
अनेक वर्षे नेत्रदीपक अशी नाट्यदर्पणरजनी साजरी करणारे मराठी नाट्यसृष्टीमधली एक महत्वाची व्यक्ती असलेले असे माझे ज्येष्ठ आप्त श्री.सुधीर दामले यांचे आज देहावसान झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि. ईश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती प्रदान करो. ०८-०१-२०२२
मी दहा वर्षांपूर्वी त्यांच्यावर लिहिलेला एक लेख इथे.
http://anandghan.blogspot.com/2012/11/blog-post_30.html
आणि इथे https://anandghare2.wordpress.com/2016/08/18/%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a5%a7%e0%a5%a7-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80/
श्री.सुधीर दामले यांना अनेक लोकांनी श्रद्धांजली वाहिली. श्री.संजय पेठे यांच्या १४ विद्या ६४ कला या स्थळावरून मी काही हृद्य अशी मनोगते घेऊन या ठिकाणी संग्रहित केली आहेत. मी श्री.संजय पेठे यांचा आणि या लेखांच्या लेखकांचा सादर आभारी आहे.
*****
नाट्यअर्पण व्यक्तिमत्त्व!
‘नाट्यदर्पण’कार सुधीर दामले गेल्याचं कळलं आणि अनेक आठवणी जाग्या झाल्या. १९९३चा सप्टेंबर महिना असावा. त्या काळात मी ‘डीटीपी’ व्यवसायात नुकताच उतरलो होतो. साहित्य विषयाला वाहिलेल्या ‘वसंत’ मासिकाचं काम मिळवलं होतं. त्या अल्प अनुभवाच्या जोरावर नवीन कामं मिळवण्याचा धडाकाच लावला होता. त्या काळात बहुतेक सर्व प्रकाशक आणि दिवाळी अंकांच्या संपादकांशी मी संपर्क साधला होता. असाच एक दिवशी मी ‘नाट्यदर्पण’कार सुधीर दामलेंना फोन केला आणि त्यांनी मला भेटायला बोलावलं. गिरगावच्या ‘सेंट्रल प्लाझा’ थिएटरकडून उजव्या हाताला वळल्यानंतर तीन-चार मिनिटांवर दामलेंचं ऑफिस कम दुकान होतं. दुकानाच्या बाहेर ‘एन. के. प्रिंटर’ असा बोर्ड होता. बहुधा आतल्या भागात प्रिंटिंग प्रेस असावी. परंतु मला तरी ती कधी दिसली नाही.
दामलेंच्या ऑफिसमध्ये शिरल्यानंतर सर्वप्रथम मनावर बिंबलं ते त्यांचं आकर्षक व्यक्तिमत्त्व. गोरापान वर्ण आणि ताडमाड उंचीचे दामले फोनवर कोणाशी तरी बोलत होते. त्यांची खुर्चीदेखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी अशी होती. फोन ठेवला आणि खुर्चीवर रेलून ते बोलू लागले. मी त्यावेळी अगदी नवखा असल्यामुळे माझ्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. नाट्यविषयक घडामोडींशी संबंधित असलेला ‘नाट्यदर्पण’ हा दिवाळी अंक दामले तेव्हा प्रकाशित करीत असत. खरं तर त्या काळात गिरगावात बरेच डीटीपीचं काम करणारे होते. तरीदेखील त्यांना डावलून दामलेंनी आमच्यासारख्या नवख्या मुलांकडे (त्यावेळी माझ्यासोबत माधव पोंक्षे हा आतेभाऊदेखील होता) या अंकाचं काम सोपवलं होतं. १९९२ मध्ये ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच दिवाळी होती. ‘नाट्यदर्पण’चं काम तर घेतलं होतं. अवघ्या महिन्याभरात ‘वसंत’ आणि ‘नाट्यदर्पण’ या दोन दिवाळी अंकांचं काम आम्हाला करावं लागणार होतं. मात्र हे काम वेळेत झालं आणि सुधीर दामलेंशी चांगला सूर जुळला.
गिरगावात त्या काळात माझं सतत येणं-जाणं असायचं. त्यामुळे सुधीर दामलेंकडची चक्कर अगदी निश्चित असायची. लांबूनच त्यांच्या दुकानाकडे मी डोकावत असे. खुर्चीवर रेललेले भारदस्त दामले दिसले की माझी पावलं त्यांच्या ऑफिसकडे वळत. तेदेखील प्रत्येक वेळी आत्मियतेनं बोलत. या दिवाळी अंकानंतर काही महिन्यांनी त्यांनी नाट्योत्सवाचं आयोजन केलं होतं. एप्रिल १९९३ हा तो काळ असावा. मराठी रंगभूमीवरच्या वर्षभरातील सर्वोत्कृष्ट नाटकांचा तो महोत्सव होता. एकाच नाट्यगृहात नाट्यरसिकांना किमान आठ ते दहा नाटकं तीन दिवस पाहण्याची व्यवस्था होती. त्या वर्षी वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवासाठी लागणाऱ्या तिकीटांचं डीटीपी करण्याचं काम आम्ही केलं होतं. नाट्यमहोत्सवाच्या आदल्या दिवशी दामलेंना असाच भेटलो असता ते म्हणाले, ‘उद्या येतो आहेस ना नाट्यमहोत्सवाला?’
तेव्हा मी त्यांना म्हटलं, ‘माझ्याकडे तिकीट नाही…’
मी असं म्हणताच दामलेंनी आपल्या टेबलाचा ड्रॉवर उघडला आणि त्यामधून तब्बल चार पासेस काढले आणि ते माझ्या हाती सोपवत म्हणाले, ‘’तू तर येच. पण तुझ्या कुटुंबियांनाही यायला सांग…’’
साधारण तीस वर्षांपूर्वी पूर्ण नाट्योत्सवाचा तिकीट दर हजार रुपयांच्या घरात होता. त्यामुळे दामलेंकडून या कृतीची मला अजिबात अपेक्षा नव्हती. दुसऱ्या दिवशी नाट्योत्सवाला गेलो. नेहरू सेंटरसारख्या आलिशान थिएटरमध्ये अव्वल दर्जाची नाटकं पाहण्याचा आनंद काही वेगळाच होता. त्यापूर्वी काही मोजकीच नाटकं मी लांबच्या रांगेतून पाहिली होती. परंतु, दामलेंनी पुढच्या काही रांगांमधील पासेस दिल्यानं नाटकांचा खरा आनंद मला घेता आला होता. विनय आपटे, रमेश भाटकर… यासारख्या टॉपच्या अभिनेत्यांची नाटकं त्या महोत्सवात पाहिली. साधारण तीन दिवसांमध्ये सात ते आठ नाटकं पाहिली. सगळी नाटकं हाऊसफुल होती. प्रत्येक नाटक वेळेवर सुरू व्हायचं नि संपायचं. तेव्हापासून मग हळूहळू मला सुधीर दामले हे किती थोर व्यक्तिमत्त्व आहे, याची कल्पना यायला लागली. तेव्हापासून मग गिरगावात मी त्यांच्या ऑफिसमध्ये थोडा जास्तच रेंगाळायला लागलो. त्यांच्याबरोबरील चर्चेतून दरवेळी नवनवीन माहिती मिळायची. त्याच वर्षी ‘नाट्यदर्पण रजनी’चंदेखील दामलेंनी आयोजन केलं होतं. धोबी तलावाच्या रंगभवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या नाट्यदर्पण रजनीचेही पास दामलेंनी मला दिले होते.
नाट्यदर्पण रजनीची थोरवी तोपर्यंत मला समजली होती. ‘फिल्मफेअर’ मासिकाच्या तोडीचा तो सोहळा असायचा. अगदी पहाटेपर्यंत ही रजनी चालायची. संपूर्ण मराठी नाट्यसृष्टी या सोहळ्यास उपस्थित असायची. नामवंतांची मांदियाळी असूनही या रजनीला तेव्हा इव्हेंटचं स्वरूप नव्हतं. अनावश्यक त्याचं मार्केटिंग केलं गेलेलं नव्हतं. नाट्यसृष्टीचा तो छान असा घरगुती सोहळाच होता. ‘नाट्यदर्पण’ची संकल्पना अभिनेते गणेश सोळंकी यांची होती. परंतु, तिला मूर्त रूप दिलं ते सुधीर दामलेंनी. १९७५ मध्ये सुरू झालेल्या या रजनीची लोकप्रियता पुढे एवढी वाढली की केवळ मराठी नाट्य-चित्रपटसृष्टी नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवरदेखील त्यात सहभागी होत असत. पहिल्याच रजनीमध्ये डॉ. काशीनाथ घाणेकर, आशा काळे, मनोरमा वागळे, जयंत सावरकर, राजा मयेकर, संजीवनी बिडकर, रंजना देशमुख, शाहीर साबळे, गोविंदराव पटवर्धन, आशा खाडिलकर, अलका जोगळेकर, रामदास कामत यासारखी दिग्गज मंडळी सहभागी झाली होती. उत्तरोत्तर नामवंतांची ही यादी वाढतच राहिली आणि प्रत्येक कलाकाराचं या रजनीत आपली कला सादर करणं हे एक स्वप्न बनलं. नाट्यदर्पण रजनीचा दबदबा एवढा होता की त्या दिवशी मुंबईत नाट्यविषयक अन्य कोणताही कार्यक्रम आयोजित केला जात नसे. ही रजनी सर्वोत्कृष्ट होण्यामागे अर्थातच दामलेंचे कष्ट आणि कल्पकता होती. आपली टीम त्यांनी खूप छान बांधली होती. स्वतः निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता नसूनही कला क्षेत्रातील प्रत्येकाशी त्यांचे सौहार्दाचे संबंध होते. प्रत्येक जण त्यांना मान द्यायचा. या सगळ्या गोष्टी मला पाहता आल्या.
‘नाट्यदर्पण’चे पुढे दोन दिवाळी अंक मी केले. त्यानंतर मी पूर्णवेळ पत्रकारितेकडे वळल्यामुळे दामलेंसोबतच्या भेटी कमी झाल्या. पण एक भेट अगदी विलक्षण म्हणावी लागेल. त्यावेळी ‘नाट्यदर्पण’ पुरस्कारांची पत्रकार परिषद होत असे. कालांतरानं मी ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून काम करीत असल्यामुळे त्या परिषदेला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मला आलं होतं. दामलेंचं ऑफिस जिथं होतं तिथं वरच्या मजल्यावर ते राहत. अंधाऱ्या जिन्यावरून दामलेंच्या घरापर्यंत जाताना खूपच वेगळं वाटलं होतं. दोन-चार वर्षांपूर्वी दामलेंच्या दिवाळी अंकाचं काम पाहणारा मी एका नवीन भूमिकेमधून त्यांना भेटलो. दामलेंचं ते घरही उंची फर्निचर, आलिशान गालिचामुळे अगदी माझ्या लक्षात राहिलं. दामलेंचं माझ्या दृष्टीनं आणखी एक मोठेपण म्हणजे त्यांना कुठं थांबायचं हे अगदी नक्की कळलं होतं. म्हणूनच यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी बरोबर २५व्या वर्षी नाट्यदर्पण रजनीवर पडदा टाकला. खरं तर त्याचं कर्तृत्व आणि संपर्क एवढा मोठा होता की ते आजतागायत ही रजनी करू शकले असते. परंतु, त्यांनी तसं केलं नाही. आपण स्वतः निर्माण केलेल्या विश्वातून बाहेर पडण्याचं धाडस ते दाखवू शकले. नाट्यसृष्टीशी संबंधित असणाऱ्या कार्यक्रमांपासूनही ते दूर राहिले. ही खूप अवघड बाब आहे. मुंबईहून पुण्यात स्थलांतरीत झाल्यानंतरही त्यांना प्रकाशझोतात राहण्यासारखं एखादं दुसरं काम निश्चित करता आलं असतं. परंतु, तसं न करता त्यांनी ‘सुदर्शन’ नावाचा हौशी कलाकारांचा रंगमंच उभारला. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये आज जी पुण्यातील नव्या दमाची मुलं-मुली काम करताहेत, ती बहुतेक सगळी ‘सुदर्शन’शी जोडलेली आहेत. प्रायोगिक नाटकांची चळवळ म्हणून ‘सुदर्शन’चं स्वतःचं असं वेगळं स्थान आहे.
कधी कधी काही व्यक्ती तुम्हाला कितीदा भेटतात किंवा त्या किती काळ तुमच्या संपर्कात असतात, हे फारसं महत्त्वाचं नसतं. त्या व्यक्तींचा तुमच्या आयुष्यावरचा प्रभाव महत्त्वाचा असतो. दामलेंचं माझ्या आयुष्यातलं स्थान हे असं अनमोल आहे. दामलेंप्रमाणे कला क्षेत्राला वाहिलेलं ‘नाट्यदर्पण’सारखं मासिक आपणही काढावं ही मला कालांतरानं सुचलेली कल्पना ‘तारांगण’मुळे मूर्त रूपात आली. मात्र नाट्यदर्पण रजनीसारखं दर्जेदार तसेच संपूर्ण इंडस्ट्रीचा समावेश असलेलं आपण काहीतरी वेगळं करावं, ही कल्पना अजून तशीच अपूर्ण आहे. पण आजही कधी गिरगावात गेलो की माझं लक्ष आपोआप सुधीर दामलेंच्या ऑफिसकडे जातं. ते ऑफिस अजूनही आहे. परंतु, त्यात खुर्चीवर बसून फोनवर बोलणारे सुधीर दामले काही दिसत नाहीत. अर्थात दामलेंनी ‘नाट्यदर्पण’च्या रूपानं जे कार्य केलं, ते मात्र कधीही विसरण्यासारखं नाही. मोठी व्यक्ती जाते, पण तिचं कार्य लक्षात राहतं. सुधीर दामले त्यापैकी एक होते. त्यांना मनःपूर्वक आदरांजली…
मंदार जोशी



