प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ -आर्यभट

महान भारतीय शास्त्रज्ञ आर्यभटापासून या पानाची सुरुवात करीत आहे.

पृथ्वी स्वताचे भोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा पहिला शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांची आज जयंती १२-०६-२०२१

दि. १९एप्रिल१९७५ रोजी ’आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरुन प्रक्षेपित करण्यात आला.
आर्यभट्टाने वर्षाचे कालमापन केले होते. ते ३६५ दिवस, १५ घटी, ३१ पळे व १५ विपळे भरले. कोणतीही आधुनिक साधने नसताना सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी आर्यभट्टाने केलेले हे वर्षाचे कालमापन जवळजवळ अचूक आहे.
पहिला आर्यभट्ट (देवनागरी लेखनभेद: पहिला आर्यभट संस्कृत: आर्यभटः ) (इ.स. ४७६ – इ.स. ५५०) हा भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. ११ ऑगस्ट इ.स. ५१९ चे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिल्याबद्दल आर्यभट्टाला काही काळ बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. लोकांच्या अज्ञानामुळे आर्यभट्टास उपेक्षा भोगावी लागली.
लेखन
त्याने इ.स. ४९९ च्या सुमारास रचलेला आर्यभटीय हा गणित व खगोलशास्त्रावरील विवेचनात्मक ग्रंथ या विषयांवरील प्राचीनतम भारतीय साहित्यकृतींमधील एक मानला जातो. वराहमिहिराच्या साहित्यातील संदर्भांनुसार त्याने आर्य सिद्धान्त नावाचा अन्य एक ग्रंथही रचला. त्याचे भाग (१) गीतिका पाद, (२) गणितपाद,(३) कालक्रियापाद, (४) गोलपाद. मात्र वर्तमानकाळात त्या ग्रंथाची एकही संहिता उपलब्ध नाही असे दिसून येते. अंकगणित, बीजगणित व भूमिती या गणिताच्या शाखांचा त्याचा सखोल अभ्यास होता. आज बीजगणितावरचा उपलब्ध जुना ग्रंथ विख्यात ज्योतिर्वेत्ता आर्यभट्ट याचा आहे. व वयाच्या तेविसाव्या वर्षीच त्याने बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला. म्हणून आर्यभट्ट यास बीजगणिताचा जनक असे मानण्यात येते.
आर्यभटाने ० अंशापासून ते ९० अंशापर्यंत ३/१११ अंशाच्या फरकाने सर्व कोन घेऊन त्यांचे ज्यार्ध कसे काढावेत हे सांगितलेले आहे. तसेच पृथ्वी स्वत:भोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा तो पहिला शास्त्रज्ञ होय. वर्षाचे दिवस ३६५, घटी १५, पळे ३९, विपळे १५ इतक्या सूक्ष्म भागांपर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे. तसेच ‘पाय’ नावाची गणित संकल्पनेची किंमत ६३,८३२/२०,००० आहे असेही नोंदवले आहे सूर्य सिद्धान्तावर याने लिहिलेला एक टीका ग्रंथ ‘सूर्य सिद्धान्त-प्रकाश ‘ या नावाने प्रसिद्ध आहे.
आर्यभट्ट यांना ग्रहणाची शास्त्रीय कारणमीमांसा ज्ञात होती. अमावस्येला सूर्यग्रहण व पौर्णिमेस चंद्रग्रहण यांचा संबंध चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी आहे, हे त्यांना माहीत होते. तसे त्यांनी नोंदवून ठेवले आहे. पहिला आर्यभट्ट याने सूत्रांचा उपयोग खगोलशास्त्र विषयक ग्रंथांत मोठ्या प्रमाणावर केला. अशा ग्रंथांत आकडेमोड द्यावी लागते परंतु मजकूर तर मुख्यत्वे काव्यमय व यमकात असतो. मग संख्या पद्यात बसवण्यासाठी त्या अक्षराने निर्दिष्ट करायच्या व ती अक्षरे वृत्तात बसवून श्लोकात लिहावयाची असा मार्ग आर्यभट्टाने अवलंबला. त्यामुळे अक्षरसंख्या कमी होते, शिवाय वृत्तबद्ध लिखाण होते. त्यावेळी लेखनाची साधने उपलब्ध नसल्याने त्या संख्या अशा प्रकारे लक्षात ठेवणेही सोपे जात असे. जसे –वर्गाक्षराणि वर्गेऽ वर्गेऽ वर्गाक्षराणि कात्‌ मौ यः । खद्विनवके स्वरा नववर्गेऽ वर्गे नवान्त्यवर्गे वा ॥ (विकिपीडियामधून )”
श्री.माधव विद्वांस आणि फेसबुक चे आभार

अरणमुलाचा धातूचा आरसा

बाल रामचंद्राने त्याच्या चिमुकल्या हातात चंद्र धरायला हवा असा हट्ट धरला आणि त्याच्या हातात आरसा देऊन तो हट्ट पुरवला गेला ही गोष्ट प्रसिद्ध आहे. दर्पण या शब्दाचा उपयोग प्राचीन काळातल्या साहित्यात केलेला दिसतो. त्या काळात कशा प्रकारचे आरसे असतील? केरळमधल्या एका गावी आजसुद्धा खास प्रकारचे आरसे तयार केले जातात. त्याची मनोरंजक माहिती वॉट्सॅपवरून घेतलेल्या या लेखात दिली आहे. श्री.प्रशांत पोळ यांना अनुमति देण्याची विनंति करून हा लेख या संग्रहात देत आहे.

धातूचा आरसा, आपला जागतिक वारसा !

भारतीय ज्ञानाचा खजिना

चिंचोळ्या आकारात असलेल्या केरळ च्या दक्षिणेला, पण आतल्या भागात, मध्यभागी, एक लहानसं सुबक गाव आहे – अरणमुला. तिरुअनंतपुरम पासून ११६ किमी अंतरावर असलेलं हे गाव राष्ट्रीय महामार्गावर नसलं, तरी अनेक बाबतीत प्रसिध्द आहे. पंपा नदीच्या काठावर वसलेल्या अरणमुला ला ओळखलं जातं ते नावांच्या (बोटींच्या) शर्यतीसाठी. ‘स्नेक बोट रेस’ नावाने प्रसिध्द असलेल्या या शर्यती बघण्यास देश-विदेशातून पर्यटक येतात.
याच अरणमुला मधे श्रीकृष्णाचे एक भव्य-दिव्य मंदिर आहे. ‘अरणमुला पार्थसारथी मंदिर’ ह्या नावाने प्रसिध्द असलेल्या मंदिरामुळे हे स्थान जागतिक वारश्यांच्या यादीत समाविष्ट झालेले आहे. अशी मान्यता आहे की भगवान परशुरामाने श्री विष्णुंची १०८ मंदिरं बांधली, त्यापैकीच हे एक मंदिर आहे. केरळ चे प्रसिध्द शबरीमलाई मंदिर येथून तसे जवळच. एकाच ‘पथनामथिट्टा’ ह्या जिल्ह्यांत. भगवान अय्यप्पांची जी भव्य यात्रा दरवर्षी शबरीमलाई हून निघते, त्या यात्रेचा एक टप्पा म्हणजे हे अरणमुला पार्थसारथी मंदिर.

आणखी एका गोष्टीसाठी अरणमुला प्रसिध्द आहे. ते म्हणजे येथील शाकाहारी थाळी. ‘वाला सध्या’ नावाच्या ह्या जेवण प्रकारात ४२ वेगवेगळे पदार्थ असतात. आणि हे सर्व, अत्यंत वैज्ञानिक पध्दतीने, आयुर्वेदाचा विचार करून, आहारशास्त्रानुसार वाढले जातात.
अरणमुला च्या आजुबाजूला असलेल्या संपन्न सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वातावरणाचा परिणाम असेल कदाचित, पण त्यामुळे प्रतिक्रिया म्हणून ख्रिश्चनांनी येथे बरेच उपक्रम चालविले आहेत. येथे चर्चेस ची संख्या बरीच जास्त आहे. दरवर्षी त्यांचा एक महाप्रचंड मेळावा येथे भरतो.

पण ह्या सर्व बाबिंपेक्षाही एका अगदी आगळ्या, वेगळ्या गोष्टीसाठी अरणमुला प्रसिध्द आहे. आणि ते म्हणजे ‘अरणमुला कन्नडी’ ! कन्नडी चा मल्याळम मधला अर्थ आहे, आरसा! अर्थात ‘अरणमुला आरसा’. ह्या आरश्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा आरसा काचेचा नसून धातूचा असतो..!

जगभरात आरसे म्हणजे काचेचेच असं समिकरण आहे. काचेला पाऱ्याचा थर लाऊन आरसे तयार केले जातात. सिल्वर नाईट्रेट आणि सोडियम हायड्रोक्साईड यांच्या द्रवरूपातील मिश्रणात किंचित साखर मिसळून गरम करतात आणि अश्या मिश्रणाचा थर काचेच्या मागे देऊन आरसा तयार करतात. ही झाली आरसे बनविण्याची ढोबळ पध्दत. यात विशिष्ट रसायने वापरून आणि विशिष्ट प्रकारची काच वापरून सामान्य ते अत्युत्कृष्ट दर्जाचे आरसे बनविले जातात.

अर्थात ही आरसे बनविण्याची पध्दत गेल्या दीडशे – दोनशे वर्षातली. पाऱ्याचा थर दिलेले आरसे बनविण्याचा शोध जर्मनीत लागला. सन १८३५ च्या आसपास जर्मन रसायन शास्त्रज्ञ जुस्तुस लाईबिग याने पहिला ‘पाऱ्याचा थर दिलेला आरसा’ तयार केला.

मात्र जगाच्या पाठीवर आरसे बनविण्याची कला फार जुनी आहे. सर्वात जुना म्हणजे सुमारे ८००० वर्षांपूर्वी आरश्यांचा उल्लेख आस्तोनिया म्हणजे आजच्या तुर्कस्थानात आढळतो. त्याच्या नंतर इजिप्त मधे आरसे मिळाल्याची नोंद आहे. दक्षिण अमेरिका, चीन मधेही काही हजार वर्षांपूर्वी आरसे वापरात होते असे उल्लेख आढळतात.
या आरशांचे प्रकार वेगवेगळे होते. दगडाचे, धातूचे, काचेचे आरसे वापरण्याच्या नोंदी आहेत. मात्र काचे शिवाय इतर धातू / दगडांपासून बनविलेले आरसे उच्च प्रतीचे नसायचे. तुर्कस्थानात सापडलेले आरसे हे ओब्सिडियन (म्हणजे लाव्हा रसापासून बनविलेली काच) चे होते.

आरश्या संबंधी लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रबंधात किंवा विकिपीडिया सारख्या ठिकाणी भारताचा उल्लेख फारसा आढळत नाही. याचे कारण म्हणजे भारतातले लिखित साहित्य बऱ्याच मोठ्या प्रमाणात आक्रमकांनी नष्ट केले. श्रुती, स्मृती, वेद, पुराण, उपनिषदे वगैरे ग्रंथ वाचिक परंपरे च्या माध्यमातून टिकले. पण आपली प्राग-ऐतिहासिक किंवा ऐतिहासिक माहिती काळाच्या ओघात बरीचशी नष्ट झाली. असे असले तरीही अजिंठ्याच्या चित्रात किंवा खजुराहो च्या शिल्पात, हातात आरसा घेतलेली, शृंगार करत असलेली रमणी आपल्याला दिसते. म्हणजे आरश्याचा उपयोग हजारो वर्षांपासून भारतात सर्वमान्य होता हे निश्चित.

सध्या बेल्जियम ची काच आणि बेल्जियम चे आरसे जगभरात प्रसिध्द आहेत. मात्र त्या बेल्जियम च्या आरश्यांना टक्कर देतील असे धातूचे आरसे अरणमुला ला बनवले जातात. अगदी नितळ आणि आरस्पानी प्रतिमा दाखविणारे आरसे..!
हे आरसे एका विशिष्ट मिश्र धातूचे बनलेले असतात. मात्र यात नेमके कोणते धातू वापरले जातात हे अजूनही गुलदस्त्यात आहे. धातुशास्त्रज्ञांनी ह्या आरश्यांचं विश्लेषण करून सांगितलं की तांबे आणि टीन च्या विशिष्ट मिश्रणाने बनविलेल्या धातूला अनेक दिवस पॉलिश केले की बेल्जियम च्या काचेच्या आरशांशी स्पर्धा करणारे आरसे तयार होतात. आणि हे ओळखले जातात, ‘अरणमुला कन्नडी’ ह्या नावाने.

केरळच्या अरणमुला मधे तयार होणारे हे आरसे वैशिष्ट्यपूर्ण आहेत, कारण जगाच्या पाठीवर, इतरत्र कोठेही असे आरसे तयार होत नाहीत. किंबहुना धातूपासून इतके नितळ आणि सुस्पष्ट प्रतिमा दाखविणारे आरसे तयार करण्याचं तंत्र, ह्या एकविसाव्या शतकातही कोणत्याही शास्त्रज्ञाला शक्य झालेलं नाही. जगात प्रचलित आरश्यांमध्ये प्रकाशाचे परावर्तन मागून होते. मात्र अरणमुला कन्नडी मधे ते समोरच्या पृष्ठ्भागातून होते, आणि त्यामुळे उमटलेली प्रतिमा ही स्वच्छ आणि सुस्पष्ट असते. लंडन च्या ‘ब्रिटीश म्युझियम’ मध्ये एक ४५ इंचांचा भला मोठा अरणमुला कन्नडी ठेवलेला आहे, जो पर्यटकांचे आकर्षण आहे.

ह्या आरशांच्या उत्पादनाची प्रक्रिया म्हणजे काही कुटुंबाच्या समुहाने जपलेले एक रहस्य आहे. त्यामुळे ह्या लोकांशिवाय हे आरसे इतर कुणालाही तयार करता येत नाहीत. असं म्हणतात, अरणमुला च्या पार्थसारथी (श्रीकृष्ण) मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, काही शतकांपूर्वी तेथील राजाने, शिल्पशास्त्रात प्रवीण असलेल्या आठ कुटुंबांना पाचारण केलं होतं. या कुटुंबांजवळ हे धातूचे आरसे तयार करण्याचं तंत्रज्ञान होतं. मुळात बांधकामात तज्ञ असलेल्या या कुटुंबांजवळ हे तंत्रज्ञान कुठून आलं, या बद्दल काहीही भक्कम माहिती मिळत नाही. ही आठ कुटुंब तामिळनाडू मधून अरणमुला ला आली हे निश्चित. यांच्याजवळ धातूंना आरश्या प्रमाणे चकचकीत करण्याचं तंत्रज्ञान फार आधीपासून होतं. मात्र त्याचा व्यापारिक उपयोग करायचं काही ह्या कुटुंबांच्या लक्षात आलं नसावं.

अरणमुला पार्थसारथी मंदिराचा जिर्णोध्दार करून झाल्यावर पुढे काय ? असा विचार करत असताना या कुटुंबांनी तिथल्या राजाला चमकत्या धातूचा राजमुकुट करून दिला. राजाला तो इतका आवडला की त्याने ह्या कुटुंबांना जागा दिली, भांडवल दिलं आणि त्यांना धातुचे आरसे तयार करायला सांगितलं. ह्या आरश्यांना बायकांच्या आठ सौभाग्य लेण्यांमध्ये समाविष्ट केलं. आणि तेंव्हापासून ह्या कुटुंबांनी धातूंचे आरसे तयार करण्याचा पेशा पत्करला.
ह्या आरश्यांमागे अनेक पौराणिक कथा / दंतकथा आहेत. हा आरसा सर्वप्रथम पार्वतीने शृंगार करताना वापरला असंही मानलं जातं. विशेषतः वैष्णवांच्या पार्थसारथी मंदिराच्या परिसरात ही पौराणिक कथा शेकडो वर्षांपासून श्रध्देने ऐकली जाते.

आज हे आरसे म्हणजे जागतिक ठेवा आहे. हे सर्व आरसे हातानेच तयार केले जातात. सुमारे डझनभर आरसे तयार करायला दोन आठवडे लागतात. कोणतेही दोन आरसे सहसा एकसारखे नसतात. परदेशी पर्यटकांमध्ये ह्या आरश्यांबद्द्ल प्रचंड आकर्षण आहे. अगदी लहानात लहान, म्हणजे एक-दीड इंचाच्या आरशाची किंमत १,२०० रुपयांच्या पुढे असते. दहा-बारा इंची आरसे तर अनेकदा वीस – पंचवीस हजारांपर्यंत विकले जातात. अनेक कॉर्पोरेट कंपन्या ह्या आरश्यांना भेटवस्तू म्हणून देण्यासाठी वापरतात.

जगाच्या पाठीवर एकमेव असलेली आणि वैज्ञानिकांना कोड्यात पाडणारी, ही धातूचे आरसे तयार करण्याची कला काही शतकांपूर्वी उजेडात आली. मात्र ती काही हजार वर्षे जुनी असावी हे निश्चित. पण मूळ मुद्दा तसाच राहतो – हजारो वर्षांपूर्वी धातुशास्त्रातली ही नजाकत, हे ज्ञान आपल्याजवळ आले कोठून..?

– अवती भवती
प्रशांत पोळ.