भारतरत्न लता मंगेशकर

मला समजायला लागल्यापासून मी लता मंगेशकरांची गाणी ऐकत आलो आहे, आजही ती आवडीने ऐकतोच आणि पुढेही ऐकतच राहणार आहे यात तिळमात्र शंका नाही. लता मंगेशकर हे नाव मी कदाचित थोडा मोठा झाल्यावर पहिल्यांदा ऐकले असेल, पण त्यानंतर ते नाव आणि तो आवाज कानावर आला नाही असा एक दिवसही गेला नसेल. पु.ल.देशपांडे यांनी एका सभेत असे सांगितले होते कीआकाशात देव आहे की नाही हे मला नाही, पण या आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लता मंगेशकरांचा आवाज आहे. दिवस असो, रात्र असो, कुठल्याही क्षणी तो कुठून तरी आणि कुठे तरी तो आवाज जातच असतो. हे अगदी खरे आहे. पूर्वीच्या काळी तो दिव्य आवाज रेडिओलहरींमधून आकाशात सगळीकडे पसरत असेल, आता इंटरनेटमधून जात असतो. त्यांनी पन्नास साठ वर्षांपूर्वी किंवा त्याच्यही आधी गायिलेली सुमधुर गाणी आजही ऐकत रहावीशी वाटतात. निदान तीन पिढ्या तरी ती ऐकत आणि गुणगुणत आल्या आहेत. अगदी आज काल होणाऱ्या सारेगमसारख्या संगीतस्पर्धांमधल्या मुलीसुद्धा लता मंगेशकर यांची गाणी गाऊन स्पर्धा जिंकत असतात, इतकी त्या गाण्यांची मोहिनी किंवा महती आहे.

मी जेंव्हा जेंव्हा टीव्हीवर त्यांची एकादी मुलाखत किंवा त्यांचा सार्वजनिक कार्यक्रम पाहिला आहे तेंव्हा त्यांच्या अत्यंत शालीन अशा व्यक्तीमत्वानेही भारावून गेलो आहे. मला नेहमी त्यांच्याबद्दल अतीव आदर वाटत आला आहे. मी जेंव्हा जेंव्हा पेडर रोडवरून जात होतो तेंव्हा तेंव्हा प्रभुकुंजकडे पाहूनच त्यांना हात जोडून नमस्कार करत होतो त्यांना इस्पितळात ठेवले असल्याच्या बातमीने मन बेचैन झाले होते, पण त्यांची प्रकृति सुधारत असल्याच्या बातम्याही येत होत्या. त्या पूर्ण बऱ्या होऊन घरी परत येतील अशीच आशा वाटत असतांना अचानक त्यांची प्राणज्योत मावळल्याची दुःखद वार्ता आली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि. या निमित्याने त्यांच्या जीवनातील घडामोडींची माहिती देणारा एक लेख आणि इतर काही लेख, छायाचित्रे व कविता मी या पानावर संग्रहित करत आहे. मी हे सर्व लेख वॉट्सॅपवरून घेतले आहेत.सर्व मूळ लेखकांचे मनःपूर्वक आभार.

लतादिदींच्या ९२ वर्षातील माहितीपूर्ण गोष्टी !!

( संकलन : हेमंत कोठीकर. ) (खालील विविध पुस्तकातून ह्या संकलित केलेल्या आणि मराठीत लिहून काढलेल्या माहितीपूर्ण गोष्टी आहेत. या शिवाय काही मुलाखती, नेटवरील ब्लॉग्स आणि लेख यातूनही माहिती घेतली आहे. चूकभूल द्यावी घ्यावी. काही गोष्टी चुकीच्या आढळल्या तर कृपया कळवाव्या. )

१) १९२९ साली या दिवशी जन्मलेल्या लतादिदींचे नाव खरे तर हेमा हर्डीकर राहिले असते. पण ते झाले लता मंगेशकर !. का ? ते खालील ६७ व्या माहितीत बघा 🙂

२) दिदींच्या वयाच्या १३ व्या वर्षी म्हणजे १९४२ साली त्यांचे वडील म्हणजे मास्टर दीनानानाथ हे जग सोडून गेले. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत याच वर्षी वयाच्या १३ व्या वर्षी दिदींनी त्यांचे पहिले गाणे ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटात म्हटले. पण दुर्दैवाने ते चित्रपटात घेतले गेले नाही !

३) याच वर्षी म्हणजे १९४२ साली ‘पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटात ‘नटली चैत्राची नवलाई’ हे दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केलेले गाणे दिदींनी म्हटले आणि ते त्यांचे प्रथम गाणे म्हणून मानले गेलेय.

४) पुढच्या वर्षी म्हणजे १९४३ साली त्याचे प्रथम हिंदी गाणे आले. मात्र ते आले मराठी चित्रपट ‘गजाभाऊ’ या चित्रपटात ! ‘माता एक सपूत’ असे त्याचे शब्द होते !

५) याच दरम्यान ‘गजाभाऊ किंवा ‘माझे बाळ’ या चित्रपटात त्यांनी छोट्याशा भूमिका देखील केल्या.

६) दिदींचे पहिले हिंदी चित्रपटातील गाणे १९४६ साली ‘आप की सेवा मे’ या चित्रपटात दत्त डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘पाव लागू कर जोरी’ हे आले !

७) अभिनेता महिपाल, जे नंतर नवरंग आणि इतर चित्रपटांमुळे नायक म्हणून प्रसिद्धीस आले, ते दिदींच्या वरील प्रथम हिंदी चित्रपट गाण्याचे गीतकार होते !

८) पण या आधी किंवा या दरम्यान प्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर यांनी दिदींचा आवाज ओळखला तो एका स्पर्धेत. या स्पर्धेत लहानग्या लताने ‘खचांजी’ चित्रपटातील नूरजहाँने गायिलेले गाणे गायले होते.

९) या स्पर्धेत जिंकल्याबद्दल लतादीदींना दिलरुबा हे वाद्य बक्षीस म्हणून मिळाले. पण नंतर जेव्हा गुलाम हैदर यांनी प्रसिद्ध निर्माते शशधर मुखर्जी यांना लताचा आवाज ऐकवला, तेव्हा त्यांनी तो फार पातळ आवाज आहे म्हणून सरळ नाकारला !

१०) १९४८ साली जिद्दी चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी जेव्हा लतादीदी लोकल आणि बस ने फेमस स्टुडिओत जात होत्या तेव्हा एक तरुण त्यांच्याच पाठीपाठी पार स्टुडिओ पर्यंत पोचला. दिदींना नंतर कळले की हा तरुण किशोर कुमार आहे आणि स्टुडिओच शोधतो आहे ! त्या दिवशी दोघांचे पहिले द्वंद्वगीत रेकॉर्ड झाले !

११) दिदींची भारतभर खरी ओळख झाली ती १९४९ साली आलेल्या ‘महल’ चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ या गाण्याने !. पण हे गाणे रेकॉर्ड झाल्यावर जेव्हा निर्माता सेवक वाच्छा यांनी ऐकले तेव्हा त्यांना ते अजिबात आवडले नाही आणि त्यांनी चक्क ते चित्रपटुन काढून टाकायचे ठरवले. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी आग्रह केल्याने गाणे चित्रपटात राहिले आणि दिदींचा आवाज घराघरात पोचला.

१२) ‘आयेगा आनेवाला’ या गाण्याच्या सुरवातीच्या ओळी ‘खामोश है जमाना….’ या दूर कुठून तरी गूढपणे येतात असा इफेक्ट हवा होता. पण तेव्हा तंत्रज्ञान फारसे प्रगत नसल्याने आणि रेकॉर्डिंग साठी एकच माइक्रोफोन असल्याने तो रेकॉर्डिंग रूम च्या मध्ये ठेवून दिदींना या ओळी दुरून माइक्रोफोन पर्यंत चालत चालत येत म्हणायला लावल्या, जेणेकरून असा दुरून कुणी गात असल्याचा इफेक्ट यावा !. आता हे गाणे आणि या ओळी ऐकताना ही कसरत केली असेल असे वाटणार सुद्धा नाही !

१३) हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले तरी या गाण्याच्या रेकॉर्ड वर गायिका म्हणून लता मंगेशकर नव्हे तर ‘कामिनी’ हे नाव होते. ! कारण त्यावेळी रेकॉर्ड वर गाणे चित्रपटातील ज्या भूमिकेवर चित्रित झाले त्याचे नाव द्यायची पद्धत होती ! आणि या चित्रपटात मधुबालाने केलेल्या भूमिकेचे नाव ‘कामिनी’ होते ! पुढे ही पद्धत बदलली !

१४) मराठी चित्रपटांना दिदींनी ‘आनंदघन’ या नावाने संगीत दिले आहे. हा शब्द त्यांना रामदास स्वामींच्या लिखाणातुन सुचला. आधी भालजी पेंढारकर यांनी दीदींना ‘जटाशंकर’ हे नाव सुचवले होते, पण ते त्यांना फारसे आवडले नाही !

१५) हृषीकेश मुखर्जी यांनी त्यांच्या ‘आनंद’ या सुप्रसिद्ध चित्रपटासाठी लताजींना संगीतकार म्हणून विचारणा केली होती. पण तेव्हा पार्श्वगायनात संपूर्ण व्यस्त असल्याने त्यांनी नकार दिला. नंतर ह्या चित्रपटाचे संगीत सलील चौधरी जी यांनी दिले.

१६) सचिन देव बर्मन यांच्याशी पाच वर्षे अबोला राहिल्यानंतर बंदिनी चित्रपटातील ‘मोरा गोरा अंग लै ले ‘ हे गाणे दोघांच्या दिलजमाईचे प्रथम गाणे !

१७) रेकॉर्डिंगच्या आधी बहुतेक वेळा लता दीदी व्हायोलीन वादकास शेजारी बसवून गाण्याची पूर्ण चाल ऐकतात. गाणे व्यवस्थित लयीत गाण्यासाठी त्याचा उपयोग होतो असा त्यांचा विश्वास आहे.

१८) संगीतकार चित्रगुप्त यांचे छोटे सुपुत्र आणि प्रसिद्ध संगीतकार आनंद-मिलिंद जोडीतील मिलिंद यांचे जन्मनाव लतादीदींनी सुचवले होते. मिलिंद माधव असे त्यांनी सुचवलेले नाव पुढे मिलिंद असे झाले !

१९) ७० च्या दशकातील ‘इंतेकाम’ सिनेमातील ‘आ, जाने जा…’ हे कॅब्रे गीत गाण्यासाठी त्यांनी नकारच दिला होता. पण संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सतत प्रयत्नामुळे आणि हे गाणे छचोर होणार नाही या ग्वाहीमुळे त्यांनी ते गायले. आज लताजींनी गायिलेल्या थोडक्या क्लब गीतांमध्ये हे एक प्रमुख आणि लोकप्रिय गाणे मानले जाते.

२०) ‘वोह कौन थी ?’ या चित्रपटातील ‘लग जा गले’ हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय गीत रेकॉर्ड झाल्यानंतर दिग्दर्शक राज खोसला याना मात्र पसंत पडले नव्हते आणि त्यांनी ते चक्क चित्रपटुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. संगीतकार मदन मोहन यांनी अभिनेता मनोज कुमार करवी राज खोसला याना समजावून सांगितल्यावर हे गाणे चित्रपटात ठेवले गेले ! आज ते लताजींच्या अत्यंत लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे !

२१) ७० च्या दशकाच्या मध्ये लतादीदी आणि हृदयनाथजी यांनी संगीतकार जोडी म्हणून काम करायचे म्हणून जवळपास नक्कीच केले होते पण मग पुन्हा लताजींच्या अती व्यस्त पार्श्वगायनामुळे हा बेत बारगळला !

२२) ४० च्या दशकात अगदी सुरवातीला दिलीप कुमार यांनी लताजी यांना त्यांच्या उर्दू उच्चाराबद्दल ‘ तुम्हारे उर्दू मे मराठी दाल भात की बू आती है’ असे गमतीने म्हटल्यावर, लताजी यांनी ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार अगदी परफेक्ट केले.

२३) आणि नंतर जेव्हा ‘महल’ चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ हे गाणे लोकप्रिय झाले तेव्हा नर्गिसची आई आणि तेव्हाची प्रसिद्ध अभिनेत्री, संगीतकार जद्दन बाई यांनी लताजींना शाबासकी देत म्हटले की या गाण्यात ‘बघैर’ हा शब्द ज्या तऱ्हेने उच्चारला आहे त्यावरून वाटत नाही की एका मराठी मुलीने हे उच्चारण केलेय !

२४) प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक मेहबूब खान जेव्हा गंभीर आजारी होते तेव्हा त्यांच्या अंतिम काळात त्यांनी हॉस्पिटलमधून लताजींना ‘रसिक बलमा’ हे गाणे फोनवरून ऐकविण्याची विनंती केली होती. हे गाणे ऐकल्यावर खूप शांतता आणि समाधान मिळते यावर त्यांचा विश्वास होता.

२५) बैजू बावरा चित्रपटातील ‘तू गंगा की मौज मैं जमुना की धारा’ हे गाणे रेकॉर्ड करताना लताजींना १०२ डिग्री ताप होता. रेकॉर्डिंगच्या अखेरीस तर तापामुळे त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. पण हे गाणे ऐकताना हे कुठेही जाणवत नाही !

२६) ४०च्या दशकाच्या सुरवातीला ‘बडी माँ’ या चित्रपटात लताजींनी एक छोटीशी भूमिका केली होती. या चित्रपटाच्या अभिनेत्री नूरजहाँ होत्या. त्याआधी त्यांचेच ‘खाचांजी’ चित्रपटातील गीत एका स्पर्धेत गाऊन लताजींनी बक्षीस मिळवले होते. त्यांची आणि नूरजहाँची प्रथम भेट या ‘बडी मां’ चित्रीकरणादरम्यान कोल्हापूरला झाली आणि नूरजहाँ ने लहानग्या लताला ‘तू पुढे खूप मोठी गायिका होशील’ असा आशीर्वाद दिला, तो पुढे अत्यंत खरा ठरला.

२७) १९४७ नंतर भारत सोडून गेल्यावरही नूरजहाँ आणि लताजींचा स्नेह कायम होता. पाकिस्तानवरून बऱ्याचदा नूरजहाँ लताजींना फोन करताना ‘धीरे से आजा री अंखियन मे’ हे गाणे ऐकवण्याची विनंती करायच्या आणि अर्थात लताजी त्या पूर्ण करायच्या.

२८) एके निवांत रात्री उस्ताद बडे अली खान रेडिओ ऐकत असताना लताजींचे ‘ये जिंदगी उसिकीं है’ हे अनारकली सिनेमातील गाणे लागले, तेव्हा ‘कम्बख्तत, ये लडकी कभी बेसुरी नही होती !’ हे प्रशंसेचे उद्गार त्यांनी काढल्याचे सर्वविदित आहे.

२९) ‘महल’ आणि इतर चित्रपटातील रेकॉर्डस् वर जरी गायिका म्हणून लताजींचे नाव नसले तरी नंतर अभिनेत्रींच्या भूमिकेचे नाव रेकॉर्डस् वर देण्याची ही पद्धत नंतर बदलली आणि बरसात ह्या १९४९ च्या चित्रपटापासून लताजींचे नाव पहिल्यांदा रेकॉर्डस् वर आले !

३०) लताजींनी गाण्याचे शब्द छचोर वाटतात म्हणून ‘संगम’ चित्रपटातील ‘मैं का करू राम मुझे बुड्ढा मिल गया’ हे गाणे गायला नकार दिला होता. राज कपूर यांनी ‘हे गाणे फक्त गंमत म्हणून चित्रपटात आहे’ हे समजावून सांगितल्यावर त्यांनी ही गाणे गायिले.

३१) गाण्यांच्या शब्दांच्या याच कारणास्तव त्यांनी १९५३ सालच्या ‘बूट पॉलिश’ या चित्रपटातील ‘मैं बहारों की नटखट रानी’ हे गाणे पण गायिले नाही. हे गाणे नंतर आशाजीनी गायिले !

३२) हिंदी सिनेमाच्या सर्व प्रमुख संगीतकारांपैकी फक्त ओ.पी. नय्यर यांनी लताजींचा आवाज कधीही आपल्या संगीतात वापरला नाही !

३३) संगीता व्यतिरिक्त लताजींना फोटोग्राफीची आवड आणि मुळापासून माहिती आहे. कॅमेरा आणि त्याची तांत्रिक अंगे त्यांना चांगल्या रीतीने ठाऊक आहेत. ज्वेलरी डिझाईन ही त्यांची दुसरी प्रमुख आवड !

३४) सामान्यतः स्त्रिया चांदीचे पैंजण वापरतात पण लताजींचे पैंजण हे नेहमी सोन्याचे असतात. श्रेष्ठ गीतकार आणि मंगेशकर कुटुंबाचे स्नेही पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सांगण्यावरून त्यांनी पैंजण कधीही चांदीचे घातले नाहीत.

३५) लताजींना शक्यतो माईकसमोर जाण्याच्या आधी आपली पादत्राणे काढून ठेवायची सवय आहे. लंडनच्या अल्बर्ट हॉल येथे कार्यक्रम करताना त्या हे करायला गेल्या तेव्हा तेथील थंडीमुळे आयोजकांना त्यांना पादत्राणे घालायची विनंती करावी लागली !

३६) अभिनेत्री मधुबाला बऱ्याचदा तिची सर्व गाणी फक्त लताजी म्हणतील असा आग्रह निर्माता/दिग्दर्शकांकडे करायची. अनेकदा आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ती तसे नमूद करण्याचा आग्रह करायची !

३७) ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट संगीतकार म्हणून राज कपूर यांनी हृदयनाथजी याना देतो म्हणून कबुल केल्यावर नंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल याना दिला. या कारणामुळे या चित्रपटाची गाणी गायला लताजीची इच्छा नव्हती . राज कपूर आणि स्वतः हृदयनाथ जी यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी या चित्रपटाची गाणी गायली.

३८) १९४२ ते १९४८ पर्यंत संघर्ष करताना आणि वेगवेगळ्या स्टुडिओत पोचताना लताजी लोकल आणि बसनेच जायच्या. १९४८ साली त्यांनी त्यांची पहिली कार ‘ग्रे हिल्मन’ घेतली आणि हा लोकलचा प्रवास थांबला.

३९) त्यांची सध्याची कार मर्सिडीज आहे. वीर झारा या चित्रपटाकरिता त्यांनी एक पैसाही मानधन घेतले नाही तेव्हा निर्माते दिग्दर्शक यश चोप्रा यांनी ही मर्सिडीज त्यांना भेट दिली.

४०) सगळ्या संगीतकारांशी लताजींचे संबंध सौहार्दाचे असले तरी मदन मोहन यांच्याशी मात्र भावाचे नाते होते. मदन मोहन यांची मुले संजीवजी आणि संगीताजी यांना सुद्धा त्यांनी मुलासारखा लळा लावला.

४१) मंगेशकर हे त्यांचे आडनाव जगात प्रसिद्ध असले तरी त्यांच्या वडिलांच्या घराण्यात हर्डीकर हे नाव होते. काहीजण ‘अभिषेकी’ हे आडनाव होते असेही सांगतात.

४२) लताजी २० वर्षाच्या आसपास असताना त्यांना एक स्वप्न सारखे यायचे ज्यात त्या एका मंदिराच्या पायऱ्यांवर बसल्या आहेत आणि खाली समुद्राच्या लाटा येऊन त्यांच्या पायाला स्पर्श करताहेत ! लताजींच्या आई, माई मंगेशकर यांनी याचा अर्थ ‘तुला देवाचा आशीर्वाद आहे. एक दिवस तू खूप मोठी होशील’ असा सांगितला. ही घटना १९४८ च्या आसपासची असावी.

४३) त्यांचे नाव ४०च्या दशकाच्या शेवटी बऱ्यापैकी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या रेडिओवरच्या बऱ्याच प्रशंसकांनी ‘लारा लप्पा लारा लप्पा लाई रखदा’ आणि ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ या गाण्यांबद्दल मात्र ‘त्यांनी अशी सुमार आणि हलक्या अर्थाची गाणी गाऊ नयेत” म्हणून तीव्र नापसंती दर्शवली होती. अर्थात आज ही गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत.

४४) लहान असताना लताजी थोर गायक के. एल. सैगल यांच्या गायनाबद्दल वेड्या होत्या. त्या लहान वयात लग्नाचा अर्थ माहिती नसताना सुद्धा ‘मी लग्न करीन तर के.एल. सैगलशीच’ असा त्यांचा बालहट्ट होता ! मात्र १९४७ मध्ये सैगल साहेबांचा मृत्यू होईपर्यंत त्यांची आणि सैगल साहेबांची कधीही भेट झाली नाही.

४५) लताजींनी शोभना समर्थ , नंतर त्यांच्या मुली नूतन आणि तनुजा आणि नंतर तनुजाची मुलगी काजोल अशा तीन पिढ्यांसाठी गाणी म्हटली. तीन पिढ्यांतील नायिकांसाठी एकाच गायिकेने गाणी म्हटल्याचे हे बहुधा एकमेव उदाहरण असावे ! ( शोभना समर्थ : सिनेमा : नृसिंह अवतार १९४९ )

४६) गाणे रेकॉर्ड करायच्या आधी लताजी आपल्या हस्ताक्षरात गाणे हिंदीत लिहून घेतात. कागदावर सुरवातीला श्री लिहिलेले असते. मग त्या लिहिलेल्या गाण्यात कुठे पॉज घायचा, कुठल्या शब्दांवर जोर द्यायचा, कुठे श्वास घ्यायचा याबद्दल खास त्यांचा खुणा असतात.

४७) गाण्यातील शब्दांचे महत्व, त्यांचे उच्चारण आणि कुठल्या शब्दांवर त्याच्या अर्थानुसार जोर द्यायचा याचे प्राथमिक महत्व संगीतकार गुलाम हैदर साहेबानी त्यांना सांगितले. तेव्हापासून शब्दोच्चरावर लताजींचा नेहमी कटाक्ष आहे.

४८) लताजींच्या विरह गीतांनी श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू येत असले तरी स्वतः लताजींना दुःखी चित्रपट फारसे आवडत नाहीत. उलट त्यांना खेळकर, गंमतीप्रधान चित्रपट जास्त आवडतात. सीआयडी ही त्यांची आवडती सिरीयल होती/आहे. आणि माता हारी हा ४०च्या दशकातील गुप्तहेरप्रधान इंग्रजी चित्रपट त्यांचा पाहिलेला पहिला इंग्रजी चित्रपट आहे.

४९) लताजी गाणी गाताना श्वास कसा आणि कुठे घेतात याबद्दल पुष्कळ लोकांना कुतूहल आहे, कारण त्यांच्या गाण्यात अशी श्वास घेतल्याची जागाच आढळत नाही. श्वासोश्वासाचे हे तंत्र त्यांना अगदी सुरवातीला संगीतकार अनिल बिश्वास यांनी शिकवले होते आणि ते त्यांनी समर्थपणे हाताळले.

५०) संगीतकार सज्जाद हुसेन हे अगदी परखड आणि फटकळ बोलण्यासाठी प्रसिद्ध होते. पण लताजींबद्दल बोलताना मात्र त्यांनी काढलेले उद्गार ‘एक लता गाती है, बाकी सब रोती है’ प्रसिद्ध आहेत !

५१) १९५९ सालापर्यंत फिल्मफेअर अवॉर्ड्स मध्ये गायकांकरिता कुठलेही अवॉर्ड नव्हते. याचा निषेधार्थ लताजींनी १९५७च्या फिल्मफेअर अवॉर्ड्स कार्यक्रमात ‘रसिक बलमा’ ही गाणे गायला नकार दिला. पुढे १९५९ सालापासून गायकांकरिता असे अवॉर्ड आले. आणि १९६७ पासून स्त्री आणि पुरुष गायकरिता स्वतंत्र अवॉर्ड्स सुरु झालीत.

५२) ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम’ या ‘वह कौन थी’ सिनेमातील गाण्याचे शूटिंग साधनावर करायची तयारी झाली पण लताजी लंडनला असल्याने गाणे लताजींच्या आवाजात तोपर्यंत रेकॉर्ड झाले नव्हते. शूटिंग वाया जाऊ नये म्हणून मग संगीतकार मदन मोहन यांनी स्वतःच्या आवाजात ही गाणे रेकॉर्ड केले आणि या पुरुषी आवाजावर साधनाला गाणे शूट करावे लागले ! नंतर हे गाणे लताजींच्या आवाजात रेकॉर्ड होऊन चित्रपटात आले !

५३) फोटोग्राफी प्रमाणेच लताजींना क्रिकेटची सुद्धा प्रचंड आवड आहे आणि सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर त्यांचे अत्यंत आवडीचे खेळाडू आहेत. सचिन तर त्यांना आईसमानच मानतो !

५४) ८०च्या दशकात कॅनडा दौऱ्यात असताना त्यांनी तेथील प्रसिद्ध गायक ऑने मरे याने गायिलेले ‘यु निडेड मी’ हे संपूर्ण इंग्रजी गाणे गायिले होते. त्यांनी गायिलेले हे बहुधा एकमेव इंग्रजी गाणे !

५५) हिंदी सिने संगीतात त्यांचे नाव जगविख्यात असले तरी त्यांना पाश्चात्य शास्त्रीय संगीत आणि त्यातील बीथोवन आणि मोझार्ट यांच्या सुरावटी ऐकायला फार आवडतात.

५६) सुरवातीच्या संघर्षाच्या काळात स्टुडिओ ते स्टुडिओ अशी पायपीट त्यांनी केली असली तरी आज त्यांचा स्वतःचा स्टुडिओ आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांचा लता मंगेशकर स्टुडिओ आणि ‘एल. एम. म्युजिक’ नावाने त्यांची कंपनी देखील आली आहे.

५७) सध्याच्या काळात त्यांनी हिंदी सिने संगीत जवळपास बंदच केले असले तरी भक्तीगीतांचे अल्बम त्या गातात. अगदी अलीकडे वयाच्या ८८-९० व्य वर्षी त्यांनी भक्तीगीतांच्या अल्बम मध्ये आवाज दिला आहे.

५८) कुणाही स्त्रीला आवड असावी तशी त्यांना हिऱ्यांची खूप आवड आहे आणि स्वतःचे हिऱ्यांचे दागिने त्या स्वतःच डिजाईन करतात.

५९) ४०च्या दशकात हिंदी सिनेमात गायन सुरु केल्यानंतर सगळी मंगेशकर बहीण भावंडे आईसोबत मुंबईतील नाना चौक येथे दोन खोल्यांच्या घरात राहायचे. १९६० मध्ये त्यांनी प्रभुकुंज या पेडर रोडवरील बिल्डिंग मध्ये एक पूर्ण मजला घेतला आणि गेली ६० वर्षे त्या तिथेच राहताहेत.

६०) ४० दशकातील सुरवातीची काही वर्षे हिंदी सिने संगीतात लताजींचा सूर काहीसा अनुनासिक वाटेल. कदाचित त्यावेळच्या प्रसिद्ध गायिकांचा किंवा त्या वेळच्या ट्रेंडचा तो परिणाम असेल. पण काही काळातच लताजी आपल्या मोकळ्या आवाजात गाऊ लागल्या. १९४६ सालच्या ‘सौभद्र’ चित्रपटातील ‘सांवरिया हो, बांसुरीया हो’ हे गाणे याचे द्योतक आहे. १९४९ पासून हा आवाज पूर्णपणे मोकळा झाला !

६१) १९४९ साली राज कपूर यांच्या बरसात चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी उद्या या म्हणून एक देखणा तरुण लताजींच्या घरी सांगायला आला. तेव्हा लताजींनी आशा ताईंना ‘राज साहेबांच्या ऑफिसची निरोप देणारी माणसे सुद्धा स्मार्ट दिसतात’ असे गमतीने म्हटले. दुसऱ्या दिवशी रेकॉर्डीं करताना कळले की तो घरी आलेला स्मार्ट युवक म्हणजे संगीतकार शंकर-जयकिशन मधील जयकिशन होते !

६२) ९०च्या दशकात आलेला आणि उस्ताद झाकीर हुसेन यांनी संगीत दिलेला ‘साज’ हा चित्रपट त्यांच्या आणि आशाताईंच्या जीवनावर असल्याचे म्हटले जाते. अर्थात चित्रपटात तसे कुठे म्हटलेले नाही किंवा लताजी किंवा आशा ताई यांनी सुद्धा तशी काही वाच्यता केली नाही.

६३) लताजींनी पिता-पुत्रांच्या अनेक संगीतकार जोड्यांच्या गाण्यांना आवाज दिला आहे. सचिनदेव बर्मन-आर डी बर्मन, रोशन-राजेश रोशन, चित्रगुप्त-आनंद मिलिंद, शंभू सेन-दिलीप समीर सेन, कल्याणजी-आनंदजी-विजू शाह,मदन मोहन-संजीव कोहली अशा आणि इतरही संगीतकार पिढ्यांसोबत गायन केलेय !

६४) त्यांच्याशी नामसाध्यर्म्य असलेल्या इतर गायिकांसोबत त्यांची गाणी आहेत. अगदी सुरवातीच्या काळातील ‘पहिली मंगळागौर’ चित्रपटात स्नेहलता प्रधान या गायिकेसोबत, ‘चूप चूप खडे हो’ या गाण्यात प्रेमलता सोबत तर कच्चे धागे या आणि इतर चित्रपटात हेमलता सोबत त्यांची द्वंद्व गीते आहेत !

६५) जंगली चित्रपटातील ‘एहसान तेरा होगा मुझपर’ हे गाणे गायला कठीण गेल्याचे लताजी यांनी एकदा सांगितले होते. कारण मुळात हे गाणे प्रथमतः पुरुषी आवाजाकरिता तयार केल्या गेले होते आणि त्यात मुखडा आणि कडवे यात खूप चढ उतार आहेत !

६६) लेकिन हा चित्रपट लताजींनी निर्मित केलेला चित्रपट आहे. चित्रपटाच्या नामावलीत मात्र हृदयनाथजी यांचे नावसुद्धा निर्माता म्हणून आहे.

६७) इंदोर येथे २८ सप्टेंबर १९२९ रोजी जन्म झाल्यानंतर त्यांचे नाव हेमा ठेवल्या गेले. असे म्हणतात की तेव्हा आडनाव हर्डीकर असे होते. नंतर त्यांचे नाव बदलून ‘लतिका’ असे ठेवल्या गेले कारण दीनानाथजींच्या भावबंधन या संगीत नाटकातील एका स्त्री पात्राचे ते नाव होते. नंतर गोव्याच्या मंगेशी या कुलदैवताचे स्मरण म्हणून आडनाव सुद्धा हर्डीकर वरून मंगेशकर झाले असे सांगतात. म्हणून हेमा हर्डीकर याचे रूपांतर लता मंगेशकर असे झाले !

६८) लताजींना ६ वेळा फिल्फेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर त्यांनी त्या स्पर्धेतून दुसऱ्या गायिकांना संधी मिळावी म्हणून माघार घेतली. याशिवाय त्यांना ३ वेळा राष्ट्रीय पारितोषिक, भारतरत्न आणि किमान १० विद्यापीठांची डी.लिट.ही पदवी मिळाली आहे.

६९) हृदयनाथजी यांच्या म्हणण्यानुसार लताजींचा आवाज सातही स्वरात आणि सगळ्या २८ श्रुतींना स्पर्श करू शकतो. अशी किमया असणाऱ्या त्या बहुधा एकमेव गायिका असाव्यात. पुरुषी आवाजामध्ये बडे गुलाम अली खान साहेब यांच्या बाबत असे म्हटले जाते.

७०) त्यांचे ‘जिस देश मे गंगा बहती है’ या चित्रपटातील ‘आ अब लौट चले’ या गाण्यातील ‘आजा रे…. आ जा ..’ ही तान ऐकली तर मानवी आवाज अंतिमतः जिथे पोहचू शकतो त्या सप्तकाच्या शेवटच्या ठिकाणास स्पर्श करणारा आणि तरीही तेथे स्थिर राहून अजिबात विचलित न होण्याची किमया साधणारा हा अद्भुत आवाज आहे.

७१) ‘आझाद’ चित्रपटातील ‘अपलम चपलम’ ही गाणे उषा मंगेशकर यांचे हिंदी सिनेमातील दुसरेच गाणे आणि लताजींसोबत प्रथम द्वंद्व गीत. पण हे गीत गाताना उषाजी खूप नर्वस होत्या. त्यांना लताजींनी समजावून धीर दिला तेव्हा हे गाणे रेकॉर्ड झाले आणि आता ते या चित्रपटातील एक प्रमुख लोकप्रिय गाणे आहे !

७२) हिंदी सिनेमात लताजी आणि आशाजी यांची जवळपास ९३ द्वंद्व गीते आहेत. दोघींचीही शैली वेगवेगळी असली तरी दोन स्त्री गायिकांनी गायिलेली द्वंद्वगीतांची ही महत्तम संख्या म्हणावी लागेल !

७३) ‘अंदाज’ चित्रपटात ‘डरना मुहब्बत करले’ या गाण्याच्या वेळी गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची लताजींची प्रथमतः भेट झाली, त्यावेळी संगीतकार नौशाद यांनी ‘बिलकुल नूरजहाँ की तरह गाती है, लेकिन पतली आवाज मे’ अशी ओळख करून दिली. पुढे मजरुह साहेब लताजी आणि कुटुंबियांचे घनिष्ठ मित्र झाले.

७४) ६० च्या दशकाच्या मध्यात लताजींना अचानक आवाजाचा त्रास आणि सतत उलट्या होऊ लागल्या. अन्नातून विषप्रयोग केल्या गेल्याच्याही बातम्या तेव्हा आल्या. त्याचा स्वयंपाकी सुद्धा तेव्हा अचानक घर सोडून निघून गेला. या घटनेनंतर बरीच वर्षे उषाजींनी स्वयंपाकघर सांभाळले !

७५) ‘आज फिर जिने की तमन्ना है’ हे लताजींचे गाईड सिनेमातील अतिशय लोकप्रिय गाणे तेव्हा मात्र देव आनंद याला आवडले नव्हते आणि ते चित्रपटात न ठेवण्याचा निर्णय त्याने घेतला होता. त्याचा लहान भाऊ आणि गाईडचा दिग्दर्शक गोल्डी उर्फ विजय आनंद याने त्याला शूट केलेले गाणे पाहून एकदा निर्णय घे असे सांगितले आणि देव आनंद चे मत बदलले !

७६) अगदी सुरवातीच्या काळात लताजींचे गुरु अमानत खान साहेब यांनी एकदा संगीतकार सज्जाद हुसेन साहेबाना सांगितले की त्यांच्याकडे लता नावाची विद्यार्थिनी आहे आणि अतिशय हुशार आणि काहीही सांगितले तरी चटकन आत्मसात करणारी आहे. कुठलीही तान, मुरकी असो, ती कधी चुकत नाही. पुढे ‘हलचल’ या सिनेमाच्या वेळी सज्जाद हुसैन साहेबाना लताजींच्या गाण्यात याचा पूर्ण प्रत्यय आला !

७७) मन्ना डे यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की सामान्यतः पुरुष गायकांचा पीच हा स्त्री गायिकांपेक्षा जास्त असतो. पण लताजी आणि आशाजी बाबत असे अजिबात नाही. त्या कुठल्याही पीच वर पोहोचू शकतात. ‘दैया रे दैया रे कैसो रे पापी बिच्चूवा’ या ‘मधुमती’ सिनेमातील गाण्यात माझ्या ओळींनंतर ज्या प्रकारे लता ‘ओये ओये ओये ओये’ करीत गाण्यात येते ते ऐकून मी स्तंभित झालो होतो असेही त्यांनी यात म्हटले होते !

७८) बऱ्याच संगीतकारांचे असे म्हणणे होते आणि आहे की लताजींच्या आवाजात प्रसाद गुण आहे. त्यामुळे भक्तिगीते, हळुवार प्रेमगीते, भावगीते या प्रकरण त्यांचा आवाज अगदी चपखल आहे. त्यामुळे या प्रकारातील त्यांची गाणी विशेष लोकप्रिय आहेत.

७९) संपूर्ण जग जरी लताजींची गाणी दररोज ऐकत असले तरी स्वतः लताजी घरी असताना पंडित भीमसेन जोशी, उस्ताद बडे गुलाम अली खान किंवा मेहदी हसन साहेब यांचे गायन ऐकणे पसंत करतात.

८०) यश चोप्रा यांचा ‘चांदनी’ हा चित्रपट आणि त्यातील गाणी हीट झाल्यानंतर त्यांनी त्याचा तेलगू रिमेक बनवला. त्यात लताजींनी प्रत्येक तेलगू शब्द काळजीपूर्वक शिकून पूर्ण चार गाणी गायली. आज कुणाही तेलगू व्यक्तीस विचारले तर या गाण्यातील तेलगू शब्दोच्चरात बारीकशी सुद्धा चूक आढळणार नाही !

८१) १९७२ च्या ‘मीरा’ सिनेमासाठी संगीतकार आणि थोर सतारवादक पंडित रविशंकर याना खरे तर लताजींचाच आवाज हवा होता. पण त्याआधीच लताजींनी गायिलेल्या मीराबाईच्या भाकीतीगीतांचा अल्बम आला असल्याने ते होऊ शकले नाही. मग या सिनेमाची गीते वाणी जयराम यांनी गायिली.

८२) प्रभुकुंज या त्यांच्या इमारतीतील घराच्या दरवाजावर त्यांच्या इंग्रजी सहीची नेम प्लेट आहे. ही सही त्यांच्या देवनागरी सहीसारखीच पल्लेदार आणि लयदार आहे !

८३) लताजींचे स्वतःचे नाव असलेले १९५१ च्या ‘दामन’ चित्रपटातील के दत्त यांनी संगीतबद्ध केलेले ‘गाये लता गाये लता’ हे गाणे असे एकमेव असावे ! याच चित्रपटाततील ‘ये रुकी रुकी हवायें’ हे लता-आशा यांचे पहिले द्वंद्व गीत आहे !

८४) लताजींवर अनेक पुस्तके निघाली असली तरी दोन वर्षांपूर्वी त्यांच्याच धाकट्या भगिनी मीना खडीकर यांनी ‘मोठी तिची सावली’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्याच धाकट्या भगिनींनी लिहिले असल्याने कदाचित यापेक्षा जास्त अधिकृत माहितीचा स्रोत असणारे दुसरे पुस्तक नसावे. याचा इंग्रजी अनुवाद मीनाजींच्या कन्या रचना शाह या करताहेत ! याच्या आधी ‘Lata : In her own voice ‘ हे नसरीन मुन्नी कबीर यांचे पुस्तक लताजींच्या मुलाखतींवर आधारित आहे आणि म्हणून अधिकृत आहे. .

८५) लताजींच्या आवाजाच्या अतिशय उंच पीच आणि रेंज मुळे हिंदी सिनेसंगीतात बऱ्याच संगीतकारांनी त्यांची बव्हांशी गाणी उंच सप्तकात ठेवली. पण त्यांची अतिशय हळुवार आणि मंद्र सप्तकातील गाणी ‘कुछ दिल ने कहा’, ‘दिल का दिया जला के गया’, ‘अपने आप रातो में’ किंवा ‘ऐ दिल ए नादान’ ही गाणी सुद्धा अमाप लोकप्रिय आहेत.

८६) संयोगवश ‘लता मंगेशकर’ या नावात सात सुरांप्रमाणे सात अक्षरे आहेत. आणि ल-ता या अक्षरांचा लय आणि ताल यांच्याशी दृढ सांगीतिक संबंध आहे !

८७) जवळपास २१०० हिंदी चित्रपटात गायन, १७५ संगीतकारांकडे गाणी, आणि अंदाजे २५० गीतकारांची गीते लताजींनी गायिली. त्यांच्या हिंदी सिनेसंगीतातील गाण्यांची संख्या ५१०० चे वर आहे आणि एकूण गाण्यांची संख्या साधारणतः ७००० चे वर आहे.

८८) अमर अकबर अँथनी या चित्रपटातील ‘हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे’ या गाण्यात, चित्रपटाच्या तीन हिरोना ( अमिताभ, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर ) तीन पुरुष गायकांचे आवाज आहेत ( किशोर, मुकेश आणि रफी ) मात्र सोबतच्या तीनही हिरोइन्स साठी फक्त एकच आवाज आहे आणि तो लताजींचा ! विशेष म्हणजे या तीनही हिरोईनच्या भूमिकांचे स्वभाव वेगवेगळे असल्याने या गाण्यात लताजींचा आवाज प्रत्येकीकरिता वेगवेगळा वाटतो !

८९) मदन मोहन आणि लता यांची गाणी सगळ्यांना जीवापाड प्रिय आहेत. मदनजींकडे लताजींनी एकूण २२७ गाणी गायली त्यातही १७५ चे वर सोलो गाणी आहेत ! पण मदनजींच्या पहिल्या चित्रपटात ( आँखे १९५०) लताजींचे एकही गाणे नव्हते !

९०) १९४८च्या मजबूर चित्रपटातील ‘अब डरने की कोई बात नाही, अंग्रेजी गोरा चला गया’ या गाण्याच्या वेळी लताजी आणि मुकेश यांची प्रथम भेट झाली आणि १९७४ मध्ये अमेरिका दौऱ्यावर असताना डेट्रॉईट येथील कार्यक्रमाच्या आधी शेवटची भेट !. याच कार्यक्रमात हार्ट अटॅक येऊन मुकेश यांचा मृत्यू झाला !

९१) लताजींनी एकूण ३६ भारतीय भाषेत तर गाणी गायिली आहेतकेच. पण डच, फिजियन, रशियन, स्वाहिली आणि इंग्रजीत सुद्धा गायिले आहे ( मुख्यत्वे कार्यक्रम दरम्यान).

९२) आणि याशिवाय आपण सर्वजण आपल्या हयातीत हा दैवी आवाज प्रत्यक्ष ऐकला/ऐकतो आहोत ही सर्वात मोठी आणि अहोभाग्याची गोष्ट !!

संदर्भ: :

1) Lata : Voice of the Golden Era : Dr Mandar Bichu
2) Gandhar : Vishwas Nerurkar
3) Lata in her own voice : Nasreen Munni Kabir
4) Hindi film songs : Music and Boundaries : Ashok Ranade
5) On stage with Lata : Mohan Deora and Rachana Shah

6) Mothi Tichi Sauli : Meena Khadikar

********************************************

निरनिराळ्या मोठ्या व्यक्तींचे अभिप्राय

( Courtesy Pramod K Khandelwal )

●जो माहौल पैदा करते हुए हमें तीन घँटे लगते हैं, वह काम लता तीन मिनट में कर दिखाती है।
(उस्ताद अमीर ख़ान)
●सुर जब सही लगता है, तो आत्मा और परमात्मा का मिलन होता है। लता जी को सुन कर हमेशा यही अनुभव होता है।
(अमिताभ बच्चन)
●अगर ताज महल दुनिया का सातवाँ अजूबा है, तो फिर लता मंगेशकर को आठवाँ अजूबा मानना पड़ेगा।
(उस्ताद अमजद अली ख़ान)
●लता जब आई, तो हम संगीतकार आश्वस्त हो गए कि अब हम धुनें बनाते समय, संगीत की किसी भी गहराई तक डूब सकते हैं, और अगर हमारी धुन पेचीदा भी हुई, तो भी उसमें मिठास बनी रहेगी, क्योंकि लता के लिए कुछ भी गाना असम्भव नहीं है।
(अनिल बिस्वास)
●जो मिठास उनकी आवाज में है, वह उनके स्वभाव में भी है। उन्हें जानना और उनके साथ काम करना एक अनोखा अनुभव है।
(बी. आर. चोपड़ा)
●कमबख़्त कभी बेसुरी नहीं होती
(बड़े ग़ुलाम अली ख़ान)
●लता की ही वजह से आज जनसामान्य में शास्त्रीय संगीत लोकप्रिय हो चला है।
(पंडित भीमसेन जोशी)
●जिस क्षण लताजी ने मेरा पहला गीत गाने की शुरुआत की, उसी क्षण मैं जान गया था कि वह गीत अमर होगा। उनके लिए धुनें बनाना, अरे उनकी शताब्दि में जन्म पा कर उनका गायन सुन पाना भर सौभाग्य से कम नहीं।
(डॉ. भूपेन हज़ारिका)
●वैसे तो वह चन्द फ़ुट और चन्द इंच की, सफ़ेद साड़ी में लिपटी हुई, सहमी-सी एक लड़की है। पर उसकी आवाज़… वह तो रौशनी है, जो आलम के गोशे-गोशे में मौसीकी का उजाला फैलाती है। और आपके जो यह टेप और सी.डी. है, इनकी तो आनेवाली नस्लें अहसानमन्द होंगी कि इन्हीं पर लता का फ़न कुरेदा हुआ है। लेकिन दरहक़ीक़त ख़ुशकिस्मत तो वह हैं, जिनका उसके साथ उठना-बैठना रहा है…
(दिलीप कुमार)
●आज से 500 साल बाद, भारतीय संगीत के दो ही नाम याद किये जाएंगे—तानसेन और लता।
(छायाकार गौतम राज्याध्यक्ष)
●बुजुर्गों से सुना था कि सरस्वती और लक्ष्मी साथ नहीं रहतीं, लेकिन लताजी को देखिए…
(पंडित हरि प्रसाद चौरसिया)
●बड़ी खुशियाँ तो जिंदगी में चार-पाँच बार ही आती हैं। हमें ध्यान देना चाहिए जीवन के उन लाखों-करोड़ों क्षणों पर, जो लता के गीतों से प्रफुल्लित हैं।
(हृषिकेश मुखर्जी)
●हर किसी वस्तु का पर्याय मिल ही जाता है। अगर नहीं मिलता, तो लता जी की दैवी आवाज का।
(इल्लैयाराजा)
●बीसवीं शताब्दी की तीन ही बातें याद रहेंगी :

 1. लता मंगेशकर का जन्म
 2. चन्द्र पर मानव का पहला कदम
 3. बर्लिन दीवार का ध्वंस
  (जगजीत सिंह)
  ●लताजी ने हम पर बड़ा अहसान किया है कि वह क्लासिकल नहीं गातीं!
  (पंडित जसराज)
  ●हमारे पास एक चाँद है, एक सूरज है और एक लता मंगेशकर है।
  (जावेद अख़्तर)
  ●पार्श्वगायन की शुरुआत से पहले जो गीत गाए जाते थे, वह ‘गीत’ केवल इसीलिए कहे जाते थे कि उन्हें हम (अभिनेत्रियाँ) गाती थीं। लेकिन लता जब से गाने लगी, उसे असल में ‘गाना’ कहते हैं।
  (कानन देवी)
  ●बचपन से लताजी को सुनते-सुनते मुझे विश्वास हो चला है कि संगीत केवल मनोरंजन का जरिया नहीं, ईश्वर तक पहुँचने का मार्ग है।
  (कविता कृष्णमूर्ति)
  ●तानपुरे से निकलनेवाला गंधार शुद्ध रूप में सुनना चाहो तो लता का “आयेगा आनेवाला…” गीत सुनो।’
  (पंडित कुमार गन्धर्व)
  ●मेरे गीतों में रद्‌दो-बदल करने का हक़ गायकों में सिर्फ़ लता को ही हासिल है।
  (मजरूह सुलतानपुरी)
  ●लताजी के गाए करुण गीतों पर अभिनय करते हुए मुझे कभी ग्लिसरीन इस्तेमाल करने की जरूरत नहीं पड़ी।
  (नर्गिस दत्त)
  ●मैं नहीं जानता कि मदन मोहन लता जी के लिए बने थे, या लता जी मदन मोहन के लिए, लेकिन आज तक मदन मोहन जैसा संगीतकार नहीं हुआ, और लता जी जैसी गायिका नहीं हुई।
  (ओ. पी. नय्यर)
  ●लोता गायेगा न? फिर हम सेफ है।
  (एस. डी. बर्मन)
  ●लता गाती है, बाकी सब रोते हैं
  (सज्जाद हुसैन)
  ●सालों से मैंने लता को इतनी नजदीक से जाना है कि मेरा ख्याल था कि मैं उसे खुली किताब की तरह पढ़ सकता हूँ। लेकिन जब कभी मैं उसे माइक्रोफोन के सामने खड़ी देखता हूँ, तो लगता है कि यह व्यक्ति कौन है…? क्योंकि तब वह एक देवी की तरह हो जाती है। वह गाती है, तब उसके पैर छूने को मन करता है।
  (सलिल चौधरी)
  ●कामयाबी की चोटी पर तो कई पहुँचे, पर लता जी की बात और है। लता जी एक बार वहाँ पहुँचीं तो वहीं रहीं।
  (सलीम ख़ान)
  ●कई गायक तानपुरे के साथ सुर नहीं लगा पाते। दीदी का सुर इतना पक्का है कि आप दीदी के सुर पर तानपुरा मिला सकते हैं।
  (श्रीनिवास खळे)
  ●लताजी एक ही ऐसी हैं जिनकी फिल्म इण्डस्ट्री में हर कोई इज्जत करता है।
  (तलत महमूद)
  ●आम आदमी को इससे कोई मतलब नहीं कि राग मालकौंस था और ताल त्रिताल। उसे तो चाहिए वह मिठास, जो उसे आह्‌लाद दे, जिसका वह अनुभव कर सके। यही लता की लोकप्रियता का मुख्य मर्म है।
  (वि.स. खाण्डेकर)
  ●मेरी जीवनसंध्या के इन वर्षों में आजकल जब मैं शाम को टहलने निकलता हूँ, तब पश्चिम में डूबते सूरज की कलात्मक लालिमा मन को अवश्य आनंद देती है। पर लौटते वक्त, मेरी वृद्ध आँखों के सामने गहराते अँधेरे में, मुझे किसी कला की अनुभूति नहीं होती। निराशा की उस मनःस्थिति में भी मुझे दो ऐसी बातें मिल जाती हैं, जिससे विषाद की छाया छँट जाती है: एक तो रजनीगंधा फूलों की सुगन्ध और दूसरे, कहीं से आ रहा लता का मीठा स्वर।
  (वि.स. खाण्डेकर)
  ●उसमें आत्मविश्वास कूट कूट कर भरा हुआ है। लेकिन, साथ-साथ वह अन्तर्मुखी भी है, इसीलिए अभिमानी नहीं है। हाँ, स्वाभिमानी है और उसके गायन में गर्व खनकता है।
  (वसन्त ज़ोगलेकर)
  ●यदि किसी से पूछा जाए “क्या आपने अमृत चखा है”, तो तीन पीढ़ी के लाखों लोग जवाब देंगे, “जी हाँ, लता के गीतों के रूप (वसन्त साठे)
  🌻🌺🌸🥀🌹

श्री.रवी खोत यांच्या फेसबुकच्या फलकावरून साभार दि.०८-०२-२०२२

**********************************

तो एक दिवस मी जगलो…

. . . . . . . शिरीष कणेकर

मी मनाशी पक्क ठरविलं होतं की, काही झालं तरी मी या एका विषयावर लिहिणार नाही. नो म्हणजे नो! आलेल्या प्रत्येक अनुभवाचं लेखनासाठी भांडवल करायलाच हवं का? निदान एखादा तरी विषय, एखादा तरी अनुभव असा असू दे की, जो वाचकांबरोबर ‘शेअर’ करण्याचा अनावर मोह मी आवरलाय. आता इतक्या दिवसांनंतर वाटतंय की, माझ्या आनंदडोहापासून वाचकांना कटाक्षानं दूर ठेवणं योग्य नाही. माझ्या आनंदात आनंद शोधणाऱ्या दिलदार वाचकांना त्यापासून वंचित ठेवणं उचित नव्हतं. हा नवा विचार बदलण्याच्या आत मी लेखणी उचलल्येय व आता लेख संपवूनच खाली ठेवीन.

तीसएक वर्षे झाली असतील. हो, बरोबर. साल १९८७. काय माझ्या डोक्यात किडा वळवळला देव जाणे, मी साक्षात लता मंगेशकरला फोनवरून जेवणाचं निमंत्रण दिलं. तेव्हा आजच्यापेक्षाही मला अक्कल कमी असावी. डायरेक्ट लता? देवाकडे फोन नाही, नाहीतर त्यालाही बोलवायला मी कमी केलं नसतं. अर्थात लताला बोलावणं हे देवाला बोलावण्यापेक्षा कुठे कमी नव्हतंच. माझ्या महत्त्वाकांक्षेनं सगळय़ा सीमा ओलांडल्या होत्या. खरं आश्चर्य पुढेच होतं. तिनं तात्काळ माझं निमंत्रण स्वीकारलं. दिवसही ठरला. फोन ठेवल्यावर मी सुन्न बसून राहिलो. हे काय घडत होतं? लता भाटिया बिल्डिंगच्या पायऱ्या चढून माझ्या खोपटात येणार? ती अशी सामान्य माणसांच्या घरी जाते? तेही जेवायला? लताबरोबर मी इंग्लंडच्या राणीला पंक्तीला बोलावू का? नसेना का माझी ओळख, लता येत्येय म्हटल्यावर ती धावत येईल.

अनेक काळज्यांनी माझ्या मेंदूला मुंग्या आणल्या. मेनूतील पदार्थांचं काँबिनेशन काय असावं? कालवणं फिलवणं असे वहाते प्रकार नकोत. शाकाहारी जिन्नसाचा तोंडी लावण्यापुरताही चर्चेत उल्लेख नव्हता. लताला बोलावून काय चिंचगुळाची आमटी द्यायची? तेदेखील सी.के.प्या.च्या घरी? काय म्हणेल ती? काय म्हणेल जात? मला सी.के.पी. फुड फेस्टिव्हलला येऊ देतील का? मला ज्ञातीबाहेर नाही टाकणार? मला सुटसुटीत हवं होतं कारण मला ती बेडरूम-कम-डायनिंग रूम-कम-पसारा रूममध्ये यायला नको होती. तिथलं सगळं विहंगम दृश्य पाहून लताची वाचा बसली असती व पुढे काही महिने ती गाऊ शकली नसती. तेव्हा म्हटलं जे काही रणकंदन व्हायचं ते बाहेरच्या खोलीत होऊ दे. ती आदर्श होती अशातला भाग नाही, पण दुसरा पर्याय काय होता?

सुनील गावसकर आला होता तेव्हा बायको शेजारच्या घरातून टेबल फॅन आणायला निघाली होती. नशीब तिनं रातोरात अख्खं घर ए.सी. नाही करून घेतलं. स्टिल बेटर, तिनं लोखंडवाला काँप्लेक्समध्ये भलामोठा फ्लॅट घेण्याचं टुमणं नाही लावलं. गावसकर येऊन गेला की, फ्लॅट विकायचा. एका दिवसापुरता घ्यायचा. लताच्या शाही स्वागतासाठी तिनं मला दारात हत्ती म्हणून उभं केलं नाही हे काय कमी झालं? सुनील काय किंवा लता काय, माझ्याकडे येत होते, माझ्या ऐश्वर्याची वर्णने वाचून नव्हे हे तिला कोण सांगणार? आपण जसे आहोत तसे आहोत. त्यापेक्षा लताला ‘इंप्रेस’ करायला तिला गाऊन दाखवायचं का?… गावसकर आल्या आल्या माझ्या छोटय़ा मुलानं दारातच त्याला विचारलं होतं- ‘‘तुझा हात मोडू का?’’

‘‘नको.’’ गावसकर म्हणाला, ‘‘राहू दे काही दिवस.’’

त्यानं एकाएकी असा प्रश्न का विचारावा हेच मला कळत नव्हतं. इतके दिवस तो बापावर गेलाय असं मी अभिमानानं मिरवत होतो. ‘‘तुझा गळा आवळू का?’’ असं त्यानं लताला विचारलं तर? माझ्या तळहातांना घाम सुटला.
एका गोष्टीबाबत मात्र मी निःशंक होतो. जेवण, स्वयंपाक बायको जे काही करेल ते अप्रतिम असेल याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही संदेह नव्हता. त्रिभुवनात तिच्यासारखे खिमा पॅटिस कोणी करीत नसेल.

त्या दिवशी सकाळीच लताचा फोन आला. ‘‘मला किनई बरं वाटत नाही.’’ तिनं सुरुवात केली, ‘‘पहाटे मला उलटी झाली. अॅसिडिटी फार वाढल्येय.’’ माझं मन मटकन खाली बसलं. तोंड एकदम कडू झालं. असंच व्हायचं आमच्या बाबतीत. तरी म्हटलं लता कुठली यायला माझ्या गरीबाच्या घरी?

‘‘नाही-नाही. मी येत्येय तुमच्याकडे.’’ लता मनकवडी असल्यागत म्हणाली, ‘‘मी हे सांगायला फोन केला की, मी काही खाणार मात्र नाही. तुम्ही उगीच काही करत बसाल म्हणून सांगितलं.’’

‘‘ठीक आहे- ठीक आहे.’’ मी जीव भांडय़ात पडून म्हणालो. लता येणं महत्त्वाचं होतं. दुपारी तीन-चारच्या सुमाराला लताच्या सेक्रेटरीचा फोन आला- ‘‘दीदी निकल पडी है स्टुडियों से. बस्स, पहुँचही गयी होगी आपके यहाँ.’’

मी घाईघाईनं फोन ठेवला व चपला पायात सरकवून धावलो. मी खाली पोहोचायला व लताची गाडी फाटकातून आत शिरायला एकच गाठ पडली. माझी छाती धडधडत होती. तो गाडीच्या इंजिनाचा आवाज आहे असं मी मनाला समजावलं. आमच्या सिंधी कॉलनीत काहीच ‘हलचल’ झाली नाही. मला नेहमी वाटत आलंय की, मधल्या चौकात जर पाटपाणी घेतलं तर माणसं घरातून बाहेर पडून पाटावर मांडी घालून जेवायला बसतील. लताच्या हातात एक कागदाचं पुडकं होतं. ती आत्ताच गाऊन आलेल्या गाण्याचं मानधन तर त्यात नसेल? ‘बावर्ची’मध्ये हरिंद्रनाथ चटोपाध्यायच्या खोलीतल्या तिजोरीकडे राजेश खन्ना वारंवार तिरका कटाक्ष टाकतो तसा अर्थपूर्ण कटाक्ष मी लताच्या हातातल्या पुडक्याकडे ती जाईपर्यंत टाकत होतो. लतापेक्षा तो यःकश्चित पैसा मला मोलाचा वाटला होता का? स्टुपिड कुठला! लता स्थानापन्न झाल्यावर मी तिला म्हणालो, ‘‘हे बघा दीदी, काही खाणार नाही हे तुम्ही आधीच सांगितलंय, पण खायला काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलं नाही तर थुत् आमच्या जिंदगानीवर. तुम्ही नका खाऊ, पण-’’

‘‘पण आता मी काहीही खाईन. मला बरं वाटतंय. शिवाय सॉलिड भूक लागल्येय. सकाळपासून पोटात काहीही नाही. त्यातून त्या कोरसवाल्या बायांनी हैराण केलं.’’ लता एका दमात पटदिशी म्हणाली.

त्यानंतरची आमची धावपळ बघण्यासारखी होती. स्टूल सरकवा… त्याच्यावरचे पेपर व पुस्तकं दिवाणावर ठेवा… कपाटाची फळी पाडा व अन्न त्यावर ठेवा… आमची त्रेधा पाहून लता उत्स्फूर्तपणे आम्हाला जॉइन झाली. ती पण कुठे काय ठेवा हे हिरिरीनं सांगू लागली. एकदम मी भानावर आलो. अरे, काय करतोय आम्ही? या रेटनं आम्ही लताला स्वयंपाकघरात पाठवून पापड तळून आणायला पाठवलं असतं आणि वर डिशेस किचन कॅबिनेटमध्ये खालच्या ड्रॉवरमध्ये आहेत हेही सांगायला कमी केलं नसतं.

आम्ही जेवण-कम-खाणं केलं होतं. पुरणपोळी (तेलपोळी बरं का, ती कामचलाऊ पीठपोळी नाही) करायचं सुचलंच नाही. कोलंबीची खिचडी व खिमा पॅटिस असा टिपिकल सी.के.पी. मेनू होता. गोड म्हणून खोबऱयाच्या वडय़ा. ती काही खायचंच नाही म्हणाली तर केशरयुक्त मसाला दूध व लिंबाचं सरबतही. लताला वाढल्यावर तिनं विचारलं, ‘‘तुम्ही नाही जेवत?’’ तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की, नवसाच्या, देवदुर्लभ पाहुणीच्या आधीच मी माझ्या वेळेला जेवून घेतलं होतं. माझ्या आजारांनी माझ्या जेवणाच्या वेळा ठरविल्या होत्या. लताही त्याला काही करू शकत नव्हती. मी उत्तरादाखल तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटलो. झोपेतून उठून बंद पडद्याआड उभी राहून फटीतून बघत माझी नखाएवढी चिमुरडी मुलगी म्हणाली, ‘‘ओ लता मंगेशकर (माझ्या छातीत धस्स झालं!), तुमचा आवाज गोड आहे.’’

‘‘गाण्याचा की बोलण्याचा?’’ लतानं विचारलं.

‘‘बोलण्याचा’’ माझी मुलगी उत्तरली. एवढय़ा गोड आवाजात बोलणारं तिनं कोणी ऐकलंच नव्हतं. पहिल्याच भेटीत लताबरोबर तिची जी गट्टी जमली ती आधी शिक्षणासाठी व नंतर लग्न करून अमेरिकेत निघून जाईपर्यंत कायम होती. तिच्या लग्नाला लता आली तेव्हा न राहवून मी विचारलं, ‘‘तुम्ही आवर्जून कशा आलात?’’

‘‘म्हणजे काय?’’ लता म्हणाली, ‘‘लहानपणापासून ती मला फ्रेंड म्हणत आल्येय. मग फ्रेंडच्या लग्नाला जायला नको?’’

कोलंबीच्या सुरमट खिचडीचा घास घेत लतानं विचारलं, ‘‘तुमची ‘ए’ बिल्डिंग ना? आशा ‘बी’मध्ये राहायची.’’

तो धागा पकडून मी विचारलं, ‘‘दीदी, तुमचं आशाचं सगळय़ात आवडतं गाणं कोणतं?’’

‘‘रोशनलालचं ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ ‘‘ती म्हणाली व लगेच गायलाच लागली. मी थरारलो व श्वास रोखून ऐकू लागलो. लता मंगेशकर माझ्या घरात बसून आशाचं गाणं गात होती. किती लोकांच्या भाग्यात हा सुवर्णयोग असेल? अण्णा असते तर म्हणाले असते- ‘‘मिस्टर शिरीष, सारखे रडत असता ना? आयुष्यातील या अपूर्व सुवर्णक्षणांची जाण ठेवा.’’

त्यानंतर लता गुणगुणतच होती. घराची वास्तुशांती झाली. आता वेगळी पूजा कसली? मी माझ्या संग्रहातले लताचे फोटो काढले. लता कोचावर मांडी घालून अगदी घरच्यासारखी बसली. पर्समधून चष्मा काढून तिनं चढविला व एकेक फोटो बघत बोलू लागली- ‘‘तलत, सलीलदा ‘रिमझिमके ये प्यारे प्यारे गीत’च्या वेळचा… हा मदनभैयांबरोबर. बहुधा ‘अकेली मत जईयो’च्या रेकॉर्डिंगचा… (एक गायक बशी चाटताना) जास्त झाली असावी… तिनं खिमा पॅटिस मागून खाल्ला. आम्हाला काय, शक्य असतं तर आम्ही पॅटिसचं तिच्याभोवती वारूळ उभं केलं असतं. ती हात धुवायला गेली. नेहमीप्रमाणे वॉश बेसिनला पाणी नव्हतं. मी लोटय़ानं तिच्या हातावर पाणी घातलं. ती म्हणाली, ‘‘असं कोणाच्या हातावर पाणी घालू नये. तुमची इस्टेट त्याला जाते.’’

‘‘मग तुम्ही माझ्या हातावर घाला.’’ मी म्हणालो.

लता खळखळून हसली. मला वाटलं, आपण आपल्या नसलेल्या आवाजात म्हणावं, ‘‘न हंसो हमपे हम है जमाने के ठुकराये हुवे’’ हे आपलं उगीच. ज्याच्याकडे साक्षात लता येते तो कसला जमान्यानं ठुकरवलेला?…

खोबऱयाची वडी तोंडात टाकत लता सहज म्हणाली, ‘‘मला आंबा घालून केलेल्या खोबऱयाच्या वडय़ा फार आवडतात.’’ काही दिवसांनी मी तिला आवडतात तशा आंब्याच्या खोबऱयाच्या वडय़ा तिच्याकडे घेऊन गेलो. माझ्या समोरच तिनं बॉक्स उघडला व आत कुंकवाची पुडी पाहून ती म्हणाली, ‘‘वहिनींनी केल्यात खोबऱयाच्या वडय़ा?’’

‘‘म्हणजे काय? अहो, विकतच्या वडय़ा आणण्यात काय मतलब? त्या काय, तुम्हीही आणू शकता.’’ माझ्यासमोर लतानं बॉक्समधल्या एक सोडून चार वडय़ा खाल्ल्या व मगच उरलेल्या वडय़ा आत नेऊन ठेवायला सांगितले. तिनं वडय़ा खाल्लेल्या बघण्यात मला किती आनंद, किती समाधान आहे हे तिला कळलं होतं. सामान्यांचं मन जाणण्याइतके तिचे पाय जमिनीवर होते. अत्युच्चपदी जराही न बिघडलेली ती थोर होती. लता माझ्याकडे येऊन (रीड ऍज ‘जेवून’) गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या बायकोनं तिला फोन केला व ती गलबलून म्हणाली, ‘‘अहो दीदी, आमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा. आम्ही हडबडून गेलो हो. साधं तुम्हाला ओवाळायचंही सुचलं नाही. सो सॉरी!’’

‘‘असं काय करता वहिनी?’’ लता तिची समजूत घालत मायाळूपणे म्हणाली, ‘‘अहो, किती मजा आली. मी खूप एंजॉय केलं. खिमा पॅटिसची चव अजून माझ्या जिभेवर आहे…’’

माझी बायको घळघळा रडायला लागली. आणि सातासमुद्रापलीकडे माझ्या एकपात्री प्रयोगानंतर रात्री ‘बेसमेंट’मध्ये गप्पा रंगल्या असताना माझ्या स्थानिक यजमानांनी मला विचारलं, ‘‘लता मंगेशकर वागायला अतिशय वाईट आहे हे खरं का?…’’

shireesh.kanekar@gmail.com

एक श्रद्धांजलि

प्रिय गानसरस्वती,

सकाळी सकाळी जाग यायची ती तुझ्या पहाटेच्या
उठा उठा हो सकळिक गाण्याने …

आणि सायंकाळ व्हायची ते
या चिमण्यांनो परत फिर रे ने

कधी एकटं वाटलं की तुझा आधार होता..

निज माझ्या नंदलाला ऐकवत कित्येक वेळा तुझ्या कुशीत नकळतपणे झोपलो…

पहाटे च्या भक्ती गीता पासून,
दिवाळी च्या पहिल्या दिवसापासून…

गणेशोत्सवात गणराज रंगी नाचतो
म्हणत तूच असायचीस..

प्रत्येक पूजेला तू घराघरात उपस्तीत होतीस…

अगदी प्रेमात पडलेल्या प्रत्येकाच्या मनामनात तू तुझ्या गाण्याने
त्यांच्या भावनेला आकार दिलास…

अगं,
प्यार किया तो डरना क्या,
प्यार किया तो कोई चोरी नही की

हे तूच तर शिकवलंस,

शायद मेरी शादी का खयाल,
म्हणत आजही बऱ्याच तरुणी स्वप्न रंगवत असतील,

लगजा गले म्हणत तू आजही कित्येक जणांना रडवतेस,

मुलगी सासरी जाताना च्या दुःखावर
लेक लाडकी या घरची होणार सून..
या गाण्याने तू कित्येक मनांवर फुंकर मारलीस…

अगं आई (लतादीदी),

कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या,
झुलतो बाई राज झुला म्हणत ,

कित्येक बाळांना तूच तर पाळण्यात ठेवलस,
कदाचित त्यात मी पण असेंन,

चंदा है तू,
मेरा सुरज है तू,
म्हणत आजही कित्येक आनाथांच्या ओठी हसू आणतेस,

यशोमती मैय्या से बोले नंदलाला
हे ऐकून कदाचित साक्षात श्रीकृष्ण ही तुझ्या प्रेमात पडला असेल,

ए मेरे वतन के लोगो म्हणत
इतक्या वर्षांनी आजही अंगावर काटा तूच आणतेस,
तुझ्या शिवाय आपला स्वातंत्र्य दिन अपुराच,

पाऊस पडला की तुझ्या मेंदीच्या पानावर ऐकण्याची मज्जाच वेगळी

सकाळी कामावर जाताना,
संध्याकाळी घरी परतताना,
सुखाच्या, दुःखाच्या,
आयुष्याच्या प्रत्येक-प्रत्येक क्षणात तू आहेस,
आणि राहशील…

कलेची अशी सेवा कधी कुणी केली नाही

मनाच्या गाभार्यात असे कुणी आजवर उरतले नाही,

तू अनेक पिढ्यावर राज्य केलयंस,

कसली उपमा द्यावी तुला
आई,

अगं खरचं
आम्ही किती नशीबवान आहोत..

तुझ्या सारख्या लोकांचा कलेच्या साहाय्याने सहवास लाभला..

खूप खूप खूप लिहावंसं वाटतंय
पण शब्द अपुरे पडतात

फक्त एवढंच सांगते
की तू कोणत्याही अवतारापेक्षा कमी नव्हतीस

असा आवाज दुसरा नाही
असा लाजाळू स्वभाव दुसरा नाही..

तू इथे, आमच्या मध्ये आलीसच होतीस आनंद वाटायला…

आता देवाने त्याच्या आवडत्या बाळाला पुन्हा बोलावून घेतले..

आणि कित्येक मने पोरकी झाली…

🙏🏼 तुझे आशीर्वाद नवोदित कलाकारांवर सदैव राहुदेत..🙏🏼
तुझी कला त्यांना साध्य होऊदेत
हीच ईश्वर चरणी प्रार्थना..

देवबाप्पा हिला पुन्हा पाठव
नव्या रूपाने पुन्हा आनंद पसरवायला…

गानसरस्वती लता मंगेशकर.. love you…

आपल्या आत्म्यास शांती लाभो 🙏

**************************

एकदा आचार्य अत्रेंना लताबद्दल लिहायला सांगितलं तेव्हा शब्दप्रभू अत्रे म्हणाले:

“केवळ लोखंडाच्या निपातून उतरल्या शाईनं, जाड्या भरड्या कागदावर लताला अभिवादन करणं म्हणजे एखादया अप्सरेच्या मृदुल चरणकमलाखाली गोणपाटाच्या पायघड्या अंथरण्यासारखं आहे.”

लताच्या प्रतिभेला साजेसं अभिवादन करायचं असेल तर..

“पहाटकाळची कोवळी सुवर्ण किरणं दवबिंदूमध्ये भिजवून कमलतंतूच्या लेखणीने फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र तिला गुलाब कळीच्या करंडकातून अर्पण करायला हवं.”

“लताचा आवाज हा मानवी सुष्ठीतला एक अद्भुत चमत्कार आहे. साक्षात विधात्याला सुद्धा असा चमत्कार पुन्हा घडवता येणार नाही.”

“श्रीकृष्णाच्या मुरलीचा साद, उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि सरस्वतीच्या वीणेचा झंकार हे तिन्ही एकवटून विधात्याने आपल्या लताचा कंठ घडवला असेल.”

“सूर, लय, ताल, सिद्धी आणि प्रसिद्धी या गोष्टी जिथे एकत्र येतात त्या जागेला आपण लता मंगेशकर असं म्हणावं. कारण संगीतातील सात सूर म्हणजे फक्त आणि फक्त आपली

ल ता मं गे श क र

. . .

गीतकार आणि संगीतकार श्री.यशवंत देव यांनी लता मंगेशकर यांच्याबद्दल असे लिहिले आहे.

सगळे गाती सूर लावूनी
जीव लावूनी गातो कोण
कवितेच्या गर्भात शिरूनी
भावार्थाला भिडतो कोण

गीतामधली भाव वादळे
सबल स्वरांनी झेली कोण
अहंकार फेकून स्वरांना
ममतेने कुरवाळी कोण

नाभीतूनी ओंकार फुटावा
तैसे सहजच गातो कोण
गाता गाता अक्षर अक्षर
सावधतेने जपतो कोण

शब्दांच्या पलीकडले स्पंदन
सुरातुनी आळवितो कोण
गीतामधली विरामचिन्हे
तीही बोलकी करतो कोण

विश्वामधल्या रसिक कुळाशी
सुरेल हितगुज करतो कोण
निज स्वरांचा पहिला श्रोता
आपला आपण होतो कोण

या सर्व प्रश्नाचे उत्तर एकच
लता मंगेशकर

यशवंत देव

. . . .

लता मंगेशकर यांची काही तुफान लोकप्रिय गाणी

आएगा आएगा आने वाला…
पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है…
जब प्यार किया तो डरना क्या प्यार किया कोई चोरी नही की छुप छुप आहें भरना क्या..
चलते चलते यूहीं कोई मिल गया था..
अजीब दास्तान है यह कहां शुरू कहां खतम्…
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो…
यारा सिली सिली …
यशोमती मैया से बोले नंदलाला…
सत्यम शिवम् सुंदरम…
रहें न रहें हम यूहीं महका करेंगे…
ऐ मालिक तेरे बंदे हम…
ये शमा …..शमा है ये प्यार का…
ये कहां आ गए हम साथ चलते चलते..
आज फिर जीने की तम्मन्ना है…
मेरे हाथों में नौ नौ चूड़ियां है…
हमने देखी है उन आंखों में महकती खुशबू,,,
मेरे खाबों में जो आए …
हमको हमीं से चुरा लो…
कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए..
रूठे रूठे पिया मनाऊं कैसे …
तू जहां जहां चलेगा …..
लग जा गले ….
तुम मुझे यूं भुला ना पाओगे….
कोई भला उनको कैसे भुला सकता है।

उफ्फ अनगिनत गाने, शायद ही कोई ऐसा दिन हो जिस दिन उनकी आवाज ना सुनी हो
पता नही कौन सी सिद्धि प्राप्त थी कि हर दिल अजीज थी लता जी।
कॉलेज के दिनो से लेकर जीवन के पांच दशक उनके गाने सुन कर कैसे निकल गए पता ही नहीं चला।
जीवन का एक अटूट हिस्सा थी लता जी। धन्यवाद जीवन को संगीत रस से सराबोर करने के लिए। आज मन सच में भारी है।
जरा आंख में भर लो पानी….
अश्रुपूरित श्रद्धांजलि बुलबुले हिंदुस्तान लता मंगेशकर जी।
💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

“आता, विसाव्याचे क्षण……”

लेखिका: सौ. रेखा दैठणकर
२८ दिवसापूर्वीच ह्या सगळ्या गोष्टींची सुरवात झाली….. कामवाल्या बाईचे निमित्त झालं…. खरंतर या वयात काय, काहीही छोटं कारण पुरतं म्हणा….. काहीतरी ‘लेबल’ तर लागलं पाहिजे ना….. मग नेहेमीचीच धावपळ…… ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये भरती…..(तिथल्या नर्सला विचारलं हॉस्पिटल चं नाव)…. सुहास्य मुद्रेच्या डॉ समदानींनी आश्वस्त केलं, “सगळं काही ठीक होणार दीदी”….. मी मनातल्या मनात हसले….आता ही बहुदा ‘शेवटच्या प्रवासाची’ नांदी च असावी…..
मग सुरु झाले सगळे उपचार….. नाकातोंडांत नळ्या, सतत अस्थिर ऑक्सिजनची पातळी…… कधी कधी शुद्ध असायची, कधी नसायची…… शुद्ध असेल तेंव्हा सगळा ‘जीवनपट’ डोळ्यांसमोरून सरकायला लागायचा…… थोड्या थोडक्या होत्या का आठवणी?…. 92 वर्षांपैकी, 87-88 वर्षांच्या तरी आठवत होत्या….. एकामागून एक नुसती आठवणींची भेंडोळी…… कधी कधी संदर्भ लागत होते, कधी कधी नाही…..
लहानपणीचे दिवस आठवताना चेहऱ्यावर नकळत स्मित येत होतं …. माई, बाबा आम्ही सगळी भावंड….. बाबांचं स्वर्गीय गाणं…. समजत नसलं तरी कानांना तेच छान वाटायचं…. बाबांकडे गाणं शिकायला येणारे विद्यार्थी…. त्यांच्या शिकवणीकडे माझं असणारं लक्ष….. आशाची मस्ती, दंगेखोरपणा जो मला अजिबात आवडायचा नाही…. बाळचं दुखणं….. आणि मग एक दिवस आम्हा मुलांना कुणीतरी वरच्या मजल्यावर नेलं…. खाली येऊ दिलं नाही….. त्या दिवशी ‘बाबा’ आम्हांला सोडून गेले होते….. मी अचानक मोठी झाले, व्हावंच लागलं….
मग सगळ्या परिवाराला सांभाळायचा केलेला निश्चय…. नाईलाजाने सिनेमाकडे वळलेली पाऊले….. स्टेज शो करून मिळवती झाल्याचा आनंद….. काय काय आठवत होतं…… आणि परत शुद्ध गेली….. काही कळेनासं झालं…..
आयुष्यभर किती माणसं जोडली गेली….. गणनाच नाही…. शुद्ध येत होती, जात होती…… अनेक चेहरे समोर येत होते….. नौशादजी, सज्जादजी, रोशनजी, खय्यामजी, मदन भैया, हेमंतदा, सचिनदा, फडके साहेब, खळेकाका, अनिल विश्वासजी, मुकेश भैया, किशोरदा, रफी साहेब……. सगळ्यांनी जणू फेर धरलाय…… काही जणांशी वाद ही झाले….. आत्ता हसू च येतंय सगळ्यांचं, नको होते ते व्हायला….
आज परत सगळ्या तपासण्या केल्या गेल्या….. आता अजून काय काय सहन करायचंय काय माहित?……
आज सकाळपासून आठवतायत, मिळालेले सत्कार, पदव्या, अनेक अवॉर्ड्स…. विशेष म्हणजे ‘भारतरत्न’ पुरस्कार…. फारच प्रेम दिलं लोकांनी…. देशात – परदेशात केलेले शोज….. कशी उतराई होणार यांची?…..
किती परीक्षा बघणारे प्रसंग, किती संकटं, पण मंगेशाच्या कृपेने आणि माई-बाबांच्या आशीर्वादाने सगळं निभावून नेलं…..
पण आता जीव थकलाय…. काही नको वाटतंय…. 7-8 वर्ष झाली, गाणं पूर्ण थांबवलंय….. बाहेर पडणंच बंद झालंय….. घरात बसून TV वर बघत असते, आजूबाजूला काय चाललंय ते…..
घरातले सगळे स्थिरावलेत….. फारशी कुणाची काळजी राहिली नाहीये….. आता ही ‘यात्रा’ संपावी असं मनापासून वाटतंय….. पण ‘त्या’ ने बोलावले पाहिजे ना?….. मन अगदी तृप्त आहे…. हजारो नाही, लाखो नाही तर करोडो लोकांचे प्रेम मिळालंय…. आदर मिळालाय….. अजून काय पाहिजे….. परत विचारांची भेंडोळी……..
कालपासून डॉ समदानींच्या चेहऱ्यावर चिंता दिसतीये…. श्वास जड झालेत…. आता तर एकेक श्वास घ्यायलाही कष्ट पडतायत…. मंगेशा, सोडव रे आता…… हे कुठलं गाणं रुंजी घालतंय, ” *तुझ्या शिवारी जगले, हसले, कडी कपारी अमृत प्याले! आता हे परि सारे सरले….. उरलं मागं नाव “…… परत सगळं भोवतीचं फिरतंय…. काही समजत नाहीये…. खूप खोल खोल, खड्ड्यात किंवा भोवऱ्यात फिरतीये असं वाटतंय….. थांबता येत नाहीये….. सहन होत नाहीये……
मगाशीच आशा येऊन गेली…. बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे ही येऊन गेले…… आज काहीतरी विशेष दिसतंय….. सचिनही बघून गेला…. आज ‘सुटका’ दिसतीये…. आज श्वास जास्तच जड झालेत….. आशाच्या गाण्याप्रमाणे ‘जड झाले ओझे ‘ असं वाटतंय….. सोडवा कुणीतरी…. डॉक्टर, डॉक्टर…………
आता एकदम हलकं वाटतंय…. पिसासारखं…… सगळ्या नळ्या काढल्यात….. उंचावरून खाली सगळ्यांकडे बघतीये असं वाटतंय…..
सगळीकडे असं का वातावरण आहे? सुतकी, दुःखी?…. म्हणजे…. म्हणजे….. मी……. बहुतेक तसंच असावं…… आज माईची, बाबांची खूप आठवण येतीये…. त्यांना कधी एकदा भेटते असं झालंय……
माझ्या डोक्यावरून पांघरूण घातलंय…. पण ही काय जादू आहे? मला सगळं दिसतंय…… मला न्यायला आलेत हे 4-5 जण…. रोजचेच हॉस्पिटल मधले….. रडताहेत…. मी विचारतीये त्यांना, पण लक्ष देत नाहीयेत….. त्यांच्या बोलण्यावरून कळतंय, मला घरी नेताहेत…. प्रभुकुंजवर….. कधी एकदा घर आणि घरातली माणसं दिसताहेत, असं झालंय…. आली, आली गाडी…. हे उलट्या अक्षरात काय लिहिलंय? ऍम्ब्युलन्स….. हं….. घरी सगळे वाट बघत असतील नाही? उषा, आशा, हृदयनाथ, सगळी मुलं…. घाबरले असतील बिचारे….. पण आता त्यांच्या डोक्यावर हात ही फिरवता येणार नाही…… ह्याचं मात्र वाईट वाटतंय…..
सगळीकडून कानावर पडतंय, मी अनंताच्या प्रवासाला निघून गेलीये म्हणे…. नाही नाही, अजून इथेच घुतमळतीये मी….. इतकं सोपं आहे का, इतक्या लोकांचे प्रेमपाश इतक्या चटकन सोडवणं….. किती मोठी मोठी लोकं येताहेत प्रभूकुंजवर…. मी तर पार संकोचून गेलीये….. हे काय, हे इतके मिलिटरी आणि पोलीस कशाला?….. तिरंगा दिसतोय…. मला फार अभिमान आहे या तिरंग्याचा आणि त्याची प्राणपणाने रक्षा करणाऱ्या सैनिकांचा…. तुम्हाला आवडतं ना माझं ते गाणं,’ए मेरे वतन के लोगो…… “….. ते गाताना नाही आता ऐकताना अजूनही घशात हुंदका दाटतो….. पण आज तुम्हा सगळ्यांचा हुंदका अडकलाय् हे पाहून खूप भरून येतंय…. किती प्रेम कराल माझ्यावर? मी काय केलंय? फक्त गाणी तर म्हटलीत…..
आत्ताच कानावर आलंय, मोदी साहेब येताहेत, मला पाहायला…… बापरे, मोठ्ठा माणूस… पंतप्रधान असावा तर असा….. मला भेटायला खास येताहेत, सगळे कार्यक्रम रद्द करून…. हे मात्र अति होतंय हं…… आज त्यांना परत एकदा डोळे भरून, सॉरी, बंद डोळ्यांनी पाहता येईल…..
आता मला तिरंग्यात लपेटलंय….काय वाटतंय म्हणून सांगू?… ‘साऱ्या भारताची शान आहोत आपण’ असं काहीतरी feeling आलंय….. मिलिटरी व्हॅन पण काय सुंदर सजावलीये…. यातून जायचंय आता….. माझा खूप हसरा फोटो लावलाय समोर…. खरंच वाटत नाही, मी अशी होते….. आत्ताही, बहिणींनी साथ सोडली नाहीये…. आशा, उषा दोन्ही बाजूला उभ्या आहेत….. मी हळूच बघतीये त्यांच्याकडे….. रडवेल्या झाल्यात अगदी….. आमची गाडी मुंबईच्या रस्त्यावरून धिम्या गतीने चाललीये…. दुतर्फा खूप लोक उभे आहेत, साश्रू नयनानी मला एकदा, शेवटचं बघायची इच्छा ठेऊन….. किती हे प्रेम?…. कशी उतराई होणार यांची?…. खूप संकोचून गेलीये मी….
अच्छा, शिवाजी पार्क वर आणलंय वाटतं…. म्हणजे बाळासाहेबांच्या इथेच…. असतात असे ऋणानुबंध काही काही….. मिलिटरी चे जवानानी ‘सलामी’ देऊन आता, ‘guard of Honour’ म्हणून मला अत्यंत आदराने खांद्यावरून घेऊन चाललेत…. जणू काही लहानपणी बाबांच्या खांद्यावरून जत्राच बघतीये….. हो जत्रा च….. इतकी माणसं जमलीत इथे….. नजर टाकावी तिकडे माणसंच…… आणि आणि हे काय?… मला खांद्यावरून खाली एका पांढऱ्या चौथऱ्यावर ठेऊन, हे सगळे कुठे चाललेत?…..पण एक मात्र खरं…. माझ्या पांढऱ्या रंगावरच्या प्रेमाची आठवण ठेवलीये यांनी….. पण खूप एकटं वाटतंय….. मला इथे सगळ्यांच्या मध्ये ठेवलंय…. कुणीच नाही आजूबाजूला…… लांब खुर्च्यावर बाळ, आशा, उषा, आदिनाथ, भारती वहिनी सगळे दिसतायत….. पार कोलमडून गेलेत…. कसं समजावू त्यांना…. खूप थकले आहे मी….. आता ‘विसाव्याचे क्षण’ हवेत मला…..
ही अचानक गडबड कसली? मोदीजी आले वाटतं? हं….. बापरे, ते माझ्यापुढे नतमस्तक होतायत…. आत्ता मात्र वाटतंय, उठून त्यांना नमस्कार तरी करायला हवा होता….. देशाचे पंतप्रधान आपल्यापुढे वाकतायत…… धन्य झाले मी….. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून मन भरून आशीर्वाद दिलाय मी, तुम्हीच माझ्या या भारत देशाला प्रगतीपथावर नेऊ शकता….. माझा लाडका सचिन ही दिसतोय….डोळे पाणावलेत त्याचे ही… मानसपुत्रच माझा….. सुखी रहा…..
आता कानावर पडतंय मंत्रपठण!…. म्हणजे वेळ आली वाटतं……. चंदनाची शय्या….. वाट बघतीये…..माईला, बाबांना भेटण्यासाठी आतूर झालीये मी….. खूप हलकं वाटतंय…. आता लाखो, करोडो हृदयात कायमचं ‘ज्योत’ बनून रहायचंय्….. आपल्याच आवाजाची जादू त्यांच्या हृदयातून ऐकायचीये……. सर्वाना त्यांच्या सुख-दुःखांच्या प्रसंगी आपल्या सुरातून साथ द्यायचीये….. याच साठी तर आपल्याला माई-बाबांनी इथे ठेवलं होतं ना….. बाबा, तुम्ही कल्पवृक्ष होऊन मला सर्व काही दिलंत…. आता तुमचाही शब्द नाही मोडवत…. येतीये मी… आले…. सगळीकडे ज्वाळा उसळल्यात…. आणि मला तुमच्या भेटीची आस लागलीये……
सर्वांना ‘नमस्कार’ आणि ‘आशीर्वाद’!…. कधीही आठवण करा, मी हजर असेन…… पण आता जाऊदे…..
“अखेरचा हा तुला दंडवत 🙏, सोडून जाते गाव……….. दरी दरितून, मावळदेवा, देऊळ सोडून धाव रेऽऽऽऽऽऽऽ ………
(आपल्या सर्वांच्या लाडक्या लतादीदींचे मनोगत)

सौ. रेखा दैठणकर

*********************************

अपमान करण्याची संधी देऊ नका…

डॉ. धनंजय केळकर
| महाराष्ट्र टाइम्स |

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निमित्ताने लता मंगेशकर यांच्याशी अधिकाधिक परिचय होत गेला. या परिचयातून त्यांचे साधे; परंतु काही जीवनसूत्रे पाळणारे व्यक्तिमत्व उलगडत गेले. कोणाला अपमान करण्याची संधी द्यायची नाही, हे त्यांचे वाक्य ठळकपणे ठसले.

दीनानाथ मंगेशकर यांना वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांचे निधन झाले; त्यामुळे कोणत्याही स्थितीत अशी वेळ इतर कोणावर येऊ नये, या भावनेतून एक चांगले रुग्णालय पुण्यात उभारावे हा संकल्प लता मंगेशकर; तसेच मंगेशकर कुटुंबीयांनी मनात केला होता. तशा हालचालीही सुरू केल्या होत्या.

वैद्यकीय शिक्षण संपल्यानंतर, मी मुंबईच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात काम करत होतो. तेथे मोठी संधी होती; पण एकूणच मुंबईचे आयुष्य मला आवडले नव्हते. आपण पुण्यात जाऊन वैद्यकीय सेवा करावी, असे मनाने घेतले. पुण्यात आल्यानंतर, येथे सुरू असलेल्या वैद्यकीय सेवांमध्येही समाधान मिळत नव्हते. काही तरी आपले उभे केले पाहिजे, म्हणजे तेथे आपल्या मनासारखे काम करता येईल, हा निर्णय झाला होता. अर्थात, असे काही उभारण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेच पाठबळ आमच्याकडे नव्हते. एका ओळखीच्यांच्या माध्यमातून, १९९०मध्ये मी माझ्या काही सहकाऱ्यांसोबत थेट ‘प्रभुकुंज’वर धडकलो. सगळे मंगेशकर कुटुंबीय तेथे होते. आम्ही आमची योजना त्यांना सांगितली. पुण्यामध्ये अशा मोठ्या रुग्णालयाची गरज असल्याचेही त्यांना सांगितले; पण त्या वेळेस आमच्याकडे अनुभव नव्हता, हे सत्यच होते. लता मंगेशकरांनी अतिशय शांत शब्दांमध्ये आम्हाला ते सांगितले. ते सांगताना आम्ही दुखावणार नाही, याची इतकी काळजी घेतली होती, की आम्हालाच त्याचे आश्चर्य वाटत होते. एखाद्या आईची माया त्यामध्ये होती. तेव्हा त्यांच्याबरोबर इतके ऋणानुबंध जुळतील, असे वाटले नव्हते; पण त्यांच्या स्नेहाने आम्हाला जिंकले होते.

पुण्यात परत आल्यावर, आम्ही संजीवन रुग्णालयामध्ये काम सुरू केले. बघता बघता सहा वर्षे उलटली. आमच्या गाठी भरपूर अनुभव जमला. पहिल्या भेटीत लता मंगेशकरांनी थेट सांगितले नसले, तरीही त्यांना काही तरी भव्य उभे करायचे होते, छोटे रुग्णालय उभारण्यात त्यांना रस नव्हता. त्यानंतर मात्र त्यांनी मला स्वतःहून निरोप पाठविला. मी गेल्या कालावधीत काय करतो आहे, यावर त्यांचे लक्ष होते. माझी प्रगती समाधानकारक आहे, हे बघितल्यावर त्या बैठकीत त्यांनी सांगतले, डॉक्टर आता हा प्रकल्प तुमचा आहे. तुम्हीच तो तडीला न्यायचा आहे. त्या दिवसानंतर आजपर्यंत त्यांनी नेहमीच मदतीची भूमिका घेतली. मला त्यांनी सांगितलेले एक वाक्य आजही आठवते, ‘आयुष्यात आपला अपमान करण्याची संधी कधी कोणाला मिळणार नाही, असेच काम आपण करायचे.’ शॉर्टकट घ्यायचा नाही, कायदा मोडायचा नाही, अनावश्यक सवलती मागायच्या नाहीत, आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवायचे व सामान्यांसाठी झोकून देऊन काम करायचे, ही सूत्रे त्यांनी आयुष्यभर सांभाळली. तीच सूत्रे सांभाळत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चालविण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असायचा.

रुग्णालयाची उभारणी सुरू झाली, त्या वेळेस आम्ही त्यांना प्रत्येक तपशील कळवायचो. त्या शांतपणे ऐकून घ्यायच्या, कधी तरी एखादी सूचना करायच्या; पण आग्रह नसायचा. उलट माझी काय मदत होईल, असे विचारायच्या. त्यांच्या मोठेपणापुढे आणि तितक्याच साधेपणापुढे सुरुवातीला दबून जायला व्हायचे. नंतर लक्षात आले, की तो साधेपणा ओढून ताणून आणलेला नव्हता, तर तो त्यांचा स्थायीभाव होता. आपल्या वागण्यातूनच त्या आमच्यापुढे आदर्श उभा करीत होत्या.
रुग्णालयाच्या मदतीसाठी आम्ही पुण्यासह अनेक शहरांमध्ये संगीत रजनीचे कार्यक्रम केले. त्या कार्यक्रमाच्या तयारीबद्दलही त्या कमालीच्या दक्ष असायच्या. आपल्या वादकांची, सहकलाकारांची सोय नीट होते आहे ना, याकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे. इतकेच नव्हे, तर कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री जाऊन, तिथली ध्वनिक्षेपक यंत्रणा नीट आहे ना, याची खात्री त्या करून घेत. त्या वेळेस मी त्यांना सहज म्हटले होते, की दीदी तुमची स्मरणशक्ती अफाट आहे. सगळी गाणी तुम्हा तोंडपाठ असतात, तरी प्रत्येक वेळेला तुम्हाला गाण्याचे नोटेशन असलेला कागद समोर का लागतो? त्यावर त्यांचे उत्तर फार समर्पक होते. त्या म्हणाल्या, ‘गाणे मी गात असले, तरीही गीतकाराने लिहिलेले, संगीतकाराने परिश्रमपूर्वक चाल लावलेले आणि वादकांनी जीव तोडून वाजविलेले असते. ते टीम वर्क असते. मग त्यामध्ये बदल होऊन कसे चालेल. तो अधिकार आपल्याला नाही. म्हणून गाणे पाठ असले, तरी त्याचे बारीक तपशील असलेला कागद समोर असलेला बरा असतो; म्हणजे चूक होत नाही.’ खरे तर त्यांच्याकडून चूक होण्याची शक्यता नव्हतीच आणि झाली असती, तरी त्यांना कोणी विचारलेही नसते; पण आपल्या सहकाऱ्यांच्या श्रमांचीही इतकी मनापासून दखल घेत, त्यांना प्रत्येक वेळेस त्याची पोचपावती देण्याची त्यांची सवय खरोखरच प्रत्येकाने आचरणात आणण्यासारखी होती.
‘रजनी’च्या पाठोपाठ, रुग्णालयाच्या मदतीसाठी भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामना घेता येईल का, अशी कल्पना आम्ही त्यांच्यापुढे मांडली. त्यांनी त्याला होकार देत, मला तेव्हाच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची भेट घेण्यास सांगितले. मी मुंबईत दालमिया यांना भेटायला गेलो, तेव्हा ते मला म्हणाले, ‘भारतीय क्रिकेट संघ असे धर्मादाय सामने खेळायला लागला, तर पुढील दहा वर्षे पुरणार नाहीत, इतके चांगले काम करणाऱ्या संस्था आपल्या देशात आहेत; त्यामुळे हे शक्य नाही.’ मी थोडासा खट्टू झालो होतो. सहजच मी म्हटले, ‘हे खरे असले, तरी मंडळाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, तेव्हा लतादीदीच धावून यायच्या ना…’ दालमिया हसून म्हणाले, ‘हो ना. म्हणूनच, अपवाद म्हणून तुम्हाला सामना द्यायचे आम्ही ठरविले आहे.’ भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा एकमेव सामना असेल. तसाच तो झालाही. त्या सामन्याच्या आयोजनाची बैठक, दिल्लीत एनकेपी साळवे यांच्या घरी झाली. शरद पवारांपासून बीसीसीआयचे सगळे पदाधिकारी व माजी अध्यक्ष त्याला उपस्थित होते. त्या बैठकीत नियोजनामध्ये या सगळ्यांनी अनेक मोलाच्या सूचना केल्या, जबाबदाऱ्या घेतल्या. अखेर वानखेडे स्टेडिअमवर तो सामना पार पडला. सामन्याच्या दिवशी सकाळपासून राजसिंह डुंगरपूर, शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह लतादीदी उपस्थित होत्या. त्या शेवटपर्यंत थांबल्या. त्यांच्यामुळे सगळेच थांबले.
असाच प्रसंग सौद बाहवान यांच्याबाबतचा आहे. सौद बाहवान हे मस्कतमधील अतिशय मोठे व प्रतिष्ठित उद्योगपती. त्यांची बरोबरी आपल्याकडील टाटा समूहाशी करता येईल. त्यांच्या धर्मादाय संस्थेचा व्यापही तितकाच मोठा होता. ते लतादीदींना आपली बहीण मानत; अगदी राखी बांधण्यापर्यंत. अडचण आली किंवा एखादा नवीन प्रकल्प सुरू करायचा असला, की आम्ही त्यांना हक्काने पत्र पाठवायचो. पुढच्या अठ्ठेचाळीस तासांत रुग्णालयाच्या खात्यात पैसे जमा झालेले असायचे. त्या काळात त्यांनी आम्हाला कोट्यवधी रुपयांची मदत केली. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना फोन केला, तर ते सहजपणे एवढेच म्हणाले, ‘माझ्यासाठी काही करू नका; रुग्णांची मनापासून सेवा करा. ती माझ्यापर्यंत पोहोचेल.’ ही सगळी लता मंगेशकर या नावाची जादू होती.
अशा अनेक आठवणी सांगता येतील. गेल्या तीस-बत्तीस वर्षांत त्यांनी मलाच नव्हे, तर मंगेशकर रुग्णालयातील सर्वांनाच आपल्या कुटुंबाचा भाग बनवून टाकले होते. एखादी तक्रार त्यांच्याकडे गेली, तर त्या त्याचा आवर्जून पाठपुरावा करायच्या. चूक झाली असेल, तर ती पुन्हा होऊ नये, यासाठी आग्रह धरायच्या. रागावल्या कधीच नाहीत; पण त्यांनी विचारण्याचा धाकही आम्हा सगळ्यांना पुरेसा होता. मला त्या कायम धाकटा भाऊ म्हणायच्या; पण माझ्या मनातील त्यांचे स्थान आईचे होते. त्यांची मायाही आईचीच होती.
रुग्णालयाच्या प्रारंभीच्या काळात, ‘सीजीएचएस’ची मान्यता मिळविण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो. जाताना फक्त दिल्लीला जातो आहे, एवढेच त्यांना सांगितले होते. त्यांनी मी नक्की कशासाठी जातो आहे, याची चौकशी माझ्या सहकाऱ्यांकडे केली. दिल्लीत उतरल्यावर, मला थेट लालकृष्ण अडवानींचाच फोन आला. मला तो धक्का होता. अडवानीजींनी मला तातडीने भेटायला बोलावले. काय काम आहे, असे विचारले. थेट आरोग्य मंत्र्यांना फोन करून, आवश्यक मान्यता तातडीने देण्याचे आदेश दिले. वास्तविक, अडवानींनी माझी दखल घेण्याचे काहीच कारण नव्हते; पण ती घेतली गेली, याचे एकमेव कारण होते, ते म्हणजे लता मंगेशकर हे नाव.
नवीन रुग्णालयाच्या उभारणीच्या वेळेस मात्र त्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास होता. भूमिपूजनाला सचिन तेंडुलकरला बोलवावे, अशी सूचना माझ्या सहकाऱ्यांनी केल्यावर, त्यांनी तेथूनच सचिनला फोन करून विनंती केली. एका आठवड्यात इमारतीचे भूमिपूजन सचिन तेंडुलकरांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्या वेळेस नरेंद्र मोदींना बोलविण्यावरही एकमत झाले. त्या वेळेस मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. लतादीदींचे पत्र घेऊन अहमदाबादमध्ये मोदींना भेटल्यावर, त्यांनी तातडीने वेळ दिली. तोपर्यंत मोदी राष्ट्रीय राजकारणात येण्याची चर्चाही नव्हती. त्या कार्यक्रमातच लता दीदींनी, देशाचे पंतप्रधान व्हावे अशा शुभेच्छा मोदींना दिल्या होत्या. पुढचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे.
गेल्या तीन-साडेतीन वर्षांत मात्र त्यांनी हळूहळू सगळ्यांतूनच निवृत्ती घेतली. आपली मानसिक तयारी केली होती. एकदा बोलताना, तर त्यांनी मृत्यूबद्दल इतक्या सहजपणे माझ्याशी चर्चा केली, की त्याने मीच काहीसा हादरलो. त्या शांत होत्या. मृत्यूलाही आपलेसे करण्याची प्रगल्भता त्यांच्यात होती. त्यांच्या जाण्याने मंगेशकर रुग्णालयाचा परिवार एका अकृत्रिम स्नेहाला, काळजी करणाऱ्या व्यक्तीला आणि आईच्या मायेला मुकला आहे, अशीच माझी भावना आहे. त्याचबरोबर, त्यांनी आपल्या वागण्यातून निर्माण केलेली जीवनसूत्रे हाच आदर्श म्हणून बाळगण्याचाही एक धडा त्या देऊन गेल्या आहेत. त्यांच्या गाण्याबाबत बोलण्याबाबत मी मोठा नाही; पण एक माणूस म्हणून त्यांची झालेली ही ओळख मला तितकीच मोठी वाटते; किंबहुना सगळ्यांत मोठी वाटते.
(लेखक दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक आहेत.)

*****************

तेरी आवाज ही पहेचान है!

शिरीष कणेकर

अनेक संगीतकार आले आणि गेले… अनेक गायिका आल्या आणि गेल्या… लता होती तिथेच आहे.. ध्रुवपदासारखी अढळ, दीपगृहासारखी मार्गदर्शक… गंगाजलासारखी पवित्र! असा भाव नाही, जो तिने गाऊन व्यक्त केला नाही… असा देव नाही, जो तिच्या कंठातून गात नाही… असा माणूस नाही, ज्याचे कर या नादब्रह्माच्या साक्षात्कारापुढे जुळले नाहीत…

या पलीकडे जाऊन मी आता तिच्याविषयी नव्यानं काय लिहिणार आहे? ‘आवाज कुणाचा? – लता मंगेशकरचा’ अशी आरोळी आम्ही वर्षानुवर्षे मारत आलो आहोत.
‘म्हातारा झालो हो, दीदी.’ मी अलीकडेच तिला फोनवर म्हणालो.
‘तुम्ही?…मग माझं काय?’ ती उद्गारली.
‘अहो, तुमच्या आवाजाने तुम्हाला ‘आवाजी’ बहुमताने तरुण ठेवलं. तुमची गाणी ऐकण्याइतपत कान शेवटपर्यंत शाबूत राहावेत एवढीच या क्षणाला मागणी आहे. लई नाई मागणं.’
‘काय होतंय हो तुम्हाला?’ तिनं आस्थेनं विचारलं. तिच्या स्वरातील कळवळय़ानं मला गलबलून आलं. मी स्वतःला फार एकटा समजतो. माझ्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात नाना पाटेकरनंही माझ्या एकटेपणाचा ओलाव्यानं उल्लेख केला होता. लताची सोन्यासारखी गाणी माझ्याभोवती फेर धरून बागडत असताना मी माझ्या संपन्न गोतावळय़ात असतो; मग आडमुठय़ा अट्टहासानं मी स्वतःला एकटा का म्हणवून घ्यावं? हा तिच्या गाण्यांचा व तिचा अवमान नाही का? अनेकदा मला वाटत आलंय की कुणी विचारलं की तुम्ही काय करता, तर अभिमानानं छाती ठोकून सांगावं – ‘मी लताची गाणी ऐकतो.’
चाळीस वर्षांपूर्वी नव्हाळीतल्या उमाळय़ानं मी ‘यादों की बारात’ या माझ्या सदरात ‘तेरी आवाज के सिवा इस दुनिया में रख्खा क्या है’ या शीर्षकाखाली लिहिलेला मजकूर आजही न कोमेजता मला खुणावतोय. तुमच्या परवानगीनं तो सादर करतो.

28 सप्टेंबर 1929 रोजी एका गंधर्वलोकीच्या दैवी स्वरानं पृथ्वीवर अवतार घेतला. गवयाची पोर. तिनं जन्मल्यावर टाहो फोडला नसेल, एखादी नाजूक लकेर छेडली असेल. ‘कोहं?’ असा सवाल पुसणारा आक्रोश न करता ‘मी आल्येय हं!’ अशी करोडो कानसेनांना दिलासा देणारी लाजवट सुरावट पेश केली असेल. आईबापांची काय पुण्याई असते, ज्यामुळे प्रत्यक्ष देव आवाजरूपानं त्यांच्या अंगणात बागडतो?

बाप म्हणाला, ‘पोरी, तुझ्या गळय़ात गंधार आहे.’ बापाच्या पश्चात पोरगी हेलावून गायली, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला.’ सज्जाद हुसेन म्हणाला, ‘लता गाती है, बाकी सब रोते है.’ लता त्याच्याकडे गायली, ‘वो तो चले गये ऐ दिल, यादसे उनकी प्यार कर.’ अनिल विश्वास म्हणाला, ‘लता या क्षेत्रात आली आणि आम्हाला देवदूत आल्यासारखं वाटलं. लता त्याच्याकडे देवदूतासारखीच गायली, ‘बदली तेरी नजर तो नजारे बदल गये.’ मदन मोहन म्हणाला, ‘लहानपणी ज्योतिषानं माझं सर्व भविष्य अचूक सांगितलं होतं. पण लता मंगेशकर नावाचा दैवी आवाज तुझ्याकडे गाईल हे नाही सांगितलं.’ लता मदनकडे गायली, ‘अब गमको बना लेंगे जीने का सहारा.’ लताच्या थट्टामस्करीनं कातावून गुलाम महंमद एकदा म्हणाला, ‘लताजी हंसीये मत. ठीक तरहसे गाईये.’ मग लता गायली, ‘दिल देके सनम तुम्हे पछताए हम.’ एस. डी. गेंगाण्या आवाजात व बंगाली ढंगात लताला पुकारायचा आणि लता गायची, ‘रोते रोते गुजर गयी रात रे.’ सी. रामचंद्र धुंद चाली बांधायचा आणि लता ऊर फुटून गायची, ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोये.’ पंजाबी आणि बंगाली संगीतकारांच्या गोतावळय़ात के. दत्ता हा मराठमोळा माणूस लताला वडिलकीच्या अधिकारात बोलावून घ्यायचा आणि मग लता म्हणायची, ‘बेदर्द जमाने से शिकवा न शिकायत है.’

मोगरा तिच्या गळ्यात फुललाय. त्या कोणा लवंगिकेचं लटपट लटपट चालणं तिच्या अवखळ जिभेनं नेमकं टिपलंय. ‘मालवून टाक दीप’ असं आर्जव करणाऱ्या मीलनोत्सुक रमणीची अधीरता तिच्या आवाजातून जाणवलीय. ‘साजन की गलियाँ छोड चले’ हा निषाद तिच्या स्वरातून पाझरलाय. ‘सावरी सुरत मन भायी रे पिया’ हा लाजरा आनंद तिच्या सुरातून ठिबकलाय. ‘तारे वही है, चाँद वही है, हाय मगर वो बात नही है’ ही व्यथा तिच्या तोंडून साकार झालीय. ‘बेचैन करनेवाले तू भी न चैन पाये’ हा भंगलेल्या हृदयाचा तळतळाट व ‘कोई किसीका दीवाना न बने’ ही पोळलेल्या अंतःकरणाची उपरती तिच्या अजोड कंठातून वेदनेसारखी ठणकत आलीय. ‘दिले बेकरार सो जा, अब तो नही किसीको तेरा इंतजार सो जा’ हा रडवा, अश्रूपूर्ण ‘गिला’ तिनं केलाय. ‘बनायी है इतनी बडी जिसने दुनिया, उसे टूटे दिल का बनाना न आया’ ही बोचरी विसंगती दुखऱ्या आवाजात तिनं दाखवून दिल्येय.

केवळ हिंदी चित्रपटांपुरतं बोलायचं तर 1947 साली वसंत जोगळेकरांच्या ‘आपकी सेवा में’मध्ये दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लताचा स्वर प्रथम उमटला. त्यानंतर गुलाम हैदरनं ‘मजबूर’मध्ये या दोन शेपटेवाल्या, कृश पोरीचा आवाज घेतला. जोहराबाई अंबालावाला, अमीरबाई कर्नाटकी, शमशाद बेगम या मातब्बर गायिकांना डावलून गुलाम हैदरनं या घाटी पोरीला गायला लावलं याचं फिल्मी दुनियेला उपहासात्मक आश्चर्य वाटलं. पण अशा एखाद्या अद्भुत आवाजाची देणगी मिळावी व नसीम बानूसारख्या बेसूर नायिकेला गायला लावताना कर्तृत्वाला जखडून टाकणाऱया शृंखला तटातट तुटाव्यात म्हणून परमेश्वराची करुणा भाकणारे खेमचंद प्रकाश, ज्ञानदत्त, हंसराज बहेल, के. दत्ता, श्यामसुंदर, अनिल विश्वास, सी. रामचंद्र, बुलो सी. रानी आणि नौशाद यांच्यासारखे अभिजात संगीतकार खडबडून जागे झाले. ‘आयेगा आनेवाला’नं जाणकार थरारले. ‘चुप चुप खडे हो’नं लताचा आवाज झोपडी झोपडीतून पोहोचवला. तो आजतागायत तिथून बाहेर पडलेलाच नाही. अनेक संगीतकार आले आणि गेले. अनेक गायिका आल्या आणि गेल्या. लता होती तिथंच आहे. ध्रुवपदासारखी अढळ, दीपगृहासारखी मार्गदर्शक, गंगाजलासारखी व पवित्र! ‘गाये लता, गाये लता’ हे गाणं एकावन्न साली ती के. दत्तांसाठी गायली. त्यातला आशय तिनं सहीसही आचरणात आणलाय…

असा भाव नाही, जो तिनं गाऊन व्यक्त केला नाही. असा देव नाही, जो तिच्या कंठातून गात नाही. असा माणूस नाही, ज्याचे कर या नादब्रह्माच्या साक्षात्कारापुढे जुळले नाहीत. आज मी ठाम ठरवून लिहायला बसलोय की लताच्या अवीट गोडीच्या अविस्मरणीय गाण्यांची जंत्री द्यायची नाही. (यादी द्यायला ती काय वाण्याची यादी आहे?) होतं काय की एक गाणं दिलं की पाठोपाठ दुसरं गाणं आपसूक येतं. मग तिसरं. मग चौथं. हा सिलसिला चालूच राहतो. अमर संगीताचा माहोल निर्माण होतो. रसिक वाचक मोहोरून येतात. धुंदफुंद होतात. त्यांची संगीतसमाधी लागते ते लतामय होतात. माहीत नसलेली गाणी ऐकण्याची मनाशी खुणगाठ बांधतात. मग त्यांना असे भास होतात की, आपल्याला लेख बेहद्द आवडलाय. माय फुट, आवडलाय. त्यांना लताची गाणी आवडलेली असतात. मला फुकटचं श्रेय मिळतं. असो.

मी समग्र लता ऐकलीय असं मला वाटत असताना एखादं लताचं अफलातून गाणं माझ्या कानी पडतं व माझं गर्वाचं घर खाली होतं. उदाहरणार्थ, बाबूजी सुधीर फडके यांचं ‘रत्नघर’मधलं ‘ऐसे है सुख-सपन हमारे’ लतानं ते चौसष्ट वर्षांपूर्वी गायलं होतं. ‘हैद्राबाद की नाजनीन (1952) मधील हे वसंत देसाईंचं लताचं लाजवाब गाणं तसं मी अलीकडेच ऐकलं आणि वेडावून गेलो. काय गायलंय बाईनं! काय त्या हरकती, मुरक्या, आलाप, पुन्हा एकदा मला माझ्या लेखणीचा थिटेपणा जाणवतोय. आस्वाद घेण्यात व त्याला शब्दरूप देण्यात आपण फारच कमी पडतोय या विचारानं मनाला क्लेश होतात. बघा, गाणंच सांगायचं राहिलं. मन कुठं थाऱयावर आहे? – ‘जाओ, चमका सुबह का सितारा, फिर जुदाईने आ के पुकारा’… मी सावरतो स्वतःला. नाहीतर पुन्हा लताच्या अजरामर गाण्यांची जंत्री सुरू व्हायची. काय शिंचा त्रास आहे? लतामय होण्यापूर्वी मी चांगला शहाणासुरता होतो.
संगीतकाराची करामत व त्याच्या गाण्यात लतानं ओतलेली जान यांचं विश्लेषण करायला मी असमर्थ आहे. ती माझी कुवत नाही. ‘कागा रे’मध्ये विनोद व लतानं काय गंमत केल्येय याची मीमांसा न करता येताही जर मला ते बेहद्द आवडत असेल तर तेवढं मला पुरेसं आहे. मला मिळणारा कुंडलिनी जागृत करणारा संगीतानंद समधर्मींबरोबर वाटून घेणं मला आवडत आलंय. लतानं आम्हाला एका रज्जूनं बांधून ठेवलंय. लताविषयी हा भक्तिभाव काही लोकांना खटकतो. का खटकतो? देवळात जाणाऱयाकडून भक्तिभाव सोडून कोणता भाव अपेक्षित असतो? लताचा आवाज तुम्हा एकटं व एकाकी राहू देत नाही एवढी एक गोष्ट मनात तिच्याविषयी श्रद्धा निर्माण करायला पुरेशी नाही का? ‘लता व दिलीपकुमार यांना शिरीष कणेकरांनी मोठं केलं’ असा अप्रतिम आरोप एका वाचकानं केला होता. चंद्र व सूर्य मी निर्माण केले, हे म्हणायचं तो विसरला.
एकदा मी कुठल्याशा गाण्याचा संगीतकार तिला विचारला. तिला पटकन आठवेना. गाणंच आठवेना. (हे सहसा होत नाही.) ‘तुम्ही चाल म्हणून दाखवा. म्हणजे लगेच आठवेल मला.’
‘भ्रम आहे हा तुमचा.’ मी म्हणालो, ‘मी कोणाची नक्कल करीत नसतो. कुठलंही गाणं मी माझ्या चालीत गातो.’
मी लतासमोर गाण्याची संधी सोडायला नको होती, असं माझ्या मुलीचं मत पडलं. पण त्यानंतर मला धक्के मारून घरातून बाहेर काढण्यात आलं असतं हे तिला कुठे माहीत होतं? बरं, बाहेर पडून शेजारच्या घरात आसरा शोधावा तर तिथं साक्षात आशा भोसले राहते. ‘जाये तो जाये कहाँ?’
‘दीदी, तुम्ही करण दिवाणबरोबरही द्वंद्वगीत गायलात. मग माझ्या बरोबर का गात नाही?’ मी विचारले.
‘गाऊया की’ लता म्हणाली, ‘लोकांना सुरात कसं गातात हे तरी कळेल.’
आचरटासारखं बोलल्यावर शालजोडीतले खावे लागतील एवढं तरी मला कळायला हवं होतं. पण शहाणपणाबद्दल मी कधीच प्रसिद्ध नव्हतो. लतानं कुठला गुण माझ्यात पाहिला देव जाणे. ती एकदा मला म्हणाली, – ‘मी तिघांनाच फोन करून गप्पा मारते. राजसिंगजींची वहिनी, गुलझार व तुम्ही.’
माझी अक्षरशः वाचा बसली. या बहुमानाचं मी काय करू हेच मला कळेना. वाटलं रफीला बोलावून गायला सांगावं – ‘बहोत शुक्रीया, बडी मेहेरबानी.’
‘हॅलो.. मी लता बोलत्येय…’ हा टेलिफोनवरच्या लतावर मी लेख लिहिला. तो प्रसिद्ध झाल्यावर आमचं टेलिफोनवर बोलणं झालं.
‘लेखात काही खटकलं का तुम्हाला?’ मी सावधपणे विचारले. ‘काय?’
‘काय असं नाही.’ मी जास्त सावधपणे म्हणालो, खटकण्यासारखं काय असू शकतं हे ती माझ्याकडूनच काढून घेऊ इच्छित होती. मी गळाला लागलो नाही.
मग तीच दिलखुलासपणे म्हणाली, ‘तुम्हाला काय हो, लिहा दडपून. कोण विचारायला बसलंय?’
‘हा काय काँप्लिमेंट म्हणायचा?’ माझा प्रश्न तिच्या खळखळून हसण्यात विरून गेला. ‘लोटा इज लोटा!’ असं आमचा बंगाली फोटोग्राफर म्हणाला होता ते मला नेहमीच आठवत असतं.
लताला जवळची माणसं लांब जाऊ नयेत हे जपण्याची विलक्षण हातोटी आहे. कार्यक्रमात वगैरे सगळय़ांशी बोलणं सर्वथा अशक्य असतं. पण एखादा कटाक्ष, एखादं मंद स्मित, एखादं वाक्य समोरच्याची जिंदगी बनवून टाकते. ‘दीनानाथ’ नाटय़गृहात ती कशाला तरी आली होती. तिच्याभोवती गर्दी होती. मी लांब भिंतीला टेकून गंमत बघत उभा होतो. एकाएकी तिनं खुणेनं मला बोलावलं. मी गेलो.
‘तो स्वतःला अमिताभ बच्चन समजतोय तो कोण आहे हो?’ तिनं कुजबुजत्या आवाजात विचारलं. मी हसलो. तिचा हेतू साध्य झाला. मी तिच्या गोतावळय़ातला होतो या भावनेनं माझ्या काळजाला ठंडक पोहोचली होती. कोणाची टिंगल करायला तिला मी योग्य वाटलो होतो हेही खरंच. आता पुन्हा माझ्याकडे लक्ष देण्याची तिला गरज नव्हती.
ताडदेवला शशांक लालचंदच्या स्टुडिओत मी तिच्या रिहर्सलला गेलो होतो. तिथं सुरेश वाडकर, शब्बीर कुमार, अनिल मोहिले सगळे होते.
‘कुठलं गाणं म्हणावं मला कळत नाही.’ शब्बीरकुमार लताला म्हणाला.
‘का बरं?’ लता बोलली, ‘रफीसाहेबांचं एखादं गा. वर्षानुवर्षे तुम्ही तेच करत आलायत.’
शब्बीरचा पडलेला चेहरा बघावा लागू नये म्हणून मी त्याच्याकडे बघण्याचं टाळलं.
‘तिथं बसू नका हं.’ लतानं मोर्चा माझ्याकडे वळवला, ‘तिथं कोरसवाले बसतील. तिथं बसलात तर तुम्हाला गायला लागेल.’
‘गाईन की. भितो की काय!’ मी हुशारी दाखवत म्हणालो.
‘तुम्ही कशाला भ्याल हो; मी भिते.’ लतानं ‘नॉक् आऊट’ पंच टाकला. या वेळेला शब्बीरकुमारनं माझ्याकडे बघणं टाळलं असावं.

अफलातून विनोदबुद्धी
लताच्या गाण्याखालोखाल जर तिच्याकडे काही असेल तर ती तिची अफलातून विनोदबुद्धी.
‘वेस्टर्न आऊटडोअर’ला ‘लेकिन’मधल्या ‘मै एक सदीसे बैठी हूँ’ या लताच्या गाण्याचं रेकॉर्डिंग चालू होतं. एक कडवं पुन्हा रेकॉर्ड करायचं ठरलं. त्यात कडव्याचा शेवट होता – ‘सबको कुछ दे जाता है.’ गाता गाता लता त्या ओळीपाशी आली आणि म्हणाली, ‘लेकिन फर्नांडिस खाना खाता है…’ रेकॉर्डिंगला सन्नाटा पसरला. कोणाला काही कळेना. लताच्या मागे कोपऱयात डबा उघडून जेवत बसलेला कोणी फर्नांडिस दचकला. घाईघाईनं त्यानं डबा बंद केला.
‘आराम से – आराम से’ लता त्याला म्हणाली, ‘जेवणाची कधी घाई करायची नाही. सावकाश जेवा. मी थांबते. पाच-दहा मिनिटांनी काही फरक पडत नाही.’
झाला प्रकार कळल्यावर हास्यस्फोट झाला. सर्वांचं लक्ष वेधल्यामुळे फर्नांडिस नरमला, ओशाळला. त्याला तिथून निघताही येईना व लता समोर उभी असताना जेवताही येईना. मात्र लतानं त्याचं जेवण झाल्यावरच रेकॉर्डिंग सुरू केलं.
‘मध्यंतरी xxxx बाईंची तब्येत बिघडली होती.’ लतानं मला ‘गॉसिप’ पुरवलं. शेवटी ती माणूसच होती. बारा महिने, चोवीस तास लता मंगेशकर बनून जगणं कसं शक्य आहे? जिभेला कधीतरी चाकोरी सोडून वळवळावंसं वाटणारच. ऐकणाऱ्यावर मात्र मणामणाचं ओझं येतं. लताच्या विश्वासाला जागण्याचं कठीण काम त्याला करायचं असतं. ‘लता काय म्हणत होती, माहित्येय?’ असं वचा वचा बोलून आपण आतल्या गोटातील असल्याचं धादांत खोटं सत्य म्हणून मिरवत कॉलर ताठ करून फिरणारे जे कोणी असतील ते असतील. हम तो ऐसे नही है, भैया!
‘काय झालं बाईंना?’ मी विचारलं.
‘ब्लडप्रेशर, दुसरं काय होणार?’
‘का?’
‘अवघड – अवघड गाणी म्हणायला लागतात ना, म्हणून.’ आता मला बऱ्यापैकी कळायला लागलेला ‘लता-पंच’ अखेर आलाच.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या खलीद महंमदनं तिची न्यूयॉर्कमध्ये मुलाखत घेतली. त्यात त्यानं विचारलं, ‘करीअरच्या या स्टेजलाही तुम्हाला मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतात का?’
‘हो तर. लागतात ना!’ लता म्हणाली.
‘उदाहरणार्थ?’
‘उदाहरणार्थ, तुम्हाला ही मुलाखत देणे.’ लतानं एक ठेवून दिली. हा भाग छापलेल्या मुलाखतीत मात्र नव्हता.
माझ्या मुलीच्या लग्नाला येऊन लतानं (आणि आशानंही) लग्नाला चार चाँद लावले. मी आभाराचे कृत्रिम शब्द पुटपुटत असताना ती म्हणाली- ‘अहो, असं काय करता? ती लहान असल्यापासून मला तिची ‘फ्रेंड’ म्हणत आलीय. मग फ्रेंडच्या लग्नाला जायला नको?’
माझी मुलगी आनंदानं रडली. लतानं तिला भेटवस्तू दिली. ‘नो प्रेझेंटस् आहे.’ माझी मुलगी म्हणाली. ‘मला चालतं,’ लता म्हणाली, आशानं तिच्या गाण्याचा आल्बम दिला. लता बोलली तेच शब्द आशाही बोलली – ‘मला चालतं.’
बरोबरच होतं. हे दुनियेचे नियम त्या दोघींना कसे लागू पडतील?
त्यांच्यापासून आमचं जग सुरू होत होतं. माझ्या मुलीला लतानं दिलेला फ्रॉक तिने जपून ठेवला व आता ती तो तिच्या मुलीला घालते. ‘हा लतानं दिलाय’ असं ती अमेरिकेतल्या हिंदुस्थानी लोकांना सांगते तेव्हा त्यांना वाटते की ही (बापाप्रमाणे?) फेकते आहे.

आवडती नावडती गीते
तुमच्या आमच्यासारखीच लताला स्वतःच्या गाण्यापैकी काही आवडती, काही नावडती असू शकतात, असं का कुणास ठाऊक मला कधी वाटलंच नव्हतं. परकरी मुलीनं सागरगोटय़ांवरून भांडावं त्या आविर्भावात ती बोलते तेव्हा धमाल येते. उदाहरणार्थ, तिला ‘असली नकली’मधलं आपल्याला आवडणारं ‘तेरा मेरा प्यार अमर’ आवडत नाही. का? ‘शीः मला ते दळण दळण्यासारखं वाटतं.’ ती नाक मुरडून म्हणते. अगं मावशे, पण तू काय भन्नाट गायल्येस ते, हे कोणी सांगायचं? ‘संगीता’मधील सी. रामचंद्रचं ‘नाउमीद होके भी दुनिया में’ तिच्या आवडत्या गाण्यात मोडत नाही हे कळल्यावर मला धक्का बसला होता. तिनं इतकं सुंदर म्हटलेलं सुंदर चालीचं गाणं तिला आवडत नाही? मग तिनं तिच्या नापसंतीचा रहस्यभेद केला, ‘ती चाल ओरिजिनल नाही. अण्णांनी वहाब या अरेबियन संगीतकाराची रेकॉर्ड माझ्या हातात ठेवली व सांगितलं की आपल्याला हे गाणं करायचंय. तेच ‘नाउमीद होके भी’ त्या गाण्याविषयी माझं मन थोडं कलुषित होणं स्वाभाविक नाही का?’ एकदा तिनं मला सामान्य वाटलेलं लक्ष्मीकांत-प्यारेलालचं ‘तकदीर’मधलं ‘सात समुंदर पार’ तिला आवडतं असं म्हणाली तेव्हा मी उडालो होतो.
‘हे आवडतं?’ मी उद्धटपणाच्या प्रांगणात पाऊल टाकत आगाऊपणानं बोलून गेलो.
‘मला स्वतःची आवडनावड असू शकत नाही का?’ तिनं चिडीला येत विचारलं. मी जीभ चावली. मी एखाद्या शाळूसोबतीबरोबर वाद घालत नव्हतो याचं भान मी विसरलो होतो. गाढवा, ती लता आहे लता, मी स्वतःला बजावलं.
तरीही एकदा मी तिला फोनवरून म्हणालोच, ‘कोणा कोणा संगीतकारांशी भांडलात हो तुम्ही? सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, एस. डी. बर्मन… आणखी कोण कोण?’
‘अहो, मी काय तुम्हाला भांडकुदळ वाटले का?’ तिनं उसळून विचारलं. वाघीण क्षमाशील मूडमध्ये आहे, ती एक पंजा मारून फडशा पाडणार नाही याची खात्री असल्यामुळे हा उंदीर बिनधास्त तिच्या आसपास बागडत होता. पण आपण उंदीर आहोत हे मी स्वतःला विसरून देत नव्हतो.

लताच्या हस्ताक्षरातील गाणी
माझ्या ‘गाये चला जा’च्या सुधारित तिसऱ्या आवृत्तीच्या (प्रकाशन 30 मार्च 1992) मुखपृष्ठावर व मलपृष्ठावर तिच्या हस्ताक्षरातील तिच्या सांकेतिक खुणा असलेली ‘अनाडी’तील दोन गाणी टाकली आहेत. त्यातील ‘वो चाँद खिला’वर कोपऱ्यात 3 डिसेंबर 1957 अशी तारीख आहे व 30 नोव्हेंबर 1957 अशी तारीख ‘बन के पंछी गाये’ या गाण्यावर आहे. 3 डिसेंबरच्या गाण्यावर ‘अनाडी’ असे चित्रपटाचे नाव लिहिलंय तर 30 नोव्हेंबरच्या गाण्यावर ‘मिसेस डीसा’ असं आहे. याचाच अर्थ तीन दिवसांत चित्रपटाचं नाव बदललं होतं. फोकस ललिता पवारवरून राज कपूरवर आला होता. गंमत आहे की नाही? कुठलंही गाणं गाण्यापूर्वी लता ते स्वतःच्या अक्षरात लिहून घ्यायची. म्हणूनच मला ही दोन गाणी मिळू शकली. आपण लताला पलंगाखालची ट्रंक काढायला लावली याची बराच काळ मला बोचणी लागून राहिली होती. आजही ते जीर्ण झालेले व फाटायला आलेले दोन कागद मी प्लॅस्टिकच्या कव्हरमध्ये जपून ठेवलेत. कुणाला पाहायचे असतील तर त्यानं बाहेरून व लांबून पाहावेत. तो अमूल्य ठेवा प्लॅस्टिकमधून बाहेर काढायचा नाही. कमसे कम जब तक मैं जिंदा हूँ…

(अर्थात ओ. पी. सोडून) झाडून सर्व संगीतकारांकडे ती गायल्येय. नुसतीच गायली नाही तर भरपूर गायल्येय. पण शंकर-जयकिशन तिचे खरे यारदोस्त होते. सवंगडी होते. तिने त्यांच्याकडे तब्बल 311 ‘सोलो’ गाणी गायली. गाणं, भांडणं, अबोला, समेट व त्यानंतर चौपाटीची भेल खाणं या चक्रातून त्यांचं नातं फिरत राहिलं. ‘फिल्मफेअर’ पारितोषिकात पार्श्वगायनाला मान्यता नाही या कारणास्तव लतानं पारितोषिक समारंभावर बहिष्कार टाकला.
‘तुला आमच्या आनंदात आनंद नाही का?’ जयकिशननं चिडून विचारलं.
‘आहे ना.’ लता म्हणाली, ‘प्रश्न तो नाही. संगीतकाराला जसं पारितोषिक असतं तसं पार्श्वगायकाला किंवा पार्श्वगायिकेला असायला नको का? मलाच द्या असं मी कुठं म्हणत्येय? कोणालाही द्या, पण द्याल की नाही? तुम्ही वास्तविक आमच्या हक्कांसाठी भांडायला पाहिजे. पण तुमच्या आनंदात आनंद मानून आम्ही आमचा अपमान विसरून स्टेजवरून तुमच्यासाठी गावं अशी तुमची अपेक्षा आहे. आमच्याशी तुम्हाला काही देणंघेणं नाही.’
शब्दानं शब्द वाढत गेला. तिरीमिरीत लता जयकिशनला म्हणाली, ‘तुम झाडू हो!’

मग अबोला, समेट फॉलोड बाय चौपाटीची भेळ!
एका होळीला ‘शास्कीन’चा पांढराशुभ्र सूट घालून शंकर व जयकिशन सकाळी सकाळी लताच्या घरी आले. दारातच तिनं त्यांच्या अंगावर रंगाचं पाणी बादलीतून ओतलं. त्यांच्या सुटाचा सत्यानाश झाला. त्यांचा त्या वेळचा चेहरा आठवून लताला आजही हसू लोटतं.
मुलाखती देण्यातलं तिचं इंटरेस्ट मागेच संपलंय. काही वर्षांपूर्वी ‘मसंद की पसंत’ या टीव्हीवरच्या कार्यक्रमात मसंदनं तिला विचारलं, ‘तुमची बहुतेक सगळी चांगली गाणी साठ सालानंतरचीच आहेत ना?’
लतानं कळेल न कळेल इतपत मान डोलावली. वाचा बसल्यावर ती तरी दुसरं काय करणार? पन्नास ते साठ या संगीताच्या सुवर्णकाळातील लताची अजरामर गाणी या तथाकथित समीक्षकाला माहीतच नव्हती. आपल्याला माहीत नाही हेही त्याला माहीत नव्हतं. मला वाटलं की तो तिथंच एकावन्न सालच्या ‘तराना’मधलं अनिल विश्वासचं गाणं गायला लागेल- ‘वो दिन कहाँ गये बता…’
‘अलीकडे मला मुलाखत देण्यातही स्वारस्य राहिलेलं नाही.’ ती माझ्याजवळ म्हणाली, ‘यांना ना संगीतात इंटरेस्ट ना जुन्या आठवणीत. येऊन जाऊन विचारणार काय, तर पांढरी साडी का नेसता, लग्न का नाही केलं, दारू पिता का, आशाशी संबंध कसे आहेत…’
आशाचं नाव निघालंय तो धागा पकडून मी विचारलं, ‘तुम्हाला आशाचं सर्वाधिक आवडणारं गाणं कोणतं?’
‘रोशनचं ‘दिल ही तो है’मधलं ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ क्षणाचाही विलंब न लावता लता म्हणाली अन् लगेच ‘निगाहे मिलाने को’ गायला लागली.
मी श्वास रोखून धरला. लता माझ्या घरात कोचावर पाय दुमडून बसून मजेत आशाचं गाणं गात होती. लताच्या आवाजात प्रत्यक्ष समोर बसून आशाचं गाणं कोणी ऐकलंय? मी आणि फक्त मी. मला माझ्या डोळय़ांचा आणि कानांचा हेवा वाटला. हे नक्की खरंच घडत होतं ना? माझ्या नशिबात वाढून ठेवलेल्या दुःखांबद्दल देवाला दूषणे देताना या सुखाच्या व आनंदाच्या दैवी वर्षावासाठी मी त्या जगन्नाथाचं ऋणी राहायला नको का? अरे, दुःखं तर कोणालाच चुकलेली नाहीत, पण सुखाचा एवढा ठेवा कोणाच्या पदरात पडतो?
रुपारेल कॉलेजमध्ये आशा भोसलेच्या जाहीर मुलाखतीच्या कार्यक्रमात एक अकलेच्या कांद्यानं तिला विचारले- ‘रात्री नीट झोप लागते का?’
हा प्रश्न मी लताला सांगितला तेव्हा ती म्हणाली, ‘मग आशानं उत्तर दिलं की नाही, की नाही येत झोप, तुम्ही रोज अंगाई गीत म्हणायला येत जा म्हणून? अकारण आशाला डिवचलं तर ती सुपडा साफ करील.’
लताविषयी कंड्या पिकवणाऱ्या वृत्तपत्रांनी भूतकाळात लताला भरपूर मनस्ताप दिला. (गेली अनेक वर्षे ती या सगळय़ाच्या पलीकडे गेल्येय.) का करतात ही माणसं असा उपद्व्याप? दुसऱ्याला किती त्रास होतो, मनस्ताप होतो, बदनामी होते याची त्यांना काहीच पडलेली नसते. दडपून लिहायचं व तमाशा बघत बसायचं…’
लतासकट सगळय़ा भावंडांना त्यांची आई माई मंगेशकरांचं विलक्षण कौतुक आणि अभिमान होता. लताच्या दिवाणखान्यात भिंतीवर माईंचं भलंमोठं ‘पोर्ट्रेट’ आहे. त्याच्याकडे बघत मी लताला म्हणालो, ‘तुमच्या माई तरुणपणी काय सुरेख दिसायच्या हो!’
‘मग?’ लताचा चेहरा अभिमानानं डवरला होता.
पण हीच माई कशावरून तरी रागावली की या भावंडांची पळापळ व्हायची. ‘कुःसंतान असण्यापेक्षा निःसंतान असणं चांगलं’ ती गरजायची. लता, आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ म्हणजे ‘कुःसंतान’ बरं का!
‘अहो, ती डोक्यात राख घालून घर सोडून निघायची.’ आशा मला हसत हसत सांगत होती, ‘वर म्हणायची, तुम्हाला काय वाटतं, मी माझं पोट भरू शकणार नाही? तिची समजूत काढता काढता आमच्या नाकीनऊ यायचे. दीदीदेखील तिला थांबवण्यासाठी तिच्या पायावर अक्षरशः लोटांगण घालायची तेव्हा कुठे माई आम्हाला क्षमा करायची. हा नाटय़प्रयोग अधून मधून व्हायचाच.’
‘लहानपणी माई आम्हाला जेवण्याच्या वेळेला कोणाकडे जाऊ द्यायची नाही.’ लता म्हणाली, ‘यांची परिस्थिती वाईट आहे. म्हणून आले जेवणाची वेळ साधून, असं कोणी म्हणू नये म्हणून!’ लताच्या डोळय़ांच्या कडा ओल्या झाल्या होत्या.
लता आताशा सहसा घराबाहेर पडत नाही. (भगिनी मीना खडीकरनं तिच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनालाही ती गेली नव्हती.) तिला गरज काय बाहेर पडण्याची? प्रत्येक संगीतप्रेमींच्या मनात तिनं घर केलंय. या न्यायानं हिंदुस्थानात आणि बाहेर जगभरही तिचे किती फ्लॅटस् – आय मीन, घरं हो- झाली सांगा. सिकंदर तलवारीच्या बळावर व खूनखराबा करून जगज्जेता झाला होता. लता गळय़ाच्या बळावर व रसिकांच्या हृदयाला हात घालून जगज्जेती झाली. कोण मोठं? तिचा आवाज व तिची गाणी ही आमच्यासारख्या असंख्य पामरांच्या ‘जीने का बहाना’ आहे. तिनं रडवलंय व डोळेही पुसलेयत.
लता दीनानाथ मंगेशकर आज रोजी नव्वद पूर्ण झाली. तरीही आपण तिचा उल्लेख अरे-तुरेनंच करतो. आवाजाला काय माणसासारखं वय असतं? परमेश्वराच्या अस्तित्वाचा साक्षात्कार घडवणारा स्वर असा दिवसांच्या, महिन्याच्या आणि वर्षांच्या हिशेबात मोजायचा असतो? उद्या आईची माया किलोत मोजाल. पतिव्रतेची किंमत तिच्या गळय़ातील काळय़ा पोतीच्या दामावरून कराल. काळजातलं दुःख सेंटीमीटरमध्ये मोजाल. अश्रूंचं मोल लिटरच्या भावात कराल..?

मला नेहमी असं वाटत आलंय की, तिचा स्वर कानी पडत असताना माझा शेवटचा दिस गोड व्हावा. त्या वेळेला तीन-जास्त नाही, फक्त तीन-गाणी माझ्या कानावर पडावीत- विनोदचं ‘वफा’मधलं ‘कागा रे’, सज्जादचं ‘खेल’मधलं ‘जाते हो तो जाओ’ आणि श्यामसुंदरचं ‘आलिफ लैला’मधलं ‘बहार आयी खिली कलिया’! त्यानंतरही माझ्याकडे मिनिट-दोन मिनिट शिल्लक असेल तर तेवढं सी. रामचंद्रचं ‘शिनशिनाकी बुबलाबू’मधलं ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोये’ लावा प्लीज…

लता आणि आशाचे मनोहर किस्से
लता आणि आशाचे काही मनोहर किस्से आहेत. त्यात दोन महान गायिका बोलत नसून दोन जिवाभावाच्या बहिणी बोलताहेत हे ध्यानात असू द्या. आशाची ‘माधुरी’ या हिंदी सिने-पाक्षिकात मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यात तिनं म्हटलं होतं की आमची दीदी कधी कोणाला काही प्रेझेंट दिलं तर ते कदापि विसरत नाही. नेव्हर. त्यानंतर आशा एकदा लतानं दिलेली साडी नेसली होती. लतानं चष्मा खाली करून तिच्याकडे पाहिलं, पण ती काहीच बोलली नाही.
‘दीदी, तूच दिलेली साडी आहे.’ आशा म्हणाली.
‘मला वाटलंच होतं. पण मी बोलले नाही, कारण तू मुलाखतीत सांगतेस.’ लता म्हणाली.
एकदा दोघी बहिणी एक द्वंद्वगीत गात होत्या. लता आशाच्या कानाशी लागून म्हणाली, ‘आशा, अर्धा सूर कमी लागलाय.’
‘मरू दे गं’ आशा म्हणाली, ‘त्या संगीतकाराचीही काही हरकत नाही. तू कशाला खुसपट काढतेस?’
‘तसं नाही,’ लता म्हणाली, ‘चकाकतं ते सगळं सोनं नसतं.’
एकदा लतानं आशाला अकस्मात विचारलं, ‘तू काय स्टेजवरून गाताना नाचतेस?’
‘‘नाही गं.’’ आशा चिवचिवली, ‘मी कसली नाचत्येय? उगीच जरा पाय थिरकवते.’
‘त्यालाच नाचणं म्हणतात.’ लता थंडपणे म्हणाली.
आशा लतासंदर्भात म्हणाली होती, ‘आम्ही दोघी दोन डोळय़ांसारख्या आहोत. जर एका डोळय़ात काही गेलं तर दुसऱयात पाणी येतं.’
एच. एम. व्ही.नं लताची साठी साजरी केली. आशानं मुळात भाषणासाठी नाव दिलं नव्हतं. पण ती आर. डी.सह आली व तिनं उत्स्फूर्त भाषण केलं. ती म्हणाली, ‘आजही माझ्या डोळय़ांपुढून ते चित्र हलत नाही. तिच्यापेक्षा मोठा असलेला तंबोरा घेऊन तिच्याच लांबसडक केसांवर बसून दीदी रियाज करत्येय. देवळाच्या गाभाऱ्यातील घंटानादासारखा तिचा स्वर माझ्या कानात घुमतोय…’ मी लताला भारावलेलं पाहिलं.
आशाला लताची नक्कल करायला सांगा. आधी ती पदर अंगभर लपेटून घेईल आणि मग सुरू. तिला दाद देण्यावाचून गत्यंतर नसतं. लताही नकलाकार आहे. एका संगीतकाराची (नावात काय आहे?) तिनं केलेली अफलातून नक्कल मी पाहिली आहे. कधी कधी मनात येतं की दोघींनी ‘लता-आशा मिमिक्री नाईट’ करायला हरकत नाही.

काही क्षणचित्रे
‘अनपढ’मधली ‘आपकी नजरों ने समजा’ ही गझल रेकॉर्ड केल्यावर मदन मोहन लताला मिठी मारून ढसढसा रडला होता. त्याचं सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर पडत होतं.
लताबरोबरचं भांडण मिटल्यानंतर रफी उत्साहानं म्हणाला होता, ‘अब गाने में मजा आयेगा.’
‘नूरजहाँन हिंदुस्थानात राहिली असती तर लताला काही फरक पडला नसता. पण नूरजहाँनचं मात्र कठीण झालं असतं,’ असं तलत महेमूद पाकिस्तानात म्हणाला होता.
अमूक एक गाणं संध्या मुखर्जीकडून गाऊन घेतलं होतं का, असं विचारल्यावर विक्षिप्त संगीतकार सज्जाद हुसेन म्हणाला होता- ‘हम किसी संध्या या सुबह को नहीं जानते. हम सिर्फ लतासे गवा लेते है.’ तो लताचा उल्लेख प्रेमानं ‘मेरी काली कोयल’ असा करायचा.
‘रफी, किशोर, मन्ना डे वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर राज्य करतील. लता कोणाच्या लक्षात राहणार आहे?’ इति. शारदा ‘स्टारडस्ट’ मासिकात.

‘लता ही एकच गायिका अशी आहे की जिचा अर्धा सूरही कमीजास्त होत नाही’
– पुण्यातील सत्कारात ओ. पी. नय्यर

‘लता मंगेशकरला एवढी मोठी गायिका का मानतात माहित्येय? माझ्यासारख्या बेसुऱया गायकाबरोबरही ती सुरात गाते’
– मुकेश

कंबख्त कभी बेसुरीही नही होती
बडे गुलाम अली खाँ

shireesh.kanekar@gmail.com

*****************

पेडर रोडवर ‘प्रभुकुंज’वरून जाताना सहज वर नजर टाकायची इतक्या वर्षांची सवय आजपासून सोडावी लागणार.
‘देव नाही देव्हाऱयात’चा अर्थ आज कळला.

लताबद्दल वेळोवेळी कुणी काय म्हणून ठेवलंय वाचा-
सज्जाद हुसेनः लता गाती है, बाकी सब रोती है।
बडे गुलाम अली खान ः कंबख्त कभी बेसुरीही नहीं होती।
ओ. पी. नय्यर ः साली ऐसी आवाज तो सौ साल में नहीं होगी।
आशा भोसले ः देवानं एक परफेक्ट नरडं तयार केलं आणि मग तो साचाच मोडून टाकला. मग दुसरी लता मंगेशकर कशी तयार होणार?
नौशाद ः लता गायची व आमचा सारंगीवादक कादरबक्ष याला रडूच फुटायचं.
पु. ल. देशपांडे ः आकाशात चंद्र-सूर्य आहेत व खाली जमिनीवर लता मंगेशकर आहे.
मीना मंगेशकर ः आम्ही सगळी मास्टर दीनानाथांची मुलं. आम्ही सगळेच गातो, पण लता ती लता.
मदन मोहन ः लहानपणी ज्योतिषानं माझं सर्व भविष्य अचूक सांगितलं होतं, फक्त लता मंगेशकर नावाचा दैवी सूर तुझ्याकडे गाईल हे सांगितलं नव्हतं.
अनिल विश्वास ः लता मंगेशकर आली आणि आम्हा संगीतकारांना देवदूत आल्यासारखं वाटलं.
शिरीष कणेकर ः दीदी, तुझा आवाज साथीला व सांत्वनाला नसता तर कबके मर चुके होते.
…… भरत व्यासप्रभृती पितृतुल्य व्यक्तींनी रदबदली केल्यामुळे लता नाइलाजाने गायला तयार झाली. तिनं एक अट घातली. रेकॉर्डिंगला राज कपूरचं तोंड दिसता कामा नये. स्वतःच्या चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला राज कपूर स्टुडियोच्या बाहेर उभा होता. आत लता जीव ओतून गात होती – ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’. गाण्यात लाड नाहीत, उफराव गाणं उरकून टाकलं असं कदापि नाही.
ती हॉस्पिटलमध्ये जायच्या दोन-तीन दिवस आधीच आम्ही फोनवर यथेच्छ गप्पा मारल्या होत्या. फोन ठेवता ठेवता ती म्हणाली, ‘भरलं ना पोट? मिळाला ना भरपूर मसाला?’
ती मूर्तिमंत गाणं जगली. रडगाणं तिनं आसपास फिरकू दिलं नव्हतं. ती चोवीस तास नर्सेसच्या पहाऱयात होती, पण कधी प्रकृतीविषयी चकार शब्द काढला नाही. एकदा तिचा आवाज ठणठणीत झाला. तो ऐकून मी उत्साहाने म्हणालो, ‘आवाजावरून तब्येत चांगली वाटत्येय.’
‘आवाजाला काय धाड भरल्येय?’ लता जोशात म्हणाली.
‘दीदी, हे वाक्य तुम्ही बोलू शकता’ मी म्हणालो व दोघंही हसलो.

एकदा मी तिच्याशी फोनवर बोलत असताना बाजूचा दुसरा फोन वाजला. ‘दुसरा फोन येतोय वाटतं? घ्या, मी मग बोलीन’
‘अहो दीदी’, मी जेरीला येत म्हणालो, ‘तुमचा फोन बंद करून मी भाजीवाल्याचा फोन उचलला हे बाहेर कळलं तर लोक मला दगडांनी चेचून मारतील.’

लता खुदकन् हसली.

दोन-तीन दिवसांत माझा तिला फोन असायचा. सकाळी 11 ही वेळ ठरलेली होती. साधारणपणे तेव्हा तिची कुठली ट्रीटमेंट चालू नसायची. एकदा फोनवर मी तिला म्हणालो, ‘दीदी, खरं सांगतो, तुमच्याशी बोलताना टेन्शन येतं, दडपण येतं, भीती वाटते.’

‘आपण असं करूया’ लता समजावणीच्या सुरात म्हणाली, ‘मी तुम्हाला आधी सांगत जाईन की आज टेन्शन घ्या, आज नको, आज घाबरा, आज नको. कशी वाटते कल्पना?’

सर्व टेन्शन दूर होऊन मला हलकं वाटलं, हसू आलं. ब्याण्णवव्या वर्षी ही विनोदबुद्धी?
‘दीदी, तरुणपणी तुम्ही अशाच विनोदी होतात का हो?’

‘नाही नाही, भलतीच तापट होते. एक घाव दोन तुकडे करून टाकायचे. एका भांडणानंतर मी संतापून जयकिशनला ‘तुम झाडू हो’ असं म्हणाले होते. बिच्चारा. त्याच्या शेवटच्या आजारात कल्याणजीभाईचा फोन आला होता – ‘जयकिशनला हॉस्पिटलात भेटून या. तो खूपच जास्त आजारी आहे. मी धावले. त्याला कावीळ झाली होती. दारूने ती बळावली होती. अहो, रात्री जागा आली की आपण पाणी पितो ना, त्याप्रमाणे तो दारू प्यायचा……
‘कुठल्या नायिकेशी तुमचं सूत होतं?’ मी विचारलं.
‘मीना कुमारी.’ लता हरखून म्हणाली. ‘भारी स्वभावानं गोड होती. गीता दत्तशी माझी जिगरी दोस्ती होती. जुन्या काळची गायिका जोहराबाई अंबालावाले मला मुलीसारखी प्रेमाने वागवायची.’

‘महंमद रफी?’

‘रफीसाहेबांची एक गंमत सांगते. मला मेहंदी हसनच्या गजला भारी आवडायच्या. मी रेकॉर्डिंगला आले तरी मेहंदी हसनच्या गजला कायम गुणगुणत असायचे. एकदा मेहंदी हसन मुंबईत आला होता. त्याच सुमारास माझं रफीसाहेबांबरोबर एक द्वंद्वगीताचं रेकॉर्डिंग होतं.

रफीसाहेब मला म्हणाले, ‘आपके चहीते मेहदी हसन बंबई में पधारे है। मिल आइए उन्हे। आपको इतने पसंत जो है।’

लताला गंमत वाटली. हसू आलं. रफी चक्क जेलस झाला होता.

‘लेकीन आपको क्या प्रॉब्लेम है?’ लता हसू आवरत म्हणाली, ‘वो मुझे पसंत तो है। वैसे आप भी मुझे काफी पसंद है।’

मी बोलत असताना मागून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता.

‘कोणी आलंय?’

‘नाही, आमचा स्वयंपाकी. विचारतोय बिर्याणी करू का? आता कोण खाणार आहे बिर्याणी? मला बघायला येणारे डॉक्टर्स व वेढा घालून बसलेल्या नर्सेस यांनाच खिलवावी लागेल. मी खिचडीपुरती उरल्येय.’
आजारी बिछान्यावरून हा विनोद आला होता…….
‘दीदी, आपलं द्वंद्वगीत गाण्याचं राहून गेलं.’ मी वात्रटपणे म्हणालो.

‘हो ना!’ लता तत्परतेनं सहमत झाली, ‘आता मला पूर्वीसारखं गायला कितपत जमेल शंका आहे. तुम्ही संभाळून घ्याल ना?’

‘ऑफ कोर्स! सुनील गावसकरबरोबर फलंदाजी करताना मी त्याला नेहमीच ‘शील्ड’ करायचो. तुम्ही ऐन भरात होतात तेव्हाही मी तुम्हाला संभाळून घेतलं असतं.’

लता ठसका लागेपर्यंत हसली. डॉक्टरांनी तिचं मीठ बंद केलं होतं. हसायला तर बंदी नव्हती? ती फोनवरून माझ्या कानात ‘अलिफ लैला’मधलं ‘बहार आयी खिली कलिया’ गायली होती आणि माझ्या मनात आलं की, आमची लता नव्वदी पार केल्यावरही कोणाहीपेक्षा चांगली गाते.…..
पृथ्वीला पोरकं करून स्वर्ग आबाद करण्याची ही कसली दळभद्री देवकरणी?
माझी आई गेली तेव्हा मला काही कळत नव्हतं. आज माझी ‘गॉडमदर’ गेली तेव्हा मला काही कळून घ्यायचंच नव्हतं. तिची हजारो गाणी ती आपल्यासाठी मागे ठेवून गेल्येय. तिच्या अजर गाण्यांचे मधुघट माझ्या घरात व मनात ओसंडून वहातायत. अगदी मोजक्या लोकांना देव अमरत्व का देत नाही?
https://www.saamana.com/article-on-lata-mangeshkar-by-shireesh-kanekar/

******

कुणाची आठवण कुठल्या गाण्याने होते ?

लता मंगेशकर – तेरा जाना दिलके अरमानोंका मिट जाना
अभिनेते
राज कपूर – मेरा जूता है जापानी , मेरी पटलून इंग्लिस्तानी
देवानंद – मै जिंदगीका साथ निभाता चला
दिलीपकुमार – मधुबनमे राधिका नाचे रे
शम्मीकपूर – या हू – चाहे मुझे कोई जंगली कहे
शशीकपूर – एक था गुल और एक था बुलबुल
राजेश खन्ना – मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू
जोंनी वॉकर – जंगलमे एक मोर नाचा
मेहमूद – हम काले है तो क्या दिलवाले है
प्राण – सपने वादे प्यार वफा सब बाते है , बातोंका क्या –
राजेद्रकुमार – तेरी प्यारी प्यारी सूरतको किसीकी नजर ना लगे , चश्मे बद्दू
अभिनेत्री
मीनाकुमारी – रुक जा रात ठहर जारे चंदा –
वहिदा रहेमान – आज फिर जीनेकी तमन्ना है
वैजयंतीमाला – आ जा SS रे , परदेसी
नर्गिस – राजाकी आयेगी बारात , रंगीली होगी रात
मधुबाला – जब प्यार किया तो डरना क्या
बीना रॉय – ये जिदगी उसीकी है , जो किसीका हो गया
रीना रॉय – डफलीवाले , डफली बजा
नूतन – सुनो छोटीसी गुडियाकी लंबी कहानी
सायरा बानू – जा जा जा मेरे बचपन
साधना – नैना बरसे रिमझिम
अभिनेते – अभिनेत्री ( मराठी )
रमेश देव – सूर तेच छेडिता , गीत उमटले नवे
सुधीर फडके – स्वये श्रीराम प्रभू ऐकती
सीमा – नाचनाचुनी अति मी थकले
शंकर महादेवन – सूर निरागस हो
राजा परांजपे – एक धागा सुखाचा
संगीतकार
शंकर जयकिशन – ओ बसंती पवन पागल
रोशन – जो वादा किया वो निभाना पडेगा
हेमंतकुमार – तन डोले मेरा मन डोले
राहुलदेव बर्मन – ओ हसीना जुल्फोवाली
सचिनदेव बर्मन – होठोपे ऐसी बात
गायक
किशोरकुमार – जिंदगी एक सफर है सुहाना
महमद रफी – बहुत शुक्रिया , बडी मेहेरबानी
हेमंत कुमार – निशाना चूक ना जाये , जरा नजरोसे कहदोगी
मुकेश – सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी
मन्ना डे – लागा चुनरीमे दाग
गायिका
आशा भोसले – राधा कैसे न जले
सुमन कल्याणपूर – तुमने पुकारा और
परवीन सुलताना – हमे तुमसे प्यार कितना हम नही जानते
गीता दत्त – वक्त ने किया क्या हसी सितम
शमशाद बेगम – लेके पहला पहला प्यार
संगीतकारा
उषा खन्ना – छोडो कलकी बाते
अशा शेकडो गोष्टी आमच्या हृदयात कोरलेल्या आहेत .
कशाला पाहिजेत वेगळी स्मारके ?
अगदी आजची नवीन पिढी सुद्धा यातलीच शेकडो गाणी गुणगुणते – जोपर्यंत हिंदी / मराठी भाषा जिवंत आहे तोपर्यंत ही गाणी टिकणार आहेत .


श्याम केळकर

*****

06-02-2022

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची सर्वोत्तम गाणी याच नावाच्या कितीतरी याद्या मी पाहिल्या आहेत. कुठलीही यादी न पाहता फक्त स्मरणातून मला जी दहा गाणी चटकन आठवतात ती अशी आहेत.
१.आ जा रे परदेसी
२.ओ सजना बरखा बहार आयी
३. पिया तोसे नैना लागे रे
४. ऐ मेरे वतन के लोगो
५. कल्पवृक्ष कन्येसाठी
६. जरासी आहट होती है तो दिल सोचता है
७.लगजा गले के फिर ये हँसी रात ना हो
८. तेरा जाना, दिलके अरमानोंका
९. रेहते थे कभी जिनके दिलमे
१०. आपकी नजरोंने समझा

ही आणि अशी गाणी मी कितीही वेळा ऐकली तरी मी पुन्हा पुन्हा ऐकतच राहणार आहे. स्व.लतादीदींना साश्रु दंडवत आणि भावपूर्ण श्रद्धाजलि. ॐ शांति.

07/02/2022
काल सकाळी आम्ही सगळे न्याहारी करत असतांना अचानक ती दुःखद बातमी समजली. आम्ही लगेच टीव्ही लावून निरनिराळ्या चॅनेलवरच्या बातम्या पहायला लागलो. त्याच वेळी आपापल्या हातातल्या मोबाइलवर वॉट्सॅप आणि फेसबुकवरले संदेश पहायला लागलो. सगळीकडे शोककळा पसरली होती. प्रत्येकजण भावविव्हल होऊन हृदयद्रावक संदेश प्रसृत करत होता. लतादीदींच्या जाण्यामुळे देशाचे, जगाचे, सिनेजगताचे, संगीताच्या क्षेत्राचे किती अपरिमित नुकसान झाले आहे, कधीही न भरून येऊ शकणारी अशी पोकळी निर्माण झाली आहे, त्या नसल्या तरी त्यांच्या आठवणी चिरकाल येत राहणारच आहेत वगैरे वगैरे. हे ऐकत असतांना माझ्या शंकेखोर मनात काही शंका उठत होत्या. “त्यांची आठवण येणार नाही असा एक क्षण ही नसेल” असे म्हणणाऱ्याला विचारावे की तुला लताबाईंची कोणती गाणी आठवतात ते पटकन सांगशील का ? मग मी स्वतःलाच हा प्रश्न विचारला आणि आठवतील त्या गाण्यांचे मुखडे कीबोर्डवर टाइप करत राहिलो. दहा गाणी लिहिल्यानंतरही अनेक गाणी मी येऊ का असे विचारत ओठावर येत होती, त्यांना थांबवले. एकादी यादी समोर ठेऊन यातली तुझी आवडती दहा गाणी निवड असे मला कुणी सांगितले तर माझी पंचाईत झाली असती. कारण त्यांची संख्या खूप मोठी झाली असती आणि त्यांची एकमेकींशी तुलना तरी कशी करावी हे मलाच समजल नसते. म्हणून मी हे काम बुद्धीला न देता स्मरणशक्तीवर सोपवले.

या यादीकडे पाहिल्यावर हे जाणवते की ही सगळी गाणी पन्नास वर्षांहूनही जुनी आहेत. मग मला तीच गाणी का लगेच आठवली किंवा तीच गाणी माझ्या स्मरणात जास्त रुतून का बसली असतील? याचे एक कारण असे असणार की त्या काळातली लोकप्रिय गाणी ऐकण्याची मला तेंव्हा मनापासून आवड होती आणि दुसरे कारण म्हणजे त्यानंतरच्या पन्नास वर्षांमध्येही ती गाणी अनेक वेळा माझ्या कानावर पडली आहेत. गेल्या चारपाच वर्षांतली कुणाचीच गाणी मला सांगता येणार नाहीत कारण मी ती फारशी मनापासून कधी ऐकलीच नाहीत. हा माझा दोष आहे, की माझ्या वयाचा की बदलत जाणाऱ्या काळाचा ? कोण जाणे.

०८-०२-२०२२
एकादा खेळाडू धडाकेबाज खेळी करत सामने जिंकत असतो, एकादा नटश्रेष्ठ आपल्या अभिनयाने रंगभूमी किंवा चित्रपटसृष्टी गाजवत असतो, एकाद्या संगीत दिग्दर्शकाची किंवा गायकाची गाणी ज्याच्या त्याच्या ओठावर असतात, अशा वेळी त्याने अचानक एक्झिट घेतली तर त्याची उणीव सगळ्या रसिकांना तीव्रपणे जाणवते. पण बहुतेक कलावंतांच्या बाबतीत असे होते की वयोमानानुसार त्यांची शारीरिक क्षमता कमी होत जाते आणि ते पहिल्यासारख्या जोमाने काम करू शकत नाहीत. यामुळे निर्माण होत असलेली पोकळी ते स्वतःसुद्धा भरून काढू शकत नाहीत. हळूहळू त्यांच्याजागी नवे चेहेरे यायला लागतात. त्यातले काही त्यांचेच सहकलाकार किंवा प्रतिस्पर्धी असतात, काही त्यांचे शिष्य असतात, काही जणांनी एकलव्याप्रमाणे दुरून पाहून किंवा ऐकून त्यांचे अनुकरण केलेले असते, तर काही जण पूर्णपणे स्वतंत्र प्रज्ञेने पुढे आलेले असतात. काही वेळा लोकांची अभिरुचि बदलते आणि कलेचा तो प्रकारच तितकासा लोकप्रिय रहात नाही. हे सगळ्याच क्षेत्रात होत असते. अलीकडच्या काळात हे जग सोडून गेलेले रामदास कामत, रमेश देव आणि लतादीदी हे सगळे एका काळी आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर असलेले अत्यंत गुणी आणि लोकप्रिय कलाकार गेली किती तरी वर्षे नवनिर्मिति करत नव्हते. त्यामुळे त्यांच्या निघून जाण्यामुळे कुठली वेगळी पोकळी तयार झाली असे मला तरी वाटत नाही. पण तसे म्हणण्याची पद्धत आहे. या सर्व कलाकारांची उत्तमोत्तम निर्मिती इलेक्ट्रॉनिक्सच्या किमयेमुळे अमर झाली आहे आणि त्यांचे चहाते त्याचा आस्वाद पुढेही घेत रहाणारच आहेत.

०९-०२-२०२२
रामदास कामत रंगमंचावर नाटकातली गाणी गात असतांना मी प्रेक्षकात बसून त्यांना ५-६ वेळा पाहिले असेल आणि रमेश देव स्टेजवर असतांना फक्त एक दोन वेळा आणि तेही त्यावेळी नाटकातली पात्रे म्हणून. लतादीदींना दुरूनसुद्धा प्रत्यक्ष पाहण्याची संधी मला कधी मिळाली नाही. या तीघांनाही व्यक्ती म्हणून मुलाखत देतांना मी टी.व्ही.वर पाहिले आहे. माझी यातल्या कुणाशीच प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही किंवा मी कधी त्यांना एकादे पत्र पाठवले नाही. त्यांच्या कानावर माझे नाव जावे असे कुठलेच चांगले किंवा वाईट कृत्य माझ्याकडून घडले नाही. त्यामुळे त्यांनी ते कधी ऐकले असण्याची सुतराम शक्यता नाही. पण मला मात्र या सर्वांबद्दल मनातून एकतर्फीच खूप आपुलकी वाटत आली होती आणि पुढेही वाटत रहाणार आहे. लतादीदींची सुरेल गाणी ऐकणे हा तर माझ्या नित्य जीवनाचा भाग झाला होता. त्या पेडर रोडवर प्रभूकुंजमध्ये रहातात अशी ऐकीव माहिती होती, इतर दोघे कुठल्या गावात रहात होते हेसुद्धा मला माहीत नव्हते. गेली काही वर्षे त्यांची खबरबात ऐकली नव्हती. त्यामुळे आता हे लोक या जगात नाहीत म्हणून मला काही काळ वाईट वाटण्याशिवाय काय फरक पडणार आहे?
कवीवर्य भा.रा. तांबे यांनी लिहिलेल्या आणि लतादीदींनी गायल्यामुळे प्रसिद्ध झालेल्या गीतातच म्हंटले आहे, “जन पळभर म्हणतिल हाय हाय । मी जातां राहिल कार्य काय ?”


लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: