माझ्यातल्या कला स्वतंत्र आहेत असे मला वाटते. स्पर्धात्मक जगानं आपल्याला असं शिकवलंय की मुलं थोडी कुठं चित्र काढायला लागली की त्याला स्पर्धेत पाठवायची तयारी सुरू होते. स्पर्धेने तुम्ही त्याला झाकोळून टाकता. स्पर्धा मी माझ्या जीवनातून काढून टाकलेली आहे, त्यामुळे निर्भेळ आनंद मी घेऊ शकतो, तो कोणालाही घेता येईल. .
आतापर्यंत आपली किती पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि त्यातील अंधश्रद्धा निर्मूलनावर कोणती आहेत. ?
जवळपास माझी पंधराच्या आसपास पुस्तके प्रसिद्ध झाली त्यातील अंधश्रद्धा निर्मूलन विषयक दोन आहेत. – संभ्रम व धार्मिक,
दिवाळी अंकातच का लिहिता ? इतरत्र का लिहित नाही ?
दिवाळी अंकात मला भरपूर जागा मिळते आणि तो खूप काळ वाचला जातो, मासिके आता बंद पडली आहेत किंवा नीट चालत नाहीत.
या वर्षीच्या दिवाळी अंकात कोणकोणते लेख लिहिलेत ?
1) पाणी व माती – साप्ताहिक सकाळ
२) काका चव्हाणांचं व्यक्तिचित्र – महाराष्ट्र टाईम्स
३) Wood Carving – दीपावली
४) तेंदू- पत्ता- मौज, ५) डावं जग – लोकसत्ता
आपल्या मुलींना आपण शहरी प्रचलित कल्पनेच्या विरोधी अशा नगरपालिकेच्या शाळेतून शिकवलं, त्याची काय कारणे ?
आम्ही असं ठरवलं होतं की आमची मुलं मराठीत शिकावीत. पायी जाता येईल अशी जवळ शाळा असावी . तिसरं म्हणजे गरीब लोक जिथं शिकतात तिथं मुलं शिकावीत, त्यामुळे गरीबांबद्दल त्यांना प्रत्यक्ष माहिती कळेल. त्यांच्यातल्या काहींबरोबर मैत्री असेल, राम मनोहर लोहिया हे सरकारी रूग्णालयात मरण पावले होते. त्या घटनेचा माझ्या मनावर परिणाम झाला, राजकीय नेते जसे विमानाने परदेशात जातात व उपचार करून घेतात तसे त्यांनी केलं नाही. आम्ही दोघांनीही विचार करून दोन्ही मुलांना नगरपालिकेच्या शाळेत घातले त्यापैकीएक आर्टिस्ट झाली व सध्या संगणक शिकत आहे दुसरी मुक्ता, M.A. Clinical psychologist झाली. युनिव्हर्सिटीत पहिली आली. दहावीपासून वरच्या क्रमांकात येतच होती, त्या कुठल्याही. क्लासला गेल्या नाहीत. त्यांनी कुठलही गाईड वापरलं नाही, त्यांना जन्मात आम्ही अभ्यास कर असं म्हंटलं नाही. मुलांना स्वत:हून शिकावसं वाटलं तर ते खरे शिक्षण, आपल्या पोरांच भवितव्य हे आपण फार हातात घेऊ नये त्यांचा त्यांना मार्ग काढू द्यावा. एकदा मुल बाढल्यावर पुढे नातं हे मित्रासारखंच असतं.
__ मायबोली, मिसळपाव या संकेतस्थळांवर यापुर्वी प्रकाशित
श्री.प्रकाश घाटपांडे


. . . . . . . . . . . . . . . . . .

Prakash Ghatpande

डॉ अनिल अवचट यांच्या स्मृतीला अभिवादन. यानिमित्त काही आठवणी जाग्या झाल्या. ओतूर, ता.जुन्नर हे माझे जन्मगांव. तेच अनिल अवचटांचे गांव. माझे वडील ओतूरच्या हायस्कूलात बरीच वर्षे शिक्षक होते त्यांना हायस्कूलमधे विज्ञान विषय शिकवायचे. आमच्या कुटुंबाशी त्यांच्या कुटुंबाचा स्नेह होता.ओतूर माझे जन्मगाव असले तरी मी वाढलो बेल्ह्यात.बेल्ह्यातच आमचे घर व शेती होती. त्यामुळे मला ओतूरचे काही आठवत नाही. पुण्यात मी कॉलेज शिक्षणासाठी आलो नंतर पुण्यातच नोकरी ला लागलो. तेव्हा मी अनिल अवचटांचे लेख वाचायचो. एकदा त्यांना भेटायला पत्ता शोधत गेलो. ऐसपैस गप्पा झाल्या व ओतूर कनेक्शनमुळे स्नेहबंध घट्ट झाला. नंतर असेच ज्योतिष व सामाजिक संदर्भापोटी मधून मधून भेटत राहिलो. माझ्या लग्नालाही डॉ अनिल अवचट व डॉ सुनंदा अवचट उभयता आवर्जून आले होते. माझ्या यंदा कर्तव्य आहे या विवाह व ज्योतिष या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्याच हस्ते झाले होते.अत्याधुनिक दुर्बिण

जगातली सर्वात मोठी, सर्वात महागडी आणि अत्याधुनिक अशी दुर्बिण तयार करून ती अंतराळात पाठवून दिली आहे. पृथ्वीपासून चंद्र जितक्या अंतरावरून फिरत असतो त्याच्याही तीन चार पट पलीकडे एका जागेवर या दुर्बिणीला ठेवले जाईल आणि ती पृथ्वीच्या बरोबरच सूर्याची प्रदक्षिणा करत राहील, पण ती अवकाशातील दूर दूर असलेल्या ताऱ्यांचे निरीक्षण करून सगळी माहिती पृथ्वीवर राहणाऱ्या शास्त्रज्ञांना पुरवेल. या अगडबंब दुर्बिणीचे नाव आहे वेब स्पेस टेलिस्कोप. श्री बाळासाहेब पाटोळे यांनी या अद्भुत दुर्बिणीची सविस्तर माहिती या अभ्यासपूर्ण लेखात दिली आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार.

हबल अल्ट्रा डीप फिल्ड या आगळ्यावेगळ्या फोटोवर श्री.विनीत वर्तक यांचा लेखही खाली दिला आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार.

. . . . . . . . . . . . . . .

सफर विज्ञानविश्वाची : 75000 करोडचे टाईम मशीन ⏳ . . . . म्हणजेच

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप JWST 💸


लेखन : बापा – बाळासाहेब पाटोळे 📝

अंतरीक्ष…. हा अगदी लहानपणापासूनच माझा आणि आपल्या सर्वांचाच अगदी जिव्हाळ्याचा विषय.
माझ्या बाबतीत म्हणाल तर मी वयोमानाने जसजसा मोठा होत गेलो तसं अंतरीक्ष आणि खगोल माहिती वाचणे, त्यासंबंधी डॉक्युमेंटरी बघणे हे जणू व्यसनच होत गेले. आजही माझ्याकडे अश्या डॉक्युमेंटरी चे जवळपास 50 GB चे कलेक्शन आहे आणि ते सर्व मी पाहून संपवले आहे, आणि अजूनही नवनवीन माहिती साठी शोध चालूच असतो. असो…. माझ्याविषयी बोलण्यापेक्षा आपण मूळ मुद्द्यावर येऊ.
या अनंत अश्या अंतराळात काय आणि किती गोष्टी/वस्तू सामावल्या आहेत हे अजून ही शेकडो वर्षे अभ्यास करून मानवजातीला पूर्णतः माहीत होईल याबद्दल नेमकी खात्री देता येणार नाही इतका अफाट पसारा या अनंत विश्वात विसावलेला / पसरलेला आहे.
मानव अगदी अनादी काळापासून खगोल अभ्यास करत आलाय आणि कालपरत्वे तो अभ्यास एका वेगळ्या उंचीवर गेला तो म्हणजे गॅलिलिओ गॅलिली या शशोधकाने लावलेल्या दुर्बीण च्या शोधामुळे. त्यानंतर आजतागायत लहान मोठ्या आणि विविध प्रकारच्या हजारो दुर्बिणी (टेलिस्कोप) आजही अहोरात्र आकाशाकडे टक लावून आहेत आणि दिवसागणिक नवनविन खगोलीय माहिती गोळा करत आहे.
दुर्बिणी वापरात आल्यानंतर अनेक खगोल संशोधक वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी लावून अंतिरक्ष पिंजून काढू लागले पण त्यांना कांही अडचण जाणवू लागल्या आणि त्यापैकी कांही म्हणजे “प्रथ्वीवरील वातावरणा तील धूलिकण” आणि “नैसर्गिक व मानवनिर्मित उजेड” या दोन गोष्टी आकाशातून दुर्बिणीत येणाऱ्या प्रकाशाला अडथळा ठरू लागल्या. त्यामुळे दुर्बिणीतून नेमकी प्रतिमा मिळणे अवघड होऊ लागले.
याचे उत्तर शोधले खालील पध्दतीने:
अनेक महाकाय दुर्बिणी मानवाने निर्मित केल्या आणि त्या पृथ्वीवर असणाऱ्या उंचच उंच अश्या पर्वतावर नेऊन ठेवल्या जिथं कोणताही मानव निर्मित प्रकाश अडथळा करणार नाही आणि पर्वताच्या उंचीमुळे तेथील वातावरण ही अगदीच तुरळक असे असेल. त्यामुळे वातावरणातील धूलिकण प्रतिमेला बिघडवू शकणार नाहीत.
यामुळे निरीक्षण करणे अगदीच सोपे आणि विना अडथळा होऊ लागले.
पण यालाही कांही मर्यादा येऊ लागल्या आणि यातही एक अडचण होऊ लागली. ती अडचण कोणती???
💿💿💿💿💿💿💿💿💿💿💿💿💿
चला पहिला एक उदाहरण घेऊ…
जुन्या काळातील फोनोग्रामची जी एलपी डिस्क असते ती एकदा डोळ्यासमोर आणा, आता त्या डिस्क वर ज्या वर्तुळाकार खाची आहेत त्या लक्षात घ्या. त्या खरेतर वर्तुळाकार जरी असल्या तरी त्या सर्पिलाकार असतात, म्हणजेच त्या खाचा डिस्क च्या मध्यातून सुरू होतात आणि डिस्क फिरेल तसे त्या खचित अडकणारी सुई बाहेरून फिरत फिरत त्या डिस्क च्या केंद्रापर्यंत आपोआप सरकत पोचते.
अगदी तंतोतंत असाच आकार आपल्या मिलकीवे गॅलक्सी (मंदाकिनी आकाशगंगा) ची आहे, याच आकाशगंगेत आपली सूर्यमाला आहे आणि याच सुर्य मालेत आपली पृथ्वी आणि इतर ग्रह आहेत. मजेची गोष्ट म्हणजे आपल्या सुर्यासारखे करोडो इतर सूर्य आणि त्यांच्या ग्रह मालिकाही आपल्या याच मंदाकिनी आकाशगंगेत आहेत.
आता वरती जी मी दुर्बिणीतून निरीक्षणात होणारी अडचण सांगत होतो ती अशी की, आपल्या सुर्यमालेच्या चारी बाजूस अनेक इतर सूर्यमाला विखुरलेल्या आहेत आणि या आपल्याला इथं पृथ्वीवर बसून दिसणे शक्य होत नव्हते. का?? तर त्याचे कारण म्हणजे वरील जसे मी फोनोग्राफ च्या एलपी डिस्क च्या खाचेबद्दल सांगत होतो ते पुन्हा डोळ्यासमोर आणा,
आता समजा….. ती डिस्क म्हणजे आपली मंदाकिनी आकाशगंगा. त्यावर असणाऱ्या सर्पिलाकार खाचा म्हणजे अनेक सूर्यमालाच्या ओळी, आणि त्या खाचेतील एक एक बारीक खड्डा म्हणजे एक एक सूर्यमाला. आता त्या खड्ड्यात बसून (म्हणजेच एक सुर्यमालेच्या एखाद्या ग्रहावर बसून) आपल्याला त्या एलपी डिस्क च्या पलीकडील खाचेत किंवा डिस्कच्या मध्यावर काय आहे? किंवा त्या डिस्कच्या पलीकडे काय आहे? हे त्या एका खाचेच्या खड्ड्यात राहून दिसणे कसे शक्य होईल???
आणि नेमकं हीच अडचण आपल्याला पृथ्वीवर तैनात केलेल्या कोणत्याही दुर्बिणीतून बघताना होत असते.
यासाठी त्या खड्ड्यातून बाहेर पडून खूप वरती उंचीवर जावे लागेल जेणेकरून डिस्क चे केंद्र आणि डिस्कच्या पलीकडे ही आपली नजर पोचू शकेल.
यावर उपाय ही एक तोडगा 20व्या शतकाच्या 90व्या दशकात शोधला गेला तो म्हणजे . …….
हबल टेलिस्कोप च्या माध्यमातून.
🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️

हबल_टेलिस्कोप 🛰️🚀

ही टेलिस्कोप 24 एप्रिल 1990 रोजी अंतराळात स्थापन करण्यात आली.
⭕️ #हबलचीठळकवैशिष्ट्ये:
🏮१. त्याकाळची किंमत 2600 करोड रुपये
🏮२.पृथ्वीपासून अंतर 545 किलोमीटर
🏮३. वेग 28000 किलोमीटर / प्रतितास
🏮४. प्रत्येक 97 मिनिटांत एक पृथ्वी प्रदक्षिणा
🏮५. मूळ आरसा 2.4 मीटर (जवळपास 7 फूट)
🏮६. वजन 12200 किलो
🏮७. तापमान 20 डिगरी सेल्सिअस
🏮८. 90 दशकातील कॅमेरा, इन्फ्रा रेड कॅमेरा
ही दुर्बीण पृथ्वीच्या वातावरणाच्या ही कितीतरी वर उंचीवर असल्याने त्यामध्ये वातावरण अथवा मानवनिर्मित प्रकाश यांचा अडथळा तर नाहीच याउपर म्हणजे दुर्बीण अजून उंचीवर गेल्याने आपल्या सुर्यमालेच्या बाहेर डोकावणे ही शक्य झाले. मागील 30 वर्षाच्या कारकिर्दीत या दुर्बिणीने अनेक अजब असे शोध लावले आहेत आणि अजूनही पुढील 10 वर्षे तिचे कार्य चालूच असणार आहे.
पण….. हबल दुर्बीण बनवली गेली तेंव्हा ती पृथ्वीच्या कक्षेत स्थापन करताना अचानक कांही अडचण झाली आणि त्याच्या प्रतिमा ठीक येईना झाल्या होत्या तेंव्हा त्याकाळच्या अंतराळवीरांनी स्पेस वॉक करत जरुरी असणारे बदल व दुरुस्ती करत ही दुर्बीण यशस्वीपणे अपेक्षित अश्या पद्धतीत कार्यरत केली आणि वेळोवेळी आवश्यक ते तांत्रिक बदल करत हबल ला आजही कार्यरत ठेवले आहे.
जेंव्हा पासून यांत्रिक प्रगती चालू झाली त्यानंतर सतत हि प्रगती चालूच आहे. सुदैवाने गेल्या दोन दशकांत मात्र ही प्रगती अतिजलद गतीने होत आहे.
आज आपण खरेदी केलेला अद्ययावत असा मोबाईल अगदी 6 महिन्याच्या आत मागासलेला वाटू लागतो इतका वेग आजच्या तंत्रज्ञानाने घेतला आहे.
ही गोष्ट अगदी सामान्य अश्या मोबाईल बाबत घडते मग विचार करा संशोधन क्षेत्रातील यंत्रसामुग्री मध्ये किती वेगवान आणि थक्क करणारे बदल होत असावेत.
आणि म्हणूनच 1990 साली प्रस्थापित झालेली हबल दुर्बीण 1996 सालीच या संशोधकांना मागासलेली वाटू लागली आणि या संशोधकांनी पुढील अद्ययावत अशी दुर्बीण बनवण्याचा घाट 1996 साली घातला.
युरोपियन स्पेश एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी व नासा तसेच अन्य 9 देशांच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याने ही मोहीम सुरू केली.
⛔️ #जेम्सवेबअंतराळदुर्बीण 💸 ही दुर्बीण जरी 1996 साली बनवण्यास चालू झाली तरी मधील काळात अनेक तांत्रिक, राजकीय, आर्थिक समीकरणे बदलत गेली आणि त्यामुळे जवळपास अडीज दशके म्हणजेच 25 वर्षाचा काळ हे स्वप्न सत्यात उतरण्यास लागला. या विलंबामुळे त्याचे निर्मीती मूल्य कितीतरी पटीने वाढले पण एक गोष्ट चांगली झाली आणि ती म्हणजे आज आता उपलब्ध असणारे तंत्रज्ञान यात समाविष्ट करण्याची संधी संशोधकांना मिळाली ज्याचा सदुपयोग त्यांनी अगदी बिनधास्तपणे केला. हबलची पुढील वारसदार असणारी ही दुर्बीण, पण या दोघीत कांहीही समानता नाहीय. दोन्ही दुर्बीणी मधील ठराविक फरक कळण्यासाठी सोबतचा फोटो अवश्य बघा. जेम्स वेब दुर्बीणीची टेक्नॉलॉजी आणि त्याची स्थापन कक्षा या हबल पेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत.

⭕️ #जेम्सवेबदुर्बीणठळक_वैशिष्ठ्ये खालीलप्रमाणे:
🏮१. हबल पेक्षा तीन पट मोठा आरसा (मिरर) 6.5 मीटर
🏮२. या दुर्बिणीची मापं, 69.5 मीटर लांबी आणि 46.5 मीटर रुंदी. याच्या सन शिल्ड ची मापे टेनिस कोर्ट एवढी आहेत.
🏮३. एकूण वजन 6200 किलोग्रॅम
🏮४. आजची किंमत 75000 करोड (भारतीय चलन मूल्य)
🏮५. प्रथ्वीपासून परिक्रमा कक्षा 15 लाख किलोमीटर.
🏮६. अंदाजे कार्यकाळ (अपेक्षित) 10 वर्षे
🏮७. तापमान (वजा) -223 डिगरी सेल्सिअस.

जेम्सवेब दुर्बीण कुठं असेल !!! ❓❓❓

आता इतक्या मोठ्या दुर्बिणीला पृथ्वीपासून इतक्या दूरवर का बरं स्थापित करण्यात येत आहे?? आणि नेमकं 15 लाख किलोमीटर हेच अंतर का ठेवलंय ?? चला याची माहिती घेऊ…
सूर्य, चंद्र, प्रुथ्वी आणि जवळपास सर्व ग्रह तारे यांची प्रत्येकाची स्वतःची एक गुरुत्वाकर्षण क्षमता / ताकद असते, आणि ही क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी व वेगवेगळ्या अंतरापर्यंत कार्यरत असते.
आपल्या पृथ्वीचा एकमेवाद्वितीय असा नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र. हा चंद्र पृथ्वीपासून 3,84,500 किलोमीटर या अंतरावरून पृथ्वीची प्रदक्षिणा करत असतो. याला कारणीभूत आपल्या पृथ्वीची आणि चंद्राची स्वतःची गुरुत्वाकर्षण ताकद हीच आहे.
सूर्य मात्र आपल्या पृथ्वीपासून 14.84 करोड किलोमीटर इतक्या अंतरावर असूनही सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपली पृथ्वी सूर्याची परिक्रमा करत असते.
आपली पृथ्वी आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षण क्षमता जरी वेगवेगळ्या असल्या तरी यांच्या फिरण्याच्या जागा गृहीत धरता आतापर्यत शशोधकांनी अंतराळात अश्या पाच जागा शोधून काढलेल्या आहेत की जिथं सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या एकमेकांवर होणाऱ्या परिणामाने त्या विशिष्ट अंतराळ स्थळांवर प्रभावित गुरुत्वाकर्षण हे शून्य होऊन जाते. अंतराळातील अश्या पाच जागांना L1, L2, L 3, L 4 आणि L5 अशी नावं दिली गेली आहेत, त्यापैकीच एक जागा L2 ही पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे आणि या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे इथं पृथ्वी किंवा चंद्र यांची सावली ही पोचत नाही, त्यामुळे दुर्बिणी ला कांही अडथळा होण्याची शक्यता येत नाही. तसेच इतक्या अंतरामुळे सूर्याचे तापमान या दुर्बीणीच्या उपकरणांवर ही परिणाम करू शकणार नाही.
पण तरीही सूर्याकडिल असणाऱ्या दुर्बिणीच्या बाजूचे तापमान 100 डिगरी सेल्सिअस आणि सूर्याच्या विरुद्ध बाजूचे तापमान हे शून्याच्या खाली म्हणजेच ऋण 270 डिगरी सेल्सिअस इतकं खाली असणार आहे.
सूर्याच्या या तापमानापासून वाचण्यासाठी या दुर्बिणी ला सन शिल्ड बसवण्यात आले आहे जे टेनिस कोर्ट इतक्या प्रचंड आकाराचे आहे आणि याच मुळे दुर्बिणीचे तापमान हे ऋण 230 ते 270 डिगरी सेल्सिअस इतके कायमस्वरूपी राखले जाईल आणि हेच तापमान गृहीत धरून दुर्बिणीतील सर्व उपकरणे विकसित केली गेली आहेत.
पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर हे अंतर कायम ठेवत ही दुर्बीण ही पृथ्वीसोबत सूर्याची वार्षिक परिक्रमा करत राहील. आणि आपले काम चोख बजावत मिळालेली माहिती आपल्या पर्यंत पोचवत राहील.


⛔️⛔️⛔️⛔️⛔️⛔️⛔️⛔️⛔️⛔️⛔️⛔️

जेम्सवेबदुर्बिणीचीठळक आणिआश्चर्यकारक वैशिष्ठ्ये खालील प्रमाणे*:

🏮१. मूळ आरसा हा 21 फूट आकाराचा आहे, पण तो एकसंध नसून एकूण 18 षटकोनी आकाराच्या लहान लहान आरश्यानी मिळून बनलेला आहे.
🏮२. या अठरा षटकोनी आकाराच्या प्रत्येकी 4.3 फूट असणारे आरसे हे बेरेलीयम या धातूपासून बनवले आहेत आणि या प्रत्येक आरशावर वर 48 ग्राम सोन्याचा थर ही लावला आहे. सोने हा युनिक धातू असल्याने अंतराळातील कोणत्याही गॅस अथवा रासायनिक सामुग्रीचा वाईट परिणाम या आरशांवर होणार नाही.
🏮३. हे 18 आरसे पुन्हा एकत्र येऊन एकसंध असा 21 फुटाचा आरसा तयार होण्यासाठी एकूण 126 छोट्या मोटर यात बसवण्यात आल्या आहेत. दुर्बीण इच्छित स्थळी पोचल्यावर हे सर्व आरसे आपली निर्धारित हालचाल करून 21 फूट आरसा तयार करतील.
🏮४. या दुर्बिणीचा मेंदू म्हणजे ISIM Integrated Science Instrumentation Module (संयुक्तिक वैज्ञानिक उपकरन नियामक भाग). या व्यतिरिक्त Spacecraft Bus (अंतराळायन वाहन) ही व्यवस्था ही आहे, याची जबाबदारी म्हणजे या दुर्बिणीला सुनिश्चित स्थळी पोचवणे, पोचल्यानंतर दुर्बीण व्यवस्थितपणे उघडून त्यांची कार्यप्रणाली चालू करणे, माहिती (प्रतिमा) गोळा करणे, मिळलेल्या माहितीचे पृथक्करण करणे, आणि ही माहिती पृथ्वीवर पाठवणे.
☢️☢️☢️☢️☢️☢️☢️☢️☢️☢️☢️

जेम्सवेबदुर्बीणीलाप्रामुख्याने खालील जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत*:

⚠️१. बिग बँग नंतर च्या पहिल्या कांही शेकडो हजारो वर्षांनंतर उत्पन्न झालेल्या किरणांचा अभ्यास करणे
⚠️२. त्यानंतर प्रथमच तयार झालेल्या कांही आकाशगंगा यांचे निरीक्षण करणे
⚠️३. अगदी दूरस्थ तसेच आपल्या व इतर आकाशगंगेत असणाऱ्या ग्रह ताऱ्यांचे विस्तृत निरीक्षण करणे.
⚠️४. डार्क मॅटर (दैवी ताकद वस्तुमान) याचा शोध घेणे
⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️
आता येऊ मूळ मुद्द्याकडे…..

टाईम_मशीन 🚀

वेळेच्या मागे पुढे जाऊन डोकावणे याला टाईम ट्रॅव्हल म्हणतात पण हे खरंच शक्य आहे?
जेम्स वेब ही दुर्बीण 1350 करोड वर्षांपूर्वी घडलेला बिग बँग (महाविस्फोट) कसा काय बघणार??
त्यानंतर लगेच बनलेल्या आकाशगंगा कशा काय तपासणार???
हीच तर खरी गंमत आहे….या गमतीशीर कारणासाठीच तर हा लेख माझ्या हातून सुटला आहे.
प्रकाश (लाईट) ही या साऱ्या अफाट अश्या अंतराळातील एकमेव गोष्ट आहे जी कधी बदलत नाही की आपल्या गती मध्ये बदल करत नाही. प्रकाशाची गती ही नेहमीच स्थिर आणि अबाधित राहिली आहे आणि गंमत म्हणजे ही एक प्रकाशाची गती आजतागायत कोणीही गाठू शकले नाही.
प्रकाशाची गती नेमकी असते तरी किती??
2,99,793 (दोन लाख नव्व्यानव हजार सात शे त्र्यानव) किलोमीटर प्रति सेकंद इतका भयानक वेग हा लाईटचा असतो.
(म्हणजेच जवळपास 3 लाख किलोमीटर प्रतिसेकंद).
आता याला 60 ने गुणले की येणारे उत्तर म्हणजे 180 लाख किलोमीटर हे अंतर एक मिनिटात प्रकाश पार करतो असा त्याचा अर्थ आहे.
आता 180 लाख किलोमीटर हे अंतर जर दर मिनिटाला पार होत असेल तर मग प्रतितास , प्रतिदिन आणि प्रतिमहिना किती अंतर पार होत असावे?.
आता 180,00,000 ला 60x24x365 गुणा, याचे जे उत्तर येईल तो आकडा म्हणजेच प्रकाश पृथ्वीवरील एका वर्षात जे अंतर पार करेल ते किलोमीटर असेल. आणि याच अंतराला #एकप्रकाशवर्ष म्हटले जाते.
आपले ब्रह्मांड इतके अफाट पसरलेले आहे की त्याचे अंतर आपल्या पृथ्वीवरील किलोमीटर किंवा मैल या परिमानाने मोजणे अशक्यप्राय आहे म्हणूनच अंतराळातील अंतर हे प्रकाश वर्षात मोजले जाते.
आता एक प्रकाश वर्ष म्हणजे 300000x60x60x24x365 किलोमीटर अंतर हे एव्हाना आपल्या लक्षात आलेले आहेच.
आता यापुढील आणखी एक गंमत पाहू………
#टाईमट्रॅव्हल……
⏳🚀
आपला सूर्य आपल्या पासून 14.84 करोड किलोमीटर इतक्या अंतरावर आहे, सुदैवाने हे अंतर जरी करोडो किलोमीटर असले तरी एक प्रकाश वर्षाच्या अगदीच एका क्षुल्लक भागाइतकेच आहे.
सूर्यापासून निघणारा सूर्यप्रकाश आपल्या पर्यंत म्हणजेच पृथ्वीवर पोचण्यास 8 मिनिटे आणि 27 सेकंद इतका वेळ लागतो. याचा दुसरा अर्थ काय?
याचा सरळ सरळ अर्थ हाच आहे की आपण जेव्हा केंव्हा सूर्याकडे पाहतो तेंव्हा आपल्याला सूर्य हा 8 मिनिटे 27 सेकंदापूर्वी जसा होता तसाच दिसत असतो आणि आताचा सूर्य आपल्याला आतानंतर 8 मिनिटं आणि 27 सेकंदानंतर दिसणार असतो.
आता खरी गंमत ही की आपण या प्रकाश वेग आणि अफाट अंतराच्या खेळामुळे विनासायास 8 मिनिटं आणि 27 सेकंदाचा टाईम ट्रॅव्हल करून भूत काळातील सूर्य पाहत असतो.
याचा आणखी एक वेगळा अर्थ म्हणजे आपल्याला पृथ्वीवर राहून कधीही ताजा ताजा सूर्य पाहता येतच नाही.
मला वाटतंय आपल्याला आता प्रकाश वेग, प्रकाशवर्षं आणि टाईम ट्रॅव्हल ह्या संज्ञा आता समजून गेल्या असतील.
याच अनुषंगाने आपण अंतराळातील जे कांही बघत असतो ते म्हणजे त्या वस्तू/ग्रह/ताऱ्यापासून परावर्तित अथवा प्रसारित झालेला प्रकाश हा असतो, आता ती वस्तू किती प्रकाशवर्षं दूर आहे यावर आपल्याला दिसणारा प्रकाश किती प्रकाश वर्ष पूर्वीचा आहे हे अवलंबून असते.
म्हणजेच आपण अंतराळातील जे कांही पाहत असतो ते वर्तमान काळातील कधीच नसते तर ते भूतकाळातीलच असते.
आता याच शास्त्रीय आणि मूलभूत आधारावर आपण जेम्स वेब या दुर्बिणीतुन भूतकाळातील घडलेल्या घटना पाहणार आहोत.हबल ने ही त्याच्या कुवतीनुसार शकय तिथं पर्यंत अश्या अनेक आकाशगंगा आणि ग्रह तारे यांची अंतरे आणि अंदाजे त्यांचा जन्मकाळ वर्तविला आहे.
जेम्स वेब ही दुर्बीण हबल दुर्बिणीपेक्षा 10 पट अधिक सक्षम आणि ताकदवान आहे. आणि याचमुळे या जेम्स वेब दुर्बीणीला ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली त्यावेळचा प्रकाश जो अंदाजे 1350 करोड प्रकाशवर्षं दूर असणार आहे त्याला शोधून त्याचे निरीक्षण करायचे आहे आणि तो सापडला की आपसूकच महाविस्फोट आणि त्यांनतर उत्पन्न झालेल्या आकाशगंगा यांची कांही ना कांही माहिती ही मिळणारच. आणि म्हणूनच या दुर्बिणीला भूतकाळ दर्शवणारी, टाईम ट्रॅव्हल करणारी दुर्बीण म्हटलं जातं आहे.
जेम्स वेब अंतराळ दुर्बीण ही 25 डिसेंबर 2021 रोजी अंतराळात प्रक्षेपित करण्यात आली आहे आणि जवळपास 30 दिवसांच्या प्रवासानंतर ती नियोजित स्थळी म्हणजेच L2 पॉईंट वर पृथ्वीपासून 15,00,000 किलोमीटर अंतरावर प्रस्थापित होईल. आता सध्या जवळपास 13 लाख किलोमीटर अंतर पार झाले आहे, या दरम्यान प्रवास चालू असताना दुर्बीण आपली ठराविक उपकरणे उघडून सेट करत आहे आणि उर्वरित उपकरणे निर्धारित स्थळी पोचल्यानंतर उघडून कार्यान्वित होतील.
पण लगेच आपल्याला माहिती पोचवली जाणार नाहिय, पाहिले 5 ते 6 महिने आपल्याच मंदाकिनी आकाशगंगा (मिलकी वे गॅलक्षी) चे निरीक्षण ही दुर्बीण करत राहील आणि सर्व उपकरणे यानुसार सेट केली जातील आणि हीच माहिती मूलभूत माहिती म्हणून स्टोअर केली जाईल आणि मग आपल्या आकाशगंगेच्या बाहेरून येणारी माहिती गोळा केली जाईल व त्याचा अभ्यास मूलभूत माहितीशी तुलनात्मक रीतीने तपासली जाऊन आपल्याकडे माहिती प्रसारित केली जाईल.
जेम्स वेब दुर्बिणीत चार प्रकारचे इन्फ्रा रेड पद्धतीचे सेन्सर बसवले गेले आहेत ते अगदी लाखो, करोडो प्रकाश वर्षे दूर असणारा अंधुक प्रकाश ही टिपण्याची क्षमता बाळगून आहेत. हबल मध्येही अश्या इन्फ्रा रेड दुर्बीण आहेत पण त्यांची क्षमता इतकी अफाट नक्कीच नाही.
या अश्या अजीब आणि विस्मयकारक कारणांमुळे ही दुर्बीण अतिशय वेगळी आणि खगोलीय अभ्यासाला एक वेगळं वळण देणारी जादुई कांडी ठरणार आहे.
आता उत्सुकता आहे ती कधी या दुर्बिणी पासून अपेक्षित अशी माहिती यायला चालू होईल याची.
(वरील सर्व माहिती वेगवेगळ्या वेब साईटवरून, यु ट्यूब विडिओ मधून आणि माझ्याकडिल उपलब्ध असणाऱ्या डॉक्युमेंटरी मधून संग्रहित केली आहे, माहिती मध्ये कांही शंका अथवा बदल आवश्यक असल्यास मला मेसेंजर वर कळवा, योग्य माहिती नक्कीच यात समाविष्ट केली जाईल किंवा आवश्यक ते बदल केले जातील. सोबतचे फोटो हे गुगल वरून व नासा च्या पेज वरून साभार घेतले आहेत)
एक अंतराळवेडा
बापा – बाळासाहेब पाटोळे
इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर
टोकियो, जपान.

सफर विज्ञानविश्वाची ( Safar Vidnyanvishwachi ) या फेसबुकवरील ग्रुपवरून साभार दि.२२-०१-२०२२

*********************

हबल अल्ट्रा डीप फिल्ड

… विनीत वर्तक
सुमारे ४०० वर्षापूर्वी मानवाने आकाशाकडे दुर्बिणी मधून बघायला सुरवात केली. त्याआधी जे काही आपण बघत होतो ते उघड्या डोळ्यांनी.. आकाशात घडणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टींची नोंद करत मानव पुढे जात होता. त्याच्या ह्या बघण्याला खूप मर्यादा होत्या. त्यामुळे आकाशाची खरी ओळख व्हायला माणसाला १६१० हे साल उजाडावं लागलं. ह्याच वर्षी गॅलिलिओने आकाशाकडे दुर्बिणीतून बघितलं. त्याला जे काही त्या दुर्बिणीतून दिसलं, त्याने मानवाला एक नवीन दृष्टी आकाशाकडे बघण्याची मिळाली.ह्या दृष्टीतूनच पुढे अनेक शोध लागले.
अवकाश दुर्बिणीच्या कल्पनेवर काम सुरु व्हायला १९७० साल उजाडलं. नासा, युरेपियन स्पेस एजन्सी आणि स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूट ह्यांनी एकत्र येऊन ह्या प्रोजेक्ट वर काम सुरु केलं. ख्यातनाम अवकाश वैज्ञानिक ‘एडविन हबल’ ह्यांच्या स्मरणार्थ ह्या दुर्बिणीला त्यांचं नाव दिल गेलं. १.५ बिलियन अमेरिकन डॉलर ( जवळपास ९७ अब्ज रुपये) किमतीची हबल दुर्बीण १९८३ ला अवकाशात जाणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात १९९० मध्ये स्पेस शटल डिस्कव्हरी मधून पृथ्वीच्या लो ऑर्बिट मध्ये स्थापन करण्यात आली.
‘हबल टेलिस्कोप’ ने मग जे बघितलं त्याने मानवाचा ह्या विश्वाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून गेला. हबल ने बघितलेल्या काही फोटोंनी मात्र विश्वाचे अंतरंग कधी नव्हे ते माणसाला समोर दिसले. हबल चा एक फोटो जगात खूप प्रसिद्ध आहे. त्या फोटोचं नाव आहे “हबल अल्ट्रा डीप फिल्ड”. असं काय आहे ह्या फोटोत? की विश्वाच्या एका काळोख्या भागातून घेतला गेलेला हा फोटो जगाच्या सर्वच अवकाश संस्शोधक आणि वैज्ञानिकात प्रसिद्ध आहे. तर जाणून घेऊ ह्या ह्या “हबल अल्ट्रा डीप फिल्ड” ची गोष्ट.
“हबल अल्ट्रा डीप फिल्ड” हा फोटो हबल टेलिस्कोप ने घेतलेला असून ह्यात तब्बल १३ बिलियन प्रकाश वर्ष लांब असणाऱ्या गोष्टी आपण बघू शकत आहोत. ( जो प्रकाश फोटोत आला आहे तो १३ बिलियन वर्षापूर्वी निघाला आहे.) ह्या पूर्ण फोटोत आपण पूर्ण विश्वाचं आयुष्य बघू शकत आहोत. सप्टेंबर २००३ ते जानेवारी २००४ ह्या काळात अवकाशाच्या एका छोट्या अंधाऱ्या कोपऱ्यात हबल ने आपली लेन्स थांबवून ठेवली. ‘फोर्नेक्स’ह्या तारकासमूहात ही जागा केवढी होती तर २.४ आर्कमिनिट. सोप्प्या शब्दात सांगायचं झालं तर १ मिलीमीटर X १ मिलीमीटर चा कागद १ मीटर अंतरावर धरला तर तो जितकी जागा व्यापेल तेवढा हा भाग. किंवा पूर्ण अवकाशाचं जर २६ मिलियन भागात विभाजन केलं तर त्यातला एक भाग. इतके दिवस त्या भागाचं निरीक्षण केल्यावर हबल ने जे विश्व दाखवलं ते म्हणजे ‘हबल अल्ट्रा डीप फिल्ड’.ह्यात हबलने एक दोन नाही तर तब्बल १०,००० पेक्षा जास्त आकाशगंगाचा वेध घेतलेला होता. ( हबल दुर्बीण खूप छोट्या प्रकाशाचा वेध घेऊ शकते. हे म्हणजे मुंबईत बसून अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधील एका झाडावर असलेल्या काजव्याच्या प्रकाशाचा वेध घेण्याएवढं प्रचंड आहे.) ह्यातील प्रत्येक आकाशगंगेत मिलियन, बिलियन तारे आहेत. म्हणजे हा फोटो एकाच वेळी ट्रिलियन अपॉन ट्रिलियन तारे दर्शवित आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्यातल्या काही आकाशगंगा प्रचंड जुन्या आहेत तर काही अवघ्या ६०० मिलियन वर्षाच्या आहेत.
ह्या फोटो मधील एक छोटासा प्रकाशाचा ठिपका पण एक आकाशगंगा आहे. म्हणूनच हा फोटो म्हणजे विश्वाच्या अनंततेचं दर्शन आहे.
१)ह्या फोटोमधील इंग्रजी क्रॉस प्रमाणे ज्या ताऱ्यांचा प्रकाश दिसत आहे, ते आपल्याच मिल्की वे आकाशगंगेतील तारे आहेत. हबल दुर्बिणीत जवळच्या ताऱ्यांना बघताना होणाऱ्या परिवर्तनामुळे तसं दिसत आहे.
२)ह्यात सर्व प्रकारच्या आकाशगंगा आपल्याला बघायला मिळतात. ह्यात आपण काही नवीन आकाशगंगा पण बघू शकतो ज्या पृथ्वीपासून ५ बिलियन प्रकाशवर्षापेक्षा कमी अंतरावर आहेत. ह्या फोटोच्या डाव्या बाजूच्या खालच्या बाजूस एक पिवळसर आकाशगंगा दिसते आहे(थाळीप्रमाणे). ( फोटोत हिरव्या बाणाने ही आकाशगंगा दाखवलेली आहे. )
३)ह्या फोटोत आपण ५ ते १० बिलियन वर्षापूर्वी च्या आकाशगंगा पण बघू शकत आहोत. त्या काळात विश्व खूप विचलित अवस्थेत होतं. त्यामुळे अनेक आकाशगंगाची आपआपसात टक्कर हे नवीन नव्हतं. अशाच त्या काळातल्या आकाशगंगा आपण एकमेकात टक्कर होताना आणि मिसळताना बघू शकत आहोत. ह्या फोटोतील मार्क केलेल्या ह्या तीन आकाशगंगा एकमेकात मिसळताना दिसत आहेत. त्यांचे रंग पर्पल,ऑरेंज आणि रेड आपण बघू शकतो. ( फोटोत आकाशी रंगाच्या वर्तुळात ह्या तीन आकाशगंगा आपण बघू शकतो. )
४)ह्या फोटोत आपण अगदी जुन्या म्हणजे जवळपास १० बिलियनपेक्षा जास्त प्रकाशवर्ष लांब आणि जुन्या आकाशगंगा ही बघू शकतो आहोत. वरच्या तीन आकाशगंगेपासून आपण सरळ खाली आलो की एक लाल रंगाची रेष दिसेल. ही आकाशगंगा विश्व निर्मितीच्या सर्वात प्राथमिक स्वरूपातली आकाशगंगा आहे. ह्या आकाशगंगे नंतर बाकीच्या आकाशगंगा अस्तित्वात आल्या आहेत. किंबहुना विश्व अस्तित्वात येतं गेलं आहे. ( फोटोत पिवळ्या रंगाच्या वर्तुळात अंधुक अशा लाल रंगात दिसणारी आकाशगंगा १० बिलियन वर्षापेक्षा जास्त जुनी आहे. हा प्रकाश १० बिलियन वर्षापूर्वी तिकडून निघालेला आहे. )
हा फोटो म्हणजे विश्वाने केलेला अनंताचा प्रवास आहे. ह्याची जर अजून मोठी इमेज मिळाली तर अजून सुस्पष्टरीत्या आपण विश्वाच्या प्रवासाला बघू शकतो. १३ बिलियन वर्षापूर्वी असलेलं विश्व ते आज असणारं विश्व, हा पूर्ण प्रवास हबल च्या ह्या एका फोटोत बंदिस्त झाला आहे. १.५ बिलियन डॉलर खर्च करून नासा ने बनवलेल्या हबलमागचा खर्च आणि त्यामागची मेहनत ह्या एका फोटोत वसूल झाली आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
“हबल अल्ट्रा डीप फिल्ड” आजही आपल्यासोबत बोलतो. आपल्याला दाखवतो ते विश्वाच प्रचंड स्वरूप जे फक्त आपल्याला दिसणाऱ्या आकाशाच्या २६ मिलियन भागांपेकी एका भागात समाविष्ट आहे. मग विचार करा, उरलेल्या भागात किती विश्व सामावलेलं आहे!! ज्याकडे अजून आपण बघितलेलं नाही किंवा ते आपल्याला दिसलेलं नाही…
माहिती स्त्रोत :- नासा, फ्युचर
फोटो स्त्रोत :- नासा

नाट्यदर्पण आणि सुधीर दामले

अनेक वर्षे नेत्रदीपक अशी नाट्यदर्पणरजनी साजरी करणारे मराठी नाट्यसृष्टीमधली एक महत्वाची व्यक्ती असलेले असे माझे ज्येष्ठ आप्त श्री.सुधीर दामले यांचे आज देहावसान झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि. ईश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती प्रदान करो. ०८-०१-२०२२
मी दहा वर्षांपूर्वी त्यांच्यावर लिहिलेला एक लेख इथे.
http://anandghan.blogspot.com/2012/11/blog-post_30.html
आणि इथे https://anandghare2.wordpress.com/2016/08/18/%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a5%a7%e0%a5%a7-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80/

श्री.सुधीर दामले यांना अनेक लोकांनी श्रद्धांजली वाहिली. श्री.संजय पेठे यांच्या १४ विद्या ६४ कला या स्थळावरून मी काही हृद्य अशी मनोगते घेऊन या ठिकाणी संग्रहित केली आहेत. मी श्री.संजय पेठे यांचा आणि या लेखांच्या लेखकांचा सादर आभारी आहे.

*****

नाट्यअर्पण व्यक्तिमत्त्व!

‘नाट्यदर्पण’कार सुधीर दामले गेल्याचं कळलं आणि अनेक आठवणी जाग्या झाल्या. १९९३चा सप्टेंबर महिना असावा. त्या काळात मी ‘डीटीपी’ व्यवसायात नुकताच उतरलो होतो. साहित्य विषयाला वाहिलेल्या ‘वसंत’ मासिकाचं काम मिळवलं होतं. त्या अल्प अनुभवाच्या जोरावर नवीन कामं मिळवण्याचा धडाकाच लावला होता. त्या काळात बहुतेक सर्व प्रकाशक आणि दिवाळी अंकांच्या संपादकांशी मी संपर्क साधला होता. असाच एक दिवशी मी ‘नाट्यदर्पण’कार सुधीर दामलेंना फोन केला आणि त्यांनी मला भेटायला बोलावलं. गिरगावच्या ‘सेंट्रल प्लाझा’ थिएटरकडून उजव्या हाताला वळल्यानंतर तीन-चार मिनिटांवर दामलेंचं ऑफिस कम दुकान होतं. दुकानाच्या बाहेर ‘एन. के. प्रिंटर’ असा बोर्ड होता. बहुधा आतल्या भागात प्रिंटिंग प्रेस असावी. परंतु मला तरी ती कधी दिसली नाही.
दामलेंच्या ऑफिसमध्ये शिरल्यानंतर सर्वप्रथम मनावर बिंबलं ते त्यांचं आकर्षक व्यक्तिमत्त्व. गोरापान वर्ण आणि ताडमाड उंचीचे दामले फोनवर कोणाशी तरी बोलत होते. त्यांची खुर्चीदेखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी अशी होती. फोन ठेवला आणि खुर्चीवर रेलून ते बोलू लागले. मी त्यावेळी अगदी नवखा असल्यामुळे माझ्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. नाट्यविषयक घडामोडींशी संबंधित असलेला ‘नाट्यदर्पण’ हा दिवाळी अंक दामले तेव्हा प्रकाशित करीत असत. खरं तर त्या काळात गिरगावात बरेच डीटीपीचं काम करणारे होते. तरीदेखील त्यांना डावलून दामलेंनी आमच्यासारख्या नवख्या मुलांकडे (त्यावेळी माझ्यासोबत माधव पोंक्षे हा आतेभाऊदेखील होता) या अंकाचं काम सोपवलं होतं. १९९२ मध्ये ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच दिवाळी होती. ‘नाट्यदर्पण’चं काम तर घेतलं होतं. अवघ्या महिन्याभरात ‘वसंत’ आणि ‘नाट्यदर्पण’ या दोन दिवाळी अंकांचं काम आम्हाला करावं लागणार होतं. मात्र हे काम वेळेत झालं आणि सुधीर दामलेंशी चांगला सूर जुळला.
गिरगावात त्या काळात माझं सतत येणं-जाणं असायचं. त्यामुळे सुधीर दामलेंकडची चक्कर अगदी निश्चित असायची. लांबूनच त्यांच्या दुकानाकडे मी डोकावत असे. खुर्चीवर रेललेले भारदस्त दामले दिसले की माझी पावलं त्यांच्या ऑफिसकडे वळत. तेदेखील प्रत्येक वेळी आत्मियतेनं बोलत. या दिवाळी अंकानंतर काही महिन्यांनी त्यांनी नाट्योत्सवाचं आयोजन केलं होतं. एप्रिल १९९३ हा तो काळ असावा. मराठी रंगभूमीवरच्या वर्षभरातील सर्वोत्कृष्ट नाटकांचा तो महोत्सव होता. एकाच नाट्यगृहात नाट्यरसिकांना किमान आठ ते दहा नाटकं तीन दिवस पाहण्याची व्यवस्था होती. त्या वर्षी वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवासाठी लागणाऱ्या तिकीटांचं डीटीपी करण्याचं काम आम्ही केलं होतं. नाट्यमहोत्सवाच्या आदल्या दिवशी दामलेंना असाच भेटलो असता ते म्हणाले, ‘उद्या येतो आहेस ना नाट्यमहोत्सवाला?’
तेव्हा मी त्यांना म्हटलं, ‘माझ्याकडे तिकीट नाही…’
मी असं म्हणताच दामलेंनी आपल्या टेबलाचा ड्रॉवर उघडला आणि त्यामधून तब्बल चार पासेस काढले आणि ते माझ्या हाती सोपवत म्हणाले, ‘’तू तर येच. पण तुझ्या कुटुंबियांनाही यायला सांग…’’
साधारण तीस वर्षांपूर्वी पूर्ण नाट्योत्सवाचा तिकीट दर हजार रुपयांच्या घरात होता. त्यामुळे दामलेंकडून या कृतीची मला अजिबात अपेक्षा नव्हती. दुसऱ्या दिवशी नाट्योत्सवाला गेलो. नेहरू सेंटरसारख्या आलिशान थिएटरमध्ये अव्वल दर्जाची नाटकं पाहण्याचा आनंद काही वेगळाच होता. त्यापूर्वी काही मोजकीच नाटकं मी लांबच्या रांगेतून पाहिली होती. परंतु, दामलेंनी पुढच्या काही रांगांमधील पासेस दिल्यानं नाटकांचा खरा आनंद मला घेता आला होता. विनय आपटे, रमेश भाटकर… यासारख्या टॉपच्या अभिनेत्यांची नाटकं त्या महोत्सवात पाहिली. साधारण तीन दिवसांमध्ये सात ते आठ नाटकं पाहिली. सगळी नाटकं हाऊसफुल होती. प्रत्येक नाटक वेळेवर सुरू व्हायचं नि संपायचं. तेव्हापासून मग हळूहळू मला सुधीर दामले हे किती थोर व्यक्तिमत्त्व आहे, याची कल्पना यायला लागली. तेव्हापासून मग गिरगावात मी त्यांच्या ऑफिसमध्ये थोडा जास्तच रेंगाळायला लागलो. त्यांच्याबरोबरील चर्चेतून दरवेळी नवनवीन माहिती मिळायची. त्याच वर्षी ‘नाट्यदर्पण रजनी’चंदेखील दामलेंनी आयोजन केलं होतं. धोबी तलावाच्या रंगभवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या नाट्यदर्पण रजनीचेही पास दामलेंनी मला दिले होते.
नाट्यदर्पण रजनीची थोरवी तोपर्यंत मला समजली होती. ‘फिल्मफेअर’ मासिकाच्या तोडीचा तो सोहळा असायचा. अगदी पहाटेपर्यंत ही रजनी चालायची. संपूर्ण मराठी नाट्यसृष्टी या सोहळ्यास उपस्थित असायची. नामवंतांची मांदियाळी असूनही या रजनीला तेव्हा इव्हेंटचं स्वरूप नव्हतं. अनावश्यक त्याचं मार्केटिंग केलं गेलेलं नव्हतं. नाट्यसृष्टीचा तो छान असा घरगुती सोहळाच होता. ‘नाट्यदर्पण’ची संकल्पना अभिनेते गणेश सोळंकी यांची होती. परंतु, तिला मूर्त रूप दिलं ते सुधीर दामलेंनी. १९७५ मध्ये सुरू झालेल्या या रजनीची लोकप्रियता पुढे एवढी वाढली की केवळ मराठी नाट्य-चित्रपटसृष्टी नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवरदेखील त्यात सहभागी होत असत. पहिल्याच रजनीमध्ये डॉ. काशीनाथ घाणेकर, आशा काळे, मनोरमा वागळे, जयंत सावरकर, राजा मयेकर, संजीवनी बिडकर, रंजना देशमुख, शाहीर साबळे, गोविंदराव पटवर्धन, आशा खाडिलकर, अलका जोगळेकर, रामदास कामत यासारखी दिग्गज मंडळी सहभागी झाली होती. उत्तरोत्तर नामवंतांची ही यादी वाढतच राहिली आणि प्रत्येक कलाकाराचं या रजनीत आपली कला सादर करणं हे एक स्वप्न बनलं. नाट्यदर्पण रजनीचा दबदबा एवढा होता की त्या दिवशी मुंबईत नाट्यविषयक अन्य कोणताही कार्यक्रम आयोजित केला जात नसे. ही रजनी सर्वोत्कृष्ट होण्यामागे अर्थातच दामलेंचे कष्ट आणि कल्पकता होती. आपली टीम त्यांनी खूप छान बांधली होती. स्वतः निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता नसूनही कला क्षेत्रातील प्रत्येकाशी त्यांचे सौहार्दाचे संबंध होते. प्रत्येक जण त्यांना मान द्यायचा. या सगळ्या गोष्टी मला पाहता आल्या.
‘नाट्यदर्पण’चे पुढे दोन दिवाळी अंक मी केले. त्यानंतर मी पूर्णवेळ पत्रकारितेकडे वळल्यामुळे दामलेंसोबतच्या भेटी कमी झाल्या. पण एक भेट अगदी विलक्षण म्हणावी लागेल. त्यावेळी ‘नाट्यदर्पण’ पुरस्कारांची पत्रकार परिषद होत असे. कालांतरानं मी ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून काम करीत असल्यामुळे त्या परिषदेला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मला आलं होतं. दामलेंचं ऑफिस जिथं होतं तिथं वरच्या मजल्यावर ते राहत. अंधाऱ्या जिन्यावरून दामलेंच्या घरापर्यंत जाताना खूपच वेगळं वाटलं होतं. दोन-चार वर्षांपूर्वी दामलेंच्या दिवाळी अंकाचं काम पाहणारा मी एका नवीन भूमिकेमधून त्यांना भेटलो. दामलेंचं ते घरही उंची फर्निचर, आलिशान गालिचामुळे अगदी माझ्या लक्षात राहिलं. दामलेंचं माझ्या दृष्टीनं आणखी एक मोठेपण म्हणजे त्यांना कुठं थांबायचं हे अगदी नक्की कळलं होतं. म्हणूनच यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी बरोबर २५व्या वर्षी नाट्यदर्पण रजनीवर पडदा टाकला. खरं तर त्याचं कर्तृत्व आणि संपर्क एवढा मोठा होता की ते आजतागायत ही रजनी करू शकले असते. परंतु, त्यांनी तसं केलं नाही. आपण स्वतः निर्माण केलेल्या विश्वातून बाहेर पडण्याचं धाडस ते दाखवू शकले. नाट्यसृष्टीशी संबंधित असणाऱ्या कार्यक्रमांपासूनही ते दूर राहिले. ही खूप अवघड बाब आहे. मुंबईहून पुण्यात स्थलांतरीत झाल्यानंतरही त्यांना प्रकाशझोतात राहण्यासारखं एखादं दुसरं काम निश्चित करता आलं असतं. परंतु, तसं न करता त्यांनी ‘सुदर्शन’ नावाचा हौशी कलाकारांचा रंगमंच उभारला. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये आज जी पुण्यातील नव्या दमाची मुलं-मुली काम करताहेत, ती बहुतेक सगळी ‘सुदर्शन’शी जोडलेली आहेत. प्रायोगिक नाटकांची चळवळ म्हणून ‘सुदर्शन’चं स्वतःचं असं वेगळं स्थान आहे.
कधी कधी काही व्यक्ती तुम्हाला कितीदा भेटतात किंवा त्या किती काळ तुमच्या संपर्कात असतात, हे फारसं महत्त्वाचं नसतं. त्या व्यक्तींचा तुमच्या आयुष्यावरचा प्रभाव महत्त्वाचा असतो. दामलेंचं माझ्या आयुष्यातलं स्थान हे असं अनमोल आहे. दामलेंप्रमाणे कला क्षेत्राला वाहिलेलं ‘नाट्यदर्पण’सारखं मासिक आपणही काढावं ही मला कालांतरानं सुचलेली कल्पना ‘तारांगण’मुळे मूर्त रूपात आली. मात्र नाट्यदर्पण रजनीसारखं दर्जेदार तसेच संपूर्ण इंडस्ट्रीचा समावेश असलेलं आपण काहीतरी वेगळं करावं, ही कल्पना अजून तशीच अपूर्ण आहे. पण आजही कधी गिरगावात गेलो की माझं लक्ष आपोआप सुधीर दामलेंच्या ऑफिसकडे जातं. ते ऑफिस अजूनही आहे. परंतु, त्यात खुर्चीवर बसून फोनवर बोलणारे सुधीर दामले काही दिसत नाहीत. अर्थात दामलेंनी ‘नाट्यदर्पण’च्या रूपानं जे कार्य केलं, ते मात्र कधीही विसरण्यासारखं नाही. मोठी व्यक्ती जाते, पण तिचं कार्य लक्षात राहतं. सुधीर दामले त्यापैकी एक होते. त्यांना मनःपूर्वक आदरांजली…

मंदार जोशी

शुभांगी दामले यांचा लेख
महाराष्ट्र टाइम्स
लोकसत्ता
राजीव जोशी यांचा लेख

अनाथांची माय सिंधूताई सपकाळ

मी सिंधूताई सपकाळ यांच्याबद्दल पहिल्यांदाच जेंव्हा ऐकले तेंव्हाच मी भारावून गेलो होतो. नंतर त्यांच्याविषयी अनेक लेख येत गेले ते वाचून तसेच टेलिव्हिजनवरील त्यांच्या मुलाखती पाहून त्यांच्याबद्दल मनात असलेला आदर वाढत गेला. त्यांच्या चरित्रावर आधारलेला एक चित्रपटही मी आवर्जून पाहिला. ‘खुपते तिथे गुप्ते’ नावाच्या एका कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी घेतलेली त्यांची मुलाखत प्रेक्षकांच्या मनावर खूप परिणाम करून गेली. त्यांचे अत्यंत प्रेमळ पण खंबीर व्यक्तिमत्व, तसेच प्रखर बुद्धीमत्ता, विशाल सामान्यज्ञान आणि हजरजबाबी बोलणे वगैरे सगळे छाप पाडणारे होते.
त्यांनी अनन्वित असा छळ सोसलाच, पण त्यामुळे मनात कडवटपणा आणू दिला नाही. स्वतः कठीण परिस्थितीतून जात असतांनाही इतर दुबळ्या लोकांना जमेल तितका आधार देत त्यांनी एक एक करत हजारो अनाथ मुलांचा मायेने सांभाळ करणाऱ्या सामाजिक संस्था उभ्या केल्या. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची काळजी वाहिली. त्यांच्या अकस्मात निधनामुळे अनेक अनाथांची माय गेली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि . . . . आनंद घारे

**************************

आम्ही अनुभवलेय सिंधुताई सपकाळ या मातेचे संघर्षमय जीवन, ज्यानी अनेकांचे संसार उभारले.. जगण्याचे बळ दिले. एक चौथी पर्यंत शिकलेली.. घरच्यांनी आणि समाजाने ज्यांना लहान मुलासह हाकलून लावले.. जी भूकेसाठी भिक्षा मागायची.. त्याच स्त्रीने हजारो मुलांची माता होत प्रेमाने पायावर उभे केले हे सत्य आम्ही अनुभवलेय.
“फुलांवरुन तर कुणीही चालेल रे.. पण काट्यावरुन चालायला शिका.. स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा न करता घरात माय बना.. माय शिवाय घर नाही, देश नाही.. मुलींनो आपले संस्कृती संस्कार विसरु नका.. शेतकऱ्यांनो उद्याचा दिवस चांगला असेल.. जीव देवू नका” असे आत्मियतेने सांगणाऱ्या सिंधुताईंच्या शब्दाला त्यांच्या संघर्षाने.. फिनीक्स पक्ष्यांच्या उभारीची किनार असल्याने फार मोठी किंमत होती.
जेवढा खडतर संघर्ष तेवढ्याच निर्धाराने त्या जगल्या. आत्महत्येचा विचार केला तर समोर भूकेला दिसला म्हणून आपली भिक त्याला दिली. तेव्हा समजले आपल्याला अनेकांच्या भूकेचा प्रश्न मिटवायचा आहे.
गरीबांचा.. अनाथांचा वाली कुणीच नसतो. आज मानवता संपतेय.. लोक दगड झालेत. तेव्हा काळजावर ठोके द्यायचे आहे.. माझ्या कार्याचा कळस चढवायचा आहे हीच त्यांची ‘पद्मश्री’ प्राप्त झाल्यावरची प्रतिक्रिया.
शिक्षण नसतानाही अविश्वसनीय वाटणारी त्यांची काव्यात्मक अंतःकरणातून प्रकटणारी.. हृदयाला साद घालणारी संवाद शैली होती. त्यांच्या भाषेत मृदुता, आपुलकी.. सहानुभूती असायची. त्यातून ममता झिरपायची, म्हणूनच आज त्यांच्या समाजाला भूषण वाटणाऱ्या अनेक संस्था उभ्या आहेत. इथली मुला.. मुलींची आई पुन्हा सोडून गेलीय.
पण जाताना अनाथ असो वा गरीब.. अपंग.. दुबळे यांच्या वेदनांविषयी समाजात सहानुभूती जागृत करुन गेलीय. त्यांनी स्वतःच्या दुःखाकडे हसत बघून अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केलाय.
अश्या या सिंधुताई यशोदा मातेला भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या मानवतावादी अफाट कार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. . . . . 🌹🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏🌹 . . . . . वॉट्सॅपवरून साभार दि.०५-०१-२०२२

काही मान्यवरांनी दिलेली श्रद्धांजलि

CMO Maharashtra
@CMOMaharashtra
सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.


Devendra Fadnavis
04 Jan 2022
@Dev_Fadnavis
महाराष्ट्र आज एका मातेला मुकला आहे. सिंधुताई सपकाळ यांना माझी विनम्र श्रद्धांजली… महाराष्ट्राच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शान्ति 🙏


Supriya Sule
04 Jan 2022
@supriya_sule
’अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले.अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. अतिशय खडतर असे आयुष्य त्या जगल्या. पण या संघर्षातून त्यांनी अनाथ,दु:खी,कष्टी जनांच्या आयुष्याला आधार दिला.त्यांच्या या कार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


🌹⚜🌸🔆🙏🔆🌸⚜🌹

सिंधूताईंची एक जुनी मुलाखत
महाराष्ट्र टाइम्स दि. 11 Jan 2014
अनाथांच्या ‘माई’ म्हणून सुपरिचित असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे १९८८ मध्ये ‘वनवासी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्यांच्यावर चित्रपटही निघाला.
समाजासमोर आतापर्यंत जे काही आले ते अपूर्ण असल्याचे माईंना वाटते. या जाणिवेतूनच माईंनी आत्मचरित्र लिहिणार असल्याची माहिती माईंनी शुक्रवारी ‘मटा’ भेटीत दिली. ‘माझ्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास मला माझ्या हाताने लिहायचा आहे. मी आत्मचरित्र लिहणार आहे. यात कुणावर टीका राहणार नाही, विषयावर फुंकर मात्र जरूर घालेन’, असे त्या म्हणाल्या.
एका कार्यक्रमानिमित्त नागपुरात आलेल्या माईंनी ‘मटा’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. महिला सुरक्षा, युवापिढी, शेतकरी आत्महत्या, अभावग्रस्त समाज अशा अनेक विषयांवर संपादकीय सहकाऱ्यांशी खास शैलीत मनमोकळा संवाद साधला. ग्रामीण भाग पिंजून काढणाऱ्या सिंधुताईंनी अभावग्रस्त समाज पाहिला. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पुरुष मरतो. बाई मात्र दु:खातून स्वत:ला सावरते अन् कुटुंबही सावरते. तिच्यातील हा खंबीरपणा पुरुषांनाही कळला पाहिजे. अशी कळकळ व्यक्त केली.
काटेरी आयुष्याशी अतूट नाते निर्माण झालेल्या माईंनी अनेकांच्या आयुष्यात फुलांचे मळे फुलवले. ‘ही ऊर्जा मला काट्यांनीच दिली. हरले असते तर सरले असते. ज्या माहेर-सासरने हाकलून दिले होते त्याच जिल्ह्यातील सत्कार केल्यामुळे भरून पावले.’ प्रत्येक ठिकाणी सरकार पोहोचू शकत नाही. नुकसान झाले असल्यास ते भरून काढण्याची उमेद निर्माण केली पाहिजे. प्रत्येकवेळी सरकारकडे हात पसरवून होत नाही. सरकारच्या मदतीशिवायही जगता येते ही माझ्या संस्थांनी दाखवून दिले आहे, असे त्या म्हणाल्या.
माय बना, मादी नको!
महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, असे आपण म्हणतोय. वाढत्या अत्याचारांना महिलाही जबाबदार आहे. तिने उघडे-नागडे प्रदर्शन करू नये, आपली पायरी राखून वागावे. मुळात महिलांनी स्वत:भोवती काही चौकटी आखून घेतल्या पाहिजेत. निर्मिती तिच्या हाती आहे. संस्कार तिच्या हाती आहेत. महिलांमध्ये समाजाला ‘मादी’ नाही तर ‘माय’ दिसली पाहिजे, असे सिंधुताई परखडपणे म्हणाल्या. मीही उघड्यावर झोपले. भिकाऱ्यांमध्ये राहिले. पण, कुणी माझ्या अंगावर हात नाही टाकला. मी त्यांना भाकर पुरविली. मला त्यांच्यात अन्नदाता दिसली. पायरी राखून वागले की काही समस्या उद्भवत नाही, असेही त्या म्हणाल्या.


सिंधुताई सपकाळ

https://mr.wikipedia.org/s/1bc
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

The President, Shri Ram Nath Kovind presenting the Nari Shakti Puruskar for the year 2017 to Dr. Sindhutai Sapkal, Pune, Maharashtra, at a function, on the occasion of the International Women’s Day, at Rashtrapati Bhavan, in New Delhi on March 08, 2018.

Dr. Sindhutai Sapkal, Pune on International Women’s Day 2017 (cropped).jpg
जन्म १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७
मृत्यू ४ जानेवारी, २०२२ (वय ७४)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे चिंधी
नागरिकत्व भारतीय
पेशा सामाजिक कार्यकर्त्या
पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)[१] पद्मश्री पुरस्कार (२०२१)
सिंधुताई सपकाळ (१४ नोव्हेंबर, १९४७ – ४ जानेवारी, २०२२) या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या विशेषतः भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[२][३]

जन्म आणि सुरूवातीचे जीवन
सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८, वर्धा जिल्ह्यातील पिंप्री मेघे गावात आणि ब्रिटीश भारतातील बेरार येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी झाला.[४][५] एक अवांछित मूल असल्याने, त्यांचे नाव चिंधी (“फाटलेल्या कापडाचा तुकडा”) ठेवले. अत्यंत गरिबी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लवकर लग्न यामुळे त्यांना चौथी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडावी लागली.

सपकाळ यांचे वयाच्या १२व्या वर्षी श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाले, जे त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते. लग्नानंतर त्या वर्ध्यातील सेलू येथील नवरगाव गावात गेल्या. हे लग्न फार काळ टिकले नाही आणि वयाच्या २० व्या वर्षी, त्यांना त्यांच्या मुलीसोबत नवऱ्याने सोडून दिले.[६][७]

विवाह
विवाह वयाच्या ९ व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत.[ संदर्भ हवा ]

अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला होता. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली.[ संदर्भ हवा ]

जीवनातील संघर्ष
दमडाजीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या.एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले.[ संदर्भ हवा ]

ममता बाल सदन
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत. [८]

सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे-

बाल निकेतन हडपसर, पुणे
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
अभिमान बाल भवन, वर्धा
गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन) [८]
ममता बाल सदन, सासवड
सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे[९]
आंतरराष्ट्रीय पातळीवर
सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले आहेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे.[१०]

मृत्यू
दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मृत्यूच्या एक महिन्यापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते.[६][११]

पुरस्कार व गौरव
सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.[८] त्यांतले काही :-

पद्मश्री पुरस्कार (२०२१)[१२][१३]
महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)[१]
पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’ (२०१२)
महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ (२०१०)
मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)
सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
राजाई पुरस्कार
शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘सामाजिक सहयोगी पुरस्कार’ (१९९२)
सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला ‘रिअल हीरो पुरस्कार’ (२०१२).
२००८ – दैनिक लोकसत्ताचा ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’.
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)[१४]
डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)[१५]
पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ [९]
पद्मश्री पुरस्कार (२०२१)[१६]
प्रसारमाध्यमांतील चित्रण
सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.[१७]
सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट १६-२-२०१४ रोजी निघाला.

हे लेखही पहा :
https://marathiworld.com/sindhutai-sapkal
https://majhamaharastra.com/sindhutai-sapkal-information-in-marathi/
https://marathime.com/sindhutai-sapkal-information-in-marathi/

नवी भर दि.७-०१-२०२१ : 2008 मध्ये मायबोली वरती प्रकाशित झालेला लेख

माई

१९९० सालची गोष्ट. मे महिन्यात, भर दुपारी एक बाई आमच्या घरी आल्या. ठिगळं लावलेलं लुगडं, रुपयाएवढं कुंकू आणि पायात चपला नाहीत. माझ्या बाबांशी काहितरी काम होतं त्यांचं. या बाईंचं मोठ्या आवाजातलं बोलणं मला आत व्यवस्थित ऐकू येत होतं. त्यांचे कुठे कुठे ३-४ अनाथाश्रम होते, आणि तिथे राहणार्‍या मुलांसाठी त्यांना पैशांची आवश्यकता होती. बाबांचा कामानिमित्ताने अनेक धार्मिक संस्थानांशी संबंध होता, आणि या बाईंना तिथून आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न बाबा करणार होते. मग जरा वेळाने बाबांनी मला बोलावलं. म्हणाले, ‘या सिंधूताई. यांना घेऊन डॉ. XXXX यांच्या घरी जा.’
बाहेर प्रचंड ऊन होतं. बाबांनी रिक्षेसाठी पैसे दिले आणि डोक्यावर रुमाल, खिशात कांदा असा जामानिमा करून मी निघालो. सिंधूताईंनी डोक्यावरून पदर घेतला फक्त. पायात चप्पल नव्हतीच. मे महिन्याच्या त्या भयंकर उन्हातही सिंधूताईंच्या पायांना चटके कसे बसत नाहीत, याचाच विचार मी बराच वेळ करत होतो. डॉक्टरकाकांचं घर तसं फार लांब नव्हतं, पण उन्हाच्या झळांमुळे रस्त्यावर एकही रिक्षा नव्हती. म्हणून पायीच जाणं आलं. चालता चालता मग त्यांनी नाव काय, कुठल्या वर्गात वगैरे चौकशी केली. त्यांचं बोलणं वेगळंच होतं. खूप प्रेमळ. आवाजही वेगळाच. खडा, खणखणीत, पण मऊ. उत्तर देताना त्यांना ‘सिंधूताई’ म्हटलं, तर मला म्हणाल्या, ‘बाळ, मला माई म्हण.’

माईंना घेऊन डॉक्टरकाकांकडे पोहोचलो, तर घरात बरीच गर्दी होती. या डॉक्टरकाकांनी तेव्हा नुकतंच दक्षिणेतल्या एका बुवांचं शिष्यत्व पत्करलं होतं. अकोल्यातली प्रॅक्टीस सोडून, ते आंध्र प्रदेशातील त्या बुवांच्या आश्रमात जाऊन राहणार होते. हवेतनं अंगठ्या, घड्याळं काढणार्‍या त्या बुवांना गरिबांसाठी एक मोठा दवाखाना सुरू करायचा होता, आणि त्यासाठी म्हणून डॉक्टरकाकांनी आपला बंगला, त्याभोवतीची ८-१० एकर जमीन, ३-४ गाड्या असं सगळं त्या बुवांना देऊन टाकायचं ठरवलं होतं. आम्ही गेलो तेव्हा त्या बुवांच्या शिष्यांचा कसलासा सत्संग सुरू होता. डॉक्टरकाकांनी मला आत बोलावलं, पण माईंना बाहेरच थांबवलं. आत भरपूर कुलर्स लावलेले होते, आणि एक खूप स्थूल आजोबा ‘मानवसेवा हीच माधवसेवा’ असं काहीबाही बोलत होते. बाहेर माई काकांना त्यांच्या आश्रमांबद्दल सांगत होत्या. खर्च वाढले आहेत, मुलांना शिकवायचं आहे, सरकार पैसे देत नाही, वगैरे. माईंचं जोरात बोलणं इथेही आत ऐकू येत होतं. सत्संग सुरू असताना शांततेचा भंग झाल्याने ते आजोबाही बोलायचे थांबले.
काकांनी माईंना खिशातून पाच रुपये काढून दिले, आणि आत येऊन मला म्हणाले, ‘एवढ्या उन्हात कशाला आलास? आता तू थांब इथेच. ड्रायव्हर घरी सोडेल तुला. त्या बाईंना मी जायला सांगितलं आहे. आणि तुझ्या बाबाला सांग की या बाई भिकारी आहेत. त्यांचा अनाथाश्रम वगैरे काही नसेल. उगीच फसवण्याचे धंदे.’

माई अजूनही बाहेरच उन्हात उभ्या होत्या. माईंना घेऊन घरी परत गेलो नाही, तर बाबा रागवतील, असं सांगून मी तिथून सटकलो. घरी परत येताना वाटेत माईंना काही घरं उघडी दिसली, आणि माई सरळ तिकडे वळल्या. माईंनी परत त्यां घरी आश्रम, मुलं असं सगळं सांगितलं, आणि ‘माझ्या मुलांसाठी मला भीक घाल ग माये’, असं म्हणून माईंनी पदर पसरला. मी थिजलोच. माईंनी अशी भीक मागितल्यानं मला प्रचंड शरमल्यासारखं झालं. पण माईंना भीक मागताना काही वाटत नसावं. उलट कोणीतरी दोन पाच रुपये पदरात टकल्याने त्या खुशीत होत्या. भीक मागणं, ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट, हे त्या दिवशी मला पुरेपूर कळलं.

माईंची पुढे बरीच वर्षं भेट झाली नाही. पण त्यांच्याबद्दल अनेकदा पेपरमध्ये यायचं. त्यात त्यांच्या भीक मागण्याचे, हालअपेष्टांचे उल्लेख असायचे. कधी लता मंगेशकर, मनमोहन सिंह, बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना त्यांचे फोटो असायचे. पण तरीही ‘सिंधूताई सपकाळ’, म्हणजे माईंचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर यायच्या त्या हातात पाच रुपयाची नोट गच्च धरून उन्हात अनवाणी उभ्या असलेल्या, आणि माझा हात धरून भीक मागणार्‍या माई

माई मुळच्या विदर्भातल्या. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरं वळायचं काम करायचे. गाव अतिशय मागासलेलं. शहरी सुविधांचा स्पर्श नाही, कुणाला शिक्षणाचा गंध नाही, अशीच सगळी परिस्थिती. चिंधी (सिंधू) ही सर्वांत मोठी मुलगी. पाठी एक भाऊ, एक बहीण. त्या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील त्यांना घेऊन पिंपरीमधी गावात आले. मुलीनं शिकावं अशी वडलांची इच्छा. पण आईचा मात्र सक्त विरोध. मग ते माईंना गुरं राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. माई मुळच्याच बुद्धिमान, पण जेमेतेम मराठी चौथीपर्यंत शिकता आलं. अल्पवयातच लग्न झालं आणि चिंधी साठेची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नात माईंचं वय होतं अकरा वर्षं आणि नवर्‍याचं वय तीस वर्षं. घरी प्रचंड सासूरवास. ढोरासारखी मेहनत करावी लागे. घरात सगळे पुस्तकद्वेष्टे. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बीळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अक्षरांवरून आधाशासारख्या नजर फिरवायच्या.

अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. त्या सांगतात,”तेव्हा गुरं वळणं हाच व्यवसाय असायचा. गुरंही शेकड्यांनी असायची. त्यांचं शेण काढता काढता कंबरडं मोडायचं. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणार्‍यांना मजुरी पण शेण काढणार्‍यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथं मी बंड पुकारलं. लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली.”

माई हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली होती, आणि अडाणी गावकर्‍यांना नवीन नेतृत्व मिळालं होतं. गावकरी डोईजड होण्याची शक्यता होती. माईंच्या पोटातील मूल आपलं असल्याचा प्रचार मग दमडाजीनं सुरू केला. नवर्‍याच्या मनात माईंच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला, आणि पूर्ण दिवस भरलेल्या माईंना त्यानं बेदम मारून घराबाहेर काढलं. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकलं. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली.
नवर्‍यानं हाकलल्यानंतर गावकर्‍यांनीही हाकललं. माराने अर्धमेल्या झालेल्या माई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनंही पाठ फिरवली.

दोन घासांसाठी भीक मागण्याची वेळ माईंवर आली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वेस्टेशनवर त्या भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेलं एखादं फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वेरुळांच्या कडेनं फिरायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळे स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणं सुरू झालं. त्या गायच्या,

ये ऊन किती कडक तापते
बाई अंगाची फुटते लाही
दोन दिसाचा शिळा तुकडा वाढा
चालेल आम्हा वाढा
दार नका लावू
पुन्हा येणार नाही..

माई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथेही त्यांनी कधी एकटं खाल्लं नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकार्‍यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच माईंना संरक्षण दिले. माईंभोवती ते रिंगण घालून झोपायचे. २१ वर्षांच्या होत्या माई तेव्हा. पण एक दिवस हे संरक्षणही संपले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नाही. त्यांच्याबरोबर जेवणारे भिकारी त्यांच्यापासून दूर झाल्याचं त्यांना जाणवलं आणि लक्षात आलं की तिथे कायम राहता येणार नाही. वाट फुटेल तिथे माई चालत राहिल्या. आश्रय कुठेच मिळाला नाही. उघड्यावर तर रात्री झोपणं शक्य नव्हतं, म्हणून माईंनी स्मशान गाठलं.
त्या स्मशानातच राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचं काय? एक मृतदेह आला. अंत्यसंस्कार झाले. मडकं फुटलं. पण मडक्यात थोडं पाणी तसंच होतं. अंत्यविधी करून लोक निघाले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे मागे आशेने चालू लागल्या. एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडं पीठ आणि सव्वा रुपया दिला. भिन्न काळोख दाटला होता. चिता अजून धगधगत होती आणि माईंच्या पोटात भूक इतकी पेटली होती की ‘दगड चावता आला असता तर दगडही चावून खाल्ला असता.’ माईंनी मडक्यातल्या पाण्यात पीठ कालवले, आणि चितेवरच्या निखार्‍यावर भाजले. कडक भाकरी तशीच खाल्ली.

माई काही दिवसांनी तिथूनही बाहेर पडल्या, आणि भीक मागत, काम शोधत चिखलदर्‍याला पोहोचल्या. तिथे रस्ताबांधणीला सुरुवात झाली होती. स्थानिक आदिवासी आणि मध्य प्रदेशातील मजूर तिथे काम करत होते. कंत्राटदाराने माईंना कामावर ठेवण्यास नकार दिला. सकाळ-संध्याकाळ कुटकी (भात), डाळ आणि आठवड्यातून एकदा ताक, या बोलीवर माईंनी तिथल्या मजुरांची मुलं सांभाळण्यास सुरुवात केली. चिखलदर्‍याचं काम संपल्यावर हे मजूर पुण्याला आले, आणि माई त्यांच्याबरोबर निघाल्या.

एकदा असंच पुण्यात कुठेसं रस्त्यावर माईंना एक मुलगा रडत बसलेला दिसला. आपलं नाव ‘दिपक गायकवाड’ एवढंच त्या मुलाला सांगता येत होतं. आसपासच्या लोकांनाही काहीच माहिती नव्हती. त्या मुलाला घेऊन माई पोलीस स्टेशनात गेल्या तर पोलीसांनी माईंना हाकलून लावलं. माईंनी आठवडा पोलीस स्टेशनबाहेर बसून काढला पण पोलीसांनी तक्रारही नोंदवून घेतली नाही. माईंनीच मग त्या मुलाचा सांभाळ करायचं ठरवलं. पुढे महिनाभरात अशीच २-३ मुलं त्यंना रस्त्यावर भीक मागताना भेटली, आणि माईंनी त्यांनाही आपल्या पदराखाली घेतलं. निराश्रिताचं जगणं किती भयंकर असतं ते त्यांनी अनुभवलं होतं. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये, हे त्यांची इच्छा होती. या मुलांमुळे आपल्याही जगण्याला काही अर्थ मिळेल, असं त्यांना वाटलं. पण या मुलांचा सांभाळ करायला पैसा कुठून आणायचा? स्वतःचंच पोट तिथे भरलं जात नव्हतं, आणि आता जोडीला ४ मुलं होती. आणि त्या मुलांनी भीक मागणं माईंना मंजूर नव्हतं.

त्यावेळी भारत-रशिया मैत्री करारावर पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात सह्या होणार होत्या. या ऐतिहासिक करारासाठी मोठा समारंभ योजला होता. कडेकोट बंदोबस्त होता. माईंच्या लक्षात आलं की आपण इथे व्यासपीठावर जाऊन दोन शब्द जर बोलू शकलो तर इथे जमलेल्या हजारो प्रेक्षकांच्या मनांत आपण जागा करू शकू आणि मग आपल्या संकटातून मार्ग निघू शकेल. त्यंनी हळूच सभागृहात प्रवेश केला. झाडूवाली असेल म्हणून कोणीच त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. व्यासपीठावर एक काश्मिरी माणूस आपल्या व्यथा सांगत होता. तो भाषण संपवून खाली उतरताच माईंनी थेट व्यासपीठावरच उडी घेतली. दुसरा वक्ता अजून उठायचा होता. त्याआधी माईंनी सरळ माईक धरला आणि भाषण सुरू केलं. त्यांचा खणखणीत आवाज आणि कविता ऐकून सगळे स्तब्ध झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि माईंना जे हवं होतं ते मिळालं. आता त्यांना मदत नक्कीच मिळणार होती.

कार्यक्रम संपला आणि श्री. सुनील दत्त समोर आले. त्यांनी माईंशी हस्तांदोलनच केले. माई थक्क झाल्या. सर्वजण माईंचं कौतुक करत होते, पण त्यांचं तिकडे लक्ष नव्हतं. त्यांना भूक लागली होती. शेवटी त्यांनी हळूच विचारलं, ‘खाना है क्या?’ कार्यक्रमानंतर आमंत्रितांसाठी बडा खाना मांडलेलाच होता. माई गेल्या आणि त्यांनी पूर्ण ताट भरून अन्न घेतलं. तिथेच जमिनीवर बसून जेवू लागल्या. एवढं ताटभर अन्न त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं होतं.

त्या जेवत असतानाच दगडूशेठ हलवाई मंदिर समितीचे तात्यासाहेब गोडसे तिथे आले आणि त्यांची विचारपूस केली. तात्यासाहेबांनी माईंच्या मुलीला, ममताला, सांभाळण्याची तयारी दाखवली, आणि ममता पुण्याच्या सेवासदनमध्ये दाखल झाली. त्याच कार्यक्रमात आकाशवाणीचे यशवंत खरातही होते. माईंचा खडा आवाज त्यांनी ऐकला होताच. त्यांनी माईंना आकाशवाणीवर कार्यक्रम करायला माईंना आमंत्रण दिलं. त्या मुलांना बरोबर घेऊन मुंबईला निघाल्या. पण स्वतःच्या मुलीला माईंनी दुसर्‍यांना सांभाळायला का दिलं?

माई सांगतात, “रस्त्यावर बेवारस सोडलेली मुलं माझ्याकडे सांभाळायला होती. मी जे काही सोसलं होतं त्यानंतर माझा हा मार्ग मी निश्चित केला होता. माझ्या मुलीला मी त्यांच्याबरोबर सहज सांभाळू शकले असते. पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर? मी काय केलं असतं? ज्या मुलांना मी सांभाळणार होते, ती मुलं तशीच पाणी पिऊन झोपली असती. पण माझी मुलगी त्यांच्याबरोबर असती तर माझी माया जागृत झाली असती. तिला मी अंधारात नेऊन गुपचूप दोन घास खाऊ घातले नसते का? मला अन्याय करायचा नव्हता. म्हणूनच मी मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाशी घातले आणि पुढे निघाले. माझ्यातली आई चुकली असती तर मग माझ्याच्याने इतर मुलांचा सांभाळ झाला नसता.”

आकाशवाणीवर गाऊन माईंना ३५० रु. महिना मिळू लागले. दूरदर्शनवरही त्यांच्या गाण्याचे २ कार्यक्रम झाले, आणि जमा झालेले पैसे घेऊन माई चिखलदर्‍याला परतल्या. एक झोपडी बांधून त्यांनी आपला आश्रम थाटला. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली. रस्त्यावर सापडलेली, कचराकुंडीत फेकलेली, अनाथ झालेली मुलं माईंनी आपली मानून चिखलदर्‍याला आणली.

त्याचवेळी महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवरील मेळघाटच्या जंगलात व्याघ्र प्रकल्पासाठी स्थाननिश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावांतील आदिवासी निर्वासित होणार होते, आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवासींची बाजू शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कोणीच लक्ष देत नाही, हे पाहून जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयावर २-३ मोर्चेही नेले. तेव्हाचे वनमंत्री छेडीलाल गुप्ता यांच्या कानावर हा प्रकार गेला, आणि त्यांनी आदिवासींचे पुनर्वसन झाल्याशिवाय व्याघ्र प्रकल्प सुरू होणार नाही, असं आश्वासन माईंना दिलं. अजून एक लढाई माई जिंकल्या, पण अशा अनेक लढाया त्यांना रोजच लढाव्या लागत होत्या.

चिखलदर्‍याचा परिसर ख्रिश्चन मिशनर्‍यांनी व्यापला आहे. माईंचं अनाथालय त्यांना त्या परिसरात नको होतं. त्यांनी माईंवर अनेकदा दबाव आणला. ‘तुझी मुलं आम्हाला दे, आम्ही तुला पैसे देतो’, म्हणून अनेकदा त्यांच्याकडून निरोप आला. मेळघाटच्या जंगलात मजा करायला येणार्‍या राजकारण्यांसाठी बंगल्यावर मुली धाडाण्यास दडपण आणलं गेलं. मात्र ही मुलं हिसकावून घ्यायचा प्रयत्न झाला, तेव्हा माई अक्षरशः चवताळून उठल्या. अमरावतीपासून ते थेट दिल्लीपर्यंत माईंनी तक्रारी केल्या, पण उपयोग शून्य. पण एवढं होऊनही माई चिखलदर्‍यातून पळ काढत नाही, हे पाहून मिशनर्‍यांच्या गुंडांनी माईंवर हल्ला केला. एका महिन्यातच दोन हल्ले झाले. माई तरीही बधल्या नाहीत. मुंबईला निघाल्या असता त्यांच्यावर तिसरा हल्ला झाला, आणि त्यात त्या जबर जखमी झाल्या. त्यानंतर मात्र माईंनी त्या परिसरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

माईंचा पहिला मुलगा दिपक त्यांना पुण्याला सापडला होता. माईंच्या एका मुलाखतीत दिपकचा उल्लेख वाचून सासवडहून कोणी त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत चिखलदर्‍यास आले. दिपकच्या आजोबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी थोडी जमीन आपल्या बेपत्ता, अनाथ नातवासाठी ठेवली होती. दिपकने आता आपल्या गावी परत जावं, अशी त्या नातेवाईकांची आणि माईंची इच्छा होती. पण दिपकने नकार दिला. माईंनीच त्याला वाढवलं होतं, आणि त्यांना सोडून कुठेही जाण्याची त्याची तयारी नव्हती. मात्र मिशनर्‍यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दिपक, माई आणि अनाथाश्रमातील मुलांसकट चिखलदर्‍यातून बाहेर पडला. आणि कुंभारवळण या सासवडजवळ असलेल्या गावात, आजोबांनी नावे करून दिलेल्या जमिनीवर ‘ममता बाल सदन’ उभं राहिलं.

आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथाश्रम आहेत. १०४२ मुलं तिथे राहतात. काही वर्षांपूर्वी माई चिखलदर्‍यास परतल्या, आणि तिथे मुलींचं वसतीगृह सुरू केलं. आज १०० मुली तिथे राहून शिक्षण घेतात. माईंना आज सुमारे १५०० मुलं आहेत. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळीच त्यांची मुलं. विधवा, परित्यक्ता, मनोरुग्ण या त्यांच्या लेकी. माईंच्या मुलींचं आडनाव साठे, तर मुलांचं आडनाव सपकाळ असतं. माईंना ४०० सुना आणि २०० जावई आहेत. बरीचशी मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. ‘माझी मुलं डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत’, हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. मागे एकदा माईंकडे गेलो होतो, तर ‘माझी मुलगी M.Phil झाली’ असं म्हणून माईंनी पेढे दिले. माईंच्या मुलांची, नातवंडांची लग्नं, बारशी तर नेहमीचीच असतात. शिकून, नोकरीला लागून मुलं दूर गेली, तरी माईंच्या ओढीनं ती परत येतात. माईंशिवाय आयुष्य जगणं, त्यांच्यासाठी संभवत नाही.
याशिवाय वर्धा जिल्ह्यात एक वृद्धाश्रम, गोरक्षण केंद्र आणि परित्यक्तांसाठी चिखलदर्‍याला वसतीगृह माईंनी सुरू केलं आहे. त्या सांगतात,
“सर्वांनी, जन्मदात्या आईनंही पाठ फिरवली तेव्हा गोठ्यातल्या गाईनं मला संरक्षण दिलं. म्हणून मी गायीलाच माझी माय मानलं. तुझ्या ऋणातून उतराई होईन, असं मी तिला वचन दिलंय.” वर्ध्याच्या गोरक्षण केंद्राच्या रूपानं माईंनी आपलं वचन पाळलं. आज रस्त्यावर सोडलेल्या भाकड गायींचा, कावळ्यांनी डोळे फोडून जखमी केलेल्या गायींचा सांभाळ या केंद्रात केला जातो. ३० वर्षं राज्यभर हिंडून, भीक मागून, भाषणं करून, कविता म्हणून माईंनी त्यांचा हा संसार उभा केला आहे.

गाण्यानं, कवितेनं माईंना जगवलं, आणि आजही कविताच त्यांचा आधार आहे. बहिणाबाई, सुरेश भटांच्या कवितांचं ऋण त्या मान्य करतात. ‘या साहित्यिकांनी मला दु:खातून बाहेर काढलं आणि सांगितलं, व्रण जपत रहा, गात रहा, पुढे जात रहा. साहित्य माणसाच्या पायात बळ देतं, जखमा पुसतं, बेभान करतं, उन्मत्त करतं. कवितांमुळेच माझ्या वेदना मी विसरू शकले’, असं माई नेहमी सांगतात. त्या स्वतः उत्तम कवयित्री आहेत. त्यांच्या कवितेतही ही वेदना असते. “वेदनेशिवाय कविता निर्माण होत नसते. वेदनेतून निर्माण झालेली कविता काळजाशी नातं जोडते”, माई सांगतात

माईंनी आता साठी ओलांडली आहे. दिपक आणि ममता ही त्यांची मुलं त्यांचं बरचसं काम आता सांभाळतात. ममताने MSW केलं आहे. ‘सख्खी आई जिवंत असताना अनाथाश्रमात नेऊन टाकलं, आणि इतरांच्या मुलांना सांभाळलं’, म्हणून आपली मुलगी आपल्याला बोल लावेल, याची माईंना सतत भीती वाटत असे. पण ममताला आपल्या आईने केलेल्या त्यागाचं मोल ठाऊक आहे. माईंनी उभ्या केलेल्या पसार्‍याचा तिला प्रचंड अभिमान आहे.

ममताप्रमाणेच आपल्या इतर मुलींनी शिकावं म्हणून माई झटत असतात. ‘स्त्री कधीही हरणार नाही. कारण तिला वेदना म्हणजे काय, ते ठाऊक असतं. विदर्भात इतक्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. पण एकातरी शेतकर्‍याच्या बायकोनं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं आहे? ती कधीही या जगातून पळ काढणार नाही. कारण स्त्रीची वेदना तिला जगायला शिकवते. स्त्रीचं आयुष्य कसं? मंदिरात ठेवाल तर नंदादीप, मुठीत धराल तर आग. पण तरीही स्त्रीच कायम वेठीस धरली जाते. रमाबाई, पुतळाबाईंपासून ते रूपकंवरपर्यंत असंख्य स्त्रिया सती गेल्या. समाजात आजवर एक तरी ‘सत्या’ झाला आहे का?’ विलक्षण नाट्यमय आयुष्य जगलेल्या माई ‘वेदनांची कीव करून त्यांचा पराजय कसा करायचा’, हे असं सहजपणे सांगून जातात. ‘चिखल आणि पाण्याचं जे नातं, ते दु:खाचं माझ्याशी आहे. या चिखलातच, म्हणजे ओल्या मातीतच बीज अंकुरतं. पण असा ओलावा मला कधीच मिळाला नाही. मी खडकावरच रुजले. पण म्हणून माझी मुळं पक्की, चिवट आहेत. मी कधीच मोडून पडणार नाही.’

माईंनी केलेल्या संघर्षाची पावती म्हणून त्यांना आजवर १७२ पुरस्कार मिळाले आहेत. पण ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी बेघर व्हावं लागलं, त्या पिंपरीमधीच्या गावकर्‍यांनी माईंचं कौतुक केलं, आणि त्यांना आश्चर्यच वाटलं. माईंनी छेडलेल्या आंदोलनामुळेच आज गावकर्‍यांना शेणासाठी महिना हजार रुपये तरी मिळतात. आपल्या गावातील एक स्त्रीने देशात नाव काढलंय, याचा त्या गावकर्‍यांना अभिमान आहे. ‘जो गाव माझ्यावर थुंकला, तोच गाव माझ्या नावाने आज जयजयकार करतो. माझं नाव झाल्यावर माझे पतीही माझ्याकडे आले. त्यांना सांभाळणारं कोणीच नव्हतं. मी त्यांना सांगितलं की मी तुमची आई होऊ शकेन, पत्नी मात्र कधीही नाही. पटत असेल तर रहा. माझ्या आश्रमातली मुलं त्यांचा नीट सांभाळ करतात’.

‘हे निखारे मी स्वतःहून पदरात बांधून घेतले आहेत. जिवंत असेपर्यंत मी त्यांची राख होऊ देणार नाही,’ असं म्हणत न थकता माई काम करत असतात. कसल्यातरी विवंचना सतत असतातच. जिंतूरचे एक डॉक्टर गेल्या महिन्यात माईंकडे एका १० वर्षाच्या मुलाला घेऊन आले. या मुलाच्या हृदयात दोष आहे. डॉक्टरांना तो रस्त्यावर भीक मागताना सापडला. त्यांनी त्याला माईंकडे आणून सोडलं. परवा माईंकडे गेलो तेव्हा या लहानग्याला भेटलो. निलेश त्याचं नाव. अतिशय तल्लख. अफाट स्मरणशक्तीचा धनी. आणि तितकाच समजूतदार. योग्य उपचार झाले नाहीत, तर तो फार जगेल असं डॉक्टरांना वाटत नाही. उपचारांसाठी लाख-दोन लाख रुपये कुठून आणायचे, याच चिंतेत आता माई आहेत.

‘मला १७२ पुरस्कार मिळाले. पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही’. म्हणून माई आजही लोकांसमोर पदर पसरतात. चारपैकी एकाच अनाथाश्रमाला सरकारी अनुदान मिळतं. सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना माईंची दमछाक होते. ‘गाना नही तो खाना नही, भाषण नही तो राशन नही’, असं म्हणत, आपल्या मुलांना दोन वेळ जेवायला मिळावं म्हणून त्या महाराष्ट्रभर हिंडत असतात.
माईंनी अनाथ मुलं वाढवली, त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. ‘निराश्रित’, ‘बेवारस’ असा शिक्का त्यांच्यावर बसू दिला नाही. या मुलांनाही त्याची जाण आहे. आपल्याला जे प्रेम मिळालं, तेच इतरांनाही मिळावं, म्हणून त्यांची धडपड सुरू असते. ‘देवा, आम्हांला हसायला शिकव. परंतु आम्ही कधी रडलो होतो, याचा विसर पडू देऊ नकोस’, हे माईंनी त्यांना शिकवलं आहे.

माईंच्या पायात अजून चप्पल नाही. कोणी पाच रुपये दिले की आजही त्यांना तितकाच आनंद होतो. माईंची वणवण आजही सुरू आहे. पदर पसरून त्या गात असतात,

निखार्‍यावरी दुर्दैवाच्या, पडली चिमणी पिलं,
कवटाळूनी हृदयासी त्यांना मी आईचं प्रेम दिलं,
सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी,
चार घास मागाया आले, तुमच्या दारामधी

हा लेख 2008 मध्ये मायबोली वरती प्रकाशित झालेला आहे !💐

लेखकाचे नाव :- चिनूक्स असे दर्शीवलेले आहे ,

तुम्ही याचं लेखकाच्या नावसहित हा लेख पुढे फॉरवर्ड किंवा कॉपी पेस्ट करून तुमच्या वॉल वर अपलोड करू शकतात

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले (जन्म : नायगाव,तालूका खंडाळा, जिल्हा सातारा जानेवारी ३, इ.स. १८३१, मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्‍या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्‍याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनर्‍यानी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१६ सालीही चालू आहे. (मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये पहिली Co-ed शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.)
सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचेकेशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणार्‍या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणार्‍या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.
सत्कार : पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही. सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
दूरदर्शन मालिकासंपादन करा
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर दूरदर्शनच्या ’किसान’ वाहिनीवर २८ सप्टेंबर २०१५ पासून सोमवार ते शुक्रवार या काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील हिंदी मालिका दाखविली जात आहे..
सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके :
काव्यफुले (काव्यसंग्रह, १८५४)सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य :
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका : शैलजा मोलक) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : ना.ग. पवार) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : नागेश सुरवसे) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (विद्याविकास) (लेखक : ज्ञानेश्वर धानोरकर) त्या होत्या म्हणून (लेखिका : डॉ. विजया वाड)’व्हय मी सावित्रीबाई फुले’ हे नाटक (एकपात्री प्रयोगकर्ती अभिनेत्री : सुषमा देशपांडे) साध्वी सावित्रीबाई फुले (लेखिका : फुलवंता झोडगे) सावित्रीबाई फुले (लेखक : अभय सदावर्ते) सावित्रीबाई फुले (लेखिका : निशा डंके) सावित्रीबाई फुले (लेखक : डी.बी. पाटील ) सावित्रीबाई फुले -श्रध्दा (लेखक : मोहम्मद शाकीर) सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रतिमा इंगोले ) सावित्रीबाई फुले (लेखक : जी.ए. उगले) सावित्रीबाई फुले (लेखिका : मंगला गोखले) सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (लेखक : ना.ग. पवार) ‘हाँ मैं सावित्रीबाई फुले’ (हिंदी), (प्रकाशक : अझिम प्रेमजी विद्यापीठ) ज्ञान ज्योती माई सावित्री फुले (लेखिका : विजया इंगोले) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका उषा पोळ-खंदारे) Savitribai – Journey of a Trailblazer (Publisher : Azim Premji University)
सावित्रीबाई संमेलन/अभ्यासकेंद्र/पुरस्कार
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन भरते. याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते. पुणे विद्यापीठाव्या नावाचा विस्तार करून ते ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करण्यात आले. पुणे विद्यापीठात ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र’ या नावाचे एक अभ्यासकेंद्र आहे. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍यास एका समाजसेविकेस दिला जातो. ५००१ रुपये रोख,व सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, चिंचवडगाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार, महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी(पुणे)तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ‘आदर्श माता’ पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून), सावित्रीबाई फुले महिलामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणार्‍र्‍या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्‍न पुरस्कार : आदर्श माता रत्‍न, उद्योग रत्‍न, कला रत्‍न, क्रीडा रत्‍न, जिद्द रत्‍न, पत्रकारिता रत्‍न, प्रशासकीय रत्‍न, वीरपत्‍नी रत्‍न, शिक्षण रत्‍नमराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, माझी मैत्रीण ट्रस्टतर्फे देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार : २११६ साली हा पुरस्कार सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी यांना देण्यात आला.
अधिक वाचन : फुलवंता झोडगे. ‘साध्वी सावित्रीबाई फुले’. चिनार पब्लिकेशन, पुणे. (मराठी मजकूर) डॉ. विजया वाड. ‘त्या होत्या म्हणून’. अनुश्री प्रकाशन.(मराठी मजकूर) “दै. सकाळमधील लेख”, सकाळ, ३ जानेवारी, इ.स. २००९. (मराठी मजकूर) कष्टाने शिक्षण घेतलेल्या मुलीला किंवा स्त्रीला सावित्रीची लेक म्हणायची रीत पडली आहे. त्यामुळे शिकलेल्या स्त्रियांच्या परिचय-ग्रंथाला ‘सावित्रीच्या लेकी’ किंवा ‘लेकी सावित्रीच्या’ अशी नावे देण्यात येतात. त्यामुळे या नावाची पुस्तके अनेक लेखकांनी लिहिली आहेत. उदा० निर्मलाताई काकडे यांच्या यू.म. पठान यांनी लिहिलेल्या चरित्राचे नाव “लेक सावित्रीची’ असे आहे.‘सावित्रीच्या लेकी’ नावाचे एक मासिकही आहे.आम्ही सावित्रीच्या लेकी. (पुस्तक : लेखिका सुधा क्षिरे) आम्ही सावित्रीच्यालेकी (लेखिका – भारती पाटील) सावित्रीच्या लेकींचा परिचय (मधुरिमा मासिकातले पाक्षिक सदर) .🙏🙏🙏 -वाचाल तर वाचाल-राष्ट्रनिर्माते डाॕ.बाबासाहेब आंबेडकर
श्री.आर आर थोरात . . . . . फेसबुकवरून साभार

विकीपी़डियावरील माहिती
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87

सावित्रीच्या लेकी क्षितिजापार निघाल्या
क्रांतीज्योतीने दश दिशा उजळल्या

केशवपन करू नका. ते पाप आहे असे नाभिकाना सांगणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे आज पुण्यस्मरण (जन्म ३ जानेवारी १८३१-निधन १० मार्च १८९७)
एकदा शाळेत जात असतांना चौकातील गुंडांनी सावित्रीबाईंचा रस्ता अडवून ,”मुलींना आणि महार – मांगाना शिकवणे तू बंद कर नाहीतर तुझी अब्रू शाबूत राहणार नाही” अशी धमकी दिली. हे ऐकताच सावित्रीबाईंनी त्याला चपराक लगावली. सावित्रीबाई अशा संकटांना तोंड देण्यास समर्थ होत्या.
दादोबा पांडुरंग तर्खडकर हे सरकारी-देशी शाळांचे पर्यवेक्षक असतांना त्यांनी थोड्या वेळात शाळेने चांगली प्रगती केली हे भूषावह आहे असा शेरा दिला. त्या काळात विधवा महिलांचे केशवपन होत असे कारण विधवा स्त्री ने संन्यासिनी सारखे जीवन जगावे अशी रूढी होती. स्त्रीला अपशकुनी समजले जात असे. तिला पांढरे वस्त्र परिधान करावे लागत असे. त्यांना घरात कोंडून ठेवले जात असे हे स्त्रियांचे दुख त्यांनी जवळून पहिले होते. केशवपनाची दृष्टप्रथा नष्ट झाली पाहिजे असे त्यांना वाटे, पण लोक ऐकत नव्हते म्हणून जोतीबा आणि सावित्रीबाईंनी सर्व नाव्ह्यांची सभा बोलावली. आपण आपल्या भगिनींवर वस्तरा चालवितो हे मोठे पाप आहे याची जाणीव करून दिली. नाव्ह्यांनाही त्याची जाणिव झाली आणि त्यांनी पाठिंबा दिला. जास्त करून ब्राह्मण समाजात केशवपन प्रथा होति.
सातारा जिल्ह्यातील शिरवळ जवळ नायगाव येथे त्यांचा जन्म झाला .म .ज्योतिबा फुले यांचे सारख्या युग युग पुरुषाबरोबर त्यांचा विवाह झाला . त्यांच्या बरोबर त्यांनी समाजकारणाचा वसा घेतला . स्त्री शिक्षणाचे ओढीने त्यांनी पुणे येथे शाळा सुरु केली . ब्राह्मण परीत्यक्तेचा मुलगा दत्तक घेऊन त्यांनी अनोखा आदर्श ठेवला . त्या स्वत: कवयित्री होत्या ” का व्य फुले ” व “बावनकशी सुबोध रत्नाकर ” हे त्यांचे काव्य संग्रह. सावित्रीबाई यांनी प्लेगचे साथीतहि रुग्ण सेवा केली . व त्याची बाधा त्यानांही झाली व त्यांचा अंत झाला.

सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.
१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तरी भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.
सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही. सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.
सावित्रीबाई यांनी प्लेगचे साथीतहि रुग्ण सेवा केली . व त्याची बाधा त्यानांही झाली व त्यांचा अंत झाला
अभिवादन”
माधव विद्वांस . . . फेसबुकवरून साभार

अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे

माझे अभियांत्रिकी महाविद्यालयामधले (इंजिनियरिंग कॉलेजमधले) सहपाठी श्री.श्यामसुंदर केळकर हे निरनिराळ्या विषयांवर मुखपुस्तकावर (फेसबुकावर) स्फुट लेख लिहित असतात. अहिंसा – शाकाहार – मांसाहार या विषयावरील त्यांचे ११ स्फुट लेख मी या पानावर एकत्र दिले आहेत. हे लेख विचारांना चालना देणारे तसेच खूप माहितीपूर्ण आहेत. यात मांडलेली मते पूर्णपणे त्यांची आहेत आणि त्यांच्या मतांना कशाचा आधार आहे यांचे संदर्भ त्यांनी ठिकठिकाणी दिले आहेत. यावरील माझी मते / प्रतिसाद मी खाली दिले आहेत. . . . आनंद घारे

अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे १
( गुजरात मध्ये मांसाहारी दुकानांवर बंदी घालण्यात येत आहे . त्यावरून या विषयाचा एकूणच संक्षिप्त अभ्यास मांडण्याचा हेतू आहे . )
अहिंसा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात तीन नावे – गौतम बुद्ध , वर्धमान महावीर आणि महात्मा गांधी. खरे म्हणजे येशू ख्रिस्त यांचेही नाव यायला हरकत नाही त्यानीही हिंसेचे समर्थन केल्याचे ऐकिवात नाही किवा वाचनात नाही . ख्रिश्चन धर्माशी आपला जास्त परिचय नसल्यामुळे ते नाव डोळ्यासमोर येत नाही हे खरे.
हिंदू देवतांचे मात्र एकही नाव डोळ्यासमोर येत नाही . आपले सगळे देव शस्त्रधारी आहेत . नि:शस्त्र देव एकही नाही . देवतांची स्थिती तर त्याहून वाईट ! देव फक्त शस्त्रधारी असतात , देवता त्रिशूळ घेऊन कोणाला तरी मारत असतात आणि या देवताना अनेक पशू बळी दिले जात असतात . ( अपवाद फक्त सरस्वती आणि लक्ष्मी )
म्हणजेच आपले बहुतेक देव आणि देवता ह्या मांसाहार जास्त प्रचलित असलेल्या काळातील आहेत .
असे का बरे असावे ? येशू ख्रिस्त याना दोन हजार वर्षे लोटली , महावीर आणि बुद्ध याना २५०० वर्षे लोटली . पण विष्णूचा आठवा अवतार श्रीकृष्ण याना जाऊनच ५४०० वर्षे लोटली . श्रीराम याना जाऊन ९०००-१०००० वर्षे झाली असावीत . म्हणजे आपले देव हे जास्त जुने आहेत . परशुराम , वामन आणि नरसिंह तर त्याही पूर्वी. आपण अजून त्यानाच चिकटून आणि त्यांच्याच काळात वावरत आहोत . देवतांच्या काळाचा तर काहीच अंदाज करता येत नाही .
बुद्ध आणि महावीर यांचेनंतर ही खूप ज्ञानी पुरुष भारतात होऊन गेले . त्यातील एक प्रमुख नाव चक्रधर स्वामी. (११९४- १२६७ – साली त्यानी आपल्या पंथाची सुरुवात केली ) हे स्वत:ला द्वैत पंथी वैष्णव असे म्हणत आणि श्रीकृष्ण याना आपले दैवत मानत. यानी स्थापन केलेल्या पंथाला पुढे महानुभाव पंथ नाव मिळाले. हा पंथ शाकाहाराचा समर्थक असून मद्यपानाचा निषेध करतो . ह्यानी अहिंसेचा उपदेश केलेला आहे . ह्या पंथात दफनाची पद्धत आहे . नगर , बीड , परभणी अशा दुष्काळी भागात हा पंथ जन्माला आल्यामुळे असे असावे . चक्रधरस्वामी ह्यानी वैदिक परंपरेला नाकारून शूद्रांसह स्त्रियांना ही मोक्षाचा समान अधिकार आहे असे म्हटले आहे . त्याना महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक मानले जाते .
त्याना मराठीचे संस्थापकही मानले जाते . त्यांची शिष्या महदंबा ही मराठीतील पहिली कवयित्री मानली जाते . त्यानी रचलेले ” धवळे ” हे मराठीतील पहिले कवयित्री काव्य मानले जाते .
असाच दुसरा एक पंथ बिश्नोई पंथ . त्याविषयी पुढील भागात .


श्याम केळकर


अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे २
बिश्नोई पंथ .
सलमान खान चिंकारा प्रकरणामुळे हा पंथ लोकाना माहीत झाला . आजकाल पर्यावरण या विषयावर खूप बोलले जाते पण हा भारतातील किवा कदाचित जगातील पहिला पर्यावरणवादी पंथ म्हणावा लागेल . ह्या पंथाचे अनुयायी बहुतांशी राजस्थानमध्ये आहेत . या पंथाचे संस्थापक गुरु जंभेश्वर ( १४५१-१५३६ ) बिश्नोई याचा अर्थ वीस अधिक नऊ . यानी अनुयायांना २९ आज्ञा ( नियम ) घालून दिले होते . त्यापैकी सर्वात महत्त्वाचे दोन म्हणजे:-
१) जीवदया – कोणाही प्राण्यांची हत्या करावयाची नाही
आणि
२) कोणतेही हिरवे झाड तोडायचे नाही .
या पंथाचे आजही भारतात सुमारे १० लाख अनुयायी आहेत .
१७३० साली जोधपूरचे राजे अभयसिंग यानी खेजराली गावात झाडे तोडण्यासाठी कामगार पाठविले . (१२-९-१७३० , भाद्रपद शुद्ध दशमी) अमृतादेवी बिश्नोई या महिलेने झाडे तोडण्यास विरोध केला . तिचा शिरच्छेद करण्यात आला . तिच्यानंतर तिच्या तीनही मुली आणि नंतर अनेक – एकूण ३६३ माणसानी आपले प्राण गमवावे लागले . शेवटी राजाने माघार घेतली . ( जगातील तो पहिला मोठा अहिंसक सत्याग्रह असावा ) भाद्रपद शुद्ध दशमी हा दिवस अजूनही अमृतादेवी यांच्या स्मरणार्थ पाळला जातो .
१९७३ साली याच अंदोलनातून प्रेरणा घेऊन सुंदरलाल बहुगुणा यानी उत्तराखंड येथील चमोली गावात ” चिपको ” आंदोलन सुरू केले . Rain water Harvesting बद्दल आपण बोलतो इथे तेही केले जाते . प्राणी आणि पक्षी यांचेसाठी वेगळा साठा केला जातो . हरणाच्या आईचा मृत्यू झाल्यास या स्त्रिया पिल्लाला अंगावर दूधही पाजतात .
या पंथातही पार्थिव शरीर दफन करण्याची प्रथा आहे . वाळवंटी प्रदेश आहे .
( महानुभाव पंथ ७५० वर्षे ,बिष्णोई पंथ ५०० वर्षे टिकून आहे . प्रार्थना समाज , ब्राह्मो समाज , सत्य धर्म टिकले नाहीत . डॉ बाबा आढाव यांच्या दोन सभाना मी उपस्थित होतो. ते अजूनही सत्य धर्माची प्रार्थना सभेत म्हणतात . पण ते एकटेच .
ज्ञानी पुरुषानी स्थापन केलेले संप्रदाय मात्र शेकडो वर्षे टिकतात . जंभेश्वर यानी अशी काय जादू केली असेल की ३६३ माणसानी प्राण देण्यास मागेपुढे पाहिले नाही ? तेही मृत्यूनंतर १९४ वर्षानी ? )


श्याम केळकर


अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ३
जीवो जीवस्य जीवनम् – असे विष्णू शिरोडकर लिहितात (वाचकांच्या प्रतिसादांमध्ये). हे प्राण्यांसाठी खरे आहे . त्याना मन नसते किवा असलेच तर फार मर्यादित असते .
त्याना कर्ताभाव नसतो कोंबडी पकडताना मांजराला काही पाप करत आहोत अशी भावना नसते . आहार , निद्रा , भय आणि मैथुन या निसर्ग – प्रेरणा जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा त्यानुसार ते वागतात . म्हणून दादा भगवान यानी त्याना परमेश्वराचे आश्रित असे म्हटले आहे .
अमीबा ते मनुष्य प्राणी ही उत्क्रांती होत रहाते . अध्यात्मानुसार तोच आत्मा पुढे पुढे जातो . ( डार्विन च्या म्हणण्यानुसार उत्क्रांती होते . आत्म्याचा विषय नाही .) तोच आत्मा पुढे सरकतो कारण या पैकी कुठल्याही देहात कर्ता भाव नाही आणि त्यामुळे पाप – पुण्य , चांगले – वाईट , शुभ – अशुभ असे काहीच नाही . पुढे जात जात तो मानवी देह गाठतोच. पुढचा प्रवास ( जे मानतात त्यांचेसाठी ) मात्र आपोआप नाही तो आपणच निर्धारित करतो .
मांजर जसे कोंबडे पकडून चावून चावून खाते तसे आज स्वत:ला मांसाहारी म्हणणारे खाऊ शकतील ? कदाचित ९०००-१०००० वर्षांपूर्वी आपले पूर्वज तसे खातही असतील . अजूनही आदिवासी लोक काही ठिकाणी प्राणी पकडून खातात . डुकरे पकडून त्याना जिवंत भाजून खातात . ( पहा – फॅंड्री ) म्हणजेच आपल्याला आता आपण नैसर्गिकरीत्या १०० % मांसाहारी आहोत असे म्हणणे योग्य होणार नाही .
म्हणजे माणूस जसा जसा प्रगत होतो तसा तसा तो प्रत्यक्ष मांसाहाराकडून अप्रत्यक्ष मांसाहाराकडे वळतो. कोंबडा दुसऱ्या कोणीतरी मारावा , साफ करावा मग कदाचित पुढील गोष्टी ते करतील . अलीकडे कृत्रिम मांस निर्मितीचे प्रयोग चालू आहेत . असे मांस खाणाऱ्याना मांसाहारी म्हणायचे की नाही हा पुढेमागे चर्चेचा विषय होऊ शकेल .
मांसाहार ते शाकाहार हा प्रयोग हजारो वर्षे चालू आहे .
सत्य आणि अहिंसा इत्यादि दैवी गुणांचा विकास अनादि कालापासून होत आहे पुष्कळ विकास झाला आहे पण अजूनही विकासास पुष्कळ अवसर आहे जोपर्यंत आपल्याला सामाजिक शरीर आहे तोपर्यंत विकासास अनंत अवकाश आहे. वैयक्तिक विकास झाला तरी सामाजिक , राष्ट्रीय आणि जागतिक विकास रहातोच .
( शेवटचा परिच्छेद – गीता प्रवचने – विनोबा )
अहिंसेचा विकास कसाकसा होत गेला याविषयी विनोबांचे विचार पुढील भागात )


श्याम केळकर


अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ४
थोडेसे विषयांतर
शाकाहार मांसाहार विचार करण्यापूर्वी माणसामाणसांमधील हिंसाचार कमी व्हायला हवा . पण महासत्ता बनण्याच्या अट्टाहासापोटी तो वाढत चालला आहे .
काही दिवसांपूर्वी म्हणजे एक – दीड महिन्यापूर्वी आपण एक बातमी वाचली असेल . चीनने उपग्रहातून क्षेपणास्त्र डागण्याची यशस्वी चाचणी केली . निर्धारित लक्ष्य सुमारे ३५ किमी चुकले . पण या बातमीमुळे अमेरिकेसह युरोप आणि इस्रायल हादरले . या मुळे जगातील अस्तित्त्वात असलेल्या सर्व क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा कुचकामी होणार आहेत .
आणि कालच बातमी आहे की अमेरिका आता चंद्रावर अण्वस्त्र प्रकल्प उभारणार आहे . हा प्रकल्प पृथ्वीवरच उभा करून चंद्रावर पाठविला जाईल .
कदाचित हे चीनला उत्तर असेल . माहीत नाही .
१००० वर्षापूर्वीची युद्धे समोरासमोर होत . त्यासाठी समोरासमोरचा रक्तपात पाहावा लागतो . तो पाहून अंत:करणात करुणा जागी होते . आजकालच्या ह्या यंत्रणा हजारो किमी वरून हे करू शकतात . अशा परिस्थितीत माणसामाणसांमधील हिंसा दूर करणे हे खूप कठीण काम आहे .
कदाचित आपण प्राण्यांचे बाबतीत अधिक सहृदय झालो तर हे होईल का ?


श्याम केळकर


अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ५
आहार काय असावा याचा जैन धर्मात खूप विचार केलेला आहे . मी मागेच एका स्फुटात जैन धर्मात १४ आध्यात्मिक पायऱ्या मानलेल्या आहेत हे सांगितले होते . १४ वी पायरी ही तीर्थंकर ही आहे . वर्धमान महावीर ही आहे .
जैन धर्मात खाण्यापिण्याचे खूप कडक नियम आहेत . पण आपण आणि जैन मित्रानी हे लक्षात घेतले पाहिजे की हे नियम सर्वसाधारण लोकांसाठी नसून साधकांसाठी आहेत . ज्याना आध्यात्मिक दृष्टीने उच्च पायरी गाठायची आहे त्यांचे साठी त्या गोष्टी आहेत . पदवी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी आहेत . ते नियम सर्व साधारण लोकांसाठी नाहीत. ( संदर्भ – साध्वी वैभवश्री यांचे चरम मंगल या वाहिनीवरील प्रवचन )
अनेक जण विचारतात की पूर्वी ऋषी मुनी मांसाहार करत नव्हते का ? याचे उत्तर बहुधा हो असेच द्यावे लागेल . भवभूती कवीच्या उत्तर राम चरित्रात एक प्रसंग आहे . वाल्मीकी ऋषीन्च्या आश्रमात वसिष्ठ ऋषी आले असता त्यांच्या स्वागतासाठी एक लहान कालवड ( गायीचे स्त्री पिल्लू ) मारली गेली तेव्हा एक लहान मुलगा मोठ्या मुलाला विचारतो – “आज आपल्या आश्रमात तो दाढीवाला बाप आला आहे , त्याने आपली कालवड मटकावली हे खरे ना ?” ( भवभूतीचा काळ ८ वे शतक मानला जातो .)
तो मोठा मुलगा म्हणतो :- ” अरे ते वसिष्ठ ऋषी त्यांचेबद्दल असे बोलू नये . ” ( संदर्भ – गीता प्रवचने – १६ वा अध्याय )
हाच प्रसंग आचार्य अत्रे यानी आपल्या गुरु- दक्षिणा या लहान मुलांच्या नाटकात वापरला आहे .
पण आपण हे ध्यानात घ्यायला हवे की तो काळ सुमारे ९-१० हजार वर्षापूर्वीचा आहे . त्या काळी माणसाचा साराच उदरनिर्वाह पशूवरच होत होता . आपण गोमांस खात नाही म्हणून आपण वसिष्ठ ऋषीन्पेक्षा मोठे असे मानण्याचे कारण नाही .
पण ज्यांचा आध्यात्मिक विकास झाला त्याना हे अयोग्य वाटू लागले . म्हणून त्यानी मांसाहार करू नये असा प्रचार सुरू केला .
जैन धर्माचे २२ वे तीर्थंकर नेमीनाथ . हे श्रीकृष्ण यांचे सख्खे चुलत भाऊ . लग्नासाठी वधूकडे निघाले असता त्याना शेकडो पशूंची हत्या होताना दिसली . लग्नाच्या पाहुण्या मंडळींच्या खाण्यासाठी हे चालले होते . ते पाहून त्याना शिसारी आली आणि त्यानी तात्काळ दीक्षा घेण्याचा विचार केला . ( हा काळ सुमारे ५५०० वर्षांपूर्वीचा )
खाण्यापिण्याचे नियम स्थल – काळ – समूह सापेक्ष असतात . सर्वानी तेच स्वीकारावेत हे म्हणणे योग्य नाही .
क्रमश :


श्याम केळकर
( मी स्वत: कधी चिकन , मटण , मासे खाल्लेले नाहीत . अंडी मात्र खात असे . पण १९९५ साली साधू वासवानी दिवसाचे निमित्त साधून मी अंडी खाणेही बंद केले . शक्यतो मी केक खात नाही . पण अलीकडे केकचे प्रस्थ खूप वाढले आहे . चुकून केकमार्फत कधीतरी अंड्याचा अंश खाल्ला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही .)


अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ६
श्रीराम ते श्रीकृष्ण या काळात हळूहळू मांसाहार करू नये असे वाटणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली . जैन पंथाचे लोक वाढू लागले हेही कारण असू शकते . श्रीकृष्ण यानी गायींचे संवर्धन आणि पालन याला महत्त्व दिले. गायी पाळणारे ते गोप आणि गोपी . कदाचित याच काळानंतर गाय मारू नये, ती आपल्याला दूध देते , तिला मारू नये असा विचार वाढीस लागला असावा . ती गोमाता आहे असे याच काळापासून लोक मानू लागले आणि कमीतकमी गोमांस तरी खाऊ नये हा विचार खूप लोकात पसरला .
कृष्णानी गोवर्धन पर्वत उचलला ही रूपक कथा असू शकते . श्रीकृष्णानी गोवर्धन आणि गोरक्षा अशा दोनही बाजूनी गायींची संख्या वाढवण्यावर भर दिला . ( दादा भगवान – अहिंसा )
इतर प्राण्यानाही मारू नये असे बहुधा ब्राह्मण लोकाना वाटू लागले . पण अशी सक्ती इतर लोकांवर करणे शक्य नव्हते . मग त्यासाठी फक्त यज्ञात बळी दिलेले पशूच फक्त खावे , इतर नाही असे शिकविण्यात येऊ लागले . देवाला / देवीला बळी दिलेले पशूच फक्त खावे असे सांगण्यात येऊ लागले . यात दुतर्फा सोय होती . यज्ञ करणारे आणि मांसाहार करू इच्छिणारे . परिणामी यज्ञयाग वाढू लागले . देवाला बळी वाढू लागले . देवतांची संख्या वाढू लागली . यज्ञात बळी दिलेला प्राणी स्वर्गात जातो असे सांगणे सुरू झाले . अडाणी आणि अशिक्षित जनतेला ते खरे वाटे . ( संदर्भ – गीता प्रवचने )
( या संदर्भात कबीर यांची गोष्ट आहे . अशाच एका यज्ञात ते गेले . त्यानी विचारले :- या बोकडाचे तुम्ही काय करणार ?
ब्राह्मण म्हणाले :- त्याला बळी देणार . त्यामुळे त्याला स्वर्गप्राप्ती होईल . कबीर म्हणाले :- मग तुमच्या वडिलांनाच का बळी देत नाही ? ते म्हातारे आहेतच . त्याना स्वर्गात जाऊ दे .
मग कबीरांचे काय झाले असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता . ( संदर्भ – दादा भगवान – आप्तवाणी -२) )
मग गौतम बुद्ध आले . ते म्हणू लागले – कमीतकमी देवाच्या नावाने तरी हिंसा करू नका . देवाला बळी देणे थांबवा .
महावीर यांचा जैन पंथ आणि गौतम बुद्ध यांचे अनुयायी वाढू लागले . सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला . त्यानंतर बौद्ध धर्म जवळजवळ भारतभर पसरला .
त्यामुळे भारत हा जगातील शाकाहारी लोकांचे प्रमाण जास्त असणारा एक देश बनला .
बौद्ध आणि जैन धर्म का नष्ट झाला / केला गेला हा इतिहास काही फारसा स्पृहणीय नाही. पण तो इतिहास सांगणे हा वर्ण्य विषय नाही .


श्याम केळकर


अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ७
मांसाहार करणाऱ्या लोकांच्या अनेक शंका असतात . जैन धर्म यातील जास्तीतजास्त शंकांचे निरसन करतो . सर्वात सामान्य ( Common) शंका ही की सर्वच प्राणीमात्रात जीव असतो मग मांसाहाराला आक्षेप का ?
( ज्यांचा पारलौकिक धर्मावर विश्वास नाही त्यानी वाचले नाही तरी चालेल .)
जीवांचे पांच प्रकार आहेत :-
एकेंद्रिय जीव – याना फक्त स्पर्शेंद्रिय असते . ( यात वनस्पती आल्या . )
दोन इंद्रिय असलेले जीव – याना स्पर्श आणि चव अशी दोन इंद्रिये असतात .
तीन इंद्रिये असलेले जीव – याना वासाचे आणखी एक इंद्रिय असते .
चार इंद्रिये असलेले जीव – याना चक्षू ही असतात .
पांच इंद्रिये असलेले जीव – याना कान ही असतात
आणि
माणूस – पंचेंद्रिये असलेला आणि खूप विकसित मन असलेला .
मग साधकाचा सर्वात उत्तम आहार कोणता ? एकेंद्रिय जीवांचा . आहार घेतल्याशिवाय सुटका नाही आणि थोडीफार हिंसा अटळ आहे . एकेंद्रिय जीवच आपला सर्वोत्तम आहार आहे . एकेंद्रिय जीव हे त्रस जीव ( ज्याना त्रास / यातना होतो असे जीव ) नाहीत .
निर्जीव वस्तू खाऊ शकत नाही . म्हणून जीव असणारी वस्तूच खावी लागते .त्यानेच शरीराचे पोषण होते . जीव असतो अशा आहारातच जीवनसत्त्वे असतात . पण एकेंद्रिय जीवात रक्त , पू आणि मांस नाही . म्हणून हे जीव खाण्यात कमीतकमी हिंसा आहे .
त्या जीवानी तुम्हाला जगविले हे पुण्य त्यांच्या पदरात आपोआप पडते . त्यांची उर्ध्वगती होते . ते एकेंद्रियातून दोन इंद्रिये असलेल्या जीवात जातात . त्याचे पाप आपल्याला मिळते पण आपण पूर्ण दिवस जगलो आणि धर्माचरण केले म्हणून पुण्यही मिळते . पण पाप दहा रुपयांचे असेल आणि पुण्य १०० रुपयांचे असेल त्यामुळे एकूण तुम्हालाही फायदाच होतो .
सर्वात अहितकारक काय ? अर्थातच उलट .
माणूस खाणे सर्वात वाईट
मग पंचेंद्रिय जीव खाणे वाईट
मग चार इंद्रिये असलेले जीव
असे खाली खाली –
( संदर्भ – दादा भगवान – अहिंसा )


श्याम केळकर


अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ८
अंडे खाऊ शकतो की नाही ?
काही जण म्हणतात की अंडी दोन प्रकारची असतात सजीव आणि निर्जीव . सजीव अंडी खाऊ शकत नाही कारण त्यात जीव आहे . तो बेशुद्ध अवस्थेत आहे तरी पण तो जीवच आहे आणि ते फुटते तेव्हा त्यातून पंचेंद्रिय जीव बाहेर पडतो . निर्जीव अंडी खाऊ शकत नाही कारण आपण निर्जीव – जड काहीच खात नाही निर्जीव वस्तूत जीवनसत्त्वेच नसतात . त्यामुळे निर्जीव अंडे खाण्यात काहीच अर्थ नाही . ( आपण शक्यतो शिळे अन्न खात नाही . मांसाहार करणारेही शिळे मांस खात नाहीत . कारण ते निर्जीव असते .) म्हणजेच कोणत्याही प्रकारचे अंडे आपण खाऊ शकत नाही . ( दादा भगवान )
दूध पिऊ शकतो की नाही ?
दूध हे वासरासाठी असते , आपल्यासाठी नाही असे काही जण म्हणतात . पण हे जंगली प्राण्यांच्या बाबतीत बरोबर आहे . आपण गायीला / म्हशीला पाळतो . त्याना खूप खायला घालतो . त्यामुळे वासराला पाजून देखील त्या गायीकडे / म्हशीकडे खूप दूध शिल्लक असते असे दूध पिण्यास काही हरकत नाही . ( दादा भगवान )
मांसाहार कोणी घ्यावा ? ( कोणी घेणे अनुचित नाही .)
आहार शुद्धीचे जितके प्रयोग भारतात झाले तितके जगात कोठेही झालेले नाहीत . भारत हा एकमेव देश जगात आहे जिथे कित्येक जातीच्या जाती मांसाहार करत नाहीत . ज्या करतात त्यांच्याही आहारात मांस ही नित्य बाब नसते . काही जण श्रावणात , काही सोमवारी , शनिवारी आणि एकादशी , चतुर्थी अशा दिवशी मांसाशन करत नाहीत .
आपण जन्म घेतो त्याबरोबरच आपल्याला स्वधर्म मिळतो . ज्या आई बापांचे संस्कार घेऊन आपण जन्म घेतो तेव्हाच आपण आहारशुद्धीच्या एका टप्प्यावर आलेलो असतो . ही पूर्व पुण्याई घेऊन आपण पुढे जायला पाहिजे . पण हल्ली पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत चालला आहे . आपल्यातील जड श्रद्धा , अंधश्रद्धा ढासळल्या तर त्यात नुकसान नाही . पण एक अंध श्रद्धा जाऊन दुसरी येणे योग्य नाही . काही जणाना मांसाहार इष्ट वाटू लागला आहे .
( गीता प्रवचने – विनोबा )
ज्या व्यक्तीनी शाकाहारी कुटुंबात जन्म घेतला आहे त्यानी शाकाहार सोडणे योग्य नाही . मांसाहारी कुटुंबात जन्माला आला असाल तर मांसाहार करायला हरकत नाही . तुमच्या रक्तात मांसाहार आला नसेल तर तो करू नका .
बोकडाला , कोंबडीला काय आई वडील , मुलेबाळे नाहीत ?त्याना त्रास होत नसेल का ? तुम्हाला , तुमच्या मुलाबाळाना कोणी खाल्ले ( पूर्वी राक्षस खात असत असे आपण ऐकतो .) तर तुम्हाला त्रास होतो ना ? मग तुम्हाला प्राणी मारायचा अधिकार कोणी दिला ? ( दादा भगवान )
पाणी गाळून आणि उकळून प्यावे. पाण्यात अपकाय जीव असतात . त्यामुळे पोटात जीवाणू उत्पन्न होऊ नयेत म्हणून पाणी उकळून प्यावे असे सांगितले आहे . शरीर चांगले रहावे आणि ज्ञानावर आवरण येऊ नये म्हणून हे सांगितले आहे . ह्या पाण्यात आठ तासानी पुन्हा जीव उत्पन्न होऊ शकतात म्हणून दर आठ तासानी हे पाणी बदलावे असे जैन धर्मात सांगितले आहे . म्हणजे ही हिंसा मान्य केली आहे .


श्याम केळकर


अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ९
भाव हिंसा , भाव अहिंसा
आपण श्वास घेतो तेव्हा हवेद्वारे अनेक जीव नाकातून आत जातात आणि अनेक जीव श्वास सोडतो तेव्हा बाहेर पडतात . म्हणजे हिंसा अटळ आहे .
म्हणजे अहिंसेसाठी काय करायला हवे ? भावात अहिंसा असली पाहिजे . कोणत्याही जीवमात्राला माझ्या शरीराकडून , वाणीने आणि मनाने किंचित् मात्रही दु :ख दिले न जावो, न जावो , न जावो अशी प्रार्थना करावी आणि असे भाव बाळगावेत . ही झाली भाव – अहिंसा . प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी जमतीलच असे नाही . पण चूक झाली आणि समजली तर त्यासाठी माफी मागावी . ( आपण ज्या देवाला मानता त्याला स्मरून माफी मागावी नाहीतर गांभीर्याने माफी मागावी .)
कोणाही जीवाला मारण्याची , मानसिक आर्थिक त्रास देण्याची इच्छा म्हणजे भाव हिंसा . कोणावरही तू हे खाऊ नकोस , हे विकू नकोस ( जे विकणे कायद्याला धरून आहे ) अशी जबरदस्ती करणे म्हणजे हिंसा आणि असे करणाऱ्या आणि करविणाऱ्याला अनुमोदन देणे हीही हिंसाच . ( ऐसा करना , कराना और करवाना , इनका अनुमोदन करना ये सब हिंसामेही आयेगा l )


दुर्दैवाने महावीरांच्या अनुयायांना अहिंसेचा अर्थच कळला नाही . हिंसा करायची नाही म्हणून ते क्षत्रिय बनले नाहीत आणि त्याच कारणासाठी शेतीतही गेले नाहीत . सर्वच व्यापारात शिरले. व्यापारी म्हणून त्यानी जेवढी हिंसा केली तिला मर्यादाच नाही . ( सौजन्य – आचार्य रजनीश )


व्यापारी असल्यामुळे ते श्रीमंत आहेत, त्यांच्या हातात सत्ता आहे आणि त्या जोरावर जबरदस्तीने छोट्या छोट्या हातगाडीवाल्या व्यावसायिकांना त्रास देत आहेत . हे अयोग्य आहे आणि निषेधार्ह आहे . रोज सकाळी ऑमलेट किवा अंडा बुर्जी खाणाऱ्या आणि ती सुविधा देणाऱ्या लोकाना त्रास देणे योग्य नाही . शाकाहारी / मांसाहारी असणे , किती प्रमाणात असणे ही सर्वस्वी त्या व्यक्तीची निवड आहे . महात्मा गांधी गोहत्या विरोधी होते पण गोहत्याबंदी कायद्याच्या विरोधात होते .
काय योग्य काय अयोग्य हे माणसाच्या विवेकबुद्धीवर सोडायला हवे .


श्याम केळकर


अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे १०

जैन धर्म , बौद्ध धर्म यात अहिंसेला जसे महत्त्व दिले आहे तसे शैव / वैष्णव / वैदिक धर्मात नाही . तत्त्वम् असि , अयमात्मा ब्रह्म , सर्वम् खलु इदम् ब्रह्मम् , ईशावास्यम् इदम् सर्वम् अशी सुंदर सुंदर वचने आहेत पण ती फक्त वादविवादात वापरण्यासाठी .
कोणतीही व्यक्ती ही पूर्ण चांगली किंवा वाईट नसते असे आधुनिक मानसशास्त्र सांगते . ती बदलू शकते असे मानसशास्त्र सांगते .पण त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत .
अंगुलिमाल नावाचा एक खूनी दरोडेखोर होता . माणसाना मारून त्यांचे आंगठे तोडून त्यांची माळ तो गळ्यात घालत असे . तो रहायचा त्या जंगलात जाऊन नि:शस्त्र भगवान बुद्धानी आपल्या निर्भयतेने त्याला स्तिमित केले . त्याने बुद्धांचे शिष्यत्व पत्करले .
एका जंगलात एक अत्यंत विषारी साप रहात होता . तो भगवान महावीराना चावायला येताक्षणीच महावीरानी त्याला ” चंडकौशिक , आता तरी क्रोध सोड , शहाणा हो ” असे म्हटले . तो साप पूर्वजन्मात एक शीघ्रकोपी आचार्य होता आणि शिष्यांचा खूप छळ करी लहानसहान गोष्टींवरून त्याना कडक शिक्षा देई . महावीरांच्या हाकेसरशीच तो शांत झाला आणि त्याने प्राण सोडले .
अशा कथा हिंदू देव- देवतांच्या नाहीत . वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला ही कथा आहे पण ती नारदाच्या नावावर आहे . नारदाला आपण देव तर मानत नाहीच तर कळलाव्या असे म्हणतो . ( नारद हे आद्य कीर्तनकार होते असे म्हणतात आणि अजूनही त्यांच्या नावाने एक रिकामा पाट कीर्तनकार ठेवतात असे मी ऐकले आहे . मी लहानपणी २-३ कीर्तने ऐकली आहेत पण अशा दृष्टीने मी तेव्हा पाहिलेले नाही . )
दादा भगवान हे जन्माने वैष्णव , पण त्यांच्या शिकवणीत जैन धर्मावर जास्त भर आहे . महात्मा गांधी पण जन्माने वैष्णव पण त्यांच्यावरही जैन मताचाच प्रभाव आहे .
श्रीमत् राजचंद्र ( १८६७-१९०१ ) या नावाचे एक थोर ज्ञानी पुरुष गुजरातमध्ये होऊन गेले . फक्त ३४ वर्षांचे आयुष्य लाभूनही यांची योग्यता तीर्थंकरांच्या बरोबरीची मानली जाते . ( जैनात तीर्थंकर फक्त २४ असतात . काही जण राजचंद्र याना २५ वा तीर्थंकर मानतात . ) यानाच कृपाळू देव असेही म्हणतात . ( यांचे मूळ नाव रायचंद असे होते . महात्मा गांधींच्या आत्मचरित्रात त्याच नावाने उल्लेख आहे )
महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून आपण गोपाळ कृष्ण गोखले याना मानतो . पण गांधींच्या आध्यात्मिक विचारांवर श्रीमत् राजचंद्र यांचा खूप प्रभाव आहे . १८९१-१९०१ या काळात त्या दोघांचा नियमित पत्रव्यवहार असे . प्रत्यक्ष सहवास जास्त लाभला नाही कारण गांधींचे जास्त वास्तव्य या काळात भारताबाहेर होते . गांधी जरी गीता सतत जवळ बाळगीत तरी त्यांची अहिंसा आणि अहिंसात्मक सत्याग्रह ही कल्पना जैन प्रभावातून आली असावी . सत्याचा आग्रह जैन धर्माला मान्य नाही आणि अहिंसा हे शस्त्र म्हणूनही जैन धर्माला मान्य नाही .
पण नि:शस्त्र व्यक्तीने अन्यायाचा प्रतिकार कसा करायचा ? म्हणून जैन प्रभावातून दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीना ही कल्पना सुचली असावी . ( रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? , शठम् प्रति शाठ्यम् , जशास तसे ही विचारसरणी लोकाना आकर्षित करते . पण इंग्रजांविरुद्ध हे धोरण योग्य नाही हे महात्मा फुले लहूजी वस्ताद यांना आणि न्यायमूर्ती रानडे हे वासुदेव बळवंत फडके यांना सांगत होते . )


श्याम केळकर


अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ११ ( समारोप )
ज्ञानी लोकांच्या दृष्टिकोनातून हिंसा आणि अहिंसा
ज्ञानी लोकांतील कर्ता भाव लोप पावलेला असतो . त्यामुळे त्यांच्याकडून हिंसा होतच नाही . ते पाप – पुण्य , शुभ – अशुभ , चांगले – वाईट याच्या पलीकडे गेलेले असतात .
या जगात कोणीही मरत नाही आणि कोणीही मारू शकत नाही हे ते जाणून असतात . प्रत्येक जीवाची मरणवेळ येते तेव्हा भाव – हिंसा असलेली माणसे निमित्त होऊन त्याना मारतात . ( म्हणजे त्यांच्या देहाला मारतात . ) कर्ता भावामुळे त्याना पाप लागते . (म्हणून मारण्याचा पण अहंकार नसावा आणि वाचविण्याचा पण अहंकार नसावा .) पण ज्ञानींचे तसे नसते . त्याना कर्ता भाव नसतो . म्हणून ते पाप – पुण्य , शुभ – अशुभ, चांगले – वाईट आणि न्याय – अन्याय याच्या पलीकडे गेलेले असतात . ( दादा भगवान )
( पूर्वी मी लिहिले की मांजरही पाप – पुण्य, शुभ- अशुभ आणि चांगले वाईट असे काही करत नाही . त्याच्यातही कर्ता भाव नसतो . पण ते अज्ञानी आहे .)
येशूंचे एक वचन आहे की जे लहान मुलांसारखे असतील त्याना देवाच्या राज्यात प्रवेश मिळेल . येशूनी काय म्हटले आहे – लहान मुलांसारखे , लहान मुलाना असे नाही म्हटलेले – लहान मुले निष्पाप असतात ( आजकालच्या मुलांबाबत हे वाक्यही धाडसी वाटते .) ती निर्लेप असतात त्याना आपण सांगतो – खोटे बोलू नये . तो विचारतो – खोटे म्हणजे काय ? मग त्याला सांगतात :- जसे असेल तसे सांगावे . त्या मुलाची पंचाईत होते . म्हणजे जसे नसते तसे सांगावयाची पण रीत असते ? चौकोनाला चौकोन म्हण गोल म्हणू नकों . असे खोटे शिक्षण आपण त्याला देतो . ( विनोबा )
विषय विकार म्हणजे काय ते त्याना माहीतच नसते . म्हणजेच ते अज्ञानी असतात . उलट ज्ञानी हे विषय – विकाराना जिंकून पलीकडे गेलेले असतात आणि लहान मुलांसारखे झालेले असतात . ( रजनीश )
अशीच एक कथा आहे .कर्ता केवळ कृष्ण आहे या भावनेने कृष्णार्पण म्हणण्याची पद्धत आहे . एक बाई होती . काहीही केले की ती कृष्णार्पण म्हणायची . उष्ट्याला शेण लावून तो शेणगोळा तिने बाहेर फेकावा आणि लगेच कृष्णार्पण म्हणावे . लगेच तो शेणगोळा तिथून उठे आणि कृष्णाच्या मूर्तीवर जाऊन बसे . पुजारी मूर्ती साफ करून करून दमला . शेवटी कळले की हा सारा त्या बाईचा महिमा आहे . ती जिवंत असेपर्यंत असेच चालणार . ती आजारी पडली . मृत्यूघटिका जवळ आली . तिने मरणही कृष्णार्पण केले . त्याच क्षणी मंदिरातील मूर्तीचे तुकडे होऊन तिचे तुकडे खाली पडले तिला न्यायला विमान आले तेही तिने कृष्णार्पण केले . विमान देवळावर पडले आणि देऊळ कोसळले . (विनोबा – गीतादर्शन – अध्याय ९)


श्याम केळकर


माझ्या प्रतिक्रिया :

१. विठ्ठलासारखे पूर्णपणे निःशस्त्र देव आहेत. दत्तात्रेयाच्या सहा हातांपैकी काही हातांमध्ये शस्त्र दिसत असले तरी त्यांनी कुठल्याही अवतारात कोणा दुष्टाचा वध केल्याची कथा नाही. गीता आणि महाभारतात अनेक ठिकाणी अहिंसेचा पुरस्कार केला आहे. फक्त दुर्गा आणि कालीमातेने वेगळे अवतार घेऊन असुरांचे दमन केल्याच्या कथा आहेत. लक्ष्मी, सरस्वति आणि पार्वती या तीन्ही शांत देवता आहेत.
२. महाराष्ट्रातला वारकरी पंथ शाकाहार पाळतो. तोसुद्धा काही शतकांपासून चालत आला आहे.

३. सर्वसामान्य लोकांना आध्यात्मिक प्रगति वगैरे काही माहीत नसते किंवा त्यात रस नसतो. आपले वाडवडिल जे करत आले आहेत ते लहानपणापासून पहात असतात आणि तसेच करतात. काही विशिष्ट जातींच्या काही पिढ्यांपूर्वीच्या पूर्वजांनी अध्यात्माचा विचार केलाही असेल. काही पिढ्या त्यांचे अनुकरण करतात. त्यानंतरचे लोक स्वतंत्र विचार करून वेगळ्या मार्गाने जातात. तेही अध्यात्माचा विचार करत नाहीत. माझ्या लहानपणी गावातली किंवा ओळखीतली सर्व ब्राह्मण मुले शुद्ध शाकाहारी होती. आजची ब्राह्मण मुले सर्रास अभक्ष्यभक्षण करतात म्हणजे त्यांची आध्यात्मिक अधोगती झाली का? हवापाण्यापासून प्राण्यांच्या शरीराला पोषण मिळू शकत नाही. ते फक्त वनस्पतींनाच शक्य आहे. तसे पहायला गेल्यास वनस्पतीसुद्धा सजीवच असतात, पण त्यांनाही न खाल्ल्यास माणूस जीवंत कसा राहणार? मग एका प्रकारच्या सजीवांना खाणे आध्यात्मिक आणि दुसऱ्या प्रकारच्या सजीवांना खाणे वाईट असे का? व्हेगन लोक दूध किंवा दुग्धजन्य पदार्थसुध्दा खात नाहीत म्हणजे ते अधिक विकसित असतात का? मला वाटते हे वैयक्तिक पातळीवरच घडत किंवा ठरत असते. आजकाल सामाजिक बंधने शिथील झाली असल्यामुळे लोक जास्त मोकळेपणाने वागतात. त्यामुळे शाकाहार मागे पडत चालला आहे.

हिंसा करणे आणि मांसाहार यात थोडा फरक आहे असे मला वाटते. माझ्या ओळखीतल्या अनेक लोकांना मांसाहार वर्ज्य नाही, पण त्यातले कोणीही खाटिक नाहीत. ते स्वतः कुठल्याही पशूची हत्या करत नाहीत. त्यामुळे त्या पशूंना होणाऱ्या वेदना त्यांना दिसत नाहीत. सगळे शुद्ध शाकाहारी लोकही सहृदय असतातच असेही नाही. तेही अनेक जीवांना निरनिराळ्या प्रकारे निष्ठूरपणे पीडा देत असतात. ‘पाप – पुण्य , शुभ – अशुभ, चांगले – वाईट आणि न्याय – अन्याय याच्या पलीकडे गेलेले’ ‘ज्ञानी’ लोक ही एक निव्वळ कल्पना आहे, त्याचप्रमाणे गोष्टीतली ” कृष्णार्पण” म्हणणारी बाई ही भाकडकथा आहे. प्रत्यक्षात असे कोणी असत नाहीत. लहान म्हणजे भाषाही न शिकलेली मुले मनाने निष्पाप असतात कारण त्यावेळी त्यांना स्वार्थ नसतो. पण त्यांना बोलायला यायला लागले की मोठी माणसेच त्यांना खोटी आश्वासने देतात, खोट्या गोष्टी सांगतात ते ऐकून ती मुलेही लहान सहान थापा मारायला शिकतात. ती पूर्णपणे अहिंसक असतीलच असेही सांगता येत नाही. भाव हिंसा ही सुद्धा एक नैसर्गिक प्रवृत्ती (Instinct) आहे आणि ती स्वसंरक्षणासाठी सर्वांना उपजतच मिळालेली असते. सत्व, रज आणि तम हे गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये असतातच, त्यांच्या प्रमाणावर जमेल तेवढे नियंत्रण ठेवण्यामुळेच माणसामाणसात फरक पडतो. सर्वसाधारण माणसे त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या चार लोकांकडे पाहून तसे वागत असतात. धार्मिक वृत्तीचे आणि तत्वचिंतन वगैरे करणारे लोक अधिक सात्विक, अहिंसक वगैरे होण्याचा प्रयत्न करतात. दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना त्यातच मजा वाटत असेल तर ते जास्तच हिंसक होत जातात.


शहाणे मध्यमवर्गीय

हे पान आधी कोकणस्थ, देशस्थ, जोशी वगैरे या नावाने उघडले होते. या सर्वांमध्ये एक समान गोष्ट अशी आहे की ते मध्यमवर्गीय असतात, किंवा असायचे. या मध्यमवर्गीयांच्या शहाणपणावर एक सुंदर लेख वॉट्सॅपवर मिळाला. तो खाली देत आहे. या पानाचे शीर्षकही त्यानुसार बदलले आहे. या विषयावरील मी लिहिलेला लेख या ठिकाणी आहे. https://anandghan.blogspot.com/2022/02/blog-post.html

आजकाल सुशिक्षित लोक जातीपातींना फारसे महत्व देत नाहीत. पोटजातींना तर नाहीच नाही. त्यांच्यात सर्रास विवाहसंबंध होत असल्यामुळे पुढच्या पिढीतल्या मुलांना आपली उपजात कोणती सांगावी हे समजतही नसेल. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांमध्ये अनेक पोटजाती आहेत. शंभर वर्षांपूर्वी त्यातल्या कोकणस्थ आणि देशस्थ या दोन पोटजातींमधील लोकांत खूप वाद होत असत असे सांगतात. मी तरी त्याचा अनुभव कधी घेतलेला नाही. अजूनही एक गंमत म्हणून त्यांचे एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणे चाललेले असते. जोशी हे आडनाव या दोन्ही पोटजातींमध्ये अगदी प्रचुर प्रमाणात आहे, त्याशिवाय भारतातल्या इतर समाजांमध्येसुद्धा आहे. कोकणस्थ, देशस्थ आणि जोशी यांच्या गुणविशेषांवर लिहिलेल्या काही मजेदार कविता मला वॉट्सॅपवर मिळाल्या त्या खाली दिल्या आहेत.

१. शहाण्या माणसांचा क्लास

“अरे, पण गरज काय आहे याची?”
हे वाक्य ज्यांना योग्यवेळी, योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीविषयी आणि योग्य व्यक्तीशी बोलताना वापरता येतं ना, ती माणसं शहाणी असतात. जपून वागतात, जपून जगतात आणि जगताना इतरांनाही जपतात.

ऊठसूठ हाॅटेलात जाऊन खाणार नाहीत, सतत बाहेरून पार्सल मागवणार नाहीत, सारखी खरेदीही करणार नाहीत.
रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्टॅन्डवर पहाटे साडेचार किंवा पाच वाजता एकटे उतरले तर अर्धा तास तिथंच थांबतील.
भल्या पहाटे जाऊन घरच्यांच्या साखरझोपेचा विचका करणार नाहीत आणि दुप्पट-तिप्पट पैसेही खर्च करणार नाहीत.
अर्धा तास थांबतील, बसेस सुरू झाल्या की शांतपणे घरी पोचतील. सकाळचा पहिला चहा घरीच घेतील, सात वाजता आलेला वर्तमानपत्राचा ताजा अंक वाचतील.
अर्धा तास वाचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करून तिप्पट पैसे खर्च करणार नाहीत.
पण कुटुंब असेल, लहान बाळ असेल तर असं वागणार नाहीत. रिक्षा करतील, थोडीफार घासाघीस करतील, आणि घरी जातील.
हे जगण्यातलं व्यावहारिक शहाणपण पिढ्यानपिढ्या रक्तात मुरलेला एक वर्ग आपल्या समाजात आहे.
अनेकजण त्यांना मिडलक्लास म्हणतात, पण माझ्या लेखी ती खरी शहाणी माणसं असतात. त्यांना ‘मजेत जगावं कसं?’ हे समजायला पुस्तक वाचावं लागत नाही, ते मजेतच जगत असतात. किंबहुना, जगण्याचा आस्वाद घेण्याची कला त्यांना जन्मजात अवगत झालेली असते.

आपलं मूल अनवाणी शाळेत जाणार नाही याची काळजी त्यांना असते.
ती काळजी वूडलँड, क्राॅक्स, ली कूपर, बाटा यांनी शांत करण्याचा उद्योग ते करत बसत नाहीत. लखानी किंवा पॅरागाॅन ते आनंदानं निवडतात, आनंदानं वापरतात, गरजा पूर्ण करतात आणि मस्त राहतात.

स्वत:ची वाहनं ते स्वत: धुतात, पुसतात. सायकलला स्वत:च ऑयलिंग करतात. घरातल्या पंपानं सायकलच्या टायरमध्ये हवा भरतात.
सुटी फुलं आणतील, देवाच्या पूजेचे हार स्वत: तयार करतील. बुटांना पाॅलिश स्वत:च करतील. ते रोज जमणार नसेल तर बाहेरून आल्यावर बूट काढले की, मोज्यानंच ते बूट स्वच्छ पुसतील, आत ठेवतील आणि मग मोज्यांचा जोड धुवायला टाकतील.
हे काटकसरीचं जगणं नसतं, हे योग्य जगणं असतं.

ज्या खोलीत कुणी नसेल तिथले लाईट्स आणि पंखे बंद ठेवतात. गरज नसताना घरभर दिवे आणि पंखे विनाकारण चालू ठेवण्याचा शौक त्यांना नसतो.
रात्री खिडक्या उघड्या ठेवून झोपतात, एसीची गरज पडत नाही. गरज नसताना ‘बाय वन गेट वन फ्री’ च्या शंभर जाहिराती पाहिल्या तरीही त्यांना काहीही फरक पडत नाही. पण गरज असेल तेव्हा रेमण्ड, सियाराम, अरविंद मिल्स, विमल असंच कापड घेतील.
रेडिमेड घेण्यापेक्षा शिवून घेतील. मस्तपैकी चार-पाच वर्षं तरी सहज वापरतील.

घरी कुणी आलं की, पोह्याचा चिवडा, भडंग, खोबऱ्याची वडी किंवा शेंगादाण्याचा-रव्याचा-बेसनाचा लाडू मनापासून देतील आणि नंतर आलं घातलेला कपभर चहा.. (हे सगळे पदार्थ घरीच स्वहस्ते केलेले असतात आणि चहापत्ती घाऊक मार्केटमधून आणलेली असली तर आलं, गवतीचहा, चिमूटभर सुंठ घालून तिला फक्कड रंगत कशी आणायची, हे तंत्र बरोब्बर समजलेलं असतं.) आल्यागेल्याचा, पै-पाहुण्यांचा पाहुणचार मस्त करतात, रिटर्न गिफ्ट म्हणून उगाचच महागड्या गोष्टी देऊन इंप्रेशन मारायला जात नाहीत.

सणावाराला घरी गोड पदार्थ तर होणारच. घरच्या तुपातला शिरा, खीर, चक्का आणून घरी केलेलं श्रीखंड (अनेकदा चक्कासुद्धा घरीच करतात) हे पदार्थ पेटंट असतात. अचानकच गोड खाण्याची हुक्की आलीच तर केळ्याचं शिकरण दोन मिनिटांत तयार..!
घरात कुणी नसेल आणि एकटाच मुलगा किंवा पुरूष जरी असेल तरी स्वत:च्या वेळेपुरती मुगाची खिचडी त्याला करून खाता येते. दुपारच्या उरलेल्या पोळ्यांची वरणफळं त्याला बरोबर जमतात. कालचा उरलेला भात फोडणी देऊन सकाळी खाता येतो. किंवा वेळप्रसंगी दहीपोहे करूनही उदरभरणाची सोय करता येते. त्यासाठी हाॅटेलची पायरी चढण्याची गरजच पडत नाही. ह्या जगण्याला लो प्रोफाईल, मिडलक्लास किंवा चिक्कूपणा म्हणणारी माणसं बिनडोक असतात. कारण,
हे परफेक्ट आत्मनिर्भर जगणं आहे.

यांच्या घरातले पुरूष दळणं आणतात, वाणसामान आणतात, भाजी आणतात, इस्त्रीचे कपडे लाॅन्ड्रीत नेऊन देतात आणि घेऊनही येतात. रद्दीवाल्याकडे स्वत:च रद्दी घेऊन जातात. स्वत: पानं घेणं आणि जेवण झाल्यानंतर स्वत:चं ताट स्वत: घासणं, फरशी पुसणं यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. पहिल्या पगारात घेतलेलं घड्याळ ते रिटायर होईपर्यंत छान वापरतात. पाच-सात वर्षं चष्म्याची फ्रेम बदलत्या नंबरनुसार काचा बदलून वापरतात. याच्यात त्यांना कसलाही कमीपणा वाटत नाही.

मुलाचा पहिला वाढदिवस, पाचवा वाढदिवस खाजगी हाॅल किंवा पार्टी हाॅल घेऊन साजरा-बिजरा करत नाहीत. असल्या कृत्रिम आनंदाची त्यांना गरज नसते. पण मुलांच्या शिक्षणाविषयी मात्र अजिबात तडजोड नसते. अगदी निगुतीनं मुलांना शिकवतात. महागड्या ब्रॅन्डेड गोष्टी चांगल्या असतातच असं नाही, यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. त्यामुळं, चांगली शाळा ते बरोबर निवडतात आणि मुलांना शिक्षण देतात. मुलांना खाऊनही माजू देत नाहीत आणि टाकूनही माजू देत नाहीत. सापशिडीतल्या ९८ आकड्यावरच्या सापाला घाबरायचं नाही, हे आपल्या मुलांना शिकवायला त्यांना कुठल्याही मोटिव्हेशनल ट्रेनरची गरज भासत नाही, ते स्वत:च खंबीर असतात. आवश्यक तेवढी यथाशक्ती बचत करून, साधी सरळ भरवशाची गुंतवणूक आणि साधा जीवनविमा एवढ्यावर त्यांना सुरक्षित वाटतं. गडगंज श्रीमंत होण्याचा हव्यास ते धरत नाहीत. अनैतिक मार्गानं काहीही कमावण्याचा विचारही करत नाहीत. “जोडोनियां धन उत्तम व्यवहारें, उदास विचारें वेच करीं”
या तुकोबारायांनी सांगितलेल्या पक्क्या धारणेनं जगतात. म्हणून त्यांची वखवख होत नाही, त्यांना भस्म्या होत नाही. षड्रिपूंचा त्रास तर अजिबात नाही..
हेच तर खऱ्या अर्थानं निरामय आयुष्य आहे ना..!

घरात महागडं इंटिरिअर नसलं तरी, घरी कामाला येणाऱ्या बाईंच्या मुलांच्या वह्यापुस्तकांसाठी मात्र बरोबर पैसे दिले जातात, अगदी न चुकता. सकाळी दारी आलेल्या वासुदेवाला किंवा समर्थ संप्रदायातल्या माधुकरी मागणाऱ्यांना तांदळाचं माप मिळतंच. दरवर्षी दिवाळीला पोस्टमनला शंभराची नोट मिळते. सगळ्या रेषा कशा अगदी समांतर..
कशाचंही तंगडं कशातही अडकत नाही, कसला गुंता नाही, वैचारिक गोंधळ नाही. बेष्ट आयुष्य..!
समंजस आयुष्य..!
विनाशर्त विनातक्रार संपूर्ण स्वीकारलेलं आयुष्य..!

‘क्रेझ’ या गोष्टीशी यांचा लांबून-लांबून संबंध नसतो. म्हणून यांचे व्याप मर्यादित असतात. आयुष्याकडून फार अपेक्षा नसतात, हट्ट-दुराग्रह तर अजिबातच नाहीत. वर्षाकाठी दिवाळीसारख्या एखाद्-दुसऱ्या प्रसंगी कापड खरेदी वगैरे होते, जमल्यास गुरूपुष्यामृताच्या दिवशी एक ग्रॅम सोनं घरी येतं आणि देवघरात देवासमोर ठेवलं जातं. अट्टाहास कुठलाच नाही. ह्या जगण्याला ते
‘हा माझा मार्ग एकला’
असं म्हणू शकतात, पण
‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया’
हे म्हणणं त्यांना साधलेलं असतं. ह्या जगण्याला काय म्हणाल? मिडलक्लास?
नाही. हा तर खरा वरचा क्लास.. विषमभुज त्रिकोणाला सुद्धा समभुज करण्याची अफाट विलक्षण शक्ती ज्यांच्या दृष्टीकोनात ठासून भरली आहे असा क्लास…!

कुणी त्याला मिडलक्लास म्हणो किंवा मध्यमवर्गीय..
पण हा आहे खऱ्या शहाण्या माणसांचा क्लास…!

🙏🌹🙏 वॉट्सॅपवरून साभार दि. १३-०३-२०२२

२. कोकणस्थांची कविता… तिला देशस्थांचे उत्तर

*कोकणस्थांची कविता 😗

मी आहे ब्राह्मण कोकणस्थ
आम्ही कधीच बसत नाही स्वस्थ

रीतीरीवाजांमध्ये आमचा अव्वल नंबर आहे
आमचीच पालखी प्रत्येक जण वाहे
बचतीचा मार्गच आमचा धर्म आहे.
आम्ही कधीच नसतो अस्ताव्यस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!१!!

वंशपरंपरा आम्ही दांडीवर कपडे टाकतो
पण त्याचा क्रम कधीच बदलत नसतो
बदलला तर आम्ही लगेच पिसाळतो
दुसऱ्या जातीची सून आली तर होतो आम्ही त्रस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!2!!

एका काडीनेच गॅस पेटवितो
लगेच दुसऱ्या गॅससाठी ती विझवून ठेवितो
वरण-भाताशिवाय आम्ही जेवत नसतो
त्यानेच जेवण होते आमचे मस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!3!!

लोकमान्य आमच्यातच जन्माला आले
सर्व क्रांतिकारक आम्हीच देशा दिले
स्त्रियांना अण्णासाहेबांनीच उद्धरले
साधू न होता राहतो नेहमी व्यस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!4!!

दादा फाळक्यांनी चित्रपटसृष्टीचा पाया घातला
राजा परांजपे यांनी देशभर पसरविला
माधुरीने त्यावर कळस चढविला
असे क्षेत्र नाही जेथे नाही आमचा हस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!5!!

भांडणातसुद्धा आम्ही कमी नाही
तत्वांसाठी आमचे आयुष्य जाई
वाटण्यांमध्ये झाडूची सुद्धा विभागणी होई
त्यासाठी आम्ही होत नाही त्रस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!६!!

लाचारी करून मागत नाही दान
व्यवहार करतानाही राखतो अभिमान
नेहमी असते आमची ताठ मान
खर्चाला असते आमची कडक शिस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!७!!

गॅस सिलेंडर वर तारीख लिहितो
वेळेआधी संपला तर उपासच घडतो
तोच मग आमचा एकादशीचा दिवस होतो
उपासाला कधीच आम्ही खात नाही जास्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!८!!

महिन्याची पेपर रद्दी मोजून लावलेली असते
वाण्याला तागडीची गरजच नसते
त्याच पैशातून आमची भिशी चालत असते
पै पैसा करून आम्ही घेतो खस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!९!!

चोवीस कॅरेट शिवाय सोने घेत नाही
पेठे-गाडगीळांशिवाय दुसरे दुकान पाहत नाही
दागिन्यांत आमची असते सर्वांवर मात
नाही वापरत आम्ही तांबे-पितळ-जस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!१०!

काय बरोबर ना ?

*देशस्थांचे उत्तर 😗

आम्ही देशस्थ💐😀

जग जरी म्हणत असले कितीही बेशिस्त
तरी देखील अभिमानी ..आम्ही देशस्थ

नसतो जेवणाला आमच्या वेळ अथवा नियम
अतिथीच्या तृप्तीसाठी राखुन असतो संयम
व्यवहारापेक्षा माणुसकीला असतो व्रतस्थ
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

असतील कपडे जरी घरात कुठेही पडलेले
कपड्यांपेक्षा नातेसंबंधच अधिक सांभाळलेले
गदारोळात नात्यांच्या जरी होतो आम्ही त्रस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

चहा झाला असेल ना? असे विचारत नाही
चहासाठी आलेला जेवण करूनच जाई
अघळ पघळ गप्पांमधे नेहमी आम्ही व्यस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

ज्वारी झाली महाग तरी भाकरी चुकत नाही
वरणभातावर भागवण्याची आमची परंपरा नाही
चटण्या भाज्या असल्यावरच जेवण लागते मस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

लग्न कार्य असतो आमचा महिनाभरचा खेळ
नसते कुठले बजेट ,ना हिशोब ना ताळमेळ
उसने देता घेता नसते काळजी किंवा खंत
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

गॅस जरी संपला तरी उपाशी रहात नाही
अडचणीला देशस्थाचाच शेजार धावून येई
वसुधैव कुटुंबावर असते नेहमीच भिस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

“आला सण की घाल पुरण” अशी आमची रीत
पोळीवरती डावभर तूप .. आम्ही नाही भीत!
हौसे पुढे कुठे असते महाग आणि स्वस्त?
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

सोने कसले घेता? जपतो सोन्यासारखे क्षण
पैसा प्रतिष्ठेहून मोलाचे समोरच्याचे मन
अंत्ययात्रेची गर्दी सांगे..आम्ही किती श्रीमंत!
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

गदिमांच्या शब्दांसाठी फडक्यांच्या चाली
चितळ्यांना मोठं करते देशस्थाचीच थाळी
आमची इन्फोसीस सांभाळते किती कोकणस्थ!
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

ऋषी मुनींची परंपरा रक्तामधे खेळते
आर्यधर्माचे बाळकडू गर्भामधेच मिळते
देशस्थातच जन्मा येती किती संतमहंत!
मी आहे ब्राह्मण देशस्थ

भाषा आमची माउलींची जणू इंद्रायणी
भक्ती प्याली नाथाघरच्या हौदामधले पाणी
ठामपणा शिकवत राही ..रामदासांचे ग्रंथ
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

क्रांतीकारक काय फक्त कोकणात जन्मा येतात?
फासावरले राजगुरू काय तुमचे काका लागतात?
नथुरामाचे रामायण …काय सांगू जास्त?
मी आहे ब्राह्मण देशस्थ

कर्वे असतील मोठे, पण आमचे आमटेही महान!
माधुरीला झाकोळेल.. गंधर्वांची शान!
तरी देखील माजवत नाही कुठले आम्ही प्रस्थ
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

वसिष्ठांच्या छाटीला तर सूर्याइतकी दीप्ती
कमंडलूत समुद्र त्यांच्या , धरणी कुबडीवरती
सागराचे प्राशन करी आमच्यातला अगस्त्य
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

आमच्या देशस्थीची आगळीच आहे शान
कुठेही जा, देशस्थांनाच मिळतो अधिक मान
“आमचे वागणे देशस्थीच” असे सांगतात कोकणस्थ
मी आहे ब्राह्मण देशस्थ !! मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

👆🏻👆🏻👆🏻
ह्याला माझ्या शाळेतील कऱ्हाडे मित्राच – अनिल खांडेकर – स्वरचित उत्तर 😀😀👇🏻👇🏻👇🏻

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे
कोकणात, देशावर, सर्वदूर आमची बिऱ्हाडे
अतिथी देवो भव: असा आमचा शिरस्ता
पोटातून हृदयाकडे जातो म्हणे प्रेमाचा रस्ता
ओळखी इकडे तिकडे चोहीकडे
मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

भेटीगाठी ठरल्या की आधी भोजनाची चर्चा
खमंग स्वादिष्ट जेवणात आमचा नंबर वरचा!
आमच्यात पुरुषही झकास रांधे-वाढे,
मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

साधेपणा आणि नीटनेटकेपणा आमच्या अंगी
उधळपट्टी कमी, तरी बेत सारे जंगी
कलागुणांची आवड आमच्याकडे
मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

फार ढिसाळ कारभार नाही, ना कडक शिस्त
तरी चोख काम करण्यावार आमची भिस्त
ना अतिरेक काटकसरीचा, ना खर्चाचे राडे
मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

पक्वान्न नसली तरी चालतील, आमटी आमची जीव कि प्राण
शेजाऱ्यांशी चालू असते पदार्थांची देवाण घेवाण
सगळं असलं तरी काहीतरी हवं डावीकडे,
मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

आलं गेलं सतत हवं तरच ते घर, असा आमचा नियम
आज हे येणारेत उद्या त्यांच्याकडे जायचंय चालू असतं कायम
कुणाकडे गेल्यावर मदतीला सरसावतो पुढे
मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

मावस बहिणीचा मामेदीर तो चुलत भावाचा मावसभाऊ
नात्यांची कोडी घालत, सोडवत एकमेकांना धरून राहू
अर्धा वेळ गप्पा ह्याच, कधी गेलो कुणाकडे..
मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

खांडेकर, किर्लोस्कर, पराडकर, आणि सप्रे
महान व्यक्तींची यादी संपतच नाही बापरे!
पाध्ये, पंत, ठाकूरदेसाई आणि श्रीखंडे
मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

 • अनिल खांडेकर विलेपार्ले,
 • Santosh Kulkarni: म्हणूनच म्हणतोय संगम होऊ देत तिघांचा
  आपण सुखी समाज सुखी आणि देश सुखी, एक परिपूर्ण प्रेमाचा गोड संगम

अरे वेड्यानो. नका भांडु नका करु त्रागा,
मी आहे, हिंदू हे गर्वाने सांगा
🌹वर्षा 🌹

३. कोकणस्थांवर छान कविता

घारे गोमटे अन लख्ख गोरे
सावळे आणि वागण्यात न्यारे
खरे गोखले दामले परचुरे
जाणावी कोकणस्थ ज्ञाती

सानुनासिक बोलती शब्द
ठेविती परशुरामीय अब्द
पराक्रमे करिती देश स्तब्ध
अशी चित्पावन ज्ञाती

दिसती आम्ब्यासारीखे सुरेख
वागती फणसासारिखे कंटक
डोकाविता यांच्या हृदयात
रसाळ गरे मिळती

बोलणे यांचे अतिस्पष्ट
फार लवकरी होती रुष्ट
जगण्या घेती अपार कष्ट
मार्गे सरळ असती

पै पै गाठी साठविती
पर्शुरामासी आठविती
समोर समोर हिशोब राखिती
कर्ज न ठेविती दुसर्यांचे

अटकेपार झेंडे रोविले
मराठ्यांचे सामर्थ्य वाढविले
पेशवेपद भूषविले
ब्राह्मणांची मान उन्चाविती

प्रसविले केसरी टिळक
आगरकर ते सुधारक
शास्त्री चिपळूणकर प्रेरक
करती

कान्हेरे, फडके, चाफेकर
गोगटे आणि सावरकर
क्रांतीकारकांची तळपे धार
या महाराष्ट्र देशी

गोखले, कर्वे , साने गुरुजी
सुधारक समुद्र देती भरती
सहकाराचा पाया रचिती
गाडगीळ प्रभृती

रामायण गाई सुधीर
मालती उडवी बहार
फाळके परांजपे दामले नेने
गुंफिती चलचित्रांचा हार

देसाई पेठे दांडेकर गाडगीळ
चितळे घैसास आणि सकळ
केळकर भट लाविती मूळ
उद्योग धर्माचे

केशवसुत टिळक केतकर
कवितेतुनी देती शब्द सार
जे करी आम्हा हुशार
दुध ते वाघिणीचे

फडके गाडगीळ आणि काळे
देती कथेस रूप आगळे
मराठीस देई वळण वेगळे
साहित्यसेवा कोब्रांची

ऐसी हि नर रत्नांची खाण
कौतुके थकले शब्दांचे वाण
कयांचे गुणगान
यथा बुद्धी

असेच व्हा कीर्तिवंत
म्हणावा जयजयवंत
गणेशा चरणी मागतो साद्यंत
मागणे प्रेमाचे

ऐसे कवतुक केले
जैसे शब्द सुचिले
असेल काही चुकले
दुर्लक्षावे म्हणे वेदांत

🙏🙏🙏🙏🙏🙏

४.जोशी

जोशी नुसतं आडनाव नाही,
जोशी एक…..”दर्जा” आहे!
प्रांत असेल कुठलाही पण,
जोशी त्यातली उर्जा आहे!

जोशी उगाच चमकत नाहीत,
जोशी म्हणजे केवळ संयम!
नुसते कायदे करत नाहीत,
आयुष्यभर पाळतात नियम!

सर्वसमावेशक आडनाव,
तरीही उगाच लाटा नाहीत!
जोशी चाललेच नाही कधी,
अशा जगात वाटा नाहीत!

गातात तेव्हा भिमसेन जोशी,
बोलतात तेव्हा विघ्नेश जोशी!
अशोक सराफ खिशात टाकते,
तीही निवेदिता जोशी!

जन्मजातच विनय रक्तात,
उतत नाहीत,मातत नाहीत!
झोपून नसतात उषःकाली,
विनाकारण जागत नाहीत!

नाकासमोर चालणं माहीत,
तरी वळण येताच वळतात!
घडण्याआधी बऱ्याच गोष्टी,
केवळ प्रतिभेनेच कळतात!

जोशी आणि प्रतिभेचं,
युगान् युगं सख्ख नातं!
स्वतः गिळत नाही तरी,
दुसऱ्यांसाठीच दळतं जातं!

जोशी तसे “हवा”च असतात,
जाणवतात पण दिसत नाहीत!
खुर्ची रिती दिसली तरी,
उगाच धावून बसत नाही!

जागतिक जोशी दिन बिन,
जोशी फारसा मानत नाही!
खिसा असो,खिसा नको,
जोशांसारखी दानत नाही!

प्रमोद जोशी.देवगड.9423513604

५. चित्पावनी भोजन

ठेवा सुंदर पात्र शुद्ध करुनी चौरंगी त्या चंदनी
रांगोळी भवती सुरेख बरवी काढा तयालागुनी
चौरंगावरती चहुदिशि पहा ठेवा सुगंधी फुले
डाव्या बाजुस नेहमी भरुनिया तांब्या असावा जले

पात्री सव्यकरी चविष्ट चटणी वाटूनि पाट्यावरी
मिरची नारळ लिंबु मीठ मिसळा निवडून कोथिंबीरी
आणी लोणचि कैरी लिंबु आवळा त्याखालि कोशिंबीरी
केळी गाजर काकडी कितितरी करतात नानापरी

चटणीच्यावरि पात्रशीर्षि इवले वाढा लवण मागुती
लिंबाला मग अष्टमांश चिरुनी वाढा तिथे फोड ती
चटणी लोणची मीठ घेउनि सवे कोशिंबिरीची नदी
पात्री वाहु नये म्हणून तिजला निथळून घ्यावे आधि

उजव्या बाजुस वाढती रुचिकर भाजी कढी आमटी
डाळिंब्या उसळी, अळु फदफदी, सारे पहा गोमटी
सारे जिन्नस वाहती म्हणुनिया द्रोणांतरी वाढणे
वाढा शांतपणे नको गडबडी थेंबास ना सांडणे

भाजी कोरडि त्यासवे कवण हो पात्रांतरी ती बरे
केळी केळफुले अपक्व फणसा फोडून त्याचे गरे
आठळ्या उकडुनि फोडणी करुनिया किंवा बटाटे जरी
घाला तो कढिलिंब लाल मिरच्या आणी जिरे मोहरी

वाढा ओदन शुभ्रसा वरण ते लिंबू लवण त्यावरी
साजूक तूप तयावरी धरुनिया ती धार हो साजिरी
हा झाला पहिला असाच दुसरा वाढा मसाले आता
दध्योदन आणि शेवटास करुनि होण्या मनी शांतता

भातासोबत वाढणे आणुनिया पोळी पुरी भाकरी
असता तांदुळ भाकरी मऊ जरी नवनीत घाला वरी
पोळ्याही घडिच्या करा फुगवुनि अर्धी न वाढा कधि
काढा ताजि पुरी झणी तळुनिया तळुनी न ठेवा आधि

पापड नाचणी कुर्डई तळुनिया मिरगुंड किंवा जरी
वाढावी नच ‘घेइ घेइ’ करुनी आग्रह नको यापरी
गोडाची मग जिन्नसे करुनिया वाढा जरा आग्रहे
तो ही माणूस पाहुनि,न इतरा जाणा परब्रह्म हे

मोदक सुंदर शुभ्र ते करुनिया त्याच्या कळ्या काढूनि
आती सारण चांगले भरुनिया नाके जरा दाबुनि
आता त्या उकडा, हळूच धरुनि पात्रांतरी वाढूनि
नाके फोडुनि त्यामधे घृत अहा साजूक द्या ओतुनि

आता ते सुरु भोजनास करणे “वदनी कवळ” गाउनि
हरहर पार्वती शंकरा स्मरुनिया सीतापती वंदुनी
आणी शेवटी भोजनान्त समयी तक्रा आणा मागुनी
ऐसे हे सगळे व्यवस्थित करा ही रीत चित्पावनी
💐🌹🇮🇳🙏🙏🙏🇮🇳🌹💐

. . . . . वॉट्सॅपवरून साभार दि.०१-०२-२०२२

६. चित्पावन ब्राह्मणांची ……” संस्कृती “

या लेखातील चित्पावनांचा पोशाख आणि भाषा या मुद्द्यंशी मी सहमत नाही. टिळक, केळकर, चिपळूणकर वगैरे सर्वांच्या फोटोत त्यांनी अंगरखा घातलेला दिसतो आणि चित्पावनी भाषा फक्त कर्नाटकातल्या दक्षिण कन्नड भागात बोलली जाते. पण इतर अनेक बाबतीत माहितीपूर्ण असा हा लेख आहे. .. आनंद घारे

चित्पावन ब्राह्मणांची ……” संस्कृती “

सन १९५० च्या पूर्वी असलेल्या पिढ्यांत पुरुषांचा पोषाख मुख्यत्वे उपरणे व धोतर आणि स्त्रियांचा नऊवारी लुगडे असा असे. १९७० नंतरच्या दशकांत त्यांची जागा पुरुषांचा पायजमा किंवा पॅन्ट आणि स्त्रियांची सहावारी साडी यांनी घेतली. चित्पावन समाज महाराष्ट्रातील सामाजिक पुनरुत्थानाच्या विविध चळवळीचे लक्ष्य ठरत आला. सुरुवातीस सौम्य विरोध झाला तरी हा समाज नव्या आधुनिक विचारसरणीला धरून सामाजिक सुधारणा सकारात्मकतेने अमलात आणत गेला. याचा मुख्य परिणाम असा झाला की आज कोकणस्थ स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने जीवनातील सर्व क्षेत्रांत कार्यरत दिसतात. कुलाबा गॅझेटियरनुसार पेशव्यांच्या काळात अनेक कोकणस्थ कुलाबा जिल्ह्यात स्थायिक झाले. यांच्या स्त्रिया या दिसायला सुंदर असल्याचे जाणवते. हे मध्यम बांध्याचे असतात. हया व्यक्ती मराठी भाषिक आहेत. यांपैकी काही व्यापारी आहेत तर काही सरकारी कर्मचारी, भिक्षुकी करणारे, तर काही धनिक आहेत. यांची घरे माती आणि दगडाची असून घराभोवती बाग दिसते. त्यांचे दैनंदिन अन्न भात, पोळी, भाजी, लोणी, कडधान्ये, दही असे प्रामुख्याने आहे. ते दिवसातून दोनदा भोजन करतात.

कुलदेवता…..!!
गुहागर येथील श्री व्याडेश्वर हा कुुलस्वामी तर अंबेजोगाई येथील योगेश्वरी भवानी, महालक्ष्मी, वज्राई या कोकणस्थांच्या कुलदेवता आहेत. काळभैरव, हरिहरेश्वर, व्याघ्रेश्वर, वेळणेश्वर, लक्ष्मीनृृसिंंह, केशवराज, परशुराम इ. देवताही चित्पावनांंच्या कुलदेव व कुलदेवता आहेत.

सण…..!!
चैत्र पाडवा,नागपंचमी ,नारळी पौर्णिमा,दसरा,दिवाळी,आषाढी कार्तिकी एकादशी ,मकरसंक्रांत,होळी, रंगपंचमी हे कोकणस्थांचे सर्वसामान्य सण होत.रंगपंचमीचे महत्व पेशवाईपासून वाढले आहे,होळीचा सन केवळ एक धार्मिक कार्यक्रम म्हणून केला जाई.

महालक्ष्मी अष्टमी पूजन (नवरात्र)…..!!
आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रातील अष्टमीला कोकणस्थ ब्राह्मणांत घागरी फुंकल्या जातात. सकाळी सोवळ्यात सुवासिनी महालक्ष्मीची पूजा करतात. नवविवाहित स्रिया पाच वर्षपर्यंत खडे आणि दोरक यांची पूजा करतात. तो दोरक नंंतर मनगटाला बांधतात. तिन्हीसांजेला महालक्ष्मीचा तांदळाच्या उकडीचा मुखवटा तयार करून देवी उभी करतात. नंंतर तिची पूजा करण्यात येते. त्यावेळी देवीची ओटी भरून हा दोरक देवीला अर्पण करतात. धूपाच्या धुराने भरलेल्या घागरी फुंकण्याला संंध्याकाळी सुरुवात होते. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा अष्टमीचा खेळ चालतो.

संक्रांत……!!
संक्रांतीचे वाण पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात. त्याला सुगडे असेही म्हणतात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात. ही वाणे सवाष्णीला दिली जातात. एक देवाजवळ व एक तुळशीजवळ ठेवले जाते. व मग तीन सवाष्णींना आपल्या घरी बोलावून वाण दिले जाते. काही बायका छोटी बोळकी देतात. काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात. त्याला ‘सुगडे’ म्हणतात. बहुतेक कोकणस्थ ब्राह्मणांकडे सुगडे देण्याची प्रथा आहे लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महिला ‘पाटावरची वाणे’ देतात. म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सुगडी, तिळगूळ व हळदकुंकू घेतात आणि तीन किंंवा पाच सवाष्णींच्या घरी जाऊन त्यांच्या घरांतील देवासमोर पाट मांडून त्यावर या वस्तु ठेवतात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बायका आपापल्या घरी हळदीकुंकवाचे कार्यक्रम करतात. त्यावेळी आलेल्या स्त्रियांना वस्तु दिल्या जातात. या वस्तु ‘लुटल्या’ गेल्या असे म्हणायची पद्धत आहे.. पूर्वी काही ठिकाणी ‘सोरट’ करत असत. ‘सोरट’मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तु मांडून ठेवतात व समोरच्या वाडग्यातील चिठ्ठयांमधून एक चिठ्ठी निवडून त्यात असलेली वस्तु त्या सवाष्णीला कुंकू लावून देतात.

गौरी-गणपती……!!
गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी हात असलेल्या तर काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.

कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी अथवा विहिरीपाशी जाते. पाच किंंवा सात खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने किंंवा कुमारिकेने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने (न बोलता) चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी, ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर कोमट पाणी घालून, हळदकुंकू लावून, मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदुळ पसरून खडे ठेवतात. उभ्या गौरींसाठी खास पातळे व दागिने असतात. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवाष्णी गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील व मागील दारांपासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी ‘गौरी कशाच्या पाऊली आली ग सोन्यामोत्याच्या पाऊली आली’ असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पद्धत आहे. उंबरठ्यावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठ्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.
गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात. खोबर्‍याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात. काही बायका गौरींपुढे लाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळदकुंकू, गंध, फूल, अक्षता, दूर्वा, आघाडा, गेजवस्त्र यांनी गौरींची पूजा करतात. त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळदकुंकू, साखर देतात. दुसर्‍या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुसर्‍या दिवशी मुख्यतः घावन-घाटले किंवा पुरणपोळी करतात. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात. तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी ‘उतरवतात’ म्हणजे त्यांचे विसर्जन करतात.

अनंत चतुर्दशी (भाद्रपद शुद्ध चतुर्दशी)
अनंत चतुर्दशी हे व्रत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच, मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे. सर्व व्रतांमध्ये अनंताचे व्रत कडक आहे. या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने ताम्रकलश चौरंगावर मांडून त्यास दोन छोटे रूमाल गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेज तयार करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. समंत्रक चौदा गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याचीपण पूजा करतात. पूजा झाल्यावर तो दोरा उजव्या हातात बांधतात. त्यानंतर अनंताची कथा भक्तिभावाने ऐकतात. रात्री मंत्रजागर, गाणी इ. कार्यक्रम करतात. अशा प्रकारे चौदा वर्षे अनंताचे व्रत करतात. त्याने फल प्राप्त होते असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.

बोडण…..!!
बोडण हे धार्मिक कार्य चित्पावन समाजात केले जाते. लग्न, मुंज यांसारखे मंगलकार्य पूर्ण झाल्यानंतर हे व्रत केले जाते. बोडण हा एक हिंदू चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणातील कुलधर्म, कुलाचार आहे. आपल्या कुळातील चालीप्रमाणे म्हणजेच परंपरेप्रमाणे वार्षिक, त्रैवार्षिक अगर शुभकार्य झाल्यावर बोडण भरतात. बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात. चातुर्मास, पौष किंवा चैत्र महिना सोडून हा देवीचा धार्मिक कार्यक्रम एरवी कधीही करता येतो.तीन किंवा पाच सुवासिनी व एक कुमारिका यांना तेल शिकेकाई देऊन, सुस्नान होऊन सोवळ्याने म्हणजेच रेशमी वस्त्र नेसून सर्व सौभाग्य अलंकार लेऊन येण्यास सांगितले जाते. सर्वांचे पाट गोलाकार मांडून मधोमध एक पाट अगर चौरंग ठेवून ठरावीक पद्धतीचीच रांगोळी काढायची असते. बोडण भरण्यास पितळी परातच लागते. ती चौरंगावर ठेवतात. आल्याबरोबर सुवासिनींची व कुमारिकेची तुळशीपुढे पूजा होते. प्रथम तुळशीची पूजा व नंतर आलेल्या महिलांची व कुमारिकेची गरम पाणी व दूध पायावर घालून ओटी भरतात. त्यानंतर लगेच त्या बोडण भरण्यास बसतात. आपल्या देवघरातील अन्नपूर्णा काढून ती बोडणाच्या परातीत ठेवतात तिची पूजा करण्याआधी, प्रथम सुपारीचा गणपती करून त्याची पंचामृताने पूजा करतात. कणीक साखर घातलेल्या दुधात भिजवून तिचे देवीकरिता छोटे छोटे दागिने करतात. त्या कणकेचेच सिंहासन व दुधासाठी हराडेरा करतात. आरतीसाठी कणकेचे पाच छोटे छोटे दिवेही करतात. देवीची पूजा घरच्या मुख्य स्रीने पंचामृत वापरून करायची असते. देवीभोवती पुरणपोळीवर सर्व पदार्थ वाढून पाच नैवेद्य मांडले जातात. यावेळी नैवेद्यासाठी पुरण घातलेच पाहिजे असा संंकेत आहे. नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी दुर्गादेवीची आरती म्हणतात. नंतर ते पाच दिवे परातीत प्रत्येक नैवेद्याजवळ ठेवतात. घरातील दुसरी बाई चांदीच्या संध्येच्या पळीस साखळी गुंडाळून त्याने दुधाची धार सोडून ते दिवे शांत करते. या पूजेसाठी जसे पुरण हवे तसे एक ते दोन भांडी पंचामृतही (दूध, दही, तूप, मध, साखर)आवश्यक मानले जाते. दिवे शांत झाल्यावर देवीवर प्रत्येकी पाच पळ्या दूध व दही घालतात. नंतर घरातील मुख्य स्री सर्वांना बोडणाच्या परातीला हात लावण्यास सांगते. याला बोडण कळवणे म्हणतात. नंतर इतर लोक बोडण कळवण्यास सुरुवात करतात. आधी कुमारिका देवी, पैसा व सुपारी त्या बोडणातून काढते, व नंतर देवीच्या तोंडास पुरण किंवा साखर लावून देवी देवघरात ठेवते. बोडणातले पुरण सवाष्णीच्या हातास लावून त्यांचे हात ’थांबवते’. परातीतील बोडण चमचाभर काढून घेऊन सर्व माणसांना अंगारा म्हणून लावतात. ते बोडण नंतर डब्यात, पातेल्यात घालून गाईस खायला घालतात. ते इतर कोणत्याही जनावरास घालायचे नसते, तसेच टाकून द्यायचे नसते.[ संदर्भ हवा ]

खानपान…..!!

कोकणातील रहिवासी असल्याने यांचे मुख्य अन्न तांदूळ, कुळीथ, नाचणी हे आहे. यापासून तयार केलेले अन्नपदार्थ आणि त्यामधे नारळाचा मुबलक वापर हे प्रांतीय उपलब्धतेचे द्योतक आहेत.

भाषा…..!!
चित्पावनांची स्वतःची चित्पावनी बोलीभाषा ही कोकणी भाषेची उपबोली होती.[११]. १९५०च्या दशकानंतर ह्या भाषेत बोलणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली असली तरी, आजही गोवा आणि कर्नाटकाच्या दक्षिण कानडा जिल्ह्यातील चित्पावन आपल्या कुटुंबांमध्ये ही बोली टिकवून आहेत. देशावरील बहुतेक चित्पावन ब्राह्मणांनी चित्पावनी आणि कोकणीचा उपयोग सोडून मराठी भाषेचा अवलंब सुरू केला. एके काळी चित्पावन ब्राह्मणांचे संस्कृत भाषेवरसुद्धा प्रभुत्व असे. चित्पावनी भाषेतील मूळ सानुनासिक उच्चारांचा प्रभाव चित्पावनांच्या मराठी बोलण्यावर आढळतो. अर्थात हा मुद्दा वगळल्यास चित्पावन बोलत असलेली मराठी ही जवळपास प्रमाण मराठी भाषेसारखीच असते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र चित्पावनांनी स्वतःच्या शालेय शिक्षणाकरिता प्राथमिक स्तरापासूनच्या इंग्रजी शिक्षणाचा वापर प्रामुख्याने चालू केला.

व्यवसाय आणि अर्थकारण…..!!

पेशवाईपूर्व काळात कोकण विभागात चित्पावन समाज हा मुख्यत्वे स्थानिक समुदाय शेती व भिक्षुकीवर अवलंबून होता. त्यांत अगदी तुरळक प्रमाणात प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा समावेश असे. पेशवाईcच्या काळात थोडा बदल होऊन सरदारकी तसेच सैन्यातील कामे वाढली, प्रशासनातील कारकुनी कामातही वाढ झाली व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भिक्षुकांची स्थिती सुधारली. असे असले तरी, सुधारलेल्या स्थितीचा उपयोग करून अपवादात्मक उद्योग व्यवसाय करण्याचे जे प्रयत्‍न झाले ते तात्कालिक स्वरूपाचे ठरले. आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेला हा चित्पावन समाज पेशवाईनंतर आलेल्या इंग्रजी प्रशासनात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून शासकीय क्षेत्रात रमला. इंग्रजांनीसुद्धा सुरुवातीला थोडा संशय बाळगला तरी लौकरच त्यांना प्रशासनात सामील करून घेतले. चित्पावन समुदायाचे बरेच लोक अर्थक्षेत्रे, विपणन, शिक्षण, स्वयंंउद्योग, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय तसेच मनोरंंजनाच्या क्षेत्रांत आढळतात.

 • CP . . . . वॉट्सॅपवरून साभार .. दि.१६-०६-२०२२

आदि शंकराचार्य आणि अद्वैत – द्वैत वगैरे

१.आदि शंकराचार्य

आदि शंकराचार्यजयंती – केरळ च्या कालडी गावातून सात वर्षाचा एक तेजस्वी बालक संन्यास घेवून निघाला…. जन्मजात दैवीगुणांमुळे सहाव्या वर्षीच त्याला चारही वेदांचे ज्ञान झालेले होते.
निघतांना विधवा आईला आश्वासन दिले होते की तिच्या निर्वाणाच्या वेळी नक्की हजर राहिल व अंत्येष्टि ही मीच करील. तरीही आईने एकवेळ पुनर्विचार करायला लावला तर म्हणाला की त्याने आत्मोद्धारासाठी नव्हे तर जगदोद्धारासाठी संन्यास घेतला आहे!

त्याकाळी भारतातील समाज जीवनात आत्मग्लानीने पाखंडमत वृद्धींगत होत वेदांचे महत्त्व कमी होत असतांना वर्णाश्रम संस्कृतीचे पुनरुत्थान करून समाजाला व पर्यायाने राष्ट्राला एकसुत्रात त्याला गुंफायचे होते…. माणसाचा जीवनविकास जीव ते ब्रह्म असा आहे हा अद्वैत सिद्धांत मांडायला त्याचा जन्म झालेला होता.

भारताच्या दक्षिणेकडून त्याची उत्तरेकडे यात्रा सुरू झाली. गावा गावांमध्ये आपले अद्वैत तत्त्वज्ञान जागवत गंगाकिनारी तपःश्चर्येला तो निघाला. या प्रवासात हाती दंड, कमंडलू व काखेला झोळी येवढेच सोबत घेवून तो प्रखर बुद्धीमत्तेचा दैवी बालक निघाला. त्याकाळात धरणे नव्हती त्यामुळे नद्या किमान दहा महिने तरी तट भरभरून वाहात. त्यांना पोहून पार करत व वाटेत आडव्या येणाऱ्या डोंगर कड्यांना एखाद्या तरबेज गिर्यारोहकाप्रमाणे पादाक्रांत करत हा नर्मदा किनारी पोहचला. हा बालक निघाला होता गंगा किनारी, पण तपःस्थलीच्या सर्व खाणाखुणा त्याला नर्मदा किनारीच दिसल्यात…. मन म्हणत होते नर्मदा पार करून गंगेकडे जायचे आहे, पण अंतर्मन सांगत होते की नर्मदाकिनारीच त्याला त्याते ईप्सित साध्य होणार आहे.
तो नर्मदा किनारीच राहिला. अखंड परिभ्रमण हाच संन्याशाचा आचार असल्याने तो नर्मदाकिनारी तपश्चर्यारत फिरू लागला.
डोंगरांमधून नर्मदा काठाकाठाने फिरतांना त्याला एक गुहा दिसली. तपःश्चर्येला ही गुहा उत्तम समजून तो गुहेच्या दाराशी गेला व त्याची चाहूल लागून गुहेतून आवाज आला….
कोण आहेऽरे तिकडे….
मी शंकर…. कालडीवरून आलो…. ऐरवी हा परिचय पुरेसा होता….
पण विचारणाऱ्याच्या प्रश्नातील व्याप्ती शंकरला कळलेली होती.
शंकर हे देहाचे नाव होते, पण विचारणारा व सांगणारा दोघंही व्यापकतेच्या अवकाशात विहरणारे विहग होते. त्यामुळे संकुचित देहावस्था दोघांनाही मान्य नव्हती. संकुचित वर्णन दोघांनाही मान्य नव्हते.
आतून प्रश्न करणारे होते आचार्य गोविंदपाद! अनेक वर्ष ते त्या गुहेतच तपःश्चर्यारत होते.
बाहेर होता भरतभूचे वेदपुरक उत्थान करायला सर्वस्वाचा त्याग करून निघालेला आठ वर्षांचा शंकर….
गोविंदपादांनी आवाज दिला व बालक शंकराने अद्वैताचा झरा मोकळा करवून त्याचा प्रवाह सुरू करवला…..
मनो बुद्ध्यहंकार चित्तानि नाहं
न च श्रोत्र जिव्हे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानन्द रूपः शिवोsहम् शिवोsहम् ॥१॥
न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुः न वा सप्तधातुः न वा पंचकोशः।
न वाक्‍पाणिपादं न चोपस्थपायु चिदानन्द रूपः शिवोsहम् शिवोsहम् ॥२॥
न मे व्देषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः।
न धर्मो न चार्थो न कामो ना मोक्षः चिदानन्द रूपः शिवोsहम् शिवोsहम् ॥३॥
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञ ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्द रूपः शिवोsहम् शिवोsहम् ॥४॥
न मे मृत्युशंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्द रूपः शिवोsहम् शिवोsहम् ॥५॥
अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणीम् ।
सदा मे समत्वं न बंध्योर्नमुक्ती चिदानन्द रूपः शिवोsहम् शिवोsहम्॥६॥

मी मन, बुद्धी, अहंकार व चित्तही नाही,
मी कान, जिभ, नाक व डोळे युक्त शरीरही नाही,
मी आकाश, भुमी, तेज, वायू हे पंचमहाभूतही नाही,
परमआनंदरूप असा मी शिव आहे…..

भारतीय अद्वैत तत्त्वज्ञानाचे संपुर्ण सार या बालकाने आपल्या होणाऱ्या गुरूंसमोर अर्पण केले होते.
हा बालक पुढे आचार्य शंकर वा आद्य शंकराचार्य म्हणून प्रसिद्धी पावला. हे स्तोत्र आत्म षटक वा निर्वाण षटक नावाने अजरामर झाले आहे.
शंकराचार्यांनी आपल्या ३२ वर्षांच्या आयुष्यात अखंड भारताची तीनवेळा परिक्रमा केली.
जागोजागी वेद मत मांडतांना नवनविन रचना करुन भारतीय वेदांतांवर आधुनिक भाष्य करून अजरामर साहित्याची रचना केली.
वेदांवर इतके प्रभावी भाष्य करणारे शंकराचार्य हे कलियुगातील व्यास मुनीच आहेत. शंकराचार्यांचे वेदांवरील भाष्य, ब्रह्मसुत्रादी प्रस्थानत्रयीं वरील भाष्य तसेच त्यांनी प्रसंगोपात्त केलेल्या स्तोत्रादी रचना, तत्त्वज्ञान व व्याकरणाने परिपुर्ण असल्याने कालातीत आहेत.

आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने त्यांनी वेदमत प्रस्थापित करतांनाच भारताच्या चारही दिशांना चार प्रमुख मठांची स्थापना केली व भारताच्या एकात्मतेला सुत्रबद्ध करायला उत्तरेतील मठाचे पुजारी दक्षिण भारतीय तर दक्षिणेतल्या मठाचे पुजारी उत्तरभारतीय ठेवलेत. तसेच पुर्व व पश्चिमेच्या मठांचेही केले.
चारही वेदांचे संरक्षण व संवर्धन करायला या मठांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे वेद वाटून दिलेत.
देवाची सगुण उपासना कशी करावी याविषयी सामान्य माणसाला पंचायतन पुजेचे महत्त्व सांगितले.
आज हिन्दू धर्माचे जे रुप आहे ते शंकराचार्यांनीच टिकवून व वृद्धिंगत केलेले रूप आहे.
हीनते पासून दूर नेवून भारताची हिन्दू ही खरी ओळख शंकराचार्यांनीच निर्माण केली.

आज वैशाख शुद्ध पंचमी, श्रीमद्आद्यशंकराचार्यांची जयंती, हिन्दुधर्माची पुनर्रचना करणाऱ्या या विश्वकर्म्याला शतवार प्रणाम!
(वयाच्या ३२ व्या वर्षी श्रीशंकराचार्यांनी सदेह कैलासगमन केले आहे.)

श्रीशंकरो विजयते!
जय जय शंकर! हर हर शंकर!

वॉट्सॅपवरून साभार दि. ०८-०५-२०२२

श्रीशंकराचार्य स्तोत्र
द्वैतज्ञानतमः प्रभिन्नमभवद्यस्योदयाद्भूतले
वेदान्तामृतवर्षणाय निरताः वन्द्या यदीया कराः।
संव्याप्तो यदुपज्ञमेव महितो ज्ञानप्रकाशो भुवि
श्रीमच्छङ्करदेशिकेन्द्ररवये तस्मै नमो भास्वते।।
धन्या त्वं पृथिवि त्रिलोकगुरुणा कारुण्यमूर्त्या पुरा
पादाम्भोजरजःकणैः सुमहितैः सम्पाविता राजसे।
धन्यः त्वं श्रुतिशीर्षवृन्द महता भाष्यामृतेनैधसे
तत्पादाम्बुजसेवनोत्कमनसो धन्याः वयं शाङ्कराः।।
केचित् शम्भुमुमापतिं श्रुतिगिरां तत्त्वं परं मन्वते
लोकत्राणपरायणञ्च कतिचित् नारायणं मन्वते।
श्रीचक्राञ्चितबिन्दुमध्यवसतिं केचिज्जगन्मातरम्
तत्त्वं तत् गुरुशङ्कराख्यवपुषा विभ्राराजते नोतुलम्।।
येनाकारि समस्तलोकगुरुणा धर्मप्रतिष्ठापनं
यद्भाष्यामृतवर्षणैः श्रुतिशिरःक्षेत्रं समृद्धं महत्।
येनाज्ञानतमो महद्व्यपगतं लोकैकदीपत्विषा
सोयं शङ्करदेशिको भवतु नः वन्द्यं परं दैवतम्।।
हित्वा राजतपर्वतं परशिवः सन्त्रातुकामो नतान्
श्रीमच्छङ्करदेशिकेन्द्रवपुषा सञ्जात इत्यादरात्।
धीमन्तः कथयन्ति किन्तु विनतैः तत्पादसेवार्थिभिः
आविर्भाव इहेर्यते भवहरात् शुद्धात्परब्रह्मणः।।
धर्मेण प्रतिपालितो गुरुगुरोः यस्यावतारोत्सवः
वेदैश्च स्वशिरोभिरादृतमलं यद्भाष्यमत्यद्भुतम्।
यत्स्पर्शाद्भुवि देवताः पुनरगुः चैतन्यवत्त्वं पुरा
सोयं शङ्करदेशिको विजयते मोक्षैकदीपाङ्कुरः।।

*****

शुक्रवार दि.०६ मे, २०२२. आज आद्य शंकराचार्य यांची जयंती! हिंदु धर्माचा -हास होत असण्याचा काळात सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या हिंदुधर्माला नवसंजीवनी दिली. चार दिशांना चार आश्रम स्थापून सारा आर्यावर्त (भारत) हिंदुधर्माच्या सूत्रांनी एकत्र गुंफण्याचे अद्वितीय कार्य केले! गणपती, सूर्य, विष्णू, देवी भगवती आणि भगवान शंकर या दैवतांची (एकत्रित अशी) पंचायतन पूजा रूढ करून विविध देवभक्तांना एकत्र आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. अवघ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात फार मोठे धर्मकार्य केलेल्या, असंख्य संस्कृत स्तोत्रे रचणा-या या आद्य शंकराचार्यांना, (ज्यांचा गौरव शंकरं लोकशंकरम् असा केला जातो!) विनम्र वंदन! आपणां सर्वांना आद्य शंकराचार्य जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

जगद्गुरु शंकराचार्याबद्दल पु.ल.

“काश्मीरच्या प्रवासी-मंदिरात आम्ही तळ ठोकला. ह्या टूरिस्ट सेंटरच्या उशालगतच एक उंच टेकडी आहे आणि टेकडीवर श्रीशंकराचार्यांचे मंदिर आहे. महिन्यापूर्वीच मी केरळातल्या आद्य श्रीशंकराचार्यांच्या कालडी गावी गेलो होतो. आणि आता भारताच्या उत्तर टोकाला ह्या दक्षिण टोकातल्या महापुरुषाने ज्या डोंगरमाथ्यावर बसून शंकराची उपासना केली ते मंदिर पाहत होतो. कुठे केरळातल्या पेरियार नदीच्या तीरावरचे ते कालडी गाव आणि कुठे काश्मिरातले श्रीनगर! कसल्या दुर्दम्य जिद्दीने भारलेली ही माणसे होती ! आम्ही विमानाच्या तीन तासांच्या प्रवासाला वैतागलो होतो आणि हा केवळ वयाच्या आठव्या वर्षी चतुर्वेदी झालेला आईबापावेगळा नंबुद्री ब्राह्मणाचा पोर मरत्या हिंदुधर्माला संजीवनी देण्यासाठी हजारो मैलांची वाट तुडवत, अरण्ये ओलांडत, पर्वत चढत उतरत कैलासराण्याच्या दर्शनासाठी केरळातून काश्मीरपर्यंत आला होता. काश्मिरात मला सर्वांत जर काही सुंदर वाटले असेल तर ते डोंगरमाथ्यावरचे आद्य श्रीशंकराचार्यांचे मंदिर ! गौरीशंकराहूनही जर उंच काही असेल तर ती त्या नंबुद्री ब्राह्मणाची विजिगीषा ! अद्वैताची ध्वजा घेऊन हा प्रखर बुद्धिमत्तेचा ब्राह्मण, पेरियार नदीचे ते पवित्र तीर सोडून जो निघाला तो पाखंड्यांना चेपत चेपत थेट काश्मिरापर्यंत आला. ज्ञानदेवांसारखीच काहीशी त्याचीही कथा. पतीनिधनोत्तर काही महिन्यांनी त्याची माता प्रसवली. गावातली गढूळ तोंडे गलिच्छ बोलली. आठव्या वर्षी वेद म्हणणाऱ्या पोराला डोक्यावर घेऊन नाचावे तिथे त्याला वाळीत टाकला. वास्तविक अशा मुलात किती कडवटपणा यायला हवा ! ज्ञानेश्वरात किती कडवटपणा यायला हवा ! ….
पण शंकराचार्य काय, ज्ञानेश्वर काय-हे धर्मसंस्थापनेचे नर. त्यांनी हिंदुधर्मावर साठलेले शेवाळ दूर करून सनातन आणि निर्मळ विचारांचे पाट देशभर सोडले.”

 • पु.ल. देशपांडे.

(अद्वैत वेदान्ताची पाळेमुळे खोलवर रुजवणाऱ्या, खऱ्या अर्थाने “जगद्गुरु” असलेल्या आदि शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने.) . . . . वॉट्सॅपवरून साभार दि.८-०५-२०२२

*************************

२. द्वैत अद्वैत वगैरे

माझे इंजिनियरिंग कॉलेजमधले मित्र श्री.श्यामसुंदर केळकर यांनी निरनिराळे धर्म, तत्वज्ञान वगैरेंचा थोडा अभ्यास केला आहे आणि तो चालू आहे. द्वैत- अद्वैत हे शब्द बहुतेक लोकांच्या वाचनात निश्चितच आले असतील, पण आपल्या नेहमीच्या बोलण्यात ते सहसा कधी येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल थोडे गूढ वाटत असेल. फेसबुकवरील श्री.केळकर यांच्या भिंतीवर त्यांनी अलीकडे या विषयावर एक स्फुटलेखांची लहानशी मालिका दिली होती. ती मी जशीच्या तशी या पानावर उद्धृत केली आहे. यात द्वैत आणि अद्वैत म्हणजे काय याचा सविस्तर उहापोह केलेला नाही, पण त्यांच्याशी संबंधित असलेली आणि आपल्याला माहीत नसलेली अशी बरीच माहिती दिली आहे. ती उद्बोधक आहे. यातले तर्क आणि मते ही पूर्णपणे त्यांचीच आहेत आणि वाचकाने त्यांच्याशी सहमत व्हावेच असे त्यांचे म्हणणेही नाही. या लेखमालेमुळे त्यावर स्वतंत्रपणे विचार करायला चालना मात्र मिळेल. . . . . आनंद घारे

अद्वैत – द्वैत वगैरे -१
तत्त्वम् असि l
शंकराचार्य हे अद्वैत संप्रदायाचे जनक मानले जातात याचे प्रथम सूत्र आहे :-
तत्त्वम् असि l
संस्कृतची गम्मत बघा –
याच वाक्यातून अद्वैतवादी आणि द्वैत वादी दोघे आपली बाजू मांडतात .
तत्त्वम् असि म्हणजे तत् त्वम् असि l
ते तू आहेस . ( अद्वैत वादी )
इथे तत्त्वम् हा संधी मानला गेला आहे .
तत्त्वम् असि म्हणजे तस्य त्वम् असि l
म्हणजे त्याचा तू आहेस . ( द्वैत वादी )
म्हणजे इथे तत्त्वम् हा शब्द समास समजून त्याचा विग्रह केला आहे .
म्हणून ज्ञानी पुरुषांजवळ बसून शिकलेले ज्ञान ते खरे ज्ञान .( First generation knowledge )

********


अद्वैत – द्वैत वगैरे – २
महावाक्ये
महावाक्ये ४ मानली जातात :-
१) प्रज्ञानं ब्रह्म – ऐतरेयोपनिषद ( ऋग्वेद )
२) अहम् ब्रह्माsअस्मि – बृहदारण्यक उपनिषद (यजुर्वेद )
३) तत्त्वम् असि – छांदोग्योपनिषद् ( सामवेद )
४) अयमात्मा ब्रह्म – मांडूक्य उपनिषद ( अथर्ववेद)
उपनिषदांचा काळ किमान इसवीसन पूर्व १००० ते इसवीसन पूर्व ३००० असा मानला जातो . ( किवा त्याही पूर्वी )
प्रज्ञानम् ब्रह्म याचा अर्थ प्रगट ज्ञान म्हणजेच ब्रह्म . म्हणजेच जिवंत ज्ञानी पुरुष म्हणजे ब्रह्म .
अहम् ब्रह्माSस्मि म्हणजे मीच ब्रह्म आहे .
तत्त्वम् असि म्हणजे ते ( ब्रह्म ) तूच आहेस .
अयमात्मा ब्रह्म म्हणजे हा आत्माच ब्रह्म आहे .
ह्या चारही वाक्यांचा एकत्रित अर्थ काय निघतो ?
मी म्हणजे आत्मा आहे – ज्ञान प्राप्तीनंतर ब्रह्म आहे . ( म्हणजेच परमात्मा आहे . ब्रह्मालाच कोणी परमात्मा म्हणतात .)
ही चारही वाक्ये अद्वैत निदर्शक आहेत . म्हणजे अद्वैत सिद्धांत फार पूर्वी पासून प्रचलित आहे .
मग शंकराचार्य याना महत्त्व का ?
पण यात ” वासांसि जीर्णानि यथा विहाय ” अशा पुनर्जन्मनिर्देशक किवा ” नैनम् छिंदति शस्त्राणि ” अशा आत्म्याच्या अविनाशीपणाचे निर्देशक वाक्यांचा उल्लेख का नाही ?
विशिष्टाद्वैत , द्वैताद्वैत आणि द्वैत सिद्धांत का आले ?

*******

अद्वैत – द्वैत वगैरे – 3
प्रज्ञानं ब्रह्म – ऐतरेयोपनिषद ( ऋग्वेद )
प्रज्ञानम् ब्रह्म याचा अर्थ प्रगट ज्ञान म्हणजेच ब्रह्म . म्हणजेच जिवंत ज्ञानी पुरुष म्हणजे ब्रह्म .
आत्मज्ञान प्राप्त झालेल्या अनेक व्यक्ती असतात . त्याना झालेले ज्ञान एकच असते का ? रजनीश , दादा भगवान , सरश्री सगळे जण म्हणतात की ते एकच असते .
हे भौतिक विज्ञान नाही . भौतिक विज्ञान सतत बदलत असते . काही नवीन गोष्टी कळतात . काही जुन्या गोष्टी चुकीच्या किवा अपुऱ्या असतात . त्यात सुधारणा करावी लागते . पण आत्मज्ञानाचे तसे नाही . सगळ्यांना एकच ज्ञान प्राप्त होते म्हणून आपण – प्रज्ञानम् ब्रह्म – असे म्हणू शकतो . ते ज्ञान जर वेगवेगळे असते तर ब्रह्म पण वेगवेगळे झाले असते .
मग अनेक पंथ का ? भगवान महावीर तीर्थंकर आणि गौतम बुद्ध तीर्थंकर का नाहीत ?
जैन मतानुसार तीर्थंकराना पुन्हा जन्म नसतो त्यांच्या सर्व आशा , अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण झालेल्या असतात , पाप – पुण्य / Debit – Credit दोन्ही खात्यात शिल्लक शून्य असते आणि त्यांच्या मृत्यूनंतर ते सिद्ध क्षेत्रात जातात .
रजनीश यांच्या मते अनेक जण आत्मज्ञान प्राप्तीनंतर थेट मोक्षात जातात . पण ते तीर्थंकर नाहीत . ते सिद्ध आहेत .
तीर्थंकर व्यक्तींच्या केवळ दर्शनाने मोक्षगती मिळते . ( अर्थात तशाच पुण्यवान व्यक्तीना तो योग लाभतो .) पण या व्यक्ती लगेचच देहत्याग करून मोक्षास जातात . म्हणून ते तीर्थंकर नाहीत .
गौतम बुद्धांचा एक जन्म बाकी आहे असे काही पुस्तके सांगतात . आपले ज्ञान दुसऱ्याना मिळावे अशी त्यांची करुणा शिल्लक होती . म्हणून २५०० वर्षानी मी परत येईन असे त्यांचे वचन आहे असे म्हणतात . म्हणून ते तीर्थंकर नाहीत . ( सौजन्य – साध्वी – वैभवश्री , यू ट्यूब – चरम मंगल )
मग एवढे पंथ आणि संप्रदाय का ?
आत्म्याबद्दल मांडूक्योपनिषद् काय सांगते ?
हा अंत : प्रज्ञ नाही , बहि : प्रज्ञ नाही , उभयत:प्रज्ञ नाही
प्रज्ञानघन नाही ,प्रज्ञ नाही , अ- प्रज्ञ नाही .
अदृश्य , अव्यवहार्य ( ज्याचे भाग पडत नाहीत ), अग्राह्य , लक्षणरहित , अचिंत्य आहे , शब्दाने समजावण्यासारखा नाही . एकच एक आत्म्याचा अनुभव हे त्याचे सार आहे . तो शांत , शिव , अद्वैत आहे .
( सौजन्य – अष्टादशी – विनोबा )

*********

अद्वैत – द्वैत वगैरे – ४
प्रज्ञानं ब्रह्म – ऐतरेयोपनिषद ( ऋग्वेद ) -२
मग एवढे पंथ आणि संप्रदाय का ?
ज्ञान एकच असले तरी त्याची अभिव्यक्ती अशक्य असते
हे आपण कालच पाहिले . ( वर्धमान महावीर यांची देशना मौन असे असे एक पंथ मानतो .)
तरी पण तीर्थंकरपदापासून फक्त किंचित दूर असलेल्या व्यक्तीना हे ज्ञान अजून काही जणाना मिळावे असे वाटते .
पण त्या ज्ञानाची अभिव्यक्ती समोर कोण आहे त्यावर अवलंबून असते . ती अभिव्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे असते . एकाच प्रश्नाचे उत्तर अशी व्यक्ती वेगवेगळ्या लोकाना वेगवेगळी देऊ शकते .
मुळात हा अनुभव स्वत:ला स्वत :च घ्यायचा आहे . ज्ञानी व्यक्ती फक्त सहायक – Catalyst बनू शकते . त्यासाठी आदर्श परिस्थितीत एकास एक असाच संपर्क हवा .
ज्ञानी व्यक्ती अतिशय दुर्मिळ असतात . आपले पुण्य त्याना ओळखण्यात कमी पडते . ओळखले तरी विविध प्रकारच्या अंतरायान्मुळे आपण त्यांच्याशी संपर्क करू शकत नाही . ज्ञानी व्यक्ती वेगवेगळ्या देशात प्रगट होतात . ते मुळात कमी बोलतात . त्यांच्या भाषेत बोलतात . ते कोणाशी तरी बोलतात आणि मग त्यांच्या बोलण्याची पुस्तके छापली जातात .
दादा भगवान म्हणतात :- एक वैद्य एका रोग्याला केळे खाणे बंद करा असे सांगतो . दुसरा रोगी केळे खाणे बंद करतो . अरे, तुला थोडेच वैद्यानी तसे सांगितले आहे ?
पुस्तक छापले की असे होते .
रजनीश लिहितात . एक माणूस काश्मीरला जातो . त्याला ती हवा आवडते . मग तो आपल्या मुंबईतील प्रेयसीला एक पेटी पाठवितो आणि लिहितो :- तुझ्यासाठी काश्मीरची हवा पाठविली आहे . काय होईल त्या हवेचे ? ज्ञान असे पेटीत / पुस्तकात बंद करता येत नाही .
एखाद्या मुलाने मेणबत्तीवर हात ठेवला तर त्याला आगीचा अनुभव येतो. त्यापूर्वी तो ऐकतो का ? नाही मग मात्र आयुष्यभर विसरत नाही . .
आत्म्याचा अनुभव आला की खूप आनंद होतो .
त्या आनंदाची मीमांसा तैत्तिरीय उपनिषदांत केली आहे . त्यासंबंधी पुढील भागात .

*********

अद्वैत – द्वैत वगैरे – ५
प्रज्ञानं ब्रह्म – ऐतरेयोपनिषद ( ऋग्वेद ) -३
आत्म्याचा अनुभव आला की खूप आनंद होतो .
त्या आनंदाची मीमांसा तैत्तिरीय उपनिषदांत अशी केली आहे .
ही आनंदाची मीमांसा आहे . युवक असावे युवक सत्चरित्र, अध्ययनसंपन्न ,अत्यंत आशावान , दृढ- निश्चयी ,बलिष्ठ असावा . त्याच्यासाठी ही सर्व पृथ्वी वित्ताने पूर्ण असावी हा जो आनंद तो एक मनुष्य – आनंद .
असे जे १०० मनुष्य – आनंद तो मनुष्य – गंधर्वांचा १ आनंद आहे .
असे मनुष्य – गंधर्वांचे १०० आनंद = देव गंधर्वांचा १ आनंद
असे देव – गंधर्वांचे १०० आनंद= नित्यलोकात रहाणाऱ्या पितरांचा १ आनंद
असे नित्यलोकात रहाणाऱ्या लोकांचे १०० आनंद = जन्मजात देवांचा १ आनंद
जन्मजात देवांचे १०० आनंद = कर्म करून देवत्व पावलेल्या कर्मदेवांचा १ आनंद
कर्मदेवांचे असे १०० आनंद = देवांचा १ आनंद
देवांचे १०० आनंद = इंद्राचा १ आनंद
इंद्राचे १०० आनंद =बृहस्पतीचा १ आनंद
बृहस्पतीचे १०० आनंद = प्रजापतीचा १ आनंद
प्रजापतीचे १०० आनंद = ब्रह्माचा १ आनंद
बालिश वाटते ना ? पण आपण ज्याला परमोच्च सुख मानू , त्याच्या 10 raised to 20 इतके पट म्हणजे
१० लाख कोटी कोटी / १०० मिलियन ट्रिलियन पट हा आनंद आहे .
म्हणजेच सत्- चित् – आनंदाची आपण कल्पनाच करू शकत नाही .

********

अद्वैत – द्वैत वगैरे – ६
गीता म्हणजे वेद आणि उपनिषदांचे सार असे बोलले जाते . याचा अर्थ असा होतो की वेद आणि उपनिषदे यांची रचना श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधी आहे . महाभारताच्या आधी पासून आहे .
मग व्यासानी वेद लिहिले म्हणजे काय ? महाभारतातील युद्ध हे दुसऱ्या महायुद्धाशी तुलना करण्यायोग्य किवा त्याहूनही मोठे होते . प्रचंड मनुष्यहानी , वित्तहानी आणि नासधूस झाली . त्यात वेद आणि उपनिषदेही नष्ट झाली .काही संशोधकांचे मत असे आहे की व्यासानी सर्व वेद आणि उपनिषदे यांच्या उपलब्ध प्रती मिळवून त्यातून पुन्हा वेद आणि उपनिषदे यांच्या संहिता निश्चित केल्या . ( एकनाथ महाराज यानी जशी ज्ञानेश्वरी ची एक प्रमाण प्रत तयार केली त्याप्रमाणे )
संजय सोनवणी यांचे एक पुस्तक आहे – हिंदू धर्माचे शैव रहस्य . त्यांच्या मते आपला मूळ धर्म – पंथ हा शैव आहे . ७० % मंदिरे शंकराची आहेत . अमरनाथ , केदारनाथ , बारा ज्योतिर्लिंगे अशी अनेक जुनी प्राचीन मंदिरे ही शंकराची आहेत . शैव पंथ हा अद्वैत वादी आहे . म्हणून सर्व भारतभर अद्वैत पंथाचेच प्राबल्य होते . ( खुद्द श्रीराम यानी लंकेवर स्वारी करण्यापूर्वी शंकराचीच पूजा केली होती .)
वैदिक पंथाच्या इतकाच किवा कदाचित त्याहूनही अधिक जुना जैन पंथ आहे . जैनांचे २२ वे तीर्थंकर हे श्रीकृष्ण यांचे सख्खे चुलत भाऊ . महाभारतातील प्रचंड हिंसेनंतर जनतेमध्ये युद्धाविरुद्ध मोठे जनमत तयार झाले असावे .यामुळे पुढील काही काळात वैदिक पंथाची खूपच पीछेहाट झाली असावी . २३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे काळात जैन पंथ वाढला . त्यानंतर सुमारे ३०० वर्षानी २४ वे तीर्थंकर महावीर आणि गौतम बुद्ध यांचाही जन्म झाला . बौद्ध पंथीय लोकांची संख्याही वाढू लागली .
अशा या परिस्थितीत आदि शंकराचार्य यानी अद्वैत मताला संपूर्ण भारतभर पुन्हा चेतना दिली. महाभारतीय युद्ध ते शंकराचार्य यात सुमारे ३५०० वर्षाहून जास्त कालावधी आहे . एवढ्या मोठ्या कालखंडानंतर हे घडले . म्हणजे एक प्रकारे त्यानी अद्वैत मताचे पुनरुज्जीवनच केले .
आद्य शंकराचार्य हे शंकराचेच उपासक आहेत . बरेच लोक शिवोs हम् असे म्हणतात . मी शिव आहे असे म्हणतात . म्हणजेच आपला मूळ पंथ शिव आहे.
वैष्णव पंथ खूप नंतर उदयास आला . सुमारे ४०० वर्षानी आला .

********

अद्वैत – द्वैत वगैरे – ७
अद्वैत मताचा घोष फक्त भारतातील लोकानीच केला आहे का ? नाही . सूफी संतानीही केला आहे . शुभ्र पवित्र लोकरीचे वस्त्र म्हणजे सूफ . असे वस्त्र अंगावर घालतात ते सूफी .
मंसूर – अल – हल्लाज ( ८५८-९२२ ) जन्म – इराण , मृत्यू – बगदाद ( इराक ) या नावाचे एक सूफी संत होऊन गेले . त्यानी ” अनल हक ” अशी घोषणा केली होती अनल हक या उर्दू शब्दांचा अर्थ काही जण ” मी सत्य आहे ” (आणि सत्य म्हणजेच परमेश्वर )असा करतात . जावेद अख्तर याचा अर्थ ” अहम् ब्रह्माs स्मि ” असा करतात . इराण आणि इराक हे तेव्हा मुस्लिम धर्मी देश होते आणि आजही आहेत .
त्याचे गुरु जुनैद . ते त्याला म्हणाले – तू हे कृपया मोठ्याने बोलू नकोस . मंसूर त्याना म्हणाला की जेव्हा मी हे अनुभवत असतो तेव्हा माझ्याकडून हे बोललेच जाते . मी ते अडवूच शकत नाही .
त्याला हाल हाल करून मारण्याची शिक्षा झाली . आख्यायिका अशी आहे की हात , पाय कापले जात असतानाही तो हसत होता , म्हणत होता – ज्याला कापता येत नाही , ज्याला जाळता येत नाही , तोडता येत नाही त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहेत हे वेडे लोक ! ( नैनम् छिंदति शस्त्राणि , नैनम् दहति पावक: – आठवा)
सगळ्यांना मंसूर वर दगड फेकण्याची आज्ञा होती . जुनैद नी एक फूल फेकले . मंसूरच्या डोळ्यात अश्रू आले . माझ्या गुरूना माहीत आहे की मी खरे बोलत आहे पण त्यानाही काहीतरी फेकावे लागले .
जे सत्य आहे ते कुठेही प्रगटेलच . मुख्य म्हणजे ते Invention नाही , Discovery आहे आणि शोधायचेही स्वत:मध्येच ! मग त्याला कोण अडवू शकेल ?
सौजन्य – रजनीश

**********

अद्वैत – द्वैत वगैरे –
आदि शंकराचार्य यांचा काळ ८ वे शतक असा सापडतो मध्वाचार्य ज्यानी द्वैत मताची मांडणी केली त्यांचा काळ (१२३८- १३१७ ) आहे .
ख्रिश्चन धर्माची सुरुवात १ ल्या शतकात झाली आणि इस्लाम धर्माची स्थापना ७ व्या शतकात झाली . ( त्याही पूर्वी ज्यू धर्म ख्रिस्त पूर्व १८ व्या किवा २० शतकापासून अस्तित्त्वात होता ) या तीनही धर्मात भगवान मालिक आणि माणसे ही प्रजा आहेत . सर्व माणसांवर भगवान / अल्ला/ ईश्वर याचे लक्ष असते आणि तो त्या सर्व लोकांच्या पाप – पुण्याचा निवाडा करतो अशी त्यांची श्रद्धा आहे . हे जग देवाने निर्माण केले आहे असे हे तीनही धर्म मानतात .
१०-११ व्या शतकात ख्रिश्चन आणि मुस्लिम यांचा भारतात पुरेसा शिरकाव झाला होता .
अद्वैत मत ” ब्रह्म सत्यम् जगत् मिथ्थ्या ” असे म्हणते . डोळ्यांना उघड उघड दिसणारे जग मिथ्थ्या हे कसे पटणार ? अद्वैत मत प्रतिपादन करणारा एक ब्राह्मण समोरून हत्ती येत आहे असे पाहून तिथून पळून गेला आणि हत्ती गेल्यावर परत आला . त्यासंबंधी विचारले असता त्याचे उत्तर होते :- गजमपि मिथ्थ्या , पलायनमपि मिथ्थ्या l असे शब्दांचे खेळ या नवीन धर्मांच्या आगमनानंतर पटणे कठीण होते .
ब्रह्मज्ञान मिळविणे हे अंतिम लक्ष्य असे अद्वैत मत मानते .
पण जे कधी पाहिले नाही आणि ऐकले नाही ते लोकानी खरे का मानावे ?
ज्याना दोन वेळचे जेवण सहज उपलब्ध आहे , रहाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था आहे , ल्यायला पुरेशी वस्त्रे आहेत अशा सुखवस्तू लोकांसाठी ब्रह्मज्ञान , अद्वैत वगैरे ठीक होते . वेद आणि उपनिषदे ही अशा लोकांसाठी आहेत .
पण बाकी लोकांचे काय ? सामान्य लोकांचे काय ? अद्वैत मताला गोंजारत बसले असते तर पूर्ण भारतभर मुस्लिम किवा ख्रिश्चन धर्म पसरला असता .
म्हणून सर्वसामान्यांना समजेल अशा व्यावहारिक धर्माची मांडणी रचण्यात आली . याची सुरुवात रामानुजाचार्य ( १०१७-११३७ ) यानी केली. त्यानी मायावाद ( फक्त ब्रह्म सत्य आणि जग मिथ्थ्या ही विचारसरणी ) नाकारला .यानी जातीभेद दूर करण्याचा आणि समाजसुधारणा करण्याचा प्रयत्न केला .
मध्वाचार्य यानी द्वैत मताची मांडणी केली . त्यानी पाच प्रमुख भेद मान्य केले .
१) ईश्वर आणि जीव
२) ईश्वर आणि जड
३) जीव आणि जीव
४) जीव आणि जड
५) जड आणि जड
याखेरीज विश्वाची निर्मिती , वाढ आणि विनाश करणारा देव म्हणजे विष्णू असे म्हटले . म्हणजेच हे जग देवाने निर्माण केले असे मान्य केले . अद्वैत मत हे जग नित्य आहे , कोणीही निर्मिलेले नाही असे होते . ( हे सर्व करताना त्यानी – मध्वाचार्य यानी उपनिषदांमधूनच आधार शोधला
भक्तीमार्गाने तुम्ही ईश्वराजवळ जाऊ शकता . ईश्वर बनू शकत नाही . मूर्तीपूजा करून देव प्रसन्न होतो अशा गोष्टी यानंतर सुरू झाल्या . पुराणाना महत्त्व प्राप्त झाले .हे सर्व विचारपूर्वक केले गेले असावे . जग म्हणजे माया नसून सत्य आहे हे या मताने मान्य केले .यामुळे एतद्देशीय आणि मुस्लिम / ख्रिश्चन धर्मातील फरक खूप कमी केला .किवा नवा एतेद्देशीय धर्म स्थापन झाला . ह्या सर्व गोष्टी अद्वैत मतापेक्षा खूप सोप्या आहेत . साध्या आहेत .
यातून वैष्णव पंथाचा पाया घातला गेला आणि भक्ती मार्ग
वाढीस लागला . अंधश्रद्धा वगैरे यातूनच वाढीस लागल्या .
अद्वैत मार्ग आणि द्वैत मार्ग उघड उघड विरोधी दिसत असल्यामुळे शैव आणि वैष्णव यांचे कट्टर वैर होते .इतके की महाशिवरात्रीला शैव उपास करीत तर वैष्णव श्रीखंडपुरी खात असे मी ऐकले आहे !
( या लेखातील मते / तर्क माझे आहेत . चुकीचे असू / वाटू शकतात .)

********

अद्वैत – द्वैत वगैरे – ९ ( समारोप )
पुष्टीमार्ग : वल्लभाचार्य ( १४७९-१५३१) यानी पुष्टीमार्ग सुरू केला त्याकाळी मुस्लिम अम्मल होता . त्यामुळे हिंदू स्त्रिया घराबाहेर पडू शकत नसत . त्यावेळी वल्लभाचार्य यानी काळानुरूप हिंदू धर्माला पुष्टी दिली . घरात बसूनही भक्ती करता येईल असा तो मार्ग होता .
कृष्णजन्म साजरा करणे , कृष्णाचा पाळणा हलविणे , दही – हंडी करणे असे निरुपद्रवी कार्यक्रम त्यानी सुरू केले . बासरीवाल्या कृष्णाची पूजा , राधाकृष्णाची पूजा करणे असले कार्यक्रम त्यानी सुरू केले .
हिंदू धर्म म्हणजे निश्चित असे काहीच नसल्यामुळे , शिक्षणाचा पूर्ण अभाव असल्यामुळे गैर मुस्लिम जनतेला एकत्र ठेवणे आणि कशात तरी गुंतविणे एवढाच याचा हेतू असावा .
माझा हा मार्ग सुमारे ५०० वर्षे चालेल असे ते म्हणाले होते . ५०० वर्षे होऊन गेली आहेत .

***

स्वातंत्र्यानंतर : आता आपण स्वतंत्र देश आहोत . आता आपल्याला अशा शिशु वर्गातील धर्माची आवश्यकता नाही . धर्म दोन प्रकारचे असतात . स्वधर्म ( म्हणजेच आत्मधर्म किवा पारलौकिक धर्म ) आणि परधर्म (म्हणजेच लौकिक धर्म ज्यात सर्व धर्म – हिंदू , मुस्लिम , ख्रिश्चन वगैरे मोडतात .)
स्वधर्म हा नितांत वैयक्तिक धर्म आहे आणि त्याचा इतरांशी काहीही संबंध नाही . त्यात कोणतीही कर्मकांडे नसतात . ज्यांच्या दृष्टीने पारलौकिक असे काही नसते अशांचा या प्रकाराशी काहीही संबंध नाही .
परधर्म ज्याचा त्याचा जसा असेल तसा त्याने / तिने पाळावा . परधर्म पाळताना मात्र भारतीय घटना पाळली जावी . घटना लौकिक धर्मापुरतीच म्हणजे ऐहिक धर्माशीच मर्यादित आहे . परधर्म हा व्यावहारिक धर्म आहे . परस्परांशी वागताना कसे वागावे याचे हा मार्गदर्शन करतो . यासाठी घटना आणि कायदा पाळणे एवढेच पुरेसे आहे .
मुस्लिम अमदानीत आणि ख्रिश्चन अमदानीत आपद् धर्म म्हणून सुरू केल्या गेलेल्या गोष्टी आता टाळायला हव्यात . कृष्णाला दही हंडीत , बासरीत , मोरपिसात किवा राधेत गुंतवून न ठेवता योगेश्वर कृष्णाची आठवण जागवावी . दसऱ्याला रावणवध करण्याची गरज नाही . उलट प्रभू रामचंद्रानी रावणाचे सर्व अंत्यसंस्कार विधी नीट पार पाडले हे आवर्जून लक्षात ठेवावे . हळदी कुंकू , वट – सावित्री , हरतालिका या गोष्टी आता कालबाह्य व्हाव्यत .
Mind**** Inside Cambridge Analytica ‘s plot to break the world
लेखक – ख्रिटोफर वायली
या पुस्तकाची समीक्षा माझे एक फेसबुक मित्र नरेंद्र दामले यानी ” द्वेषाची पेरणी ” या नावाने लोकसत्तात १३-११-२०२१ रोजी केलेली आहे . फेसबुकच्या, WA च्या या जमान्यात आपली मते कलुषित करण्यासाठी, आपली संस्कारमूल्ये बदलवण्यासाठी अनेक प्रकारे आपल्याला बदलवण्यासाठी आपला वापर केला जाऊ शकतो .
कोणाकडूनही धर्माच्या नावावर आपला गैरवापर होऊ देऊ नका . एवढा धर्म आपल्या व्यवहारात ठेवा . समाज- माध्यमे वापरताना हे लक्षात राहू द्या .
काळानुरूप आणखी एक धर्म आपण व्यवहारधर्माशी जोडायला हवा . तो म्हणजे पर्यावरण धर्म . हिंदू धर्म संकटात आहे असे नसून अख्खी मानवजात संकटात आहे .
आपण असेच वागत राहिलो , तर १५०-२०० वर्षानंतर आपण अस्तित्त्वातच असणार नाही . निसर्ग आपले काम करून टाकील . आपण निसर्गाचे पाहुणे असून जर यजमानालाच लुटायला लागलो तर अखेरीस यजमान गप्प रहाणार नाही आणि आपल्याला आपली जागा ( ? ) दाखवून देईल !
गेली २ वर्षे माणूस किती क्षुद्र आहे याची जाणीव आपल्याला करोनाने करून दिलीच आहे . ही फक्त ट्रेलर होती . सिनेमा पहाण्याची वेळ न येवो !
( या लेखातील मते / तर्क माझे आहेत . )

श्याम केळकर

**********

यावर माझे विचार :
‘तत्वमसि’ पासून सुरू करून ‘व्यावहारिक धर्मा’पर्यंत आणलेली ही स्फुटलेखमाला वाचनीय आहे. या लेखांमधली मते आणि तर्क लेखकाचे आहेत आणि अर्थातच ते त्याच्या वाचनावर आधारलेले आहेत. उदाहरणार्थ मी “पुष्टीमार्ग” कधी ऐकलाच नाही. पण तशा प्रकारचा वारकरी पंथही चारपाचशे वर्षे टिकून राहिला आहे आणि जास्त माहितीतला आहे. “ज्याना दोन वेळचे जेवण सहज उपलब्ध आहे , रहाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था आहे , ल्यायला पुरेशी वस्त्रे आहेत अशा सुखवस्तू लोकांसाठी ब्रह्मज्ञान, अद्वैत वगैरे ठीक होते . वेद आणि उपनिषदे ही अशा लोकांसाठी आहेत.” हे निरीक्षण अगदी बरोबर आहे. मानवधर्म आणि पर्यावरणधर्म पाळला गेला तरच मानवजात सुखाने राहू शकेल. हे लेखकाचे मला निष्कर्ष १०० टक्के मान्य आहेत.

हिंदू धर्मीयांमध्ये अनेक समजुती किंवा मतप्रवाह मानणारे पंथ आहेत. त्यात खूप विसंगति दिसते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे परस्पराशी संबंध, त्यांच्यामधील कामांची वाटणी आणि त्यांचे अनेक अवतार, गणपती व देवी वगैरेंची अनेक रूपे किंवा अवतार, त्यांनी केलेले चमत्कार वगैरे, वगैरे, वगैरे. वेद तर अपौरुषेय आहेत, ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने काही निवडक ऋषींना सांगितले. व्यास मुनी तर जन्माला येताच एकदम बारा वर्षाच्या मुलाएवढे झाले आणि त्यांना सगळे वेद आपोआप समजले वगैरे गोष्टी अनाकलनीय आहेत. या सगळ्यावर तर्कसंगत विचार करण्यतच काही अर्थ नाही असे मला वाटते.

हे जग कुणी निर्माण केलं? किंवा ते कसे चालते? अशा गहन प्रश्नांची उत्तरे म्हणून देव ही संकल्पना निर्माण झाली असे म्हणतात. अगतिकतेच्या परिस्थितीत तोच तारणहार आधार असतो. सर्वसामान्य लोकांना दंडवत घालण्यासाठी किंवा नवसाला पावणारा एक देव हवा असतो आणि तो दगडाची किंवा धातूची मूर्ती, अमूर्त आकार, झाड, गाय, नाग, एकादा साधू, बाबा, पीर अशा निरनिराळ्या स्वरूपांमध्ये त्यांना सहजपणे मिळतो. यामुळे देव हा आपल्यापेक्षा वेगळा आहे असेच ९९.९९९९९९९९ टक्के लोक समजत आले आहेत. मनापासून अद्वैत मान्य करणारा मला तरी अजून कोणी भेटलेला नाही. मला काही नास्तिक भेटले आहेत, पण देव आहे असे मानणारे सगळेजण ती अपरंपार सामर्थ्य असलेली एक वेगळी शक्ती आहे असेच समजतात.
. . . . आनंद घारे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

काही व्यक्तिमत्वे ही अशी असतात की त्यांच्या नुसत्या स्मरणाने अंगावर आनंदाची कारंजी उडू लागतात. आयुष्यात जेव्हढे त्यांचे शब्द कानावर पडले त्या सर्वांचे प्रतिध्वनी कानात दाटीवाटीने ऐकू येतात. त्यातून जे सूर निर्माण होतात ते स्वर्गीय संगीत असते. त्या स्वर्गीय संगीतात हरवून जाण्याचे भाग्य सर्वांनाच मिळत नाही. असे मी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी ऐकले होते. त्यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास, केलेली गडकिल्ल्यांची भ्रमंति आणि ओघवत्या शैलीत केलेले त्यांचे वर्णन या सगळ्याबद्दल मी खूप वाचले होते. मला त्याचा आनंद घेण्याची संधी मिळाली नाही हे माझे दुर्दैव. मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो नसलो तरी टेलिव्हिजनवर अनेक वेळा पाहिले होते आणि त्यांचे बोल ऐकले होते. वयाची शंभरी गाठल्यानंतरही ते सुस्थितीत होते असे ऐकले होते. पण ती ओलांडण्यापूर्वी आज त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि. आज वॉट्सॅप आणि फेसबुकावर काही जणांनी दिलेल्या श्रद्धांजलि खाली देत आहे. दि.१५-११-२०२१. सर्व मूळ लेखकांचे मनापासून आभार.

वर्षातला सगळ्यात दुःखद क्षण
छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वर्गात दुःख झालं असेल. कारण आज त्यांचा एक मावळा असा मावळा, ज्यांनी छत्रपतीना आपल्या अत्यंत सुंदर अशा शाहीरी सारख्या लोककलेच्या माध्यमातून या आधुनिक जगात पुन्हा अवतरीत केला आपल्या समोर या जगासमोर सादर केला. आज त्या महान मावळ्याच म्हणजेच प्रसिद्ध शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे च आज वयाच्या १०० व्या वर्षी दुःखद निधन झालं. त्यांना स्वर्गात मानाचा मुजरा मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

आज आपण एका महान व्यक्तिमत्वाला मुकलोय. पुन्हा असा शिवशाहीर होणार नाही याची खंत मनाला लागून राहील. ते नेहमी म्हणत ‘ मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक जागेवर गेलोय जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा पावन स्पर्श झालाय. फक्त एक स्वर्ग तेवढा बाकी राहिलाय ‘. आणि आज त्यांनी स्वतःची ती इच्छा सुद्धा पूर्ण केली.

धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे बाबासाहेब पुरंदरे 🙏🙏🙏🚩

एक सुर्य मावळला …. मागे ठेवून असंख्य सूर्यकिरणांना ….. अतिशय दुःखद आणि वेदनादायक बातमी!
जाणता राजा या नाटकाच्या माध्यमातून, अथक संशोधनातून व परिश्रमांतून शिवचरित्र हे घरोघरी पोहोचवणारे शिवशाहिर पुजनीय बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन…
शिवरायांचा एक मावळा स्वर्गात शिवरायांची भेट घ्यायला निघाला…
आज पहाटे ५ वाजून ०७ मिनिटांनी प्राणज्योत मालवली.
भावपूर्ण श्रद्धांजली..!
वंदनीय शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

महाराष्ट्राच्या कणाकणात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचं स्फुल्लिंग मराठीजनांच्या मनामानात चेतवणारे , शाळकरी वयात वाचनाची गोडी निर्माण करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व शिवशाहीर वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांची आज पहाटे ५ वाजून ०७ मिनिटांनी प्राणज्योत मालवली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

🙏🌹🙏🌹🙏

वेचित क्षण आयुष्याचे
जीवन शिवमय झाले l
शिवरायांचे चरित्र गाता
जीवन शतायु झाले ll

पुण्यात्म्याच्या प्रस्थानाने
शिवसृष्टी हळहळली l
एकादशी तिथी जणू स्वतःला
धन्य मानती झाली ll

शिवरायांचाही परम आत्मा
असेल बहु हळहळला l
यमदूतही नेता शाहीरासी
असेल मनामधे रडला ll

थोरवी शिवरायांची ती
कोण आता गायील ? l
गड किल्ले अन् बुरूज दारे
मूक आता होतील ll

नाही वडा कधी नाही भोजन
ना शिवथाळी सजविली l
सच्चाईने पराक्रमाची
शिवकथाच रंगविली ll

नाही मावळे ना फुशारकी अन
नाही स्थापिली सेना l
सच्चा भाव शिवरायाप्रति
ढोंग कुठे दिसेना ll

खरा जाणला शिवबा त्यांनी
ना धरला सत्ताध्यास l
कळो जनांसी तोच शिवबा
हाच धरला ध्यास ll

मूक जाहले शब्दचि आता
कथा मूक झाल्या l
नयनकडाही शिवरायांच्या
असतील ओथंबल्या ll

आता न होणे असे शतायु
खरे शिवशाहीरsss l
“जाणत्या राजाच्या” नांवे
अवघा बाजारsss ll
🙏🙏🙏🙏🙏

(सहजस्फूर्त काव्य आहे.) संजय वि. रानडे, बोरीवली, मुंबई.

पु. ल. देशपांडे यांच्या “गणगोत” मधील बाबासाहेब पुरंदरे वरील लेख

मी त्या वेळी दिल्लीला सरकारी चाकरीत होतो. सुटीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला चार मराठी पुस्तके घ्यावीत म्हणून एका पुस्तकाच्या दुकानात शिरलो. केवळ योगायोगाने काउंटरवर पडलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड हाती पडला. साऱ्या महाराष्ट्रातल्या शुभदेवतांना केलेल्या सुरुवातीच्या आवाहनानेच मनावरची धूळ झटकली. “सुदिन सुवेळ मी शिवराजाच्या जन्माचं व्याख्यान मांडलंय-आई, तू ऐकायला ये” ही तुळजाईला घातलेली हाक जिवाला चेतवून गेली. त्या शिवचरित्रातला ‘उदो उदो अंबे’चा जागर म्हणजे महाराष्ट्राचा पाना- दोन पानांत उभारलेला सांस्कृतिक इतिहास आहे. बळवंत मोरेश्वर पुरंदरे नामक कोण्या इतिहासकाराने लिहिलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड वाचत मी काउंटरपाशीच खिळून राहिलो. ते दहाखंडी चरित्र विकत घेऊन मी निघालो. दिल्लीला पोचेपर्यंत अखंड चोवीस तासांच्या सफरीत ते दहाही खंड संपवले. आपण काही तरी अद््भुत अनुभवातून न्हाऊन बाहेर पडल्यासारखे वाटले. महाराष्ट्रात जन्माला आल्याच्या धन्यतेने मी फुलून निघालो होतो.

जगण्यासाठी महत्त्वाची गोष्ट मिळवावी लागते; ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन. पुरंदऱ्यांना हे प्रयोजन वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षीच गवसले. एका ड्रॉइंग मास्तराच्या बळवंत नावाच्या मुलाला शिवनेरीच्या शिवरायाने झपाटले. त्या झपाटल्या अवस्थेतच त्यांच्या जीवनाचा प्रवास चालू आहे, यापुढेही चालणार आहे. इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे; पण त्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधान करायचे नाहीत, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. उगीचच ‘शिवाजी’ म्हटल्यावर हाताचे आणि जिभेचे पट्टे फिरवणे नाही. त्यांच्या अंतःकरणातला कवी मोहोरबंद, गोंडेदार भाषा लिहितो; पण हातातला इतिहासाचा लगाम सुटत नाही, वर्तमानाच्या रिकिबीतून पाय निसटत नाही की नजर डळमळत नाही.

पुरंदरे इतिहासात सहजतेने डुबकी घेतात. माशाला पोहायची ऐट मिरवावी लागत नाही, तशी पुरंदऱ्यांना शिवभक्तीचा दर्शनी टिळा लावण्याची आवश्यकता भासत नाही. आणि म्हणून जाणत्या इतिहासकारांनी घालून दिलेले दंडक सांभाळून शिवचरित्र आणि त्या अनुषंगाने इतर इतिहासविषयक लिखाण सामान्यांपर्यंत अत्यंत सचित्र भाषेत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. इतिहास संशोधन हे शास्त्र आहे याची त्यांना पक्की जाणीव आहे आणि म्हणूनच हा तरुण मोकळ्या मनाने सांगतो, की “माझ्या रचनेतल्या चुका दाखवा. पुढल्या आवृत्तीत दुरुस्त करीन. इतिहास ही माझी एकट्याची मिरास नाही. ते साऱ्यांचं धन आहे. त्यात कुठं हीण आलं असेल तर ते पाखडून फेकून द्यायला हवं! इथं वैयक्तिक अहंकार गुंतवण्याचं कारण नाही.” त्यांच्या शिवचरित्राच्या खास आवृत्तीच्या प्रकाशनाच्या दिवशी ते म्हणाले होते, “शिवाजीला मी माणूस मानतो, अवतार नव्हे. आजवर ठपका द्यावा, असा ह्या माणसाविरुद्ध सबळ पुरावा आढळला नाही. आढळला तर न लपवता तो शिवचरित्रात घालीन.” आणि म्हणूनच पुरंदरे ऐतिहासिक घटनांविषयी बोलताना कोणत्याही नाटकी अभिनिवेशाने बोलत नाहीत.

पुरंदऱ्यांची तपशिलांवरची पकड भलतीच कडक आहे. स्मरणशक्ती विलक्षण. त्यांच्याशी बोलताना-म्हणजे ते बोलत असून आपण ऐकत असताना-इतिहास हा वर्तमानापासून तुटला आहे असे वाटतच नाही. अतिशय रंगतदार भाषेत बोलतानादेखील इतिहासकार म्हणून ते एक प्रसन्न अलिप्तपणा सांभाळू सकतात. आज इतकी वर्षे मी त्यांच्या तोंडून शिवचरित्रातले प्रसंग ऐकतो, पण कधी मुसलमान व्यक्तीचा मुसलमान म्हणून त्यांनी तुच्छतापूर्वक उल्लेख केलेला मला स्मरत नाही. परधर्मीयांची कुचेष्टा नाही. अवहेलना नाही. इतिहास ही वस्तू अनेक जण अनेक कारणांनी राबवतात. खुद्द शिवाजी महाराजांचे चित्र दुसऱ्या महायुद्धात रिक्रूटभरतीसाठी राबवले होते. “सोळा रुपये पगार, कपडालत्ता फुकट…शिवाजी न्यायासाठी लढला” हे पोस्टर अजून आठवते. काहींना इतिहासातले नाट्य रुचते. काहींचा रोख आजवर झालेले इतिहास संशोधन चुकीचे होते आणि आपलेच कसे खरे हे अट्टहासाने दाखवण्यावर असतो. इतिहासाचे काही भक्त तर सदा उन्मनी अवस्थेतच असल्यासारखे वागतात. उगीचच ‘रायगड रायगड’ करीत उड्या मारण्याने शिवरायांवरची आपली निष्ठा जाज्वल्य असल्याची लोकांची कल्पना होते, अशी यांची समजूत असावी; पण शिवाजी महाराजांच्यावर प्रेम असायला प्रत्येक किल्ल्याचा चढउतार केलाच पाहिजे, असे मानायचे कारण नाही.

दरवर्षी रायगडावर जाऊन डोळे गाळायचे ही शिवभक्ती नसून शिवभक्तीची जाहिरात आहे. आणि म्हणूनच गड-कोटांविषयी पुरंदरे बोलायला लागले की शिवाजी महाराजांच्या जीवनाचे मूळ सूत्र जो विवेक न गमावता ते रंगून बोलतात, म्हणून मला त्यांचे कौतुक अधिक वाटते. स्वतःच्या डोळ्यात आधीच लोटीभर पाणी आणून ऐतिहासिक कथा सांगण्याचा देखावा त्यांनी कधी केला नाही-ते करणारही नाहीत. कारण त्यांनी इतिहासाकडे “हरहर ! गेले ते दिवस!’’ असले उसासे टाकीत पाहिले नाही.

पुष्कळदा वाटते की, त्यांनी शिवचरित्र कसे लिहिले याचा इतिहास एकदा लिहावा. किती निराशा, कसले कसले अपमान, केवढी ओढग्रस्त! त्यातून पुरंदऱ्यांचे खानदान मोठे! वडील भावे स्कुलात ड्राॅइंग मास्तर. पर्वतीच्या पायथ्याशी पुरंदऱ्यांचा वाडाही आहे. भिक्षुकी, मास्तरकी हे व्यवसाय अफाट दैवी संपत्तीचे धनी करणारे. त्या धनातून मंडईतली मेथीची जुडीदेखील येत नसते. महागाईच्या खाईत भारत इतिहास संशोधक मंडळाकडून मिळणारे माहे पाऊणशे रुपये घेऊन पुरंदऱ्यांनी संसार सजवला. रुपयांचा अखंड शेकडा एकजिनसी न पाहिलेले ग. ह. खरे हे पुरंदऱ्यांचे गुरू. ऋषी हा शब्द फारच ढिलेपणाने वापरला जातो; पण ऋषी म्हणावे अशी खऱ्यांसारखी माणसे क्वचित आढळतात. खऱ्यांचे सहायक म्हणून पुरंदऱ्यांनी खूप वर्षे भारत इतिहास संशोधक मंडळात काम केले.

वर्तमानातून इतिहासात पुरंदरे अगदी सहजतेने डुबकी घेतात. हा माणूस किती शांतपणे माणसांच्या अंगावर रोमांच उभे करतो. कुठेही राणा भीमदेवी थाट नाही, अश्रुपात नाही, मुठी आवळणे नाही. त्या पूर्वदिव्यावर पडलेल्या कालवस्त्राला अलगद दूर करून पुरंदरे इतिहासाचे दर्शन घडवतात. त्यांना वक्तृत्वाची देणगी आहे. शब्दकळा तर अतिशय साजरी आहे. सूक्ष्म विनोदबुद्धी आहे. पण ही सारी लक्षणे मिरवीत येत नाहीत. भाषेच्या अंगातून अलगद ओसंडत असतात. कुठलीही ऐतिहासिक घटना पचवून ते लिहितात किंवा बोलतात. “मला अमुक एक ऐतिहासिक कथा ठाऊक नाही, किंवा निश्चित पुरावा नाही म्हणून मी मत देत नाही” हे सांगायची त्यांनी भीती वाटत नाही.

इतिहास हा आम्ही हातच्या कागदपत्रांइक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो. अशा वेळी शिवचरित्राच्या रूपाने त्या इतिहासाचे पाठ लोकमानसात नेऊन सोडणाऱ्या पुरंदऱ्यांचे खूप कौतुक व्हायला हवे होते. त्यांनी इतिहासकाराची पंडिती पगडी चढवली नाही. कुणाही पंडिताने धन्योद््गार काढावेत इतका अभ्यास केला आणि मांडला मात्र गद्यशाहिरासारखा. त्या चरित्राला ते आधारपूर्वक लिहिलेली बखर म्हणतात. इतिहास हा “माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळण्यापर्यंत गेला पाहिजे. इतकंच नव्हे, तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकी-सुना गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,” असे म्हणणारा हा इतिहासकार मला तरी आमच्या आजवरच्या भारतीय इतिहासकारांपेक्षा एक निराळी – लोकशाहीला अत्यंत पोषक भूमिका घेऊन उभा राहिलेला दिसतो.

वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षापासून आजतागायत आपल्या सुखाचे, स्वास्थ्याचे नव्हे, तर आयुष्याचे दान देऊन गोळा केलेले हे शिवचरित्राचे हे धन. एका मास्तरचा हा मुलगा शिवरायाचे चरित्र आठवीत आडरानातल्या वडपिंपळाखाली पालापाचोळ्याचे अंथरूण आणि दगडाची उशी करून झोपला. हल्ली रस्त्यारस्त्यातून जिल्हा परिषदेच्या जीपगाड्या धावताना आढळतात.

शिवाजी महाराजांच्या पावलांच्या खुणा शोधत जाणाऱ्या पुरंदऱ्यांना कोण जीपगाडी देणार! पार्लमेंटात हात वर करण्यापुरते जागे असणाऱ्या सभासदांना आसेतुहिमाचल आगगाडीच्या पहिल्या वर्गाचा फुकट पास असतो. पुरंदरे कुठल्याशी गावी कागदपत्रं मिळायची शक्यता आहे, हे कळल्यावर थर्ड क्लासच्या खिडकीपाशी तिकिटासाठी रांग धरून उभे असतात !

निरनिराळ्या जागा धरून किंवा अडवून ठेवण्याच्या ह्या युगात उदात्त वेडाने झपाटलेली माणसे एकूणच कमी. बाराशे मावळे दीड लाख मोगली फौजेचा धुव्वा उडवीत होते. कारण ते बाराशे मावळे “हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा!” ह्या शिवाजीराजाने त्यांच्या कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले होते. कोणत्याही कार्याच्या सिद्धीला असा एखादा मंत्र लागतो; पण सिद्धीपेक्षा प्रसिद्धी मोठी, अशी भावना रुजायला लागते तेव्हा माणसांची बाहुली होतात. पुरंदरे शिवाजीचे चरित्र गाईन हा संकल्प सोडून जगताहेत. इतिहासाच्या त्या धुंदीत वावरणाऱ्या पुरंदऱ्यांना वर्तमान आणि भुताची चित्रे एकदम दिसतात. हे दिसणे भाग्याचे ! ही भाग्याची वेडे !

– पु. ल. देशपांडे

*********************

अत्यन्त सुंदर शब्दांकन असलेली ही पोस्ट मराठी मनावरचा एक अत्यावश्यक संस्कार म्हणून प्रत्येकाने वाचावी
👇🏼
‘‘तृप्त मी शिवशक्तीच्या गानात झालो शारदे’’
II बाबासाहेब पुरंदरे II

‘‘वडिलांनी माझं मन जाणलं आणि ते मला निरनिराळ्या किल्ल्यांवर घेऊन जाऊ लागले. त्या किल्ल्यांवरच्या मातीशी माझं असं माझ्याही नकळत नातं जोडलं जाऊ लागलं. मी अगदी लहान आठदहा वर्षांचा असेन. पण आईच्या कुशीचं आणि मातीच्या स्पर्शाचं भान येण्यासाठी वयाच्या जाणतेपणाची गरज नसतेच मुळी. ती ओढ जन्मजातच असावी.. असतेच! आज वयाच्या ९७ व्या वर्षीही तो दिवस मला आठवतोय. वडिलांनी, मामासाहेबांनीच मला त्या इतिहासात नेऊन सोडलं.. मी अजूनही तिथेच आहे फक्त मामासाहेबांचं बोट सुटलं.. त्यांनी मला ‘बाबासाहेब, इथं असं असं घडलं’ असं त्यांच्या आवाजात सांगितलेलं आठवतं, अजूनही तो आवाज ऐकू येतो आणि त्या आठवणी गडाच्या एकेका तटाकोटासारख्या मनात रुतून बसतात.. इतिहास माझ्यासाठी केवळ कथेचा विषय न राहता तो व्यथा जागी करणारा विषय ठरला आहे.’’

एक सांगू का? माझं श्रेयस-प्रेयस किंबहुना आयुष्यातलं जे काही असेल ते फक्त आणि फक्त पाच अक्षरात सामावलेलं आहे, ते आपण ओळखलं असेलच.. ते म्हणजे ‘शिवचरित्र’! आयुष्यातून शिवचरित्र वजा केलं तर.. तर झालो असतो एखादा अगदी सामान्य आणि समाजाच्या फारसा उपयोगाचा नसलेला माणूस.. माझ्या जीवनातील साफल्याचे श्रेय शिवचरित्रालाच आहे!
आजवरच्या आयुष्यात मी जे काही करू शकलो, त्याबद्दल विधात्याशी कृतज्ञ आहे. तृप्त आहे. समाधानी आहे. मी एक हजाराहूनही अधिक पौर्णिमेचे चंद्र पाहिले पण याचा अर्थ मी एक हजाराहूनही अधिक अमावास्या, ग्रहणं पाहिली असाही होतो नाही का? आणि त्या पौर्णिमा, अमावास्या, ग्रहणं सगळं काही माझ्या लक्षात राहिलं आहे. आजवर आयुष्यात माझ्या कामाची दखल घेणारी, कामाविषयी कौतुक असणारी, विचारपूस करणारी आणि कामात रस घेणारी माणसं भेटली आणि त्यांच्यामुळे जीवनप्रवास सुखकर होत गेला. अर्थात, या प्रवासात याउलट वागणारी काही माणसंही भेटली. पण त्यांची संख्या अत्यल्प आहे आणि सुख देणाऱ्यांची संख्या खूपच जास्त आहे. तरीही त्रास देणाऱ्यांविषयी मनात राग वा तक्रार नाही.

मी केव्हा बोलायला लागलो आणि पहिलं अक्षर मी कोणतं उच्चारलं ते मला माहीत नाही. कुणी सांगितल्याचं आठवत नाही! पण ज्यांनी मला बोलायला शिकवलं त्यांच्याशी मी अतिशय कृतज्ञ आहे. माझे या क्षेत्रातील गुरू आहेत माझे वडील. माझ्यावर त्यांचा फार मोठा प्रभाव आहे. आम्ही त्यांना मामासाहेब म्हणत असू. ते उत्तम चित्रकार होते. सुमारे सहा फुटांहूनही अधिक उंची, धोतर, कोट त्यावर उपरणं. कपाळावर गंध. भरघोस मिशा आणि यापेक्षाही लक्षात राहील असा भारदस्त आवाज. त्यामुळे त्यांच्याशी बोलणारा सुरुवातीला दोन पावलं मागेच सरके. सांजवात झाली की देवापुढे परवचा म्हणायला बसायचं. तो म्हणून झाला की मामासाहेब गोष्टी सांगत. पुराणातल्या, इतिहासातल्या, त्यांचा आवाज खूप मोठा, त्यात चढ-उतारही भरपूर. शिवाय हावभाव, हातवारे करून ते गोष्टी सांगत त्यामुळे आम्ही त्यात अगदी रंगून जायचो. त्यांच्या तोंडून इतिहासातल्या गोष्टी ऐकता ऐकता माझ्या नजरेसमोर ते प्रसंग, त्या लढाया जणू प्रत्यक्ष घडत असल्याचं चित्र दिसू लागे आणि त्या गड-किल्ल्यांवर जाण्याची ओढ वाटू लागे. त्यांनी माझं मन जाणलं आणि ते मला निरनिराळ्या किल्ल्यांवर घेऊन जाऊ लागले. त्या किल्ल्यांवरच्या मातीशी माझं असं माझ्याही नकळत नातं जोडलं जाऊ लागलं. मी अगदी लहान आठदहा वर्षांचा असेन. पण आईच्या कुशीचं आणि मातीच्या स्पर्शाचं भान येण्यासाठी वयाच्या जाणतेपणाची गरज नसतेच मुळी. ती ओढ जन्मजातच असावी.. असतेच!

त्या काळात प्लेगची साथ आली आणि मग पुणेकर मंडळी सिंहगडाच्या पायथ्याशी वास्तव्याला आली. मला ती एका अर्थानं पर्वणी वाटली नसेल तर नवल. पहाटे उठल्यापासून सूर्य तेजात न्हाऊन निघत असलेला सिंहगड मला खुणावू लागला. मी तहानभूक विसरून त्याच्याकडे टक लावून पाहात बसे. मामासाहेबांनी एक दिवस मला गडावर नेलंच! त्यांचं बोटं धरून मी गडावर पोहोचलो. आज वयाच्या ९७ व्या वर्षीही (येत्या १५ ऑगस्टला तिथीनुसार माझा जन्मदिन) तो दिवस मला आठवतोय. त्यांनीच मला त्या इतिहासात नेऊन सोडलं.. मी अजूनही तिथेच आहे फक्त मामासाहेबांचं बोट सुटलं.. त्यांनी मला ‘बाबासाहेब, इथं असं असं घडलं’ असं त्यांच्या आवाजात सांगितलेलं आठवतं, अजूनही तो आवाज ऐकू येतो आणि त्या आठवणी गडाच्या एकेका तटाकोटासारख्या मनात रुतून बसतात. मला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की माझं एकही व्याख्यान त्यांनी ऐकलं नाही. तसा कधी त्या काळी योगच आला नाही.

मामासाहेब मला त्यांच्याबरोबर नाटक, चित्रपट पाहायला घेऊन जात. त्याकाळच्या ‘आर्यन चित्रमंदिरात’ मूक चित्रपट लागत. त्या नाटक, चित्रपटातील अभिनेत्यांच्या अभिनयाचा पगडा माझ्या मनावर बसला. आपणही नाटकातल्यासारखा अभिनय करावा, संवाद म्हणावेत असा एक नादच मला लागला. ‘अयोध्येचा राजा’ हा चित्रपट त्या वेळी नुकताच चित्रपटगृहात लागला होता. त्यामधील बाबुराव पेंढारकर यांच्या अभिनयानं मला झपाटून टाकलं. त्यानंतर ‘प्रभात’चा प्रत्येक चित्रपट पाहणं हा जणू घरातला कुळधर्म. कुळाचारच बनला! त्यातल्या त्यात ‘सिंहगड’ हा चित्रपट पाहिल्यावर तर पुढचे काही दिवस दुसरं काही सुचेनाच. सगळे संवाद, गाणी पाठ झाली होती. त्यातलं तानाजीचं काम तर मला फारच आवडलं होतं. मग माझ्या अंगात तानाजी संचारू लागे.

एकदा असाच मी एक चित्रपट पाहून आलो आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वाडय़ातल्या एका खोलीत कंदिलाच्या उजेडात- कारण त्यावेळी आमच्याकडे वीज नव्हती- अभिनय करायला सुरुवात केली. कंदिलाच्या प्रकाशामुळे माझी सावली भिंतीवर पडली होती. त्या सावलीकडे पाहात मी अभिनयाला सुरुवात केली. त्यात दंग असताना माझ्या सावलीशेजारी आणखी एक सावली हलताना दिसली. मी मागे वळून पाहिलं तर दारात वडील उभे. आता आपली धडगत नाही, आपली पाठ शेकणार म्हणून भिंतीला पाठ लावून भेदरलेल्या नजरेनं वडिलांकडे पाहात राहिलो. वडिलांनी गंभीरपणे पाहात मोठय़ा आवाजात विचारलं, ‘नट व्हायचंय? व्हा! पण केशवराव दात्यांसारखे व्हा!’ मी थरारलो, तसाच वाकून त्यांना नमस्कार केला.

माझी इतिहासाची आवड फुलवली आणि वाढवली भावे स्कूलमधील शिक्षकांनी. वर्तमानकालीन परिस्थितीशी तुलना करीत करीत ते शिकवीत. त्यामुळे इतिहास केवळ कथेचा विषय न राहता तो व्यथा जागी करणारा विषय ठरला. त्या लहानग्या वयात इतिहासावरचं माजगावकरसरांचं ‘भाष्य’ ऐकून मी अस्वस्थ होत असे. ते ऐकून अनेकदा मी वर्गात रडलो होतो. असे विद्यार्थ्यांना अस्वस्थ करणारे शिक्षक त्यावेळी होते. मला आणखी एक आवड होती, नाद होता- नकला करण्याचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांचीही मी अनेकदा करीत असे. एकदा शाळेत- स्नेहसंमेलनात ती नक्कल मी प्राचार्य नारळकर, प्रा. दबडघाव, श्री. म. माटे अशा मान्यवर मंडळींसमोर केली होती. त्यांचं भाषण मी म्हणून दाखवू लागलो. ‘‘वटवृक्षाचे बीज मोहरीहूनही लहान असते. पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, वलकले असतात ती वाढत वाढत तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात. उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.. मलाही एक वल्गना करू द्या! माझे गाणे मला गाऊ द्या! या जगात आपणाला जर हिंदुत्वाच्या मानाच्या राष्ट्रात सन्मानाने जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे. ते राष्ट्र वटवृक्षाप्रमाणे विस्तारायला हवेच. हिंदुध्वजाखाली ते स्थापन झाले पाहिजे. या नाही तर पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल. माझी ही वल्गना खोटी ठरली तर वेडा ठरेन मी! आणि माझी ही वल्गना खरी ठरली तर मी ‘प्राफेट’ ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!’’ नक्कल संपली. टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळ्यांनी खूप कौतुक केले. प्रा. नारळकरांनी तर माझे दोन्ही दंड धरून वर उचलले आणि म्हणाले, ‘‘शाब्बास, शाब्बास पुरंदरे.. फार छान नक्कल केलीस तू. भाषणही उत्तम केलेस. तू उत्तम वक्ता होशील.’’

पुढे एकदा तर सावरकरांची ही नक्कल मी साक्षात त्यांच्याच समोर केली. केवढं धाडस होतं ते! एकदा गायकवाड वाडय़ात स्वातंत्र्यवीर सावरकर उतरले होते. त्यांच्याबरोबर गोखले, गणपतराव नलावडे, म. तु. कुलकर्णी वगैरे मंडळीही होती. सावरकरांचं दर्शन घ्यावं म्हणून मी वाडय़ात गेलो. तेव्हा मला पाहून गणपतराव तात्यांना म्हणाले, ‘तात्या, हा मुलगा तुमची नक्कल फार उत्तम करतो, अगदी हुबेहूब!’ सावरकर किंचितसे हसले. म्हणाले, ‘‘असं!. कर बघू बाळ.’’ हाफ पँट, वर पांढरा सदरा, डोक्यावर टोपी अशा वेषात मी उभा राहिलो आणि जरा दबकतच सावरकरांची नक्कल त्यांच्यासमोर करायला सुरुवात केली. नंतर आवेशानं भाषण म्हणू लागलो. स्मितवदनाने तात्या ते ऐकत होते. आपलीच नक्कल पाहात होते. नक्कल संपली. मी तसाच उभा राहिलो. त्यांनी मला जवळ बोलावलं. पाठ थोपटून माझं कौतुक केलं. ‘‘फार उत्तम! उत्कृष्ट!! अगदी हुबेहूब!’’.. त्यांच्या त्या कौतुकोद्गारानं माझ्या अंगावर मूठभर मास चढलं. पण त्यांच्या पुढच्या शब्दांनी मनावरचं ओझं दूर झालं. मी एकदम सावध झालो; भानावर आलो. आजपर्यंत जी मी व्याख्यानं दिली. इतिहासाचा अभ्यास केला त्याचं श्रेय टाळ्यांच्या या शब्दांना द्यावं लागेल. ते म्हणाले, ‘नक्कल उत्तमच केलीस बाळ. पण आयुष्यभर केवळ नकलाच करू नकोस दुसऱ्यांच्या. स्वत:चं असं काही तरी निर्माण कर!’ त्या दिवसापासून मी नक्कल करण्याचं सोडून दिलं. सावरकरांबद्दलच्या आदरभावात वाढच झाली.

वक्तृत्व शिकण्याच्या दृष्टीने माझ्यावर सरस्वतीने कृपाच केली. वक्तृत्वाच्या बाबतीत सावरकरांच्या जवळपास फिरकू शकेल, असा दुसरा एकही वक्ता मी अद्याप पाहिलेला नाही. सावरकरांची वाणी म्हणजे केवळ उसळता लाव्हा. त्यांचं उभं राहणं, त्यांचे हावभाव, त्यांच्या डोळ्यांच्या, भिवयांच्या आणि मानेच्या हालचाली केवळ अनुपमेय! त्यांचा शब्दस्रोत म्हणजे आभाळातून अवतरणारा गंगौघ. छे! छे! त्याला उपमाच नाही. ते वक्तृत्व म्हणजे शिवतांडव! माझ्या मनावर सावरकरांच्या शब्दांचा आणि शैलीचा फार मोठा परिणाम झाला. त्यांच्या त्या शैलीनं संस्कार आणि शिकवण मला दिली.

याच काळात नारायण हरी ऊर्फ नाना पालकर यांनी मला अनेक गोष्टी सहजपणे शिकविल्या. ‘कशाकरता’ बोलायचं हे मला नानांकडून समजलं, उमजलं. मला जर नाना पालकर, विनायकराव आपटे आणि ताई आपटे यांचा सहवास लाभला नसता तर उत्तम वक्ता होऊनही मी दगडच राहिलो असतो. त्यांनी माझ्या जीवनाला अर्थ दिला. आत्मा दिला. कशाकरिता जगायचं आणि कसं जगायचं हे त्यांनी स्वत:च्याच जीवनाचा नकाशा माझ्यापुढे ठेवून मला शिकवलं.

नागपूरच्या राजाराम सीताराम ग्रंथालयात माझं पहिलं सार्वजनिक व्याख्यान झालं. नंतर भरतीच्या लाटेप्रमाणे एकापाठोपाठ एक व्याख्यानमाला होत गेल्या. नागपूरचे माझे मित्र क्रीडापटू शामराव सरवटे यांचे मला ऐरावताच्या बळाने साहाय्य झाले. विदर्भात माझे शेकडय़ाने कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांची बहुतांशी योजना माझे मित्र दि. भा. ल. ऊर्फ राजाभाऊ कुलकर्णी यांनी केली. शिवचरित्राच्या कामात राजाभाऊंचा निम्म्याहून मोठा वाटा आहे.

‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथ छापण्यासाठी पैसे आवश्यक होतेच. आमच्या आईसाहेबांनी, थोरल्या वहिनीसाहेबांनी आणि दाते आजींनी आपलं स्त्रीधन माझ्या हाती सोपवलं, आशीर्वाद दिले.. छे? त्यांचं ऋण फेडण्याचा उद्धटपणा मी करू शकलो नाही. मी पुण्याहून मुंबईला कोथिंबीर विकण्याचा अनुभव घेतला. पुस्तके विकली. त्यावेळी राजाभाऊ माझ्याबरोबर होताच. श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ‘राजहंस प्रकाशन’ सुरू केलं आणि या प्रकाशनातर्फे हा ग्रंथ प्रकाशित केला. त्या समाधानाच्या आठवणी अविस्मरणीयच!

या सर्वात आवर्जून श्रेयाचा मान द्यावा तो सातारच्या पुण्यशील माँसाहेब महाराज राजमाता सुमित्राराजे भोसले यांना. त्यांनी मला ‘शिवशाहीर’ संबोधलं! माँसाहेब महाराजांबद्दलच्या आदराला माझे शब्द अपुरे आहेत. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी आपल्य ‘मराठा’ या दैनिकातून आणि थोरल्या भावासारख्या असणाऱ्या पु. लं.नी सरकार दरबारी ‘राजा शिवछत्रपती’ची अशी भलावण केली की, त्यामुळे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष या शिवचरित्राकडे वळले. मुंबईच्या शिवाजी पार्कवर साकारलेल्या ‘शिवसृष्टी’चं यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे अशांसारख्या महानुभवांनी आणि असंख्यानी कौतुक केलं. कोणा कोणाची नावं घेऊ? ‘शिवकल्याण राजा’ या ध्वनिमुद्रिकेचं अतोनात स्वागत – कौतुक झालं, ते त्यातील प्रतिभावंतांच्या कवनांनी, बाळासाहेब मंगेशकरांच्या संगीतानं आणि आपल्या लतादीदींच्या स्वरांमुळे! ‘जाणता राजा’ या महानाटय़ासाठी मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि अनेक महान व्यक्ती तसेच देश-विदेशातल्या मानकऱ्यांचा, जाणकारांचा आणि रसिक श्रोतृवर्गाचा अपरंपार कृतज्ञ आहे.

या सर्वाना मी अंत:करणपूर्वक श्रेय देतो. पण ते देण्यासाठी शब्द कोणते वापरू?.. उमगत नाही, सूचत नाही.

मुंबईतील माझी पहिली व्याख्यानमाला विलेपाल्र्याला पु. ल. देशपांडे यांनी आयोजित केली. कोणत्याही बाबतीत त्यांनी मला मदत करायची शिल्लक ठेवलं नाही. या पती-पत्नींची माया.. मला ठरवलं त्यापेक्षा जास्त जगायच्या मोहात पाडते. मात्र एक खंत मनात आहे ती म्हणजे भाईंनी वेळोवेळी दिलेला सल्ला मनात असूनही मी पाळू शकलो नाही. व्याख्यानमालांतून मिळालेलं धन मी समाजकार्यासाठी सगळं वाटून टाकलं. भाई सांगायचे स्वत:साठी थोडा तरी भाग ठेवून दान करा आणि ते सांगणं अगदी योग्यच, काळजीपोटीचं होतं. पण मला ते तसं वागणं जमलं नाही हे खरं.

माझ्या आजवरच्या जीवनात खारट-तुरटही अनुभव आहे. पण चांगले अनुभव इतके प्रचंड आहेत की, खारट-तुरट प्रसंग अगदी नगण्यच! जनतेच्या प्रेमाने माझे मन अतिशय मोहरून गेले आहे. वास्तविक मी एक लहानसा विद्यार्थी आहे. इतिहास आणि त्यातही शिवशाहीचा इतिहास हा माझा विषय. हा इतिहास मी महाराष्ट्र रसात, महाराष्ट्राच्या कडेपठारांवर गात हिंडतो आहे.

इतिहास हा पाचवा वेद आहे. पण मी वेदांती नाही. मी विद्वान नाही. मी गोंधळी आहे. मी इतिहासकार नाही. अभ्यासपूर्वक इतिहास गाणारा मी एक शाहीर आहे. मी बखरकार आहे. इतिहासाचा अभ्यास मांडणे आणि इतिहासाचा उपयोग सांगणे ही या पाचव्या वेदाच्या वैदिकांची मुख्य कामे असतात. या इतिहासवेदाचा पथ्यपूर्वक आणि अभ्यासपूर्वक उपयोग करण्याचे व्रत घेतलेला मी एक कलावंत आहे. मला माझ्या व्रताची अतोनात आवड आहे, हौस आहे, अभिमान आहे.

मी या पुण्यात जन्मलो, रंगलो, खेळलो. सारे संस्कार पुण्यात घडले. किती तरी मोठी माणसं दोन हातांवरून पाहिली. त्यांची भाषणं ऐकली. कुणाची गाणी ऐकली. कुणाचे पोवाडे ऐकले, कुणाची कीर्तने ऐकली. गोंधळ-भारुडे ऐकली. कुणाची चिडणी-रागावणी आणि कुणाकुणाच्या अस्सल मराठी शिव्यासुद्धा मन लावून ऐकल्या. पूर्वीच्या ‘मिनव्‍‌र्हा टॉकीज’समोर अनेक वेळा वर्तुळाकार गर्दीत मांडी घालून बसून खास मंडईत गाणाऱ्या गोंधळ्यांचे पोवाडे ऐकले. भजने, लळिते, मेळे आणि लावण्या ऐकल्या. मी त्यात रंगलो तो रंग माझ्या अंत:करणावर पडला तो पक्काच जडला.

मी जर या मावळात लहानाचा मोठा झालो नसतो तर या अस्सल महाराष्ट्र रंगाला मी फार फार मुकलो असतो. पुण्याची पुण्याई मला लाभली. मी कुठे साती समुद्राच्या पार पोहून गेलो- आलो तरी माझ्या तनामनाला लागलेला खंडोबाचा भंडारा, भवानी आईचा मळवट, ज्ञानेश्वर- तुकारामांचा अबीरगुलाल आणि कसबा गणपती, मंडईच्या गणपतीचा अष्टगंध, गुलाल थोडासुद्धा धुतला जाणार नाही. सह्य़ाद्रीतल्या अणूरेणूशी मी कृतज्ञ आहे. शिवपूर्वकालापासून या सह्य़ाद्रीत कला आणि विद्या यांचा संचय होत आला. अनेक महान कार्याचे संकल्प येथेच सोडले गेले. अनेक यज्ञांच्या आहुती इथेच दिल्या गेल्या.

आमच्या पुरंदरे वाडय़ात थोर कीर्तनकारांची कीर्तने होत. मी अगदी पुढे बसून ती ऐकायचो. या कीर्तनकारांचा वेष, त्यांच्या लकबी, त्यांची लीन-तल्लीन वृत्ती, त्यांनी दिलेले दृष्टान्त, त्यांचे ओघवतं वक्तृत्व या सगळ्या गोष्टींनी मी भारावून जायचो. एक अगदी नक्की की त्यामुळे माझं आयुष्य भक्तिरसपूर्ण झालं. हे असे संस्कार होत होते. त्यातच माझ्या देश प्रेमाच्या बीजाला धाडस-धैर्याचे-अंकुर फुटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठका, शिबिरे यातून विचारांना एक वेगळी आणि ठाम अशी दिशा मिळाली. संघप्रचारक म्हणूनही जबाबदारी सोपविली गेली. त्यामुळे गावोगावी जाणं झालं. पण परत महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात परतलो.

या पुणे शहराने अनेक यश-अपयश, अनुग्रह आणि आघात, उत्कर्ष आणि नाश, गाढवाचा नांगर आणि सोन्याचा नांगर, जलप्रलय आणि अग्निप्रलय, चिखलफेक आणि पुष्पवृष्टी असे अनेक आकाश-पाताळ गाठणारे प्रकार अनुभवले आहेत. कधी शिरी मंदिल चढला तर कधी पाठीला माती लागली. यातूनच इतिहास घडला आहे. संस्कृती यातूनच फुलली आहे. बंड करून उठणं हा इथल्या मातीचा धर्म आहे. या मातीतूनच राजमाता जिजाऊसाहेब, शिवाजीराजे, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, फडके यांसारख्ये बंडखोर उठले. तसेच धोंडो केशव कर्वे, इतिहासाचार्य राजवाडे, गुरुवर्य बाबुराव जगताप, ‘सकाळ’कार ना. भि. परुळेकर, डॉ. बानू कोयाजी, पं. महादेवशास्त्री जोशी, पं. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, ‘पंचवटी’तले ग. दि. माडगूळकर, यंत्रतपस्वी किलरेस्कर, अनेक चित्रतपस्वी युगनिर्माते,

पं. भीमसेन जोशी, सुधीर फडके, बालगंधर्व आणि नाटय़तपस्वी- किती तरी ‘वेडी’ माणसं याच मातीत रुजली. याच आणि अशांनीच पुण्याचा आणि देशाचा सांस्कृतिक इतिहास घडवला आहे. या इतिहासाचा आणि या चरित्रांचा माझ्या मनावर परिणाम आणि संस्कार झाला. मलाही माझं वेड आणि स्वप्न या मातीत सापडलं.
भविष्यात माझं आणखी एक स्वप्न आहे. ते भव्य-दिव्य आणि अफाट आहे, असं म्हणावं लागेल. मला संपूर्ण शिवचरित्र वॅक्स, प्लॅस्टर ऑफ पॅरिस अशा वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांपुढे ठेवायचं आहे. म्हणजे ‘डिस्ने लँड’सारखी ही ‘शिवसृष्टी’ असणार आहे. शिवकालीन क्रांतीचा स्फूर्तिदायक इतिहास जगाने येऊन पाहावा आणि आमच्या तरुणांची मने अभिमानाने पोसली जावीत, हीच इच्छा आहे.

शिवचरित्रावर भाषणे करून मिळवलेले लाखो रुपये मी वेगवेगळ्या संस्थांना अर्पण केले हे खरे. पण ही धन देण्याची प्रेरणा मला कशातून मिळाली आहे, सांगू? शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांना भूमीमध्ये धन सापडले. ते त्यांनी जनतेसाठी- विहिरी- तलाव वगैरे कामांसाठी वापरले. स्वत: महाराजांना तोरणा किल्ल्यावर धन मिळाले. ते त्यांनी स्वराज्याच्या कारणी लावले. लोकमान्य टिळकांना अर्पण केलेल्या थैलीचा त्यांनी विश्वस्त निधी केला.

पु. ल. देशपांडे यांनी साहित्य, कला यातून मिळालेले लाखो रुपये वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून समाजार्पण केले. अशा थोरांच्या वाटचालीने जी वाट मिळालेली आहे, तिच्यावरून चालणारा मी एक वाटसरू आहे. ही थोर मंडळी माझी यामागची प्रेरणा आहेत. यावेळी आणखी एक विचार मनात येतो की, हे जग सोडून आपल्याला केव्हा तरी जायचे असते आणि मग तेव्हा आपल्याबरोबर काय येते? हातातली अंगठी, दाग-दागिने काढून घेतले जातात. इमले, बंगले, गाडय़ा, धनदौलत, सोने-नाणे सारे सारे काही इथेच राहते. असे असताना मग समाजऋण फेडण्याची कसूर का करायची? आपण मिळवलेल्या मिळकतीतील काही भाग तरी रुग्णालये, वाचनालये, शाळा-महाविद्यालये किंवा आपल्याला पसंत पडणाऱ्या मार्गाने समाजाला देण्याची इच्छा असावी. हे आणि हेच माझे श्रेयस-प्रेयस असावे असे मला वाटते.

आता पसायदानाची वेळ जवळ येत आहे; अशी मला जाणीव होत आहे. मी हे पसायदान सतत मागतो आहे. मागणे एवढे आहे,

‘चंडिके दे, अंबिके दे, शारदे वरदान दे
रक्त दे, मज स्वेद दे, तुज अघ्र्य देण्या अश्रु दे।’
तृप्त मी शिवशक्तीच्या गानात झालो शारदे
मागणे काहीच नाही, एवढे वरदान दे
मम चितेने यात्रिकांची वाट क्षणभर उजळु देचंडिके दे, अंबिके दे, शारदे वरदान दे।

बहुत काय लिहिणे?
आमचे अगत्य असो द्यावे!

लेखनालंकार- राजते लेखनावधि:।।
शब्दांकन- डॉ. चित्रलेखा पुरंदरे

बाबासाहेब पुरंदरे यांचे इतिहास ऋण

शरद पांडुरंग काळे, निवृत्त वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र

काही व्यक्तिमत्वे ही अशी असतात की त्यांच्या नुसत्या स्मरणाने अंगावर आनंदाची कारंजी उडू लागतात. आयुष्यात जेव्हढे त्यांचे शब्द कानावर पडले त्या सर्वांचे प्रतिध्वनी कानात दाटीवाटीने ऐकू येतात. त्यातून जे सूर निर्माण होतात ते स्वर्गीय संगीत असते. त्या स्वर्गीय संगीतात हरवून जाण्याचे भाग्य सर्वांनाच मिळत नाही. ज्यांना ते भाग्य मिळते त्यांनाच त्याची किंमत समजते. असे स्वर्गीय संगीत ऐकण्यासाठी जिवाचे कान पुरत नाहीत. पण जेव्हढे शक्य असेल तितका वेळ त्या स्वरगंगेत डुबता येईल तेव्हढे डुबावे आणि स्तब्ध झालेल्या काळाचे आभार मानावेत, स्वतःचे अभिनंदन करीत राहावे! श्रीमान बाबासाहेब पुरंदरे हे असे व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभले हे सर्व मराठी लोकांचे मोठे भाग्यच आहे. बाबासाहेब म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास वर्तमानात प्रत्यक्ष उभा करण्याचे सामर्थ्य असलेले द्रष्टे वक्ते. बाबासाहेबांसारख्या व्यक्तिमत्वांमुळे इतिहासाची पाने हिऱ्यांसारखी लखलखतात. त्या प्रकाशातून जणू ते इतिहासपुरुष पुन्हा अवतरतात आणि नव्या पिढ्यांना मार्गदर्शन करीत राहातात.
बाबासाहेबांचे भाषण आम्ही सुमारे बारा वर्षांपूर्वी अणुशक्तीनगर च्या प्रशिक्षणार्थी छात्रावासाच्या मोठ्या आणि प्रशस्त हॉल मध्ये आयोजित केले होते. या मोठ्या सभागृहाला एकच प्रवेशद्वार होते. बाबासाहेबांच्या सभेचा एक नियम आहे. त्यांचे भाषण चालू असतांना मध्ये कुणी उठायचे नाही. खरंतर हा बाबासाहेबांच्या सभेचा नियम नसून तो कोणत्याही सार्वजनिक सभेचा शिष्टाचार आहे. मध्ये उठून जाणे हा व्यायापीठाचा आणि सर्वांचाच अपमान असतो. दुर्दैवाने आपल्या देशात हा साधा शिष्टाचार पाळावा असे प्रत्येक वेळा सांगावे लागते! त्या सभेत एका वैज्ञानिक महिलेने तो शिष्टाचार मोडला, त्यावेळी बाबासाहेब काही बोलले नाहीत. पण आम्हा आयोजकांना मात्र मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. बाबासाहेबांची तेंव्हाही आम्ही मनापासून क्षमायाचना केली होती, आज ही त्यांना सांगावयाचे आहे, बाबासाहेब, आपले भाषण ऐकण्याची देखील पात्रता नाही हो आमच्यात! त्या दिवशी बाबासाहेबांचे ते ओजस्वी भाषण ऐकले. प्रतापराव गुजरांच्या “वेडात दौडले सात मराठे वीर” हा प्रसंग त्यांनी डोळ्यासमोर शब्दांमधून उभा केला तेंव्हा अंगावर काटा उभा राहिला होता. त्वेष, दुःख, संताप आणि जाज्वल्य स्वराज्यनिष्ठा आणि महाराजांच्या संमिश्र भावना आम्हाला त्यादिवशी अदृश्य चलतचित्रपटाच्या पडद्यावर दिसल्या होत्या. बाबासाहेबांच्या शब्दांशब्दांतून जणू महाराजांचे बोल विजेसारखे कोसळत होते. ते भाग्य आम्हाला त्या दिवशी मिळाले. बाबासाहेब, हे आपले इतिहास ऋण उभा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही.
बाबासाहेबांनी लिहिलेले राजा शिवछत्रपती हे नितांतसुंदर चरित्र आहे. महाराजांच्या प्रतिबिंब असलेले हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाने वाचलेच पाहिजे. महाराजांचे चरित्र लोकांच्या समोर शब्दांमधून ठेवतांना ते शब्द हिऱ्यासारखे लखलखीत असले पाहिजेत. शब्द तेच असतात, शब्दांचे अर्थ शतकानुशतके बदलत देखील नसतात, तरीदेखील ते कोण, कसे आणि कुणाबद्दल वापरले जातात त्यावर खूप काही अवलंबून असते. शब्दांची धार बोथट होत नसते. बाबासाहेबांच्या या कादंबरीच्या अठराव्या आवृतीतील साठ वर्षांपूर्वी असलेला शब्दांचा ताजेपणा आत्ता उमललेल्या गुलाबकळी इतकाच ताजा आहे. बाबासाहेबांनी या चरित्राच्या सुरुवातीला जे “आवातन” लिहिले आहे, त्याला तोड नाही! महाराष्ट्र शारदेला त्यांनी वापरलेली विशेषणे नवनवोन्मेषशालिनी, चातुर्यकलाकामिनी, अभिनववाङगविलसिनी, वीणावादिनी आणि विश्वामोहिनी किती सुंदर साद घालीत आहेत ते लक्षात येते. मला खात्री आहे की महाराष्ट्र शारदेने त्यांना नक्कीच आशीर्वाद दिला आहे. ही सर्व विशेषणे एका वाक्यात वापरून बाबासाहेबांनी आपल्या प्रतिभेच्या आविष्काराची जी झलक पेश केली आहे ती वाचून पु. लं. नी त्यांना झालेला हर्ष वर्णन केला आहे. हे आवतान किती सुंदर आहे हे समजण्यासाठी ज्यांनी ते वाचले नाही ते जरूर वाचावे असे मला कळकळीने सांगायचे आहे. ते आवतान म्हणजे बाबासाहेबांनी विविध देवदेवतांच्या समोर ठेवलेले निमंत्रण आहे. भाषावैभवाचा हा एक उत्तम नमुना आहे.
बाबासाहेबांनी १९५०-५१ मध्ये शिवचरित्राची काही प्रकरण एकता मासिकात प्रसिद्ध केली. ती प्रकरणे त्या मासिकाने छापली पण त्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया येईनात म्हणून त्यांनी संपादकांना त्यासंबंधी विचारणा केली आणि संपादकीय प्रतिक्रिया मागितली. त्यावेळी संपादकानी त्यांना सांगितले, आम्ही तरी कुठे वाचतोय तू काय लिहिले ते! तू लिहितोस म्हणून आम्ही छापतो एव्हढेच! त्यांचे उपाध्याय वासुदेवकाका कवि यांनी आग्रह करकरून बाबासाहेबांना शिवचरित्र लिहिण्यास प्रेरित केले होते. त्यांच्याच सूचनेवरून मग त्यांनी आपली लेखन शैली बदलली आणि मग मात्र कधीच मागे वळून पाहिले नाही. आपल्या शब्दभंडारातून अचूक शब्दांची निवड करीत त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पैलूंची ओळख अतिशय सुंदर पद्धतीने करून दिली. वज्राहुनी कठोर, मेणाहून मऊ, मातृभक्ती, स्वप्नद्रष्टे, स्फूर्तिदाते, उत्तम प्रशासक, हिंदवी स्वराज्य संस्थापक अशा विविध चित्रांमधून बाबासाहेबांनी जे शब्दचित्र आपल्यापुढे उभे केले आहे ते खरोखरीच अतिशय अप्रतिम आणि अतुलनीय आहे.
बाबासाहेबांचे भाषावैभव महाराष्ट्राला नवे नाही. त्यांच्या लिखाणातून आणि त्यांच्या तेजस्वी भाषणांमधून ते प्रत्ययाला येत असते. खणखणीत आवाज कसा असतो, बुलंद आवाज कसा असतो, काळजात धडकी भरविणारा आवाज कसा असतो, आईसमोर नम्रपणे बोलण्याचा आवाज कसा असतो, सवंगड्यांमध्ये वीरश्री निर्माण करणारा आवाज कसा असतो, बादशाही तख्तासमोर न झुकणारा आणि स्वराज्य अभिमानाचा आवाज कसा असतो या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर, बाबासाहेबांचा आवाज! बाबासाहेब, आपल्या वाणीला सहस्त्र मुजरे अर्पण.
सत्तरच्या दशकात श्रीमान बाबासाहेब पुरंदरे, श्री शिवाजीराव भोसले, पु ल देशपांडे, दुर्गाबाई भागवत, पु. भा. भावे यांच्यासारख्या दिग्गजांची भाषणे ज्यांनी ऐकली त्यांनी मराठी भाषेचे वैभव खऱ्या अर्थाने अनुभवले. सुधीर फडके आणि गदिमा ह्या जोडीने गीतरामायण त्याच साठ सत्तर दशकाच्या काळात सादर करून मराठी मुगुटात कोहिनूर हिरा माळलेला होता. कुसुमाग्रज, बोरकर, महानोर, शांताबाई शेळके यांच्या कविता त्यावेळी ऐन भरात होत्या. वसंतराव देशपांडे, श्रीराम लागू, काशीनाथ घाणेकर, राजा गोसावी, शांता जोग, भक्ती बर्वे यांनी मराठी रंगभूमीला एका वेगळ्याच उंचीवर नेले होते. दूरदर्शन किंवा इंटरनेट नसून देखील आयुष्य रंगबिरंगी होते ते या सर्व प्रभावी कलाकारांमुळे. मराठी भाषेचे वैभव वाढविण्याचे मोठे कार्य बाबासाहेबांनी केले आहे. शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान चरित्रातून येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीला स्फूर्ती मिळत राहणार आहे. बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण आणि पद्मविभूषण या किताबांनी सन्मानित केले गेले. लौकिकार्थाने जरी हे सन्मान महत्वाचे असले तरी बाबासाहेबांसारख्या तेज:पुंज हिऱ्याला कसल्याच कोंदणाची गरज नाही हे खरे. हा खरा स्वयंभू हिरा!
बाबासाहेबांचा इंग्रजी तारखेप्रमाणे २९ जुलै हा जन्मदिवस. त्यांनी या वर्षी १०० व्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांना देवाने आता आपल्यातून नेले आहे. ह्या इतिहास तपस्वीने जीवनाची इतिकर्तव्यता पूर्ण केली आणि निजधामी जातांना कृतकृत्यता अनुभवली ह्याचा आनंदच आहे. जाणाऱ्या माणसाचा विरह क्लेशदायक असतोच. बाबासाहेबांच्या असंख्य चाहत्यांना खेद होणे अगदी स्वाभाविक म्हणावे लागेल. पण बाबासाहेब त्यांच्या तेजस्वी आणि ओजस्वी स्वरांमधून अमर झाले आहेत. त्यांना विनम्र श्रद्धांजली।
शुभास्ते पंथान: सन्तु।
—–//////——/////——- शरद काळे

 • – – – – – – – – – – –

भरपावसात महाबळेश्वरातून प्रतापगडावर सायकलवरून जाणारे शिवशाहीर, इतिहासकार,नाटककार आणि लेखक,महाराष्ट्र भूषण,सगळ्यांचे लाडके बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. भावपुर्ण श्रद्धांजली . (जन्म जुलै २९, इ.स. १९२२ )
वरील प्रसंग “त्रिपदी ” या गो नि दांडेकर यांचे पुस्तकातील आहे . गो नि दां एकदा महाबळेश्वराहून पुण्यास जाणेसाठी एस टी ने पुण्यास येण्यासाठी गाडीत बसले होते . त्यावेळी दुपारी २ नंतर महाबलेश्वराहून प्रतापगडाकडे जाणारी गाडी तेंव्हा नवती . गो नि दांचे लक्ष बाहेर गेले तर एक ओळखीचा चेहरा सायकलवर दिसला .त्यांचे लक्षात आले ते बाबासाहेब आहेत ,त्यांनी त्यांना साद घातली त्या व वेळी बाबासाहेबांनी सांगितले ते प्रतापगडाला एक ऐतिहासिक दस्त सापडला आहे तो आणण्या साठी ते पावसात सायकलवर निघाले होते.
बाबासाहेबांचेवर अनेक जणांनी टिका केली पण त्यांनी घेतलेले कष्ट टीकाकारांनी घेऊन दाखवावेत.
विवेकानंद शिलास्मारकला कोटी रुपये देणगी कोठेही नाव न घालणेचे अटीवर दिली
इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा-वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषणक्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये.
’बेलभंडारा’ या नावाने बाबासाहेब पुरंदरे यांचे सचित्र चरित्र डॉ.सागर देशपांडे यांनी लिहून प्रसिद्ध केले आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांना डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने D .lit या मानद पदवीने सन्मानित केले आहे
यशवंतराव चव्हाण यांनी बाबासाहेबांची राजा शिवछत्रपति या पुस्तकाच्या २०० प्रती मागवून घेतल्या होत्या.


अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला. अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारहि तितकाच उग्र आहे! पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्रि!
त्याच्या आवडीनिवडी आणी खोडी पुरूषी आहेत, त्याचे खेळणे-खिदळणेहि पुरूषी आहे, त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही कारण सह्याद्रि हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळा कभिन्न. रामोशा सारखा.
पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो!
आडदांड सामर्थ्य हेच त्याचे सौंदर्य!
तरीपण कधीकाळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजूक लेणी घातली,
त्याच्या अटिव अन् पिळदार देहाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून मराठी मुलुखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या, त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला, मनगटात किल्ले कोटांचे कडीतोडे घातले…
सह्याद्रीला इतके नटवले सजवले तरीपण तो दिसायचा तसाच दिसतो! रामोशासारखा ! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा! सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की, तेथून खाली डोकावत नाही, डोळेच फिरतात!
मुसळधार पावसात तो न्हाऊ लागला की, त्याच्या खांद्यावरून धो धो धारा खालच्या काळदरीत कोसळू लागतात आणि मग जो आवाज घुमतो, तो ऐकावा. सह्याद्रीचे हसणे, खिदळणे ते! बेहोश खिदळत असतो.
पावसाळ्यात शतसहस्त्र धारांखाली सह्याद्रि सतत निथळत असतो. चार महिने त्याचे हे महास्नान चालू असते. काळ्यासावळ्या असंख्य मेघमाला, त्याच्या राकट गालावरून अन् भालावरून आपले नाजूक हात फिरवित, घागरी घागरींनी त्याच्या मस्तकावर धारा धरून त्याला स्नान घालीत असतात. हे त्याचे स्नानोदक खळखळ उड्या मारीत त्याच्या अंगावरून खाली येत असते. त्याच्या अंगावरची तालमीची तांबडी माती या महास्नानात धूऊन निघते. तरी सगळी साफ नाहीच. बरीचशी.दिवाळी संपली की सह्याद्रीचा हा स्नानसोहळा संपतो. त्या हसर्‍या मेघमाला सह्याद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात. त्याच्या आडव्या भरदार छातीवर तो हिरवा गर्द शेला फारच शोभतो. कांचनाच्या, शंखासुराच्या, सोनचाफ्याच्या व बिट्टीच्या पिवळ्या जर्द फुलांची भरजरी किनार त्या शेल्यावर खुलत असते. हा थाटाचा शेला सह्याद्रीला पांघरून त्या मेघमाला त्याचा निरोप घेतात. मात्र जातांना त्या त्याच्या कानांत हळूच कुजबुजतात, “आता पुढच्या ज्येष्ठांत मृगावर बसून माघारी येऊं हं ! तोपर्यंत वाट पाहा !” रिकामे झालेले कुंभ घेऊन मेघमाला निघून जातात.दाट दाट झाडी, खोल खोल दर्‍या, भयाण घळी, अति प्रचंड शिखरे, उंचच उंच सरळ सुळके, भयंकर तुटलेले ताठ कडे, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, भीषण अन् अवघड लवणे, घातली वाकणे, आडवळणी घाट, अडचणीच्या खिंडी, दुर्लंघ्य चढाव, आधारशून्य घसरडे उतार, फसव्या खोंगळ्या, लांबच लांब सोंडा, भयाण कपार्‍या, काळ्याकभिन्न दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा !
असे आहे सह्याद्रीचे रूप. सह्याद्रि बिकट, हेकट अन् हिरवट आहे. त्याच्या कुशी-खांद्यावर राहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे. वाघांतहि आहे. कारण तेहि मराठ्यांच्याइतकेच शूर आहेत !सह्याद्रीच्या असंख्य रांगा पसरलेल्या आहेत. उभ्या आणि आडव्याहि.
सह्याद्रीच्या पूर्वांगास पसरलेल्या डोंगरामधील गल्ल्या फार मोठमोठ्या आहेत. कृष्णा आणि प्रवरा यांच्या दरम्यान असलेल्या गल्ल्यांतच चोवीस मावळे बसली आहेत. दोन डोंगर रांगांच्या मधल्या खोर्‍याला म्हणतात मावळ. एकेका मावळांत पन्नास-पन्नास ते शंभर-शंभर अशी खेडी नांदत आहेत.प्रत्येक मावळामधून एक तरी अवखळ नदी वाहतेच. सह्याद्रीवरून खळखळणारे तीर्थवणी ओढ्या-नाल्यांना सामील होते. ओढेनाले ते या मावळगंगांच्या स्वाधीन करतात. सगळ्या मावळगंगा हे माहेरचे पाणी ओंजळीत घेऊन सासरी जातात. या नद्यांची नावे त्यांच्या माहेरपणच्या अल्लडपणाला शोभतील अशीच मोठी लाडिक आहेत. एकीचे नाव कानंदी, दुसरीचे नाव गुंजवणी, तिसरीचे कोयना. पण काही जणींची नावे त्यांच्या माहेरच्या मंडळींनी फारच लाडिक ठेवलेली आहेत. एकीला म्हणतात कुकडी, तर दुसरीला म्हणतात घोडी ! तिसरीला म्हणतात मुठा, तर चौथीला वेलवंडी ! काय ही नावे ठेवण्याची रीत ? चार चौघीत अशा नावांनी हाक मारली की, मुलींना लाजल्यासारखें नाही का होत ?कित्येक मावळांना या नद्यांचीच नांवे मिळाली आहेत. कानंदी जेथून वाहते ते कानद खोरे. मुठेचे मुठे खोरे. गुंजवणीचे गुंजणमावळ, पवनेचे पवन मावळ, आंद्रेचे आंदरमावळ आणि अशीच काही.मावळच्या नद्या फार लहान. इथून तितक्या. पण त्यांना थोरवी लाभली आहे, गंगा यमुनांची.
सह्याद्रि हा सहस्त्रगंगाधर आहे. मावळांत सह्याद्रीच्या उतरणीवर नाचणी उर्फ नागली पिकते. नाचणीची लाल लाल भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा हे मावळचे आवडते पक्वान्न आहे. हे पक्वान्न खाल्ले की बंड करायचे बळ येते! भात हे मावळचे राजस अन्न आहे. आंबेमोहोर भाताने मावळी जमीन घमघमत असते. अपार तांदूळ पिकतो. कांही मावळांत तर असा कसदार तांदूळ पिकतो की, शिजणार्‍या भाताच्या पेजेवर तुपाळ थर जमतो. खुशाल वात भिजवून ज्योत लावा. नाजूक व सोन्यासारखा उजेड पडेल. महाराष्ट्राच्या खडकाळ काळजातून अशी ही स्निग्ध प्रीत द्रवते. मावळे एकूण चोवीस आहेत. पुण्याखाली बारा आहेत व जुन्नर-शिवनेरीखाली बारा आहेत.
मोठा अवघड मुलूख आहे हा. इथे वावरावे वार्‍याने, मराठ्यांनी नि वाघांनीच.

 • बाबासाहेब पुरंदरे

शिवरायमय झालेलं एक ध्यासपर्व संपलं…
पण संपलं तरी कसं म्हणावं….ओजस्वी, लखलखते शब्द….महाराष्ट्र धर्माचा प्रखर अभिमान….. सह्याद्रीवर अलोट प्रेम….. इतिहासाचा गाढा अभ्यास…. या सगळ्या रूपात तुम्ही असणारच आहात महाराष्ट्राच्या, मराठी माणसांच्या मनामनात…. 🙏🙏🙏

प्रवास शतकाचा
 
श्रावण महिना होता. पावसाची एक मोठी सर येऊन गेली. लगेच ऊनही पडलं. वडिलांनी आपल्या मुलांच्या हातात थोडे पैसे दिले. पिशवी दिली आणि सांगितलं की, बाबासाहेब आज आपल्याकडे श्री सत्यनारायणाची पूजा आहे तर, त्यासाठी लागणारं साहित्य मंडईतून घेऊन ये. त्या वेळी त्या मुलाचं म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांचं वय होतं आठ वर्षे. पिशवी आणि पैसे घेऊन ते मंडईत जायला निघाले खरे; पण ते मंडईत गेलेच नाहीत. इकडे पूजेची वेळ झाली तरी, त्यांचा पत्ताच नव्हता. मग शोधाशोध सुरू झाली, तेव्हा मुठीत पैसे आणि एका हातात पिशवी धरलेले बाबासाहेब भारत इतिहास संशोधक मंडळात कुठलंस एक मोठं पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत असताना सापडले.
वडिलांच्या लक्षात आपल्या मुलाचा कल कोठे आहे हे आलं आणि मनोमन त्यांना समाधान वाटलं. पुढे त्यांनी बाबासाहेब आणि त्यांच्या दोन भावांना अशा आपल्या तिन्ही मुलांना सिंहगड, तोरणा वगैरे किल्ले दाखवले आणि त्या वेळी बाबासाहेबांना किल्लयांबद्दल आणि त्या किल्ल्यांच्या ‘राजा’बद्दल म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो अभिमान वाटला, जे प्रेम दाटून आले, ते आजपर्यंत तसंच टिकून आहे.
वयाची गेली 92 वर्षे त्या एका विचाराने ते झपाटून गेले आहेत. शिवाजी महाराजांचं, त्यांच्या इतिहासाचं, त्यांच्या पराक्रमाचं, शौर्याचं, त्यांना जणू वेडच लागलं आणि वेड लागल्याशिवाय इतिहास निर्माण होत नाही. इतिहास हा अत्तराच्या थेंबातून आणि गुलाबजलातून निर्माण होत नाही. तो घामाच्या आणि रक्ताच्या थेंबांतून निर्माण होते. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा वेड्यांचा इतिहास आहे आणि ते वेड ज्यांनी मला लावलं त्या माझ्या आई-वडिलांबद्दल आणि शिक्षकांबद्दल मी अपरंपार कृतज्ञ आहे,’ अशी भावना आजही बाबासाहेब व्यक्त करतात.
पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण अशा असंख्य पुरस्कारांनी गौरवांकित झालेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे आपल्या देशाला ललामभूत ठरले, परंतु या सगळ्या पुरस्कारांनी गौरव होण्यासाठी नव्हे तर, छत्रपतींचा गौरवशाली इतिहास सर्वसामान्यांना, आबालवृद्धांना नेमकेपणाने माहीत होण्यासाठी. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत.
शिवाजी महाराज ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या सर्व ठिकाणी स्वतः बाबासाहेबांना जाण्यात मोठी धन्यता वाटली. तिथे जाण्यासाठी त्यांनी लाखो मैल प्रवास केला. ते अनेकदा पायी चालत गेले, सायकलवरून गेले, उन्हा -तान्हात, पावसात भिजत गेले. जिथे जिथे काही पुरावे सापडतील ती सगळी ठिकाणे त्यांनी पालथी घातली.
बरेचसे पुरावे गोळा करता आले. असंख्य कागदपत्रे जमा झाली. त्यातली जवळपास सगळीच मोडी लिपीतील होती. बाबांनी ती समजावीत यासाठी मोडी लिपी अवगत केली. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी प्रा. त्र्यं. श शेजवलकर यांच्यासारख्या अनेक विद्वान संशोधकांच्या ग्रंथांचा अभ्यास केला. ग.ह. खरे यांना बाबा गुरूथानी मानतात आणि या सगळ्यातून त्यांनी स्वतः शिवचरित्र लेखनाला सुरवात केली.
सुरवातीला ते ‘एकता’ नावाच्या मासिकातून प्रसिद्ध होत होते. नंतर त्यांनी अधिक सोप्या भाषेत लिहायला सुरवात केली आणि पुढे ‘राजा शिवछत्रपती’ हा एक हजार पानांचा अतुलनीय ग्रंथ तयार झाला. त्या ग्रंथाला भरपूर पुरस्कार लाभले. साहित्यसम्राट आचार्य प्र.के.अत्रे आणि लोकोत्तर विनोदी लेखक पु.ल. देशपांडे यांच्यासारख्या दिग्गजांनी या ग्रंथाचं प्रचंड कौतुक केलं. आजतागायत या ग्रंथाच्या लाखो प्रती छापल्या गेल्या आणि विकल्या गेल्या आहेत. अजूनही या ग्रंथाला प्रचंड मागणी आहे!
बाबा केवळ पुस्तक लिहून थांबले नाहीत तर, त्यांनी महाराजांचा इतिहास आपल्या व्याख्यानांमधून श्रोत्यांना सांगितला आणि तो जिवंत केला.
लहानपणी त्यांनी खूप कीर्तने ऐकली आणि स्वतः केलीदेखील. त्यामुळे त्यांना व्याख्यान कसं द्यायचं याचा एक धडाच मिळाला. याशिवाय त्यांना एक सवय होती. ती म्हणजे नकला करण्याची. ते उत्तम नकला करतात. पूर्वी नाटक पाहून घरी आल्यावर त्यातील पात्रांच्या ते नकला करत. वडिलांनी एकदा ते पाहिलं आणि ते एकदम म्हणाले ‘बाबासाहेब, तुम्हाला नट व्हायचंय? तर, मग केशवराज दादांसारखं व्हा!’
बाबांनी एकदा तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची अगदी त्यांच्यासमोरच नक्कल केली. त्या वेळी सावरकर बाबांना जे म्हणाले त्यामुळे बाबांचं आयुष्य बदलूनच गेलं. सावरकरांना बाबांनी त्यांची केलेली नक्कल आवडली, पण ते म्हणाले ‘आयुष्यभर अशाच दुसर्‍यांच्या नकला करत राहणार आहेस का? स्वतः च काहीतरी कर.’ ते ऐकून बाबांनी मग नकला करणं सोडून दिलं.
बाबा व्याख्यानाच्या बाबतीत सावरकरांना गुरूस्थानी मानतात. बाबांनी आतापर्यंत सुमारे 12,000 व्याख्याने दिली आहेत. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही (काही ठिकाणी हिंदीतून) त्यांची व्याख्याने झाली. एवढंच नव्हे तर, भारताबाहेर – परदेशात – इंग्लंड, अमेरिकेतही त्यांची व्याख्याने झाली आहेत.
‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाच्या छपाईसाठी लागणारे पैसे खूप होते. बाबांनी ते पैसे मिळवण्यासाठी इतर नामवंत लेखकांची पुस्तके गावोगावी जाऊन विकली अगदी हातात कोथिंबीरची गड्डी घेऊन रस्त्यावर उभ राहून ओरडून विकतात… तसे विकली ! कुठल्याही श्रमाला त्यांनी कमी लेखले नाही.
भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, परंतु गोवा, दीव-दमण मात्र पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. त्यासाठी गोवा मुक्तीसंग्रामात बाबांनी सुप्रसिद्ध गायक कै. सुधीर फडके यांच्याबरोबर भाग घेतला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी म्हणजे 1974 मध्ये बाबांनी दादरच्या शिवाजी पार्कवर ‘शिवसृष्टी’ निर्माण केली. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा लोकांना ‘याचि देही, याचि डोळा’ पाहायला मिळाला. ती ‘शिवसृष्टी’ पाहण्यासाठी देश-विदेशातील असंख्य रसिक आले होते .
याच सुमारास भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्वर-संगीताने नटलेली आणि नामवंत कवींच्या कवनांनी साकारलेली ‘शिवकल्याण राजा’ ही ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. त्यामध्ये बाबांनी केलेलं निवेदन प्रचंड गाजलं. ही ध्वनीमुद्रिका आज 47-48 वर्षे झाली तरी अजूनही लोकप्रिय आहे.
‘राजा शिवछत्रपती’ हा एक मोठा ग्रंथ तर त्यांनी लिहिलाच, पण त्याबरोबर आणखीही काही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांची एकूण संख्या 25 आहे. त्यातली काही पेशवाईत घडलेल्या घटनांच्या वर्णनाची पुस्तके आहेत. ‘महाराज’ हे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करणारे पुस्तक खूप गाजले. त्या पुस्तकात अर्ध्या पानात मोठे चित्र आहे व त्याखाली त्या चित्रातील प्रसंग बाबांनी त्यांच्या सुंदर शब्दांत वर्णन केला आहे. त्याचबरोबर ‘शेलारखिंड’ ही शिवकालावर आधारित कादंबरीही खूप लोकप्रिय ठरली. त्यावर ‘सर्जा’ या नावाचा चित्रपटही निघाला.
बाबा आपल्या या सर्व काळात लेखन, व्याख्यान यामध्ये सतत व्यग्र असत. आम्हा घरच्यांनाही ते फारसे भेटायचे नाहीत. सारखा त्यांचा प्रवास सुरू असे. एकदा ते रोमला गेले असताना त्यांनी एक प्रयोग नाटकाचा प्रयोग पहिला. आणि त्यांच्या मनात विचार सुरू झाला की, असा प्रयोग आपल्याला भारतात करायला हवा. ते त्या विचाराने अगदी झपाटूनच गेले आणि त्यातून ‘जाणता राजा’ हे महानाट्य निर्माण झालं. एका वेळी 200 कलाकार रंगमंचावर हे नाट्य सादर करतात, याशिवाय हत्ती, घोडे, उंट यांसारखे प्राणीही यात काम करतात.
या नाटकाचा हिंदी, इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आणि त्यांचे प्रयोग सबंध भारतभर इतकेच नव्हे तर, अमेरिकेतही झाले. प्रयोगांची संख्या 1200 एवढी झाली असेल. बाबा असे कीर्तिमान होत गेले तरी, वडीलमाणसांबद्दल, भावे स्कूल या त्यांच्या शाळेतील शिक्षकांबद्दल असलेला त्यांचा आदर किंचितही कमी झालेला नाही.
आज वयाच्या 100 व्या वर्षांत त्यांनी पदार्पण केले आहे; तरीही आपल्या तल्लख स्मरणशक्तीमुळे त्या सर्वांची, त्यंानी दिलेल्या शिकवणुकीची बाबांना आठवण आहे, हे विशेष!
बाबांच्या आयुष्याच्या प्रवासाची ही घोडदौड या वयातही थांबलेली नाही. पूर्वी घोड्यावर बसून ते प्रवास करत होते. ते थकल्याचे कधीच जाणवले नाही. ते कधीच निराश होत नाहीत. याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा हे त्यांच्या जगण्याचं कारण आहे. छत्रपतींच्या इतिहासाचा ध्यास त्यांनी घेतला आणि आयुष्यभर तो त्यांचा श्वासच झाला. शिवशाहीर ‘बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे’ म्हणजे आमचे बाबा आमच्या घराण्याचा इतिहास आहे, वर्तमान आहे आणि पिढ्यान्पिढ्यांसाठी कमावून ठेवलेलं नाव आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
पुण्यातील कात्रज रस्त्यावर 13 एकर जागेमध्ये ‘शिवसृष्टी’ उभारण्याचं काम त्यांच्या कल्पनेतून साकार होत आहे. त्यासाठी खूप धन आणि वेळेची आवशक्यता आहे. त्यासाठी बाबांना आणखी काही वर्षांचं आयुष्य लाभायलाच हवं. त्यांच्या ग्रंथविक्रीतून, व्याख्यानातून जे धन त्यांना समाजाकडून मिळालं, ते सगळं त्यांनी निरनिराळ्या शैक्षणिक, आरोग्य अशा विविध प्रकारच्या संस्थांना उदारहस्ते देऊन टाकलं.
शेवटी एकच म्हणावसं वाटतं की, बाबांनी शिवचरित्र नुसतं लिहलं, नुसती व्याख्यानं दिली असं नव्हे तर, ते शिवचरित्र जगले आहेत. त्यांचाबद्दल कितीही लिहिलं तरी, अपुरं वाटावं असं त्यांचं कर्तुत्व आहे. ते आदर्श आहे, अनुकरणीय आहे, त्यांच्या कार्यातून ते अजरामर झालेले आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास,
‘तृप्त मी शिवशक्तीच्या गानात झालो शारदे,
मागणे काहीच नाही, एवढे वरदान दे,
रक्त दे, मज खेद दे,
तुज अर्घ्य देण्या अश्रू दे !

 • डॉ. चित्रलेखा पुरंदरे 

https://www.shikshanvivek.com/Encyc/2021/11/15/pravas-shatakacha.htmlइतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा-वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषणक्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये.
’बेलभंडारा’ या नावाने बाबासाहेब पुरंदरे यांचे सचित्र चरित्र डॉ.सागर देशपांडे यांनी लिहून प्रसिद्ध केले आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांना डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने D .lit या मानद पदवीने सन्मानित केले आहे

वादात सापडलेले शाहीर

बाबासाहेब पुरंदरे: शिवचरित्र लोकांपर्यंत नेताना वादात सापडलेले ‘शाहीर’

तुषार कुलकर्णी बीबीसी मराठी प्रतिनिधी 26 जानेवारी 2019
बाबासाहेब पुरंदरे

(बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे निधन झालं. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला त्यावेळी हा लेख लिहिण्यात आला होता. तो पुन्हा शेअर करत आहोत.)

बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. 8.30 त्याचं पार्थिव त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. 10.30 वाजता त्यांची अंत्ययात्रा सुरू होणार आहे आणि वैकुंठ स्मशानभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

‘जर 125 वर्षांचं आयुष्य मिळालं तर शिवचरित्र ब्रह्मांडाच्या पलीकडे घेऊन जाईल,’ असा म्हणणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना भारत सरकारनं पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला. हा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल वाटणारा आनंद शब्दांत न सांगता येण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बाबासाहेब पुरंदरे यांना गेली अनेक दशके महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही शिवचरित्र नेण्याचे श्रेय त्यांना दिलं जातं. पण अनेक प्रसंगी त्यांना विरोध झाला आहे, त्यांच्या कामावर टीकाही झाली आहे.

बाबासाहेब पुरंदरे आणि शिवचरित्राचं नातं अतूट आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक आणि संशोधक असले तरी ते स्वतःला इतिहासकार म्हणवून घेत नाहीत. त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटणारे लोक त्यांना “शिवशाहीर” म्हणतात, पण त्यापुढे जाऊन ते म्हणतात की “मला काही म्हटलं नाही तरी चालेल. पण शिवचरित्र वाचा.”

“शिवभक्ती ही आपल्याला संस्कारातून आणि रक्तातूनच मिळाली आहे,” असं बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांचे चरित्रकार सागर देशपांडे यांना सांगितलं होतं. डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर ‘बेलभंडारा’ हे पुस्तक लिहिलं आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी लेखकाला सांगितलेल्या आठवणी तसंच पुरंदरेंच्या सहकाऱ्यांशी आणि नातेवाईकांशी बोलून देशपांडे यांनी हे चरित्र लिहिलं आहे.

बळवंत मोरोपंत पुरंदरेंचा जन्म 29 जुलै 1922ला झाला. सुरुवातीला त्यांच्या पुस्तकांवर हेच नाव असायचं, पण अवघा महाराष्ट्र त्यांना बाबासाहेब पुरंदरे याच नावाने ओळखतो.

लहानपणी वाढदिवसाला एखादं खेळणं, खाऊ किंवा फार फार तर आवडतं पुस्तक भेट म्हणून मिळावं, म्हणून अनेक जण हट्ट करतात. पण पुरंदरेंनी आपल्या आठव्या वाढदिवसाला वेगळाच हट्ट आपल्या वडिलांकडे केला. तो म्हणजे सिंहगड पाहायचा आहे.

या हट्टाला काय उत्तर द्यावं, त्यांच्या वडिलांना कळेना. पण त्यांनी त्यांचा हट्ट पुरवला. त्यांनी आपल्या वडिलांकडून शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरेंच्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्या कथा त्यांच्यासमोर जिवंत झाल्या, अशी आठवण ‘बेलभंडारा’मध्ये आहे.

एका मुलाखतीमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शाळेत त्यांनी भाषण दिलं होतं. त्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्यांच्या शिक्षकांनी त्यांना छातीशी धरलं आणि म्हटलं, “खूप अभ्यास कर आणि खूप मोठा हो.”

“तेव्हापासून आतापर्यंत त्यांचा संदेश आपण आपल्या मनावर कोरला आहे,” असं बाबासाहेब सांगतात. त्यांनी आतापर्यंत शिवचरित्राबरोबरच 50 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत.

पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असला तरी त्यांना विरोध करणाऱ्यांनी ‘महाराष्ट्र वैचारिकदृष्ट्या पेटवू’ असा इशारा दिला आहे

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका व्हीडिओद्वारे बाबासाहेब पुरंदरे यांच्या सन्मानाचा विरोध केला आहे. “या निर्णयामुळे शिवभक्तांच्या भळभळत्या जखमांवर सरकारनं मीठ चोळलं आहे. दर दोन चार वर्षांनी इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्यांचा सन्मान केला जातो,” असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आपण ‘महाराष्ट्र वैचारिकदृष्ट्या पेटवू’, असंही आव्हाड या व्हीडिओमध्ये म्हणाले आहेत.

‘सर्वांत लोकप्रिय संशोधक’
पुण्याचे इतिहासकार मंदार लवाटे सांगतात, “सात दशकांहून अधिक काळ त्यांनी शिवचरित्र लोकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं आहे. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात आले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांचं इतिहास संशोधनाचं कार्य अव्याहतपणे सुरू आहे.

“बाबासाहेब पुरंदरे हे संशोधक आहेत, यात संशयच नाही, पण त्याच बरोबर त्यांनी इतिहास सामान्यांना वाचता येईल, अशा भाषेत लिहिला. इतका अभ्यास आणि विशिष्ट भाषाशैली असलेली काही मोजकी उदाहरणं आहेत या क्षेत्रात होऊन गेली. जसं की सेतूमाधवराव पगडी किंवा य. न. केळकर. त्यांच्याप्रमाणेच पुरंदरे देखील आहेत.”

“त्यांच्या इतका लोकप्रिय संशोधक किंवा इतिहासकार मी तरी पाहिला नाही. पानटपरीवर सुद्धा त्यांचे फोटो लावलेले मी पाहिले आहेत. जितका लोक त्यांचा आदर करतात तितका आदर ते लोकांचा करतात. लहान मुलाला देखील ते आहो-जाहो करतात. कधी कुणाला नावं ठेवत नाही, फक्त लोकच त्यांच्यावर प्रेम करतात असं नाही त्यांचं देखील तितकंच प्रेम समाजावर आहे,” असं लवाटे सांगतात.

‘त्यांचं व्याख्यान ऐकून मी शिवमय झाले होते’
कथाकथन, व्याख्यान, नाटक, ‘जाणता राजा’ हे महानाट्य, पुस्तकं, विविध मालिकांसाठी संहिता लेखनात मार्गदर्शन अशा विविध माध्यमांतून त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र घराघरात पोहोचवलं. त्यांच्या व्याख्यानांना हजर राहणारे लोक त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात. “मी तेव्हा 23-24 वर्षांची असेल जेव्हा मी त्यांच्याकडून रायगडवर शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकलं. ऐकताना मी मंत्रमुग्ध होऊन गेले. ते अत्यंत पोटतिडकीनं सांगतात. ते चरित्र ऐकून मी शिवमय होऊन गेले,” असा अनुभव नाट्य दिग्दर्शक पद्मश्री राव सांगतात.

“शिवचरित्र प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं, त्यासाठी ते वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करतात. 97 व्या वर्षांतही ते तरुणांना लाजवेल या उत्साहाने काम करतात. आता जरी तुम्ही त्यांच्या घरी गेला तर ते वाचत बसलेले तुम्हाला आढळतील. त्यांना नवीन शिकण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर जे आपल्याला समजलं ते इतरांना समजावं, नवीन अभ्यासक, नवीन इतिहासकार तयार व्हावे असं त्यांना खूप वाटतं. त्यामुळे ते तरुणांना प्रोत्साहन देतात, त्यांना मदत करतात आणि त्यापेक्षा अधिक म्हणजे ते त्यांच्या कार्याला आशीर्वाद देतात,” असंही राव यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

राव या ‘शिवरुद्राचं दिग्विजयी तांडव’ या नाटकाच्या दिग्दर्शक आहेत. “ज्या वेळी या नाटकाची संहिता आम्ही पुरंदरेंना दाखवली तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, की हे नाटक लवकरच रंगमंचावर यायला हवं. त्यांनी जे प्रोत्साहन आणि आशीर्वाद दिले ते फार महत्त्वाचे वाटतं,” राव सांगतात.

इतिहास संशोधनाची पद्धत
‘गणगोत’मध्ये पु. ल. देशपांडे त्यांच्याविषयी लिहितात, “इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे; पण त्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधान करायचे नाहीत, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे.”

त्यांच्या इतिहास संशोधनाच्या पद्धतीबद्दल मंदार लवाटे सांगतात “त्यांची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे. शिवाजी महाराजांसंदर्भात कुठेही आलेला बारीक तपशील त्यांच्या लक्षात राहतात. त्यांच्या अभ्यासात सातत्य आहे. ते ‘हार्ड कोअर’ संशोधक आहेत पण शास्त्रीय पद्धतीने ते लिहिलं तर ते मोजक्या अभ्यासकापुरतंच मर्यादित राहतं असं त्यांना वाटतं म्हणून ते त्यांचा अभ्यास रंजक पद्धतीने मांडतात.”

महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद
2015 मध्ये महाराष्ट्र शासनाचा महराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना मिळू नये अशी मागणी देखील काही संघटनांनी केली होती.

‘दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हा असत्य इतिहास बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडला’, हा त्यांच्यावरील मुख्य आक्षेप त्यावेळी होता. “बाबासाहेब पुरंदरे यांनी दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, अशी भूमिका कुठेच घेतलेली नाही,” असं भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य पांडुरंग बलकवडे सांगतात.

त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर काही राजकीय पक्ष देखील समोरासमोर आले होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या निवडीवर विरोध दर्शवला होता तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुरंदरे यांचं समर्थन केलं होतं.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या 10 लाख रकमेपैकी फक्त 10 पैसे स्वतःकडे ठेऊन त्यात 15 लाख स्वतःचे घालून ती रक्कम पुरंदरे यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मदत म्हणून दिली होती.

‘सरकारचा निर्णय संशयास्पद’

बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्याचा निर्णय म्हणजे ‘निवडणुकीच्या काळात जाणीवपूर्वक केलेलं कार्य आहे,’ असं मत संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे.

बीबीसी मराठीकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, “लोक चिडले पाहिजेत, वाद निर्माण झाले पाहिजेत असा हेतू हा पुरस्कार देण्यामागे असावा. राजाशिवछत्रपती हा इतिहास नसून ती कादंबरी आहे. इतिहासाची उपलब्ध पुस्तकं असताना त्यांनी राजाशिवछत्रपतीसाठी त्यांचा वापर केला नाही. ‘राधामाधवविलासचंपू’, ‘बुधभूषण’, ‘शिवभारत’, ‘जेधेशकावली’ यांसारखी पुस्तकं आणि इतर पत्रव्यवहार उपलब्ध असूनही त्यांचा वापर या पुस्तकासाठी केला नाही. तसंच जेम्स लेनच्या लिखाणासाठी पूरक असं वातावरण त्यांनी तयार केले.

“जेम्स लेन आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे प्रकरण झाल्यावर त्यांनी आजवर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळेच आम्ही विरोध करत आहोत. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्यावेळेस राज्यभरात आम्ही 28 शिवसन्मान परिषदा घेतल्या होत्या. परंतु इतकं होऊनही पुन्हा त्यांना पुरस्कार देणं म्हणजे विशिष्ट विचारसरणीला पाठिंबा दिल्यासारखं मला वाटतं,” असं गायकवाड म्हणाले.

त्यांना स्वतःला काय वाटतं?
बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे इतर लोकांनी वाद केलेले आपल्याला दिसतील. पण ते स्वतःहून कोणत्या वादात अडकले, असं दिसत नाही. त्यांच्यात एक अलिप्तपणा आहे. स्वतःच्या कार्याकडे ते एका वेगळ्या दृष्टीने पाहतात असं वाटतं.

ते स्वतःच्या कार्याबद्दल ‘बेलभंडारा’मध्ये सांगतात, “मी जे काही केलं ते टीपकागदाप्रमाणे आहे. माझी स्वतःची बुद्धिमत्ता वा प्रतिभा मला स्वतःला कुठेच जाणवत नाही. जुन्या कागदपत्रातील आणि मावळी खेड्यापाड्यातील लोकांची भाषा मी जरा आलटून पालटून लिहिली आहे. लिहिलं आहे ते सत्यच आहे. पण माझं काय आहे? मी टीपकागद आहे. हा माझा विनय नाही प्रामाणिकपणा आहे.”

पद्मविभूषण मिळाल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे उत्तर दिलं, “छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकाळ यांचा शोध घेण्यासाठी सबंध आयुष्य वेचलेल्या एका विद्यार्थ्यांचा हा गौरव आहे. ज्या शिवचरित्रासाठी मी रानोमाळ हिंडलो, दऱ्याखोऱ्या भटकलो, कागदपत्रे गोळा केली, त्याचे अर्थ लावले त्या प्रदीर्घ अभ्यासाचा हा गौरव आहे. शिवचरित्राचा हा गौरव आहे.”


बाबासाहेब! 😢
काय म्हणतात अश्यावेळी? अनेक आठवणी आहेत. हात किंचित उंचावून तुम्ही ‘बाळ!’ इतकंच म्हणायचात. आपण चूक केलीये की कौतुकास्पद काही हे तेवढ्यातच कळून जायचे.
एवढ्या प्रचंड रंगमंचावरच्या एका कोपऱ्यात एका नृत्याच्या प्रवेशात एक गोष्ट राहून गेली. प्रवेश संपवून रंगमंचाच्या मागे उतरते आहे तोच तुम्हीही धावत तिथे पोचला होतात. ‘बाळ! गजरा राह्यला!’ एवढे तीनच शब्द. त्यादिवशी खरंतर आपण सगळेच शोकाकुल होतो, तुमच्या अंगाखांद्यावर वाढलेला विकी निघून गेला होता पुढे. पण त्यामुळे प्रयोगात कसूर होता कामा नये हे तेवढ्या एका कृतीत तुम्ही शिकवलेत. आजही मला बारीक सारीक गोष्टी नजरेआड करता येत नाहीत हे तुम्हीच शिकवलेले.
जाणता राजात रंगमंचावर जे घडायचं त्यापेक्षा ते घडवण्यासाठी मागे जे सर्व माणसाचं मिळून एका लयीत, एकाच शरीराचा सगळे जण भाग असल्यासारखं जे चालायचं ते मला अदभुत वाटायचं. सगळ्यांना एकत्र जोडून ठेवणारी ऊर्जा तुम्ही होतातच पण अश्या प्रयोगाचे स्वप्न बघणे हेच काहीतरी वेगळे होते.
रोजच्या प्रयोगाच्या आधी, तयार व्हायला सुरुवात करायच्या पूर्वी एक मिटिंग असायची. आदल्या दिवशीच्या प्रयोगाबद्दल काही सांगायचात. बारीक सारीक गोष्टी पक्क्या लक्षात असायच्या तुम्हाला आणि चुका, कौतुक दोन्ही आवर्जून सांगायचात. कौतुक जरा काकणभर जास्तच. आजच्या प्रयोगाच्या सूचना असायच्या. इतका मोठा माणूस रोज ठरवून तेवढा वेळ आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी देतो हे 17-18 वर्षाच्या मला फारच भन्नाट वाटायचं.
जाणता राजामुळे विक्रम गायकवाड ते निनाद बेडेकर अशी अनेक माणसे भेटली. करिअरची दिशा ते इतिहासाबद्दल प्रेम हे तिथेच मिळालं.
पुढे एका ठराविक विचारसरणीपासून मी खूप दूर निघून आले. पण तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रेम कधी कमी झाले नाही, होणार नाही.
तुमचे नाव आले की आजही मला तो आशिर्वादासाठी थोडासा उंचावलेला हात आणि अतिशय मृदू आवाजात ‘बाळ!’ म्हणणे हेच आठवते. ती शिदोरी आयुष्यभर पुरेल.

मानाचा मुजरा 🙏🙏🙏🌹🌹
आदरणीय बाबासाहेब …
तुमची व्याख्यानं ,पुस्तक वाचतचं आम्ही शाळा शिकलो ..शिवाजी महाराज आम्हांला तुमच्या व्याख्यानातूनच जास्त कळले.
व्याख्यानाला उभं राहताना सुरवातीलाच
“कोणीही विणकामाच्या सुया घेऊन स्वेटर विणत विणत व्याख्यानाला बसू नये हि विनंती …”अशी विनंती तुम्ही आवर्जुन करत असतं.
तसंच तुमचा सुरवात व शेवट करतानाचा तो त्रिवार मुजरा,तुमच्या मागे स्टेजवर तो लिहण्याचा फळा ,खडू ..त्यावर नकाशाद्वारे महाराज कुठल्या रस्त्याने गनिमी कावा करत आग्र्याहून सुटका करून घेतली व रंगीत खडूंनी महाराजांचे मुक्काम ,मार्ग अधोरेखित करत ,शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी कवि भूषण महाराजांच्या दरबारात जाऊन आपली कविता सादर करतात ती रचना तुमच्या तोंडून अत्यंत जोशपूर्ण ऐकतांना अंगावर शहारे यायचे ..
इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर,
रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर,
ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,
‘भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,
त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥
सेर शिवराज है
सेर शिवराज है
हे तुमच्या तोंडून ऐकतांना तर साक्षात असं वाटायचं सेर डरकाळ्या फोडत स्टेजवर महाराजांना मुजरा करतोय की काय न अंगावर सरसरून काटा यायचा .
‘श्रीमानयोगी ‘हा ग्रंथ मी तुमची व्याख्यानं ऐकून शालेय जीवनातच संपूर्ण वाचून काढला .
न माझ्या पुस्तकांच्या कपाटात अजुनही तो ग्रंथ तितक्याच दिमाखात उभा आहे.🙏
बाबासाहेब तुम्ही आमच्या मनातला ‘सिवा’ जिवंत ठेवला ..🙏
आमच्या मानाचे स्थान ,महाराष्ट्राचा अभिमान तुम्ही सतत जागृत ठेवला.🙏
जिजाऊ महारांजांच आपल्या महाराष्ट्रावरचं बरंचसं ऋण तुम्ही फेडलतं ..🙏
आजच्या आर्यन खानाचे सुटका झाल्यानंतरचे ढोल वाजवून स्वागत करणाऱ्या वाह्यात गोष्टींना विरोध करण्याचं सामर्थ्य तुम्हीच दिलंत …🙏🌹
खूप मोठे उपकार आहेत तुमचे आमच्यावर ..इतके अभिरूचीपूर्ण बालपण आम्हांला तुमच्यामुळे मिळालं …
आमची पिढी घडवण्यात तुमचा खूप मोठा वाटा आहेत…
शिवाजी महाराजांच वेड लावलतं तुम्ही आम्हांला बाबासाहेब 🙏🌹
‘जाणता राजा ‘हे तुमचं महानाट्य म्हणजे आम्हां शिवप्रेमींसाठी एक सुंदर पर्वणी होती..
‘दार उघड बये दार उघड’ म्हणत गागाभट्टांचा ते तुळजा भवानीला आर्त साद घालत , साक्षात जिवंत हत्ती ,घोडे स्टेजवर धावत ..व सरतेशेवटी राज्याभिषेकाचा नयनरम्य ,अद्भूत सोहळ्याचं नाट्य बघताना एक अलौकिक आनंद व रोमांच उभ राहत असे .
👏🏻👏🏻👏🏻🙏🙏
साहित्य प्रसारचे कुलकर्णी काका हे आमचे परिचित होते त्यांचे तुमचे घनिष्ट संबंध होते .त्यांच्यामार्फत तुम्हांला भेटण्याची खूप इच्छा होती …राहून गेलं ..😞
पण तुमच्या व्याख्यानातून न पुस्तकांतून तुम्ही सतत भेटत राहिलात न राहाल ..🙏
शिवासारखा राजा परत होणे जसं शक्य नाही तसंच आदरणीय बाबासाहेब पुरंदऱ्यांसारखा ‘ इतिहासकार साहित्यिक शिवप्रेमी मावळा ‘ह्या महाराष्ट्राला पुनःश्च लाभणे पण शक्य नाही ..🙏
प्रौढ़प्रताप, पुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक, हिन्दवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलभूषण, सिन्हासनाधिश्वर, राजा धिराज, महाराज, योगिराज, श्रीमंत, श्री छत्रपति शिवाजी महाराज की, जय..! जय भवानी, जय शिवाजी… 🙏🙏

भावपूर्ण श्रध्दांजली !!🙏🙏🌹😞

Aarti Mahajan