वैज्ञानिक दृष्टीकोन

आपल्या देशात विज्ञान / तंत्रज्ञान या विषयांमध्ये शिक्षण घेऊन पदवीधर झालेल्या लोकांची संख्या फार मोठी आहे, पण हे लोक त्यांच्या आयुष्यात विज्ञानाला किती महत्व देतात? ते अंधश्रद्धेपासून किती प्रमाणात मुक्त झाले आहेत? याचा विचार करता फार कमी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन असतो अशी तक्रार मोठ्या शास्त्रज्ञांनी केली आहे. या वर्षी राष्ट्रीय विज्ञानदिवसाच्या निमित्याने मिळालेला एक लेख. लेखिकेचे मनःपूर्वक आभार.
विज्ञान म्हणजे काय ? हे मी या लेखात सविस्तर विषद केले आहे. https://anandghan.blogspot.com/2018/02/blog-post_16.html

सायंटिफिक टेम्पर

सायंटिया / सायंशिया या मूळ शब्दाचा अर्थ -ज्ञान .यातून पुढे सायन्स,सायंटिफिक, सायंटिस्ट असे शब्द उगम पावले. सायंटिफिक टेम्पर हा शब्द 1976मध्ये भारतीय संविधानात कलम 51-ए मध्ये ‘नागरिकांची मूलभूत कर्तव्य काय असतात’ या विधाना अंतर्गत घटनादुरुस्ती द्वारे समाविष्ट करण्यात आला. याची व्याख्या करायची झाली तर ती याप्रमाणे करता येईल:
एखादी गोष्ट फक्त शतकानुशतके वडीलधारी किंवा इतर लोक करत आहेत म्हणून न करता त्याकडे साहसी व समीक्षात्मक दृष्टीने बघणं,नवं संशोधन वा सत्य स्वीकारणं आणि वस्तुस्थितीवर भर देत जितका पुरावा हाती असेल तितक्याच तथ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन अस म्हणता येईल.

पाऊस पडून शेकडो वर्षे बीज रुजत असेल, फांद्या एकमेकांवर घासून हजारो वर्षे आग लागत असेल, शेकडो मृतदेह कुजत असतील, एखाद्या विशिष्ट झाडाची फळं खाऊन आजार बरा होत असेल आणि त्याच झाडाच्या पायथ्याशी उगवलेलं भुछत्र खाऊन विषबाधा अनेक वर्षे होत असेल. पण ज्या क्षणी प्रागैतिहासिक मानवाच्या मनात हे का आणि कसं? असे प्रश्न निर्माण झाले त्याक्षणी माणसाच्या आयुष्यात विज्ञानाचा जन्म झाला असं मानायला हरकत नाही.

तिथपासून ते आज माईंड क्लोन बनवण्याच्या प्रवासापर्यंत आपली मजल गेली असली तरी सायंटिफिक टेम्पर आपल्यात खरोखरच रुजलंय का ,याच उत्तर देणं अवघड आहे. आपल्या दृष्टीने विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळा आणि जीव, भौतिक, रसायन ही तीन शास्त्र आणि त्यांची उपशास्त्र. पण शास्त्र या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला तर, मोजणी, संरचना, अवकाश,आणि बदल यावर आधारित गणित ही शाखा निर्विवादपणे ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ हे दाखवण्याच एक शास्त्र आहे हे आपण विसरतो. अनुमानांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करून विश्लेषण करणारं तर्कशास्त्र आपल्या गावीही नसतं. इतकंच काय समाजाच्या सुव्यवस्थेसाठी निर्मिलेली अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र ही देखील शास्त्रच.

यातली सामाजिक शास्त्र ही अपूर्ण लिविंग सायन्सेस समजली जातात कारण त्यात स्थळ, काल, परिस्थिती, घटना यानुसार 100% वस्तुनिष्ठता येणं अशक्य असतं.त्यात थोडीफार व्यक्तिनिष्ठता येतेच. पण वरील इतर शास्त्र मात्र प्रयोग, निरीक्षण, अनुमान या कसोट्यांवर कुणालाही कुठेही सिद्ध करता येतील अशी आहेत.

स्वतःच्या विचारातील त्रुटी व व्यक्तिनिष्ठतेनुसार झुकणारा कल ओळखायला देखील वैज्ञानिक दृष्टीकोनच लागतो .कारण मेंदूतील सगळ्यात मोठा भाग सेरेब्रम हा स्पर्श, दृष्टी, श्रवण = अनुभव व भावना यासोबतच संभाषण, तर्कबुद्धि व शिकण्याची प्रक्रिया=आकलन यासाठीही जबाबदार असतो. म्हणजेच एकच भाग सायंटिफिक टेम्परसाठी लागणाऱ्या तर्कबुद्धि साठी आणि त्याच वेळी अतार्किक ,अविचारी वागण्याला कारणीभूत ठरणाऱ्या भावना या घटकासाठी सारखाच जबाबदार असतो.आणि यामुळेच वैज्ञानिक दृष्टीकोन व तो तयार व्हावा असं वातावरण असणं अत्यंत गरजेचं आहे.

दोन गट असतात : आपण पहिल्यापासून प्रगतच आहोत म्हणून वसकन अंगावर येणारे
नाहीतर क्वांटम फिजिक्स, molecular डिझाईन , जेनेटिक्स असे शब्द तोंडावर फेकून आपणच विज्ञानवादी असण्याचा दावा करणारे

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आत्मा असलेला बुद्धिप्रामाण्यवाद आपण अव्हेरतो. लोकायत आणि चार्वाकची परंपरा असणाऱ्या देशाला बुद्धिप्रामाण्यवादाचं इतकं वावडं का? याचा विचार करायला हवा. आपल्याकडे विज्ञान शिकणारी व्यक्ती ही वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून असेलच आणि विज्ञान या विषयाशी संबंध नसणाऱ्याचा त्याच्याशी दुरान्वयेही संबंध नसावा असे काही गैरसमज प्रचलित आहेत.

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारा न्यूटन ‘ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी समजून घेण्यास फक्त आपणच (मानव) समर्थ आहोत’ असं म्हटल्याने त्याची प्रतिभा, संशोधन व अभ्यास झाकोळते का? अजिबातच नाही. म्हणूनच आपलं यान मंगळावर जाण्याच्या आदल्या दिवशी राधाकृष्णन तिरुपतीला त्याची प्रतिकृती वाहून ‘not to leave anything to chance’ असं म्हणतात तेव्हा मोहीम यशस्वी झाली ती बालाजीमुळे नव्हे तर शास्त्रज्ञांच्या perception व perspiration मुळे याचं भान आपण बाळगलं पाहिजे आणि राधाकृष्णन यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांच्या कृतीला वैयक्तिक श्रद्धा म्हणून त्यांच्यातील शास्त्रज्ञातून वेगळं काढता आलं पाहिजे.

वरील गैरसमज खरे ठरता, ,भारताच्या औद्योगिक जगताची पायाभरणी करणारा एक उद्योजक आणि हिंदुराष्ट्र व अध्यात्म यांची महती जगाला सांगायला चाललेला भगव्या कपड्यातील एक संन्यासी यांच्यात 1893 साली जपानहून कॅनडाकडे जाणाऱ्या जहाजावर जी चर्चा झाली त्याने भारावून जाऊन 1930 आणि 1940 साली दोन जगविख्यात संस्था उभारण्याचं उद्योगपतींना काही प्रयोजनच नव्हतं! त्या दोन महान व्यक्ती होत्या: स्वामी विवेकानंद व जमशेदजी टाटा. आणि विज्ञानाची ही नवलतीर्थे आजही भारताची मान उंचावत आहेत: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च! त्यामुळे जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं हे छापील ,टाळीबाज वाक्य बाजूला ठेवलं तर उत्तम. विज्ञान व अध्यात्म हातात हात घालून चालल्याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

दुसरं उदाहरण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं. प्रगतिशील हिंदुराष्ट्र या कल्पनेला आयुष्य वाहून घेतलेले सावरकर म्हणतात : “बुद्धिवादी, विज्ञानवादी सुधारकांनी सर्व प्रकारचा धार्मिक भाबडेपणा, लुच्चेगिरी मग ती वैदिक असो, बायबलीय असो की कुराणीय तिच्या कचाट्यातून मानवी बुद्धी मुक्त करणं हेच पवित्र धर्मकार्य समजावं’

आपल्या श्रद्धांची बेटं ही वादळात सापडलेल्या जहाजाला तात्पुरता आधार देणारी असली तरी जहाजाचा तो मुक्काम नसतो हे लक्षात घेऊन योग्य वेळी ते बेट सोडता यायला हवं आणि श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी या भंपक वाक्याचं श्राद्ध घालता यायला हवं. जिथे श्रद्धा असते तिथे प्रश्न नसतात. त्याअर्थी श्रद्धा डोळस असू शकत नाही. हे काही वेळेला आधार देणारं असलं तरी आपली जगण्याची पद्धत व प्रेरणा तेवढीच आहे का हे जरूर बघायला हवं.

त्यामुळे आपला धर्म, शिक्षण, धारणा, जडणघडण, पूर्वाश्रमीचे संस्कार हे सगळं एका बाजूला ठेवून आपण एखाद्या गोष्टीची who, what, when, where, why and in what way (how) अशी निर्मम तटस्थपणे चिकित्सा करतो तेव्हा आपण विज्ञानाचं बोट धरलंय असं समजायला हरकत नाही. त्यासाठी तुकाराम महाराजांच्या एका ओळीचं स्मरण देखील पुरेसं ठरावं ‘ सत्य असत्याशी मन केले ग्वाही, ना मानियले बहुमता.

आता दुसरी बाजू :
मानवी संस्कृती विकसित झाली ती विज्ञान तंत्रज्ञानाच्या बळावर यात वाद असूच शकत नाही. मात्र आज कल्पनातीत असं तंत्रज्ञान, मध्ययुगीन संस्थारचना आणि अश्मयुगीन भावभावना या परिस्थितीत आपण जगत आहोत. संस्कृतीचा जन्म, उदय आणि विकास कशाच्या जोरावर झालाय हे समजून घेतलं तर लक्षात येईल की त्यासाठी आवश्यक असणारं kin /group selection हे फक्त ज्ञान नव्हे तर भावभावना ,हेतू,गरजा, भाषा ,सुरक्षितता अशा अनेक गोष्टींच्या आधारावर झालं आहे. आणि त्यामुळेच विज्ञान तंत्रज्ञानाला कप्पेबंद असून चालणार नाही. ना ते विज्ञानाच्या सोयीचं आहे ना माणसाच्या. संस्कृतीच्या रसरशीत ,खळाळत्या ,जिवंत प्रवाहाच्या कडेकडेने जात मग त्यात सामील होणं हा पर्याय अधिक सोयीस्कर ठरावा. कारण ? डार्विनचे थेट निसर्गदत्त वारसदार असलेल्या एडवर्ड विल्यम यांच्या शब्दात सांगायचे तर :
परग्रहवासीयांना माणसाच्या तंत्रज्ञानाचं जराही कौतुक नसेल. ते तिथपर्यंत पोहोचलं त्या अर्थी ते प्रगतच असणार! मानवी संस्कृतीचं मूल्यमापन करायचं झाल्यास ते विज्ञान तंत्रज्ञानाने नव्हे तर सुसंस्कृतपणाच्या मोजमापाने करावं लागेल. त्यासाठी कला, संगीत, तत्वज्ञान, धर्म , अशा मानव्यविद्याचा आधार घ्यावा लागेल. या विद्या म्हणजे समाजाचं , त्यांच्या भावभावना ,मानसशास्त्र यांचं प्रतिबिंब.

यामुळेच ज्ञानसूर्य तेजाने तळपताना हा प्रवाह आटणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं आहे.
विज्ञानासोबत विवेक हवा हे वाक्यही असंच काहीसं फसवं. विज्ञान म्हणजे सत्य , विज्ञान म्हणजे अपूर्णत्व मान्य करण्याचा प्रामाणिकपणा, विज्ञान म्हणजे दुसऱ्याने आपलं म्हणणं सप्रमाण सिद्ध केलं तर त्याला त्याचं श्रेय देण्याचा मोठेपणा, विज्ञान म्हणजे हट्ट सोडता येणं ,ऐकून घेता येणं ,नव्या पद्धतीने विचार करता येणं ,आपल्या आकलनात सुधारणा करणं
विवेक यापेक्षा वेगळा नसतो.

विज्ञान दिनाच्या दिवशी फक्त शास्त्रज्ञांचे फोटो पुढे पाठवत बसण्या ऐवजी आणि विज्ञान शाप की वरदान अशा उथळ चर्चाना प्रोत्साहन देण्याऐवजी संविधानात ‘आपली मूलभूत कर्तव्य’ या विभागात नमूद केलेलं ‘ To develop the scientific temper ,humanism ,spirit of enquiry and reform ‘म्हणजे नेमकं काय हे समजून घेतलं तरी पुष्कळ,नाही का?

गौरी साळवेकर

सूचना : या लेखात काही तपशिलातल्या चुका दिसतात, पण लेखिकेने मांडलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत.

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: