समर्थ रामदास, दासबोध आणि सज्जनगड

 

समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेला महान ग्रंथ दासबोध आणि त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला सज्जनगड यासंबंधीची माहिती आणि कांही दुर्मिळ अशी चित्रे या भागात संकलित केली आहेत.

१. दासबोध,     २.दुर्मिळ चित्रे,    ३. रामदासस्वामी,   ४.समर्थांची पत्रे,  ५.शिकवण,    ६.सज्जनगड  ७.समर्थांचे अकरा मारुती    ८.टाकळी मारुती मंदिर    ९.सुखकर्ता दुखहर्ता संपूर्ण आरती  १०.दोन नवे लेख  ११.समर्थ रामदास  १२.दासबोधाचे लेखन  १३.मनाचे श्लोक  १४.नृसिंहपंचक

 

१. दासबोध

https://anandghan.blogspot.com/2009/02/blog-post_18.html या स्थळावरील लेखात मी दासबोधाबद्दल विस्ताराने लिहिले आहे. त्यातला सारांश असा आहे.
कांही इतर धार्मिक ग्रंथांप्रमाणे हा फक्त संन्यस्त वृत्तीने आध्यात्मिक विचार सांगणारा ग्रंथ नाही. यात अनेक प्राचीन धार्मिक ग्रंथांमधील विचारांचे सार आहे. त्यात दहा समासांचे एक दशक अशी वीस दशके आहेत. आत्मा परमात्मा वगैरेबद्दल सांगणाऱ्या अध्यात्माच्या विषयांशिवाय मू्र्खलक्षणे, शिकवण आदि नांवाची दशके आहेत. त्यांत सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनात मार्गदर्शन करेल, अगदी आजच्या युगात उपयुक्त वाटेल असे खूप कांही यात आहे. यात काय काय समाविष्ट आहे ते समर्थांनी स्वतःच ग्रंथारंभलक्षणनाम समासात विस्तृतपणे दिले आहे. त्यामधील कांही ओव्या त्यांच्याच शब्दात खाली देत आहे. समर्थांनी सोपी भाषा वापरलेली आहे. ती समजायला कठीण वाटू नये असे मला वाटते.

।। श्रीराम।।
श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिले जी येथ । श्रवण केलियाने प्राप्त । काय आहे ।।१।।
ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ।।२।। नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिले वैराग्याचे लक्षण । बहुधा अध्यात्मनिरोपण । निरोपिले ।।३।।
भक्तिचेनयोगे देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । इये ग्रंथी ।।४।।
मुख्यभक्तीचा निश्चय । शुद्धज्ञानाचा निश्चय । आत्मस्थितीचा निश्चय । बोलिला असे ।।५।।
नाना किंत संवारले । नाना संशयो छेदिले । नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ।।१२।।
नाना ग्रंथांच्या संमती । उपनिषदे वेदांत श्रुती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेसहित ।। १५।।
नाना संमती अन्वये । म्हणोनि मिथ्या म्हणता नये । तथापि हे अनुभवासि ये । प्रत्यक्ष आता ।।१६।।
शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता । उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणि वेदांत ।।१८।।
भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता पांडवगीता । गणेशगीता यमगीता । उपनिषदे भागवत ।।१९।।
इत्यादिक नाना ग्रंथ । संमतीस बोलिले येथ । भगवद्वाक्ये यथार्थ । निश्चयेसी ।।२०।।
भगवद्वचनी अविश्वासे । ऐसा कवण पतित असे । भगवद्वाक्याविरहीत नसे । बोलणे येथीचे ।।२१।।
पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरे करी ।।२२।।
अभिमाने उठे मत्सर । मत्सरे ये तिरस्कार । पुढे क्रोधाचा विचार । प्रबळ बळे ।।२३।।
ऐसे अंतरी नासला । कामक्रोधे खवळला । अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ।।२४।।
आता श्रवण केलियाचे फळ । क्रिया पालटे तत्काळ । तुटे संशयाचे मूळ । येकसरां।।२८।।
मार्ग सापडे सुगम । नलगे साधन दुर्गम । सायुज्यमुक्तीचे वर्म । ठाई पडे ।।२९।।
नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथे ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे फळश्रुती । इये ग्रंथी ।। ३० ।।
जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेचि प्राप्त ।। ३८।।
———————————————————————————————-

२. दुर्मिळ चित्रे

दासबोध वाचणाऱ्या, ऐकणाऱ्या, आवडणाऱ्या, त्याविषयी आस्था असणाऱ्या, तो आचरणाऱ्या अशा सर्वांसाठी एक अत्यंत मोलाचा खजिना उपलब्ध करीत आहोत…

सोबत तीन चित्रे जोडलेली आहेत…

१) समर्थांचा मूळ दासबोध ठेवलेली पेटी

दासबोध ३
२) मूळ दासबोधाची पोथी कल्याण स्वामींनी शिवथर घळीत लिहिली होती. समर्थ रामदास ते शिष्यांना सांगत असतांना …

दासबोध २
३) मूळ दासबोध प्रतीतील पहिले पान

दासबोध १

अवश्य दर्शन घ्या व आप्तेष्टांनाही घडवा! आज कल्याण स्वामींची ३०० वी पुण्यतिथी आहे, हे दर्शन घ्यायला सर्वांनाच आवडेल!

सौजन्य: श्री समर्थ वाग्देवता मंदीर धुळे व श्री कल्याणस्वामी मठ संस्थान डोमगाव

———————————————————————-

दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी सांगितलेली मूर्ख आणि उत्तम माणसांची लक्षणे खाली दिलेल्या लेखामध्ये दिली आहेत.
दासबोधात सांगितलेली लक्षणे -१ मूर्खलक्षणें
https://anandghare.wordpress.com/2013/03/05/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/

दासबोधात सांगितलेली लक्षणे -२ पढतमूर्खलक्षणें
https://anandghare.wordpress.com/2013/03/05/%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4-2/

दासबोधात सांगितलेली लक्षणे -३ उत्तमलक्षणे
https://anandghare.wordpress.com/2013/03/05/%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4-3/


३. समर्थ रामदासस्वामी

Samarth_Ramdas_swami

शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।।
कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ।।
जयजय रघुवीर समर्थ ।।
हे तीन गुण ज्या समर्थांच्या अंगी एकवटले होते ते अलौकिक व्यक्तीमत्वच असणार! लग्नाच्या बोहल्यावर उभे असतांना त्यांनी मंगलाष्टकामधले “शुभमंगल सावधान” हे शब्द ऐकले आणि लगेच सावध होऊन आपल्या आयुष्याला वेगळ्या मार्गावर नेले. त्यानंतर विविध प्रकारची मोठमोठी कामे करून समाधी घेतली. त्यांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो दिवस दरवर्षी रामदासनवमी या नांवाने साजरा केला जातो. त्यांच्या जीवनावरील माझा लेख या स्थळावर दिला आहे.
https://anandghan.blogspot.com/2013/03/blog-post.html
———————————————————-

४. समर्थांची पत्रे

समर्थ रामदासांनी छत्रपति शिवाजी महाराजांना लिहिलेले एक महत्वाचे पत्र खाली दिले आहे. त्यामधील पहिले अक्षर घेतले तर त्यामधून एक महत्वाचा संदेश किती खुबीने पाठवला आहे हे लक्षात येईल.
विवेके करावे कार्य साधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूडील भविष्यार्थी मन ।
रहाटेचि नये ।
चालु नये असन्मार्गी ।
सत्यता बाणल्या अंगी ।
रघुवीरकृपा ते प्रसंगी ।
दासमहात्म्य वाढवी ।
रजनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।
आदिमाया मूळभवानी ।
हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
येकान्ती विवेक करोनी ।
इष्ट योजना करावी ।
यात अफझलखानाच्या स्वराज्यावरील स्वारीची बातमी दिली आहे.


समर्थ रामदास स्वामींचे पत्र (Wikipedia मधून उद्धृत)

हे पत्र समर्थ रामदास स्वामींनी छत्रपति संभाजी राजांना  लिहिले आहे. यावरील माझे विचार मी या अनुदिनीवर दिले आहेत.
https://anandghan.blogspot.com/2009/02/blog-post_19.html

अखंड सावधान असावें । दुश्चित्त कदापि नसावें।
तजविजा करीत बसावें । एकांत स्थळी ॥ १॥
कांहीं उग्र स्थिति सांडावी । कांहीं सौम्यता धरावी।
चिंता लागावी परावी । अंतर्यामीं ॥ २॥
मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे।
सुखी करूनि सोडावे । कामाकडे ॥ ३॥
पाटवणी तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना।
तैसें सज्जनांच्या मना । कळलें पाहिजे ॥ ४॥
जनाचा प्रवाह चालिला । म्हणजे कार्यभाग आटोपला।
जन ठायीं ठायीं तुंबला । म्हणजे खोटां ॥ ५॥
श्रेष्ठीं जें जें मिळविलें । त्यासाठीं भांडत बसलें।
मग जाणावें फावलें । गलिमांसी ॥ ६ ॥
ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिस-यासी जय।
धीर धरोण महत्कार्य । समजून करावें ॥ ७ ॥
आधींच पडला धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती।
याकारणें समस्तीं । बुद्धि शोधावी ॥ ८ ॥
राजी राखितां जग । मग कार्यभागाची लगबग।
ऐसें जाणोनियां सांग । समाधान राखावें ॥ ९ ॥
आधीं गाजवावे तडाके । मग भूमंडळ धाके।
ऐसें न होतां धक्के । राज्यास होती ॥ १० ॥
समय प्रसंग ओळखावा । राग निपटून काढावा।
आला तरी कळों न द्यावा । जनांमध्यें ॥ ११ ॥
राज्यामध्ये सकळ लोक । सलगी देऊन करावे सेवक।
लोकांचे मनामध्यें धाक । उपजोंचि नये ॥ १२ ॥
आहे तितुकें जतन करावें । पुढें आणिक मिळवावें।
माहाराष्ट्रराज्य करावें । जिकडे तिकडे ॥ १३ ॥
लोकीं हिंमत धरावी । शर्तीची तरवार करावी।
चढती वाढती पदवी । पावाल येणें ॥ १४ ॥
शिवराजास आठवावें । जीवित्व तृणवत् मानावें।
इहपरलोकी रहावें। कीतीर्रूपे ॥१५॥
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥
शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥
शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥
शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥१७॥
सकळ सुखांचा त्याग । करून साधिजे तो योग ॥
राज्यसाधनाची लगबग । कैसी असे ॥१८॥
त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥
———————————————————-

५. समर्थ रामदासांनी दिलेली शिकवण

केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’ हे समर्थ रामदासांचे सुप्रसिद्ध वचन माझी आई दर दहा पंधरा दिवसांत एकदा तरी मला ऐकवायचीच. एकादे काम हाती घेतल्यावर ते फक्त यायलाच लागत असे एवढेच नव्हे तर ते मनापासून आवडू लागे. या अनुभवाचा मला पुढील आयुष्यात खूप उपयोग झाला. मी मराठीमध्ये ब्लॉग सुरू केली तेंव्हा समर्थ रामदासांचेच दुसरे सुप्रसिद्ध वचन “जे जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे, शाहाणे करून सोडावे सकळ जन ” माझे बोधवाक्य झाले.
“मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥ स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ।। ” हे रामदासांचे आणखी एक सुवचन आहे. कुणीही कांहीही म्हंटले तरी आपण आपली शांतगंभीर वृत्ती सोडता कामा नये हा त्यांचा उपदेश समोर असला म्हणजे टीका आणि कुचेष्टा यांनी विचलित न होता मनावर ताबा ठेवायला त्याचा उपयोग होतो. “सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे।।” म्हणजेच ” उद्यमेन हि सिद्धंति कार्याणि न मनोरथै।” हे सुभाषित अत्यंत प्रेरणादायक आहे. रामदासांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांमधील काही ओळी आता म्हणी किंवा वाक्प्रचारांसारख्या झाल्या आहेत. अशा प्रकारे चारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी दिलेली शिकवण आमूलाग्र बदललेल्या आजच्या परिस्थितीमध्येसुध्दा कशी त्रिकालाबाधित किंवा अजरामर आणि मोलाची आहे हे मी या लेखात लिहिले आहे.

https://anandghan.blogspot.com/2013/03/blog-post_5.html


६.सज्जनगड

हा किल्ला सातारच्या नैऋत्येस सहा मैलावर आहे. उंची १०४५ फूट. शिलाहारांनी तो दहाव्या अकराव्या शतकांत बांधला असावा.
१६६२ मध्ये अफझलखानाचा मुलगा येथे किल्लेदार होता.

२/४/१६७३ – शिवाजी महाराजांनी विजापूरकरांकडून हा किल्ला घेतला व समर्थ येथे पौष शुद्ध नवमी १५९५ ह्या दिवशी कायमचे रहावयास आले. त्यामुळे पुष्कळ संत, साधु येथे येवू लागले त्यामुळे सज्जनगड हे नांव पडले. जिजोजी काटकर नावाचा किल्लेदार महाराजांनी येथे नेमला. महाराजांनी हा किला समर्थांना इनाम दिला.

कर्नाटक स्वारीवर जाण्यापूर्वी शहाजी राजे सहकुटुंब येथे येवून समर्थांना भेटून गेले.

१६९९ – औरंगजेबाने सातारच्या किल्ल्यास वेढा घातला असता परशुराम त्र्यंबक प्रतिनिधीने तेथून धन्य वगैरे मदत पाठवून सातारचा वेढा चालू ठेवण्यास मदत केली. सातारा पडलेनंतर लागलीच १७०० च्या जून मध्ये मोगलांनी वेढा वाढवून दीड महिन्यानंतर हा किल्ला घेतला. वेढ्याचा सेनापति रुहुलाखान बक्षी होता. पहिला हल्ला भिकाजी जाधव व गोविंद महादेव गोडबोले यांनी परतवला. परशुराम त्रिंबक हा किल्ला लढवित होते. परशुराम त्रिंबकांनी हा किल्लापडण्यापूर्वीच वासोटा किल्ल्यावर येथील राममूर्ती नेवून सुखरुप ठेवली व समाधी शिळेने बंद करुन टाकली. त्यामुळे ती शाबूत राहिली.
किल्ला घेतलेवर औरंगजेबाने नौरसतारा हे नांव किल्ल्याला दिले. जुने नांव आश्वलायनगड होते. त्याचेच अपभष्टरुप अस्वलगड असे झाले.

१६७८ मध्ये शिवाजी महाराजांनी संभाजीला समर्थांच्या सान्निध्यात त्यांच्या स्वभावात सुधारणा व्हावी म्हणून येथे ठेवले. संभाजीबरोबर त्याची पत्नी येसूबाई व मुलगी भवानी ह्या दोघीजणी होत्या . सुमारे महिनाभर राहून संभाजी सहकुटुंब येथून निघून गेले.

१६८० – पौष शुद्ध ९ ते माघ शुद्ध १५ पर्यंत शिवाजी महाराज येथे समर्थांच्या सान्निध्यात होते. समर्थांबरोबर अध्यात्म वगैरे विषावर चर्चा झाली. समर्थांनी महाराजांचा अंतकाळ जवळ आला आहे असे सूचित केले. (३१/१२/७९ ते ४/२/८०)

समर्थांनी अंगापूरच डोहांत सापडलेली आंग्लाईची मुर्ती येथे स्थापन केली. येथील आग्नेय कोपर्यात समर्थ जपास बसत. तेथेच जवळ असलेल्या पिसा बुरुजावर समर्थांची व शिवाजी महाराजांची खलबते होत. येथे समर्थांची वार्याने उडवलेली छाटी आणणसाठी कल्याणानी कड्यावरुन उडी मारली ती जागा जवळच आहे. येथेच ध्वज लावीत असत. किल्ल्याच्या पश्चिम टोकाला एक मारुती समर्थांनी स्थापन केला. त्याला धाब्याचा मारुती म्हणतात.

शिवाजी महाराजांचे मृत्यूने समर्थांना अत्यंत दु:ख झाले. त्यांनी संभाजीना येथुन एक पत्र लिहिले.

शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा साक्षेप |
शिवरायांचा आठवावा प्रताप | भूमंडळी ॥

संभाजींचे उत्तर आले –
‘‘आज्ञा प्रमाण,’’ व शके १६०३ च पौषांत संभाजी समर्थ दर्शनास येवून गेले

शके १६०३ च्या माघ कृष्ण पंचमीस तंजावर येथून व्यंकोजी राजांनी मल्हारराव लिंबदेव थेऊरकर व केशव गोसावी ह्यांचबरोबर धाडलेल्या श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती आणल्या . त्या पाहून समर्थांना समाधान झाले. आपल खोलीतच त्या ठेवून समर्थांनी त्यांची यथासांग पूजा केली. नऊ दिवस समर्थांनी अन्न, पाणी वर्ज केले होते. माघ वद्य नवसीस श्रीराम मुर्तीकडे ध्यान लावून पद्मासन घालून समर्थ बसले व या जगाचा निरोप त्यांनी घेतला.
२००० होन खर्चून शिवाजी महाराजांनी येथे एक मठ बांधलेला होताच. त्याच्या उत्तरेस एक मोठा खळगा होता. तेथेच समर्थांचे मानसपुत्र व प्रथम शिष्य उद्धव गोसावी ह्यांनी समर्थांच देहावर अग्निर्काय केले. (शके १६०३)

नंतर संभाजी महाराजांनी रामचंद्रपंत अमात्यांकर्वि राजगुरुचे प्रतिष्ठेस शोभेल असा दानधर्म केला. दहनस्थळी समाधी बांधून चंदनाचा ओटा समर्थ शिष्य तारळेकर गोसावी यांच्या कडून करवून पादुका स्थापन केल्या. समाधीवर रामाची स्थापना करुन शिष्यांनी लहानसे देऊळ बांधले. नंतर संभाजी महाराजांनी सभामंडप व देऊळ रामचंद्रपंत अमात्यानकर्वि बांधले. (१६८१)

सदर मंदिराची दुरुस्ती १८०० व १८३० साली वाई तालुक्यातील शिरगावच परशुराम भाऊंनी केली. मंदिराच्या ओवर्या यवतेश्वराचे वैजनाथ भागवतांनी बांधल्या .
समर्थांनंतर त्यांच्या शिष्या आक्का उर्फ चिमणाबाई देशपांडे यानी येथील व चाफळ व अन् ठिकाणचा कारभार चाळीस वर्षे केला. सव्वा दोन तपानंतर त्यांनी समर्थांचे पुतणे रामजीचे सुपुत्र गंगाधर यांचेकडे देवस्थानची सर्व व्यवस्था सोपविली. मंदिराचे पाठीमागील ओवरीत नारायण महाराज सासवडकर आणि वायव्य कोपर्यात वेणाबाईची समाधी व वृंदावन आहे. (शके चैत्र शुद्ध १४, १६३०)
मंदिराचे पुढील बागेच उत्तरेस आक्कांची मठी व समाधी आहे. (कार्तिक शुद्ध १,१६४३)

येथील मठांत समर्थांसंबंधीच खालील वस्तु दर्शनार्थ ठेवण्यात आल्या आहेत. समर्थांचे वडिलांचे, कुलकर्णीपण सोडून देवून श्रीराम चरणी वाहिलेले पितळेचे कलम दान, समर्थांच्या चंदनाच्या पादुका, कुबडी, काठी, व बुद्धिबळाची पिवळी मोहरी, शिवाजी महाराजांनी दिलेला पितळी खुरांचा पलंग, समर्थांचे व्याघ्रांबर , वल्कल, शिरोभूषण, पिकदाणी, समर्थांनी रामाची मूर्ति आल्यावर ज्या ठिकाणी ठेवून मुर्तीची पूजा केली तो देव्हारा. कल्याणस्वामी उरमोडीचे पाणी भरुन आणीत तो हंडा. चंदनी पादुका दत्ताने माहूर येथे त्यांना दिल्या होत्या.
शिवाजी महाराजांचे मृत्युनंतर तर सहा महिने ज्या घळीत समर्थांनी वास्तव्य केले ती घळ पूर्वेकडे तटाखाली आहे.

शाहूची रक्षा विरुबाई हिने समर्थांचे समाधी समोर आपले नावाचे एक तुळशीवृंदावन बांधले.

कलुषाने बाळाजी आवजी चिटणीस व त्याचा भाऊ शामजी बाळा आवजी याना उरमोडी काठी ठार मारले व त्यांची मालमत्ता जप्त केली.

१८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला घेतला व येथे एक एतद्देशिय शिपायांची तुकडी ठेवली होती.

१८५७ मध्ये रंगोबापूजी गुप्ते येथे सहा आठवडे येवून राहिले होते . भोरकडून येणारे व सातारचे त्यांचे बंडात सामिल झालेले अनुयायी एकत्र करुन उठाव करण्याचा त्यांचा बेत होता. तो फसला. रामोशी, मांग वगैरे लोकांच्या तुकड्या त्याने तयार केल्या होत्या.

किल्ल्याच्या पायथ्याशी परळी गांव आहे. त्याचे वायव्येस दोन प्राचीन हेमाडपंती देवळे आहेत. दक्षिणेकडील देऊळ जास्त जुने व ओसाड आहे. उत्तरेकडील देऊळ चांगले स्थितीत आहे. मुसलमानांनी उद्ध्वस्त केल्यावर हे बांधले गेले. ह्या दोन मंदिरांचे बांधणीवरुन हा किल्ला मुसलमानांच्या पूर्वीचा असावा असे वाटते.

मीरजेचे देशपांडे घराण्यातील वेणाबाई याना लग्नाचे दिवशीच वैधव्य प्राप्त झाले. पुढे त्या समर्थांच्या शिष्या झाल्या . त्यांनी सीतास्वंयवर , निवृत्तिराम वगैरे ग्रंथ लिहिले आहेत. त्या शके १६०० चैत्र वद्य चतुर्दशीला येथे समाधिस्थ झाल्या . त्यांची येथे समाधी आहे.

परळी गावांत महारुद्रस्वामीची समाधी उरमोडीच्या घाटावर आहे. केदारेश्वराचे मंदिर फार जुने आहे. १८६१ मध्ये संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो ह्या विश्वासू सेवकास परळी गांवी हत्तीच पायी दिले.

गो रा माटे यांच्या असा घडला सातारा या पुस्तकातून
लेखक संकलक : श्री माधव विद्वांस

फेसबुकवरून साभार


७.समर्थ रामदास स्वामी स्थापित मारुती

रामदासांचे ११ मारुती
शिष्यांना आणि लोकांना एकत्र आणून त्यांच्यात परस्पराविषयी आत्मियता निर्माण व्हावी म्हणून समर्थांनी रामजन्माचे व हनुमान जयंतीचे उत्सव सुरु केले. अशा उत्सवांसाठी त्यांनी मोक्याच्या ठिकाणी ११ मारुतींची स्थापना केली. त्यापैकी ७ मारुती सातारा जिल्हयात आहेत ते खालील प्रमाणे-

१ )शहापूरचा मारुती शके १५६६ मध्ये स्थापन झालेला आहे. कराड-मसूर रस्त्यावर सुमारे नऊ ते दहा कि.मी अंतरावर शहापूरचा फाटा असून मुख्य रस्त्यापासून मारुतीचे मंदिर दोन फर्लांग आत आहे. येथील मारुतीची मूर्ती चुन्यापासून बनविलेली आहे, म्हणून चुन्याचा मारुती म्हटले जाते. मूर्तीची उंची ६ फूट आहे.

२ )महारुद्र मारुती मसूर :
मसूरच्या ब्रम्हपुरी भागात शके १५६६ मध्ये या मारुतीची स्थापना केली. समर्थस्थापित अकरा मारुतीत ही सर्वात देखणी मुर्ती आहे.

३ )दास मारुती चाफळ :
श्रीरामाच्या समोर दोन्ही कर जोडून उभा असलेला हा मारुती म्हणजे श्रीरामासमोर नम्रपणे उभा असलेला दूतच आहे. रामचंद्रासमोर नम्र हनुमंतांची मूर्ती असली पाहिजे म्हणून समर्थांनी सुंदर दगडी मंदिर बांधून त्यात दास मारुतीची स्थापना केली. मूर्तीची उंची ६ फूट आहे. दासमारुतीसाठी समर्थांनी बांधलेले मंदिर आज ही उत्तम स्थितीत आहे.

४ )खडीचा मारुती शिगणवाडी :
शके १५७१ मध्ये या मूर्तीची स्थापना झाली. सव्वा तीनशे वर्षापूर्वीच्या या मारुतीला खडीचा मारुती अथवा बालमारुती असेही म्हणतात.

५ )मठातील मारुती उंब्रज :या मारुतीची स्थापना शके १५७० मध्ये झाली. समर्थ रामदास चाफळहून रोज उंब्रज येथे स्नानाला जात म्हणून येथे मारुतीची स्थापना झाली. समर्थांनी मारुती मंदिर व त्या पाठोपाठ मठ ही स्थापना केला. हा मारुती समर्थांच्या अकरा मारुतीतील सर्वात वयाने लहान असलेला बाल मारुती वाटतो.

६ )माजगांवचा मारुती, माजगांव : चाफळपासून दीड मैलाच्या अंतरावर माजलगाव या गावी हा मारुती आहे. या मारुतीच्या स्थापनेविषयी दंतकथा सांगतात की, या गावाच्या शिवेवर साधारण घोडयाच्या आकाराचा एक मोठा दगड होता. या दगडाचीच लोक ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजा करीत असत. नंतर समर्थांच्या हस्ते त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली

७ )प्रताप मारुती चाफळ : श्रीराम मंदिराच्या मागे सुमारे ३०० फूट अंतरावर प्रताप मारुतीचे मंदिर आहे. या मारुतीला भीम मारुती किवा वीर मारुती असेही म्हटले जाते. या मंदिराला ५० फूट उंच शिखर आहे. मूर्तीची उंची सात ते आठ फूट आहे. मूर्ती भीमरुपी महारुद्र या स्त्रोतात समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे पुच्छ माथा मुरडिले या स्थितीत आहे.

८ ) मनपाडळे:  कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा आणि पन्हाळगडजवळील मनपाडळे गावी समर्थांनी मारुतीची स्थापना केली आहे. शके 1573 मध्ये या मारुतीची स्थापना करण्यात आली आहे. साडेपाच फूट उंचीची मूर्ती उत्तराभिमुख आहे.

९ )पारगाव (जिल्हा कोल्हापूर) : कराड कोल्हापूर रस्त्यावरील वाठार गावापासून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर पारगावमध्ये समर्थांनी मारुतीची स्थापना केली. शके 1574 मध्ये मारुतीची स्थापना करण्यात आली. 11 मारुतींमध्ये उंचीने सर्वात लहान मूर्ती असून तिची उंची दीड फूट आहे.

१० )शिराळे (जिल्हा सांगली ): सांगली जिल्ह्यातील सापांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळे गावी समर्थांनी शके 1576 मध्ये मारुतीची स्थापना केली. 7 फूट उंच चुन्याची मूर्ती उत्तराभिमुख आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताला मूर्तीच्या चेहऱ्यावर सूर्याची किरणं पडतात.

११ )बहे बोरगाव : सातारा जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात कृष्णा नदीकाठी बहे-बोरगावमध्ये शके 1573 मध्ये समर्थांनी मारुतीची स्थापना केली. कृष्ण महात्म्यात या परिसराचा उल्लेख बाहुक्षेत्र असा आढळतो. या ठिकाणी कृष्णेच्या पात्रामध्ये देऊळ आहे.

— नवी भर दि.२०-०४-२०१९ – वॉटसॅपवरून

या मारुतींविषयी सविस्तर माहिती इथे मिळेल  https://www.loksatta.com/vishesha-news/lord-maruti-temples-by-samarth-ramdas-swami-1229844/


८.टाकळी (नाशिक) येथील मारुती मंदिर

समर्थ रामदासस्वामींनी घरामधून निघून गेल्यानंतर नाशिकजवळील टाकळी इथे बारा वर्षे तपश्चर्या केली होती. त्य काळातील गोमयासून तयार केलेल्या मारुतीची मूर्ती या ठिकाणच्या मंदिरात आहे. या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात.

मारुती

                              नवी भर दि.२०-०४-२०१९


९.सुखकर्ता दुखहर्ता संपूर्ण आरती

 

गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो  त्यात फ़क्त 3 कड़वी म्हटली जातात, पण मूळ रामदास स्वामी लिखित आरती ७ कडव्यांची आहे ती खालीलप्रमाणे आहे

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिरविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना
॥ जय ० ॥ ७ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥

!!गणपती बाप्पा मोरया!!


१० नवी भर

दोन नवे लेख दि.१८-०२-२०२०

आज दास नवमी. भारतभूमीचे महान संत रामदास स्वामी यांचा जन्म 1608 मध्ये श्री रामनवमीच्या दिवशी जांब (जि. जालना) या गावी झाला. लहानपणीच त्यांना प्रभु रामचंद्रानी दर्शन व अनुग्रह दिल्यावर त्यांनी गोदातीरी टाकळी, नासिक येथे बारा वर्षे तपश्चर्या केली व तेथेच शहाजीराजेंची व त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी 1632 ते 1644 अखंड भारत भ्रमण करुन सामाजिक परिस्थितीचे अवलोकन केले व प्रत्यक्ष राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक कार्यास सुरुवात केली. ठिकठिकाणी मारुतीची स्थापना व अंगापूरच्या डोहात सापडलेल्या प्रभु रामचंद्राची चाफळ येथे स्थापना करुन पहिल्या मठाची व संप्रदायाची मुहुर्तमेढ. 1649 मध्ये त्यांची व महान संत तुकोबारायांची तसेच छत्रपती शिवरायांची चाफळजवळ शिंगणवाडीला प्रथम भेट व शिवरायांना अनुग्रह.1654 मध्ये शिवथरघळीत दासबोध लेखन. 1656 मध्ये छत्रपतींनी आपल राज्य समर्थांच्या झोळीत अर्पण केले. 1673 मध्ये छत्रपतींनी परळीचा किल्ला आदिलशहाकडून जिंकून 1676 मध्ये समर्थांना कायमस्वरुपी वास्तव्यास दिला तोच हा सज्जनगड. 1680 मध्ये छत्रपतींच्या महानिर्वाणानंतर 1681 मध्ये छ. संभाजीराजेंना ऐतिहासिक व सुंदर मार्गदर्शनपर पत्र. त्याचप्रमाणे तंजावरहून राम, लक्ष्मण, सीतामाई व हनुमानाच्या मूर्ती मागवून त्यांची सज्जनगडावर मागविल्या. त्यानंतर याच मूर्तींच्या समोर समर्थांनी अखेरचे पाच दिवस अन्नत्याग करुन माघ वद्य नवमी शके १६०३(दि.22 जानेवारी 1682) रोजी पूर्वसूचना देऊन सज्जनगडावरच देह ठेवला.
🌺जय जय रघुवीर समर्थ🌺
वॉट्सअॅपवरून साभार दि.१८-०२-२०२०
————-
सगळ्यांना दासबोध आणि मनाच्या श्लोकांपुरतेच माहित आहेत समर्थ रामदास.
पण त्यांची स्वराज्यासाठीची कामगिरी फारशी कोणाला माहित नाही.
संन्यासी, एक भगवी छाटी, कमंडलू, खाकेतील कुबडी आणि समर्थ लंगोट, एव्हढीच त्यांची संपत्ती.
स्नानाचे काय? झोपायचे कुठे? समर्थांनी हा प्रश्न सोडवतानाच महाराजांसाठी सैन्य तयार केले.
समर्थांनी गावोगाव मारुती मंदिरांची स्थापना केली. यातील बहुतेक मंदिरांमध्ये तळघरे आणि भुयारे आहेत. नाथमाधवांच्या कादंबऱ्यात याचे वर्णन आढळते.
प्रत्येक मंदिराला लागुनच एक व्यायाम शाळा. हनुमानाची उपासना म्हणजेच बलदंड शरीर, हा मंत्र त्यांनी महाराष्ट्राला दिला.
गावोगाव तरुण पोरे या आखाड्यात घुमू लागली. दंड बैठका, फरी गदगा, ढाल तलवार शिकू लागली. महाराजांचा मावळा बलदंड आणि शस्त्रनिपुण होत होता.
पन्हाळगडावरून विशाळगडा पर्यंत धावत जायचे आणि नंतर रात्रभर लढत गड गाठायचा. पावन खिंड लढवायची. हि काटकता आणि ताकद याच आखाड्यात तयार झाली.
बजरंग बली कि जय!
रामदासी झरे हा त्यांचा दुसरा अद्भुत खेळ.
आम्ही गोव्याला जात असताना प्रधान गुरुजींनी गाडी थांबवायला सांगितली. गाडी बंद करून सगळ्यांना बाजूच्या झाडीच्या बाजूला उभे केले, आणि विचारले,”काही ऐकू येतंय का?”
गाडीच्या आवाजानी आमचे कान बधीर झाले असावेत. काहीच ऐकू येईना. ते आम्हाला त्या झुडपांच्या मागे घेऊन गेले. अहो आश्चर्यम हायवे वरील त्या झुडुपांच्या मागे एक दोन फुट रुंदीचा खळाळून वाहणारा स्वच्छ पाण्याचा झरा होता.
हाच तो रामदासी झरा. सगळ्या महामार्गांवर दर बारा कोसांवर समर्थांनी असे झरे शोधले आहेत, तयार केले आहेत. संन्याशांना स्नानसंध्या करायला आणि राजांच्या फौजेला कूच करत असताना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारे, बारमाही खळाळून वाहणारे रामदासी झरे. आजही हे महाराष्ट्राचे वैभव खळाळून वहात आहे.
माहितगाराशिवाय कळणार नाहीत असे रामदासी झरे. बहिर्जीच्या हेर खात्याला, हे माहित असत. मारुती मंदिरातील तळघरे आणि भुयारे त्यांच्या कामाला यायची. रामदासी झरे सैन्याला पाणी पुरवायचे.
राजे स्वराज्य उभारणी करत होते आणि समर्थ सैन्य तयार करत होते. दास मारुतीची उपासना करणारे मावळेच, राजांसाठी जीव देणारे जिवलग असे तयार झाले.
समर्थांच्या कुबडीत गुप्ती असायची असे म्हणतात. तेंव्हा पासून लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर, डॉक्टर हेडगेवार, योगी अरबिंदो घोष, सेनापती बापट, नेताजी सुभाषचंद्र घोष आदि सगळे राजकीय नेते हे राजकारण, क्रांती कार्य आणि योग, अध्यात्म यात सहज संचार करणारे होते. संन्याशाचा संसार म्हणजेच जगाचा संसार हि उक्ती या सगळ्यांनी सार्थ केली.
महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची हि पुढील साखळी. आपणही त्याच मालिकेतील निदान लढवय्ये तरी बनूया.
भारतमाताकी जय.
*Anuja Apte* यांच्या वॉलवरून साभार

…………………….. वॉट्सअॅप व फेसबुकवरून साभार दि.१८-०२-२०२०

*****************************

दासबोध जयंती..!!

समर्थ रामदास लिखित सृजनशिलता उत्पन्न करणारा एक शब्दप्रपात…! समर्थ लिहितात तेंव्हा मन एक सुसंगत,अर्थपूर्ण प्रवाही विचार करायला उद्युक्त होत.
दासबोध ग्रंथाची सुरुवात होते एका चौकस प्रश्नाने. एक मुमुक्षुच हे अनुभव कथन असल्यासारखा हा दासबोध ग्रंथ पुढे सरकतो. शब्द, शिकवण, अनुभव आणि निर्णय यांच अतिशय सुरेख मिश्रण असलेला हा ग्रंथ अक्षरांच्या सुंदर अस बौद्धिक नर्तनाची प्रचिती देतो.
दासबोधात धर्म आहे, शास्त्र आहे, कृती आहे, आदर्श आहे, सात्विकता आहे, कृतार्थता आहे. रामदास स्वामींनी या ग्रंथाच बोट धरून आचारशीलतेच्या वाटेवर चालायला शिकवलं. स्वतः उत्तुंग कर्तव्यपूर्तीचा एक दीपस्तंभ असलेले समर्थ लीलया आपल्यालाही त्या अकल्पनिय अनुभवाचा प्रत्यय देतात.
दासबोधातले शब्द फेर धरत आईच्या मायेने भक्ती शिकवतात. वडिलांच्या कर्तव्याने शक्ती शिकवतात..! आणि ईश्वराच्या मायेने व्रतस्थ करतात.
दासबोधातील प्रत्येक पान एक स्वतंत्र गृहीतक देत. त्यात कोणताही प्रश्न ठेवला आणि सजग मनाने विचार केला की त्याच उत्तर मिळत.
दासबोध संस्कृती देतो. जगण्याची आकृती देतो आणि त्याला सुसंगत प्रवृत्तीही. म्हणून दासबोध हा विचारग्रंथ आहे. त्याची फलश्रुती म्हणजे आयुष्य बहुश्रुत होते. आपण प्रत्येक घटना, मनुष्य, स्वार्थ, परमार्थ या साऱ्यांचा निरक्षीर विवेकाने वापर करू शकतो. विवेकपूर्ण सांहिता आणि आशयपूर्ण परमार्थ याने हा ग्रंथ एक सुंदर आयाम निर्माण करतो.
“तुझ्या दासबोधाशी एकरूप व्हावे.. अस आपण म्हणत म्हणत तो दासबोध नावाचा कल्पवृक्षच आपल्याला त्याच्या उच्च अशा उंचीवर घेऊन जाऊन मनाला अढळ अस ध्रुवपद निर्माण करून देतो.
दासबोध आपल्याला वृत्तीचा खेळ खेळवत निवृत्तीपर्यंत घेऊन जातो. समुद्रमंथनातल अमृत असच मधुर असेल ना..?आचरणाने चिरंजीव करणारी ही सजीव शब्दांची ओळख किती सोपी आहे ना…? दासबोध असाच आहे..!! वीस दशकांचे श्वास घेऊन ही साहित्यमूर्ती मनात सखोल आसनस्थ होते. तिच्या आश्वस्त पठण, मननाने शिवथरघळीची विराटता, चाफळची समीपता, सज्जनगड येथील सायोज्यता आणि अयोध्येची स्वरूपता मनाला जाणवते. शरयूच अथांगपण, गोदावरीच शांतपण आणि कृष्णेच सशैलपण देणारा हा ग्रंथ आयुष्याच्या शेवट पर्यंत या जीवनप्रवाहात आपल्याला तारून न्हेतो.
असा हा दासबोध…! या साहित्यमेरुमणीला त्रिवार दंडवत..!!
श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी, सातारा ९८२२६३५९०२

नवी भर … वॉट्सअॅपवरून साभार दि.२१-०२-२०२१

**************************

नवी भर दि. १०-०३-२०२१

श्रीराम

११. समर्थ रामदास

इसवी सनाचे सतरावे शतक. तो काळ ‘मोगलाई’चा. ज्या काळात ‘दहशतवाद’, ‘असहिष्णुता’ हे शब्द एखादवेळेस त्या काळातील शब्दकोषात देखिल नसतील, पण सामान्य मनुष्य ‘याचि देही याचि डोळा’ ते अनुभवत होता. सुलतानी आणि अस्मानी संकट एकाच वेळेला महाराष्ट्रावर आणि एकूणच भारतावर घिरट्या घालीत होते. ‘स्वधर्म’ नावाचा काही धर्म असतो आणि तो प्राणपणाने जगायचा, जपायचा असतो हे सांगण्याचे धाडस करण्याची तयारी देखील त्या काळात फार कमी लोकांची होती. एखादया भरलेल्या शेतात टोळधाड यावी आणि काही क्षणांत ते शेत फस्त करून टाकावे, अगदी अशाच पद्धतीने मोगल आणि इतर आक्रमक गावावर हल्ला करायचे आणि सोन नाणं लुटून न्यायाचेच, पण गावातील लेकीबाळी एकतर पळवून न्यायचे किंवा ‘नासवून’ टाकायचे. जनतेनं दाद मागायची कोणाकडे? कारण हिंदूंना राजा नव्हताच. काही सरदार होते, पण तेही बादशहाचे मांडलिक. त्यामुळे तेही वतने टिकविण्यासाठी आपल्याच लोकांशी भांडत होते. ब्राह्मण आपल्या कर्मकांडात गुंतले होते, क्षत्रिय तत्कालीन राज्य व्यवस्थेचे मांडलिक झाले होते. वैश्य जीव मुठीत धरून व्यापार करीत होते आणि तथाकथित क्षुद्र आपापले जीवन कसेतरी जगत होते. काहीही करून फक्त जीव वाचविणे हाच हाच त्या काळातील जगण्याचा मूलमंत्र झाला होता.

इसवीसनाच्या तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची पताका हातात घेतली आणि भक्तिमार्गाच्या माध्यमातून सामान्य मनुष्यात प्राण ओतण्याचे, त्याच्यातील ‘स्व’त्व जागृत करण्याचे कार्य चालू केले. समाजातील सात्विकता जवळ जवळ नष्ट होत चालली होती. चांगुल्यावरील सामान्य जनतेचा विश्वास उरला नव्हता. दुष्काळ पडला तर सर्वात आधी ज्याप्रमाणे शेतकरी आपले बियाणे सुरक्षित ठेवतो त्याप्रमाणे माऊलींनी आणि नंतर तत्कालीन संतांनी समाजातील सात्विकतेच्या बीजाचे संरक्षण आणि संवर्धन केले. माऊलींचा हरिपाठ, संत एकनाथांचे भारूड आणि इतर संताचे अभंग यामुळे समाजमन भक्तिरसात न्हाऊन निघत होते आणि ईश्वराच्या, नामाच्या सान्निध्याने मनुष्यातील सत्वगुण वृद्धीगंत व्हायला बळ मिळत होते. मनुष्याच मन विकसित करणे, हे फार अवघड काम. त्याहून अवघड म्हणजे निद्रिस्त समाजाला जागृत करून त्यास विशिष्ठ ध्येयाने प्रेरीत करून ते कार्य करण्यास प्रवृत्त करणे. अर्थात, हे काम हृदयाच्या शस्त्रक्रियेसारखे. माणूस जिवंत ठेऊन जुनं म्हणजे सडलेले हृदय बदलून तिथे नवीन हृदयाचे रोपण करायचे. खरे हृदय बदलणे त्यामानाने एकवेळ सोपे म्हणता येईल, पण मनुष्याचे विचार समूळ बदलणे हे गोवर्धन पर्वत उचलण्यासारखे महाकठीण. पण आपल्याकडील संत मंडळी हे उत्तम मानसशास्त्रज्ञ, त्यामुळे त्यांनी ही सर्व शस्त्रक्रिया बेमालुमपणे आणि निष्णात तंत्रज्ञाप्रमाणे पार पाडली. ही शस्त्रक्रिया झाल्याचे सामान्य मनुष्याला कळले देखील नाही. मात्र त्याचा ‘रोग’ मात्र बरा होण्यास निश्चित मदत झाली असे खात्रीने म्हणता येईल. “जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती” म्हणतात ते उगीच नव्हे!

मराठवाड्यातील एका गावातील एका घरात एका मुलाचा जन्म झाला. अर्थात मुलाचा जन्म होणे ही तशी सामान्य घटना. पण त्याच मुलाने पुढील काळात आपल्या असामान्य कर्तृत्वाने आपले आपल्या गावाचे, प्रांताचे नव्हे तर देशाचे नाव मोठे केले, इतकेच नव्हे तर आज चारशे वर्षांनंतरही ते नाव एक दीपस्तंभ बनून आजच्या पिढीला मार्गदर्शन करीत आहेत. माझ्यासारख्या एका अर्थाने आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यास त्यांच्या चरित्राचे स्मरण करावेसे वाटते, त्याचे कर्तृत्व पुन्हा एकदा समाजाला सांगावेसे वाटते, यातच त्यांच्या अलौकिक आणि अपौरुषेय कार्याचे माहात्म्य दडले आहे.

घरात पूर्वापार चालत आलेली रामभक्ती !! मोठे बंधु त्यामानाने ज्येष्ठच. त्यामुळे हा बाळ आपल्या मित्रमंडळीत जास्त रमायचा. सुरपारंब्या आणि इतर तत्कालीन खेळ हे वेळ घालविण्याचे साधन. नंतर मात्र सूर्यनमस्कार, पोहणे अशा गोष्टीत त्यास रस वाटू लागला. एकीकडे रामभक्ती चालू होतीच. आठव्या वर्षी मुंज झाली आणि अचानक वडिलांचे निधन झाले आणि त्याचा बाळाच्या मनावर खोल परिणाम झाला. बाळ अंतर्मुख झाला. त्याचवेळेस गावात टोळधाड आली आणि या अंतर्मुखतेस एक वेगळी दिशा मिळाली. त्याच्या जीवनाचे ध्येय निश्चित झाले.
“धर्माच्या करिता आम्हांस जगती रामाने धाडियले।”
रामकार्य करण्याचे ठरले आणि हनुमंत त्यांचा आदर्श, मार्गदर्शक आणि मित्र झाला. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी हनुमंताला आपल्या सोबत ठेवले. प्रत्येक गोष्ट हनुमंताला साक्षी ठेऊन आणि समर्पण करून केली. आयुष्यात परमेश्वरावरील अतूट श्रद्धा आणि शुद्ध साक्षीभाव किती काम करतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण !! आयुष्याचे ध्येय ठरले, निश्चय दृढ झाला, आता कृती !! सामान्य मनुष्याचे असामान्य संकल्प आईच्या अश्रूत वाहून जातात असा आपल्याकडील अनेक लोकांचा अनुभव आहे. ‘हुंडा मला नकोय पण आईसाठी घेतोय’, मला काही नकोय मात्र आईची इच्छा मोडवत नाही’, अशी ‘कारणे’ देणारी मंडळी आज देखील आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात. पण याचे ध्येय पक्के होते, विशाल होते, ध्येय रामराज्य आणण्याचे होते. हिंदूंना स्वतःचे सार्वभौम सिंहासन मिळावे, हिंदू जिंकू शकतात, हिंदू जिंकलेल्या राज्याचा विस्तार करु शकतात, हिंदू राज्य करु शकतात, हिंदू कारखाने चालवू शकतात, व्यापार करू शकतात, समुद्रावर सत्ता गाजवू शकतात, गडकिल्ले बांधू शकतात, शेती विकसित करू शकतात हे दाखवून देण्याचा निश्चय झाला होता, आता फक्त तो प्रत्यक्षात आणायचा होता. एका वाक्यात सांगायचे तर सामान्य मनुष्यात ‘राष्ट्रभक्ती’, ‘राष्ट्रीय दृष्टीकोन’ जागृत करण्याचे काम करायचे होते. जगात कोणतीही गोष्ट दोनदा घडते. एकदा कोणाच्या तरी मनात आणि नंतर प्रत्यक्षात!

हा संकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी पारंपरिक पद्धतीने संसारात रमणे सोयीचे नव्हते, म्हणून आईच्या शब्दासाठी बोहल्यावर चढलेला हा मुलगा गोरजमुहूर्ताचा फायदा घेऊन बोहल्यावरून पळून गेला. त्याला पारंपरिक संसारात न अडकता विश्वाचा संसार करायचा होता. “चिंता करतो विश्वाची”, असा विचार करणाऱ्या मुलाला कृती करून विश्वाची चिंता करणे म्हणजे काय करायचे असते हे समाजाला दाखवून द्यायचे होते आणि तसे करण्यासाठी हजारो तरुण मिळवायचे होते, त्यांची संघटना बांधून पुढेही अशी व्यवस्था चालू राहील याची रचना करायची होती.

“शक्तीने मिळती राज्ये | युक्तीने येत्न होतसे |
शक्ती युक्ती जये ठाई | तेथे श्रीमंत धावती |”

या उक्तीनुसार स्वतः शक्ती सामर्थ्य कमविणे गरजेचे वाटले. म्हणून हा मुलगा आपल्या घरापासून कोसोमैल दूर असलेल्या टाकळीला गेला. त्यादिवसापासून त्याच्या खऱ्या तपश्चर्येला सुरुवात झाली. ‘केल्याने होत आहे रे आधी या केलेची पाहिजे, नव्हे ! आपणच केले पाहिजे’ असे ठरवून त्याने स्वतः रोज हजार सूर्यनमस्कार, नंतर सद्ग्रंथाचे वाचन, चिंतन, भिक्षेच्या निमित्ताने समाजमनाचे सूक्ष्म अवलोकन, अशा विविध उपक्रम चालू केले. घटना घडत होत्या. साधारण बारा वर्षांनी साधनेचा अर्थात जीवीतकार्याच्या पूर्वतयारीचा एक टप्पा पूर्ण केल्यावर हा मुलगा देशाटन करण्याकरिता टाकळीतून बाहेर पडला.

अंदाजे चोवीस वर्षाचे वय. स्वयंप्रेरित होऊन स्वतःहून निवडलेला एका अर्थाने जगावेगळं संकल्प !! “बहुत लोकं मिळवावे,…..” हा उद्देश मनात ठेऊन संपूर्ण देशभर प्रवास केला. हा मुलगा भारताची कानाकोपऱ्यात प्रवास करून देश काल परिस्थितीचा अभ्यास करून एका निश्चयास आला की आपल्याकडे कसलीच कमतरता नाही. कमतरता एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे असलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करुन , नीट योजना करून कार्य सिद्धीस नेणाऱ्या ‘योजकाची’. एका शब्दात सांगायचे तर संघटनेची आणि सक्षम, लोकोत्तर नेतृत्वाची. हिंदू मनुष्य पराक्रमात, सामर्थ्यात कुठेच कमी नव्हता. कमतरता एकाच गोष्टीत होती ती म्हणजे ‘मी जिंकू शकतो’ हेच तो विसरून गेला होता. अभाव होता राष्ट्रीय दृष्टिकोनाचा!! संघटनेच्या माध्यमातून समाज आपल्याला हवे ते सर्व करू शकतो हे सिद्ध करण्याची गरज होती. बारा वर्षांच्या देशाटनात समर्थानी अशी हुकमी माणसे हेरून देशाच्या विविध भागात शेकडो मठ स्थापन केले. प्रत्येक मठात महंत नेमून मुख्य हनुमान भक्ती आणि बलोपासना ही कार्य सांगितलीच, पण सामान्य मनुष्यात स्वाभिमान जागृत करण्याचे महत्कार्य या तरुणांकरवी करायला सुरुवात केली.

“मुख्य हरिकथा निरुपण। दुसरे ते राजकारण।।
तिसरे ते सावधपण। सर्वा विषई।। .. दा.११.५.४

त्या काळात दळणवळणाची अल्पस्वल्प साधने असताना देखील या सर्व मठातील संपर्क, सुसंवाद आणि सुसूत्रता उत्तम होती. याचा उपयोग छत्रपतींना स्वराज्य स्थापनेसाठी झाला हे सर्वज्ञात आहे. अलौकिक जीवनदृष्टीने कार्य करणाऱ्या आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्या या तरुणास समाजाने उस्फूर्तपणे ‘समर्थ’ ही उपाधी बहाल केली. रोज हजार सूर्यनमस्कार घालणारा आणि प्रचलित पद्धतीने मठ स्थापन करुन राजाश्रयावर मठ न चालविणारा हा आगळा संत लोकांना आकर्षित करीत होता. तरुण पिढी हनुमान आणि बलोपासनेमुळे धष्टपुष्ट होत होती आणि संकुचित विचार सोडून समाजाचा म्हणजेच समष्टीचा विचार अंगी बाणवत होती.

छत्रपतींनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला हे खरेच. पण कोणीही एकटा मनुष्य राज्य तोपर्यंत निर्माण करू शकत नाही, जोपर्यंत तत्कालीन समाज ते मनापासून स्वीकारीत नाही. राज्य व्हावे ही श्रींची इच्छा !! ह्या उद्गारांना विशेष मूल्य नक्कीच आहे. पण हे वाक्य त्याकाळातील समाजातील प्रत्येक मनुष्याचे ‘ब्रीदवाक्य’ झाले होते, याचीही आपण दखल घेतली पाहिजे. जेव्हा समाज एका विशिष्ठ ध्येयाने प्रेरित होतो तेंव्हाच शिवाजी महाराजांसारखे असामान्य नेतृत्व आणि कर्तृत्व घडते. शिवाजी महाराजांचे भौगोलिक साम्राज्य  आजच्या दोन-तीन जिल्ह्याइतके मर्यादित असले तरी भावनिकरित्या ते राज्य इथे राहणाऱ्या प्रत्येक मावळ्याचे होते. दिल्लीश्वराने स्वराज्य बुडविण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्याला त्यात कधीही यश मिळाले नाही. शेवटी त्याला स्वतःला दिल्ली सोडून महाराष्ट्रात यावे लागले आणि इथेच गाडून घ्यावे लागले तरीही स्वराज्य जिंकणे त्यास शक्य झाले नाही. ह्याला एकमेव कारण म्हणजे छत्रपतींच्या मागे असलेली समाजाची सात्विक शक्ती आणि शुद्ध व विजिगीषू वृत्ती. ही वृत्ती प्रज्वलीत करण्याचे काम ह्या मठातून अखंड चालू राहिले.

त्या काळात युद्धे होत होतीच, माणसे मरत होती, मारीत होती, जगत होती. फक्त  कशासाठी जगायचे ? कशासाठी मरायचे ? कशासाठी मारायचे? हे सांगणार कोणी नव्हते. ते सांगण्याचे काम कोणी केले असेल तर त्या समर्थांनी. ह्यामुळेच जिवा महाला, बाजीप्रभू तानाजी, येसाजी मरायला तयार झाले. हे जेव्हा मरायला तयार झाले तेव्हा त्यांची पत्नी विधवा होणारच होती, त्यांच्या मुलांचे पितृछत्र हरपणारच होते. पण त्यांनी आपल्या कुटुंबापुरता संकुचित विचार न करता देशाचा, थोडक्यात कर्तव्याचा विचार केला आणि ही शिकवण समर्थांमुळेच शक्य झाली.

आपण संकल्पित केलेलं कार्य ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते. समर्थ या बाबतीत भाग्यवान ठरले, पण खरंतर त्यांनी हे सर्व प्रयत्नपूर्वक घडवून आणले. त्यासाठी लागणारे सर्व काही केले. १६८० ला छत्रपतींचा राज्याभिषेक झाला. हिंदूना सार्वभौम राजा मिळाला. सातशे वर्षांची गुलामी नष्ट झाली. ही फक्त राजकीय गुलामी नव्हती तर सांस्कृतिक गुलामी देखील होती. छत्रपतींनी ही गुलामी झिडकारून टाकली आणि नवी हिंदू राज्यव्यवस्था निर्माण केली. अनेक बाटलेल्या हिंदूंना त्यांनी नवीन विधिविधान निर्माण करुन शुद्धीकरण करुन परत स्वधर्मात घेतले. छत्रपतींनी समर्थाना आपले गुरु मानले होते. सद्गुरुंची सेवा घडावी म्हणून शिवाजी महाराजांनी आपले सर्व राज्य समर्थांच्या झोळीत टाकले आणि समर्थानी निःस्पृहपणे ते परत देऊन टाकले. त्याकाळात आणि आजही असा संत महात्मा बघायला मिळणे अति दुर्मिळ! अशा या समर्थांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर ‘आनंदवनभुवनी’ हे काव्य लिहिले. 
“उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करायला।”

एका सामान्य कुटुंबातील मुलगा मनाशी  संकल्प करून प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्वतःच्या बुद्धिकौशल्याचा उपयोग करून, रामावर प्रचंड श्रद्धा ठेवून सामान्य मनुष्यातील सात्विक शक्तीचे जागरण करून हिंदू सिंहासन निर्माण करु शकतो. हे मराठवाड्यातील जांब गावच्या ठोसरांच्या नारायणाने सिध्द करून दाखविले. फक्त त्यासाठी त्याला ‘नारायणा’चे ‘रामदास’ व्हावे लागले. ‘नारायण ठोसर ते रामदास’ हा प्रवास विलक्षण आहे, तो मुळातून अभ्यासायला हवा, खास करून तरूणांनी!

आजची समाजाची परिस्थिती फार वेगळी आहे असे नाही. ‘संघशक्ती कलींयुगे’ हेच खरे आजच्या ‘दासनवमी’च्या शुभदिनी आपण कोणत्या न कोणत्या सामाजिक संघटनेचे सदस्य होऊन राष्ट्रकार्यात आपलाही खारीचा वाटा उचलूया.

श्रीराम 

जय जय रघुवीर समर्थ।

संदीप रामचंद्र सुंकले, थळ, अलिबाग, रायगड ४०२२०७
8380019676

विनंती :- हा लेख अनेक वाचकांपर्यंत जाईल असे पहावे. धन्यवाद.

***********************************

१२. दासबोधाचे लेखन

दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदासांनी माघ शुध्द नवमी इ.स.१६५४ला लेखनाची सुरूवात केली होती. त्याचे लिखाण त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींनी रायगड जिल्ह्यातील अत्यंत निबीड अरण्यात विसावलेल्या शिवथर घळ (सुंदर मठ) या ठिकाणी हे लेखन केले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत.

एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांच्या, साधकांच्या, निस्पृहांच्या, विरक्तांच्या, सर्व सामान्यांच्या, बालकांच्या, प्रौढांच्या,जराजर्जरांच्या अशा सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांच्या मानवी मनाला उपदेश केला आहे. या ग्रंथाचे पारायण देखील करतात.
सकाळी उठल्यावर तोंड कसे धुवावे इथपासून ते मोक्ष कसा प्राप्त करून घ्यावा इथपर्यंत जीवाला व्यवहार चतुर-दक्ष करून अंती मोक्षाची वाट दाखवणारा हा एकमेव ग्रंथ आहे. इतर संतांनी जे सांगितले ते तर इथे आहेच शिवाय इतर अनेक गोष्टींचा परामर्श समर्थांनी या ग्रंथात घेतलाय हेच या ग्रंथाचे वेगळेपण आहे.
महाराष्ट्र सरकारच्या अधीन असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेने ७,८०० ओव्यांचा हा ग्रंथ ऑडियो स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. शास्त्रीय गायक संजय अभ्यंकर यांच्या आवाजातल्या या ऑडियोरूपांतरित दासबोधाचे संगीत राहुल रानडे यांचे आहे.
आयुष्यात एकदा तरी हा ग्रंथ जो समजावून घेऊन वाचेल व आचरणात आणेल त्याचे इहलोकी व परलोकी कल्याणच होईल हे निश्चित …

समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे……
भक्तांचेनि साभिमानें। कृपा केली दाशरथीनें। समर्थकृपेचीं वचनें। तो हा दासबोध ॥श्रीराम॥
वीस दशक दासबोध। श्रवणद्वारें घेतां शोध। मनकर्त्यास विशद। परमार्थ होतो ॥श्रीराम॥
वीस दशक दोनीसें समास। साधकें पाहावें सावकास। विवरतां विशेषाविशेष। कळों लागे ॥श्रीराम॥
ग्रंथाचें करावें स्तवन। स्तवनाचें काये प्रयोजन। येथें प्रत्ययास कारण। प्रत्ययो पाहावा ॥श्रीराम॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

*************************

१३. मनाचे श्लोक

आज माघ वद्य ९, म्हणजे ‘रामदास नवमी’ ! समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांचा देह ठेवला. समाजासाठी, स्वराज्यासाठी, छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रपती संभाजी राजे यांच्यासाठी आपले कर्तव्य करून, ते हे नश्वर जग ते सोडून गेले.
त्यांच्या या अफाट ग्रंथसंपदेतील ‘मनाचे श्लोक’ यांतील ही काही मोत्ये —

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥
प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥
मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सार वीचार राहो॥
समर्थाचिया सेचका वक्र पाहे। असा सर्व भुमंडळी कोण आहे॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥
महासंकटी सोडिले देव जेणें। प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥
फुकाचे मुखी बोलतां काय वेचे। दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे। विचारे तुझा तूंचि शोधुनि पाहे॥
तुटे वाद संवाद तेथें करावा। विवेके अहंभाव हा पालटावा॥
जनीं बोलण्यासारिखे आचरावें। क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे॥
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी। मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे। परी अंतरीं सज्जना नीववावे॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। न होतां मनासारिखें दु:ख मोठे॥
जनीं सर्वसूखी असा कोण आहे। विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले। तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥
मना सर्वथा सत्य सांडूं नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें॥
अहंतागुणे सर्वही दुःख होते। मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते॥
सुखी राहता सर्वही सूख आहे। अहंता तुझी तुंचि शोधुन पाहे॥
मनाची शते ऐकता दोष जाती। मतीमंद ते साधना योग्य होती॥
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी। म्हणे दास विश्वासत मुक्ति भोगी॥

. . . . . नवी भर दि. २७-०२-२०२२ वॉट्सॅपवरून साभार

१४.नृसिंहपंचक

श्रीसमर्थरामदास कृत नृसिंहपंचक

नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें
प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें
खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें
तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हीजाळें।।

झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी
लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी
हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी
कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।

कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं
घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं
तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं
धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।

भरभरित भरारी भर्भराटे भरारी
थरथरित थरारी थर्रथराटे थरारी
तरतरित तरारी तर्तराटे तरारी
चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।।

रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी।
गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी।
न धरित जन मानें लोक गेलें निदानें।
हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।।

जय श्रीराम
🙏🏻🙏🏻🙏

दासबोधात सांगितलेली लक्षणे -३ उत्तमलक्षणे

महाजालाच्या किना-यावरून शंखशिंपले आणि गारगोट्या वेचत जातांना कधी कधी हिरे माणके आणि मोतीसुध्दा हाती लागतात. अशी काही रत्ने या भागात दिली आहेत.

समर्थ रामदासांनी लिहिलेल्या दासबोधात भरपूर शहाणपणा शिकतला आहे तसेच मूर्खपणाची लक्षणेही सांगितली आहेत. त्यातही पढतमूर्ख आणि नुसताच मूर्ख असा भेद केला आहे. जे लोक शिकले सवरेले असल्यामुळे शहाणे झाले असावेत अशी अपेक्षा असते पण तरीसुध्दा मूर्खासारखे वागतात त्यांना रामदासांनी पढतमूर्ख म्हंटले आहे. रामदासांनी जे सांगितले, त्यातले काही त्यांच्या आधी भर्तृहरीने सुभाषितांमध्ये आणि त्यातले काही त्याच्याही आधी श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितले होते. संत कबीराचे दोहे, संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या आणि संत तुकारामांची अभंगवाणी यातसुध्दा यातले काही दाखले दिसतात, पण समर्थांनी दासबोधामध्ये ही लक्षणे एकेका समासात संकलित करून दिली आहेत. त्यातला तिसरा भाग खाली दिला आहे. देशोदेशीच्या विद्वान आणि संतमंडळींनी इतके सांगूनसुध्दा सगळी माणसे शहाणी झाली नाहीतच. यातले अनेक नमूने आपल्या आजूबाजूला दिसतात आणि कधी कधी आपणसुध्दा असे वागत असतो. या भागात दिलेली उत्तम लक्षणे आपल्यात नसली तरी ती अंगात बाणवण्याचा प्रयत्न आपण करत रहायला हवा.

दशक २ समास २ : उत्तमलक्षण

समास दुसरा : उत्तमलक्षण || २.२ ||
॥श्रीराम॥
श्रोतां व्हावें सावधान | आतां सांगतों उत्तम गुण | जेणें  करितां  बाणे  खूण | सर्वज्ञपणाची ||१||
वाट पुसिल्याविण जाऊं नये | फळ वोळखिल्याविण खाऊं नये | पडिली वस्तु घेऊं नये | येकायेकीं ||२||
अति वाद करूं नये | पोटीं कपट धरूं नये | शोधल्याविण करूं नये | कुळहीन कांता ||३||
विचारेंविण  बोलों  नये | विवंचनेविण चालों नये | मर्यादेविण हालों नये | कांहीं येक ||४||
प्रीतीविण रुसों नये | चोरास वोळखी पुसों नये | रात्री पंथ क्रमूं  नये | येकायेकीं ||५||
जनीं आर्जव तोडूं नये | पापद्रव्य जोडूं नये | पुण्यमार्ग  सोडूं  नये  |  कदाकाळीं  ||६||
निंदा द्वेष करूं नये | असत्संग धरूं नये | द्रव्यदारा  हरूं  नये  |  बळात्कारें   ||७||
वक्तयास खोदूं नये | ऐक्यतेसी फोडूं नये | विद्याअभ्यास  सोडूं  नये | कांहीं केल्या ||८||
तोंडाळासीं  भांडों  नये | वाचाळासीं तंडों नये | संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||९||
अति क्रोध करूं नये | जिवलगांस खेदूं नये | मनीं वीट  मानूं नये  |  सिकवणेचा ||१०||
क्षणाक्षणां रुसों नये | लटिका पुरुषार्थ बोलों नये | केल्याविण  सांगों नये | आपला  पराक्रमु  ||११||
बोलिला बोल विसरों नये | प्रसंगी सामर्थ्य चुकों नये | केल्याविण  निखंदूं  नये | पुढिलांसि  कदा  ||१२||
आळसें सुख मानूं नये  |  चाहाडी  मनास  आणूं नये | शोधिल्याविण करूं नये | कार्य कांहीं ||१३||
सुखा आंग देऊं नये | प्रेत्न पुरुषें सांडूं नये | कष्ट  करितां  त्रासों  नये  |  निरंतर ||१४||
सभेमध्यें लाजों नये | बाष्कळपणें बोलों नये | पैज  होड  घालूं  नये | काहीं  केल्या  ||१५||
बहुत चिंता करूं नये | निसुगपणें राहों नये | परस्त्रीतें  पाहों  नये  |  पापबुद्धी   ||१६||
कोणाचा उपकार घेऊं नये | घेतला तरी राखों नये | परपीडा करूं नये | विस्वासघात ||१७||
शोच्येंविण असों नये  |  मळिण वस्त्र नेसों नये | जाणारास पुसों नये | कोठें जातोस म्हणौनी ||१८||
व्यापकपण सांडूं नये | पराधेन होऊं नये | आपलें वोझें घालूं नये | कोणीयेकासी ||१९||
पत्रेंविण पर्वत  करूं नये | हीनाचें रुण घेऊं नये | गोहीविण जाऊं नये | राजद्वारा ||२०||
लटिकी  जाजू  घेऊं  नये | सभेस  लटिकें करूं नये | आदर नस्तां बोलों नये | स्वभाविक ||२१||
आदखणेपण  करूं नये | अन्यायेंविण गांजूं नये | अवनीतीनें वर्तों नये | आंगबळें ||२२||
बहुत अन्न खाऊं नये | बहुत निद्रा करूं नये | बहुत  दिवस  राहों  नये | पिसुणाचेथें  ||२३||
आपल्याची  गोही  देऊं  नये | आपली  कीर्ती वर्णूं नये | आपलें आपण हांसों नये | गोष्टी सांगोनी ||२४||
धूम्रपान घेऊं नये | उन्मत्त द्रव्य सेऊं नये | बहुचकासीं  करूं  नये | मैत्री कदा  ||२५||
कामेंविण राहों नये | नीच उत्तर साहों नये | आसुदें  अन्न  सेऊं नये | वडिलांचेंहि ||२६||
तोंडीं सीवी असों नये | दुसऱ्यास देखोन हांसों नये | उणें अंगीं संचारों नये | कुळवंताचे ||२७||
देखिली वस्तु चोरूं नये  |  बहूत  कृपण होऊं नये | जिवलगांसी करूं नये | कळह कदा ||२८||
येकाचा घात करूं नये | लटिकी गोही देऊं नये | अप्रमाण वर्तों नये | कदाकाळीं ||२९||
चाहाडी चोरी धरूं नये | परद्वार करूं नये | मागें  उणें बोलों नये | कोणीयेकाचें ||३०||
समईं यावा चुकों नये | सत्वगुण सांडूं नये | वैरियांस  दंडूं  नये  |  शरण आलियां ||३१||
अल्पधनें माजों नये | हरिभक्तीस लाजों नये | मर्यादेविण  चालों  नये  | पवित्र जनीं ||३२||
मूर्खासीं समंध पडों नये | अंधारीं हात घालूं नये | दुश्चितपणें  विसरों  नये | वस्तु  आपुली  ||३३||
स्नानसंध्या सांडूं  नये  |  कुळाचार खंडूं नये | अनाचार मांडूं नये | चुकुरपणें ||३४||
हरिकथा सांडूं नये | निरूपण तोडूं नये | परमार्थास  मोडूं  नये | प्रपंचबळें ||३५||
देवाचा नवस बुडऊं नये | आपला धर्म उडऊं नये | भलते भरीं भरों नये | विचारेंविण ||३६||
निष्ठुरपण  धरूं  नये  |  जीवहत्या  करूं  नये | पाऊस देखोन जाऊं नये | अथवा अवकाळीं ||३७||
सभा देखोन गळों नये | समईं उत्तर टळों नये | धिःकारितां  चळों  नये  | धारिष्ट आपुलें ||३८||
गुरुविरहित असों नये | नीच यातीचा गुरु करूं नये | जिणें शाश्वत मानूं नये | वैभवेंसीं ||३९||
सत्यमार्ग सांडूं नये | असत्य पंथें जाऊं नये | कदा अभिमान घेऊं  नये | असत्याचा ||४०||
अपकीर्ति ते सांडावी | सत्कीर्ति वाढवावी | विवेकें दृढ  धरावी | वाट  सत्याची ||४१||
न घेतां हे उत्तम गुण | तें मनुष्य अवलक्षण | ऐक  तयांचे  लक्षण | पुढिले  समासीं ||४२||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उत्तमलक्षणनाम समास दुसरा || २.२ ||

दासबोधात सांगितलेली लक्षणे -२ पढतमूर्खलक्षणें

महाजालाच्या किना-यावरून शंखशिंपले आणि गारगोट्या वेचत जातांना कधी कधी हिरे माणके आणि मोतीसुध्दा हाती लागतात. अशी काही रत्ने या भागात दिली आहेत.

समर्थ रामदासांनी लिहिलेल्या दासबोधात भरपूर शहाणपणा शिकतला आहे तसेच मूर्खपणाची लक्षणेही सांगितली आहेत. त्यातही पढतमूर्ख आणि नुसताच मूर्ख असा भेद केला आहे. जे लोक शिकले सवरेले असल्यामुळे शहाणे झाले असावेत अशी अपेक्षा असते पण तरीसुध्दा मूर्खासारखे वागतात त्यांना रामदासांनी पढतमूर्ख म्हंटले आहे. रामदासांनी जे सांगितले, त्यातले काही त्यांच्या आधी भर्तृहरीने सुभाषितांमध्ये आणि त्यातले काही त्याच्याही आधी श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितले होते. संत कबीराचे दोहे, संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या आणि संत तुकारामांची अभंगवाणी यातसुध्दा यातले काही दाखले दिसतात, पण समर्थांनी दासबोधामध्ये ही लक्षणे एकेका समासात संकलित करून दिली आहेत. त्यातला दुसरा भाग खाली दिला आहे. देशोदेशीच्या विद्वान आणि संतमंडळींनी इतके सांगूनसुध्दा सगळी माणसे शहाणी झाली नाहीतच. यातले अनेक नमूने आपल्या आजूबाजूला दिसतात आणि कधी कधी आपणसुध्दा असा मूर्खपणा करत असतो.
दशक २ समास १० : पढतमूर्खलक्षण
समास दहावा : पढतमूर्खलक्षण || २.१० ||
॥श्रीराम॥
मागां सांगितलीं लक्षणें | मूर्खाआंगी चातुर्य बाणे | आतां  ऐका  शाहाणे | असोनि,  मूर्ख  ||१||
तया नांव पढतमूर्ख | श्रोतीं न मनावें दुःख | अवगुण  त्यागितां,  सुख | प्राप्त  होये ||२||
बहुश्रुत आणी  वित्पन्न | प्रांजळ  बोले  ब्रह्मज्ञान | दुराशा आणी अभिमान | धरी, तो येक पढतमूर्ख ||३||
मुक्त क्रिया  प्रतिपादी  |  सगुण भक्ति  उछेदी | स्वधर्म आणी साधन निंदी | तो येक पढतमूर्ख ||४||
आपलेन  ज्ञातेपणें  |  सकळांस शब्द ठेवणें | प्राणीमात्राचें पाहे उणें | तो येक पढतमूर्ख ||५||
शिष्यास  अवज्ञा  घडे | कां  तो संकटीं  पडे | जयाचेनि शब्दें मन मोडे | तो येक पढतमूर्ख ||६||
रजोगुणी तमोगुणी | कपटी कुटिळ अंतःकर्णी | वैभव देखोन वाखाणी | तो येक पढतमूर्ख ||७||
समूळ ग्रंथ पाहिल्याविण | उगाच ठेवी जो दूषण | गुण सांगतां अवगुण | पाहे तो येक पढतमूर्ख ||८||
लक्षणें ऐकोन मानी वीट | मत्सरें करी खटपट | नीतिन्याय  उद्धट  |  तो  येक  पढतमूर्ख ||९||
जाणपणें भरीं  भरे | आला  क्रोध  नावरे | क्रिया शब्दास अंतरे | तो येक पढतमूर्ख ||१०||
वक्ता अधिकारेंवीण | वक्तृत्वाचा करी सीण | वचन जयाचें कठीण | तो येक पढतमूर्ख ||११||
श्रोता  बहुश्रुतपणें  |  वक्तयास  आणी  उणें | वाचाळपणाचेनि गुणें | तो येक पढतमूर्ख ||१२||
दोष ठेवी पुढिलांसी | तेंचि स्वयें आपणापासीं | ऐसें कळेना जयासी | तो येक पढतमूर्ख ||१३||
अभ्यासाचेनि  गुणें  |  सकळ  विद्या जाणे | जनास निवऊं नेणें | तो येक पढतमूर्ख ||१४||
हस्त बांधीजे ऊर्णतंतें | लोभें मृत्य भ्रमरातें | ऐसा जो प्रपंची गुंते | तो येक पढतमूर्ख ||१५||
स्त्रियांचा संग धरी | स्त्रियांसी निरूपण करी | निंद्य वस्तु आंगिकारी | तो येक पढतमूर्ख ||१६||
जेणें उणीव ये आंगासी | तेंचि दृढ धरी मानसीं | देहबुद्धि  जयापासीं  |  तो येक पढतमूर्ख ||१७||
सांडूनियां श्रीपती | जो करी नरस्तुती | कां दृष्टी पडिल्यांची कीर्ती | वर्णी,तो येक पढतमूर्ख ||१८||
वर्णी स्त्रियांचे आवेव | नाना नाटकें हावभाव | देवा विसरे जो मानव | तो येक पढतमूर्ख ||१९||
भरोन वैभवाचे भरीं | जीवमात्रांस तुछ्य करी | पाषांडमत थावरी | तो येक पढतमूर्ख ||२०||
वित्पन्न  आणी  वीतरागी | ब्रह्मज्ञानी माहायोगी | भविष्य सांगों लागे जगीं | तो येक पढतमूर्ख ||२१||
श्रवण  होतां  अभ्यांतरीं  |  गुणदोषाची चाळणा करी | परभूषणें मत्सरी | तो येक पढतमूर्ख ||२२||
नाहीं भक्तीचें साधन  |  नाहीं  वैराग्य ना भजन | क्रियेविण ब्रह्मज्ञान | बोले, तो येक पढतमूर्ख ||२३||
न मनी तीर्थ न मनी क्षेत्र | न मनी वेद न मनी शास्त्र | पवित्रकुळीं  जो  अपवित्र  |  तो  येक  पढतमूर्ख ||२४||
आदर देखोनि मन धरी | कीर्तीविण स्तुती करी | सवेंचि निंदी अनादरी | तो येक पढतमूर्ख ||२५||
मागें येक  पुढें येक | ऐसा  जयाचा दंडक | बोले येक करी येक | तो येक पढतमूर्ख ||२६||
प्रपंचविशीं सादर | परमार्थीं ज्याचा अनादर | जाणपणें घे अंधार | तो येक पढतमूर्ख ||२७||
येथार्थ सांडून वचन | जो रक्षून बोले मन | ज्याचें जिणें पराधेन | तो येक पढतमूर्ख ||२८||
सोंग  संपाधी  वरीवरी | करूं नये तेंचि करी | मार्ग चुकोन भरे भरीं | तो येक पढतमूर्ख ||२९||
रात्रंदिवस करी  श्रवण  |  न  संडी आपले अवगुण | स्वहित आपलें आपण | नेणे तो येक पढतमूर्ख ||३०||
निरूपणीं  भले भले | श्रोते येऊन बैसले | क्षुद्रें लक्षुनी बोले | तो येक पढतमूर्ख ||३१||
शिष्य जाला अनाधिकारी | आपली अवज्ञा करी | पुन्हा त्याची आशा धरी | तो येक पढतमूर्ख ||३२||
होत  असतां  श्रवण | देहास  आलें उणेपण | क्रोधें करी चिणचिण | तो येक पढतमूर्ख ||३३||
भरोन वैभवाचे भरीं | सद्गुरूची उपेक्षा करी | गुरुपरंपरा चोरी | तो येक  पढतमूर्ख  ||३४||
ज्ञान बोलोन करी स्वार्थ | कृपणा ऐसा सांची अर्थ | अर्थासाठीं लावी परमार्थ | तो येक पढतमूर्ख ||३५||
वर्तल्यावीण सिकवी | ब्रह्मज्ञान लावणी लावी | पराधेन  गोसावी  |  तो येक पढतमूर्ख ||३६||
भक्तिमार्ग अवघा मोडे | आपणामध्यें उपंढर पडे | ऐसिये कर्मीं  पवाडे | तो  येक  पढतमूर्ख ||३७||
प्रपंच गेला हातीचा | लेश नाहीं परमार्थाचा | द्वेषी देवां ब्राह्मणांचा | तो येक पढतमूर्ख ||३८||
त्यागावया अवगुण | बोलिलें पढतमूर्खाचें लक्षण | विचक्षणें नीउन पूर्ण | क्ष्मा केलें पाहिजे ||३९||
परम मूर्खामाजी मूर्ख | जो संसारीं मानी सुख | या संसारदुःखा ऐसें दुःख | आणीक नाहीं ||४०||
तेंचि पुढें निरूपण | जन्मदुःखाचें लक्षण | गर्भवास हा दारुण | पुढें निरोपिला ||४१||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पढतमूर्खलक्षणनाम समास  दहावा  || २.१० ||

दशक दुसरा समाप्त ||

दासबोधात सांगितलेली लक्षणे -१ मूर्खलक्षणें

महाजालाच्या किना-यावरून शंखशिंपले आणि गारगोट्या वेचत जातांना कधी कधी हिरे माणके आणि मोतीसुध्दा हाती लागतात. अशी काही रत्ने या भागात दिली आहेत.

समर्थ रामदासांनी लिहिलेल्या दासबोधात भरपूर शहाणपणा शिकतला आहे तसेच मूर्खपणाची लक्षणेही सांगितली आहेत. त्यातही पढतमूर्ख आणि नुसताच मूर्ख असा भेद केला आहे. जे लोक शिकले सवरेले असल्यामुळे शहाणे झाले असावेत अशी अपेक्षा असते पण तरीसुध्दा मूर्खासारखे वागतात त्यांना रामदासांनी पढतमूर्ख म्हंटले आहे. रामदासांनी जे सांगितले, त्यातले काही त्यांच्या आधी भर्तृहरीने सुभाषितांमध्ये आणि त्यातले काही त्याच्याही आधी श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितले होते. संत कबीराचे दोहे, संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या आणि संत तुकारामांची अभंगवाणी यातसुध्दा यातले काही दाखले दिसतात, पण समर्थांनी दासबोधामध्ये ही लक्षणे एकेका समासात संकलित करून दिली आहेत. त्यातला पहिला भाग खाली दिला आहे. देशोदेशीच्या विद्वान आणि संतमंडळींनी इतके सांगूनसुध्दा सगळी माणसे शहाणी झाली नाहीतच. यातले अनेक नमूने आपल्या आजूबाजूला दिसतात आणि कधी कधी आपणसुध्दा असा मूर्खपणा करत असतो.
————————————————————————————-
|| दशक दुसरा : मूर्खलक्षणें || २.० ||
समास पहिला : मूर्खलक्षण || २.१ ||
॥श्रीराम॥
ॐ  नमोजी  गजानना | येकदंता त्रिनयना | कृपादृष्टी भक्तजना अवलोकावें ||१||
तुज नमूं वेदमाते | श्रीशारदे ब्रह्मसुते | अंतरीं वसे  कृपावंते | स्फूर्तिरूपें ||२||
वंदून सद्गुरुचरण | करून रघुनाथस्मरण | त्यागार्थ  मूर्खलक्षण  |  बोलिजेल  ||३||
येक मूर्ख येक पढतमूर्ख | उभय लक्षणीं कौतुक | श्रोतीं  सादर  विवेक  |  केला  पाहिजे  ||४||
पढतमूर्खाचें लक्षण | पुढिले समासीं निरूपण | सावध होऊनि विचक्षण  |  परिसोत  पुढें ||५||
आतां प्रस्तुत विचार | लक्षणें सांगतां अपार | परि कांहींयेक  तत्पर  |  होऊन  ऐका ||६||
जे प्रपंचिक जन | जयांस नाहीं आत्मज्ञान | जे  केवळ  अज्ञान  |  त्यांचीं  लक्षणें ||७||
जन्मला जयांचे उदरीं | तयांसी जो विरोध करी | सखी  मानिली  अंतुरी  |  तो येक  मूर्ख  ||८||
सांडून सर्वही गोत | स्त्रीआधेन जीवित | सांगे अंतरींची मात | तो येक मूर्ख ||९||
परस्त्रीसीं प्रेमा धरी | श्वशुरगृही वास करी | कुळेंविण कन्या वरी | तो येक मूर्ख ||१०||
समर्थावरी  अहंता | अंतरीं  मानी  समता | सामर्थ्येंविण करी सत्ता | तो येक मूर्ख ||११||
आपली आपण करी स्तुती | स्वदेशीं भोगी विपत्ति | सांगे  वडिलांची  कीर्ती  |  तो  येक  मूर्ख  ||१२||
अकारण हास्य करी | विवेक सांगतां न धरी | जो  बहुतांचा  वैरी  |  तो  येक  मूर्ख ||१३||
आपुलीं धरूनियां दुरी | पराव्यासीं करी मीत्री | परन्यून  बोले  रात्रीं  |  तो  येक मूर्ख ||१४||
बहुत जागते  जन  |  तयांमध्यें करी शयन | परस्थळीं बहु भोजन | करी,तो येक मूर्ख ||१५||
मान अथवा अपमान | स्वयें करी परिच्छिन्न | सप्त वेसनीं जयाचें मन | तो येक मूर्ख ||१६||
धरून परावी आस  |  प्रेत्न सांडी सावकास | निसुगाईचा संतोष | मानी,तो येक मूर्ख ||१७||
घरीं विवेक उमजे | आणि सभेमध्यें लाजे | शब्द बोलतां निर्बुजे | तो येक मूर्ख ||१८||
आपणाहून जो श्रेष्ठ | तयासीं अत्यंत निकट | सिकवेणेचा मानी वीट | तो येक मूर्ख  ||१९||
नायेके त्यांसी सिकवी | वडिलांसी जाणीव दावी | जो आरजास  गोवी  |  तो  येक  मूर्ख  ||२०||
येकायेकीं येकसरा | जाला विषईं निलाजिरा | मर्यादा सांडून सैरा | वर्ते, तो येक मूर्ख ||२१||
औषध ने घे असोन वेथा | पथ्य न करी सर्वथा | न मिळे आलिया  पदार्था | तो येक मूर्ख  ||२२||
संगेंविण विदेश करी | वोळखीविण संग धरी | उडी घाली  माहापुरीं  |  तो येक मूर्ख ||२३||
आपणास जेथें मान | तेथें अखंड करी गमन | रक्षूं नेणे मानाभिमान  |  तो येक मूर्ख ||२४||
सेवक जाला लक्ष्मीवंत | तयाचा होय अंकित | सर्वकाळ  जो  दुश्चित्त  |  तो येक मूर्ख ||२५||
विचार न करितां कारण | दंड करी अपराधेंविण | स्वल्पासाठीं  जो  कृपण | तो येक मूर्ख  ||२६||
देवलंड पितृलंड  | शक्तिवीण  करी  तोंड | ज्याचे मुखीं भंडउभंड | तो येक मूर्ख ||२७||
घरीच्यावरी खाय दाढा | बाहेरी दीन बापुडा | ऐसा जो कां वेड मूढा | तो येक  मूर्ख ||२८||
नीच यातीसीं सांगात | परांगनेसीं येकांत | मार्गें जाय खात खात | तो येक मूर्ख ||२९||
स्वयें नेणे परोपकार | उपकाराचा अनोपकार | करी  थोडें  बोले  फार | तो येक मूर्ख ||३०||
तपीळ खादाड आळसी | कुश्चीळ कुटीळ मानसीं | धारीष्ट  नाहीं  जयापासीं | तो  येक  मूर्ख ||३१||
विद्या वैभव ना धन | पुरुषार्थ सामर्थ्य ना मान | कोरडाच वाहे  अभिमान  |  तो येक मूर्ख ||३२||
लंडी लटिका लाबाड | कुकर्मी कुटीळ निचाड | निद्रा  जयाची  वाड  |  तो येक मूर्ख ||३३||
उंचीं जाऊन वस्त्र नेसे | चौबारां बाहेरी बैसे | सर्वकाळ नग्न दिसे | तो येक मूर्ख  ||३४||
दंत चक्षु आणि घ्राण | पाणी वसन आणी चरण | सर्वकाळ  जयाचे  मळिण | तो येक  मूर्ख ||३५||
वैधृति आणी वितिपात | नाना कुमुहूर्तें जात | अपशकुनें  करी  घात | तो  येक मूर्ख ||३६||
क्रोधें अपमानें कुबुद्धि | आपणास आपण वधी | जयास नाहीं दृढ बुद्धि  |  तो येक मूर्ख ||३७||
जिवलगांस परम खेदी | सुखाचा शब्द तोहि नेदी | नीच जनास वंदी | तो येक मूर्ख ||३८||
आपणास राखे परोपरी | शरणागतांस अव्हेरी | लक्ष्मीचा भर्वसा धरी  |  तो येक मूर्ख ||३९||
पुत्र कळत्र आणी दारा | इतुकाचि मानूनियां थारा | विसरोन  गेला  ईश्वरा  |  तो  येक  मूर्ख  ||४०||
जैसें जैसें करावें | तैसें तैसें पावावें | हे जयास नेणवें | तो येक मूर्ख ||४१||
पुरुषाचेनि  अष्टगुणें | स्त्रियांस  ईश्वरी देणें | ऐशा केल्या बहुत जेणें | तो येक मूर्ख ||४२||
दुर्जनाचेनि बोलें  |  मर्यादा सांडून चाले | दिवसा झांकिले डोळे | तो येक मूर्ख ||४३||
देवद्रोही  गुरुद्रोही | मातृद्रोही पितृद्रोही | ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही | तो येक मूर्ख ||४४||
परपीडेचें मानी सुख | परसंतोषाचें मानी दुःख | गेले वस्तूचा करी  शोक | तो  येक मूर्ख ||४५||
आदरेंविण  बोलणें | न पुसतां  साक्ष देणें | निंद्य वस्तु आंगिकारणें | तो येक मूर्ख ||४६||
तुक तोडून बोले | मार्ग सांडून चाले | कुकर्मी मित्र केले | तो येक मूर्ख ||४७||
पत्य राखों नेणें कदा | विनोद करी सर्वदा | हासतां खिजे पेटे द्वंदा | तो येक मूर्ख ||४८||
होड घाली अवघड | काजेंविण करी बडबड | बोलोंचि नेणे मुखजड | तो येक मूर्ख ||४९||
वस्त्र शास्त्र दोनी नसे | उंचे स्थळीं जाऊन बैसे | जो  गोत्रजांसी  विश्वासे  |  तो येक मूर्ख ||५०||
तश्करासी वोळखी सांगे | देखिली वस्तु तेचि मागे | आपलें  आन्हीत  करी  रागें | तो येक मूर्ख ||५१||
हीन जनासीं बराबरी | बोल बोले सरोत्तरीं | वामहस्तें प्राशन करी | तो येक मूर्ख ||५२||
समर्थासीं मत्सर धरी | अलभ्य वस्तूचा हेवा करी | घरीचा  घरीं  करी  चोरी  |  तो येक मूर्ख ||५३||
सांडूनियां जगदीशा | मनुष्याचा मानी भर्वसा | सार्थकेंविण वेंची वयसा | तो येक मूर्ख ||५४||
संसारदुःखाचेनि गुणें | देवास गाळी देणें | मैत्राचें बोले उणें  |  तो  येक मूर्ख ||५५||
अल्प अन्याय क्षमा न करी | सर्वकाळ धारकीं धरी | जो  विस्वासघात  करी  |  तो  येक  मूर्ख ||५६||
समर्थाचे मनींचे तुटे | जयाचेनि सभा विटे | क्षणा बरा क्षणा पालटे | तो येक मूर्ख ||५७||
बहुतां दिवसांचे सेवक | त्यागून ठेवी आणिक | ज्याची  सभा  निर्नायेक | तो येक मूर्ख ||५८||
अनीतीनें द्रव्य जोडी | धर्म नीति न्याय सोडी | संगतीचें मनुष्य तोडी  |  तो येक मूर्ख ||५९||
घरीं असोन  सुंदरी  |  जो सदांचा परद्वारी | बहुतांचे उचिष्ट अंगीकारी | तो येक मूर्ख ||६०||
आपुलें अर्थ दुसऱ्यापासीं | आणी दुसऱ्याचें अभिळासी | पर्वत करी हीनासी | तो येक मूर्ख ||६१||
अतिताचा  अंत  पाहे | कुग्रामामधें राहे | सर्वकाळ चिंता वाहे | तो येक मूर्ख ||६२||
दोघे बोलत असती जेथें | तिसरा जाऊन बैसे तेथें | डोई  खाजवी  दोहीं हातें  |  तो येक मूर्ख ||६३||
उदकामधें सांडी गुरळी | पायें पायें कांडोळी | सेवा करी हीन कुळीं | तो  येक मूर्ख ||६४||
स्त्री बाळका सलगी देणें | पिशाच्या सन्निध बैसणें | मर्यादेविण  पाळी  सुणें  |  तो  येक  मूर्ख ||६५||
परस्त्रीसीं कळह करी | मुकी वस्तु निघातें मारी | मूर्खाची  संगती  धरी | तो  येक  मूर्ख  ||६६||
कळह पाहात उभा राहे | तोडविना कौतुक पाहे | खरें  अस्ता  खोटें साहे | तो  येक  मूर्ख ||६७||
लक्ष्मी आलियावरी | जो मागील वोळखी न धरी | देवीं  ब्राह्मणीं  सत्ता  करी | तो  येक मूर्ख ||६८||
आपलें काज होये तंवरी | बहुसाल नम्रता धरी | पुढीलांचें  कार्य  न करी | तो येक मूर्ख ||६९||
अक्षरें गाळून वाची | कां तें  घाली पदरिचीं | नीघा न करी पुस्तकाची | तो येक मूर्ख ||७०||
आपण  वाचीना  कधीं | कोणास  वाचावया नेदी | बांधोन ठेवी बंदीं | तो येक मूर्ख*||७१||
ऐसीं हें मूर्खलक्षणें | श्रवणें चातुर्य बाणे | चीत्त देउनियां शहाणे | ऐकती सदा ||७२||
लक्षणें अपार असती | परी कांहीं येक येथामती | त्यागार्थ बोलिलें श्रोतीं | क्षमा केलें पाहिजे ||७३||
उत्तम लक्षणें घ्यावीं | मूर्खलक्षणें त्यागावीं | पुढिले  समासी  आघवीं | निरोपिलीं ||७४||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मूर्खलक्षणनाम समास पहिला || २.१ ||