पेशवाईतले वीर

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची मर्दुमकी गाजलेली आहे. त्यांच्या कर्तृत्वावरील लेख मी या भागात संग्रहित केले आहेत.
https://anandghare.wordpress.com/2018/08/31/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%87/
थोरले बाजीरावांचे लहान बंधु चिमणाजी किंवा चिमाजी अप्पा हेसुद्धा लढवय्ये होते. त्यांनी शर्थीने लढून पोर्तुगीजांना हरवले आणि वसई येथील त्यांचे मुख्य ठाणे असलेला त्यांचा किल्ला जिंकून घेतला. या लढाईवरील दोन लेख आणि एक कविता खाली दिली आहे. चिमाजी अप्पा यांचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांनी केलेली एवढी एकच लढाई प्रसिद्ध आहे.

बाजीराव पेशवे यांचे सुपुत्र नानासाहेब पेशवे आणि नातू माधवराव पेशवे यांनी मराठा साम्राज्याचा भारतभर विस्तार केला. त्यांची माहितीही खाली दिली आहे.

१८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात (दुसरे) नानासाहेब पेशवे यांनी महत्वाची कामगिरी केली होती. त्याची माहिती देणारा एक लेखही खाली दिला आहे.

फेसबुक आणि गूगलवरून घेतलेल्या या रचनांचे लेखक व कवी यांचे आभार.
………….

या पानावर पहा : बाळाजी विश्वनाथ भट, चिमाजी अप्पा, थोरले आणि दुसरे नानासाहेब, तात्या टोपे आणि माधवराव पेशवे

**************

नवी भर दि.०४-०१-२०२१ : पेशवा घराण्याचे संस्थापक आणि थोर मुत्सद्दी

बाळाजी विश्वनाथ भट

बाळाजी विश्वनाथ पेशवे

सातारच्या शाहूमहाराजांचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांची आज जयंती (१ जानेवारी १६६२ – २ एप्रिल १७२०). (प्रधान –पेशवा हा मूळ फारसी पेसवा शब्दाचा मराठी उच्चार )
भट घराण्यातील पहिला पेशवा. त्याने पेशवेपदाचे महत्त्व वाढविले व ते पुढे त्याच्या वंशजांकडे गेले; या अर्थाने बाळाजीस पेशवाईचा संस्थापक म्हटले जाते. पूर्ण नाव बाळाजी विश्वनाथ भट. याच्या पूर्वजांविषयी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही; तथापि कोकणातील महाल दंडा राजपुरी आणि श्रीवर्धन येथील देशमुखीचे वतन या घराण्यात चालू होते. हा मुलूख जंजिऱ्याच्या सिद्दीच्या अंमलाखाली होता. त्याच्या जुलमास कंटाळून बाळाजी व त्याच्या समवेत नाना फडणीसाचे पूर्वज भानु १६९० च्या सुमारास साताऱ्याकडे आले. पुढे धनाजी जाधव याजकडे बाळाजी नोकरीस राहिला. स्वकर्तृत्वाने धनाजीकडे पुणे, दौलताबाद या प्रदेशांवर सुभेदार, सर सुभेदार इ. पदावर त्याने काम केले.

मोगलांच्या कैदैतून छत्रपती शाहूंची सुटका व्हावी, या करिता चाललेल्या १७०५ मधील खटपटीत तो मध्यस्थी करीत असावा असे दिसते. खंडो बल्लाळ चिटणीस आणि बाळाजी यांच्यामुळे खेडच्या लढाईत ताराबाईंचा पराभव झाल्यानंतर धनाजीने शाहूचा पक्ष स्वीकारला. १६९०-१७०७ दरम्यान मराठी कारभार आणि राजकारण यांचा अनुभव घेतलेल्या बाळाजीपंताला शाहूने राज्याभिषेकसमयी सेनाकर्ते ही पदवी बहाल केली. शाहूने बाळाजीचा पक्ष घेतल्यामुळे धनाजीचा मुलगा चंद्रसेन महाराणी ताराबाईस मिळाला. दुसरेही काही सरदार ताराबाईस जाऊन मिळाले. त्याच वेळी काही मोगल अधिकाऱ्यांनी शाहूला विरोध करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे शाहूला शत्रूने वेढले होते. बाळाजीने कर्जे काढून फौजा उभारल्या आणि कृष्णराव खटावकर, दमाजी थोरात, उदाजी चव्हाण यांसारख्या पुंडांचा आणि छत्रपतींच्या इतर शत्रूंचा उपशम केला. सेनाकर्ते ही पदवी त्याने सार्थ केली. कान्होजी आंग्रे हा त्या वेळी ताराबाईला मिळाला आणि लोहगड घेऊन पुण्यावर त्याने स्वारी केली. शाहूने त्याचा बंदोबस्त करण्याकरिता पेशवा बहिरोपंत पिंगळे यास पाठविले; पण पेशव्याचा पराभव होऊन तोच कान्होजीच्या कैदेत पडला. अशा बिकट परिस्थितीत बाळाजीने मुत्सद्देगिरीने कान्होजीस शाहूच्या पक्षात ओढले आणि त्यास सरखेलपद बहाल करविले. शाहूने बाळाजीस पेशवेपद दिले. (१७१३).

आंग्र्यांशी झालेल्या करारनाम्याने बाळाजी पेशव्याने एक मोठा प्रश्न निकालात काढला. १६८१ पासून मोगलांशी चाललेल्या लढ्यात जाधव, घोरपडे, भोसले, दाभाडे, आंग्रे इ. सरदारांनी आपापल्या हिमतीवर फौजा उभारून मुलूख जिंकून त्यांवर अंमल बसविला होता. या सरदारांना त्याने एकत्र आणले व नवीन सरदार उत्पन्न केले. या प्रबळ सरदारांचे आणि छत्रपतींचे संबंध कसे असावे, हा गुंतागुंतीचा प्रश्न होऊन बसला होता. सरदार-जाहगीरदारांचे महत्त्व वाढत चालले होते. एकतंत्री राजसत्ता जाऊन मराठी सत्तेला सरंजामी सत्तेचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशा वेळी आंग्र्यांशी झालेला करार हा या बदलत्या राजकारणाचा पहिला आविष्कार होता. यामुळे एक एक सरदार शाहूच्या आधिपत्याखाली येत गेला आणि स्वराज्य, चौथाई आणि सरदेशमुखी यांच्या सनदांनी जो मुलूख आणि जे हक्क छत्रपतींस प्राप्त झाले, ते अष्टप्रधान आणि इतर सरदार यांत शाहूतर्फे वाटले गेले.

बाळाजीने दुसराही असाच एक महत्त्वाचा प्रश्न सोडवून मराठी राज्याला स्थैर्य आणले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते. बादशाह फरूख सियर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांचे वितुष्ट आले. सय्यदांचा नाश करण्याच्या बादशाहच्या खटपटी सुरू झाल्या. आत्मरक्षणार्थ सय्यद बंधूंना मित्र शोधावे लागले. दक्षिणेचा सुभेदार सय्यद हूसेन अली याने पेशव्याचे मार्फत मराठी राज्याशी नवा तह केला. त्यात शिवाजीमहाराजांचे स्वराज्य बिनशर्त शाहूला देण्याचे ठरले. शिवाय दख्खनच्या सहा सुभ्यांचा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्क मान्य करण्यात आले. मोबदला म्हणून शाहूने पंधरा हजार फौजेनिशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोरचिलटांचा बंदोबस्त करून मुलखाची आबादी राखावी, या अटी करारनाम्यात ठरल्या. या करारनाम्यावर बादशाहकडून शिक्का-मोर्तब व्हावयाचे होते. बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूंच्या साहाय्यास नोव्हेंबर १७१८ मध्ये दिल्लीस गेला. दिल्लीत सत्तांतरण झाले. फरुख सियरची इतिश्री होऊन महमूदशाह गादीवर आला. १७१९ च्या मार्च महिन्यात सनदांवर नव्याने बादशाहचे शिक्कामोर्तब होऊन बाळाजी दक्षिणेत परतला. संभाजीची पत्नी येसुबाई आणि इतर मंडळी मोगलांच्या कैदेत होती. त्यांना घेऊन जुलै महिन्यात पेशवा बाळाजी साताऱ्यास येऊन छत्रपतींस भेटला.

अशा रीतीने शाहूच्या सत्तेला मान्यता आणि स्थैर्य बाळाजी विश्वनाथने मिळवून दिले. बाळाजी विश्वनाथाने सय्यद बंधूंशी तह करून मोगली राजकारणात प्रवेश मिळविला. या प्रवेशामुळे बाजीराव पेशव्यांस उत्तरेकडे मराठी राज्याचा विस्तार करता आला. चौथ-सरदेशमुखीचे जे हक्क पेशव्याने मिळविले ते वसूल करण्याच्या निमित्ताने मराठी फौजांचा संचार दक्षिणेत चोहोकडे सुरू झाला व त्यांच्या वाढत्या पराक्रमास वाव मिळाला.

बाळाजी विश्वनाथ दिल्लीहून परत आल्यावर दक्षिणेत कोल्हापुरच्या बंदोबस्तासाठी गेला. काही दिवस कोल्हापुरला वेढा देऊन तो १७२० च्या मार्च महिन्यात साताऱ्यात आला आणि तेथून सासवडला गेला. तेथेच त्याचे निधन झाले. त्याची पत्नी राधाबाई त्याच्या मृत्यूनंतर बरीच वर्षे जिवंत होती. त्याला पहिला बाजीराव आणि चिमाजी आप्पा असे दोन मुलगे होते. ते मराठेशाहीत स्वपराक्रमाने प्रसिद्धीस आले.(मराठी विश्वकोश )

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकाच्या फलकावरून साभार

– – – – – – –

विकीपीडियावरून मिळालेली माहिती. पहा https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5

बाळाजी विश्वनाथ पेशव्यासंबंधी थोडक्यात सर्व काही

श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या स्वराज्यसेवेचा घटनाक्रम :-

 • सन १५७५ महादजीपंत भट श्रीवर्धनचे देशमुख
 • सन १६६० परशुरामपंत भट शिवाजीमहाराजांच्या कारकुनी सेवेत दाखल.
 • परशुरामपंत भट शिवाजीमहाराजांच्या सेवेत सरदार.
 • सन १६८४ साली बाळाजी विश्वनाथ चिपळूण सोडून सासवडास पुरंदरे यांच्याकडे वास्तव्यास आले. सन १६८४ ते सन १६९९ औरंगजेबाच्या विरुद्ध रामचंद्रपंत यांच्या सेवेत.
 • सन १६९९ ते सन १७०३ पुणे प्रांताचे सरसुभेदार.

या कार्यकाळातील कार्ये

 1. नारायणगाव येथे बंधारा बांधला.
 2. नारायणगड हा किल्ला बांधला.
 3. विसापूर किल्ल्याची डागडुजी.
 • मोगलांशी एकीकडे मुत्सद्दी वाटाघाटी तर दुसरीकडे सिंहगड किल्यास पुरंदरे यांच्या मार्फत दारूगोळा रसद पुरवठा. या काळात दिम्मत सेनापती असा बाळाजी विश्वनाथ यांचा उल्लेख.
 • सन १७०४ ते सन १७०७ दौलताबाद प्रांताचे सरसुभेदार.
 • या काळात या सुभे दौलताबाद प्रांताचा उत्तम बंदोबस्त.
 • नोव्हेंबर सन १७०५ मध्ये दहा हजार फौजेनिशी दिंडोरीवर स्वाऱ्या.
 • बाळाजी विश्वनाथ यांची हुशारी पाहून

अंबाजीपंत पुरंदरे व प्रतिनिधी यांच्या शिफारशीनुसार सेनापती धनाजी जाधव यांच्या सेवेत. फौज बाळगून प्रतिकूल परिस्थितीत उत्तम महसूल वसूली.

 • बाळाजी विश्वनाथ यांची ताराबाईसाहेबांकडून रांगणा किल्यावर नेमणूक.
 • सन १७०५ औरंगजेब महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला असतांना बाळाजी विश्वनाथ यांची मोगलांच्या ताब्यातील गुजरातवर स्वारी. झाबुआ व गोध्रा प्रांतांचा मोगल सुभेदार मुरादबक्ष याचा पराभव.
 • मुरादबक्षचा दोन लाख दहा हजार खंडणी भरून बाळाजी विश्वनाथ यांच्याशी तह.

शाहूमहाराज यांची दिनांक ८ मे सन १७०७ रोजी दारोहा गावी सुटका.

ऑक्टोबर सन १७०७ च्या खेडच्या निर्णायक लढाईत सेनापती धनाजी जाधव यांना थोरल्या धन्याविरूद्ध न लढण्याचाबाळाजींचा सल्ला. सेनापती धनाजी जाधव आणि शाहूमहाराज यांची भेट. सेनापती धनाजी जाधव आणि बाळाजी विश्वनाथ शाहूमहाराजांच्या सेवेत दाखल. खेडची लढाई. सातारा शाहूमहाराजांकडून काबीज.

दिनांक १२ जानेवारी सन १७०८ सातारा येथे शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक. छत्रपती शाहूमहाराज यांच्याकडून अष्टप्रधानांच्या नेमणूका. बाळाजी विश्वनाथ यांची अमात्यांचे मुतालिक म्हणून नियुक्ती.

दिनांक २७ जून सन १७०८ सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.

दरम्यान छत्रपती शाहूमहाराजांकडून बाळाजी विश्वनाथ यांना सेनाकर्ते किताब व सेना उभारणीसाठीच्या खर्चास पंचवीस लाख दहा हजार दोनशे रूपयांचा सरंजाम बहाल.

सन १७१२-१३ छत्रपती शाहूमहाराज यांचे पेशवा बहिरोपंत पिंगळे यांची सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या वर स्वारी. स्वारीत पेशवा बहिरोपंत पिंगळे यांचा सरखेल कान्होजी आंग्रे यांजकडून पराभव. पेशवा बहिरोपंत पिंगळे कैदेत. याच स्वारीत श्रीपतराव प्रतिनिधी यांनी गाजविलेल्या पराक्रमामुळे शाहूमहाराजांच्या कैदेत असलेले परशुरामपंत प्रतिनिधी यांची कैदेतून सुटका. दिनांक १६ मार्च सन १७१३ रोजी परशुरामपंत प्रतिनिधी यांची पेशवा म्हणून नियुक्ती. आंग्रे यांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यात पेशवा परशुरामपंत प्रतिनिधी यांची चालढकल. दिनांक १९ जून सन १७१३ रोजी पेशवा परशुरामपंत प्रतिनिधी यांची पून्हा प्रतिनिधी पदावर नियुक्ती.

पेशवा पद दिनांक १९ जून सन १७१३ ते दिनांक १६ नोव्हेंबर सन १७१३ पर्यंत रिक्त.

दरम्यानच्या काळात बाळाजी विश्वनाथ यांचे फौजेचे वळण चांगले असल्याने बाळाजी विश्वनाथ यांना पेशवा पद देण्याविषयी अंबाजीपंत पुरंदरे आणि प्रतिनिधी यांची शाहूमहाराज यांच्याकडे शिफारस. दिनांक १७ नोव्हेंबर सन १७१३ रोजी बाळाजी विश्वनाथ यांची पेशवा पदी नियुक्ती.

सन १७१८ जानेवारीत पोलवण येथे सरखेल कान्होजी आंग्रे यांची पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी भेट घेऊन सरखेल कान्होजी आंग्रे यांना शाहूमहाराजांच्या पक्षात आणण्यात यश आले. दिनांक २८ फेब्रुवारी सन १७१४ रोजी पेशवे व आंग्रे यांच्यात सलोख्याचा तह. बहिरोपंत पिंगळे व निळो बल्लाळ चिटणीस यांची सुटका. सरखेल कान्होजी आंग्रे शाहूमहाराजांच्या पक्षात आल्याने पश्चिम किनारपट्टीवर शाहूमहाराज यांची सत्ता स्थापन झाली.

नोव्हेंबर सन १७१५ पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी पुणे प्रांत स्वराज्यात आणला. चंद्रसेन जाधव याने शाहूमहाराज यांना व दमाजी थोरात याने बाळाजी विश्वनाथ यांना कपटाने कैद करण्याचा कट रचला. ५ ऑगस्ट सन १७१६ रोजी दमाजी थोरात यांजकडून पेशवा बाळाजी विश्वनाथ, अंबाजीपंत पुरंदरे आदी यांना कपटाने कैद केले. खंडणी देऊन सुटका झाली. बाळाजी विश्वनाथ यांनी पिलाजी जाधव यांच्यावर दमाजीची मोहीम सोपवली. पिलाजी जाधव यांनी दमाजी थोरात याचा पराभव करून त्यास अटक करून या प्रकरणाचा कायमचा सोक्षमोक्ष लावला.

सन १७१४ आंग्रे – पेशवे यांच्या संयुक्त स्वारीने जंजीरेकर हबशाकडील काही किल्ले स्वराज्यात आणले.

सन १७१७ – १८ पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि हुसैन अली सय्यद यांनी कोल्हापूरकर संभाजींचा पूर्ण पाडाव केला. गुजरात, खानदेश आदी बादशाही मुलखात मराठ्यांनी छापेमारी आरंभली.

सन १७१८ सालच्या अखेरीस पेशवा बाळाजी विश्वनाथ आपला जेष्ठ पुत्र बाजीराव फौजेसह उत्तरेकडील दिल्ली मोहिमेवर रवाना झाले. सय्यद बंधूंनी मदतीबदल्यात पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्याशी स्वराज्याचा मुलूख, मराठ्यांचे चौथाईचे हक्क आदी बाबतच्या शाही सनदा देण्याचा तह केला. सय्यद बंधूंनी पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या साह्याने बादशहा फर्रूखसियरला पदच्युत केले व त्याच्या जागेवर रफिउद्दोरजात बादशहा केले. या सर्व धामधुमीचा फायदा उचलत पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी सय्यद बंधूवर दबाव आणून महाराणी येसूबाईसाहेब आणि राजपरीवार यांची सहीसलामत सुटका करून घेतली. शाही सनदा मिळाल्यानंतर पेशवा बाळाजी विश्वनाथ साताऱ्यास आले. या मोहिमेतील खर्च वजा करून पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी तीस लाख रूपये व शाही सनदा छत्रपती शाहूमहाराजांच्या चरणी अर्पण केल्या.

सन १७१९ साली पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी चासकर जोशी यांच्यामार्फत कल्याण – भिवंडी प्रांत स्वराज्यात आणला. यानंतर बेळगांव, रूकडी, तावळे, डिग्रज या भागात मोठी मोहीम राबविण्यात आली. सेनाखासखेल यशवंतराव थोरात यांचा बंदोबस्त करून आष्टा व येळावी ही दोन महत्त्वपूर्ण ठाणी ताब्यात घेतली. कोल्हापूरकर संभाजी राजे आणि शाहूमहाराज यांच्यात वैमनस्य वाढत होते. दरम्यान पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी कोल्हापूरला वेढा घातला. दिनांक २० मार्च सन १७२० रोजी कृष्णतीरावरील उरणबाहे येथे कोल्हापूरकर संभाजी राजे यांचा पूर्ण पराभव करून त्यांनी संभाजी राजेंना साताऱ्यास राजदर्शनासाठी आणले. साताऱ्यास राजबंधूंच्या भेटीगाठी, राजकीय खलबते झाली.

मोहिमेनंतर सासवड येथे घरी परतल्यावर चाळीस वर्षांच्या अविश्रांत दगदगगीने पेशवा बाळाजी विश्वनाथ आजारी पडले. अखेर दिनांक २ एप्रिल सन १७२० रोजी एका कर्तव्यदक्ष, कर्तबगार पेशवा बाळाजी विश्वनाथ यांची प्राणज्योत मावळली.

**********

वसईचा वीर !

वसईच्या किल्ल्यावर यशस्वी चाल करून तिथल्या पोर्तुगीज सत्तेला खिंडार पाडणारे वीर चिमाजी अप्पा यांचा आज स्मृतिदिन ! (१७ डिसेंबर)
चिमाजी उर्फ चिमणाजी अप्पा (इ.स. १७०७ – इ.स. १७४१) हे पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ.
त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापन केली.
वसईची लढाई ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची मानली जाते. या कामगिरीसाठी चिमाजी अप्पांची नेमणूक झाली. आपल्या थोरल्या भावाचा विश्वास सार्थ ठरवला.
या लढाईची कथाही तितकीच विस्मयजनक व नाट्यमय आहे.
१७ फेब्रुवारी १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली.
अत्यंत चिकाटीने चालवलेल्या वेढ्यासोबतच त्यांनी किल्ल्यावर गनिमी काव्याने हल्ले चालू ठेवले. अशाच एका हल्ल्यात पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मृत्युमुखी पडला. तरीही पोर्तुगीजांनी लढा चालू ठेवला आणि चालून येणाऱ्या मराठ्यांच्या लाटांचा हातबाँब, बंदुका आणि उखळी तोफा वापरून प्रतिकार चालू ठेवला.
आपल्या वरचढ तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांचे बरेच नुकसान केले; परंतु मराठ्यांनी आपला वेढा सैल होऊ दिला नाही. इकडे आंग्र्यांच्या आरमाराने समुद्री मार्गही बंद केले होते आणि तेथूनही रसद मिळणे बंद झाले.
शेवटी १६ मे १७३९ रोजी वेढा धसास लागला आणि मराठ्यांनी किल्ल्यावर एल्गार केला. चिमाजी अप्पाने स्वतः पहिली तोफ डागली आणि नारो शंकर दाणी याच्या नेतृत्वाखालील घोडदळ आणि आंग्र्यांचे आरमार दोहो बाजूंनी पोर्तुगीजांवर तुटून पडले. तोफखान्याच्या सरदार गिरमाजी कानिटकराने किल्ला पुरता भाजून काढला आणि मानाजी आंग्र्याच्या बरकंदाजांनी बुरुजांवरून पोर्तुगीज शिपाई टिपून काढणे सुरू ठेवले.
या भडिमारापुढे पोर्तुगीज बचावाने नांगी टाकली आणि त्यांनी मराठ्यांकडे शरणागती मागितली.
शरण आले असताही आपल्या सैन्यास मानाने वाट काढून द्या, अशी विनवणी पोर्तुगीज सैनिकांनी केली. चिमाजीनी ती दिलदारपणाने मान्य केली. त्यामुळेच काही सैनिक दिव, दमणला तर काही गोव्याला पोहोचू शकले.
असे चिमाजी अप्पा. आपण स्वतः: किंवा चिरंजीव सदाशिवराव भाऊ केव्हाही ‘पेशवा’ बनणार नाही, हे ठाऊक असूनही ते कायमच पेशवाईशी एकनिष्ठ राहिले.
त्यांच्या स्मृतींना वंदन !

– भारतकुमार राऊत

*********

Madhav Vidwans is with Niyati Ghanekar

पोर्तुगीजाना वसईच्या लढाईत हरविणाऱ्या चिमाजी अप्पा यांचे आज पुण्यस्मरण (१७ डिसेंबर १७४०)
वसईची लढाई मराठा साम्राज्य आणि पोर्तुगीज वसाहतकारांच्यात इ.स. १७३९ साली लढली गेलेली लढाई होती. यात मराठ्यांचे नेतृत्त्व थोरले बाजीराव पेशवे यांचा भाऊ चिमाजी अप्पा याने केले. यात मराठ्यांनी पोर्तुगीज वसाहतकारांवर विजय मिळवला.
शंकराजीपंत फडके या सरदाराने चिमाजी अप्पाला कळवले, की वसईतील पोर्तुगीजांवर चाल करायची असेल या मोहिमेच्या सुरुवातीलाच मराठ्यांनी अर्नाळा किल्ला काबीज करणे गरजेचे होते. शंकराजीने स्थानिक लोकांशी मसलत करून अर्नाळा घेण्यासाठी त्यांची मदत मागितली. गोविंदजी कासार आणि गवराजी पाटील या बोलिंज गावाच्या रहिवाशांसह गंगाजी नाईक अंजूरकर, बाजीराव बेलोसे आणि रायाजीराव सुर्वे हे मराठा सरदार ४०० सैनिकांचे पथक घेऊन खुश्कीच्या मार्गाने निघाले, तर दर्यासारंग मानाजी आंग्रे याने गुराबा घेऊन समुद्रावरून अर्नाळ्यावर चाल केली.
मार्च २८, इ.स. १७३७ रोजी मराठा सैन्याने अर्नाळ्यात गाफील असलेल्या पोर्तुगीजांवर हल्ला केला आणि त्यांना हुसकावून लावून किल्ला काबीज केला. या विजयाची स्मृती म्हणून किल्ल्याच्या उत्तरेकडच्या तटबंदीमध्ये एक शिलालेख कोरण्यात आला; जो अजूनही शाबूत आहे. शंकराजीपंताने लगेचच किल्ल्याची डागडुजी सुरू केली व किल्ला पुन्हा भांडता केला. जानेवारी इ.स. १७३८पर्यंत तीन बुरूज बांधून तयार झाले. त्यांना भैरव बुरूज, भवानी बुरूज आणि बावा बुरूज अशी नावे देण्यात आली. मार्च महिन्यात किल्ला पूर्ण लढता झाल्यावर मराठा सैन्य आसपासच्या प्रदेशात पसरले व वर्सोवा तसेच धारावी या बेटांवर त्यांनी आपले बस्तान बसवले.
चिमाजी अप्पांनी लढाईत मिळालेल्या चर्च मधील प्रचंड घंटा वाई जवळील मेणवली येथे घाटावरील घंटागृहात टांगली आहे “


मोहरा इरेला पडला – दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी

बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्ला असला
दुश्मन फिरंगी तिथला आटोपेना कोणाला
त्या सिंहाला पकडाया भारतीय चिमणा सजला
गोव्याचा टोपीवाला कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयाला बुद्धीचा डाव उडाला
मोहरा इरेला पडला ||१||

बोलावूनी सरदारांना तो समरधुरंधर बोले
शूरांनो वेढा द्याया चारमास होऊनी गेले
बेहीम्मत जे असतील परतोनी ते जातील
जा कळवा की दादाला मोहरा इरेला पडला ||२||

तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे
शीर तुटुनी त्या आघाते किल्ल्यात पडूद्या त्याते
ती निर्वाणीची वाणी डोळ्यास आणि पाणी
प्रत्येक वदे गहीवरुनी इर्षेस वीर हा चढला
मोहरा इरेला पडला ||३||

गोळ्यांच्या मार्याखाली चर खोदोनी रेतीत
उडविले सुरंगी बार तट लोळविला मातीत
गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारात
जो बांध तटाचा फुटला तो सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला बंदुकीस भाला भिडला
मोहरा इरेला पडला ||४||

मर्दच्या मराठी फौजा रणकीर्ती जणांच्या गाव्या
जणू घोंगावत मधमाश्या मोहोळाला बिलगाव्या
कडकडात वरुनी व्हावा सारखा अग्निवर्षावा
परी तो सिंहाचा छावा परतेना हिम्मतवाला
मोहरा इरेला पडला ||५||

वारावर करतची वार अनुसरले शूर पवार
शिंद्यांचा खांदा घोडा चालला जणू की तीर
बावटा धरुनी तोंडात भोसले चढे जोमात
आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला
मोहरा इरेला पडला ||६||

गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु कितक्यांच्या धड्पडल्या
धातीचे निधडे वीर चिंध्यापरी त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना क्षत्रुची पकड सुटेना
तो विजयश्रीचा चिमणा बेहोष होऊनी लढला
शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावर चढला
जयनादाने वसईचा दिग्प्रांत पहा दुमदुमला

तो समय आणि ती मूर्ती ठाके कवीनयनापुढती
मोहरा इरेला पडला ||७||

बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे

थोरले नानासाहेब पेशवे

सातारचे छत्रपतींचे चौथे पेशवे बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांचे आज पुण्यस्मरण (भट घराण्यातील ३ रे ) ते थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांना २५ जुन १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने बाळसे धरले. मराठ्यांनी उत्तर भारतात जरब बसवली आणि साधारण इ.स. १७६० च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य अशी ताकत होती. परंतु १७६१ च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. त्याच पराभवाच्या धक्याने २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले. इ.स. १७४९ साली शाहू छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर बाळाजी मराठा राज्याचा सर्वसत्ताधीश झाला. छ.शाहूचे वारस रामराजे हे सातारा येथे छत्रपती म्हणून छत्रपतीच्या गादीवर होते. तरीही बाळाजीने छत्रपतीच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला. त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात दिनांक २५ सप्टेंबर, इ.स. १७५० रोजी सांगोला येथे करार झाला. त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीरावाने छत्रपतींना दरसाल पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारान्वये ठरले.
नानासाहेब पेशवे यांची समाधी पुण्यात मुठा नदीकाठी पूना हॉस्पिटलजवळ आहे.
पुण्याचे देवदेवेश्वर संस्थान दरवर्षी ’श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि अध्यात्मिक पुरस्कार’ देते. २०१६ साली हा पुरस्कार डॉ. यू.म.पठाण आणि संस्कृतचे अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर यांना प्रदान झाला. हे देवदेवेश्वर संस्थान पुण्यातील पर्वतीवरील देवळांची व्यवस्था पाहते .(विकिपीडिया )”
त्यांनी प्रथमच लावणी या मराठमोळ्या कलेला उत्तेजन दिले.
चित्र The Indian Portrait मधील – श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकाच्या फलकावरून साभार – नवी भर दि.२३-०६-२०२२


दुसरे नानासाहेब पेशवे

🚩 ” क्रांतीवीर नानासाहेब पेशवे “यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩 (६ऑक्योबर)
धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या आई गंगाबाई व वडील नारायण भट्ट हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या सेवेत होते. छोट्या धोंडोपंतांची हुशारी पाहून बाजीराव पेशव्यांनी त्यांना आपला वारस म्हणून दत्तक घेतले.
इसवी सन १८५१मधे दुसऱ्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांना ईस्ट इंडिया कंपनी कडून मिळत असलेले सालाना ८ लाख सालाना पेन्शन रद्द केली गेली आणि इथेच पहिल्यांदा नानासाहेबांच्या अभिमानाला ठेच पोहोचली. त्यांनी लंडनच्या राणीकडे आपल्या वकिलामार्फत निरोप धाडला, पण इंग्रजांचे इरादे स्पष्ट होते.”फक्त भारतीयांची लूट “. इसवी सन १७५७ मधे बंगालचा नवाब “सिराज उद्दौला” ह्याचा प्लासीच्या लढाईत पराभव केला आणि भारतात ब्रिटिशांनी आपले पाय रोवायला सुरूवात केली.
दक्षिणेत टिपू सुलतान चा श्रीरंग पट्टणम च्या लढाईत पाडाव झाला आणि ब्रिटीश राजवट हळू हळू आपले पाय पसरू लागली. ईस्ट इंडिया कंपनी पाहता-पाहता एक एक राजवट उलथवून आपला जम बसवू लागली.
ईस्ट इंडीया कंपनी विरोधात भारतीय जनतेत आणि विशेषकरून भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण व्हायला सुरुवात झाली .आणि यात भर पडली ती कंपनी सरकारने आणलेल्या बंदुकामुळे .सैनिकांमध्ये माहिती पसरली की ह्या बंदुकीच्या काडतुसामधे गाईच्या आणि डुकराच्या चरबीचा वापर केला आहे .
“हिंदूंना गाय पवित्र होती आणि मुसलमानांना डुक्कर निषिद्ध होते .कंपनी सरकारने हीच बंदूक वापरण्यास सुरुवात केली आणि स्वातंत्र्य युद्धाचा भडका उडाला. वेगवेगळे संस्थानिक आणि कंपनी सरकारमधील सैनिकांनी दिल्लीचा बादशहा ह्यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध कंबर कसली आणि ह्या सगळ्याचे नियोजन करणार होते ! नानासाहेब पेशवे आणि त्यांचे सेनापती तात्या टोपे : नानासाहेबांनी ब्रिटिशां विरोधात कंबर कसली.५३ नेटिव्ह इन्फंट्री चे सैनिक नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाले.नानासाहेबांचे नाव ऐकतात पंधरा हजाराच्या आसपास सैनिक जमा झाले .
नानासाहेबांनी जनरल व्हिलर आणि सैन्यावर कानपूरच्या किल्ल्याला वेढा देऊन जोरदार हल्ले सुरु केले .१० दिवस अहोरात्र गोळीबार करताच व्हिलर ची मती गुंग झाली.
मुत्सद्दी नानासाहेबांनी आपले दूत पाठवून तह केला.इंग्रजांना कानपूर सोडून अलाहाबादला पळून जाण्यास सांगितले .नानासाहेबांनी इंग्रजांवर पहिला विजय मिळवला.
सैन्यामध्ये नाना बहाणे करून निरनिराळया ठिकाणी लोक पाठवून सैनिकांपर्यंत ते आपला हेतू पोहोचवत होते. ब्राह्मण, कीर्तनकार, प्रवचनकार, मुल्लामौलवी, फकीर असे निरनिराळे वेष धारण करून शेकडो क्रांतिदूत ते सैन्यात पाठवत होते.
ब्रिटिश सत्ता रानटीपणाने न्याय-अन्याय न बघता भारतात सर्व ठिकाणी दडपशाही करत होती. शेतकऱ्यांपासून संस्थानिकांपर्यंत सर्वत्र जुलूमशाहीचा रणगाडा फिरत होता. त्यातही मुख्य पिळवणूक आर्थिक होत होती. असे कित्येक संस्थानिक होते की, त्यांचे दत्तक वारस मान्य न करता त्यांची संस्थाने ताब्यात घेतली.
संस्थानातली सगळी संपत्ती सरकारजमा केली. त्यांच्या तोंडावर निर्वाहापुरते निवृत्तीवेतन देण्यात आले . सैन्यात दडपशाही, न्यायालयीन चौकशीला नकार, केव्हाही अकारण बडतर्फी, भावनांचा अपमान अशी सर्व बाजूंनी गळचेपी होत होती. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं आवश्यक होतं. ती जबाबदारी नानासाहेब पेशव्यांनी उचलली.
श्रीमंत नानासाहेब पेशवे हे दुसऱ्या बाजीरावांचे दत्तक पुत्र होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांना देण्यात येणाऱ्या आठ लक्ष रुपयांच्या पेन्शनवर त्यांचा हक्क नाकारण्यात आला. त्याबरोबरच पेशवे म्हणून असणारे इतर सन्मानही ब्रिटिशांनी काढून घेतले. नानासाहेबांनी आपला एक हुशार वकील अजीमुल्लाखान याला विलायतेला पाठवलं. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
या स्वातंत्र्य युद्धासाठी बाहेरची राष्ट्रे काही मदत करतील का हे बघण्यासाठी त्यांनी वकिलाला रशियात पाठवले. जागतिक राजकारणाचा अभ्यास आणि मुत्सद्दीपणा त्यांच्याजवळ होता. दिसण्यात अतिशय रुबाबदार आणि छाप पाडील असं सुंदर व्यक्तिमत्त्व होतं. ते विद्याशास्त्र संपन्न आणि युद्धशास्त्रातही पारंगत होते. उत्तम संघटन चातुर्य होतं. इंग्रज अधिकाऱ्यांना खिळवून ठेवणारं प्रभावी वक्तृत्व होतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कर्तृत्वाची प्रशंसा इंग्रज अधिकारीही करत.
इंग्रजांविरुद्ध संघटित उठावाची उभारणी ब्रह्मावर्तातच झाली. नानासाहेब कधी केवळ एका ठिकाणी बसून पत्रव्यवहार करत होते. कधी तीर्थयात्रेचे निमित्त काढून भाऊ आणि वकील यांच्यासह दिल्ली, अंबाला, सिमला, लखनौ, काल्पी व इतर अनेक ठिकाणी जाऊन निरीक्षण करून येत. त्यांच्याविषयी लोकांच्या मनात प्रेमाची आणि आदराची भावना होती.
नानासाहेबांच्या प्रयत्नामुळे दिल्लीचा बादशहा बहादूरशहा जाफर, बेगम झिनतमहल, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जगदीशपूरचा महाराणा कुमारसिंहजी हे सर्व राजपुरुष जीवावर उदार होऊन हाती असलेल्या शस्त्रांसह एकदिलाने या क्रांतीला सिद्ध झाले होते. ३१ मे १८५७ ही उठावाची तारीख ठरली होती. पण मंगल पांडे या सैनिकाच्या अतिरेकी उत्साहामुळे एक महिना आधीच सर्व उठाव बरबाद झाला.
हातात शस्त्र धरून उठावाला सिद्ध झालेले क्रांतिकारी क्रांतिकारकांच्या मार्गाने जाऊन हुतात्मे झाले. रणरागिणी लक्ष्मीबाई गेली. रणशूर तात्या टोपे, ऐंशी वर्षाचे कुमार सिंहजी गेले.नाना म्हणजे हिंदभूचा साक्षात क्रोधच, नाना म्हणजे या भूमीचा नरसिंहमंत्रच. नानासाहेब पेशव्यांनी क्रांतिकारकांना घेऊन बरीच मोठी कामगिरी केली. परंतु दुर्दैवाने त्यांना यश आले नाही.
शत्रूला सतत झुंजवत ठेवून आपल्या अतुल पराक्रमाची शर्थ करून शेवटी आपल्या सैन्यासह नानासाहेब नेपाळमध्ये गेले. नेपाळच्या राजाची मदत मिळावी, अशी अपेक्षा होती. पण ती सफल झाली नाही आणि १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाचा हा महान प्रणेता नेपाळातच ६ आॅक्टोबर १८५८ मधे अंतर्धान पावला.
लेखन ✒️
डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर

तात्या टोपे

🏇 तात्या टोपे 🏇 ( रामचंद्र पांडुरंग टोपे) जन्म : १८१४ येवला (नाशिक)
फाशी : १८ एप्रिल १८५९ शिवपुरी (मध्यप्रदेश)

“१८५७ च्या विद्रोहात जो सर्व नेते होते सामील होते, त्या सर्व नेत्यांमध्ये तात्या टोपे अप्रतिम साहसी, अति धैर्यवान आणि दृढनिश्चयी होते. त्यांची संघठनशक्ती व प्रतिभा प्रशंसनीय होती”- सर हयू रोज.
ह्यू रोज प्रमाणेच जॉर्ज फारेस्ट याने तात्या टोपेला ‘सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय नेता ‘ म्हटले आहे. ” तात्या टोपे जगातील सर्वश्रेष्ठ गुरिल्ला सेना नायक होते……. जर त्या विद्रोहात त्याच्यासारखे आणखी दोन तरी नेते असते , तर हिंदुस्थान इंग्रजांना तेव्हाच सोडावा लागला असता. यात शंकाच नाही.”
‘ तात्या टोपेबद्दल वर दर्शविल्याप्रमाणे लिहिणारे तिन्ही लोक इंग्रज होते. हे लक्षणीय आहे. शत्रुसुद्धा ज्याची अशी प्रशंसा करतात, तो सेनानायक आधी नानासाहेब पेशव्यांच्या पदरी मुख्य लेखनिक होता. तो नानासाहेबां पेक्षा दहा वर्षांनी वयाने मोठा होता. कानपूरला जेव्हा नानासाहेबांनी उठावाची सूत्रे हातात घेतली. तेव्हा त्यांनी लेखनिक तात्याला आपल्या दरबारात बोलावले व त्यांना सैनिकी वेष व रत्नाजडीत तलवार देऊन आपला सरसेनापती घोषित केले. लेखणी टाकून देऊन तलवार हाती घेणारा व युद्धाचा कसलाही अनुभव नसणारा तो सर्वश्रेष्ठ योद्धा ठरला आणि आपल्या देशाच्या स्वतंत्रतेच्या बलिवेदीवर त्याने धैर्यपूर्वक आपले बलिदान केले. आपल्या आयुष्याच्या उण्यापुऱ्या शेवटच्या दोन वर्षात तात्याने एवढी चिकाटी , निष्ठा , शौर्य व बाणेदारपणा दाखविला की, शत्रुंना ( इंग्रजाना ) सुद्धा त्याच्या गुणांची व कर्तृत्वाची वाखाणणी करावी लागली.
तात्याचे वडील पांडुरंगराव , ते वेदशास्त्र संपन्न होते. त्यांचे मुळगांव बीड़ जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जोळ हे खेडे. त्या काळात पाटोदा तालुका नगर जिल्ह्यात होता. नंतर ते नाशिक जिल्ह्यातील येवले या गावी स्थायिक झाले . दुस-या बाजीरावाचा विश्वासू सरदार त्र्यंबकजी डेंगळे हा नगर जिल्हयातल्या संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथला राहणारा. त्याचा व पांडुरंगरावांचा चांगला परिचय होता. त्र्यंबकजी डेंगळ्यांनीच पांडुरंगरावांना दुस-या बाजीरावाच्या सेवेत आणले. त्यांच्याकडे धर्मदाय खाते सोपविण्यात आले. १८१८ मध्ये इंग्रजांनी पेशवाई बुडविली व दुसऱ्या बाजीरावाला आठ लाख रुपये पेन्शन देऊन उत्तरेत गंगेच्या काठी ब्रम्हावर्त ( विठूर ) येथे स्थायिक केले. दुस-या बाजीरावाबरोबर जी ब्राम्हण मंडळी विठूरला गेली, त्यांत पांडूरंगरावही होते व तेथेही त्यांच्याकडे धर्मदाय खाते होते. ते आधी अण्णासाहेब विंचूरकरांचे आश्रित होते . पांडुरंगरावांना आठ मुले होती. त्यातला दुसरा रामचंद्र ऊर्फ तात्या.त्याचा जन्म येवले येथे सन १८१४ सुमारास झाला. विचूरकरांच्या ‘ तीर्थयात्रा प्रबंध ‘ या तत्कालीन हस्तलिखितात रामचंद्ररावांचा उल्लेख ‘अप्पा टोपे’ य तात्यांचा उल्लेख ‘तात्या टोपे ‘ असा आहे. यावरून त्यांचे मूळ आडनाव टोपे हेच होते. बाजीरावाने दिलेल्या टोपीवरून त्याचे आडनाव टोपे असे पडले, ही आख्यायिका त्यावरून वाद ठरते. ते येवले येथे स्थायिक झाल्याने त्यांना येवलेकर असेही आडनाव लाभले. ते देशस्थ ब्राह्मण होते.
नानासाहेब पेशव्यांचे संबंध कानपूरच्या वरिष्ठ इंग्रज अधिका-यांशी चांगले होते. ते अधिकारी अधूनमधून विठूरला नानासाहेबांकडे येत असत. नानासाहेब त्यांचे आदरातिथ्य उत्तमप्रकारे करायचे. त्यामुळे त्या अधिका-यांचा नानासाहेबांवर विश्वास होता. १० मे रोजी मेरठच्या पलटणीतील देशी शिपायांनी , ११ मे रोजी दिल्लीच्या देशी पलटणींनी व ३० मे रोजी लखनौच्या पलटणींनी इंग्रजाविरुद्ध उठाव केले. त्याच्या बातम्या कानपूरला येऊन धडकल्या. कानपूरच्या देशी पलटणी तीन होत्या. त्यात ३००० शिपाई होते. ते ही उठाव करण्याच्या बेतात आले. त्याची कुणकुण तेथला इंग्रज सेनापती व्हीलर व कलेक्टर हिलर्डसन यांना लागली. त्यांनी लगेच नानासाहेबांना त्याचे शिपाई व तोफा घेऊन कानपूरला बोलावले. नानासाहेब तीनशे सशस्त्र शिपाई व दोन तोफा घेऊन कानपूरला आले. त्याच्याकडे कानपूरच्या नबाबगंज मधील सरकारी खजिना व दारूगोळ्याचे कोठार आणि शस्त्रागार यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी इंग्रज अधिका-यांनी सोपविली. तात्या टोपेही त्यांच्याबरोबर कानपूरला आले होते.
कानपूरच्या पलटणीचा सुभेदार टीकासिंह नानांना व तात्याना भेटला. नानांचा सल्लागार अजीमुल्लाखाँसुद्धा तेथेच होता. चौघांनी उठावाचा बेत आखला. ४ जून १८५७ रोजी टीकासिंहच्या नेतृत्वाखाली कानपूरच्या ३००० शिपायांनी इंग्रजाविरूद्ध बंड पुकारले. त्या छावणीत बायकामुलांसह फक्त १००० इंग्रज होते. व्हीलरने संरक्षणाची तयारी केलेलीच होती. टीकासिंह व तात्या टोपे यांनी कानपूरच्या रेसिडेन्सिवर हल्ला चढविला. नानासाहेब त्यांचे ८ लाखाचे पेन्शन इंग्रज सरकारने बंद केल्याने मनातून इंग्रजावर चिडलेले होतेच. ते वरवरून मैत्री दाखवित होते. त्यांनीही नबाबगंज मधला इंग्रज सरकारचा खजिना, दारूगोळा – भांडार व शस्त्रागार ताब्यात घेतले. हिलरने १६-१७ दिवस चांगली टक्कर दिली पण रेसिडेन्सीतील अन्नपाणी संपत आले. अनेक इंग्रज मारले गेले. त्यामुळे त्याने शरणागती पत्करली. नानासाहेबांनी उरलेल्या इंग्रजांना अलाहाबादेस पाठवून देण्याचे आश्वासन दिले. कानपूर स्वतंत्र झाले. विठूरला जाऊन नानासाहेबांचा राज्याभिषेक थाटात झाला.
कानपूरची बातमी कळताच हॅवलॉक व नील हे दोघे सेनापती चिडले. नील तर क्रुरकर्माच होता. ते दोघे मोठे सैन्य घेऊन रस्त्यात दिसेल त्याला फासावर चढवित
कानपूरला पोहचले. कानपूरला टीकासिंह व तात्या टोपे शर्थीने लढले. पण त्यांचा पराभव झाला. नानासाहेब आपला खजिना व सारे कुटूंब घेऊन गंगापार निघुन गेले. तात्या उरलेले सैन्य घेऊन ग्वाल्हेरकडे गेला. तात्याने ग्वाल्हेरच्या राजाच्या सैन्याला उठावास प्रवृत केले.
हॕवलॉक व नील लखनौकडे तेथल्या इंग्रजांच्या मदतीला सन्य घेऊन गेले. ही संधी संधी तात्याने साधली व पुन्हा कानपूर जिंकून घेतले. ते कळताच हॕवलाॕक व नील वाटेतून परतले. त्यांनी कानपूरवर हल्ला केला. तात्याने मोठ्या जिद्दीने त्यांचा प्रतिकाराला केला पण त्याचा टिकाव लागला नाही. कानपूर व विठूर हातातून गेले. तात्या पुन्हा पश्चिमेकडे निघाला.
तात्याने जेव्हा कानपूर पुन्हा स्वबळावर जिंकले होते, तेव्हा त्याला युध्दोपयागी अशी प्रचंड लूट मिळाली होती. त्या लुटीत ५ लाख रुपये , ११ हजार काडतुसांच्या पेट्या , ५०० तंबू, बैलाचे पुष्कळ तांडे, भरपूर धान्य व कपडे त्याला मिळाले होते. ते त्यात काल्पीच्या किल्ल्यात ठेवून दिले होते. पश्चिमेकडे जाताना शिवराजपूरची देशी पलटण त्याला येऊन मिळाली होती. आता त्याच्या जवळ २० हजारावर सैन्य होते. त्याची बाजू आता भक्कम होती.
सर ह्यू रोजने २० मार्च १८५८ रोजी झाशीला वेढा घातला. राणी लक्ष्मीबाई जिद्दीने लढत होती. पण तिचे सैन्य बेताचच होते. तिने तात्याला मदतीसाठी बोलावले. तात्या आपले सैन्य घेऊन निघाला पण ह्यु रोजच्या सैन्याने त्याचा पराभव केला. राणी लक्ष्मीबाई झांशीहून मोजक्या सैनिकांसह गुप्त मार्गाने बाहेर पडून काल्पीला आली. तात्याने तिचे सांत्वन केले. नानासाहेब पेशव्यांचे पुतणे रावसाहेब हे सुद्धा तेथे होते. झांशी काबीज केल्यावर ह्यू रोज काल्पीयावर चालून आला. तेव्हा राणी लक्ष्मीबाईने ग्वाल्हेरवर हल्ला करण्याचा सल्ला त्यांना दिला. तिघेही आपल्या सैन्यासह ग्वाल्हेरला आले. थोड्याशा चकमकीत ग्वाल्हेर त्यांच्या हाती आले. राजे जयाजीराव शिंदे व दीवाण दिनकरराव राजवाडे आग्र्याला इंग्रजांच्या आश्रयाला निघून गेले.
सर हयू रोजने काल्पी जिकल्यानंतर आपला मोर्चा ग्वाल्हेरकडे वळविला. तेथे तुंबळ युद्ध झाले. त्यात राणी लक्ष्मीबाईचे दुःखद निधन झाले. इंग्रजांनी तात्यासह सर्वांचा तेथे पराभव केला. तात्या आपल्या उरलेल्या सैन्यासह त्या युद्धातून निसटले. जाताना त्यांनी आसपासचे जंगल पेटवन दिले.
तात्याबरोबर रावसाहेब पेशवेही निघाले. तात्याने मार्च १८५९ अखेरीपर्यंत आपल्या दुर्दम्य ध्येयवादाच्या बळावर आपल्या अपु-या सैन्यानिशी गनिमी काव्याने मध्य भारतात इंग्रज सेनाधिका-यांना अगदी बेजार करून सोडले. उत्तर अलवर ते दक्षिणेला सातपुड्यातील बैतुल, पूर्वेला सागर ते पश्चिमेला छोटा उदयपूर एवढ्या मोठ्यामध्य भारताच्या प्रचंड टापूत जवळ जवळ एक डझन मोठे मोठे इंग्रज सेनाधिकारी त्याचा पाठलाग करीत होते. पण तात्याचे दर्शन सुद्धा त्यांना होत नव्हते. म्हणून इंग्रज सरकारने तात्याला पकडण्यासाठी एक लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर केले. पण एवढ्या मोठ्या रकमेच्या लोभाने कोणीही तात्याचा थांगपत्ता लागू देत नव्हता.
लढायांच्या काळात सैन्य आपल्या गावाकडे येत आहे. असे कळताच प्रत्येक गावातील सगळे लोक आपले सामान – सुमान घेऊन जंगलात पळून जात असत. त्यामुळे सैन्याला धान्य , किराणा इ. जिवनावश्यक पदार्थ मिळणे दुरापास्त होऊन जाई. आपल्या सैन्यावर तशी पाळी येऊ नये, म्हणून तात्याने रावसाहेब पेशव्याच्या नावे सा-या प्रजेसाठी एक जाहीरनामा काढून तो गावोगावी पोहचविण्याची व्यवस्था केली. या जाहीरनाम्यातील महत्त्वाचा भाग असा –
” सर्व शहरे , लहानमोठी गावे खेडीपाडी येथील राहणारे मध्यम प्रतीचे लोक, व्यापारी , दुकानदार , लष्करी लोक व इतर सर्व प्रतीचे लोक यास कळविले जाते की, जयाचा झेंडा बरोबर बाळगून राजाच्या मुख्याबरोबर असणारी ही फौज इकडेस आली आहे. या देशात राहणा-या लोकांची खराबी करण्याकरीता ती ईकडे आलेली नाही. फक्त धर्मबाह्य पिरती लोयाच्या नाशाकरीता इथे आली आहे . या उपर कोणत्याही गावच्या लोकांनी ही फौज गावानजीक आली असता पळून जाऊ नये, या फौजेस ज्या सामानाची गरज लागेल, ते सामान शिरस्त्यापेक्षा काही जास्त किंमत ठरवून ज्या किंमतीने गावकरी लोकांकडून विकत घेतले जाईल. हा जाहीरनामा ज्या गावी जाऊन दाखल होईल, त्या गावच्या मुख्याने तो आपल्या आसपासच्या गावात पाठवून द्यावा म्हणजे जेणेकरून लोकांची सर्व भीती दूर होईल.”
तात्याला पकडणे शक्य नाही, म्हणून इंग्रज सेनाधिका-यांनी त्याचे म्हातारे वडिल, त्याची पत्नी, मुलगा व मुलगी यांना अटक करून ग्वाल्हेरच्या भयाण किल्ल्यात नजर कैदेत ठेवून दिले. मध्य भारतात तात्या २० जून १८५८ ते मार्च १८५९ अखेर सुमारे ९-१० महीने अत्यंत वेगाने आपल्या सैन्यासह इंग्रज सैन्याला झुकांड्या देत घुमवित राहीला. त्याचा दरदिवसाचा वेग ५० मैलाच्या वर होता, तर इंग्रज सैन्य ४0 मैलांपेक्षा जास्त अंतर कापू शकत नव्हते. या काळात तात्याने एवढ्या मोठमोठ्या इंग्रज अधिका – यांना ३००० मैलाच्या वर पायपीट करायला लावली. पण तात्या त्याच्या हाती लागला नाही. म्हणून त्यांनी फितुर शोधायला सुरुवात केली.
२१ जानेवारी १८ ५९ रोजी तात्याने रावसाहेब पेशवे व फिरोजशहा यांच्यासह अलवर जवळील शिक्कारा ( सीकर ) या गावाजवळ इंग्रज सेनापती कर्नल मीड याच्याशी शेवटची झुंज दिली. त्यात त्यांचा पराभव झाला. रावसाहेब पेशवे नेपाळात निघून गेले व फिरोजशहा इराणकडे निघाला. आता तात्याकडे फारच थोडे सैन्य राहिले. त्याने त्या सैन्यालाही रजा दिली व तो तीन चांगले घोड़े, एक तट्टू, रामराव व नारायण हे दोन ब्राहाण आचारी आणि गोविंद हा मोतद्दार यांच्या सह परोणच्या जंगलात एका सुरक्षित स्थानी निघून गेला.
त्याचा जुना मित्र मानसिंह हा राजपूत जवळच होता. त्या दोघांची भेट झाली. त्यानंतर मानसिंग जातांना म्हणाला , “ मी थोडेसे शिपाई, काही दारूगोळा व अन्नसामग्री घेऊन दोन – तीन दिवसात तुझ्या मदतीला येतो.” मानसिंहाची जहागीर ग्वाल्हेरच्या राजाने काढून घेतली होती. ती कशी मिळवावी या चिंतेत तो होता. हे कर्नल मीडला समजले होते. म्हणून मीडने त्याला बोलावून घेतले व त्याला ग्वाल्हेरच्या शिंद्यांकडून अलवरची जहागीरी मिळवून देण्याचे मधाचे बोट त्याला लावले. त्या बदल्यात तात्या टोपे याला पकडून देण्याचे वचन मीडने त्याच्याकडून घेतले.
तात्याला विश्रांती मिळाल्यामुळे तो आता ठाकठिक झाला होता. सिरोज जवळच्या विद्रोही सैन्याला व शिवपुरच्या एक हजार विद्रोही सैन्याला जाऊन मिळण्याच्या व त्यांच्या साह्याने पुन्हा इंग्रजाविरूद्ध लढण्याचा तात्याचा विचार होता. तशी त्यांच्यात निरोपानिरोपी चालू होती. तो मानसिंहाची वाट पाहात परोणच्या जंगलात थांबला होता. पण मानसिंहाने त्याला दगा दिला ७ एप्रिल १८५९ च्या मध्यरात्री तात्या गाढ झोपेत असताना मानसिंह काही इंग्रज सैनिक घेऊन गुपचूप तात्याच्या मुक्कामी आला व त्याने तात्याला पकडून दिले. त्याआधी त्या सैनिकांनी तात्याची सर्व शस्त्रे हस्तगत केली होती. तात्याची त्यांनी झडती घेतली. तेव्हा तात्याजवळ सोन्याची तीन कडी, एक तांब्याचे कडे, १०८ मोहरांची पिशवी सापडली. तात्यांचे हुजरे मात्र तात्यांचे सर्व कागदपत्र घेऊन निसटून गेले. १०८ मोहरांपैकी ९७ मोहरा मीडने मानसिंहला दिल्या. बाकीच्या २१ मोहरा तात्याला पकडणा-या शिपायाःना वाटून दिल्या.
१० एप्रिल १८५९ रोजी इंग्रजांच्या मुशैरी छावणीत तात्यांचे शेवटचे वक्तव्य लिहून घेण्यात आले. तात्याने त्यात आपली आत्मकहाणी सांगितली आहे. ती फार विस्तृत आहे. तात्याला शिप्री येथल्या मीडच्या छावणीतील सैनिकी न्यायालयापुढे १४ एप्रिल १८५९ रोजीच उभे करण्यात आले. तीन दिवस तात्याची चौकशी चालली. त्या न्यायालयात तात्याने स्पष्टपणे सांगितले, “मी जे जे काही केले ते माझे धनी नानासाहेब पेशवे यांच्या आज्ञेनुसार केले. काल्पीपर्यंत मी त्यांच्या हाताखाली वागलो. तेथून पुढे रावसाहेबांच्या आज्ञा पाळल्या. न्याय्ययुद्धातल्या व्यतिरिक्त किंवा लढाई व्यतिरिक्त मी किंवा नानांनी एकाही युरोपियन माणसाला किंवा स्त्रीला ठार मारले नाही किंवा फाशी दिले नाही. कुठलाही साक्षीपुरावा देण्याची माझी नाही. मी तुमच्या विरूद्ध युद्ध खेळलो आहे म्हणून मला पक्के माहीत आहे की, आता मला मरणाला सिद्ध झाले पाहिजे. कोणतेही न्यायालय नको आहे व त्यामध्ये मला कोणताच भाग घ्यावयाचा नाही.”
१७ एप्रिल १८५९ रोजी तात्याला फाशीची शिक्षा सुनविण्यात आली. तेव्हा त्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. तेव्हा तात्या म्हणाला, माझ्या वृद्ध आईवडिलांचा माझ्या कृत्याशी कोणताच संबंध नाही. म्हणून त्यांना माझ्याकरीता कोणताही त्रास देऊ नये.” नंतर बेड्या घातलेले हात उंचावून तात्या धीरगंभीरपणे म्हणाला, आता मला एकच आशा आहे की, या शृंखलांतून मुक्त होण्यासाठी मला एक तर तोफेच्या तोंडी द्यावे किंवा फासावर लटकविले जावे.
नंतर तात्याला वधस्तंभाकडे नेण्यात आले. त्याने शेजारच्या मांगाकडे एक दृष्टीक्षेप टाकला व तो शांतपणे पाय-या चढून वर आला. सभोवारच्या इंग्रजांकडे तुच्छतेने दृष्टी टाकून त्याने आपल्या हाताने स्वतः ची मान फाशीच्या दोराच्या फासात अडकविली. त्याच्या पायाखालची फळी काढून घेताच एका क्षणापूर्वी तरतरीत व तेजस्वी दिसणारे तात्याचे रुबाबदार व बांधेसुद शरीर क्षणार्धात अचेतन होऊन लोंबकळू लागले. झाले ! स्वातंत्र्य युद्धातले चैतन्यच हरपले .
तात्या मध्यम उंचीचा, निमगोरा, धट्टाकट्टा, भव्य कपाळ असलेला, उंच व सरळ नाक असलेला, काळेभोर डोळे व कमानदार भुवया असलेला, भेदक नजर असलेला तो वीर मातृभूमीच्या कुशीत विलीन झाला. त्याच्या चेह-यावर बुद्धिमत्तेचे तेज विलसत होते. त्याचा चेहरा पाहताच हा मोठा कर्तबगार पुरूष आहे, असे सर्वांना वाटायचे. तात्याला उर्दू, हिंदी, मराठी, संस्कृत या भाषांचे चांगले ज्ञान होते. सही करण्याइतके इंग्रजी त्याला येत होते. ताचे बाळबोध व मोडी अक्षर वळणदार होते. त्याचा पोशाख साधा होता. खांद्यावर काश्मिरी शाल व कमरेला तलवार आणि कुकरी असायची.
स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी हालअपेष्टा सोशीत, इंग्रज सेनाधिका-यांना सळो की पळो करीत हा अत्यंत स्वाभिमानी वीर योद्धा अखेर विश्वासघाताने प्राणांना मुकला. मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे ज्या ठिकाणी तात्यांना फाशी देण्यात आली तेथे तात्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे.
🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 स्वातंत्र्य वेदीवर हौतात्म्य पत्करलेल्या सर्व ज्ञात व अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन🙏

फेसबुक / वॉट्सॅपवरून साभार दि.२४-०४-२०२२


***********************

श्रीमंत माधवराव पेशवे

पानिपतचे अपयश भरून काढणारे थोरले माधवराव पेशवे यांची आज जयंति (१६ फेब्रूवारी १६४५ ते १८ नोव्हेंबर १७७२)

माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली,त्या वेळी माधवरावाचें वय अवघे सोळा वर्षांचे असल्यामुळे त्यांचे काका रघुनाथराव हा कारभार पाहू लागले . वास्तविकपणे माधवराव जरी अल्पवयीन होते, तरी ते बुद्धिमान असल्यामुळे त्यांनी पेशवाईतील घडामोडी मोठया सूक्ष्म रितीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुद्धी ही त्याच्या अंगी होती.

थोरले माधवराव पेशवे यांच्या बद्दल #ग्रांटडफ ने काढलेले उद्गार

People interested in knowing the true significance of Grant Duff’s statement that “the plains of panipat weren’t more fatal to fortunes of mahrattas than the early death of this excellent prince” should read about the historical character “Augustus Caesar”.
थोरले माधवराव पेशवे यांच्या बद्दल ग्रांट डफ ने काढलेल्या उद्गारांचे खरे मर्म समजावून घेण्यास प्रथम रोमन सम्राट “ऑगस्टस सीझर” याचे चरित्र वाचावे. किमान विकी आर्टीकल तरी वाचावे. जर माधवराव सर्वसाधारण आयुष्य जगले असते, तर जी प्रतिष्ठा ऑगस्टस ने गृहयुद्धात फसलेल्या रोमन साम्राज्याला दिली, तीच प्रतिष्ठा माधवरावांनी स्वराज्याला मिळवून दिली असती.. किंबहुना ते त्या मार्गावर होते..
या दोन व्यक्तिरेखांचे आयुष्य खूप सारखे आहे आहे.. सिंहासनावर बसण्या अगोदरची बिकट परिस्थिती, त्रास देणारा काका, सखाराम बापुंचे सारखे इतर त्रासदायक लोक, नाजूक प्रकृती, लहान वय आणि लहान वयात साम्राज्याला आणि परिवाराला बसलेला प्रचंड धक्का.. या सर्वातून पार पडत साम-दाम-दंड-भेद वापरून आणलेली स्थिरता हे सगळे सगळे या समान आहे. शुद्ध वैयक्तिक चारित्र्य, कडक शिस्त, चोख व्यवहार, राजकारणाची उत्तम पकड, उत्तम लढवैय्या, हे सगळे गुण ऑगस्टस, आणि माधवराव यांच्यात समान आहेत…

माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरील भिंतीवरून साभार दि.१६-०२-२०२१

************

विकीपीडियावरील माहिती
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%87
शत्रूचा उठाव
पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा, परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला. परंतु पुढे राघोबा व माधवराव यांच्यांत वैमनस्य आले, ती संधी साधून निजामाने मराठ्यांकडील बराच मुलूख परत घेतला.

निजामाप्रमाणे हैदरानेहि या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला. तेव्हा इ.स. १७६४ मध्ये राघोबाशी समेट केल्यावर माधवरावाने हैदरवर स्वारी केली. या प्रसंगी हैदरने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून पाहिली; पण माधवराव पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून सावनूर व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रुपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला.

या नंतर इ.स. १७७० मध्ये माधवरावांनी पुनः हैदरवर स्वारी केली.

इ.स. १७६० मध्ये म्हैसूरचा नामधारी राजा चिक्ककृष्णराज मरण पावला. त्याच्या जागी हैदरने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आहे असे पाहून हैदरने त्यास बंदीखान्यात टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा माधवराव पेशव्यांस राग येऊन, त्यांनी निजामांशी दोस्ती करून हैदरवर स्वारी केली. तेव्हा हैदरने मुलूख उजाड करून तलाव फोडून व विहिरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरुपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यांस २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्यांनी हैदरशी तह केला.

दिल्लीकडील राजकारण
पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुवून कढण्याची माधवरावास फार इच्छा होती. पण इ.स. १७६८ पर्यंत राज्यकारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावास विशेष काही करिता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे शिंदे, होळकरांचे सैन्य त्यास मिळाले.

मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडून राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यात पानिपत येथेंमराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत.

या वेळी मराठ्यांनी दुसरेही एक महत्त्वाचे कारस्थान तडीस नेले. त्यांत महादजी शिंदे प्रमुख होते. इ.स. १७५४ मध्ये निजाम उल्मुल्काचा नातू गाझीउद्दीन याने वजिराचे पद बळकावून दुसरा आलमगीर यास तख्तावर बसविले. त्या वेळी आलमगीरचा पुत्र मिर्झा अबदुल्ला हा दिल्लीतून पळून गेला होता. तो शहाआलम या नावाने प्रसिद्ध होता. त्याने इंग्रजांचा आश्रय करून अलाहाबादेस रहाणे केले होते. त्याला या वेळी मराठ्यांनी दिल्लीस आणून तख्तावर बसविले.

त्यावेळच्या किरकोळ संस्मरणीय गोष्टी
इ.स. १७६५ मध्ये मल्हारराव होळकर मरण पावले. तेव्हा त्यांची सून अहिल्याबाई होळकर ह्या जहागिरीची व्यवस्था पाहू लागल्या. त्यांचा कारभार प्रजेस अत्यंत सुखदायक झाल्यामुळे त्यांचे नाव उत्तर हिंदुस्थानात सर्वांच्या तोंडी होते. दुसरी गोष्ट म्हणजे महादजी शिंद्यांची दौलतीवर नेमणूक होणे ही गोष्ट होय. तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धी. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण जिवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे त्‍या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस हा, लढाया न खेळणारा, म्हणून अर्धा शहाणा मानला जाई. जिवा, सखा, विठा, नाना अशी संक्षिप्त रूपे वापरली जात.

माधवरावांचा मृत्यू
इ.स. १७७२ मध्ये हैदरवरील स्वारीत असतानाच माधवराव आजारी पडले. पुढे ते दुखणे क्षयावर जाऊन त्यातच त्यांचा अंत झाला. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. या वेळी त्यांची पत्नी रमाबाई ही सती गेली. तिचे वृंदावन पुण्याजवळच्या थेऊर येथे अद्याप आहे. मराठेशाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्र्याचा, कर्तबगार पुरुष होता. अकरा वर्षांच्या कारकीर्दीत त्याने पानिपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला.

. . . . .

नवी भर दि. १८-११-२०२१

बाई चालली थेउरातून कुडी साहेबांचीघेऊन !! १८नोव्हेंबर १७७२ सकाळी ९ वाजता थेऊर येथे गजानन मंदिरात श्रीमंत थोरले माधवराव यांनी प्राण सोडले .
वयाच्या २७ व्या वर्षीच त्यांना देवाज्ञा झाली. कुटुंब कलह बाहेरील राजकारण यांना तोंड देण्यातच त्यांचे आयुष्य संपले .
पानिपतच्या पराभवाचा डाग त्यांनी धुवून काढला .
त्यांची सौभाग्यवती रमाबाई त्यांचे बरोबर सती गेल्या. त्यावेळी रमा बाईंचे वय २३ वर्षांचे होते …
त्यावेळी शाहिरांनी केलेले वर्णन

बाई चालली थेउरातून कुडी साहेबांची घेऊन !!
अमीर गुलाल गेली गर्दी होउन मुत्सद्दी उधळती पान !!
चवघडे वाजती खणखण मुळे च्यातीरी उभी राहिली जाऊन !!
काशीचे पाणी आल्या कावडी भरून बाईने केले जलपूजन !!
रामबाई पाषाण हिय्या केला प्राण ज्योतिशी मिळविला !!
उभी धर्म शिळे ठाकली हाताची ताली पिटली !!
घाव्रल जाळू लागली हाक इंद्र सभेला गेली !!
विमाने धाडून दिली दोघे विमाने बसविली !!
सती शोभली जशी सुलोचना !!
खाली “श्रीमंत थोरले माधवराव पेशवे हे १९३८ साली श्री सखाराम सहस्रबुद्धे यांनी लिहिलेल्या पुस्तकतील चित्र त्यावेळी त्या पुस्तकाची किमत रुपये २/-होती हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे

श्री.माधव विद्वांस यांच्या पेसबुकवरील भिंतीवरून साभार दि.१८-११-२०२१

३० जानेवारी १९४८

जानेवारी १९४८ मधला दुर्मिळ अंक

३० जानेवारीला हुतात्मा दिवस असेही म्हणतात. महात्मा गांधीजींच्या पुण्यस्मरणासाठी हे नांव दिले गेले. महात्माजींविषयी मी किती लिहिणार आणि थोडक्यात ते कसे लिहिणार? असा विचार मनात आल्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष उल्लेख न करता त्या दिवसाचे औचित्य साधून मी दहा बारा वर्षांपूर्वी हौतात्म्य हा लेख लिहिला होता. त्यानंतर तीन चार दिवसांनीच योगायोगाने माझ्याकडच्या संग्रहातले एक जुने पान हाती लागले. ते लोकसत्ता दैनिकाने पांच वर्षांपूर्वी प्रसारित केले होते. ३० जानेवारी १९४८ रोजी घडलेल्या भयंकर वृत्ताचे प्रकाशन दुसरे दिवशी म्हणजे ३१ जानेवारी १९४८ च्या लोकसत्तेच्या अंकात कसे दिले होते याचे छायाचित्र या पांच वर्षांपूर्वीच्या अंकात दिले होते. त्या काळात आधुनिक संदेशवहनाच्या सोयी नसल्यामुळे ताबडतोब माहितीचे प्रसारण होणे अशक्यच असणार. त्यामुळे संध्याकाळी घडलेल्या घटनेची माहिती रात्री छापून दुसरे दिवशी देणे क्रमप्राप्त होते. या अंकाचा एक विशेष सांगायचा झाला तर तो मोफत दिला गेला. त्या अंकाचा प्रचंड खप होणार हे निश्चित असूनसुध्दा तत्कालिन वृत्तपत्र व्यवसायाने अशा भीषण घटनेतून आर्थिक फायदा उठवण्याचा विचार केला नव्हता.

कै. ग.त्र्यं. माडखोलकर या सुप्रसिध्द साहित्यिक संपादकाने त्या घटनेच्याही दोन वर्षे आधी “जो जळेल तोच जाळील” या मथळ्याखाली महात्मा गांधींवर लिहिलेला अग्रलेख या पांच वर्षांपूर्वी प्रसारित केलेल्या लोकसत्तेच्या अंकातच १९४८ सालच्या जुन्या लोकसत्तेच्या अंकाच्या चित्राच्या सोबत छापलेला होता.

ही दुर्मिळ माहिती पुरवल्याबद्दल मी लोकसत्ताचा आभारी आहे.

या दोन्ही अंकांची छायाचित्रे खाली दिली आहेत. आज महात्माजींच्या पुण्यतिथीनिमित्य त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजलि.

30jan1945A

30jan1945b

GandhijiGodse

शूर मराठी सरदार बाजीप्रभू, धनाजी, संताजी, शिंदे आणि होळकर

मराठ्यांच्या साम्राज्याचा उत्तर हिंदुस्थानात विस्तार करण्याचे काम शिंदे आणि होळकर या जोडगोळीने प्रामुख्याने केले. शिंदे म्हणताच होळकर हे नाव लगेच जिभेवर येते इतकी ही जोडी लक्षात राहिलेली आहे. त्यातल्या मल्हारराव होळकरांची माहिती आधी मिळाली. ती देऊन हे पान उघडले. ही माहिती  देणारा श्री.माधव विद्वांस यांचा फेसबुकावरील  लेख खाली दिला आहे. मी त्यांचा आभारी आहे. नंतरच्या काळात शिंदे आणि होळकर यांच्यावरील इतर लेखांची भर यात घातली, तसेच वीर बाजीप्रभू देशपांडे , धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांची माहितीही याच पानावर संकलित केली. यामुळे लेखांचा  क्रम थोडा अनियमित झाला आहे. कृपया याची नोंद घ्यावी 

महादजी शिंदे यांची छत्री (समाधी) पुण्यामध्ये वानवडी इथे आहे. मी तिची माहिती या लेखात दिली आहे. https://anandghare2.wordpress.com/2010/08/17/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%9c%e0%a5%80/

या पानवरील लेख

७.बाजीप्रभू देशपांडे   
८. सातारचे छत्रपती शाहू महाराज
९. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

४. यशवंतराव होळकर
५. महादजी शिंदे
६. धनाजी जाधव

१. मल्हारराव होळकर
२. दत्ताजी शिंदे
३. संताजी घोरपडे

……..

नवी भर दि. १३-०७-२०२१

७. नरवीर बाजीप्रभू देशपांडे 

बाजी_प्रभू_देशपांडे 1

जीवाची बाजी लाऊन घोडखिंडला पावनखिंड करणारे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू , संभाजी जाधव १३ जुलै १६६०, तसेच शिवा काशीद (१२ जुलै १६६०)यांचे आज पुण्यस्मरण
बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. बांदलांचे बाजी दिवाण होते. बाजींप्रभू स्वराज्यस्थापनेच्या कामी महाराजांकडे आले .बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली.
सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी, आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणार्‍या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना १३ जुलै, इ.स. १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे. घोडखिंडीतला हा लढा मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमाची शर्थ मानला जातो.

शिवा काशिद यांची आठवण ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. शिवराजांनी पन्हाळा सोडण्याचे ठरविले आणि बरोबर ६०० हत्यारबंद पायदळ, बाजीप्रभूंसह महाराज हेरांनी योजलेल्या मार्गाने पन्हाळयावरून निसटले. १२ जुलै १६६०, आषाढ पौर्णिमा, गुरूवार, रात्रीचे सुमारे १० ची वेळ. विजा चमकत होत्या पाऊस कोसळत होता आणि एवढ्यात सिद्दीच्या एका पहारेकऱ्याने हे पाहिले आणि तो ओरडला, `दगा दगा!’ ही चाहूल लागताच राजांनी दोन पालख्या केल्या. एका पालखीत ते स्वत: तर दुसऱ्या पालखीत शिवरायांसारखा दिसणारे, त्यांच्यासारखाच पेहराव केलेला प्रति शिवाजी (शिवा काशीद) बसले. महाराज एका आडमार्गाने विशाळगडावर जाण्यासाठी रवाना झाले. हेरांनी महाराजांच्या पलायनाची बातमी सिद्दी जौहरकडे पोहोचविली. जौहरने मसूदला पाठलाग करावयास सांगितले आणि अखेर शिवरायांना पकडले. पण ते खरे शिवाजी नाहीत हे कळताच शिवाजी म्हणून पकडून आणलेल्या शिवा काशीदचा शिरच्छेद करण्यात आला. स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी, शिवराजासाठी शिवा काशीदने समर्पण केले.
संभाजी जाधव हे प्रसिध्द धनाजी संताजी पैकी धनाजीचे वडील . ,फुलाजी प्रभू हे बाजी प्रभू देशपांडे यांचे बंधू
!!!!!!शूरा मी वंदिले !!!!!!

कसे जाल विशालगडला ? कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडाच्या पूर्वेला ९ ते १० कि.मी. अंतरावर गजापूर, पांढरपाणी व येळवण जुगाईच्या मध्यावर उंच ठिकाणी म्हणजे १७११ फुटावर पावनखिंड आहे. पावनखिंड ज्या दोन डोंगरांच्या दरीत येते ती दरी दक्षिणोत्तर असून सात मैल लांबीची आहे. या दरीतच कासारी नदी उगम पावली आहे. पन्हाळा, म्हाळुंगे, पांडवदरी, धनगरवाडा, पांढरपाणी, घोडखिंड असा हा मार्ग आहे.

माधव विद्वांस
श्री.माधव विद्वांस आणि फेसबुकचे आभार दि.१३-०७-२०२१

**********

८. सातारचे छत्रपति शाहू महाराज

शाहू महाराज

सातारचे छत्रपति शाहू महाराज यांची आज जयंती (१८ मे १६८२– १५ डिसेंबर १७४९).
उत्तर कोकणात रायगडाखाली माणगाव जवळ गांगवली येथे संभाजीची पत्नी येसूबाई यांच्या पोटी १८ मे १६८२ रोजी शाहूंचा जन्म झाला.
औरंगजेबाचा सरदार जुल्फिकारखान याने रायगड काबीज करून शाहू व त्यांच्या कुटुंबास कैद केले. येसूबाई, सकवारबाई आणि इतर २०० स्त्री-पुरुष सेवक शाहूंसोबत कैद झाले होते.
औरंगजेबाने शाहूस राजा म्हणून मान्यता दिली आणि ७ हजारांची मनसबही दिली.
औरंगजेबाची कन्या झीनत उन्निसाबेगम हिने शाहू व त्यांच्या परिवाराची चांगलीच काळजी घेतली.
शाहूंचे जन्म नाव शिवाजी असले तरी औरंगजेब त्यांना शाहूच म्हणत असे. नोव्हेंबर १७०३ मध्ये औरंगजेबाने शाहूंचा विवाह कण्हेरच्या शिंद्यांच्या मुलीशी लावून दिला. या आधी दिल्लीत शाहूंचा विवाह मानसिंहराव रुस्तुमराव जाधवराव यांची कन्या अंबिका ऊर्फ राजसबाई यांच्याशी झाला होता त्या तेथेच वारल्या. शाहूंना औरंगजेबाने ७,००० झत, ७,००० स्वार अशी सन्मान्य मनसब व राजा हा किताब दिला होता; तथापि त्यांची आर्थिक स्थिती नाजूक होती आणि धार्मिक बाबतीत त्यांची अवहेलनाही झाली. एकदा तर औरंगजेबाने त्यांना मुसलमान करण्याचा घाट घातला; पण बेगमच्या मध्यस्थीने हा प्रसंग टळला.
फेब्रुवारी १७०७ मध्ये औरंगजेब मृत्यू पावला. त्याचा पुत्र आजम पदारूढ झाला. त्याने झीनतउन्निसा व जुल्फिकारखान यांच्या सल्ल्यानुसार मराठ्यांच्यात छत्रपती पदासाठी अंतर्गत कलह माजविण्यासाठी शाहूंची सुटका केली. औरंगजेबाच्या कैदेतून जिवंत परत आलेल्या शाहूंचे महाराष्ट्रात सर्वत्र स्वागत झाले. नागपूरकर भोसल्यांचे पूर्वज परसोजी भोसले यांनी शाहूंबरोबर त्यांच्या ताटात एकत्र जेवण केले. त्यामुळे शाहू तोतया नाहीत याबद्दल सर्वांची खात्री पटली. राजाराम-पत्नी ताराराणींचे अनेक सरदार शाहूंना मिळाले.
१२ ऑक्टोबर १७०७ रोजी धनाजी जाधव शाहूंस मिळाले. शाहू चाकणच्या किल्ल्यावर व नंतर चंदन गडावर आले. म्हणून ताराराणी आपल्या छत्रपती शिवाजी या पुत्रासह सातारा सोडून पन्हाळा गडाच्या आश्रयाला गेल्या. शाहूंनी सातारा काबीज केले. आणि १२ जानेवारी १७०८ मध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून सिंहासनारूढ झाले. त्यांनी अष्ट प्रधान मंडळ नियुक्त केले त्यात बहिरोपंत पिंगळे यांस पेशवे पद व धनाजी जाधव यांना सेनापती पद दिले.
शाहू महाराजांचा शिक्का –
। श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी । । शंभूसुतोरिव । मुद्रा शिवराजस्य राजते ।।
बाळाजी विश्र्वनाथाच्या मृत्यूनंतर पेशवेपद मिळवण्यासाठी अनेक सरदारांची स्पर्धा चालू होती, पण शाहू महाराजांनी कुणाच्या विरोधास न जुमानता ही जबाबदारी बाजीराव यांच्यावर सोपवली. तरुण व शूर बाजीरावाबद्दल शाहू महाराजाना जबरदस्त अभिमान व खात्री होती. शाहू महाराज एका पत्रात म्हणतात “”सारे माझेच आहेत. परंतु माणूस असा बाजीराव, मोठाच लौकिक महाराजांचा बाळाजी पंतांनी केला, तदाधिक्य बाजीराव! तखारबहाद्दरपणाची पराकाष्ठा, असा पुरुषच नाही! ( संदर्भ- मराठी रियासत -खंड -३ पुण्यश्लोक शाहू )
श्रीमंत पेशवा बाजीराव व मस्तानीचे प्रेम प्रकरण जेवा अगदी बाजीरावाच्या घरच्या मंडळींच्या विरोधामुळे विकोपाला गेले त्याची खबर सातार्यास छत्रपती शाहूस लागली,व त्याचे पत्र पेशवा चिमाजी आप्पास आले,त्यात तो लिहितो’ रायास कोणे एकी बिलकुल खट्टे न करणे….रायाच्या मर्जी विरुद्ध होईल ऐसे वर्तन न ठेवणे…..’ यावरून शाहूस बाजीरावाची किती काळजी होती हेच दिसून येते…हे अस्सल पत्र रियासत कारांना उपलब्ध झाले आहे….
**********अभिवादन*****

९. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

अहिल्याबाई ३

अहिल्या म्हणून पुण्य श्लोक झाली ——–चार धाम यात्रा जिने पूर्ण केली
राउळेबहु तिने जीर्णो धारीत केली ———-माते परीस प्रजा पालनहि केले
सप्तपुऱ्याचे तिने दर्शनहि घेतले ————माहेश्वरी विणकर स्थापित केले
माहेश्वरीसाडी नाम प्रसिद्ध झाले ——–अहिल्या म्हणून पुण्य श्लोक झाली
रचना: माधव विद्वांस

अहिल्याबाई १

पुण्यश्लोक अहिल्याबाई यांची आज जयंती अहिल्याबाईचे जन्म गाव नगर जवळील चौंडी. ज्यावेळी स्त्रियांना शिक्षणास बंदी होती त्यावेळी त्यांच्या पित्याने त्यांना लिहिणे वाचणे शिकविले .पती आणि सासरा यांचे पश्चात त्यांनी इंदूर संस्थांची जबाबदारी समर्थ पणे सांभाळली .दरबारात त्या स्वत:उपस्थित राहून राज्यकारभार करीत ,न्यायनिवाडाही करीत. राघोबादादास त्यांनी खडसावण्यास मागेपुढे पाहिले नाही
बंगालमधून कारागीर आणून माहेश्वर येथे वस्त्रोद्योग उभा केला .स्थानिक लोकांना प्रशिक्षण दिले व रोजगार उभा केला . आज माहेश्वरी साडी महिलांचा जीव कि प्राण आहे .
अहिल्याबाईनि भारत भ्रमण केले तीर्थक्षेत्रांच्या जागी अनेक धर्मशाळा बांधल्या मुख्यत्वे वाराणसी,अयोध्या,द्वारका,वेरूळ जवळील घृष्णेश्वर,अमरकंटक,बद्रीनाथ,श्री शैल्य,ओंकारेश्वर,भीमाशंकर,भरतपूर,गया,हरिद्वार ,इंदूर,कोल्हापूर,कुरुक्षेत्र ,नाथद्वारा,ओंकारेश्वर, पुणे,पुष्कर,चित्रकुट ,गंगोत्री ,रामेश्वर,जगन्नाथपुरी
अशा ९ ० ठिकाणी देवळांचा जिर्णोधार ,धर्मशाळांची कामे केली ,ह्युआन्स्तंग व शंकराचार्यानंतर एवढे भारत भ्रमण कोणी केले नाही .
#माहेश्वरचे घाट आवर्जून पहावे . फोटो Suvarna Naik Nimbalkar यांचे पोस्ट वरुन

अहिल्याबाई २


अहिल्याबाई होळकर आणि काशी

1770 च्या दशकात अहिल्याबाई होळकरांनी काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणूनच काशीत अहिल्याबाईंना खूप महत्त्व आहे.
अहिल्याबाई होळकरांना इथे देवी मानतात, त्यांची पार्वतीच्या रूपात पूजा होते
अनघा पाठक, बीबीसी मराठीसाठी, वाराणसीहून

असं म्हणतात की काशी विश्वनाथाचं पहिलं मंदीर मोहम्मद घोरीच्या आदेशावरून त्याचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबकाने तोडलं होतं. पण याबद्दल इतिहासकारांमध्ये एकवाक्यता नाही.
सध्याचं काशी विश्वेश्वराचं मंदिर 1585ला राजा तोरडमल यांनी नारायण भट यांच्याकडून बांधून घेतलं. पुढच्या शंभरच वर्षांत ते औरंजेबाने तोडलं. मग 1770 च्या दशकात अहिल्याबाई होळकरांनी काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणूनच काशीत अहिल्याबाईंना खूप महत्त्व आहे.
अहिल्याबाईंनी फक्त काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला नाही तर गंगेच्या किनारी अनेक घाटही बांधले. सध्या काशीत सगळ्यांत जास्त गर्दी असते तो दश्वाश्वमेध घाटही अहिल्याबाईंनीच बांधला.
माधव रटाटे बनारस हिंदू विद्यापीठात संस्कृतचे प्राध्यापक आहेत. त्यांचंही मुळ मराठीच आहे पण त्यांच्या सहा-सात पिढ्या वाराणसीतच राहिल्या.
अहिल्याबाईंना वाराणसीत किती मानतात याबद्दल सांगताना ते म्हणतात, “काशीत अहिल्याबाईंची पार्वती रूपात पूजा केली जाते. त्या आमच्यासाठी देवीच आहेत. आता जो नवा कॉरिडोर बनला आहे, तिथे अहिल्याबाईंचा एक पुतळाही आहे. त्यांनी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला, इतकं मोठं काम केलं, म्हणून त्यांनी पार्वतीरूपात इथे आराधना केली जाते.”

पुण्यश्लोक आहील्यादेवी माँसाहेबांनी खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी माहाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेवुन स्वराज्यचे सुराज्य निर्माण केले काशी विश्वेश्वर मुक्त करा ही माहाराजांची ईच्छा होती आणी काशी विश्वेश्वराच्या सुंदर अश्या मंदीर निर्मीतीचे अनमोल कार्य पुर्णत्वास नेवुन शिवरायांच्या मनातील लौकीक कार्यास त्या पात्र ठरल्या सबंध हिंदुस्थान भर अठरा हजार मंदीरांचा जिर्णोद्धार व नवनिर्माण त्याच बरोबरीने ऐकोणीस हजार घाट बांधले नदीकीनारी घाट ही त्याकाळातील प्रमुख गरज होती अनेक नदींच्या कीनारे मंदीरे होती तुडुंब भरुन वाहणार्‍या या नद्या परंतु यात्रे करु पांतस्थ महीला यांना नदीपात्रामधे उतरता येत नसत तेथील चिखल दलदल यामधे माणसे जनावरे रुतुन बसायची प्रसंगी धारेत जावुन वाहुन जायची त्यामुळे नदीचे काठ हे सुरक्षीत नव्हते नावेमधुन प्रवास करताना नाव त्या दलदलीमधे फसायची प्रवाशी पांतस्थ यात्रेकरु त्या गाळामधे अडकुन पडायचे माता भगीनींना नदीपात्रातुन पाणी काढता येत नव्हते ही सर्व गरज ओळखुन पुण्यश्लोक आहील्यादेवी माँसाहेबांनी जवळपास सबंध भारतभर ऐकोणीस हजार घाट बांधले संबंध देशातील यात्रेकरु वाटसरु पांथस्थ यांचा पायी यात्रा तिर्थाटन वाटसरुंचे मार्ग आणी त्या मार्गावरील पाण्याचे दुर्भीक्ष पाहता संबंध देशामधे सव्वा लाख विहरी बारवा तलावांची निर्मीती केली . त्या पैकी ऐकट्या माहाराष्र्टात साडेचारशे पाचशे बारवा आहेत. त्यांचा राज्यकारभार ईतका चोख आणी उत्तम न्यायप्रिय होता अगदी मुक्या जितराबांची पशुपक्षाच्या दाणापाण्याची सुद्धा व्यवस्था त्या करुन देत असत त्या साठी राखीव कुरण पक्षासाठी पिकांचा शिवार विकत घेवुन त्या राखीव करत असत आक्रमणाच्या काळात अनेक मंदीर उद्धवस्त झाल्याने अनेक देवस्थान व आसपासचा परिसर ओस पडला होता त्या ठीकाणी नव्याने जिर्णोद्धाराची कामे सुरु केली पुर्णत्वास नेली नियमीत पुजापाठाच्या व्यवस्था लावुन दील्या दिवाबत्ती वार्षिक सण उत्सवासाठी अर्थाजनाची सोय करुन दीली धर्म शाळा अन्नछत्रे सुरु केली प्रत्येक देवस्थानाला पुढील तढवीज म्हणुन जमीनी लावुन दील्या मुस्लीम पातशाहांच्या मुलुखात जावुन तिथे ही कामे करुन घेण ही सोपी गोष्ट नव्हती परंतु आहिल्यादेवी माँसाहेबांनी आपल्या हीमतीवर हे करवुन दाखवले अनेक संस्थानीक सरदार हे आपल केवळ वतन सांभाळण्यासाठी मांडकील होवुन आपली गादी वतन टीकवुन ठेवण्यासाठी धडपडत असताना इतकी दुरदुष्टी धैर्य स्थैर्य लाभलेली ही अखंड हिदुस्थानातील एकमेव पुण्यश्लोक माहाराणी आहील्यादेवी होळकर यांच्या आजच्या त्यांच्या पवित्रजन्मदीनाच्या निमीत्ताने त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन प्रणाम
हर हर महादेव

अहिल्यादेवीने केवळ जिर्णोद्धारच केला नाही, तर त्याचं भव्यदिव्य वैभव कैकपटीने वाढविले. मंदिरांचा जीर्णोद्धार करून माझ्या मातेने प्रत्येक हिंदूची ओळख जपली, त्याचा स्वाभिमान, त्याचा अभिमान, त्याची आस्था, त्याचा जणू श्वासच जपला! शिंदेची मुलगी, होळकरांच्या सुनबाई, तत्त्वज्ञानी राणी, धुंरधर योध्द्या, प्रजेचे कल्याण करणाऱ्या, वाईट प्रथा नाकारणाऱ्या, प्रजानुयायी शासक व कुशल संघटक असलेल्या या माऊलीने तीस वर्षे इंदुरच्या राज्य कारभाराची सुत्रे संभाळली आणि देशभरात असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार, अगणित धर्मशाळा, बगीचे, पाणपोया, विहारी ज्यांनी बांधल्या..
अशा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर माँ साहेबांना जंयती निमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा..🙏🚩

हिंदुस्थानात असे एकही महत्त्वाचे तीर्थक्षेत्र नाही की जिथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी मंदिरे बांधली नाहीत अथवा त्यांचा जीर्णोद्धार केला नाही..
मोठ्या प्रमाणात अहिल्यादेवी यांनी शिवमंदिराचा जीर्णोद्धार केला…
तितकेच पवित्र नद्याच्यातीरी घाट बांधले…..
सोमनाथापासून ते काशीविश्वेश्वरां पर्यंत ची हिंदूंच्या आस्थेची पवित्र धार्मिकस्थळें परकीय आक्रतांनी मोडली ती पुन्हा राजमाता अहिल्यादेवींच्या पुढाकाराने उभी राहिली
आशा हिंदुधर्म जीर्णोद्धारक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना विन्रम अभिवादन..🙏🌺⛳

*******************

नवी भर दि.२८-१०-२०२०

४. श्रीमंत यशवंतराव होळकर

यशवंतराव होळकर

🚩 श्रीमंत यशवंतराव होळकर महाराज यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा स्वतःच्या रक्तमासाचे खतपाणी घालता घालता काही रोपट्यांचे वृक्ष झाले, ते फोफावले व त्यांच्या पारंब्याने अवघ्या हिंदुस्थानभर छाया धरली. याच पराक्रमी घराण्यापैकी होळकरांचे एक घराणे. मल्हारराव होळकर हे याच घराण्याचे मूळ पुरुष . माळव्याचे  ( ईंदोर ) सुभेदार म्हणून प्रसिद्ध होते.
मल्हाररावांचे शौर्य आणि मुत्सद्देगिरी दोन्हीही मराठी दौलतीच्या कामी राबली. त्यांचा दबदबा पेशव्यांनाही वाटत होता. पुढे परिस्थिती झपाट्याने पालटली मल्हाररावांच्या हयातीतच त्यांचा मुलगा वारला आणि होळकरी दौलत सांभाळण्याचे जोखमीचे काम अहिल्‍याबाईंकडे आले.
अहिल्याबाईंच्या मृत्यूनंतर तुकोजी होळकर हे सुभेदारीच्या गादीवर आले .पुढे याच तुकोजी होळकर यांच्या पोटी यशवंतराव यांचा जन्म १७७६ साली झाला .
यशवंतराव होळकर हे मराठी इतिहासातला एक चमत्कार आहे. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत होळकरांच्या दौलतीची मालकी आपल्याकडे येईल हे त्यांच्या स्वप्नातही नव्हते. त्यामुळे त्यांचे गुण आणि दोष हे त्यांच्या अनुभवातून त्यांच्या वाट्याला आले आहेत. मराठी इतिहासात त्यांचा झालेला आकस्मित उदय, त्यांनी उमटवलेला ठसा आणि अजिंक्य समजल्या गेलेल्या इंग्रजी फौजांना त्यांनी शिकवलेला धडा हे पाहिले की नेपोलियनची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. योगायोग असा आहे की नेपोलियन व यशवंतराव हे दोघे समकालीन होते, आणि दोघांनीही एकाच शत्रूला तोंड दिलेले आहे.
हिंदुस्थानभर आपल्या कवायती फौजांचा टेंभा मिरवणाऱ्या इंग्रजांचा नक्शा फक्त एका यशवंतरावांनी उतरवला होता. यशवंतरावाची बदनामी करण्याची एकही संधी इंग्रजांनी सोडली नाही.
भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात असे कितीतरी क्रांतिकारी होऊन गेले ज्यांनी अज्ञात राहून देशाची सेवा केली. या भारत मातेला इंग्रजांच्या क्रूर शासनातून मुक्त करण्यासाठी कित्येक भारत मातेच्या सुपुत्रांनी आपले प्राण पणाला लावले त्यात यशवंतराव यांचे नाव आघाडीवर होते. त्यावेळी होळकरांचा प्रभाव मोठा होता.
होळकर साम्राज्याची समृद्धी इंग्रजांना त्यांना बघवत नव्हती. म्हणून त्यांनी यशवंतरावांच्या मोठ्या भावाचा मल्हाररावांचा कट रचून त्यांना ठार केले.
मोठ्या भावाच्या अचानक झालेल्या मृत्यूने यशवंतराव हळहळले, पण त्यांनी लवकरच स्वतःला सावरले.
१८०२ मध्ये झालेल्या युद्धात त्यांनी पुण्याच्या पेशवा बाजीराव (द्वितीय) आणि सिंधिया यांच्या संयुक्त सेनेला नमवले. तेथे खरी यांच्या शौर्याची पताका फडकली.
या दरम्यान इंग्रजांनी देखील भारतात आपले पाय पसरविण्यास सुरवात केली होती. तेव्हा यशवंतरावांसमोर आणखी एक मोठी आपत्ती येऊन ठेपली. ती म्हणजे भारताला या इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करणे.
यासाठी यशवंतराव यांनी नागपूरचे भोसले आणि ग्वालियर येथील सिंधिया या राजपरीवारांसोबत हात मिळविला. त्यांनी या धोकेबाज इंग्रजांना देशातून बाहेर फेकण्याचा निश्चय केला. त्यानंतर त्यांनी इतर शासकांनाही इंग्रजांविरुद्ध एकजूट होण्याची विनंती केली परंतु कोणीही त्यांना सहकार्य केले नाही.
अखेर त्यांनी स्वतःच इंग्रजांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. ८ जुन १८०४ ला त्यांनी पहिल्यांदा इंग्रजी सैन्याला पराभूत केले. त्यानंतर त्यांनी कोटा येथून इंग्रजांना हद्दपार केले.
ते कायम त्यांच्या कार्यात सफल होत गेले.
अखेर ११ सप्टेंबर १८०४ ला ब्रिटीश जनरल वेलेस यांने लार्ड ल्युक यांना पत्र लिहीले की,
जर यशवंतरावांना लवकर थांबविले नाही गेले तर इंग्रजांची भारतातून हकालपट्टी करतील..!
यशवंतराव आता इंग्रजांसाठी त्यांच्या मार्गाचा काटा बनले होते, त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर हल्ला करविला. या युद्धात यशवंतरावांनी भरतपूरच्या महाराज रणजीत सिंह यांची सोबत घेत परत इंग्रजांना पराभूत केले.
पण महाराज रणजीतसिंह यांनी यशवंतरावांची साथ सोडून इंग्रजांची साथ देण्याचे ठरवले.
तेव्हा यशवंतराव हतबल झाले, त्यांना कळेच ना की असे का होत आहे, का कोणी त्यांचा साथ देत नाही?
यशवंतरावांच्या शौर्याची कहाणी आता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरायला लागली होती.
लोक त्यांच्या पराक्रमी आणि धाडसी व्यक्तिमत्वामुळे खूप प्रभावित झाले. त्यामुळे त्याचा सन्मानही वाढला.
कदाचित याच कारणामुळे त्यांचे जुने शिंदे राजघराणे यांनी त्यांची साथ सोडली होती, ते पुन्हा त्यांची साथ देण्यास समोर सरसावले. यामुळे इंग्रजांची झोपचं उडाली. त्यांना काळजी वाटू लागली की जर यशवंतराव यांच्या सोबत सर्व संस्थानिकांनी हात मिळवणी केली तर काही खरं नाही.
म्हणून त्यांनी एक डाव खेळला!
त्यांनी यशवंतरावांशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून यामुळे त्यांचा फायदा होईल.
यावेळी इंग्रजांनी पहिल्यांदा विना अट पुढाकार घेतला होता. त्यांनी यशवंतराव यांच्याशी तह करताना त्यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला की, त्यांना जे हवं ते देऊ, त्याचं जेवढ साम्राज्य आहे तेही त्यांना परत करू. फक्त या बदल्यात ते इंग्रजांशी लढणार नाहीत.
पण यशवंतराव हे भारत मातेचे खरे सुपुत्र होते. त्यांनी इंग्रजांची ही संधी लाथाडली. त्यांचं केवळ एकच ध्येय होतं. इंग्रजांना भारतातून बाहेर काढणे. त्यांच्या या ध्येयपूर्तीसाठी त्यांनी देशातील सर्व संस्थानिकांना एकजूट करण्यास सुरवात केली. पण ते या कार्यात असफल ठरले. दुसरीकडे त्यांचे एकमेव साथीदार सिंथिया यांनी देखील इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्यामुळे यशवंतराव आता एकटे पडले.
अशा परिस्थितीत आता त्यांना काही मार्ग दिसत नव्हता. म्हणून त्यांनी स्वतःच इंग्रजांवर हल्ला चढवला.
इंग्रजांना स्वतःच्या बळावर पराभूत करण्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली. त्यासाठी त्यांनी भानपूर येथे दारू-गोळाचा कारखाना उघडला आणि त्यात ते दिवसरात्र झटत राहिले. त्यामुळे त्यांची प्रकृती देखील खालावू लागली पण देशभक्तीच्या धुंदीत हरवलेले यशवंतराव यांना त्यांच्या ध्येयापुढे काहीही दिसत नव्हते.
अखेर २८ ऑक्टोबर १८११ साली इंग्रजांशी लढताना यशवंतरावांना वीरमरण आले, तेव्हा ते केवळ ३५ वर्षांचे होते.
ते एक असे सुभेदार होते की, ज्यांच्यावर इंग्रज आपलं अधिपत्य नाही मिळवून शकले, ज्यांनी इंग्रजांना नाकीनऊ आणून सोडले. आपले जीवन त्यांनी भारत मातेच्या सेवेसाठी अर्पण केले.
जर त्यांच्याप्रमाणेच भारतातील इतर संस्थानिकांनी भारतमातेला इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्याच्या संघर्षात त्यांची साथ दिली असती तर इंग्रज भारतावर एवढे वर्ष राज्य करू शकले नसते.
भारतातील जनतेला त्यांची गुलामगिरी करावी लागली नसती. त्यांचे अत्याचार सहन करावे लागले नसते.
जर यशवंतराव त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात सफल झाले असते तर आज देशाचे चित्र काही वेगळेच असते. इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराच्या कटू आठवणी आपल्या इतिहासात नसत्या, तर फक्त केवळ या शूरांची वीरगाथा असली असती.
🙏 अशा या थोर व शौर्यशाली सुभेदार श्रीमंत यशवंतराव होळकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏
लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

***********

नवी भर दि. ४-१२-२०२०

५. श्रीमंत महादजी शिंदे

महादजी शिंदे

🚩 शूर व महान सेनांनी श्रीमंत महादजी शिंदे यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🚩
शिंदे यांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील कन्हेरखेड (तालुका कोरेगाव )या गावचे. राणोजी व जया आप्पा यांच्या माळव्यातील व उत्तरेकडील इतर मोहीमातून महादजींना लष्करी शिक्षण मिळाले. प्रथम तळेगाव , उमरीच्या निजामावर लढाईत पराक्रम करून नाव मिळवले.
महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराजा रघुजी भोसले यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने त्यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले होते. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर त्यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.
महादजी शिंदे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होती. १७४० निजामाविरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये बेळूरच्या लढाईत महादजी शिंदे यांनी भाग घेतला होता व या लढाईत मराठ्यांनी निझामाच्या सैन्याला परतावून लावले होते.
१७४५ ते १७६१ दरम्यान जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व केले होते. मालव, राजपुताना, बुंदेलखंड, मारवाड व हिम्मत नगर ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली, कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरीरीने सहभाग घेतला होता. यातील महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६ फतेहाबाद १७४६, बडी साद्री.
मल्हारराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राजांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंद्यांचा अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.
जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्ध मराठे असा मोठा सामना झाला. बुरांडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीबाकडून क्रूरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालिविरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारले गेले, तसेच महादजी देखील लढता लढता घायाळ झाले होते. या लढाईत त्यांचा पाय दुखावला तो पुढील जन्मभर तसाच राहिला.
पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली. मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानिक बनले व ग्वाल्हेर ही शिंद्यांची राजधानी बनली.
पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजी शिंदे यांनी भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.
१७७३ मध्ये नारायणराव पेशवे यांचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवे बनले . बाराभाईच्या कारभारानुसार नारायणरावांचा मुलगा सवाई माधवराव पेशवे बनले व रघुनाथरावला पेशवे पदावरुन हटवले गेले. या बारभाईंमध्ये महादजी व नाना फडणिसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.
१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टीवर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी मध्ये ३,९०० ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येऊन मिळाले. मराठ्यांचे सैन्य महादजी शिंदे व तुकोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांना हैराण केले. त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहीरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोडून टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्यावाचून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले .१२ जानेवारी १७७९ रोजी मध्यरात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत पराभव करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.
१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले.त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्यांच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यांची सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली.
ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगाव चा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरु करण्यास आदेश दिले, कर्नल गोडार्ड यांनी ६००० ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅमनेनी ग्वाल्हेर काबीज केले. वॉरन हेस्टिंग्जने महादजी शिंदेंना नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. त्याने महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले. फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटिशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखील महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटिशांना आव्हान दिले. ब्रिटिशांप्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटिशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात करणे अवघड गेले.
महादजी शिंदे यांचा इंग्रजांकडून पराभव झाल्यानंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदेगिरीने तहाची बोलणी केली. हा तह सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला पण उज्जैनमध्ये माघार घ्यावी लागली.इंग्रजांशी झालेल्या तहानंतर शस्त्रसंधीचा उपयोग महादजीने चांगलाच करून घेतला.
दिल्लीवर मराठा साम्राज्याचा भगवा मोठ्या डौलाने फडकवत ठेवणारे, दिल्ली दरबारी नगारा, पालखी, चौघडा, हत्ती घोडे, व मानाची वस्त्रे असणारे, तसेच दिल्लीत वकील-ए-मुतालिक या पदाची वस्त्रे, फर्मान व अधिकार असणाऱ्या महान सेनानी व मुसद्दी महादजी शिंदे यांचे 12 जानेवारी 1794 रोजी पुण्यातील वानवडी येथे देवाज्ञा झाली.
🙏महान सेनानी व मुसद्दी महादजी शिंदे यांना विनम्र अभिवादन व मानाचा त्रिवार मुजरा…!!🙏
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

***

नवी भर दि.०८-२०२०

🚩 श्रीमंत महादजी शिंदे यांनी यांनी बांधलेली गढी🚩

सध्या हा वाडा व त्याचबरोबर ७०० एकर जमीन रयत शिक्षण संस्थेला दिली आहे.🙏
काही ठिकाणे आपण पाहतो आणि फक्त आणि फक्त अचंबित होतो.
नगर पासुन जवळच 30 किलोमीटर अंतरावर जामगाव या गावी शिंद्यांची गढी आहे. महादजी शिंद्यांनी ती बांधली आहे. तो राजवाडा म्हणा किंवा गढी पाहून इतके गुंग व्हायला होते आणि त्या काळच्या इंजिनिअरिंग चे कौतुक वाटल्या शिवाय रहात नाही .
87 एकर परिसर, 3 मुख्य प्रवेशद्वारं. अडीच एकर जागेत असलेला महादजी शिंदे यांचा वाडा 17 व्या शतकात बांधलेला. सागवानी दारे आणि तुळया यांनी बांधलेला अजूनही दिमाखात उभा आहे. 2 चौक आणि 21 जिने, प्रशस्त दालने आहेत. वाड्याची संपूर्ण बांधकाम दगड मातीचा लगदा, चुना ,रुमाली वीट, आणि साग यामध्ये केलेले आहे.
वाड्यात मच्छीमहाल, आंबेमहाल,रंगमहाल, तालीम, खलबतखाना,भुयारी मार्ग असुन 17 व्या शतकातले रंगकाम अजूनही शाबूत आहे. या वाड्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या पूर्ण वाड्यात एकच दगडी खांब आहे.
त्या गढीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अर्ध चंद्राकृती बारव पायऱ्या मात्र पूर्ण नाहीश्या झाल्या आहेत. पण कदाचीत त्यामुळेच त्याचे पाणी अजूनही शाबूत आहे. आणि तिथे सुरू असणाऱ्या कॉलेज ची तहान भागवते आहे.
स्थापत्य शास्राचा उत्कृष्ट नमुना तिथे पाहायला मिळतो. जामगाव हे गाव पारनेर तालुक्यात आहे .तो भाग पूर्वीपासून पूर्णपणे अवर्षण ग्रस्त, पाऊस अगदी नावालाच. पण तरीही वाड्याच्या दोन्ही चौकात कारंजे. आधुनिक घरांमध्ये POP करतो तेव्हा चे लाकडी POP पाहून थक्क होतं तेही, प्रत्येक खोलीत वेगळी कलाकुसर अशी की कल्पनाशक्ती ला सलाम. लाकडी छत असल्यामुळे खोलीतले तापमान नियंत्रित राहायला मदत होते. तिथे खोल्यांना चुन्याचे प्लास्टर केलेले आहे पण ते एका विशिष्ट पद्धतीने. मातीच्या आणि दगडाची भिंत प्लास्टर करण्याआधी तिथे झोपडीला असतात तसे काड्याबआणि गवत यांनी शाकारले आणि मग त्यावर चुन्याचे प्लास्टर केले. त्याकाळी पारनेर चा चुना खुप प्रसिद्ध होता. प्लास्टर करतांना फक्त तो भिंतींना थापला नाही तर सुंदर सुंदर गोखले केले थोडी कलाकुसर केली आणि भिंत आकर्षक बनवली या पद्धतीने भिंत केल्यामुळे तापमान संतुलित राहते
इथले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे असणाऱ्या खूप वेगवेगळ्या खिडक्या. लाकडी फ्रेम करून त्यावर चुन्याच्या प्लास्टर च्या डिझाइन अश्या की आपण बघून फक्त स्तब्ध होतो.सोबत काही फोटो देत आहे. भिंतीचे फोटो मात्र काढता आले नाही कारण वाड्याच्या तो भाग बंद केला आहे.
आजूबाजूच्या डोंगरावरून खापरी नळ आणि चाऱ्याच्या खोदून पाणी वाड्यात आणले आणि ते सगळीकडे वापरले. उत्कृष्ट बांधकामाचा नमुना आहे हा वाडा म्हणजे . एकदा भेट द्यावीच असाच.
……दिपाली माळी
🚩 जय जिजाऊ जय 🚩
🚩 जय शिवराय 🚩 . . . . . . . फेसबुकवरून साभार

नवी भर दि.१२-०२-२०२२ : महादजी शिंदे

महान सेनानी मुत्सद्दी राजकारणी ,बहुभाषी , इंग्रज ज्यांना ग्रेट मराठा म्हणत, तसेच पानिपतच्या लढाईत झालेली मराठा साम्राज्याची हानी ज्यांनी भरून काढली असे ग्वाल्हेरचे महादजी शिंदेसरकार यांचे आज पुण्यस्मरण.(१२-०२-२०२२)
शिंदे घराणे सातऱ्याजवळील कोरेगाव येथील कण्हेरखेडचे. राणोजी शिंदे यांना थोरले बाजीराव पेशवे यांचेवर उत्तर हिंदुस्थानी जबाबदारी सोपविली होती. त्यावेळी त्यांचे मुख्यालय उज्जैन येथे होते कालांतराने ते ग्वाल्हेर येथे हलविणेत आले. महादजीचा जन्म उज्जैन येथे राणोजींची राजपूत पत्नी चिमाबाई हिचे पोटी दिनांक ३ डिसेंबर १७३०रोजी उज्जैन येथे झाला. त्यांना हिंदी, उर्दू, संस्कृत, फारसी या भाषा अवगत होत्या. महादजी मराठी व हिंदी भाषांत कविता करीत असत. त्याची कृष्णभक्तीवरील कवने उपलब्ध आहेत.ती कवने ते गातही असत. त्यांनी गीतेवर टीका लिहिली होती पण ती उपलब्ध नाही.
राणोजी व जयाप्पा यांच्या बरोबर लहानपणापासूनच ते मोहिमेवर जात असत. माळव्यातील व उत्तरेकडील इतर मोहिमांतून महादजीना शिपाईगिरीचे शिक्षण मिळाले. महादजीनी प्रथम तळेगाव-उंबरीच्या निजामावरील लढाईत पराक्रम गाजवला होता. १७४५ ते १७६१ दरम्यान महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड १७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीचा सहभाग होता. यातील चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६, बडी साद्री. या महादजींच्या महत्त्वाच्या लढाया होत्या
रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही राजस्थानातील संस्थाने मल्हाराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी मराठा साम्राज्याखाली आणली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंद्यांचा अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.
बारभाईचे कारस्थानात महादजी शिंद्यानी महत्वपूर्ण भूमिका वठवून नारायणराव पेशव्यांचे मुलगा सवाई माधवराव यास पेशवे पदी बसविले.
या वेळी नाना फडणवीस, सखारामबापू बोकील, हरिपंत फडके, मोरोबा फडणीस, त्रिंबकराव पेठे, तुकोजीराव होळकर भगवानराव पंतप्रतिनिधी, मालोजी घोरपडे, सरदार रास्ते,बापूजी नाईक, फलटणचे निंबाळकर हे १२ सरदार या कारस्थानात सामील होते. महादजींनी आपल्या लष्करात सुधारणा करण्यासाठी इंग्रजांच्या कवायती सेनेची शिस्त पाहून त्यानी डि. बॉइन या फ्रेंच सेनाधिकाऱ्यास आपल्या पदरी ठेवले आणि शिस्तबद्ध फौज तयार केली. त्यांच्या पदरी तीस हजार कवायती पायदळ, पाचशे तोफा व तीस हजार घोडदळ एवढे सुसज्ज सैन्य उभे केले होते. त्यांनी दिल्लीच्या बादशाहीवरील वर्चस्व स्थापन केले. बादशहाकडून पेशव्यांस ‘वकील-इ-मुतालिक’(मुख्य कारभारी) ही पदवी मिळविली. स्वतःस नायबगिरी मिळवून बादशहास ६५,००० नेमणूक करून सर्व अधिकार आपल्या हाती घेतले. शिवाय बादशहाकडून गोवधबंदीचे फर्मान काढविले. महादजी मथुरेस राहू लागले. आयुष्याच्या अखेरीस ते सुमारे पावणेदोन वर्षे ते पुण्यातच होते. नवज्वर होऊन पुण्याजवळील वानवडी येथे त्याचे निधन झाले. पुणे शहरात वानवडी येथे त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे.

. . . माधव विद्वांस ……… फेसबुकवरून साभार दि.१२-०२-२०२२

– – – – – – – –

नवी भर दि. २०-०६-२०२०

धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे या शूर मराठी सरदारांनी गनिमी काव्याने लढाई देऊन औरंगजेबाच्या बलाढ्य सेनेला सळो की पळो करून सोडले होते. त्यातील संताजी घोरपडे यांची माहिती या पानावर संकलित केली आहे. त्यात धनाजी जाधव यांची भर घातली दि.२७-०६-२०२१ इतिहास अभ्यासक डॉ.सुवर्णा नाईक निंबाळकर यांचे मनःपूर्वक आभार.


६. वीर धनाजी जाधव

धनाजी जाधव

“🚩सर सेनापती धनाजीराव जाधव यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्रअभिवादन 🚩
धनाजीराव जाधव यांचे घराणे म्हणजे शिवाजी महाराजांचे मातुल घराणे होय. जिजाऊंचे वडील लखोजी जाधवराव व बंधू अचलोजी जाधवराव या दोघांनी जाधव घराण्याला सतराव्या शतकाच्या आरंभी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती .दौलताबाद व सिंदखेडराजा मुलूख इत्यादी भागात त्यांचा दरारा होता. पण दौलताबादेस निजामशहा कडून विश्वासघाताने लखोजी जाधवराव व त्यांचे दोघे पुत्र अचलोजी ,रघुजी आणि नातू यशवंतराव हे सर्व पुरूष एकाच वेळी मारले गेले .या प्रकारानंतर अचलोजींचा अल्पवयीन मुलगा संताजी यांचे पालन-पोषण शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ साहेब यांनी केले .जिजाऊ यांचे जेष्ठ पुत्र संभाजी आणि भाचा संताजी हे दोघे समवयस्क होते .ते एकत्र वाढले परंतु दुर्दैवाने ते दोघेही कनकगिरीच्या युद्धात एकदमच मारले गेले.
संताजींचे पुत्र शंभूसिंह छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असत .पुढे पावनखिंडीच्या लढाईत शौर्य आणि पराक्रम गाजवताना धारातिर्थी पडलेले शंभूसिंह यांच्या पोटी १६५० च्या सुमारास धनाजीराव यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोपवलेल्या ऊमराणी येथील लढाईत धनाजीराव जाधव प्रथम महाराजांच्या नजरेस पडले. जिजाऊंच्या संस्कारात तावून सुलाखून निघालेले शंभर नंबरी सोने म्हणजे धनाजीराव जाधव .धनाजीराव हे मृदुभाषी ,शांत ,व हाताखालच्या लोकांना सांभाळून घेणारे ,मराठा सरदारांशीच नव्हे तर मोगल सरदारांशी शिष्टाचाराने वागणारे, राजकारणाच्या वाऱ्याची दिशा पाहून आपले धोरण ठरविणारे मुत्सद्दी सेनानी होते .
धनाजी जाधवांना खानदानी मराठे सरदारात प्रमुख समजत. धनाजीराव जाधवांच्या कर्तबगारीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीतच सुरू झाली असली तरी ,त्यांचा खरा पराक्रम छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराराणी यांच्या काळातच दिसून आला .धनाजीराव जाधव सौम्य प्रकृतीचे असल्यामुळे गोड बोलून कार्य साध्य करून घेत .त्यामुळे हाताखालचे लोक त्यांच्यावर अत्यंत प्रेम करत त्यामुळेच छत्रपती राजाराम महाराजांबरोबर त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते .
संपूर्ण स्वातंत्र्ययुद्धाच्या २६ वर्षांच्या कालखंडात सतत लढाया करणारा हा मराठ्यांच्या बाजूचा एकमेव सेनानी होता. धनाजीराव जाधव यांनी शेकडो लढाया केल्या, विजय मिळवले यांची नुसती यादी करायची म्हटली तर पुस्तकाची अनेक पुष्ठे खर्ची पडतील .छत्रपती रााजाराम महाराज व महाराणी ताराराणी यांच्या काळात धनाजीराव जाधव एक सारखे धावपळीच्या लढाया करताना दिसून येतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती सावरण्यासाठी व औरंजेबाच्या प्रचंड सेनेला सामोरे जाण्याचे धैर्य दाखविणाऱ्या काही सेनानींपैकी संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी एक तेजस्वी इतिहास निर्माण केला. संताजी घोरपडे यांच्यानंतर धनाजी जाधव यांना सेनापतीपद मिळाले. छ. राजाराम महाराजांच्या निर्वाणानंतर धनाजी जाधव यांनी अतिशय निष्ठेने स्वराज्याची सेवा केली.
१७०८ मध्ये शाहूमहाराज मोगल कैदेतून सुटून आल्यानंतर खेड येथे ते व ताराराणी यांचे सैन्य समोरासमोर आले. त्यावेळी धनाजी जाधव यांनी ताराराणीचा पक्ष सोडला व ते शाहू महाराजांना मिळाले. धनाजीराव जाधव यांनी २००० कोसांच्या हालचाली केल्या होत्या .त्यांच्या पाठीमागून धावून धावून झुल्फिकारखाना सारखा मातब्बर सेनानी सुद्धा मेटाकुटीला आला होता. शत्रूवर अचानक छापा टाकावा, सापडेल त्याला कापून काढावे ,लगेच माघार घ्यावी ,रसदी माराव्या, ठाणेदारांना पकडावे अशा गनिमी पद्धतीने धनाजीराव जाधव लढत राहिले. त्यामुळे मोगलांच्या छावणीत त्यांच्या नावाचा मोठा दरारा निर्माण झाला होता. खुद्द औरंगजेबही धनाजीराव जाधव यांना घाबरून होता .मोगलांची घोडी पाण्यावर घातली असता एखाद्या वेळी पाणी पीत नसत, तेव्हा त्यास पाण्यात संताजी-धनाजी दिसतात की काय असा प्रश्न मोगल सेनानी विचारत असत .हे खुद्द मोगल इतिहासकारांनी त्यांच्या पराक्रमाच्या गाथा या पुस्तकात सांगितल्या आहेत .
छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्यात अनेक सेनापतींचा हातभार लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपतीं संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज ,व छत्रपती राजाराम महाराजांबरोबर एकनिष्ठ राहून स्वराज्याचे रक्षण करणाऱ्यांपैकी एक म्हणजे धनाजी जाधव व संताजी घोरपडे या जोडगोळीने औरंगजेबाच्या सैन्याला कसे पळता भुई करून सोडले होते, त्याच्या अनेक गोष्टी इतिहासात वाचायला मिळतात.
१७०८ या काळात धनाजीराव जाधव सरसेनापती होते .छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धूरा धनाजी जाधवराव यांनी सांभाळली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता .छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात धनाजीराव जाधव यांनी फलटणच्या मैदानात बादशहाच्या फौजेशी हमरीतुमरीची लढाई करून रनमस्त खान यांचा पाडाव केला .या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी धनाजीराव जाधव यांचा सन्मान केला त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन जयसिंगराव हा किताब दिला .छत्रपती राजाराम महाराज चंदी प्रांतात जाताना जिंजीला धनाजीराव जाधव यांनी मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना सरनोबत हे पद दिले गेले. मोगलांपासून सुटका झाल्यावर शाहूराजे सैन्य गोळा करीत खानदेश मार्गे सातारला पोहोचले तेव्हा महाराणी ताराराणीने छत्रपती शााहूंचा गादीवरचा हक्क अमान्य केला.
१२ जानेवारी १७०८ मध्ये छत्रपती शााहू राजांनी स्वतः साताऱ्यास राज्यभिषेक करविला .त्यावेळी छत्रपती शाहू हेच स्वराज्याचे खरे वारस आहेत म्हणून धनाजी जाधवराव यांनी छत्रपती शाहू महाराजांचा पक्ष स्वीकारला होता. धनाजी जाधव यांना छत्रपती शाहू महाराजांनी सेनापतिपद दिले. पण धनाजीराव जाधव यांना हे सेनापतिपद फार दिवस उपभोगता आले नाही. छत्रपती शााहू महाराज विशाळगड व पन्हाळगड मोहिमेवर असता २६ जून १७०८ मध्ये वारणा नदीच्या काठी वडगाव येथे पायाला जखम होऊन धनाजी जाधवराव मृत्यू पावले.
🙏अशा या पराक्रमी, “शूर योद्याला स्मृतीदिनीनिमित्त आमचा मानाचा मुजरा “🙏
लेखन ✒️
इतिहास अभ्यासक
डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

*************************

माधव विद्वांस
गनिमीकाव्याने औरंगजेबास जेरीला आणणारे धनाजी व संताजी पैकी धनाजी यांची आज पुण्यतिथी २७ जून१७०८
धनाजी जाधव हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली. संताजीशी झालेल्या युद्धामध्ये संताजी मरण पावले. त्‍यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजींचा मोठा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धनाजी व संताजी यांनी मोठा पराक्रम केला. श्रीवर्धन सातारला आलेल्या बाळाजी भट व त्याच्या पत्नीला आधार देण्याचे काम धनाजी जाधव यांनी केले. हे दाम्पत्या बरीच वर्षे जाधव यांच्या आश्रयाखाली होते. त्यांचे घनिष्ठ संबध होते. धनाजी जाधव यानी शाहुमहाराजांकडे शिफारस केल्यामुळेच बाळाजी भटाला प्रथम पेशवाईची सूत्रे मिळाली.
माहिती महाराष्ट्र ज्ञानकोश यशवंतराव चावण प्रतिष्ठान मधून
लुखजी जाधव याचा पुत्र जो अचलोजी त्यास निजामशहा यानें ठार मारल्यावर त्याचा मुलगा संताजी याचें संगोपन जिजाबाईनें केलें. कनकगिरीच्या लढाईत हा मेला. त्याला शंभुसिंग म्हणून पुत्र होता. त्याचा मुलगा धनाजी. याचा जन्म स. १६५० च्या सुमारास झाला. हा प्रथम प्रतापराव गुजराच्या हाताखालीं होता. उंबराणीच्या लढाईत तो प्रथम पुढें आला. पुढें (१६७४) धनाजी हा हंबीरराव मोहिते याच्या हाताखालीं गेला. विजापूरचा सेनापति अबदुलकरमि याशीं झालेल्या नेसरीच्या लढाईत यानें विशेष शौर्य दाखविल्यामुळें यास बढती देण्यांत आली (फेब्रु.) सावनूरच्या लढाईंत यानें हुसेनखान मायणा याचा पुरा मोड केला तेव्हां शिवाजीनें याची तारीफ केली (१६७९).
संभाजीचा वध झाल्यावर आतां पुढें काय करावें हें ठरविण्याकरितां जी मुख्य मुख्य मराठे मंडळी रायगडावर जमली त्यांत धनाजी जाधव होता. त्यानें सातार्‍यास सर्जाखानाचा पराभव केला.

पुढें (१६९०) धनाजी राजारामाबरोबर जिंजीस गेला. तेथें त्यानें इस्मायलमकाचा पराभव केला, यावेळीं महादजी नाईक पानसंबळ याच्या मृत्यूचें वर्तमान समजल्यामुळें संताजी घोरपडे यास सेनापति नेमण्यांत येऊन त्याच्याबरोबर धनाजीस जयसिंगराव ही पदवी देऊन महाराष्‍ट्रांत पाठविण्यांत आलें (१६९०).
महाराष्‍ट्रांत १६९२ सालीं संताजीच्या वांईकडील व गोदेच्या उत्तरतीरींच्या मोहिमांत बरोबर धनाजी होता. धनाजीच्या सैन्यांत संताजीच्या इतकी चांगली शिस्त नव्हती पण तो आपल्या लोकांनां अधिक प्रिय होता. इकडे धनाजीनें अमात्य व सचिव यांच्याबरोबर पन्हाळा घेतला.
धनाजी हा संताजी घोरपडयाबरोबर महाराष्‍ट्रांतून पुन्हां कर्नाटकांत आल्यावर (१६९३) पुढील वर्षें तो संताजीबरोबरच होता. परंतु शेवटीं शेवटीं या दोन्ही सरदारांमध्यें वैमनस्य उत्पन्न होऊन धनाजीनें संताजीच्या सैन्यांतील कांहीं लोकांस फितविलें, व एके दिवशीं विजापुराजवळ संताजीवर एकदम हल्ला केला. संताजी आपला जीव वांचवून कसा तरी तेथून निसटला, तेव्हां कांहीं लोकांनां त्याच्या पाठलागार्थ पाठवून, व कांहींनां सातार्‍यास राजारामाकडे रवाना करून धनाजी अर्ध्या लोकांसह (सुमारें १०००० फौज) झुल्फिकारखानाचा समाचार घेण्याकरितां पुन्हां कर्नाटकांत आला. यापुढें दोन वर्षें धनाजीची व झुल्फिकारखानाची कर्नाटकांत झटापट चालू होती. त्यावेळीं व त्यानंतर धनाजीनें कर्नाटकांत व महाराष्‍ट्रांत सर्व बाजूस आपली फौज पसरून मोंगलाशीं चाललेल्या युद्धांत बरेच नांवाजण्यासारखे पराक्रम केले (१७०३-०५) त्यामुळें औरंगझेब फार चिडला परंतु, त्याच्यानें मराठयांचा पुरा पराभव होईना.
औरंगझेब महाराष्‍ट्रांतील किल्ले घेण्यांत गुंतला होता. तेव्हां धनाजीनें आपलीं बायकामुलें वाघिणगिरें येथें आणून ठेविलीं होतीं. इ. स. १७०५-०७ च्या सुमारास औरंगझेबानें तेथील गढीस वेढा दिला, तेव्हां धनाजी मोंगलांच्या सैन्याभोंवतीं घिरटया घालून त्यांनां त्रास देत होता. धनाजीचा मोंगलांच्या शिपायांस इतका धाक बसला होता कीं, तो आलेला दृष्‍टीस पडतांच ते पळावयास लागत. अशी एक आख्यायिका आहे कीं, आपल्या पडछायेस पाहून दचकून जेव्हां घोडा पाणी पीत नसे तेव्हां मोंगल स्वार ‘तुला पाण्यांत धनाजी दिसतो कीं काय?’ असें घोडयास विचारीत. मध्यंतरी (१७०७) घोरपडयांनीं ताराबाईच्या मुलखांत लुटालूट केल्यामुळें धनाजी त्याच्या पारिपत्यास गेला असतां झुल्फिकारखान घोरपडयांच्या मदतीस आला, व त्यानें धनाजीस कृष्‍णेपार काढून दिलें. यानंतर मोंगलांचें सैन्य महाराष्‍ट्रांतून निघून गेल्याबरोबर धनाजीनें पुण्याचा फौजदार लोदीखान याचा पराभव करून चाकणचा किल्ला परत घेतला.
यानंतर मोंगलांच्या छावणींतून शाहूची सुटका होऊन तो महाराष्‍ट्रांत आला, तेव्हां ताराबाईकडून धनाजी जाधवाची त्याच्यावर रवानगी झाली होती. परंतु धनाजीनें शाहू हा तोतया नसून खरा आहे असें ओळखून तो त्याला मिळाला. पुढें शाहू गादीवर बसला तेव्हां त्यानें धनाजीस सेनापतीच्या जागीं कायम नेलें, व त्याच्याकडे कांहीं जिल्ह्यांचा वसूल गोळा करण्याचें काम दिलें (१७०८). धनाजी हा अखेरपर्यंत कोल्हापूरच्या विरुद्ध शाहूकडेच राहिला. कोल्हापूरकर मात्र त्याला फोडण्याचा प्रयत्‍न करीत होते.
पुढल्या वर्षीं धनाजी हा कोल्हापूरकरावरील रांगण्याच्या मोहिमेवरून परत येत असतां वारणा नदीच्या कांठीं वडगांव येथें मरण पावला . त्याला कित्येक दिवसांपूर्वीं झालेली एक जखम पुन्हां वाहूं लागल्यामुळें तो बरेच दिवसपर्यंत आजारी होता. या आजारांत त्यानें वसुलाच्या कामाकरितां बाळाजी विश्वनाथ याची नेमणूक केली होती. कोल्हापूरचे अलीकडे (उत्तरेस)पेठ नाक्याचे पुढील वडगाव येथे त्यांची समाधी आहे
धनाजीची स्त्री गोपिकाबाई ही सती गेली. धनाजीस दोन बायका होत्या. पहिलीस संताजी व दुसरीस चंद्रसेन आणि शंभुसिंग असे पुत्र होते. पैकीं चंद्रसेन हा पुढें सेनापति झाला. शिवाजीच्या तालमींत तयार झालेला धनाजी हा शाहूच्या कारकीर्दीत शेवटचाच पुरुष होय. धनाजी हा सत्तेच्या जोरावर लोकांचे वतनी हक्क दडपण्यास कमी करीत नसे हें गसूर व कर्‍हाडच्या देशमुखीच्या तत्कालीन तंटयावरून दिसून येतें.(महाराष्ट्र ज्ञान कोष -यशवंतराव प्रतिष्ठान -डॉ श्रीधर यशवन्त केतकर )
माधव विद्वांस . . . . . . फेसबुकवरून साभार


१. मल्हारराव होळकर

Malhararao Holkar

Madhav Vidwans
“पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर पुढाकार घेणारे मल्हारराव होळकर यांची आज जयंती. पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील होळ या गावी मल्हाररावांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी झाला. मल्हारराव आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनले. ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते.अंगी गुण असले, वीरश्री असली तर एक सामान्य हटकर (धनगर) मुलगा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले.

भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. जेजुरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हाररावांची धारणा होती, त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. मंदिराचे बांधकाम करण्याचा घाट घातला.

उत्तरोत्तर मल्हाररावांची प्रगती होत होती, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते. गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा झाला होता. इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. १७ मार्च १७५४मध्ये कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी खंडेराव छावणीतून बाहेर पडले आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण प्राप्त झाले. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हाररावांना तिचा विचार बदलण्यात यश आले, परंतु बाकी अकराजणी सती गेल्या. पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हाररावांनी मोहिमा उघडल्या. इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. यात त्यांना मल्हाररावांनी मदत केली. मात्र,
************ मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळे सोडून दिले. त्यांच्या याच कृतीने घात झाला. आणि पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. मल्हाररावांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला.

मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जिवलग मित्र होते. उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला. मोगल बादशहाचे सर्व सरदार, वजीर दोहोंना टरकून असायचे. अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठेच आता बादशाहीचे रक्षण करू शकतील एवढा विश्‍वास बादशहाच्या मनात निर्माण झाला होता. तिसऱ्या स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. (२७ मार्च १७५२) होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी या दोघां प्रबळ सरदारांचे सामर्थ्य पाहूनच बादशहा हा करार करायला प्रेरित झाला होता.
*************पानिपतच्या युद्धापूर्वीच १३ मार्च १७६0 रोजी मल्हाररावांनी अब्दालीशी तह करून त्याला परतही पाठवायची सुरुवात केली होती, परंतु तोवर भाऊसाहेब पेशवेच उत्तरेत यायला निघाल्याने नजीबाच्या आग्रहाने अब्दाली येथेच थांबला. १४ जानेवारी १७६१ रोजी मल्हारराव होळकर ऐन वेळी रणमैदान सोडून गेले असा त्यांच्यावर आक्षेप आहे पण आता नव्या पुराव्यांच्या प्रकाशात संजय क्षीरसागर या संशोधकाने, मल्हारराव सायंकाळी साडेपाचपर्यंत रणमैदानावरच झुंजत होते, व त्यांनी आपला सरदार संताजी वाघ यास भाऊच्या मदतीसाठी ससैन्य पाठवले होते हे सप्रमाण सिद्ध केले आहे.

पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली.

लेखक – श्री.माधव विद्वांस


याशिवाय खालील  जास्तीची माहिती विकीपीडियावर उपलब्ध आहे. https://mr.wikipedia.org/s/31p

बालपण
मल्हाररावांचा जन्म भटक्या धनगर मेंढपाळ कुटुंबातला होता. त्यांच्या वडिलांचा, खंडोजी वीरकर चौगुला यांचा, अशाच भटकंतीत पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील होळ या गावी मुक्काम पडला होता. या गावी तांड्याचा मुक्काम असतानाच मल्हाररावांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी झाला. मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ या मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे कायमचे चिकटले. “मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला.

कारकीर्द
मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली.

जयाजी शिंदेंचा बिजोसिंगने केलेला खून आणि कुंभेरच्या लढ्यात खंडेराव होळकरांचा झालेला अपघाती मृत्यू या प्रकरणांमुळे शिंदे-होळकरांत जरी वैमनस्य निर्माण झाले असले तरी मराठी साम्राज्याच्या हितासाठी त्यांनी शिंदेंशी पुन्हा मैत्री साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. ‘शिंद्यांशी मैत्र होते तोवर पेशव्यांनाही आमची धास्ती होती..’ असे सार्थ उद्गार दत्ताजी शिंदेंनी त्यांची भेट नाकारल्यावर काढले. तरीही ते किल्मिष मनात न ठेवता मल्हाररावांनी बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे झुंजत असताना तुकोजीराव होळकरांना मदतीसाठी पाठवले.

पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांच्या पहिल्या पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर १७६१ रोजी मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारराव अनेकदा तिच्याशी सल्लामसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदाऱ्या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या.


नवी भर दि.१०-०१-२०२० फेसबुकवरून साभार

२. दत्ताजी शिंदे

Dattaji Shinde

बचेंगे तो ओर भी लढेंगे !!! असे म्हणणाऱ्या दत्ताजीराव शिंद्यांची आज पुण्यतिथी १० जानेवारी १७६०
दत्ताजी शिंदे :— दत्ताजी शिंदे हा राणोजी शिंद्याचा दुसरा मुलगा, जयाप्पाचा सख्खा व महादजीचा सावत्र बंधु. जयाप्पा मेल्यानंतर (१७५५) शिंदे घराण्याची सरदारी जयाप्पाचा पुत्र जनकोजी यास मिळाली. परंतु तो लहान होता म्हणून दत्ताजीच कारभार पाही. …या चुलत्यापुतण्यांनी अनेक पराक्रम केले व उत्तर हिंदुस्थानांतील पुष्कळ प्रांतहि मराठी साम्राज्यांत समाविष्ट केले. कुकडीच्या लढाईत ज्या अकरा शूर अप्तामीनी थेट निजामाच्या हत्तीवर चाल करुन त्याची डोलाची अंबारी खालीं पाडिली. त्यांपैकीं दत्ताजी हा एक होता (१७५१). त्यानंतर पुन्हा निजामानें उपसर्ग दिल्याने पेशव्यांनी दत्ताजीस मुख्य सेनापति करुन व बरोबर विश्वासरावास देऊन निजामावर पाठविलें. त्यानें शिंदखेड येथें निजामाला गांठून पूर्ण मोड केला व पंचवीस लक्षांचा प्रांत व नळदुर्ग किल्ला मिळविला (१७५७). जयाप्पाचा ज्या बिजसिंगाच्या (मारवाडावरील) मोहिमेंत खून झाला, तींतहि दत्ताजी होता; खून झाल्यावर दत्ताजीने तें दुःख एकीकडे ठेऊन बिजेसिंगाचा मोड केला व (जून १७५५). पुढें दत्ताजीने सर्व मारवाडचें राज्य घेऊन त्याचा तिसरा हिस्सा मराठी साम्राज्यांत दाखल करुन पांच कोट रु खंडणी मिळविली (१७५६). नंतर बुंदीच्या राणीस मदत करुन व तिचा मुलगा गादीवर बसवून, दत्ताजीनें ४० लाख रुपये मिळविले व सरकारचें बरेंच कर्ज फेडले (१७५६). पुढील सालीं दादासाहेब अबदालीवर गेला असतां व मल्हारराव होळकर, हिंगणे, राजेबहाद्दर वगैरे मंडळी त्याला मदत करण्यांत कुचराई करीत असतां, त्यानें दत्ताजीसच धाडण्याबद्दल पेशव्यांस अनेक पत्र लिहिली आहेत. यावेळीं दत्ताजीने आपलें लग्न उरकून घेतले (१७५८). त्याच्या स्त्रीचें नांव भागीरथीबाई. लग्न उरकून दत्ताजी उज्जयिनीस आला. तेथें मल्हाररावानें त्याचा भोळा स्वभाव पाहून त्यास दादासाहेबानें सांगितलेल्य नजीबखानाचें पारिपत्य करण्याच्या कामगिरीपासून परावृत्त केलें. याचवेळी मल्हाररावानें “नजीब खळी राखावा, न राखल्यास पेशवे तुम्हां आम्हांस धोत्रे बडविण्यास लावितील” असे उद्‍गार काढिले. जनकोजी लहान पण मुत्सद्दी असल्याने, त्याने हा सल्ला फेटाळला, पण भोळ्या दत्ताजीनें तो स्वीकारुन नजीबास राखलें, मात्र त्याच नजीबानें दत्ताजीचा विश्वासघातानें प्राण घेतला.
अभिवादन

श्री.माधव विद्वांस
*****

नवी भर दि. १०-०१-२०२२

🚩मराठ्यांच्या पालखीचा गोंडा दत्ताजी शिंदे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩

३७५ वीर दत्ताजी शिंदे

ग्वाल्हेरचे शिंदे घराणे हे मराठी स्वराज्यातील अत्यंत शूर व पराक्रमी घराणे होय .सातारा जिल्ह्यातील कन्हेरखेडची पाटीलकी या घराण्याकडे होती. शिंदे घराण्यात राणोजी ,दत्ताजी ,जनकोजी ,जयाप्पा सारखे पुरुष मराठी साम्राज्याचे अभिमानी होऊन गेले. कुकडीच्या लढाईत निजामाच्या हत्तीची अंबारी खाली पाडणार्यात दत्ताजी शिंदे प्रमुख होते. दत्ताजी शिंदे हे अत्यंत शूर व पराक्रमी होते .ऊत्तरेत लाहोरचा बंदोबस्त दत्ताजी शिंदे यांनीच केला होता. त्यावेळी ऊत्तरेतील तिर्थक्षेत्रे मुक्त करून आणि बंगालपर्यंत स्वारी करून कर्ज फेडण्यासाठी दत्ताजी शिंदे यांनी पैसा उभा केला होता. मराठ्यांच्या उत्तरकालीन इतिहासात शिंदे घराण्याचे फार मोठे योगदान आहे .या घराण्यातील राणोजी, महादजी या कर्तृत्ववान पुरूषामुळेच पानिपतचे अपयश धुवून निघाले होते, व ऊत्तर हिंदुस्तानात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.या घराण्याचा दौलतीचे ,स्वराज्याचे आधारस्तंभ म्हणण्यात आले.
सन.१७५८ मध्ये दत्ताजींचे लग्न भागीरथीबाई यांच्याशी झाले होते.भागिरथीबाई या अत्यंत सालस ,हुशार व धोरणी होत्या. लग्न झाल्यावर दत्ताजी ऊज्जैनला आले. दत्त्ताजीं यांचा शूर व पराक्रमी स्वभाव पाहता ,मल्हारराव होळकरांनी त्यांनां नजीबाचे पारीपत्य करण्यास १० जानेवारी १७६० मध्ये पानिपतला पाठवले. दत्ताजींनी नजीबावर हल्ला केला.अफगाणी सैन्य बंदुका घेऊन तयार होते .मराठी सैन्याची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवारी आणि भाले .मराठ्यांचा तोफखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला दत्ताजी आणि जनकोजीला समर्थपणे तोंड देता आले नाही.
बुरांडी घाटावर रोहिल्यांच्या गोळीबारात दत्ताजी शिंदे घोड्यावरून खाली आले .सुडाने फुरफुरलेले दत्ताजी रोहिल्यांकडे झेपावले .त्यातच समोरच्या गर्दीत त्यांना नजिबांचे तोंड दिसले ,तसे ते बेफान होऊन एकेकाला कंठस्नान घालीत दत्ताजी वादळासारखे घोंगावत पुढे जात होते. तोच समोरून कुतुबशहा व नजीर, दत्ताजी शिंदे यांच्यावर झेपावले .दत्ताजी जखमी होऊन पडले होते.अंगात थोडी धुगधुगी दिसत होती. कुतुबशहाने “दत्ता ss” म्हणून हाक दिली तसे दत्ताजी यांनी त्यांच्यावर डोळे रोखले.
कुतुबशहा म्हणाला “क्यु पाटील ,और लढोगेss?” कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्‍यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता. रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले। खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं. यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्‍या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्‍यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.
त्या दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता .हा भयंकर प्रसंग पाहून झाडावरची पाखरे सुध्दा थबकली. यमुनेचा प्रवाह सुद्धा स्तब्ध झाला.ईतका भयंकर प्रसंग होता तो.
जनकोजींचा जखमी देह घेऊन मराठा सैन्य तळावर आले. त्यांच्या तोंडावरची घोंगडी पत्नी काशिबाई यांनी बाजूला केली.त्यांच्या सर्वांगावर जखमांचे वार दिसत होते.” पाणी ऽ पाणी ऽऽ” असे जनकोजी क्षीण आवाजात पुटपुटत होते.जनकोजींच्या पत्नी काशीबाई गलबलून गेल्या. आणि ओरडू लागल्या ” माझ्या दौलतीचा राजा s शिपीभर पाण्याला तू महाग झालास का?” जनकोजी विचारू लागले, “माझे काकासाहेब कुठे आहेत? कुठे आहेत काका ?”
सार्यांनी माना खाली घातल्या. भागीरथीबाई कावर्याबावर्या होऊन मुक्या हरिणीसारखे साऱ्यांकडे बघू लागल्या होत्या. झाला प्रकार त्यांच्या ध्यानात आला आणि त्या धाय मोकलून रडू लागल्या. तोंडात मारून घेऊ लागल्या.जमिनीवर हात आपटू लागल्या . त्यांच्यासाठी धरती फाटली आणि आभाळ पण फुटलं. टाका कसा घालायचा ? त्या जोर जोरात किंचाळून रडू लागल्या.”माझ्या चांदसूर्या ss कुठे गेलास रे ? कुणाची ही दौलत ,कुणाचे वाडे आणि राजवाडे ? माझ्या चांदाचा मुखडाही बघायला मिळाला नाही ,मला एकटीला टाकून कुठे गेलास रे माझ्या बाजींद्या सरदारा s?” भागीरथीबाईंच्या शोकाने सारे व्याकुळ झाले होते .परंतु पुढे भागीरथीबाईंनी आपला शोक आवरला .त्या जनकोजीना म्हणतात ” बाबा ,तुम्ही बायकांसारखे का रडता? आपण सारेच असे बसलो तर वैरी सारी उरलीसुरली माणस घशात घालेल.चला उठा s”भराभरा निघूया जिच्यावर आभाळ कोसळले तिचे धीराचे बोल ऐकून साऱ्यांच्या उरात उभारी आली.
.मोडकी -तोडकी ,अर्धमेली फौज तशीच वाट तुडवत पुढे निघाली. भागीरथीच्या भाग्याचा गोळा ढगाआड गेला होता .आता पोटातला गोळा जगविण्यासाठी त्या जीवाच्या आकांताने पळत सुटल्या होत्या .नऊ महिने भरलेल्या भागिरथी बाई घोड्यावर बसून निघाल्या. पुढे भागिरथी बाई शिंदे बुरांडी घाटातून निसटुन कोटपुतली या भूईकोटला आल्या. तेथे त्या प्रसुत झाल्या. धावपळ व संकटामुळे मुलगा जगला नाही. या युद्धात कोवळी ,निष्पाप लेकरसुध्दा बळी पडली. हे मुल गेले आणि दत्ताजी शिंदे यांचा वंशच समाप्त झाला. निखळलेल्या गोंड्याचा साधा धागाही शिल्लक राहिला नाही.
दत्ताजी शिंदे म्हणजे मराठ्यांच्या पालखीचा गोंडा होता .काळाने हा गोंडा खुडून नेला होता.
अहिल्याबाई होळकर या तेथेच तळावर होत्या. भागीरथीबाई यांची त्या समजूत काढत असतात. म्हणतात बाई रडू नका .आपण मराठी सरदारांच्या बायका .आपल लगीन सरदारांशी नव्हे तर तलवारीशी लागत. तलवार गळाली की आपण कोसळतो. “यावर भागिरथीबाई म्हणतात “बाईसाहेब, खंडेराव गेले तेव्हा त्यांचे तुम्ही अंत्यदर्शन तरी घेतले असेल. तिरडीवर चुडा तरी फोडला असेल” त्यांच्या अंत्यदर्शनाचे भाग्यसुध्दा मला लाभले नाही.
१० जानेवारी १७६० रोजी शोर्यशाली दत्ताजी शिंदे यांचा पानिपताच्या रणांगणावर मृत्यू झाला.
मराठ्यांच्या इतिहासात अशा कितीतरी समंजस ,धाडशी ,पराक्रमी स्रिया होऊन गेल्या.
🙏अशा या थोर दत्ताजी शिंदे आणि भागीरथीबाई शिंदे यांना आमचा मानाचा मुजरा🙏
लेखन ✒️
डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
संदर्भ  : मराठी विश्वकोष, पानिपत- विश्वास पाटील, मराठी रियासत – गो.स.सरदेसाई
( टिप या लढाई नंतर एक वर्षांनी १४ जानेवारी १७६१ ला पानिपतच्या रणक्षेत्रावर सदाशिव भाऊसाहेब , विश्वासराव पेशवे ,अहमदशहा अब्दाली यांच्यात शेवटचा निकाली रणसंग्राम झाला.

४७५ दत्ताजी शिंदे २

. . . . .  श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुक पानावरून साभार दि.१०-०१-२०२२

४७५ दत्ताजी ३

*************

३. संताजी घोरपडे

“🚩संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा” 🚩
दिनांक 18 जुन 1697संताजी घोरपडे यांचा स्मृतिदिन

संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पुढे अठराव्या शतकात जवळपास संपूर्ण भारतभर आपला दरारा निर्माण केला. छत्रपती शिवाजीराजांनी कर्नाटकात स्वारी केली त्यावेळी संताजी घोरपडे यांच्या बरोबर होते . पुढे कृष्णेच्या दक्षिणेकडील कर्नाटकाचा बहुतेक भाग घोरपडे यांनी जिंकल्यावर सोंडूर, गजेंद्रगड ,दत्तवाड ,कापशी , इत्यादी शाखा उत्पन्न झाल्या . संताजी घोरपडे यांना छत्रपती राजाराम महाराजांनी 1691 मध्ये सेनापती पद दिले. संताजींचे वास्तव्य नेहमीच शंभू महादेवाच्या डोंगरात असत. तेथूनच ते चारही दिशेत विजेसारखे चमकत राहिले. बादशहाने जिंकलेल्या विजापूर प्रांत संताजी घोरपडे यांनी लुटून फस्त केला. संताजी घोरपडे अत्यंत शूर व धाडसी होते .”बलाढ्य फौजा बाळगून आत्मविश्वासाने वावरणाऱ्या शत्रूच्या शूर सेनानीना आपल्या गनिमी युद्धतंत्राच्या विलक्षण कौशल्याने हमखास पेचात आणून दाती तृण धरावयास लावणारा सेनानी म्हणून दक्षिणेत संताजींची ख्याती होती ” संताजी घोरपडे यांचे नाव ऐकताच मोगल सेनानींच्या उरात धडकी भरत असे. संताजींशी लढण्याचा प्रसंग आला तर भल्या भल्या सरदारांना कापरे भरत असे. संताजीराव घोरपडे हे मराठा साम्राज्याचे 1689 ते 1697 या काळात सरसेनापती होते . छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली . त्याच काळातले संताजी घोरपडे व धनाजी जाधव या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घकाळ म्हणजे सतरा वर्षे औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी घोरपडे यांची प्रचंड दहशत होती . औरंगजेबाचा इतिहासकार खाफीखानाने लिहून ठेवले आहे की संताजीच्या या महान विजयाची कहाणी सर्वस्वी त्या काळातील शत्रु पक्षीय मोगल इतिहासकारांनी लिहून ठेवली हे विशेष . अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले ते संताजी घोरपडे यांनी .

संताजी घोरपडे यांचे लष्करी डावपेच व हालचाली अतिशय काटेकोरपणे आखल्या जात. हाताखालच्या सैनिकांना त्यांचे आदेश बिनचूक आणि बिनबोभाट पार पाडावे लागत. सन 1689 साली बादशहा औरंगजेब याने छत्रपती संभाजीराजे यांची वडू कोरेगावच्या छावणीत अमानुषपणे हत्या केली. त्याच छावणीत औरंगजेबबादशहा असताना काही मोजक्या लोकांना बरोबर घेऊन औरंगजेबाच्या छावणीवर संताजीने घोरपडे यांनी यशस्वी छापा घातला व तंबूचे सोन्याचे कळस कापून ते पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुढे पेश केले. मराठ्यांच्या छत्रपतिची अमानुष हत्या झाल्याने सारी मराठी दौलत हादरून गेली असता संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या छावणीवर घातलेला छापा मराठी सैन्याला एक नवसंजीवनी सारखा वाटला. या घटनेमुळे सार्‍यांच्या कामाला एक दिशा मिळाली. त्याचा पूर्ण अनुभव पुढील सतरा-अठरा वर्षे औरंगजेबाला घ्यावा लागला. मोगल बादशहाला मराठ्यांनी दे माय धरणी ठाय करून टाकले. त्याच्या मुळाशी संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाला दिलेले आव्हान होते.

संताजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढलेले व त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या मुशीतून तयार झालेले सेनानी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढलेल्या राजकीय तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव असलेली शिकवण संताजी विसरले नव्हते . म्हणूनच स्वराज्याच्या पडत्या काळात त्यांनी स्वराज्यास पारखे होऊन मोगलांची बाजू धरली नाही. निराशेच्या घोर अंधकारात हे स्वराज्याचाच विचार करत राहिले. या सर्व मंडळीत संताजी घोरपडे यांचे स्थान प्रथम दर्जाचे मानले पाहिजे. 20 /25 हजारांची जंगी फौज बाळगणारा हा मराठ्यांचा सेनापती प्रत्यक्ष शत्रूस केंव्हाच जाऊन मिळाला नाहि. गनिमी काव्याच्या युद्धाचे आद्य धडे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतच मिळाले. लढाईच्या कामी शिस्तीचे महत्व असते, हा धडा त्यांनी याच काळात घेतला. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात संताजींची कडव्या लष्करी शिस्तीचे सेनानी म्हणून जी प्रतिमा उदयास आली तिचा उगम या तालमीत तयार झाला आहे. पुढचा इतिहास असे सांगतो की संताजी सारखा प्रति संताजी मराठ्यांना परत निर्माण करता आला नाही .पुढे औरंगजेबाच्या मृत्युपर्यंत मराठी फौजा मोठ्या जिद्दीने व पराक्रमाने मोगलांशी गनिमी युद्ध करत राहिल्या. पण संताजी प्रमाणे एकामागून एक असे नेत्रदीपक विजय कोणाही मराठा सेनानीस कमविता आले नाहीत. संताजी ची महती यातच आहे.

जिंजी तंजावर पर्यंत पसरलेल्या कर्नाटकाचा विस्तिर्ण प्रदेश संताजी यांच्या कार्याचे खास क्षेत्र होते. मोहिमेत ठिक ठिकाणी मोगली सैन्याचा समाचार घेत विविध ठिकाणच्या चौथाईच्या खंडण्या वसूल करीत मराठ्यांचा हा सेनानी राजाराम महाराजांच्या दर्शनाला जात असत. संताजी मोगली फौजेचे हालचालींची व तिच्या सेनानींच्या योजनांची बित्तंबातमी राखून असत यावरून संताजी घोरपडे यांच्या शौर्याची कल्पना येते . छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले स्वराज्य पुढे अठराव्या शतकात आपल्या दराऱ्याने व अतुलनीय पराक्रमामुळे संताजी व धनाजी यांनी वाचवले.
“अशा या महान सेनानीला मानाचा मुजरा.”🙏

लेखन ✒️
डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर.
………….. वॉट्सअॅपवरून साभार दि.१८-०६-२०२०
———————–
विकीपीडियावरील माहिती
संताजी घोरपडे
https://mr.wikipedia.org/s/a47

संताजी घोरपडे (मृत्यू : १८ जून १६९७) हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते. हे छत्रपती राजाराम यांच्या सत्ताकाळात घोरपडे सरसेनापतीपदावर होते

धनाजी जाधव यांच्यासोबत घोरपडे यांनी जवळजवळ १७ वर्षे मुघल सैन्याशी लढा देउन मराठा साम्राज्य तगवून धरले होते.

संताजीने लढलेल्या काही लढाया
जुल्फिकार खानास वाट दिल्यावरून संताजीत आणि राजारामराजांत वाद निर्माण झाला. संताजी जिंजी सोडून कांचीपुरमला निघून गेले. वाटेत त्यांना कासीमखान जिंजीकडे चालून येत असल्याची बातमी मिळाली. कासीम खानास बादशाहने जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी पाठविले होते. कांचीपुरमनजीक कावेरीपाक या ठिकाणी खान असताना संताजीने अचानक हल्ला चढ़विला. अगदी थोड्याच वेळात खानाच्या फौजेचा धुव्वा उडाला आणि खान कांचीपुरमला पळून गेला, तिथे त्याने देवळांचा आश्रय घेतला आणि धोका मिटेपर्यंत तिथेच लपून बसला.

याच दरम्यान बहिर्जी घोरपडेने राजाराम विरोधात बंडखोरी केली आणि ते याचप्पा नायका संगे मोगलांविरोधात लढू लागले. राजारामने संताजीससुद्धा सेनापति पदावरून दूर केले. आता सेनापति पद धनाजी जाधवांकडे देण्यात आले. सेनापतिपद गेले तरी संताजीने मोगलांविरोधातला लढा चालूच ठेवला. तो मोगलांना वतनासाठी किंवा कुठच्या पदासाठी जाऊन मिळाला नाही. १६९५च्या जानेवारी महिन्यात संताजीने कर्नाटकातून मुसंडी मारली ती थेट बऱ्हाणपुरात. मोगली सुभेदाराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांच्या २००० सैन्यापुढे त्याचा निभाव लागला नाही आणि तो बऱ्हाणपूर सोडून पळून गेला. मराठ्यांनी बऱ्हाणपूर लूटले. ही बातमी जेव्हा औरंगजेबास कळली तेव्हा त्याने बऱ्हाणपूरच्या सुभेदारास बांगड्यांचा आहेर पाठवला. नंतर संताजीने सुरत लुटण्याचा बेत आखला होता, पण शेवटी तसे न करता त्याने वेढा घातला तो नंदुरबार शहरास. नंदुरबारच्या सुभेदाराने शहर राखण्यासाठी संताजीबरोबर लढाई केली. संताजी नंदुरबारला जास्ती वेळ वेढा घालून बसला नाही आणि तो परत खटाव प्रांतात आला. तिथे त्याने अनेक मोगल सरदारांना लढाईत मारले, अनेक मोगल सरदार युद्ध सोडून पळून गेले, अनेक सरदार कैद झाले.

संताजीच्या कारकिर्दीतले दोन मोठे विजय म्हणजे दोड्डेरीची लढाई आणि दुसरी बसवापट्टणची लढाई. या दोन लढायांची तुलना साल्हेर किंवा कांचनबारीच्या लढायांशी होऊ शकते. संताजीस नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने कासीमखानाबरोबर खानाजाद खान, असालत खान, मुराद खान, सफसिख खान असे अनेक नामवंत सरदार पाठवले होते. कासीमखानाबरोबर सरदार मोठा तोफखाना, भरपूर धन, आणि कामबक्षचेसुद्धा सैन्य दिमतीला दिले होते. संताजी मोगल सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होता. त्याला गुप्तहेराकडून बित्तंबातमी मिळत होती. कासीमखानाने आपले सामान रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली. संताजीने गनिमी काव्याचे डाव आखले आणि त्याप्रमाणे आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने कासीमखानाच्या सामानावर हल्ला केला. तो हल्ला परतवण्यासाठी कासीमखानने आपले बरेच सैन्य खानाजाद खानाबरोबर तिथे पाठवून दिले. संताजीच्या दुसऱ्या तुकडीने खानाजाद खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरू केली. आता कासीमखानाची छावणीत शुकशुकाट होता, तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसऱ्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मोगली सैन्याची पुरी वाताहत करून टाकली. मोगली सैन्य रणंगण सोडून पळत सुटले आणि दोड्डेरीच्या गढीचा आश्रय घेतला. संताजीने या गढीला वेढा घातला आणि मोगलांची रसद मारली. दोड्डेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासीम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकळे सोडले. कासीमखान आणि त्याचे सरदार दोरखंड लावून एक रात्री सेनेला संताजीच्या तोंडी देऊन किल्ल्यात निघून गेले. जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद संपत आली. खानाचे सैन्य उपाशी मरू लागले. शेवटी मोगलांनी संताजीकडे जीवदानाची याचना केली. संताजीने मोगलांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद, आणि सोबत दोन लाख होनाची खंडडणी घेतली. ही नामुष्की सहन न होऊन कासीमखानाने विष पिऊन आत्महत्या केली. या लढाईचे दाखले मोगल इतिहासकारांनी दिले आहेत.

**********************

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे

बाजीराव पुतळा

पेशवाईमधील इतर वीरांची माहिती इथे पहा : पेशवाईतले वीर  https://anandghare.wordpress.com/2020/12/20/%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0/

थोरले बाजीराव पेशवे हे आयुष्यात एकही लढाई न हरलेले महापराक्रमी योद्धा तर होतेच, उत्तम प्रशासक, राजकारणी स्वामीनिष्ठ सेवक आणि रसिकही होते. त्यांच्यावर लिहिलेले दोन वेगवेगळ्या प्रकारचे लेख या ठिकाणी दिले आहेत. श्री अमोल दांडेकर हे अमेरिकेत राहतात आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. दुसरे लेखक श्री.अमोल वाघ हे बहुधा मध्यप्रदेशात रहात असावेत असे त्यांच्या लेखनावरून वाटते. त्यामुळे लेखनातले विषय आणि आशय व्याकरणापेक्षा महत्वाचे आहेत.
या महान व्यक्तीविषयी अधिक माहिती इथे मिळेल. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%87

. . . . . ….

नवी भर दि.१८-०८-२०२१ :  बाजीरावांचा आम्हाला ठाउक नसलेला इतिहास!

Sudhir Dandekar यांच्या फेसबुक फळ्यावरून साभार दि.१८-०८-२०२१

बाजीरावांचा आम्हाला ठाउक नसलेला इतिहास! वाचून अंगावर रोमांच उभे राहीले नाहीत तरच नवल!!!!!
आपल्याला एखाद्या थोराच्या वैयक्तिक आयुष्यात इतका काही वेड्यागत रस असतो की, बाजीराव म्हटल्यावर आठवते ती फक्त मस्तानी. ह्या मस्तानीचं गारुड एवढं काही गडद आहे की, त्यापलिकडचा बाजीराव आम्हाला नुसता ऐकूनही ठाऊक नसतो. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी स्वराज्याचा पेशवा झालेला हो! अवघं ४० च वर्षांचं शापित आयुष्य आणि त्यातही केवळ २० च वर्षांची कारकीर्द लाभलेला हा अचाट योद्धा! त्या २० च वर्षांच्या काळात त्याने हिंदवी स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य केलं! जो संकल्प थोरल्या महाराजांनी मनी धरला होता, ह्या रणधीराने तो पूर्तीस नेला. महाराष्ट्रास वाकुल्या दाखवत ४०० वर्षे खिजवणारी दिल्ली जाळली, लुटली आणि फस्तच नव्हे, तर अंकित केली ती ह्याच बाजीरावाने! मेघ बेबंदपणे बरसू लागले की जसं जंगलात एकही पान कोरडं राहू शकत नाही, तसा हा हिंदवी स्वराज्याचा पंतप्रधान अवघ्या मुलुखभर तांडव करत होता! राजमुद्रेतील शिवछत्रपतींना अपेक्षित असलेले ‘वर्धिष्णू’ आणि ‘विश्ववंदिता’ शब्द सार्थ करत होता. एवढ्या मग्नतेने की, त्यापोटी वैयक्तिक आयुष्य, तहान-भूक सारं सारं तुच्छ ठरलं आणि ह्या असमशौर्यधाम वीराला मृत्यू आला तोही मोहीम करतानाच!! पण हे आम्हाला शिकवलंच जात नाही. शालेय इतिहासाच्या पुस्तकात आमच्या राष्ट्रपुरुषांना स्थान दिलं न दिल्यासारखं केलं जातं आणि रानटी मुघल आक्रमकांच्या स्तुतीपोटी मात्र पानेच्या पाने भरली जातात, ही इथली अवस्था आहे. अन् वर आम्हीच चिंता करतो की, आमची पिढी स्वदेशाभिमानी आणि कसदार का बरं होत नाही!!

वास्तविक बाजीराव हा शतकानुशतकांतून कधीतरीच उदित होणारा निष्णात सेनापती. साक्षात रणपंडित!! ४० वर्षांचं आयुष्य, २० वर्षांची कारकीर्द आणि ४१ लढाया; करा कल्पना!! ह्या ४१ लढायांपैकी एकसुद्धा लढाई न हरलेला नरपुंगव होता बाजीराव!! ४१ वेळा अजिंक्य राहिलेल्या आणि तेही आपल्या शिवप्रभूंच्या हिंदवी स्वराज्यासाठी युद्ध करत अजिंक्य राहिलेल्या महारथीचा आपल्याला किती अभिमान वाटला पाहिजे! पण आम्ही करंटे मात्र बाजीरावाला प्रेमवीर म्हणून रंगवतो. नाहीतर मग त्याची जात पाहातो! वस्तुतः महापुरुषांची ‘जात’ नसते पाहायची, तर त्यांनी जनसामान्यांच्या मनामनात पेटवलेली अभिमानाची ‘वात’ आणि त्यायोगे सबंध समाजाने टाकलेली ‘कात’ पाहायची असते. हे आपण जेव्हा शिकू, तेव्हाच इतिहास नावाचा खजिना आपल्या खऱ्या स्वरुपात खुला होतो. उदाहरणार्थ – ब्रिटीश फिल्डमार्शल Bernard Montgomery याने आपल्या History of Warfare ग्रंथात बाजीरावाने लढलेल्या पालखेडच्या युद्धाचं वर्णन ‘A masterpiece of strategic mobility’ ह्या गौरवपूर्ण शब्दांत केलंय! का बरं म्हणाला असेल तो असं?

मुळात दख्खनचा प्रांतपाल म्हणून आलेल्या आणि नंतर स्वतःचीच असफजाही राजवट सुरु केलेल्या निज़ामाने मराठ्यांच्या कोल्हापूर आणि सातारा गाद्यांमधील दुफळीचा फायदा घेत १७१९ चा सय्यद बंधूंशी झालेला मराठ्यांचा करार मानायला नकार दिला. वर शहाणा कोल्हापूरचे संभाजी आणि सातारचे शाहू दोघांनाही म्हणू लागला ‘तुमच्यातला खरा छत्रपती कोण ते मी ठरवून देतो आणि त्यालाच कराराप्रमाणे चौथाई-सरदेशमुखी घेता येईल’. पंतप्रतिनिधींच्या कारस्थानामुळे कोल्हापूरचे संभाजी निज़ामाला सामील झालेले. महाराष्ट्राला लागलेला दुहीचा शाप, दुसरे काय! पण शाहुंनी मात्र ह्या अपमानास्पद गोष्टींना थारा द्यायचं नाही असं ठरवलं आणि त्यावेळी कर्नाटकच्या मोहिमेवर असलेल्या बाजीरावांना पाचारण केलं.

ह्या काळात निज़ाम स्वतः ऐवज़खानासोबत पुणे जिल्ह्यात धुमाकूळ घालत होता. त्याचा सरदार तुर्कताज़खान नाशिक व संगमनेर भागात धुडगूस घालत होता. आणि रंभाजी निंबाळकर साताऱ्यावर बरसत होता. स्वराज्यावर असं चहुबाजूंनी संकट आलेलं असताना राऊंनी एक अनोखाच निर्णय घेतला. १७२७ च्या दसऱ्याला त्यांनी जे सीमोल्लंघन केलं ते विद्युद्वेगाने थेट औरंगाबादच्या दिशेने आणि काही समजायच्या आतच गोदावरीपल्याडच्या निज़ामी प्रांताचा पार चुथडा करुन टाकला. गडबडून गेलेला निज़ाम सारे सोडून बाजीरावांच्या मागे! बाजीराव मात्र वायुवेगाने हालचाली करत संचार करत होते. वाटेत लागणारा निज़ामचा सर्व मुलूख फस्त करत होते. बाजीरावांचा रोख पाहून निज़ामाला वाटले की ते बुऱ्हाणपूरवर हल्ला करणार. येडा सगळी तयारी करुन बसला, तर बाजीराव त्याला वाईट चकवा देत पार भरुचला उगवले!! वर अफवा पसरवून दिल्या की, निज़ामशी हातमिळवणी करुन मी गुजरातवर आक्रमण करतोय.

निज़ामाशी उभा दावा असलेला अलिमोहनचा सुभेदार सरबुलंदखान हबकला, तर बाजीरावांनी त्याला अभय दिल्याचे नाटक केले. कश्यात काही नसताना निज़ाम हकनाक बदनाम झाला. तळतळून त्याने पुणे प्रांत बेचिराख करुन टाकला. संभाजींना छत्रपती घोषित केले. हेतू केवळ एकच की, बाजीराव खुल्या मैदानात यावेत. कारण, निज़ामाचा सगळा भर तोफखान्यावर. त्याच्या वेगाला मर्यादा. बाजीराव सडे स्वारी करणारे, मिळेल ती चटणी-भाकर खाणारे आणि परमुलूख लुटून रसद मिळवणारे. त्यामुळे त्यांच्या हालचाली जलद! ते कश्याला निज़ामाला भिक घालताहेत? उलट निज़ाम पुण्यावर आहे म्हटल्यावर बाजीराव थेट औरंगाबादच्या दिशेने निघाले. पन्नाशी उलटलेला पाताळयंत्री निज़ाम दुसऱ्यांदा अवघ्या पंचविशीतल्या राऊस्वामींच्या डावाला बळी पडला! आपला सारा तोफखाना मागे अहमदनगरलाच ठेवण्याशिवाय त्याला गत्यंतरच उरले नाही. तसाच औरंगाबादच्या दिशेने धावला! नियती खळखळून हसली असेल त्यावेळी!!

निज़ामाच्या एकूण एक हालचालींची वार्ता गुप्तचरांमार्फत राऊंकडे पोहोचत होती. बाजीरावांनी ताबडतोब गंगापूर आणि वैजापूर लुटले व पालखेड येथे जाऊन स्थिरावले. बिथरलेला निज़ाम पालखेडवर चालून आला. मराठ्यांच्या चतुर पेशव्याला पालखेडचा भूगोल व्यवस्थित ठाऊक होता. गावाच्या पूर्वेला एकच नदी. ती राऊंनी ताब्यात घेतली. गावाला पाणीपुरवठा करणारे सारे मार्ग रोखले. निज़ामाची रसद मारली. मुलूख तर केव्हाच फस्त केलेला. दग्धभू धोरण. सैन्य घोड्याच्या नालेच्या आकारात विभागलेले. निज़ाम चालून आला आणि अन्न नाही पाणी नाही अश्या अवस्थेत बाजीरावांनी लावलेल्या सापळ्यात अडकला. कुत्रे हाल खाईनात अशी अवस्था झाली त्याची. पोटात कण नाही आणि चारी बाजूंनी काळ बनून उभे ठाकलेले मराठे!!

दि. २५ फेब्रुवारी १७२८. अतिप्रचंड सैन्य घेऊन आलेल्या निज़ामाने अवघ्या पंचवीस सहस्र सैन्यासोबत लढणाऱ्या पंचविशीतल्या तरुण पोरासमोर बिनशर्त शरणागती पत्करली. बाजीरावांच्या मेहेरबानीवर अत्यंत अपमानास्पद अवस्थेत जायला वाट करुन दिली गेली त्याला. पुढे ६ मार्चला मुंगी-पैठणच्या शमानुसार त्याला मराठ्यांची चौथाई-सरदेशमुखी तर परत द्यावीच लागली, शिवाय मान तुकवून शाहूंनाच छत्रपती म्हणून स्वीकारावे लागले!!

चातुर्याने हालचाली केल्या तर आपले कमीतकमी नुकसान करुन रणमैदानात काय काय चमत्कार करुन दाखवता येतात; याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही पालखेडची न झालेली लढाई!! शिवरायांच्या युद्धनीतीचा विकास ह्या हालचालींमध्ये दिसून येतो. बाजीरावांनी ह्या युद्धाचे ठिकाणही स्वतःच ठरवले, वेळही स्वतःच ठरवली आणि कावेबाज म्हणून समजल्या गेलेला निज़ामाला आपल्या तालावर अक्षरशः हवे तसे नाचवले! याच मोहिमेने बाजीरावांचा आणि मराठेशाहीचा डंका सर्वत्र वाजण्यास सुरुवात झाली. अश्या कर्तबगार पेशव्याची आज जयंती. यानिमित्ताने आज हा मस्तानीपल्याडचा बाजीराव आठवूयात. अभिमानाने फुलून जाऊयात!!

… लेखक अज्ञात . . . . . . . फेसबुकवरून साभार १८-०८-२०२१

************************

नवी भर दि. २८-०४-२०२१

रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे यांची आज पुण्यतिथी

बाळाजी विश्वनाथ यांचेनंतर त्यांचे चिरंजीव बाजीराव यांना शाहू महाराजांनी दिनांक १७ एप्रिल १७२० रोजी पेशवेपद दिले. बाजीरावाच्या पराक्रमाची गाथा फार मोठी आहे. ती विस्ताराने सांगणे आणि त्यांच्या उत्तर-दक्षिण भरार्‍यांना सूत्रबध्द करणे फार कठीण आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगली सत्ता खिळखिळी बनली असली तरी ती अद्याप पूर्ण मोडली नव्हती. परंतु अशा परिस्थितीत मोगल साम्राज्य आता आता फार काळ टिकणार नाही, हे अचूक हेरून बाजीराव आपले डावपेच आखत होते. तल्लख बुध्दिने डावपेचांची आखणी करावी आणि भक्कम हातांनी त्याची त्वरीत अंमल बजावणी करावी हेच बाजीरावांचे ब्रीद होते.

मराठी सत्तेचा उत्तरेत विकास करून सार्‍या उपखंडात मराठ्यांचा दबदबा निर्माण करणे ही बाजीरावांची महत्त्वाकांक्षा होती. उत्तरेत मोहिमेवर जाण्यापूर्वी बाजीरावांनी दक्षिणेकडील शत्रूंचा पूर्ण बंदोबस्त केला होता. त्यांनी कर्नाटकात दोन मोहिमा काढून अर्काटचा नबाब, गुबीचा मुरारराव घोरपडे, म्हैसूरचे वाडियार इ. अनेक संस्थानिकांना मराठ्यांचे नेतृत्व स्वीकारण्यास भाग पाडले. याच वेळी दक्षिणेत निजाम उल मुल्क हा फार शिरजोर झाला होता. १७२५ चे सुमारास मोगलांशी फारकत घेऊन त्याने आपले स्वतंत्र राज्य ‘असफशाही’ स्थापन केले होते. वास्तविकत: मोगलांनी १७१९ च्या तहानुसार स्वराज्य चौथाई आणि सरदेशमुखीबाबत सनदा दिल्या होत्या. त्यानुसार त्या मुलुखातील सर्व सत्तांना मराठ्यांना चौथाई देणे भाग होते.

परंतु निजाम मात्र यास विरोध करीत असे. सातारकर शाहू महाराज आणि कोल्हापूरकर संभाजी महाराज यांपैकी खरा छत्रपती कोण ते आधी ठरवा आणि मगच माझ्याकडे चौथाई मागा असे निजामाचे म्हणणे होते. निजामाच्या अशा वृत्तीला बाजीरावांनी रणांगणावरच उत्तर दिले. औरंगाबाद आणि पैठण यांच्या मधे असलेल्या पालखेडला निजाम आणि बाजीराव यांच्या सैन्यांची गाठ पडली. अतिशय घनघोर लढाई झाली. त्यात निजामाचा सपशेल धुव्वा उडवत बाजीरावांनी त्याला पराभूत केले. अखेर नाईलाजाने निजामाने तह मान्य केला. मुंगी-शेगावचा तह म्हणून मराठ्यांच्या इतिहासात याची नोंद झाली आहे. यावेळी शाहू महाराजच खरे छत्रपती आहेत आणि चौथाईची रक्कम त्यांनाच दिली पाहिजे. असे बाजीरावांनी निजामाला सुनावले. कोंडीत सापडलेल्या पराभूत निजामाने ते बिनशर्त मान्य केले.

त्यानंतर कोल्हापूरकर संभाजी आणि शाहू महाराज यांच्यामध्ये वारणेच्या काठावर मोठे युध्द झाले. त्यात कोल्हापूरकर संभाजीचा सपशेल पराभव झाला. अर्थात यावेळीही बाजीरावांची मौलिक मदत शाहू महाराजांना लाभली होती. परंतु येसूबाईंच्या मध्यस्थीने तह झाला. दोन बंधूंनी असे आपापसांत संघर्ष करू नये असे येसूबाईंचे मत होते. त्यामुळेच हा वारणेचा ऐतिहासिक तह घडून आला.

पुढे बाजीरावांनी बुंदेलखंडात जाऊन बंगषखान या मोगली सुभेदाराचा पराभव करून त्याने कैद केलेल्या छत्रसाल राजाची सुटका केली.

तरीही अद्याप निजामाचा पुरा बिमोड झाला नव्हता. निजाम सतत मराठ्यांच्या काही ना काही कुरापती काढतच होता. त्यातच आता पालखेड (१७२८) नंतर दहा वर्षांनी म्हणजेच १७३८ साली भोपाळ येथे निजाम आणि बाजीराव एकमेकांसमोर उभे ठाकले. दिल्लीच्या बादशहास मदत करण्यासाठी निजाम निघाला असतांना त्याचा तळ भोपाळ येथे पडला होता. ही संधी साधून बाजीरावांनी वेगवान हालचाली करीत अचानक भोपाळ वेढले आणि त्यांनी निजामाची बाहेरून येणारी रसद तोडली. नेमके याच वेळी बाजीरावांच्याच आदेशानुसार चिमाजीआप्पा तापी नदीच्या तीरावर मोर्चे बांधून बसला होता. त्यामुळे नासिरजंग या निजामाच्या मुलाला आपल्या पित्याच्या मदतीस जाताच आले नाही. बाहेरून नवी कुमक येऊ शकत नाही आणि येणारी रसदही तोडली गेल्याने निजाम पुरा कोंडीत सापडला होता. परिणामी परत एकदा निजाम आणि बाजीराव यांच्यात युध्द झाले. त्यात पुन्हा एकदा निजामाचा दारूण पराभव झाला. भोपाळची लढाई म्हणजे बाजीरावांच्या कारकीर्दीतील परमोच्च बिंदू.

एक जातिवंत मर्दाना लढवय्या म्हणून बाजीराव प्रसिध्द होते. दक्षिणेत वर्चस्व आणि उत्तरेत राजकीय नेतृत्व ही बाजीरावांची राजनीती होती.

बाजीरावांबद्दल सांगायचेच झाले तर, पुत्र असावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. बाळाजी विश्वनाथांपासून मिळालेला शौर्य, धैर्य आणि चातुर्य यांचा मौलिक वारसा नुसताच टिकवला नव्हे तर तो सातत्याने वृध्दींगतही केला. कल्पकता आणि धाडस यांचा सुरेख संगम बाजीरावांच्या कारकीर्दीत अनुभवण्यास मिळतो. त्यांची झेप उत्तम. सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट संपादन केल्याशिवाय थकणारी नाही. चिकाटीला कमी नाही आणि हाताला दम नाही. असाच प्रवास असल्यावर अपयश कोठून येणार? असे अभिमानाने म्हणावेसे वाटते.

शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याचे रुपांतर साम्राज्यात करण्यात बाजीरावांचा सिंहाचा वाटा आहे.

अखेर दिनांक २८ एप्रिल १७४० रोजी मध्यप्रदेशातील रावेरखेडी येथे बाजीरावांनी इहलोकीचा निरोप घेतला.

*************

नवी भर  दि. १९-०९-२०२०

पुस्तक परिचय – या सम हा

बाजीराव पेशवे म्हटलं की सोबतच मस्तानी म्हणणं हे कर्तव्य असल्यासारखे लोक बाजीरावांना केवळ मस्तानीसोबत जोडतात. हे आजचं आहे असं नाही. नव्वदच्या दशकात राऊ कादंबरीवर आधारित राऊ याच नावाची मालिका सह्याद्री वाहिनीवर सुरू झाली होती. त्यात बाजीराव रविंद्र मंकणी होते आणि मस्तानी अश्विनी भावे! साहजिकच अश्विनी भाव्यांना भाव देण्यासाठी असेल पण त्याही मालिकेत मस्तानीचा प्रभाव वाढला होता आणि पराक्रमी बाजीराव झाकोळले गेले होते. संजय भन्साळीच्या सिनेमामुळे “मस्तानीचे प्रेमी” बाजीराव हे “पराक्रमी” बाजीरावापेक्षा मोठे ठरले. बाजीरावांवरील एका कार्यक्रमात मेजर जनरल (नि) शशिकांत पित्रे सर गेले होते. त्यात पराक्रमी बाजीराव कुठेच न दिसल्याने ते अस्वस्थ झाले. शांतपणे कार्यक्रम सोडून बाहेर आले. पण याच अस्वस्थतेतून “या सम हा” हे प्रचंड अभ्यासपूर्ण पुस्तक तयार झाले.

विसाव्या शतकाच्या आरंभी म्हणजे बाजीरावांनंतर सुमारे २०० वर्षांनी, युद्धतत्त्वांची चर्चा जागतिक स्तरावर सुरू झाली. या युद्धतत्त्वांवर आणि युद्धशात्र शिकवताना जे महान जागतिक युद्धविषयक तत्त्वज्ञ आहेत, त्यांच्या युद्धनीतीवर बाजीरावांची प्रमुख युद्धे पित्रे सरांनी तोलून दाखवली आहेत. या सर्व युद्धात ज्याला जागतिक मापदंड म्हणता येतील अशा पद्धतीने बाजीरावांनी सर्व युद्धे लढली आणि जिंकली आहेत. या युद्धांमध्ये खांडवा – बाळापूरची लढाई, गुजरात आणि कर्नाटक मधील मोहिमा या सुरुवातीला आहेत. या पुस्तकात सर्वाधिक चर्चा असलेली पालखेडची लढाई आहे. नंतर अमझेरा आणि बुंदेलखंड या लढाया आहेत. स्वराज्यातील आपसातील कलहाचे पर्यावसान म्हणजे दाभाड्यांच्या विरुद्ध केलेली डभईची लढाई आहे. शिवाजी महाराजांपासून सर्वांनी प्रयत्न करूनही हाती न आलेल्या जंजिऱ्याची मोहीम आहे. बाजीरावांनाही जंजिरा जिंकता आला नाहीच पण किमान सिद्दीने मराठ्यांचे मांडलिकत्व स्वीकारले. ही आर्धी जिंकलेली लढाई सुद्धा आहे. त्यांनंतर बाजीराव दिल्लीच्या दारात जाऊन परत आले त्याची संपूर्ण व्यूहात्मक चर्चा आहे. निजामाला भोपाळच्या किल्ल्यात वेढून पुन्हा गुडघ्यावर आणलं ते आहे. वसईच्या लढाईत चिमाजी अप्पांनी केलेली शर्थ आहे आणि शेवटची लढाईत निजामाच्या मुलाला – नासिरजंगला – हरवले ते आहे. या सर्व लढाया/युद्धे याबद्दल लिहिताना पित्रे सर कुठेही बाजीरावांना “आपल्या कादंबरीचा हीरो” म्हणून कोणतीही सवलत देत नाहीत. जी आधुनिक युद्धतत्त्वे मानली गेली आहेत, त्या प्रत्येक कसोटीवर घासून बघतात आणि अखेरीस एक अजिंक्य सेनापती म्हणून बाजीरावांचं सोनं झळाळून उठतं.

ज्या १० आधुनिक युद्धतत्त्वांवर बाजीरावांच्या लढाया तोलून बघितल्या ती तत्त्वे आहेत –
१. उद्दिष्टाची निवड आणि पाठपुरावा
२. सुरक्षितता
३. गतिक्षमता
४. आक्रमक चाल
५. बळाचा मितव्यय
६. बळाचे केंद्रीकरण
७. विस्मयकारकता
८. मनोधैर्य
९. सहकार्य
१०. युद्धव्यवस्थापन
पालखेडच्या लढाईवर या पुस्तकात ३ प्रकरणे आहेत. वरील प्रत्येक पैलू त्यात तोलून बघितला आहे. उदा: निजामाला पूर्ण मात हे उद्दिष्ट होतं, त्याचाच पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी शाहूंनी माघारी बोलावल्यावरही त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था करून, बाजीराव माघारी आले नव्हते. सहा महिने बाजीराव निजामाला आपल्या मागे लागण्यासाठी उद्युक्त करत होते. निजाम त्यांना गाठण्याआधीच पुढील टप्प्यावर पोहोचत होते. जेव्हा निजामाने बाजीराव आपल्या पकडण्याच्या बाहेर गेले आहेत असं वाटून माघारीची वाट धरली तेव्हाच बाजीरावांनी औरंगाबादवर चढाई केली आणि निजामाला पुन्हा बाजीरावांच्या मागे जावं लागलं. बाजीरावांकडे मुख्यतः घोडदळ असायचे. त्यामुळे गती, कमीत कमी बळाचा वापर आणि व्यवस्थापनात बुणग्यांची कोणतीही सोय करावी लागत नसे. पालखेडच्याच लढाईत निजामाचा तोफखाना हा युद्धक्षेत्रापासून काही किलोमीटर दूर अडवून ठेवला आणि बिना दात/पंजे असल्याप्रमाणे निजामाचे मनोधैर्य खच्ची केले. बाजीराव हे बारगिरांचे सेनापती होते. ते कायम आपल्या सैन्यात एका सैनिकासारखे वावरत. यामुळे त्यांच्या सैन्याचे मनोधैर्य कायम उच्च असे. अनेक लढायांमध्ये वेगवेगळ्या तुकड्यांचे निर्णय हे शिंदे, होळकर, पवार, चिमाजी आणि अन्य सरदार घेत. मात्र मूळ आराखडा बाजीरावांचा असे. त्यामुळे सैन्य विखुरलेले असताना केव्हा एकत्र करायचे आणि एकत्रित हल्ला करायचा याचे गणित पक्के असायचे.

या युद्धतत्त्वांशिवाय सुन्त्झू या चिनी युद्ध तत्त्वज्ञाने अडीच हजार वर्षांपूर्वी “द आर्ट ऑफ वॉर” नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यातील तत्त्वे आजही जगन्मान्य आहेत. याही कसोटीवर बाजीरावांची युद्धे तपासून पाहिली आहेत. यातील मुख्य बाबी –
१. न लढताच जिंकणे सर्वात उत्तम – निजामाची सगळीकडून कोंडी केली, त्याचा तोफखाना त्याच्याजवळ येऊ शकला नाही आणि पालखेडला प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढाई न होता निजाम शरण आला
२. जे अवघड आहे त्याची योजना ते सहज असतानाच आखावी, जे प्रचंड आहे, ते लहान असतानाच हाताळावे – निजामाने साताऱ्यावर चढाईचा विचार करताच बाजीराव वेगाने त्याच्या भागात घुसले आणि निजामाला त्याचा बेत बदलावा लागला. इथे जर निजाम साताऱ्यावर चालून गेला असता तर एकूण युद्ध खूप मोठं झालं असतं.
३. विजयाचा उन्माद साजरा करू नये, जे करतात ते रक्ततृषार्त असतात – बाजीरावांनी कधीही विजय साजरा केला नाही. दाभाड्यांना डभईला हरवल्यावर तर त्यांच्या आईंना भेटायला स्वतः गेले होते.
४. तुम्ही स्वतःला अजेय बनवा आणि शत्रू जेव्हा असुरक्षित असेल तेव्हाच त्याच्यावर हल्ला करा. आपण हरणार नाही अशाच ठिकाणी मुरब्बी लढवैये मोर्चेबंदी करतात आणि पराभवाला कारणीभूत ठरेल अशा कोणत्याही निमित्ताकडे दुर्लक्ष करत नाहीत – डभईच्या लढाईत बाजीरावांनी आधी दाभाड्यांना बाकी सैन्यापासून दूर नेले आणि नंतर नदीच्या चंद्रकोरीत अडकवले. इथे बाजीराव हरण्याच्या सगळ्याच शक्यता दूर झाल्या.
याच तत्त्वज्ञानातील दुसरा एक तत्त्वज्ञ, चुंग हो ची, म्हणतो की – गोंधळ होण्यापूर्वी गोंधळाची जाणीव असणे, संकट येण्यापूर्वी संकटाची जाणीव असणे, विध्वंसापूर्वी विध्वंसाची जाणीव असणे आणि आपदेपूर्वी आपदेची कल्पना असणे हे गहन ज्ञान आहे… या आणि अशा सर्व बाबी या बाजीरावांच्या बाबतीत तंतोतंत खऱ्या ठरतात.

कार्ल फॉन क्लाऊजवित्स हा बाजीरावांनंतर ८० वर्षांनी जन्मला. त्याने “ऑन वॉर” या ग्रंथात हालचालप्रधान युद्धांबद्दल लिहिले आहे. त्याने खालील मुद्दे मांडले होते –
१. शत्रूचा अन्नपुरवठा तोडणे/कमी करणे – भोपाळच्या किल्ल्यात निजामाला जेवण मिळणे मुश्किल झाले होते
२. शत्रूच्या तुकड्या विलग राखणे – पालखेड आणि डभई या दोन्ही ठिकाणी मुख्य तुकडीला विलग केले गेले होते
३. शत्रूला माघार अधिक धोकादायक करणे – प्रत्येक लढाईतच शत्रूला परतीच्या वाटा पूर्ण बंद केल्या होत्या
४. शत्रूची स्वतंत्र ठाणी मोडणे – दिल्लीच्या चढाईच्या आधी बाजीरावांनी आपल्या लहान लहान तुकड्यांच्या मार्फत अनेक ठिकाणी शत्रूला मात दिली होती (अपवाद – होळकरांचा पराभव)
५. शारीरिक आणि नैतिक परिश्रमाची तयारी – जे अंतर सामान्य घोडदळ ५ दिवसात पूर्ण करे, तेच अंतर बाजीरावांचे सैन्य २ दिवसात पूर्ण करत असे. घोड्यावर बसल्याबसल्याच शेतातील दोन कणसं घेऊन जेवण पूर्ण होत असे.
६. नेमकेपणा आणि शिस्त – बाजीरावांच्या सैन्याने कधीही लुटालूट केली नाही, कधीही कोणत्याही स्त्रीवर हात टाकला नाही
याही प्रत्येक मुद्यांमध्ये बाजीरावांचे युद्धकौशल्य वादातीतपणे सिद्ध होते.

बेसिल हेन्री लिडेल हार्ट हा हालचालप्रधान युद्धावरील मोठा भाष्यकार आहे. त्याच्या मांडणीत
– उद्दिष्ट आणि क्षमता या जुळल्या पाहिजेत – बाजीराव दिल्लीच्या दारी जाऊन हल्ला न करता परतले
– बदलत्या परिस्थितीत लवचिकता असली पाहिजे – होळकरांची तुकडी पराभूत झाल्यावर आग्र्याला शत्रुसैन्याची पार्टी सुरू होती. ते बघून बाजीरावांनी आग्र्याला वळसा घालून थेट दिल्ली गाठली
– शत्रूला अनपेक्षित बाजूने हल्ला केला पाहिजे – बंगश जेव्हा बुंदेलखंडात होता तेव्हा ५ दिवसांचे अंतर २ दिवसात कापून त्याच्यावर अनपेक्षित हल्ला केला होता
– शत्रूच्या क्षमता ओळखून, घाई न करता निर्णय घेतले पाहिजेत – निजामाला पालखेड आणि भोपाळ या दोन्ही ठिकाणी त्याचा तोफखाना वापरता आला नाही
– शत्रू सावध असताना हल्ला न करणे – बाजीरावांनी आग्र्याला हल्ला न करता थेट दिल्लीला धडक मारली
– जिथे विजय झाला तिथेच पुन्हा हल्ला न करणे आणि जिथे पराजय होतोय तिथेच अधिक वेळ न घालवणे – थोडक्यात लवचिकता असली पाहिजे – प्लॅन बी कायम तयार असले पाहिजेत

अशा विविध युद्धतत्वज्ञांच्या मुद्द्यांवर बाजीराव हे अद्वितीय योद्धे ठरतात.

अर्थात काही चुकीच्या म्हणता येतील अशा बाबीही होत्याच. त्याही पित्रे सरांनी व्यवस्थित मांडल्या आहेत.
१. त्यातील पहिली म्हणजे अति सौजन्यशीलता – सद्गुणविकृती. चाणक्यनीतीतील
अग्नि: शेषं ऋण: शेषं, शत्रु: शेषं तथैव च ।
पुन: पुन: प्रवर्धेत, तस्मात् शेषं न कारयेत् ।।
ही बाब बाजीरावांनी अमलात आणली नाही आणि निजामाला दोन वेळा मारता येत असतानाही सोडलं. वसईला सगळ्या धर्मांध पोर्तुगीजांना जिवंत जाऊ दिलं…
२. वसुलीच्या पद्धतीत कोणत्याही सुधारणा त्यांनी केल्या नाहीत. त्यात त्यांना स्वारस्य नव्हते, किंवा तेवढा वेळ मिळाला नाही
३. आधुनिक शस्त्रे, तोफा या आपल्या सैन्यात असाव्यात असा प्रयत्न केला नाही. त्यांचा भर वेगावर असल्याने दुर्लक्ष केले असेल, पण दुर्लक्ष केले हे खरे…
४. समुद्र केवळ आंग्ऱ्यांवर सोडला, त्यात कोणतेही नवीन प्रयोग केले नाहीत.
या उणिवा या गालावर लावलेल्या तीटासारख्या आहेत.

बाजीरावांनी शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हयातीत मोगल साम्राज्य नावापुरते शिल्लक राहिले. हिंदूपदपातशाही निर्माण होऊ शकेल हा विश्वास आला. मराठा सरदार हे गुजरात, माळवा आणि उत्तरेत स्थायिक झाले. या भागात सतत सुलतानी कराच्या ओझ्याखाली पिचलेल्या जनतेने मराठ्यांना मनापासून स्वीकारले आणि मराठ्यांनीही त्यांना सांभाळले. छोट्या स्वराज्याचे रूपांतर बाजीरावांनी आपल्या शौर्याने मराठा साम्राज्यात केले. छत्रपतींच्या या सेवकाला शतशः नमन 🙏🙏

पुस्तकाचे नाव – या सम हा
लेखक – मेजर जनरल (नि) शशिकांत पित्रे
प्रकाशक – राजहंस प्रकाशन
पृष्ठे – ३३५
किंमत – ₹४००

नवी भर दि.१८-०८-२०२०

जीवनात एकही युध्द न हरलेला एकमेव महान योध्दा अशी जागतिक इतिहासात नोंद.

१८ ऑगस्ट १७०० श्रीमंत बाजीराव पेशवे …. 🚩

बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा तर चिमाजी आप्पा धाकटा आईचे नाव राधाबाई बाजीरावांचे मूळ नाव विसाजी मात्र बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही प्रसिद्ध होते वयाच्या १३ व्या वर्षी काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३) बाजीरावांना चार मुलगे झाले त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला समशेर बहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावांनी ४० महत्त्वाच्या लढाया केल्या त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपुर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (मे १७३९) या मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले…

थोरल्या बाजीरावांना पराभूत करणे त्यांच्या शत्रूला कधीही शक्य झाले नाही हिंदवी स्वराज्य सैन्य भिमथडीच्या तट्टांना नर्मदा, यमुनेचे पाणी पाजणारा बाजीराव हा पहिलाच योद्धा होय…

बाजीरांवानी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्त्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्रा च्या बाहेर आपली सत्ता असायला हवी हे जाणून बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार हे मराठा सरदार उभे केले त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं पुढे आली…

बाजीरावांचा हिंदुस्थानभर मोठा दरारा होता १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केल तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला…

असा धुरंधर की ज्याचा कधी पराजय झाला नाही ज्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते अशा रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्ध नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या अशा थोरले बाजीराव पेशवे तथा बाजीराव बाळाजी भट यांची आज जयंती…

थोरल्या बाजीरावांची मुद्रा :
“।। श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान……।।”

उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यानी अतुल पराक्रम गाजवला……🚩

विनम्र अभिवादन

. . . . . . . . . ..  वॉट्सपवरून साभार दि.१८-०८-२०२०

—. . . . . . —-. . . . . .

नवी भर दि.०२-०३-२०२०

Bajirao -1

पालखेडची लढाई

पेशवे – Peshwe यांच्या फेसबुकावरील पानावरून साभार

पहिला बाजीराव आणि निजाम-उल-मुल्क यांच्यामध्ये १७२८ साली औरंगाबादच्या नैऋत्येस २८ मैलांवर (सु. ४५ किमी.) असलेल्या पालखेड (गोदावरी नदीच्या तीरावर महाराष्ट्रातील सध्याच्या पुणतांबे गावाजवळ) येथे झालेला संग्राम. जगाच्या इतिहासात एक महत्त्वाची रणनीती म्हणून या संग्रामाचा उल्लेख होतो. बाजीरावांच्या रणनीती आणि राजकारणचातुर्याने प्रभावित होऊन शाहू महाराजांनी बाजीरावांना वयाच्या १९व्या वर्षीच पेशवाईची वस्त्रे दिली होती आणि बाजीरावांनी तो विश्वास या लढाईत सार्थ करून दाखविला.

पार्श्वभूमी : बाजीरावांनी १७ एप्रिल १७२० रोजी पेशवेपदाचा पदभार घेतल्यानंतर लागलीच ते आलमखानाबरोबर मोहिमेवर गेले. पालखेडमधील त्यांचा प्रतिस्पर्धी निजाम-उल-मुल्क याच्या बरोबर त्यांची पहिली भेट ४ जानेवारी १७२१ रोजी चिखलठाण्यात आणि दुसरी २३ फेब्रुवारी १७२३ रोजी झबुवाजवळ बलाशामध्ये झाली. या भेटींदरम्यान आपल्यापेक्षा ३० वर्षांनी लहान असलेल्या बाजीरावांची कर्तबगारी चलाख निजामाने हेरली. दख्खनमधील आपल्या भावी आव्हानाची पुरेपूर कल्पना निजामाला येऊन चुकली. बादशाहाने निजामाचा नि:पात करण्यास धाडलेल्या मुबारीझखानाला सामोरे जाण्यासाठी निजामाने बाजीरावांच्या साह्याची याचना केली आणि ते तातडीने त्याच्या मदतीला धावून गेले. १ ऑक्टोबर १७२४ रोजी शक्करखेडा लढाईत मुबारीझखानाचा पराभव झाला. निजामाने मराठ्यांना ‘चौथाई’ देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय, या लढाईदरम्यान निजामानिकट वावरल्याने त्याच्या डावपेच आणि विचारसरणीमध्ये जवळून डोकावून पाहण्याची संधी बाजीरावांना मिळाली. या अमूल्य उपहाराचा बाजीरावांनी निजामाबरोबरील भावी लढायांत पुरेपूर उपयोग केला.

२० जून १७२५ रोजी बादशाहाने निजामाला दख्खनचा सुभेदार नेमले. लागलीच आपमतलबी निजामाने मराठ्यांविरुद्ध कारस्थाने सुरू केली. १७२५ आणि १७२७ मध्ये बाजीरावांनी कर्नाटकामध्ये मोहिमा काढल्या. याच काळात १७२७ मध्ये निजामाने शाहू महाराजांचे चुलतबंधू कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्याशी संधान बांधले आणि छत्रपती शाहूंशी असा दावा मांडला की, छत्रपतिपदाचा हक्क उभयता दोन्ही बंधूंनी निश्चित करावा व मगच चौथ-सरदेशमुखीसंबंधी धोरण ठरविण्यात येईल. वास्तविक शाहू महाराजांनी कृष्णा आणि घटप्रभा नद्यांदरम्यानच्या प्रदेशाची मालकी संभाजीराजांना देऊ केली होती; परंतु त्यांना ते मान्य नव्हते. निजामाची ही विनाकारण लुडबुड शाहू महाराजांना आवडली नाही. शाहूंच्या छत्रपतिपदास सुरुंग लावून मराठी राज्यात फूट पाडण्याचा निजामाचा हा डाव होता. बाजीरावाने हा डाव धुडकावून युद्धाची तयारी केली होती. निजाम आणि संभाजी महाराज यांच्या सैन्याची हालचाल साताऱ्याच्या दिशेने होत असल्याची बातमी शाहू महाराजांना मिळाली. त्यांचा कट्टर शत्रू उदाजी चव्हाण साताऱ्याला शह देण्याच्या इराद्याने रहिमतपूरजवळ पोहोचला होता. निजामाच्या कारस्थानांची खात्री शाहू महाराजांना पटली. निजामाला धडा शिकविणे आवश्यक होते. १७२७चा पावसाळा संपताच बाजीराव फौजेनिशी निजामाच्या मुलखावर चालून गेले. खानदेश, बऱ्हाणपूर, सुरत इ. भागांत चपळाईच्या मजला करून बाजीरावांनी निजामाच्या सैन्याला बेजार केले. चपळाईने विविध ठिकाणी हल्ले करून शत्रूला दमविण्याच्या रणनीतीमुळे निजामाचा तोफखानाही निरुपयोगी ठरला.

बाजीरावांची रणनीती : बाजीरावांची मदार सर्वथा घोडदळावर होती. निजामाच्या पाऊण ते एक लाख सैन्याविरुद्ध बाजीरावांच्या सेनेची संख्या फक्त पंचवीस ते तीस हजारांच्या घरात होती; परंतु शत्रूच्या संख्या वा शस्त्रबलाची पर्वा बाजीराव करत नसत. बुद्धिचातुर्यपूर्ण डावपेचांवर त्यांचा भर असे. शत्रूला वेढा घालणे, त्याची रसद तोडणे आणि त्याचा पाणीपुरवठा अडवणे यांसारख्या मार्गांचा परिणामकारक उपयोग करून शत्रूला गुडघे टेकविण्यास ते भाग पाडत. शक्यतो युद्ध न करता आणि आपल्या सेनेची वाताहत न होऊ देता प्रतिपक्षी सेनापतीचे मनोधैर्य खच्ची करून त्याच्यावर मनोवैज्ञानिक विजय मिळविण्याची अफलातून कला बाजीरावांना साध्य होती.

या वेळी आपल्या गती क्षमतेचा फायदा घेऊन मुघल सैन्याला लांब पल्ल्याचा पाठलाग करावयास भाग पाडायचे, ते थकून जेरीस आल्यावर त्यांना आपल्या निवडीच्या जागेच्या साठमारीत पकडायचे, रसद तोडून उपासमार करायची आणि शरण आणायचे, ही त्यांची योजना होती.

मराठा सैन्यापाशी तोफखाना नाममात्र होता; उलट, निजामाकडील तोफांचा संभार प्रबळ होता. हा असमतोल भरून काढण्याचा एकच उपाय होता, तो म्हणजे निजामाचा तोफखाना रणांगणाजवळ पोहोचण्याअगोदरच अडसर घालायचा. म्हणजेच शत्रूच्या सैन्याची त्याच्या तोफखान्यापासून ताटातूट करण्याची नीती! ही किमया बाजीरावांनी अद्भुत रीत्या साधली. पालखेडची लढाई हा या सर्जनशील रणनीतीचा बेजोड आविष्कार होता.

घोडदळाचा भर गतिमानतेवर असतो. ही वावटळ कोणत्या बाजूने आणि केव्हा धाड घालेल, याची बाजीरावांच्या शत्रूला सदैव धास्ती वाटे. कोणताही लवाजमा आणि अवजड सामान नसल्याने आपल्या योजना शत्रूच्या हालचालींनुसार किंवा लढाईच्या धावत्या परिस्थितीनुसार बदलण्याची लवचीकता त्यांना उपलब्ध होती. त्याचबरोबर शत्रूचा पराभव संरक्षणात्मक पवित्र्याने नव्हे, तर आक्रमक चालीनेच होऊ शकतो, यावर बाजीरावांचा दृढ विश्वास होता. अशा प्रकारे गतिमानता (Mobility), लवचीकता (Flexibility) आणि आक्रमकता (Offensive Spirit) हे त्रिसूत्र बाजीरावांच्या सामरिक नीतीचा आणि कारवाईचा आत्मा होता.

बाजीरावांनी आखलेल्या युद्धयोजनेचे दोन पैलू होते. निजामाच्या सैन्याला आपला पाठलाग करावयास लावून स्वराज्याबाहेर दूरच्या मुलखात न्यायचे, त्याचे सैन्य दमल्यावर आपल्या निवडीच्या जागी त्याला घेरायचे आणि लढाईत त्याला पराजित करायचे. या कारवाईची धुरा बाजीरावांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. दुसरीकडे, आधीपासूनच आपल्या अनुपस्थितीत नाशिकपासून दक्षिणेकडील स्वराज्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी बंधू चिमाजीआप्पांवर त्यांनी सोपविली होती. त्यासाठी शाहू महाराज आणि दरबार तात्पुरता पुरंदर किल्ल्यावर हलविण्यात आला होता. त्यांच्या संरक्षणासाठी पुणे परिसरात शिंद्यांच्या तुकडीला तैनात करण्यात आले होते. जुन्नर, पेडगाव, पाटस, खेड वगैरे मुलखांचे संरक्षण त्यांनी चिमाजीआप्पांवर सोडले होते. काही झाले तरी शत्रू पुरंदरवर कधीही हल्ला करू शकणार नाही, याची तजवीज करण्याचा दोन्ही बंधूंनी निर्धार केला होता.

युद्धपूर्व हालचाली : सुरुवातीचे डावपेच : जुलै-ऑगस्ट १७२७ मध्ये ऐवजखानाने सिन्नरवर हल्ला केल्यानंतर हालचालींना आरंभ झाला. जून ते सप्टेंबर १७२७ मध्ये निजामाच्या सैन्याचा तळ धरुर भीरमध्ये होता. ऑक्टोबरमध्ये निजामाने भीरपासून साताऱ्याच्या दिशेने आगेकूच केली. बाजीरावांनी लागलीच गाजावाजाने औरंगाबादच्या दिशेने प्रयाण केले. नंतर पारनेर आणि अहमदनगर उजवीकडे सोडून ते पुणतांब्याला पोहोचले. त्यांनी गोदावरी नदी ओलांडली आणि पूर्वेकडून वळून निजामाच्या हद्दीतील जालन्यावर हल्ला चढविला. त्यानंतर बऱ्हाणपूरवर चाल करण्याची त्यांनी खोटी बतावणी केली. बऱ्हाणपूर त्या काळचे महत्त्वाचे व्यापार आणि दळणवळणाचे केंद्र होते; परंतु बऱ्हाणपूरला न जाता बाजीराव डिसेंबर १७२७ मध्ये वाशिममध्ये दाखल झाले आणि ‘चौथ’ गोळा केला. बऱ्हाणपूरच्या दिशेने बाजीराव जात आहेत, हे ऐकून निजामाचे धाबे दणाणले आणि त्याने आपले सैन्य बऱ्हाणपूरकडे वळविले. बाजीरावांना हेच अपेक्षित होते. त्यांनी वाशिम सोडले आणि मंगळूर-माहूर मार्गे वायव्येच्या दिशेने चोपडाला पोहोचून तापी नदी ओलांडली. १८ डिसेंबर १७२७ रोजी ते काकरमुडाला पोहोचले. नंतर बावापीर गंदोडला नर्मदा पार करून त्यांनी भडोचकडे आपला मोर्चा वळवला. हे कळल्यावर निजामाने दिशा बदलून भडोचच्या दिशेने आगेकूच केली. संथ चालीने मार्गक्रमण करणाऱ्या त्याच्या सैन्याने काही अंतरच कापले होते, तेव्हा बाजीराव गुजरातमधील छोटा उदयपूरजवळ पोहोचल्याची बातमी त्याला कळाली. एव्हाना १७२८चा जानेवारी उजाडला होता. गेले तीन महिने कूर्म गतीने चालणारे निजामाचे अगडबंब सैन्य पार थकून गेले होते. बाजीरावांचा पाठलाग करण्याची आपली चूक निजामाला कळून चुकली होती. आता बाजीरावांना परतण्यास भाग पाडण्याचा निजामासमोर एकच उपाय होता, तो म्हणजे पुण्यावर हल्ला करण्याचा.

निजामाने ‘पिछेमुड’ करून पुण्याचा रस्ता धरला. शिवाय निजामाला गुजरातचे वावडे होते; कारण तिथला मोगलांचा सुभेदार सरबुलंदखान हा निजामाचा कट्टर प्रतिस्पर्धी. निजाम त्याच्या मुलखात जाणे टाळेल, हे चाणाक्ष बाजीराव जाणून होते. निजामाचे सैन्य जुन्नर, उदापूर, नारायणगड, औसेरी, खेड जिंकून पुण्याला पोहोचले. ८ जानेवारी १७२८ रोजी निजामाच्या पुढाकाराने संभाजी महाराजांच्या लग्नाचा समारंभ पुण्याला झाला. निजामाची अपेक्षा होती की, बाजीराव घाबरून पुण्यास परततील; परंतु बाजीरावांचा चिमाजीआप्पांवर पूर्ण भरवसा होता. निजामाला पुन:श्च चालता करण्यासाठी बाजीरावांनी आपला मोर्चा निजामाची पूर्व राजधानी औरंगाबादकडे वळविला. ते तातडीने खानदेशात पोचले आणि १४ फेब्रुवारी १७२८ रोजी मराठा सैन्य धुळ्याजवळील बेलवाडला धडकले.

बाजीरावांच्या औरंगाबादवर हल्ला करण्याच्या मनसुब्यामुळे निजाम हबकला आणि त्याने पुणे सोडून उत्तरेकडे प्रयाण केले. १२ फेब्रुवारीला तो अहमदनगरला पोहोचला. बाजीरावांना हेच पाहिजे होते. निजाम गोदावरी ओलांडण्याच्या दिशेने येत आहे, हे पाहून पालखेडमध्ये सापळा लावण्याचे बाजीरावांनी ठरविले. गेल्या चार महिन्यांच्या बाजीरावांच्या अथक परिश्रमापश्चात दिशाहीन भटकंतीनंतर दमले-भागलेले निजामाचे सैन्य मराठ्यांनी लावलेल्या जाळ्याकडे वाटचाल करीत होते. पालखेडची रणदुंदुभी गर्जू लागली.

मराठा सैन्य : मराठा सैन्य स्वराज्याच्या प्रेरणेने पेटलेल्या शिलेदारांचे होते. पंचवीस ते तीस हजार संख्येच्या बाजीरावांच्या सैन्यात बहुसंख्य घोडदळ होते. वाटेत मिळेल ते खाऊन ते आपला गुजारा करत. त्यामुळे शिधा आणि राहुट्यांचे ओझे त्यांच्याजवळ नसे. घोडेस्वाराच्या वैयक्तिक गरजा घोड्याच्या पाठीवरच असत. त्यायोगे गतिमानता आणि चपळता त्यांच्या अंगी बाणली जात असे. परंतु मराठा सैन्याची प्रमुख उणीव म्हणजे तोफखाना. तोफखान्याच्या उणिवेमुळे त्यांच्या गतिक्षमतेत जरी भर पडत असली, तरी मोगलांच्या जंगी तोफांपुढे मराठा सैन्याला कच खावी लागण्याची शक्यता होती.

नेतृत्व : बाजीरावांचे नेतृत्व कणखर, चतुर आणि सैन्याचे मनोबल उंचाविणारे होते. आपल्या सैनिकांत मिळूनमिसळून राहण्याने सैनिकांमध्ये निष्ठा आणि भरोसा निर्माण होत असे. सैन्याच्या तुकड्यांचे सेनापती सामान्य शिलेदारांमधून त्यांच्या गुणांची पारख करून निवडलेले होते. सैन्यात विलक्षण एकसूत्रता होती.

निजामाचे सैन्य : निजामाच्या सैन्याची संख्या लाखाच्या घरात होती. संख्याबलात आणि शस्त्रबलात श्रेष्ठ असूनही इच्छाबलात मात्र मराठ्यांच्या तुलनेत ते कमी होते. पैशाच्या मुबलकतेमुळे सुखलोलुपता अंगी भिनली होती. तसेच धनधान्य आणि इतर गरजा जनावरांवर लादून नेण्याच्या प्रथेमुळे त्यांच्या सवयी ऐषारामी होत्या आणि गतिमानता कमजोर होती. लढाऊ दलाच्या मानाने त्यांच्या साहाय्यदलाचा आकार अवजड असायचा (‘Teeth to Tail Ratio’). मोगलांचा तोफखाना मात्र बलाढ्य होता आणि योग्य लक्ष्य लाभल्यास केवळ तोफांकरवीच शत्रूचा विध्वंस साधून विजय प्राप्त करण्याची त्यांच्यात क्षमता होती. परंतु बोजडपणामुळे आणि अवाढव्यपणामुळे मोगल सैन्यात एकसूत्रता, गतिमानता आणि लवचीकता यांचा पूर्ण अभाव होता.

नेतृत्व : निजाम-उल-मुल्क हा मोगल सेनापती एक कर्तबगार तुराणी होता. हा कावेबाज, कुटिल, शूर आणि कसलेला सेनानी होता. परंतु लढाईच्या मैदानावर आघाडीच्या सैन्यापासून निजाम खूप मागे असे आणि डावपेच त्याच्या सेनादलांतील नेते वापरीत असत. त्यामुळे लढाईच्या आघाडीवर निर्णयामधे विलंब होत असे. बहुसंख्य सैन्य मराठा सरदारांचे असल्यामुळे सैनिक निजामाशी निष्ठावान नव्हते.

रणभूमी : भौगोलिक विश्लेषण : समुद्रसपाटीपासून १६०० फूट उंचीवर असलेल्या पालखेडचे क्षेत्र मैदानी होते. गोदावरी नदी नैऋत्येला १५ मैलांवर असून तिथून जवळच प्रवरा नदी तिला मिळते. प्रवरेत मुठेचे पाणी येते. त्यामुळे गोदावरीचे पात्र रुंद, मुबलक पाण्याने भरलेले. ती ओलांडण्याची एकच जागा म्हणजे पुणतांबे. पालखेडच्या आग्नेयेस आणि पूर्वेच्या दिशेने शिवनाला ती वाहत असे. पालखेडच्या सान्निध्यातील पिण्याच्या पाण्याचा तो एकमेव स्रोत होता. उत्तरेला प्रदेश चढत जात होता आणि २५ मैल दूर २२०० फूट उंचीवर घनदाट अरण्य होते. ते पार करणे कठीण होते. उत्तरेस अरण्य, पूर्वेस शिवनाला आणि दक्षिणेस गोदावरी अशा सर्व बाजूंनी अडथळ्यांनी वेढलेले पालखेडचे रणांगण बाजीरावांच्या डावपेचांना पूरक होते.

लढाईचा आराखडा : बाजीरावांच्या रणनीतीचे तीन प्रमुख घटक होते. त्यांच्या अनुमानानुसार निजामाच्या अगडबंब सैन्याला गोदावरी पार करण्यास तीन दिवस लागणार होते. पहिल्या दिवशी पाहणी आणि योजनेसाठी आघाडीच्या तुकड्या गोदावरी पार करून येणे अपेक्षित होते, दुसऱ्या दिवशी प्रमुख सेना, काही रसद आणि बाजारबुणगे आणि तिसऱ्या दिवशी तोफखाना आणि अवजड रसद. तोफखान्याला निजामाच्या इतर सेनेपासून वेगळे करण्याचा बाजीरावांचा मुख्य डाव होता. तोफखाना हे मोगलांचे प्रमुख अस्त्र होते. त्याला गोदावरी ओलांडण्यासच मज्जाव केला, तर त्यांचे हे युद्धविजयी अंगच निकामी होणार होते. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मुख्य सेना गोदावरी ओलांडून सापळ्यात आल्यावर पुणतांब्याची ओलांडण्याची जागाच आपल्या तुकडीद्वारे गोठवून टाकली की, १५ मैल दूर असलेला तोफखाना कुचकामी होईल, हा रणनीतीचा पहिला घटक होता.

दुसरा घटक निजामाची रसद तोडणे, हा होता. निजामी सैन्याचा शिधा आणि सामान गाढवांवर लादलेले असे. हा घोडे-गाढव चमू पालखेड रणक्षेत्रात आला की, रात्री गनिमी हल्ला करून त्यांना चारी दिशांना पळवून लावायचे आणि रसद व त्याबरोबर जनावरांच्या वैरणीची धूळधाण करायची, हा डावपेच.

तिसरा घटक म्हणजे शत्रूला पाण्याविना मारायचे. शिवनाल्याला तसे फेब्रुवारीमध्ये पाणी कमीच. विहिरीही कोरड्या. गोदावरी आणि शिवनाल्यावर शत्रुसैन्याला पाण्यापर्यंत पोहोचू द्यायचे नाही, हा तिसरा कावा. निजामाच्या सैन्याचा शिधा आणि पाणी अडवले तर निजाम शरण येईल, याची बाजीरावांना खात्री होती. उत्तरेकडे अरण्य आणि दक्षिणेकडे गोदावरी याची पूर्णत: नाकेबंदी केली, तर त्यांचे मार्गच खुंटतील, हे निश्चित होते.

पालखेडची लढाई आणि तह : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्याअखेरीस पालखेडमध्ये बाजीरावांच्या सैन्याची मोर्चाबंदी पूर्ण झाली होती. पूर्वेस बाजीराव, उत्तरेस पिलाजी जाधव, पश्चिमेस मल्हारराव होळकर आणि दक्षिणेस दवाजी सोमवंशी असे मांडणीचे स्वरूप होते. १७ फेब्रुवारी १७२८ या दिवशी निजामी सैन्याचा अग्रभाग धापा टाकत पुणतांब्याला पोहोचला. १८ फेब्रुवारीला निजामाने स्वतः गोदावरी पार केली. १९ आणि २० फेब्रुवारीला उरलेले सैन्य, जनावरे आणि जनाना पार झाले. आता फक्त गोदावरीच्या उतारापासून चार-पाच मैलांवर असलेला तोफखानाच पार होणे बाकी होते.

पुणतांबे ओलांडण्याची जागा २१ फेब्रुवारीला बाजीरावांच्या सैन्याकडून गोठविली गेली. तोफखान्याला तिथे पोहोचणे दुरापास्त झाले. शिवनाल्यावर पाणी आणण्यास गेलेल्या लोकांवर गोळ्यांचा वर्षाव झाला. संध्याकाळी रसदीच्या घोडे-गाढवांवर अचानक वावटळीसारखा हल्ला झाला आणि जीव वाचविण्यासाठी निजामाचे सैन्य चारी दिशांत सैरावैरा धावले. रात्री-अपरात्री सैन्याच्या तुकड्यांवर गनिमी हल्ले चालू झाले. २५ फेब्रुवारीपर्यंत मराठ्यांचा वेढा घट्ट झाला. निजामाच्या सैन्याची उपासमार होऊ लागली. पाण्याविना माणसे आणि जनावरे तडफडू लागली. निजामाला बाजीरावांसमोर गुडघे टेकण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. त्याने ऐवजखान आणि चंद्रसेन जाधव यांना बाजीरावांबरोबर सामोपचाराची बोलणी करण्यास धाडले. ६ मार्च १७२८ रोजी मुंगी शेवगाव येथे तहावर सह्या झाल्या. त्यातील १७ कलमे शतप्रतिशत शाहू महाराजांना अनुकूल होती. दक्षिणेतील सहा सुभ्यांचा चौथ व सरदेशमुखी, निजामाने काबीज केलेल्या गावांची मालकी आणि संभाजी महाराजांची कृष्णा, घटप्रभा प्रदेशाला संमती यांचा त्यात समावेश होता.

रक्ताचा थेंब न सांडता निजामाच्या प्रचंड सैन्याला शरण आणणे हा बुद्धी, मुत्सद्देगिरी आणि शक्तीचा अद्वितीय संगम होता. म्हणूनच फील्ड मार्शल माँटगोमेरी यांनी जगात झालेल्या सर्वोत्कृष्ट लढायांवर लिहिलेल्या सुप्रसिद्ध ग्रंथात (A History of Warfare : Field-Marshal Viscount Montgomery of Alamein) पालखेडचा अग्रभागी समावेश केला आहे. या संग्रामामुळे मराठ्यांचे परंपरागत गनिमी युद्धतंत्र श्रेष्ठ आहे, हे पुन्हा सिद्ध झाले.

– मेजर जनरल शशिकांत पित्रे

——————————-

नवी भर दि. २६-०२-२०२०

Madhav Vidwans

#२५फेब्रुवारी *

तो फक्त २५वर्षांचा तरुण सेनापती होता. त्याचा शत्रू वयाने, अनुभवाने दुप्पट वर कसलेला सेनापती. त्या तरुण विराकडे सैन्य फक्त २५,०००आणि त्याच्या शत्रूकडे ४०,००० आणि ६५०तोफांचा त्या काळातील सर्वोत्तम तोफखाना.
नेमका तो तरुण सेनानायक राज्यापासून दूर दक्षिण दिशेला असताना, शत्रूच्या राजाने खुद्द राजधानीवर चाल केली, आपल्या बलाढ्य फौज व तोफखान्यासह…शत्रूची ही अपेक्षा की तो तरुण त्याची राजधानी वाचवण्यासाठी धावत येईल आणि आपल्या तावडीत सापडेल….पण…पण …घडले भलतेच : तो तरुण वायूवेगाने दक्षिणेतून निघाला आणि अचानक शत्रूच्या राज्यात आतपर्यंत शिरला, नुसता धुमाकूळ घालत लुटालूट सुरू केली. शत्रूला आता त्याच्या मागे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. तो राजधानी जिंकण्याचा विचार सोडून त्या तरुण वादळामागे धावला, पण वादळच ते…कधी खानदेश, तर कधी मराठवाडा तर अचानक गुजरात अशी शत्रूची आपल्यामागे फरपट करत होते..त्यातून अचानक बातमी आली – ते वादळ माळव्यात शिरले. आता शत्रूची खाशी राजधानीच मारणार …शत्रूला वेगवान हालचाली करता येत नव्हत्या म्हणून त्याने त्याचा तोफखाना मागे सोडून दिला आणि त्या वादळाचा पाठलाग सुरू केला पण हाती काहीच लागेना.
अन तश्यातच बातमी आली, शत्रूचा मागे सोडलेला तोफखाना त्या तरूण पोराने लुटून नेला…शत्रू आता पूर्ण हताश होऊन मराठवाड्यातल्या एका गावापाशी थांबला. दिवस उन्हाळ्याचे होते, रणरणता मराठवाड्याचा उन्हाळा, पाण्यासाठी नुसती घालमेल झालेली. शत्रूचे सैनिक जेव्हा पाणी आणायला जवळच्या तलावाजवळ पोचले तर पाहतात तो काय? ते तरुण वादळ आणि त्याचे सैन्य तलावाची वाट अडवून उभे…पाणीच तोडले, आधीच दमछाक आणि आता पाणी तोडले.
अखेर व्हायचे तेच झाले…तो बलाढ्य, अनुभवी शत्रूराजा एका तरुण पोराला शरण आला. शत्रूचा सम्पूर्ण पराजय, तो ही आपला एकही सैनिक न गमावता…

जगाच्या इतिहासात अशी लढाई झाली नाही…आजही जगातील प्रमुख देशांच्या सैन्य अधिकाऱयांना ही लढाई *Strategic Planning* चा वस्तुपाठ म्हणून शिकवली जाते.

*25 फेब्रुवारी 1728* – *पालखेडची लढाई*

तो बलाढ्य शत्रू :- निजाम उल मुल्क  वय : 57,

ते तरुण वादळ :-  *श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे*   वय : 28 फक्त

👌🏻🚩👌🏻🚩👌🏻🚩         ……. फेसबुकवरून साभार

———————————-

नवी भर : या वर्षी मिळालेले आणखी काही लेख आणि चित्रे खाली दिली आहेत.  … दि.१८-०८-२०१९

उण्यापुऱ्या ४० वर्षांच्या आयुष्यात* आणि २० वर्षांच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत, एकही लढाई न हरता ४१ लढाया जिंकून, हिंदवी स्वराज्य वाढवणाऱ्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे (बल्लाळ बाळाजी भट) ह्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
* जन्म: १८ ऑगस्ट १७००, मृत्यू: २८ एप्रिल १७४०
फोटो: १) शनिवार वाड्यासमोरील थोरल्या बाजीरावांचे शिल्प (वर दिला आहे) २) इ.स. १७६० मधल्या हिंदुस्थानचा नकाशा (हिंदवी स्वराज्याचा विस्तार फिकट पिवळ्या रंगात दाखवला आहे)
– शरद केळकर
१८ ऑगस्ट २०१९

बाजीराव ७


पंतप्रधान श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती !!!
मराठा साम्राज्यास भारतात प्रतिष्ठा दिली त्या बाजीराव पेशव्यांची आज जयंती (१ ८ ऑगस्ट १ ७ ० ० ) कारकिर्दीत ४ १ लढाया केल्या त्यात एकातही हार नाही . General Montgomery व Grantt Duff या दोन ब्रिटीश लेखकांनी बाजीराव पेशव्या बद्दल बरेच लिखाण केले आहे .
दिल्लीकरांना महाराष्ट्राची गरज बाजीरावापासूनच पडू लागली . सध्या मात्र चित्र उलटे झाले आहे . नादीरशहाने आक्रमण करताच बादशाहने बाजीरावाची मदत मागीतली .परन्तु बाजीराव नर्मदा ओलांडायचे आताच लूट करून नादीरशहा परत गेला. बाजीरावास बहुधा उष्माघात किंवा विषम ज्वर झाला असावा . त्यातच त्याचा अंत झाला . नर्मदा तिरावर रावेरखेडा येथे त्याची समाधी नर्मदा प्रकल्पात बाधित होत असल्याने गुजरात सरकार आता त्याची नव्याने बांधणी करणार आहे
वास्तविक धनगर समाजातील मल्हारराव होळकर ,तसेच सामान्य मराठा कुटुंबातील सध्याच्या ग्वाल्हेर संस्थानचे शिंदे,बडोदा येथील गायकवाड , देवासचे उदाजी पवार यांना पेश्व्यानीच त्यांचे अंगची धडाडी ,चातुर्य ,व्यवस्थापन कौशल्य पारखून मुलखाची जबाबदारी सोपविली व त्यांनी ती सार्थ केली . मस्तानी सारख्या आंतरधर्मीय स्त्री बरोबर विवाह करून सेकयुलर असल्याचा दाखलाही दिला परंतु समाजसुधारकांच्या यादीत बाजीरावाचे नाव नाहीच त्याच्या पराक्रमाची दखलही कोणी घेत नाही. पुण्यातील बाजीराव रस्ता सोडला तर त्यांचे नावे शाळा कॉलेज ,काही नाही निदान त्यांचे नावे सैनिक स्कूल तरी व्हावे .

झाडाच्या फांद्या तोडण्यापेक्षा मुळावर घाव घालणे हि बाजीरावाची रणनीती होती
महाराष्ट्रात त्याची आठवण कोणास नसो पण क्षात्र तेजाने तळपणाऱ्या या आपण अभिवादन करु.
* कसे जाल बाजीरावाचे समाधीकडे
मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर इंदूर ट्रिपचे वेळी बाजीराव समाधीस जरूर भेट द्या
रावेर खुर्द किवा रावेरखेडी येथे जाणेसाठी सनावद्वारून कटोरा मार्गे चांगल्या रस्त्याने जाता येईल मधेही रस्ते आहेत पण माहितीकारून मगच जावे खरगोन किंवा मंडलेश्वर कडूनही माहेश्वरचे बाजूने नर्मदेच्या दक्षिण तीरावर जाता येईल
.रावेर बाजीराव स्मृती ,ओंकारेश्वर . मांडू (राणी रूपमती ) ,उज्जैन(महांकालेश्वर ), बाघ गुंफा(पेंटीग्ज ) ,माहेश्वर (नर्मदा घाट ),इंदूर (खवैयांची नागरी ) ,धार हि मराठमोळी ठिकाणे हे सर्व एकाच ट्रीप मध्ये होईल
खाली हिंमतबहादूर श्रीमंत जितेंद्रसिह गाईकवाड बडोदा समाधीस्थानी


बाजीरावपेशवे यांचे जन्मस्थान
डुबेरे गावचा बर्वे वाडा – बाजीरावाचे जन्‍मस्‍थान
(चंद्रशेखर बुरांडे यांचा लेख )     —- श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरील पानावरून साभार

थोरल्या बाजीरावांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात डुबेरे येथील बर्वे वाड्यात १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला. थोरले बाजीराव हे राधाबाई व बाळाजी विश्वनाथ यांचे प्रथम संतान. बाळाजी विश्वनाथ भट हे स्वकर्तृत्वाने अनेक वर्षांच्या सेवेनंतर पेशवे पदावर पोचले.

मल्हार बर्वे यांना छत्रपती राजारामांकडून, गंगथडी प्रांतात चौदा महालांची चौथाई व जहागिरी मिळाली होती. पेशव्यांच्या पागेला चारा व खिल्लारे पुरवण्याचे काम बर्वे करत असत. पुढील काळात, त्यांनी निफाडजवळ कोहुरे व डुबेरे ही गावे वसवली. छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांना त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षीच पेशवेपदी नियुक्त केले. थोरले बाजीराव मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी आयुष्यभर यशस्वीपणे लढत राहिले. अवघे चाळीस वर्ष जीवन लाभलेल्या व उभ्या आयुष्यात एकही लढाई न हरलेल्या त्या धूर्त, पराक्रमी व मुत्सद्दी पेशव्याचा अंत, २८ एप्रील १७४० रोजी, मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील, रावेरखेडी येथे उष्माघाताने झाला. त्यांचा अंत्यसंस्कार रावेरखेडी येथे करून त्यांची समाधी नर्मदेच्या काठावर बांधण्यात आली.

डुबेरे हे गाव सिन्नरच्या दक्षिणेला सात किलोमीटर अंतरावर आहे. एका बाजूला औंढा पट्टयांची रांग व दुस-या बाजूला सप्तशृंगी देवीचे मंदिर असलेला डुबेर डोंगर. त्‍या डोंगर पायथ्याशी दाट झाडीत डुबलेले म्हणून गावाचे ‘डुबेरे हे नाव. त्या परिसरात अजूनही पेशवेकालीन बैठी व दुमजली घरे आहेत. डुबेरे गावातील मुख्य गल्ल्या व बोळ; अरुंद रस्ते एकमेकांना समांतर व काटकोनात छेदणारे आहेत, हे विशेष. बर्वेवाडा गावाच्या मध्यभागी आहे. तो १६९५ च्या आसपास बांधला गेला असावा. वाड्याचे बांधकाम भक्कम आहे. ते चपट्या विटा व चिरेबंद घडीव दगड यांनी केलेले आहे. चहुबाजूनी तटबंदीआहे. वाड्यास एक टेहळणी बुरुज आहे. त्या बुरुजावरुन गावाचा पूर्ण परिसर नजरेत भरतो. वाड्याच्या संरक्षणार्थ, गच्चीवरील अर्धगोलाकार मुंढा-यांच्या तळ भागातील जंग्याचा उपयोग शत्रूवर गोळ्या झाडण्यासाठी असे. मध्यंतरीच्या काळात पडझड झालेल्या भागाची डागडुजी चुकीच्या कार्यपद्धतीने झाल्याचे दाखले इमारतीवर ठिकठिकाणी दिसून येतात. त्यामुळे वाड्याच्या सौंदर्यास बाधा पोचली आहे. अशी दृष्ये संवेदनशील मनाला पटत नाहीत.

मुख्य रस्त्यावरुन पश्चिम दरवाज्याकडे जाताना सर्वप्रथम नजरेत भरतात त्या उत्तराभिमुख चिरेबंद भिंतीच्या खोबणीत चपखलतेने बसवलेल्या सलग रेषेतील सात खिडक्या. त्या विशिष्ट आकृतिबंधातील लाकडी खिडक्या ही बर्वे वाड्याची शान आहे! त्या जागेतून, युद्धावर निघालेल्या किंवा पराक्रम गाजवून परतणा-या स्वकुळातील पुरुषांवर किंवा अती महत्‍त्‍वाच्या पाहुण्यावर स्वागतपर पुष्पवृष्टी करण्याचा रिवाज असे. तसेच, पश्चिम दरवाज्यावरील नगारखान्यात वाद्यघोष वाजवून, लढाई जिंकून परतलेल्या शूर वीरांचे व पाहुण्याचे स्वागत करत असत.

वाड्याच्या आतील रचना भारतीय वास्तुशास्त्रावर आधारित आहे. भारतीय वास्तुशास्त्रात खुल्या चौक रचनेला महत्त्व आहे. भौगोलिक दिशेचा उपयोग व तिन्ही ॠतूंत फायदेशीर ठरणा-या आणि निसर्गनियमांशी मिळत्याजुळत्या सुरक्षित जीवनशैलीला ‘भारतीय वास्तुशास्त्र’ म्हणतात. महिला व मुले यांच्या स्वास्थ्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश व शुद्ध हवा यांची गरज असते हे ओळखून चौकांची मांडणी व आकार ठरवत असत. त्या रचनेमुळे सूर्यास्तापर्यंत घरात परिवर्तित मंद प्रकाश पडे व हवा खेळती राही. पूर्वेकडील प्रवेशद्वारातील आयताकृती चौकाला लागून तीन फूट उंच चिरेबंदी जोत्यावर, कर्मचा-यांसाठी कचेरी व बैठकीची व्यवस्था आहे. त्या जोत्यावर सम अंतरातील लाकडी खांबांचा सांगाडा व चौफुली आकाराच्या लाकडी तुळयांवर आधारित कौलारू छताची रचना साधली आहे. रखरखीत सूर्यप्रकाशाची प्रखरता कमी करण्यासाठी लाकडी जाळ्यांचा उपयोग केला आहे. मोठ्या चौकानंतर दोन लहान सम आकारातील चौकांपैकी एका चौकात तुळशी वृंदावन व दुस-यात पिण्याच्या पाण्याचे आड (छोट्या गोल आकाराची घडीव दगडात बांधलेली विहीर) आहे. चौकांवर माजघर, देवघर, स्वयंपाकघर व स्वच्छतागृहांचा प्रकाश निर्भरित आहे. वाड्याचा आराखडा फक्त सुरक्षिततेला महत्त्व देऊन बनवला आहे. देवघराचा दरवाजा, लाकडी तुळयांचे टोक व खांबावरील जुजबी नक्षीकाम सोडले तर कलासौंदर्याला फारसा वाव दिलेला दिसत नाही. तसेच, खोल्यांची उंची कमी का ठेवत याचाही खुलासा होत नाही.

युद्धकाळ किंवा अडीअडचणीच्या वेळी, धान्यसाठा मुबलक असावा यासाठी वाड्यात बळंद (दोन भिंतीतील पोकळी) व इतर खोल्यांची रचना केली आहे. बळंदात उतरण्यासाठी लाकडी ओंडक्यांची व्यवस्था आहे. तेथे परिवर्तित सूर्यप्रकाश व शुद्ध खेळती हवा राहील असे नियोजन आहे. तळमजल्यावरील भिंतीत केलेल्या पोकळीची लाकडी झडप वर ओढून हवे तेवढेच धान्य काढता येई. पडवी ते माजघर मार्गावरील भिंतीच्या रुंद गाभ्यातील अरुंद जिन्याची रचना अपरिचित माणसास चटकन दिसू नये अशी आहे. चार ते पाच फूट रुंद भिंतीच्या गाभ्यात सामानासाठी फडताळे व मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी गुप्त कोनाडे आहेत. रात्रप्रकाशदिव्यांसाठी ठिकठिकाणी छोटे कोनाडे व वस्तू अडकवण्यासाठी लाकडी खुट्यांचा वापर आढळतो.

बाळंत स्त्रीस आवश्यक असणा-या, थंड व उबदार खोलीची रचना वास्तुशास्त्रास धरुन आहे. त्या खोलीतील खिडक्यांची रचना जरुरीपुरता सूर्यप्रकाश, शुद्ध हवा व गरम हवेचे संतुलन राहील अशी आहे. अवघडलेल्या बाळांत स्त्रीस, अंघोळ घालण्यासाठी केलेल्या रचनेतील वेगळेपण समजावल्याशिवाय कळत नाही! परस्थ स्त्रियांना, बाह्य दरवाजातून आत घेण्यासाठीची सूचकता व वरील रचनेतील सर्व खुबी पाहून नवल वाटते! त्यावरुन, वर्तमान आधुनिक जीवनपद्धतीतील कृत्रिमपणा भारतीय जीवनशैलीशी किती फारकत घेणारा आहे हे दिसून येते! त्यामुळेच, शहरात तोकड्या सदनिकेत ‘न मिळणारे वास्तुसुख शोधणा-यांची संख्याच अधिक आहे;
साधारण दोन एकर जमिनीवरील तटबंदीचा जोत्यापर्यंतच्या भाग दगडात व त्यावरचा भाग मातीचा आहे. विशिष्ट पद्धतीने कमावलेल्या त्या मातीचे कुतूहल सर्वांनाच असते. मातीची संलग्नता व क्षमता वाढवण्यासाठी खापरी तुकडे, घोड्याची लीद, शंख-शिंपल्याचा चुरा, छोटे गोटे व विशिष्ट वनस्पतींच्या रसाचे म़िश्रण एकजीव होईपर्यंत बैलांकडून तुडवून, अनेक दिवस थंड वातावरणात भिजत ठेवत. ओल्या मातीचे घट्ट ढेकळ एकमेकांवर रचून भिंत बांधली जात असे. वाड्याच्या दक्षिण भागात घोड्यांच्या पागा व जनावरांचे गोठे आहेत.

बाजीराव ३

पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण म्हणून जपलेल्या मोजक्या शस्त्रसंग्रहात ढाल, तलवार, भाला, चिलखत इत्यादी वस्तू आहेत. त्या संग्रहातील घोड्यावर बसून भालाफेक करणारे बाजीराव पेशव्यांचे फॅब्रिक पेंटिग खूपच बोलके आहे. जीवनात अनेक प्रसंगात साथ देणारा माजघरातील मजबूत झोपाळा खूप काही सांगून जातो! इतिहासकार कै. सेतुमाधव पगडी, म.श्री दिक्षीत, ना स. इनामदार, रणजीत देसाई आदी मान्यवरांनी वाड्यास भेट दिली आहे.

चंद्रशेखर बर्वे – 9421912214 (सरदार मल्‍हार दादोजी बर्वे यांचे वंशज)

– चंद्रशेखर बुरांडे


श्रीमंत बाजीराव पेशवे

18 ऑगस्ट 1700 – 28 एप्रिल 1740

अजिंक्य

अजिंक्य सेनानायक श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा आज जन्मदिवस . त्यांच्या प्रेरणादायक स्मृतीस विनम्र अभिवादन !!

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी दि.17 एप्रिल 1720 रोजी बाजीराव बाळाजी भट उर्फ बाजीराव बल्लाळ पेशवेपदी विराजमान झाले . हिंदू पद पातशाही आणि हिंदू साम्राज्याचा ध्यास घेऊन कायम अपराजित राहिलेले अजिंक्य सेनानी श्रीमंत बाजीराव पेशवे .

2 एप्रिल 1720 रोजी बाजीरावांचे तीर्थरूप , पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या दुःखद निधनानंतर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचे चिरंजीव बाजीराव यांची पेशवे पदावर नियुक्ती केली . त्यानंतर पेशवेपद वंशपरंपरागत भट घराण्याकडे राहिले . बाजीराव मृत्यूपर्यंत पेशवेपदी राहिले . मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचे बहुमोल कार्य बाजीरावांनी केले . आपल्या पेशवेपदाच्या करकीर्दीत बाजीराव एकही लढाई हरले नाहीत . ब्रिटिश फिल्ड मार्शल बर्नार्ड माँटगोमेरी – ” Bajirao was possibly the finest cavalry general ever produced by India . ”

बाजीरावांचा जन्म दि.18 ऑगस्ट 1700 रोजी चित्पावन ब्राह्मण भट घराण्यात झाला . श्रीमंत पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे ते सुपुत्र . त्यांचे कनिष्ठ बंधू चिमाजी अप्पा हे ही त्यांच्या सारखेच पराक्रमी होते . बाजीराव आपल्या वडिलांच्या लष्करी मोहिमेत सामील होत असत . मुघल सत्ता उखडून टाकून अखंड हिंदुस्थानात हिंदू पद पातशाही , हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची महत्वाकांक्षा ते बाळगून होते . ढासळत्या मुघल साम्राज्याला आक्रमकपणे धक्का देऊन नेस्तनाबूत करण्याची मनिषा ते बाळगून होते . हल्ला , हल्ला मुळांवर सारखा हल्ला करीत रहा म्हणजे कितीही विशाल असला तरी तो वृक्ष कोसळतोच हे त्यांचे तत्त्व होते .

पेशवेपदी नियुक्त झाल्यावर बाजीरावांसमोर खडतर आव्हाने उभी होती . तरुण वयात झालेल्या त्यांच्या पेशवेपदी नियुक्तीमुळे नारो राम , अनंतराम सुमंत , श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांसारखी ज्येष्ठ मंडळी नाराज होती . आपल्या सारखेच तरुण आणि धडाडीचे योद्धे मल्हारराव होळकर , राणोजी शिंदे आदिंना त्यांनी हाताशी धरून त्यांना मराठा साम्राज्याच्या विस्तारात सहभागी करून घेतले . तेव्हा ही सर्व मंडळी विशीतले तरुण होते .

मोगलांचा वजीर निजाम उल मुल्क असफ जहाँ दक्षिणेत स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करून दख्खनवर प्रभुत्व मिळविण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांसमोर नव नवीन आव्हाने उभी करत होता .

नवीन ताब्यात आलेल्या माळवा व गुजरातची घडी बसवायची होती .

सिद्दीचा जंजिरा या सारखे मराठा साम्राज्यातले प्रांत जरी मराठा साम्राज्यात असले तरी त्यावर पेशव्यांचे पूर्ण नियंत्रण नव्हते .

आपल्या कारकीर्दीत बाजीराव या सर्व आव्हानांना पुरून उरले . वयाच्या केवळ चाळीसाव्या वर्षी दि.28 एप्रिल 1740 रोजी या महान सेनानायकाचा दुर्दैवी मृत्यू झाला .

बाजीराव सहा फूट उंच होते . तेजस्वी पण सतत रणांगणात असल्यामुळे रापलेली कांती बाजीरावांना शोभून दिसत असे . पांढरे शुभ्र आणि फिक्या रंगाचे कपडे त्यांना पसंत होते . संपूर्ण सेनेला त्यांनी आपल्या करड्या शिस्तीत ठेवले होते . त्यांच्या विरश्रीयुक्त भाषणांनी सैन्यात उत्साहाची लाट पसरत असे .

त्यांची पालखेडची लढाई हे युद्धशास्त्रातील एक उत्कृष्ट उदाहरण आहे . अमेरिकन सेनेत ते रोल मॉडेल आहे आणि त्या धर्तीवर सैनिकांना युद्धतंत्राचे प्रशिक्षण दिले जाते .

अटक पासून कटक पर्यंत भगवा फडकवायचा आणि भारतवर्षात हिंदू पद पातशाही , हिंदू साम्राज्य प्रस्थापित करण्याचे युगपुरूष शिवाजी महाराजांचे स्वप्न बाजीरावांनी बऱ्याच प्रमाणात सत्यात उतरवले होते .

तरुण तडफदार बाजीरावांनी तीन दिवस दिल्लीला ओलीस धरले होते . लाल किल्ल्यातून बाहेर पडण्याची मुघल बादशहाची हिंमत झाली नाही . औरंगजेबाचा नातू दिल्लीहून पलायनाच्या विचारात होता . आपली ताकद दाखवून बाजीराव परत फिरले .

दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटिश कमांडर जनरल माँटगोमेरी यांनी ” हिस्ट्री ऑफ वॉरफेयर ” या आपल्या पुस्तकात बाजीरावांची मुक्त कंठाने स्तुती केली आहे . विजेच्या चपळाईने अत्यंत तेज आक्रमणाच्या बाजीरावांच्या शैलीचे त्यांनी भरभरून कौतुक केले आहे . हे पुस्तक ब्रिटन मध्ये ‘ डिफेन्स स्टडीज कोर्स ‘ मध्ये शिकवले जाते . हीच युद्धशैली दुसऱ्या महायुद्धात ‘ ब्लिट्झक्रिग ‘ म्हणून वापरली गेली .

बाजीरावांचे युद्ध रेकॉर्ड भारतातल्या सर्व सेनानायकांपेक्षा अव्वल दर्जाचे मानले जाते . चाळीस पेक्षा जास्त लढाया ते लढले आणि एकही हरले नाहीत .

नर्मदेपार सेना घेऊन जाणारे आणि चारशे वर्षांच्या यवनी सत्तेला दिल्लीत जाऊन ललकारणारे बाजीराव हे पहिले मराठा सेनानी होते .

बाजीरावांनी गुजरात , माळवा , बुंदेलखंड जिंकले नसते आणि नर्मदा आणि विंध्य पर्वतातून येणारे सर्व मार्ग आपल्या ताब्यात घेतले नसते तर पुन्हा एकदा अल्लाउद्दीन खिलजी , अकबर औरंगजेबासारख्या आक्रमकाचे विशाल सेनेसह आक्रमण अटळ होते .

आपल्या पदरच्या सेनापतींच्या शौर्याची बाजीरावांना कदर होती . इतिहासात मराठी साम्राज्याची ताकद म्हणून पुढे आलेले होळकर , शिंदे , पवार , गायकवाड आदि घराणी बाजीरावांची मराठा साम्राज्याला देणगी आहेत . ग्वाल्हेर , इंदूर , धार , देवास , पुणे , बडोदा अशी शक्तीस्थाने मराठा साम्राज्यात बाजीरावांमुळेच अस्तित्वात आली .

बाजीराव हे पहिले असे योद्धे होते ज्यांचा शिक्का सत्तर ते ऐंशी टक्के भारतावर चालत होता . मोगल साम्राज्याला त्यांनी दिल्ली आणि आसपासचा प्रदेश एवढेच सिमित ठेवले होते . बाजीरावांनी निजाम , मोगलांसह पोर्तुगीजांवरही कितीतरी वेळा मात केली होती . छत्रपती शाहू महाराजांचे निष्ठावंत पेशवे म्हणून संपूर्ण देशात बाजीरावांनी आपली जरब बसवली होती .

हिंदू पद पातशाहीचा सिद्धांत सर्वप्रथम बाजीरावांनी मांडला . प्रत्येक हिंदू राजाला अर्ध्या रात्री मदत करायला ते तत्पर असत पूर्ण देशाचा बादशहा एक हिंदू असावा हे त्यांचे लक्ष्य होते . बाजीरावांच्या छत्रछायेखाली बुंदेलखंडाची रियासत जिवंत होती . छत्रसालाच्या मृत्यूनंतर त्याचा एक तृतीयांश हिस्सा बाजीरावांना मिळाला .

दिल्लीवर आक्रमण ही त्यांची अत्यंत साहसी चाल होती . छत्रपती शाहू महाराजांना ते नेहमी म्हणत मोगल साम्राज्याचा पाया दिल्लीवर आक्रमण केल्याशिवाय मराठ्यांची ताकद बुलंद होऊ शकणार नाही आणि दिल्लीला तर मी कधीही आपल्या पायाशी झुकवेन

महाराष्ट्र आणि अधिकांश पश्चिम भारत बाजीरावांनी मोगल आधिपत्यातून मुक्त केला होता . नंतर त्यांनी आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला . मोगल बादशहाशी बगावत केलेला निजाम दक्षिणेतील मोठी ताकद होता . कमी सैन्य असूनसुद्धा निजामाला बाजीरावांनी कैक युद्धात हरवले होते आणि त्याच्यावर अनेक अटी लादल्या होत्या . बुंदेलखंडात त्यांनी मोगल सिपाहसालार मोहम्मद बंगशला हरवले होते .

इ.स.1728 ते 1735 च्या दरम्यान बाजीराव पेशवे अगणित लढाया लढले . पूर्ण माळवा , गुजरात ताब्यात घेतला . बंगश निजामासारखे बडेबडे सिपाहसालार परास्त केले . औरंगजेबाचा बारावा वंशज मोगल बादशहा मोहम्मद शहाने बंगशला हटवून जयसिंहाला बाजीरावावर पाठवले . बाजीरावांनी त्यालाही हरवलं .

दि.12 नोव्हेंबर 1736 ला बाजीराव पेशव्यांनी पुण्याहून दिल्लीला कूच केले . आग्र्याच्या सादातवर त्यांचे आक्रमण रोखण्याची जबाबदारी होती . मल्हारराव होळकर आणि पिलाजी जाधवांची सेना यमुनेच्या दुआबात पोहोचली . त्यांना घाबरून सादातने दीड लाखांची फौज उभी केली . एका मोर्चावर एवढे सैन्य मराठ्यांकडे कधीच नव्हतं पण त्यांची रणनीती अजोड होती . रणनीतीप्रमाणे मल्हारराव होळकरांनी मैदान सोडले . बाजीरावांनी सादात खाँ आणि मोगल दरबाराला धडा शिकवण्याचा निश्चय केला . सर्व मोगल सैन्य आग्रा मथुरेत अडकले , इकडे बाजीरावांनी थेट दिल्लीवर धडक मारली . आजच्या ताल कटोरा स्टेडियमवर बाजीरावांनी आपली छावणी टाकली . दहा दिवसांचे अंतर बाजीरावांनी केवळ 48 तासात न थकता न थांबता केवळ पाचशे घोड्यांच्या साथीत पूर्ण केले . मोगल बादशहा बाजीरावांना इतक्या जवळ पाहून घाबरला . स्वतःला लाल किल्ल्यात सुरक्षित ठिकाणी कोंडून त्याने मीर हसन कोकाच्या नेतृत्वाखाली आठ ते दहा हजार सैन्याची तुकडी बाजीरावांवर धाडली . केवळ पाचशे मर्द गड्यांसह बाजीरावांनी या सेनेचा दारुण पराभव केला . 28 मार्च 1737 हा तो दिवस होता . मराठी सत्तेच्या पराक्रमाचा तो सर्वश्रेष्ठ दिवस होता . बाजीराव तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते . पुऱ्या दिल्लीला बाजीरावांनी एक प्रकारे बंधक बनवले होते .

दिल्लीहून निजामाच्या नेतृत्वाखाली मोगलांची विशाल सेना आणि दक्षिणेतून बाजीरावांची मराठी सेना दि.24 डिसेंबर 1737 ला भोपाळ येथे एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या मराठी सैन्याने मोगल सैन्याचा जबरदस्त पराभव केला . जीव वाचवण्यासाठी निजाम लगेचच तहासाठी तयार झाला . माळवा मराठ्यांच्या ताब्यात आला . खंडणी म्हणून पन्नास लाख रुपये बाजीरावांना द्यावे लागले . पुढचे अभियान पोर्तुगीजांविरुद्ध होते . कित्येक युद्धात त्यांनाही हरवून बाजीरावांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती .

बाजीराव पेशव्यांचे अल्पायुष्यात निधन झाले नसते तर अहमदशहा अब्दाली किंवा नादीरशहा डोईजड झाले नसते इंग्रज आणि पोर्तुगीज अशा पाश्चिमात्त्य सत्ता ही आपले बस्तान बसवू शकल्या नसत्या केवळ चाळीसाव्या वर्षी बाजीरावांचा मृत्यू ही भारत देशासाठी अत्यंत दुर्दैवी घटना होती .

छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , श्रीमंत पेशवे बाजीराव , श्रीमंत पेशवे माधवराव आपल्या दुर्दैवाने अल्पायुषी ठरले अन्यथा आज वेगळाच इतिहास दिसला असता .

आपल्या देदिप्यमान पराक्रमाने मराठा साम्राज्य अतुलनीय उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या ह्या अजिंक्य अपराजित योद्ध्यास त्रिवार मानाचा मुजरा !

मुकुंद कुलकर्णी

. . . . .. . . .. . . . . . .  . . . . . . . . . . वॉट्यसॅपवरून साभार दि. १९-०८-२०१९


मूळ पोस्ट दि.३१-८-२०१८

उद्यमं साहसं धैर्यं बलं बुद्धी: पराक्रम: |
षडेते गुण सम्पन: नाम तस्य प्रतापी बाजीराव:| ……  श्रीरंग घारे

बाजीराव पेशव्याने आपल्या आयुष्यात काय मिळवले?
लेखक – अमोल दांडेकर

(आज बाजीराव पेशव्यांचा ३१८वा स्मृतिदिन एप्रिल २८)

बाजीरावाच्या राजकारणांची आणि मोहिमांची फलश्रुती अशी झाली की १८व्या शतकात अख्या हिंदुस्थानात मराठ्यांचा आणि फक्त मराठ्यांचा बोलबाला होता. एका सत्तेचा अस्त झाला (मुघलांच्या) तर मराठ्यांच्या सत्तेचा उदय झाला. लाल किल्ल्यावर भगवा ध्वज लागत होता, शिवाजी महाराजांचं स्वप्न अंशत: पूर्ण झालं. कलकत्ता (आता कोलकाता ) हे शहर खंदकाचं शहर म्हणून ओळखलं जात होतं, हा खंदक मराठ्यांसाठी म्हणजे मराठ्यांपासून सुरक्षा म्हणून खणला होता. पाटणा शहराभोवती मराठ्यांच्या भीतीनं कोट उभारला. मुघलांच्या कुठल्या राणीला किंवा खोजाला किती पगार द्यायचा हे मराठे पुण्यात बसून ठरवत होते. हे सगळं बाजीरावच्या हयातीत झालं नाही पण त्या पेशव्याने केलेल्या परिश्रमाची ही फलश्रुती होती. मुघल नाक रगडत मराठ्यांकडे आले तुम्ही आमची सुरक्षेची जवाबदारी घ्या! खरंच देव, देश अन धर्मापायीच मराठे अटकेपार गेले. घरापासून दूर १३०० कि. मी. पानिपतात लढले, पडले आणि नैराश्य व मरगळ झटकून पुन्हा कामाला लागले. म्हणून पुन्हा सांगतो १८ व्या शतकाचा इतिहास हा मराठ्यांचा इतिहास आहे, शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशव्याने केलेल्या मेहनतीचे फळ आहे ते!

बाजीराव पेशवा हा एक लढवय्या, एक पंतप्रधान, एक राजकारणी, एक स्वामिनीष्ठ इमानदार सेवक होता. जस शिवाजी महाराजांनी आपल्या उभ्या आयुष्यात फक्त स्वराज्य, स्वातंत्र्य याचाच ध्यास घेतला तसाच बाजीरावने आपल्या उण्या-पुऱ्या फक्त ४० वर्ष्याच्या आयुष्यात आणि २० वर्ष्याच्या कारकीर्तीत फक्त देश आणि देश याचाच विचार केला. आपल्या या २० वर्षाच्या कार्यकाळात ह्या पेशव्याची घोडदौड पहिली तर दात घशात जातील, सुरतेपासून तर बुंदेल खंडापर्यंत आणि कावेरीपासून तर दिल्लीपर्यंत उभ्या आयुष्यात १,७५,००० की. मी. घोडदौड करणारा हा एकमेवाद्वितीय अजिंक्य योद्धा. मोहिमेवर असताना कणसं तर कधी पिशवीतून चणे खाऊन शत्रूला पाळता भुई थोडी करणारा हा आमच्या मातीतला आमच्या हाडामासाचा एक जिगरबाज! एकदा छत्रपती शाहूला कुणीतरी विचारलं
“एका बाजूला ५०,००० ची फौज आणि दुसऱ्या बाजूला एकटा पण सशस्त्र बाजीराव पेशवा, कोणाला निवडाल?” शाहूने क्षणाचाही विलंब न करता बाजीरावाला निवडलं होतं!

बाजीरावानं दोन चार जिल्ह्यांचं विस्कळीत स्वराज्य, साम्राज्यात बदललं. मराठ्यांची घोडी एकाचवेळी कावेरीचं आणि यमुनेचं पाणी, म्हणू त्या ठिकाणी पीत होती. उभ्या हिंदुस्तानात भल्याभल्यांना बाजीरावनं आपल्या तलवारीचं पाणी पाजलं. बुंदेल खंडात बाजीरावनं चारीमुंड्या चित केलेला बंगश बाजीरावाच्या आईचा म्हणजे राधाबाईंच्या यात्रेची जवाबदारी घेतो, तिची वहाण डोक्यावर घेऊन नाचतो. बाजीरावनं दिल्लीच्या बादशहाला, दिल्लीत मराठी हिसका दाखवला होता, बादशहाच्या तोंडचे पाणी पळाले होते.

अश्या या भारत मातेच्या वीर पुत्राचे आज त्याच्या ३१८व्या स्मृती दिनानिमित्त स्मरण!

अमोल दांडेकर
https://www.facebook.com/amol.dandekar.14?fb_dtsg_ag=AdyZOIYXOsL-ky4_1go3sGlQ4vczGwa2NUQLo8ddEcKaQA%3AAdwDHnuamhYRIuJkAo6ooSzUkfotxrw_WVzP7RYEigHZ1A
———————————————

मराठा महायोद्धा बाजीराव
लेखक – प्रांजल वाघ

बाजीराव समाधी
नर्मदेच्या भयाण वाळवंटात फिरून फिरून अगदी वैतागून गेलो होतो आम्ही… रणरणत ऊन भाजून काढत होतं…
उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला सावली सापडत नव्हती…आमच्या गाडीचा ड्रायव्हर मूळचा इंदोरचा पण त्याने देखील कधी गाडी इतक्या आत आणली नव्हती… शोध होता तो एकाच गोष्टीचा… पण ती देखील कुठे आहे कोणालाच माहित नव्हती… आणि ही अशी परिस्थिती फक्त ‘हिंदुस्तानातच आपल्यावर येऊ शकते..

१५ मे २००९ च्या लोकमत मधील एका लेखाने खाड्कन डोळे उघडले आमचे… हा लेख होता श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर…. त्या लढवय्या पेशव्याच्या समाधीच्या अस्तित्वाचा! बाजीराव पेशव्यांचा अकाली मृत्यू झाला हे आम्हाला माहित होतं… पण त्यांची समाधी कुठे असेल हा साधा विचारच आम्ही केला नाही! कसा करणार?
शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात दोन पानात संपवलेला बाजीराव खरोखर किती मोठा होता हे आम्हाला कोण सांगणार? ‘लढवय्या पेशवा’ पेक्षा ‘बाजीराव – मस्तानी’ ह्या प्रकरणाला जास्त महत्व देऊन महाराष्ट्रातील जनतेनेच
ह्या पेशव्याच्या कर्तृत्वाला दाबून टाकले!

ह्या मर्द गड्याचा पराक्रम सांगावा तो तरी किती!

“जो गती भयी गजेंद्र की, वही गती हमरी आज
बाजी जात बुंदेल की , बाजी रखियो लाज!”

बुन्देलखंडचा राजा छत्रसाल ह्याने मोहम्मद बंगश ह्या मोगल सरदारा खिलाफ बाजीरावाची मदत मागितली.
संदेश पोहोचला तेव्हा बाजीराव जेवत होते. असे म्हणतात की हातातला घास तसाच ठेवून बाजीराव उठले आणि थेट घोड्यावरून मोजक्या स्वारानिशी निघाले. बाकीचे सैन्य त्यांना नंतर येऊन मिळाले. “उशीर केल्यामुळे छत्रसाल पराजित झाले तर इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते म्हणून उशीर झाला!”

ह्याला म्हणतात मराठी बाणा!

ह्या कृत्यानंतर बाजीरावाने बंगाशाला पराभूत तर केलेच, पण छात्रासालाच्या राज्याचा १/३ हिस्सा जहागीर म्हणून मिळवला… आणि मराठी तितुका बुन्देल्खंडी फडकला!!

अशा ह्या पराक्रमी पेशव्याची समाधी रावेरखेडी नावाच्या एका गावात आहे असे आम्हाला कळते काय आणि ती लवकरच नर्मदेच्या पाण्याखाली जाणार असल्याचे कळते आणि तिचा शेवटचा दर्शन घ्यावा म्हणून आम्ही लगेच निघतो काय… सगळं अगदी घाईघाईत घडलं… इंदोरहून गाडी घेऊन आम्ही निघालो ते थेट सनावादला नर्मदा ओलांडली…मनात एक विचार येऊन गेला.. जेव्हा मराठ्यांनी नर्मदा ओलांडली तेव्हा नावांचा पूल बांधून ओलांडली होती…आज आम्ही सिमेंटच्या पुलावरून ती ओलांडली… घोड्यांच्या टापांनी हादरून उठणारा हा परिसर आज रेल्वे आणि गाड्यांच्या आवाजाने भरून गेला होता!

बडवाह! मध्य प्रदेशातील एक छोटासा जिल्हा! ह्या जिल्ह्यात कुठेतरी लपल होत रावेरखेड़ी! सुमारे पंधरा मिनिटे एक खडबडीत रस्त्यावरून आमच्या इंडिका आम्ही बळजबरी नेली तेव्हा एक कच्चा रास्ता लागला…. आणि नंतर लागल ते एक छोट गाव! हेच रावेरखेड़ी असणार असा आम्ही एक अंदाज़ बांधून घेतला!

अगदी कोणीही न सांगता चुकीचे अंदाज़ बांधणे व ते बरोबर आहेत अशी स्वतःची समजूत घालण्यात आम्ही पटाईत!
गावात आम्ही आमच्या अस्खलीत हिंदी मध्ये विचारल, “इधर कोई समाधी है क्या?”

” सचिन तेंडुलकर १००वी सेंच्युरी कधी मारणार?” असा प्रश्न विचारल्यावर समोरचा कसा क्लीन बोल्ड होतो अगदी तशीच अवस्था तिथल्या ग्रामस्थांची झाली! कोणालाच माहित नाही! मग मूळ मुद्द्यावर आलो,
“ये रावेरखेड़ी किधर है? ये नहीं है क्या?” रावेरखेड़ी हे गाव समोरचा नाला ओलांडून पलिकडे आहे असे कळले व आम्ही पुढे निघालो…
पण पुढच्या गावी देखील हेच चित्र…समाधी कुठे आहे कुणालाच ठाऊक नहीं…आता करायचे काय… मग विचारले की बाबा नदी किधर है? आणि त्या दिशेने आम्ही कूच केली… ह्या गावातून जाताना एक गोष्ट मात्र ध्यानी आली…

गावातील घरांचे दरवाजे एकदम जुन्या पद्धतीचे… भक्कम लाकडाची बांधणी आणि सुन्दर नक्षीकाम… जणू बाजीराव पेशव्यांच्या काळी बांधलेली घर असावीत! सुमारे ३०० वर्षांपूर्वी ते देखिल ह्याच रस्त्याने घोड़दौड़ करीत नर्मदा तीरी आपल्या छावणीत गेले असतील! अचानक अवतीभवती सेना सागर उभा राहिला…. सरदारांचे डेरे, सैनिकांची चाललेली धावपळ आणि आपल्या डे-यात मसलती करीत बसलेला एक दिमाखदार मराठी तरुण! महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर नेणारा हाच तो…… बाजीराव! गरुडाची भेदक नजर, पिळदार मिश्या, तोंडावर किंचित  स्मित, कमावलेल मजबूत शरीर आणि तितकीच मजबूत
विचारशक्ती! कुशल व्यवस्थापक, अजिंक्य योद्धा आणि आकर्षक  व्यक्तिमत्व असा हा सर्वगुणसम्पन्न मराठ्यांचा
पंतप्रधान!……..असो!

तर आम्ही समाधी शोध चालू ठेवला..असे करता करता गाव संपल! पुढे नुसती सपाट जमीन! डोक्यावर अंड फोडल असता तर त्याचा हाफ-फ्राय तयार होइल इतकं भाजून काढणार ऊन!! आता काय करायच ह्या विचारत असताना एक उजवीकडे शेड दिसली! शेतीच्या कामासाठी वापरली जात होती बहुदा! म्हट्ल पाहू इथे विचारून!
भात्यातील शेवटचा बाण उरलेला तो मारून पाहू! असे म्हटले आणि मी गाडीतुन उतरलो!

पुढे लिहिण्या अगोदर एक वस्तुस्थिति सांगतो! ह्याची जाणीव त्या दिवशी झाली! आपल्या मध्ये का कोण जाणे आपल्याच इतिहासाबद्दल एक कमालीचा न्यूनगंड असतो! आणि त्याच्या जोडीला असते ती कमालीची उदासीनता!
आपल्यालाच आपला इतिहास माहित नसतो आणि आपण तो जाणून देखील घेत नहीं! भारताबाहेर कोणाला इथले पराक्रमी माहित असेल अशी आपण अपेक्षा ठेवत नाही. तीच गोष्ट आमच्याबाबतीत खरी ठरली !

महाराष्ट्राबाहेर मराठ्याला ओळखत कोण? म्हणून आम्ही कधीच, “पेशवा बाजीराव की समाधी कहा है?” असे विचारले नाही! का कोण जाणे! अगदी नकळत ही गोष्ट घडली खरी! असो! मग मी त्या शेड पाशी गेलो आणि एक माणसाला विचारल, “इधर कोई समाधी है क्या?”
“मुझे पता नाही साहब, दादासाहब से पूछो!”, असे म्हणताच एक माणूस आतून बाहेर आला!

हा माणूस म्हणजे दादासाहब! नाव दादासाहब पण त्याच दिसण अगदी उलट! एकदम बारीक, दाढ़ीची खुंट वाढलेली
आणि साधारण उंचीचा हा माणूस ‘दादासाहब’ ह्या खिताबाला साजेसा बिलकुल नव्हता! मी म्हट्ल, ” दादासाहब, इधर कोई समाधी है क्या?”
आपल्या लुंगीला हाथ पुसत त्याने उत्तर दिले…. “समाधी? पेशवा सरकार की समाधी? वो…..”

पुढचे शब्द मी ऐकलेच नाहीत जणू!! पेशवा सरकार! पेशवा सरकार!!! इतका मान! इतका आदर!! ते देखील पुण्याहून शेकडो मैल दूर ह्या उजाड़ रावेरखेड़ी मध्ये!! आश्चर्य! मी अक्षरशः बावरुन गेलो आणि नकळत डोळ्याच्या
कडा पाणवल्या! ज्या महाराष्ट्र देशासाठी हा बाजीराव लढ़ला तिथे देखील त्याला इतका मान नाही!
महाराष्ट्रात बाजीराव कोण आहे हे देखील माहित नसलेली लोक राहतात आणि माहीत असला तरी…….
“अरे तो का बाजीराव – मस्तानी वाला?” असे प्रश्न विचारणारे महारथी देखील आहेत!

आपल्या इतिहासाची काय किम्मत करतो आपण हे निर्लज्जपणे सांगणारे आपण कुठे आणि ह्या नर्मदेच्या वाळवंटात उभा असलेला हा गावठी ‘दादासाहब’ कुठे ! मन विषण्ण झालं! आपल्या मराठीपणाची थोडी का असेना लाज वाटली! जणू ह्या ‘दादासाहब’ ने नकळत आमच्या अस्मितेचा पोकळ फुगा त्याच्या दोन शब्दांनी फोडला होता. एक सणसणीत चपराकच गालावर पडली होती!

कोण कुठली इंग्लंडची राणी पण तिला आपली लोकं, क्वीन एलीझबेथ म्हणतात. अमेरिकेसारखा स्वार्थी देश,
पण त्याच्या राष्ट्रपतीला आपण प्रेसिडेंट ओबामा म्हणतो! जसं कि हा भारताचाच प्रेसिडेंट आहे! पण जेव्हा आपल्याच देशातील वीरांना आदर देण्याची पाळी येते तेव्हा आपली जीभ जड होते! शिवाजी, संभाजी, बाजीराव अशी राजरोस पणे आपण नावे घेतो! तेव्हा कुठे जातो हा मराठीचा अभिमान? कुठे जाते आपली मराठी अस्मिता? आणि हा कोण
कुठला ‘दादासाहब’! त्याला काय घेणं देणं नसताना इतका आदर करतो मराठ्यांच्या पेशव्यांचा…. पेशवा सरकार!!

ह्या नंतर आम्हाला समाधी सापडली देखील आणि आम्ही ती पाहून देखील आलो! महाराष्ट्राच्या महान पुत्राला वंदन केले आणि नर्मदेच्या पात्रातील जुन्या घाटावर जाऊन स्नान करून आलो! तिथे काही अवशेष आहेत ते पाहिले, ३०० वर्षे मागे जाण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि परत निघालो!  परत येताना मी विचारांच्या अधीन झालो होतो! ते नर्मदेच निळ पात्र, एका सच्च्या पण विस्मरणात गेलेल्या योद्ध्याची त्याच्या नावाला न साजेशी अशी पण दुर्लक्षित समाधी आणि त्या वाळवंटात उभा असलेला तो ‘दादासाहब’! बाहेर वा-यामुळे मातीचे लोळ उठले होते, आकाशात धुरळा उडाला होता. माझ्या मनात देखील असाच कल्लोळ मजला होता. दोनच शब्द मनात परत परत ऐकू येत होते….

पेशवा सरकार!  पेशवा सरकार!!  पेशवा सरकार!!!

मित्रांनो नक्की शेयर करा

http://www.rational-mind.com/पेशवा-सरकार/
वाचल्या बद्दल धन्यवाद्

प्रांजल वाघ.


थोरले बाजीराव

लेखक : माधव विद्वांस

थोरले बाजीराव

त्यांनी आपल्या कारकिर्दीत ४ १ लढाया केल्या त्यात एकातही हार नाही तसेच “”दिल्ली दरबारी ज्या व्यक्तीने महाराष्ट्रास प्रतिष्ठा दिली त्या थोरले बाजीराव पेशव्यांची आज पुण्यतिथी(२ ८ एप्रिल १ ७ ४ ० )

**ब्रिटिश जनरल मॉंटगोमेरि General Montgomery यांनी थोरले बाजीराव यांचे बद्दल बरेच लिखाण केले आहेव त्यांच्या युद्धनितीचे वर्णन केले आहे .
१७व्या शतकात दिल्लीकरांना महाराष्ट्राची गरज बाजीरावांचे पासूनच पडू लागली . सध्या मात्र चित्र उलटे झाले आहे .
नादीरशहाने आक्रमण करताच बादशाहने बाजीरावाची मदत मागीतली .परन्तु बाजीराव नर्मदा ओलांडायचे आताच लुट करून नादीरशहा परत गेला. बाजीरावास बहुधा उष्माघात किंवा विषम ज्वर झाला असावा . त्यातच त्याचा अंत झाला .
नर्मदा तिरावर रावेरखेडा येथे त्याची समाधी नर्मदा प्रकल्पात बाधित होत असल्याने गुजरात सरकार आता त्याची नव्याने बांधणी करणार आहे
वास्तविक धनगर समाजातील मल्हारराव होळकर ,तसेच सामान्य मराठा कुटुंबातील सध्याच्या ग्वाल्हेर संस्थानचे शिंदे,गायकवाड ,उदाजी पवार यांना पेशव्यानीच पुढे आणले आहे. मस्तानी सारख्या आंतरधर्मीय स्त्री बरोबर विवाह करून सेक्युलर असल्याचा दाखलाही दिला परंतु समाजसुधारकांच्या यादीत बाजीरावाचे नाव नाहीच त्याच्या पराक्रमाची दखलही कोणी घेत नाही. पुण्यातील बाजीराव रस्ता सोडला तर त्यांचे नावे शाळा कॉलेज ,काही नाही निदान त्यांचे नावे सैनिक स्कूल तरी व्हावे . 

“”””झाडाच्या फांद्या तोडण्यापेक्षा मुलावर घाव घालणे हि बाजीरावाची रणनीती होती “”””
महाराष्ट्रात त्याची आठवण कोणास नसो पण क्षात्रतेजाने तळपणाऱ्या बाजीरावांना शतश प्रणाम 

– श्री.माधव विद्वांस यांनी १४ विद्या ६४ कला या संस्थळावर दिलेला लेख … फेसबुकवरून साभार             दि. २८-०४-२०१९

***************************************

बाजीरावाचे समाधीकडे कसे जाल ?

रावेरखेडा नकाशा
मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर इंदूर ट्रिपचे वेळी बाजीराव समाधीस जरूर भेट द्या .
रावेर खुर्द किवा रावेरखेडी येथे जाणेसाठी सनावद वरून कटोरा मार्गे चांगल्या रस्त्याने जाता येईल मधेही रस्ते आहेत पण माहिती काढून मगच जावे खरगोन किंवा मंडलेश्वर कडूनही माहेश्वरचे बाजूने नर्मदेच्या दक्षिण तीरावर जाता येईल .
रावेरखेडा बाजीराव स्मृती , ओंकारेश्वर, मांडू (राणी रूपमती ) , उज्जैन(महांकालेश्वर ), बाघ गुंफा(पेंटीग्ज ) , माहेश्वर (नर्मदा घाट ), इंदूर (खवैयांची नागरी ), धार हि मराठमोळी ठिकाणे हे सर्व एकाच ट्रीप मध्ये होईल
मार्ग दक्षीणेकडून कडून <>खंडवा –सनावद– बेदीया –भोगावनिपाणी –रावेरखेडा
मार्ग उत्तरेकडून <>माहेश्वर –कासारवड –बेदीया –भोगावनिपाणी –रावेरखेडा

श्री.माधव विद्वांस यांचे मनःपूर्वक आभार


हर हर महादेव 🚩

श्रीमंत बाजीराव साहेब पुण्यतिथी (२८ एप्रिल १७४० )

छत्रपती शाहू महाराजांनी १७२० साली पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या १९ वर्षाच्या ज्येष्ठ पुत्रास म्हणजेच बाजीराव बल्लाळ यांस पेशवे पदावर नियुक्त केले. पेशवे पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर पुढील वीस वर्षे बाजीराव साहेबांनी मराठा साम्राज्याचा विस्तार सबंध हिंदुस्तानभर वाढवला. अत्यंत प्रभावशाली व्यक्तित्व, जन्मजात नेतृत्वशक्ती, अद्भुत रणकाैशल्य, अदम्य साहसी वृत्ती, इ. सर्व अंगीभूत गुणांमुळे बाजीराव साहेबांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये भारतातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य म्हणून मराठा साम्राज्याची ओळख निर्माण केली, दरारा निर्माण केला. आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एक हि युद्धं न हारलेला एकमेव अपराजित योद्धा, सेनानी अशीच त्यांची ओळख होती अन ती आज हि कायम आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाचे हिंदवी साम्राज्यात रुपांतर करणारा हा मराठा साम्राज्याचा महान पराक्रमी पेशवा २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदाकाठी रावेरखेडी येथे परलोकीच्या प्रवासाला कायमचा निघून गेला.
”आम्ही तो थोरल्या आबासाहेबांचे पाईक” असं श्रीमंत बाजीराव साहेब म्हणत असत अन तसंच ते जगले.

हिंदुस्तानच्या या महान सुपुत्रास व मराठा साम्राज्याच्या या एकमेवाद्वितीय अपराजित महापराक्रमी प्रधानपंतास मन:पुर्वक अभिवादन … मुजरा 🙏

”तुझे तेज अंगी शतांशी जरीही, उजळून टाकू दिशा दाही दाही” हिच एकमेव प्रार्थना श्रीमंत बाजीराव साहेबांच्या चरणी. 🌷🙏🚩🌹🌼

(*थोरले आबासाहेब – छत्रपती श्री शिवाजी महाराज)

मूळ शब्दांकन- सारंग    …… वॉट्सॅपवरून साभार        दि.२८-०४-२०१९


नवी भर दि.२६-०९-२०१९

bajiraoPeshve