माझे अभियांत्रिकी महाविद्यालयामधले (इंजिनियरिंग कॉलेजमधले) सहपाठी श्री.श्यामसुंदर केळकर हे निरनिराळ्या विषयांवर मुखपुस्तकावर (फेसबुकावर) स्फुट लेख लिहित असतात. अहिंसा – शाकाहार – मांसाहार या विषयावरील त्यांचे ११ स्फुट लेख मी या पानावर एकत्र दिले आहेत. हे लेख विचारांना चालना देणारे तसेच खूप माहितीपूर्ण आहेत. यात मांडलेली मते पूर्णपणे त्यांची आहेत आणि त्यांच्या मतांना कशाचा आधार आहे यांचे संदर्भ त्यांनी ठिकठिकाणी दिले आहेत. यावरील माझी मते / प्रतिसाद मी खाली दिले आहेत. . . . आनंद घारे
अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे १
( गुजरात मध्ये मांसाहारी दुकानांवर बंदी घालण्यात येत आहे . त्यावरून या विषयाचा एकूणच संक्षिप्त अभ्यास मांडण्याचा हेतू आहे . )
अहिंसा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात तीन नावे – गौतम बुद्ध , वर्धमान महावीर आणि महात्मा गांधी. खरे म्हणजे येशू ख्रिस्त यांचेही नाव यायला हरकत नाही त्यानीही हिंसेचे समर्थन केल्याचे ऐकिवात नाही किवा वाचनात नाही . ख्रिश्चन धर्माशी आपला जास्त परिचय नसल्यामुळे ते नाव डोळ्यासमोर येत नाही हे खरे.
हिंदू देवतांचे मात्र एकही नाव डोळ्यासमोर येत नाही . आपले सगळे देव शस्त्रधारी आहेत . नि:शस्त्र देव एकही नाही . देवतांची स्थिती तर त्याहून वाईट ! देव फक्त शस्त्रधारी असतात , देवता त्रिशूळ घेऊन कोणाला तरी मारत असतात आणि या देवताना अनेक पशू बळी दिले जात असतात . ( अपवाद फक्त सरस्वती आणि लक्ष्मी )
म्हणजेच आपले बहुतेक देव आणि देवता ह्या मांसाहार जास्त प्रचलित असलेल्या काळातील आहेत .
असे का बरे असावे ? येशू ख्रिस्त याना दोन हजार वर्षे लोटली , महावीर आणि बुद्ध याना २५०० वर्षे लोटली . पण विष्णूचा आठवा अवतार श्रीकृष्ण याना जाऊनच ५४०० वर्षे लोटली . श्रीराम याना जाऊन ९०००-१०००० वर्षे झाली असावीत . म्हणजे आपले देव हे जास्त जुने आहेत . परशुराम , वामन आणि नरसिंह तर त्याही पूर्वी. आपण अजून त्यानाच चिकटून आणि त्यांच्याच काळात वावरत आहोत . देवतांच्या काळाचा तर काहीच अंदाज करता येत नाही .
बुद्ध आणि महावीर यांचेनंतर ही खूप ज्ञानी पुरुष भारतात होऊन गेले . त्यातील एक प्रमुख नाव चक्रधर स्वामी. (११९४- १२६७ – साली त्यानी आपल्या पंथाची सुरुवात केली ) हे स्वत:ला द्वैत पंथी वैष्णव असे म्हणत आणि श्रीकृष्ण याना आपले दैवत मानत. यानी स्थापन केलेल्या पंथाला पुढे महानुभाव पंथ नाव मिळाले. हा पंथ शाकाहाराचा समर्थक असून मद्यपानाचा निषेध करतो . ह्यानी अहिंसेचा उपदेश केलेला आहे . ह्या पंथात दफनाची पद्धत आहे . नगर , बीड , परभणी अशा दुष्काळी भागात हा पंथ जन्माला आल्यामुळे असे असावे . चक्रधरस्वामी ह्यानी वैदिक परंपरेला नाकारून शूद्रांसह स्त्रियांना ही मोक्षाचा समान अधिकार आहे असे म्हटले आहे . त्याना महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक मानले जाते .
त्याना मराठीचे संस्थापकही मानले जाते . त्यांची शिष्या महदंबा ही मराठीतील पहिली कवयित्री मानली जाते . त्यानी रचलेले ” धवळे ” हे मराठीतील पहिले कवयित्री काव्य मानले जाते .
असाच दुसरा एक पंथ बिश्नोई पंथ . त्याविषयी पुढील भागात .
श्याम केळकर
अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे २
बिश्नोई पंथ .
सलमान खान चिंकारा प्रकरणामुळे हा पंथ लोकाना माहीत झाला . आजकाल पर्यावरण या विषयावर खूप बोलले जाते पण हा भारतातील किवा कदाचित जगातील पहिला पर्यावरणवादी पंथ म्हणावा लागेल . ह्या पंथाचे अनुयायी बहुतांशी राजस्थानमध्ये आहेत . या पंथाचे संस्थापक गुरु जंभेश्वर ( १४५१-१५३६ ) बिश्नोई याचा अर्थ वीस अधिक नऊ . यानी अनुयायांना २९ आज्ञा ( नियम ) घालून दिले होते . त्यापैकी सर्वात महत्त्वाचे दोन म्हणजे:-
१) जीवदया – कोणाही प्राण्यांची हत्या करावयाची नाही
आणि
२) कोणतेही हिरवे झाड तोडायचे नाही .
या पंथाचे आजही भारतात सुमारे १० लाख अनुयायी आहेत .
१७३० साली जोधपूरचे राजे अभयसिंग यानी खेजराली गावात झाडे तोडण्यासाठी कामगार पाठविले . (१२-९-१७३० , भाद्रपद शुद्ध दशमी) अमृतादेवी बिश्नोई या महिलेने झाडे तोडण्यास विरोध केला . तिचा शिरच्छेद करण्यात आला . तिच्यानंतर तिच्या तीनही मुली आणि नंतर अनेक – एकूण ३६३ माणसानी आपले प्राण गमवावे लागले . शेवटी राजाने माघार घेतली . ( जगातील तो पहिला मोठा अहिंसक सत्याग्रह असावा ) भाद्रपद शुद्ध दशमी हा दिवस अजूनही अमृतादेवी यांच्या स्मरणार्थ पाळला जातो .
१९७३ साली याच अंदोलनातून प्रेरणा घेऊन सुंदरलाल बहुगुणा यानी उत्तराखंड येथील चमोली गावात ” चिपको ” आंदोलन सुरू केले . Rain water Harvesting बद्दल आपण बोलतो इथे तेही केले जाते . प्राणी आणि पक्षी यांचेसाठी वेगळा साठा केला जातो . हरणाच्या आईचा मृत्यू झाल्यास या स्त्रिया पिल्लाला अंगावर दूधही पाजतात .
या पंथातही पार्थिव शरीर दफन करण्याची प्रथा आहे . वाळवंटी प्रदेश आहे .
( महानुभाव पंथ ७५० वर्षे ,बिष्णोई पंथ ५०० वर्षे टिकून आहे . प्रार्थना समाज , ब्राह्मो समाज , सत्य धर्म टिकले नाहीत . डॉ बाबा आढाव यांच्या दोन सभाना मी उपस्थित होतो. ते अजूनही सत्य धर्माची प्रार्थना सभेत म्हणतात . पण ते एकटेच .
ज्ञानी पुरुषानी स्थापन केलेले संप्रदाय मात्र शेकडो वर्षे टिकतात . जंभेश्वर यानी अशी काय जादू केली असेल की ३६३ माणसानी प्राण देण्यास मागेपुढे पाहिले नाही ? तेही मृत्यूनंतर १९४ वर्षानी ? )
श्याम केळकर
अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ३
जीवो जीवस्य जीवनम् – असे विष्णू शिरोडकर लिहितात (वाचकांच्या प्रतिसादांमध्ये). हे प्राण्यांसाठी खरे आहे . त्याना मन नसते किवा असलेच तर फार मर्यादित असते .
त्याना कर्ताभाव नसतो कोंबडी पकडताना मांजराला काही पाप करत आहोत अशी भावना नसते . आहार , निद्रा , भय आणि मैथुन या निसर्ग – प्रेरणा जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा त्यानुसार ते वागतात . म्हणून दादा भगवान यानी त्याना परमेश्वराचे आश्रित असे म्हटले आहे .
अमीबा ते मनुष्य प्राणी ही उत्क्रांती होत रहाते . अध्यात्मानुसार तोच आत्मा पुढे पुढे जातो . ( डार्विन च्या म्हणण्यानुसार उत्क्रांती होते . आत्म्याचा विषय नाही .) तोच आत्मा पुढे सरकतो कारण या पैकी कुठल्याही देहात कर्ता भाव नाही आणि त्यामुळे पाप – पुण्य , चांगले – वाईट , शुभ – अशुभ असे काहीच नाही . पुढे जात जात तो मानवी देह गाठतोच. पुढचा प्रवास ( जे मानतात त्यांचेसाठी ) मात्र आपोआप नाही तो आपणच निर्धारित करतो .
मांजर जसे कोंबडे पकडून चावून चावून खाते तसे आज स्वत:ला मांसाहारी म्हणणारे खाऊ शकतील ? कदाचित ९०००-१०००० वर्षांपूर्वी आपले पूर्वज तसे खातही असतील . अजूनही आदिवासी लोक काही ठिकाणी प्राणी पकडून खातात . डुकरे पकडून त्याना जिवंत भाजून खातात . ( पहा – फॅंड्री ) म्हणजेच आपल्याला आता आपण नैसर्गिकरीत्या १०० % मांसाहारी आहोत असे म्हणणे योग्य होणार नाही .
म्हणजे माणूस जसा जसा प्रगत होतो तसा तसा तो प्रत्यक्ष मांसाहाराकडून अप्रत्यक्ष मांसाहाराकडे वळतो. कोंबडा दुसऱ्या कोणीतरी मारावा , साफ करावा मग कदाचित पुढील गोष्टी ते करतील . अलीकडे कृत्रिम मांस निर्मितीचे प्रयोग चालू आहेत . असे मांस खाणाऱ्याना मांसाहारी म्हणायचे की नाही हा पुढेमागे चर्चेचा विषय होऊ शकेल .
मांसाहार ते शाकाहार हा प्रयोग हजारो वर्षे चालू आहे .
सत्य आणि अहिंसा इत्यादि दैवी गुणांचा विकास अनादि कालापासून होत आहे पुष्कळ विकास झाला आहे पण अजूनही विकासास पुष्कळ अवसर आहे जोपर्यंत आपल्याला सामाजिक शरीर आहे तोपर्यंत विकासास अनंत अवकाश आहे. वैयक्तिक विकास झाला तरी सामाजिक , राष्ट्रीय आणि जागतिक विकास रहातोच .
( शेवटचा परिच्छेद – गीता प्रवचने – विनोबा )
अहिंसेचा विकास कसाकसा होत गेला याविषयी विनोबांचे विचार पुढील भागात )
श्याम केळकर
अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ४
थोडेसे विषयांतर
शाकाहार मांसाहार विचार करण्यापूर्वी माणसामाणसांमधील हिंसाचार कमी व्हायला हवा . पण महासत्ता बनण्याच्या अट्टाहासापोटी तो वाढत चालला आहे .
काही दिवसांपूर्वी म्हणजे एक – दीड महिन्यापूर्वी आपण एक बातमी वाचली असेल . चीनने उपग्रहातून क्षेपणास्त्र डागण्याची यशस्वी चाचणी केली . निर्धारित लक्ष्य सुमारे ३५ किमी चुकले . पण या बातमीमुळे अमेरिकेसह युरोप आणि इस्रायल हादरले . या मुळे जगातील अस्तित्त्वात असलेल्या सर्व क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा कुचकामी होणार आहेत .
आणि कालच बातमी आहे की अमेरिका आता चंद्रावर अण्वस्त्र प्रकल्प उभारणार आहे . हा प्रकल्प पृथ्वीवरच उभा करून चंद्रावर पाठविला जाईल .
कदाचित हे चीनला उत्तर असेल . माहीत नाही .
१००० वर्षापूर्वीची युद्धे समोरासमोर होत . त्यासाठी समोरासमोरचा रक्तपात पाहावा लागतो . तो पाहून अंत:करणात करुणा जागी होते . आजकालच्या ह्या यंत्रणा हजारो किमी वरून हे करू शकतात . अशा परिस्थितीत माणसामाणसांमधील हिंसा दूर करणे हे खूप कठीण काम आहे .
कदाचित आपण प्राण्यांचे बाबतीत अधिक सहृदय झालो तर हे होईल का ?
श्याम केळकर
अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ५
आहार काय असावा याचा जैन धर्मात खूप विचार केलेला आहे . मी मागेच एका स्फुटात जैन धर्मात १४ आध्यात्मिक पायऱ्या मानलेल्या आहेत हे सांगितले होते . १४ वी पायरी ही तीर्थंकर ही आहे . वर्धमान महावीर ही आहे .
जैन धर्मात खाण्यापिण्याचे खूप कडक नियम आहेत . पण आपण आणि जैन मित्रानी हे लक्षात घेतले पाहिजे की हे नियम सर्वसाधारण लोकांसाठी नसून साधकांसाठी आहेत . ज्याना आध्यात्मिक दृष्टीने उच्च पायरी गाठायची आहे त्यांचे साठी त्या गोष्टी आहेत . पदवी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी आहेत . ते नियम सर्व साधारण लोकांसाठी नाहीत. ( संदर्भ – साध्वी वैभवश्री यांचे चरम मंगल या वाहिनीवरील प्रवचन )
अनेक जण विचारतात की पूर्वी ऋषी मुनी मांसाहार करत नव्हते का ? याचे उत्तर बहुधा हो असेच द्यावे लागेल . भवभूती कवीच्या उत्तर राम चरित्रात एक प्रसंग आहे . वाल्मीकी ऋषीन्च्या आश्रमात वसिष्ठ ऋषी आले असता त्यांच्या स्वागतासाठी एक लहान कालवड ( गायीचे स्त्री पिल्लू ) मारली गेली तेव्हा एक लहान मुलगा मोठ्या मुलाला विचारतो – “आज आपल्या आश्रमात तो दाढीवाला बाप आला आहे , त्याने आपली कालवड मटकावली हे खरे ना ?” ( भवभूतीचा काळ ८ वे शतक मानला जातो .)
तो मोठा मुलगा म्हणतो :- ” अरे ते वसिष्ठ ऋषी त्यांचेबद्दल असे बोलू नये . ” ( संदर्भ – गीता प्रवचने – १६ वा अध्याय )
हाच प्रसंग आचार्य अत्रे यानी आपल्या गुरु- दक्षिणा या लहान मुलांच्या नाटकात वापरला आहे .
पण आपण हे ध्यानात घ्यायला हवे की तो काळ सुमारे ९-१० हजार वर्षापूर्वीचा आहे . त्या काळी माणसाचा साराच उदरनिर्वाह पशूवरच होत होता . आपण गोमांस खात नाही म्हणून आपण वसिष्ठ ऋषीन्पेक्षा मोठे असे मानण्याचे कारण नाही .
पण ज्यांचा आध्यात्मिक विकास झाला त्याना हे अयोग्य वाटू लागले . म्हणून त्यानी मांसाहार करू नये असा प्रचार सुरू केला .
जैन धर्माचे २२ वे तीर्थंकर नेमीनाथ . हे श्रीकृष्ण यांचे सख्खे चुलत भाऊ . लग्नासाठी वधूकडे निघाले असता त्याना शेकडो पशूंची हत्या होताना दिसली . लग्नाच्या पाहुण्या मंडळींच्या खाण्यासाठी हे चालले होते . ते पाहून त्याना शिसारी आली आणि त्यानी तात्काळ दीक्षा घेण्याचा विचार केला . ( हा काळ सुमारे ५५०० वर्षांपूर्वीचा )
खाण्यापिण्याचे नियम स्थल – काळ – समूह सापेक्ष असतात . सर्वानी तेच स्वीकारावेत हे म्हणणे योग्य नाही .
क्रमश :
श्याम केळकर
( मी स्वत: कधी चिकन , मटण , मासे खाल्लेले नाहीत . अंडी मात्र खात असे . पण १९९५ साली साधू वासवानी दिवसाचे निमित्त साधून मी अंडी खाणेही बंद केले . शक्यतो मी केक खात नाही . पण अलीकडे केकचे प्रस्थ खूप वाढले आहे . चुकून केकमार्फत कधीतरी अंड्याचा अंश खाल्ला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही .)
अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ६
श्रीराम ते श्रीकृष्ण या काळात हळूहळू मांसाहार करू नये असे वाटणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली . जैन पंथाचे लोक वाढू लागले हेही कारण असू शकते . श्रीकृष्ण यानी गायींचे संवर्धन आणि पालन याला महत्त्व दिले. गायी पाळणारे ते गोप आणि गोपी . कदाचित याच काळानंतर गाय मारू नये, ती आपल्याला दूध देते , तिला मारू नये असा विचार वाढीस लागला असावा . ती गोमाता आहे असे याच काळापासून लोक मानू लागले आणि कमीतकमी गोमांस तरी खाऊ नये हा विचार खूप लोकात पसरला .
कृष्णानी गोवर्धन पर्वत उचलला ही रूपक कथा असू शकते . श्रीकृष्णानी गोवर्धन आणि गोरक्षा अशा दोनही बाजूनी गायींची संख्या वाढवण्यावर भर दिला . ( दादा भगवान – अहिंसा )
इतर प्राण्यानाही मारू नये असे बहुधा ब्राह्मण लोकाना वाटू लागले . पण अशी सक्ती इतर लोकांवर करणे शक्य नव्हते . मग त्यासाठी फक्त यज्ञात बळी दिलेले पशूच फक्त खावे , इतर नाही असे शिकविण्यात येऊ लागले . देवाला / देवीला बळी दिलेले पशूच फक्त खावे असे सांगण्यात येऊ लागले . यात दुतर्फा सोय होती . यज्ञ करणारे आणि मांसाहार करू इच्छिणारे . परिणामी यज्ञयाग वाढू लागले . देवाला बळी वाढू लागले . देवतांची संख्या वाढू लागली . यज्ञात बळी दिलेला प्राणी स्वर्गात जातो असे सांगणे सुरू झाले . अडाणी आणि अशिक्षित जनतेला ते खरे वाटे . ( संदर्भ – गीता प्रवचने )
( या संदर्भात कबीर यांची गोष्ट आहे . अशाच एका यज्ञात ते गेले . त्यानी विचारले :- या बोकडाचे तुम्ही काय करणार ?
ब्राह्मण म्हणाले :- त्याला बळी देणार . त्यामुळे त्याला स्वर्गप्राप्ती होईल . कबीर म्हणाले :- मग तुमच्या वडिलांनाच का बळी देत नाही ? ते म्हातारे आहेतच . त्याना स्वर्गात जाऊ दे .
मग कबीरांचे काय झाले असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता . ( संदर्भ – दादा भगवान – आप्तवाणी -२) )
मग गौतम बुद्ध आले . ते म्हणू लागले – कमीतकमी देवाच्या नावाने तरी हिंसा करू नका . देवाला बळी देणे थांबवा .
महावीर यांचा जैन पंथ आणि गौतम बुद्ध यांचे अनुयायी वाढू लागले . सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला . त्यानंतर बौद्ध धर्म जवळजवळ भारतभर पसरला .
त्यामुळे भारत हा जगातील शाकाहारी लोकांचे प्रमाण जास्त असणारा एक देश बनला .
बौद्ध आणि जैन धर्म का नष्ट झाला / केला गेला हा इतिहास काही फारसा स्पृहणीय नाही. पण तो इतिहास सांगणे हा वर्ण्य विषय नाही .
श्याम केळकर
अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ७
मांसाहार करणाऱ्या लोकांच्या अनेक शंका असतात . जैन धर्म यातील जास्तीतजास्त शंकांचे निरसन करतो . सर्वात सामान्य ( Common) शंका ही की सर्वच प्राणीमात्रात जीव असतो मग मांसाहाराला आक्षेप का ?
( ज्यांचा पारलौकिक धर्मावर विश्वास नाही त्यानी वाचले नाही तरी चालेल .)
जीवांचे पांच प्रकार आहेत :-
एकेंद्रिय जीव – याना फक्त स्पर्शेंद्रिय असते . ( यात वनस्पती आल्या . )
दोन इंद्रिय असलेले जीव – याना स्पर्श आणि चव अशी दोन इंद्रिये असतात .
तीन इंद्रिये असलेले जीव – याना वासाचे आणखी एक इंद्रिय असते .
चार इंद्रिये असलेले जीव – याना चक्षू ही असतात .
पांच इंद्रिये असलेले जीव – याना कान ही असतात
आणि
माणूस – पंचेंद्रिये असलेला आणि खूप विकसित मन असलेला .
मग साधकाचा सर्वात उत्तम आहार कोणता ? एकेंद्रिय जीवांचा . आहार घेतल्याशिवाय सुटका नाही आणि थोडीफार हिंसा अटळ आहे . एकेंद्रिय जीवच आपला सर्वोत्तम आहार आहे . एकेंद्रिय जीव हे त्रस जीव ( ज्याना त्रास / यातना होतो असे जीव ) नाहीत .
निर्जीव वस्तू खाऊ शकत नाही . म्हणून जीव असणारी वस्तूच खावी लागते .त्यानेच शरीराचे पोषण होते . जीव असतो अशा आहारातच जीवनसत्त्वे असतात . पण एकेंद्रिय जीवात रक्त , पू आणि मांस नाही . म्हणून हे जीव खाण्यात कमीतकमी हिंसा आहे .
त्या जीवानी तुम्हाला जगविले हे पुण्य त्यांच्या पदरात आपोआप पडते . त्यांची उर्ध्वगती होते . ते एकेंद्रियातून दोन इंद्रिये असलेल्या जीवात जातात . त्याचे पाप आपल्याला मिळते पण आपण पूर्ण दिवस जगलो आणि धर्माचरण केले म्हणून पुण्यही मिळते . पण पाप दहा रुपयांचे असेल आणि पुण्य १०० रुपयांचे असेल त्यामुळे एकूण तुम्हालाही फायदाच होतो .
सर्वात अहितकारक काय ? अर्थातच उलट .
माणूस खाणे सर्वात वाईट
मग पंचेंद्रिय जीव खाणे वाईट
मग चार इंद्रिये असलेले जीव
असे खाली खाली –
( संदर्भ – दादा भगवान – अहिंसा )
श्याम केळकर
अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ८
अंडे खाऊ शकतो की नाही ?
काही जण म्हणतात की अंडी दोन प्रकारची असतात सजीव आणि निर्जीव . सजीव अंडी खाऊ शकत नाही कारण त्यात जीव आहे . तो बेशुद्ध अवस्थेत आहे तरी पण तो जीवच आहे आणि ते फुटते तेव्हा त्यातून पंचेंद्रिय जीव बाहेर पडतो . निर्जीव अंडी खाऊ शकत नाही कारण आपण निर्जीव – जड काहीच खात नाही निर्जीव वस्तूत जीवनसत्त्वेच नसतात . त्यामुळे निर्जीव अंडे खाण्यात काहीच अर्थ नाही . ( आपण शक्यतो शिळे अन्न खात नाही . मांसाहार करणारेही शिळे मांस खात नाहीत . कारण ते निर्जीव असते .) म्हणजेच कोणत्याही प्रकारचे अंडे आपण खाऊ शकत नाही . ( दादा भगवान )
दूध पिऊ शकतो की नाही ?
दूध हे वासरासाठी असते , आपल्यासाठी नाही असे काही जण म्हणतात . पण हे जंगली प्राण्यांच्या बाबतीत बरोबर आहे . आपण गायीला / म्हशीला पाळतो . त्याना खूप खायला घालतो . त्यामुळे वासराला पाजून देखील त्या गायीकडे / म्हशीकडे खूप दूध शिल्लक असते असे दूध पिण्यास काही हरकत नाही . ( दादा भगवान )
मांसाहार कोणी घ्यावा ? ( कोणी घेणे अनुचित नाही .)
आहार शुद्धीचे जितके प्रयोग भारतात झाले तितके जगात कोठेही झालेले नाहीत . भारत हा एकमेव देश जगात आहे जिथे कित्येक जातीच्या जाती मांसाहार करत नाहीत . ज्या करतात त्यांच्याही आहारात मांस ही नित्य बाब नसते . काही जण श्रावणात , काही सोमवारी , शनिवारी आणि एकादशी , चतुर्थी अशा दिवशी मांसाशन करत नाहीत .
आपण जन्म घेतो त्याबरोबरच आपल्याला स्वधर्म मिळतो . ज्या आई बापांचे संस्कार घेऊन आपण जन्म घेतो तेव्हाच आपण आहारशुद्धीच्या एका टप्प्यावर आलेलो असतो . ही पूर्व पुण्याई घेऊन आपण पुढे जायला पाहिजे . पण हल्ली पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत चालला आहे . आपल्यातील जड श्रद्धा , अंधश्रद्धा ढासळल्या तर त्यात नुकसान नाही . पण एक अंध श्रद्धा जाऊन दुसरी येणे योग्य नाही . काही जणाना मांसाहार इष्ट वाटू लागला आहे .
( गीता प्रवचने – विनोबा )
ज्या व्यक्तीनी शाकाहारी कुटुंबात जन्म घेतला आहे त्यानी शाकाहार सोडणे योग्य नाही . मांसाहारी कुटुंबात जन्माला आला असाल तर मांसाहार करायला हरकत नाही . तुमच्या रक्तात मांसाहार आला नसेल तर तो करू नका .
बोकडाला , कोंबडीला काय आई वडील , मुलेबाळे नाहीत ?त्याना त्रास होत नसेल का ? तुम्हाला , तुमच्या मुलाबाळाना कोणी खाल्ले ( पूर्वी राक्षस खात असत असे आपण ऐकतो .) तर तुम्हाला त्रास होतो ना ? मग तुम्हाला प्राणी मारायचा अधिकार कोणी दिला ? ( दादा भगवान )
पाणी गाळून आणि उकळून प्यावे. पाण्यात अपकाय जीव असतात . त्यामुळे पोटात जीवाणू उत्पन्न होऊ नयेत म्हणून पाणी उकळून प्यावे असे सांगितले आहे . शरीर चांगले रहावे आणि ज्ञानावर आवरण येऊ नये म्हणून हे सांगितले आहे . ह्या पाण्यात आठ तासानी पुन्हा जीव उत्पन्न होऊ शकतात म्हणून दर आठ तासानी हे पाणी बदलावे असे जैन धर्मात सांगितले आहे . म्हणजे ही हिंसा मान्य केली आहे .
श्याम केळकर
अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ९
भाव हिंसा , भाव अहिंसा
आपण श्वास घेतो तेव्हा हवेद्वारे अनेक जीव नाकातून आत जातात आणि अनेक जीव श्वास सोडतो तेव्हा बाहेर पडतात . म्हणजे हिंसा अटळ आहे .
म्हणजे अहिंसेसाठी काय करायला हवे ? भावात अहिंसा असली पाहिजे . कोणत्याही जीवमात्राला माझ्या शरीराकडून , वाणीने आणि मनाने किंचित् मात्रही दु :ख दिले न जावो, न जावो , न जावो अशी प्रार्थना करावी आणि असे भाव बाळगावेत . ही झाली भाव – अहिंसा . प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी जमतीलच असे नाही . पण चूक झाली आणि समजली तर त्यासाठी माफी मागावी . ( आपण ज्या देवाला मानता त्याला स्मरून माफी मागावी नाहीतर गांभीर्याने माफी मागावी .)
कोणाही जीवाला मारण्याची , मानसिक आर्थिक त्रास देण्याची इच्छा म्हणजे भाव हिंसा . कोणावरही तू हे खाऊ नकोस , हे विकू नकोस ( जे विकणे कायद्याला धरून आहे ) अशी जबरदस्ती करणे म्हणजे हिंसा आणि असे करणाऱ्या आणि करविणाऱ्याला अनुमोदन देणे हीही हिंसाच . ( ऐसा करना , कराना और करवाना , इनका अनुमोदन करना ये सब हिंसामेही आयेगा l )
दुर्दैवाने महावीरांच्या अनुयायांना अहिंसेचा अर्थच कळला नाही . हिंसा करायची नाही म्हणून ते क्षत्रिय बनले नाहीत आणि त्याच कारणासाठी शेतीतही गेले नाहीत . सर्वच व्यापारात शिरले. व्यापारी म्हणून त्यानी जेवढी हिंसा केली तिला मर्यादाच नाही . ( सौजन्य – आचार्य रजनीश )
व्यापारी असल्यामुळे ते श्रीमंत आहेत, त्यांच्या हातात सत्ता आहे आणि त्या जोरावर जबरदस्तीने छोट्या छोट्या हातगाडीवाल्या व्यावसायिकांना त्रास देत आहेत . हे अयोग्य आहे आणि निषेधार्ह आहे . रोज सकाळी ऑमलेट किवा अंडा बुर्जी खाणाऱ्या आणि ती सुविधा देणाऱ्या लोकाना त्रास देणे योग्य नाही . शाकाहारी / मांसाहारी असणे , किती प्रमाणात असणे ही सर्वस्वी त्या व्यक्तीची निवड आहे . महात्मा गांधी गोहत्या विरोधी होते पण गोहत्याबंदी कायद्याच्या विरोधात होते .
काय योग्य काय अयोग्य हे माणसाच्या विवेकबुद्धीवर सोडायला हवे .
श्याम केळकर
अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे १०
जैन धर्म , बौद्ध धर्म यात अहिंसेला जसे महत्त्व दिले आहे तसे शैव / वैष्णव / वैदिक धर्मात नाही . तत्त्वम् असि , अयमात्मा ब्रह्म , सर्वम् खलु इदम् ब्रह्मम् , ईशावास्यम् इदम् सर्वम् अशी सुंदर सुंदर वचने आहेत पण ती फक्त वादविवादात वापरण्यासाठी .
कोणतीही व्यक्ती ही पूर्ण चांगली किंवा वाईट नसते असे आधुनिक मानसशास्त्र सांगते . ती बदलू शकते असे मानसशास्त्र सांगते .पण त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत .
अंगुलिमाल नावाचा एक खूनी दरोडेखोर होता . माणसाना मारून त्यांचे आंगठे तोडून त्यांची माळ तो गळ्यात घालत असे . तो रहायचा त्या जंगलात जाऊन नि:शस्त्र भगवान बुद्धानी आपल्या निर्भयतेने त्याला स्तिमित केले . त्याने बुद्धांचे शिष्यत्व पत्करले .
एका जंगलात एक अत्यंत विषारी साप रहात होता . तो भगवान महावीराना चावायला येताक्षणीच महावीरानी त्याला ” चंडकौशिक , आता तरी क्रोध सोड , शहाणा हो ” असे म्हटले . तो साप पूर्वजन्मात एक शीघ्रकोपी आचार्य होता आणि शिष्यांचा खूप छळ करी लहानसहान गोष्टींवरून त्याना कडक शिक्षा देई . महावीरांच्या हाकेसरशीच तो शांत झाला आणि त्याने प्राण सोडले .
अशा कथा हिंदू देव- देवतांच्या नाहीत . वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला ही कथा आहे पण ती नारदाच्या नावावर आहे . नारदाला आपण देव तर मानत नाहीच तर कळलाव्या असे म्हणतो . ( नारद हे आद्य कीर्तनकार होते असे म्हणतात आणि अजूनही त्यांच्या नावाने एक रिकामा पाट कीर्तनकार ठेवतात असे मी ऐकले आहे . मी लहानपणी २-३ कीर्तने ऐकली आहेत पण अशा दृष्टीने मी तेव्हा पाहिलेले नाही . )
दादा भगवान हे जन्माने वैष्णव , पण त्यांच्या शिकवणीत जैन धर्मावर जास्त भर आहे . महात्मा गांधी पण जन्माने वैष्णव पण त्यांच्यावरही जैन मताचाच प्रभाव आहे .
श्रीमत् राजचंद्र ( १८६७-१९०१ ) या नावाचे एक थोर ज्ञानी पुरुष गुजरातमध्ये होऊन गेले . फक्त ३४ वर्षांचे आयुष्य लाभूनही यांची योग्यता तीर्थंकरांच्या बरोबरीची मानली जाते . ( जैनात तीर्थंकर फक्त २४ असतात . काही जण राजचंद्र याना २५ वा तीर्थंकर मानतात . ) यानाच कृपाळू देव असेही म्हणतात . ( यांचे मूळ नाव रायचंद असे होते . महात्मा गांधींच्या आत्मचरित्रात त्याच नावाने उल्लेख आहे )
महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून आपण गोपाळ कृष्ण गोखले याना मानतो . पण गांधींच्या आध्यात्मिक विचारांवर श्रीमत् राजचंद्र यांचा खूप प्रभाव आहे . १८९१-१९०१ या काळात त्या दोघांचा नियमित पत्रव्यवहार असे . प्रत्यक्ष सहवास जास्त लाभला नाही कारण गांधींचे जास्त वास्तव्य या काळात भारताबाहेर होते . गांधी जरी गीता सतत जवळ बाळगीत तरी त्यांची अहिंसा आणि अहिंसात्मक सत्याग्रह ही कल्पना जैन प्रभावातून आली असावी . सत्याचा आग्रह जैन धर्माला मान्य नाही आणि अहिंसा हे शस्त्र म्हणूनही जैन धर्माला मान्य नाही .
पण नि:शस्त्र व्यक्तीने अन्यायाचा प्रतिकार कसा करायचा ? म्हणून जैन प्रभावातून दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीना ही कल्पना सुचली असावी . ( रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? , शठम् प्रति शाठ्यम् , जशास तसे ही विचारसरणी लोकाना आकर्षित करते . पण इंग्रजांविरुद्ध हे धोरण योग्य नाही हे महात्मा फुले लहूजी वस्ताद यांना आणि न्यायमूर्ती रानडे हे वासुदेव बळवंत फडके यांना सांगत होते . )
श्याम केळकर
अहिंसा – शाकाहार – मांसाहार – वगैरे ११ ( समारोप )
ज्ञानी लोकांच्या दृष्टिकोनातून हिंसा आणि अहिंसा
ज्ञानी लोकांतील कर्ता भाव लोप पावलेला असतो . त्यामुळे त्यांच्याकडून हिंसा होतच नाही . ते पाप – पुण्य , शुभ – अशुभ , चांगले – वाईट याच्या पलीकडे गेलेले असतात .
या जगात कोणीही मरत नाही आणि कोणीही मारू शकत नाही हे ते जाणून असतात . प्रत्येक जीवाची मरणवेळ येते तेव्हा भाव – हिंसा असलेली माणसे निमित्त होऊन त्याना मारतात . ( म्हणजे त्यांच्या देहाला मारतात . ) कर्ता भावामुळे त्याना पाप लागते . (म्हणून मारण्याचा पण अहंकार नसावा आणि वाचविण्याचा पण अहंकार नसावा .) पण ज्ञानींचे तसे नसते . त्याना कर्ता भाव नसतो . म्हणून ते पाप – पुण्य , शुभ – अशुभ, चांगले – वाईट आणि न्याय – अन्याय याच्या पलीकडे गेलेले असतात . ( दादा भगवान )
( पूर्वी मी लिहिले की मांजरही पाप – पुण्य, शुभ- अशुभ आणि चांगले वाईट असे काही करत नाही . त्याच्यातही कर्ता भाव नसतो . पण ते अज्ञानी आहे .)
येशूंचे एक वचन आहे की जे लहान मुलांसारखे असतील त्याना देवाच्या राज्यात प्रवेश मिळेल . येशूनी काय म्हटले आहे – लहान मुलांसारखे , लहान मुलाना असे नाही म्हटलेले – लहान मुले निष्पाप असतात ( आजकालच्या मुलांबाबत हे वाक्यही धाडसी वाटते .) ती निर्लेप असतात त्याना आपण सांगतो – खोटे बोलू नये . तो विचारतो – खोटे म्हणजे काय ? मग त्याला सांगतात :- जसे असेल तसे सांगावे . त्या मुलाची पंचाईत होते . म्हणजे जसे नसते तसे सांगावयाची पण रीत असते ? चौकोनाला चौकोन म्हण गोल म्हणू नकों . असे खोटे शिक्षण आपण त्याला देतो . ( विनोबा )
विषय विकार म्हणजे काय ते त्याना माहीतच नसते . म्हणजेच ते अज्ञानी असतात . उलट ज्ञानी हे विषय – विकाराना जिंकून पलीकडे गेलेले असतात आणि लहान मुलांसारखे झालेले असतात . ( रजनीश )
अशीच एक कथा आहे .कर्ता केवळ कृष्ण आहे या भावनेने कृष्णार्पण म्हणण्याची पद्धत आहे . एक बाई होती . काहीही केले की ती कृष्णार्पण म्हणायची . उष्ट्याला शेण लावून तो शेणगोळा तिने बाहेर फेकावा आणि लगेच कृष्णार्पण म्हणावे . लगेच तो शेणगोळा तिथून उठे आणि कृष्णाच्या मूर्तीवर जाऊन बसे . पुजारी मूर्ती साफ करून करून दमला . शेवटी कळले की हा सारा त्या बाईचा महिमा आहे . ती जिवंत असेपर्यंत असेच चालणार . ती आजारी पडली . मृत्यूघटिका जवळ आली . तिने मरणही कृष्णार्पण केले . त्याच क्षणी मंदिरातील मूर्तीचे तुकडे होऊन तिचे तुकडे खाली पडले तिला न्यायला विमान आले तेही तिने कृष्णार्पण केले . विमान देवळावर पडले आणि देऊळ कोसळले . (विनोबा – गीतादर्शन – अध्याय ९)
श्याम केळकर
माझ्या प्रतिक्रिया :
१. विठ्ठलासारखे पूर्णपणे निःशस्त्र देव आहेत. दत्तात्रेयाच्या सहा हातांपैकी काही हातांमध्ये शस्त्र दिसत असले तरी त्यांनी कुठल्याही अवतारात कोणा दुष्टाचा वध केल्याची कथा नाही. गीता आणि महाभारतात अनेक ठिकाणी अहिंसेचा पुरस्कार केला आहे. फक्त दुर्गा आणि कालीमातेने वेगळे अवतार घेऊन असुरांचे दमन केल्याच्या कथा आहेत. लक्ष्मी, सरस्वति आणि पार्वती या तीन्ही शांत देवता आहेत.
२. महाराष्ट्रातला वारकरी पंथ शाकाहार पाळतो. तोसुद्धा काही शतकांपासून चालत आला आहे.
३. सर्वसामान्य लोकांना आध्यात्मिक प्रगति वगैरे काही माहीत नसते किंवा त्यात रस नसतो. आपले वाडवडिल जे करत आले आहेत ते लहानपणापासून पहात असतात आणि तसेच करतात. काही विशिष्ट जातींच्या काही पिढ्यांपूर्वीच्या पूर्वजांनी अध्यात्माचा विचार केलाही असेल. काही पिढ्या त्यांचे अनुकरण करतात. त्यानंतरचे लोक स्वतंत्र विचार करून वेगळ्या मार्गाने जातात. तेही अध्यात्माचा विचार करत नाहीत. माझ्या लहानपणी गावातली किंवा ओळखीतली सर्व ब्राह्मण मुले शुद्ध शाकाहारी होती. आजची ब्राह्मण मुले सर्रास अभक्ष्यभक्षण करतात म्हणजे त्यांची आध्यात्मिक अधोगती झाली का? हवापाण्यापासून प्राण्यांच्या शरीराला पोषण मिळू शकत नाही. ते फक्त वनस्पतींनाच शक्य आहे. तसे पहायला गेल्यास वनस्पतीसुद्धा सजीवच असतात, पण त्यांनाही न खाल्ल्यास माणूस जीवंत कसा राहणार? मग एका प्रकारच्या सजीवांना खाणे आध्यात्मिक आणि दुसऱ्या प्रकारच्या सजीवांना खाणे वाईट असे का? व्हेगन लोक दूध किंवा दुग्धजन्य पदार्थसुध्दा खात नाहीत म्हणजे ते अधिक विकसित असतात का? मला वाटते हे वैयक्तिक पातळीवरच घडत किंवा ठरत असते. आजकाल सामाजिक बंधने शिथील झाली असल्यामुळे लोक जास्त मोकळेपणाने वागतात. त्यामुळे शाकाहार मागे पडत चालला आहे.
हिंसा करणे आणि मांसाहार यात थोडा फरक आहे असे मला वाटते. माझ्या ओळखीतल्या अनेक लोकांना मांसाहार वर्ज्य नाही, पण त्यातले कोणीही खाटिक नाहीत. ते स्वतः कुठल्याही पशूची हत्या करत नाहीत. त्यामुळे त्या पशूंना होणाऱ्या वेदना त्यांना दिसत नाहीत. सगळे शुद्ध शाकाहारी लोकही सहृदय असतातच असेही नाही. तेही अनेक जीवांना निरनिराळ्या प्रकारे निष्ठूरपणे पीडा देत असतात. ‘पाप – पुण्य , शुभ – अशुभ, चांगले – वाईट आणि न्याय – अन्याय याच्या पलीकडे गेलेले’ ‘ज्ञानी’ लोक ही एक निव्वळ कल्पना आहे, त्याचप्रमाणे गोष्टीतली ” कृष्णार्पण” म्हणणारी बाई ही भाकडकथा आहे. प्रत्यक्षात असे कोणी असत नाहीत. लहान म्हणजे भाषाही न शिकलेली मुले मनाने निष्पाप असतात कारण त्यावेळी त्यांना स्वार्थ नसतो. पण त्यांना बोलायला यायला लागले की मोठी माणसेच त्यांना खोटी आश्वासने देतात, खोट्या गोष्टी सांगतात ते ऐकून ती मुलेही लहान सहान थापा मारायला शिकतात. ती पूर्णपणे अहिंसक असतीलच असेही सांगता येत नाही. भाव हिंसा ही सुद्धा एक नैसर्गिक प्रवृत्ती (Instinct) आहे आणि ती स्वसंरक्षणासाठी सर्वांना उपजतच मिळालेली असते. सत्व, रज आणि तम हे गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये असतातच, त्यांच्या प्रमाणावर जमेल तेवढे नियंत्रण ठेवण्यामुळेच माणसामाणसात फरक पडतो. सर्वसाधारण माणसे त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या चार लोकांकडे पाहून तसे वागत असतात. धार्मिक वृत्तीचे आणि तत्वचिंतन वगैरे करणारे लोक अधिक सात्विक, अहिंसक वगैरे होण्याचा प्रयत्न करतात. दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना त्यातच मजा वाटत असेल तर ते जास्तच हिंसक होत जातात.