
मी जेंव्हा मुंगी उडाली आकाशी हे गाणे ऐकले तेंव्हापासून मला ते एक भयंकर गूढ वाटत होते. तो एक अतिशयोक्ती अलंकाराचा नमूना आहे असेही मला वाटले होते. आज संत मुक्ताबाईंच्या समाधीदिनाच्या निमित्याने या अभंगाचा अर्थ मला थोडासा समजला. ही माहिती मला वॉट्सॅप आणि गूगलवर मिळाली. सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार.
आज संत मुक्ताबाई समाधी दिन १९ मे,१२९७ मेहूण जळगाव जिल्हा. संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. परंतु त्यांचे स्वतःचेही स्वतंत्र व्यक्तीमत्व होते.
संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने दरवाज्याची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे.या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे.
इवलीशी मुंगी आकाशी उडाली आणि तिने सूर्याला गिळले असे मुक्ताबाई माउली म्हणतात तेंव्हा त्यांना त्यांच्यासारखी सामान्य स्त्री आध्यत्मिक क्षेत्रात गेल्यावर उंच आकाशात गेली म्हणजेच तिने कर्तृत्व गाजविले असे म्हणायचे आहे सूर्याला गिळले असे म्हणतात त्याचा अर्थ सूर्य म्हणजे परमात्मा त्याच्यात विलीन होणे अभिप्रेत आहे.
थोर नवलाव झाला ,वांझे पुत्र प्रसवला म्हणतात ,तेंव्हा आध्यात्मात गेल्यामुळे त्यांच्यात सृजनशीलता निर्माण झाली आणि त्या मुळेच अभंगांची निर्मिती करू शकल्या असे म्हणायचे आहे
त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत्या. त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे . ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.
मुक्ताबाई यांची अभंग निर्मितीही अतिशय अर्थपूर्ण आणि समाजाभिमुख आहे. त्यांच्या अभंगातून सर्वांच्या जीवनाच्या अनुषंगाने उल्लेख आढळतो.
संत मुक्ताबाई यांना विनम्र अभिवादन.
————-
मुंगी उडाली आकाशी। तिने गिळीले सूर्यासी।
थोर नवलाव झाला। वांझे पुत्र प्रसवला।
विंचू पाताळाशी जाय। शेष माथा वंदी पाय।
माशी व्याली घार झाली। देखोनि मुक्ताई हसली।
परमात्म्याने विश्वाची निर्मिती करण्यासाठी मायेची निर्मिती केली आणि मायेने आपल्या लीलेने जे जे काही नवल घडविले ते ते ‘कोडे’, ‘कूट’ या प्रकारांत मांडून मायेचे रूपक संतांनी उभे केले आहे. मुक्ताबाईच्या अभंगातील ही मुंगी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात माया आहे. या मुंगीने म्हणजे मायेने आकाशात उड्डाण केले म्हणजे ज्या परमात्म्यापासून आपण निर्माण झालो आहोत, त्याला विसरून आपली मर्यादा ओलांडली. ‘निजबोधरूप – तोचि ज्ञानदीप’ असे सूर्याचे वर्णन केले आहे. अहंकाराचा समूळ नाश करणारा तो सूर्य होय; तर अज्ञानाचा, अविद्येचा नाश करणारा ज्ञानप्रकाश म्हणजे परब्रह्म. त्याच्या मूळ स्वरूपाला मायेने आवरण घातले. ज्ञानप्रकाशाला स्वत:च्या आवरणाने अर्थात अविद्येने ग्रासले म्हणजे सूर्याला गिळीले आणि अविद्येचा प्रवास सुरू झाला. शुद्ध स्वरूप झाकले गेले, हाच मोठा नवलाव झाला. अविद्येला कधीही ब्रह्मरूप प्राप्त होणार नाही म्हणून ती वांझोटी आहे. ती वांझोटी अविद्या प्रसवली आणि तिने ‘अहंकार’ पुत्राला जन्म दिला. त्यातून विकारांचा षड्रिपू म्हणजे विंचू उदयास आला आणि मोहरूपी सर्पाने त्याला पाताळात नेले म्हणजे विकारांनी जीव पाताळात गाडला गेला. या अविद्येतून निर्माण झालेले संकल्प, विकल्प आणि त्यात सापडलेली जी जीवरूप माशी ती व्याली आणि त्यातून फार मोठी घार म्हणजे ‘वासना’ निर्माण झाली. मूळची शुद्ध स्वरूपातील उत्पत्ती असतानाही शेवटी विकारांच्या अत्युच्च पातळीला गेलेली जीवदशेची अवनत अवस्था पाहून मुक्ताबाई एकीकडे अत्यंत हळहळली, तर दुसरीकडे ढालगज मायेची ही चमत्कृती पाहून हसली. हेच रूप ‘योगाच्या’ अंगानेही सोडविता येते. या रूपाकत योगिनी आणि तत्त्वज्ञ या दोनही भूमिकेतून मुक्ताई अभिव्यक्त होते हे निश्चित.
चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा
योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा
विश्व रागें झाले वन्ही, संती सुखें व्हावें पाणी
शब्द शस्त्रें झालें क्लेश, संती मानावा उपदेश
विश्व पट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा
ब्रह्म जैसें तैशा परी, आम्हा वडील भूतें सारी
अहो क्रोधें यावें कोठे, अवघे आपण निघोटे
जीभ दातांनी चाविली, कोणें बत्तीशी तोडीली
मन मारुनी उन्मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा
******************
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
संत ज्ञानेश्वरांना ताटीचे अभंगातून बोध देणाऱ्या संत मुक्ताबाईचे आज पुण्यस्मरण . मुक्ताबाई वादळात मुक्ताबाईनगर (एदिलाबाद )येथे अडकल्या त्यावेळी वीज पडली व त्यातच अंतर्धान पावल्या.वैशाख् वद्य दशमी /वैशाख वद्य द्वादशी रोजी त्यांची पुण्यतिथी मानली जाते.
संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत-कवयित्री होत्या. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे त्यांचे थोरले भाऊ होते.
संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. परंतु त्यांचे स्वतःचेही स्वतंत्र अस्तित्व होते. त्यांनी रचिलेले ताटीचे अभंग हे त्यांच्या नावावर नोंदविलेले आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत. त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनांती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते. मुक्ताबाईचे मुंगी उडाली आकाशी हे पद्माकर गोवईकरांचे कथानक खूपच छान आहे
माधव विद्वांस – फेसबुक यांचे आभार
नवी भर दि.०७-०६-२०२१
******
मुक्ताबाई
समाधी दिन १९ मे,१२९७, मेहूण,जिल्हा जळगाव. ह्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते.. परंतु त्यांचे स्वतःचेही स्वतंत्र व्यक्तीमत्व होते.
मात्यापित्यांच्या देहत्यागानंतर या अनन्य साधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. ती तितक्याच समर्थपणे तिने उचलली आणि पेलली. त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या बालवयातच मुक्ताई प्रौढ गंभीर, सोशिक समंजस बनली. हळव्या निरागस वयात जीवनाच्या वास्तव सत्याकडे आणि कठोर स्वरूपाकडे निर्लीप्तपणे पाहण्याचे प्रगल्भ प्रौढत्व तिच्यात आलेले होते.
मुक्ताबाईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. म्हणुनच तर पाठची बहीण असूनही जगावर रुसुन बसलेल्या आपल्या ज्ञानदादाला त्यांनी अधिकारवाणीने समजावले. संत कोणाला म्हणावे, संताची वागणूक कशी असावी हे ज्ञानदादाचा मनावर बिंबवले. ही समजूत घालत असताना त्यांनी उस्फुर्तपणे जे अभंग गायले तेच पुढे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले. ताटीच्या अभंगात मुक्ताबाईंचं हळुवार, समंजस, प्रसंगावधानी, उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे. त्यात त्यांनी संतत्वाची जी लक्षणे सांगितली आहेत ती त्यांच्या व्यक्तित्वात दिसून येतात.
संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने दरवाज्याची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे.या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे.
इवलीशी मुंगी आकाशी उडाली आणि तिने सूर्याला गिळले असे मुक्ताबाई माउली म्हणतात तेंव्हा त्यांना त्यांच्यासारखी सामान्य स्त्री आध्यत्मिक क्षेत्रात गेल्यावर उंच आकाशात गेली म्हणजेच तिने कर्तृत्व गाजविले असे म्हणायचे आहे सूर्याला गिळले असे म्हणतात त्याचा अर्थ सूर्य म्हणजे परमात्मा त्याच्यात विलीन होणे अभिप्रेत आहे.थोर नवलाव झाला ,वांझे पुत्र प्रसवला म्हणतात ,तेंव्हा आध्यात्मात गेल्यामुळे त्यांच्यात सृजनशीलता निर्माण झाली आणि त्या मुळेच अभंगांची निर्मिती करू शकल्या असे म्हणायचे आहे.
योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरू मानले. मुक्ताबाईंनी ‘ज्ञानबोध’ या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनान्ती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.
ज्ञानदेवांनी आणि सोपानदेवांनी एका मागोमाग एक अश समाध्या घेतल्या तेव्हा निवृत्तीनाथ आणि मुक्ताई व्यथा-व्याकूळ झाले, उदासीन झाले. मुक्ताई अबोल व उदासी बनल्या. दु:खी कष्टी अवस्थेत मुक्ताबाई महाराष्ट्राच्या उत्तर भागात तापी तीरावर मेहूण येथे आल्या. वैशाख वद्य दशमी शके १२१९ या दिवशी मुक्ताबाई वैकुंठवासी झाल्या. संत नामदेव महाराजांनी समाधीग्रहण प्रसंगाचे हृदय वर्णन केले आहे.
कडाडली वीज निरंजनी जेव्हा l
मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली l
वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई l
झाली मुक्ताबाई स्वरुपाकार l
एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी l
जेव्हा निरंजनी गुप्त झाली l
गेले निवारुनी आकाश आभुट l
नाम म्हणे कोठे मुक्ताबाई l
मुक्ताबाई यांची अभंग निर्मितीही अतिशय अर्थपूर्ण आणि समाजाभिमुख आहे. त्यांच्या अभंगातून सर्वांच्या जीवनाच्या अनुषंगाने उल्लेख आढळतो.
उदाहरण म्हणून त्यांचे तीन अभंग
मुंगी उडाली आकाशी
योगी पावन मनाचा रसग्रहण
चिंता क्रोध मागे सारा
संत मुक्ताबाई यांना विनम्र अभिवादन.
प्रसाद जोग.सांगली.
. . . . . वॉट्सॅपवरून साभार दि. २०-०५-२०२२
. . . . . . . .
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
संत ज्ञानेश्वरांना ताटीचे अभागातून बोध देणाऱ्या संत मुक्ताबाईचे आज पुण्यस्मरण . मुक्ताबाई वादळात मुक्ताबाईनगर (एदिलाबाद )येथे अडकल्या त्यावेळी वीज पडली व त्यातच अंतर्धान पावल्या.वैशाख् वद्य दशमी रोजी त्यांची पुण्यतिथी मानली जाते.
संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत-कवयित्री होत्या. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे त्यांचे थोरले भाऊ होते.
संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. परंतु त्यांचे स्वतःचेही स्वतंत्र अस्तित्व होते. त्यांनी रचिलेले ताटीचे अभंग हे त्यांच्या नावावर नोंदविलेले आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत. त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनांती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते. मुक्ताबाईचेमुंगी उडाली आकाशी हे पद्माकर गोवईकरांचे कथानक खूपच छान आहे
प्रसिद्ध तातीचा अभंग
चिंता क्रोध मागे सारा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
योगी पावन मनाचा
साही अपराध जनाचा
विश्व रागें झाले वन्ही
संते सुखें व्हावें पाणी
शब्द शस्त्रें झालें क्लेश
संती मानावा उपदेश
विश्व पट ब्रह्म दोरा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
ब्रह्म जैसें तैशा परी
आम्हां वडील भूतें सारी
अहो क्रोधें यावें कोठे
अवघे आपण निघोटे
जीभ दातांनी चावली
कोणें बत्तीशी तोडीली
मन मारुनी उन्मन करा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
******************************
🌸ताटी उघडा ज्ञानेश्वरा……१🌸
संत जेणें व्हावें । जग बोलणे साहावें ॥
तरीच अंगी थोरपण । जया नाही अभिमान ॥
थोरपण जेथे वसें । तेथे भूतदया असें ॥
रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वदेशी ॥
ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
आज मला संत मुक्तबाईंची, खरे पाहता त्यांच्या त्या ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ ह्या अभंगाची खूपच आठवण येत होती. त्यांचा दादा, म्हणजे आमचे श्रीज्ञानेश्वर जेव्हा रागावून दार बंद करून बसले, तेव्हा त्यांनी त्यांना समजवण्यासाठी उत्स्फूर्तपणे एका पाठोपाठ एक असे बारा अभंग रचून म्हंटले, जे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्यापैकी पहिल्या अभंगाचे आज रसग्रहण करूया. पाठची बहीण असूनही जगावर रुसुन बसलेल्या आपल्या ज्ञानदादाला तिने अधिकारवाणीने समजावले. संत कोणाला म्हणावे, संताची वागणूक कशी असावी हे आपल्या ज्ञानदादाच्या मनावर बिंबवले. ताटीच्या अभंगात ज्ञानोबांच्या ह्या मुक्तेचे हळुवार, समंजस, प्रसंगावधानी, उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे. त्यात मुक्ताईने जी संतत्वाची लक्षणे आपल्या दादाला सांगितली आहेत ती मूर्तिमंत तिच्या व्यक्तित्वात दिसून येतात.
मुक्ताबाई म्हणतात की संतांना जगाची बोलणी सहन करावीच लागतात. ज्याला संत बनायचे आहे, त्यांना जगाचे कटू बोल हे सहन करावेच लागतात, कारण संतांची विचारधारा आणि सामान्य जनांची विचारक्षमता ह्यामध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते. जगाच्या पाठीवर असा एकही संत झाला नसेल की ज्याला तत्कालीन समाजाने छळला नसेल. मग ते एकनाथ महाराज असोत वा तुकोबा. संतांचे महत्व समाजाला नेहमीच त्यांच्या पश्चात का जाणवते हे एक न सुटणारे कोडेच आहे. कदाचित ती त्यांची परमेश्वराने घेतलेली परीक्षा असावी…..जे ते सहजी पार करतात.
हे बोलणे सहन करायचे तर त्यासाठी अहंकार त्यजावा लागतो आणि अहंकार त्यागल्याशिवाय थोरपण कसे येईल? संतांचे जीवन हे अज्ञ जनांच्या उद्धारासाठीच असते ना? अज्ञानी समाजाकडून अजून कसली वेगळी अपेक्षा ठेवावी? पण म्हणून त्या समाजाला सोडून, त्यांच्या वागणुकीने रुसून जर संत समाजापासून दूर निघून गेला, तर त्या समाजाचा उद्धार कसा होईल? अजाण समाजाचे हे पोरपण जाणून अभिमान गळून पडताच हृदयात भूतदया जागृत होते आणि आपोआप थोरपण येते….त्यासाठी अजून वेगळे असे काही करावे नाही लागत.
त्या भूतदयेने त्यांची दृष्टी इतकी विशाल झालेली असते की त्यांना आपल्या ब्रह्मस्वरूपाची पूर्ण जाणीव होते आणि हेच ब्रह्म जर साऱ्या चराचराला व्यापून राहिले आहे, तर मी कुणाहूनही आणि कुणीही माझ्याहून वेगळा नाहीच ही सर्वश्रेष्ठ अनुभूती होते…..म्हणून तर तीर्थक्षेत्री जाऊन आणलेले गंगाजल आमचे एकनाथ महाराज तहानलेल्या गाढवाच्या मुखी रिते करू शकतात. मुक्ताबाई म्हणतात की ब्रह्मस्वरूपात जर सर्वत्र मीच आहे, तर आपण कुणावर आणि कसे रागवावे?
ह्या भावंडांच्या आयुष्यातील ही घटना ही एक ईश्वरी लीला आहे. ज्ञानस्वरूप ज्ञानेश्वर महाराज काय हे सर्व जाणत नव्हते? पण असे काही नाट्यपूर्ण घडल्याशिवाय आम्हा सामान्य जनांसाठी ज्ञानगंगा प्रवाहित कशी होईल? म्हणून हे त्या ईश्वराने घडविलेले एक नाटक आहे. वेळप्रसंगी आपल्याहून लहान असलेलाही जर आपल्याला काही योग्य असे समजावीत असेल, तर आमच्यासारखा सामान्य माणूस म्हणेल की, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिले आहेत, मला नको शिकवूस…… पण आमची माऊली असे नाही म्हणत. खरा थोर कसा असतो हे आम्हाला समजविण्यासाठी हे सगळे नाट्य आहे. हे जर निवृत्तीनाथांनी सांगितले असते तर…..तर वेळप्रसंगी योग्य असल्यास लहानाचेही ऐकावे ही शिकवणूक आम्हाला नसती मिळाली ना?
अभंगाच्या अखेरीस ही धाकटी बहीण आपल्या दादाला सांगते की, ‘ऐशी समदृष्टी करा। ताटी उघड ज्ञानेश्वरा।।’ ही ओळ साधीसुधी नाही, ती ‘ताटी उघडा दादा’ असे नाही म्हणत. का? कारण हा संवाद आता बहीण-भावाचा उरलेला नाही. आता एक ज्ञानी आत्मा अधिकारवाणीने एक तुल्यबळ अशा, पण क्रुद्ध झालेल्या आत्म्याला पुनःजागृत करीत आहे….समत्वबुद्धि धारण करण्यास सांगत आहे….क्रोधविकाराने अल्पकाळासाठी का होईना, पण बंद झालेले बुद्धीचे कवाड उघडण्याचे आदेश दिला जात आहेत असे जाणवते. हे जे ज्ञानियांच्या बाबतीत घडू शकते, ते माझ्यासारख्या सामान्यांच्या बाबतीत घडले तर नवल ते काय?.. पण तेव्हा मुक्ताईचा हाच आदेश माझ्यासाठी असणार…………ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हरिॐ
🌸ताटी उघडा ज्ञानेश्वरा….2🌸
योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ॥
विश्व रागें झाले वन्ही । संती सुखें व्हावें पाणी ॥
शब्द शस्त्रें झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥
विश्व पट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
मुक्तबाईंचे हे दुसरे अभंगपुष्प आपल्याला संतांचे अर्थात पारमार्थिक पथावरील प्रत्येक साधकाच्या उद्दिष्टाचे लक्षण, कर्तव्य, त्यांच्या असण्याचे प्रयोजन विषद करीत अंतिम चरणात विश्वरहस्य उलगडून सांगते.
पहिल्याच ओळीत मुक्ताई योग्याची दोन अशी लक्षणे, नव्हे गुणधर्म सांगतात की ज्या माणसात ते गुण नाहीत त्याने स्वतःला आणि इतरांनीही त्याला योगी मानू नये. त्या म्हणतात ‘योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा।।’ योगी बनणे सोपे नाही. विवाहबंधनात स्वतःला गुंतवून घेतले नाही, ह्या एकाच निकषावर का कुणी योगी बनतो? अहो, जो निरंतर त्या परमेश्वराच्या अनुसंधानात आहे, ज्याचा त्या सर्वेश्वराबरोबर निरंतर योग जुळलेला असतो तो योगी. मग तो पवित्रच असणार ना? योग्याचे मन गंगेसारखे पावन असते. ज्याप्रमाणे अपवित्र माणसे गंगेच्या संपर्कात येऊन पवित्र बनतात आणि त्यांची पापे धुऊनही गंगेच्या पावित्र्यात थोडीही कमतरता येत नाही…ती अजूनही तितकीच पवित्र असते, तसा योगीही मनाने पावन आणि अपराधी जनांचे अपराध सहन करून पोटात घालणारा असतो. त्याच्या संपर्कात कुणी लबाड, भामटा आला तरी योग्याला फरक पडता कामा नये, उलटपक्षी त्या पामराचे दोष गळून तो चांगल्या मार्गाला लागला पाहिजे.
संत कुणाच्या अपराधाने आपल्या मनाचा तोल ढळू देत नाही, त्यासम स्वतः बनत नाही. सारे विश्व जरी क्रोधाग्नीत धगधगत असले तरी, जो क्रोधीत होत नाही तो संत. उलट हीच ती वेळ असते की जेव्हा विश्वाला संतांचे ह्या विश्वातील प्रयोजन समजते. आगीने कधी आग विझेल का? तिथे शीतल जलाचा शिडकावाच जरुरी असतो ना? शीतल गंगाजलासारख्या मनाचा संत आपली विश्वाला शांत करण्याची भूमिका स्विकारतो….पार पाडतो. पाणी जीवन आहे. पाण्याची भुमिका सोपी नाही, महाकठीण आहे. कशी? आग विझवताना पाण्याला आपले द्रवरुपी अस्तित्व संपवून टाकणे भाग पडते, म्हणजे पाण्याला वाफ बनून विरून जावे लागते ना? जगाच्या इतिहासातील अनेक संत असेच विरून गेले…पण त्यांनी आपल्या कर्तव्यकार्याचा शेवटपर्यंत त्याग नाही केला… ….विश्व रागे झाले वन्ही। संती सुखे व्हावे पाणी। …..शीतल गंगाजलासारखे पावन असे ते संत सुखेनैव आग शांतवणाऱ्या जळाची भूमिका अंगिकरतात. हवे-हवे(राग) च्या भौतिक ज्वालांत गुरफटलेल्या ह्या अखिल मानवविश्वाला ‘भौतिक सुख हे खरे सुख नाही’ ह्या ज्ञानगंगाजलाने शीतल करणे हे संतकर्तव्यही ह्या चरणात हळुवारपणे मांडलेले जाणवते.
तिसऱ्या चरणात संतांचे अजून एक महान भाववैशिष्ट्य दडलेले आहे, ते म्हणजे संत हे मनाने कमालीचे कोमल असतात. आम्हा समान्यांसारखी त्यांची मने निबर, कठोर बनलेली नसतात. अशा कोमल मनांवर जेव्हा समाज शब्द शस्त्रे परजून तुटून पडत असतो तेव्हा, त्यांना किती क्लेश होत असतील ह्याचा किंचितही विचार समाज करत नाही…….आणि तेव्हा आपल्या मुक्ताईचा एकच उपदेश, एकच ज्ञान त्यांच्या कामी येते आणि ते म्हणजे ‘विश्व पट, ब्रह्म दोरा।’……. ‘मुक्ताई’ ह्या नावातच त्यांची महानता दडली आहे…ती आई असुनही मुक्त आहे आणि मुक्त असुनही तिने आपले सर्वकालीन आईपण जपले आहे…….असा मुक्तात्मा ह्या अभंगपुष्पाच्या अंतिम चरणात आपल्याला ह्या अखिल विश्वाचे स्वरूपरहस्य केवळ प्रत्येकी दोन अक्षरी अशा चार शब्दात सांगून जातो…..’विश्व पट ब्रह्म दोरा’……….हे संपूर्ण विश्व म्हणजे त्या ब्रह्म नामक एकाच धाग्याने विणले गेलेले वस्त्र आहे……आईने ह्या चार शब्दात मी-तू चे द्वैतच संपवून टाकले आणि आईच्या अधिकाराने पुन्हा एकदा तोच आदेश दिला…..ताटी उघडा ज्ञानेश्वरा… हा आदेश आम्हा सर्वांसाठी आहे. बाळा आतातरी स्वतःला ओळख……तू ज्ञानस्वरूप आत्मा आहेस….ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हरिॐ
🌸ताटी उघडा ज्ञानेश्वरा….३🌸
सुखसागरी वास झाला | उंच नीच काय त्याला ॥
अहो आपण जैंसे व्हावें | देवें तैसेंचि करावें ॥
ऐसा नटनाटय खेळ | स्थिर नाही एकवेळ ॥
एकापासुनी अनेक झाले | त्यासी पाहिजे सांभाळिले ॥
शून्य साक्षित्वें समजावें | वेद ओंकाराच्या नावें ॥
एकें उंचपण केले | एक अभिमानें गेलें ॥
इतकें टाकुनी शांती धरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
ह्या अभंगपुष्प मालिकेतील हे तिसरे अभंगपुष्प ‘सुखसागरी’ सुरू होऊन ‘ज्ञानेश्वरा’ वर विराम पावते. हे ताटीचे अभंग म्हणजे त्या बालपणीच्या गोष्टीतल्या बदकांच्या कळपात राहून आपले स्वरूप न जाणणारा राजहंस वा मेंढ्यांच्या कळपात वाढल्याने आपले स्वरूप न कळलेला सिंहाचा छावा, ह्यांना जसे त्यांच्या खऱ्या कुळाची आठवण द्यावि तसे आम्हा सामान्यांना आमच्या स्वरूपाचे ज्ञान देणे आहे. फक्त ह्या रुपकात तो राजहंस वा छावा मुक्ताबाईंचा दादा आहे, ज्याने आपण राजहंस असल्याचे सिद्ध केले भावार्थ दीपिका लिहून.
मुक्ताबाई म्हणतात की ‘सुखसागरी वास झाला। उंच नीच काय त्याला।। महात्म्यांची महानता केवळ त्यांच्या कृतीतूनच नव्हे, तर त्यांच्या प्रत्येक शब्दातूनही त्यांच्या महानतेचे दर्शन आपल्याला देत असते. पहिल्या ओळीतील ‘झाला’ शब्द आपल्याला कर्तुत्वभावाचा लोप दर्शवतो. ‘वास केला’ न म्हणता ‘वास झाला’ असे शब्द काही ठरवून नाही बोलता येत…खरे ना? माझ्यासारख्या सामन्याच्या लेखणीतून उतरले असते….’सुखसागरी वास केला। उंच नीच काय मला।। हाच फरक फरक असतो उंच संत आणि खुजे असणारे आम्ही सामान्य ह्यांच्यात आणि म्हणून संतांची उंची आम्हा सामान्यांना मापता येत नाही….म्हणून समाजाकडून संतांचा छळ होतो.आपण त्यांची उंची मापण्याचा प्रयत्नही न करावा… आपण केवळ लिन व्हावे त्यांचे पायी. हे जेव्हा जमेल ना, तेव्हा प्रभूच प्रेमे उचलुनी घेईल…असो. तर मुक्ताई सांगत आहेत की सुखसागरी वास म्हणजेच ज्याला ईश्वरानुभूती झाली आहे त्याच्यातील लहान-मोठा, ज्ञानी-अज्ञानी, गरीब-श्रीमंत, खालची जात-वरची जात ही सगळी द्वंद्व संपुष्टात येतात. जो स्वतः सुखसगरात डुंबत आहे, त्याला असल्या बाबी कधी स्पर्शही करीत नाहीत. सागरी क्रीडा करणाऱ्यांना किनाऱ्यावरील वाळू अंगी लागेल? त्याच्या मनात सन्मानाच्या अपेक्षा नसतात. कारण सर्वत्र ब्रह्मच व्यापून आहे हे जाणणारा असा हा भेद कसा करू शकेल? ज्याच्या मनी असा भेदभाव असेल तो शांत कसा असेल? जो अंतरी शांत नसेल तो संत कसा?
पुढे त्या म्हणतात ‘अहो आपण जैसे व्हावे। देवे तैसेचि करावे।।…खरेतर विश्व आपल्यासाठी कसे असावे हे अंतिमतः आपल्यावरच अवलंबून आहे ना? ध्वनी-प्रतिध्वनी, बिंब-प्रतिबिंब ह्यांच्यातील संबंधासारखेच हे आहे. अखिल विश्वाच्या रूपाने तो ईश्वरच नटलेला असल्याने माझ्या कुवतीनुसार, कृतीनुसार, रुची-अभिरुचीनुसार, कृती वा कर्मानुसार तोच त्याच्या विश्वातून मला सामोरा येत असतो…माझ्या मनोमंदिरी अवतरीत होत असतो. बिंब तोच आणि प्रतिबिंबही तोच…
हेच अधिक नीट समजावे म्हणून त्या म्हणतात, ‘ऐसा नटनाट्य खेळ। स्थिर नाही एकवेळ।।’….हे विश्वनाट्य निरंतर पुढेच जात आहे. हेच विश्वनाट्य पुढे काही शतकांच्या अंतराने आलेल्या तुकोबांनी ‘जिवाशिवाचे भातुके। केले क्रीडाया कोतुके। कैसी येथे लोके। आभास अनित्य।।’ ह्या शब्दांनी वर्णिले आहे ना? नानात्वाच्या ह्या अनित्य अशा नटनाट्य खेळात मी,तू आणि इतर असा कोणताही भेद नसणारे म्हणजेच शून्यस्वरूप….शून्य वर्तुळाकारच असते ना?…म्हणजेच ज्याच्यापासून सुरू होऊन परत त्याच्याशीच पूर्ण होणारे असे ते शून्यस्वरूप ब्रह्म जाणण्यासाठी वेदप्रवृत्ती निर्माण झाली आणि त्यातून त्या मूलस्वरूपाला ओंकार रूप प्राप्त झाले. म्हणून मुक्ताई म्हणतात, ‘एकापासुनी अनेक झाले। त्यासी पाहिजे सांभाळीले।। शून्य साक्षीत्वे समजावे। वेद ओंकाराच्या नावे।।’..ह्यातून एक जाणवते की ह्या शून्यब्रह्माला जर जाणायचे असेल, तर मला माझ्यात, माझ्या ‘आत’ साक्षीभाव रुजवण्यावाचून अन्य पर्याय नाही असे आई मला सांगत आहे. ज्या एकापासुनी अनेक झाले तोच त्यांचा सांभाळ करणार आहे आणि तोच त्यांना तारणारही आहे. हे शाश्वत सत्य जाणून आपण आपुला कर्तुत्वभाव टाकावा आणि साक्षीभाव धारण करावा…….हाच एकमेव मार्ग आहे आपले सारे मानसिक क्लेश टाळण्यासाठी. हे अंमलात आणणे बोलण्याइतके सोपे नाही हे खरे, पण जर ‘त्याच्या’ नामस्मरणाची कास धरली तर तो कर्ता-करविताच ते घडवेल ह्या विश्वासाने त्याचे नाम चित्ती राखावे.
हे मला जमत नाही म्हणून तर मी विविध द्वंद्व ओढवून घेतो आणि त्यात गुरफटतो, अशांत होतो आणि संत मात्र निर्द्वंद्व झाल्याने शांत असतात. शांत असणे हे ईश्वरीकृपेचे एक प्रमुख लक्षण आहे. जिथे द्वंद्व आहे, तिथे अभिमान, अहंकार आणि युद्धप्रवृत्ती निर्माण होतेे, शांतीचा लोप होऊन अशांती निर्माण होते आणि परिणामी त्या ब्रह्मरूपास, स्वरूपास जाणणे ह्या अनुभूतीपासून मी दूरदूर होत जातो. हे समजविण्यासाठी आई मला सांगते, ‘एके उंचपण केले। म्हणजे मी श्रेष्ठ आहे हे एक मनी आले की तत्क्षणी…’एक अभिमाने गेले। त्या एकाअभिमानामुळे ज्या ‘एका’पासुनी हे सारे घडले, त्या ‘एकापासून’ ह्या एका अभिमानापायी तू दूर जाणार… त्याच्या त्या अनुभूतीला तू मुकणार…..मला सुखसागरी डुंबणे न लाभता पुन्हा एकदा भवसागरी बुडणेच घडणार…..मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार…हेच आई मला सांगत आहे ना?
हे सर्व सांगून अंती आई सांगत आहे, विनंती करीत आहे की, ‘इतके टाकुनी शांती धरा। ‘, म्हणजे हा वृथाचा अभिमान, जो कर्तुत्वभावातून उपजला आहे, तो त्यजून शांती धारण करा आणि कर्तव्यभावात स्थिर होऊन……..ताटी उघडा ज्ञानेश्वरा। हरि ॐ
🌸ताटी उघडा ज्ञानेश्वरा … ४🌸
मुक्ताई अत्यंत परखडपणे जगाला दिसणारे बाह्य वैराग्य आणि कठोर आत्मपरिक्षणात स्वतः साधुसंन्याशाना स्व-अंतरी दिसणारे वैराग्य, अशा अंतर्बाह्य वैराग्याविषयी चौथ्या आणि पाचव्या अभंगात जे सांगत आहेत ते आता पाहूया आणि स्वतःलाही तपासूया….
वरी भगवा झाला नामें | अंतरीं वश्य केला कामें ॥
त्याला म्हणूं नये साधू | जगीं विटंबना बाधू ॥
आपआपणा शोधून घ्यावें | विवेक नांदे त्याच्या सवें ॥
आशा दंभ अवघें आवरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
संतत्वाचे वा साधुत्वाचे तात्विक विश्लेषणात्मक विवेचन करताकरता मुक्ताई आता हळूच ज्ञानदेवांच्या मनीच्या साधुत्वाला, वैराग्याला डिवचतात. अर्थात ह्या डिवचण्यामागील त्यांचा उद्देश ज्ञानदेवांना आत्मपरिक्षणास भाग पाडून विश्व व्यवहारात परत आणणे हा आहे. अर्जुन किती शूर आहे हे काय सर्वज्ञ भगवान श्रीकृष्णांना ज्ञात नव्हते का? तरीही भगवंत त्याच्यावर क्लैब्यत्वाचा म्हणजेच षंढत्वाचा आरोप का करतात? ममत्वाने झाकोळले गेलेले क्षात्रतेज पुन: झळाळून यावे ह्यांसाठीच ना? तसेच इथे आपली मुक्ताई ज्ञानदेवांना आपले वैराग्य वा साधुत्व हे खरे आहे ना, वरवरचे पोशाखी तर नाही ना याचा शोध घ्यायला, आत्मपरीक्षण करायला उद्युक्त करीत आहे. विवेक आणि वैराग्य ह्यांच्या एकत्र असण्याचे महत्वही त्या सांगतात. “विवेका सहित वैराग्याचे बळ | धगधगीत ज्वाळ अग्नि जैसा ||” असे सांगणार्या तुकोबांनी वैराग्याच्या संदर्भात “विष खावे ग्रासोग्रासीं | धन्य तोचि एक सोसी ||” असे म्हटले आहे.
घर बांधायचे झाले तर प्रथम भूमी खणून घरासाठी पाया बांधावा लागतो. त्या पायाच्या भक्कमपणावर तर सारी इमारत उभी रहाणार आहे ना? तो जर कच्चा असेल तर….तर तो त्यावरील इमारतीच्या भाराने खचून जाईल आणि उभी इमारत जमीनदोस्त होईल ना? हाच नियम आई आपल्याला पहिल्या दोन चरणात शिकवीत आहे. ‘वरी भगवा झाला नामे। अंतरी वश्य केला कामे’ ह्याचे दोन अर्थ जाणवतात. एक अर्थ म्हणजे, मुखाने नाम घेणे चालू झाले आहे खरे, पण अंतरीच्या कामनांचे काय? त्या कामनांचे नियमन केले गेलेआहे की त्यांचे बळेच दमन केले आहे? कारण ते जर दमन असेल तर कामना रुपी नाग पुन्हा कधीही उसळून वरवरचे वैराग्य कोसळू शकते. हे माझ्यासारख्या सामन्याच्या बाबतीत संभवते. अजूनही कामनांनी घर खाली नाही केले, आणि तरीही मला वाटते की मला आता अध्यात्म साधले. ह्याला भोळेपणा म्हणावा की भोंदूपणा? आत्मपरीक्षण करणे भाग आहे. दुसरा अर्थ सरळसरळ समाजातील भोंदू साधूंशी निगडीत आहे. असे भोंदू वैराग्याची लक्षणे असणारी वस्त्रे परिधान करतात, मुखी हरिनाम धारण करतात आणि विकाराधीन वैयक्तिक जीवन जगत असतात. त्यांचे सामाजिक जीवन मात्र वैराग्याचे प्रदर्शन करीत असते. अशांना साधू म्हणणे म्हणजे साधुत्वाची विटंबना आहे आणि ती जगासाठी अत्यंत घातक ठरू शकते कारण अशा भोंदू लोकांमुळे समाजाचा अध्यात्ममार्गावरील विश्वास उडू शकतो, असे मुक्ताई स्पष्टपणे सांगत आहेत. आपल्याकडून असा हा घोर अपराध घडू नये ह्यासाठी आत्मपरीक्षण करावे, आपल्या अंतरी विवेक जागृत आहे ना हे प्रसंगी तपासावे आणि त्या विवेकाच्याच आधाराने आशा आणि दंभ आवरावे. आवरणे म्हणजे लगाम खेचून त्यांचे दमन करणे अपेक्षित नाही, इथे आवरणे म्हणजे निवारणे अपेक्षित आहे….. हे सारे कळतेही, पण जमणार कसे? तिथे आई सांगते आहे…….ताटी उघडा ज्ञानेश्वरा…….तू शुद्धबुद्ध आत्मा आहेस…..कवाड उघड…ताटी उघडा ज्ञानेश्वरा…ताटी उघडा ज्ञानेश्वरा……हरि ॐ
🌸ताटी उघडा ज्ञानेश्वरा…५🌸
संत तेचि जाणा जगीं । दया क्षमा ज्यांचे अंगी ॥
लोभ अहंता न ये मना । जगी विरक्त तोची जाणा ॥
इह परलोकी सुखी । शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी ॥
मिथ्या कल्पना मागें सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
ताटीच्या पाचव्या अभंगात मुक्ताबाईंनी संतांचे अजून दोन महत्त्वाचे गुणधर्म सांगून त्यावरून संतांचे लक्षण अथवा व्याख्या केली आहे. ज्याच्या अंगी क्षमा आणि दया वसतात तो संत अशी ही सुटसुटीत व्याख्या आहे. क्षमा म्हणजे इतरांनी आपल्या संदर्भात केलेला अपराध प्रतिकार न करता सहन करणे. दयेची संकल्पना खूपच व्यापक आहे. दयेचा संबंध आपण इतरांशी कसे वागावे याच्याशी आहे. “भूतांची दया हे भांडवल संता ” असे तुकोबानीही म्हंटले आहे. अंगी क्षमा आणि दया असणे हे संतांचे भावात्मक लक्षण आहे. आईने इथे ‘लोभ आणि अहंकार ज्याच्या अंगी नाहीत तो संत’ हे संतांचे अभावात्मक लक्षण सांगितले आहे. पण लोभ आणि अहंकार नसणे या अभावरूप गुणधर्माला मुक्ताई विरक्ती म्हणतात. शुद्ध ज्ञान म्हणजे ‘मी सर्वव्यापक ब्रह्म आहे’ हे मुखी असावे आणि आचरणी दिसावेही. हे ज्ञानरत्न ज्याने अतरंगी धारण केले आहे, त्याच्या मुखी ही रत्नप्रभा विलसेलच ना? त्या रत्नप्रभावानेच तो महात्मा इहलोकी आणि परलोकीही सुखी होतो. कुठले भाव आणि कशाचा अभाव असतो तेव्हा हा रत्नप्रभाव अनुभवता येतो हे मुक्ताबाईंनी सुरवातीस सांगितलेच आहे. ज्ञानदेवांकडे तर ते रत्न सुर्यपूत्र कर्णाच्या कवचकुंडलांसारखे जन्मजात आहेच आणि तरीही ह्या ईश्वरी लिलेत त्यांनी आत्तातरी दुःखच धारण केले आहे ना? तो सुर्यपूत्र कर्णही ईश्वरी लिलेत सुतपुत्र म्हणून वावरला ना? वेळीच सावरला असता तर?……असे कुणाच्याही बाबतीत होऊ नये म्हणून तर मुक्ताई साऱ्या मिथ्या कल्पना मागे सारायला सांगत आहेत. हे सुखकारक, ते दुःखकारक अशा प्रकारच्या साऱ्या मिथ्या कल्पना दूर करा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा…….ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हरि ॐ
🌸ताटी उघडा ज्ञानेश्वरा…६ 🌸
एक आपण साधू झाले | येर कोण वाया गेले ||
उठे विकार ब्रम्ही मुळी | अवघे मायेचे गा बळी ||
माया समूळ नुरे जेव्हा | विश्व ब्रम्ह होईल तेव्हां ||
ऐसे समजा आदि अंती | मग सुखी व्हावें संती ||
चिंता क्रोध मागे सारा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||
मुक्ताबाईंच्या ह्या अभंग पुष्पमालेच्या प्रत्येक पुष्पाचा रंग वेगळा. सहावा अभंग म्हणजे तर जणू मध्यान्हीचा तळपता सूर्य.स्वतःस उच्च वा श्रेष्ठ समजणाऱ्यांना अधिकारवाणीने असे समाजविले आहे की ते वाचतानाच आपल्याला जाणवते की चांगदेव का तिथे झुकले? अधिकार असणे म्हणजेच काहीतरी अधिक (Positive, सकारात्मक) असणे. मग जिथे अधिक आहे, तिथे उणे(Negative, नकारात्मक) कसे असेल? मग ज्याच्याकडे नकारात्मक दृष्टिकोन असेल, त्याला अध्यात्मिक पथावरील अधिकारी वा साधु,संत वा संन्यासी कसे मानावे? म्हणून पहिल्याच चरणात साधुसंतांनी सर्वसामान्य माणसांकडे सहानुभूतीने पाहण्याची, त्यांना समजावून घेण्याची आवश्यकता मुक्ताई प्रतिपादितात. आम्ही जेथे पोहोचलो तेच साधुत्व व इतर जनांचे जीवन वाया गेले असे आपल्या वर्तणुकीतून दर्शवणे ही साधुत्वाची अवस्था नव्हे. तर आपण जेथे आहोत तेथून इतरांना मार्गदर्शन करीत, हात देऊन त्यानांही आपल्या अवस्थेपर्यंत आणणे, किमान त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे साधुत्व.
ह्या अभंगाचा दुसरा चरण क्रांतिकारी विचारसरणीचा आहे. सामान्यांना झेपणार नाही. इथे त्या म्हणतात की सामान्य जन विविध विकारांनी ग्रस्त आहेत हे खरे, पण मुळात पहिल्यांदा विकार उठला तो एकमेवाद्वितीय अविकृत परब्रह्मातच ना?…….“एकोहम् बहु स्याम” हा आदि संकल्प म्हणजे एक विकारच म्हणायला हवा ना?……म्हणून त्या संकल्पबीजातून निर्माण झालेले हे सर्व प्रवाहपतीत जन, हे मायेचे बळी आहेत असे समजून त्यांचा तिरस्कार न करता त्यांच्यासाठी आपल्या हृदयी करुणा जागृत व्हावी. त्यांच्याबद्दल कळवळा यावा. ब्रह्मज्ञ कुणा म्हणावे? इथे एक पाठभेद आढळतो. काहीजण ‘माया समूळ नुरे जेव्हा।’ असे म्हणतात, तर काही जण ‘माया समूळ मुरेल जेव्हा।’ असे असल्याचे मानतात. मी अधिकारी नाही, अधिकारी व्यक्तींनी जरूर व्यक्त व्हावे. पण दोन्हीचे अर्थ सुरेखच आहेत. जन्मजन्मांतरीची माया जेव्हा समूळ नष्ट होईल असे म्हणा वा ज्याने त्या मायेला पचवले वा आपल्यात विरून टाकले असे म्हणा, पण त्यानाच हे इंद्रियगोचर असलेले अखिल विश्व म्हणजे अनेकत्वाने व्यक्त झालेले केवळ ब्रह्मच आहे हे ज्ञान होईल ना? सर्वत्र अनादी-अनंत ब्रह्मच आहे, हे ज्याने जाणले तो संतमहात्मा सुखी, सदासुखी असावा ना? असे म्हणून मायाभ्रमित ज्ञानेश्वरांना (माया कधी कुणाला भ्रमित करेल, रामायणातील त्या मायावी कांचनमृगासारखी भटकवेल हे नाही सांगता येत) मुक्ताईरूपी आदीमाया इथे आदेश देते …..चिंता क्रोध मागे सारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।। आता तेच आत्मज्ञानाचे, ब्रह्मज्ञानाचे चिलखत घेऊन चिंता व क्रोधादी विकारांना पुन्हा एकदा परास्त करा, मागे सारा आणि …………ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हरि ॐ
🌸ताटी उघड ज्ञानेश्वरा…….७🌸
ब्रह्म जैसे तैशापरी | आम्हा वेढिले भूती सारी ||
हात आपला आपण लागे | त्याचा करू नये राग ||
जीभ दाताने चाविली | कोणी बत्तीशी तोडीली? ||
थोडे दुखावले मन | पुढे उदंड साहाणें ||
चणे खावे लोखंडाचे | मग ब्रम्हपदी नाचे ||
मन मारुनी उन्मन करा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||
ह्या अभंगाचा खालीलप्रमाणे एक पाठभेद आढळून येतो.
ब्रह्म जैसें तैशा परी।आम्हा वडील भूतें सारी ॥१॥
अहो क्रोधे यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥२॥
जीभ दातांनी चाविली। कोणें बत्तीशी तोडीली? ॥३॥
मन मारुनी उन्मन करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
मागच्या म्हणजेच सहाव्या अभंगात साक्षात परब्रह्मावर सर्वप्रथम विकार तिथेच निर्माण झाला असे म्हणणाऱ्या मुक्ताबाई ह्या अभंगात सुरुवातीसच सांगतात की जरी असे असले तरी त्याला म्हणजे ब्रह्मतत्वाला काहीही फरक पडत नाही, कारण तो आमच्यासारख्या पंचमहाभूतांनी वेढलेला नाही. इथे आई एक फार मोठे रहस्य उलगडत आहे. ते रहस्य म्हणजे, जो पंचमहाभूतांनी वेढलेला नाही, त्याला विकार देखील विकारी बनवू शकत नाहीत. वेढले जाणे म्हणजे काय? वेढले जाणे म्हणजे त्या पंचमहाभूतांच्या गराड्यात व विळख्यात अडकून पडणे. देहात राहून जो विदेही झाला त्यालाच निर्विकारी बनणे साधेल. पुरातन काळापासून ऋषीमुनी ह्याच प्रयत्नात राहिले आणि त्यांनी ते साधलेही. संतभक्तांनी परब्रह्माला भजून ती विदेही अवस्था प्राप्त केली. सारी चराचर सृष्टी ह्या पंचमहाभूतांनीच बनलेली आहे आणि त्यांच्याच प्रभावात आहे. अशा स्थितीत ज्ञात्यांनी, ज्ञानेश्वरानी कोणावर आणि का रागवावे? मुक्ताई हा मुद्दा पटवून देताना दैनंदिन जीवनांतील आपल्या सर्वांच्या अनुभवाचा पण मार्मिक असा दाखला देतात. एखादेवेळी चुकून जीभ दातांखाली येते व चावली जाते, पण तेव्हा आपण चिडून दात पाडायला प्रवृत्त होत नाही ना?. उलट आपलेच दात आणि आपलीच जीभ असे म्हणून समाधान करून घेतो. मुक्ताईना पुढे जे सांगायचे आहे ते म्हणजे त्यांनी सांगितलेला हा दृष्टांत व्यापक केला म्हणजे सारे विश्व हे आपलेच शरीर आहे असे म्हणता येईल. मुक्ताई ज्ञानदेवांना त्यांच्या भविष्यकालीन जबाबदारीची आणि कार्याची जणू जाणीव करून देतात. ज्याला लोकसंग्रह म्हणजेच विश्वकल्याण साधावयाचे आहे, त्याने एवढ्यातेवढ्याने आपले मन दुखावून घेता कामा नये. कारण यापुढे त्यांना आणखी खूप काही सहन करायचे आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. ज्याला ब्रह्मप्राप्ती सारखे अत्युच्च ध्येय गाठायचे आहे, त्याला कष्ट हे सहन करावेच लागतात आणि लागणारही.
पुढच्या चरणात मुक्ताई म्हणतात, ‘चणे खावे लोखंडाचे। मग ब्रह्मपदी नाचे।।’ साऱ्या कडधान्यांमध्ये चणे जरा अधिकच कठोर, त्याला अंकुर येण्यासही थोडा अधिक वेळ लागतो. सर्वसामान्य समाज तर लोखंडी चण्यांसारखा आहे. हे खरे, पण तो समाज जर वैश्विक शरीराचा अविभक्त भाग आहे तर ज्या ज्ञानदेवांना ब्रह्मपदी नाचायचे आहे त्यांना हे लोखंडी चणे पचवणे भाग आहेना? हे लोखंडी चणे पचविण्यासाठी काय करावे हे देखील त्या अंतिम चरणात स्पष्ट करतात. गुरू केवळ तुमची खरी समस्या तुम्हाला सांगत नाही, तर त्या समस्येचे निवारण कसे करायचे तेही सांगतो. त्या म्हणतात उन्मन व्हा, मनावर ताबा ठेवून आणि वैयक्तिक रागलोभ बाजूला सारून तटस्थपणे विचारसागरमंथन करा. इथे एक पाठभेद आहे. काही ठिकाणी ‘मन मारुनी मथन करा’ तर काही ठिकाणी ‘मन मारुनी उन्मन करा।’ असे आढळते. पण कुठलाही शब्द घेतला तरी काहीही फरक नाही…..कारण त्या शब्दाच्या पूर्वीचे ‘मन मारुनी’ हे दोन शब्दच खरे महत्वाचे आहेत. आधुनिक दन्तवैद्य जसे रूट कॅनॉलिंग करतात तसे मनाच्या बाबतीत करणे भाग आहे. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे……म्हणून त्या परत एकदा तीच ललकारी देतात………..ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हरि ॐ
. . . . . . .
वॉट्सॅपवरून साभार . . . दि.१४-०७-२०२१