स्वातंत्र्यवीर सावरकर – १

आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्य मला मिळालेल्या लेखांचे संकलन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील लेखांच्या संग्रहाचा दुसरा भाग : https://anandghare.wordpress.com/2021/05/28/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-2/

विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पण दिन (२६ फेब्रुवारी,१९६६)

प्रायोपवेशन करून तात्यारावांनी देह त्यागला. त्या संदर्भात मी इंटरनेटवर शोधाशोध सुरु केली आणि मला सुभाष नाईक हे नाव दिसले .(स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणदिनाच्या स्मृतीनिमित्तानें) त्यानी लिहिलेला एक लघुलेख वाचायला मिळाला..तेवढ्यासाठी मी मा.सुभाष नाईक याना फोन केला,त्यांच्याशी बराच वेळ बोललो. त्यांचा लेख नावानिशी, अपलोड करू का ? म्हणून परवानगी मागितली,त्यांनी त्याला मान्यता दिली त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार .त्यांचा लेख देत आहे.

मृत्यु आणि स्वा. सावरकर : स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणदिनाच्या स्मृतीनिमित्तानें

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनभर मृत्यूशी जवळचा संबंध होता, असें म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. क्रांतीचा पथ म्हणजे मृत्यूच्या हातात हात घालून चालणेंच की. आणि , हा पथ त्यांनी विचारपूर्वक स्वीकारलेला होता.

‘की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने
लब्ध-प्रकाश-इतिहास निसर्गमाने
जे दिव्यदाहक म्हणोनि असावयाचे
बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे

यावरून त्यांचे सुस्पष्ट विचार आपल्याला कळतात. त्यांच्या जीवनातल्या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या आपल्या ‘हे स्वतंत्रते’ या स्फूर्तिप्रद कवितेत त्यांनी म्हटलेलें आहे – ‘तुजसाठि मरण तें जनन , तुजवीण जनन तें मरण’. देशाच्या स्वातंत्र्याचा एवढा ध्यास की त्यावरून निज-जीवन ओवाळुन टाकावें, अशी त्यांची वृत्ती व कृती होती.

लंडनमध्ये मदनलाल धिंग्राने इंग्रज ऑफिसर कर्झन वायली ( Curzon Wyllie) याचा जो वध केला, त्यामागे प्रेरणा सावरकरांचीच होती. तसेंच, त्यानी इंग्लंडमधून भारतात सशस्त्र लढ्यासाठी शस्त्रही धाडली होती. हे सारे मृत्यूशी संबंधित खेळ’च .नंतर, अटकेत पडल्यावर, फ्रान्सच्या मार्सेलीस बंदरात जहाजातून ते पळून गेले, तेव्हां त्यांच्यावर जर गोळीबार झाला असता, तर त्यात मृत्यु पावण्याची शक्यता होतीच, आणि सावरकरांनी पलायनापूर्वी ती नक्कीच विचारात घेतली असणार.

अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा इतकी कडक होती, की तें जीवन असह्य होऊन कांहीं कैद्यांनी आत्महत्याही केली . त्या काळाबद्दल सावरकरांनी स्वत:च लिहून ठेवलें आहे की, त्या काळात, विशेष करून जेव्हां त्यांची प्रकृती प्रचंड खालावलेली होती, त्यावेळीं त्यांना स्वत:ला, या मार्गाचा अवलंब आपणही करावा असें वाटलें होतें. ध्यानात घ्या, सर्व परिस्थिती प्रतिकूल असतांना, एकट्यानें तिला तोंड देतांना, (No support-system) , अशा या ग्रासलेल्या नकारात्मक मन:स्थितीतून बाहेर येणें किती कठीण असेल ! त्याची कल्पनाही करणें कठीण आहे. पण, त्यातूनही सावरकर निग्रहानें सावरले, मृत्यूचें दार न ठोठावतांच त्याच्या संभाव्य मिठीतून बाहेर पडले. खरं सांगायचं तर, त्या वेळी अंदमानातील क्रातिकारकांना मृत्यु म्हणजे ‘साल्व्हेशन’च ( मुक्ती ) वाटत होतें. पण हा ‘निगेटिव्ह’ विचार झाला. त्या salvation च्या , मुक्तीच्या, आकर्षणापासून बाहेर येणें सोपें नव्हे. पण सावकरांनी दुर्दम्य इच्छाशक्तीनें तें साधलें. कारण, आपण जीवित राहून देशासाठी योगदान देऊं शकूं ही त्यांची खात्री . देशासाठी मृत्यूशी जवळीक बाळगणें हा एक संबंध झाला ; आणि नकारात्मकरीत्या त्याला भेटणें, म्हणजे कर्तव्यच्युत होणें, हा अगदी वेगळा संबंध झाला. तसल्या संबंधाला सावरकर बळी पडले नाहींत. मृत्यूची भीती त्यांनी conquer केलेली होती, तिला पूर्णपणें कह्यात आणलें होतें.

अगदी देशाच्या स्वातंत्र्यानंतरही, आपल्याच सरकारनें त्यांना महात्मा गांधीच्या खुनाच्या खटल्यात गोवलें , तेव्हां त्या महापुरुषाला काय वाटलें असेल ? ‘ याचसाठी केला सारा अट्टाहास ?’ असा प्रश्न नक्कीच त्यांच्या मनात आला असेल. जी माणसें दोषी ठरलीं, त्यापैकी दोघांना मृत्युदंड झाला , हें आपल्याला माहीतच आहे. ज़रा कल्पना करा, दोषी नसतांनाही जर सावरकरांना दोषी ठरविलें गेलें असतें, तर काय भयंकर प्रकार झाला असता !! कल्पनेनेही अंगावर शहारे येतात ! अनेकानेक महापुरुषांना , त्यांचा दोष नसतांनाही मृत्यू स्वीकारावा लागला आहे. येशू ख्रिस्त हें एक उदाहरण. पण येशू मृत्यूला घाबरला नाहीं . गांधी खून खटल्यात तर नथूराम व आपटेही घाबरले नाहींत, (टीप – ध्यानीं घ्या, इथें त्यांच्या कृत्याचें ग्लोरिफिकेशन करण्याचा यत्किंचितही हेतू नाही; आपण केवळ मृत्यूवर चर्चा करत आहोत ), तिथें सावरकरांसारखा नरसिंह घाबरणें शक्यच नव्हतें. निग्रहानें त्यांनी स्वत:चा बचाव कोर्टात केला , सत्य त्यांच्या बाजूनें होते, व ते सुटले , पण मृत्यूच्या दाराचें पुन्हां एकवार दर्शन घेऊनच !

१९४५ सालीं स्वातंत्र्यवीरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सांगलीला मृत्युशय्येवर होते. तेही क्रांतिकारक होते, त्यांनीही अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेली होती. त्यांना लिहिलेल्या पत्रात स्वातंत्र्यवीर म्हणतात की आपल्याला तर लहानपणापासूनच मृत्यूची सोबत आहे. आतां शांतपणें त्याला सामोरें जावें. यावरून त्यांचा मृत्यूविषयींचा दृष्टिकोन आपल्याला कळतो.

कांहीं काळ आधी, याच विषयावर स्वातंत्र्यवीर काय म्हणाले, हें पाहणेंही उपयुक्त ठरेल. त्या वेळीं वा. वि. जोशी यांनी, ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी बद्दल चर्चा करून, ‘ज्ञानदेवांनी आत्महत्या केली’ असा निष्कर्ष काढला होता. त्यानंतर, ‘ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीला आत्मार्पण म्हणावें की आत्महत्या ?’ असा प्रश्न उपस्थित करून स्वातंत्र्यवीरांनी समर्पक विष्लेषण केलें होतें – ” जें जीवनांत संपायचें होतें तें संपलेलें आहे , आतां कर्तव्य असें उरलेलें नाहीं , अशा कृतकृत्य भावनेनें ‘पूर्णकाम’ झालेले धन्य पुरुष आपण होऊन प्राण विसर्जित करतात. तें कृत्य ‘उत्तान अर्थीं बळानें जीव देणें ’ असूनही, त्याला आत्मसमर्पण म्हणून जें गौरविलें जातें, तें यथार्थ असतें.” यातून सावरकरांचें मृत्युविषयक तत्वज्ञान दिसून येतें.

हिंदूंमधील ‘प्रायोपवेशन’ तसेंच जैनांमधील ‘संथारा’ या प्रकारच्या मृत्युभेटीला सन्मान मिळतो , तें आदराला पात्र ठरतें . ( टीप- इथें धर्माचा उल्लेख हा केवळ वर उल्लेखलेल्या प्रथांबद्दल आहे प्रस्तुत लेखाचा धर्माशी प्रत्यक्षा प्रत्यक्ष कांहीं संबंध नाहीं ). त्या आदराचें कारण सावरकारांच्या वरील विवेचनातून स्पष्ट होतें.

जेव्हां स्वातंत्र्यासाठी क्रांतीलढा सुरूं केला तेव्हां , ‘आपल्याला भारत स्वतंत्र झाल्याचें पहायला मिळेल’ अशी सावरकरांना अजिबात कल्पना नव्हती. देश स्वतंत्र झाल्यावर तसें त्यांनी स्वत: म्हटलेलेंही आहे. नंतरही, स्वत:च्या अधिक्षेपाचा विचार त्यांनी दूर ठेवला ; देश स्वतंत्र होण्याचें त्यांना समाधान होतें , आणि त्यामुळे त्यांना कृतकृत्य वाटलें असल्यास त्यात नवल नाहीं. गांधी खुनाचें किटाळ दूर झाल्यावर, सावरकरांनी स्वत:च्या गतकाळाविषयीं लेखन करून आपल्या सर्वासाठी अमूल्य ठेवा ठेवला. मृत्यूच्या दोन एक वर्षें आधी त्यांनी ‘भारताच्या इतिहासाची सहा सोनेरी पानें’ हा विचारप्रवर्तक ग्रंथ लिहिला .

हें सर्व साध्य झाल्यानंतर, जीवनसाफल्य प्राप्त झालें असें वाटून, त्यांनी प्रायोपवेशन करण्यांचे ठरविले. मंडळी, विचार करा, आपणां सार्‍यांना भूक-तहान काटणें, थोड्या वेळानंतर कठीण होऊन जातें. एक वेळ माणूस अन्नावाचून कांहीं काळ काढूं शकेल ; परंतु पाणी हें तर जीवन आहे, त्याच्यावाचून रहाणें किती कष्टप्रद ! तिथें दिवसेन् दिवस अन्नपाण्यावाचून काढणें यासाठी किती जबरदस्त मनोनिग्रह लागत असेल , याची कल्पनासुद्धां करणें कठीण आहे. प्रायोपवेशनानें सावरकरांनी स्व-देहाचें ‘विसर्जन’ केलें. पण मृत्यूला कसें सामोरें जावें, याचा एक महान वस्तुपाठ ते आपल्यासाठी ठेवून गेले.अशा वेळीं समर्थ रामदासांच्या वचनाची आठवण येते – ‘महाथोर ते मृत्युपंथेंचि गेले ; कितीएक ते जन्मले आणि मेले’. मरणें आणि ‘मृत्युपंथानें जाणें’ यांतील भेद, जो रामदासांनी संगितला आहे, तो सावरकरांच्या कृतीतून आपल्यापुढे एक आदर्श म्हणून नेहमीच उभा राहील.–

सुभाष स. नाईक मुंबई.

मराठी बद्दल ते कायमच आग्रही असायचे,म्हणून आंग्ल भाषेतील शब्दांना मराठीमधे प्रतिशब्द दिले व ते आपण रोज वापरतो. थोडे शब्द उदाहरण म्हणून देतो.
महापौर, दूरध्वनी, दिग्दर्शन, प्राचार्य, संचलन, पटकथा, मुख्याध्यापक, स्थानक, ध्वनिमुद्रण, शस्त्रसंधी, वार्ताहर ,संपादक इत्यादी.
अंतकाळ जवळ आल्यावर त्यांच्या जवळच्या माणसाने नर्सला बोलवा म्हटल्यावर त्या स्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या ओठी शब्द आले, अरे परिचारिकेला बोलवा असे म्हणता येत नाही का?

नेहमी लिखाणाचा शेवट करताना त्या संबंधी एक गाणे देत असतो आज त्या बद्दल विचार करताना अनादी मी अनंत मी हे गाणे अनिवार्यच होते.
मार्सेलिस येथे मोरिया बोटीतून मारलेल्या त्या सुप्रसिद्ध आणि त्रिखंडात गाजलेल्या उडीनंतर त्यांना परत ताब्यात घेतले जाते. आता नानाविध प्रकारे छळ होणार हे नक्की म्हणून त्याला धीरोदत्तपणे तोंड देता यावे म्हणून रचलेली धैर्यदायी कवच मंत्र रचना (सन १९१०) त्यांनी लिहिली,
“अनादी मी अनंत मी “
https://youtu.be/FRDKzNqZVNE

वीर सावरकरांना विनम्र अभिवादन आणि शत शत प्रणाम.

प्रसाद जोग.सांगली.
९४२२०४११५०

संदर्भ : इंटरनेट, श्री.सुभाष नाईक, आठवणीतली गाणी, यु ट्युब, विकिपीडिया.

******************

मावळत्या दिनकरा..!

२६ फेब्रुवारी १९६६, होय याच दिवशी सायंकाळी हिंदूस्थानात एक नाही तर दोन सुर्य अस्ताला गेलेत. एक नेहमीचा नैसर्गिक नितीनियमांप्रमाणे पृथ्वीवरील सर्व जीवमात्रांना प्रकाश देऊन कर्मफळाची अपेक्षा न करता मावळला, तर दुसरा आपले क्षात्रतेज निर्माण करुन, मिळालेला मनुष्यजन्म पतित पावन करुन, अखंड हिंदूराष्ट्र निर्मितीचा ज्वालामुखी अखंड तेवत ठेवत प्रायोपवेशनाने मावळला. त्या धगधगत्या ज्वालामुखीचे नांव होते स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर..!
सुर्याची ऊबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकालाही हेवा वाटेल अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनेही शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता, या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे विनायक दामोदर सावरकर..! स्वातंत्र्यवीर सावरकर ही व्यक्ती नाही तर ते अखंड तेवत राहणारे विचारांचे विद्यापीठ आहे.
मातृभूमीच्या रक्षणार्थ, मातृभाषेच्या जिवीतार्थ, स्पृष्य अस्पृशांच्या व जातीभेदाच्या सीमा मिटवून अखंड हिंदवी राष्ट्र निर्मीतीसाठी आपले तन, मन, धन, संसार, मोह, माया पणाला लावणारा एकमेवाद्वितीय हिंदू ह्रदयसम्राट..!
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अवघ्या विश्र्वातील असे एकमेव स्वातंत्र्ययोद्धा होते ज्यांना एकाच आयुष्यात दोन दोन जन्मठेपेची शिक्षा झाली. सदर शिक्षा भोगून आल्यावर देखील हा महान योद्धा आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ पुन्हा राष्ट्र जीवनात सक्रिय झाला.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अवघ्या विश्वातील असे पहिले लेखक आहेत की, ज्यांच्या ‘१८५७ चा भारताचा स्वातंत्र समर’ या पुस्तकावर दोन दोन देशांनी प्रकाशनापूर्व बंदी घातली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे प्रथम स्नातक होते, ज्यांची पदवी, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे, ब्रिटिश सरकारने, हिसकावून घेतली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे प्रथम भारतीय विद्यार्थी होते ज्यांनी मातृभुमीच्या प्रेमाखातर, तात्कालिन ग्रेट ब्रिटनच्या राजा प्रती निष्ठावान असल्याची शपथ घेण्यास नकार दिल्याने परिणामस्वरूप त्यांना शिक्षण घेऊनही, ‘बॅरीस्टर’ हि पदवी मिळाली नाही तसेच वकीली करता आली नाही.
स्वातंत्रवीर सावरकर असे प्रथम भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते, ज्यांनी सर्वप्रथम पुण्यात विदेशी वस्त्रांची होळी केली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाच्या तिरंगा झेंड्याचे मधोमध धर्म चक्र लावण्याबद्दल सल्ला दिला होता. तात्कालिन राष्ट्रापती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा सल्ला मान्य केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यपुर्व काळातील ब्रिटीश साम्राज्याशी लढा देणारे असे पहिले राजकीय बंदिवान होते, ज्यांचे प्रकरण हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहचले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे पहिले क्रांतिकारी होते ज्यांनी हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबद्दल चिंतन केले आणि बंदी जीवन समाप्त होताच अस्पृश्यता आणि इतर कुप्रथांविरुद्धच्या सामाजिक कार्यात वाहून घेतले.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अवघ्या विश्वातील असे पहिले कवी होते कि, ज्यांनी अंदमानच्या एकांत कारागृहात भीतींवर खीळा आणि कोळशाने मातृभूमीवर विविध कविता लिहून मुखोद्वत केल्या. अशा प्रकारे मुखोद्वत केलेल्या सुमारे दहा हजारांहून जास्त ओळी त्यांनी जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका झाल्यावर पुन्हा लिहून काढल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे वर्णनपर जी सुप्रसिद्ध काव्य लिहिले आहे त्यातही हिंदू राष्ट्राची प्रखर संकल्पना मांडली आहे.

हे हिंदूशक्ती संभूत दीप्तितम तेजा
हे हिंदू तपस्यापुत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री सौभाग्यभूतीच्या साजा
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा..!

कवी मन असलेले भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी हिंदूत्वाबद्दल ‘ हिंदू मेरा परीचय’ हि जी सुप्रसिद्ध कविता लिहिलेली आहे ती वाचत असतांना डोळ्यासमोर एकच तेजोमय प्रतिमा उभी राहते,‌ आणि ती प्रतिमा स्वातंत्रवीर सावरकरां व्यतिरीक्त अन्य असूच शकत नाही.

मेरा परीचय..!
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..!
मै शंकर का वह क्रोधानल कर सकता जगती क्षार–क्षार।
डमरू की वह प्रलय ध्वनि हूँ, जिसमे नचता भीषण संहार।
रणचंडी की अतृप्त प्यास, मै दुर्गा का उन्मत्त हास।
मै यम की प्रलयंकर पुकार, जलते मरघट का धुँआधार।
फिर अंतरतम की ज्वाला से जगती मे आग लगा दूँ मैं।
यदि धधक उठे जल, थल, अंबर, जड चेतन तो कैसा विस्मय..?
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..!

मै अखिल विश्व का गुरु महान्, देता विद्या का अमरदान।
मैने दिखलाया मुक्तिमार्ग, मैने सिखलाया ब्रह्मज्ञान।
मेरे वेदों का ज्ञान अमर, मेरे वेदों की ज्योति प्रखर।
मानव के मन का अंधकार, क्या कभी सामने सका ठहर..?
मेरा स्वर्णभ मे घहर–घहर, सागर के जल मे छहर–छहर।
इस कोने से उस कोने तक, कर सकता जगती सोराभ्मय।
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..!

मैने छाती का लहू पिला, पाले विदेश के क्षुधित लाल।
मुझको मानव में भेद नही, मेरा अन्तस्थल वर विशाल।
जग से ठुकराए लोगों को लो मेरे घर का खुला द्वार।
अपना सब कुछ हूँ लुटा चुका, फिर भी अक्षय है धनागार।
मेरा हीरा पाकर ज्योतित परकीयों का वह राजमुकुट।
यदि इन चरणों पर झुक जाए कल वह किरीट तो क्या विस्मय..?
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..!

होकर स्वतन्त्र मैने कब चाहा है कर लूँ सब को गुलाम..?
मैने तो सदा सिखाया है करना अपने मन को गुलाम।
गोपाल राम के नामों पर कब मैने अत्याचार किया?
कब दुनिया को हिन्दू करने घर–घर मे नरसंहार किया..?
कोई बतलाए काबुल मे जाकर कितनी मस्जिद तोडी..?
भूभाग नहीं, शत–शत मानव के हृदय जीतने का निश्चय।
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..‌!

मै एक बिन्दु परिपूर्ण सिन्धु है यह मेरा हिन्दु समाज।
मेरा इसका संबन्ध अमर, मैं व्यक्ति और यह है समाज।
इससे मैने पाया तन मन, इससे मैने पाया जीवन।
मेरा तो बस कर्तव्य यही, कर दू सब कुछ इसके अर्पण।
मै तो समाज की थाति हूँ, मै तो समाज का हूं सेवक।
मै तो समष्टि के लिए व्यष्टि का कर सकता बलिदान अभय।
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..!

स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्व ऐन तारूण्यातले मोठे उत्साही आणि बुध्दिमान देशभक्त होते. एकदा सावरकरांना लंडनमधील प्रसिध्द वृत्तपत्राच्या प्रतिनिधिने विचारलं होतं, की तुमच्यावर सतत लक्ष ठेवलं जातं, तुमच्या मागे सतत पोलिसांची नजर असते ते तुम्हाला कसं वाटतं..? त्यावर सावरकर म्हणाले, “ We don’t mind. They may follow us if the atmosphere suits them !” टिपिकल ब्रिटिश विनोद म्हणून त्यांच्या या उदगाराचं कौतुक झालं होतं.

लंडनमधलं इंडीया हाऊस हे स्वातंत्र्यवीर कार्याचे केंद्र. तिथलं वातावरण तर अत्यंत भारलेलं होतं. हा मदनलाल धिंग्रा, सावरकर स्वतः सेनापती बापट हे सगळे त्यावेळेला रसरसते तारूण्य आणि देशप्रमाचं वारं डोक्यात घेऊन वावरणारे स्फूर्तिशील युवक होते. सेनापती बापट यांचा घेतलेला वृध्दपणीचा फोटोच आम्ही नेहमी पाहत आलो आहोत. लहानपणापासून ते तसे दिसत नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप एवढी पडत असे, की त्यांची एक फ्रेंच मैत्रीण जिला त्यांनी फ्रेंच भाषेतलं बॉम्बस्फोटाचं लिटरेचर ट्रान्सलेट करून द्यायची रिक्वेस्ट केली होती. तिने आपली परीक्षा बाजूला ठेवून – ड्रॉप घेऊन प्रथम ते इंग्लिशमध्ये भाषांतरित करून दिलं. त्याच्या प्रती काढून सावरकरांनी भारतातल्या क्रांतीकारकांना पाठवल्या. त्याचाच उपयोग पुढचे बॉम्बस्फोट केले गेले. लंडनमध्ये देखील ‘पारतंत्र्यात राहणं मान्य नसणं हा गुन्हा नसून गौरवाची गोष्ट आहे’ असा मतप्रवाह होता. अनेक क्रातिकारकांचं ते कार्यस्थळ होतं. रशियन क्रांतीची सूत्रे देखील तेथूनच हलत होती. हिंदुस्थानातल्या तरूणांच्या कार्याचा प्रभाव वाढत होता.

हे सर्व क्रांतिकार्य देशाबाहेरून चाललं होतं. इटलीला स्वातंत्र्य मिळवून देणा-यांत सिंहाचा वाटा असलेल्या मॅझेनीचं आत्मचरित्र सावरकरांनी भाषांतरित करून भारतात पाठवलं होतं. त्याची सावरकरांच्या भाषेतली प्रस्तावना एवढी तेजस्वी आणि प्रेरणादायी होती, की ब्रिटिश सरकारला भीती वाटली आणि तिच्यावर बंदी आणली. अर्थातच ती जास्त प्रसिध्द झाली. सावरकरांना लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत करून लंडनला पाठवल होतं. टिळक आणि सावरकर दोघांच्या बुध्दिमत्तेबद्दल तिथे आदर होता. बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन पदवी दिली न गेलेला तरूण म्हणून सावरकरांबद्दल सहानुभूती होती. याचवेळी मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घालून मारल्यामुळे सर्व लोकमत सावरकर आणि सहकारी यांच्या विरूध्द गेलं. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडली होती. इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची सजा दिली गेली. मदनलालच्या निषेधाला सावरकरांनी विरोध केल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्यावर केंद्रित झाल्या. भारतातल्या क्रांतिकार्यात सुसूत्रता आणून त्याची सूत्रे लंडनमधून हलविण्याची शक्यता मोडून पडली. लंडनमधील कार्य उदध्वस्त होण्याची वेळ आली.

घर मोडकळीला आल्याचा – दोघं भाऊ पकडले गेल्याचा – धक्का होताच. माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही तो क्रांतीकारी बनतो. घरावर राष्ट्राच्या नावाने बेल तुळस वाहून हे लोक बाहेर पडले तरी प्रेम जिवंतच असतं ही माणसं सामान्य नव्हती. एवढया मोठया सत्तेशी ते थोडेच लोक झुंज घेत होते. अख्खा समाज तुमच्या बाजूने असला तरी तो तुमच्या बाजूने उभा राहत नाही. त्याला उभं करायचं आणि त्याचवेळेला एकाकी झुंजायचं असं अवघड काम ते करीत होते. कुटुंबाची वाताहत, कार्य उदध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपणं आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत हे कळणं यातून अक्षरशः पळून जाऊन ते त्या ब्रायटनच्या किना-यावर बसले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हे खरं तर आजही मोठ्या गौरवाने गावं असं हे मातृभूमीला हूंकारलेले, सागराशी हितगुज करणाऱ्या संकल्पनेचे हे अजरामर काव्यगीत..! आपण अनेकदा ऐकलं अन पुटपुटलं देखील आहे. या काव्याच्या प्रत्येक शब्दांतून मातृभूमीच्या आदरार्थ जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकतांना वाचले पाहिजेत अन वाचतांना ऐकले देखील पाहिजेत..!

स्वातंत्र्यवीर सावरकर हे लंडनला बॅरीस्टरच्या शिक्षणासाठी गेले असतांना, त्यांचा मुलगा प्रभाकर याच्या अकस्मात मृत्यूची बातमी त्यांना समजते. त्यातच ब्रिटीशां सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला सुरु केला. त्यामुळे त्यांना लंडन मध्ये कधीही अटक होण्याची शक्यता होती. या दरम्यान ते सहज साईट सिइंगला लंडन जवळच असलेल्या ब्रायटन नावाच्या एका गावाजवळील समुद्र किनारी गेले होते. भारत भुमीच्या स्वातंत्र्याबद्दल आत्मचिंतन करत‌ असतांना, एकदम त्यानां हे गीत स्फुरलं..!

सदर प्रसंगाची पुर्वपीठीका अशी होती की, ब्रिटनमध्ये भारतीय क्रांतीवीर मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घालून मारल्यामुळे सर्व लोकमत सावरकर आणि सहकारी यांच्या विरूध्द गेलं. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडली होती. इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची सजा दिली गेली. मदनलालच्या निषेधाला सावरकरांनी विरोध केल्याने पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून जाऊ शकत नाही. या भावनेतून ते शब्द आले ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत.

त्या सागरावर रागावलेला, रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.’ भूमातेच्या चरणतला तुज धूता । मी नित्य पाहिला होता. त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास, मित्र मित्राला म्हणतो तसा, की चल जरा फिरायला जाऊ दुस-या देशात..!
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ । सृष्टीची विविधता पाहू
त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.
जननी-ह्रद विरहशंकितहि झाले । परि तुवां वचन तिज दिधले.
पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन. जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन। त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी । मी जगदनुभव-योगे बनुनी ।
मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो.
तव अधिक शक्त उदधरणी । मी
पाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद् धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं !
‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला l सागरा प्राण तळमळला ।।१।।
लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी । ही फसगत झाली तैशी
पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.
भू विरह कसा सतत साहू या पुढती । दशदिशा तमोमय होती
तमोमय म्हणजे अंधःकारमय मार्ग दिसत नाही असं झालंय.
गुणसुमने मी वेचियली या भावे । की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. ही सुंदर कुटुंब वत्सलता. प्रेम इथे नाही.
ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता । रे तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंचा
राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.
भुलविणे व्यर्थ हे आता । रे बहु जिवलग गमते चित्ता । रे तुज सरित्पते, जी सरिता । रे
हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत. माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।।
यानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात,
या फेन-मिषे हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा ?
माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी । मज विवासना ते देशी
विजनवास विदेशवास किंवा विवास – तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक –
तरि आंम्लभूमी भयभीता । रे अबला न माझिही माता । रे
माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.
कथिल हे अगस्तिस आता । रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला
आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू.
मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय.
स्वातंत्र्यपुर्व काळात, ब्रिटीश साम्राज्याला सतत आव्हान देऊन सळो की पळो करणाऱ्या या भारतमातेच्या सुपुत्राला स्वतंत्र भारतात मात्र पुन्हा एकांतवासच मिळाला.
स्वातंत्र्योत्तर काळातील कथीत मवाळ गटाच्या नेत्यांशी झालेल्या वैचारिक मतभेदांमुळे या भारतमातेचा सुपुत्राला एकाकी जीवन जगावे लागले. एवढेच नाही तर महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा खटला पण त्यांचेवर भरण्यात आला. ऐतिहासिक लाल किल्ल्यात चाललेल्या या खटल्याची सुनावणी झाली अन त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. पण तात्कालीन स्वतंत्र्य भारताच्या सरकारने गांधी हत्येबाबत खटल्याचा न्यायालयीन निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा श्री. जीवन लाल कपुर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करून स्वातंत्र्यवीर सावरकर या निष्काम कर्मयोग्यास पुन्हा एकदा व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला व इतिहासात या स्वातंत्र्यवीरास खलनायक ठरवण्याचा वेळोवेळी प्रयत्न सुरू ठेवला. हा चौकशी आयोग दिनांक २१ नोव्हेंबर १९६६ रोजी आस्तीत्वात आला ( स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजीच प्रायोपवेशनाद्वारे आपला देह निसर्गाच्या स्वाधीन केला होता). त्यानंतर दिनांक ३० नोव्हेंबर १९६९ रोजी या चौकशी आयोगाने आपला चौकशी अहवाल शासनास सादर केला.स्वातंत्र्यवीर सावरकर या जगात राहिलेले नसतांना देखील, या चौकशी आयोगाने आपल्या अहवालात सावरकरावर संशयास्पद ठपका ठेऊन, या महान नरवीरास स्वातंत्र भारताच्या इतिहासात एक प्रकारे व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही असे वाटते.

तरूणपीढीने स्वातंत्रवीर सावरकरांच्या चैतन्यमयी विचारांचे, लिखाणाचे वाचन करून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आज रोजी सायंकाळी पश्चिमेला प्रखर तेजोमय झालेला सुर्य हा मावळतांना त्याचा लालबूंद रंग हा प्रखरतेची साक्ष देत होता.
क्षितिजावरचा सुवर्ण पिसारा आवरून ढळणाऱ्या अशा या तेजोमय सुर्याकडे लक्ष द्यायला कोणासा वेळ नव्हताच अन खंतही..!
अस्ताला जाणाऱ्या भास्कराकडे पाहता पाहताच मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीची जाणीव करणाऱ्या असंख्य आठवणी मनांत डोकावू लागल्या. नकळत जेष्ठ कवी कै. भा.रा तांबे यांची एक कविता ओठावर आली.
मावळत्या दिनकरा अर्घ्य तूज जोडोनी दोन्ही करा !
जो तो वंदन करी ऊगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या !
रीत जगाची ही रे सवित्या, स्वार्थपरायणपरा !
जेष्ठ कवीवर्य भा.रा. तांबे यांच्या संवेदनशिल मनात काय विचार असेल या कवितेद्वारे सुर्याशी संवाद साधतांना..?
एखाद्याच्या हातात पद अथवा सत्ता असतांना त्याचा उदोउदो करणारी मंडळीच त्याची सत्ता गेल्यानंतर मात्र त्या व्यक्तीकडे ढुंकूनही पहायला तयार होत नाही.
नेहमी आपल्या अवती भवतीच असलेल्या स्वार्थी जगाचा कटू अनुभव अस्ताला जाणाऱ्या सुर्याकडे पाहून शब्दात मांडण्याचा प्रयत्न या महान अवलीयाने लीलया केलेला आहे.
उपकाराची कुणा आठवण..? ‘शितें तोवरी भूते’ अशी म्हण;
जगात भरले तोंड पुजेपण, धरी पाठीवर शरा,
मावळत्या दिनकरा ..!

मोठ्या उद्दीग्न मनाने कवीने या कडव्यामधून खोटारड्या जगाची रीत सांगीतली आहे. तोंडपुजे लोक अवती भवती असतात, पण तुमची पाठ फिरली की तेच लोक निंदेचे शर किंवा वाग्बाण पाठीवर मारणार. प्रेमाचे, स्नेहाचे ढोंग करणारी स्वार्थी माणसे कवीला दिसतात.

असक्त परी तू केलीस वणवण, दिलेस जीवन, हे नारायण,
मनी तू धरीले सानथोरपण, समदर्शी तू खरा..! मावळत्या दिनकरा..

स्वत: अपार कष्ट करून, अवघे आयुष्य पणाला लाऊन समाजासाठी चंदनासारखे झिजलेल्या अनेक महान व्यक्तींचे स्मरण या ओळीतून कवीने चाणाक्षतेने करून दिले आहे.
या कवितेने मावळतीला झुकलेला दिनकरही क्षणभर थांबला अन काव्य प्रतिभेचे अलौकीक तेज लाभलेल्या कवी भास्कराला (भा.रा.तांबे) त्याने वंदन केले..!
मावळत्या दिनकरा..! कदाचित हा मावळता दिनकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मा असल्याचा मला भास होत होता. होय हा सिद्धहस्त स्वातंत्र्यवीर, लेखक, कवी, समाजसेवक, नेता, आजही अश्वत्थाम्यासारखा फिरत असेल अन स्वतंत्र्य भारताच्या आजच्या परीस्थितीकडे पाहून मनातच पुटपुटत असेल, हेची फळ मम तपाला…!
आजच्या तरुण पिढीने याबाबत अंतर्मुख होऊन विचार करणे अभिप्रेत आहे.
थांबतो इथेच. जय सावरकर..!
विचारमंथन..!

राजेश पुराणिक.

अंत्ययात्रा

तात्यांचे प्राणोत्क्रमण झाल्याची दुःखद वार्ता सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली. वृत्तपत्रांनी दुपारीच विशेष अंक काढले. नभोवाणीने दुपारी साडेबारा वाजता वृत्त प्रसृत केले. वृत्त ऐकताच अंत्यदर्शनासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रांतसंघचालक कै. काशीनाथपंत लिमये आणि आचार्य अत्रे आले. त्यांनी तात्यांच्या खोलीत जाऊन अंत्यदर्शन घेतले. आता अंत्ययात्रा काढण्यासाठी प्राथमिक सिद्धता करण्याचे दायित्व सर्वच कार्यकर्त्यांवर-विशेषतः हिंदूसभेच्या कार्यकर्त्यांवर पडले. त्यांनी यात्रेसाठी एक लष्करी गाडा शव वाहून नेण्याकरता मिळवण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिका-यांना तशी विनंती करण्यात आली. परंतु ती नाकारण्यात आली. ही वार्ता आचार्य अत्रे यांना समजल्यावर त्यांनी, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना विनंती केली की, शासनाकडून आपली मागणी पुरी होत नसल्याने व्ही. शांताराम यांनी त्यांच्या चित्रनगरीतून तोफा व बंदुका घेऊन बसलेले सैनिकांचे चित्रफलक लावलेला ट्रक सिद्ध करून द्यावा. त्यांच्या या विनंतीला मान देऊन व्ही. शांतारामांनी अवघ्या वीस-एक तासांत लष्करी गाड्याप्रमाणे एक ट्रक सिद्ध करून धाडला. अंत्ययात्रा सावरकर सदनपासून निघून गिरगावातल्या चंदनवाडी विद्युत्वाहिनीत जाणार होती. म्हणजे तब्बल ६-७ मैलांचे अंतर होते. तरीही सहस्रावधी स्त्री-पुरुष आरंभापासून यात्रेत सामील झाले होते. त्या यात्रेची व्यवस्था आचार्य अत्रेही पाहत असल्याने ते प्रथमपासून उपस्थित होते. त्याआधी दर्शनासाठी शासनाच्या वतीने मंत्री मधुसूदन वैराळे, व्ही. शांताराम व संध्या, लता मंगेशकर आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रांतील अनेक नामवंत व्यक्ती येऊन आपली श्रद्धांजली वाहून गेल्या होत्या. शासनाच्या वतीने मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा दुखवट्याचा संदेश माझ्या नावे सर्वप्रथम सचिवालयातून आला. मात्र त्या दिवशी मुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री शासकीय दौ-यावर मुंबईबाहेर गेले होते. यात्रेतील जनता ‘सावरकर अमर रहे’, ‘सावरकरांच्या राजकारणाचा विजय असो’, ‘हिंदू धर्म की जय’, ‘हिंदू राष्ट्र की जय’ आदी घोषणा देत होते. एका गाडीत ‘नंदादीप समिती’ च्या कार्यकर्त्या सावरकरांची पदे गात होत्या, तर दुसच्या गाडीत भजनी मंडळाच्या स्त्रिया भजने म्हणत मिरवणुकीच्या अग्रभागी जात होत्या. वाटेत ठिकठिकाणी कमानी, फुलांच्या परड्या रस्त्यांवर उभारल्या होत्या आणि तात्यांचे शव ठेवलेला लष्करी गाडा जसा पुढे जात असे तशी त्यावर परड्यांतून पुष्पवृष्टी केली जात होती. यात्रा जेव्हा आर्थर रोड तुरुंगापाशी आली, त्या वेळी एक आगळे दृश्य दिसले. तुरुंगाच्या बाहेरच्या मुख्य दारावर पहारा करणारे पोलीस शवगाडा समोर येताच त्यांचा फिरता पहारा थांबवून खांद्यावरच्या बंदुका खाली उलट्या धरून दक्ष स्थितीत नतमस्तक होऊन उभे राहिले होते, तर त्या चार भिंतीच्या मागे असलेल्या चाळीच्या वरच्या मजल्यावरून जमलेल्या कैद्यांनी स्वयंस्फूर्तीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे’, ‘स्वा. सावरकर की जय’ अशा घोषणा देऊन श्रद्धांजली वाहिली. वरील हृदयस्पर्शी दृश्य शव-गाड्यावरून मला स्पष्ट दिसत होते. पार्थिव देहाची मिरवणूक बॉब सेन्ट्रल रेल्वे स्टेशनपाशी आली. त्या वेळी संघाच्या गणवेषधारी स्वयंसेवकांनी तात्यांना सैनिकी पद्धतीने मानवंदना दिली. मिरवणूक जेव्हा भडकमकर मागनि जाऊ लागली तशी घराघरातून लोक येऊन मिरवणुकीत सामील होत होते. पुढे गिरगाव रस्त्यावरून शवयात्रा चंदनभूमीकडे सरकू लागली त्या वेळी रस्ता शोकाकूल जनतेच्या अलोट गर्दनि व्यापून गेला होता. घराघराच्या गच्च्या माणसांनी भरून गेल्या होत्या. त्या वेळची आठवण झाली की, पुढे साप्ताहिक ‘मार्मिक’ च्या व्यंगचित्राखाली जी ओळ प्रसिद्धली होती त्याचे स्मरण झाल्यावाचून राहत नाही. तात्यांच्या ‘सागरा, प्राण तळमळला’ ह्या काव्यपंक्तीप्रमाणे रचलेली ती ओळ म्हणजे ‘प्राणा, (जन) सागर तळमळला!!’ शेवटी अंत्ययात्रा चंदनवाडीत पोचली. त्या वेळी भाषण करताना आचार्य अत्रे यांनी निदर्शनास आणले की, स्वा. सावरकरांसारख्या प्रखर देशभक्ताला श्रद्धांजली वाहण्यास महाराष्ट्र शासनाचा एकही मंत्री उपस्थित असू नये, ही शरमेची गोष्ट आहे. त्या वेळी समाजातूनही ‘शेम’ ‘शेम’ च्या आरोळ्या उठल्या. नंतर अनेक मान्यवर वक्त्यांनी श्रद्धांजली वाहिल्यावर सुधीर फडके यांनी ‘श्रीराम, जयराम जय जय राम! चा गजर सुरू केला, आणि तो चालू असताना तात्यांच्या अचेतन शरीराला विद्युत्दाहिनीत अग्नी दिला गेला.

या क्रांतीसूर्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…

संदर्भ- आठवणी अंगाराच्या, पृष्ठ- २६-२८, विश्वास सावरकर

©सावरकरी_विचाररत्ने फेसबुक पेज


आज २६ फेब्रूवारी २०२१ पंचावन्न वर्षापूर्वीचा तो दिवस अजूनही मला चांगलाच आठवतो. सावरकर सदन मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रायोपवेशन चालले होते. १ फेब्रुवारी १९६६ पासून त्यांनी अन्नपाणी, औषधे यांचा त्याग केला होता. आणि आत्मार्पण करण्याचे योजले. त्या आधी ” आत्महत्या आणि आत्मार्पण ” हा लेख लिहून त्यांनी दोन्हीमधला फरक विषद करून सांगितला होता. एखादी व्यक्ती आपले सर्व इप्सित साध्य करते, आता इच्छा म्हणून काहीच उरत नाहीं, तेव्हा केवळ भुईला भार म्हणून न राहता आपले जीवन तृप्तपणे संपवणे म्हणजे आत्मार्पण हे त्यांनी सूचित केले होते. आणि त्याप्रमाणे शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजी, ते स्वतःही मृत्यूला सामोरे गेले. त्या दिवशी दादर येथील त्यांच्या घरातून निघालेली प्रचंड अंत्ययात्रा रात्री चंदनवाडीच्या स्मशानभूमीत पोचली. चित्रपती व्ही. शांताराम यांनी स्वतः तोफा ठेवलेली शृंगारलेली गाडी दिली होती त्यावर हिंदुमहासभेच्या भगव्या ध्वजांत गुंडाळलेले त्यांचे पार्थिव एखाद्या सिंहा प्रमाणे जाणवत होते. ते उघड्या डोळ्यांनी गेले होते. अंत्ययात्रेच्या आरंभी आचार्य अत्रे, व्ही. शांताराम , मुंबईचे महापौर, सोपानदेव चौधरी, सुधीर फडके आदी सावरकर भक्त होते. लाखो लोकांचा महासागर चंदनवाडीच्या स्मशानभूमीकडे वळला होता. त्यामध्ये तरुण होते वयस्क होते, पुरुष -स्त्रिया शाळकरी विद्यार्थी असे सर्वच भावनाशील होऊन सामील झाले होते. नव्हते फक्त काॅंग्रेसवाले. खुद्द राज्याचे गृहमंत्री बाळासाहेब देसाई हे स्वतः सावरकर भक्त होते. त्यांना स्वातंत्र्यवीरांच्या अंत्ययात्रेत सामील व्हायचे होते, पण सरकारने त्यांनाही मनाई केली होती.

स्मशानभूमीत अत्र्यांनी भाषणात सांगितले,” येथे लाखो लोक जमलेले आहेत पण या महाराष्ट्र सरकारचा एकही मंत्री हजर नाही त्याचा मी धिक्कार करतो. स्वातंत्र्यवीर तात्या आज आपणातून गेले.तात्यांनी जन्मभर मृत्यूशी झुंज दिली. अनंत मरणे मारून ते शेवटपर्यंत जगले. आणि मृत्यूशी झगडता झगडता आज निघून गेले. आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे अप्रिय काम आपल्यावर येऊन पडले आहे. स्वातंत्र्यवीर केवळ स्वातंत्र्यवीर नव्हते. वाङ्मयीन, सामाजीक अशा प्रत्येक क्षेत्रात ते अग्रेसर होते. आज वास्तविक राष्ट्रपतींनी तात्यारावांना ” भारतरत्न ” पदवी द्यावयास हवी होती ! आज महाराष्ट्र सरकारचा कोणीही मंत्री हजर नाही याला काय म्हणावे? तात्या महान क्रांतिकारकच नाहीत , महान साधू आहेत ! त्यांनी प्रायोपवेशन केले ! आत्मार्पण केले ! कुमारील भट्टाने अग्निकाष्टे भक्षण केली. शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. ज्ञानेश्वरांनी – एकनाथांनी समाधी घेतली. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. तसे आमचे तात्या ! त्यांनी आत्मार्पण केले. प्रायोपवेशन केले ! तात्यांसारखा माणूस पुन्हा होणे नाही. यानंतर सुधीर फडके यांनी “ आम्ही जातो आमुच्या गांवा “ हा तुकोबांचा अभंग गात सर्व जमावाला त्यात सामील करून घेतले व थोड्याच अवकाशात तात्याराव अनंतात विलीन झाले.

आणि दुसऱ्या दिवसापासून आचार्य अत्रेंनी ‘दैनिक मराठा ‘ मधून रोज तात्यारावांच्या जीवनाचे एकेक पैलू उलगडणारे चौदा अमर लेख लिहिले. स्वातंत्र्यवीरांची क्रांतिकारी गाथा आणि आचार्य अत्र्यांची सिद्धहस्त लेखणी यांच्या संगमाचा हा एक मनोमिलाप होता. सावरकरांच्या हाल अपेष्टा आणि यमयातना त्यांच्या लेखांतून वाचताना आपले रक्त उसळू लागते. काळजात हजारो सुया टोचल्या जातात. आपल मेंदू जणू उखळात घालून ठेचत आहे असे जाणवते. आणि त्या सावरकर नामक क्रांतीकारकांच्या मुगुटमणीप्रती आपण नतमस्तक होतो. केवळ त्या पवित्र पायावर साक्षात दंडवत घालावेत, हीच एक भावना मनांत शिल्लक रहाते. ते सर्व मृत्युलेख वाचून मी इतका भारावून गेलो की ते सर्व लेख माझ्या हस्ताक्षरात लिहून
त्याचे “मृत्युन्जय ” हा ग्रंथ हस्तलिखीत ग्रंथ तयार करून मी आचार्य अत्रे याना अर्पण केला. एखाद्या छापील पुस्वतकांप्ररमाणे मी त्याची रचना केली होती. आ. अत्र्यांनी दैनिक मराठा मध्ये माझ्यावर लिहून माझे कौतुक केले होते.आचार्य अत्र्यांच्या त्या अग्रलेखांचे पुस्तक कधी निघाले नाही. कदाचित त्यांच्या कुटुंबीयाकडेही हे लेख नसावेत. मात्र आजही ते सर्व अग्रलेख माझ्या संग्रहात आहेत. एकेक अग्रलेख वाचताना आजही अत्र्यांच्या जिव्हेवर सरस्वतीचा वास किती प्रभावी होता, याची जाणीव या भाषाप्रभूंची लेखणी आणि वाणी वाचता ऐकताना होते.खुद्द आचार्य अत्र्यांनीच म्हटले होते ‘ भाषा प्रभू म्हणवणारे आम्ही, पण आज आम्हांलाही शब्द वाकवताना कसरत करावी लागते आहे. इतके ते दुःखाने उन्मळून गेले होते. त्यांनी लिहीलेल्या त्या अमर अग्रलेखामधील पहीलाच अग्रलेख मी माझ्या मित्रांच्या अवलोकनार्थ आज स्वातंत्र्यवीरांच्या चोपन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त वाचनासाठी देत आहे. क्रांतीकारकांच्या मुकुटमणीला कोटी कोटी प्रणाम.

— प्रा. मं. गो. राजाध्यक्ष.

१. तात्या गेले !

          अखेर आज तात्या गेले ; आमचे तात्या सावरकर गेले! मृत्यूशी जवळ जवळ ऐंशी दिवस प्राणपणाने झुंज देतां देतां शेवटी तात्या कामास आले. मृत्यूची अन तात्यांची झुंज गेली साठ वर्षे चाललेली होती. दहा साली तात्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले, तेव्हां त्यांनी स्पष्टच सांगितले की ,

               की, घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
               लब्ध प्रकाश इतिहास - निसर्ग माने,
               जे दिव्य, दाहक म्हणून असावयाचे,
               बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे !

तात्या सावरकर कोण आहेत हे पुष्कळांना माहीत नाही. तात्या हे कवि आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, लघुकथाकार आहेत. निबंधकार आहेत. मराठी प्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेते. त्यांच्या लेखनाचे एकंदर आठ खंड असून त्यांची साडेपांच हजार पाने होतात. मराठी भाषेत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले आहेत. हरि नारायण आपटे, विठ्ठल सीताराम गुर्जर, नाथ माधव इत्यादी. पण तात्या सावरकरांएवढे प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेलेला नाही. तात्यांची गम्मत ही कीं ते नुसते क्रांतीकारक नव्हते,ते केवळ कवी आणि कादंबरीकार नव्हते . ते निबंधकार आणि नाटककार नव्हते. ते भारतीय इतिहासांतील एक चमत्कार होते. इंग्रजांनी हा देश जिंकून निःशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची नि पराक्रमाची राखरांगोळी झाली. ती राख पुन्हा पेटवून तिच्यातून स्वातंत्र्य प्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला , त्या ज्वलजहाल क्रांतिकारकांचे वीर सावरकर हे नि:संशय कुल पुरुष आहेत. भारतीय शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन सावरकर जन्माला आले.इतिहासाच्या धगधगत्या कुंडामधून त्यांचा पिंड आणि प्रद्न्य तावून सुलाखून निघाली.

सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची धग देशातून नष्ट झालेली नव्हती. किंबहूना वासुदेव बळवंत फडक्यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकरांचा जन्म झाला. चाफेकर बंधूनी दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे क्रांतिदेवतेच्या चरणी बलिदान केले. त्यांच्या प्राणज्योतीने चेतविलेलें यज्ञकूंड भडकवीत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला. घरातल्या अष्टभुज्या देवीपुढे त्यांनी शपथ घेतली कीं, ” देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता मरतो झुंजेन !” वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यूला आव्हान देण्याची प्रतिज्ञा सावरकरांनी केली, आणि ती विलक्षण रीतीने खरी करून दाखविली. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाण्याची केवळ प्रतिज्ञा करूनच सावरकर स्वस्थ बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांच्या गुप्तमंडळाची स्थापना करून श्री शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्रांतिकारकांची त्यांनी संघटना निर्माण केली. अग्निरसाच्या कारंज्याप्रमाणे स्वातंत्र्याची pज्वलज्जहाल काव्ये सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेमधून उचंबळू लागली. स्वातंत्र्यलक्षुमीला ‘ अधिरुधिराचे स्नान घातल्यावाचून ती प्रसन्न होणार नाही ह्या मंत्राची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ सावरकरांनी ह्या शतकाच्या प्रारंभी रोवली ही गोष्ट महाराष्ट्र विसरू शकत नाही ! सात सालच्या अखेरीपासून देशांत बाॅम्बचे आणि पिस्तूलाचे आवाज ऐकू यावयाला लागले. बाॅम्बचे पहीले दोन बळी आठ सालच्या प्रारंभी खुदिराम बोस ह्या अठरा वर्ष्यांच्या क्रांतिकारक तरूणाने मुझफरपूर येथे घेऊन सशस्त्र क्रांतीचा मुहूर्त केला. सत्तावनी क्रांतीयुद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतीकारकांना त्यावेळी बजावले की , ‘ १० मे १८५७ रोजी सुरु झालेला संग्राम अद्याप संपलेला नाही. सौंदर्य संपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा देदीपयमान मुगुट जेव्हां चढेल, तेंव्हाच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल. ! ‘ अश्या रीतीने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार बनले. आठ सालच्या जुलै महिन्यात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर विलायतेमधील भारत मंत्र्यांचे सहाय्यक सर कर्झन वायली ह्यांना एका मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल धिंग्रा ह्या पंचवीस वर्षांच्या तरुणाने गोळ्या घालून ठार केले. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन ह्यांना भर नाटक गृहांत अनंत कान्हेरे नि त्याचे दोन सहकारी ह्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर लंडनमध्ये आपले क्रांतिकार्य निर्वेधपणे करणे सावरकरांना शक्यंच नव्हते.

अडीच महिन्यानंतर त्यांना पकडून ‘ मोरिया ‘ बोटीतून स्वदेशी पाठविण्यात आले असताना त्यांनी मार्सेल्स बंदरात एका पहाटे पोलिसांचा पहारा चुकवून बोटींमधून समुद्रांत उडी मारली. ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सुवर्ण कळसच होय. ही त्यांची उडी त्रीखंडात गाजली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटला भरून त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्यावेळी सावरकर अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते. म्हणूनच ‘ भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी ‘ असे त्यांना म्हटले जाते. क्रांतिकारक सावरकरांचे अवतारकार्य येथे समाप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर सावरकर युरोपमध्ये मोकळे असते, तर ” आझाद हिंद “चा झेंडा त्यांनी सुभाषबाबूंच्या आधी तेथे फडकविला असता ह्यात काय संशय ? म्हणून आम्ही म्हणतो की भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सावरकर हे ‘ पाया ‘ आणि सुभाषचंद्र हे ‘ कळस ‘ आहेत ! भारतात गेल्या दीडशे वर्षात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातंच नव्हें , पण जगात झालेला नाही. वीर सावरकरांनी हजारो पाने लिहिली. उत्कृष्ट लिहिली. तुरुंगामध्ये दहा हजार ओळी तोंडपाठ करून एका आचाऱ्याच्या मार्फत त्या भारतात पाठवल्या. काँग्रेसच्या राज्यांत सावरकरांना काहीं किंमत राहिली नाही. उलट गांधीजींचे खुनी म्हणून त्यांना पकडून त्यांची जास्तीत जास्त बदनामी करण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. पण त्या अग्निदिव्यातून ते सहीसलामत सुटले.

मानवी जीवनात असा एकही विषय नाही, ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही. त्र्याऐंशी वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना आता जीवनांत रस म्हणून राहिला नाही. आत्मार्पण करण्याचे विचार त्यांच्या मनांत येऊ लागले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधुसंतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला. कुमारील भट्टाने अग्निदिव्य केले. आद्य शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरांत ‘ हे कृष्ण, हे श्याम ‘ असा आक्रोश करीत प्रवेश करून जलसमाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीला समाधी घेतली. समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करून रामनामाच्या गजरात आत्मार्पण केले. एकनाथांनी गंगेमध्ये समाधी घेतली.
तुकोबा ‘ आम्ही जातो आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा ! ‘ असे म्हणत वैकूंठाला गेले. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पंण करविण्याचे ठरविले. कारण, त्यांना ह्या आयुष्यांत इतिकर्तव्य म्हणून
कांहीच उरले नाही.

               धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।
               कर्तव्यं मे न विद्यते किंचीत
               धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।
               प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम
  आचार्य अत्रे.
  दैनिक मराठा : दिनांक २७ मार्च १९६६.

*************

सावरकरांनी मराठी भाषेला दिलेले शब्द

शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे.

दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)

सर्व लेख वॉ ट्सअॅपवरून साभार दि.२६-०२-२०२१

३० जानेवारी १९४८

जानेवारी १९४८ मधला दुर्मिळ अंक

३० जानेवारीला हुतात्मा दिवस असेही म्हणतात. महात्मा गांधीजींच्या पुण्यस्मरणासाठी हे नांव दिले गेले. महात्माजींविषयी मी किती लिहिणार आणि थोडक्यात ते कसे लिहिणार? असा विचार मनात आल्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष उल्लेख न करता त्या दिवसाचे औचित्य साधून मी दहा बारा वर्षांपूर्वी हौतात्म्य हा लेख लिहिला होता. त्यानंतर तीन चार दिवसांनीच योगायोगाने माझ्याकडच्या संग्रहातले एक जुने पान हाती लागले. ते लोकसत्ता दैनिकाने पांच वर्षांपूर्वी प्रसारित केले होते. ३० जानेवारी १९४८ रोजी घडलेल्या भयंकर वृत्ताचे प्रकाशन दुसरे दिवशी म्हणजे ३१ जानेवारी १९४८ च्या लोकसत्तेच्या अंकात कसे दिले होते याचे छायाचित्र या पांच वर्षांपूर्वीच्या अंकात दिले होते. त्या काळात आधुनिक संदेशवहनाच्या सोयी नसल्यामुळे ताबडतोब माहितीचे प्रसारण होणे अशक्यच असणार. त्यामुळे संध्याकाळी घडलेल्या घटनेची माहिती रात्री छापून दुसरे दिवशी देणे क्रमप्राप्त होते. या अंकाचा एक विशेष सांगायचा झाला तर तो मोफत दिला गेला. त्या अंकाचा प्रचंड खप होणार हे निश्चित असूनसुध्दा तत्कालिन वृत्तपत्र व्यवसायाने अशा भीषण घटनेतून आर्थिक फायदा उठवण्याचा विचार केला नव्हता.

कै. ग.त्र्यं. माडखोलकर या सुप्रसिध्द साहित्यिक संपादकाने त्या घटनेच्याही दोन वर्षे आधी “जो जळेल तोच जाळील” या मथळ्याखाली महात्मा गांधींवर लिहिलेला अग्रलेख या पांच वर्षांपूर्वी प्रसारित केलेल्या लोकसत्तेच्या अंकातच १९४८ सालच्या जुन्या लोकसत्तेच्या अंकाच्या चित्राच्या सोबत छापलेला होता.

ही दुर्मिळ माहिती पुरवल्याबद्दल मी लोकसत्ताचा आभारी आहे.

या दोन्ही अंकांची छायाचित्रे खाली दिली आहेत. आज महात्माजींच्या पुण्यतिथीनिमित्य त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजलि.

30jan1945A

30jan1945b

GandhijiGodse

स्व.चंद्रशेखर (तात्या) अभ्यंकर

tatya abhyankar

भावपूर्ण श्रद्धांजलि

बारा वर्षांपूर्वी मी चाचपडतच मनोगतवर प्रवेश केला होता. तेंव्हा तिथे छोटा डॉन, पिवळा डँबिस. ३.१४विक्षिप्त अशांसारखी दादा मंडळी होती आणि त्यांच्याबरोबर एक विसोबा खेचर होता. त्याचे कधी अत्यंत खुसखुशित तर कधी सडेतोड किंवा घणाघाती लिखाण मला खूप आवडायचे. संगीतावर लिहितांना तो खूप समरस होऊन त्यातले बारकावे समजाऊनही सांगत असे. मनोगतवर त्याचा रोजचा वावर होता आणि निरनिराळ्या लोकांनी टाकलेल्या पोस्टांवरसुद्धा तो तुफान फटकेबाजी करत असे, कुणाची टोपी उडव, कुणाच्या पंच्याला हात घाल वगैरे त्याचे उपक्रम सगळेजण मोकळेपणाने घेत असत कारण त्यात निखळ विनोद असायचा, कुजकटपणा किंवा द्वेश नसायचा. थोड्याच अवधीत मी त्याचा फॅन झालो होतो.
त्याच्या पुढाकारतूनच एकदा मनोगतचा कट्टा जमवायचे ठरले. ही मंडळी आहेत तरी कोण याची मला उत्सुकता असल्याने मीही त्याला हजेरी लावली. ठाण्यातल्या एका प्रशस्त घरात आम्ही २०-२२ जण जमलो होतो. तिथे मला कळले की या अवलियाचे खरे नाव तात्या अभ्यंकर असे आहे. आमच्या वयात २०-२५ वर्षांचा फरक असला तरी आमचे बरे सूत जमले. तो तर त्या कट्ट्याचा संयोजक, सूत्रसंचालक आणि प्रमुख पाहुणा वगैरे सबकुछ होता. त्याने आपल्या बोलण्यामधून सर्वांना हसत खेळत ठेवलेच, थोडा बिहाग राग ही गाऊन दाखवला. तो कट्टा म्हणजे माझ्यासाठी एक विलक्षण आणि संस्मरणीय अनुभव होता.
तात्याचे बिंधास वागणे किंवा अनिर्बंध लेखन कदाचित मनोगतमधल्या काही विद्वानांना मानवले नसेल. तात्याने मिसळपाव हे नवे संकेतस्थळ काढले आणि हे ‘हॉटेल’ उत्तम चालवले. फेसबुकवर शिळोप्याची ओसरी काढली आणि तीही छान चालवली. माझी जुनी ओळख लक्षात ठेऊन त्याने दोन्ही ठिकाणी मला निमंत्रण दिले. वॉट्सॅप आल्यानंतर वाढलेल्या माझ्या इतर व्यापांमुळे मी अलीकडे तिकडे फारसा जाऊ शकत नाही. तात्यासुद्धा काही वेळा कित्येक दिवस अदृष्य होत असे. त्यामुळे अलीकडल्या काळात माझी त्याच्याशी आंतर्जालावर गाठ पडली नव्हती आणि आज अचानक त्याच्या अकाली निधनाची धक्कादायक बातमी आली. ईश्वर त्याच्या आत्म्याला सद्गति देवो अशी प्रार्थना.
—-
तात्याच्या या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. शिळोप्याची ओसरी या स्थळावर शोकसंदेशांचा पूर आला. त्यातले तात्याच्या जीवनावर आणि लेखनावर प्रकाश टाकणारे काही संदेश या ठिकाणी संकलित केले आहेत.
त्याच्या आधी तात्याच्या स्वतःच्या लेखनाची किंचित चुणुक दाखवणारे दोन लहानसे लेख / संदेश दिले आहेत.

स्मृती ठेउनी जाती – भाग १६ – तात्या अभ्यंकर http://anandghan.blogspot.com/2019/05/blog-post_17.html

***************************************************

Chandrashekhar Abhyankar
Admin · February 24, 2016
सर्व नवीन सभासदांना सूचनावजा नम्र विनंती —

इथे कृपया राजकीय स्वरूपाच्या आणि मन विषण्ण करणा-या सामाजिक स्वरूपाच्या पोस्ट नकोत..

फक्त साहित्य, संस्कृती, कला, प्रवासवर्णन, शिल्प, फोटोग्राफी, नृत्य, नाटक, संगीत, चित्रपट, ललित लेखन, कविता, गजल, चारोळी.. इत्यादी विषयावर कृपया इथे लिहा..

whats app किंवा इतर forwards, copy/paste देखील इथे चालणार नाहीत..इथे फक्त तुमचे स्वत:चे लेखन करा..

धन्यवाद..

— (समूह प्रशासक) तात्या..

Chandrashekhar Abhyankar
Admin · August 14, 2017
रामायण-महाभारत वर्षानुवर्ष आहे आणि पुढील हजारो वर्ष राहील.. असे लाखो तात्या येतील आणि जातील..त्यामुळे तात्या काय लिहितो याला शाटाइतकंही महत्व नाही..

तरीदेखील य:कश्चित तात्याच्या लेखनामुळे इतकं हळवं होऊन त्याला व्यक्तिगतरित्या झोडायची का गरज भासते हे समजत नाही..

माझं काय करायचं, मला सुबुद्धी द्यायची की दुर्बुद्धी द्यायची की खोल दरीत लोटून द्यायचं हे किसन्याला ठरवू दे की! तो समर्थ आहे..

सबब, इतकं हळवं असू नये.. श्रद्धा या चट्टान की तरह भक्कम असाव्यात..तात्याच्या चार ओळीने त्या इतक्याही हलता कामा नयेत की तात्याला व्यक्तिगतरित्या झोडायची वेळ यावी! हा हा 🙂

असो..

बरं आता एक छान पोस्ट..तुम्हा सगळ्यांना आवडेल अशी आशा करतो..
———————————————

एकदा एका गावात एक गरीब बाई आणि तिचा सात-आठ वर्षाचा मुलगा असे राहत असतात. आई दिवसभर भंगार वेचायला जायची आणि मुलगा दिवसभर थोडी दूर असलेल्या शाळेत जायचा.. संध्याकाळी दोघं भेटायचे..

एके दिवशी मुलगा आईला म्हणतो, “आई मी उद्यापासून शाळेत जाणार नाही. वाटेत तो जरा वेळ जंगलाचा रस्ता लागतो ना, तेव्हा मला भीती वाटते..”

त्यावर आई म्हणते..”अरे एवढंच ना? उद्या शाळेत जाताना जंगलाचा रस्ता सुरू झाला की फक्त ‘मामा..’ अशी हाक मार. लगेच तुझा मामा येईल आणि तुला सोबत करेल..”

दुस-या दिवशी नेहमीप्रमाणे आई भंगार वेचायला बाहेर पडते आणि मुलगा शाळेत जायला निघतो. संध्याकाळी दोघे भेटतात..

आई विचारते, “काय रे? आज पण भीती वाटली का? मामाला हाक मारलीस? मामा आला होता का?”

मुलगा खुश होऊन म्हणतो, ” हो भीती वाटली म्हणून मी ‘मामा..’ अशी हाक मारली तर लगेच मामा आला आणि त्याने मला सोबत केली, खाऊही दिला..

आई, खरंच खूप छान आहे गं मामा.. हातात बासरी, डोक्याला छान मोरपीस!”
———————————————

श्रद्धा अशा त्या गरीब बाईसारख्या भक्कम असाव्यात. की मी नाही, माझ्या मुलाने जरी तुला हाक मारली तरी तुला आलं पाहिजे..!

तेव्हा तात्या काय लिहितो याला महत्व नाही. तुमच्या श्रद्धा ठाम हव्यात..

खुळे कुठले!

ह्या ह्या..

तात्या अभ्यंकर. 🙂
——————————————
Sonali Mukherjee (तात्यांची नातेवाईक)

मी ऑस्ट्रेलियालाच आहे. फोन वरून जेवढे समजले आहे तेवढे सांगत्येय.
आईला सकाळी तोंड धुवायला पाणी देऊन, चहा देऊन तो गेला. शेवटपर्यंत आईचं सगळं केलंन. फक्त शेवट आईचा नव्हता, त्याचा होता हे दुर्दैव.
काल त्याच्या छातीत दुखत होतं. काकडी सालासकट खाल्ली म्हणून घास बसला वगैरे काहीतरी कारण झाले. ऍसिडिटी आहे असे समजून त्याने जेलुसील वगैरे गोळ्या खाल्ल्या. सकाळी उठून चहा केला आईला दिला. खुर्चीत बसला होता. आईने विचारले, “आता बरे आहे का?” त्यावर हात वर करून “थांब, सांगतो” असे म्हणाला. तो हात खाली पडला. त्यानंतर काही बोलेना.
तिला उठता येत नाही. तिने आरडा ओरडा करून शेजाऱ्यांना बोलावण्याचा सपाटा लावला. दाराला कडी असल्यामुळे दार उघडता येईना. पोलीस व फायरब्रिगेड बोलवावे लागले. हार्ट अटॅकच असावा. अजून प्रोसिजर सुरु आहे. आता सगळे नातेवाईक आले आहेत.
ती बिचारी माझा श्रावण बाळ गेला असा टाहो फोडत्येय. जाताना देखील मला चहा देऊन गेला असे म्हणत्येय.
जिवंत असताना त्याने ज्या काही चुका केल्या असतील त्यासाठी आपण सगळ्यांनी (माझ्या सकट)चिक्कार शिव्या घातल्या आहेत. मी तर त्याच्या तोंडावर बोलले आहे मात्र आईच्या बाबतीतल्या वागण्यासाठी त्याला शंभर मार्क दिले. खूप वाईट झालं. एक पर्व संपलं!
यावर पुढील चौकश्याना मला कदाचित उत्तर द्यायला नाही जमणार. माफ करा.
—————————

तात्या १
डॉ. अमेय गोखले
काही जणांची वागण्याची तऱ्हाच अशी असते , की त्यांच्या हाती मद्याचा प्याला देखील खुलतो ; आणि काही जण दूध सुद्धा ताडी प्यायल्या सारखे पितात… काहीकाही हस्तस्पर्शच असे असतात , त्यांच्या हाती कणेर सुद्धा गुलाबसरखी वाटू लागते…
किंवा
घरातल्या लहान पोरानं शर्ट वर करून घरभर नागवं फिरल्यावर आपल्याला त्यात अश्लील वाटत नाही. जगाच्या दृष्टीने सगळी अशुद्धी केलेला माणूस , माझ्या लेखी मात्र देवटाक्याच्या पाण्याइतका शुद्ध होता…
——-

फेसबुकवरची वल्ली – चंद्रशेखर अभ्यंकर उर्फ तात्याची प्रत्येक पोस्ट वाचल्यावर मला नेहमी पुलंच्या त्या रावसाहेबांची आठवण व्हायची. बेळगावकर आणि मुंबईकर इतकाच काय तो त्यांच्यात फरक ! पण बोलणं तसंच थेट , मनात ठेवून वगैरे काही नाही. प्रसंगी कोणाला शाब्दिक फटके देईल , पण मनात कटुता नसायची. प्रसंगी त्याच्या पोस्ट्स मध्ये शिव्या आल्या , तरी त्यात अश्लीलपणा किंवा वासना जाणवत नव्हती. म्हणूनच , अशा पोस्टवरही स्त्रीवर्गाकडून आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला नाही… नॉनव्हेज खातो , दारू पितो , यात त्याला कधी वावगं वाटलं नाही , आणि समोरचा काय म्हणेल याचा विचारही त्याने केला नाही. ‘माझी वॉल – माझी मर्जी’ असा माज करावा तो तात्यानेच. एखाद्याचं मत नाही पटलं , तर त्याची कमेंट अगदी सांगून डिलीट करायचा… अतीच झालं , तर थेट अंफ्रेंड करून टाकायचा…

या तात्याची आणि माझी प्रत्यक्षात भेट कधीच नाही. आमची फेसबुकवर कधी मैत्री झाली , ते मला नेमकं आठवत नाही… पण त्याच्या लेखन शैलीच्या अनेक फॅन्स पैकी मीही एक झालो होतो , यात वाद नाही… आणि त्यालाही दुसऱ्याची कदर होती. माझ्या कवितांवर , लिहिण्यावर त्याची आवर्जून दाद असायची. त्याच्या ‘मालकीच्या’ काही फेसबुक ग्रुप्समध्येही मला त्याने घेतलं होतं ! ☺️

सोशल मिडियावर न चुकता मराठीतुन लिहिणाऱ्यांमध्ये तात्या अनभिषिक्त सम्राट होता. ‘आपण काय मुंबय नाय बघितली काय?’ किंवा ‘साली आमच्या बामणांमधेच एकी नाय’ , वगैरे सरळसोट लिखाण ; वाचणाऱ्याला तो आपल्याच मनातलं लिहितोय असं वाटणारं ! म्हणूनच तात्या या सोशल मीडियात लोकप्रिय होता. त्याच्या पोस्ट सगळीकडे फिरायच्या… कधी नावासकट ,कधी नावाशिवाय…

तात्या इथला ट्रेंड सेटर होता. खवैय्या तात्या , गाण्यातला तात्या , चित्पावन तात्या , देशभक्त तात्या , स्पष्टवक्ता तात्या अशी विशेषणं स्वतःच्या नावाआधी लावण्याचा ट्रेंड तात्यानेच व्हायरल केला. राजकारण्यांना , कार्यकर्त्यांना एखादा टोमणा मारून शेवटी #खिक् असं लिहायचा आणि मजा बघत बसायचा ! तात्याचं महाभारत , रद्दीवाला , रानडे काका , रिसबुड वहिनी अशा काल्पनिक ; तर मारिया , ट्रम्प , मोदी-शहा वगैरे फेमस कॅरॅक्टरना घेऊन तात्याने केलेलं लिखाण अफलातून असायचं ! तसंच आपण लिहावंसं कित्येकांना वाटलं नसतं , तरच नवल.

कधी अण्णा किंवा बाबूजींची महती सांगेल , कधी शुद्ध यमन गाऊन व्हिडीओ पोस्ट करेल , कधी राजकारणावर कोपरखळ्या मारेल ; किती आणि काय सांगावं ? #हरहुन्नरी : हर हुनर जीसमे मौजूद हो , असा होता तात्या…
———-

गेले बरेच महिने इथे तात्याच्या पोस्ट्स दिसत नव्हत्या. मी तर २-४ वेळा तात्याच्या प्रोफाईला सुद्धा जाऊन पाहिलं. अनफ्रेंड तर केलं नव्हतं , पण अलीकडे काही पोस्ट केलेल्याच नव्हत्या ! नाही म्हणायला बरोब्बर वर्षभरापूर्वी तात्याचा मला फोन आला होता… आर्थिक मदतीसाठी… अकाऊंट डीटेल्स दिल्या , नंतर थँक्सही म्हणाला…

तात्या नक्की कशामुळे आर्थिक विवंचनेत होता ? अशा अनेक जणांकडून पैसे घ्यायची वेळ त्याच्यावर का आली ? पुढे काय झालं ? हे सगळे प्रश्न आता फिजुल आहेत.

काल तात्या हे जग सोडून गेला. आणि सोशल नेटवर्किंग विश्वातला एक अध्याय संपला. लिहू नये असं वाटत होतं , पण न लिहून राहवलंही नसतं !

🙏🏼 मृतत्म्याला सद्गती लाभो 😢🙏🏼


तात्या २
Ajinkya Rahalkar
Yesterday at 3:33 PM
फेसबुकवरच्या लिखाणाला काही किंमत नसते हे मत ज्यांच्यामुळे बदललं गेलं ते ‘तात्या अभ्यंकर’ आज सकाळी गेले… अवलिया माणूस..पण प्रचंड बुद्धिमत्ता, प्रतिभा असून तिचा उपयोग योग्य ठिकाणी न केल्याने म्हणा किंवा नशिबाने साथ सोडल्याने म्हणा आयुष्यातूनच उठले… त्यांच्यावर थोडा काल्पनिक पण बराच खरा दोन वर्षांपूर्वी हा लेख डॉ. कैलास गायकवाड यांनी लिहिला होता तो मी सेव्ह करून ठेवलेला.. तोच पोस्ट करावासा वाटतोय…
तात्या अभ्यंकरांना भावपूर्ण श्रद्धांजली…!

तात्या ..

तोंडाचा मोठा आ वासत तात्याने जांभई दिली. अंगावरचे पांघरुण झुगारुन दिले. बेडवर बसल्याबसल्याच आळोखेपिळोखे देत पाठीतून दोनदा कट कट असा आवाज काढला. काय करावे आज? असा विचार करत उठतच होता तितक्यात .. ,” उठलास का रे “? ‘’ आज तरी वेळेवर आंघोळ कर रे बाबा ‘’ असा आईचा आतल्या खोलीतून क्षीण पण करारी आवाज आला. बेडच्या बाजूला पडलेला आणि पोर्‍याने खिडकीतून फेकलेला ‘’ लोकसत्ता’’ उचलत ….’’ उठलोय गं ….. आलोच पाच मिंटात ‘’ असे म्हणून तात्या टॉयलेटात शिरला. दोन मिनिटात मथळे चाळत …. स्वत:शी काहीबाही पुटपुटत पोट मोकळं केलं. आरशावरचा ब्रश उचलला …. कोलगेट कॅल्सीगार्ड ब्रशवर पिळून खसाखसा दातावर फिरवला. गर्रर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र गुट असा अगम्य आवाज काढत चूळ भरली. कपडे उतरवले. गीझरचं पाणी बादलीत जमवून भसाभसा दोन तांबे डोक्यावरुन घेतले. दोन तीन ठिकाणी फाटलेल्या टॉवेलने खसाखसा डोकं पुसत तात्या बाहेर आला तेव्हा म्हातारीने अर्धा कप चहा समोर आदळला होता.

‘’ घे…. रात्रीच्या उरलेल्या दुधातनं बनवलाय. …. दूधवाल्याने दूध घातलं नाही आज. म्हणे राहिलेली चार म्हैन्याची उधारी आधी टाका… मग देतो दूध. ‘’

‘’ हं … बघतो आज काहीतरी त्याच्या पैशांचं’’ …. असं रोजच्यासारखंच वेळ मारुन नेत तात्यानं अर्धा कप चहा इतक्या शिताफीनं फुरकला की क्षणभर कपालाही काय झाल्याचं कळलं नाही.

‘’लाईट बिल भरायचं राहिलंय …… तळमजल्यावरच्या पेंडशांचं मीटर कापून नेलं काल एमेसीबी वाल्यांनी. पेंडशेंच्या कारट्यानं फारीनातनं पैशे धाडले नाहीत वाटतनीत अजून ‘’

म्हातारी अजून काहीबाही बडबडत पैशाचेच विषय काढेल त्या आधीच निघावं म्हणून तात्याने घाईघाईत पॅंट चढवली. कालच्याच शर्टच्या बाह्यांचा वास घेतला. ठीक आहे असं मनातच म्हणत घातला देखील. ‘’ आलोच गं जाउन ….. चार वाजेपर्यंत येतो ….. दूधवाल्याचे आणि लायटीच्या बिलाचं बघतो आजच. ‘’ असं आश्वासनवजा दोन शब्द फेकून तात्या जिन्यावरन उतरला देखिल.

साला आज काय खरं नाय… आज दोन चार हजार काढलेच पाहिजेत कुठून तरी. नाहीतर उद्या चहासुद्धा नाय भेटायचा आणि काळोखात झोपावं लागेल . झपझप पावले टाकत तात्याचं विचारचक्र फिरत होतं . नाका ओलांडला आणि नव्यानेच झालेली प्रतिभा अ‍ॅव्हेन्यू बिल्डिंग लागली. आयसीआयसीआय बॅंकेची आंबेडकर चौक शाखा तळमजल्यावर दिमाखात विसावली होती. बाजुलाच सदानंद हॉटेल गजबजलं होतं . डोसे, वडे , इडली आणि उपम्याचा दरवळ सुटला होता. चाकरमानी, कॉलेजातले पोट्टे पोट्टी , कसकसले एक्झिक्युटीव्ह पोटपूजा करुन बाहेर पडत होते तर काही लगबगीनं आत शिरत कॉर्नर टेबल खाली आहे का म्हणत कटाक्ष टाकत होते.
तात्याला यात स्वारस्य नव्हतं . त्याच्या द्रुष्टीने महत्वाचा होता हॉटेलबाहेरचा टपरीवाला. वेगवेगळ्या जर्द्याच्या माळा लोंबकळत ठेवलेल्या कळकट दिसणार्‍या पण अत्यंत स्वच्छ असलेल्या टपरीवरच्या मुरुगनला तात्याने हाळी दिली. ‘’ मुरुगन … निकाल अपना छोटा फोरस्क्वेअर ‘’ …. मुरुगनने पटदिशी सिग्रेट समोर धरताच तात्याने अख्खं पाकिट जवळजवळ हिसकवलंच . ‘’ अरे पाकिट मंगताय रे….. एक से मेरा क्या होगा… आणि आपल्याच जोकवर तात्या “ ह्या ह्या ‘’ असं हसला. मुरुगनच्या नजरेत जाणवलेल्या नाराजीला जाणूनबुजून इग्नोर मारत त्यानं इलेक्ट्रीक लायटरवर सिगरेट शिलगावून दोन जोरकस झुरके मारले. तो कडवट धूर छातीभर भरून घेतला. डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या तेव्हा कुठं जिवाला जरा हायसं वाटलं . मुरुगन दुसर्‍या गिर्‍हायकांत रमल्याचे बघून तात्यानं हळूच कल्टी मारली. प्रतिभा अ‍ॅव्हेन्यूच्या जिन्याकडे पावलं टाकत तो निघाला …… समोरुन मिनिस्कर्ट घालून उतरणार्‍या पोरीकडे अंमळ तिरकस बघत दुसर्‍या मजल्यावर पोचला.

‘’ साईप्रसाद कॉम्प्यु-टेक ‘’ अशा नियॉन साईन लावलेल्या ऑफीसात शिरला. काचेचा दरवाजा ढकलताच आतमधे प्रकाश दिसला. प्रकाश ह्या ऑफीसात आणि बाजुच्या सी ए च्या ऑफीसात असा टु इन वन शिपाई होता. चार वाजेपर्यंत साईप्रसाद आणि चारनंतर ‘’ पी . पी. घैसास इनवेस्टमेंट्स ‘’ ह्या ऑफीसात असं भारीतलं नियोजन होतं त्याचं .
‘’ तात्या ….. तू आज कस्काय आलास? अरे आज सनीसायेब तुझ्या घरी त्यांचा जुना पीसी इनस्टॉल करायला हर्ड्याला पाठवणार आहेत ना ? . इति प्रकाश …
यातला सनीसायेब म्हणजे ऑफीस ओनर सुनील शिंदे आणि हर्ड्या म्हणजे ऑफीसात कामाला असलेला हार्डवेअर इंजिनिअर . कॉम्प्युटर रिपेअर करणार्‍या पोर्‍याचं काहीही नाव असलं तरी प्रकाश त्याला हर्ड्याच म्हणायचा.

‘’ अरे हो. विसरलोच ‘’ . सालं हे तात्याच्या डोक्यातनंच निघून गेलं होतं . साईप्रसाद कॉम्प्युटेकमध्ये तात्या रोज फुकटात नेट वापरायला येतो आणि एक पीसी अडवून ठेवतो म्हणून सुनीलने त्याचा चांगल्यातला जुना पीसी तात्याला घरी बसवून देण्याचं ठरवलं होतं. सुनीलच्या ऑफीसात पीसी, टॅबलेट , लॅपटॉप रिपेअर, असेम्बल्ड कॉम्प्युटर विक्री याबरोबरच ब्रॉडबॅंड कनेक्शन्ससंदर्भातली कामं चालायची. चार पाच पोरं कामाला होती. प्रकाश शिपायाचं अडेलपडेल ते काम करायचा. तात्या सुनीलच्या बापाचा क्लासमेट . सुनीलचा बाप तिगस्ता साली अ‍ॅक्सीडंटमधे वारला तेव्हा तात्याने सुनीलला फार मदत केली होती. पोलीस पंचनामा , सिव्हिलमधे स्वत: येउन लवकर पीएम करुन घेतलं होतं . तेरावं होईपर्यंत तात्याने सुनीलला अगदी घरातल्या माणसासारखा आधार दिला होता. सुनील म्हणूनच तात्याप्रती आदर बाळगून होता.
पण तात्याची हॉटेलातली पार्टनरशीप तुटल्यापासून आणि पार्टनरने फसवल्यापासून तो अगदी कफल्लक झाला होता. इन्शुरन्सची काही फुटकळ कामे करुन कसाबसा चार रुपड्या पदरात पाडून घ्यायचा आणि महिना ढकलायचा. त्यात हे फेस्बुकचं आणि व्हॉटस अ‍ॅपचं वेड लागलेलं. तात्या 24 तास ऑनलाईन असायचा . त्याच्या लेखणीत जादू होती. रोज दिसणारे / दिसलेली व्यक्तीचित्रं तो समरसून रेखाटायचा . त्याच्या पोस्ट्सवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाउस पडायचा. रोजचा पेपर टाकणारा, भंगार विकत घेणारा , चौथ्या मजल्यावरच्या सरमळकरांकडे येणारी नखरेल मोलकरीण , तळमजल्यावरचे पेंडसेकाका अशा अनेक व्यक्तीरेखा तात्याने जिवंत केल्या होत्या. फेसबुकावर त्याचे 14/15 ग्रुप्स होते . एका ग्रुपवर साहित्यविषयक लिखाण , दुसर्‍या ग्रुपवर दाक्षिणात्य अभिनेते अभिनेत्री यांचे फोटो शेअर करणे , तिसरा शिवसेनेसंबंधी आस्था असलेल्या जुन्या जाणत्या लोकांचा ग्रुप , चौथ्या ठिकाणी लोकल शाखाप्रमुख , नगरसेवक काही पत्रकार आणि काही सो कॉल्ड समाजसेवक अशांचा चालू घडामोडींवर वादविवाद घालणारा ग्रुप अशी निरनिराळ्या ग्रुपांची विभागणी करुन तात्या अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने त्यांचं अ‍ॅडमिनपद चालवत होता. वादविवाद ग्रुपवर तात्याचा शब्द प्रमाण होता. रोज मेंबरं कुण्या एकाला जात/ धर्म/ पक्ष/ भक्त आणि फुरोगामी अशा कुठल्या ना कुठल्या विषयावर उचकून द्यायचे आणि दुसर्‍या बाजूला तात्याला जुंपायचे. सकाळपासून रात्र होईपर्यंत कमेंटवर कमेंटा यायच्या … कुणी विकिपिडियाचे दाखले द्यायचा तर कुणी कुठलासा व्हिडिओ/ फोटो अपलोड करुन आपण सांगतो ते पुराव्यानिषीशी अशी छाती काढत आपलंच खरं करु पहायचा. पण तात्या या सार्‍यांच्या पुढचा होता. त्याचा युक्तीवाद, त्याची भाषा, त्याचे बर्‍याच राजकारण्यांशी असलेले संबंध याला तोड नव्हती. कित्येक सेलेब्रिटी नट नट्यांसोबतचे त्याचे फोटोज पाहून भलेभले तोंडात बोटे घालत . अचूक वेळी अचूक फोटो टाकत, बारामतीकरांचे , नागपुरकरांचे जुने ऐतिहासिक किस्से सांगत तो पोस्टला असे काही वळण द्यायचा की समोरचा फुरोगामी, धर्ममार्तंड , पत्रकार यांना पळता भुई थोडी व्हायची. वाद सुरु इतरजण करायचे….. पण अंतिम शब्द त्याचाच असायचा.

असेच थोड्याफार फरकाने त्याचे व्हॉट्स अ‍ॅप गृपही होते. तिथेही हाच प्रकार चालायचा. बर्‍याच गृप्स्ना त्याने को अ‍ॅडमिन ठेवले होते. पण तिथेही त्याचा राडा सुरुच असायचा. मग कुणाला गृपमधून नारळ देणे… कुणाला जहाल हब्दात पायरी दाखवणे ह्या बाबी नित्याच्याच होत्या. तात्या नेट्वरच्या आभासी जगाचा एकूणच अनभिषिक्त सम्राट होता. म्हणूनच तात्या येता जाता प्रकाश, मुरुगन सारख्या भाबड्या लोकांकडे बर्‍याचदा कुत्सितपणे पहात ‘’ लेको …. फेसबुकावर या म्हणजे कळेल तुम्हाला … तात्या क्या चीज है’’ असं पुटपुटायचा. पण ती मुरुगनसारख्याच्या पल्ले पडणारी बाब नव्हती .

अकरा साडेअकराला आलेल्या तात्याचा दिवस जो सुरु व्हायचा तो असाच वादळी पोस्टसनी . मग त्या पोस्टना रीप्लाय देणे, कुणाला कसल्या बातमीची लिंक देणं …. फेसबुकाची नवीन नोटिफिकेशन्स वारंवार चेक करत रहाणं … मधेच आवडत्या नटाचा एक फोटो पोस्ट करुन त्याचा स्वत:ची संबंधित एखादा किस्सा टाकणं ….. असं करत करत दोन अडीच वाजले की तो उपकार केल्यासारखा लॉगआउट करत उठायचा . खाली येतायेता एक सिग्रेट फुकायचा. नाट्यगृहाच्या गल्लीत भाजीमार्केट मधल्या माथाड्यांच्या स्टॉलकडे वळायचा . येथे वीस रुपयात मूदभर भात आणि त्यावर चमचाभर वरण मिळायचं . भाजी हवी असेल तर पंचवीस आणि सोबत लोणचं पापड पाहिजे असेल तर पस्तीस रुपये असा रेट असायचा. चव अगदी घरगुती असायची . खिशात पैसे असतील त्यानुसार तात्या दुपारचे जेवण आटपायचा . त्रुप्तीचा ढेकर देत बडीशेब चघळत जो निघायचा तो मघाचा अपुरा राहिलेला वाद पुढे चालवायला पुन्हा एकदा ‘’ साईप्रसाद कॉम्प्युटेक’’च्या दिशेला.

आजही झपझप पावले टाकत पीसीजवळ पोचला तेव्हा ऑफीसात सुनील आला होता. ‘’ तात्या, माझा जुना लीनोव्होचा मॉनिटर आणि पीसी पाठवलाय तुमच्या घरी इनस्टॉल करायला. रिझवान गेलाय … पण त्याचा फोन होता की तुमच्याकडे लाईट नाही म्हणून….. ‘’ सुनील बोलला आणि तात्याच्या मनात पाल चुकचुकली….. ‘’ च्यायला मीटर नेला की काय कापून एमेसीबी वाल्यांनी’’? जाउ दे… घरी गेल्यावर बघू असं म्हणत तात्याने परत फेसबुकला लॉग इन केलं. ‘’ काइंडली सी हीयर’’ असा व्हाट्सअ‍ॅपवरचा मेसेज पाहोन त्याने लगोलग ती पोस्ट उघडली.

फेरीवाल्यांना मारण्यात काय हशील ? अशा तात्याच्या पोस्टला ‘’ फेरीवाल्यांना चोपून काढले पाहिजेत “ अशा प्रकारच्या कमेंट्स आल्या होत्या. बर्‍याच जणांनी तात्याच्या पोस्टला समर्थन दिलं होतं तर तितक्याच किंबहुना जास्त लोकांनी त्या विरोधात लिहिलं होतं. फेरीवाल्यांना चोपून काढले पाहिजेत या एकाच्या कमेंटला 34 लाइक आले होते …. आही जणांनी फेरीवाल्यांना चोपत असतानाचे फोटो पोस्टून आनंद घेतला होता आणि बरेच जण फुटपाथ , रेल्वे स्टेशन मोकळे व्हायलाच हवे अशा प्रकारचं ठासून बोलत होती.

तात्याने पवित्रा घेतला. एक दीर्घ पोस्ट टाकण्याइतका मसाला त्याच्याजवळ होताच. फेरीवाले कोण आहेत? ते काय काय वस्तूंची विक्री करतात ? त्यामागचे अर्थकारण अर्थकारण काय ? मध्यमवर्गीय त्या सामानावर कसा अवलंबून आहे ? हेच सामान त्या मॉलमध्ये गेलं तर आपल्याला केवढ्याला पडेल ? पथविक्रेता संरक्षण अधिनियम …. त्या नियमाची व्याप्ती ….. त्या तुलनेने त्यांचे न झालेले सर्वेक्षण …… दुकान आणि गाळेवाल्यांनी केलेले अतिक्रमण … त्याकडे कोर्ट, लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी केलेले दुर्लक्ष , रोज त्यांचा जप्त होणारा माल , त्यांचे होणारे नुकसान …. काही समर्पक आकडेवारी असा जबरी रिप्लाय तात्याने भराभरा टाईप केला. दोन तीन टायपो लीलया करेक्ट केले…. एक दोनदा वरुन खाली नजर टाकली आणि एंटर मारुन पोस्ट केला.

पोस्ट करायची खोटी ….. काहींनी न वाचताच भराभरा लाइक केले. पाच मिनिटात त्या कमेंटला 34 लाइक झाले. फेरीवाल्यांना चोपून काढले पाहिजे असा सूर असणार्‍यानेही …. ‘’ ह्या बाबी खरंच मला माहीत नव्हत्या ‘’ असे म्हणत …. आपल्या भूमिकेचा लोकांनी पुनर्विचार केला पाहिजे असे मत पोस्ट केले. तात्या तुम्हारा जवाब नही अशा अर्थाच्या ढीगभर कमेंट्स आल्या. आपल्या लेखनशैलीवर तात्या मनोमन सुखावला ….. तात्या नक्की करतोय तरी काय असे नाराजीयुक्त आश्चर्याने पहात सुनीलने चहाचा ग्लास तात्याकडे सरकवला आनी तिकडे पाहण्याचीही तसदी न घेता त्याने उचलून चहा भुरकायला सुरुवात केली.

वाद आता हळूहळू शांत होत होता. विरोध करणार्‍यांचा विरोध तात्याच्या अभ्यासू कमेंटनंतर गळून पडला होता. चित्रपट अभिनेते, काही जुने किस्से , गेल्या वर्षीच्या काही उकरुन काढलेल्या पोस्ट्सला आलेले फुटकळ लाइक्स आदि नोटिफिकेशन्स पहात हळूहळू सात वाजले. च्यायला आज पण नगदनारायणाचा बंदोबस्त झाला नाही असे स्वत:शीच पुटपुटत तात्याने लॉगआउट केले. येतो रे सनी … असे म्हणत सुनीलचे काय उत्तर येईल याची वाटही न पहाता तात्या भरभर जिने उतरला. उद्या त्या डोंबिवलीकराला 5/10 हजाराची इनवेस्टमेंट करायलाच लावतो असे स्वताशीच म्हणत त्याने नाका पार केला. पेंडशांच्या काळोख झालेल्या फ्लॅटकडे बघत दुडक्या चालीने आपल्या घरात शिरला. काहीसा घाबरतच त्याने प्रवेश केला. लाईटच्या बोर्डवर पेटलेला चूटा रेड बल्ब पाहून त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. चला….. लाइट कापली नाही अजून…. उद्या भरुच कसेही बिल….. खुशीतच त्याने एक जुन्या गाण्याची शीळ घातली. शीळ ऐकून आतमध्ये म्हातारीने हालचाल केली. ‘’ आलास का रे…. जरा आत ये. दुपारी दुसर्‍या मजल्यावरच्या माईने पोहे दिले होते. एक वाटीभर मी खाल्ले …. अजून एक वाटी आहेत. तू खातोस का ? नसेल खायचे तर दे मला…. जरा भूक लागल्यागत वाटतंय बघ. ‘’ म्हातारी बोलली आणि तात्याला गलबलून आलं ….. त्याचा बिझिनेस ऐन बहरात होता तेव्हा जे हवं ते खाणारी म्हातारी आता पोहे खातेय …. त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
‘’ हे घे पोहे’’ म्हणत त्याने सगळे पोहे वाटीत आणून तिच्यासमोर ठेवले. थांब मी तुला चहा करतो फक्कडसा म्हणत तो स्वैंपाकघरात शिरला. ‘’ चहा कसला कपाळ? अरे दूध कुठं टाकलंय आज त्या मेल्याने?” म्हातारी करवादली… ‘’ दूधवाल्याचे पैसे नाही दिले आणि हा कॉम्प्युटर आणला मोठा ‘’ असे म्हणत तिने हॉलमधल्या टेबलवर इनस्टॉल केलेल्या पीसीकडे बोट केले. कसकसल्या वायरी आणि इंटरनेट म्हणे लावून दिले असे तो शिंदेंकडचा पोर्‍या सांगत होता. तात्याने पीसीकडे पाह्यलं जरा हसला आणि पैशाच्या आठवणीनं त्याच्या चेहर्‍यावर परत चिंतेचं जाळं पसरलं …..

काहीशा विमनस्क अवस्थेतच तो बाथरुमात शिरला. नळ सोडून खसाखसा चूळ भरली. थंड पाण्याचे हबकारे चेहर्‍यावर मारले. मघा ओले झालेले डोळे पुन्हा ओले केले. बाजुच्या हॅंडटॉवेलला हात पुसून तोंड बाकी शर्टच्या बाहीनेच पुसत तो बेडजवळ आला. सकाळच्या लोकसत्तेची पुरवणी घेत तो बेडवर पहुडला. खिशात हात घालून पाहिलं…. तर शंभरची एक नोट आणि दहाच्या काही नोटा काही नाणी एवढंच खिशात होतं. तीन महिन्याआधी एक दुकान भाड्याने चढवलं होतं त्याचे दोन महिन्याची दलाली म्हणून तीस हजार मिळाले होते. तेव्हापासून काही पैसा हातात आला नव्हता. काय करावं ….. असं डोकं गच्च धरुन तो नुसताच छतावर गरगर फिरणार्‍या पंख्याकडे बघत राहिला.
बाथरुमात साबण नाही… पेस्ट संपलीये….. वाण्याची, दूधवाल्याची उधारी राहिली आहे. लाईट बिल भागवायचं आहे. पैसे नाही दिले तर पेपरवाला लोकसत्तासुद्धा बंद करेल दोन चार दिवसांत . विचार करकरुन त्याला ग्लानी आली.

तितक्यात त्याच्या फोनवर ती टिपिकल रिंगटोन वाजली. अंमळ अनिच्छेनेच त्याने फोन उचलला . हॅलो तात्या ….. पलीकडे चिरपरिचित आवाजाचा गोखले होता. गोखले हा तात्याच्या लेखणीचा डाय हार्ड फॅन होता. ‘’ अरे पुन्हा म्हात्रेने कमेंट केलीय ….. आधी तुझ्या मताशी सहमती दाखवून वाद संपवला सुद्धा होता …. पण आता परत त्याने एक फोटो पोस्ट केलाय. काही परप्रांतीय फेरीवाल्यांनी आपल्या एका स्थानिक नेत्याचं डोकं फोडलंय म्हणे. तो विचारतोय….. बघ तात्या….. अजून तू फेरीवाल्यांचीच बाजू घेणार का? आता म्हणे आर या पार…. कोणत्याच स्टेशनवर फेरीवाल्यांना बसू देणार नाही असे बोलतोय तो…… प्लीज लिही ना त्यावर ….. मी लिहित होतो…. पण मला कुठं जमणार आहे तुझ्यासारखं लिहायला? तात्या तो तात्याच…… ‘’

इतर कुठला दिवस असता तर तात्याने मोबाईलचा डाटा ऑन करुन हळूच ‘’ यावर उद्या सविस्तर लिहितो’’ अशी कमेंट त्याने केली असती….. पण आज त्याच्या घरी पीसी इनस्टॉल झाला होता. लोकसत्तेची पुरवणी भिरकावून तो उठला आणि पीसीचे बटन ऑन केले. पीसी बूट होईपर्यंत त्याला धीर नव्हता …. एकदाचा बूट झाला आणि शिंदेने जोडलेल्या ब्रॉडबॅंडला ऑटो कनेक्ट झाला. गुगल क्रोमच्या ब्राउझरमध्ये गुगलचे ओपन झालेले होमपेज पाहून त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अ‍ॅड्रेसबार मध्ये फेसबुक.कॉम टाईप करायला हार्डली त्याला दोन सेकंद लागले. युझर आयडी पासवर्ड कधी एकदा टाकतो असे त्याला झाले होते. डु यू वॉंट क्रोम टु रीमेंबर धिस पासवर्डला सराईतपणे येस करुन तो लॉगीन झाला.

फेसबुकची त्याची वॉल आता त्याच्या समोर होती. आलेल्या शंभरेक नोटिफिकेशन्समधली म्हात्रेची ती नोटिफिकेशन त्याने अचूकपणे ओळखली आणि क्लिक केली. स्थानिक नेत्याच्या डोक्याला झालेल्या मारहाणीचा फोटो न्याहाळत त्याने शब्दांची जुळवाजुळव केली आणि आता याला कसे उत्तर द्यायचे याचे आडाखे बांधले. शर्टाच्या बाह्या मागे करत खुर्चीच्या मागे एक उशी ठेवून त्याने कीबोर्ड जवळ ओढला आणि बडवायला सुरुवात केली.
स्वत:च्या आयुष्यातील सार्‍या विवंचना मागे ठेवत जगाच्या विवंचनेवर भाष्य करणारा हा त्याचा प्रवास उद्या पहाटेपर्यंत त्याचा असाच सुरु रहाणार होता……

Chandrashekhar Abhyankar __/\__

डॉ. कैलास गायकवाड

Padma Dabke आभासी जगतातल्या अनभिषिक्त सम्राटाला आपले दैनंदिन जीवन चालवणे अवघड व्हावे इतका अतिरेक या आभासी जगाने निर्माण होतो हे वास्तव दाखवून गेलेल्या या अवलियाला श्रद्धांजली वाहणाऱ्याने काही धडा घ्यायला हवा.
Nilesh Shinde तात्याला इतकं ओळखणारे तात्याला ना काम देत होते ना पैसा आणि तात्याही मानी होता, कुणी वाईट बोललं की तो आयुष्यातून ब्लॉक च.
————————-
Sandeep Punekar

फेसबुकच्या आभासी जगात आपल्या असामान्य लेखणीने भीमण्णा, लतादिदी, बाबुजीं, किशोर, पंचमदा अख्तरीबाई यांच्या मधुर गाण्यांच्या आठवणी रंगवत, पुण्याच्या बादशाही लाॅजच्या जेवणाची रसभरीत वर्णनं सांगत, मधुबाला, वहिदा रेहमान आणि मारिया शारपोवा (शिरापोहा) यांच्या सौंदर्याचं भरभरुन वर्णनं करत, चित्पावन असुन बच्चुभाईची वाडीतल्या वेश्या आणि अतीसामान्यांची दुःखं याविषयी लिहित, पुलं आणि वपुंचं साहित्य कोळुन प्यालेला, शिवसेना आणि बाळासाहेबांच्या आठवणींनी गर्वाने छाती फुगवत, रसिक, लेखक, गायक, बल्लवाचार्य, खवय्या,भक्तीमार्गी साधक आयुष्याकडे पहाण्याचा आणि ते समृद्धपणे जगण्याचा दृष्टीकोन शिकवत तात्या अभ्यंकर अकाली अनंताच्या प्रवासाकडे रवाना झाला.
———————–
Satish Lahane

Sameer gaikwad यांच्या Wall वरुन तात्या अभ्यंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
‘रेड लाईट डायरीज’चं विश्व शब्दबद्ध करण्याची प्रेरणा देणारा माझा मित्र तात्या अभ्यंकर आज अनंताच्या प्रवासास निघून गेला…
ज्या फेसबुकनं त्याला नावलौकिक दिला त्यानंच बदनामी दिली.
त्याचं दिलखुलास मनमौजी बेभान जगणं कुठल्याही फंद्यात गुंतणं शक्य नव्हतं.
भीमसेन जोशी ते बाबूजी आणि फोरास रोड ते गंगूबाई हनगल असा त्याचा अस्ताव्यस्त कॅनव्हास होता.
त्यानं आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. अनेकांनी त्याला फसवलं. नंतर त्याला अनेकांचं देणं झालं. त्यात तो झुरु लागला.
मोरपीसाची लेखणी असूनही व्यसनांच्या आहारी गेला.
तात्याची वृद्ध आजारी आई हा त्याचा वीक पॉईंट होता. तो कट्टर बाळासाहेब ठाकरेप्रेमी होता.
अखेरच्या काळात त्याचा सेलफोन नॉट रिचेबल होता.
पानाफुलावर प्रेम करणारा तात्या रशियन टेनिस सम्राज्ञी मारिया शारापोवा हिचा भक्त होता.
स्त्री सौंदर्यावर खुलून लिहिणारया तात्याच्या लिखाणात वासनेचा लवलेश नसे.

तो अस्सल गजलप्रेमी होता.
इथल्या अनेक बोरुबहाद्दर कारकुनी छाप व लेखणाची बुंदी पाडणारया लेखकाहून तो कैकपटीने सरस होता. त्याचं चीज कधी झालं नाही. किंबहुना तो ही या बाबतीत बेफिकीर होता. तसा तर तो जिंदगीभर बेफिकीर होता. पण माणूस अस्सल बावनकशी जिंदादिल होता..
मधुबालेचा आजन्म अविवाहित चाहता होता.
पोस्टच्या अखेरीस त्याच्या नावाची दिलखुलास टॅगलाईन असे.
कुणाचीही टोपी उडवण्यात माहिर असलेला तात्या स्वतःचीच खिल्ली उडवण्यात एक्सपर्ट होता.

त्याचं जाणं हूरहूर लावून गेलं.
इनबॉक्समध्ये डोकावणारा, लिखाणावर प्रेम करणारा, चुकांची दुरुस्ती करणारा मित्र मी गमावलाय.
काही महिन्यांपूर्वी त्याला हवे असलेले पैसे द्यावेत असे वाटले होते. पण तितके तर माझ्याकडेही नव्हते.
मित्रा तुझी निकड भागवू शकलो नाही याचं आता शल्य वाटतं.
कोणत्या तोंडाने तुला श्रद्धांजली वाहू?

इथे फेसबुकवर तुला श्रद्धांजली वाहणारयांचा पूर येईल. तितक्याच लोकांनी तुला मदत केली असती तर तू वाचला असतास का? पुढे जाऊन तुझ्या सवयी तु बदलल्या असत्या का?
अनेक प्रश्न मागे ठेवून जाताना माझ्या मनाला अपराधीपणाची सल लावून तू निघून गेलास.

माझ्या गावाकडे येऊन आषाढातल्या पावसात भिजत गाणी म्हणायचं तुझं स्वप्न इतक्या अकाली विरुन जाईल असं वाटलं नव्हतं..
निदान तुझा उर्वरित प्रवास तरी सुखाचा होवो..

– समीर गायकवाड.
————————
Jaidev Paranjape
तात्या तसा मला दुरूनच माहिती होता… तरी त्याच्या बहुरंगी व्यक्तिमत्वाची पूर्ण कल्पना त्याच्या व्यक्त होण्यातून यायची. कधीही भेटलेला नसताना, तात्या माझा मित्र आहे असं म्हणायला भाग पाडायची… तो गेला हे खरंच वाईट झालं. एकदा तरी भेट व्हायला हवी होती. सूर आणि शेअर्स या बाबतीत तात्याचा हात धरू शकणारा मिळणं अवघड आहे. अशी एकाने मला त्याची ओळख दिली होती. इहलोकातली ही ओळख तो ईश्वर लोकात बरोबर घेउन गेला असावा असं मी मानतो. त्याला सूर-शांती लाभो…! 🙏
——–

—————-
Namita Bhide इतक्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वची परिस्थितीच्या विचित्र भोवऱ्यामुळे अकाली exit …शोकांतिका म्हणायची का?
तो माझा नातलग असल्याने त्याला मी खूपच चांगली ओळखते. शापित गंधर्व ही उपाधी योग्य ठरेल शेखर साठी
———-
Nilesh Shinde पैश्यासाठी झगडणाराही तात्या होता हे मात्र बर्याच लोकांपासून गुलदस्त्यात होते. त्यांच्या विवंचना काही केल्या संपत नव्हत्या
आणि आता हा प्रवास अर्धवट ठेवून आजारी आईच्या काळजीत तडफडत असलेल्या एक आत्मा एवढाच उरलाय
—————-
Shivprasad Vengurlekar
तात्या गेलें! बाझवत जाऊदे तुमची दुनिया म्हणत त्यांनी शेवटचा श्वास घेतला असेल!
तात्या व्यसनी होते का माहीत नाही पण मला आणि नक्कीच माझ्या सारख्या अनेक फेसबुकींना त्यांनी व्यसन लावलं त्यांच्या पोस्टीं, कमेंट आणि ती व्यक्तिचित्रे यांचं ते व्यसन!
गेले काही महिने तात्यांनी फे बु वरील आपलं लिखाण बंद करून आम्हाला तडपवत ठेवलं, एकही दिवस तात्यांच्या त्या भन्नाट लिखाणाच्या आठवणीशिवाय गेला नाही!
दोनच दिवसांपूर्वी आमच्या चिरंजीवानी तात्यांची आठवण काढली, मी ही अनेक वेळा तात्यांना मेसेज टाकले पण एकदाही उत्तरं नाही😢
तात्यांना एकदाही प्रत्यक्ष न भेटता फक्त फे बु वरील मैत्री असूनसुद्धा आपल्या रोजच्या जिवनातील एक घनिष्ठ संबंध असलेला मित्राला आपण कायमचे मुकलो ही हळहळ …
विलक्षण अश्या या व्यक्तिमत्त्वाला मनाचा मुजरा!
(तात्यांच्या पश्चात त्यांच्या मातोश्रीवर कोसळलेल्या दुःखाची जाणीव अस्वस्थ करतेय, फे बु मित्रमंडळींनी एकत्र येऊन काही विचार विनिमय करावा, अंत्यविधी संबंधी काही कळल्यास त्वरित कळवावे)
——————-
Milind Joshi

तात्या अभ्यंकर… सामान्य पणे जीवन जगणारा असामान्य कलाकार… काळाच्या पडद्याआड…

ते जितके चांगले गायक होते तितकेच उत्कृष्ट लेखकही होते. अनेकदा आम्ही फोनवर बोललो होतो. ठाण्याला गेल्यावर त्यांची भेट घ्यायची होती पण ती इच्छा मात्र आता कधीही पूर्ण होणार नाही याची खंत कायम मनात राहील….

भावपूर्ण श्रद्धांजली…
Mahesh Kedar त्यांची प्रकृती बर्याच दिवसांपासुन खराब होती…निदान ६ महीने झाले ते पुर्ण अलिप्त होते…नेमका काय विषय होता हे मात्र माहीत नाही.


तात्या ३
Aditya Sathe shared a link.

ग्रुपवर आलं की पहिल्या प्रथम दिसणार वाक्य, “सर्व नवीन सभासदांना सूचना…” आता मुकं झालं यावर विश्वास ठेवणे जरा कठीण आहे. तात्या आणि माझी प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही पण खूप आधीपासून त्यांच्या लिखाणाचा मी चाहता… त्यांच्याबद्दल २०१३ मध्ये एक खूपच छोटा लेख मी माझ्या ब्लॉग वर लिहिला होता, तो इथे पुन्हा शेअर करतोय..
तात्या
तात्या, परखड रोखठोक पण काळजाच्या जवळच्या गोष्टी निघाल्या की तितकाच हळवा होणारा. आपले अंतरंग काहीही हातचे नं राखता आपल्या लिखाणातून मांडणारा. वास्तविक तात्याला कधीच प्रत्यक्षात भेटायचा योग आला नाही. फेसबुकावर ओळख झाली तीच मुळात एका उत्तम लेखामुळे. त्या क्षणापासून असा एकाही लेख तात्यानी लिहिला नसेल जो मी वाचला नाहीये. (जुने लेख सोडून द्या तात्या…). माझ्या भावविश्वात आढळ कोपरा निर्माण केलाय तात्या.

आज स्पष्ट कबुल करतो; मला तात्याचा हेवा वाटतो. आपण जळतो साला त्याच्या नशिबावर. जळतो त्याच्या मोजक्या शब्दात व्यक्तिचित्र उभा करायच्या हातोटीवर (थोड्या क्लुप्त्या मला पण सांगा की तात्या). जळतो त्याला लाभलेल्या थोरामोठ्यांच्या सहवासाबद्दल, त्यांच्याकडून मिळालेल्या कौतुकाबद्दल, आशिर्वादाबद्दल वाचतो तेव्हा तर पार जाळून कोळसाच होतो.

तात्या, एकच मागणं आहे. हात मस्तकी ठेवून आशीर्वाद द्यावा. दिग्गजांच्या पायी मस्तक ठेवल्याचं समाधान मिळेल. पु लंनी रावसाहेब आत्ता लिहिलं असतं तर मी नक्की म्हटला असतं रावसाहेब म्हणजे आपणच. “शौक करायच्या जागी शौक करायचा. उघड करायचा. शिवराळ बोलना पण कधीही अश्लील किंवा अश्लाघ्य नं वाटणारे.” त्या भाषेशिवाय तात्या अभ्यंकर मनाला मान्यच होत नाही.

तात्या.. असेच लिहिते राहा. बस आता लवकर दर्शनाचा योग येऊ दे.
——————-
Sachin Joshi
17 hrs
प्रिय तात्या,

२०१५-१६ च्या सुमारास कुणीतरी तुमची एक झकास पोस्ट शेअर केली होती. लगेच तुमच्या भिंतीवर जाऊन तुमच्या पोस्टी चाळल्या. सगळ्याच पोस्टी अगदी मनाला भिडणाऱ्या, वास्तववादी. आपसूकच तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट टाकली. तुम्ही लगेचच ती स्वीकारली. तेव्हापासून तुमच्या सगळ्या विषयावरील लिखाणाची मेजवानी सुरू झाली. राजकारण, सिनेमा, शास्त्रीय संगीत, पौराणिक, खेळ, भ्रमंती, खाद्य आशा सर्वच विषयांवर तुमची चौफेर फटकेबाजी चालायची. तुम्ही इतर काही समूहांवर मला ऍड केल्याने सर्व विषयांवरील सरस लेख वाचनात येऊ लागले तसेच नवीन मित्र मिळाले. वैयक्तिक ओळखीसहित समाज माध्यमावर कमावलेला एवढा अफाट मित्रवर्ग क्वचितच कुणाचा असेल. ही किमया साधणारे तात्या, तुम्ही एक अवलिया होतात.

खरे सांगायचे तर फेसबुकवर लिहायची व प्रासंगिक प्रतिक्रिया देण्याची प्रेरणा मला तुमच्याकडून मिळाली. तुम्ही तुमच्या पोस्टवरील प्रत्येक प्रतिक्रियेवर विशेष टिप्पणी अथवा लाईक करून दखल घ्यायचे हे विशेष. एका सिनेतारकाच्या लहान मुलावर तुम्ही टाकलेल्या एका पोस्टला मला आक्षेप होता. तुम्हाला मी तसे वैयक्तिक मेसेज करून कळवले तर तुम्ही पुढच्या क्षणाला ती पोस्ट डिलीट केली.

कुणाची प्रतिक्रिया आवडली तर त्या व्यक्तीला टॅग करून त्या प्रतिक्रियेवर स्वतंत्र पोस्ट करणारा तात्या… खाद्यपदार्थांचे, जेवणाच्या ताटाचे फोटो टाकून “या गरीबाघरी जेवायला” म्हणणारा दिलदार तात्या… विविध ज्ञात अज्ञात हिरोईन्सचे फोटो टाकून त्यांच्या बद्दल माहिती सांगून “तात्यासारखा अभ्यास शिका” म्हणणारा मिश्किल तात्या… विविध नट्यांचे फोटो टाकुन “होय, माझे तुझ्यावर प्रेम आहे” असे म्हणणारा, खोट्या सभ्यतेचा आव न आणणारा सौंदर्यप्रेमी तात्या… एसटी, शाळेतली मुले दिसली की हळवा होणारा, आठवणीत रमणारा तात्या… आपल्या आवडत्या नेत्यावर, पक्षावर, नट-नट्यांवर अंधपणे प्रेम न करता चूक वाटले की टीका करणारा, राग व्यक्त करणारा तात्या.. आता फक्त माझ्या आठवणीत राहणार…

तुमचा बाबू रद्दीवाला, रानडे काका, रिसबुड वहिनी ही काल्पनिक पात्र डोळयासमोर उभी राहायची.. आता त्यांना पुनरुज्जीत फक्त तुमच्या जुन्या पोस्टी करणार..

कर्णभक्त तात्यांचं महाभारत हे काहीसं विवादित असलं तरी त्यातल्या पात्रांची आजच्या वास्तवाशी घातलेली सांगड मनोरंजन करायची… ती पात्र आता इतिहासातच विरली जाणार..

तुमची मानलेली मावशी (सोनिया गांधी), मावसभाऊ राहुड्या व मामा (शरद पवार), तात्यांचे बाळासाहेब, दिघे साहेब, तात्यांचा स्पॉट नाना (अमित शहा), तात्यांचे मोदिशेठ हे सगळे आता तुमच्या नकळतपणे चिमटा काढणाऱ्या पोस्टिंना मुकणार..

कोकणस्थांच्या फुशारक्या आणि देशस्थांची उणीदुणी तितक्याच मिश्कीलपणे व खेळकरपणे कोण काढणार..?

मधेच अचानक बाबूजी, अण्णा (भीमसेन जोशी) यांच्या आठवणींच्या भावुक पोस्टी कोण टाकणार..?

फोरासरोडच्या पडद्यामागील जीवन कसे डोळ्यासमोर उभे राहणार? “साला आमी काय मुंबई बघितली नाय काय”? अशी मिजास कोण मिरवणार?

उत्तर प्रदेशवर मनापासून प्रेम करणाऱ्या तात्यांच्या लेखाखाली “भदोहीचा तात्या” असं कधी वाचायला मिळणार?

एक ना अनेक प्रश्न आज दिवसभर मनात घोळत आहेत, मात्र “माझी भिंत माझी मर्जी” असा हुकूमशाही थाट असलेली तुमची फेसबुकची भिंत तुमच्या या आभासी दुनियेतील तुमच्या राजेपणाची, कलोपासकतेची, रसिकतेची, उत्कृष्ठ लेखकाची कायम साक्ष देत राहील.

शेवटी प्रांजळपणे सांगतो, काही कारणास्तव तुम्हाला मी कसली मदत नाकारली असेल तर त्याबद्दल मनात शल्य बोचत राहील.. माहीत नाही त्याने काही बदलले असते का, पण त्याबद्दल तुम्ही जिथे असाल तिथून मला माफ कराल याची खात्री आहे, एवढे दिलदार आमचे तात्या नक्कीच आहेत.. तुमच्या वा आईंसाठीच्या एखाद्या उपक्रमात मी नक्कीच सहभागी असेल अशी ग्वाही देतो.. तुमच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..🙏🏻😞💐

तुमचाच
– सचिन
——————–

Sachin Vijapure

मला वाटतं सगळ्यांनी तात्या च्या सहवासाचा लाभ घेतला , त्याच्या बरोबरचा वेळ अगदी enjoy केला मग जर तो जरा जास्त आहारी गेला तर त्याला त्यातून बाहेर काढायची पण थोडी जबाबदारी आपल्यावर येते. आपण सगळ्यांनी त्याच्यावर खूप प्रेम केले मग आपली काहीच जबाबदारी नाही का ??? का त्याच्या जवळच्या लोकांनी लक्ष नाही दिले . तुम्हाला तात्या फक्त मनोरंजन आणि बोध घेण्या साठी पाहिजे होता का . 😦 …! खूप खूप चटका लावणारं आहे हे . त्यांच्या मातोश्री चा विचार करून मन अजुनच हेलावत . तात्यांनी मना पासून प्रेम केले आई व्वर . निदान तिच्या साठी तरी अस न्हवत व्हायला हवे .

काय इतका त्रास होता तात्याला ? का एवढं आहारी गेला .? काहीतरी शल्य असल्या शिवाय माणूस असा बेभान नाही वागणार उगाच . तात्या बेदरकार होता पण बेजबाबदार होता अस नाही वाटत .!
——–
शैलेश त्र्यंबक सहस्त्रबुद्धे

ईतकेच मला जाताना जाताना
सरणारवर कळले होते.
मरणाने केली सुटका
जगण्याने छळले होते…..😢😢😢

कधीही न कळलेला तात्या …. भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢
————-
Amol Mohan Soma

जोडलेल्या हातांकडे
तुझ्या, कानाडोळा केला
का, कशी लिहू आता
अरे, श्रद्धांजली तूला..

तात्या….. सुटलास रे….!

— अ. सो.
————
Swati Phadnis
20 hrs
भावपूर्ण श्रद्धांजली!
.
जाणारा जात नाही रिकामा

जाणाऱ्या माणसाला बरोबर काहीच नेता येत नाही
हे खरे आहे
खरे नाही त्याचे सारे मागे ठेवणे
आणि एकट्याने अगदी रिकामे निघून जाणे

जाताना आपल्या अदृश्य हातांनी
उचलतो तो कधी आपल्या जिवलगांची नीज
उचलतो कुणाची स्वस्थता
सहज ओढून नेतो जीवनाचे दिलासे
आणि संघर्षांचे धैर्य
पायांखालच्या जमिनीचा
विश्वासच कधी हिरावतो कायमकरता

उगवता उगवता राहून जाते
त्याच्या श्वासाच्या वाऱ्यावाचून बरेच काही
त्याच्या स्नेहाच्या ओलीविना
काही ठायीच सुकून जाते
कधी तो नेतो चोरून संबंधांची अर्थपूर्णता
आणि थंड वास्तवामधली सृजनाची धुगधुगी
कधी कधी तर तो बरोबर नेतो
मुक्या बीजांमधले संभव
आणि जन्मांचे शकूनही घेऊन जातो

जाणाऱ्या माणसाला बरोबर काहीच नेता येत नाही
हे खरे नाही

डॉ. अरूणा ढेरे !!
————

तात्या ६
Milind Joshi

आज सकाळी तात्या अभ्यंकर गेल्याची बातमी समजली आणि धक्काच बसला. खरे तर त्या व्यक्तीशी माझे फक्त २/३ वेळेस फोनवर बोलणे झाले होते. तसेच ४/५ वेळेस चाटमध्ये आम्ही बोललो होतो. यापेक्षा जास्त संभाषण नव्हतेच. पण तरीही त्यांचे जाणे मनाला एक प्रकारची रुखरुख लावून गेले.

जे फेसबुकवर खूप जास्त सक्रीय असतील त्यांना तात्या माहित नाही असे अभावानेच दिसेल. त्यांच्या लिखाणाची शैली जबरदस्त होती. आम्ही जरी एकमेकांना प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी तात्या माझे फेसबुकवरील गुरु म्हणता येतील. कारण त्यांच्या हलक्याफुलक्या फेसबुक पोस्ट वाचूनच मीही फेसबुकवर वेगवेगळे प्रसंग चितारू लागलो. व्यक्तिचित्रण कसे असावे हेही मी त्यांच्या पोस्टवरूनच शिकलो. इतकेच काय तर आजकाल मी माझ्या पोस्टच्या खाली जे ‘–आठवणीत रमणारा मिलिंद’, ‘–भक्त मिलिंद’, ‘–सामाजिक मिलिंद’ अशी बिरुदे स्वतःला चिटकवून घेतो ती देखील त्यांचीच स्टाईल.

देवाने या माणसाला दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळे मुबलक प्रमाणात दिले होते. साक्षात भारतरत्न भीमसेन जोशी यांचे शिष्यत्व, मोठमोठ्या कलाकारांचा सहवास, अप्रतिम आवाज, रागदारीचे उत्तम ज्ञान, लिखाणाची अतिशय सुंदर शैली, सोशल मिडीयावर भरपूर वाचक, नर्मविनोदी स्वभाव, बेदरकार वृत्ती, मनात येईल ते बिनधास्त बोलण्याची हिंमत, सोशल मिडीयावर मिळणारी भरपूर प्रसिद्धी… आणि त्याच बरोबर दारूचे व्यसन.

मग कोणत्या दोन गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या? एक म्हणजे सहनशीलता. कुणी ‘अरे’ म्हटल्यावर तात्या ‘कारे’ म्हणणारच. समोरच्या व्यक्तीची भीडभाड या माणसाने कधीच ठेवली नाही. अर्थात ज्याच्या पाठीवर मोठमोठ्या व्यक्तींनी प्रेमाची थाप दिली आहे त्याला सोशल मिडीयावरील सेलेब्रिटीची काय तमा असणार? आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. व्यसनाधीनता आणि पैशाची आवक कमी असल्यामुळे आपोआपच कर्जबाजारी पणाही वाढला तर त्यात नवल ते काय?

आज सकाळी पोलिसांना तात्यांच्या फ्लॅट मध्ये त्यांचे पार्थिव खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत मिळाले. शेजारच्या खोलीत त्यांची ८४ वर्षांची आई झोपलेली होती. तिला कुणाचा आधार असल्याशिवाय काहीही करता येत नाही. आणि आज तिचा तो आधारही कायमचा संपला. त्या माउलीला हा आघात कितपत सहन होईल हा प्रश्नच आहे. समजा तो जरी तिने पचवला तरी त्यानंतर तिचे पुढचे जीवन कसे असेल हाही एक प्रश्नच आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. पुढील तपासात शवविच्छेदनानंतर खरे कारण समजू शकेल. पण मला वाटते कर्जबाजारी पणा आणि पुढे कसे होईल या गोष्टीचा मनावर येणारा ताण त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असावा.

तात्यांचे अकाली जाणेही मला काही गोष्टी शिकवून गेले.

१. काहीही झाले तरी दारूला स्पर्श करायचा नाही. कधीकाळी इतरांच्या आग्रहाखातर घेतली जाणारी दारू कालांतराने व्यसन बनते. याच दारूपायी असामान्य कलाकाराचे असामान्यत्व झाकोळले जाते. त्याच्या अंगी असलेले सगळे चांगले गुण ‘शून्य’ ठरतात आणि अगदी हलाखीची परिस्थिती सामोरी येते. मग समाजात ना मान उरतो ना मित्रगण. प्रत्येक जण तोंडदेखले कितीही चांगले बोलले तरी त्याच्यापासून दूर राहण्याचाच प्रयत्न करतात.

२. कला असो वा बुद्धिमत्ता त्याचा अभिमान बाळगण्यापेक्षा त्याचा उपयोग करून घेता येणे जास्त महत्वाचे असते. पैसा जरी सर्वकाही नसला तरीही पैशाशिवाय जगणे खूपच अवघड आहे तसेच एखाद्याकडून मदत घेणे हा तात्पुरता उपाय असून स्वतः पैसा कमविणे हाच समाधानी जगण्याचा एकमेव मार्ग आहे.

३. फेसबुक किंवा Whats App वरील वाचक हे फक्त दोन मिनिटाचे मानसिक समाधान देतात. त्यासाठी आपला अमूल्य वेळ फक्त त्यावरच खर्च करणे आपल्या विनाशास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे आधी पोटापाण्याचा उद्योग करून पुरेशी तजवीज झाल्यानंतरच सोशल मिडीयावर सक्रीय होणे जास्त शहाणपणाचे ठरते.

— डोळे उघडलेला मिलिंद…
———————–
Vikas Mahamuni is with Chandrashekhar Abhyankar.

आज ओस पडलेली ओसरी तात्यामय झाली खरी पण तात्यांचे जाणे ही अंर्तमुख करून जाणारी घटना आहे.

गायकवाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये व्यक्त केले की सर्व जण(यात मीपण आलोय) श्रद्धांजली वाहतील पण ज्यावेळी मदतीचा हात पुढे करायला हवा होता तेव्हा माघार घेतील.

तात्या तुझ्याच शैलीत बोलायचे झाले तर सरणावरती असताना सर्व गुणगान करतील आणी जेव्हा मदतीचा हात पुढे करायला लागेल तेव्हा दूरवर पळतील…

खरंच अंर्तमुख करून गेली तात्यांची एक्झीट…

तात्या अभ्यंकर तुमच्या #आठवणी #विचार निरंतर स्मरणात राहतील…

बाकी श्रद्धांजली वगैरे काही नाही कारण ही शिळोप्याच्या ओसरीवर तात्यानू तुझे विचार सदैव ओसंडून वाहतील….

सकाळी बातमी कळली तेव्हापासून विषण्ण मनस्थितीत असलेला तात्याचा चाहता.
——————
Vinay Joshi
17 hrs
फेसबुकवर थोडंफार जे लिहायला शिकलो ते तात्या ऊर्फ चंद्रशेखर अभ्यंकर यांच्यामुळे.

त्यांच्या बेधडक लिखाणाचा मी फॅन होतो आहे आणि राहीन.

प्रत्यक्ष कधीच भेट झाली नाही. पण तरीही खूप वर्षांची ओळख असल्यासारखे फोनवर बोलायचो.

तुमचं राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक मार्मिक लिखाण आता कधीच वाचायला मिळणार नाही याचं दुःख वाटतंय तात्या.

तुमच्या पोस्टवरच्या अनेकांच्या कमेंट्सना तुम्ही दिलेले रिप्लाय वाचून हसण्याची काही शिकण्याची संधी अशी अकाली हिरावून घेऊन तुम्ही निघून गेलात.

मी अविवाहित आहे पण ब्रह्मचारी नाही असं बिनदिक्कत सांगण्याची हिम्मत तुमच्यात होती.

पंडित भीमसेन जोशी, किशोर कुमार, मधुबाला आणि अनेक दिग्गजांचे किस्से तुमच्या मनाच्या कप्प्यात होते आणि तुम्ही सढळ हस्ते ते वाटलेत आणि आमचं अनुभव विश्व वाढवलंत.

फोरासरोड ते फिल्मीस्तान अनेक अनेक विषयांवर विविधांगी पोस्ट लिहिल्यात. बिनधास्त कोणताही आडपडदा न ठेवता लिहिल्यात.

किती किती लिहू तुमच्यावर. शब्द कमी पडतील.

बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि फेसबुकच्या अभासी जगातला एक अवलिया तात्या.

वयानी मोठे असलात तरी माझा मित्र तात्या.

धक्का लावून गेलात.

जिथे असाल तिथे सुखी रहा.

भावपूर्ण श्रद्धांजली.

श्रीराम. 💐🙏

तात्यांचा अभासी जगातला शिष्य आणि मित्र,
#विजो
विनय जोशी.
——————–
सुयोगा जठार

शिवराळ भाषा वापरूनही कधी अश्लील वाटलं नाही, असं लेखन की दैवी देणगी असल्यासारखे.. कोणताही विषय वर्ज्य नाही.. मातृभक्त, लोकप्रिय आणि पारदर्शक तात्या! आता कधीच वाचता येणार नाही! प्रत्यक्ष भेटले नसूनही खूप वाईट वाटले! 😢😢
मनाला चटका लावून गेले “तात्या”! 😢
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
—————–
Amit Joshi

आज “तो” गेला, एक fb वर गृप सुरू केला होता “शिळोप्याची ओसरी” आधी हे काय भलत नाव म्हणून हसलो नंतर गृप join केला , त्यातला तुमचा पोस्ट वाचत राहायचो, आवडत्या लेखकाचं पुस्तकाची आतुरतेने वाट बघतात तसा तुमच्या लिखाणाची वाट पाहायचो, तुमचं लिखानाला कधीच सीमा नव्हत्या सांगितलं खेळ राजकारण

एक दिवस अचानक तुमच्या पोस्ट येणं बंद झालं हे लक्षात आले आधी गृप बाहेर आहे का पाहिलं नंतर कळलं की तुमचं लिखाणच बंद झालं तस गृपची वर्दळ पण कमी झाली मध्ये मध्ये पोस्ट पण असायची की तुमच लिखाण आता तुमच्याच गृप वर नसत, तुमच्या बद्दल फारशी माहिती कळलीच नाही,

आणि आज ती बातमी कळली, तुमच्या बद्दल आणि तुमच्या स्वभाव बद्दल लोकांना किती प्रेम होतं ते आज दिवसभर वाचत आहे, तुमच्या आयुष्यात आलेल्या अडचणी आणि त्याबद्दल च्या चर्चा मला नेहमीच दुययम राहतील
माणूस म्हणून तुम्ही खरच खूप ग्रेट आहेत

पण एक अनुभव मात्र मला देऊन गेलात

“पैसा असला की सगळे आपले आणि नसला की सगळे दुरावले”

तात्या तुम्हाला मनापासुन श्रध्दांजली
🙏🏻
—————-
Mandar Kulkarni

कशाला त्या xxx च्या नादी लागतोस रे? भले ते असतील सेनेचे त्यांना मी अजिबात उभे करत नाही.बाकी भाजपात देवेंद्र आणि नरेंद्र सोडला तर xx कोणी कामाचे नाही. बाकी ते जाऊ दे माझ्या बाटलीचे काय? अस हक्काने विचारणारा, त्याच्या घरी गेल्यावर स्वतःच्या हाताने केलेला लाडू खायला देणारा, बायको गाते म्हंटल्यावर घेऊन आला का नाहीस असा रागवणारा, त्याला बाटली दिल्यावर अरे इतकी महागाची सवय नको लाऊस तू एकदा येणार वर्षातून फक्त….तात्या का गेलास सोडून? एकदा तरी बोलला असतास मनमोकळा…अरे नारायणाने दिलेला पैसा त्याच्याकडेच जातो ह्यावर माझा विश्वास होता आणि आहे..तुझ्यासाठी आम्हीच कमी पडलो तात्या…..
—–
Yogeshwar Kasture is with विनू ऊर्फ अजय कारुळकर
एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व तात्या🙏❤
शेवट तात्यांनी त्यांच्या लेखांचे पुस्तक लिहीलेच नाही।
भावपूर्ण श्रद्धांजलि 😔
निशब्द!
—–
Madhav Bhokarikar is with Chandrashekhar Abhyankar.
Yesterday at 3:06 PM
‘तात्या अभ्यंकर’ म्हणण्याइतका त्यांचा व माझा परिचय कधीच नव्हता. नाहीतरी या फेसबुकवरच्या परिचयाबद्दल काय सांगणार ? त्यांचा बाबू रद्दीवाला, रानडे काका, रिसबूड वहिनी या पात्रातून आपल्याला सांगत रहायचे, काही ना काही, अतिशय मार्मिकपणे !

त्यांच्या या लिखाणाच्या भलेपणाला झाकून टाकणाऱ्या, त्यांच्याबद्दलच्या काही बुऱ्या पोस्टपण वाचण्यात आल्या. मी ऐकलेली दोन-तीन वाक्ये, मला जीवनाचे कायम सार व मानवी स्वभाव सांगत असतात.
‘दुपारच्या बारा वाजेची वेळ मोठी वाईट असते.’
‘बुभुक्षित: किं न करोति पापम् ?’
‘गरिबीला मान-अपमान, बुद्धी काही नसते.’

त्यांनी कै. बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्या एका गीताची मला आठवण करून देवून, अगदी पार शालेय वयात लोटले होते. — चाहिये आशीष माधव

— आणि वकिलीचा व्यवसाय असल्याने, ज्यांना मी आपला वाटतो, ते मला अगदी मनमोकळेपणाने सल्ला विचारतात, आणि मी सांगतो. — बस ! त्यांचा प्रत्यक्ष फोनवर अडचणीत असलेला आवाज एकदा ऐकला, मी धीर दिल्यावर, त्यांच्या आवाजात झालेला बदल ऐकला, आणि समाधान वाटले ! एका अडचणीतील माणसाला धीर देण्याचे !

इथं फेसबुकवर ते कधीचेच दिसत नाही. —- आणि आता यापुढे दिसण्याची पण शक्यता नाही.
—————
Nilesh Shinde

तात्याला जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा त्याला मदत करु नका असे सांगणारेच आज श्रद्धांजली वाहतायत

काळाचा महिमा थोर आहे

तात्याय तस्मै नमः
————-
Mandar Kulkarni भारतात येतांना ड्युटी फ्री मध्ये गेलो की तात्यांची आठवण असायची. त्याला आवडते म्हणून रेड लेबल घेऊन जायचो. नक्की ये म्हणणारा, इनबॉक्स मध्ये येऊन आई आजारी आहे रे असे सांगणारा तात्या चटका लावून गेला
——
Chandravilas Durve

भावपूर्ण श्रद्धांजली💐
बरेच दिवस फेसबुक वर दिसत नव्हते. मी मेसेज केला आणि थोड्याच वेळात मला उत्तर आले.
नंतर मी फोन केला. आठवणीने फोन केला म्हणून भारावले होते. पण काही तरी प्रचंड दडपण होते. अडचणी होत्या. मी काही तरी मार्ग निघू शकेल आणि कसा निघेल ह्याची कल्पना दिली. मध्यंतरी दोनदा ठाण्यात येऊनही भेट होऊ शकली नाही.
काळाकडेच फक्त उत्तर होते!
💐
—————-
Vaibhav Kulkarni
Yesterday at 2:38 PM
साधारण पणे 5 एक वर्षांपूर्वी तात्या नामक व्यक्तीची ओळख ही फ़ेसबुक च्या माध्यमानातून माझी झाली सुरवातीला तात्या चे आंबट गोड पोस्ट खूप आवडू लागले, शब्दांचा राजा माणूस असलेला तात्या यांनी रेड लाईट या विषयांवरचे लेखन असो किंवा लाडू ची गोष्ट अगदी सहजपणे अलगत मनाला स्पर्श करून जात होती.

त्यात्या हा फक्त लेखनसम्राटचं नव्हता तर तो गायन सम्राट सुद्धा होता.

पंडित भीमसेन जोशी यांच्या आशीर्वाद लाभलेला व किराणा घराण्याचा दुर्लक्षित राहिलेला शापित गंधर्व होता तो

पंडितजींचा व अटलजिचा व बाळासाहेब यांचा अगदी निस्सीम भक्त होता तो अगदी म्हणजे त्यांच्या घरासमोरून जाताना सुद्धा पायातील वहाण सुद्धा हातावर घेऊन पुढे जायचा.

राजकारणातील थोर समीक्षक च होता तो प्रत्येक वेळी साधक बाधक चर्चा घडवून आपलं मतं स्पष्टपणे मांडायचा.

अमित शहा यांचे नाना हे नामकरण तात्यानी चं केले असावे .

अश्या या अजातशत्रू माणसाचे माझे खटके उडाले तर महाराष्ट्र मधील विधानसभेच्या वेळी सेना भाजपा वेगळे लढत होते आणि तात्या हाडाचा शिवसैनिक त्यामुळे काही काळ अबोला राहिला.

सुमारे दीड एक वर्षांपूर्वी मी मुंबई ला स्थायिक झाल्यावर खूप वेळा विचार येत होता की तात्यांना भेटावे घरी जाऊन.

व एक दिवस माझ्या मोबाईल वर फोन आला तात्याचा आणि त्याचा आवाज कापरलेले चिंतातुर होता ते म्हणाले आई ची तब्बेत खूप खलावली आहे काही पैश्याची मदत करता येते का बघ एक महिन्यात परत देतो.

मी पण लगेच होकार दिला व त्यांनी अकाऊंट नंबर पाठविला.

मी मित्र मंडळी यांच्या काढून मदत घेऊन त्यांना देवी इच्छुत होतो पण खूप जणांनी मला सांगितले की तू प्रत्येक्ष भेटून त्यांना पैसे दे व आई ची तब्बेतीची चौकशी कर.

तात्याना तसा निरोप दिला की मी येतोय भेटायला तर ते चाचपडले व म्हणाले मला वेळ नाहीये तू लगेच पैसे पाठव.

मला काहीच कळले नाही मग त्यांच्या जाणकार लोकांकडून माहिती घेतली तर कळले की त्यांच्या आईचे वय झाले आहे व दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत.

त्यानंतर खूप दिवस काही तात्यांशी संपर्क आला नाही पण एकदा मसेज आला की तुला राजकीय चर्चेत सहभागी होण्याचो इच्छा आहे का?
असेल तर सांग माझ्या स्मूहात सामील करतो फक्त अट हीच आहे की मला सध्या किरणामल भरायला पैसे नाहीत 500 रुपये दे।

मी लगेच होकार देऊन पैसे दिले व त्यांनी मला समूहात सामील करून घेतले त्यामुळे आज तुम्हा सगळ्या महानुभाव ची ओळख झाली व साधक बाधक चर्चा करायला मिळाली अधून मधून फोन यायचा त्याच की एक स्कीम आहे बघ घेतो का वगैरे?

पण घरगुती कारणास्तव मी व्यस्त असल्यामुळे त्यांना सांगितलं की मी यातून बाहेर आलो को करेन मदत आणि ते म्हणाले की अनुलुप विलोम चा कार्यक्रम करू पण आज ही बातमी या समूहावर समजलो अगदीं पोटात गोळा आला व आपला घरातली कोणी तरी गेला असे दुःख झाले..

देव त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हीच मनोकामना 💐💐

©वैभव कुलकर्णी
—————-
Mahesh Bhagwat

नुसत्या फेसबुक वर झालेली ओळख.पण मनाला भावलेला अवलिया.
कलासक्त संगीतवेडा, माणूसवेडा, खवय्या, मातृभक्त, बिनधास्त आणि बेडर, जातीयवादास कडाडून विरोध करणारा. आणि एक चांगला संवेदनशील लेखन करणारा लेखक हरपला. आमची शिळोप्याची ओसरी पोरकी झाली. आमचा प्रिय तात्या आम्हाला सोडून गेला.🙏💐💐💐
——–
Bala Zodge मला तर अजूनही खरं वाटत नाही.
मुंबईच्या कामाठीपुर्यापासून ते ठाणा चेकनाक्यापर्यंत याला खडानखडा माहिती होती.
शिवाय प्रत्येक गोष्टीचे ज्ञान
एकदम दिलखुलास
Mahesh Bhagwat Bala Zodge होय,तुम्हाला प्रेमाने आमचा बाळा असे संबोधणारा. विश्वंभर चौधरी यांना मिस्कीलपणे विचारणारा की काय हो विसुभाऊ ह्या चॅनेलवाल्यांकडून बोलण्याचे किती रुपये मिळतात तुम्हाला. अतिशय लोपटाळू, प्रेमळ,दिलखुलास व्यक्तिमत्व होते.
तुमच्या चारोळ्या ते आवर्जून शेयर करत.
———-
Shrinivas Phadke
Yesterday at 1:22 PM
तात्या अभ्यंकर यांच्या मुळे फेसबुकवर लिहायला लागलो. राजकीय तात्या आणि शिळोप्याच्या ओसरी या दोन्ही ग्रुपवर मोकळे वातावरण होते. तात्या स्वतः मार्मिक भाषेत पोस्ट, नर्म विनोदी चुटके किंवा मल्लिनाथी करीत त्यामुळे तात्यांना विनोदाचे चांगले अंग होते .संगीत हा त्यांचा प्रांत होता त्यांचे गुरु भीमसेन जोशी आणि अनेक गायकांच्या रुह्य आणि लक्षात राहणाऱ्या आठवणी ते सांगत.त्यांच्याच भाषेत त्यांचा अनुभवाचा कॅनव्हास खूप मोठा होता त्यात लालबत्ती पासून खासदार नगरसेवक हे सर्व होते .

तात्या गेल्याची बातमी आली आणि ती खोटी ठरावी असे खूप वाटत होते त्यांनी तात्याची बडबड असा WA ग्रुप काढला होता त्या साठी त्यांनी मला फोन दिला होता तो फिरवून पलीकडून तात्यांचा आवाज येईल या आशेने मी सकाळपासून फोन लावत होतो प्रथम तो कोणी उचलला नाही आणि आता बंद झाला आणि ही वाईट बातमी खरी ठरली

ईश्वर तात्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या मातोश्रींना पुत्रशोक सहन करण्याचे सामर्थ्य .
————–
नरेंद्र गोळे
मनोगत डॉट कॉमवर आंतरजालीय, अनिर्बंध सत्वर प्रतिसाद चर्चा, देवनागरीत प्रथमच शक्य झाली होती. त्याचा आनंद आम्ही सारेच घेत होतो. क्वचित स्वातंत्र्याचा गैरवापरही व्यक्तिगत टीकेकरता होऊ लागला. मग तेथील प्रशासक श्री. महेश वेलणकर ह्यांनी प्रत्येक नोंदीवर प्रकाशनपूर्व निर्बंध घातले. त्याचा निषेध करण्यासाठी मग मनोगत कट्टा झाला. आयोजकांत एक होते तात्या. मी त्यांना म्हटले की प्रशासकांवर टीका करण्यापेक्षा ’मनोगता’ला उत्तर देण्याकरता तुम्ही ’जनोगत’ काढा आणि चालवून दाखवा ना! त्याला तात्यांनी मिसळपाव डॉट कॉम काढून उत्तर दिले. त्या सर्व जालसंजीवित आठवणींचा गुच्छच ह्या फोटोत दडलेला आहे. मात्र तात्या आज नाहीत. काल होते. आज नाहीत. तात्यांना ईश्वर सद्गती देवो.

 

Satish Lahane
अभिराम दीक्षित यांच्या Wall वरुन
तात्या वारला
चंद्रशेखर अभ्यंकर असं भारदस्त नाव धारण केलेला हा आडमाप माणूस – वयाने आणि आकाराने माझ्यापेक्षा बराच मोठा होता . मोठा असूनही त्याला कधी अहोजाहो केलं नाही . तो वारला हे भिडेखातर लिहितोय – तात्या मेला अस लिहिलं पाहिजे .

काही वर्षापूर्वी भारतात होतो तेव्हा तात्याच्या अनेक भेटी व्हायच्या . सोशल मीडियातून मला भरगच्च मित्र मिळाले . पुढे वेगवेगळ्या कारणांनी सगळेच दुरावले – त्यातला तात्या प्रमुख ! फेसबुक आणि ऑर्कुट लोकप्रिय व्हायच्या आधी – मिसळ पाव हा नव्या मराठी लेखकांचा अड्डा होता . तात्या त्यातला मुख्य माणूस . तो फोरास रोड च्या वेश्यावस्ती पासून सुधीर फडकेंच्या गाण्यापर्यंत कशावरही लिहायचा . मी अति पुरोगामी लिखाण सुरु केले की ढुंगण वर करून झोपलेल्या नागड्या बाळाचा फोटो टाकायचा – वर म्हणायचा हे आस्तिक नास्तिक विज्ञान वगैरे – वाद विवाद संपेपर्यंत तात्या ढुंगण वर करून झोपला आहे .

तात्या शिवसैनिक होता . आमची मैत्री झाली ते आम्ही दोघंही शिवसेना असल्याने . तात्या शिवसैनिक होता हे कौतुक नाही , मी पण होतो, मुंबई ठाण्यातली निम्मी मराठी माणसं शिवसैनिकच असतात . संघ भाजप विरुद्ध मनापासून दंड ठोकणारा तो शिवसैनिक होता . तात्या ची शिवसैनिक गिरी समजण्यासाठी मुंबईचा कनिष्ठ मध्यम वर्गीय गरीब मराठी माणूस समजून घेतला पाहिजे . मुबईतला भाजपा गुजराथी मारवाडी श्रीमंतांचा पक्ष आहे . डाळीच्या भावाची चिंता असलेला मराठी माणूस मुंबई भाजपात नाही . मागे डाळीचे भाव वाढले तेव्हा कचकून शिव्या खाल्ल्या मोदीने तात्याच्या . पुढे तो स्वतःला काँग्रेसवाला म्हणायचा कधी बहुजनसमाजमावादी चित्पावन म्हणायचा !

तात्या अभ्यंकर चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण . तात्याच्या जातीचा उल्लेख करण्यामागे एक महत्वाचं कारण आहे . लेखाच्या शेवटी ते देणार आहे . आटपाट नगरात एक गरीब ब्राम्हण राहत होता अशा गोष्टी आपण लहानपणापासून वाचल्या आहेत . 1990 नंतर जागतिकीकरणाच्या अर्थव्यवस्थेत आटपाट नगराच्या कथा गेल्या . मुंबई पुण्यातले गरीब ब्राम्हण सुद्धा गेले . शिकले इंग्लिश बोलले ते बाहेर गेले . काळाच्या मागे राहिलेले , न शिकलेले अडाणी मूंबईतून बाहेर फेकले गेले . मुंबई अडाणी अंबानींची झाली . थोडक्यात उद्याच्या अन्नाची चिंता असलेला ब्राम्हण शिल्लक राहिला नाही . तात्या राहिला .

त्याच वडिलोपार्जित लहान घर ठाण्यात होतं त्यात राहिला . हिशोबनीस म्हणून फोरास रोडच्या बार मध्ये कामं केली . दोन पेग नी घसा ओला करत कोणत्याही बार मध्ये बाबूजींचं , माडगूळकरांचं – गीत रामायण गात राहिला . तात्याच्या आवाजात भारदस्त पणा होता . प्रेम वासना गाणं दारू वेश्यावस्ती या सगळ्यावर लिहिताना आणि बोलताना त्याच्या व्यक्तिमत्वातला भारदस्त पणा दिसत असे . तात्या वेश्या वस्तीत फिरायचा . पण त्याचं पुरुष म्हणून स्खलन झालं नाही आणि प्रेमाची किंमत त्याच्या लेखी कमी झाली नाही . उलट वाढली .

एक काळ असा होता की , बरेचसे गरीब ब्राम्हण ट्रॅफिक लायसन्स आणि एलआयसी चे एजन्ट असायचे . तात्या ते होताच . शिवाय तो शेअर मार्केट चा पण एजन्ट होता . इंट्रा डे शेअर मार्केट हा जुगार आहे . पैसे छापायचे मशीन कोणी विकत नसतो . बौद्धिक आणि शारीरिक कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत हे अर्थशास्त्र कळण्याची बौद्धिक कुवत त्याच्यात निश्चित नव्हती . निष्पाप आणि निर्मळ नसला तरी तो जाणून हलकट निश्चित नव्हता . तो त्या शेअर मार्केट च्या दुष्टचक्रात गेला . मग लोकांकडून पैसे उधार घेणं आलं . दुप्पट करतो आलं . त्याच्या नावाने पेपरात नोटिसाही आल्या . पण तात्याने अनेकांचे पैसे बुडवले तसे अनेकांना दुप्पट करून सुद्धा दिले होते .

तात्याची पिसं काढता येतील – ते सोप्प आहे . त्याचं गरीब ब्राम्हण असणं मात्र समजून घेणं अनेकांना अवघड आहे . तात्या अविवाहित होता . त्याचा जबरा प्रेमभंग सामाजिक कारणामुळे झाला असावा . तितकं मोकळं आणि खरं तो नेहमी बोलेल याची खात्री नाही . तो दुःखी नव्हता पण त्याच्या अडाणचोट रांगड्या वृत्तीत एक एक घाबरलेला आणि हरलेला माणूस होता .

माझी तात्याशी पहिली भेट 2013 साली झाली असावी . त्याच्या आधी फक्त इंटरनेट वर ओळख होती . मला त्याचं लिखाण भारी वाटलं होत . कोणी दुढाचार्य चष्मांवाला, शर्ट इन केलेला अभ्यंकर मला अपेक्षित होता . जे पाहिलं – तो सरळच पेशन्ट होता शर्टाच्या गुंड्या खालीवर लावल्या होत्या . तोंडात गुटखा तंबाकू खाऊन पांढरे घट्टे पडले होते . वजन जास्त . ब्लड प्रेशर मुळे हाताला किंचित कंप होता.

पहिल्याच भेटीत त्याने माझ्याकडे पैसे मागितले . शेअर मार्केट मध्ये लावून डबल करतो बोलला . त्याची बुडणाऱ्या पैशाबद्दलची कीर्ती आधीच ऐकली होती . गरिबी सुद्धा माहीत होती . पैसे बुडणार हे निश्चित होतं . पण त्याची नड पण समजत होती . जितके मागितले तितके दिले . पण एक अट घातली दुप्पट कर पण परत देऊ नको . त्यानंतर तात्याने मला कधी पैसे मागितले नाहीत .

त्याची बार मधली गाणी ऐकली . भीमसेन जोशी आणि बाबूजींचे किस्से ऐकले . तात्या थोरामोठयाच्या संगतीत राहिला . पण मोठा झाला नाही लहान मुलासारखाच राहिला . तात्याची एक आई आहे . तात्या मेला तो त्या आईच्या साक्षीने . आई खूप म्हातारी आहे . तात्याने तिची वर्षानु वर्ष सेवा केली आहे . तात्या तिचं सगळं नित्यनेमाने प्रेमाने करायचा . लहान मुलासारखाच आई आई बोलायचा .

तात्याने लग्न केले नाही , स्त्री प्रेमासाठी तो आसुसला होता . विषय काढला लग्नाचा तर म्हणायचा लग्न करून सुद्धा तुम्ही तसेच भोंगळे रहाणार लेको ! तात्या मेला तेव्हा त्याची आई जिवंत होती . आईने माझा श्रावणबाळ म्हणून हंबरडा फोडला . आईला हलता सुद्धा येत नाही . एक गरीब ब्राम्हण मेला . त्याच्या आईचं बघायला कोणी नाही .

…………
Amit Joshi तात्या वाईट अजिबात नव्हते, लोकांचे पैसे बुडाले ही असतील त्याच वाईट पण तात्या वाईट अजिबात नव्हता
———-
Suresh Kalekar तात्या अभ्यंकर फेसबुकवरील एक जिंदादिल रसिक व्यक्तिमत्व होते .. पंडित भीमसेन जोशी चे शिष्यत्व लाभलेले पुल कुमारजी यांचे प्रेम लाभलेले. स्वर भास्करांचे स्वरसाक्षर शिष्य.. छान गळा लाभलेले..
विनोद शैली प्रसन्न करून जाई.. फोरास रोड ते राजकीय दंगल कोणताच विषय वर्ज्य नसे.. हाडाचे शिवसैनिक असल्याने बाळासाहेब दैवत मानत..
दारूचे व्यसन हा मोठा ड्राॅ बॅक होता.. ताणावर दारू हे औषध मानणारे जे लोक असतात त्यातले ते होते..
ठराविक पैसे येत राहतील असे काही साधन नव्हते.. पैशाची चणचण असे..
तात्या सोबत मी कनेक्ट होतो.. भेट झाली नाही पण फोन होत.. फोनवर मला काका संबोधत .. पोस्टीवर कमेंट प्रतिकमेंट होत..
..
अंथरूणावर एकाच जागी खिळलेल्या आईची प्रचंड काळजी होती सेवा ही करत होते ते.. मातोश्री साठी ते सदैव तळमळत असत.. तिच्या आजारपणासाठी माझ्या कडून घेतलेली रक्कम वर्षभरात परतही केली.. . पुण्यात संगीत प्रेमी लोकांचा सक्रीय ग्रुप करण्याचा त्यांचा मानस होता पण ते जमले नाही.. पुण्यात तुम्हाला मी बादशाहीत जेवण देणार हे ते आवर्जून म्हणत पण त्यांना व मला ती वेळ साधता आली नाही.. दुर्दैव दुसरे काय.. रानडे काका सबनीस काकू मारिया शारापोव्हा चे काल्पनिक अफेअर ही विनोद शैली प्रसन्न करून जाई.. एक अवलिया माणूस होता तात्या.. .. सहा महिन्यात बरेच निष्क्रिय होते ते.. राजकीय तात्या व शिळोप्याची ओसरी हे फेसबुकवर ग्रुप होते त्यांचे.. मला वाटते हळूहळू त्यांचे जन कनेक्शन कमी होत गेले.. मागे पडत चालले होते..
काल अचानक हृदय विकाराच्या झटक्याने गेले ..
भावपूर्ण आदरांजली
त्यांच्या आईची मात्र खरंच काळजी वाटते..

****************************************************

स्व.तात्या अभ्यंकर यांनी सुरू करून नावारूपाला आणलेल्या मिसळपाव या संस्थळावरील सदस्यांना तर त्यांचे दुःख आवरत नव्हते. त्यांनी दिलेल्या शंभरावर श्रद्धांजलींपैकी काही प्रातिनिधिक श्रद्धांजलि खाली संग्रहित केल्या आहेत. त्या लिहिणाऱ्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार.

मिसळपाववरील प्रतिक्रिया

विजुभाऊ in काथ्याकूट
15 May 2019 – 12:09 pm
गाभा:
इथे असलेल्या नव्या सदस्याना कदाचित ठाऊक नसेल मिसळ पाव हे संस्थळ तात्या अभ्यंकर या कलंदर माणसाने सुरू केले.
संगीत साहित्य खादाडी अशा अनेक विषयाम्मधे उत्तम गती असलेला तात्या एक भन्नाट व्यक्तिमत्व होता . होता म्हणताना वाइट वाटतेय.
मिपच्या रुपाने आपल्या सर्वांना व्यक्त होण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ तात्याने दिले .
तात्या आणि त्याच्या मुशाफिरीवर खूप काही लिहून होईल.
बोलायला वागायला बिंदास असणारा तात्या गाण्यातला दर्दी होता. त्याने खूप ऐकले होते. तो स्वतः गायचा.
तात्या ने मिपावरचा वावर बंद केला त्यालाही बरीच वर्षे झाली. फेसबुकावर त्याने शिळोप्याची ओसरी नामक पेज सुरू केले होते तो तेथे लेखन करायचा
मिपावर विसोबा खेचर या नावाने लिहीलेल्या त्याच्या संगीतविषयक चित्रपट विषयक लेखांची जंत्री देता येईल .
https://www.misalpav.com/node/10995 देवगंधर्वांचं ‘पिया कर..’, थोडं गोविंदरावांचं आणि थोडं नारायणरावांचं ‘मधुकर वन वन’
https://www.misalpav.com/node/2455 बसंतचं लग्न ( ही आख्खी लेखमाला आहे)
तात्याची रौषनी तर मला कित्येक संस्थळावर वाचायला मिळाली.
https://www.misalpav.com/node/1901 गोपाला मेरी करुना
https://www.misalpav.com/node/1346 काही ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे!
https://www.misalpav.com/node/20610
https://www.misalpav.com/node/805 आज़ जाने की जि़द ना करो…

कालच तात्याच्या रौषनी धाग्यावर तात्या भेटणार नाही असे कोणाला तरी म्हणालो आणि आज तात्या गेल्याची बातमी येते हे धक्कादायक आहे.
तात्या ने मिपाला आणि मिपाकराना खूप काही दिलंय.
या धाग्यावर तात्या तुम्हाला भेटला त्या च्या काही चांगल्या आठवणी शेअर कराव्यात ही विनंती.
इश्वर मृतात्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना _/\_
——-
भावपूर्ण आदरांजली.
15 May 2019 – 12:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सकाळी दहाच्या सुमारास वाट्सपवर मेसेजेस यायला सुरुवात झाली आणि धक्काच बसला. मराठी संस्थळं मुक्त असली पाहिजे, लिहिण्या बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे या ध्येय-धोरणातून मिपाची ज्यांनी स्थापना केली ते तात्या अभ्यंकर, उर्फ चंद्रशेखर अभ्यंकर एक उमदं व्यक्तिमत्व. शास्त्रीय संगीत, ती घराणी, व्यक्तिचित्र, खुसखुशीत लेखन, प्रतिसाद, वाद यासोबत उत्तम लेखन करणारा मिपाकर आज गेला. अतिशय दु:ख होत आहे.

भावपूर्ण आदरांजली.

-दिलीप बिरुटे
————–
ओह गूडनेस, माझा तात्यांचा
15 May 2019 – 1:15 pm | माहितगार
ओह गूडनेस, माझा तात्यांचा परिचय ऑनलाईनच म्हणजे मनोगत संस्थळावरचा, मनोगतच्या लेखकांनी मराठी विकिपीडियावर सुद्धा लेखन करावे असे आवाहन करणारा आणि विकिपीडियाचे फायदे नमुद करणारा लेख मनोगतावर लिहिला . चर्चे दरम्यान विकिपीडियावर भरपूर टिकाही झाली आणि मी त्यास शक्य ती उत्तरे दिली. आक्षेप नोंदवणारी बहुतेक मंडळी नंतर थोडे थोडे का होईना मराठी विकिपीडियावर लेखन करून गेली. जोरदार आक्षेप नोंदवणार्‍यांमध्ये मला तात्या आघाडीवर होते ते आठवते. मी त्यांना उत्तर दिले आणि नंतर त्यांनी मराठी विकिपीडियावर येऊन लेखन केले.

माझी तात्यांबद्दलची तेव्हाची प्रतिमा प्र.के.अत्रेंसारखा शब्दांचा वापर करताना भीडभाड न बाळगणारा माणूस अशी होती. त्यांना मराठी विकिपीडियावर लिहिताना पाहताना खरे सांगायचे तर मनातून धास्तावलो होतो कारण त्यांनी त्यांची -ज्ञानकोशाच्या संकेतात न बसणारी- शब्द संपत्ती इतर ठिकाणच्या संकेतस्थळाप्रमाणे मराठी विकिपीडियावर मोकळी केली असती तर असा विचार मला नाही म्हणाले तरी जरासा चिंतीत करून गेला. पण माझी ती चिंता अनाठायी होती हे काही महिन्यातच मला उमगून गेले. मराठी विकिपीडियावर त्यांनी अदमासे २०० ते २५० संपादने केली असावीत मुख्यत्वे शास्त्रीय संगितातील राग आणि काही शास्त्रीय गायक यांच्या बद्दलच्या लेखांची सुरवात त्यांनी केली.

त्यांनी दुसरा ऑनलाइन संपर्क केला ते मला मराठी विकिपीडियाबद्दल मराठी विकिपीडियाच्या कक्षेत न बसणारी चर्चा करण्यासाठी मिपाचे व्यासपीठ वापरावे अशी गळ दोन तीनदा तरी घातली असेल. विकिपीडियाला कमी सेंसॉरशीपवाल्या सपोर्टची गरज भासते तसे मला तात्यांच्या संस्थळावर चर्चा करण्याचा विचार मनातून भावला कारण काही झाले तरी मनोगता प्रमाणे तात्या सेंसॉरशीपची तलवार चालवणार नाहीत हा विश्वास होता. पण मी मिपावर बर्‍याच उशीराने लिहिता झालो तो पर्यंत मिपाचे हस्तांतर झाले होते . तात्या करतील त्या पेक्षा सेंसॉरशीपची एक लेयर शक्यता अधिक राहीली तरी खूप जाच करणारी नसल्याने टिकून राहू शकलो आहे. पण मिपावर या या आग्रहाचा त्यांचा संवाद झाला तसा पुन्हा झाला नाही. एक आश्वासक व्यक्तिमत्व काळाच्या आड गेलेल ऐकुन मनाला हुरहूर लागते ती तशी लागली.

शोकसभा आयोजीत होत असल्यास या धाग्यावर कळवावे हि नम्र विनंती.

तात्या अभ्यंकर अर्थात विसोबा खेचर यांच्या मराठी विकिपीडियावरील योगदानाचा दुवा
—————-
तात्या गेले ही बातमी वाचुन
15 May 2019 – 2:22 pm | स्मिता श्रीपाद
तात्या गेले ही बातमी वाचुन खुप धक्का बसला.
पूर्वी च्या मिपा वर तात्यांचा मुक्त वावर होता. गेल्या काही वर्षात ते इथे नव्हते.
मिपा मालक अशीच माझ्या मनात त्यांची तेव्हापासुन प्रतिमा होती.
रोज मिपा च्या मुखपृष्ठावर सुंदर सुंदर ललनांचे फोटो टाकायचे तात्या एकेकाळी :-)… आणि बहुतेक सोबत एका पदार्थाचेही..नीटसं आठवत नाही.
मिपा एकदम happening वाटायचं तेव्हा…रोज ऑफिस मधे आलं की पहिलं मिपा वर जाउन बघायचे मी की आज काय नवीन.
तात्यांसोबतच प्राजु, स्वाती दिनेश, अपर्णा ताई, रेवती, चतुरंग ही सगळी मंडळी एकदम खुप खुप जुन्या ओळखीची वाटायची.
तात्यांचा साहित्य, संगीत, खादाडी सगळेकडे मुक्त संचार होता.सगळ्या लेखांवर त्यांची आवर्जुन प्रतिक्रीया असायची.त्यांचे लेखच नव्हे तर प्रतिक्रीया वाचायला पण मला मजा यायची.
आणि प्रतिक्रीया वाचुन तात्या स्वभावाने किती मोकळे ढाकळे असतील याचा अंदाज यायचा.
माझ्या आठवणीप्रमाणे “फोटो बघुन खपलो आहे, वारलो आहे ई ई” अशी कमेंट पाककृती च्या लेखावर द्यायची सुरुवात बहुतेक तात्यांनीच केली असावी.
स्वाती दिनेश च्या सासरेबुवांनी एक लेखमाला इथे लिहिली होती. त्यांच्या संपूर्ण आयुष्यातल्या आठवणी, आत्मचरीत्रपर लेखन होतं ते.
ते लिहिणारी व्यक्ती स्वाती दिनेश चे सासरे आहेत हे शेवटच्या भागात कळलं होतं सगळ्यांना.
” आज मिसळपाव संकेतस्थळ सुरु केल्याचं सार्थक झालं” अशा आशयाची तात्यांची त्यावर काहितरी कमेंट होती त्यावर.
कौतुक करायचं तर दिलखुलास आणि शिव्या पण मोकळेपणाने द्यायच्या अशी माणसं खुप कमी असतात.
तात्या, तुमच्या आत्म्यास शांती लाभो. __/\__
———–
धक्कादायक
15 May 2019 – 4:46 pm | विकास
आत्ता आमच्या सकाळी काही मित्रांच्या मेसेजेस मुळे ही बातमी वाचली आणि क्षणभर विश्वास बसला नाही.

तात्याला पहिल्यांदा मनोगत संस्थळावर पाहिले होते. तिथल्या शिस्तीच्या विरोधात तो त्याच्या स्वभावाप्रमाणे विरोध करायचा. तिथूनच काही जणांनी उपक्रम हे संस्थळ चालू केले. तेथे पण तो सक्रीय होता. पण परत शिस्तीचे वावडे असल्याने आणि तसेच त्याच्या डोक्यात खरेच मोकळीढाकळी वेबसाईट चालू करायचे आले आणि तशी त्याने मिसळपाव करून दाखवली. तात्याचे या संदर्भातील जे गुण होते ते खरेच एखाद्या entrepreneur ला शोभतील असे होते. त्याने नुसतेच स्थळ चालू केले नाही तर माणसेपण ओढून आणली, मैत्री केली… मराठी संस्थळ अशा पद्धतीने नावारूपाला आणणारा कदाचित तो एकोहम असावा. आणि त्या साठी तो कायम लक्षात राहील.

तात्याला भावपूर्ण श्रद्धांजली.
————————-
तात्याला अप्रत्यक्षरीत्या
15 May 2019 – 7:02 pm | माझीही शॅम्पेन
तात्याला अप्रत्यक्षरीत्या भेटलो होतो म्हणजे तो माझ्या लग्नाला बायको कडून आला होता , हेहि मला बऱ्याच कळालं , एक हरहुन्नरी ,वादळी माणूस , लेखन कौशल्यात कोणीही हात धरू शकणार नाही , एकदा / दोनदा आपण नक्की भेटूया एवढ्यावरन पुढे सरकलोच नाही. पुढे अनेक वादविवाद पुढे आल्यावर भेटावं असं वाटलं नाही , पंडित भीमसेन (अण्णा ) ह्यच्या बद्दल भरभरून लिहायचा , अण्णा गेल्यावर सैरभैर होऊन लेख लिहिला होता.
इतक्या लहान वयात आंतरजालावर लोकप्रिय असणारे व्यक्तिमत्व हरपणे हे निश्चित दुःखदायक आहे
——————-
या आभासी जगात , आभासी जागेत ,
15 May 2019 – 7:25 pm | खिलजि
या आभासी जगात , आभासी जागेत , मराठीचे स्थान बळकट करणारे , मिपाचे संस्थापक कै. तात्या अभ्यंकर यांना विनम्र श्रद्धांजली … त्यांना बघितलं नाही पण एक मात्र नक्की त्यांनी आपल्यासारख्या बर्याच जणांना एक अशी अनमोल जागा निर्माण करून दिलीय कि त्याला या आभासी जगात कुठेच तोड नाही आहे . मिपा जसेजसे वृद्धिंगत होत जाईल , तशी तशी त्यांची महती दिगंत होत जाईल . हे लवकरात लवकर व्हावे , हि शंभू महादेवाकडे प्रार्थना …
————

भावपूर्ण श्रद्धांजली
15 May 2019 – 7:32 pm | बाबा योगिराज
तात्याला मी फक्त मिपावरील लेखनसाहित्यामुळेच ओळखत होतो. मध्यंतरी फार काही कानावर आलं होतं, पण मला तात्याच लिखाण फार आवडायचं म्हणून मी त्याकडे कधी लक्ष दिलं नाही. सुरवातीला मी तात्याला भेटायचा एक दोन वेळेस प्रयत्न केला होता परंतु भेट काही घडली नाही.
कुणासाठी तो कसाही असो माझ्यासाठी तरी तो माझा आवडता लेखक होता. आणि काहीही घडलेलं असलं तरी आपल्या सगळ्यांना मिपाच्या माध्यमातून एकत्र आणणारा होता. तात्याच अकस्मात आणि अश्या पद्धतीने निघून जाण फार धक्कादायक आहे.
तात्या मिसळपाव साठी खरच धन्यवाद. तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
ओंम शांती शांती शांती: _____/\____

तुझ्या लेखनाचा पंखा
बाबा योगीराज.
——————–
अरेरे
15 May 2019 – 8:09 pm | अभ्या..
खरोखर वाईट बातमी,
मी मिपावर आलो तेंव्हा तात्या सक्रीय नव्हते पण त्यांचे खूप लेखन आणि प्रतिसाद वाचलेले होते. निकम्मा तम्मा तात्या किंवा बाझवलाभेंचो सारख्या शिव्या देऊन सतीसभौ(मोकलाया फेम) समोर आपली शुध्दलेखनाची हार मानणारे प्रतिसाद, अनुष्का शेट्टीचे फोटो टाकून “हिच्यावर आमचा भारी जीव” असे प्रतिसाद, थिंकमहाराष्ट्रच्या चर्चेनंतर साडेतीन टक्क्याचे ब्रॉडबॅन्ड बूड हलवून ड्रिंकमहाराष्ट्र करायला पळणारे तात्या, मिपासदस्यांशी कौटुंबिक पातळीवर गप्पाटप्पा हाणणारे रंगेल, कलंदर, संगीताचे दर्दी तात्या अशीच इमेज डोळ्यासमोर होती. मध्यंतरी काही कालावधीपुरते ते परत मिपावर लिहिते झालेली. त्यावेळी एकदा माझ्याशी संपर्कही केलेला(त्यांना माझा नंबर कुणी दिला हे अजुनही कळले नाही, आता तर बिलकुल कळणार नाही) होता. थोड्याश्या कौतुकाच्या आणि इतर गप्पानंतर सम्पर्क धंडावला. त्यानंतर तीनचार वर्षानी डायरेक्ट काल विजुभौचा रोषनीवर प्रतिसाद पाहुनच आठवण होते तो हि बातमी. विजुभउंना काय दिसले की काय स्वप्नात असे विचारावे वाटलेले पण सकाळी व्हाटसपावर सॅड न्युज कळली.
अशा आत्म्यांना शांती देवो असे आम्ही पामर काय म्हणणार. त्यांच्या दैवतासमान आण्णांच्या संगीताचा, खादाडीचा ते तृप्त मनाने आस्वाद घेत मनसोक्त बैठका रंगवोत इतकीच इच्छा.
इत्यलम
——
श्रद्धांजली
15 May 2019 – 9:47 pm | डॉ.प्रसाद दाढे
मिसळपावमुळे म्हणजे खरं तर तात्यांमुळे माझ्यासारखे अनेक जण ‘लिहिते’ झाले. इथे अनेक समविचारी मित्र मिळाले. रामदास, बिपीन, विजुभाऊ, भडकमकरमास्तर, चतुरंग, पिवळा डॅमबिस, केशवसुमार, धमु, प्रभाकर पेठकर आणि अर्थात स्वतः तात्या अश्या अनेक दिग्गजांनी मारलेले चौकार, षटकार आणि त्यावरच्या एकेकाच्या अफलातून प्रतिक्रिया हा सगळा एक सोहळा होता.
तात्या फॉर्ममध्ये होते तेव्हाचे धमाल किस्से इथल्या जुन्या मंडळींच्या आठवणीत आहेतच. त्या आठवणीच आता सोबत राहतील
——

अरेरे
15 May 2019 – 10:45 pm | पिवळा डांबिस
अतिशय दु:ख्खद बातमी. मृतात्म्यास आदरांजली…
तात्याच्या लिखाणामुळेच तर मी मिपावर आलो. वर डॉ. दाढेंनी म्हंटल्याप्रमाणे सुरवातीच्या काळात एक इरसाल ग्रूप जमला होता.
तात्याशी चर्चा, थट्टामस्करी आणि हो, वादही भरपूर घातले.
कुणाचं काही चांगलं लिखाण अतिशय आवडलं की तो ख-प-लो, असं म्हणून त्याचा स्वतःचा हार घातलेला फोटो प्रतिसादात द्यायचा.
इतक्या लवकर ते खरं ठरेल असं अजिबात वाटलं नव्हतं…
कुणी मिपाकर गेल्याचं कळलं तर दु:ख्ख होतंच पण त्यात जर ती व्यक्ती माझ्यापेक्षा वयाने लहान असेल तर जास्त यातना होतात..
असो. ईश्वरेच्छा.
———-
अतिशय धक्कादायक बातमी!
17 May 2019 – 8:47 am | कानडाऊ योगेशु
अतिशय धक्कादायक बातमी!
खादाडी सदर व त्यासोबत एखाद्या सुंदर ललनेचा फोटो व सोबतची “ही आमची अनुष्का हीच्यावर आमचा फार जीव”
किंवा
फाट्यावर मारण्यात येत आहे.
चपला घाला आणि त्वरीत चालु लागा.
आणि ते सर्वात लोकप्रिय बाझवला भेंचोद
अश्यासारखे इतर शालजोडीतले खास तात्यांचेच असे ट्रेडमार्क्स होते.
व्यक्तिश: परिचय नसला तरी नेहेमी ओळख असल्यासारखेच वाटायचे.
तात्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
—–
तात्या …..
17 May 2019 – 9:28 am | चौकटराजा
खरे तर मी बराचसा तात्यासारखा आहे असे वाटतेय …. यमन , भीमसेन बालगंधर्व , शिव्या ,,,,मुक्त स्वभाव हे माझयाकडे आहे. मला ही व्यक्ती माझया पेक्षा १६ वर्षाने लहान आहे हे आज कळत आहे. माझा स्वभाव कितीही दिलखुलास असला तरी आपण होऊन परिचय करून घेण्याचा मात्र नाही. त्यामुळे मी विसोबा खेचर या आय डी शी परिचय करून घेतलाच नाही. मला इथे हे काही विद्वान , रसिक ,वात्रट मित्र भेटले त्याचे श्रेय नीलकांत व पर्यायाने तात्यांना जाते. सबब एक मिपावाला म्हणून अपरिचित आप्त गेल्याचे मला दुःख आहे. आत्मा बीत्मा मी काही मानत नसल्याने “सदगती ” वगैरे सोडा , जिवंतपणी अभ्यंकर यांनी जे कार्य केले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे !
———-

भावपूर्ण श्रद्धांजली
17 May 2019 – 9:56 am | सुधीर
२००२ मध्ये याहू चॅट आणि चॅट रूमची एक क्रेझ होती. मी कधी कधी याहू चॅट रूम्स मध्ये चॅट करायचो. पण कधीतरी २००७ मध्ये काही मराठीतले ब्लॉग्ज नजरेस पडले, तिथूनच मग मनोगत आणि मायबोली या संकेतस्थळाविषयी कळलं. मायबोलीचा पसारा जास्त होता. पण मनोगत खूपच आकर्षक वाटलं. का कुणास ठावूक मायबोलीचा इंटरफेस तितकासा आवडला नाही. मग मायबोली पेक्षा उपक्रम जास्त आवडू लागलं. कारण तिथे “त्यामानाने” फारशी बंधनं नव्हती. लोक खूप चांगल्या विषयावर चर्चा करायचे. मी वाचनमात्रच असायचो, पण चर्चा वाचायचो. बर्‍याच आयडींचा छाप होता. काहींची विद्वत्ता आवडायची. तर काहींचा व्यासंग. त्यातला एक आयडी आठवतो. तो आयडी होता सर्कीट. आणि काहींची काळजाला हात घालणारी पुलं सारखी शैली, अर्थात ती व्यक्ती होती, तात्या अभ्यंकर. तात्या आणि सर्कीटचा याराना त्यावेळेच्या सदस्यांना आठवत असेल. रोशनी सारखे लेख अर्थात उपक्रमच्या एकंदर चौकटीत बसत नव्हते. रोशनी मध्ये उत्सुकता होती आणि तात्यांची बंडखोरी वृत्ती तेव्हा आवडली होती. निलकांत-तात्यांनी मिळून रातोरात नवं संकेतस्थळ उभं केलं ते होतं ‘मिसळपाव’. मी पहिल्यादिवशीच आयडी घेतला. लेख सोडा, पण प्रतिसाद तरी लिहिन का? हे माहीत नव्हतं. पण मी या संकेतस्थळाच्या पहिल्या दिवशीच आयडी बनवला. तात्याशी प्रत्यक्षात कधी संबंध आला नाही पण तात्यांच्या मिसळपावने मला अभिव्यक्त व्हायला शिकवलं हेही तितकच खर. आणि तात्यांमुळे मला थोडीफार मराठी गाणी, नाट्यसंगीत आवडू लागलं. तात्यांना शेअर बाजार पण खूप आवडायचा. आणि त्यावेळेस मला शेअर बाजाराविषयी फक्त आकर्षण होतं. संकेस्थळावर पडीक असणं परवडनारं नव्हतं, त्यामुळे पुढे संकेतस्थळावर अधनं मधनं येणं व्हायचं. मधले काही संदर्भ लागले नाहीत पण काही व्यवहारांमध्ये इतर सदश्यांशी आलेल्या कटूतेमुळे “कदाचित” तात्या मिपा सोडून गेले असावेत असा अंदाज मी बांधला. तात्या त्यांच्या ‘वल्ली’ चितारताना काहीसा उदास शेवट लिहायचे. तात्यांच्या स्वतःच्या कथानकाचा शेवट सुद्धा असा चटका लावून जाणारा असेल असं वाटलं नाही.
————-
धक्कादायक !
17 May 2019 – 11:01 am | आवडाबाई
तात्या गेले, धक्का बसला.
मिसळपाव सुरू केले तेव्हा मनोगतवर संदेश करून इकडचे सदस्यत्व घेण्याचा आग्रह केला होता.

बंडखोर आहेत हे तर दिसतच होते, पण किती बंडखोर आहेत हे इथे आल्यावरच कळले. कधी त्यांचे म्हणणे पटायचे, अनेकदा नाही. शिवराळपणा जास्त झाला की कित्येक आठवडे मग फिरकायचे नाही इकडे. पण शेवटी यावेच लागायचे, काहीतरी छान लेखन तेवढ्यात मिस झाले असेल ह्याची जवळ जवळ खात्री असायची.
काहीतरी वेगळाच बिनधास्तपणा होता इथे. असो.

तात्यांचे वय एवढे कमी असेल ह्याची कल्पना नव्हती. त्यांच्या आईंबद्दल वाचून तर दु:खाला काळजीची किनार लागली. (त्यांच्यासाठी काही आर्थिक मदत गोळा होत असेल तर नक्की आवडेल भर घालायला.)

तात्यांना श्रद्धांजली .
————-
जो भी था जैसे भी था , तात्या शख्स दिल का अमीर था !
17 May 2019 – 1:08 pm | वाहीदा
मैं क्या कई लोग तात्या को रुबरु जानते थे ..उनसे कई बार मुलाकात भी हुई २००८ – २००९ के दरमीयान !वोह दौर हि कुछ और था नायाब दौर ! तात्याके वजह से कईयोंके कलम, तीर – कमान की तरह तरकश से बाहर निकाले जाते और लफ्जोंमे पिरोए जातें.. उन्होंने कईयों को लिखना सिखाया और कईयोंको अच्छा पढना | तात्याने लिखे लेख पढना एक मेजवानी हुआ करती .. तात्या मेजबान और हम सब मेहमान 🙂 और उन्ही के वजह से मिसलपाव याने आला दर्जे की मेजवानी !! कई लेखकों की एक से एक नायाब तहरीर हमें पढने मिलती और उससे भी ज्यादा उसपर आए हुए एक से एक कमेंट्स याने प्रतिसाद पढना याने Intellectual मेजवानी !
खैर, तात्या जिंदगी के उतार और चढाव बहोत देख चुके थे उस वजह से अज़ीम बनना मुश्किल था लेकीन अजी़ज़ जरुर थे.. उन्हें नसीब ने साथ नहीं दिया शायद उस वजह से दिलफरेबी भी हो गएं लेकीन दिलकश जरुर बनें रहे . माली हालात Financial Situation के वजह से गमगीन थे लेकीन फिर भी लिखते बहोत हि बढिया थे ..आला किस्म की उनकी कलम बहोत हि बढिया तरीके से चलती उस कलम को सलाम !! खुदा ने उन्हें कई फन (कलाओं) से नवाजा अगर वक्त साथ देता तो न जाने उडान भर के किस बुलंदी पे चले जाते | उन्होंने अपने अम्मी की काफी खिदमत की और जिसे अपने अम्मी के खिदमत का मौका मिला उसे खुदा ने और ज्यादा तकलीफ नहीं दी ..खुदा की मर्जी , अपने तरफ जल्द हि बुला लिया . अगर जिंदगी ने इतना बुरा बर्ताव न किया होता तो शायद Financial मामुले में दिल-फरेबी नहीं बनते |
अब खुदा से एक हि गुजारीश, ऐ खुदा, तात्याने जो कुछ जाने – अनजाने गुनाह किए उन सारे गुनाहोंको बक्श दें और उनके बुजुर्ग अम्मी को हौ हिम्मत दें के वोह इस गम बर्दाश्त कर सकें आमीन !! Allah Does not Burden a Soul with more than it can bear : Al-Quran 2:286
अल्लाह, तुम तो गफ्फुरो रहीम हो . तात्या की रुहपर रहमत नाजील फरमा , उनकी रुह को सुकून दें ! अल्लाह उनकी बुजुर्ग अम्मी जो अब भी इस दुनिया में है उनकी हिफाजत फरमा . आमीन !!
~ तात्या के खातीर १० साल बाद मिसलपाव पे कदम रखनेवाली ‘वाहीदा’
(विजू भाऊ तुम्हारे लिए वही प्रतिसाद यहां पर भी लिख रही हुं .. अब कलम टुटती हुई सी लग रही है जो लिखता था वोह चला गया …)

मिसलपाव के उस खुशनुमा माहौल की ताबीर को सलाम !
17 May 2019 – 1:17 pm | वाहीदा
उस खुशनुमा माहौल को सलाम ! उस खुशनुमा नूर की शुरुवात जिसने की उनकी रुह को , तात्या की रुह को सलाम !!
उनकी रुह फरेबी नहीं थी वोह बेचारे वक्त के मारे थे. अगर वक्त ने सही वक्तपे करवट ली होती तो वोह दौर आज भी बरकरार होता.
खैर अब जो भी था जैसा भी था तात्या शख्स दिल का अमीर था यह बात तो हम नहीं नकार सकतें | उन्ही के वजह से हमारी कई आला writer हस्तीयों के articles से मुलाकात हो पायी जैसे के आप , रामदास काका , प्रभूसर , बिपीन कार्यकर्ते, पिवळा डैंबिस , प्राजू, राज जैन , राजेंद्र बापट कितनोंकी किताबें छपी और कितनोंकी सोशल मिडीयापे एक नई पहेचान बन के उभरें. कितने तो आजभी यु-टुब्स पे एक नए इतमाद confidence से घुम रहे हैं ..यह बिल्कुल तात्या की और मिसलपाव कि हि देन हैं. we can never forget what Tatya and ‘Misalpav’ has given all of us indirectly.
~ वाहीदा
—–
अरेरे
17 May 2019 – 1:22 pm | टीपीके
फारच वाईट झाले.
२००८ ला मी भारताबाहेर गेलो. दिवाळी मध्ये मटा वाचताना ऑनलाईन दिवाळी अंकांचा लेख वाचनात आला, त्यात मराठी आंतरजाल याची ओळख झाली. मला वाटते पहिल्याच वर्षी मिपाने दिवाळी अंक काढला होता.
पहिली काही वर्षे तात्यांचा वावर जबरजस्त होता, त्यांचे लिखाण, प्रतिक्रिया , व्यक्त होणे जानवण्या इतके मोकळे होते, आणि विषयांची व्याप्ती तर फार होती. मला वाटते रामदास यांच्या नंतर इतके अनुभव असणारे मराठी आंतरजालावर फार कमी लोक असतील.
झाले ते वाईट झाले, तात्यांना श्रद्धांजली
———–
रंगपेटी
17 May 2019 – 10:38 pm | vcdatrange
फेसबुकवर सुपर अॅक्टीव असणार्‍या अपेक्षित मंडळींचे तात्यावरचे मृत्युलेख वाचुन आठवण झाली ती अश्याच एका शापित गंधर्वाची.
संगमनेरातल्या नव्याने वयात येवु घातलेल्या सर्वांना जणु चंद्रशेखर चौकात हजेरी लावल्याशिवाय मिसरुड फुटत नाही , याकारणे आमची पहिली ओळख झाली. .इनमिन काही महिने सुरु झालेल्या आयुर्वेद कॉलेजला अॅडमिशन घेवुन संगमनेरला आला होता. पण त्या थोड्या काळातही तो लक्षात राहिला. पुण्यात शिकायला आल्यावर हा आमचा सिनियर. सु शिच्या दुनियादारीचा अंमल डोक्यात होताचं, त्यात नेमकं सदाशिवातच वर्दळ असल्याने टुकारगिरी या समवाय संबंधाने आमचं लगेचच सूत जुळलं. हडपसरहुन जीप घेवुन यायचा हा. या गाडीतल्या टेपरेकॉर्डरवर मल्लिका शेखचं ‘ तू तलम अग्निचं पातं’ हजार वेळा तरी ऐकलं असेल. . जे काही करायचा ते जीव ओतुन. . आमच्या क्लासचे सर्वजण भर पावसात भुशी डॅमला गेलो होतो. हा आमच्या आधी मोटारसायकलवर तिथे हजर. . .

मध्येच अभ्यासाचं भूत संचारलं , मग आयुर्वेदाचा अभ्यास , मास्तरशी घसट , तीही इतकी मास्तरच्या नव्या कोर्‍या आयकॉनची चावी याच्याकडेच असायची. . . मग अध्यात्म . . . वारी . . सगळं सगळं.

खुनशीवर सदा शिवातच भलं थोरलं चकाचक क्लिनिक टाकलं. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणार्‍या क्लिनिकल मिटिंगला मान्यवर लेक्चरर म्हणून शेवटचा कधीतरी भेटला. .

अन् मग अदृश्य झाला. . कायमचा।
———–
चान्स कायमचाच हुकला रे!
18 May 2019 – 7:16 pm | सुनील
त्याला दोन गोष्टींचा फार शौक! एक म्हणजे गाणे आणि दुसरे खाणे!!

हे दोन्ही शौक पूर्ण करणारे शहर म्हणजे लखनौ. त्याचे आवडते. लखनौच्या रसभरीत आठवणी त्याच्याच तोंडून ऐकाव्यात. अशीच लखनौची एक खासियत म्हणजे हलीम!

दहा वर्षे झाली ह्या गोष्टीला आता.

एकदा घरी हलीम करण्याचा घाट घातला होता. आणि अगदी योगायोगाने म्हणा वा अन्य काही, पण तात्या घरी आला. ग्लेन कुळातील कुठलीशी स्कॉच घरी होतीच. आग्रह झाला.

परंतु, हलीम हा अगदी निगुतीने करण्याचा पदार्थ! तिथे घाई-गडबड करून चालत नाही. पदार्थच बिघडतो. आणि इथे त्याला फार काळ थांबता येणार नव्हते. जाणे भागच होते. आणि तसा तो निघालादेखिल. पण, एकदा अगदी ठरवून, हलीम-स्कॉचचा बेत करायचा, हे पक्के ठरवूनच!

दुसर्‍या दिवशी मिपावर फोटो चढवला आणि त्याची प्रतिक्रिया आली – अरे, कालचा चान्स हुकला रे!

दहा वर्षे झाली. तो चान्स नंतर कधी आला नाही आणि आता तर येणारही नाही!!!
——–
तात्या गेला!
19 May 2019 – 7:59 am | चतुरंग
परवा बातमी ऐकून धक्का बसला. मनस्वी, हरहुन्नरी आणि बेधडक तात्याची आणि माझी वैयक्तिक भेट कधी झाली नाही. फोनवरती दोन चारदा बोलणे झाले तेवढेच.
जालावरती मराठीतून मुक्त विचार मांडता यावेत या एका बंडखोर विचारातून आणि जिद्दीतून मिसळपाव संकेतस्थळाची उभारणी तात्याने केली हे त्याचे सर्वात मोठे काम असावे आणि याचसाठी तो कायम स्मरणात राहील. तात्याला असे अकाली मरण यायला नको होते अशी चुटपुट लागून राहिली आहे.
मराठी संकेतस्थळांच्या इतिहासात मिसळपावची झणझणीत तर्री देणार्‍या तात्याला मनःपूर्वक श्रद्धांजली! __/\__
-चतुरंग
————-
माझ्या आठवणीतला तात्या

सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
17 May 2019 – 10:46 pm
“आम्ही तात्याला पहिला नाही”अशा काही प्रतिक्रिया पाहिल्या आणि वाटलं, तात्याचे चार फोटू टाकावेत.

मात्र जे फोटो डोळ्यापुढे होते, ते संगणकात नव्हते हे जाणवले आणि स्व्तःवरच चरफडलो.
२००५ च्या सुमारास शिवाजी पार्कवर भरलेल्या पहिल्या वहिल्या कट्ट्यात टिपलेले “असा घ्यायचा शास्त्रिय संगिताचा आस्वाद”यावर तात्या रंगात येऊन बोलत असतानाचे फोटो…..
मधे एकदा अचानक पुण्याला जायची लहर आली. मी, तात्या, जयन्तराव कुलकर्णी, बहुधा माधव कुलकर्णी पण होते. काही पुणेकर मंडळी थेट तिथेच मैफिलीत सामिल झाली, रात्री बरोबर मैफल रंगत गेली. गप्पा रंगत गेल्या, मध्यरात्रीनंतर डावा हात कानावर घेऊन उजवा हात वर करत यमन गाताना टिपलेला तात्याचा फोटो आणि तात्याचा फोटो मोबाईलवर टिपत असताना काढलेला पेठकर साहेबांचा फोटो

तात्यानच गोळा केलेल्यांत सामावून रॉयल चॅलेंज मध्ये जमलेल्या धमाल गप्पांचा फोटो

बदललेले संगणक, बॅक अप घेताना गोची होऊन अनेक फोटो गेले. अखेर शोधता शोधता एका ठाणे कट्ट्याचे फोटो सापडले. मोठा जोरदार कट्टा झाला होता. तात्या, जयन्तराव कुलकर्णी, माधव कुलकर्णी, अत्यानंद, कुमार जावडेकर, अजब, शंतनु, केशव सुमार, नरेन्द्र गोळे, आनंद घारे, डॉ विलास पवार, डॉ मिलिंद फणसे, छाया राजे, चित्तरंजन भट या व अशा अनेक थोरा मोठ्यांनी हजेरी लावली होती. त्या वेळचे हे फोटो (त्यातला एक फोटो खाली दिला आहे.)

तात्या ७

तात्याचा आनंदी चेहरा आणि आग्रही आवाज, बोलण्यातली लगबग अजूनही आठवते. माझ्यावर तात्याचा का कुणास टाऊक पण जीव होता. एकदा रात्री रामदासांचा’फोन, ‘साक्षी, उत्सवला बसलोय तात्या आठवण काढतोय, पाठोपाठ तात्याचा आवाज, अरे बाबा ये लवकर. ‘तात्या, अरे आता तुमचा कार्यक्रम संपत आला असेल’माझी एक शंका. लगेच उत्तर ‘अरे, नाही बाबा तू ये, आम्ही आहोत’. आता हजेरी लावण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. तिथे पोचताच तात्याच्या चेहर्‍यावर दिसलेला आनंद डोळ्यापुढे आहे.

‘आयला झक मारली आणि पिऊन स्कूटर चालवली. ***** नेमका पकड्लो गेलो, *** ऐकायला तयार नाहीत रे, साल्यांनी रात्रभर पोलिस स्टेशनला रखडवलं, सकाळी कोर्टात हजर केलं, साला ******* एकदाचा जज ‘कबूल’म्हणून दंड भरून सुटलो. आता कानाला खडा, पिऊन गाडीला हात लावणार नाही असं साभिनय सांगणार्‍या तात्या.

एक दिवस अचानक कचेरीत तात्याचा फोन, ‘अरे साक्षी आपला नंदन आलाय, आत्ता त्याला घेऊन मामलेदारला आलोय’

‘मनोगत’चं गंभीर वातावरण न भावलेल्या तात्याने एक दिवस मिपा चालू केलं. काही कारणास्तव मी तेव्हा सदस्यत्व घेतलं नव्हतं. आणि एक दिवस तात्याचा रात्री फोन, ‘अरे हे काय रे? तू माझा गाववाला आणि मिपावर नाहीस असं म्हणत माझी हजेरी. मी येतो म्हणालो. तात्यानं सांगितलं, तुझा आयडी राखून ठेवला आहे, पासवर्ड मेल केला आहे, दाखल हो. मी उलट फोन मारला, ‘तात्या, पासवर्ड ची गोची दिसते रे लॉग इन होत नाही. क्षणांत तात्याने उलट फोन केला, पासवर्ड चंद्रशेखर, आता सरळ दाखल हो. आणि नुसता येऊ नको, मला उद्या एक मस्त लेख हवा. मी सदस्य झालो आणि ‘माझी नवी मैत्रीण हा लेख टाकला. तेव्हा खुष झालेला तात्या

क्रांतिकारकांवरचा माझा एखादा लेख आवडल्यावर ‘मिपाला श्रीमंत करणारा’लेख असे तोंड्भरुन कौतुक करणारा तात्या.

मध्यंतरी बरच काही घडून गेलं. माझा मिपावरचा वावरही कमी झाला होता. मिपावर एकदा दाखल झाल्यावर बरीच गड्बड होऊन गेल्याचं वाचनात आलं. काही पत्ताच लागत नव्हता. मग काही ओळखीच्या सदस्यांकडून काही समजलं. त्यालाही अनेक दिवस झाले. अचानक एका दोन जानेवारीला तात्याची खूप आठवण झाली. मी, रामदास, संतोष आमची फोनाफोनी झाली. अखेर राम्दासांनी तात्याला राजी केलं. रात्री नऊच्या सुमारास मी, रामदास, संतोष (बहुतेक आणखी एकजण असावा, आता आठवत नाही) महेश लंच होम्वर जमलो. तात्याला वाढदिवसा निमित्त मच्छी खायला घालायची होती, दोन घोट घ्यायचे होते. तात्या येतो की नाही अशी धाकधुक होती. पण तो आला. सगळे जेवलो, तात्या अस्वस्थ होताअसं वाटलं आणि ते साहजिक होतं. सात आठ वर्षं झाली असावित या गोष्टिला. ती अखेरची भेट.

पुन्हा कधीही तात्या भेटला नाही आणि फोनही लागला नाही. परवा अचानक तात्या गेल्याचं समजलं. तात्याच्या सगळ्या गाठी भेटी डोळ्यापुढे उभ्या राहिल्या.
————–
मी कोंडून घेतलंय स्वतःला
18 May 2019 – 4:02 pm | खिलजि
मी कोंडून घेतलंय स्वतःला

जागा हळूहळू कमी होत चाललीय

एवढी कि आता फक्त तिथे कसाबसा उभा राहतोय

त्या एवढयाश्या जागेवरूनच अवतीभवती पाहतोय

मी आणि माझा मेंदू , मेंदू आणि मी

एक अविरत चाललेली लढाई

विचारांची त्सुनामी , भावनांचे वादळ

अवहेलनांचा पाऊस आणि बरेच काही

कुठेतरी दूर एक आशेचा किरण दिसतोय

इथे मात्र मिट्ट काळोख आणि त्या तेवढ्याच जागेवर उभा राहणारा मी

गुदमरतोय जीव माझा , पण मोकळीक कुठेच दिसत नाही

आधी मेंदूची लढाई सुरु होती

आता श्वासांच्या सैनिकांनी त्यामध्ये उडी घेतली

किती मोजू आणि किती घेऊ आणि का घेऊ ?

तरीही घेतोय , कारण …कारण…

माझ्या नाकाला ती सवय लागलीय

आणि त्या हळव्या हृदयालासुद्धा

ज्याला स्पंदनाशिवाय जगणे मान्यच नाही

एक फक्त एक जीवघेणी कळ

आणि हेलावून जाणारी , आरडाओरडा करणारी वृद्ध आई

बस्स …. मग मिट्ट काळोख आणि काळोख , दुसरं काही नाही …..

कुणी आहेत का मिपाकर , जे सांगू शकतील , त्यांच्या पश्चात त्यांच्या आईचे कसे काय होणार आहे . काही कुणी ठरवत असेल तर उत्तम . धागा काढून सहमती घ्यावी सर्वांची ..
————


मनोगतवरील सदस्यांची श्रद्धांजलि

तात्या अभ्यंकर यांचे निधन!
प्रेषक जयन्ता५२ (बुध., १५/०५/२०१९ – १३:०३)
फेसबुकवर तात्या अभ्यंकर यांचे आज निधन झाल्याची बातमी कळली.
नंतर इतर मित्रांकडूनही कळले. मटा मध्ये छोटीशी बातमी आल्याचे समजते.
अनेक आठवणींनी मन भरून आले आहे.
भावपूर्ण श्रध्दांजली!
जयन्ता५२

तात्या : प्रे. सन्जोप राव (गुरु., १६/०५/२०१९ – ०६:२२).
‘मनोगत’ च्या सुरवातीच्या काळात तात्याशी ओळख झाली. ते दिवस बरे होते. वादावादी, खडाजंगी चालत असे, पण एकूण मजा होती. तात्या एकदा एकटा आणि एकदा सर्किटला घेऊन असा माझ्या घरी आला होता. नंतर तो पिरंगुटचा प्रसिद्ध कट्टा झाला. त्यानंतर बरेच काही कडू गोड झाले.
आणि आज तो गेला.
अदिती, श्रावण मोडक आणि तात्या
आज उदास वाटते आहे.
इतकेच.

असेच काहीसे : प्रे. नंदन (शुक्र., १७/०५/२०१९ – १४:२९).
असेच म्हणतो. दहा-बारा वर्षांपूर्वीचे मनोगतावरचे ते स्नेही आणि काव्यशास्त्रविनोदचर्चांचे दिवस आठवले.

श्रद्धांजली : प्रे. अभिजित पापळकर (गुरु., १६/०५/२०१९ – १५:१९).
तात्या हे आनंदी व्यक्ती होते. त्यांचे संगीताचे ज्ञान खोल होते. त्यांना श्रद्धांजली.
अभिजित पापळकर

जालसम्राट : प्रे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (गुरु., १६/०५/२०१९ – १५:३३).
मनोगतमुळेच तात्याची ओळख झाली. मनोगतवर नवीन होतो तेव्हा तात्याने नेहमीच पाठराखण केली. तात्याचा लेखनाचा फ़्यान इथेच झालो. लेखन अनुमतीची प्रतीक्षा आणि शुद्लेखन इथे तेव्हा कौतुकाचे आणि वादाचे विषय होते. पुढे तात्यांचे बोट पकडून उपक्रमवर आणि मग मिपाच्या स्थापनेत सोबत होतो. मध्यात बरंच काही घडून गेलं, संवाद कमी होत गेला. मागील वर्षी जानेवारीत फुटकळ हाय हॅलो झालं. सर,कसे आहात ही शेवटची चौकशी. फेबुवर शिळोप्याच्या ओसरीवर ते प्रशासक होते. प्रशासक या शब्दावर मनोगतमुळेच प्रेम. असो.

मनोगतमुळे तात्याची ओळख झाली, आभार. तात्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

भावपूर्ण श्रद्धांजली : प्रे. रन्गा (शुक्र., १७/०५/२०१९ – ०१:३५).
तात्यांच्या लेखनाचा मी चाहता आहे व राहीन. मराठी आंतरजालावर तुलनेत उशिरा सक्रिय झाल्यामुळे तात्यांबरोबरचा संवाद जुजबी पातळीवर राहिला.

तात्यांच्या अकाली निधनाने मराठी आंतरजालावर न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

श्रद्धांजली : प्रे. कुमार जावडेकर (शनि., १८/०५/२०१९ – १३:१७).
खूप सुंदर आठवणी आहेत तात्यांच्या. त्यांचे प्रतिसाद अगदी मनमोकळे असायचे आणि त्यांतून त्यांचं ज्ञान, विशेषतः संगीतप्रेम दिसून यायचं.
शिवाजी पार्कला त्यांनी सुंदर महफिल रंगवली होती एका मनोगत कट्ट्यात.
भावपूर्ण श्रद्धांजली.
– कुमार

 


तात्यांचे काही व्हिडिओज आणि गाणी
15 May 2019 – 9:11 pm | मनो
तात्या ओळख
https://youtu.be/R0aRJcLp_Z4

यमनकल्याण
https://youtu.be/UYt5vnxQpHw

सागरा प्राण तळमळला
https://youtu.be/tG06flT0N_8

राग बिहाग
https://youtu.be/toWTWN-GO5o

सोन्याचा पिंजरा
https://youtu.be/eQ-m1NKVucg

दैवजात दुःखे भरता
https://youtu.be/CMh1YdWtibc

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो
————–

 

 

संत माळेतील मणी शेवटला… स्व.गदिमा

महाकवि  स्व.ग.दि.माडगूळकर यांचे नातू श्री.सुमित्र माडगूळकर यांनी गदिमांच्या पुण्यतिथीनिमित्य लिहिलेला लेख. यात गदिमांच्या आयुष्यामधील शेवटच्या दिवशी घडलेल्या घटनांचा वृत्तांत आहे.

———————————————————————————————————-

“संत माळेतील मणी शेवटला…
आज ओघळला एका एकी … “

………..सुमित्र माडगूळकर
रिक्षावाल्याने अंगात झटका आल्यासारखी एकदम रिक्षा बाजूला घेतली,आत बसलेल्या माय – लेकरा कडे बघून म्हणाला, “तुम्ही इथेच उतरा,मी या पुढे जाऊ शकत नाही “.समोर खूप गर्दी जमलेली होती.
माय – लेकराच्या तोंडावर प्रश्नचिन्ह पाहताच तो उत्तरला “समोर पहा,ती महाकवीची अंतिम महायात्रा चालू आहे,मला त्यात सामील व्हायचे आहे,तुम्हाला माहित नाही?,गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर यांचे काल निधन झाले !”.

आत बसलेल्या माय – लेकराच्या चेहऱ्यावरील राग,प्रश्नचिन्ह क्षणार्धात दूर झाले व नकळत आई उत्तरली “चल,आपणही पाच मिनिटे का होईना या अंतयात्रेत सामील होऊ,हीच या महाकवीला आपल्या कडून शेवटची श्रद्धांजली…. “.

१५ डिसेंबर १९७७ ची सकाळ असे अनेक जण त्या अंतिम महायात्रेत सामील झाले होते… आपणहून…त्यांचे बालपण ‘नाच रे मोरा’,’झुक झुक अगीनगाडी’ म्हणत फुलले होते,तरुणपण ‘माझा होशील का?’,’हृदयी प्रीत जागते’ ने रंगविले होते,’देव देव्हाऱ्यात नाही,’इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ वर त्यांचे मन भक्तीरसात न्हाऊन निघाले होते.आयुष्याच्या संध्याकाळी ‘या कातरवेळी पाहिजेस तू जवळी’ ने मनाला हुरहूर लावली होती,आयुष्यातील प्रत्येक दुःखाच्या क्षणी ‘दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ सारख्या गीतरामायणातील गीतांनी आधार दिला होता.शाळेच्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकात ‘मी सिंह पाहिला होता’,’औंधाचा राजा’,’आचंद्र सूर्य नांदो’,’शशांक मंजिरी’ सारख्या धडा-कविता मनाच्या कोपऱ्यात स्थान मिळवून होत्या ,नक्कीच वाचल्या होत्या.आज ते लाडके गदिमा शेवटच्या प्रवासाला निघाले होते … कोणाला दुःख झाले नसेल त्या दिवशी ?.

डिसेंबर च्या एका पहाटे गदिमा दरदरून घाम फुटून जागे झाले,त्यांना विचित्र स्वप्न पडले होते “माडगूळच्या दारावरील गणपती” व “पंचवटीचे तुळशी वृदांवन व त्याचा कट्टा” दुभंगलेला दिसला होता. ते खूप अस्वस्थ झाले,विद्याताईंनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण ते म्हणाले “तुझ्या व मुलांच्या मनाची तयारी कर. मी आता अनंताच्या प्रवासाला निघालेला प्रवासी आहे. माझ्या दिव्यातील तेल आता संपत आले आहे “. एका पहाटे त्यांना खूप थंडी वाजून आली विद्याताईंनी घाईने नुकत्याच एका खेड्यातल्या समारंभात भेट मिळालेली उबदार घोंगडी त्यांच्या अंगावर घातली,गदिमा खिन्नपणे हसून म्हणाले “अग आता नको,काही दिवसांनी ती उपयोगी येईल”.

१४ डिसेंबर १९७७,गदिमांची आई ‘बनुताई दिगंबर माडगूळकर’ यांचा आदर्श माता म्हणून सत्कार होणार होता,माडगूळहून गदिमांचे धाकटे बंधू श्यामकाका आले होते. गदिमांना रात्रभर झोप नव्हती,विद्याताईंकडे बघून नुसते केविलवाणे हासत होते… डोळ्यात कारुण्य दाटले होते … ,काहीतरी सांगायचे होते पण …

गदिमा आईला म्हणाले “आईसाहेब,आज तुमचा सत्कार आहे. विसरू नका. लवकर आवरून ठेवा.तुम्हाला न्यायला गाडी येईल.”

आई म्हणाली “तुम्ही नाही का येणार? “,आपल्या लाडक्या लेकाला बनुताई आदराने आहो जाहोच म्हणत असत. ‘येणार तर,पण आधी तुम्हाला गेले पाहिजे,आम्ही येतोच मागोमाग’. थोड्या वेळाने गदिमा व विद्याताई नातू सुमित्रला घेऊन बकुळीच्या पारावार जाऊन बसले. तितकेच गदिमा बाललीला पाहण्यात रमून गेले होते. तसा बराच वेळ गेला .. आत आल्यावर गदिमा विद्याताईंना म्हणाले “मंदे,तू आज मला तुझ्या हाताने आंघोळ घालशील का?” ,अंगात ताप होता विद्याताईंनी अंग गरम पाण्याने पुसून घेतले. कॉटवर स्वच्छ पांढरी चादर घातली.

”मंदे,आज मस्त वांगी भात आणि साजूक तुपातला शिरा कर,तोंडाची चवच गेली आहे… “,विद्याताईंनी त्यांच्या आवडीचे जेवण केले गदिमा मनसोक्त जेवले त्या दिवशी. संध्याकाळी कार्यक्रमाला जाण्यासाठी विद्याताईंनी सर्व कपडे तयार करून ठेवले होते,रेशमी झब्बा,जाकीट,धोतर,सेंट वाला रुमाल. गदिमा म्हणाले “मंदे,आता उशीर करू नकोस,लवकर आटप”. विद्याताई हसून म्हणाल्या “आत्ता आवरते बघा”. गदिमा बाहेरच्या निळ्या कोचावर जाऊन बसले,तोड्या वेळाने अचानक त्यांचा मोठा आवाज आला “मंदे,अग लवकर इकडे ये,मला बघ कसं होतंय,खूप थंडी वाजते आहे बघ .. “. विद्याताई त्यांना लगबगीने आत खोलीत घेऊन आल्या .. अंगावर दोन तीन रग घातले पण त्यांची थंडी कमी होईना.दात एकमेकांवर आपटून जोरात आवाज येत होता.

विद्याताईंनी घाई घाईने मुलांना,सुनांना बोलवून घेतले,माळीबुवाला पाठवून डॉ.मेहतांना बोलवून घेतले. डॉ.मेहता म्हणाले “कविराज,फटकन एक इंजेक्शन घेऊन येतो,ते घ्या व मस्त कार्यक्रमाला जा”. मेहता समोरच असलेल्या दवाखान्यात निघून गेले.गदिमांना रगात दरदरून घाम फुटला होता. इकडे छोटा सुमित्र रडवेला चेहरा करून “पपाआजोबा बोलत का नाहीत’ म्हणून एकटक बघत राहिला होता. त्याला कळत नव्हते “सर्वजण का जमलेत ?,ताईआजी का घाबरली आहे ?,डॉक्टर काय करत आहेत ? “.

इकडे गदिमांचे पाय थंड पडले होते,विद्याताई व सुना त्यांच्या पायाला ब्रँडी चोळत होत्या. गदिमा म्हणाले “मला काही करू नका”. तितक्यात डॉ.मेहता परत आले त्यांनी इंजेक्शन ची तयारी सुरु केली. तितक्यात गदिमांनी गजानन महाराजांना (शिवपुरी,अक्कलकोट) जोरात हाक मारली “महाराज,मला आता सोडवा”. त्याचं बोलणं एकदम बंद पडले,जीभ तोंडात हलू लागली. डॉ. मेहतांनी इंजेक्शन दिले पण ते शिरेत न जाता तसेच बाहेर आले.अखेर संध्याकाळी पावणेसात च्या सुमारास गदिमांची प्राणज्योत मालवली.

सकाळचाच प्रसंग बाथरूमला जाताना गदिमांनी विद्याताईंचा आधारासाठी दिलेला मदतीचा हात झिडकारून टाकला होता .. १९४२ साली प्रेमाने हातात घेतलेला त्यांचा हात आता कायमचाच सुटलेला होता … बुधवार १४ डिसेंबर १९७७ ची ती भीषण संध्याकाळ,दोन सूर्य अस्ताला गेले.मृत्यूच्या पराभवाचा दिवस,कारण त्याच्या हाती लागला तो केवळ गदिमांचा नश्वर देह.

फर्ग्युसन रस्त्यावरील उद्योगपती बाबुराव पारखे यांच्या विद्याविलास या बंगल्यात आदर्शमाता पुरस्कार सोहळा चालू होता बनुताईचां प.महादेवशास्त्री जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला,तेव्हड्यात गदिमांची बातमी येऊन पोहचली,बनुताईनसमोर ही बातमी सांगता येत नव्हती पण त्या महाराजांचे दर्शन घेतल्या शिवाय परत पंचवटीत जाण्यास तयार नव्हत्या त्यासाठी अडून बसल्या,शेवटी दर्शन घेऊन त्या निघाल्या,मग कार्यक्रमात प.महादेवशास्त्री जोशी यांनी गदिमांच्या निधनाची वार्ता सांगितली,सगळीकडे शोकछाया पसरली.इकडे पंचवटीत त्या सत्काराच्या हारतुऱ्यांसकट पोहोचल्या,आपल्या लाडक्या लेकाची अवस्था पाहून त्यांचे काय झाले असेल,एकीकडे आई आदर्श माता पुरस्कार स्वीकारीत होती व एकीकडे मुलगा अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता,सगळाच दैवदुर्विलास!.

पंचवटीच्या हॉल मध्ये पांढऱ्या चादरीखाली काहीतरी झाकलेले होते,माझे लाडके आजोबा कुठेच दिसत नव्हते,अगदी त्याच्यां निळ्या कोचावर सुद्धा,घरातले सगळे रडत होते,प्रचंड माणसे जमली होती,सगळे का रडत आहेत मला काहीच कळत नव्हते,त्यांना हसवावे म्हणून मी जास्तच चेकाळलो होता,कधीनव्हे ते वेड्या सारखा इकडून तिकडून पळत होता. शेवटी माझी रवानगी वरच्या मजल्यावर झाली.

माझा बालहट्ट आता पुरविला जाणार नव्हता,एक महाकवी आपल्या शेवटच्या प्रवासाला निघालेला होता,माझ्या लाडक्या आजोबांचा हात माझ्या हातातून कायमचा सुटलेला होता.

१५ डिसेंबर १९७७,प्रचंड अंतयात्रा निघाली होती,पुणे मुंबई रस्त्याने जाणारी अंतयात्रा वाकडेवाडीच्या लोकांच्या हट्टाने वाकडेवाडीतून वळविण्यात आली,जेव्हा अंतयात्रा डेक्कन वर पोहोचली तेव्हा तिचे दुसरे टोक बालगंधर्व चौकात होते.इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित बघितली असेल,संगीतकार राम कदम “अण्णा अण्णा” म्हणत आक्रोशाने धावत होते… ,महाराष्ट्र शासनाच्या वतीने शरद पवार सामील होते.स्त्री-पुरुष,वृध्द,राजकारणी,कलावंत,अगदी दप्तर-पुस्तके घेतलेल्या लहान मुलांपासून सर्वजण त्यात सामील झाले होते.

सगळ्यांच्या मुखात आज एकच ओळी होत्या ….
“विठ्ठलाच्या पायी थरारली वीट ….. ”
“संत माळेतील मणी शेवटला…आज ओघळला एका एकी … ”

अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नाहीत कारण गदिमा हे त्यांना त्यांच्या घरातलेच एक वाटत होते.गदिमांना केवळ ५८ वर्षाचे आयुष्य लाभले तरी ते आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून,साहित्यातून,चित्रपटातून,गीतरामायणातून मराठी रसिकांच्या ह्रदयात विराजमान आहेत.

… सुमित्र माडगूळकर

WhatsApp वरून साभार.

आचार्य अत्रे यांनी डॉ.आंबेडकरांवर लिहिलेला अग्रलेख

फेसबुकरील माझे मित्र श्री. थोरात यांच्या भिंतीवरून साभार


Ramesh Rangrao Thorat

—————————

—-: दैनिक मराठा आचार्य अत्रे:—–

गुरुवार, दिनांक 6 डिसेंबर 1956, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली. अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजली पर भाषण फक्त एका व्यक्तीचं झालं. ते होते आचार्य अत्रे…..!!!

अत्र्यांचं ते भाषण इतिहासात अजरामर झालं आहे. त्यानंतर अत्र्यांनी ‘मराठा’ तून सतत 12 दिवस बाबांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर अग्रलेख लिहिले. त्यातील हा ‘7 डिसेंबरचा पहिला अग्रलेख’.

“सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतातल्या अस्पृश्यांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळ्या दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जगभर आकाशपाताळ एक केले असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते.”

“आंबेडकर म्हणजे बंड-मूर्तिमंत बंड. त्यांच्या कणाकणांतून बंड थैमान घालत होते.

आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय.

आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली ‘भीमा’ची गदा होय.

आंबे़डकर म्हणजे जातिभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय.

आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघनखे होय.

आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यां च्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक यु्द्धच होय.”

“महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुद्ध” हे तीन गुरूच मुळी आंबेडकरांनी असे केले, की ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले.

“महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुद्ध” हे तीन गुरूच मुळी आंबेडकरांनी असे केले, की ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले.

… हालअपेष्टा आणि छळ ह्यांचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा “बंडखोर गुरूंचे” आंबेडकर हे सच्चे चेले होते.”

“जुलूम आणि अन्याय म्हटला की, आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्याधमन्यांमधून त्यांचे रक्त उसळ्या मारू लागे. म्हणूनच लोकसभेत पंडित नेहरूंनी बोलून दाखविल्याप्रमाणे हिंदू समाजाच्या प्रत्येक जुलुमाविरुद्ध पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.”

“हिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण त्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलुमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशात नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन, पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती आणि त्यांनी ती शेवटपर्यंत खरी करून दाखवली.”

“जो तुमचा धर्म मला कुत्र्या-मांजरा पेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही राहणार नाही, असे कोट्यवधी हिंदुधर्मीयांना कित्येक वर्षांपासून ते बजावत होते. माणसासारख्या माणसांना ‘अस्पृश्य’ मानणारी ती तुमची ‘मनुस्मृती’ मी जाळून टाकणार, असे त्यांनी या सनातनी हिंदूंना छातीवर हात मारून सांगितले होते. ह्यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांही हिंदुधर्माचे भयंकर दुष्मन आहेत.”

“धर्मांतराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी ह्यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की, आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील.!”

“आंबेडकरांची धर्मांतरांची घोषणा ही हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वर्ण्याने हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे, असे आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वर्ण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा, असे टाहो फोडून ते सांगत होते.”

“धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, ‘हिंदू धर्मावर’ मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षाच्या आत मी ह्या देशाचे वाटोळे करून टाकले असते. पण ह्या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही ..! ”

“हिंदू धर्माप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस ह्यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत. त्यामुळे जनाब जीनांप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करून हिंदी स्वातंत्र्याचा मार्ग ते रोखून धरीत आहेत, अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली.”

“अस्पृश्यता निवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भूतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पाहत असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध गांधीजींनी जसे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुद्ध का बंड पुकारू नये, असा आंबेडकरांचा त्यांना सवाल होता. अस्पृश्यता निवारणाबाबत गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होता. म्हणून साम्राज्यशाही विरोधी पातळीवर काँग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही.”

तथापि, गांधीजींबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असतानाही केवळ त्यांचे प्राण वाचवण्यासाठी म्हणून “अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघा” ची आपली मागणी त्यांनी मागे घेतली आणि ‘पुणे करारा’ वर सही केली.”

“… ‘गोडशासारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा’ ‘आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा’ ह्याचा अर्थ हिंदू समाजाला अद्याप समजू नये याचे आम्हाला दु:ख होते.”

‘पुणे करारा’ वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले, पण स्वत:चे आणि अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण, ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबेडकरांनी ‘पुणे करारा’ वर सही केली, तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा काँग्रेसने मात्र आंबेडकरांना दाखविला नाही. आपल्याला धार्जिण्या असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाताशी धरून काँग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले.”

“आंबेडकर त्याबद्दल नेहमी विषादाने म्हणत की, स्पृश्य हिंदूंच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकीय जीवन गांधीजी आणि काँग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!”

“नऊ कोटी मुसलमानांना खूष करण्यासाठी काँग्रेसने ह्या सुवर्णभूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलीकडे काँग्रेसने काहीही केले नाही. असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच ‘घटना समितीत’ अखंड हिंदुस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, ‘जगातील कोणतीही सत्ता ह्या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे, असे आज ना उद्या मुसलमानांना कळून आल्यावाचून राहणार नाही!’ आंबेडकरांचे हे उदारपण हा त्यांच्या देदीप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय.”

काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूंच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली.

‘मनुस्मृती जाळा’ म्हणून सांगणारे आंबेडकर ‘भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार’ व्हावेत हा काय योगायोग आहे?

“घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी ‘हिंदू कोड’ तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या. आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावाचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही.”

“आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कोणी घडवून आणली नाही ती घडून आली असती.”

“पण, दुर्दैव भारताचे ..! दुर्भाग्य हिंदू समाजाचे ..! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वत:चा घात करून घेतला. राज्यकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदू समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वत:चा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीन-दीन अनुयायांचा उद्धार करण्यासाठी त्यांना मानवजातीला ‘समतेचा, दयेचा आणि शांतीचा’ संदेश देणाऱ्या त्या ‘परम कारुणिक बुद्धाला’ शरण जाण्यावाचून गत्यंतरच उरले नाही.

“आंबेडकरांच्या विव्दत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात – नव्हे भारतात या क्षणी नव्हता. ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यावचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हत.”

“महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून तो घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता, की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मावर आत्यंतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहीत होती. आंबेडकर कितीही तर्क-कर्कश आणि बुद्धिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. शुचिर्भूत धार्मिक वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे, असे त्यांचे ठाम मत होते. धर्मावरील त्यांच्या गाढ श्रद्धेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिले.”

“त्यांना कोणतेही आणि कसलेही व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे, असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची देखील प्राज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सदैव संचारलेले असे.”

“अनेक वर्षाच्या आध्यात्मिक चिंतनाने आणि परिशीलनाने शेवटी आंबेडकर ‘भगवान बुद्धा’ च्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यांनाच नव्हे, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच ता. १४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुद्ध धर्माची जेव्हा दीक्षा दिली तेव्हा ‘साऱ्या भारताला मी बौद्ध करीन’ अशी गगनभेदी सिंहगर्जना त्यांना केली.”

“मुंबईतील दहा लाख अस्पृश्यांना थोड्याच दिवसांनी ते बुद्ध धर्माची दिक्षा देणार होते. पण दृष्टांत काही निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलुमाशी सबंध जगभर झगडून झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते, दुर्बल झाले होते. विश्रांतीसाठी त्यांच्या शरीरातील कणन् कण आसुसला होता. भगवान बुद्धाच्या करुणेचा जेव्हा त्यांना अखेर आसरा मिळाला, तेव्हा त्यांना अंत:करणात जाळणारा वन्ही शीत झाला. आपल्या कोट्यवधी अनुयायांना आता आपण उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतारकार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनाने त्यांनी आपली प्राणज्योती निर्वाणात कधी विलीन करून टाकली, त्याची जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यंत गंधवार्तासुद्धा लागली नाही.”

‘मी हिंदू धर्मात जन्माला आलो त्याला माझा नाईलाज आहे; पण मी हिंदू धर्मात कदापि मरणार नाही!’ ही आंबेडकरांची घोषणा हिंदू धर्माविरुद्ध रागाची नव्हती. सुडाची नव्हती. झगडा करून असहाय झालेल्या विनम्र आणि श्रद्धाळू साधकाचे ते तळमळीचे उद्धार होते.

“आंबेडकरांचे चरित्र ही एका शूर आणि बंडखोर समाजसुधारकाची वीरकथा आहे. शोककथा आहे. गरिबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी. आणि आंबेडकरांचा ज्यांनी जन्मभर छळ आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यांनी आणि सनातनी हिंदूंनी त्यांची ही शोककथा वाचून आता अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसजसा अधिक प्रकाश पडेल, तसतसे अलौकिकत्व प्रकट होईल. आणि आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्धारकर्तेच होते, अशी भारताची खात्री पटेल. भारतीय जीवनात जे जे म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान प्रणेते होते.”

“महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे ते कोणाच्या बापालाही तोडता येणार नाही, असे ते म्हणत. कोणकोणते गुण आता आठवायचे आणि त्यांच्या कोणकोणत्या उद्धारांचे स्मरण करावयाचे? सात कोटी अस्पृश्यांच्या डोक्यावरचे तर आता आभाळच फाटले आहे. भगवान बुद्धांखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळ्यांतले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावे की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे.”

“त्यांनी जो मार्ग आखला आणि जो प्रकाश दाखवला त्याच्याच अनुरोधाने जाऊन त्यांच्या कोट्यवधी अनुयायांनी आपला उद्धार करून घ्यावा. आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायाचे हृदय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विद्वत्ता, त्यांचा त्याग, त्यांचे चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपल्या जीवनात निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उद्धार होईल. तीन कोटी मराठी जनतेच्या वतीने व्याकूळ हृदयाने आणि अश्रूपूर्ण नेत्रांनी आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो.”

👉(मराठा : 7-12-1956) … editorial written by p k atre in maratha news paper on 7th december 1956.

पं.रामभाऊ मराठे आणि मंदारमाला नाटक

४ ऑक्टोबर २०१८ रोजी पं.राम मराठे यांची २९ वी पुण्यतिथी होऊन गेली. त्यांच्या स्मृतीला वंदन. त्या निमित्याने मला वॉट्सॅपवर मिळालेले त्यंची आठवण जागी ठेवणारे दोन लेख.
🙏🙏
पं. रामभाऊंबद्दल त्यांचे शिष्य पं. उल्हास कशाळकर यांनी सुंदर लेख लिहिला आहे. त्यातील काही संक्षिप्त भाग.

“पं. रामभाऊंची मैफल हा एक बहारदार अनुभव असे. घरंदाज गायकीचे संस्कार, स्वत:चा विचार आणि रसिकांना भरभरून देण्याची त्यांची इच्छा यामुळे त्यांच्या बैठकी दीर्घकाळ लक्षात राहत असत. मैफल साधारणत: रात्री १० वाजता सुरू होई. त्यांच्या रागाचा अंदाज बांधणे अशक्य असे. कधी अगदी प्रचलित राग छायानट, शुद्धकल्याण, कामोद तर कधी बिहागडा, नटबिहाग, नटकेदार सारख्या अप्रचलित रागाने सुरुवात असे. त्यानंतर ठुमरी बरेचदा मा. कृष्णरावांच्या वळणाची, त्यानंतर नाट्यगीत हे सर्वसाधारणपणे दीड ते दोन तासाचं झाल्यानंतर पहिले मध्यंतर होत असे. मध्यंतर चांगले अर्धा-पाऊण तास झाल्यावर कधी बागेश्री, कधी कानड्याचे नायकी किंवा कौशीकानडा असे राग. त्यानंतर रसिकांना वारंवार त्यांच्याकडून ऐकावेसे वाटणारे जोडराग, यात बसंतबहार, बसंती केदार, पंचम मालकंस असे काही. यानंतर आडाणा, सोहनीसारखे उत्तरांगातल्या रागांच्या १-२ बंदिशी किंवा एखादे नाट्यपद, भजन वगैरे. इथे दुसरे मध्यंतर. यानंतर खरे म्हणजे भैरवीच हवी कारण एव्हाना रसिक स्वरगंगेत अगदी चिंब भिजून जायचे, पण या नंतर थोडा चहा आणि भैरवी. ती जवळजवळ ४० ते ४५ मिनिटं! भैरवीमधील कितीतरी वेगवेगळ्या मूडच्या बंदिशींचा संग्रह रामभाऊंकडे होता. हे सर्व होईपर्यंत सकाळचे साडेचार आणि पाच वाजलेले असायचे.”

“रामभाऊंकडे रागांचा आणि बंदिशींचा प्रचंड खजिना होता. एकप्रकारे त्यांना “कोठीवाले’ गवई म्हणता येईल. तरीपण त्यांचे म्हणून एक वैशिष्टय म्हणावे असे म्हणजे जोडराग. त्यांना जोडरागाचे बादशहा म्हणावे इतके विविध प्रचलित अप्रचलित जोडराग रामभाऊ मैफलीत सादर करत. गळ्यावरील प्रचंड हुकूमत, रागाचा परिणाम करणारी विशिष्ट स्वरसंगती आणि अमर्याद कल्पनाशक्ती या जोरावर त्यांनी आपले जोडराग गायनाचे एक वेगळेच तंत्र विकसित केले. जौनभैरव, भैरवभटियार, जीवनकली, हिंडोलबहार, वसंतबहार, कौशीकानडा, बसंतीकेदार खटाचे वेगवेगळे प्रकार, जयंतमल्हार, पंचममालकंस, हिंडोली वगैरे कितीतरी. एखाद्या स्वराला केवळ एका वेगळ्या रागातील स्वराचा कण देऊन देखील त्या रागाची छाया निर्माण करून परत फिरून मूळ रागाचे दर्शन देण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती.”
————————————————–

मंदारमाला

———————————-
मंदारमाला हे साठच्या दशकात प्रचंड गाजलेले संगीत नाटक.  रामभाऊ तेव्हा ऐन भरात होते. त्यांचे आवेशयुक्त गाणे व अभिनय आजही स्मृतिपटलावर कोरला गेलेला आहे !
वेलणकरांनी मंदारमालाबद्दल लिहिलेला सुंदर लेख
नाटक मंदारमाला

२६ मार्च १९६३ साली आजच्या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते… हरी मेरो जीवन प्राण आधार… अशा “मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते.
“मंदारमाला‘चे १९६३च्या गुढीपाडव्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ‘भारत नाट्य प्रबोधन संघा’ने हे नाटक परत रंगभूमीवर आणले. दादर येथील रंगमंदिरात नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. पहिले शंभर प्रयोग ‘रंगमंदिर’तर्फे झाल्यावर नाट्यनिर्माते राजाराम शिंदे यांच्या ‘नाट्यमंदार’ने हे नाटक चालवायला घेतले आणि ४०० प्रयोगांचा पल्ला कधी ओलांडला हे रसिकांनाही समजले नाही. संपूर्ण देशभर प्रयोग झाले. अडीच-अडीच महिने सलग दौरे होत. कधीकधी नाटकाचे दिवसाला तीन-तीन प्रयोग होत. या नाटकाचे असे एकूण १२००हून अधिक हाऊसफुल्ल प्रयोग झाले. या नाटकाद्वारे विद्याधर गोखले यांनी मोठ्या आणि आळवून आळवून म्हणावयाच्या नाट्यपदांच्या परंपरेला छेद दिला. लागोपाठ पदे येणार नाहीत अशी नाटकाची सुरेख मांडणी त्यांनी केली.
चटपटीत संवादांदरम्यान ही रसाळ पदे गुंफली होती. पंडित मा.राम मराठे आणि मा.प्रसाद सावकार यांच्यातील ‘बसंत की बहार आयी’ ही अजरामर जुगलबंदी ऐकण्याला प्रेक्षक उत्सुक असत. त्यासाठी नाटक साडेचार तास चालले तरी ते चुळबूळ करीत नसत.
‘संगीत मंदारमाला’चं कथानक सतराव्या-अठराव्या शतकात राजपुतान्यातील असल्याचे गृहीत धरण्यात आलं आहे. आपल्याकडे जे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक, बंदीशकार, नायक, विद्वान पंडित होऊन गेले त्यांच्यापैकीच काहींच्या जीवनातील मोजक्या प्रसंगांना विद्याधर गोखले कल्पनेची अफलातून जोड दिली आणि ‘मंदार’ या कमालीचा स्त्रीद्वेष असलेल्या, जीवनाला विटलेल्या, मात्र सप्तसुरांच्या नादब्रह्मात कायम रमणार्या आणि संगीत भक्तीच्याच बळावर मनपरिवर्तन झालेल्या अवलिया वनवासी संगीतकाराचा जीवनप्रवास ‘संगीत मंदारमाला’च्या रूपानं रसिकांसमोर आला अन् इतिहास बनून गेला. ‘सोऽहम हर डमरू बाजे’ ही या नाटकातील तोडी रागावर आधारित बंदिश आजही लोकप्रिय आहे. नाटकातील इतर पदांमध्येही पं. राम मराठे यांनी अनेक राग-रागिण्यांचा वापर केला. ज्योतकंस, अहिरभैरव, गौडमल्हार, बसंत बहार, बैरागी भैरव, तोडी, मालकंस, बिहाग, हिंडोल, भैरवी असे अनेक राग रामभाऊंनी चपखलपणे वापरले. ‘बसंत की बहार आयी’ या जुगलबंदीतील ‘चक्रधार’ हा तर त्यांच्या सांगीतिक गणिताचा उत्तम नमुना होता.

मंदारमाला नाटकातील गाजलेली पदे

ही सर्व पदे आठवणीतली गाणी या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. https://www.aathavanitli-gani.com/Natak/Mandarmala

कोण अससि तू न कळे (राग जोगकंस, गायक राम मराठे)

जय शंकरा गंगाधरा (राग अहिर भैरव, गायक राम मराठे) https://www.youtube.com/watch?v=YKKtlZGQx6o

जयोस्तुते हे उषादेवते (राग देसकार, गायक राम मराठे)

तारिल हा तुज गिरिजाशंकर (राग हिंडोल, गायक राम मराठे)

तारे नहीं ये तो रात को (राग मिश्र खमाज, गायक प्रसाद सावकार)

बसंत की बहार आयी (राग बसंत आणि बहार, गायक राम मराठे आणि प्रसाद सावकार)

बुझावो दीप ए सजनी (राग मिश्र भैरवी, गायक प्रसाद सावकार)

हरी मेरो जीवनप्राण-अधार (राग मिश्र पिलू, गायक राम मराठे)
संजीव वेलणकर पुणे.

—————————————–

मी काॅलेजात असेपर्यंत नाट्यसंगीताची चेष्टा करत होतो. एका संगीतप्रेमी मित्राबरोबर मंदारमाला हे नाटक पाहिले आणि पं.राम मराठे यांच्या जयशंकरा या गाण्यावर मुग्ध झालो. त्यानंतर माझी नाट्यसंगीताची आवड वाढतच राहिली. ही गाणी उपलब्ध करून पन्नास वर्षे मागील जगात नेल्याबद्दल धन्यवाद…..  आनंद घारे

स्व.यशवंत देव यांना श्रद्धांजलि

WhatsApp Image 2018-11-04 at 16.53.03

🙏🙏
10/30/2018
अत्यंत दुःखद बातमी.
ज्येष्ठ कवी, संगीतकार आणि गायक यशवंत देव यांचे प्रकृती अस्वास्थ्याने , काल रात्री १.३० वाजता निधन झाले.
यशवंत देव उर्फ नाना, हे फार मोठे संगीतकार, गायक आणि कवी होते. त्याही पेक्षा ते एक सहृदयी माणूस होते. शब्दप्रधान गायकीचे जनक. अनेक शिष्य त्यांनी घडविले, अनेक ज्येष्ठ गायकांना मार्गदर्शन केले. त्यांना भेटणे हा निव्वळ अमृतानुभव असायचा. त्यांच्या कडून अनेक किस्से, गमती जमती ऐकायला मिळायच्या. आपल्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्यालाही ते नेहमी, सन्मानाने वागवायचे. त्यांच्या जाण्याने मराठी संगीत सृष्टीची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
भावपुर्ण श्रद्धांजली.
🙏🙏🙏
भाव तोच देव मानणारा भावगीतांचा देव, शब्दांचे सामर्थ्य जपणारा जयवंत देव,
आज देवाघरचा झाला !
आज शब्द मुके झाले व भाव हरपला.
तिन्ही लोकांना आनंदाने भरून टाकणारा यशवंत अनंतात विलीन झाला .
भावपूर्ण श्रद्धांजली
————————————

आशीर्वाद देणारे हात दूर जातायत!

– आशा भोसले

यशवंत देव यांच्याशी माझी खूप जुनी ओळख. अगदी 47-48 सालापासून… तेही या क्षेत्रात नवीन आणि मीही नवीन होते, अगदी तेव्हापासूनची. एचएमव्हीमध्ये काम करण्याचा तो काळ असेल. तेव्हापासून माझे ऋणानुबंध जुळले ते अगदी शेवटपर्यंत. त्यांनी मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. ते गाण्यातील बारकावे समजावून सांगायचे. मला म्हणायचं, ‘सा’ लावताना डोळे मिटू नकोस. हातवारे करू नकोस. मी हात हलवल्यावर म्हणायचे, हाताने तान घेतेस का? त्यांची समजवण्याची पद्धतही खूप वेगळी. एकदम स्वच्छ माणूस. चित्तपावनी ब्राह्मण, साधी मसाल्याची भाजी पण त्यांना चालायची नाही. त्यांना भेटल्यावर जणू मोगऱ्याच्या फुलाला भेटल्यासारखं वाटायचं.

देवांनी खूप शिकवलं. माझ्या गाण्यात आणखी काय सुधारणा हव्यात… आणखी कशाची भर टाकली पाहिजे…सतत सांगायचे. ते म्हणायचे, गाणं कधी संपत नसतं. गाणं कधी परिपूर्ण नसतं. त्यांच्यासोबत खूप गाणी केली. त्यातील ‘विसरशील तू खास मला दृष्टिआड होता’ हे गाणं मला फार आवडायचं. त्यांच्या कार्यक्रमात हे गाणं हमखास असायचे.
त्यांचा स्वभाव एकदम स्पष्टवक्ता. तोंडावर एक आणि पाठीमागे एक असं बोलणं त्यांना जमायचे नाही. त्यांचा एक किस्सा सांगते, एकदा मी त्यांना प्रश्न केला की तुम्हाला माझा आवाज जास्त आवडतो की लतादीदीचा? एका क्षणात देवसाहेबांनी उत्तर दिले, दीदींचा! त्यांच्या उत्तरामुळे मी भारावून गेले. देवसाहेब पुढे म्हणाले, नैसर्गिकता ही लतादीदींच्या गाण्याची ताकद आहे आणि हिंमत ही तुमच्या गाण्याची ताकद आहे. त्यांचे ते खरे बोलणे मला खूप आवडले होते.

देव यांच्या कुटुंबाशी माझे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. ते माझ्या घरी येताना खरवस घेऊन यायचे. मीही त्यांच्या घरी जेवणाचा डबा पाठवायचे. माझा एक डबा त्यांच्या घरी राहिलाय. त्यांची पत्नी म्हणाली होती, रिकामा कसा द्यायचा, काहीतरी देईन. त्यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा मी घरी सांत्वनासाठी गेले होते. त्यावेळी देवसाहेब म्हणाले, आता तो डबा तसाच राहू दे माझ्याकडे….
अशा खूप आठवणी आहेत.

देव म्हणजे उत्साहाचा अखंड झरा. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे नव्या पिढीने नुसते चिंतन जरी केले तरी कळेल गाणं काय असतं. त्यांच्या 91 व्या वाढदिवसाच्या एका कार्यक्रमाला आम्ही भेटलो होतो. जेव्हा कधी भेट व्हायची तेव्हा ते म्हणायचे, आपण गाणं करूया. वयाच्या नव्वदीतही जोमाने गायचे, शिकवायचे. माझ्या बंधूना म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना ते खूप मानायचे. बंधूंसाठी त्यांनी कविताही लिहिली आहे.

मधल्या काही दिवसांत देवसाहेबांची भेट घेता आली नाही. याची आता खंत वाटतेय. आपण आपल्या व्यापात असतो, वेळ मिळत नाही. मग कधीतरी अशी दुर्दैवी बातमी कानावर येते. मला वाटत राहतं की, सुरेश भटांना भेटायला हवं होतं. देवसाहेबांना भेटायला हवं होतं. अशी प्रेम करणारी माणसं निघून जाताहेत. आशीर्वाद देणारे हात आपल्यापासून दूर जात आहेत. आमच्यापेक्षा वयाने मोठी अशी दोनच माणसं संगीत क्षेत्रात राहिली आहेत. एक लतादीदी आणि दुसरे खय्याम साहेब. बस्स आणखी काय बोलू!
————————————

🌸🌿🌸🔆💞🔆🌸🌿🌸
यशवंत देव..
संगीत क्षेत्र आपल्या प्रतिभेने समृद्ध करणारे..संगीतात नवनवे गायक यावेत..सर्वसामान्यांना संगीतातील बारकावे समजावून सांगण्यासाठी अनेक गावात जाणारे हे यशवंत.

मानवी जीवन तत्त्वज्ञानाचा व्यापक अर्थ सांगणाऱ्या गाण्याला कसे स्वरबद्ध करावे हे गाण्यात दिसते, कारण प्रेम या शब्दाभोवतीच हे जीवन गुंफलेले आहे.

प्रेम हे अमर आहे. केवळ देह दिसतो तोपर्यंतच ते जाणवेल असे नाही. देह दिसत नसला तरीही हे प्रेम..गीत इथल्या निसर्गात जाणवेलच.
फुलांफुलांत ते हसत राहील. बाहेरच्या अस्वस्थ वातावरणाने कधी फुलपाखरु म्हणून दिसेल. या प्रेमगीताला तालासूराची गरज नाही. कारण अंतरंगातून प्रकटले आहे. हलणाऱ्या पाण्यात तरंगात जी उन्हे दिसतात,क्षितिज्यावरील आकाशातील निळी रेघ ही सारी त्या प्रेमाचीच साक्ष.
🌹🍃🔆🌸☘🌸🔆🍃🌹
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे

फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे।।

हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले

तसेच काहिसे मनी, तुला बघून वाटले

तृणांत फुलापाखरू तसे बसेल गीत हे ।।१।।

स्वयें मनात जागते, न सूर ताल मागते

अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते

उन्हें जळांत हालती तिथे दिसेल गीत हे ।।२।।
कुणास काय ठाउके, कसे कुठे उद्या असू

निळ्या नभांत रेखिली, नकोस भावना पुसू

तुझ्या मनीच राहिले, तुला कळेल गीत हे ।।३।।
☘🔆🌿💖🔆💖🌿🔆☘
गीत : शांता शेळके ✍

संगीत : यशवंत देव

स्वर : अरुण दाते

🎼🎶🎼🎶🎼 🎧
🌹🌻☘🔆🍃🌺🍃🔆☘🌻
——————————–

स्वर आले दुरुनी

जुळल्या सगळ्या त्या आठवणी।।

निर्जीव उसासे वाऱ्याचे

आकाश फिकटल्या ताऱ्यांचे

कुजबुजही नव्हती वेलींची

हितगुजही नव्हते पर्णांचे

ऐशा थकलेल्या उद्यानी ।। १।।
विरहार्त मनाचे स्मित सरले

गालावर आसू ओघळले

होता हृदयाची दो शकले

जखमेतून क्रंदन पाझरले

घाली फुंकर हलकेच कुणी ।।२।।
पडसाद कसा आला न कळे

अवसेत कधी का तम उजळे

संजीवन मिळता आशेचे

निमिषात पुन्हा जग सावरले

किमया असली का केली कुणी।।३।।

गीत – यशवंत देव

संगीत – प्रभाकर जोग

स्वर – सुधीर फडके
————————-

एका युगाचा अस्त

आज सकाळी उठल्या उठल्या मिळालेली बातमी मनाला विषण्ण करणारी होती. महाराष्ट्राचे लाडके आणि तितकेच आदरणीय असे ज्येष्ठ कवि, गायक आणि संगीतकार श्री यशवंच देव हे आता कायमचे आम्हाला सोडून देवाघरी गेले. इतक्या उंचीच्या या एकाच कलाकाराशी योगायोगाने माझी ओळख झाली होती आणि त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसून त्यांचे चार शब्द ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते. त्यांच्याबद्दलच्या माझ्या आठवणी मी या ठिकाणी शब्दबद्ध केल्या आहेत.
आमच्या देवसरांना विनम्र श्रद्धांजली आणि त्यांच्या आत्म्याला सद्गति लाभो अशी प्रार्थना.
https://anandghare2.wordpress.com/2016/03/27/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A5%AE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF/
————————————–

नवी भर दि. १२-०४-२०२१

अरे देवा, तुझी मुले अशी का रे भांडतात
कुणी एकत्र नांदती, कुणी दूर दहा हात

जात पात पाहुनिया सारा व्यापार ठरतो
मोठेपणा माणसाला का रे जन्मासवे येतो
कुणी लोळे वैभवात, कुणी पोळतो चिंतेत

नाथाघरचे भोजन, सारा गाव पंगतीला
दूध भात सर्वांमुखी आग्रहाने भरविला
थोर संतांच्या या कथा आम्हा साऱ्यांच्या मुखात

गीत व संगीत–यशवंत देव.
स्वर—सुधीर फडके

कवीवर्य विंदा करंदीकरांना आदरांजली

हे पान मी मार्च २०१०मध्ये उघडले होते. आज त्यात आणखी काही कवितांची भर टाकली आहे.                 दि.१८-०३-२०१९, १२-०६-२०२०, २१-०६-२०२०, ०२-०७-२०२०, १२-०४-२०२१, २३-०८-२०२१

—————————————————

प्रिय विंदा …

मी लहान होतो तेव्हा …
तुम्ही घेऊन आलात स्वप्नांचं एक जग
केवळ माझ्यासाठी !

जगातलं उत्तमोत्तम वेचून आणलेत माझ्यासाठी
आणि माझ्या कुमारबुद्धीला झेपेल, पचेल असे ते सर्व करून
त्याचे घास भरवलेत मला !

मी मोठा होत गेलो तसे
माझ्या हृदयात बसून
तुम्हीच कविता शिकवलीत मला !
प्रेम शिकवलेत, सौंदर्याचे पाठ गिरवून घेतलेत !

अजून मोठा झालो तेव्हा तर
मला मनात धूसर जाणवणारे सारेच
तुम्ही चपखल शब्दांत स्पष्ट म्हटलेत !

माझी भाषा,
माझे जगणे,
माझे बघणे,
सारे काही
हे असे तुमचेच !
तुम्ही घडवलेत !

इतक्या दुरूनही
कुणासाठी इतके बरेच काही करता येते ..
हे तुम्ही मला शिकवलेत !

तुम्ही माझे किंवा मी तुमचा कोण
कोणास ठावे ?
पण एक नक्की ..
आज माझ्या डोळ्यात
माझ्या बापासाठी आली होती
तीच आसवे !

(प्रदीप वैद्य यांच्या ब्लॉगवरून )  …………    मार्च २०१०

chukalee_geet२

धीर थोडासा हवा !

– विं. दा. करंदीकरांची एक कविता

कालौघ जावा लागतो अवतार घेण्याला नवा
विष्णूस त्या ! मग आपण धीर थोडासा हवा.
अंधार दाटे भोवतीं ; हाती असे इवला दिवा;
सारे दिवे पेटावया धीर थोडासा हवा.
मानू नको यांना मुके ; हे न अजुनी बोलके ;
बोलते होतील तेही; धीर थोडासा हवा.
शेत रुजले, वाढलेंही; डोलते वाऱ्यावरी,
पीकही येईल हाती; धीर थोडासा हवा.
स्वर लाभला; गुरुही भला; चाले रियाझही चांगला;
जाहीर मैफल जिंकण्या, धीर थोडासा हवा.
‘या गुणांचे चीज नाही’– तक्रार दुबळी व्यर्थ ही;
चीज होण्या वेळ लागे; धीर थोडासा हवा.
घाई कुणा ? वा केवढी ? काल ना पर्वा करी;
कालाबरोबर नांदण्या, धीर थोडासा हवा.
———————————————

दि.१८-०३-२०१९

देणाऱ्याने देत जावे .. आणि एक दिवस देणाऱ्याचे हांत घ्यावेत असो सांगणाऱ्या कविवर्य विंदा करंदीकर यांच्या दोन कविता खाली दिल्या आहेत. त्यांच्या चांगल्या चांगल्या कविता इथे वाचा.
http://marathikavitasangrah.in/category/vinda-karandikar

‘उपयोग काय त्याचा ?’

शब्दांत भाव नाही,     ना वेध अनुभवाचा ;      रचना सुरेख झाली !                                                              उपयोग काय त्याचा ?

व्याहीच पत्रिकेचा       घालीत घोळ बसले;      नवरी पळून गेली !                                                               उपयोग काय त्याचा ?

सुगरण रांधणारी,       सुग्रास अन्न झाले ;     अरसिक जेवणारे,                                                                   उपयोग काय त्याचा ?

जमली महान सेना,    शस्त्रे सुसज्ज झाली ;      नेता कचखाऊ निघाला,                                                        उपयोग काय त्याचा ?

ऐश्वर्य प्राप्त झाले,   झाली दिगंत कीर्ती ;    स्नेही न एक लाभे !                                                                     उपयोग काय त्याचा ?

सर्वांस स्वास्थ्य आले,    सगळीकडे सुबत्ता ;     स्वातंत्र्य फक्त नुरले !                                                           उपयोग काय त्याचा ?

केले गुरु अनेक,   यात्रा कित्त्येक केल्या ;   शांती न प्राप्त होता,                                                                   उपयोग काय त्याचा ?

__विंदा करंदीकर


नवी भर दि.०२-०७-२०२०

 (मूळ कविता)

पंढरपूरच्या वेशीपाशी
आहे एक छोटी शाळा;
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा ॥
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे
अट्टल
मास्तर म्हणतात करणार काय?
न जाणो असेल विठ्ठल ॥

विंदा करंदीकर
✍️ == ===
-संस्कृत अनुवाद-
पंढरपूरस्य सीमायाम् अस्ति कश्चित् विद्यालयः l
गौरवर्णीया: सर्वे छात्रा एकः बालः घननीलः II
विपरितलीला विपरितचेष्टा
असत् क्रीडने अतीव कुशलः I
किं करणीयं वदति शिक्षकः
भवति कदाचित् अयं विठ्ठलः ll

वीणाताई गोडबोले
मुंबई

नवी भर दि.२०-०८-२०२१

—————————–

सब घोडे बारा टक्के!

जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट; कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा (तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी) ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता; पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार; याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी; कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के; सब घोडे बारा टक्के!

__विंदा करंदीकर


——-   विं. दा. करंदीकरांची माझी खूप आवडती कविता

देणार्‍याने देत जावे

देणार्‍याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे

हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भिमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे.
—————————————–  दि.१८-०३-२०१९

……………………………….

त्याला तयारी पाहिजे

केले कुणास्तव ते किती,    हे कधी मोजू नये;
होणार त्याची विस्मृती;    त्याला तयारी पाहिजे.

डोक्यावरी जे घेऊनी    आज येथे नाचती,
घेतील ते पायातळी;    त्याला तयारी पाहिजे.

सत्यास साक्षी ठेवुनी     वागेल तो, बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही!    त्याला तयारी पाहिजे.

पाण्यामध्ये पडलास ना?     पाणी कसेही ते असो-
आता टळेना पोहणे;         त्याला तयारी पाहिजे.

~विंदा करंदीकर

ही कविता पचवली की आयुष्य जमलंच ! 😊

– दि.२६-०३-२०१९

————————————

एवढे लक्षात ठेवा –

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा…..
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा॥
ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा।।
जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा॥
चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥
विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा॥
दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा॥
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा॥
कवी: विंदा करंदीकर
[’निर्वाणीचे गझल’ पैकी एक गझल. संदर्भ लोकसत्ता]

नवी भर दि.१२-०६-२०२०

————————————-

विंदा करंदीकर यांची एक भन्नाट कविता

त्याला इलाज नाही
धिक्करिली तरीही सटवीस लाज नाही
श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही
देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले
त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही
लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही
तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका
कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही
ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही
विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही
बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही
असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी
अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही
ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा
निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही
वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा
श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही

वी भर दि. २१-०६-२०२० फेसबुकवरून साभार

. . . . . . . . . .

प्यालों किती तरीही…

विंदा करंदीकर.१९६५.
प्यालों किती तरीही, प्याले न मोजितो मी
आहे पिता-पिवविता, तो एक, मानतो मी
अवकाश हाच प्याला अन् काळ हीच मदिरा
थेंबात सांडलेल्या,ग्रहगोल पाहतो मी
कक्षेवरी उगा का, कलते वसुंधरा ही?
झुकली अशी कशाने, तें एक जाणतो मी
पापांत पुण्य मिसळी, सत्यात भेसळी असत्य,
जो कॉकटेलकर्ता, त्यालाच मानतो मी
जी बाटलीत आहे,आहेच ती बुचात;
हें सत्य नास्तिकांच्या,डोक्यांत हाणतों मी
द्राक्षांत आजच्या या, मदिरा असे उद्यांची
आशा चिरंतनाची, इतकीच ताणतो मी
विंदा करंदीकर.१९६५.
होळी आणि धुलीवंदनाच्या,बेधुंद शुभेच्छा !!
🍻🍾🌈 नवी भर दि. १२-०४-२०२१ . . . ही कविता मला वॉट्सॅपवरून मिळाली आहे. ती विंदांनीच लिहिली आहे की नाही याची मलाही खात्री नाही. कदाचित त्यांच्या नावावर खपवली गेली असण्याची शक्यता आहे.

. . . . . .

नवी भर दि.२३-०८-२०२१

धिक्कारिली तरीही सटवीस लाज नाही———श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही
एक झुरळ रेडिओत गेले;—–गवयी होऊन बाहेर आले.
एक उंदीर तबल्यात दडला;—–तबलजी होऊन बाहेर पडला.
त्या दोघांचे गाणे झाले—तिकीट काढूनमांजर आले!
अश्या विनोदी –विद्रोही –बाल –प्रेम कवितांचे कवी ,गीतकार ,निबंधकार ,लेखक .!!विंदा करंदीकर यांची आज जयंती !!! २३ ऑगस्ट १९१८!!
मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले
कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले.
केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले.
त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला.
त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही.
उंटावरचा शहाणा ,आटपाट नाग होते ,भीमाचे जेवण ,राणीची बाग ,दोन परी ,खुर्ची आणि स्टूल ,या लहान मुलान्चेसाठीच्या कविता ,तसेच देणाऱ्याने देत जावे ,तुकोबा आणि शेक्सपियर ,पछाडलेला अश्या अनेक कविता
तसेच स्पर्शाची सावली ,आकाशाचा अर्थ ,परंपरा आणि नवत्व असे निबंधही त्यांनी लिहिले.
**विंदा –वसंत बापट –पाडगावकर यांचे कविता वाचन फारच सुरेख असायचे वाई येथे किसनवीर महाविद्यालयात १९७५ साली या तिघांचेही काव्य वाचन ऐकणेस मिळाले
काव्यसंग्रह : स्वेदगंगा –मृद्‌गंध –धृपद –जातक ८—विरूपिका –अष्टदर्शने
संकलित काव्यसंग्रह : संहिता (संपादन – मंगेश पाडगावकर)–आदिमाया (संपादन – विजया राजाध्यक्ष) यावचन
बालकविता संग्रह : राणीची बाग –एकदा काय झाले —सशाचे कान —एटू लोकांचा देश –परी ग परी —अजबखाना–सर्कसवाला –पिशीमावशी आणि तिची भुतावळ –अडम्‌ तडम् –टॉप –सात एके सात —बागुलबोवा
त्यांची आठवणीतील गाणी :
अर्धीच रात्र वेडी —- असेच होते म्हणायचे तर —– मागु नको सख्या जे —

सर्वस्व तुजला वाहुनी
सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी
घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया?
अंधार होतो बोलका वेड्यापिशा स्वप्‍नांतुनी
माझ्या सभोंती घालते माझ्या जगाची भिंत मी
ठरते परि ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी
संसार मी करिते मुका दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती आज्ञा तुझी ती मानुनी
वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन्‌ प्राक्तनावर रेलते छाती तुझी ती मानुनी
विनम्र अभिवादन “”

श्री. माधव विद्वांस आणि फेसबुक यांचे आभार . . दि.२३-०८-२०२१

. . . . . . . .

विंदांच्या आणखी काही कविता . . वॉट्सॅपवरून साभार

उंटावरचा एक शहाणा
सोन्याच्या घालून वहाणा
भीक मागतो दारोदारी
म्हणतो, ‘सगळे कंजुष भारी”

उंटावरचा एक शहाणा
उंटावरून शेळ्या हाकी
आतेला म्हणतो मामी
अन मामीला म्हणतो काकी

उंटावरचा एक शहाणा
म्हणतो बांधीन असाच वाडा
दारामधून शिरे न कुत्रा
खिडकीमधून येईल घोडा

…..
जग बघण्यासाठी .. केलेन डोळे
देवाचे मन .. साधेभोळे…

पण डोळे चावट असले
एकमेकांनाच बघत बसले..

देवाने केला विचार थोडा
बांधलान मधोमध नाकाचा घोडा…

…..

कधी वाटते वाटते
तुला द्यावे असे काही
ज्यात लपेल आकाश
लोपतील दिशा दाही

असे काही तुला द्यावे
भाबडे नि साधे भोळे
राधेचेही पडो दृष्ट
द्रौपदीचे दिपो डोळे

माझे नसून मी द्यावे
तुझे व्हावे दिल्यावीण
पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे
जन्म टाकाया गहाण….

विंदा करंदीकर….

**************************


सायंतारा लुप्त झाला

गगनि उगवला सायंतारा या प्रख्यात गीताचे गायक म्हणजेच आद्य भावगीतगायक स्व.श्री.गजानन वाटवे यांना सादर आणि साश्रु श्रध्दांजली.

यासंबंधी सविस्तर बातम्या इथे वाचा.

लोकसत्ता
http://www.loksatta.com/daily/20090403/mp01.htm

गजानन वाटवे यांचे निधन
पुणे, २ एप्रिल २००९ / प्रतिनिधी
दर्जेदार संगीत अन् भावपूर्ण आवाजातून मराठी सुगम संगीताच्या प्रांतात सहाहून अधिक दशके रसिकांना मोहिनी घालीत ‘वाटवेयुग’ निर्माण करणारे भावगीत- काव्य गायनातील पितामह व ज्येष्ठ संगीतकार गजानन वाटवे यांचे आज येथे दुपारी बाराच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांंचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन कन्या, सून व नातवंडे असा परिवार आहे. संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत वाटवे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चांगल्या कविता उत्तम चाली लावून ऐकण्याची सवय मराठी रसिकांना लावणारे वाटवे यांचे हे कार्य एखाद्या व्रतस्थाप्रमाणे सुरू होते. वयाच्या नव्वदीतही वेगवेगळ्या चाली शोधण्याची आवड ते मनापासून जोपासत होते. मात्र, मागील दीड वर्षांपासून ते आजारी होते. त्यातच आज दुपारी कर्वेनगर भागातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ८ जुलै १९१७ मध्ये बेळगावात जन्मलेल्या वाटवे यांनी संगीतसाधना करण्यासाठी वयाच्या पंधराव्या वर्षीच आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन घर सोडले व पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयात ते दाखल झाले. ‘गोपाळ गायन समाज’चे गोविंदराव देसाई यांनी त्यांच्या संगीत शिक्षणाची व्यवस्था केली. स्वतंत्रपणे स्वररचना करण्याची संधी त्यांना याच ठिकाणी मिळाली. फग्र्युसन महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाच्या वेळी त्यांचा काव्यगायनाचा पहिला कार्यक्रम झाला. त्या वेळी केवळ सात रुपये बिदागी मिळालेले वाटवे मात्र पुण्यात सर्वपरिचित झाले. १९४० मध्ये ग्रामोफोन कंपनीने त्यांची ‘वारा फोफावला’ ही पहिली ध्वनिमुद्रिका काढली. त्यानंतर मात्र गायक व संगीतकार म्हणून वाटवे यांचे नाव प्रसिद्ध झाले.
मराठी भावगीताचे जनक ठरलेल्या वाटवे यांनी नंतरच्या काळामध्ये भावसंगीतातील एक स्वतचे वेगळे विश्व निर्माण केले. ‘मोहुनिया तुजसंगे’, ‘चंद्रावरती दोन गुलाब’, ‘दुभंगुनी जाता जाता मी अभंग झालो’, ‘फांद्यावरी बांधिले गं’, ‘मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला’, ‘गगनी उगवला सायंतारा’, ‘चल चल चंद्रा पसर चांदणे’, ‘घर दिव्यात तरी’, ‘यमुनाकाठी ताजमहाल’, ‘मी निरंजनातील वात’ आदी अनेक लोकप्रिय गितांचा खजिना त्यांनी रसिकांसमोर रिता केला. मालती पांडे, मोहनतारा अिजक्य, माणिक वर्मा, बबनराव नावडीकर अशा ज्येष्ठांप्रमाणेच अलीकडच्या काळातील अनुराधा मराठे, रंजना जोगळेकर, रवींद्र साठे यांनीही त्यांची गाणी गायली आहेत. १९४२ ते १९५८ या काळात त्यांनी सात मराठी चित्रपटांसाठी पाश्र्वगायनही केले. संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना ‘लता मंगेशकर’, ‘सुशीलस्नेह’, ‘युग प्रवर्तक’ आदींसह गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कारही मिळाला आहे. ‘गगनी उगवला सायंतारा’ हे आत्मचरित्र व ‘निरंजनातील वात’ हे त्यांच्या गीतांचा समावेश असलेले पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.
संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. ज्येष्ठ गीतकार सुधीर मोघे, अरुण दाते, दत्ता वाळवेकर, वाटवे यांच्या कन्या मंजिरी चुनेकर, ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक अरिवद व्यं. गोखले, निवासी संपादक मुकुंद संगोराम, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ तसेच डॉ. सतीश देसाई, सुनील महाजन, मनोहर कुलकर्णी, श्रीपाद उंबरेकर, संजय पंडित, अजय दोंगडे, प्रा. प्रकाश भोंडे, शैला मुकुंद, संगीता बरवे, प्राजक्ता जोशी- रानडे, अश्विनी टिळक, शोभा अभ्यंकर आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.