संगणकाचे बदलते तंत्रज्ञान

सुरुवातीच्या काळातला संगणक अजस्त्र आकाराचा असायचा आणि तो तितकेसे महान काम करत नसे. यामुळे मुंबईमध्ये फक्त टीआयएफआर, बीएआरसी, आय़आयटी अशा संशोधनक्षेत्रातल्या संस्थांकडे तो आला. पुढे आयुर्विमा आणि बँका यांनी त्यांचा वापर सुरू केला तेंव्हा त्याला खूप विरोध झाला होता, पण त्याने जगभरातल्या कामकाजात केलेली क्रांति लक्षात घेता त्याला दामटून पुढे आणले गेले. पीसीचा जन्म झाल्यानंतर तो घराघरात आला. संगणकाला माहिती पुरवणे आणि त्याने दिलेली माहिती गोळा करून तिला सांभाळून ठेवण्यासाठी फ्लॉपी, सीडी, डीव्हीडी यासारखी अधिकाधिक क्षमतेचा साधने निघाली आणि पाहतापाहता ती दिसेनाशीही झाली. याचा आतापर्यंतचा आढावा घेणारा हा सुरेख लेख. श्री.तुषार कुटे या मूळ लेखकाचे मनःपूर्वक आभार आणि त्यांनी या लेखाला इथे संग्रहित करायला अनुमति द्यावी अशी विनंति.

बदलते तंत्रज्ञान

तुषार कुटे – सफर विज्ञानविश्वाची
घर शिफ्ट करत असताना साफसफाईमध्ये घराच्या एका कोपऱ्यामध्ये घेऊन दिलेल्या सीडीचे आणि डीव्हीडीचे पाऊच आणि कंटेनर्स नजरेस पडले. सन २००२ ते २०१२ या दरम्यानच्या काळामध्ये मी जमवलेल्या या सीडी व डीव्हीडी होत्या. मागच्या दहा वर्षांमध्ये त्यांच्याकडे ढुंकूनही बघितले नाही. परंतु त्यादिवशी या पाऊच आणि कंटेनरने भूतकाळ जागृत केला. माझ्या संग्रहामध्ये जवळपास ४०० सीडी व डीव्हीडी असतील. आज त्या मी ई-कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीकडे सुपूर्द केल्या.

संगणक वापरायला सुरुवात केली त्याच सुरुवातीच्या काळामध्ये माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी फ्लॉपी डिस्कचा आम्ही वापर करायचो. साडेतीन इंच आकार असणाऱ्या या फ्लॉपीमध्ये केवळ १.४४ एमबी पर्यंत माहिती साठवता यायची. याचे देखील आम्हाला अप्रूप वाटत असे. एका संगणकातून दुसऱ्या संगणकामध्ये माहिती कॉपी करण्यासाठी त्याचा आम्ही सहज वापर करायचो. परंतु १५ ते २० वेळा वापरल्यानंतर ही फ्लॉपी खराब व्हायला लागायची. त्यातील डेटा करप्ट व्हायचा आणि मग आम्ही नवीन फ्लॉपी विकत घ्यायचो. त्या काळात सायबर कॅफेमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी प्रति तास तीस रुपये मोजावे लागायचे. त्यामुळे एका तासामध्ये इंटरनेटवरून भराभर माहिती डाऊनलोड करून आम्ही फ्लॉपी डिस्कमध्ये साठवून घरच्या संगणकावर लोड करायचं.

फारच थोड्या कालावधीमध्ये फ्लॉपी ड्राईव्ह देखील कालबाह्य झाले. त्यांची जागा ‘सीडी’ने घेतली. बाजारामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ सीडी उपलब्ध झाल्या. संगणकाच्या सीडी ड्राईव्हद्वारे त्यातली माहिती वाचता यायची. तसेच कॉपी करता यायची. एका सीडीची माहिती साठवण्याची क्षमता ७०० एमबी इतकी होती! त्या काळात ती प्रचंड वाटायची. सीडी ड्राईव्हद्वारे सीडीमधील माहिती फक्त बघता येत होती. परंतु सीडीमध्ये माहिती साठवता येत नव्हती. खूपच कमी लोकांकडे त्यावेळी ‘सीडी राईटर’ उपलब्ध होता. सीडी राईटर असणारा संगणक म्हणजे उच्च प्रतीचा संगणक, असे आम्ही मानत असू. आपल्याला एखादी सीडी राईट करायची असेल तर ज्याच्याकडे सीडी राईटर आहे त्याच्या संगणकाचा वापर करून आम्ही नवीन सीडी बनवून घेत असू. कालांतराने जवळपास सर्वच संगणकांमध्ये सीडी रायटर देखील उपलब्ध झाले. त्यामुळे सीडीमध्ये माहिती साठवणे सोपे झाले होते. संगणकातील बरीचशी महत्त्वाची माहिती आम्ही सीडीमध्ये साठवायला लागलो.

पुढे मागे संगणकाची हार्ड डिस्क जर खराब झाली तर? हा प्रश्न आम्हाला सतावत असायचा. त्यामुळे बरीचशी महत्त्वाची माहिती सीडीमध्ये साठवली जायची. लवकरच या संगणकातील माहितीच्या पिढीमध्ये डीव्हीडी दाखल झाली. डीव्हीडीची क्षमता साडेचार जीबी इतकी प्रचंड होती! याच काळामध्ये री-राईटेबल सीडी आणि डबल साइडेड सीडी व डीव्हीडी देखील उपलब्ध झाल्या होत्या. तंत्रज्ञानाची ही प्रगती खरोखर अचंबित करणारी होती. संगणकीय माहितीचा साठा वाढत चाललेला होता. त्यामुळे अशा नवनवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञानाची आवश्यकता तर होतीच.
डीव्हीडी रीडर बरोबरच राईटर देखील लवकरच बाजारात आले. मग आमचा डीव्हीडी रायटिंग चा उद्योग सुरू झाला. त्याकाळात इंटरनेटवर उपलब्ध होणारी महत्त्वाची माहिती तसेच चित्रपटातली गाणी व चित्रपट देखील डीव्हीडीमध्ये साठवून ठेवू लागलो.

अनेक संगणकीय नियतकालिकांसोबत देखील सीडी आणि डीव्हीडी उपलब्ध होत होत्या. त्यातली माहितीदेखील अमुल्य अशी होती. या सर्व सीडींचा माझ्याकडे बराच मोठा संग्रह तयार झाला. यातून त्या ठेवण्यासाठी नवीन पाऊच आणि कंटेनर देखील मी विकत घेतले होते. कधी कोणती माहिती लागत असेल तर लगेच ती सीडी अथवा डीव्हीडी काढून संगणकामध्ये उघडली जायची. अशा प्रकारे या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

परंतु दहा वर्षांपूर्वी पेन ड्राईव्ह नावाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने संगणक विश्वात प्रवेश केला. माहिती साठवण्यासाठी तसेच माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हे अतिशय सुलभ तंत्रज्ञान होते. मी पाहिलेला पहिला पेन ड्राईव्ह १२८ एमबी क्षमतेचा होता! कालांतराने त्याची क्षमता वेगाने दुप्पट होत गेली. आज आपल्याकडे टीबी अर्थात टेराबाईटमध्ये देखील पेन ड्राईव्ह उपलब्ध आहेत. पेन ड्राइवचा जमाना आल्यानंतर सीडी आणि डीव्हीडीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. याशिवाय इंटरनेट अन वेबसाईटस देखील वेगाने वाढत होत्या. त्यामुळे कोणतीही गोष्ट लागत असेल तेव्हाच इंटरनेटवरून डाऊनलोड करायला लागलो. अर्थात माहिती साठवून ठेवण्याची आवश्यकता तर नव्हती.

काळाच्या ओघामध्ये सीडी आणि डीव्हीडी ड्राइव्ह देखील आता लॅपटॉप व संगणकामध्ये उपलब्ध होत नाहीत. परंतु संगणकीय माहितीचा साठा करण्यासाठी या तंत्रज्ञानाने संगणकाच्या इतिहासात मोलाचे योगदान दिले होते. आज माझ्याकडे असलेल्या सर्व सीडीज व डीव्हीडीची एकूण क्षमता ही एका पोर्टेबल हार्ड डिस्क इतकी आहे! यांना तंत्रज्ञानाची किमयाच म्हणावी लागेल. इंटेलचे संस्थापक गॉर्डन मूर यांनी संगणक विश्वाला मूरचा नियम सांगितला आहे. जरी तो संगणकातील मायक्रोप्रोसेसरला वापरण्यात येत असला तरी संगणकीय माहितीसाठ्याला देखील तो निश्चित लागू होतो. आज आपण वापरत असलेल्या हार्ड डिस्क देखील कालांतराने कालबाह्य होतील आणि नवे तंत्रज्ञान त्याची जागा घेईल. ही काळाची गरज आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाला सहाय्य करणारे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान हे इतिहासात तितकेच महत्त्वाचे होते, हे विसरून चालणार नाही!

. . . .

काही माहितीपूर्ण प्रतिसाद :

Ramesh Rahalkar
मी पहिला संगणक बघितला तेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो, १९७८ सालाची गोष्ट आहे. Commodore Pet. Memory – १००० bytes. त्या काळी floppy disks नव्हत्या. Screen, keyboard व tape recorder एकत्र fuse केलेले ते unit होते. तेव्हा अर्थातच DOS सुद्धा नव्हती. फक्त Basic मध्ये काही लहान, सोपे programs लिहिता येत होते (१००० bytes मध्ये किती लिहिणार?). माझ्या प्रोफेसरकडे तो होता, व बघून मी खूपच impress झालो होतो.

Mangesh Anāokar
ऐंशीच्या दशकांत सुरुवातीला आम्ही चक्क ८ १/२ इंची फ्लाॅपी वापरत होतो. त्याच सुमारास स्मगल्ड पीसींची भारतात एण्ट्री झाली, ज्यामध्ये ५ १/४ इंची फ्लाॅपी असायची. ड्राइव्हसुद्धा एकच होता आणि असा पीसी चालायचा डाॅस २.० वापरुन. एकच ड्राइव्ह असल्याने त्याला ‘A’ ड्राइव्ह संबोधिले जायचे.
प्रथम उतलब्ध असलेल्या फ्लाॅपी या SSSD (Single Side Single Density) प्रकारच्या आणि २५६ KB साईजच्या होत्या. मग प्रथम SSDD प्रकारच्या ५१२ KB च्या व नंतर DSDD (Double Side Double Density) प्रकारच्या १.२० MB च्या फ्लाॅपी व ड्राइव्ह आलेत.
तो पर्यंत पीसीचा प्रथम PC-XT हा दोन ड्राइव्हचा पीसी, A आणि B ड्राइव्ह सोबत आला. त्यामुळे आता ‘बॅकअप’ घेणे साध्य होउ लागले.
लगोलग PC-AT हा दोन ५ १/४ इंच फ्लाॅपी ड्राइव्ह सोबत १० MB आकाराच्या ‘राक्षसी’ आकाराचा हार्ड ड्राइव्ह ‘C’ ड्राइव्ह म्हणुन आला.
इथुन पुढे प्रगती झपाट्याने झाली. पहिला पीसी इण्टेल ८०८० वापरुन IBM ने अमेरीकन बाजारात उतरविलेला होता. पण १९८५ पर्यंत इंटेलचे ८०८१, ८०८२, ८०८३, ८०८४, ८०८५ वापरुन बनल्या गेलेल्या संगणका नंतर ८०८६ वापरुन बनलेला संगणक ‘३८६’ म्हणुन बाजारात आला तो पर्यंत डाॅस ३.० सुद्धा आलेली होती.
१९९० नंतर डाॅस ४.० आली. मायक्रोसाॅफ्टची अधिकृत काॅपी सुद्धा ५ १/४ इंची फ्लाॅपीवरच उपलब्ध होती.
या सुमारास ३ १/२ इंच आकाराची १.४४ MB ची फ्लाॅपी व ड्राइव्ह वापरात आले. या फ्लापींना कडक आवरण होते, जे ५ १/४ इंच फ्लाॅपींना नसायचे.
IBM ने नव्वदच्या सुमारास ‘पेण्टीयम’ आणला, ज्यामध्ये CD ड्राइव्ह वापरला होता. सहाजिकपणे अधिकृत आॅपरेटींग सिस्टम CD वरच उपलब्ध होती.
ज्यांना संगणकांच्या इतिहासात उत्सुकता आहे, त्यांनी ‘Osborne’ लिखीत पुस्तके वाचावीत. नांव लक्षांत नाही, पण पहिला खंड ‘Part Zero’ पासुन सुरु होतो.

पहिला मायक्रो प्रोसेसर ४०४० कां व कसा घडला इथपासुन पुढील कांही काळांत कसे बदल घडत गेलेत, याची माहिती त्यांत वाचायला मिळेल.

आनंद घारे : हा लेख आणि त्यावरील कॉमेंट्स वाचून तीनचार दशकांमधला प्रवास डोळ्यांसमोर आला. पीसी हा शब्दसुद्धा ऐकला नव्हता तेंव्हा माझ्या एका मित्राने टीव्हीचा मॉनिटर आणि टेप रेकॉर्डर यांचा उपयोग करून घरी एक खेळातला कॉम्प्यूटर तयार केला होता. काही ऑफिसेसमधल्या कॉंप्यूटर्ससाठी पंच्ड कार्ड्स वापरत असत. मग पीसी, पीसीएक्सटी वगैरे आले. ते डॉसवर चालायचे. तिथपासून बघता बघता आता किती प्रगति झाली आहे ?

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: