ज्ञानेश्वरी जयंती

आज भाद्रपद वद्यषष्ठी ज्ञानेश्वरी जयंती.
संत ज्ञानेश्वरांनी सातशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली ज्ञानेश्वरी जीवनाला मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून आजही भक्तीभावाने वाचला जातो. या ग्रंथाविषयी सविस्तर अधिक माहिती मराठी विश्वकोशात दिली आहे. https://vishwakosh.marathi.gov.in/20299/. ज्ञानेश्वरी जयंतिच्या निमित्याने मला फेसबुक आणि वॉटसॅपवर मिळालेली माहिती खाली दिली आहे. मूळ लेखकांचे मनःपूर्वक आभार.

गुरुदेव रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांनी आपल्या गीतेवरील ग्रंथात केलेले विवेचन थोडक्यात असे : ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञान व साक्षात्कार ह्यांचे अतिशय सुंदर व प्रभावी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरांचे सृष्टिनिरीक्षण किती सखोल व सूक्ष्म होते, हेही त्यातून दिसून येते. सर्व विश्वाचे आदिकारण, त्याचा कर्ता आणि नियामक ईश्वर मानला पाहिजे, हे ज्ञानेश्वरांनी विश्व-प्रपंचावरून सिद्ध करणारे प्रमाण उत्कृष्ट रीतीने मांडले आहे (९.२८०–२८५). न्यायशास्त्रातील निरनिराळ्या प्रमाणांचा – विशेषतः बुद्धिप्रामाण्य व शब्दप्रामाण्य ह्यांचा – फोलपणा दाखवून ज्ञानेश्वरांनी भक्तीचा सिद्धान्त प्रस्थापित केला आहे. कोणतेही तार्किक प्रमाण मायानदी तरून जाण्यास उपयोगी पडत नसून त्यासाठी सद्गुरू, भक्ती आणि आत्मानुभव ह्यांचाच आधार घ्यावा लागतो. तो घेऊन मायानदी उतरून जाण्यास आरंभ केला, की तरून जायला तिच्यात पाणीच शिल्लक उरत नाही. भक्ती हा दुःखाकडून सुखाकडे जाण्याचा एकमेव मार्ग होय, हा सिद्धान्त ज्ञानेश्वरांनी मांडला. साधक भक्तिमार्गाची वाट चालत असताना त्याच्या शरीरावर आणि मनावर काही प्रतिक्रिया घडून येतात. हेच अष्ट सात्त्विक भाव होत. त्यांचे मनोज्ञ चित्रण ज्ञानेश्वरांनी केले आहे. त्याचप्रमाणे आनंद आणि शांती ह्या विरोधी भावना आत्मसाक्षात्कारात कशा एकत्व पावतात, हेही त्यांनी उत्तम प्रकारे दाखविले आहे. देव आणि भक्त यांच्या अंतिम ऐक्याचा विचारही त्यांनी विविध प्रकारे मांडला आहे पण हे ऐक्य संपूर्ण होत नाही. साधक ईश्वराच्या अधिकाधिक निकट जात असला, तरी देव आणि साधक ह्यांच्या ऐक्यात काही उणेपणा राहतो. जसे चतुर्दशीचे चंद्रबिंब पौर्णिमेच्या चंद्राहून किंचित उणे असते. असे होण्याचे कारण देह, मन इ. बंधने आहेत. ती असेपर्यंत देव तो देव आणि भक्त तो भक्त असेच हे नाते राहणार. प्रवासास निघाल्याबरोबर कोणी इष्ट स्थळी पोचत नाही. चांगल्या संगतीने इष्ट स्थळी आनंदाने पोचता येते. तरी प्रवास संपण्यासाठी काही वेळ लागतोच. साधकाच्या अंतिम विजयाचे ज्ञानेश्वरांनी जे रूपकात्मक वर्णन केले आहे, ते अतुलनीय असेच आहे.
गुरुदेव रानडे ह्यांच्या मते ज्ञानेश्वरांनी केलेला गीतेचा तात्पर्यार्थ पूर्णपणे साक्षात्कारपर असून एका दृष्टीने शंकराचार्यांच्या वेदान्तपर अर्थाच्या पलीकडचा, वरचा आहे. ज्ञानेश्वरांच्या ठायी तत्त्वज्ञान, काव्य आणि आत्मानुभूती ह्यांचा झालेला अद्भुत त्रिवेणीसंगम हेच त्यांच्या गीतेवरील भाष्याचे महान वैशिष्ट्य होय.

आज ज्ञानेश्वरी जयंती भाद्रपद वद्यषष्ठी. मराठीतील गीतेवरील पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरीच्या शेवटी स्थळ, ग्रंथकर्त्याचें नांव, ग्रंथ लेखन करणाराचे नाव, ग्रंथाचा काळ यांचा उल्लेख करणाऱ्या ओव्या आहेत. सच्चिदानंद बाबा यांनी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर सांगत असलेली ज्ञानेश्वरी कागदावर उतरवली. म्हणुन लेखकु म्हणुन त्यांचा उल्लेख आहे. तसेच महाराष्ट्रमंडळी या शब्दामुळे त्यावेळी महाराष्ट्र नाव प्रचलित असावे असे वाटते. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस खाली नमूद केलेली एक कालनिदर्शक ओवी आहे


ऐसें युगीं वरि कली। आणि महाराष्ट्रमंडळी।
श्री गोदावरीचा कुलीं। दक्षिणिली॥
तेथे भुवनैकपवित्र । अनादिपंवकोश क्षेत्र ।
जगाचें जीवनसूत्र । जेथ श्रीमहालसा॥
तेथ इंदुवंशविलासु । जो सकळकलानिवासु।
न्यायातें पोखीत क्षितीशु । श्रीरामचंद्रु॥
तैं माहेशान्वयसंभुतं । श्रीनिवृत्तिनाथसुतें।
केलें ज्ञानदेवें गीतें । देशीकारलेणें॥
शके बारा शत बारोत्तरें । तै टीका केली ज्ञानेश्वरें ।
सच्चिदानंदबाबा आदरें ॥ लेखकु झाला॥


मात्र त्याकाळी छपाई नसल्याने एकमेकांकडून प्रत लिहून घेण्याची पद्धत होती. त्यामुळे अनेक कानामात्रा वेलांटी चुकत गेल्या म्हणून त्या दुरुस्त करून ज्या दिवशी ज्ञानेश्वरी पुर्ण झाली म्हणजेच भाद्रपद वद्य षष्ठीला ती शुद्ध झाली. म्हणून ज्ञानेश्वरीची जयंती साजरी करण्यात येते.
शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते.
सभामंडपात संत नामदेव यांचा एक श्लोक लिहिला आहे त्यात ‘म्हाळसापुरी ‘असे नेवासे गावाचा उल्लेख आहे. म्हाळसा म्हणजे खंडेरायाची पत्नी तिचे माहेर म्हणजे नेवासा.
सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा भावार्थाने परिपूर्ण ग्रंथ ; मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत (गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तामिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.
शके १६१४ ते १६१६ म्हणजेच इसवी सन १६९२ ते १६९४ अशी २ वर्षे रामजी यांनी अजानवृक्षाखाली बसून ‘श्री ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाचे पुनर्लेखन केले .जो सध्या सर्वांत जुन्या ग्रंथांपैकी एक मानला जातो. ही प्रत पंढरपूर येथील होळकर वाड्यात वसंतराव बोरखेडकर-बडवे यांनी जतन केली आहे.
नेवासे हे पुणे औरंगाबाद मार्गावर नगरचे पुढे गोदावरी काठी आहे ,प्रवरा संगम ,देवगड,तसेच एक जुने हेमाडपंथी देवालय हे तेथील आकर्षण आहे.नेवासे येथे गेल्यावर मनचक्षुपुढे पाचही पोरकी भावंडे येतात. परकर पोलके घातलेली ज्ञानेश्वरांचे बोट धरून चालणारी छोटी मुक्ताई दिसते व मन हेलावून जाते.
शके १२१२ किंवा इ. स. १२९० मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने – ६.१४)
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत.
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर ह्यांनी गीतेवर रचिलेली टीका. भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी ह्या ग्रंथाची पर्यायी नावे होत. स्वतः ज्ञानेश्वरांनी ह्याग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे तथापि संत नामदेवांनी ह्या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची वा ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशीनावे पुढीलांनी रूढ केली असावीत. ज्ञानेश्वरांनी आपले कार्य निवृत्तीनाथ यांना सादर केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी हे फक्त नऊ पद्य असलेल्या पसायदान लिहून केले. पसायदानाचा शब्दशः अर्थ असा होतो की, ईश्वराकडून आश्रय मागणे. पसायदानामध्ये, ज्ञानेश्वराने स्वतःसाठी काहीच मागितले नाही परंतु त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या भल्यासाठी प्रार्थना केली. पसायदानाचे दुसरे काव्यात, ज्ञानेश्वर भगवंताला विनंती करतात की त्यांना असे वरदान द्यावे कि ज्यामुळे ते सर्व द्रुष्ट लोकांच्या मनातील वाईट गोष्टीं काढून त्यांना एका धार्मिक मार्गावर आणता येईल. मानवातील वाईट गोष्टी म्हणजे काम, क्रोध, लोभ, मत्सर आणि अहंकार. त्यांनी प्रार्थना केली की या वाईट गोष्टींची जागा दया, नम्रता, सहिष्णुता, क्षमा आणि भक्ती आणि देवाला शरण याने घेऊ दे .


…………. 🌹 🌹 #पसायदान 🌹 🌹
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||


ज्ञानेश्वरीवर मुद्रण व्यवस्था अस्तित्वात आलेवर सुरू झालेवर सुमारे १९६ पुस्तके तयार झाली. तसेच संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.त्यामध्ये
‘ज्ञानेश्वरी’ लिहून घेणारे लेखक – सच्चिदानंद बाबा
‘ज्ञानेश्वरी’चे पहिले भाष्यकार – संत निवृत्तीनाथ महाराज.
‘ज्ञानेश्वरी’चे पहिले संशोधक – संत एकनाथ.
‘ज्ञानेश्वरी’चा पहिला संकलनकार – संत महिपती.
‘ज्ञानेश्वरी’चे पहिले प्रसारक – संत नामदेव.

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरील फळ्यावरून साभार दि.२७-०९-२०२१

********************************


बहुकाळपर्वणी गोमटी| भाद्रपदमास कपिलाषष्ठी|
(श्रीसंत एकनाथमहाराज)
फक्त दोनच ग्रंथांची जयंती साजरी होते असे आपण जाणतो,एक श्रीगीता जयंती आणि दुसरी श्रीगीतेवरील टीका असणारा ग्रंथ श्रीज्ञानेश्वरीची! दोन्ही ग्रंथ श्रेष्ठ आहेत,जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे आहेत. मराठी सारस्वताचे वैभव म्हणून ज्ञानेश्वरीकडे पाहिले जाते.श्रीसंत एकनाथांनी ज्ञानेश्वरीचे संशोधन पूर्ण केले ती आजची तिथी,भाद्रपद वद्य षष्ठी, ज्ञानेश्वरी जयंती म्हणून गणली जाते.शके १५०६, तारण नाम संवत्सर त्यावेळी सुरू होते हा उल्लेख नाथ महाराजांनी केला आहे. कालगणनेनुसार प्रत्येक संवत्सर दर साठ वर्षांनी पुन्हा येते.२००४ मध्ये तारण नाम संवत्सर आले होते. सोलापूरचे आदरणीय वै दा का तथा भाऊ थावरे ह्यांच्या मार्गदर्शनात पैठण येथील नाथांचे समाधी मंदिरात तीन दिवस ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण ह भ प मुकुंद महाराज जाटदेवळेकर ह्यांचे नेतृत्वात करण्यात आले होते.प्रत्येकाच्या जीवनात तारणनाम संवत्सर येण्याचा योग बहुधा एकदाच येतो ती पर्वणी आपण साधली पाहिजे असे भाऊंचे सांगणे होते,हा लाभ त्यांनी अनेक भाविकांना घडविला.
पैठणच्या भव्य माहेश्वरी धर्मशाळेत सर्वांच्या निवासाची सोय केली होती. श्रीसंत साहित्य सेवा संघ सोलापूर आणि खंडाळकर अण्णा ह्यांच्या सहयोगाने त्रिदिवसीय पारायण उत्तम रीतीने संपन्न झाले.शेवटचे दिवशी नाथ समाधी मंदिर ते नाथांचे पवित्र निवासस्थान अशी ज्ञानेश्वरी मस्तकी धारण करून दिंडी मिरवणूक निघाली होती. शांतिब्रह्म नाथांचे समाधी नजीकच गोदावरी,अर्थात भागीरथी संथ वाहते, सायंकाळी आरती समयी पादुकांच्या भागीरथी स्पर्शाने वातावरण अधिकच भक्तिमय होते.
ज्ञानेश्वरी संशोधनाची आवश्यकता काय होती हे श्रीएकनाथांनी सांगितले आहे,माऊलींची तशी प्रेरणा होती आणि मुळातच शुध्द असणाऱ्या ग्रंथात थोडे पाठभेद निर्माण झाले होते ते दूर झाल्याने प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी चा निर्वाळा त्यांनी दिला आहे. ज्ञानेश्वरीतील ओवी साडेतीन चरणांची आहे, ग्रंथात जिथे चार चरणांची ओवी आलेली आहे,ती नाथमहाराजांनी संशोधित केली असावी हे भाऊंचे म्हणणे सुयोग्य वाटते.श्रीएकनाथांचे ज्ञानेश्वरीचा महिमा वर्णन करणारे बरेच अभंग आहेत.
श्रीज्ञानदेवा चरणी|मस्तक असो दिन रजनी
संस्कृताची भाषा|मऱ्हाठी निःशेष अर्थ केला
ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी|अनुभव दावी भाविकां
एका जनार्दनी अनुभव|समाधि ठाव अलंकापुरी
हे ज्ञानेश्वरीचे श्रेष्ठत्व सांगतात.
अभ्यासकांसाठी ज्ञानेश्वरी अत्युत्तम काव्य आहे, उपासकांसाठी अनुभवाची खाण आहे,ज्ञानवंतांसाठी तत्वज्ञानाचे भांडार आहे, सिद्धपुरुषांसाठी सर्व शास्त्रांचे सरोवर आहे आणि भाविकांसाठी भक्तीरसाचे आगर आहे. ज्ञानेश्वरीची सेवा प्रत्येकाला कृपेची सावली प्रदान करते हे नक्की!
साच बोलाचे नव्हे हे शास्त्र
पै संसारु जिणते हे शस्त्र
आत्मा अवतरविते मंत्र
अक्षरे इये
(श्रीज्ञानेश्वरी १५.५७६)
शास्त्राचा संबंध विचाराशी आहे,शस्त्राचा संबंध कृतीशी आहे आणि मंत्राचा संबंध परिणाम दर्शवितो म्हणूनच श्रीगीता आणि श्रीज्ञानेश्वरी हे श्रेष्ठ ग्रंथ आहेत यासाठी त्यांची जयंती साजरी होते, त्यांचे चिंतन,मनन आणि पठण सुफळ प्रदान करतात!
🙏🙏🙏🙏🙏
संजीव प्र कुसूरकर,पुणे

********************

ज्ञानेश्वरी जयंती
(भाद्रपद वद्य षष्ठी, स्रोतः कायप्पा)
आज २७ सप्टेंबर भाद्रपद वद्य षष्ठी. हा दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरा केला जातो. वास्तविक ज्ञानेश्वरी ग्रंथ नेमका कोणत्या दिवशी पूर्णत्वास गेला ती तिथी अज्ञात आहे. परंतु एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याचे काम या दिवशी पूर्ण केले. म्हणून हा दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरा करतात. नाथांचे त्यांच्या जीवनातील महत्वाचे कार्य म्हणजे ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करणे. एके दिवशी त्यांचा घसा दुखू लागला. त्यावर औषधोपचार झाले. पण गुण येईना. तिसर्‍या दिवशी ज्ञानदेव त्यांच्या स्वप्नात आले. त्यांना म्हणाले, ‘माझ्या मानेस अजानवृक्षाच्या मुळीचा गळफास बसला आहे. तो तू स्वत: येथे येऊन काढ. म्हणजे तुझा घसा बरा होईल. म्हणून समुदाय बरोबर घेऊन कीर्तन करीत नाथ शके १५०५ मधे आळंदीस आले. याविषयी नाथांचा अभंग प्रसिद्ध आहे.
श्रीज्ञानदेवें येऊनी स्वप्नात ।
सांगितली मात मजलागी ॥१॥
दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा ।
परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥
अजानवृक्षाची मुळी कंठास लागली ।
येऊनी आळंदी काढी वेगे ॥३॥
ऐसें स्वप्न होता आलो अलंकापुरी ।
तंव नदी माझारी देखिले द्वार ॥४॥
एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले ।
श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥५॥
स्वप्नातील दृष्टांतानुसार नाथ आळंदीस आले. आळंदीस सिद्धेश्वराचे स्थान प्राचीन होते. ते स्थान गर्द झाडीने वेढलेले होते. बरोबरच्या मंडळींना बाहेर बसवून नाथ समाधिस्थानाच्या शोधार्थ निघाले. दूरूनच त्यांना अजानवृक्ष दिसला. समाधीचे दार उघडून ते आत शिरले. तेथे त्यांना वज्रासन घालून बसलेले ज्ञानराज दिसले. त्यांचे दर्शन होताच एकनाथांनी त्यांच्या पायी दंडवत घातले. तीन अहोरात्र त्यांना ज्ञानराजांचा सहवास लाभला असे केशवांनी नाथचरित्रात लिहीले आहे. अजानवृक्षाची मुळी मस्तकाला लागल्याचे निमित्त करून ज्ञानदेवांनी नाथांना प्रत्यक्ष दर्शन दिले व ज्ञानेश्वरीचा लोकात प्रसार करण्यची आज्ञा केली. नाथ समाधीच्या बाहेर आल्यावर लोकांनी पूर्ववत समाधीस्थानावर दगड रचून टाकले.
पैठणला परतल्यावर नाथांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधनाचे कार्य हाती घेतले. लोकांच्या व पाठकांच्या चुकीमुळे काही अशुद्ध व अबद्ध पाठ त्यात घुसडले गेलेले होते. ते त्यांनी काढून टाकले व ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत वाचकांच्या हाती दिली. नाथांना ज्ञानदेवांचे दर्शन शके १५०५ मधे ज्येष्ठात झाले व ज्ञानेश्वरी संशोधनाचे काम शके १५०६ मधे तारण नाम संवत्सरी संपले. ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी हा ज्ञानेश्वरी शु्द्धिकरणाचा काळ नोंदवला आहे. तो ग्रंथ मूळचा अतिशय शुद्ध असून लोकांच्या पाठभेदामुळे अशुद्ध झाला होता तो संशोधित करून आपण ही प्रत तयार केली आहे असे त्यांनी सांगितले आहे. आज आपण वाचतो ती एकनाथांनी तयार केलेली ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत. भाद्रपद वद्य षष्ठीला हे काम पूर्ण झाले. म्हणून तो दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून मानण्यात येतो.

श्री.नरेंद्र गोळे यांच्या चर्यापुस्तकभिंतीवरून साभार . . दि. २७-०९-२०२१

गीताअध्यायसार

माझे एक ज्येष्ठ आप्त श्री.मधुसूदन थत्ते यांनी त्यांच्या फेसबुकाच्या पानावर एक नवी लेखमाला सुरू केली आहे. त्यात ते दररोज श्रीमद्भगवद्गीतेच्या एकेका अध्यायाचा सारांश सुलभ भाषेत देतात. हे सगळे भाग मी या पानावर साठवण्याचे ठरवले आहे. त्यांच्या अनुमतिनेच मी हा उपक्रम सुरू केला आहे. आज यातले पहिले सहा अध्याय दिले आहेत. पुढील अध्यायांवरील निरूपण जसजसे मला उपलब्ध होईल तसतसे ते दिले जात राहील. दि. १०-०४-२०२०.          सर्व १८ अध्यायांवरील निरूपण देऊन ही मालिका पूर्ण केली आहे. दि.२२-०४-२०२०

कृपया हे संकलनसुद्धा पहा : भगवद्गीतेमधील तत्वज्ञान – भगवद्गीतासार
https://anandghare.wordpress.com/2019/02/13/%e0%a4%ad%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8/

#गीताअध्यायसार

श्री.मधुसूदन थत्ते

(मला भावलेलं भग्वद्गीतेचं मोजक्या शब्दातील सार एक एक अध्याय घेत घेत आणि संदर्भासहित)
भगवद्गीता …अध्याय १: अर्जुन विषाद योग
********************

गीताअध्यायसार 1
कोण अर्जुन…कोण कौरव…आणि, हो, कोण पांडव…?
असं पहा तुमच्या-माझ्या मनात सतत संघर्ष चालू असतो..नकारात्मक विचार जे संख्येने पुष्कळ असतात (कौरव) आणि सकारात्मक विचार जे संख्येने फार कमी असतात (पांडव).
मग कृष्ण तरी कोण..?
ह्यात कृष्ण तुमच्यातला विशुद्ध असा “मी” आहे हे मानले तर…?
आणि अर्जुन..? तो तर संभ्रमात पडलेला “मी” असे मानूया..
त्या विशुद्ध अशा “मी” ला म्हणजे अंतर्मनाला म्हणजे आपल्यातल्या कृष्णाला जेव्हा संभ्रमात पडलेला “मी” दिसून येतो तेव्हा त्या सतत चाललेल्या नकार-सकार संघर्षाच्या ऐन युद्धात विशुद्ध मी जीवनाचे अखंड तत्वज्ञान सांगतो…
किती वेगाने..?
तो वेग आपण नाही समजू शकत..
मनाने मनाला जागे करण्याचा वेग. आणि हा संदेश नंतर गीतेच्या सातशे श्लोकात आणि पुढे ज्ञानेश्वरीच्या काही हजार ओव्यात सांगितला गेला आणि तरीही आपल्याला तो शंभर टक्के समजलेला नाही…अजून त्यावर ग्रंथ लिहिले जात आहेत..
पहिल्या अध्यायार्चे हे मला भावलेले सार आहे
संदर्भ: The Holy Gita by Swami Chinmayanand. (Page 10-11)
मधुसूदन थत्ते
०५-०४-२०२०
——————–
#गीताअध्यायसार
अध्याय २ “Yoga of Knowledge”

गीताअध्यायसार २
मित्रांनो,
आज गीतेच्या दुस-या अध्यायात काय आहे ह्याचा अति-संक्षिप्त आढावा घेऊ.
ह्या अध्यायाला “Yoga of Knowledge” असे म्हटले जाते.
सांख्य योग्य अशा जरा कठीण नावाचा पदर उचलून आत डोकावले की हळू हळू कळते की गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे रत्नाची खाण आहे..
होय……ती रत्ने ज्यांचा आपण अधून मधून प्रसंगानुरूप उल्लेख करतो..
ज्ञानयुक्त बुद्धीचा वापर न केल्याने अर्जुन स्वधर्म आणि स्वकर्म करण्यामागची खरी भूमिका समजून घेत नव्हता…
श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनात काही अटळ सत्ये कशी उतरवली हे ह्या अध्यायात पाहून घ्या..
एक एक सत्य उलगडताना वेगवेगळी अर्थपूर्ण शब्दरत्ने वापरली..
कुठली रत्ने..?
अरे, ही सुभाषिताच्या रूपात विखुरलेली रत्ने आज..हजारो वर्षांनंतर आपण वापरतो की.. …!!!!
कोणी देह सोडून गेला की आपोआप मनात येते..
“वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देही ॥ (२२)”
(शरीर हे तर आत्म्याचे एक वस्त्र फक्त)
**************************
आत्मा कुठे मरतो..तो असा आहे ज्याला कोणीच नाश करू शकत नाही.
“नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ (२३)”
**************************
आपण म्हणतो आपण आपले कर्तव्य करावे..result कडे लक्ष्य असू नये…
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ (४७)”
**************************
वासनेच्या आसक्तीने क्रोध होतो…आणि मग ..संमोह..मग स्मृतिनाश..मग बुद्धिनाश ..आणि अखेर प्रणश्यति…!! (मरणच…)
“ध्यायतो विषयान्पुंस: सङ्गस्तेषूपजायते |
सङ्गात्सञ्जायते काम: कामात्क्रोधोऽभिजायते || 62||
क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम: |
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति || 63||”
**************************
पाहिलेत..एक एक शब्द-रत्न किती मौल्यवान आहे ते…तुम्ही नक्की ह्या ना त्या रूपात ही रत्ने वापरली आहेत नाही का..?
हीच ती ज्ञानयुक्त बुद्धी जिचे हे वर दिलेले आणि आणखी अनेक असे दागिने आपण ह्या दुस-या अध्यायात बघतो…!!!
मधुसूदन थत्ते
०६-०४-२०२०
————————

#गीताअध्यायसार
अध्याय ३ कर्मयोग

अर्जुन विषाद आणि सांख्य (ज्ञान) योग ह्यांचे सार आपण पाहिले…
कृष्णाने सा-या जगताला विचारात घेतले आहे..
ज्ञानी असणे-होणे आणि सिद्ध मुनीप्रमाणे निष्क्रिय साधना किंवा तप करणे आणि परमात्म्याशी एकरूप होणे आपल्याला कसे जमावे..?
पक्षी उंच उडून उंच अशा आम्रवृक्षाचे फळ लीलया खायला जाईल पण माणूस..? त्याला त्या फळासाठी झाडावर चढावे लागेल..फांदी गाठावी लागेल आणि जरा धोका पत्करून मगच हाती ते उंच फळ त्याला मिळेल नाही का…? (सोबतचे चित्र पाहावे)…
हाच फरक ज्ञानयोगी आणि कर्मयोगी ह्यांचात समजावा.
आपल्याला विहित कर्म करत करत परमात्म्याचे दर्शन होईल..
ह्या अध्यायाच्या ५व्या श्लोकात म्हटले आहे..”मनुष्य एक क्षणही कर्माशिवाय राहू शकत नाही.
विहित..? म्हणजे तरी काय…?
म्हणजे नित्य आणि नैमित्यिक कर्मे करावी आणि काम्य आणि निषिद्ध कर्मे त्यागावी..
Better said than done नाही का…?
कर्मनिष्ठ काय काय करतो…?
प्रथम स्वधर्माने सुनिश्चित केलेली कर्तव्ये करणे…आणि हे करतांना इंद्रिय-निग्रह आणि काम-क्रोधाला विसरणे
आपल्या धर्मात पंचकर्मे सांगितली आहेत…वेदकाळी सांगितली त्यामुळे आजच्या संदर्भात आपली आपण सुयोग्य बदल करून करावी.
अशी ही त्या काळाची काय काय कर्मे सांगितली…?
१……देव-यज्ञ: ……..रोज अग्नीला समिधा देणे..(आज आपण अग्निहोत्र करावे)
२……पितृ यज्ञ: …….. गत पूर्वजांना जल-आणि भाताचा घास द्यावा (घराबाहेर घास ठेवला की कावळा तो घेऊन जात असतो…….. (सोबतचे चित्र पाहावे)……
.
३……भूत यज्ञ: ……..अग्नीत शिजलेले अन्न अर्पावें (अग्नी..? आजकाल शेगड्या नसतात..मग..? यासाठी चित्राहुती घालाव्या ही आपली माझी suggestion… )
४……मनुष्य यज्ञ: …….. दारी अतिथी आला तर त्याला भोजन द्यावे…न आला तर रोज कोण्या गरिबाला अन्न द्यावे.
५……ब्रह्म यज्ञ: ……..ज्ञान दान करीत राहावे
हा अध्यायच काय, लोकमान्यांनी गीता रहस्य ग्रंथाचे पर्यायी नावच मुळी “कर्मयोग शास्त्र” असे ठेवले आहे…!!!!
मधुसूदन थत्ते
संदर्भ: सुबोध ज्ञानेश्वरी (य. गो. जोशी)
07-04-2020
————————–

अध्याय ४
**********
गीताअध्यायसार ४
अर्जुनाला ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला…
काम आणि क्रोध माणसाला पांगळे बनवते…पण कर्माला ज्ञानाचे डोळे लाभले तर …? मग विवेक सुचतो आणि विहित कर्म निष्काम होऊन जाते…
हाच तर निष्काम कर्म योग किंवा ज्ञानकर्मसन्यास योग ज्याच्या साठी देवाने हा चौथा अध्याय सांगितला…!!!
“मी सूर्याला हा निष्काम कर्म योग प्रथम सांगितला…” कृष्ण म्हणाला..
मनुष्यस्वभाव व्यासांनी कसा ओळखला पहा..श्रेष्ठतम मनुष्य म्हणजे अर्जुन प्रत्यक्ष भगवंतावर शंका घेतो..म्हणतो,
“देवा तू तर आत्ताचा…आणि सूर्य तुझ्या कितीतरी आधीचा..मग तू सूर्याला प्रथम कसे काय सांगितलंस…?”
भाबडा प्रश्न …!!!
भगवंत म्हणतात…
“तुझा प्रश्न रास्त आहे…तो सूर्य माझ्याच मायेतून जन्माला आला..
तुझे तसे माझे आजवर अनेक जन्म होऊन गेले आहेत पण तुला आपल्या गत-जन्माची स्मृती राहिली नाही…!!!”
निष्काम कर्म…!! अर्जुनाला कर्माचे प्रकार तरी काय हे हवे होते..
कर्म…अकर्म..विक्रम…गोंधळच व्हावा..!!!
आणि इथेच वर्ण—आश्रम..हे शब्द पुढे आले ज्यांच्यावर आजही ह्या २१व्या शतकात वाद चालू आहेत.
कृष्णाने सांगितले…वेदांनी प्रत्येक वर्णाला, आश्रमाला, जी जी विहित कर्मे सांगितली आहेत ती ती निष्ठेने आचरत राहणे ह्यालाच म्हणतात विकर्म..!!!
आणि…
आपण हेही ओळखायला हवे की कोणती कर्मे निषिद्ध आहेत आणि ह्या निषिद्ध क्रमांना अकर्म म्हणावे.
असा निष्काम कर्म योगी नित्य संसारात असतो पण असूनही नसतोच..
पाण्यात सूर्य-प्रतिबिंब अगदी सूर्य वाटते..असते का ते सूर्य..? तसा हा योगी संसारात असतो पण असत नाही..
ह्यानंतर ह्या अध्यायात यज्ञाचे काही प्रकार सांगितले आहेत..
यज्ञ…? म्हणजे होम..अग्नी..वेदी..वेदाचार्य…?
नव्हे…
संयम यज्ञ……….काम-क्रोधावर विवेक
द्रव्य यज्ञ……….दान करणे
तपोयज्ञ……….साधना..तप….ध्येयासाठी परिश्रम
वागयज्ञ……….वेदपठण…नित्याची मौखिक साधना..
आणि सर्वोत्तम यज्ञ हा ज्ञानयज्ञ…..यज्ञदान !!!
मित्रांनो…हा चौथा अध्याय म्हणजे गीतारूपी शांतरससागराची एक समृद्ध अशी लाटच आहे नाही का…?
मधुसूदन थत्ते
०८-०४-२०२०
संदर्भ: गीतासागर (शंकर अभ्यंकर) आणि सुबोध ज्ञानेश्वरी (य. गो. जोशी)

#गीताअध्यायसार
अध्याय ५ कर्मसंन्यास योग

गीताअध्यायसार ५
अर्जुन कृष्णाला म्हणाला
“एकदा म्हणतोस कर्मसंन्यास मोक्षासाठी श्रेष्ठ आणि मग म्हणतोस निष्काम कर्मही तेच फळ देते…अरे, नक्की काय करावे…? कर्मत्याग की कर्मयोग ..? ”
भगवंत ह्या अध्यायात ह्या प्रश्नाचेच उत्तर देतात.
ज्ञानी होऊन कर्म आचरायचे…बुद्धीची एक हद्द असते. ती तर्कांपुरती मर्यादित असते. कार्यकारण संबंधापुरती असते..त्या सीमेपलीकडे ती जाऊ शकत नाही आणि तिथे जायला प्रज्ञा आवश्यक असते..
प्रज्ञाचक्षू मिळवावे लागतात ज्यायोगे अंतरंगाचे दर्शन होते…मी म्हणजे हा देह ह्या भावनेपलीकडे ज्ञानी जातो आणि दैनंदिन सारी कर्मे अन्य कोणासारखीही करत असतो पण त्याचे मन त्यात अडकून राहात नाही जसा कमलदलावर जलाचा थेंब …
निरासक्त असूनही सर्व विहित कर्मे करत जायचे …काम,क्रोध, मंद, मत्सर, लोभ, मोह…ह्याचा स्पर्शही ज्ञानी मनाला होत नाही.
असे होता येते का…?
जरा काही उदाहरणे मनात आणा…
भक्त हनुमान…राजा जनक…पूर्ण वैराग्य असलेला शुक…जितेंद्रिय विवेकानंद… संत एकनाथ….संत रामदास
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि |
योगिन: कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये || 11||
(निष्काम कर्मयोगी ममत्व बुद्धी रहित केवळ इंद्रियांनी, मनाने, बुद्धीने आसक्तीला त्यागून अंत:कारणाच्या शुद्धीसाठी कर्मे करीत असतात.)
केवळ २९ श्लोकाच्या ह्या अध्यायाचे वैशिष्ठय पहा..
प्रारंभी कर्मयोग आणि ज्ञानयोग ह्यांचे निरूपण, निष्काम कर्मयोगाची थोरवी सांगितली, आणि अध्यायाच्या शेवटी राजयोगाला स्पर्श करत अखेरच्या श्लोकात भक्तियोगाचे माहात्म्य सुद्धा वर्णिले आहे…!!!
अर्जुनाला हा जो राजयोग स्पर्श दिसला त्याचे अति संक्षिप्त वर्णन……. (श्वास-नियंत्रणाने प्राण आणि अपान वायू ह्यांच्या नियमनाने सुषुना नाडीतून चेतना जागृत करायची)……. ऐकून त्याची जिज्ञासा जागी झाल्याचे कृष्णाच्या लक्षात आले.
भगवंताने मग अर्जुनाला सांगितले..
“हो, ह्याच उपक्रमाबद्दल मी तुला पुढल्या अध्यायात विस्तृत सांगणार आहे…!!!”
मधुसूदन थत्ते
संदर्भ: गीता सागर: श्री शंकर अभ्यंकर
०९-०४-२०२०
——————-

#गीताअध्यायसार
*****************
अध्याय ६

एक वेदिक मंत्र आहे…”तत्वमसि—तत त्वम असि ”
काही गीतेचे अभ्यासक असे मानतात की १८ अध्याय हे सहा…सहा…सहा असे ह्या प्रत्येक शब्दाचे प्रतीकरूप आहे. स्वामी चिन्मयानंद असेच मानत आले आणि अध्याय १ ते सहा हा गट त्वम शब्दाचे प्रतीकरूप आहे असे ते म्हणतात.
५व्या अध्यायात आपण पाहिले की कर्मसंन्यास आणि निष्काम कर्म वेगवेगळे असूनही कसे एकच उद्दिष्ट ठेवतात…मोक्षाचे….!!
निष्काम कर्म…म्हणायला सोपे पण आपण तर वासनांचे श्रेष्ठतम गुलाम….गुलामाने मालकाला कसे जिंकावे…?
आणि हेच ह्या सहाव्या अध्यायात विस्तृतपणे सांगितले आहे…
ह्यातला पाचवा श्लोक तर काही शाळांमध्ये “ब्रीद-वाक्य” मानला गेला आहे..
“उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् |
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: || 5||”
भगवंत म्हणतात तुम्हीच तुमचे मित्र आणि तुम्हीच तुमचे शत्रू..पहा..कोण व्हायचे तुम्हाला…
जर मित्र असाल तर स्वतः स्वतःचा सर्वांगीण उद्धार करायचे काम (अगदी विद्यार्थी दशेच्या सुरुवातीपासून) हाती घ्या
हे सोपे नाही मेडिटेशनच्या सहाय्याने (ध्यान-धारणा..इत्यादी अष्टांग योगाच्या पाय-या एक एक चढत जायला हवे…) हे सुलभ होते आणि सहाव्या अध्यायाचे हेच उद्दिष्ट आहे.
स्वामी चिन्मयानंद फार सुंदर सांगतात…इंग्रजीत आहे पण सोपे आहे..
“This chapter promises to give us all the means by which we can give up our known weaknesses and grow positively into a healthier and more potent life of virtue and strength. This technique is called meditation, which in one form or another, is the common method advocated and advised in all religions, by all prophets, at all times, in the history of man”
आज आपण “कुंडलिनी” ह्या संकल्पनेबद्दल हे काहीसे “मला कसे जमावे ?” ह्या कॅटेगरीचे मानतो…
मूलाधार ते सहस्रदल अशी सहा चक्रे आपल्याही शरीरात आहेत का..?
आपणही त्या कुंडलिनी नामक अनंत शक्तीला जागे करून हळू हळू प्रयत्नांनी वर वर आणत मस्तकात पोहोचवू शकू का…?
म्हणतात की विवेकानंदांची कुंडलिनी रामकृष्णांच्या एका स्पर्शाने जागृत झाली….
आपल्यालाही भेटतील का असे कुणी….?
हो, मित्रांनो आपल्यालाही भेटतील असे ..
पण कोण…?
तुम्ही स्वतःच….
ही आपली प्रत्येकाची क्षमता आहे हेच हा अध्याय सांगतो…
हां.. लक्षात असावे…हा मार्ग योग्य गुरुविना सापडत नाही…गुरुविना प्रयत्न केल्यास धोका होऊ शकतो…
म्हणूनच “त्वम” ह्या सहा अध्यायाच्या शेवटच्या ह्या अध्यायात “त्वम” ला महत्व आहे..
मधुसूदन थत्ते
१०-०४-२०२०
संदर्भ The Holy Geeta” by Swami Chinmayanand.

***************************************

#गीताअध्यायसार
अध्याय ७

मित्रांनो, पाचव्या अध्यायात आपण पाहिले की बुद्धीची एक हद्द असते. ती तर्कांपुरती मर्यादित असते. कार्यकारण संबंधापुरती असते..त्या सीमेपलीकडे ती जाऊ शकत नाही आणि तिथे जायला प्रज्ञा आवश्यक असते..
मनुष्याची क्षमता:……….बुद्धी आणि प्रज्ञा
परमात्म्याची रूपे :……. सगुण आणि निर्गुण
अनुभव:…………………..व्यक्त गोष्टीचा आणि अव्यक्त गोष्टीचा
भगवंताचे रूप:…………. अपरा प्रकृती (हे दृश्य विश्व्) आणि परा प्रकृती (विश्वाचा आधार असे चैतन्य)
मित्रांनो, इथेच कळून आले विज्ञान (अपरा प्रकृती) कुठवर आणि मग ज्ञान (परा प्रकृती) कुठपासून…
हा सातवा अध्याय ह्याच ज्ञान-विज्ञानाच्या विवेचनासाठी आहे.
बुद्धी काय तपासून बघते..?…ज्ञात कार्य-कारण…नाही का…?
मग अज्ञात असे कार्यकारण असू शकते का…?
एखादे चिमुकले बाळ, हाती एक खेळणे घेऊन मनाशीच हसते…आपण नेहेमी हे पाहत असतो…त्या बाळाशी कोणीही बोलताना दिसत नाही..एकटेच असते…तरीही हसते…का…? …
हेच ते अज्ञात कार्य-कारण…!! (सोबतचे चित्र पहा)
सत्व, रज, तम ह्या त्रिगुणांनी जेवढे जेवढे पदार्थ आणि प्राणिमात्र निर्माण झाले आहेत ते सगळे मायेपासून…ह्या परमात्म्याच्या छायेपासून निर्माण झाले आहेत पण त्यात परमात्मतत्वाचा स्पर्श नाही..आपली सावली हलताना दिसते पण त्या सावलीत आपण असतो का..?
ह्या मायेचाही वेध ह्या अध्यायात तुम्ही पाहाल.
आपला ग्रुप भक्तीचा आहे..आपण प्रत्येक जण भक्त आहोत..
कसे भक्त..?
म्हणजे काय..? भक्त कसे असतात तसे भक्त…!!!
नाही..चार प्रकार असतात भक्तांचे..
१……आर्त भक्त : आत्मसुख शोधत बसणारे
२……जिज्ञासू : आत्मसुखापलीकडे हे विश्व् कोणी निर्माण केले ह्याचा विचार करणारे
३……अर्थार्थी : जीवनात खूप तऱ्हेची सुखे मिळावी म्हणून परमात्म्याचा शोध घेणारी
४……ज्ञानी : सुख-दु:ख, व्यक्त-अव्यक्त इत्यादी द्वैत ख-या ज्ञानाच्या प्रकाशामुळे ह्यांच्या मनातून नाहीशी झालेली असतात.
मग आपण कोण ह्यातले..? प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे…
शक्य आहे की आपल्यापैकी बहुतेक सारे “जिज्ञासू” ठरावे..
सोबतच्या चित्रात दूर क्षितिजावर निरखून पाहणारे आजोबा कदाचित हेच ठरवत असावेत…? मी ह्यातला कोण…??
अर्जुनाला मात्र “ज्ञानी” भक्त करायचा संकल्प कृष्णाने केला होता…त्यासाठीच ही गीतेची सातवी पायरी…ज्ञान-विज्ञान योग…!!!
मधुसूदन थत्ते
११-०४-२०२०
संदर्भ: गीतासागर : श्री शंकर अभ्यंकर आणि सुबोध ज्ञानेश्व्री : य. गो. जोशी.

***********************
#गीताअध्यायसार
अध्याय ८


मित्रांनो, काय अक्षर असावे हे ॐ ?
काय दिव्यता आहे त्यात…काय प्रभाव आहे हा…? हे अक्षर पण आहे आणि अ-क्षर पण आहे…!!!
ॐकार हे अखंड अविनाशी ब्रह्माचे अक्षर आहे…आणि ह्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन कृष्णाला विचारतो..
“देवा, तत ब्रह्म किम…?”…अध्यात्म काय ? ..कर्म काय ?…अधिभूत आणि अधिदैव म्हणजे काय…?
“अहं ब्रह्मास्मि ” म्हणणारा प्रत्येक जण ज्ञानी होऊ शकतो…भगवंतांनी सहाव्या आणि सातव्या अध्यायात हे विशद केले आहे.
ह्या आठव्या अध्यायात त्याच ब्रह्माची पूर्ण ओळख दिली आहे. अक्षर-ब्रह्म हेच तर अध्यायाचे नाव आहे.
ब्रह्म….जे ह्या शरीरात आहे…
अनंत छिद्रे असलेल्या शरीरात आहे आणि तरीही गळून पडत नाही…
अनंत अशा विश्वात ते भरून आहे जन्मणा-या प्रत्येक जीवात आहे..घडणा-या प्रत्येक पदार्थात आहे..
आणि
सजीव-निर्जीव नाश पावले तरी ते नाश पावत नाही ..ते ब्रह्म…आणि अशा ब्रह्माच्या अखंडत्वाचा “स्वभाव” म्हणजे अध्यात्म…!!!
साबणाच्या पाण्याचे फुगे हवेत सोडणारा मुलगा (सोबतचा फोटो पहा) आणि नानाविध वस्तुमात्र विश्वात सोडणार ब्रह्म सारखेच कारण जसे फुगे क्षणिक तसे मायेने निर्माण झालेले हे विश्व् पण ब्रह्माच्या मोजपट्टीवर क्षणिकच..
फुगे सोडणारा मुलगा आपल्याला दिसतो ब्रह्म दिसत नाही कारण ब्रह्म हे निराकार आणि अनित्य असे आहे…!!!
शरीरात वावरणारा परमात्म्याचा अंश ते अधिदैव…
अन्ते मति: सा गति:
मनुष्याला शरीर सोडतेवेळी ज्याचे समरण होते त्याच स्वरूपात तो मिळून जातो..
असं पहा, मातीची घागर नदीतळाला गेली, लाटांनी फुटली…आतले पाणी बाहेर आले…पाणी पाण्यात मिसळले…
ह्याप्रमाणे विचार अंती मनात आला की आत्मा परमात्म्याला मिळाला नाही का..? हे फार सोपे तत्व इथे सांगितले आहे
ह्या अध्यायाच्या निरूपणात ज्ञानदेवांनी अतिशय बोलकी उदाहरणे दिली आहेत…जरूर वाचा..मन एका वेगळ्या आनंदाचा अनुभव घेते.
मधुसूदन थत्ते
१२-०४-2020
संदर्भ: सुबोध ज्ञानेश्वरी (य. गो. जोशी) आणि गीतासागर (श्री शंकर अभ्यंकर)

*****************

@गीताअध्यायसार
अध्याय ९…राजविद्या राजगुह्य योग
अध्यायाचे नाव जरा कठीणच नाही का..? पण ह्यालाच आत्मविद्या किंवा आत्मज्ञान म्हटले आणि पुढे म्हटले की हे ज्ञान गुह्यतम आहे ..एक श्रेष्ठ असे गुपित आहे तर जरा जवळचे शब्द वाटतात ..!!
आणखी आजच्या भाषेत सोपे करायचे म्हणजे म्हणूया…It is the theory of self perfection and also explains the logic behind it…
अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवन्त अर्जुनाला म्हणतात ..
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे |
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् || 1||
अर्जुना तुला मी आता असे गुह्यतम सत्य सांगतो ज्यामुळे जीवनातल्या दु:खांपासून कसे मुक्त व्हावे हे तुला समजेल. (You shall be free from all limitations of finite existence)
सहाव्या अध्यायात शरीराची क्षमता कशी अफाट आहे हे सांगून सातव्या आणि आठव्या अध्यायात ती क्षमता गाठण्यासाठी मनाची तयारी सांगितली आणि ह्या नवव्या अध्यायात शरीराची biology नाही की मनाची psychology नाही.. तर आत्मज्ञानाचे शास्त्र सांगितले आहे.
काय धर्म म्हणायचा ह्या आत्म्याचा…?
अग्नीचा धर्म काय…? …”HEAT “
बर्फाचा धर्म काय ..?…”COLD “
आत्म्याचा धर्म काय…? .
.
प्रपंचात राहून “दूध-पाणी” ओळखून वेगळे करणे..धान्य-कोंडा वेगळा करणे..
आपण किती गुरफटून जातो ह्या नित्याच्या दिनक्रमात…!!! खुपसा कोंडा मनात तयार होतो..
एकदा एक शास्त्रपारंगत मुलगा आपल्या वयस्क चुलता-चुलतीला अद्वातद्वा बोलतो..विद्वान खरा पण कसे वागावे न समजलेला मुलगा..उधळतो “कोंडा” (सोबतचे चित्र पहा )
चुलती संतापते..पण चुलता मनात आणि ओठावर गोड स्मित ठेवतो…
पत्नीला म्हणतो सोडून दे ते शब्द…क्षणिक अज्ञान आहे ते त्याचे..जाईल कालांतराने…(आणि ते तसे गेलेही नंतर)
तेव्हा असा मनात कोंडा का जपावा..?
शब्द-ज्ञान आणि खरेखुरे ज्ञान हा फरक अंतर्मुख झाल्यावर कळतो. चिंतनाने कळतो, मननाने कळतो..
कोंडा कसा ओळखावा..? किंवा कोंड्याचा अभाव कसा ओळखावा..?
भाषाशुद्धी आहे का..(अपशब्द, कटू शब्द आहेत का)
परनिंदा, परदारा, परधन ह्याच्या अभिलाषेचा लवलेशही नाही ना..?
आचरणात सत्य-सदाचार आहे का..?
दया-क्षमा दिसून येते का..?
दानधर्म केला जातो का..?
अहंकार लोपलेला आहे का..?
मित्रांनो ह्या कोंड्यापलीकडे जावे, पहावे, व्हावे हेच तर ते राजगुह्य…!!!
मधुसूदन थत्ते
१३-०४-२०२०
संदर्भ: सुबोध ज्ञानेश्ववरी (य. गो. जोशी) आणि “The Holy Geeta” by Swami Chinmayanand
****************************

#गीताअध्यायसार
अध्याय १० विभूती योग

गीताअध्यायसार १०

विभूती…? म्हणजे काय..कोण..?
माहात्म्य, तेज, दिव्यता, भव्यता, ऐश्वर्य, अलौकिक शक्ती ….म्हणजे विभूती…
भगवंताच्या अनंत विभूती आहेत.
ज्या परमात्म तत्त्वापासून निर्माण झालेले हे विश्व आहे त्यातल्या कोणालाही ते परम तत्व पूर्णपणे कळलेले नाही…
पर्वत शिखरातून निर्माण झालेल्या नदीला पर्वत शिखर काय आहे हे परत जाऊन बघता येईल का…?
अर्जुनाने अखेर विचारले, कृष्णा, तुझ्या स्वरूपाला तूच जाणतोस. तुझ्या स्वरूपाचे ज्ञान तूच जर आम्हाला करून दिलेस तरच ते आम्हाला कळेल नाही का..?
निर्जन अशा अरण्यात एखादे छोटेसे मंदिर असावे, त्यात एक पणती तेवती असावी.. रात्रभर ती उजळत असावी, पूर्व दिशेला झुंजू मुंजु व्हावे…दिनमणी हळू हळू वर यावा…ज्योतीचा प्रभाव कमी कमी व्हावा…
तेज..एकच..पणतीच्या ज्योतीचे जे रात्रीच्या अंधारात तेवते राहिले आणि दिनकराचे जे विश्वाला प्रकाशमान करते झाले…
हे देवा, ते तेज म्हणजे तुझी विभूती का…?
परमात्मा श्रीकृष्णांनी एकवार चारही दिशांना आपली दृष्टी टाकली आणि ते बोलू लागले …
“आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् |
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी || 21|”
तेज:पुंज किरणे असलेला सूर्य ही माझीच विभूती आहे…
आणि इथपासून त्यांनी खालील श्लोकापर्यंत आपल्या मुख्य मुख्य विभूती अर्जुनाला विशद केल्या
“दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् |
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् || 38||”
मौन म्हणजे माझी विभूती, ज्ञान म्हणजे माझी विभूती…
ह्या अठरा श्लोकात त्यांनी ज्या विभूती मांडल्या त्या एकवार प्रत्येकाने पहाव्या..
विष्णुरूप आदित्य, ॐ , मेरू पर्वत, देवसेनानी षडानन, हिमालय, अश्वत्थ (पिंपळ), उचै:श्रवा अश्व, ऐरावत, कामधेनू, सर्पराज वासुकी, नागराज शेष, यम, प्रल्हाद, सिंह, गरुड, प्रभू राम, मकर, ऋतुराज वसंत,
मित्रांनो, भगवन्त आपल्या किती जवळ आहे ह्या विभूतींद्वारे तुम्हीच पहा…
ह्यातल्या आज प्रत्यक्ष अनुभवाला येणा-या , दिसणा-या विभूती (अश्वत्थ, सिह, गरुड, मकर, हिमालय आणि सर्वांचा प्यारा वसंत ऋतू ) नित्याच्या झाल्या म्हणून taken for granted झाल्या आहेत नाही का…?
मधुसूदन थत्ते
१४-०४-२०२०
संदर्भ: गीता सागर: श्री शंकर अभ्यंकर आणि सुबोध गीता य. गो. जोशी.

————————
#गीताअध्यायसार
अध्याय ११

कुंभाराची मडकी…!!! कुठलेही उचला..म्हणाल ना..”अरे ही तर माती…मूळ रूप मातीच की…!!!”
आणि मग कोण्या मातीच्या ढिगा-याकडे पाहून एखादा गाढा तत्ववेत्ता म्हणेल “अरे, मला तर ह्या मातीत सारी मडकी सामावलेली दिसतात…!!!”
माझ्यासारखा अति सामान्य माणूस हे ऐकून म्हणेल..ह्या तत्ववेत्त्याची दृष्टी काही वेगळीच असावी…!!!
वेगळी..? दिव्य..?
शास्त्रीय दृष्ट्या ……..मी, हे पुस्तक, हे टेबल, ही भिंत, हे झाड, हे सर्व त्या त्या अणू-रेणू ची अभिव्यक्ती आहे..
मग आणखी खोल जा..परमाणू आले..त्याच्याही आत जा..अखेर
म्हणाल..”अरे ही तर मूळ energy ”
आईन्स्टाईन म्हणाले मॅटर आणि शक्ती एकच ..फॉर्मुला दिला त्यांनी E=m*(c*c)
मित्रांनो, भगवान व्यासांची प्रतिभा हेच वेगळ्या शब्दात सांगत होती की काय…? त्यांनाही E=m*(c*c) गवसले होते नाही का..?
हा अकरावा अध्याय सर्वोच्च तत्वज्ञान सांगणारा म्हणून सर्वमान्य आहे.
दहाव्या अध्यायात कृष्ण अर्जुनाला म्हणतो माझ्या अनंत विभूती आहेत..सर्व विश्वात मीच व्यापून आहे…नमुना म्हणून त्याने फक्त काही विभूतींचा उल्लेख केला.
सर्व मडकी माझीच रूपे असे मातीने म्हणावे…
सर्व मॅटर ही energy ची रूपे हे आईन्स्टाईनने म्हणावे …!!!
भगवंतांचे हे विश्व् रूप… कोणी कोणी ह्यापूर्वी हे विश्व् रूप पहिले असावे..?
विष्णू पत्नी लक्ष्मीने ? सनकादि ऋषींनी ? भगवंताचे वाहन गरुड…त्याने ?
ह्या सा-यांना कृष्णाचे मोहक श्यामसुंदर रूपच दिसले ना… ??
त्या दिव्य रूपात सारे विश्व् सामावले आहे असे पहायचे..? काहीतरीच काय..
त्याचे दर्शन व्हावे ही उकंठा अर्जुनाच्या मनात आहे पण कृष्णाला कसे हे सांगावे…?
मनात अर्जुन म्हणतो..
“हे देवा, तुझ्याच मायेपासून हे विश्व् निर्माण होते आणि तुझ्यातच हे लय पावते..हे कसे..समजत नाही बुवा..पण हे तुला कसे विचारू..?”
अर्जुनाचे मन कृष्णाने जाणले..”तुला ह्या डोळ्यांनी (चर्म चक्षु) ते माझे रूप दिसणार नाही..त्यासाठी दिव्य दृष्टी मी तुला काही क्षणापुरती देईन..
“ही पहा माझी विविध रूपाची विश्व् मुखे..(सोबतचे चित्र पाहावे) ..
काही तामस, काही स्नेहपूर्ण, काही पवित्र. काही अगडबंब काही क्षुद्र, काही उदास तर काही दुष्ट …काही कामविकारी, काही कोपिष्ट ..
अर्जुना, एकदा यशोदामाईला कळले मी माती खाल्ली..ती रागावली…म्हणाली, उघड बघू तोंड…अन मी तोंड उघडताच अशी घाबरली…अरे तिला सारी भिन्न भिन्न विश्वे त्यात दिसली…!!! (सोबतचे चित्र पहा).
हे कौरव…सारेच्या सारे माझ्या मुखात अंती जाणार आहेत…तुझे शत्रू ना ? मानवतेचे शत्रू ना..? बघ कसे माझ्या मुखात जातील ते…!!! (सोबतचे चित्र पहा)
हा सारा चमत्कार पाहून अर्जुन भांबावला..घाबरला..
“भगवंता,,हे काय पाहतो आहे रे मी…? हे तुझे विश्व् रूप..काळ रूप आवरून घे बघ..नाही बघवत माझ्याने…
मला ते तुझे चतुर्भुज, सुदर्शन असे कनवाळू रूप पुनः पाहू दे..
भगवन्त हसले. त्यांनी तात्काळ आपल्या विश्व् रूपाचे अमर्याद वस्त्र आवरते घेतले..
अर्जुनापुढे हसतमुख गोपाळ उभा राहिला…त्याचा प्रिय सखा पुनरपि आपल्या मोहक रूपात दिसू लागला…!!!
मधुसूदन थत्ते
१५-०४-२०२०
संदर्भ: The Holy Geeta” by Swami Chinmayanand आणि सुबोध ज्ञानेश्व्री ..य . गो . जोशी .

*****************************

#गीताअध्यायसार
अध्याय १२ भक्तियोग

गीताअध्यायसार १२
आपण पहिले की तत-त्वम-असि ह्या तीन शब्दाचे प्रतिनिधित्व गीतेचे सहा-सहा-सहा असे अठरा अध्याय करतात आणि पहिले सहा “त्वम” साठी योजले आहेत.
सातव्यापासून “तत” सुरु झाले आणि त्यात सांगितले की व्यक्ताची (सगुणाची) उपासना भक्तियोगी करतात तर ज्ञानयोगी हे अव्यक्ताची (निर्गुणाची) उपासना करतात.
अकराव्या अध्यायात अर्जुनाचे डोळे दिपविणारे आपले विश्व् रूप दाखवल्यावर शेवटी कृष्णाने असे सांगितले की हे अलौकिक रूप सहजी कोणीही पाहू शकेल पण त्यासाठी एकाग्र मनाची भक्ती हवी…
अर्जुनातला योद्धा भगवंतांनी आधीच जागा केला होता..त्यात विश्व् रूप-झलक दाखवली आणि अखेर आवाहन केले…”कोणीही हे रूप सहजी पाहू शकेल”
अर्जुनाला ही संधी होती.
त्याने ह्या १२व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच प्रश्न केला..”मग, देवा, ह्यात श्रेष्ठ कोण…सगुण उपासक की निर्गुण…??”
भक्ती दोन प्रकारची असते…शरणात्मक आणि मननात्मक. एक भक्तियुक्त ज्ञान आणि दुसरे ज्ञानयुक्त भक्ती. पहिला जरासा गौण तर दुसरा श्रेष्ठ..ज्यात सर्वकर्मफलत्याग सुचवला आहे. आणि ह्याच त्यागाने निरंतर शांती मिळते.
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते |
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् || 12||
अर्जुना, एकदा सर्वकर्मफलत्याग सवयीचा झाला की पिकलेली फळे जशी आपोआप झाडावरून खाली पडावी तशी सर्व कर्मफळे आपोआप झडून जातात.
“तुला मर्म न समजता अभ्यास जमेल की निर्गुणाचे ज्ञान झाल्यावर मी समजेन…की ज्ञानयुक्त भक्ती ज्यात सर्वकर्मफलत्याग सुचवला आहे…?
ह्यानंतर कृष्णाने भक्तांचे विविध उच्च असे प्रकार वर्णिले आहेत जे “मला आवडतात” असे वेळोवेळी म्हटले आहे..
“यो मद्भक्त: स मे प्रिय:”…..!!!!!!
मानवी जीवन विकास कसा..?
प्रथम अभ्यास, त्याच्या वरची पायरी ज्ञान, ज्ञानाच्या वर ध्यान, त्यानंतर कर्मफलत्याग आणि सर्वात वरची पायरी शांती…!!!
मित्रांनो, आपल्यापैकी कोण कुठल्या पायरीवर आहे हे ज्याने त्याने ठरवावे.
सोबतच्या चित्रात माणसे तर भक्तीत लीन दिसत आहेत पण पोपट, मांजर आणि कुत्रा पण ज्ञानेश्वरीचे बोल ऐकत कसे शांत-चित्त आहेत ते पाहावे.
मधुसूदन थत्ते
१६-०४-२०२०
संदर्भ: The Holy Geeta by Swami chinmayanand; गीतासागर: शंकर अभ्यंकर आणि सुबोध गीता: य. गो. जोशी.

*****************

अध्याय १३ क्षेत्र-क्षेत्रज्ञ विभाग योग.

ह्या आधी आपण “परा…अपरा”…”क्षर…अक्षर” असे असे देह आणि आत्मा असे भिन्नत्व पाहिले.
शेतक-याला आपले शेत पवित्र वाटते आणि तो त्याची त्याच भावनेने मशागत करत असतो.
आपला देह हे क्षेत्र (मटेरियल बॉडी) आणि आपल्यात नित्य असणारे चैतन्य (vibrant spark of life ) हे क्षेत्रज्ञ असे मानले तर त्या शेतक-याप्रमाणे आपण देहाचे पावित्र्य राखले पाहिजे, टिकवले पाहिजे, वाढवले पाहिजे हा विचार किती सुंदर आहे पहा..
अनेकांनी एक चित्र पहिले असेल (सोबतचे चित्र पहा) यमदूत काय करताना दिसतायत त्यात..? क्षेत्रापासून क्षेत्रज्ञ काढून नेत आहेत…”हे क्षेत्र आता निःसत्व झाले…दुसरे नवे घ्यायची वेळ आली !!!”
पण यमदूत नकोच…याची देही आत्म्याने परमात्म्याला जाऊन मिळावे… ..कसे..??
हेच ह्या तेराव्या अध्यायात सांगितले आहे…
स्वामी चिन्मयानंद काय म्हणतात पहा
(The Holy Geeta, page 798)
“A careful study of the chapter ( तेराव्या अध्याय) will open up enough secret windows on to the vast amphitheatre of spiritual insight within ourselves”
[ह्या अध्यायाच्या अभ्यासाने आपण आपल्यात अंतर्भूत अशा परमतत्वाला ओळखण्यासाठी जी अनेक गुप्त द्वारे आहेत ती एक एक उघडू शकतो]
otherwise , मी किंवा अन्य सामान्य माणसे काय करतो…? “अमुक हवे म्हणून देवपूजा करतो. नागपंचमीला सर्प पूजा, (सोबत चित्र पहा) गणपती पूजा, नवरात्रीत दुर्गा पूजा …मला हे दे…ते दे…अन ह्यात अध्यात्मविद्येचे वावडे असते…..!!!
पण दागिने अनेक असले तरी सुवर्ण एकच ना…परमात्मा त्या सुवर्णात पाहावा..ओळखावे त्या सुवर्णाला..
तुला, मला, ह्याला, त्याला असे कुणालाही अंतर्भूत अशा परमतत्वाला जाणणे जमणार नाही अन त्यासाठीच सहावा, सातवा असे अध्याय शरीर आणि मन तयार करण्यासाठी भगवंतांनी सांगितले आहेत…
कठीण आहे नाही का…८:५३ ची लोकल पकडायची अन कामावर जायचे की हे सारे करत बसायचे…?
पण लक्षात घ्या भगवदगीतेत .८:५३ ची लोकल पकडायची अन कामावर जायचे आणि अध्यात्म पण आत्मसात करायचे कसे…तेच तर सांगितले आहे..!!!
मधुसूदन थत्ते
१७-०४-२०२०
संदर्भ: The Holy Geeta by स्वामी चिन्मयानंद आणि सुबोध ज्ञानेश्वरी: य. गो. जोशी…

********************************
#गीताअध्यायसार
अध्याय १४…गुणत्रयविभागयोग

गीताअध्यायसार १४
सत्वं रजस्तम इति गुणा: प्रकृतिसम्भवा: |
निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् || 5||
ह्या श्लोकात कृष्णाने अर्जुनाला प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तीन गुण विशद केले.
“तो किती सात्विक दिसला सर्वार्थाने..!!!”
“शी..किती तमोगुणी…”
“हा व्यापारी रजोगुणयुक्त असावा…”
(सोबतचे चित्र पहा)
मित्रांनो काय आहे हे सत्व-रज-तम—?
नियती सत्व रज तम ह्या तीन कवड्यांनी माणसाला म्हणते खेळ…घे दान..
गंमत अशी की ह्या कवड्या कशा पाडाव्या हे ज्ञानही नियती देते…कुणी ते ज्ञान वापरते, कुणी वापरत नाही…अन मी, हा. तो, आणखी पलीकडचा तो…आम्ही खेळतो अन दान मात्र पडते ते घ्यावे लागते…
आजमितीला, ह्या वयात मी स्वतःला सात्विक म्हणू शकत नाही तसं तामसिक पण म्हणत नाही…ह्यापैकी एक निवडायचे तर रजोगुणी निवडीन मी…
मी का आणखी वर जात नाही..? ह्याला कारणही मीच आहे..
शुक-नलिका न्यायातला तो पोपट आहे मी…
पारध्याने एक फिरती नळी टांगली..पोपट बसला तीवर अन नळी फिरली..
“पडेन की काय” असे वाटून पोपटाने अधिक घट्ट नळी धरली, फड फड करू लागला..फिरत राही…..आणि पकड अधिक घट्ट होत गेली…(सोबतचे चित्र पहा)
शेवटी पकडला त्याला पारध्याने..!!!
ही नळी माझ्यासाठी लोभ, मोह,मद, मत्सर इत्यादी भाव विशेष आहेत..धरून ठेवले मी घट्ट…!!!
“अरे पण जरा ती नळी सोडून बघ..सुटशील की आकाशात भरारी मारायला…!!!” हे ज्याचे त्याला लक्षात यावे नाही का…?
मित्रांनो हा तसा लहानच आहे अध्याय पण मार्मिक आहे..
मिळाला कधी वेळ आणि झाली मनीषा वाचायची तर जरूर वाचा आणि मनन करा.
मधुसूदन थत्ते
१८-०४-२०२०
संदर्भ: सुबोध ज्ञानेश्वरी: य. गो. जोशी आणि गीतासागर: शंकर अभ्यंकर
**********************************

अध्याय १५ ..पुरुषोत्तम योग

गीताअध्यायसार १५

“गीता वाचता का कधीकधी”…विचारा कोणालाही…निम्मे तरी म्हणतील..”हो पंधरावा अध्याय पाठ आहे माझा…!!!”
मग सुरु होतो तो…
ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् |
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् || 1||
त्याच्या मनात नक्की येत असते………..
“हा असा उलटा अश्वत्थ कसा भगवंत सुरुवातीलाच म्हणतात…? आधार तरी काय ह्याला…? मुळे वर आणि अनंत फांद्या खाली अस्ताव्यस्त पसरत चालल्या आहेत..ना फळ ना फूल पण वाढ बघा कशी प्रचंड…!!!”
ह्या पहिल्या श्लोकात अश्वत्थ वृक्षाची उपमा ह्या मायारूपी विश्वाच्या पसा-याला कृष्णाने दिली आहे…
स्वामी चिन्मयानंद म्हणतात:
“आद्य शंकराचार्यानीं फार सुरेख सांगितले आहे: श्व म्हणजे उद्या; स्थ म्हणजे जे टिकून राहावे (शाश्वत) ते …आणि तो सुरुवातीचा अ आहे तो सांगतो हे जे आज आहे ते उद्या नसणार…अश्वत्थ ever changing अशी स्थिती…!!!”
वृक्ष का म्हटले..?
स्वामी चिन्मयानंद म्हणतात: “meaning of the Sanskrit term vruksh is “that which can be cut down”
काय कट डाउन करायचे…? लोभ, मोह, आसक्ती…attachment …हे सारे दृढ निश्चयाने आपापल्या संसारातले छाटून टाका..
अश्वत्थमेनं सुविरूढमूल
मसङ्गशस्त्रेण दृढेन छित्वा || 3|
तसा हा अध्याय सोपाही नाही आणि अर्थाच्या दृष्टीने फार गहन आहे..
एकच श्लोक पहा…आपल्याशी इतका निगडित आहे हे भगवंतांनी सांगितले तेव्हा आपण आपल्या शरीराकडे एक पवित्र मंदिर म्हणून पाहू लागलो…
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित: |
प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् || 14||
“मी तुझ्यातला वैश्वानर (अग्नी) आहे प्राण-अपान ह्याच्या योगे तू खातोस ते अन्न मी पचवत असतो..”…!!!
मित्रांनो…हा अध्याय पाठ केला नसेल तर करा..त्याचा अर्थ नीट ध्यानी घ्या आणि “असङ्गशस्त्रेण दृढेन छित्वा”…काय छित्वा..?…आपले सारे attachment लोभ, मोह, आसक्ती.
मधुसूदन थत्ते
१९-०४-२०२०
संदर्भ: The Holy Geeta by Swami Chinmayanand
———————

#गीताअध्यायसार
अध्याय १६…………द्वैवासूरसंपाद्विभागयोग

गीताअध्यायसार १६

चार म्हातारे कोप-यावर बसून गप्पा करत होते.
“अहो, त्या industrialist च्या संपत्तीचा अंदाज त्यालाही नसावा एवढा तो धनिक आहे”
संपत्ती…? कशाला म्हणावे संपत्ती…? धनाला…?
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे जीवन असणा-या एका पुण्यशील व्यक्तीशेजारी मनात अनंत विचार घेऊन बसलो होतो….गोंधळ होता विचारांचा..
जुजबी बोलणे झाले आमचे अन नंतर काही वेळ न बोलता मी त्यांच्याजवळ बसून होतो. तुरटी टाकलेल्या पाण्याने निवळ व्हावे असे मला माझे मन वाटू लागले…
हा असतो पुण्यप्रभाव…हे असते सात्विकतेचे रेडिएशन..आणि ही खरी संपत्ती.
गीतेच्या सोळाव्या अध्यायात असे होण्यासाठी काही “दैवी गुण संपत्ती” वर्णिली आहे.
देव आणि असुर…युगानुयुगे हे द्वैत चालू आहे…आजही चालू आहे…आजचे असुर कोण..??
हो, बरोबर ओळखलंत…
आणि असुर हे उघड उघड असुर म्हणून जसे असतात तसे संभावित असुरही असतात…वरकरणी दैवी वृत्तीचा खोटा वेष घेऊन मनोमन मात्र असुरी विचार ठेवतात (सोबतचे चित्र पहा).
देवांनी दैवी संपत्ती जोपासली तर असुरांनी असुरी संपत्ती कायम ठेवली …
ह्या गुणांची वा दुर्गुणांची यादी जरा मोठीच आहे …
भयाचा अभाव, स्वच्छ अंत:करण, सात्विक असे दान, इंद्रिय निग्रह, यज्ञरूपी उत्तम कर्म करत राहणे, प्रिय भाषण, कोणालाही दु:ख होईल असे भाषण नसणे, “मी कर्ता” ह्या अभिमानाचा त्याग….
you name it and it is there असे हे सत्गुण देवाने ह्या अध्यायात सांगितले..
त्याचबरोबर…
दांभिकता, घमेंड, वृथा अभिमान, क्रोध, कठोर भाषण, अज्ञान…असे असुरी गुण पण देवाने सांगितले आहेत…
कुणी म्हणेल..”अहो हे महाभारत काळी ठीक होतं..आज इतके सात्विक होत राहिले तर हिमालयातच जावे लागेल वास्तव्याला…”
मी म्हणेन
“कशाला हिमालय..? श्रुती स्मृती काय सांगून गेल्या…?
कालसापेक्ष असे गुणिजनांनी बदल करत करत आपल्यापर्यंत ही वेदवचने आणून ठेवली आहेत त्याप्रमाणे आणि तितके सात्विक तर होता येईल..?
मला भेटलेले आणि इथेच वर नमूद केलेलं ते सज्जन नाही का…
‘हा असतो पुण्यप्रभाव…हे असते सात्विकतेचे रेडिएशन..’ असे मी म्हटलेच ना..?”
मधुसूदन थत्ते
२०-०४-२०२०
संदर्भ: गीतासागर: शंकर अभ्यंकर आणि सुबोध गीता: य. गो. जोशी

*****************

#गीताअध्यायसार
अध्याय १७ ……श्रद्धात्रयविभागयोग

आपण १४व्या अध्यायात सत्व-रज-तम हे तीन गुण आणि त्यानुसार मनुष्य-स्वभाव ओझरता पाहिला..
फेसबुक वर काही समूह श्रद्धा ह्या एकमेव उद्दिष्टाला वाहिलेले आहेत (जसा अनुभूती समूह)..
वेद, ब्रह्मसूत्रे इत्यादी शास्त्र वेदकालापासून आपल्यापर्यंत पोहोचली आहेत…
शास्त्रशुद्ध आचरण कसे हे त्यापासून आपण जाणू शकतो.. मोक्षप्राप्तीसाठी हेच तर अवलंबायचे…
कुणी म्हणेल…
“हे सारं ठीक आहे पण आजच्या जगात वेद, ब्रह्मसूत्रे फारसे कुणीच अभ्यासत नाहीत मग काय आज मोक्ष ही संकल्पना विसरायची…?”
काय निव्वळ श्रद्धा असणे मोक्षप्राप्तीला पुरणार नाही ?? काय शास्त्रांचे अध्ययन हे must आहे…?
हाच प्रश्न अर्जुनाने कृष्णाला विचारला (तो इंग्रजी शब्द must सोडून) अन त्याचे उत्तर म्हणजे हा १७वा अध्याय..!!!
पण वर लिहिलेले…. “१४व्या अध्यायात सत्व-रज-तम हे तीन गुण” ………ह्याचा काय संबंध…?
तेच तर सार आहे.
कशी आहे तुमची श्रद्धा..?
तुम्ही सात्विक तर तुमची श्रद्धा सात्विक
तुम्ही राजसिक तर तुमची श्रद्धा राजसिक
तुम्ही तामसिक तर तुमची श्रद्धा तामसिक
तुमचा आहार सात्विक तर तुमची श्रद्धा सात्विक
तुमचा आहार राजसिक तर तुमची श्रद्धा राजसिक
तुमचा आहार तामसिक तर तुमची श्रद्धा तामसिक
तुमचा यज्ञ (तुमचा जीवन धर्म…तुमचे नित्य कर्म); तुमचे तप (साधना)…तुमचे दान
जे आहाराबद्दल वर सांगितले तेच ह्या यज्ञ, तप आणि दानाबद्दल…
……..सात्विक पती देवासमोर श्रद्धेने बसला आहे…त्याने समई तेजविली आहे…त्याची पत्नी ते पहाते अन त्या समईवर स्वतःचा लामण दिवा तेजविते…संबंध घरभर ती सात्विक श्रद्धा ज्योतींचे तेजरूप घेऊन कायम असते…
हे एक रूपक.
…… एखादा पंडित काही वेदतत्वे सांगत आहे … तामसिक ब्राह्मण समोर बसून ऐकण्याचे ढोंग करत आहे…पंडित बघत नाही हे पाहून शेंडी उपटून त्याला वेडावून दाखवत आहे…संबंध घरभर ती तामसिक श्रद्धा जणू त्या ब्राह्मणाला आणि त्याच्या कुटुंबियांना वेडावून दाखवत आहे….
हे एक रूपक.
किती रोखठोक विश्लेषण आहे ह्या भगवद्गीतेत…!!!
श्रद्धा आहे म्हणून मी श्रद्धामूलक समूहावर आहे हे खरे…पण..
कशी आहे “मम श्रद्धा?” सात्विक, राजसिक की तामसिक…?
ह्याचे सोपे उत्तर म्हणजे…
जसा माझा आहार-विहार-चाल-चलन-चरित्र तस्साच मी
…सात्विक…किंवा….राजसिक….किंवा तामसिक…!!!
मधुसूदन थत्ते
२१-०४-२०२०
संदर्भ: सुबोध ज्ञानेश्वरी: य. गो. जोशी.

*****************************
#गीताअध्यायसार
अध्याय १८
मित्रांनो स्वामी चिन्मयानंदांचे हे इंग्रजी वाक्य खूप काही सांगून जाते..
“Geeta is liquid poetry expounding solid philosophy .” (गंगेचा ओघ असलेली आणि हिमालयाप्रमाणे दृढ तत्वज्ञान देणारी गीता ही एक सरिता आहे…!!!)
गेले १७ दिवस आपण ह्या गंगेचे एक एक तीर्थ क्षेत्र अतिशय ओझरते असे पाहण्याचा प्रयत्न केला..पटते का तुम्हाला ह्या वाक्याची सत्यता…??
स्वामीजी पुढे म्हणतात..
“…science describes life while philosophy EXPLAINS life…..if the second chapter is summary of Geeta in anticipation, the 18th one is a report in retrospect…!! “
दुसरा अध्याय येणा-या अध्यायात काय अपेक्षित आहे हे संक्षिप्त रूपात देतो तर १८व्या अध्यायात आधीच्या १७ अध्यायांची summary आहे…सारांश आहे…अखेरचे सिंहावलोकन आहे.
संबंध humanity कृष्णाने तीन प्रकारात दाखवली आहे…
सात्विक, राजसिक आणि तामसिक.
आणि त्यानुसार त्यागयुक्त ज्ञानी, सत्कर्म-प्रवण कर्मी आणि काय-वाचा-मने सुखाचा अनुभव घेणारे विवेकी असे माणसांचे प्रकार दाखवतांना अज्ञानी, आळशी आणि उतावीळ असणारे कायम दु:खीही कसे ह्या भूतलावर संचारत असतात हे ही दाखवले.
संन्यास आणि त्याग …काय श्रेष्ठ…? संन्यास म्हणजे सारे काही सोडून तप करायला निघून जाणे आणि त्याग म्हणजे कर्मफलत्याग..कर्तव्य नक्कीच करत रहायचे पण “मी केले” ही भावना सोडायची आणि त्या त्या कर्तव्याच्या फळाची आशा करायची नाही…
अर्जुनाने हेच तर नेमके विचारले…”संन्यास आणि त्याग …काय श्रेष्ठ…? “
सन्न्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुम् |
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन || 1||
आणि ह्या १८व्या अध्यायात ह्याचे उत्तर कृष्णाने दिले आहे.
मोटारीत पुष्कळ मीटर्स असतात डॅश बोर्ड वर …ती मला सांगतात..पेट्रोल कमी झाले..इंजिन तापले…बॅटरी संपत आली…
आता असं पहा..आपल्या नित्य-जीवनात अशी काही इंडिकेटर्स असतात का…? शारीरिक आणि मानसिक…!!!
ज्याची त्याला कळत असतात आणि तदनुसार योग्य पाऊल टाकायला हवे हे कळत असते…मग हे जे माणसांचे तीन प्रकार वर सांगितले ते प्रत्येकी ह्या शारीरिक आणि मानसिक इंडिकेटर्स प्रमाणे कृती करणारे पण असतात आणि न करणारे पण असतात..
ह्यात मी कुठे बसतो हे आपले आपण ठरवायला हवे, नाही का…?
कधी काळी मी असे निवांत बसून माझ्या गतायुष्याबद्दल मनन केले आहे का…? (सोबतचे चित्र बघा)
ह्या जीवनाला दिशा देणा-या गीतेला ज्या खांबापाशी बसून रसाळ अशा मराठीत ज्ञानदेव सांगत होते त्या खांबाचे मी दर्शन घेतले आहे का..? (सोबतचे चित्र बघा)
मित्रांनो, गेले १८ दिवस मी माझ्या अल्प समजुतीप्रमाणे मला कळलेले हे प्रत्येक अध्यायाचे सार तुम्हाला देत राहिलो..
चुकलो असेनही कुठे…पण तुम्ही सांभाळून घेतलेत…मी कृतज्ञ आहे…!!!
मधुसूदन थत्ते
२२-०४-२०२०
संदर्भ: The Holy Geeta by Swami Chinmayanand आणि सुबोध ज्ञानेश्वरी: य. गो. जोशी.

भगवद्गीतेमधील तत्वज्ञान – भगवद्गीतासार

भगवद्गीतेमधील अठरा अध्यायांचा सुरस असा सारांश इथे पहा.
https://anandghare.wordpress.com/2020/04/10/%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0/

नवी भर : अतिशय उत्तम वाचनीय अशी पोस्ट कॉपी पोस्ट आहे। वॉट्सॅपवरून साभार . . दि. ०५-०५-२०२१

श्री. शंकर अभ्यंकर यांनी सांगितलेले घरातल्या जीवनातले गीतासार 🙏🏻🙏🏻🌷🌷

आमच्याकडे ती व्यक्ती जेवायला बसली होती. जेवणाच्या ताटाला नमस्कार करून त्यांनी चार पाच घास घेतले व सर्व पदार्थांना दाद दिली. अगदी कोशिंबिरीत दाण्याच्या कुटाबरोबर आणखी काय घातलंय वगैरेही विचारून घेतलं. मी मुद्दाम वेगळा गोड पदार्थ म्हणून श्रीखंड-बासुंदी ऐवजी मोदक केले होते. त्याचीही छान पावती दिली. मला फार प्रसन्न वाटत होतं कि पाहुणे आवडीने जेवताहेत. त्यांच्या बरोबर माझे सासरे व मुलीही जेवत होत्या. सासरे, मी व पाहुणे त्यांचा हातखंडा विषय “गीतासार ” त्यावरची व्याख्यानं, प्रवास व इतर उपक्रम याबद्दल बोलत होतो. पण मुली मात्र शांतपणे जेवत होत्या.
मधेच पाहुण्यांनी मुलींशी बोलायचा प्रयत्न केला, पण त्या बोलायला बिचकताहेत हे त्यांच्या लक्षात आलं. जेवण झाल्यावर पुन्हा काही तरी विचारल्यावर, माझ्या मुलीने सांगितलं कि काका, तुम्ही गीता या विषयावर बोलत होतात. त्यात मला काय कळणार, म्हणून मी मधे बोलले नाही !!

ह्यावर पाहुणे छान हसले व तिला म्हणाले, “अगं, गीता कळायला खूप सोप्पी आहे. तुला न कळायला काय झालं?
आत्ताचंच उदाहरण घेऊ या. तुझ्या आईने आम्हाला, सास-यांनी जेवायला बोलावलंय हे कळल्यावर, तत्परतेने आणि वेळेवर छान स्वयंपाक केला. हो ना बाळा ?
हाच कर्मयोग !! आपल्या वाट्याला आलेलं काम आनंदाने व वेळच्या वेळी करणे !!

माझ्या मुलीला हे इंटरेस्टिंग वाटलं ! पाहुणे पुढे म्हणाले, तुझ्या आईला स्वयंपाक कसा करावा हे शिकावं लागलं असेल. तिच्या आईकडून,
मैत्रिणींकडून, किंवा पुस्तकं वाचून तिनं हे ज्ञान मिळवलं. ते स्वतः प्रॅक्टिस करून वाढवलं व आज योग्य पद्धतीनं वापरलंय. खरं ना?
मुलीला हे सगळं छान पटत होतं! नवनवीन गोष्टी योग्य गुरूंकडून शिकणं, त्याचा अभ्यास करणं, त्याचा प्रत्यक्षात उत्तम उपयोग करणं. हाच गीतेतला ज्ञानयोग आहे, बरं का बाळा !!

काकांचं बोलणं पटकन कळल्या मुळे मुलीला इंटरेस्ट घेऊन ऐकावसं वाटत होतं. मी ही थक्क झाले.
मग काका म्हणाले, आता आणखी एक गंम्मत सांगतो. तुझ्या आईने किती सुंदर पद्धतीनं केलेले पदार्थ ताटात वाढले होते व प्रेमाने आग्रहाने स्वतः बाजूला उभी राहून ती वाढत होती, आग्रह करीत होती. होय ना बाळा ?
हो, पण त्यात काय नवीन! .. मोकळेपणाने कन्या विचारती झाली.
अगं, यालाच म्हणायचं भक्तियोग !!
समोर जर देण्या योग्य कोणी असेल, तर आपल्याकडे जे असेल ते प्रेमाने, भावपूर्वक, आनंदाने समोरच्याला द्यावे, हेच तर भक्तियोगात सांगितलंय !!

गीतेतील हे कळीचे मुद्दे एवढ्या सोप्या शब्दात, साध्या पद्धतीने सांगणारे हे पाहुणे होते,
विद्यावाचस्पती श्री. शंकर अभ्यंकर !
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

नवी भर गीताजयंति दि.२५-१२-२०२०

१८ श्लोक गीता हिंदी

गीता ध्यानम्
ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् ।
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम्- अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्- गीते भवद्वेषिणीम् ॥ १॥
नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः ॥ २॥
प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ।
ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः ॥ ३॥
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नन्दनः ।
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥ ४॥
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥ ५॥
भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला ।
अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवै रणनदी कैवर्तकः केशवः ॥ ६॥
पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा- सम्बोधनाबोधितम् ।
लोके सज्जनषट्पदैरहरहः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमल- प्रध्वंसिनः श्रेयसे ॥ ७॥
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥ ८॥
यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ।
ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः ॥ ९॥

नमस्कार ,🙏🙏
गीताजयंती निमित्त आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा !!
नित्यनूतन असणारी ही गीता !🌺
प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखकमलातून
स्रवलेली ही मधुर गीता !!🌺
उपनिषदांचे सार असलेली गीता !!🌺
🌺कर्म, ज्ञान , भक्ती यापैकी कोणताही मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य साधकाला देणारी गीता !! 🌺
संभ्रमित मनाला उचित मार्ग दाखवणारी गीता !!🌺
मुक्याला बोलका करणारी गीता !!🌺
कर्मफळावरील नजर तिथून हटवून उत्तम कर्म करायला शिकवणारीअशी नित्य पठनीय गीता !! 🌺
अशा गीतेला आपण सारेजण सुगीता करु या … म्हणजेच ती आचरणात आणू या …
त्यासाठी गीतामातेचेच आशीर्वाद मागूया …स्वत:ला घडवूया …🌺
उद्धरेदात्मनात्मानम् !!🙏🙏

गीताअध्यायसार ही वाचनीय अशी लेखमाला अवश्य वाचावी.
https://anandghare.wordpress.com/2020/04/10/%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0/

नवी भर  दि.०८-१२-२०१९

श्रीमद्भगवद्गीतेमधील प्रत्येक अध्यायाचा संस्कृतमध्ये सारांश

🌹🌹श्वः ‘गीताजयन्ती’दिवसो वर्तते । तं पवित्रं दिवसं लक्ष्यीकृत्य गीतायाः अष्टादशाध्यायानां प्रत्येकम् अध्यायस्य सारांशः यथाज्ञानम् अत्र प्रस्तूयते–

१ अ. – किं कर्तव्यम्, किं वा न इति द्विविधभावः मनुष्येषु सांसारिकमोहकारणतः भवति । अतः सः मोहः त्यक्तव्यः ।
२ अ.- शरीरं नाशवत् परन्तु आत्मा अविनाशी इति ज्ञातव्यम् ।
३ अ.- निष्कामभावेन परहितार्थं कार्यं कर्तव्यम् ।
४ अ.- कर्मबन्धनात् मुक्तिं लब्धुम् उपायद्वयम् अस्ति– निःस्वार्थतया कर्मणः सम्पादनम्, तत्त्वज्ञानस्य अनुभूतिः चेति ।
५ अ. अनुकूल-प्रतिकूलस्थित्यादिषु समचित्तता दिव्यानन्दायै भवति ।
६ अ.- मनुष्यस्य अन्तःकरणे समता न भवेच्चेत् निर्विकारता दुर्लभा ।
७ अ.- सर्वमपि भगवतः एव रूपम् इति स्वीकरणमेव सर्वश्रेष्ठसाधनं स्यात् ।
८ अ.- अन्तकालीन-चिन्तनानुगुणं मनुष्यस्य गतिर्भवति । अतः सर्वदा कर्तव्यस्य पालनेन सह भगवतः स्मृतिः आवश्यकी ।
९ अ.- सर्वः अपि मनुष्यः भगवत्प्राप्तेः अधिकारी वर्तते । अत्र वर्णः, जातिः, सम्प्रदायः, देशः, वेशः इत्यादयः नापेक्ष्यन्ते ।
१० अ.- जगति यत्र यत्र विलक्षणता, सुन्दरता, महत्ता इत्यादिकं दृश्यते तत्सर्वं भगवतः एव इति मन्तव्यम् ।
११ अ.- इदं जगत् भगवतः एव स्वरूपं इति मत्वा मनुष्यः विश्वरूपस्य दर्शनं कर्तुं शक्नुयात् ।
१२ अ.- यः भक्तः देह-इन्द्रिय-मनोबुद्धिभिः सह स्वयम् आत्मानं भगवते अर्पयति सः भगवतः प्रियतमः भवति ।
१३ अ.- जगति एकमात्रं भगवान् हि ज्ञातुं योग्यः अस्ति । सः ज्ञातव्यः चेत् साधकस्य अमरता सिद्ध्येत ।
१४ अ.- ईश्वरस्य अनन्यभक्त्या मनुष्यः सत्त्वरजोतमोगुणेभ्यः अतीतो भवितुमर्हेत् ।
१५ अ.- एतज्जगतः एकमात्रं मूलाधारः परमपुरुषो वर्तते, सः एव परमात्मा, यश्च सर्वदा भजनीयः इति ।
१६ अ.- नाना पापकारणतः मनुष्यः नरकं याति, जन्ममरणचक्रे च पतति । ततः मोक्तुं दुर्गुणदुराचारादयः त्यक्तव्याः ।
१७ अ.- मनुष्यः सश्रद्धं यत् शुभकार्यं करोति ततः पूर्वं भगवन्नाम्नः स्मरणं कुर्यात् ।
१९ अ.- यः अनन्यभावेन भगवतः शरणं याति तस्य सम्पूर्णं पापं नाशयित्वा, भगवान् तस्मै मुक्तिं दास्यति इति ।

🌹ॐ श्रीमद्भगवद्गीतायै नमः ! ॐ शुभसन्ध्या !
— नारदः, ०७/१२/१९.

Essence of Gita in simple language chapterwise is given below:
1. What is to be done, what should not he done – this confusion of duality arises owing to delusion caused by mundane objects. That delusion should be abandoned.
2. Body (including mind, intellect) is subject to destruction. But Atma is indestructible. This should be firmly known.
3. Action should be performed for the good of others with selfless attitude.
4. There are two means of attaining liberation from the bondage of Karma- performing actions selflessly, and realising the Truth through knowledge (discrimination).
5. Equanimity in favourable and unfavourable circumstances leads to divine bliss.
6. If equanimity in one’s mind is absent, steadiness and changelessness of mind are difficult to attain.
7. Realising that everything is indeed the form of Bhagavan alone is the best means of Liberation.
8. The last thought at the time of death determines the course ahead of man. Hence in addition to performance of one’s duty, continuous remembrance of Bhagavan is essential.
9. All men are equally qualified in attaining Bhagavan, irrespective of Varna, Jati, tradition, country, appearance etc.
10. Wherever unique beauty and splendour are visible in the world, know it all to be of Bhagavan only.
11. By looking at everything in the world as the form of Bhagavan, it is possible to have the vision of the universal form, Visvarupa of Bhagavan.
12. One, who dedicates his entire being including body, senses, mind and intellect to Bhagavan, becomes indeed most dear to him.
13. It is only Bhagavan that is to be known in the world. Once he is known, man becomes immortal.
14. Through unwavering devotion to Bhagavan , man can transcend the attributes of Satva (tranquillity), Rajas (agitation) and Tamas (slughishness).
15. The only foundation, substratum of this world is Paramatma; he should always be worshipped.
16. Man attains to Naraka and falls into the cycle of birth and death, by committing various sins. Hence evil qualities and conduct should be eschewed.
17. Sraddha, faith is essential in any auspicious act; at the beginning of any such act, the name of Bhagavan should be chanted and meditated upon.
18. To one, who takes refuge in Bhagavan as the sole resort, Bhagavan grants Liberation.

Gita Jayanti was celebrated on 8th December 2019.
P R Kannan.

श्री.कण्णन यांच्या सौजन्याने …. वॉट्सअॅपवरून साभार

——————-

महाभारत युद्धामध्ये पांडव आणि कौरव यांच्या सेनांमध्ये अठरा दिवस महाभयंकर युद्ध झाले आणि त्या युद्धाच्या पहिल्याच दिवशी कुरुक्षेत्राच्या रणांगणाच्या मधोमध उभ्या केलेल्या रथामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली असे आपण लहानपणापासून ऐकत आणि वाचत आलो आहे. जिला हिंदू धर्माचे सार समजले जाते आणि गेल्या हजारो वर्षांमध्ये असंख्य विद्वानांनी जिच्या अठरा अध्यायांचा अर्थ लावण्याचे असंख्य प्रयत्न केले आहेत, अशी ही महान गीता अशा ठिकाणी आणि थोड्याशा वेळात कशी काय सांगितली गेली असेल हेच आपल्याला अद्भुत वाटते. कोणा एका पंडिताने या घटनेचा असाही अर्थ काढला आहे की खरे तर हे कुरुक्षेत्र मानवाच्या मनातच असते आणि तिथे हे युद्ध आयुष्यभर चाललेले असते. या पंडिताचे नाव मलाही माहीत नाही, पण मी हे इंटरप्रिटेशन तीस चाळीस वर्षांपूर्वी माझ्या भावाकडून ऐकले आहे. यावरील एक पोस्ट आजकाल वॉट्सॅपवर फिरते आहे. ती खाली दिली आहे.

संजय प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते; आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं.

‘का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ?

मी जे पाहत होतो ते खरंच घडलंय का ?’

याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होतं.

त्याने चहूदिशांना पाहिले, ‘खरंच एवढं मोठं युद्ध झालं? हीच ती रणभूमी ज्यावर रक्तामांसाचा खच पडला होता ? फक्त अठरा दिवसांत भरतखंडातील 80 टक्के पुरुष वंश नामशेष? हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते?’

“यामागील सत्य तुला कधीच समजणार नाही, मला माहित आहे, तू इथे का आला आहेस, परंतु हे युद्ध कळण्यासाठी खरं युद्ध कोणाशी असतं ते तुला समजून घ्यावे लागेल!”

एक आवाज ऐकू आला। एक वृद्ध योगी गूढपणे प्रकट झाला आणि म्हणाला:

“काय आहे खऱ्या युद्धाचा अर्थ?”

संजयाने तात्काळ विचारता झाला. त्याच्या लक्षात आले कि तो एका महान, ज्ञानी माणसाच्या सहवासात आहे.

” महाभारत ही एक अतिभव्य, अभूतपूर्व वस्तुस्थिती असेलही, पण त्यामागे एक तत्वज्ञान आहेच आहे. “

वृद्ध योग्याच्या उद्गारांनी संजय अधिक प्रश्न विचारायला प्रवृत्त झाला.
“महाराज, आपण मला सांगू शकाल का काय आहे हे तत्वज्ञान?”
“नक्कीच, ऐक तर,”
वृद्ध योग्याने सांगायला सुरुवात केली.

“पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिये, ‘नयन जे पाहतात, नाक ज्याने वास येतो, जीभ जी चव घेते, कान जे ऐकतात व त्वचा जी स्पर्श जाणते. आणि आता सांग बरं कौरव म्हणजे काय?” वृद्ध योग्याने डोळे किलकिले करत विचारले.

संजयाने मानेने नकार दर्शवला.

“कौरव हे शेकडो विकार व दुर्गुण आहेत जे तुमच्या पंचेंद्रियांवर रोज हल्ला करत असतात, पण तुम्ही त्यांचा प्रतिकार करू शकता, कसा माहित आहे? “

संजयाने पुन्हा नकारार्थी मान हलवली.

“तेंव्हाच जेंव्हा भगवान श्रीकृष्ण तुमचा रथ हाकत असतात!”

वृद्ध योग्याच्या डोळे लकाकले आणि संजय या रूपकाने अवाक झाला!

” भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कोणी नाही तर हा आहे तुमचा आतील आवाज, तुमचा आत्मा, तुमचा मार्गदर्शक आणि जर तुम्ही स्वतःला त्याचा हाती सोपवलं तर तुम्हाला काहीही काळजी करायचे कारण नाही. “

संजय बावचळून गेला पण त्याने लगेच प्रतिप्रश्न केला, “महाराज, जर कौरव हे दुर्गुण वा विकारांचे प्रतीक आहेत तर मग द्रोणाचार्य आणि भीष्म हे कौरवांच्या बाजूने का बरं लढत होते?”

वृद्ध योग्याने दुःखी स्वरात सांगितले,

” याचा अर्थ हाच की जसे तुमचे वय वाढते तसा तुमचा वडील माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.

तुमच्यापेक्षा वडील माणसं, जी लहानपणी तुम्हाला परिपूर्ण वाटत असतात ती परिपूर्ण असतीलच असे नाही, ते काही बाबतीत कमकुवत असू शकतात. आणि एक दिवस तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की ती तुमच्या हिताची आहेत का नाहीत? आणि मग एके दिवशी तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्याबरोबर झगडावे लागणार आहे!

मोठं होण्यातला हा सर्वात कठीण व अपरिहार्य भाग आहे आणि म्हणूनच भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे.”

संजय पूर्णत: लीन झाला, ज्ञानाच्या या पैलूने, पण लगेच हळुवार स्वरात विचारता झाला, “मग कर्णाबद्दल काय?”

“वा!”

वृद्ध योगी उद्गारला, “वा! अप्रतिम प्रश्न, शेवटी राखून ठेवलास तर!”

“कर्ण आहे तुमच्या पंचेद्रियांचाच बांधव, तो आहे आसक्ती, तो तुमचाच एक भाग आहे पण वावरतो मात्र तुमच्या दुर्गुणी विकारांसह. त्याला कळत असतं की आपण चुकतोय, परंतु सबबी सांगत रहातो सर्वकाळ विकारांची सोबत करण्यासाठी..!’

संजयनं सहमतीदर्शक स्मितहास्य करत नजर खाली झुकवली, डोक्यात हजारो विचारांचा कल्लोळ उठला होता.

पुन्हा एकदा वाऱ्याची वावटळ उठली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्याने वर पहिले तर तो वृद्ध योगी अंतर्धान पावला होता, जीवनाचे तत्वज्ञान थोडक्या शब्दांत मांडून…!
🙏🙏

वॉट्सॅपवरून साभार


नवी भर : दि.२६-०७-२०१९

भगवद्गीतासार

Bhagavadgeeta Sar

भगवद्गीता प्रत्येक अध्याय एका वाक्यात
अध्याय १ चुकीचा विचार ही जीवनातली एकमेव समस्या आहे.
अध्याय २ योग्य ज्ञान हा सर्व समस्यांवरील उपाय आहे.
अध्याय ३ निस्वार्थ वृत्ती हा प्रगति आणि समृद्धीकडे नेणारा मार्ग आहे.
अध्याय ४ प्रत्येक क्रियेमध्ये प्रार्थना असते.
अध्याय ५ आपला अहम् सोड आणि अनंताच्या आनंदाचा अनुभव घे.
अध्याय ६ दर रोज स्वतःला परब्रह्माशी जोडून घे.
अध्याय ७ जे शिकलास तसा जग.
अध्याय ८ स्वतःला सोडून देऊ नकोस.
अध्याय ९ तुला मिळालेल्या वरदानाची किंमत ठेव.
अध्याय १० सगळीकडे ईश्वरतत्व पहा.
अध्याय ११ शरण जाऊन सत्य काय आहे ते पहा.
अध्याय १२ तुझ्या मनाला परब्रह्माशी एकरूप कर.
अध्याय १३ मायेपासून मुक्त होऊन ईश्वराशी जवळीक कर.
अध्याय १४ तुझ्या दृष्टीनुसार जीवनशैली ठेव.
अध्याय १५ देवत्वाला प्राथमिकता दे.
अध्याय १६ चांगले असणे हे स्वतःच बक्षिस असते.
अध्याय १७ सुखकराऐवजी योग्य त्याची निवड करणे ही सामर्थ्याची खूण आहे.
अध्याय १८ जा, ईश्वराशी एकरूप हो.

वर दिलेल्या इंग्रजी फलकाचा मी माझ्या मतीनुसार अनुवाद केला आहे. श्रीमद्भगवद्गीतेत प्रत्यक्षात काय लिहिले आहे याचा मी अभ्यास केलेला नाही.

हे ही पहा : भगवद् गीता का पूरा सार 10 मिनट में
https://www.youtube.com/watch?v=GGCbT3XpQp4
—————–
BHAGAVAD GITA SUMMARY IN HINDI (गीता सार)

३६९ gita_saar

क्यों व्यर्थ की चिंता करते हो? किससे व्यर्थ डरते हो? कौन तुम्हें मार सक्ता है? आत्मा ना पैदा होती है, न मरती है।
जो हुआ वह अच्छा हुआ, जो हो रहा है, वह अच्छा हो रहा है, जो होगा, वह भी अच्छा ही होगा। तुम भूत का पश्चाताप न करो। भविष्य की चिन्ता न करो। वर्तमान चल रहा है।

तुम्हारा क्या गया, जो तुम रोते हो? तुम क्या लाए थे, जो तुमने खो दिया? तुमने क्या पैदा किया था, जो नाश हो गया? न तुम कुछ लेकर आए, जो लिया यहीं से लिया। जो दिया, यहीं पर दिया। जो लिया, इसी (भगवान) से लिया। जो दिया, इसी को दिया।
खाली हाथ आए और खाली हाथ चले। जो आज तुम्हारा है, कल और किसी का था, परसों किसी और का होगा। तुम इसे अपना समझ कर मग्न हो रहे हो। बस यही प्रसन्नता तुम्हारे दु:खों का कारण है।
परिवर्तन संसार का नियम है। जिसे तुम मृत्यु समझते हो, वही तो जीवन है। एक क्षण में तुम करोड़ों के स्वामी बन जाते हो, दूसरे ही क्षण में तुम दरिद्र हो जाते हो। मेरा-तेरा, छोटा-बड़ा, अपना-पराया, मन से मिटा दो, फिर सब तुम्हारा है, तुम सबके हो।
न यह शरीर तुम्हारा है, न तुम शरीर के हो। यह अग्नि, जल, वायु, पृथ्वी, आकाश से बना है और इसी में मिल जायेगा। परन्तु आत्मा स्थिर है – फिर तुम क्या हो?
तुम अपने आपको भगवान के अर्पित करो। यही सबसे उत्तम सहारा है। जो इसके सहारे को जानता है वह भय, चिन्ता, शोक से सर्वदा मुक्त है।
जो कुछ भी तू करता है, उसे भगवान के अर्पण करता चल। ऐसा करने से सदा जीवन-मुक्त का आनंन्द अनुभव करेगा।

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

नवी भर दि. १०-०३-२०२१

माझे मुक्तचिंतन……….

गीता : श्री.राज कुलकर्णी
रामायण ,महाभारत आणि गीता या प्रमुख ग्रंथांबरोबरच वेद आणि उपनिषदे, वेदांत सूत्रे आदी प्राचीन भारतीय ग्रंथांचा एकूणच भारतीय मनावर प्रचंड प्रभाव आहे. अध्यात्मिक आणि धर्मश्रद्ध हिंदू मन या ग्रंथातील अनेक वचनांनी व विचारांनी भारलेले आहे. पण गीतेचा प्रभाव सर्वाधिक आहे. खरेतर गीता ही एक स्वतंत्र निर्मिती असली तरीही ती, महाभारतातील एक उपकथानक म्हणून समोर येते. अर्थात विद्वानांत याबाबत मतभिन्नता असेल, परंतु मी गीतेकडे कसे पाहतो हा माझ्या लेखनाचा मुख्य विषय आहे, त्यामुळे ऐतिहासिक तथ्यांपेक्षा जनमानसात असणारा गीतेचा प्रभाव मला अधिक महत्वाचा वाटतो.

देशातील अनेकविध भाष्यकार, तत्त्ववेत्ते, विद्वान आणि विशिष्ट संप्रदायाचे संस्थापक यांचा गीतेकडे पाहण्याचा स्वतंत्र दृष्टीकोन आहे. प्राचीन भारतीय गौडपादाचार्य, शंकराचार्य, शतकिर्ती, अभिनवगुप्त, रामानुज, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, निवृत्तीनाथ, मध्ययुगीन काळातील ज्ञानेश्वर, चक्रधर, तुकाराम, चैतन्य महाप्रभू यांच्यापासून ते आधुनिक काळातील दयान्नाद सरस्वती, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, जे. कृष्णमुर्ती ते अगदी ओशो राजीनिश यांनीही गीतेचे स्वतःचे स्वतंत्र आकलन मांडले आहे. भक्ती संप्रदायाचा प्रमुख आधार असणाऱ्या या ग्रंथास कांहींनी श्रीकृष्ण स्मृती म्हटले आहे तर काहंनी गीतोपनिषद देखील म्हटले आहे. म्हणजे परंपरेने गीतेस श्रुती आणि स्मृती अशी दोन्ही मान्यता आहे.
प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करताना सातत्याने असे जाणवते की, गीता म्हणजे उपदेश आहे, मार्गदर्शन आहे, आणि तत्वचिंतन देखील आहे. अर्थात या मार्गदर्शनाला आणि तत्वचिंतनाला काळाच्या मर्यादा आहेतच. गीता म्हणजे महाभारताच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने युद्धभूमीवर निर्णय घेण्याच्या मनस्थिती नसलेल्या अर्जूनाला युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठी केलेला तत्वचिंतनपर उपदेश म्हणून सर्वत्र प्रचलित आहे! मात्र प्राचीन भारतीय ग्रंथात केवळ एवढी एकाच गीता नसून अनेक गीता आहेत. श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेप्रमाणेच धतराष्ट्र विदुर संवादावर आधारलेली विदुर गीता, संजय आणि धृतराष्ट्र यांची संजय गीता, युधिष्ठाराला धृतराष्ट्र मार्गदर्शन करतो ती धृतराष्ट्र गीता, यक्ष व युधिष्ठीर संवादाची युधिष्ठीर गीता, युधिष्ठीर व भीष्म संवादाची भीष्म गीता शिवाय कर्णगीता,पराशरगीताही आहेत. या सर्व गीतेपासून ते गुरुगीता, विनोबाजींची गीताई, साने गुर्जींचे कर्मयोगावरील लेखन आणि राष्ट्रसंत तुकोडोजी महाराजांची ग्रामगीता देखील आहे.

प्रत्येक गीतेचे महत्व आणि त्यातील संदेश हा त्या त्या काळातील समाज धुरिणांना मार्गदर्शक ठरलेला आहे. त्यामुळे कोणत्याही गीतेचा कसलाच प्रभाव ज्यावर नाही असा भारतीय व्यक्ती सापडणे दुर्मिळच ! हिंदू धर्मियांसोबतच राहुल सांकृत्यायन या बौद्धमहा पंडितास देखील गीतेवर लिहावे वाटले तर शेख महंमद आणि सिद्धांतबोध लिहिणारे महानुभावी शहाबाबा या मुस्लीम संतांनाही भाष्य करावे वाटले हे खूप सुचक आहे. मुघल सम्राट अकबर यांने भगवदगीतेचे फारशी भाषांतर करून घेतले होते आणि त्याने त्याच्या ‘दिन- ए- ईलाही’ या धर्मात तीच्यातील तत्वचिंतनास स्थान दिले होते. दारा शुकोह हा शहाजहानपुत्रही गीतेने प्रभावित होता. तर आधुनिक काळातील अल्डस हक्सले, जे.ओपनहायमर, डेव्हीड थोरो, एॅनी बेझंट अगदी ब्रिटीश व्हाईसरॉय वॉरन हेस्टींग्ज देखील गीतेने प्रभावित झालेले होते. यावरूनच गीतेची महानता आणि सर्वस्विकृती स्पष्ट होते!

ब्रिटीशांच्या पारतंत्र्यात असताना , साम्राज्यवादाच्या विरोधात लढताना गीतेने अनेकांना प्रेरणा दिली हे वास्तव आहे. गीता हातात घेवून खुदिराम बोस सारखा सशस्त्र क्रांतिकारक फासांवर गेला , त्याच गीतेने टिळकांसारख्या जहाल राष्ट्रवादी विचारांच्या नेत्याला कर्मयोग शिकवला , तीच गीता नेहरू सारख्या अज्ञेयवादी व्यक्तीला पारलौकिक बाबींवर अवलंबून न राहता मानवी प्रयत्न महत्वाचे आहेत याचे शिक्षण देते , तीच गीता महात्मा गांधींना अहिंसा शिकवते आणि तीच गीता विनोबा भावे यांना सर्वोदयाची प्रेरणा देते ! तर त्याच गीतेतून प्ररणा घेवून योगी अरविंदांनी स्वातंत्र्य लढा सोडून गीतेतील ज्ञानयोगाची कास धरली आणि त्यांनी योगदर्शनास जगभर पोचवले. म्हणूनच गीता ही खऱ्या अर्थाने भारतीयत्वाचे प्रतिक आहे, कारण ती अगदी गंगेसारखी सारखी आहे. सर्व प्रवाह तिच्यात मिसळतात आणि सर्व कांही तिच्यात तिने स्वत: सामावून घेतले आहे.

गीतेकडे माझ्यासारखा व्यक्ती प्रयत्नवादाचे आणि चिकित्सक वृत्तीचे प्रतिक म्हणून पाहतो. गीता मानवी कर्तृत्वाला महत्व देणारी आहे , अलौकीक शक्तीचा प्रभाव किंवा परिणाम कांही प्रमाणात उदासीन असल्याचेही स्पष्ट करणारी आहे. मी गीता मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहतो आणि गीता सर्वांना प्रेरणा का देते ,याचा विचार करतो , तेंव्हा लक्षात येते की, आयुष्य जगात असताना प्रत्येक व्यक्तीच्या समोर अनेक प्रश्न असतात, आणि कांही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतात. असे निर्णय घेताना मानवी मनात यशापयशाच्या भीतीने किंवा संदिग्ध्तेने मनात सतत द्वंद्व चालू असते!

गीता वाचताना माझ्या मनात नेहमी अशीच भावना निर्माण होते. कारण मानवी मन द्वंद्व, संभ्रम, किंतु-परंतु आणि विचार कलह यांनी व्यापलेले आहे, मानवी मनाची ही अवस्था गीतेचा मूळ गाभा आहे. म्हणून गीता सर्वांना आपल्या मनाचे प्रतिक वाटते आणि सर्वांना ती जवळची वाटत असावी. द्वंद्व मनात घेवून आयुष्याकडे आशाळभूत नजरेने राहणारा मानव किंवा प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर अर्जुन असतो आणि तोच व्यक्ती कोणासाठी तर कृष्ण देखील असतो. तो कधी अर्जुन होवून कोणाला प्रश्न विचारतो तर कधी कृष्ण होवून कोणाला तरी उत्तर देतो , शंकाच निरसन करतो ,कधी मार्गदर्शन देखील करतो. मानव असे विविध रूपे घेवून वेगवेगळ्या भूमिका वठवून आयुष्य आनंदमय करत असतो. कधी कधी एकाच व्यक्तीच्या मनात अर्जुन आणि कृष्ण दोघेही विराजमान असतात आणि आयुष्याच्या कुरुक्षेत्रावर त्याच्या विचाराचा रथ कोणत्या दिशेने मार्गक्रमित करावा याचे द्वंद्व चालू असते!

मानवी मन हळवे आहे तेवढेच ते कठोर देखील आहे. हृदय हे अर्जुनासारखे हळवे आहे तर मन अथवा मेंदू हा कृष्णाप्रमाणे कठोर आहे आणि धूर्त आहे. पण या मनातील कृष्ण अर्जुनाचा संवाद सतत चालत राहतो आणि मग एक अवस्था अशी येते की, आपल्यातीलच अर्जुनाला आपल्यातील कृष्ण एक विराट रूप दाखवतो,आणि मार्ग दर्शन करतो. आपल्यातील कृष्णाचे विराट रूप पाहून अर्जुनाचे डोळे दिपून जातात ,तेंव्हा खरे म्हणजे आपणच आपली नव्याने भेट घेतलेली असते. हा आत्मसाक्षात्कार आपल्या मनातील द्वंद्व संपवतो ,कोणी यालाच दिव्याज्ञानाची प्राप्ती असे म्हटले आहे. याच पद्धतीने सिद्धार्थाच्या मनातील द्वंद्व संपवून त्यांना अहिंसेचा आणि सम्यक क्रांतीचा मार्ग सापडला असावा , हाच क्षण भागवान महावीर ,मोझेस ,येशू , महंम्मद या सर्वांनी अनुभवला नसेल कशावरून? आणि मग याच अनुभवातून नवनिर्मिती त्यांनी केलेली आहे, असेही म्हणता येईल!

मानवी मनातील द्वंद्व हा गीतेच्या तत्वविवेचनाचा मुख्य आधार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तीत परस्पर विरोधी मतेदेखील आढळतात. यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ आणि योगापेक्षा भक्तियोग अशी सुटसुटीत मांडणी देखील तीच्यात आहे. राजनितिज्ञ आणि तत्वचिंतक श्रीकृष्णाचे चरित्र हा खरेतर एक स्वतंत्र विषय आहे. मात्र गीतेत श्रीकृष्णाने भक्ती आणि कर्म यांचा एकत्रित असा जो व्यापक विचार मांडला ज्यातून अंधतेने धर्माचे पालन केले तर धर्माची हानी होते हे सांगून, धर्म आणि सत्य यांचा उद्देश मानवाचे कल्याण असल्याचा महत्वपुर्ण संदेश गीता देते. हाच विचार गांधीजींनी अंगीकृत केला होता. नितीकेंद्रित धर्मकल्पना हेच श्रीकृष्णाच्या विचारांचे सार होते. गीता वैदिक संस्कृतीतील अनेक विषमतावादी भूमिकेचे समर्थन करते, कारण वैदिक संस्कृतीच्या चौकटीत समाजाचे सांस्कृतिक एकीकरण हाच श्रीकृष्णाच्या मांडणीचा हेतू असल्याचे मत सदानंद मोरे यांनी त्यांच्या श्रीकृष्णावरील इंग्रजी ग्रंथात व्यक्त केले आहे.

संवेदनशील मनातील द्वंद्व मानवी जीवनाचे महत्व समजून उमजून संपणे म्हणजेच नवनिर्मितीची चाहूल असते. त्यामुळे मनातील द्वंद्व संपण्यासाठी गीता प्रत्येकाच्या आयुष्यात घडणे गरजेचे आहे! म्हणूनच गीता प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्न वादाचा चिरंतन स्रोत म्हणून समाजात प्रचलित आहे. संभ्रम ,अज्ञान संपावे आणि सदसदविवेकाच्या आधारावर निर्णय घेण्याची क्षमता निर्माण झाली तर स्वतःला स्वतःचे विराटरूप प्रत्येक व्यक्तीला पाहता येतील.

उपनिषदांनी सांगितलेला ‘आत्मोदिपोभव्’ आणि त्रीपिटकांतील ‘ ‘अत्त दिप भव’ हा संदेश म्हणजे जणू स्वत:चेच विराटरूप स्वतःच पहा आणि स्वतः स्वतःचे मार्दर्शक व्हा ‘ हात गीतेचा प्रमुख संदेश असून तो आज समस्त मानवजातीसाठी खूप महत्वाचा असल्याचे माझे चिंतन आहे!

© राज कुलकर्णी
(‘माझे मुक्त चिंतन’ या वर्षीच्या सदरातील हा पहिला भाग आहे )

श्री.राज कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार आणि हा लेख या ठिकाणी संग्रहित करायला अनुमति द्यावी अशी नम्र विनंति