डॉ.अनिल अवचट यांचे लेख

लहानपणी शिकत असतांना आपण जुन्या काळातल्या थोर समाजसेवकांची चरित्रे वाचत मोठे होत असतो. त्या सगळ्या लोकांच्याबद्दल मनात एक आदराचे स्थान निर्माण होत जाते. पण का कुणास ठाऊक, आपल्या काळातल्या आपल्या वयाच्या अशा लोकांची आपण विशेष दखलही घेत नाही. असेच डॉ.अनिल अवचट यांचे नाव अधूनमधून माझ्या वाचनात येत होते, पण मी त्यांची माहिती कधी घेतलीच नाही. गेल्या आठवड्यात त्यांचे दुःखद निधन झाल्यानंतर मात्र सगळ्या सामाजिक माध्यमांमधून त्यांच्यावर भरभरून लेखन समोर आले. तसेच त्यांचे काही लेखही प्रसिद्ध झाले. त्यांचे हे लहानसे संकलन. ही सर्व माहिती फेसबुक आणि वॉट्सॅपवर देणाऱ्या सर्वांचे आणि विशेषतः श्री.प्रकाश घाटपांडे यांचे मनःपूर्वक आभार. दि. ०१-०२-२०२२
मनापासून कलेवर आणि माणसाच्या सामाजिक कार्यावर श्रद्धा असणारा पत्रकारिता जगणारा उत्तम माणूस डॉ. अनिल अवचट गेल्याचे अतीव दुःख होत आहे.. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी आपल्या पुण्यातील पत्रकार नगरात अखेरचा श्वास घेतला.. भावपूर्ण श्रद्धांजली.

काही दिवसांपूर्वीच मी वॉट्सॅपवर डॉ.अनिल अवचट यांचा ‘थांबणे’ या मथळ्याखाली लिहिलेला एक लेख वाचला. त्याची सुरुवातच अशी होती, “कुठे, केव्हा, कसे थांबावे ही एक कला आहे.” पुढे त्यांनी काही मान्यवर लोकांची उदाहरणे दिली होती. हा लेख त्यांनी कधी लिहिला होता हे काही माहीत नाही. अलीकडचा नसावा कारण त्यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले अशी दुःखद बातमी आज आली. क्रिकेटर मंडळी तिशीमध्येच रिटायर होऊन खेळणे थांबवतात कारण त्यांची शारीरिक क्षमता कमी झालेली असते. सिनेसृष्टीतल्या बऱ्याचशा नायकनायिकांना काही काळानंतर काम मिळत नसल्यामुळे ते पडद्यावर दिसेनासे होतात, काहीजण मात्र वर्षानुवर्षे टिकून राहतात. काही कलाकार स्वेच्छेनेही ‘थांबत’ असतील. लेखक, कवी, नाटककार वगैरे सृजनशील मंडळींना वयाचे बंधन नसावे, उलट त्यांचे लेखन अधिकाधिक परिपक्व होत जावे अशी अपेक्षा असते. पण अवचटांचा लेख मुख्यत्वे त्यांच्यावरच होता. पहायला गेल्यास शंभर वर्षांपूर्वीच कविवर्य भा.रा तांबे यांनी “मधुघटचि रिकामे पडति घरी” ही कविता लिहून ठेवली आहे. “आता माझ्या प्रतिभेचा बहर ओसरला आहे” असे त्यांना म्हणायचे होते. ही प्रतिभा कशी लहरी असते हे आरती प्रभू यांनी “ती येते आणिक जाते” असे सांगितले आहे. त्यामुळे ज्या दर्जाचे लेखन वाचकांनी डोक्यावर घेतले तसे आता होत नाही हे वेळीच ओळखून थांबणे ही एक कला आहे असे अवचटांनी सांगितले आहे. त्यांनी स्वतः या बाबतीत काय केले हे मला माहीत नाही कारण माझे फारसे वाचनच नाही. पण त्यांनी आपल्या लेखाची अखेर अशी केली होती, ” हे सगळे ‘मायाजाल’ न संपणारे आहेत त्यातून आपणच ठरवून विरक्त होणे केव्हाही चांगलेच.. विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण तेवढा पण वेळ आपल्याला नाही..”
डॉ.अवचटांनी सुरू केलेले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी पुढची फळी निर्माण केली असणारच. मी एकदा असे वाचल्यासारखे आठवते की त्यांनी किंवा एका त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याने असे म्हंटले होते की माझे कार्य बंद पडावे, त्याची गरजच उरू नये (मुलांनी व्यसनाधीन होऊच नये) अशा शुभेच्छा द्या. डॉ.अवचटांनी केलेले समाजकार्य आणि लेखन यांचे ऋण तर समाजावर राहणारच आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि. . . . आनंद घारे

डॉ.अनिल अवचट यांनी डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांच्यावर लिहिलेला लेख इथे पहावा.
https://anandghare.wordpress.com/2021/10/20/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a4%be/


डॉ.अनिल अवचट हे अखेरच्या काळात इस्पितळात असतंना ते औषधोपचारांना अजीबात प्रतिसाद देत नव्हते आणि त्यांची प्रकृति क्षीण होत चालली होती. त्यावेळी डॉ.आनंद नाडकर्णी त्यांच्या सोबत होते. काहीही आशा उरली नव्हती तेंव्हा त्यांना घरी नेण्यात आले आणि त्यांचे निधन झाले. या काळात मनात आलेल्या भावना या कवितेत व्यक्त केल्या आहेत.

————————————

ऐंशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या श्री. अनिल अवचट ह्यांचा एक अप्रतिम विचारप्रवर्तक लेख, खरच प्रत्येकाने वेळच्या वेळी थांबावेच,त्यातच ग्रेस आहे🙏🙏🙏

थांबणे…..

कुठे, केव्हा, कसे थांबावे ही एक कला आहे. ती सर्व कलांमध्ये लागू होते.

कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते. माझ्याभोवती तरुणपणी अलौकिक माणसे होती. त्यांच्यामुळेच ही जाणीव मला होत गेली. विंदा करंदीकर माझे शेजारी आणि प्रतिभावंत कवी. एकदा त्यांनी ठणकावले की, आता मी लिखाण बंद करतो आहे. आणि त्यांनी शब्द पाळला.

स्वत:शी प्रामाणिक राहून या निर्णयापर्यंत यावयास धारिष्टय़ तर लागतेच; पण विसर्जनाची बूजही लागते. तसेच तात्या माडगूळकरही होते. तेही माझे मित्र होते. आयुष्याच्या उताराला लागले तेव्हा या उमद्या लेखक, चित्रकार, शिकारी आणि प्रवासी माणसाने हाच मार्ग अवलंबला. ते म्हणायचे, ‘‘गडय़ा, जगण्याची आतून उमेद राहिली नाही.’’ विंदा शेवटपर्यंत प्रसन्न राहिले. भाजी, मासे आणायला आम्ही सोबतीने जात असू. मासेवाल्या बाईशी घासाघीस करायला त्यांना मजा येत असे. तेव्हा त्यांच्यातला कवी बहुदा त्यांच्या पिशवीत त्यांनी लपवून ठेवलेला असे. तितक्याच आत्मीयतेने ते संगीतात रमत. तसेच तात्या होते. संध्याकाळी आम्ही गप्पा मारीत फेरफटका मारीत असू. तेव्हा त्यांच्यातल्या अद्भुत लेखकाची सावली कुठेही त्यांच्याबरोबर चालत नसे. उरलेले जीवन एखाद्या कवितेसारखे गुणगुणत ही माणसे कुठलेही आविर्भाव न घेता जगले.

पु.ल.देशपांडे य़ांनीही वेळेनुसार आवराआवर केली. देणग्या देऊन, पुस्तके/ पुस्तकांचे हक्क त्यांनी वाटून टाकून ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य एक गिफ्ट मिळाल्यासारखे हसत जगले. ‘‘जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते..’’ हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे. विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे आमचे आबा. त्यांचा व्यासंग, प्रभुत्व, त्यांची जाण, अभ्यास, समाज सुधारण्यासाठीचे त्यांचे दीर्घ कार्य सर्वानाच ठाऊक आहे. त्यांच्या सहवासात मला हेच जाणवते. या प्रचंड ज्ञानाच्या ग्रंथसंग्रहालयातून ते अचानक जुन्या महाबळेश्वरच्या घरी गेले. ड्रायव्हरला सांगितले, ‘‘सकाळी काही घाई नाही.’’ ड्रायव्हर जेव्हा आत आला तेव्हा छातीवर हात ठेवून आबांचे विसर्जन झाले होते.

ज्ञानी आणि भक्कम जीवनाचा अर्थ कळलेले हे ऋषीच म्हणावे लागतील. साहित्य सहवासात संध्याकाळी फिरताना गंगाधर गाडगीळ एकदा भेटले. गाडगीळ हे ब्रिटिश शिस्तीतले होते. सगळं नीटनेटके, वेळेवर असायचे, जसे त्यांचे वाङ्मय आणि आयुष्य होते. त्या संध्याकाळी त्यांचा ड्रेसदेखील इस्त्री केलेला, तंतोतंत होता. त्यांच्या मदतीला बरोबर नोकरही होता. मला त्यांनी थांबवले आणि म्हणाले, ‘‘मिस्टर अवचट, बरे झाले आत्ताच भेट झाली! आता पुढे भेट शक्य नाही.’’ ‘‘परदेशी चाललाय का?’’ मी विचारले. ‘‘नाही. आत्ता सारे थांबवले आहे. लिखाण आणि इतर गोष्टी व्यवस्थित आवरल्या आहेत. औषधे बंद केली आहेत. आता एकेक मित्रांना भेटतो आहे. थँक्यू, तुमचा सहवास लाभला.’’ ते शांतपणे नोकराबरोबर फाटकापाशी चालत गेले. त्याच आठवडय़ात ते गेल्याचा निरोप आला. या लोकांनी हे विसर्जन किती समजूतदार आणि अलिप्तपणे स्वीकारले होते. ओशोंनीही अत्यंत वेगळ्या संदर्भाने विसर्जनावर लिहिले आहे. Abandoning करणे, सोडून देणे अशी सारी अंगे या विसर्जनात येतात. ओशोंनी शेवटी सांगितले, ‘‘माझ्या गळ्यात घातलेल्या माळा फेकून द्या. संन्याशी भगवे कपडे काढून टाका. स्वत:चा संन्यास स्वत: शोधा. जे मौनात विसर्जित होते तेच चांगले संगीत!’’ त्यांच्या या वाक्यातच जीवनाच्या संगीताचे अर्थ सामावले आहेत. जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो; जो भाग एखादा गुरू प्रसाद म्हणून तुमच्या हातात देत नाही. वयाप्रमाणे जीवनाशी सामील होणे यातच खरी ग्रेस आहे. अंगणात उन्हात तांदूळ निवडत बसलेल्या, साईसारखी त्वचा झालेल्या प्रेमळ आजीमध्ये ती ग्रेस असते. कोऱ्या हॅण्डमेड पेपरवर रंगाचा पहिला ठिपका टाकल्यावर तो हळुवार पसरत जातो. पुन्हा अनेक रंगांत तो मिसळत जातो. त्याच्या कंट्रोल्ड ओघळांनी किंवा छटांनी एक चित्र बनते. कधी ते देखणे दिसते, कधी जमत नाही. हे महत्त्वाचे नाही. ती प्रोसेसच दैवी असते. त्या कागदावरच्या रंगाच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.. बदलत राहतात. विघटन हे अलौकिक अ‍ॅबस्ट्रॅक्ट नॅचरल चराचरातील मौनच असते.

‘समतया वसुवृष्टि विसर्जनै:’ जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो.. हे विसर्जन! झाडाचे पिकले पिवळे पान फांदीवरून निसटते. हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखे जमिनीवर अलगद टेकते आणि विसर्जित होते. अगदी हळुवारपणे. विसर्जन ही मौलिक गिफ्ट आहे. आजकाल लोकाना कुठे थांबावे हेच समजत नाही,जीव संपला तरी हावरट पणा जात नाही छाती फुटेपर्यंत लोक धावत असतात मागे वळून बघत नाही, स्वत:ची पर्वा नसते का तर जेवढे कमवता येईल तवढे पदरात पाडून घ्यायचे पण एक दिवस सर्व असुनही सर्व संपल्या सारखे दिवस येतात तेव्हा हातात फक्त निराशा आणि अंधारच दिसतो.ऐश्वर्य येते पण ते भोगायची मनस्थिती नसते.मग जीवनभर एवढे पळून काय उपयोग झाला. शेवटी हे सगळे ‘मायाजाल’ न संपणारे आहेत त्यातून आपणच ठरवून विरक्त होणे केव्हाही चांगलेच.. विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण तेवढा पण वेळ आपल्याला नाही.

अनिल अवचट 🙏🙏

. . . . . . . . . . . .

अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे’
अनिल अवचट
प्रास्ताविक-
(अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र – डिसेंबर 1995 मध्ये ही अनिल अवचटांची मुलाखत प्रकाशित झाली होती. मुलाखत घेणारे दोघेही माझे अंनिस चळवळीतील हितचिंतक आहेत. 2019 मधे म्हणजे मागील वर्षी या मुलाखतीच्या अनुषंगाने अवचटांशी गप्पा मारायला गेलो होतो. त्यांना या मुलाखतीची प्रत दिली व 24 वर्षांच्या कालावधीनंतर आपल्याला यात काही बदल करावासा वाटतो का? आपल्या विचारांच्या छटेत काही बदल करावा वाटतो का? हे अजमावणे हा हेतु बाळगून मी आलेलो आहे असे सुरवातीलाच सांगितले. एकूण गप्पांनतर असे जाणवले की अंधश्रद्धा निर्मूलन वा तत्सम विषयी त्यांना आज काही वेगळे म्हणायचे नाही.माणसांना समजून घेणे हा मूळ गाभा कायम आहे)
[अनिल अवचट आहेत सव्यसाची पत्रकार, कलाकार, लेखक, व्यसनमुक्ती चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, पण आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते आमच्या चळवळीचे जिव्हाळ्याचे मित्र आहेत. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचे विषय प्रभावीपणे लोकांसमोर आले ते अवचटांच्या लेखणीतून. त्या संदर्भात त्यांची संभ्रम, धार्मिक ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. प्रत्येक प्रश्नाकडे चिकित्सक आणि स्वत:च्या खास वेगळ्या दृष्टीने पहाचे हे अवचटांचे वैशिष्ट्य आहे. टी. बी. खिलारे आणि प्रभाकर नानावटी यांनी घेतलेल्या या मुलाखतीत तुम्हाला त्याला प्रत्यय येईलच..]
व्यसनमुक्तीचं कार्य करीत असताना अंधश्रध्देच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर आपल्याला काय आढळले?
अमली पदार्थाने दारुने व्यसनग्रस्त असे जे लोक येतात ते अनेक अंधश्रद्धेचे प्रकार करूनच आलेले असतात. देवऋषाकडे मांत्रिकाकडे जाऊन आलेले असतात. सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे या गावात एक बाबा आहे. त्याच्याकडे बरीच व्यसनग्रस्त माणसे जाऊन नंतर आमच्याकडे आलेली असतात, आम्ही जेंव्हा त्यांच्या पूर्वायुष्याची माहिती घेतो, तेव्हा त्यांना विचारतो, ‘डोणजे रिटर्न का ?’ तर ते ‘हो’ म्हणतात. ‘काय झालं तेथे ? फायदा झाला का?’ असे विचारल्यावर सांगतात की, ‘बाबाकडे गेल्यावर सुटते असे ऐकले होते, त्यामुळे तिथ जायच्या अगोदर आम्ही भरपर पिऊन घेतली, त्यामुळे तिकडे काय झालं ते मला आठवत नाही. तिकडून आल्यानंतर काही जणाचे काही दिवस पिण बंद होतही. परंतु नंतर चालूच रहात. मला अस वाटत का सायकॉलोजिकल शॉकचा परिणाम म्हणून काही दिवस ते दारू घेत नाहीत. गळ्यात माळ घालणे, शपथ घेणे याचा मानसिक परिणाम होऊन सुटतही असेल, पण ते थोडे दिवस टिकत. पण व्यसनाच्या मागचं कारण शोधून काढणं किंवा प्रश्नाला स्वत: तोड द्यायला शिकवणं, नातेवाईक-मित्र याची मदत त्याला मिळवून देणं हे सगळं आम्ही करतो. ही प्रक्रिया काही तेथे झालेली नसते. बाबा, महाराज याच्याकडे गेल्यावर काहींना फायदा होतो काहींना होत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना तिकडे जाऊ नका असे सांगत नाही.
चळवळीचा आदर्श कार्यकर्ता कसा असावा असे आपल्याला वाटते?
हजारों वर्षे रूजलेल्या कल्पनांशी लढा देताना फार आक्रमक पद्धतीने बोलून चालत नाही. लोक अंधश्रद्धेचा एखादा प्रकार करतात तो का ? हे कार्यकर्त्याने समजून घेतले पाहिजे आणि त्यास पर्याय सुचवला पाहिजे, जे मांत्रिक, गुरू, महाराज आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही कडक बोला परंतु जे त्यात सापडलेले लोक आहेत, त्यांना तुम्ही शत्रू समजू नका. सर्वसामान्य लोकांविषयी जर प्रेम असेल तरच तो चांगला कार्यकर्ता होऊ शकतो, माणसं अंधश्रद्धेमधे का गुरफटतात, एका टोकाला का जातात, हा आपल्याला वरकरणी जरी वेडेपणा वाटत असला तरी त्यांचं जीवन आपल्याला काहीही माहिती नाही. तो कुठल्या परिस्थितीत एखाद्या बुवाकडे, एखाद्या विधीकडे आकर्षित झाला हे आपल्याला काहीही माहिती नसताना त्याची निर्भत्सना करण हे फार क्रूर आहे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे शास्त्रीय दृष्टी कशी उपयुक्त आहे हे लोकांना दाखवून देऊ शकले पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यात अभय बंग व राणी बंग यांनी जे आरोग्यविषयक काम केले आहे त्यामळे तेथील लोकांच्या नाही.’आरोग्यविषयक दृष्टिकोनात फारच बदल झालेला आहे. अरूण देशपांडे यांनी कणकवली येथे शेतीच्या कामात उत्कृष्ठ अशी प्रगती केली आहे
अभय बंग व राणी बंग यांच्या कार्याविषयी सांगा,
अभय बंग याने लहान मुलांच्या आजारांची पाहणी करून असा निष्कर्ष काढला की चालमत्यूचं प्रमाण न्यूमोनियामुळे सर्वात जास्त आहे. सरकार व WHO/ (जागतिक आरोग्य संघटना) यांच्या अहवालानुसार डायरिया (हगवण) हे बालमृत्यूचं प्रमख कारण आहे असं मानलं जात होतं. या निष्कर्षास धक्का देणारा असा हा निष्कर्ष होता, त्याने ९७ टक्के बालमृत्यूचं प्रमाण कमी केलं व अनेक न्यूमोनियाग्रस्त मुले वाचवली. राणी बंगने स्त्रियांच्या आरोग्याविषयी पाहणी केली. स्त्रियांचे आरोग्य हे नेहमीच दुर्लक्षित केलं जातं. सरकार किंवा WHO यांचे कार्यक्रमही प्रसूतिपूर्व व प्रसुतिनंतरची काळजी किंवा कुटुंबनियोजन यावर आधारलेले असतात. म्हणजे मुलाच्या जन्माशी संबंधित तेवढ स्त्रीचं क्षेत्र आहे अस मानलं गेलं आहे परंतु स्त्रीच्या आरोग्य विषयक ज्या समस्या असतात त्या बघितल्या जात नाहीत. दोन गावातील पाचशे-सहाशे स्त्रियांची त्यांनी पाहणी केली . प्रयोगशाळेतील चाचण्या करून असा निष्कर्ष काढला की ९२ टक्के स्त्रिया ह्या कुठल्या ना कुठल्या आरोग्य विषयक समस्येने ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी दवाखाना काढला.सुईणींना प्रशिक्षण देऊन त्याच्यामापत रोगनियंत्रण केले . लोकांच्या श्रद्धांचा आदरही ठेवला आणि त्याचबरोबर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्यही सहजगत्या केल.
पांडरंगशास्त्री आठवलेंनी लाखों लोक व्यसनमुक्त केली असं सांगतात. मोठ्या प्रमाणात माणस अशा व्यसनमुक्त करता येतात का?
खरोखरी व्यसनात ग्रस्त असलेले लोक मुक्त करणे आणि लोकांनी म्हणणे आम्ही व्यसनमुक्त झालो यात फरक आहे. व्यसनात सापडलेल्या माणसाला बाहेर काढणं ही फार कठीण गोष्ट असते. घाऊकपणे लोक व्यसनमुक्त होत नसतात. पण व्यसनविरोधी वातावरण निर्माण होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे..
ध्यानधारणा (meditation) आपण करता का? त्याबद्दल आपलं मत काय?
ध्यानधारणा म्हणजे माणसाचे स्वत:शी काही काळ असणे. स्वत:च्या वर्तनाच, जीवनशैलीचं एकातामध्ये तो निरीक्षण करतो. मग त्याला काही नवीन गोष्टी सुचतात, आपण जे केलं ते बरोबर केल का याचा तो विचार करू लागतो. कोणाला काही आपण बोललो असेल तर त्याचा आपणाला विचार करता येतो. ध्यानधारणा म्हणजे धार्मिक किंवा आत्म्याच्या जवळ जाणारी गोष्ट असेच समजायला पाहिजे असे नाही. ध्यानधारणा बसूनच करता येते असं काही नाही. तस्लीनता – मग ती कुठेही येऊ शकते – माणसाच्या जीवनातला एक मोठा आनंद आहे. इगतपुरीच्या आश्रमात विपध्वनामध्ये दहा दिवस लोक. न बोलता राहतात. पहिले काही दिवस मनामध्ये खूप विचार येतात. पत्तु नंतर मात्र मनाची एक वेगळीच अवस्था येते. त्याचा एक अनुभव माणसाने घ्यावा कधीतरी. त्यात बाईट काही नाही. आपले ब्यबहारातले जे आनंद असलात, त्याच्यापेक्षा वेगळ्या रीतीने आनंद घेण्याची ताकद आपल्या मनामध्ये असते. ती आपण स्वत पुरती. शोधून काढू शकतो, त्यातून आत्मविश्वासही येऊ शकतो.
योगासने आपणा करता का? त्याबद्दल आपले मत काय आहे?
योगासने मी करतो, ती एक जगण्याची वृत्ती आहे. आपल्या ज्या अतिरिक्त गरजा असतात, (उदा. टीव्ही मंग रिमोट कंटोलटी व्ही डी सी आर कार त्याला अंतच नाही आपल मन जे सैरभैर असतं त्यामुळे आपण निसर्गापासून आणि स्वत:पासून दूर राहतो. योग हे स्वत:ला स्थिर करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे शारीरही नीट राहतं आणि मनही. योग ही गोष्ट माणसाला व्यायामासारखी एकदम करता येत नाही. हळू हळू आत्मसात करावी लागते. यात स्पर्धा नसते. कुठल्याही खेळात जी स्पर्धा असते ती माणसाचं मन खाऊन टाकते. खेळ म्हणजे मनसोक्त आनंद, स्पर्धा असेल तर ती माफक असावी.
योगामुळे निरनिराळे रोग बरे होतात, सिध्दी प्राप्त होतात असा दावा केला जातो….
योगामुळे काही रोग बरे होतात, रोग न होण्याची शक्यता वाढते हे मला मान्य आहे. योगासनाच्या निरनिराळ्या आसनांमुळे आपले न वापरले गेलेले शारीराचे भाग आपण वापरतो. औषधाची गरजच भासू नये अशा त-हेची जी काय शारीरिक अवस्था ठेयायची असते ती योगासनामळे येऊ शकते. योगामळे सिडी प्राप्त होतात असे मी मानत नाही.
कुठल्या रोगासाठी कुठली पॅथी वापरावी हे कसं ठरवावं?
शास्त्राने सिद्ध झालेली असतात ती अॅलोपॅथिक औषधे असतात. परंतु अजून शास्त्राने सिद्ध झाल्या नाहीत अशा होमिओपॅथीपासून अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक पॅथीचे दावे खूप असतात. आणि त्या मानाने ते सिद्ध करू शकत नाहीत. त्यामध्ये काही नाही असेही म्हणता येत नाही, होमिओपथिचा काही तोटा तरी मला दिसत नाही. होमिओपॅथीने आजार बरे झालेले मी पाहिले आहेत.
जीवघेण्या आजारात, ज्या रोगाचे निदान झाले नाही अशा आजारात किंवा खात्रीचे ॲलोपॅथीचे उपाय उपलब्ध असताना केवळ रोग मुळातून बरा होतो या आधार नसलेल्या श्रध्देपायी होमिओपॅथी वापरावी का?
शेवटी प्रत्येकानं ठरवावं कोणती पॅथी थापराची, उलट अॅलोपंथीकडे जाणाऱ्यांना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे की विनाकारण ॲटीबायोटिक्स घेऊ नका वाट्टेल तशी ऑपरेशन्स् करू नका
रिकी (Reiki) उपचार पद्धतीचा आपण कोर्स केलेला आहे असे कळले. त्यातून आपल्याला काही फायदा झाला का?
रिकी उपचार पद्धतीचा कोर्स मी केला, परंतु मी ते सोडून दिलं. उपचार पद्धतीवाले असे म्हणत होते की वैश्विक उर्जा (cosmic energy) असते, ती आपण आपल्या शरीरात घेऊ शकतो. लहान मुलांना ती लवकर मिळू वायते, कारण त्यांची ‘ओपनींगज् (शरीराची ‘द्वारे’) जास्त खुली असतात, मोठ्या माणसांची बुजलेली असतात. ही वैश्विक उर्जा आपल्या शरीरात न भिनल्यामुळे शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होतात,आपण जर ही बश्यिक उजो आपला चनल्स (मार्ग) खुली करून घेतली तर सर्व रोग दूर होतील असा त्यांचा सिद्धांत आहे. एकदा चैनेल्स खुली दोऊन वैश्विक उर्जा मिळाल्यानंतर तुम्ही ती दुसऱ्याला देऊ शकता. संबंध शरीरावरील प्रत्येक भागावर तीन-तीन मिनिटे हात ठेवून त्याचं अवस्थांतर करायचं असतं. त्यामुळे रोग निवारण होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे.
वैश्विक उर्जा असते. आणि तिचा आपला संपर्क तुटलेला असतो, इथपर्यंत ठीक होतं. त्या उर्जेचा संपर्क पुन्हा सुरू झाल्यावर रोग जाऊ शकतील हे एकवेळ आपण मान्य करू. परंतु या माणसाने माझी चॅनेल्स खुली केली. हा भाग न कळण्याजोगा आहे. ते असं म्हणतात की तुम्हाला आलेल्या परिणामावरून तम्ही ते ठरय शकता. आता या गोष्टी सिद्ध होणार नाहीत, परंस त्याचे जर परिणाम मिळत असतील तर तुम्ही का मान्य करीत नाही? असे ते म्हणतात. मला स्वत:ला आपण विशेष वेगळा अनुभव घेतला असे वाटले नाही. शरीराच्या निरनिराळ्या भागावर काही मिनिटं हात ठेवल्यामळे थोडं बरं वाटणं साहजिक आहे. ही रिकी उपचार पद्धती मला आता मिळणार आहे. त्यामुळे त्याचा मला फायदा होणार अशी लोकांची श्रद्धा झालेली असते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या बरं वाटत असाव.
पब, बार याबद्दल काय म्हणता येईल?
उपभोगवाद घातक आहे. पण तो आता आपण स्वीकारलेला आहे. खुल्या आर्थिक धोरणातुन तो आलेला आहे.. आपल्या बिघडलेल्या तब्येतीवर आपण ‘मल्टिनॅशनल कंपन्या’ (बहुराष्ट्रीय कंपन्या) हे जहरी औषध आपण मागवलं आहे. त्याचा उपयोग होणार की नुकसानच जास्त होणार हे अजून ठरायचं आहे. पब, नग्न जाहिराती ही सर्व उपभोगवादाची अंग आहेत. प्रत्येकजण या उपभोग संस्कृतीमध्ये कुठे ना कुठे अडकलेलाच आहे. या संस्कृतीमधून तुम्हाला काही निवड करता आली पाहिजे, एखादी गोष्ट आवश्यक किती आहे? अमुक इतक्या मर्यादपर्यंत मी ते वापरेन असं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे
तुम्ही आत्मसात केलेल्या निरनिराळ्या कलांविषयी सांगा ?
माणसांन स्वत:पुरत करायचं म्हंटले तर खूप करता येण्याजोग आहे. प्रत्येक माणस हा कमी-अधिक प्रमाणात कलावंत असतोच प्रत्येक माणसाच्या बाबतीत केलेल्या क्षेत्रात निर्मितीशील अशी वृत्ती असते. तिचं खच्चीकरण हे लहानपणी व पुढे शाळेत गेल्यावर होत असतं. ही वृत्ती जर जागी ठेवली तर स्वत:ला रमेल असं काही ना काही करता येतं. ओरिगामी, काष्ठतक्षण (Wood carving) बासरी यामध्ये मला आनंद मिळतो. विकणे प्रदर्शन करणे अशी वृत्ती मी कलेला आजपर्यंत लावलेली नाही, त्यामुळेच माझ्यातल्या कला स्वतंत्र आहेत असे मला वाटते. स्पर्धात्मक जगानं आपल्याला असं शिकवलंय की मुलं थोडी कुठं चित्र काढायला लागली की त्याला स्पर्धेत पाठवायची तयारी सुरू होते. स्पर्धेने तुम्ही त्याला झाकोळून टाकता. स्पर्धा मी माझ्या जीवनातून काढून टाकलेली आहे, त्यामुळे निर्भेळ आनंद मी घेऊ शकतो, तो कोणालाही घेता येईल. .
आतापर्यंत आपली किती पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि त्यातील अंधश्रद्धा निर्मूलनावर कोणती आहेत. ?
जवळपास माझी पंधराच्या आसपास पुस्तके प्रसिद्ध झाली त्यातील अंधश्रद्धा निर्मूलन विषयक दोन आहेत. – संभ्रम व धार्मिक,
दिवाळी अंकातच का लिहिता ? इतरत्र का लिहित नाही ?
दिवाळी अंकात मला भरपूर जागा मिळते आणि तो खूप काळ वाचला जातो, मासिके आता बंद पडली आहेत किंवा नीट चालत नाहीत.
या वर्षीच्या दिवाळी अंकात कोणकोणते लेख लिहिलेत ?
1) पाणी व माती – साप्ताहिक सकाळ
२) काका चव्हाणांचं व्यक्तिचित्र – महाराष्ट्र टाईम्स
३) Wood Carving – दीपावली
४) तेंदू- पत्ता- मौज, ५) डावं जग – लोकसत्ता
आपल्या मुलींना आपण शहरी प्रचलित कल्पनेच्या विरोधी अशा नगरपालिकेच्या शाळेतून शिकवलं, त्याची काय कारणे ?
आम्ही असं ठरवलं होतं की आमची मुलं मराठीत शिकावीत. पायी जाता येईल अशी जवळ शाळा असावी . तिसरं म्हणजे गरीब लोक जिथं शिकतात तिथं मुलं शिकावीत, त्यामुळे गरीबांबद्दल त्यांना प्रत्यक्ष माहिती कळेल. त्यांच्यातल्या काहींबरोबर मैत्री असेल, राम मनोहर लोहिया हे सरकारी रूग्णालयात मरण पावले होते. त्या घटनेचा माझ्या मनावर परिणाम झाला, राजकीय नेते जसे विमानाने परदेशात जातात व उपचार करून घेतात तसे त्यांनी केलं नाही. आम्ही दोघांनीही विचार करून दोन्ही मुलांना नगरपालिकेच्या शाळेत घातले त्यापैकीएक आर्टिस्ट झाली व सध्या संगणक शिकत आहे दुसरी मुक्ता, M.A. Clinical psychologist झाली. युनिव्हर्सिटीत पहिली आली. दहावीपासून वरच्या क्रमांकात येतच होती, त्या कुठल्याही. क्लासला गेल्या नाहीत. त्यांनी कुठलही गाईड वापरलं नाही, त्यांना जन्मात आम्ही अभ्यास कर असं म्हंटलं नाही. मुलांना स्वत:हून शिकावसं वाटलं तर ते खरे शिक्षण, आपल्या पोरांच भवितव्य हे आपण फार हातात घेऊ नये त्यांचा त्यांना मार्ग काढू द्यावा. एकदा मुल बाढल्यावर पुढे नातं हे मित्रासारखंच असतं.
__ मायबोली, मिसळपाव या संकेतस्थळांवर यापुर्वी प्रकाशित
श्री.प्रकाश घाटपांडे


. . . . . . . . . . . . . . . . . .

Prakash Ghatpande

डॉ अनिल अवचट यांच्या स्मृतीला अभिवादन. यानिमित्त काही आठवणी जाग्या झाल्या. ओतूर, ता.जुन्नर हे माझे जन्मगांव. तेच अनिल अवचटांचे गांव. माझे वडील ओतूरच्या हायस्कूलात बरीच वर्षे शिक्षक होते त्यांना हायस्कूलमधे विज्ञान विषय शिकवायचे. आमच्या कुटुंबाशी त्यांच्या कुटुंबाचा स्नेह होता.ओतूर माझे जन्मगाव असले तरी मी वाढलो बेल्ह्यात.बेल्ह्यातच आमचे घर व शेती होती. त्यामुळे मला ओतूरचे काही आठवत नाही. पुण्यात मी कॉलेज शिक्षणासाठी आलो नंतर पुण्यातच नोकरी ला लागलो. तेव्हा मी अनिल अवचटांचे लेख वाचायचो. एकदा त्यांना भेटायला पत्ता शोधत गेलो. ऐसपैस गप्पा झाल्या व ओतूर कनेक्शनमुळे स्नेहबंध घट्ट झाला. नंतर असेच ज्योतिष व सामाजिक संदर्भापोटी मधून मधून भेटत राहिलो. माझ्या लग्नालाही डॉ अनिल अवचट व डॉ सुनंदा अवचट उभयता आवर्जून आले होते. माझ्या यंदा कर्तव्य आहे या विवाह व ज्योतिष या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्याच हस्ते झाले होते.संगीतकार श्रीनिवास खळे

सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांचा आज जन्मदिन. यानिमित्य वॉट्सॅपवर आलेला लेख इथे सादर संग्रहित करत आहे. या लेखाच्या लेखकाचे आभार.
मी पूर्वीपासून श्रीनिवास खळे यांचा चाहता आहे आणि खळेकाकांवर पूर्वी लिहिलेल्या लेखांच्या लिंक्स देत आहे. ते अवश्य वाचावे.
तेथे कर माझे जुळती – ९ – श्रीनिवास खळे
http://anandghan.blogspot.com/2011/09/blog-post_17.html
श्रीनिवास खळे रजनी
http://anandghan.blogspot.com/2011/12/blog-post_19.html


संगीताचे मनाजोगते काम मिळत नाही व उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही, म्हणून वैफल्यग्रस्त होऊन घरातील हार्मोनियम विकायला निघालेल्या एका जन्मजात संगीत दिग्दर्शकाला अचानक कळले की, ‘…तो राजहंस एक!’ …!

भावगीत व भक्तीगीतांच्या दुनियेत स्वत:चे आगळे वेगळे स्थान व ओळख केवळ स्वत:च्या प्रतिभेच्या व कष्टाच्या जोरावर निर्माण करणाऱ्या श्रीनिवास खळे यांचा आज जन्मदिन.

आताच्या गुजरातमधल्या बडोद्यात १९२६साली आजच्याच दिवशी हा गंधर्व ईहलोकी अवतरला. संगीताच्या जन्मजात आवडीमुळे त्यांनी महाराजा सयाजीराव विद्यापीठात संगीत विभागात प्रवेश मिळवून पदविका घेतली. आग्रा-ऐत्रोली घराण्याचे पंडित मधुसूदन जोशी यांच्या तालमीत ते तयार झाले. बडोदा आकाशवाणीत काही काळ नोकरी केल्यानंतर ते हिंदी चित्रपटसृष्टीच्या ओढीने ते मुंबईत आले खरे, पण त्यांनी उभ्या हयातीत जेमतेम सहा चित्रपटांना संगीत दिले.

या सृष्टीत संगीताशी जी तडजोड करावी लागते, ती त्यांना मान्य नव्हती व मानवतही नव्हती. त्यामुळेच वैफल्यग्रस्त होऊन संगीताची करियर सोडून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण पत्नीच्या आग्रहामुळे त्यांनी हार्मोनियम विकली नाही.

याच काळात त्यांचा दत्ता कोरगावकर (के. दत्ता) या तेव्हाच्या प्रख्यात संगीतकाराशी परिचय झाला व खळेकाकांनी के. दत्ता यांचा सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. काही मराठी चित्रपटांचे स्वतंत्रपणे संगीत दिले खरे, पण ते सर्व चित्रपट डब्यातच राहिले.

अत्यंत कठीण अशा आर्थिक व मानसिक स्थितीशी सामना करत असतानाच १९५२ मध्ये त्यांच्या हाती ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेली ‘गोरी गोरी पान’ व ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ ही दोन गाणी आली. खळेकाकांनी ती स्वरबद्ध केली. गदिमांच्या शब्दाखातर ‘एचएमव्ही’ या प्रख्यात कंपनीने त्याची स्वतंत्र रेकॉर्ड काढली. ती तुफान लोकप्रिय झाली.

१ मे १९६० हा महाराष्ट्र स्थापनेचा दिवस. या कार्यक्रमासाठी कविवर्य राजा बढे यांनी दोन गीते रचली. खळेकाकांनी रात्रभर मेहनत घेऊन त्यांना चाली दिल्या. त्यातील शाहीर साबळे यांनी गायलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा’, हे गीत जणू महाराष्ट्राचे राष्ट्रगीत बनले. दुसरे गीत ‘जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, ‘जय जय राष्ट्र महान’, या गीतालाही अमाप लोकप्रियता लाभली.

१९६८ मध्ये खळेकाकांना ‘एचएमव्ही’ने नोकरीत सामावून घेतले.. तिथे त्यांची संगीत कारकीर्द अधिकच बहरली. १९७३ मध्ये ‘अभंग तुकयाचे’ ही रेकॉर्ड त्यांनी लता मंगेशकर यांच्या स्वरांत तर ‘अभंगवाणी’ पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरांत गाऊन घेतली. दोन ‘भारत रत्न’ गायकांकडून गाणी गाऊन घेण्याचा अनोखा विक्रम खळेकाकांच्या नावावर नोंदला गेला. नंतर त्यांनी या दोघांनाही एकत्र आणून ‘श्याम गुणगान’ ही भक्तीगीतांची रेकॉर्ड मुद्रित केली.

केवळ सहाच चित्रपटांना त्यांनी संगीत दिले हे खरे असले, तरी त्यातील अनेक गाणी केवळ चालींमुळे अजरामर झाली. ‘आई आणिक बाबा यातून कोण आवडे अधिक तुला’, ‘देवा दया तुझी रे शुद्ध दैवलीला’ (बोलकी बाहुली), ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे’, ‘प्रिया तुज काय दिसे स्वप्नात’, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’, `चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावणी’ (जिव्हाळा) ही गीते तुफान लोकप्रिय झालीच. शिवाय अरुण दाते व सुधा मल्होत्रा यांनी गायलेले ‘शुक्रतारा मंद वारा’ हे युगुल गीत पन्नास वर्षांनीही रसिकांच्या मनात टवटवीत राहिले. ह्रदयनाथ मंगेशकरांनी गायलेले ‘लाजुन हासणे अन् हसून हे पहाणे’ या प्रेमविव्हळ गीताने तर अनेक प्रेमवीरांच्या भावनांना स्वर दिला.

खळेकाकांना अनेक पुरस्कार मिळाले. सूरसिंगार, महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव असे अनेक पुरस्कार त्यांच्या वाट्याला आलेच, शिवाय २०१० मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्काराने त्यांच्या संगीतमय वाटचालीचा गौरव केला.

खळेकाकांचे वृद्धापकाळाने आलेल्या अल्प आजारात २ सप्टेंबर २०११ रोजी मुंबईत निधन झाले. संगीतासाठीच उभी हयात आनंदात घालवणारा एक स्वरगंधर्वच पुन्हा स्वर्गातील मैफिली सजवण्यासाठी मार्गस्थ झाला !

घनदाट जंगलातून मार्ग काढत असताना अनपेक्षित एखादा गंभीर नाद यावा आणि विशाल पर्वतावरुन कोसळणारा धबधबा दिसावा, तसे हे कृष्णभजन. पंडित भीमसेन जोशी यांचा पर्वतासम धीरगंभीर आवाज आणि आकर्षक, सुंदर धबधब्यासम लतादीदींचा मधुर आवाज जेव्हा एकत्र येतो, त्यावेळी एखाद्या महान गीताची निर्मिती होते .

पंडित नरेंद्र शर्मा यांचे गीतलेखन, एका बाजूला लता मंगेशकर व एका बाजूला, पं. भीमसेन यांच्यासारख्या दिगंत कीर्तीच्या गायकांकडून गाणी गाऊन घेऊन त्यांच्या अनुमतीने मिक्सिंग-एडिटिंग करूश श्रीनिवास खळे यांच्या प्रतिभेने श्रवणीय झालेले हे कृष्णभजन👇

आद्य कादंबरीकार हरी नारायण आपटे

“गड आला पण सिंह गेला” ही मी शाळेत शिकत असतांना वाचलेली पहिली कादंबरी. तेंव्हापासून हरी नारायण आपटे यांचे नाव माझ्या मनात तरी एक महान कादंबरीलेखक म्हणूनच कोरून ठेवलेले आहे. ते चतुरस्र साहित्यिक होते, तसेच त्यांनी केशवसुतांसारख्या इतर साहित्यिकांनाही प्रकाशात आणले. श्री माधव विद्वांस यांनी लिहिलेला गौरवपूर्ण लेख खाली संग्रहित केला आहे. त्यांचे आणि फेसबुकाचे मनःपूर्वक आभार

Madhav Vidwans

अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक ,लेखककादंबरीकार नाटककार, कवीहरीनारायणआपटे, अर्थात ह.ना. आपटे, यांचे आज पुण्यस्मरण (मार्च ८, इ.स. १८६४ – मार्च ३, इ.स. १९१९)
ते करमणूक व ज्ञानप्रकाश या मासिकांचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची लीलावती, राणी दुर्गावती इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. केशवसुतांची कविता आणि गोविंद बल्लाळ देवल यांचे शारदा हे नाटक हरीभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले.
आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले प्रभृतींचा प्रभाव होता. १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक अशा एकूण २३ कादंबर्‍या लिहिणार्‍या ह.ना. आपटयांची ‘पण लक्षात कोण घेतो?’ ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ युग म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक. हरिभाऊंनी नाटकेसुद्धा लिहिली आहेत. दोन नाटके स्वतंत्र आहेत, त्यांतले ’सती पिंगळा’ हे नाटक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उरलेली तीन नाटके व तीन प्रहसने रूपांतरित आहेत. धूर्तविलसत, मारून मुटकून वैद्यबुवा व जबरीचा विवाह ही फ्रेन्च नाटककार मोलियरच्या प्रहसनांची रूपांतरे आहेत तर, जयध्वज (मूळ व्हिक्टर ह्यूगोचे ‘हेर्नानी’), श्रुतकीर्तचरित (कॉग्रेव्हचे ’द मोर्निंग ब्राइड’) व सुमतिविजय (शेक्सपियरचे ’मेझर फॉर मेझर’) ही रूपांतरित नाटके आहेत. त्यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या तेराव्या वार्षिक सभेपुढे दिलेल्या व्याख्यानांची पुस्तिका ’विदग्धवाङ्‌मय’ या नावाखाली प्रकाशित झाली होती. ’नाट्यकथार्णव’ यामासिकासाठी त्यांनी मेडोज टेलर या इंग्रजी लेखकाच्या दोन कादंबर्‍यांची ’तारा’ व ’पांडुरंग हरी’ ही मराठी भाषांतरे केली होती. बिचारा या टोपणनावाने ह.ना. आपट्यांनी २९ मार्च, इ.स. १८८१च्या केसरीच्या अंकात कालिदास व भवभूती यांच्या संबंधांत लिहिलेल्या पत्रांतून त्यांचा व्यासंग व समीक्षा दृष्टी दिसून येते. निबंधकार चिपळूणकर यांच्या निधनानंतर हरीभाऊ आपट्यांनी शिष्यजनविलाप ही ८८ श्लोकांची विलापिका लिहिली होती. ती विद्वज्जनांनी वाखाणली होती.(विकिपीडिया मधून)
हरीभाऊ आपट्यांची ग्रंथ संपदा
आजच—–उष:काल——घटकाभर करमणूक—–कर्मयोग—–कालकूट—–केवळ स्वराज्यासाठी——गड आला पण सिंह गेला——गणपतराव——-गीतांजली—-चंद्रगुप्त—–चाणाक्षपणाचा कळस——जग हें असें आहे…—–जबरीचा विवाह—–जयध्वज—–तारा—–धूर्त विलसत—–पण लक्षात कोण घेतो?—-पांडुरंग हरी—-भयंकर दिव्य—–भासकवीच्या नाटककथा—–मधली स्थिति(आजकालच्या गोष्टी)—-माध्यान्ह—–मायेचा बाजार——-मारून मुटकून वैद्यबुवा—–मी——म्हैसूरचा वाघ—-यशवंतराव खरे—–रूपनगरची राजकन्या—–वज्राघात——विदग्धवाङ्‌मय——-शिष्यजनविलाप—–श्रुतकीर्तिचरित——संत सखू——सती पिंगळा——सुमतिविजय——सूर्यग्रहण——सूर्योदय—–स्फुट गोष्टी -भाग १ ते ४—-हरीभाऊंचीं पत्रें


पं.भीमसेन जोशी जन्मशताब्दि

तरुणपणातले पं.भीमसेन जोशी आणि वत्सलाबाई

पं.भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्यानिमित्य त्यांच्याविषयीच्या लेखांचे संकलन करण्याचा प्रयत्न आहे. सुरुवातीला त्यांनी स्वतःच लिहिलेला जिद्द हा लेख खाली दिला आहे.

पं.भीमसेन जोशी यांच्याबद्दल मी लिहिलेले लेख आणि त्यांच्या गायनाच्या ध्वनिफितींचे दुवे इथे पहावेत.
https://anandghare2.wordpress.com/2010/07/18/%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a8/

🤞💐 पंडित भिमसेन जोशी जयंती !!!!
त्यांची मराठीमधील दुर्मिळ मुलाखत !!!! गाणे म्हणजे काय ???
रियाज म्हणजे काय ???? आज गुरुवार !!!
त्यांचे संगीत ऐकतच आपले आयुष्य सम्रृद्ध होत गेले !!! त्यांचे विचारही तितकेच महत्त्वाचे आहेत !!!
म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी ही आगळीवेगळी मुलाखत !!! आपला नम्र अशोक देशपांडे !!!💐🙏
https://youtu.be/Sh_T48JIB10


जिद्द

लेखक – पं. भीमसेन जोशी
तसे जीवनात काहीतरी भव्यदिव्य करण्याचे, कुणीतरी बनण्याचे स्वप्न प्रत्येकजण आपापल्या प्रकृती आणि प्रवृत्ती धर्मानुसार रंगवीत असतोच! अर्थात, त्या प्रत्येकाचा तो संकल्प, ते स्वप्न वास्तवात साकार होतेच असे नाही. कारण संकल्प आणि सिद्धी यांमध्ये ईश्वरेच्छेचा फार मोठा सहभाग असतो. असे असते तरी एक मात्र खरे की, एखाद्याने जर आपण अमुक एक काम करून दाखवूच, मग काय वाटेल ते सहन करायला लागले तरी हरकत नाही असा दृढनिश्चय करून जिद्दीने न थांबता, न कंटाळता अथक परिश्रमाने त्या ईप्सिताचा पाठपुरावा केला, तर त्याचे ते ध्येय पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही!
जीवनात यशस्वी व्हायचे असेल, नव्हे, नेत्रदीपक यश मिळवायचे असेल तर आपण करीत असलेल्या कामाप्रती निष्ठा, आवड, प्रेम, आत्मियता आणि अर्थात त्या कामाला आवश्यक असलेले गुणही आपल्यामध्ये हवेत, त्याबरोबरच स्वतःबद्दल, स्वतःच्या गुणांबद्दल, कर्तृत्वाबद्दल प्रखर आत्मविश्वास आणि जिद्दही हवी. प्रतिकूलतेच्या भट्टीत जेव्हा ही जिद्द तावूनसलाखून निघते आणि वास्तवतेच्या ऐरणीवर भल्याबुऱ्या अनुभवांचे घाव तिच्यावर बसतात, तेव्हाच तिला खरा आकार मिळतो!
कारण केवळ स्वप्नरंजनात गुंगून जाऊन ध्येयपूर्ती होत नसते. “असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी” असे म्हणून स्वस्थ बसून केवळ मनोरथांचे इमले बांधून काहीच साध्य होत नसते, त्याने झालेच तर शेख महंमदासारखे आपलेही हसूच होऊ शकते.
जेव्हा तुम्हाला खरेच कुणीतरी मोठे बनण्याची इच्छा असते, नव्हे अशा एखाद्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षेने तुम्ही जेव्हा अंतर्बाह्य झपाटून जाता, त्यासाठी कोणतेही अग्निदिव्य करायलाही तुम्ही भीत नाही, तेव्हाच तुम्ही यशोमंदिराच्या पायऱ्या चढून ध्येयशिखर गाठण्यात यशस्वी होऊ शकता!
‘गाणं हेच आपलं जीवन आहे,’ असे बालवयातच कधीतरी मनावर ठसले गेले. ‘गाणं शिकू, नाव मिळवू’ असे एक स्वप्नही मी त्या बालवयातच बघितले होते. गाण्याने मला पार झपाटून टाकले होते. त्याच भरात मोठा गायक होण्यासाठी म्हणून मी अगदी लहान वयात दोन वेळा घरातून पळून गेलो. गुरूच्या शोधात उत्तर भारत वणवण फिरलो. उपासमार सहन केली. पडतील ती कामे निमूटपणे केली. अगदी एका गवयाच्या घरी तर बाजारातून मटण आणण्यापासून पुढचे सारे सोपस्कारही केले ते केवळ गाणे शिकायला मिळेल या आशेने!
पुढे सवाई गंधर्वांकडे गाणे शिकायला म्हणून गेलो, तेव्हा पहिले दीड वर्ष मी केवळ पडतील ती घरकामे निमूटपणे करीत असे. या घरकामांत रोज घरापासून अर्धा किलोमीटर दूर असलेल्या ३०० फूट खोल विहिरीतून रहाटाने पाणी काढावे लागे. अशा किमान १० ते १२ भल्या मोठ्या घागरी आणाव्या लागत. असे रोज पाणी भरताना पाहून गावकऱ्यांचा तर असा समज झाला होता की, सवाई गंधर्वांनी पाणी भरण्यासाठी एका पहिलवानाला आपल्याकडे नोकरीला ठेवलंय! माझ्याकडून गुरुजींचे कपडे धुणे, भांडी घासणे, पाणी भरणे अशी सारी कामे करवून घेण्यामागे माझ्या गुरूचा हेतू मला पारखून घेणे हाच असावा! अन् गाणे शिकून मी माझ्या बळावर इकडची दुनिया तिकडे करू शकेन ही माझी जिद्द होती. त्यासाठी तशी मेहनतही मी घेत असे.
पुढे जेव्हा गाणे शिकू लागलो तेव्हा मी गाणे सोडून दुसरे काहीही करीत नसे. अर्जुनाला धनुर्विद्या शिकताना पक्ष्याचा केवळ डोळाच दिसत होता तिच गत माझीही होती. मला फक्त गाणे आणि गाणेच ऐकू येत होते. असेच एकदा मल्हार रागाचा रियाझ गुरूसमोर करीत होतो. कुठेतरी स्वर नीट लागले नाहीत. स्वर जरा हलला. ते लक्षात येताच गुरूंनी शेजारच्या तबकातील अडकित्ता उचलून माझ्या दिशेने फेकला. तो नेमका माझ्या डाव्या डोळ्याखाली लागला. त्या वेळीच निश्चय केला की, “प्राण गेला तरी चुकायचं नाही! सतत सजग राहायचं!” आज चार हजारांहून अधिक मैफली होऊनही प्रत्येक मैफल ही माझी पहिलीच मैफल आहे आणि ती मी यशस्वी करीनच, या भावनेने मी जिद्दीने गायला सुरुवात करतो.
कशी कोण जाणे पण पहिल्यापासूनच माझी जिद्द अशी की जे काम हजारो, लाखो करू शकणार नाहीत ते मी काय वाटेल ते झाले तरी करीनच! मी त्याला जिद्द म्हणतो त्याला कोणी हट्टही म्हणत असतील. अर्थात ही जिद्द, हा हट्ट मी चांगल्या गोष्टीसाठीच वापरत आलो आहे. एकदा १९५८ साली दसर्याच्या निमित्ताने म्हैसूरला माझे गाणे होते. तिथे जाताना ड्रायव्हरला डुलकी लागल्याने आमची गाडी १०-१२ कोलांट्या खात साताऱ्याच्या खिंडीत ४०-४५ फूट खोल कोसळली. तेव्हाच मी ठरवून टाकले की, यापुढे ड्रायव्हिंग आपण स्वतःच करायचे. मरण यायचेच असेल तर आपल्याच हातून यावे! मग मी तो ध्यासच घेतला. तासन् तास खर्चून ड्रायव्हिंग, रिपेअरिंग शिकलो. भारतभ्रमण निदान १०-१२ वेळ स्वतः ड्रायव्हिंग करीत केले.
बडे गुलामअली खाँ साहेब काही झाले तरी रियाझात खंड पडू देत नसत. ती त्यांची एक प्रकारची जिद्दच होती. रियाझ करायला बसले की वेळेचे भान त्यांना राहत नसे. एका प्रवासात मुंबई ते कलकत्ता मी त्यांच्याबरोबर होतो. मुंबईला गाडीत बसल्यावर तंबोऱ्याची गवसणी जी निघाली ती कलकत्त्यापर्यंत प्रवास संपला तेव्हाच रियाझ संपला.
मीही गुरुगृही असताना रात्री चिमणीत रॉकेल भरून चिमणी पेटवायचो आणि मेहनतीला प्रारंभ करायचो. चिमणीतले रॉकेल संपून ती विझली की माझी स्वरसाधना थांबायची. म्हणजे एकदा रात्री बैठक मारून रियाझ सुरू करायचो ते सकाळी थांबायचो. एक तान घेतली की तीच पुनःपुन्हा तासन् तास म्हणत राहायची. एकेक जागा पक्की करून मगच पुढे जायचे. डोके अगदी दुखू लागायचे. पण एका जिद्दीच्या जोरावर मी ते अग्निदिव्यही पार केले.
प्रत्येक गाणे जमले पाहिजे, प्रत्येक मैफल रंगली पाहिजे, रसिक श्रोत्यांना माझ्या गाण्याने आनंद अनुभवता आला पाहिजे, ही माझी जिद्द! कधीकधी गळा साथ देत नाही. अशा वेळी जिद्दीला पेटून माझे गाणे जास्तीत जास्त चांगले व्हावे म्हणून प्रयत्नांची शिकस्त करतो. एकदा उन्हाळ्याच्या दिवसांत भयानक उष्म्यात जळगावला माझे गाणे होते. काही केल्या गाण्यात रंगच भरेना. साहजिकच रसिकांची दादही मिळेना. तेव्हा मग मीही जिद्दीला पेटलो. ‘ही मैफल काबीज करायचीय’ असे मनोमन ठरवून प्रचंड दमछाकची दीर्घ तान घेतली. ती तान इतकी दीर्घ होती की श्रोत्यांचेही श्वास कोंडले गेले. (हे मला मागाहून अनेकांनी सांगितले म्हणून कळले.) ती तान पूर्ण होण्यापूर्वीच रसिकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून आपल्या पसंतीची दाद दिली. त्या दीर्घ तानेमुळे आकाशात लखकन वीज चमकून जावी तशी माझ्या छातीत आलेली मोठी कळ माझ्या सर्वांगाला स्पर्शून गेली होती – हे तेथे कोणालाच कळले नाही, पण मैफल जिंकली या आनंदात मला ती तशी छातीत आलेली कळ फारच गौण वाटली होती एवढे मात्र खरे!
साठ साली पुण्यातल्या नेनेवाड्यात झालेल्या मैफलीत असाच काही केल्या रंगच भरेना. माझ्या चाहत्यांची अस्वस्थता पुन्हा एकदा माझ्या जिद्दीला डिवचून गेली. कुंडलिनीसारखी एरव्ही सुप्तावस्थेत असलेली ही जिद्द जेव्हा का जागृत होते, तेव्हा मग मी माझा उरतच नाही. त्या जिद्दीपुढे मग मला माझेही भान राहत नाही. या वेळीही असेच झाले. मध्यंतरानंतर मी साथीदारांना सांगितले, “आता बघाच मल्हार कसा फोडतो ते!” अर्थात त्यानंतर रंगलेल्या मैफलीबद्दल सविस्तर सांगायला नकोच.
एकंदर विचार करता बहुधा या जिद्दीमुळेच माझ्या अशा काही आरंभी न रंगणाऱ्या मैफली मध्यंतरानंतर मात्र अविस्मरणीय ठराव्यात इतक्या रंगत असाव्यात. काही का असेना एक खरे आहे, ते म्हणजे ही जिद्द माझ्यातील ‘अहं’ला डिवचून वेळोवेळी जागृत करते, जागरूक ठेवते, म्हणूनच मी रसिकांना आवडेल असे गाऊ शकतो.
माझे गुरू सवाई गंधर्व यांच्या एकसष्ठीच्या प्रसंगी पुण्यात हिराबागेत खास जलसा होता. त्या दिवशी अनेक नामवंत माझ्याआधी गायले, पण मैफल रंगेचना. शेवटी मी गायला बसलो, ते माझे पुण्यातील पहिलेच गाणे होते. न रंगलेल्या मैफलीला रंग भरण्याचे ते आव्हान मी मनोमनी स्वीकारले. कारण त्या मैफलीतून माझा परिचय प्रथमच पुणेकरांना होणार होता. त्यातूनही महत्त्वाचे म्हणजे गुरूंना आपली कामगिरी, आपली तयारी दाखविण्याची ही सुवर्णसंधीच मला लाभली होती. काही झाले तरी मला या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक होते. माझ्या स्वरांवर आणि गुरूंच्या आशीर्वादावर माझा पूर्णपणे विश्वास होता. त्या विश्वासाच्या बळावरच न घाबरता, न अडखळता मी ‘मल्हार’ रागाने माझ्या गाण्याला प्रारंभ केला. तोपर्यंत न रंगलेली ती मैफल कधी आणि कशी कशी रंगत गेली ते मलाही समजले नाही! गुरूंच्या कृपाकटाक्षातून मिळालेली पसंतीच्या पावतीची आठवण आजही मला रोमांचित करते. त्याच दिवशी मला पुण्यातच आणखी काही ठिकाणची गाण्याची निमंत्रणे मिळाली!
खुद्द माझ्या गुरूंना – म्हणजे सवाई गंधर्वांना – अत्यंत उच्च दर्जाची सर्जनशील प्रतिभा लाभली होती. संगीताची त्यांची जाणही कौतुकास्पद होती. पुढे त्यांचा आवाज जड झाला. पण त्यांनी जिद्दीने परिश्रमपूर्वक पुन्हा आवाजावर काबू मिळविली आणि स्वतःची अशी स्वतंत्र, बहुरंगी गायकी निर्माण केली.
एकदा केशवराव भोसल्यांनी त्यांना मिरजेला ललित कलादर्श कंपनीतर्फे गणेशोत्सवात गाण्याला बोलाविले. केशवरावांना स्वतःबद्दल आत्मविश्वास होता की, भर मैफलीत सवाई गंधर्वांवर आपण मात करू! प्रथम केशवराव गायले. मूळचा गोड आवाज आणि त्यात त्यांनी मुद्दाम उंच स्वर ठेवून तीन तास गाऊन वातावरण आपल्या गाण्याने भारून टाकले. सवाई गंधर्वांची पट्टी इतकी उंच नव्हती. म्हणून केशवरावांनी त्यांना विचारले, “तानपुरे उतरवून खालचा स्वर लावू का?” सवाई गंधर्वांनी ते नाकारत म्हटले, “नको, आज मी आपल्याच स्वरात गातो.” साऱ्यांना आश्चर्य वाटले. पण मोठ्या जिद्दीने अन् अपार आत्मविश्वासाने गाऊन सवाई गंधर्वांनी केशवरावांचे गाणे पुसून टाकले. तेव्हा गाणे संपल्यावर भर मैफलीत सवाई गंधर्वांचा सत्कार करून, त्यांना नमस्कार करून केशवरावांनी कबूल केले की, “रामभाऊंचा पाडाव करणे सोपे नाही!” असा नमस्कार ते फक्त आपल्या गुरूंनाच करीत. असा प्रखर आत्मविश्वास आणि जिद्द असलेला गुरू मला लाभला हे मी माझे अहोभाग्य समजतो. अर्थात माझ्या या जिद्दीत माझ्या पत्नीची जिद्दही तितकीच साहाय्यभूत झाली.
तात्पर्य, एका विशिष्ट ध्येयाची दिशा निश्चित ठरवून महत्त्वाकांक्षेच्या होकायंत्राच्या आधारे जीवनाचे तारू अनुभवाच्या सागरातून, प्रसंगी प्रतिकूलतेच्या वादळवाऱ्याशी झुंज देत, नैराश्येच्या लाटांवर मात करीत अथक परिश्रमाने वल्हवीत नेण्यासाठी जिद्दीचे सुकाणू आपल्या हाती हवेच – मग यशाच्या क्षितिजाचे केवळ आपणच स्वामी होणार यात काय संशय!


कालनिर्णय १९९४


🔶🔶 छायाचित्रकार सतीश माकणीकर यांनी सांगितलेली आठवण

आज त्यांच्या कित्येक आठवणींनी मनात गर्दी केलीय. त्या आठवणींचा कॅलिडोस्कोप फिरवत मी त्यांच्या आठवणी जागवतोय. सन १९८९ ची आठवण आहे. भीमसेनजी परदेश दौऱ्यावर गेले होते. जर्मनीत त्यांचे कार्यक्रम होते. माझा सख्खा काका त्यावेळी जर्मनीत व्याख्याता म्हणून वास्तव्यास होता. तेथून परत मुंबईला येताना माझ्या काकाला समजले की त्या फ्लाईटमध्ये पं. भीमसेनजीही प्रवास करत आहेत. तो तर त्यांचा एकदम ‘डाय- हार्ड’ फॅन. त्याला कमालीचा आनंद झाला. प्रवास सव्वा आठ तासांचा होता. पण त्याला राहवेना. टेक-ऑफ नंतर लगेचच त्यांना भेटायला तो त्यांच्या सीटपर्यंत पोहोचला. जर्मनीच्या हवेत तीस हजार फुटांवर आपल्याला आपल्या आवडत्या गायकाला भेटायला मिळण्याचा आनंद काही औरच ना? तेथे पोहोचल्यावर त्याने भीमसेनजींना नमस्कार केला आणि स्वतःची ओळख सांगितली- “ मी येथे बॉनला व्याख्याता म्हणून काम करीत आहे. माझं नाव डॉ. पाकणीकर!” यावर भीमसेनजी म्हणाले –   “ अरे वा! मग आमचे फोटोग्राफर पाकणीकर तुमचे कोण?” “तो माझा पुतण्या.” असं उत्तर काकाने दिले. पण त्याला त्या क्षणी झालेल्या आनंदापेक्षा त्यानं नंतर मला हा प्रसंग सांगितला त्यावेळी मला झालेला आनंद कैक पटींनी जास्त होता.

भीमसेनजींच्या पंचाहत्तरीनिमित्ताने १९९६ साली ‘स्वराधिराज’ नावाने एक ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. ग्रंथाचे हे नाव पु.ल. देशपांडे व सुनीताबाई देशपांडे यांनी सुचवलेले. त्यात भीमसेनजींच्या संग्रहातील अनेक फोटो व मी त्यांचे टिपलेले फोटो वापरले होते. त्या सर्व फोटोंचे एडिटिंगचे व त्याच्या संरचनेचे काम मी करणार होतो. त्या काळात माझ्या लँडलाईनवर त्यांचा फोन येत असे. “मी भीमसेन बोलतोय. कुठपर्यंत आलंय काम?” हा त्यांचा पहिला प्रश्न असे. त्या ग्रंथात प्रत्येक फोटोशेजारी मी त्या-त्या फोटोग्राफरचा श्रेयनिर्देश नोंदवला होता. तसेच ग्रंथाच्या शेवटी फोटोंचा क्रम, त्याचा स्वामित्वहक्क व त्याचा संग्राहक अशी सूची दिलेली होती. मराठी पुस्तकात इतिहासात असे पहिल्यांदाच होत होते. मी केलेलं हे काम त्यांना अतिशय आवडले. म्हणूनच स्वतः सही करून त्यांनी तो ग्रंथ मला भेट दिला.

त्यानंतर २००१ साली ‘स्वराधिराज’ याच नावाने मी एक प्रकाशचित्र प्रदर्शन केले व त्याबरोबर जगभरातील संगीत रसिकांना त्या प्रदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी त्याच नावाची वेबसाईटही सुरू केली. माझ्या सुदैवाने त्याचेही उद्घाटन भीमसेनजी व डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते झाले. चालण्याचा त्रास होत असूनही भीमसेनजींनी तासभर हिंडून प्रदर्शन पाहिले. माझे खूप कौतुकही केले.

सवाई गंधर्व महोत्सवाला २००२ च्या डिसेंबर महिन्यात ५० वर्षे पूर्ण होणार होती. मोठा पाच दिवसांचा कार्यक्रम करण्याचे मंडळाने ठरवले. तिकडे गणेशखिंड रोडवर ‘सवाई गंधर्व स्मारकाची’ वास्तू आकार घेत होती. बांधकाम सुरू असले तरीही काही भाग पूर्ण झाला होता. त्यातील आर्ट गॅलरीचे काम झाले होते.   मला हे कळल्यावर माझ्या मनात एक विचार आला आणि मी थेट ‘कलाश्री’ या भीमसेनजींच्या घरी जाऊन धडकलो. त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत ते बसले होते. मला दारात बघून त्यांच्या नेहमीच्या खर्जातील आवाजात ते म्हणाले – “ या …काय काम काढलं?” मी घाई घाईने त्यांना सांगू लागलो – “ आण्णा, स्मारकात आर्ट गॅलरीचे काम पूर्ण झाले आहे. माझ्याकडे १६ इंच बाय २० इंच आकारातील जवळजवळ पंच्याहत्तर कलावंतांच्या भावमुद्रा तयार आहेत. आपण जर स्मारकात त्याचं प्रदर्शन आयोजित केलं तर ते बघण्यास जेंव्हा रसिक येतील त्यावेळी स्मारक कसं उभं राहिलंय हे सुद्धा त्यांना कळेल. आणि मग महोत्सवात आपण स्मारकासाठी जेव्हा निधीच्या उभारणीचे अपील करतो त्याला रसिकांचा नक्कीच उत्तम प्रतिसाद मिळेल.” माझं म्हणणं मी जितक्या घाई घाईने त्यांना सांगितलं तितक्याच शांतपणे त्यांनी ते ऐकून घेतलं होतं. पुढची दोन-चार मिनिटं ते काही बोललेच नाहीत. माझी मात्र चुळबूळ. मग जर्दा मळता-मळता धीरगंभीर आवाजात ते मला म्हणाले – “ पाकणीकर, तुम्ही म्हणता ते खरं आहे. पण यावर्षी महोत्सवाचे स्वरूप मोठे असणार आहे. त्यामुळे आपल्याला आधीच स्वयंसेवक कमी पडणार आहेत. मग स्मारकावर कोण थांबणार? बरं दुसरं म्हणजे तेथे सळया व बांधकामाचे साहित्य पडले असणार… त्यात कोणाला अपघात झाला तर ते केवढ्याला पडेल? त्यामुळे आपण पुढे कधीतरी प्रदर्शन करू.” विषय तेथेच संपला. मी जरासा हिरमुसलो. पण त्यांनी महोत्सवाच्या प्रमुखाच्या भूमिकेतून योग्य असा विचार केला आहे हेही मला जाणवले. मी तेथून निघालो.

घरी येताना मनात विचार सुरू होते की – “ एवढा मोठा महोत्सव होतोय तर त्यासाठी आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे.” आणि मनात थीम कॅलेंडरच्या कल्पनेचा जन्म झाला. म्हणतात ना… एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडतो. माझ्या हातात बराच काळ होता. आता डिजिटल युग सुरू झालं होतं. मी बारा कलावंतांच्या भावमुद्रा निवडल्या. त्या कृष्ण-धवल निगेटिव्ह्ज स्कॅन केल्या. त्यावर संगणकीय संस्करण केले. मुंबईच्या एन.सी.पी.ए.च्या लायब्ररीत अनेकवेळा जाऊन त्या कलावंतांच्या मुलाखती वाचून त्यातून त्यांची शेलकी अशी एकेक वाक्य निवडली. मग झाली माझ्या पहिल्या थीम कॅलेंडरची डमी तयार. ती डमी कॉपी घेऊन मी परत कलाश्री गाठले. मला भीमसेनजींची प्रतिक्रिया पहायची होती. मी डमी त्यांच्या हातात दिली. आणि त्यांचा चेहरा पाहत बसलो. “हं … व्वा” अशी त्यांची दाद येऊ लागली. बाराही महिन्यांची पाने बघून झाल्यावर मी त्यांना म्हणालो- “ आण्णा, या कॅलेंडरचं प्रकाशन …. ” माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच त्यांचे उदगार आले – “ महोत्सवात केलं.” माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. ५० व्या सवाई गंधर्व महोत्सवात पहिल्याच दिवशी सवाई स्वरमंचावरून पं. भीमसेनजी व मंडळाचे सेक्रेटरी डॉ.एस.व्ही.गोखले यांच्या हस्ते ‘म्युझिकॅलेंडर २००३’ चे प्रकाशन झाले. माझ्या थीम कॅलेंडरच्या प्रवासाला मिळालेला तो भीमसेनी आशीर्वाद आहे असेच मी समजत आलो आहे. या नंतर जेव्हाही मी कलाश्री वर गेलो त्यावेळी भीमसेनजी – “ या कॅलेंडरवाले ….” असेच स्वागत करीत.

पुढे मी प्रदर्शनाबद्दल विसरूनही गेलो. एके दिवशी मला त्यावेळचे मंडळाचे सचिव गोविंद बेडेकर यांचा फोन आला. ते म्हणाले – “ प्रदर्शनाच्या तयारीला लागा.” मला काही बोध होईना. त्यावर त्यांनी सांगितले की- “आज मंडळाची वार्षिक बैठक होती. त्यात भीमसेनजींनी सांगितले की आर्ट गॅलरीत पाकणीकरांच्या फोटोचं प्रदर्शन करायचं आहे. त्यानीच गॅलरीचं उद्घाटन करू. तुम्ही तयारी करा व त्यांना तसा निरोपही द्या. म्हणून तुला फोन केलाय.” दिलेला शब्द लक्षात ठेऊन २८ ऑक्टोबर २००४ या दिवशी सवाई गंधर्व स्मारकात ‘म्युझिकल मोमेंट्स’ या माझ्या प्रदर्शनाचं उद्घाटन आण्णांनी केलं. माझं ते स्वप्नही पूर्ण झालं.

एकामागून एक आठवणी येत राहतात. त्या आपल्याला परत भूतकाळात घेऊन जातात. चलतचित्रांची मालिकाच जणू. आज आण्णा असते तर आपण सर्वांनी त्यांचा १०० वा वाढदिवस संगीतमय जल्लोषाने साजरा केला असता. शेकडो रसिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असत्या. पण मला नेहमी वाटत आलं आहे की ‘स्वराधिराज’ या ग्रंथाच्यावेळी कविवर्य विंदा करंदीकर यांनी चार ओळीत ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या समस्त भीमसेनप्रेमींच्याच प्रातिनिधिक भावना आहेत ना? कविराज म्हणतात –
प्रिय भीमसेनजी,
अमृताचे डोही । बुडविलें तुम्ही;
बुडताना आम्ही । धन्य झालों.
मीपण संपलें । झालों विश्वाकार;
स्वरात ओंकार । भेटला गा.
 

सतीश पाकणीकर / ९८२३० ३०३२०

वॉट्सअॅपवरून साभार दि. ०८-०२-२०२१

लोककवि मनमोहन नातू

आजच्या पिढीला कदाचित मनमोहन नातू हे नाव माहीत नसेल, पण त्यांनी लिहिलेली अनेक गीते माझ्या लहानपणच्या काळातले लोक गुणगुणत असत. माझे मित्र अविनाश नेने यांच्या सौजन्याने त्यांचे वॉट्सअॅपवरील लेख इथे संग्रहित केले आहेत.

Avinash Nene: आज ७ मे
उत्कट भावगीतकार आणि बंडखोर कवी म्हणून जनसामान्यांच्या मनावर मोहिनी घालणारे लोककवी मनमोहन नातू यांचा स्मृतिदिन.
जन्म. ११ नोव्हेंबर १९११ कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव या गावी
मनमोहन यांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण लोककवी मनमोहन या नावानेच ते महाराष्ट्राला माहीत आहेत. शब्दांच्या गोडव्याने गीताला मधाळ करणारा हा कवी. सहज साधे शब्द, मनाला आनंद देणारी आणि जीभेवर रेंगाळत ठेवणारी त्यांची गाणी आजही ऐकायला ताजीतवानी वाटतात. मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला हे त्यांचं अतिशय गाजलेलं गाणं आजही नववधूला लाजवते. मनमोहन नातू यांनी लिहिलेले हे गीत, वाटवे यांची चाल आणि शब्द.
‘मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला..’
नववधूला स्त्रीसुलभ भावनेमुळे मैत्रिणींच्या गराडय़ात पतीचे नाव घेताना वाटणारा लज्जायुक्त संकोच या गीतात आढळतो. ही संकोचाची भावना कवी मनमोहनांच्या शब्दांत पुरेपूर दिसून येते. या गीतातल्या नानाविध प्रश्नांतून ती अभिव्यक्त झाली आहे. ही नववधू शालीन आहे. सुसंस्कृत घरातली आहे. हे गाणे म्हणजे तिने मैत्रिणींशी केलेले हितगूजच आहे..
‘मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला
नका विचारू स्वारी कशी?
दिसे कशी अन् हासे कशी?
कसं पाडलं मला फशी?
कशी जाहले राजीखुशी?
नजीक येता मुहूर्तवेळा, काय बोललो पहिल्या भेटी
कसे रंगले स्वप्न पहाटी? कशी रंगली लाली ओठी?
कसा जाहला जीव खुळा? मैत्रिणींनो..
अर्थ उलगडे समरसतेचा, सुटे उखाणा संसाराचा
छंद लागला मजला त्यांचा,
धुंद बने बुलबुल जिवाचा
घरी यायची झाली वेळां, मैत्रिणींनो..’
राधे तुझा सैल आंबाडा, बापूजींची प्राणज्योती… ह्या त्यांच्या गाजलेल्या रचना. अतिशय साधं रहाणीमान असलेला हा कवी आपल्या कवितेत मनातील प्रतिबिब उभं करत असे. ते लिहितात, राजकीय पुरुषांची कीर्ती, मुळीच मजला मत्सर नाही । आज हुमायुन बाबरापेक्षा, गलिब हृदये वेधित राही । युगायुगांचे सहप्रवासी, अफुच्या गोळ्या, उद्धार, शिवशिल्पांजली हे त्यांच्या नावावर असलेले काव्यसंग्रह. मनमोहन यांचे पुस्तक वा पुस्तिकारूपाने प्रसिद्ध झालेले अनेक काव्यसंग्रह आहेत. त्यातले ‘ताई तेलीण’, ‘सुनीतगंगा’, ‘कॉलेजियन’, ‘शंखध्वनी’, ‘अफूच्या गोळ्या’, ‘दर्यातील खसखस’, ‘कुहू-कुहू’, ‘शिव शिल्पांजली’ हे संग्रह प्रसिद्ध आहेत. ‘दर्यातील खसखस’ या पुस्तकाचे प्रकाशक आर. बी. समुद्र लिहितात- ‘उदयोन्मुख कविपंचकात मनमोहन या तरुण व प्रतिभासंपन्न कवीचे स्थान फार वरचे आहे. आपल्या प्रखर बुद्धीने आणि विशिष्ट मनोवृत्तीने काव्यरचना करून त्यांनी प्रचलित काव्यपद्धतीला विजेचे धक्के दिले आहेत. त्यांच्याइतकी सुंदर प्रेमगीते मराठीत दुसऱ्या कोणत्याही कवीला लिहिता आली नाहीत.’ कवी ज. के. उपाध्ये यांना गुरुस्थानी मानणाऱ्या कवी मनमोहनांची कविता स्वतंत्र होती. त्यांच्या कविता तर उत्तम होत्याच; परंतु ध्वनिमुद्रिकांमधील भावगीतांतून त्यांना जास्त नाव मिळालं. वाटवे यांनी त्यांच्या काही कविता स्वरबद्ध केल्या आणि ती गाणी लोकप्रिय झाली. सर्व विषयांना आपल्या कवितेत स्पर्श करणारे लोककवी पत्नीच्या निधनानंतर आपल्या भावना शब्दबद्ध करताना म्हणतात. वृंदावनातील तुळस जळाली, मागे उरल्या दगडविटा,
त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे,
‘कलेवर कवीचे जाळू नका हो,
जन्मभर तो जळतच होता.
फुले तयावर माळू नका हो,
जन्मभर होत फुलतच होता’
यात ते स्वतःबद्दलच्या भावना हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त करताना ते दिसतात. मनमोहन नातू यांचे ७ मे १९९१ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे मनमोहन नातू यांना आदरांजली.
सं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
——————————–
Avinash Nene: कवी मनमोहन
यांची केवळ आणि केवळ अप्रतिम अशी कविता,
सावरकरांवर लिहिलेली पाठवत आहे। 👇

मी कागद झाले आहे

मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी|
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी ||१||

माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी|
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||२||

जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||३||

आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही|
मग विनायकाने त्यांची आळवणीही केली नाही ||४||

पापण्यात जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले|
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||५||

की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|”
शाई न वाळली अजुनी परंतू अभंग नदीच्या बाही ||६||

दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली|
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली ||७||

— लोककवी मनमोहन नातू.

Avinash Nene: कैदयामधला कैदी* ही रचना किती मार्मिक आहे ना,
आकाश म्हणतेय आकाशाच्या दृष्टीने, ह्या पृथ्वी तलावरील सर्वच कैदी, बंधनात असलेले, त्यात सावरकर पृथ्वी वरील आणखी एका कैदेत।
सर्वच कविता अप्रतिम आहे।

Avinash Nene: ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली

स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात एकांतवासात असताना त्यांची काव्यप्रतिभा बहरली. त्या उर्मीतच त्यांना “कमला” सारखी खंडकाव्येही स्फुरली. या कविता शब्दबध्द करण्यासाठी त्यांनी बारीबाबाकडे कागद व टाकाची मागणी केली. त्या अक्कलशून्य, बिनडोक व उलट्या काळजाच्या बारीबाबाने ती मागणी मान्य केली नाही.

सावरकरांची काव्यप्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देईना.

त्यांनी त्यांच्या कोठडीच्या छोट्याशा गवाक्षातून दिसणार्‍या आकाशाला विनंती केली की तू माझ्यासाठी कागद व्हायला तयार आहेस का? त्या घमेंडखोर आकाशाने उत्तर दिले:

तुझी लायकी आहे का माझ्याशी बरोबरी करायची? मी मुक्ततेचे प्रतिक आहे.

मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी|
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी?

माझ्यावर गरूडासारखे आकाशाचे राजे राज्य करतात आणि तू तर एक कैदी आहेस, तू माझ्यापर्यंत कविता लिहिण्यासाठी कसा पोहोचणार?

माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी|
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||

आभाळाने सावरकरांना हिणवले, “तुझ्या पायात तर जड साखळदंड आहेत. मला विचारण्यापेक्षा तुझ्याजवळ असलेल्या जमिनीलाच का नाही विचारत? ती कदाचित तयार होईल तुझ्यासाठी कागद होण्यास.”

जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||

पण ती अंदमानातील कालकोठडीची जमीनही कदाचित इंग्रजांची बटिक झाली होती. तिनेही या स्वातंत्र्यसूर्याच्या विनंतीस मान दिला नाही.

आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही|
मग विनायकाने त्यांची आळवणीही केली नाही ||

यानंतर सावरकरांनी त्यांच्या बाण्यानुसार त्यांच्याकडे मदतीची याचना केली नाही.

अश्या वेळी या प्रतिभावान स्वातंत्र्यसूर्याची अवस्था कशी झाली असेल? सर्व जगावर संताप झाला. आकाश व जमीन यांचा प्रचंड राग आला. यामुळे डोळ्यात अश्रू आले, पण संतापामुळे त्यांच्या ठिणग्या झाल्या. हनुमानाने लंका जाळली तद्वत सर्व जग जळेल इतका संताप त्या डोळ्यातून व्यक्त झाला.

पापण्यात जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले|
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||

मनात विचारांचे काहूर उठले. माझ्या कवितेचा हा प्रपात झेलालयला कोण तयार आहे? स्वर्गातून पृथ्वीवर गंगौघ येत आहे. कोण तयार आहे हा भार झेलायला? जर हिमालयासारखा कणखर व बलदंड आधार तयार नसेल तर ही गंगा या पृथ्वीवर येईल का?

की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|
शाई न वाळली अजुनी परंतू अभंग नदीच्या बाही ||

तुकाराम महाराजांच्या गाथेचे प्रक्तन जसे इंद्रायणीच्या डोहात बुडणे होते, तसे तर माझ्या काव्याचे नाही ना?

पण अश्या वेळी अचानक एक चमत्कार झाला. त्या कालकोठडीच्या दगडाच्या भिंती पुढे सरसावल्या आणि म्हणाल्या:

दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली|
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली |

यापुढील इतिहास आपणास ठावूक आहेच।

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील ही अप्रतिम कविता लोककवी मनमोहन नातू यांची आहे.
************************

श्री.माधव विद्वांस यांनी १४ विद्या ६४ कला या समूहावर लिहिलेला हा लेख
Madhav Vidwans14vidya_64kala

कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा,.आपण गाणी ऐकली असतात पण त्याचे गीतकार कोण आपल्याला माहीत नसते. हे गीत लिहिणारे मनमोहन नातू ऊर्फ गोपाळ नरहर नातू यांचे आज पुण्यस्मरण (जन्म ११ नोव्हेंबर, इ.स. १९११ निधन ७ मे, इ.स. १९९१) हे एक मराठी कवी होते. लोककवी मनमोहन या नावाने ते अधिक प्रसिद्ध होते. मीनाक्षी दादरकर हेही त्यांचे एक टोपणनाव होते. त्यांनी अंदाजे ५,००० मंगलाष्टकेही लिहिली, भविष्यही लिहिले आणि याशिवाय त्यांनी कादंबऱ्या आणि लघुकथाही लिहिल्या. डॉन ब्रॅडमनवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केली आहे. त्यांच्या आठवणी सांगणारे आठवणीतील मनमोहन (लेखिका : संध्या देवरुखकर) हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनातर्फे २८-६-२०११ ला प्रकाशित झाले. या पुस्तकात भा.द. खेर, रमेश मंत्री, रॉय किणीकर, प्रा.शंकर वैद्य, शं.ना. नवरे वगैरेंनी वेळोवेळी मनमोहन नातूंवर लिहिलेले लेख आहेत. जयवंत दळवी यांनी घेतलेल्या मनमोहन यांच्या मुलाखतीचाही या पुस्तकात समावेश केलेला आहे. जयवंत दळवी यांनी नातूंचे वर्णन चंद्र-सूर्याची बटणे खमिसाला लावणारा माणूस असे केले आहे.(विकिपीडिया)

मनमोहन नातूंच्या गाजलेल्या कविता
आमुचे नाव आसू गं—-आरसा फोडलात तुम्ही, आता वेणी घाला माझी—-कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा—जेव्हा पदराला ढळत्या, पदाराला तू दिलास झटका, लांब सडक तिपेडी, तुला वेणीचा मारला फटका—-ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती—-मी मुक्तांमधला मुक्त आणि तू, कैद्यांमधला कैदी । माझे नि तुझे व्हायचे कधी ते, सूर कसे संवादी ॥|—–मैत्रिणिंनो सांगू नका नाव घ्यायला—विश्वाशी मीं वैर धरिले, कान्हा कोणासाठी? दुनियेशी मीं दावा धरिला, लाला कोणासाठी?—शव हे कविचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता । फुलेही त्यावर उधळू नका हो,—जन्मभरी तो फुलतच होता—–हळूहळू बोल कृष्णा हळूहळू बोल.—ती पहा, ती पहा, बापुजींची प्राणज्योती—-तारकांच्या सुमनमाला देव त्यांना वाहती
मनमोहन नातू यांचे गद्य लेखन
छत्रपती संभाजी (कादंबरी, १९७०)—संभवामि युगे युगे (संभाजीवरील कादंबरी, १९७०)—तोरणा—प्रतापगड—आग्ऱ्याहून सुटका—सूर्य असा मावळला—छत्रपती राजाराम—छत्रपती शाहू
******************************************
ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती
झुंजला राजासवें हा, रंगला रंकासवें हा
पेटता देहेहि आता दिव्यता दावून जाती
चंदनाचे खोड लाजे हा झिजे त्याहूनही
आज कोटी लोचनींच्या अश्रुमाला सांडताती
पृथ्वीच्या अक्षाशी लाली, पृथ्वीच्या रेखांशि लाली
चार गोळ्या ज्या उडाल्या दशदिशांना कापताती
नाव ज्याचे ऐकुनिया थरकली सिंहासने
ना जरी तलवार हाती हा अहिंसेचा पुजारी
सत्य मानी देव आणि झुंजला खोट्यासवे हा
मृत्युच्या अंतीम वेळी नाम रामाचे मुखी
सिंधु गंगा आणि यमुना धन्य झाली अस्थिंनी
राख तुझी भारताच्या तिलक झाली रे ललाटी
*********************

नवी भर दि. ३०-०१-२०२२ :

लोककवी मनमोहन नातू हे नाव आताच्या नव्या पिढीला फारसे परिचित नसेल. एकेकाळी एका पिढीला वेड लावतील अशा कविता त्यांनी लिहिल्या होत्या .२ ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधींच्या जन्मदिनी त्यांची आठवण होणे याला एक खास कारण आहे. ते कारण असे की एकेकाळी क्रमिक पाठ्यपुस्तकात बापूजींवर लिहिलेली त्यांची कविता बर्‍याचजणांच्या शाळकरी दिवसाची आठवण असेल. ती कविता म्हणजे :

ती पाहा ती पाहा । बापूजींची प्राणज्योती ||
तारकांच्या सुमनमाला । देव त्यांना वाहताती ||

कवि मनमोहन यांना पैसा आणि व्यवहार याबद्दल फारसे प्रेम नव्हते. गरजेपुरता पैसा हाताशी असला की ते त्यांच्या लेखनात मग्न असायचे. पुढची गरज उभी राहिली की अगदी आठवड्याच्या रेशनपाण्यासाठी त्यांची वणवण सुरु व्हायची. अशाच एका दिवशी त्यांच्या पत्नीने हातात चार पिशव्या देऊन आठवडाभराचे रेशन घेऊन यायला सांगीतले. पत्नीने सांगीतले आणि मनमोहन यांनी ऐकले. पण पैसे कुठे होते खिशात? त्या काळी एका आठवड्याच्या धान्यासाठी साडेसात रुपये त्यांना लागायचे. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांच्या खिशात ते पण नव्हते. मग काय? नेहेमीप्रमाणे त्यांनी त्यांचे कविता लिहिलेले कागद घेतले आणि वर्तमानपत्र -मासिकांच्या संपादकांना भेटले. या पाच कविता घ्या आणि साडेसात रुपये द्या असा त्यांचा नेहेमीचा प्रस्ताव असायचा. त्या दिवशी काय झालं याची कल्पना नाही, एका संपादकांनी नको तुमच्या प्रेमकविता आता असे म्हणत त्यांना परत पाठवले. दुसरे संपादक म्हणाले तुमच्या आधीच्याच दोन कविता आमच्याकडे शिल्लक आहेत. एकूण हिशेब काय, तर पैसे नाहीत!!
मग मनमोहन यांना एक कल्पना सुचली. ते त्या काळच्या एका सुप्रसिध्द गायक -संगीतकारांकडे गेले.ते त्यांच्या कामात मग्न होते . त्यांनी काय काम आहे म्हटल्यावर कवी म्हणाले माझ्या कविता घ्या आणि रेशनपाण्यासाठी साडेसात रुपये द्या. ते गायक -संगीतकार त्या काळचे भावगीतांचे स्टार गायक गजाननराव वाटवे! त्यांनी मनमोहन यांना वाटेला लावण्यासाठी सांगितलं तुमच्या प्रेमकविता मला नको आहेत. असे त्यांनी म्हटले खरे ,पण त्यांच्या मनात एक विचार आला.

तो काळ म्हणजे १९४८ सालचा फेब्रुवारी किंवा मार्च महिना असावा. नुकताच महात्मा गांधींचा खून झाला होता. लोकभावना गांधींजीच्या हत्येमुळे व्याकुळ झाल्या होत्या. जर गांधीजींवर एखादे गाणे मिळाले तर ते लोकप्रिय होईल. याच विचाराने ते मनमोहन यांना म्हणाले ‘ मला तुमच्या प्रेमाबिमाच्या कविता नकोत – तुम्ही घरी जा – उद्यापर्यंत मला गांधीजींवर एक कविता लिहून आणून द्या. तुम्हाला साडेसात रुपये हवेत ना? गांधीजींवर कविता द्या, मी तुम्हाला पंधरा रुपये देतो.

मनमोहन यांनी मिनिटभर विचार केला आणि म्हणाले गांधीजीवर कविता लिहायची तर त्यासाठी उद्याची वाट का बघायची, आताच लिहून देतो. गजाननराव वाटव्यांची मुलगी तिथेच अभ्यास करत बसली होती. तिच्याच वहीचा एक कागद घेऊन त्यांनी भराभर लिहायला सुरुवात केली आणि वर उल्लेख केलेली कविता जन्माला आली.

ती पाहा ती पाहा । बापूजींची प्राणज्योती ||
तारकांच्या सुमनमाला । देव त्यांना वाहताती ||
चंदनाचे खोड लाजे । हा झिजे त्याहूनही ||
आज कोटी लोचनीच्या । अश्रुमाला सांगती ||

या कवितेसाठी गायकांनी त्यांच्या हातावर पंधरा रुपये ठेवले. मनमोहन यांची रेशनपाण्याची समस्या संपली होती.
गजाननराव वाटव्यांनी त्या कवितेला सुंदर चाल दिली. या कवितेची रेकॉर्ड रातोरात खपली. वाटव्यांना त्या गाण्याचे १७,००० रुपये मिळाले. कवी मनमोहन मात्र त्यांच्या १५ रुपयांवर खूश होते.

आज २ ऑक्टोबरला ही कविता म्हणताना बापूजींच्या सोबत लोककवी मनमोहन यांची ही आठवण खास आमच्या वाचकांसाठी!!    . . .  नेटभेट या संकेतस्थळावरून साभार दि.०-०१-२०२२

🌹🔆🥀👁❣👁🥀🔆🌹
मैत्रीणीं मध्ये कुठल्या तरी एका मुलीचे प्रथम लग्न होते अन् मग आपलाही बोहल्यावर चढण्याचा दिवस जवळ आलाय याची खात्री पटते कारण घरचे त्यासाठी जास्तच मागे लागणार हे ठाऊकच असते.
मग ज्या या मैत्रीणीचे लग्न झालेय तिच्या संसारा विषयी.. विशेषतः तिच्या नवऱ्या विषयी औत्सुक्य आणि कौतुकही असते. अगदी काल काल पर्यंन्त आपल्या बरोबर राहणारी.. बागडणारी ही मैत्रीण चक्क जन्मभर आता कुणाची तरी झालीय. तिचा नवरा आहे तरी कसा वागायला ? प्रेमळ की खडुस ? चिडतो का शांत राहतो ? कंजुष आहे की कर्ण ? असे ना ना प्रश्न त्यांना पडतात.
मग या मैत्रिणी तिला सतरा प्रश्न विचारुन अगदी तिला भांडावून सोडत आहेत. नवरीला पण स्वप्नातही न पडणारे असेही काही प्रश्न, अर्थातच मैत्रीच्या प्रेमळ हक्काची झालर असलेले गमतीदार.
या मैत्रीणींनी तिला उखाण्यात नाव घ्यायचा आग्रह धरलाय. या स्वारीने तुला कसे मोहित केलंय. पहिल्या भेटीत तुम्ही काय बोललात.. कोणती स्वप्न रंगवलीत वगैरे वगैरे..
खरं म्हणजे ती लाजतेय, पण ही थट्टा तिलाही आवडतेय. ती नवऱ्यावर एवढी खूष आहे की तिचा जीव जणू बुलबुल पक्षागत त्याच्या मागे धावतोय. आता तो घरी येणार म्हणून तिला जाण्याची घाई आहे.
🌹🔆🥀👁❣👁🥀🔆🌹

मैत्रिणिंनो, सांगू नका नाव घ्यायला ॥धृ॥

नका विचारू स्वारि कशी ?
दिसे कशी, अन्‌ हासे कशी ?
कसं पाडलं मला फशी ?
कशी जाहले राजिखुशी ?
नजीक येता मुहूर्तवेळा ॥१॥

नका विचारू गमतीजमती
काय बोललो पहिल्या भेटी ?
कसे रंगले स्वप्न पहाटी ?
कशी रंगली लाली ओठी ?
कसा जाहला जीव खुळा ? ॥२॥

अर्थ उलगडे समरसतेचा
सुटे उखाणा संसाराचा
छंद लागला मजला त्यांचा
धुंद बने बुल्बूल जिवाचा
घरी यायची झाली वेळा ॥३॥

🌺🥀🌸🌿🌺🌿🌸🥀🌺

गीत : मनमोहन नातू ✍
संगीत : गजानन वाटवे 🎹
स्वर : रंजना जोगळेकर 🎤 . . . . . वॉट्सॅपवरून साभार दि.२९-०३-२०२२

जागतिक पुस्तक दिन

आज जागतिक पुस्तकदिन आहे. यानिमित्य या विषयावरील लेख आणि सुवचने.

562px-विलियम_शेक्सपियर
जगप्रसिद्ध लेखक शेक्सपिअर यांचा जन्मदिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. शेक्सपिअर यांचा जन्म (23 एप्रिल 1564 ) व योगायोगाने मृत्यूदिनही तीच तारीख (23 एप्रिल 1616).जन्मगाव व मृत्यूगावही एकच.जन्म मृत्यूची तारीख व जन्म मृत्यूचं ग्राम एकच असा योग शेक्सपिअरच्या बाबतीत घडून आला.शेक्सपिअरच्या शरीरधर्माला भूतलावर अवघं पन्नाशीचं आयुष्यमान लाभलं पण लेखनानं निर्माण केलेलं कीर्तीमान अमर ठरलं आहे.
लेखन क्षेत्रात सर्वोच्च कीर्ती(प्रसिद्धी) व सर्वोच्च श्रीमंती (आर्थिक सुबत्ता) लाभलेला बहुधा हा एकमेव माणूस.38 नाटकं व 154 कविता ही त्यांची लेखन संपदा.38 नाटकांपैकी 10 नाटके ऐतिहासिक ,16 नाटके सुखात्मक व 12 नाटकं शोकात्मक. शेक्सपिअरच्या साहित्य संपदेचं वैशिष्ट्य म्हणजे जगात ज्ञात असलेल्या सर्वच भाषांत त्यांची पुस्तके अनुवादित झालेली आहेत अनेक भाषेत चित्रपट व नाटके रंगभूमीवर सादर झालेली आहेत.रोमिओ आणि ज्यूलिएट ही तर अजरामर प्रेमकहानी .आजही प्रेमाचं वारं पिऊन भरार भरारी स्वप्न रंगवणा-या तरुण तरूणीला लोकं रोमिओ-ज्यूलिएट असं म्हणतात.कोवळ्या वयात रंगवलेले प्रेमाचे कथानक व दुर्दैवी अंत हे या नाटकाचे सूत्र लोकांना इतकं भावलं की चारशे वर्षानंतरही तीच भावना जगाच्या पाठीवर मानवी भेदाच्या सर्व पाय-या ओलांडून मनामनात कायम आहे.अन् त्याचं अमरत्व इतकं अबाधित आहे की ,सृष्टीवर मानवी अंश असेपर्यंत प्रेमातला संघर्ष व त्यातली ओढ रोमिओ-ज्यूलिएटनेच अधोरेखित होणार आहे.हॕम्लेट ,किंग लिअर,मॕक्बेथ,अॉथेल्लो ही नाटकेही अशीच मानवी जीवनातील कटकारस्थाने,घातपात,विश्वासघात,व प्रेम ,सत्य अशा मूल्यांतील पराकोटीचा संघर्ष पेरणारी.जगावं की मरावं ? That is the question. हा प्रश्न सातासमुद्रापल्याडच्या सर्वच रंगभूमीवर शेक्सपिअरने नेला.याला म्हणतात प्रतिभेचं अमरत्व.
वाचनाशी माणसाची मैत्री असावी.मोठ्या रस्त्याने दुतर्फा लावलेली झाडे पांथस्थास जशी सावली देतात व सुखाच्या प्रवासात सोबतीने भागीदारी करतात तसं मानवी जीवनप्रवासात पुस्तके ही जीवनप्रवास समृद्ध करतात.सर्जनशीलतेचा महामार्ग पुस्तकांच्या पानापानांतूनच जातो.आपल्या मराठी भाषेतही विपूल साहित्यसंपदा उपलब्ध आहे.
वि.स.खांडेकर,वि.वा.शिरवाडकर.पासून आज पर्यंतच्या भालचंद्र नेमाडे यांच्या पर्यंत…रविन्द्रनाथ टागोरापासून गुलजारसाहेबांपर्यंत..
कन्नड भाषेतही दिग्गज लेखक आहेत.शिवराम कारंथासारख्या लेखकाची पुस्तके अनेक भाषांत भाषांतरीत झाली आहेत…
लिहणारे लिहीत जावे…
वाचणा-याने वाचत जावे
कधीतरी वाचणा-याने लिहणा-याचे शब्द घ्यावे
इतकं सुंदर👌🏻 आहे हे वाचणं.
वाचनाने आपली भाषा,विचार समृद्ध होत जातात.
माझ्याकडे इतकी संपत्ती ,इतका जमीनजुमला आहे.असले फुकाचे अंहकार वाचनाने पार नष्ट होऊन जातात.विचारांची ही श्रीमंती तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
वाचनाने विचार आणि वाचा यांत प्रगल्भता येते.
म्हणून वाचाल तर वाचाल
समृद्धीपणे जगाल
आज आपल्याला कोरोनासारख्या रोगाने दाखवून दिलय.माणसाच्या बेसिक गरजा अत्यंत थोड्या असतात…
आतातरी आपण विचारांनी समृद्ध होऊ या.
आपणा सर्वांना सखीसंपदा परिवाराच्या वतीने जागतिक पुस्तकदिनाच्या शुभकामना
💐💐💐
वॉट्सअॅपवरून साभार दि.२३-०४-२०२०

शेक्स्पीअरचे एक सुवचन : चाकूऐवजी प्रत्येक हातांत असेल जर पुस्तक, तर दुनिया होईल नतमस्तक. 
——-

पुस्तक दिन

जागतिक पुस्तक दिन

२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आणि जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही! वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच. वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यांचा अकारण सकारण संबंध जोडला जातो आणि संबंधाचा सबळ पुरावा देण्यासाठी अलीकडच्या मुलांच्या वाचन सवयीवर अमर्याद चर्चा होऊन पूर्णविराम दिला जातो. अलिकडची मुलं वाचत नाहीत. मुलांना पुस्तक उपलब्ध नाही. ही विधाने जितकी खरी वाटतात तितकेच प्रश्नही निर्माण करतात व तिथेच थांबतात. मात्र आजच्या दिनाच्या औचित्याने आडातले पोहणा-यांना नक्कीच आणता येईल.

एखाद्या गोष्टीची सवय किंवा शिस्त लावायची असेल तर ती आपण टाकून ठोकून लावू शकतो. सकाळी एक तास व्यायामाची सवय व्यायाम करायला लावून लागू शकते. पण व्यायामाची गोडी त्याने निर्माण होणार नाही. वाचनाच्याही गोडीचं तसंच आहे. मुलांना ”आता वाचत बसा बरं का रे! उगीच हुदंडू नका!” असं म्हणून खोलीत कोंडून घातलं तर मुल वाचतील, कारण दुसरा पर्याय नाही आणि पुस्तक हातात आहेत पण वाचनाचा आनंद अशा सक्तीच्या वाचनाने कसा मिळेल? वाचन ही फक्त क्रिया घडेल. त्या कृतीचा आनंद मिळणार नाही. वाचनाची गोडी लागून आनंद निर्माण व्हायला तसं वातावरण असणं ही मुलगामी गरज आहे. त्यादृष्टीने पालक, शिक्षक, ग्रंथपाल सर्वांनाच महत्वाची भूमिका बजावता येईल. पालकाचाच विचार करायचा झाला तर किती घरात मुलांना वाचनासाठी उदयुक्त केलं जातं? ”अभ्यास कर!” हा मंत्र सतत मुलांच्या कानावर बिंबवला जातो. अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तके मुलांना घेऊन देणं हे सामान्यत: घडत नाही. याला काही सुजाण पालकांचे अपवाद असतीलही, पण सामान्यता अभ्यासाचं पुस्तक घेऊन मुलं बसली आहे. आई वडील ते कौतुकाने बघताहेत अशावेळी त्यांच्या तोंडावर समाधाना फुललेलं दिसेल. तेच मुल इतर कुठलं पुस्तक हातात घेऊन बसलेलं दिसलं की कंपाळावर सुक्ष्म आठया चढल्याच! ”काय रे काय वाचतो आहेस?” परीक्षाजवळ आली आहे ना? अभ्यास झाला का? हा प्रश्न येतोच. परीक्षा जवळ आली की मुलांनी फक्त अभ्यासाची पुस्तकं वाचायची? अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी थोडावेळ इतर वाचनात घालवणं गरजेचं असणं हे पालकांना का समजू नये?. सतत एक तंत्री काम असलं की मोठी माणसं विरंगुळा म्हणून दुसरं काही तरी शोधतातच. मुलांनाही असा विरंगुळा मिळाला तर ती जास्त ताजीतवानी होऊन तल्लख मेंदूने अभ्यास करतील.किती पालक स्वत: पुस्तकं वाचतात? घरात मोठी माणसं पुस्तक वाचन करीत असतील तर लहानपणापासून मुलाला वाचन या क्रियेचं कुतूहल निर्माण होतं. आई-वडील किंवा घरातलं मोठं माणूस पुस्तक वाचत असेल तर एखादं दोन-तीन वर्षाच मुल त्यावेळी अगदी गप्प राहून मिळेल तो कागदाचा कपटा पुढे ठेवून वाचण्याचे नाटक करतं. एका परीने ते मोठयांच अनुकरण करतं. पण त्याचबरोबर वाचण या गोष्टीत काही तरी वेगळं आहे, काहीतरी आनंददायी आहे, त्यात रंगून जाणं याला खात्रीचा काहीतरी अर्थ आहे हे त्या बालमनात नकळत रुजण, वाचनाची गोडी निर्माण होण्याची पहिली पायरी इथे सुरू होते.

खरं तर घरातली मोठी माणसं आणि मुलं एकाचवेळी शांतपणे वाचत बसली आहेत हे दृश्य टिपून ठेवण्यासारखं आहे. पण हे किती घरात घडतं? ”मुलांच्या आणि आमच्या वाचनाच्या वेळा जमत नाही”. हे कारण नेहमीचच.मुलं टिव्ही बघतात, त्यांच्यावर नको त्या कार्यक्रमांचे परिणाम होत असतात. असे म्हणणा-या पालकांनी टिव्हीला सुंदर पुस्तकांचा पर्याय मुलांना दिला आणि वाचनासाठी शांत जागा आणि वातावरण उपलब्ध करून दिलं तर टिव्हीकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. मोठया घरांमध्ये स्वतंत्र खोली देणंही शक्य असतं मात्र ती खोली त्यांच्या आवडत्या पुस्तकांनी भरलेली असायला हवी. असा प्रयोग केलेला आणि सफल झालेला आहे. ज्यांनी केला नाही त्यांनी करून पाहण्यासारखा आहे.

बाललेखिका लीलाताई भागवत यांनी मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी सांगितलेला (मराठी बालसाहित्य, प्रवाह आणि स्वरूप) प्रयोग आज दशक बदलले तरी या प्रयोगातले संदर्भ मात्र तेच लागू होतात असे वाटते. याच अनुषगांने मुलांच्या वाचनासाठी धडपड करणारे काही प्रयोग व मुलांचे वाचनाचे काही अनुभव –

नीला कचोळे एक गृहिणी. तिचा मुलगा आता इंजिनिअरींग शिकतोय. नीलाला वाचनाचा संस्कार तिच्या वडिलांकडून मिळाला. साहजिकच वाचनातील आनंद मुलालाही मिळावा, सवय लागावी म्हणून सुरूवातीला तिने मुलाला पुस्तक आणून देण्याचं काम केलं. तेव्हा रशियन जुनी पुस्तक खुल्या स्टॉलवर, गाडीवर मिळायची. रिकाम्या वेळात नीला पुस्तकं त्याच्या पुढयात टाकू लागली. स्वत: नीलाने ‘इनव्हिझीबल मॅन’ तिस-या इयत्तेत असतांना वाचलं होतं. त्याचा मराठी अनुवाद नीलाने मुलाला वाचायला दिला. पण तो काही केल्या वाचेना, पुस्तकांकडे वहेना. नीला म्हणते, “मी जाम घाबरले, अवांतर वाचन नाही म्हणजे काय? आपला मुलगा वाचनातील आनंदाला पारखा राहील या भीतीनेच नंतर मी अशा अनेक दुपार घालवल्या. मग भलेही वाचू नकोस पण पाच मिनिट पुस्तक समोर धर. तो अगदी अळमटळम करायचा. पण घेऊन बसायचा. शिवाय मी एक करायची त्याला वाचून दाखवताना इंटरेस्टिंग भाग आला की वाचन थांबवायच. एक दिवस असंच केलं असतांना मुलाने पुस्तक अक्षरश: हातातून ओढून घेतलं नी वाचायला लागला. तेव्हापासून आजपर्यंत वाचतोच आहे. टेक्निकल साईड आहे, तरी प्रचंड वाचतो. त्याला वाचनाची सवय लावतांना केलेल्या सक्तीच्या प्रयोगाचं आता हसायला येत खरं पण मनोरंजनाचा एक हक्काचा मार्ग आपल्या मुलाला दाखवला याचं समाधान वाटतं.”

भाग्यश्री केंगे, स्वत: सॉफ्टवेअर व्यावसायिक. मुलाना वाचन सवय लावताना तिने शास्त्रीय आधार घेतलाय. मुळातच भाग्यश्रीचा गर्भसंस्कारावर विश्वास आहे, पंरतू सध्या गर्भसंस्कारासाठी जी पॅकेजेस उपलब्ध आहेत, त्यापेक्षा वय वर्षे ६ पर्यंतची मेंदू विकसनाची प्रक्रिया तिला महत्वाची वाटते. मेंदूचा विकास व्हायचा असेल तर त्याला खाद्य् पुरवायला हवं. भाग्यश्रीने याबाबत एक नवखा प्रयोग केलाय. मुलं लहान असतानाच त्यांच्या खेळण्यात पुस्तकांची ओळख करून दिली. त्याचा परिणाम असा झाला की मुलगी दीड वर्षाची असल्यापासून शब्द ओळखायला लागली व नंतर मुळाक्षर शिकली. भाग्यश्री म्हणते, ” आमच्या घरची पुस्तकं कधीच आवरून ठेवण्यासाठी नसतात. चोवीस तास पुस्तकाचं कपाट उघड असतं. कदाचित तो पसारा वाटेल, पण माझ्यासाठी मुलांच्या खोलीतलं ते त्याचं अवकाश आहे. तसेच पुस्तकं जशी वाचायची असतात तशी ती जपायचीही असतात. हे मुल्य ही जाणिवपूर्वक मुलांमध्ये रूजवलयं. त्यामुळे वाचनालयाचं फाटक पुस्तक घरी आलं तरी ते दुरूस्त करून दिलं जातं. मुलां-मुलांमध्येच पुस्तकांची देवाण घेवाण होण्यासाठी पुस्तक भिशीचा प्रयोगही भाग्यश्रीने केलाय. दर महिन्याला माझ्याकडे कोणाचं पुस्तक येणार इथपासून ते त्या पुस्तकात काय आहे? कसं आहे? आवडलं इ. पर्यंत आपोआपच चर्चा मुलांमध्ये सुरू होणे. मुलांचा कल, वय, आवड, भाषा, आजूबाजूचं वातावरण बघून मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी पुस्तक निवडणं यात पालकाचं कौशल्य आहे. भाग्यश्री म्हणते, ” सहा रूपयाची पालक जुडी घेताना पालक पनीरच्या डिशसाठी सत्तर रूपये विना तक्रार मोजले जातात. पुस्तक विकत घेतांना खुपदा असंच काहीसं घडतं आणि मग अगदी सुमार रंगीत चित्र नसलेली, अनाकर्षक पुस्तकांत रमायला मुलं का कू करतात.”

पुस्तक आणि मुलांसाठीचा इलेक्ट्रॉनिक मिडीया अगदी हातात हात घालून मैत्री करू शकतात. उदा. काही पुस्तकांच्या वेबसाईट उपलब्ध आहेत. त्यावरील चित्र दाखवून मुलचं पुस्तक वाचण्याचं औत्सुक्य वाढवता येऊ शकेल. इ-बुकची ओळख करून देऊनही त्याच कार्यक्रमांच्या पुस्तकांबाबत मुलांना माहिती करून देता येईल. असे विविध प्रयोग भाग्यश्री करते. अगदीच सगळं मुल्यांवर आधारलेलं, पारंपारिक, पंचतंत्रातलं असायला हवं असा आग्रह नाही. मुलं अशातच रमायला हवी, त्या आशयातून त्याच बालविश्व समृध्द व्हायला हवं नि त्याचं पोषण व्हायला हवं एवढच!

पुलंच्या गटण्याप्रमाणे, इयत्ता दहावीतील अमोघ पुस्तक वेडा. खरं तर पुस्तक वेडा म्हटल्यावर त्याचं कौतुक वाटायला हवं. पण या कौतुकाच्या मागे पुस्तकाचा शोधलेला आधार. नोकरीनिमित्त आईपासून दुरावलेला व आजीच्या सहवासात वाढणा-या अमोघने आपोआप पुस्तकांना जवळ केलय. एकटेपणा घालविण्यासाठी अमोघ हातात पडेल ते वाचून फस्त करतो. वाचनाचं वेड, सवय, लागण्याचं कारण काही का असेना पण वाचन क्रिया व यातून मिळणारा आनंद मुलांना समजायलाच हवा. पुढे मुलांनी त्याचा उपयोग कसा करायचा ते त्यांनी स्वत: ठरवावं. पण वाचनक्रिया व त्यातील आनंदाची ओळखच झाली नाही, रूजली नाही तर सुंदर अनुभवाला मुलं वंचित राहतील हे मात्र नक्कीच!

– सुलभा शेरताटे (नाशिक)
मराठी वर्ल्डवरून साभार दि. २३-०४-२०२०

पुस्तक दिनाच्या निमित्ताने

पुस्तकाचे तुज । काय सांगू महत्त्व । अक्षरांचे एकत्व । अंतरीचे ।। 1 ।।
अक्षरांचा शब्द । कैसी ही जोड । चारांची अजोड । व्हावी वाचा ।। 2 ।।
वैखरीस यावा । लिपीचा आकार । परेचा ओंकार । अनंत कोटी ।। 3 ।।
‘सत्य असत्यासी । मन करता ग्वाही’ । माझीही वही । जाहले पुस्तक ।। 4 ।।
ग्रंथाने तुमचे । भरोन जावो घर । संतांचे अक्षर । मनी राहो ।। 5 ।।
संताक्षरे तुमची । जडो वाचा शुद्धी । सत्य वचने बुद्धी । अंगी बाणो ।। 6 ।।
तुका ज्ञानियांचा । लागो जीवा छंद । विश्वशांती आनंद । विश्वा नांदो ।। 7 ।।

  • प्रदीप कर्णिक
    23 04 2021
    जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
  • वॉट्सॅपवरून साभार

जागतिकपुस्तकदिनाच्याशुभेच्छा ! 📚📖 बडोदा येथे त्याकाळात महाराजसयाजीरावगायकवाड यांनी फिरते वाचनालय सुरू केले होते. ते प्रकाशक आणि लेखक यांचे पोशिंदे होते.(खाली फोटो आहे). तंजावरयेथीलसरस्वतीमहालग्रंथालयाची स्थापना शिवाजी महाराजांचे वंशज सरफोजी महाराज दुसरे यांनी केली.(खाली फोटो आहे) हे ग्रंथालय संपूर्ण जगातले मध्ययुगीन काळातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथालय मानले जाते.या ग्रंथालयात ४९,००० ग्रंथ आहेत आणि सुमारे ४६,००० हस्तलिखिते संग्रहित केलेली आहेत. त्यातील काही प्राचीन असून भूर्जपत्रांवर व ताडपत्रांवर लिहिलेली आहेत. त्यात मध्ययुगीन काळातील वाल्मीकी रामायण, कंब रामायण व इतर पुरातन ग्रंथांच्या ताडपत्रावरील आवृत्त्या आहेत. कागदांवर लिहिलेल्या हस्तलिखितांमध्ये इसवी सन १४६८ मध्ये लिहिलेले भामती, भगवद्गीतेचे सर्वात लहान आकारातील हस्तलिखित, अंबर होसैनी या मुसलमान कवीने केलेले भगवद्गीतेचे मराठी निवेदनाचे हस्तलिखित, तत्त्व चिंतामणी हा बंगाली लिपीतील संस्कृत ग्रंथ यांचा समावेश आहे.
वाई येथे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी विश्वकोशासाठी संदर्भासाठी लायब्ररी केलीह ६०चे दशकात महाराष्ट्रामधील पुणे मुंबई नंतर लाखाचेवर ग्रंथ असलेली हि लायब्ररी आहे.वाई येथील टिळक ग्रंथालय हे हे १११ वर्षांचे आहे.
महाबळेश्वर जवळचे भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
आता बहुतेक शाळा महाविद्यालये विद्यापीठे ग्रंथालये आहेत.


समाजातील सर्व घटकांसाठी म्हणून सुरुवात झाली ती नेटिव्ह जनरल लायब्ररीची. १८२८ पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक ग्रंथालये उभी राहली. पहिले ग्रंथालय १८२८ साली रत्‍नागिरी येथे स्थापन झाले. हे ग्रंथालय ब्रिटिश आमदानीत काही कारणास्तव ब्रिटिशांनी काही काळ बंद केल्यामुळे स्थापनेचे काही संदर्भ नष्ट झाले, पण गॅझेटमधील नोंद आढळते. त्यापाठोपाठ सुरू झालेले ग्रंथालय म्हणजे अहमदनगर येथील १८३८ साली कर्नल पी.टी. फ्रेंच यांनी स्थापलेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. त्यानंतर नाशिक येथे १८४० साली ग्रंथालय सुरू झाले. महाराष्ट्रात नाशिक येथे स्थापन झालेल्या सार्वजनिक ग्रंथालयाला एक वेगळा इतिहास आणि परंपरा लाभलेली आहे. या ग्रंथाच्या कार्यामध्ये सुरुवातीला ब्रिटिश अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. काही ख्रिश्चन मिशनरी व नाशिक मधील वाचनप्रेमी यांनी एकत्र येऊन या ग्रंथालयाची योजना प्रत्यक्षात आणली. १८४० हा काळ म्हणजे भारतात नुकत्याच पाश्चात्त्य शिक्षणाची झालेली सुरुवात होती. अशा या काळामध्ये या ग्रंथालयांचे योगदान सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. या ग्रंथालयांनी या काळामध्ये शिक्षण चळवळीला मोठी चालना दिली. काहींच्या मते अहमदनगर हे महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय आहे. पण सरकारी यादीनुसार रत्‍नागिरीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पाहता पाहता महाराष्ट्राच्या गावोगावी ही चळवळ फोफावत गेली. संस्थानिकांनी या कामी मोलाची मदत केलेली आढळते. इचलकरंजी, सातारा, कुरुंदवाड, सांगली, फलटण अशी काही यातील उदाहरणे. ब्रह्मपुरी, राजगुरुनगर, अमरावती, इचलकरंजी, दादर, ठाणे इत्यादी ठिकाणी ज्ञानपिपासू व्यक्तींनी पदरमोड करीत ग्रंथालये स्थापन केली. बहुंताश ग्रंथालय नेटिव्ह जनरल याच नावाने सुरू होऊन कालांतराने नगर/सार्वजनिक वाचनालय म्हणून रूपांतरित झाली आहेत. काही ठिकाणी धनिक ग्रंथप्रेमींच्या मदतीला स्मरून त्याचे नाव ग्रंथालयास दिलेले आढळते, तर कोठे वाचनालयासाठी अपार मेहनत घेतली अशांची नावे ग्रंथालयास दिली आहेत (उदा. आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी). नेटिव्ह जनरलमध्ये बऱ्याच वेळा इंग्रजी साहित्याचा वरचष्मादेखील राहिला आहे. म्हणूनच मराठी भाषा व मराठी ग्रंथांच्या संवर्धनासाठी म्हणून ठाणे व मुंबई येथे मराठी ग्रंथसंग्रहालये स्थापली गेली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय’ असावे, असे मत व्यक्त केले.[महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन १९६७ साली ‘महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम’ हा कायदा अमलात आला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालय संघांना ग्रंथालय संचालनालयामार्फत अनुदान देण्यात येते. शंभर वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली महाराष्ट्रात तब्बल ८३ ग्रंथालये आहेत, तर इतर सुमारे ९ हजारांहून अधिक शासनमान्य ग्रंथालये आहेत. राज्यात एकूण १२,८६१ ग्रंथालये आहेत.
(छायाचित्र फिरते वाचनालय शार्दूलसिंह नाईकनिंबाळकर सरलष्कर यांचेकडून )

सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केलेले फिरते वाचनालय

**************

आज पुस्तक दिन📚📖
पुस्तक..मित्र,
पुस्तक..गुरू,
पुस्तक..सोबती
पुस्तक..वाटाड्या
पुस्तक. प्रेमाचे माध्यम (आठवा romantic scene साधना व राजेंद्र कुमार)
पुस्तक..मोरपीस ठेवण्याची जागा..
पुस्तक..शाळेतला पहिला दिवस..
पुस्तक..cover घालण्याकरता केलेली खटपट..
पुस्तक..कोरेपणाचा गंध.
पुस्तके. कोरोनातील.साथी
पुस्तके..मनातलं मनापासून सांगणारी. माहितीच भांडार पुरवणारी..
पुस्तके कोपरा दुमडला तरी मूकपणे सहन करणारी.. ग्रंथालयातल्या कपाटात गुदमरणारी … मला विकत घ्या व वाचा म्हणणारी..
अशी खूप काही..बोलणारी सांगणारी
चला आज पुस्तक दिनाच्या निमित्ताने “रोज काहीतरी नवीन वाचू म्हणत पुस्तक हातात घेऊ. व वाचू आनंदे” म्हणू या…
📚🙏🏼शुभेच्छा

श्रीधरकवी

माझ्या लहानपणी आमच्या घरी काही ओवीबद्ध पोथ्या होत्या. मी त्यांची यथासांग पारायणे करून माझ्या आईला त्या वाचून दाखवत होतो. त्या पोथ्यांमध्ये रसाळ भाषेत सांगितलेल्या पौराणिक कथा असल्यामुळे मलाही त्या वाचतांना आवडत असत. त्या कुणी लिहिल्या होत्या याची मला त्या वेळी सुतराम कल्पना नव्हती. त्या कवीचे नाव श्रीधर असे होते हे मला आता समजले.
————————-

हरिविजय, रामविजय यासारख्या यांच्या पोथ्या आता कोणी वाचतही आणि ते नव्या पिढीला कोणाला माहीतही नाहीत. “हरिविजय,’ ‘रामविजय, ‘पाण्डवप्रताप’, ‘जैमिनी अश्वमेध’ तसेच ‘शिवलीलामृत’ यासारखे भाविक जनाला मोहिनी घालणारे, त्यांच्या ह्रदयातील ईश्वरीभक्ती वाढवून त्यांच्या चित्ताला शांती व आनंद यांचा लाभ करून देणारे ग्रंथ ज्यांनी लिहिले, त्या श्रीधर कवींची थोरवी काय वर्णावी? श्रीधरांचे निर्वाण होऊन आज २३६ वर्षे झाली. आपण अणुयुगांतून अंतराळ युगात प्रवेश केला. या दीर्घ काळात शेकडो कवींनी धार्मिक कविता लिहिली, परन्तु श्रीधरांच्या ग्रंथांची लोकप्रियता त्यांच्या काळात होती तेवढीच आजच्या विसाव्या शतकांतहि टिकून आहे. खर्‍या जातिवंत साहित्याचेच हे लक्षण नव्हे का?

शुद्ध बीजा पोटी
श्रीधर कवींचे विस्तृत्व चरित्र उपलब्ध नाही. त्यांनी स्वतःच्या ग्रंथांतरी स्वतःची जी थोडीबहुत माहिती दिलेली आहे त्या तुटपुंज्या माहिती वरूनच त्यांच्या चरित्राचा मागोवा घेणे क्रमप्राप्त आहे.
या माहितीवरून असे दिसते की, कवि श्रीधर हे नाझरेकर कुलकर्णी घराण्यांत जन्माला आले. त्यांच्या जन्मशकाविषयी विद्वानात एकमत नाही. कुणी त्यांचा जन्मशक १५८० हा मानतात तर काहींच्या मते तो शके १६०० असावा, त्यांचे घराणे अतिशय धार्मिक व चारित्र्यसंपन्न होते. प्रसिद्ध सत्पुरुष श्रीरंगनाथ स्वामी निगडीकर हे देखील याच घराण्यात जन्माला आले.
श्रीधरांच्या वडिलांचे नाव ब्रह्मानंद व आईचे सावित्रीबाई. ब्रह्मानन्द हे नाझरे गावचे कुलकर्णी. नाझरे हे गाव पंढरपूरच्या पश्चिमेस सोळा कोस अंतरावर आहे.
ब्रह्मानन्द हे श्रीधरांचे वडील आणि गुरुजी. यांनी संसार केला तो केवळ नावापुरता माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायात वर्णिल्याप्रमाणे ते संसारात राहूनही ‘नित्यसंन्यासी’ च राहिले. मात्र उतारवयात त्यांनी खरोखरीच संन्यास घेतला आणि ते लवकरच भीमातीरी समाधिस्थ झाले.
श्रीधरांची आई सावित्रीबाई ही देखील मोठी धर्मनिष्ठ स्त्री होती.
अशा ह्या ईश्वरनिष्ठ आणि सत्वशील दांपत्याच्या पोटी श्रीधरासारखे पुत्ररत्‍न जन्माला आले.
पुढे यथासमय श्रीधरांचा विवाह झाला. त्यांच्या पत्‍नीचे नाव पार्वतीबाई. श्रीधरांनी जनरूढीप्रमाणे अनेक वर्षे संसार केला. त्यांना मुलेही झाली. परंतु श्रीधरांचे मन संसारात होतेच कुठे ? कमळाचे पान पाण्यात राहूनही भिजत नाही म्हणतात. श्रीधर देखील संसारात राहून त्यापासून अलिप्तच राहिले.

गुरुपरंपरा
कारण त्यांचे सारे चित्त अध्यात्ममार्गाकडे लागले होते. त्यांना परमेश्वराचा शोध घ्यावयाचा होता आणि त्यासाठी सद्‌गुरूंची नितान्त आवश्यकता होती. परन्तु श्रीधरांना सद्‌गुरूच्या शोधासाठी रानेवने धुंडाळीत दूर जावे लागले नाही. त्यांनी आपले वडील श्रीब्रह्मानन्द यांनाच गुरु केले. श्रीब्रह्मानंद हे अध्यातमार्गात उच्च अवस्थेला पोचलेले अधिकारी पुरुष होते. त्यांनी देखील आपले वडील श्रीदत्तानन्द यांचेकडूनच गुरुपदेश घेतलेला होता. श्रीधरांनी हीच परंपरा पुढे चालविली व जन्मदात्या पित्यालाच गुरु करून त्यांनी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला व पुढे चित्तशुद्धीसाठी अनेक तीर्थयात्रा करून ते पंढरपूर येथे येऊन स्थायिक झाले.
‘महाराष्ट्र सारस्वत’कार कै. वि. ल. भावे यांनी श्रीधरांची गुरूपरंपरा पुढीलप्रमाणे दिलेली आढळते-
रामानंद- अमलानंद – सहजानंद – पूर्णानंद – दत्तानंद – ब्रह्मानंद – श्रीधर (किंवा श्रीधरानंद)
बहुधा संन्यासग्रहणानंतर त्यांनी ‘श्रीधरानन्द’ असे नाव धारण केले असावे असे वाटते.

ग्रंथकर्तृत्व
कवि श्रीधरांचे संस्कृत भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांनी स्वतःदेखील संस्कृत भाषेत काही ग्रंथरचना केलेली आहे. रामायण, महाभारत, भागवत इ. अनेक संस्कृत ग्रंथ त्यांनी अभ्यासिले होते. त्याचप्रमाणे जयदेव, बिल्वमंगल इ. नामांकित कवींची कविताही त्यांनी काळजीपूर्वक अवलोकन केली होती.
श्रीधरस्वामींच्या घरातील वातावरणही काव्यनिर्मितीला पोषक असेच होते. त्यांचे आजोबा श्रीदत्तानन्द आणि वडील श्रीब्रह्मानंद यांनी थोडीबहुत काव्यरचना केलेली होती.
त्यामुळे आपणहि महाराष्ट्र भाषेत काव्यरचना करावी अशी स्फूर्ति श्रीधरांना झाली व त्यांनी संस्कृत ग्रंथातील आख्यानांवरून मराठी भाषेत विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. गुणवत्तेचा निकष लावला तर त्यांच्या समकालीन कवींपेक्षा त्यांची ही रचना किती तरी उजवी ठरते.
कालानुक्रमे त्यांनी केलेली ग्रंथरचना येणेप्रमाणे-
१. हरिविजय (शके १६२४)
२. रामविजय (शके १६२५)
३. वेदान्तसूर्य (शके १६२५)
४. पाण्डवप्रताप (शके १६३४)
५. जैमिनी अश्वमेध (शके १६३७)
६. शिवलीलामृत (शके १६४०)
(BookStruck: हरिविजय मधून )”
फेसबुकवरील लेख साभार

डॉ.श्रीराम लागू यांची प्रसिद्ध वाक्ये

नटश्रेष्ठ डॉ.श्रीराम लागू शब्दांच्या अचूक फेकीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी निरनिराळ्या नाटक-सिनेमांमध्ये उच्चारलेली काही वाक्ये अजरामर झाली आहेत. कदाचित ती त्यांच्यासाठीच लिहिली गेली असावीत की काय असे वाटते.

काही दिवसांपूर्वी श्रीराम लागू गेले. पुण्यातील ARAI च्या टेकडीवरील ज्या बाकावर ते नियमितपणे बसायला जात असंत, तिथे काही झाडे लावण्यात आली. त्यावेळी त्यांच्या काही ओळी लिहिलेले फलक देखील तिथं लावण्यात आले होते.

माणूस म्हणून जगण्या-मरण्यातलं तत्त्वज्ञानच इथं नेमक्या शब्दात मांडलंय, असं वाचताना वाटतं.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . .  वॉट्सअॅपवरून साभार

श्रीराम लागू १

श्रीराम लागू २

श्रीराम लागू ३

श्रीराम लागू ४

कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या कविता

Bakibab-Borkar-197x280

आज ३० नोव्हेंबर,  बाकीबाव बोरकरांचा १०९ वा जन्मदिवस

तुला कसे कळत नाही?
फुलत्या वेलीस वय नाही!
क्षितिज ज्याचे थांबले नाही,
त्याला कसलेच भय नाही,
त्याला कसलाच क्षय नाही….

असाच काहीसा अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली बोरकरांची लख्ख आरस्पानी कविता. लयीत उलगडणारी आणि शब्दचित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी, अशी. कवितेची जातकुळीच अर्थगर्भित. चित्रवाही शब्दकळेचे लेणे ल्यालेली. आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाला तितक्याच समरसतेने आपलंसं करुन, अनुभवून आपल्या अवधूती मस्तीत धुंद होताना, त्या अनुभवांचा मुक्त उद्घोष करणारी, शुद्ध अभिजात अशी ही कविता. आत्मनिष्ठ. बोरकरांनीच म्हटल्याप्रमाणे, त्यांनी कधी कविता केल्या नाहीत, बोरकरांना कविता झाल्या. त्यांचे शब्दही शब्दवतीचा साज धारण करुन आलेले आणि चराचराच्या रंगागंधांमध्ये न्हाऊन निघालेले. भोवतालच्या सृष्टीला हाक घालणारे, पण ती कशी? नुसतीच नव्हे, तर नादवेडात रंगून आणि गंधाटून!
( यशोधरा यांच्या लेखनातील उतारा )

माझे मित्र श्री.अविनाश नेने यांच्याकडून वॉट्सअॅपवर मिळालेली माहिती साभार दि.३०-११-२०१९

विकीपीडियावरील माहिती :

1200px-बाळकृष्ण_भगवंत_बोरकर

बा.भ. बोरकर ( बालकृष्ण भगवंत बोरकर, टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (नोव्हेंबर ३०, इ.स. १९१० – जुलै ८, इ.स. १९८४) हे मराठी भाषेतील आणि कोंकणी भाषेतील पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते.बा.भ.बोरकर हे मराठी साहित्य प्रेमी व एक उत्कृष्ट कवी देखील होते. बा.भ,बोरकर हे गोमंतकाचं भुषण असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जीवनकाल
बोरकरांचा जन्म गोमंतकातील कुडचडे या पावन भूमीत ३० नोव्हेंबर इ.स. १९१० या दिवशी झाला. प्रापंचिक अडचणींमुळे त्यांना मॅट्रिकच्या पुढे शिकता आले नाही. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकी पेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात ‘प्रतिभा’ या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. मराठी बरोबरच त्यांनी कोंकणी भाषेतही लेखन केलेले आहे. इ.स. १९३४ साली त्यांना बडोद्यातील वाङ्‌मय परिषदेच्या अधिवेशनात उत्कृष्ट कवितालेखन व काव्यगायन (‘तेथे कर माझे जुळती’) यांबद्दल सुवर्णपदक मिळाले. इ.स. १९४६ साली त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामात उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्‌मयविभागाचे संचालक म्हणून काम केले आणि तेथूनच वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले.
————-

नवी भर दि.३०-११-२०२१

दिव्यत्वाची_जेथ_प्रतीती— तेथे कर माझे जुळती हे गीत लिहिणारे आनंदयात्री , कवी ,लघुकथा लेखक ,कादंबरीकार अशी ओळख असणरे गोमंतक पुत्र कवी बा भ बोरकर यांची आज जयंती (३०-११-२०२१)
बोरकरांचा जन्म गोव्यातल्या कुडचडे या गावी ३० नोव्हेंबर इ.स. १९१० या दिवशी झाला. प्रापंचिक अडचणींमुळे त्यांना मॅट्रिकच्या पुढे शिकता आले नाही. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकी पेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात ‘प्रतिभा’ या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. इ.स. १९३४ साली त्यांना बडोद्यातील वाङ्‌मय परिषदेच्या अधिवेशनात उत्कृष्ट कवितालेखन व काव्यगायन (‘तेथे कर माझे जुळती’) यांबद्दल सुवर्णपदक मिळाले. इ.स. १९४६ साली त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामात उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्‌मयविभागाचे संचालक म्हणून काम केले आणि तेथूनच वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले.
८ जुलै इ.स. १९८४ रोजी पुणे येथे ते मरण पावले.
त्यांची काव्यसंपदा
अनंता तुला कोण पाहु — कशि तुज समजावू सांग — चढवू गगनि निशाण — जीवन त्यांना कळले हो –झिणिझिणि वाजे बीन-तव नयनांचे दल हलले — दिव्यत्वाची जेथ प्रतीती — दीपका मांडिले तुला — नाही पुण्याची मोजणी– पांडुरंग त्राता पांडुरंग — मम हृदयाची ललित रागिणी —माझ्या गोव्याच्या भूमीत — संधिप्रकाशात अजून जो– क्षितिजी आले भरते ग
अभिवादन. . . . . . माधव विद्वांस

दिव्यत्वाची जेथ प्रतीती
तेथें कर माझे जुळती
गाळुनियां भाळींचे मोती
हरीकृपेचे मळे उगविती
जलदांपरी येउनियां जाती
जग ज्यांची न करी गणती-
तेथें कर माझे जुळती.
यज्ञीं ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचें मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहिं चिरा नाहीं पणती-
तेथें कर माझे जुळती.
जिथें विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसें काळिज निखळी
एकाची सगळी वसती-
तेथें कर माझे जुळती.
मध्यरात्रिं नभघुमटाखालीं
शांति शिरीं तम चंवर्‍या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळीं
एकांती डोळे भरती-
तेथें कर माझे जुळती.


बा. भ. बोरकरांच्या कविता

तेथे कर माझे जुळती

दिव्यत्वाची जेथ प्रतीती
तेथे कर माझे जुळती

गाळुनिया भाळींचे मोती
हरीकृपेचे मळे उगविती
जलदांपरी येउनिया जाती
जग ज्यांची न करी गणती
तेथे कर माझे जुळती.

यज्ञीं ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती
तेथे कर माझे जुळती.

जिथे विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती
तेथे कर माझे जुळती.

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांति शिरी तम चवर्या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती
तेथे कर माझे जुळती.

चित्रपट : पुत्र व्हावा ऐसा (१९६१)
आशा भोसले / वसंत प्रभु / बा. भ. बोरकर
—–

त्या दिसा वडाकडेन 

त्या दिसा वडाकडेन गडद तिनसाना
मंद मंद वाजत आयली तुझी गो पैंजणा

मौन पडले सगल्या राना
शिरशिरुन थांबली पाना
कवळी जाग आयली तणा झेमता झेमताना

पैसूल्यान वाजली घाट
दाटलो न्हयचो कंठ काठ
सावळ्यानी घमघमाट सुटलो त्याखीणा

फुलल्यो वैर चंद्र ज्योती
रंगध्रानी लागल्यो वाती
नवलांची जावक लागली शकुन लक्षणा

गळ्या सुखा, दोळ्या दुखा
लकलकली जावन थीका
नकळतान एक जाली आमी दोगाय जणा

वड फळांच्या अक्षदांत
कितलो वेळ न्हायत न्हायत
हुकलो कितलो चंद्रलोक इंद्रनंदना

तांतले काय नुल्ले आज
सगल्या जिणे आयल्या सांज
तरीय अकस्मात तुजी वाजती पैंजणा

कानसूलानी भोवती भोवर
आंगर दाट फुलता चवर
पट्टी केन्ना सपना तीच घट्ती जागरना

त्या दिसा वडाकडेन गडद तिनसना
मंद मंद वाजत आयली तुझी गो पैंजणा

– बा. भ. बोरकर : एक आनंदयात्रा कवितेची – पु. ल. देशपांडे आणि सुनिता देशपांडे
अंदाजे १९८४/८५ साली बोरकरांच्या कवितांवर या दोघांनी कार्यक्रम केला होता.
————-

बोरकर तू गेल्यावर

नाही पुण्याची मोजणी

नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी

कशाचा न लागभाग
कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग

आम्हां नाही नामरूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळानिळा धूप

पूजेतल्या पानाफुलां
मृत्यु सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा

– बा. भ. बोरकर / जितेंद्र अभिषेकी / पु.ल.देशपांडे
—-

सरिंवर सरी आल्या गं

सरिंवर सरी आल्या गं
सचैल गोपी न्हाल्या गं ।
मल्हाराची जळात धून
वीज नाचते अधुनमधून
वनात गेला मोर भिजून
गोपी खिळल्या पदी थिजून
घुमतो पांवा सांग कुठून?
कृष्ण कसा उमटे न अजून?
वेली ऋतुमती झाल्या ग
सरिंवर सरी आल्या ग…
सरिंवर सरी आल्या ग…
सरिंवर सरी आल्या ग…

बोरकर - पावसात
—-

अनंता तुला कोण पाहूं शके?

अनंता तुला कोण पाहूं शके?
तुला गातसां वेद झाले मुके.
मतीमंद अंधा कसा तू दिसे?
तुझी रूपतृष्णा मनाला असे.

अनंता तुला कोण पाहूं शके?

तुझा ठाव कोठें कळेना जरी, x 2
गमे मानसा चातुरी माधुरी.
तरूवल्लरींना भुकी मी पुसें,
“तुम्हां निर्मिता देव कोठें वसे?”

फुलें सृष्टिचीं मानसा रंजिती,
घरी सोयरीं गुंगविती मती,
सुखें भिन्न हीं, येथ प्राणी चुके
कुठें चिन्मया ऐक्य लाभूं शके?

अनंता तुला कोण पाहूं शके?

तुझे विश्व ब्रह्मांड, ही निस्तुला-
कृती गावया रे कळेना मला.
भुकी बालका माय देवा चुके,
तया पाजुनी कोण तोषूं शके?

अनंता तुला कोण पाहूं शके?

नवीं भावपुष्पें तुला वाहिलीं,
तशी अर्पिली भक्तिबाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू! कल्पना जल्पना त्या हरो.

अनंता तुला कोण पाहूं शके?
तुला गातसां वेद झाले मुके.
अनंता तुला… अनंता तुला…

गीत : बा. भ. बोरकर
संगीत व स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी
————-

बोरकर - कांचनसंध्या

जीवन त्यांना कळले हो…

जीवन त्यांना कळले हो…

मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो

जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो

चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो

सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो

आपत्काली अन दीनांवर घन होऊनी जे वळले हो

दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो

पुण्य जयांच्या उजवडाने फुलले अन परिमळले हो

सायासावीन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो

उरीच ज्या आढळले हो!

गीत : बा. भ. बोरकर
संगीत व स्वर : सलील कुलकर्णी
————

बोरकर -प्रतिएक

झिणि झिणी वाजे बीन

झिणि झिणी वाजे बीन
सख्या रे, अनुदिन चीज नविन

कधी अर्थावीण सुभग तराणा
कधी मंत्रांचा भास दिवाणा
सूर सुना कधी केविलवाणा, शरणागत अतिलीन

कधी खटका, कधी रुसवा लटका
छेडी कधी प्राणांतिक घटका
कधी जीवाचा तोडून लचका
घेते फिरत कठीन

सौभाग्ये या सुरात तारा
त्यातून अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रविण
_____

गीतकार :बा. भ. बोरकर
गायक :आशा भोसले
संगीतकार :श्रीधर फडके
————–

कवितांची निवड श्री अविनाश नेने

तोच चंद्रमा नभात या भावगीताची कथा

भावगीतांमध्ये निरनिराळ्या विषयांवरची असंख्य गाणी आली. ही सर्व तऱ्हेची गाणी श्रोत्यांच्या मनाला आजदेखील भुरळ पाडतात. त्यात ‘चंद्र’ हा एक विषय आहे. चंद्र परिवारात ओघाने येणारी मंडळी म्हणजे चांदणे, पौर्णिमा, नक्षत्रे, आकाश, तारे, ग्रह, आकाशगंगा.. ही जीवलग मंडळीही हवीहवीशी वाटतात. चंद्रदेखील अनेक नावांनी काव्यात येतो. चंद्रमा, चांद, चंदामामा, चंद्रम, चंदाराजा, चंद्रकोर, चांदोबा, चांदोमामा अशी लडिवाळ नावे गाण्यांमध्ये आढळतात. यातून अशी चंद्राच्या नावांची कोणकोणती गाणी आहेत हे आठवण्याचा खेळ सुरू होतो. गाण्यांच्या भेंडय़ा नसल्या तरी ही गाणी आठवायची हा हट्ट सुरू होतो. या भावगीतांनी आपल्याला आयुष्यभर साथ दिलेली असते आणि आपणही तो हात कायम धरून ठेवलेला असतो. अर्थात याचे श्रेय गायक-गायिका, गीतकार, संगीतकार, संगीत संयोजक, ध्वनिमुद्रिका कंपन्या, आकाशवाणी, दूरदर्शन अशा सर्वाना जाते. यशस्वी चंद्रगीतांमध्ये मनाच्या स्वरलिपीत कोरले गेलेले गाणे म्हणजे- ‘तोच चंद्रमा नभात..’ हा नभीचा चंद्र भूवरीचा आणि प्रत्येकाच्या मनातला केव्हा झाला, हे कळलेच नाही. मराठी भावगीतांच्या कार्यक्रमात ‘वन्स मोअर’ संकल्पनेत ‘तोच चंद्रमा नभात..’ हे गीत कायम वरच्या क्रमांकावर राहील. हे गाणे ऐकणाऱ्याला आनंदाने वेड लावते अन् गाणाऱ्यालाही ओढ लावते. कवयित्री शान्ता शेळके आणि गायक-संगीतकार सुधीर फडके यांच्या रचनेतील हे अवीट गोडीचे गीत!

शीलाभट्टारिका नावाच्या कवयित्रीने रचलेल्या संस्कृत श्लोकावरून शान्ता शेळके यांनी हे गीत लिहिले. शान्ताबाईंनीदेखील हा उल्लेख केला आहे. मूळ श्लोकातील स्त्रीभावना त्यांनी प्रियकराच्या भावनेत रूपांतरित केली आहे. ध्वनिमुद्रिकेच्या कपलिंग गीताची मागणी पूर्ण करण्यासाठी हे गीत जन्माला आले. ज्या मूळ संस्कृत श्लोकावरून हे गीत लिहिले तो श्लोक असा आहे :

‘य: कौमारहर: स एव हि वर: ता एत चैत्रक्षप:।
ने चोन्मीलितमालतीसुरभय: प्रौढा: कदम्बानिला:।।
सा चैवास्मि तथापि तस्य सुरतव्यापारलीलाविधौ।
रेवारोधसि वेतसि तरूतले चेत: समुत्कंठते।।’

..ज्याने माझे कौमारहर: केले तो माझा प्रियकर आहे. तोच माझा पती आहे. चैत्रातील आल्हाददायक रात्र आहे. कदंबावरून वाहणारे वारे आणि फुललेल्या जाईचा गंध वातावरणात भर टाकतो आहे. मन आणि भावना गुंतलेल्या आहेत. मात्र त्यावेळच्या प्रेमाची आठवण जास्त दु:खी करते आहे. मी तीच आहे, मी तेव्हाचीच आहे, पण ही हुरहूर प्रेम हरवल्याचं सांगते. एकमेकांचे नाते आता ‘ते’ राहिले नाही, हा मनीचा विषाद आहे. या मन:स्थितीला इतर कोणीही जबाबदार नाही. एका विशिष्ट पातळीवर ही भावना अलगद नेऊन सोडली आहे. हा नेमका भाव प्रियकराच्या भावनेसाठी व तीन अंतऱ्याच्या गीतासाठी पुरेसा ठरला आहे.

‘तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकान्ती मजसमीप तीच तूहि कामिनी!

नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
एकान्ती मजसमीप तीच तूहि कामिनी!

सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे?
मीहि तोच तीच तूही प्रीति आज ती कुठे?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
एकान्ती मजसमीप तीच तूहि कामिनी!

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतूनी
एकान्ती मजसमीप तीच तूहि कामिनी!’

या गाण्यात स्वरसौंदर्याने भारलेले बाबूजींचे गायन आहे. संगीत देताना अंतऱ्यामध्ये भावानुकूल स्वर देणे ही तर त्यांची हातोटीच. हे संपूर्ण गायन कान देऊन ऐकल्यावर गंधर्व गायनशैलीचं अनुसरण त्यात दिसतं. त्यांनी गायनात व संगीतरचनेत आदर्श घालून दिलाय.

अ‍ॅडलिब पद्धतीने गायन सुरू होते, त्याच क्षणी आपण गीताच्या भावनेत.. वर्णन केलेल्या वातावरणात शिरतो. याचं कारण गायनापूर्वी त्यावर सखोल विचार झालेला असतो. या गाण्यातील ‘चैत्र’ हा उच्चार तर सर्व गायकांनी अभ्यास करावा असाच आहे. पूर्ण गायनात ‘जसा शब्दाचा अर्थ, तसा त्या शब्दाचा उच्चार’ हे सूत्र कायम दिसते. तोच आहे, तीच आहे, तशीच आहे, असे खंत व खेद या भावनेतील शब्द या गाण्यात बरेच आहेत. पण हा ‘तोच’ असलेला भोवताल शान्ताबाईंच्या उत्कृष्ट शब्दांनी भरला आहे. ‘माझ्या जवळी’, ‘माझ्या आसपास’ असे न म्हणता ‘मजसमीप’ ही शब्दयोजना चित्तवेधक आहे. अगदी शेवटच्या अंतऱ्यात ‘गीत ये न ते जुळून’ ही भावना थेट उघड केली आहे. तेव्हा क्षणभर असे वाटते, की कलाकाराने स्व-प्रतिभेला उद्देशून तर हे लिहिले नसेल? हे सर्व मनात येते, कारण हे एक परिपूर्ण गीत आहे. ‘यमन-कल्याण’ या रागातील स्वरांचा नेमका उपयोग बाबूजींनी यात केला आहे. हाती हार्मोनियम घ्या आणि दोन्ही मध्यम कोठे कोठे कोणत्या भावनेसाठी दिसतात, ते आवर्जून पाहा. या गाण्याचा असा अभ्यास करताना विलक्षण आनंद मिळतो. श्रोत्यांना हे पूर्ण गाणे त्यातील म्युझिकसह पाठ असते. प्रत्येक गायक संधी मिळेल तिथे हे गीत सादर करत असतो. मात्र, आत्ता कुठे हे गाणं आपल्याला समजलंय, हा बोध जरा उशिरा होतो. साडेतीन-चार मिनिटांचे भावगीत गाताना इतक्या गोष्टी सांभाळायच्या हे एक आव्हान असते. याचे कारण म्हणजे गाण्याची चाल बांधताना बाबूजींचा त्यामागचा विचार. गाणे म्युझिकसह बारकाईने ऐकले तर संपूर्ण गायनामागे व म्युझिकमध्ये दादरा पॅटर्नचे गिटारचे कॉर्ड्स वाजलेले ऐकू येतात. ‘गिटार स्ट्रमिंग’ असे ते वादन आहे. गाण्याची लय हादेखील महत्त्वाचा भाग आहे. त्याच लयीमध्ये हे गीत सादर होणे आवश्यक आहे.

शान्ताबाईंनी कवितेचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक आतून बाहेर जाणारी आणि दुसरी बाहेरून आत येणारी. त्या सांगतात : कवितेत व्यक्तिगत अनुभूती केंद्रस्थानी असते. गीताची प्रेरणा भिन्न, मागणी वेगळी व शब्दयोजनाही वेगळी असते. सहजता, सोपेपणा, चित्रमयता ही गीताची खास वैशिष्टय़े असतात. प्रतिभा म्हणजे सुचणे. त्यासाठी वाचन, व्यासंग, चौफेर काव्य पाहणे, भाषा अवगत असणे आणि स्मरणशक्ती तीव्र असणे आवश्यक आहे.

१९४७ साली प्रसिद्ध झालेल्या ‘वर्षां’ या काव्यसंग्रहाद्वारे शान्ताबाई रसिकांना कवयित्री म्हणून परिचित झाल्या. एम. ए. (मराठी)पर्यंत शिक्षण झालेल्या, ‘नवयुग’ साप्ताहिकातील कामाचा व पदाचा घेतलेला अनुभव व प्राध्यापिकेचा पेशा यामुळे शान्ताबाई सतत कविता व गीतांमध्येच रमल्या. आकाशवाणीवरून त्यांची गीते सादर झालीच; शिवाय पुढे नाटक व चित्रपट या माध्यमांतूनही त्यांनी लिहिलेली गाणी रसिकांना ऐकायला मिळाली. १९७३ साली त्यांच्या गीतांचा संग्रह प्रकाशित झाला. त्या संग्रहाला शान्ताबाईंनी ‘तोच चंद्रमा..’ हेच नाव दिले. ‘तोच चंद्रमा..’ हे त्यांचे विशेष आवडीचे गीत होते.

शान्ताबाईंचे लहानपण पुण्याजवळ मंचर येथील शेळकेवाडय़ात गेले. त्यांचे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते. नोकरीनिमित्ताने त्यांच्या सतत बदल्या होत असत. या बदल्यांमुळे पुढे चिखलदरा, नांदगांव, खर्डी येथे शेळके कुटुंबाचे वास्तव्य झाले. लहानपणीच सहज पुस्तके वाचायला मिळाल्यामुळे शान्ताबाईंना लहान वयातच वाचनाची गोडी लागली. पुणे जिल्ह्य़ातील खेड हे शान्ताबाईंचे आजोळ. खेड म्हणजे आताचे राजगुरूनगर. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना पुण्यात इंग्रजी शाळेसाठी यावे लागले. सेवासदन व हुजुरपागेतील शिक्षणाच्या शान्ताबाई खूप आठवणी सांगत. शाळेत बक्षीस म्हणून मिळालेली पुस्तके ही पर्वणी असे. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शिकताना वाचलेले ‘मेघदूता’तील श्लोक, बी. ए.ला असताना वाचलेले ‘हॅम्लेट’, ‘उत्तररामचरित’ आणि मम्मटाचे ‘काव्यप्रकाश’ यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. आपली काव्यविषयक जाण वाढणे, चांगली कविता वाचणे व अभिरुची घडणे याचे श्रेय त्या प्रा. रा. श्री. जोग यांना देतात. कविता कशी असावी, हे रविकिरण मंडळातल्या कवींच्या कवितेतून आपल्याला समजल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढील काळात बरीच गाणी शान्ताबाईंकडून लिहिली गेली, याचे श्रेय त्या त्यांच्यावर विश्वास ठेवून गाणी लिहून घेणाऱ्यांनाच देतात.

गायक-संगीतकार सुधीर फडके यांनी संगीत क्षेत्रात काम करत असतानाच सामाजिक बांधिलकीही जपली. कट्टर हिंदुत्वनिष्ठ, सावरकरांचे परमभक्त, दादरा-नगर हवेली संग्रामात सक्रिय भाग घेणारा सच्चा देशसेवक ही धारणा त्यांनी आयुष्यभर जपली, जोपासली. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ‘सावरकर’ हा चित्रपट त्यांनी पूर्ण केला. असा व्रतस्थ स्वरयात्री होणे नाही. त्यांच्या वृत्तीत नेता आणि स्वयंसेवक यांचे मिश्रण असे. जिद्द व महत्त्वाकांक्षा हे ठोस गुण त्यांच्यात होते. संगीत क्षेत्रात ते युगनिर्माता ठरले.

‘तोच चंद्रमा नभात..’ या अजर, अमर, अविनाशी गीतामुळे बाबूजींचे स्मरण घडले. २५ जुलै हा त्यांचा जन्मदिन, तर २९ जुलै हा स्मृतिदिन. या गाण्यामुळे शान्ताबाई व बाबूजी यांच्या आठवणी मनात दाटून आल्या.

नील आर्मस्ट्राँगने जरी चंद्रावर पाऊल ठेवून ‘तो’ प्रत्यक्षात कसा आहे हे स्वानुभवाने सांगितले असले तरीही आपल्याकडील अनेक गोड भावगीतांमधून आपल्याला भेटणारा नभातला चंद्रमा आपल्या मनात तोच व तसाच कायम राहणार आहे.

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com

श्री.विनायक जोशी यांचे आभार मानून हा लेख इथे संग्रहित केला आहे. दि.२२-१०-२०१९