शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

काही व्यक्तिमत्वे ही अशी असतात की त्यांच्या नुसत्या स्मरणाने अंगावर आनंदाची कारंजी उडू लागतात. आयुष्यात जेव्हढे त्यांचे शब्द कानावर पडले त्या सर्वांचे प्रतिध्वनी कानात दाटीवाटीने ऐकू येतात. त्यातून जे सूर निर्माण होतात ते स्वर्गीय संगीत असते. त्या स्वर्गीय संगीतात हरवून जाण्याचे भाग्य सर्वांनाच मिळत नाही. असे मी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी ऐकले होते. त्यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास, केलेली गडकिल्ल्यांची भ्रमंति आणि ओघवत्या शैलीत केलेले त्यांचे वर्णन या सगळ्याबद्दल मी खूप वाचले होते. मला त्याचा आनंद घेण्याची संधी मिळाली नाही हे माझे दुर्दैव. मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो नसलो तरी टेलिव्हिजनवर अनेक वेळा पाहिले होते आणि त्यांचे बोल ऐकले होते. वयाची शंभरी गाठल्यानंतरही ते सुस्थितीत होते असे ऐकले होते. पण ती ओलांडण्यापूर्वी आज त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि. आज वॉट्सॅप आणि फेसबुकावर काही जणांनी दिलेल्या श्रद्धांजलि खाली देत आहे. दि.१५-११-२०२१. सर्व मूळ लेखकांचे मनापासून आभार.

वर्षातला सगळ्यात दुःखद क्षण
छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वर्गात दुःख झालं असेल. कारण आज त्यांचा एक मावळा असा मावळा, ज्यांनी छत्रपतीना आपल्या अत्यंत सुंदर अशा शाहीरी सारख्या लोककलेच्या माध्यमातून या आधुनिक जगात पुन्हा अवतरीत केला आपल्या समोर या जगासमोर सादर केला. आज त्या महान मावळ्याच म्हणजेच प्रसिद्ध शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे च आज वयाच्या १०० व्या वर्षी दुःखद निधन झालं. त्यांना स्वर्गात मानाचा मुजरा मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

आज आपण एका महान व्यक्तिमत्वाला मुकलोय. पुन्हा असा शिवशाहीर होणार नाही याची खंत मनाला लागून राहील. ते नेहमी म्हणत ‘ मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक जागेवर गेलोय जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा पावन स्पर्श झालाय. फक्त एक स्वर्ग तेवढा बाकी राहिलाय ‘. आणि आज त्यांनी स्वतःची ती इच्छा सुद्धा पूर्ण केली.

धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे बाबासाहेब पुरंदरे 🙏🙏🙏🚩

एक सुर्य मावळला …. मागे ठेवून असंख्य सूर्यकिरणांना ….. अतिशय दुःखद आणि वेदनादायक बातमी!
जाणता राजा या नाटकाच्या माध्यमातून, अथक संशोधनातून व परिश्रमांतून शिवचरित्र हे घरोघरी पोहोचवणारे शिवशाहिर पुजनीय बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन…
शिवरायांचा एक मावळा स्वर्गात शिवरायांची भेट घ्यायला निघाला…
आज पहाटे ५ वाजून ०७ मिनिटांनी प्राणज्योत मालवली.
भावपूर्ण श्रद्धांजली..!
वंदनीय शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

महाराष्ट्राच्या कणाकणात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचं स्फुल्लिंग मराठीजनांच्या मनामानात चेतवणारे , शाळकरी वयात वाचनाची गोडी निर्माण करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व शिवशाहीर वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांची आज पहाटे ५ वाजून ०७ मिनिटांनी प्राणज्योत मालवली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

🙏🌹🙏🌹🙏

वेचित क्षण आयुष्याचे
जीवन शिवमय झाले l
शिवरायांचे चरित्र गाता
जीवन शतायु झाले ll

पुण्यात्म्याच्या प्रस्थानाने
शिवसृष्टी हळहळली l
एकादशी तिथी जणू स्वतःला
धन्य मानती झाली ll

शिवरायांचाही परम आत्मा
असेल बहु हळहळला l
यमदूतही नेता शाहीरासी
असेल मनामधे रडला ll

थोरवी शिवरायांची ती
कोण आता गायील ? l
गड किल्ले अन् बुरूज दारे
मूक आता होतील ll

नाही वडा कधी नाही भोजन
ना शिवथाळी सजविली l
सच्चाईने पराक्रमाची
शिवकथाच रंगविली ll

नाही मावळे ना फुशारकी अन
नाही स्थापिली सेना l
सच्चा भाव शिवरायाप्रति
ढोंग कुठे दिसेना ll

खरा जाणला शिवबा त्यांनी
ना धरला सत्ताध्यास l
कळो जनांसी तोच शिवबा
हाच धरला ध्यास ll

मूक जाहले शब्दचि आता
कथा मूक झाल्या l
नयनकडाही शिवरायांच्या
असतील ओथंबल्या ll

आता न होणे असे शतायु
खरे शिवशाहीरsss l
“जाणत्या राजाच्या” नांवे
अवघा बाजारsss ll
🙏🙏🙏🙏🙏

(सहजस्फूर्त काव्य आहे.) संजय वि. रानडे, बोरीवली, मुंबई.

पु. ल. देशपांडे यांच्या “गणगोत” मधील बाबासाहेब पुरंदरे वरील लेख

मी त्या वेळी दिल्लीला सरकारी चाकरीत होतो. सुटीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला चार मराठी पुस्तके घ्यावीत म्हणून एका पुस्तकाच्या दुकानात शिरलो. केवळ योगायोगाने काउंटरवर पडलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड हाती पडला. साऱ्या महाराष्ट्रातल्या शुभदेवतांना केलेल्या सुरुवातीच्या आवाहनानेच मनावरची धूळ झटकली. “सुदिन सुवेळ मी शिवराजाच्या जन्माचं व्याख्यान मांडलंय-आई, तू ऐकायला ये” ही तुळजाईला घातलेली हाक जिवाला चेतवून गेली. त्या शिवचरित्रातला ‘उदो उदो अंबे’चा जागर म्हणजे महाराष्ट्राचा पाना- दोन पानांत उभारलेला सांस्कृतिक इतिहास आहे. बळवंत मोरेश्वर पुरंदरे नामक कोण्या इतिहासकाराने लिहिलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड वाचत मी काउंटरपाशीच खिळून राहिलो. ते दहाखंडी चरित्र विकत घेऊन मी निघालो. दिल्लीला पोचेपर्यंत अखंड चोवीस तासांच्या सफरीत ते दहाही खंड संपवले. आपण काही तरी अद््भुत अनुभवातून न्हाऊन बाहेर पडल्यासारखे वाटले. महाराष्ट्रात जन्माला आल्याच्या धन्यतेने मी फुलून निघालो होतो.

जगण्यासाठी महत्त्वाची गोष्ट मिळवावी लागते; ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन. पुरंदऱ्यांना हे प्रयोजन वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षीच गवसले. एका ड्रॉइंग मास्तराच्या बळवंत नावाच्या मुलाला शिवनेरीच्या शिवरायाने झपाटले. त्या झपाटल्या अवस्थेतच त्यांच्या जीवनाचा प्रवास चालू आहे, यापुढेही चालणार आहे. इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे; पण त्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधान करायचे नाहीत, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. उगीचच ‘शिवाजी’ म्हटल्यावर हाताचे आणि जिभेचे पट्टे फिरवणे नाही. त्यांच्या अंतःकरणातला कवी मोहोरबंद, गोंडेदार भाषा लिहितो; पण हातातला इतिहासाचा लगाम सुटत नाही, वर्तमानाच्या रिकिबीतून पाय निसटत नाही की नजर डळमळत नाही.

पुरंदरे इतिहासात सहजतेने डुबकी घेतात. माशाला पोहायची ऐट मिरवावी लागत नाही, तशी पुरंदऱ्यांना शिवभक्तीचा दर्शनी टिळा लावण्याची आवश्यकता भासत नाही. आणि म्हणून जाणत्या इतिहासकारांनी घालून दिलेले दंडक सांभाळून शिवचरित्र आणि त्या अनुषंगाने इतर इतिहासविषयक लिखाण सामान्यांपर्यंत अत्यंत सचित्र भाषेत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. इतिहास संशोधन हे शास्त्र आहे याची त्यांना पक्की जाणीव आहे आणि म्हणूनच हा तरुण मोकळ्या मनाने सांगतो, की “माझ्या रचनेतल्या चुका दाखवा. पुढल्या आवृत्तीत दुरुस्त करीन. इतिहास ही माझी एकट्याची मिरास नाही. ते साऱ्यांचं धन आहे. त्यात कुठं हीण आलं असेल तर ते पाखडून फेकून द्यायला हवं! इथं वैयक्तिक अहंकार गुंतवण्याचं कारण नाही.” त्यांच्या शिवचरित्राच्या खास आवृत्तीच्या प्रकाशनाच्या दिवशी ते म्हणाले होते, “शिवाजीला मी माणूस मानतो, अवतार नव्हे. आजवर ठपका द्यावा, असा ह्या माणसाविरुद्ध सबळ पुरावा आढळला नाही. आढळला तर न लपवता तो शिवचरित्रात घालीन.” आणि म्हणूनच पुरंदरे ऐतिहासिक घटनांविषयी बोलताना कोणत्याही नाटकी अभिनिवेशाने बोलत नाहीत.

पुरंदऱ्यांची तपशिलांवरची पकड भलतीच कडक आहे. स्मरणशक्ती विलक्षण. त्यांच्याशी बोलताना-म्हणजे ते बोलत असून आपण ऐकत असताना-इतिहास हा वर्तमानापासून तुटला आहे असे वाटतच नाही. अतिशय रंगतदार भाषेत बोलतानादेखील इतिहासकार म्हणून ते एक प्रसन्न अलिप्तपणा सांभाळू सकतात. आज इतकी वर्षे मी त्यांच्या तोंडून शिवचरित्रातले प्रसंग ऐकतो, पण कधी मुसलमान व्यक्तीचा मुसलमान म्हणून त्यांनी तुच्छतापूर्वक उल्लेख केलेला मला स्मरत नाही. परधर्मीयांची कुचेष्टा नाही. अवहेलना नाही. इतिहास ही वस्तू अनेक जण अनेक कारणांनी राबवतात. खुद्द शिवाजी महाराजांचे चित्र दुसऱ्या महायुद्धात रिक्रूटभरतीसाठी राबवले होते. “सोळा रुपये पगार, कपडालत्ता फुकट…शिवाजी न्यायासाठी लढला” हे पोस्टर अजून आठवते. काहींना इतिहासातले नाट्य रुचते. काहींचा रोख आजवर झालेले इतिहास संशोधन चुकीचे होते आणि आपलेच कसे खरे हे अट्टहासाने दाखवण्यावर असतो. इतिहासाचे काही भक्त तर सदा उन्मनी अवस्थेतच असल्यासारखे वागतात. उगीचच ‘रायगड रायगड’ करीत उड्या मारण्याने शिवरायांवरची आपली निष्ठा जाज्वल्य असल्याची लोकांची कल्पना होते, अशी यांची समजूत असावी; पण शिवाजी महाराजांच्यावर प्रेम असायला प्रत्येक किल्ल्याचा चढउतार केलाच पाहिजे, असे मानायचे कारण नाही.

दरवर्षी रायगडावर जाऊन डोळे गाळायचे ही शिवभक्ती नसून शिवभक्तीची जाहिरात आहे. आणि म्हणूनच गड-कोटांविषयी पुरंदरे बोलायला लागले की शिवाजी महाराजांच्या जीवनाचे मूळ सूत्र जो विवेक न गमावता ते रंगून बोलतात, म्हणून मला त्यांचे कौतुक अधिक वाटते. स्वतःच्या डोळ्यात आधीच लोटीभर पाणी आणून ऐतिहासिक कथा सांगण्याचा देखावा त्यांनी कधी केला नाही-ते करणारही नाहीत. कारण त्यांनी इतिहासाकडे “हरहर ! गेले ते दिवस!’’ असले उसासे टाकीत पाहिले नाही.

पुष्कळदा वाटते की, त्यांनी शिवचरित्र कसे लिहिले याचा इतिहास एकदा लिहावा. किती निराशा, कसले कसले अपमान, केवढी ओढग्रस्त! त्यातून पुरंदऱ्यांचे खानदान मोठे! वडील भावे स्कुलात ड्राॅइंग मास्तर. पर्वतीच्या पायथ्याशी पुरंदऱ्यांचा वाडाही आहे. भिक्षुकी, मास्तरकी हे व्यवसाय अफाट दैवी संपत्तीचे धनी करणारे. त्या धनातून मंडईतली मेथीची जुडीदेखील येत नसते. महागाईच्या खाईत भारत इतिहास संशोधक मंडळाकडून मिळणारे माहे पाऊणशे रुपये घेऊन पुरंदऱ्यांनी संसार सजवला. रुपयांचा अखंड शेकडा एकजिनसी न पाहिलेले ग. ह. खरे हे पुरंदऱ्यांचे गुरू. ऋषी हा शब्द फारच ढिलेपणाने वापरला जातो; पण ऋषी म्हणावे अशी खऱ्यांसारखी माणसे क्वचित आढळतात. खऱ्यांचे सहायक म्हणून पुरंदऱ्यांनी खूप वर्षे भारत इतिहास संशोधक मंडळात काम केले.

वर्तमानातून इतिहासात पुरंदरे अगदी सहजतेने डुबकी घेतात. हा माणूस किती शांतपणे माणसांच्या अंगावर रोमांच उभे करतो. कुठेही राणा भीमदेवी थाट नाही, अश्रुपात नाही, मुठी आवळणे नाही. त्या पूर्वदिव्यावर पडलेल्या कालवस्त्राला अलगद दूर करून पुरंदरे इतिहासाचे दर्शन घडवतात. त्यांना वक्तृत्वाची देणगी आहे. शब्दकळा तर अतिशय साजरी आहे. सूक्ष्म विनोदबुद्धी आहे. पण ही सारी लक्षणे मिरवीत येत नाहीत. भाषेच्या अंगातून अलगद ओसंडत असतात. कुठलीही ऐतिहासिक घटना पचवून ते लिहितात किंवा बोलतात. “मला अमुक एक ऐतिहासिक कथा ठाऊक नाही, किंवा निश्चित पुरावा नाही म्हणून मी मत देत नाही” हे सांगायची त्यांनी भीती वाटत नाही.

इतिहास हा आम्ही हातच्या कागदपत्रांइक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो. अशा वेळी शिवचरित्राच्या रूपाने त्या इतिहासाचे पाठ लोकमानसात नेऊन सोडणाऱ्या पुरंदऱ्यांचे खूप कौतुक व्हायला हवे होते. त्यांनी इतिहासकाराची पंडिती पगडी चढवली नाही. कुणाही पंडिताने धन्योद््गार काढावेत इतका अभ्यास केला आणि मांडला मात्र गद्यशाहिरासारखा. त्या चरित्राला ते आधारपूर्वक लिहिलेली बखर म्हणतात. इतिहास हा “माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळण्यापर्यंत गेला पाहिजे. इतकंच नव्हे, तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकी-सुना गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,” असे म्हणणारा हा इतिहासकार मला तरी आमच्या आजवरच्या भारतीय इतिहासकारांपेक्षा एक निराळी – लोकशाहीला अत्यंत पोषक भूमिका घेऊन उभा राहिलेला दिसतो.

वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षापासून आजतागायत आपल्या सुखाचे, स्वास्थ्याचे नव्हे, तर आयुष्याचे दान देऊन गोळा केलेले हे शिवचरित्राचे हे धन. एका मास्तरचा हा मुलगा शिवरायाचे चरित्र आठवीत आडरानातल्या वडपिंपळाखाली पालापाचोळ्याचे अंथरूण आणि दगडाची उशी करून झोपला. हल्ली रस्त्यारस्त्यातून जिल्हा परिषदेच्या जीपगाड्या धावताना आढळतात.

शिवाजी महाराजांच्या पावलांच्या खुणा शोधत जाणाऱ्या पुरंदऱ्यांना कोण जीपगाडी देणार! पार्लमेंटात हात वर करण्यापुरते जागे असणाऱ्या सभासदांना आसेतुहिमाचल आगगाडीच्या पहिल्या वर्गाचा फुकट पास असतो. पुरंदरे कुठल्याशी गावी कागदपत्रं मिळायची शक्यता आहे, हे कळल्यावर थर्ड क्लासच्या खिडकीपाशी तिकिटासाठी रांग धरून उभे असतात !

निरनिराळ्या जागा धरून किंवा अडवून ठेवण्याच्या ह्या युगात उदात्त वेडाने झपाटलेली माणसे एकूणच कमी. बाराशे मावळे दीड लाख मोगली फौजेचा धुव्वा उडवीत होते. कारण ते बाराशे मावळे “हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा!” ह्या शिवाजीराजाने त्यांच्या कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले होते. कोणत्याही कार्याच्या सिद्धीला असा एखादा मंत्र लागतो; पण सिद्धीपेक्षा प्रसिद्धी मोठी, अशी भावना रुजायला लागते तेव्हा माणसांची बाहुली होतात. पुरंदरे शिवाजीचे चरित्र गाईन हा संकल्प सोडून जगताहेत. इतिहासाच्या त्या धुंदीत वावरणाऱ्या पुरंदऱ्यांना वर्तमान आणि भुताची चित्रे एकदम दिसतात. हे दिसणे भाग्याचे ! ही भाग्याची वेडे !

– पु. ल. देशपांडे

*********************

अत्यन्त सुंदर शब्दांकन असलेली ही पोस्ट मराठी मनावरचा एक अत्यावश्यक संस्कार म्हणून प्रत्येकाने वाचावी
👇🏼
‘‘तृप्त मी शिवशक्तीच्या गानात झालो शारदे’’
II बाबासाहेब पुरंदरे II

‘‘वडिलांनी माझं मन जाणलं आणि ते मला निरनिराळ्या किल्ल्यांवर घेऊन जाऊ लागले. त्या किल्ल्यांवरच्या मातीशी माझं असं माझ्याही नकळत नातं जोडलं जाऊ लागलं. मी अगदी लहान आठदहा वर्षांचा असेन. पण आईच्या कुशीचं आणि मातीच्या स्पर्शाचं भान येण्यासाठी वयाच्या जाणतेपणाची गरज नसतेच मुळी. ती ओढ जन्मजातच असावी.. असतेच! आज वयाच्या ९७ व्या वर्षीही तो दिवस मला आठवतोय. वडिलांनी, मामासाहेबांनीच मला त्या इतिहासात नेऊन सोडलं.. मी अजूनही तिथेच आहे फक्त मामासाहेबांचं बोट सुटलं.. त्यांनी मला ‘बाबासाहेब, इथं असं असं घडलं’ असं त्यांच्या आवाजात सांगितलेलं आठवतं, अजूनही तो आवाज ऐकू येतो आणि त्या आठवणी गडाच्या एकेका तटाकोटासारख्या मनात रुतून बसतात.. इतिहास माझ्यासाठी केवळ कथेचा विषय न राहता तो व्यथा जागी करणारा विषय ठरला आहे.’’

एक सांगू का? माझं श्रेयस-प्रेयस किंबहुना आयुष्यातलं जे काही असेल ते फक्त आणि फक्त पाच अक्षरात सामावलेलं आहे, ते आपण ओळखलं असेलच.. ते म्हणजे ‘शिवचरित्र’! आयुष्यातून शिवचरित्र वजा केलं तर.. तर झालो असतो एखादा अगदी सामान्य आणि समाजाच्या फारसा उपयोगाचा नसलेला माणूस.. माझ्या जीवनातील साफल्याचे श्रेय शिवचरित्रालाच आहे!
आजवरच्या आयुष्यात मी जे काही करू शकलो, त्याबद्दल विधात्याशी कृतज्ञ आहे. तृप्त आहे. समाधानी आहे. मी एक हजाराहूनही अधिक पौर्णिमेचे चंद्र पाहिले पण याचा अर्थ मी एक हजाराहूनही अधिक अमावास्या, ग्रहणं पाहिली असाही होतो नाही का? आणि त्या पौर्णिमा, अमावास्या, ग्रहणं सगळं काही माझ्या लक्षात राहिलं आहे. आजवर आयुष्यात माझ्या कामाची दखल घेणारी, कामाविषयी कौतुक असणारी, विचारपूस करणारी आणि कामात रस घेणारी माणसं भेटली आणि त्यांच्यामुळे जीवनप्रवास सुखकर होत गेला. अर्थात, या प्रवासात याउलट वागणारी काही माणसंही भेटली. पण त्यांची संख्या अत्यल्प आहे आणि सुख देणाऱ्यांची संख्या खूपच जास्त आहे. तरीही त्रास देणाऱ्यांविषयी मनात राग वा तक्रार नाही.

मी केव्हा बोलायला लागलो आणि पहिलं अक्षर मी कोणतं उच्चारलं ते मला माहीत नाही. कुणी सांगितल्याचं आठवत नाही! पण ज्यांनी मला बोलायला शिकवलं त्यांच्याशी मी अतिशय कृतज्ञ आहे. माझे या क्षेत्रातील गुरू आहेत माझे वडील. माझ्यावर त्यांचा फार मोठा प्रभाव आहे. आम्ही त्यांना मामासाहेब म्हणत असू. ते उत्तम चित्रकार होते. सुमारे सहा फुटांहूनही अधिक उंची, धोतर, कोट त्यावर उपरणं. कपाळावर गंध. भरघोस मिशा आणि यापेक्षाही लक्षात राहील असा भारदस्त आवाज. त्यामुळे त्यांच्याशी बोलणारा सुरुवातीला दोन पावलं मागेच सरके. सांजवात झाली की देवापुढे परवचा म्हणायला बसायचं. तो म्हणून झाला की मामासाहेब गोष्टी सांगत. पुराणातल्या, इतिहासातल्या, त्यांचा आवाज खूप मोठा, त्यात चढ-उतारही भरपूर. शिवाय हावभाव, हातवारे करून ते गोष्टी सांगत त्यामुळे आम्ही त्यात अगदी रंगून जायचो. त्यांच्या तोंडून इतिहासातल्या गोष्टी ऐकता ऐकता माझ्या नजरेसमोर ते प्रसंग, त्या लढाया जणू प्रत्यक्ष घडत असल्याचं चित्र दिसू लागे आणि त्या गड-किल्ल्यांवर जाण्याची ओढ वाटू लागे. त्यांनी माझं मन जाणलं आणि ते मला निरनिराळ्या किल्ल्यांवर घेऊन जाऊ लागले. त्या किल्ल्यांवरच्या मातीशी माझं असं माझ्याही नकळत नातं जोडलं जाऊ लागलं. मी अगदी लहान आठदहा वर्षांचा असेन. पण आईच्या कुशीचं आणि मातीच्या स्पर्शाचं भान येण्यासाठी वयाच्या जाणतेपणाची गरज नसतेच मुळी. ती ओढ जन्मजातच असावी.. असतेच!

त्या काळात प्लेगची साथ आली आणि मग पुणेकर मंडळी सिंहगडाच्या पायथ्याशी वास्तव्याला आली. मला ती एका अर्थानं पर्वणी वाटली नसेल तर नवल. पहाटे उठल्यापासून सूर्य तेजात न्हाऊन निघत असलेला सिंहगड मला खुणावू लागला. मी तहानभूक विसरून त्याच्याकडे टक लावून पाहात बसे. मामासाहेबांनी एक दिवस मला गडावर नेलंच! त्यांचं बोटं धरून मी गडावर पोहोचलो. आज वयाच्या ९७ व्या वर्षीही (येत्या १५ ऑगस्टला तिथीनुसार माझा जन्मदिन) तो दिवस मला आठवतोय. त्यांनीच मला त्या इतिहासात नेऊन सोडलं.. मी अजूनही तिथेच आहे फक्त मामासाहेबांचं बोट सुटलं.. त्यांनी मला ‘बाबासाहेब, इथं असं असं घडलं’ असं त्यांच्या आवाजात सांगितलेलं आठवतं, अजूनही तो आवाज ऐकू येतो आणि त्या आठवणी गडाच्या एकेका तटाकोटासारख्या मनात रुतून बसतात. मला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की माझं एकही व्याख्यान त्यांनी ऐकलं नाही. तसा कधी त्या काळी योगच आला नाही.

मामासाहेब मला त्यांच्याबरोबर नाटक, चित्रपट पाहायला घेऊन जात. त्याकाळच्या ‘आर्यन चित्रमंदिरात’ मूक चित्रपट लागत. त्या नाटक, चित्रपटातील अभिनेत्यांच्या अभिनयाचा पगडा माझ्या मनावर बसला. आपणही नाटकातल्यासारखा अभिनय करावा, संवाद म्हणावेत असा एक नादच मला लागला. ‘अयोध्येचा राजा’ हा चित्रपट त्या वेळी नुकताच चित्रपटगृहात लागला होता. त्यामधील बाबुराव पेंढारकर यांच्या अभिनयानं मला झपाटून टाकलं. त्यानंतर ‘प्रभात’चा प्रत्येक चित्रपट पाहणं हा जणू घरातला कुळधर्म. कुळाचारच बनला! त्यातल्या त्यात ‘सिंहगड’ हा चित्रपट पाहिल्यावर तर पुढचे काही दिवस दुसरं काही सुचेनाच. सगळे संवाद, गाणी पाठ झाली होती. त्यातलं तानाजीचं काम तर मला फारच आवडलं होतं. मग माझ्या अंगात तानाजी संचारू लागे.

एकदा असाच मी एक चित्रपट पाहून आलो आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वाडय़ातल्या एका खोलीत कंदिलाच्या उजेडात- कारण त्यावेळी आमच्याकडे वीज नव्हती- अभिनय करायला सुरुवात केली. कंदिलाच्या प्रकाशामुळे माझी सावली भिंतीवर पडली होती. त्या सावलीकडे पाहात मी अभिनयाला सुरुवात केली. त्यात दंग असताना माझ्या सावलीशेजारी आणखी एक सावली हलताना दिसली. मी मागे वळून पाहिलं तर दारात वडील उभे. आता आपली धडगत नाही, आपली पाठ शेकणार म्हणून भिंतीला पाठ लावून भेदरलेल्या नजरेनं वडिलांकडे पाहात राहिलो. वडिलांनी गंभीरपणे पाहात मोठय़ा आवाजात विचारलं, ‘नट व्हायचंय? व्हा! पण केशवराव दात्यांसारखे व्हा!’ मी थरारलो, तसाच वाकून त्यांना नमस्कार केला.

माझी इतिहासाची आवड फुलवली आणि वाढवली भावे स्कूलमधील शिक्षकांनी. वर्तमानकालीन परिस्थितीशी तुलना करीत करीत ते शिकवीत. त्यामुळे इतिहास केवळ कथेचा विषय न राहता तो व्यथा जागी करणारा विषय ठरला. त्या लहानग्या वयात इतिहासावरचं माजगावकरसरांचं ‘भाष्य’ ऐकून मी अस्वस्थ होत असे. ते ऐकून अनेकदा मी वर्गात रडलो होतो. असे विद्यार्थ्यांना अस्वस्थ करणारे शिक्षक त्यावेळी होते. मला आणखी एक आवड होती, नाद होता- नकला करण्याचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांचीही मी अनेकदा करीत असे. एकदा शाळेत- स्नेहसंमेलनात ती नक्कल मी प्राचार्य नारळकर, प्रा. दबडघाव, श्री. म. माटे अशा मान्यवर मंडळींसमोर केली होती. त्यांचं भाषण मी म्हणून दाखवू लागलो. ‘‘वटवृक्षाचे बीज मोहरीहूनही लहान असते. पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, वलकले असतात ती वाढत वाढत तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात. उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.. मलाही एक वल्गना करू द्या! माझे गाणे मला गाऊ द्या! या जगात आपणाला जर हिंदुत्वाच्या मानाच्या राष्ट्रात सन्मानाने जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे. ते राष्ट्र वटवृक्षाप्रमाणे विस्तारायला हवेच. हिंदुध्वजाखाली ते स्थापन झाले पाहिजे. या नाही तर पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल. माझी ही वल्गना खोटी ठरली तर वेडा ठरेन मी! आणि माझी ही वल्गना खरी ठरली तर मी ‘प्राफेट’ ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!’’ नक्कल संपली. टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळ्यांनी खूप कौतुक केले. प्रा. नारळकरांनी तर माझे दोन्ही दंड धरून वर उचलले आणि म्हणाले, ‘‘शाब्बास, शाब्बास पुरंदरे.. फार छान नक्कल केलीस तू. भाषणही उत्तम केलेस. तू उत्तम वक्ता होशील.’’

पुढे एकदा तर सावरकरांची ही नक्कल मी साक्षात त्यांच्याच समोर केली. केवढं धाडस होतं ते! एकदा गायकवाड वाडय़ात स्वातंत्र्यवीर सावरकर उतरले होते. त्यांच्याबरोबर गोखले, गणपतराव नलावडे, म. तु. कुलकर्णी वगैरे मंडळीही होती. सावरकरांचं दर्शन घ्यावं म्हणून मी वाडय़ात गेलो. तेव्हा मला पाहून गणपतराव तात्यांना म्हणाले, ‘तात्या, हा मुलगा तुमची नक्कल फार उत्तम करतो, अगदी हुबेहूब!’ सावरकर किंचितसे हसले. म्हणाले, ‘‘असं!. कर बघू बाळ.’’ हाफ पँट, वर पांढरा सदरा, डोक्यावर टोपी अशा वेषात मी उभा राहिलो आणि जरा दबकतच सावरकरांची नक्कल त्यांच्यासमोर करायला सुरुवात केली. नंतर आवेशानं भाषण म्हणू लागलो. स्मितवदनाने तात्या ते ऐकत होते. आपलीच नक्कल पाहात होते. नक्कल संपली. मी तसाच उभा राहिलो. त्यांनी मला जवळ बोलावलं. पाठ थोपटून माझं कौतुक केलं. ‘‘फार उत्तम! उत्कृष्ट!! अगदी हुबेहूब!’’.. त्यांच्या त्या कौतुकोद्गारानं माझ्या अंगावर मूठभर मास चढलं. पण त्यांच्या पुढच्या शब्दांनी मनावरचं ओझं दूर झालं. मी एकदम सावध झालो; भानावर आलो. आजपर्यंत जी मी व्याख्यानं दिली. इतिहासाचा अभ्यास केला त्याचं श्रेय टाळ्यांच्या या शब्दांना द्यावं लागेल. ते म्हणाले, ‘नक्कल उत्तमच केलीस बाळ. पण आयुष्यभर केवळ नकलाच करू नकोस दुसऱ्यांच्या. स्वत:चं असं काही तरी निर्माण कर!’ त्या दिवसापासून मी नक्कल करण्याचं सोडून दिलं. सावरकरांबद्दलच्या आदरभावात वाढच झाली.

वक्तृत्व शिकण्याच्या दृष्टीने माझ्यावर सरस्वतीने कृपाच केली. वक्तृत्वाच्या बाबतीत सावरकरांच्या जवळपास फिरकू शकेल, असा दुसरा एकही वक्ता मी अद्याप पाहिलेला नाही. सावरकरांची वाणी म्हणजे केवळ उसळता लाव्हा. त्यांचं उभं राहणं, त्यांचे हावभाव, त्यांच्या डोळ्यांच्या, भिवयांच्या आणि मानेच्या हालचाली केवळ अनुपमेय! त्यांचा शब्दस्रोत म्हणजे आभाळातून अवतरणारा गंगौघ. छे! छे! त्याला उपमाच नाही. ते वक्तृत्व म्हणजे शिवतांडव! माझ्या मनावर सावरकरांच्या शब्दांचा आणि शैलीचा फार मोठा परिणाम झाला. त्यांच्या त्या शैलीनं संस्कार आणि शिकवण मला दिली.

याच काळात नारायण हरी ऊर्फ नाना पालकर यांनी मला अनेक गोष्टी सहजपणे शिकविल्या. ‘कशाकरता’ बोलायचं हे मला नानांकडून समजलं, उमजलं. मला जर नाना पालकर, विनायकराव आपटे आणि ताई आपटे यांचा सहवास लाभला नसता तर उत्तम वक्ता होऊनही मी दगडच राहिलो असतो. त्यांनी माझ्या जीवनाला अर्थ दिला. आत्मा दिला. कशाकरिता जगायचं आणि कसं जगायचं हे त्यांनी स्वत:च्याच जीवनाचा नकाशा माझ्यापुढे ठेवून मला शिकवलं.

नागपूरच्या राजाराम सीताराम ग्रंथालयात माझं पहिलं सार्वजनिक व्याख्यान झालं. नंतर भरतीच्या लाटेप्रमाणे एकापाठोपाठ एक व्याख्यानमाला होत गेल्या. नागपूरचे माझे मित्र क्रीडापटू शामराव सरवटे यांचे मला ऐरावताच्या बळाने साहाय्य झाले. विदर्भात माझे शेकडय़ाने कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांची बहुतांशी योजना माझे मित्र दि. भा. ल. ऊर्फ राजाभाऊ कुलकर्णी यांनी केली. शिवचरित्राच्या कामात राजाभाऊंचा निम्म्याहून मोठा वाटा आहे.

‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथ छापण्यासाठी पैसे आवश्यक होतेच. आमच्या आईसाहेबांनी, थोरल्या वहिनीसाहेबांनी आणि दाते आजींनी आपलं स्त्रीधन माझ्या हाती सोपवलं, आशीर्वाद दिले.. छे? त्यांचं ऋण फेडण्याचा उद्धटपणा मी करू शकलो नाही. मी पुण्याहून मुंबईला कोथिंबीर विकण्याचा अनुभव घेतला. पुस्तके विकली. त्यावेळी राजाभाऊ माझ्याबरोबर होताच. श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ‘राजहंस प्रकाशन’ सुरू केलं आणि या प्रकाशनातर्फे हा ग्रंथ प्रकाशित केला. त्या समाधानाच्या आठवणी अविस्मरणीयच!

या सर्वात आवर्जून श्रेयाचा मान द्यावा तो सातारच्या पुण्यशील माँसाहेब महाराज राजमाता सुमित्राराजे भोसले यांना. त्यांनी मला ‘शिवशाहीर’ संबोधलं! माँसाहेब महाराजांबद्दलच्या आदराला माझे शब्द अपुरे आहेत. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी आपल्य ‘मराठा’ या दैनिकातून आणि थोरल्या भावासारख्या असणाऱ्या पु. लं.नी सरकार दरबारी ‘राजा शिवछत्रपती’ची अशी भलावण केली की, त्यामुळे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष या शिवचरित्राकडे वळले. मुंबईच्या शिवाजी पार्कवर साकारलेल्या ‘शिवसृष्टी’चं यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे अशांसारख्या महानुभवांनी आणि असंख्यानी कौतुक केलं. कोणा कोणाची नावं घेऊ? ‘शिवकल्याण राजा’ या ध्वनिमुद्रिकेचं अतोनात स्वागत – कौतुक झालं, ते त्यातील प्रतिभावंतांच्या कवनांनी, बाळासाहेब मंगेशकरांच्या संगीतानं आणि आपल्या लतादीदींच्या स्वरांमुळे! ‘जाणता राजा’ या महानाटय़ासाठी मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि अनेक महान व्यक्ती तसेच देश-विदेशातल्या मानकऱ्यांचा, जाणकारांचा आणि रसिक श्रोतृवर्गाचा अपरंपार कृतज्ञ आहे.

या सर्वाना मी अंत:करणपूर्वक श्रेय देतो. पण ते देण्यासाठी शब्द कोणते वापरू?.. उमगत नाही, सूचत नाही.

मुंबईतील माझी पहिली व्याख्यानमाला विलेपाल्र्याला पु. ल. देशपांडे यांनी आयोजित केली. कोणत्याही बाबतीत त्यांनी मला मदत करायची शिल्लक ठेवलं नाही. या पती-पत्नींची माया.. मला ठरवलं त्यापेक्षा जास्त जगायच्या मोहात पाडते. मात्र एक खंत मनात आहे ती म्हणजे भाईंनी वेळोवेळी दिलेला सल्ला मनात असूनही मी पाळू शकलो नाही. व्याख्यानमालांतून मिळालेलं धन मी समाजकार्यासाठी सगळं वाटून टाकलं. भाई सांगायचे स्वत:साठी थोडा तरी भाग ठेवून दान करा आणि ते सांगणं अगदी योग्यच, काळजीपोटीचं होतं. पण मला ते तसं वागणं जमलं नाही हे खरं.

माझ्या आजवरच्या जीवनात खारट-तुरटही अनुभव आहे. पण चांगले अनुभव इतके प्रचंड आहेत की, खारट-तुरट प्रसंग अगदी नगण्यच! जनतेच्या प्रेमाने माझे मन अतिशय मोहरून गेले आहे. वास्तविक मी एक लहानसा विद्यार्थी आहे. इतिहास आणि त्यातही शिवशाहीचा इतिहास हा माझा विषय. हा इतिहास मी महाराष्ट्र रसात, महाराष्ट्राच्या कडेपठारांवर गात हिंडतो आहे.

इतिहास हा पाचवा वेद आहे. पण मी वेदांती नाही. मी विद्वान नाही. मी गोंधळी आहे. मी इतिहासकार नाही. अभ्यासपूर्वक इतिहास गाणारा मी एक शाहीर आहे. मी बखरकार आहे. इतिहासाचा अभ्यास मांडणे आणि इतिहासाचा उपयोग सांगणे ही या पाचव्या वेदाच्या वैदिकांची मुख्य कामे असतात. या इतिहासवेदाचा पथ्यपूर्वक आणि अभ्यासपूर्वक उपयोग करण्याचे व्रत घेतलेला मी एक कलावंत आहे. मला माझ्या व्रताची अतोनात आवड आहे, हौस आहे, अभिमान आहे.

मी या पुण्यात जन्मलो, रंगलो, खेळलो. सारे संस्कार पुण्यात घडले. किती तरी मोठी माणसं दोन हातांवरून पाहिली. त्यांची भाषणं ऐकली. कुणाची गाणी ऐकली. कुणाचे पोवाडे ऐकले, कुणाची कीर्तने ऐकली. गोंधळ-भारुडे ऐकली. कुणाची चिडणी-रागावणी आणि कुणाकुणाच्या अस्सल मराठी शिव्यासुद्धा मन लावून ऐकल्या. पूर्वीच्या ‘मिनव्‍‌र्हा टॉकीज’समोर अनेक वेळा वर्तुळाकार गर्दीत मांडी घालून बसून खास मंडईत गाणाऱ्या गोंधळ्यांचे पोवाडे ऐकले. भजने, लळिते, मेळे आणि लावण्या ऐकल्या. मी त्यात रंगलो तो रंग माझ्या अंत:करणावर पडला तो पक्काच जडला.

मी जर या मावळात लहानाचा मोठा झालो नसतो तर या अस्सल महाराष्ट्र रंगाला मी फार फार मुकलो असतो. पुण्याची पुण्याई मला लाभली. मी कुठे साती समुद्राच्या पार पोहून गेलो- आलो तरी माझ्या तनामनाला लागलेला खंडोबाचा भंडारा, भवानी आईचा मळवट, ज्ञानेश्वर- तुकारामांचा अबीरगुलाल आणि कसबा गणपती, मंडईच्या गणपतीचा अष्टगंध, गुलाल थोडासुद्धा धुतला जाणार नाही. सह्य़ाद्रीतल्या अणूरेणूशी मी कृतज्ञ आहे. शिवपूर्वकालापासून या सह्य़ाद्रीत कला आणि विद्या यांचा संचय होत आला. अनेक महान कार्याचे संकल्प येथेच सोडले गेले. अनेक यज्ञांच्या आहुती इथेच दिल्या गेल्या.

आमच्या पुरंदरे वाडय़ात थोर कीर्तनकारांची कीर्तने होत. मी अगदी पुढे बसून ती ऐकायचो. या कीर्तनकारांचा वेष, त्यांच्या लकबी, त्यांची लीन-तल्लीन वृत्ती, त्यांनी दिलेले दृष्टान्त, त्यांचे ओघवतं वक्तृत्व या सगळ्या गोष्टींनी मी भारावून जायचो. एक अगदी नक्की की त्यामुळे माझं आयुष्य भक्तिरसपूर्ण झालं. हे असे संस्कार होत होते. त्यातच माझ्या देश प्रेमाच्या बीजाला धाडस-धैर्याचे-अंकुर फुटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठका, शिबिरे यातून विचारांना एक वेगळी आणि ठाम अशी दिशा मिळाली. संघप्रचारक म्हणूनही जबाबदारी सोपविली गेली. त्यामुळे गावोगावी जाणं झालं. पण परत महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात परतलो.

या पुणे शहराने अनेक यश-अपयश, अनुग्रह आणि आघात, उत्कर्ष आणि नाश, गाढवाचा नांगर आणि सोन्याचा नांगर, जलप्रलय आणि अग्निप्रलय, चिखलफेक आणि पुष्पवृष्टी असे अनेक आकाश-पाताळ गाठणारे प्रकार अनुभवले आहेत. कधी शिरी मंदिल चढला तर कधी पाठीला माती लागली. यातूनच इतिहास घडला आहे. संस्कृती यातूनच फुलली आहे. बंड करून उठणं हा इथल्या मातीचा धर्म आहे. या मातीतूनच राजमाता जिजाऊसाहेब, शिवाजीराजे, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, फडके यांसारख्ये बंडखोर उठले. तसेच धोंडो केशव कर्वे, इतिहासाचार्य राजवाडे, गुरुवर्य बाबुराव जगताप, ‘सकाळ’कार ना. भि. परुळेकर, डॉ. बानू कोयाजी, पं. महादेवशास्त्री जोशी, पं. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, ‘पंचवटी’तले ग. दि. माडगूळकर, यंत्रतपस्वी किलरेस्कर, अनेक चित्रतपस्वी युगनिर्माते,

पं. भीमसेन जोशी, सुधीर फडके, बालगंधर्व आणि नाटय़तपस्वी- किती तरी ‘वेडी’ माणसं याच मातीत रुजली. याच आणि अशांनीच पुण्याचा आणि देशाचा सांस्कृतिक इतिहास घडवला आहे. या इतिहासाचा आणि या चरित्रांचा माझ्या मनावर परिणाम आणि संस्कार झाला. मलाही माझं वेड आणि स्वप्न या मातीत सापडलं.
भविष्यात माझं आणखी एक स्वप्न आहे. ते भव्य-दिव्य आणि अफाट आहे, असं म्हणावं लागेल. मला संपूर्ण शिवचरित्र वॅक्स, प्लॅस्टर ऑफ पॅरिस अशा वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांपुढे ठेवायचं आहे. म्हणजे ‘डिस्ने लँड’सारखी ही ‘शिवसृष्टी’ असणार आहे. शिवकालीन क्रांतीचा स्फूर्तिदायक इतिहास जगाने येऊन पाहावा आणि आमच्या तरुणांची मने अभिमानाने पोसली जावीत, हीच इच्छा आहे.

शिवचरित्रावर भाषणे करून मिळवलेले लाखो रुपये मी वेगवेगळ्या संस्थांना अर्पण केले हे खरे. पण ही धन देण्याची प्रेरणा मला कशातून मिळाली आहे, सांगू? शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांना भूमीमध्ये धन सापडले. ते त्यांनी जनतेसाठी- विहिरी- तलाव वगैरे कामांसाठी वापरले. स्वत: महाराजांना तोरणा किल्ल्यावर धन मिळाले. ते त्यांनी स्वराज्याच्या कारणी लावले. लोकमान्य टिळकांना अर्पण केलेल्या थैलीचा त्यांनी विश्वस्त निधी केला.

पु. ल. देशपांडे यांनी साहित्य, कला यातून मिळालेले लाखो रुपये वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून समाजार्पण केले. अशा थोरांच्या वाटचालीने जी वाट मिळालेली आहे, तिच्यावरून चालणारा मी एक वाटसरू आहे. ही थोर मंडळी माझी यामागची प्रेरणा आहेत. यावेळी आणखी एक विचार मनात येतो की, हे जग सोडून आपल्याला केव्हा तरी जायचे असते आणि मग तेव्हा आपल्याबरोबर काय येते? हातातली अंगठी, दाग-दागिने काढून घेतले जातात. इमले, बंगले, गाडय़ा, धनदौलत, सोने-नाणे सारे सारे काही इथेच राहते. असे असताना मग समाजऋण फेडण्याची कसूर का करायची? आपण मिळवलेल्या मिळकतीतील काही भाग तरी रुग्णालये, वाचनालये, शाळा-महाविद्यालये किंवा आपल्याला पसंत पडणाऱ्या मार्गाने समाजाला देण्याची इच्छा असावी. हे आणि हेच माझे श्रेयस-प्रेयस असावे असे मला वाटते.

आता पसायदानाची वेळ जवळ येत आहे; अशी मला जाणीव होत आहे. मी हे पसायदान सतत मागतो आहे. मागणे एवढे आहे,

‘चंडिके दे, अंबिके दे, शारदे वरदान दे
रक्त दे, मज स्वेद दे, तुज अघ्र्य देण्या अश्रु दे।’
तृप्त मी शिवशक्तीच्या गानात झालो शारदे
मागणे काहीच नाही, एवढे वरदान दे
मम चितेने यात्रिकांची वाट क्षणभर उजळु देचंडिके दे, अंबिके दे, शारदे वरदान दे।

बहुत काय लिहिणे?
आमचे अगत्य असो द्यावे!

लेखनालंकार- राजते लेखनावधि:।।
शब्दांकन- डॉ. चित्रलेखा पुरंदरे

बाबासाहेब पुरंदरे यांचे इतिहास ऋण

शरद पांडुरंग काळे, निवृत्त वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र

काही व्यक्तिमत्वे ही अशी असतात की त्यांच्या नुसत्या स्मरणाने अंगावर आनंदाची कारंजी उडू लागतात. आयुष्यात जेव्हढे त्यांचे शब्द कानावर पडले त्या सर्वांचे प्रतिध्वनी कानात दाटीवाटीने ऐकू येतात. त्यातून जे सूर निर्माण होतात ते स्वर्गीय संगीत असते. त्या स्वर्गीय संगीतात हरवून जाण्याचे भाग्य सर्वांनाच मिळत नाही. ज्यांना ते भाग्य मिळते त्यांनाच त्याची किंमत समजते. असे स्वर्गीय संगीत ऐकण्यासाठी जिवाचे कान पुरत नाहीत. पण जेव्हढे शक्य असेल तितका वेळ त्या स्वरगंगेत डुबता येईल तेव्हढे डुबावे आणि स्तब्ध झालेल्या काळाचे आभार मानावेत, स्वतःचे अभिनंदन करीत राहावे! श्रीमान बाबासाहेब पुरंदरे हे असे व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभले हे सर्व मराठी लोकांचे मोठे भाग्यच आहे. बाबासाहेब म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास वर्तमानात प्रत्यक्ष उभा करण्याचे सामर्थ्य असलेले द्रष्टे वक्ते. बाबासाहेबांसारख्या व्यक्तिमत्वांमुळे इतिहासाची पाने हिऱ्यांसारखी लखलखतात. त्या प्रकाशातून जणू ते इतिहासपुरुष पुन्हा अवतरतात आणि नव्या पिढ्यांना मार्गदर्शन करीत राहातात.
बाबासाहेबांचे भाषण आम्ही सुमारे बारा वर्षांपूर्वी अणुशक्तीनगर च्या प्रशिक्षणार्थी छात्रावासाच्या मोठ्या आणि प्रशस्त हॉल मध्ये आयोजित केले होते. या मोठ्या सभागृहाला एकच प्रवेशद्वार होते. बाबासाहेबांच्या सभेचा एक नियम आहे. त्यांचे भाषण चालू असतांना मध्ये कुणी उठायचे नाही. खरंतर हा बाबासाहेबांच्या सभेचा नियम नसून तो कोणत्याही सार्वजनिक सभेचा शिष्टाचार आहे. मध्ये उठून जाणे हा व्यायापीठाचा आणि सर्वांचाच अपमान असतो. दुर्दैवाने आपल्या देशात हा साधा शिष्टाचार पाळावा असे प्रत्येक वेळा सांगावे लागते! त्या सभेत एका वैज्ञानिक महिलेने तो शिष्टाचार मोडला, त्यावेळी बाबासाहेब काही बोलले नाहीत. पण आम्हा आयोजकांना मात्र मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. बाबासाहेबांची तेंव्हाही आम्ही मनापासून क्षमायाचना केली होती, आज ही त्यांना सांगावयाचे आहे, बाबासाहेब, आपले भाषण ऐकण्याची देखील पात्रता नाही हो आमच्यात! त्या दिवशी बाबासाहेबांचे ते ओजस्वी भाषण ऐकले. प्रतापराव गुजरांच्या “वेडात दौडले सात मराठे वीर” हा प्रसंग त्यांनी डोळ्यासमोर शब्दांमधून उभा केला तेंव्हा अंगावर काटा उभा राहिला होता. त्वेष, दुःख, संताप आणि जाज्वल्य स्वराज्यनिष्ठा आणि महाराजांच्या संमिश्र भावना आम्हाला त्यादिवशी अदृश्य चलतचित्रपटाच्या पडद्यावर दिसल्या होत्या. बाबासाहेबांच्या शब्दांशब्दांतून जणू महाराजांचे बोल विजेसारखे कोसळत होते. ते भाग्य आम्हाला त्या दिवशी मिळाले. बाबासाहेब, हे आपले इतिहास ऋण उभा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही.
बाबासाहेबांनी लिहिलेले राजा शिवछत्रपती हे नितांतसुंदर चरित्र आहे. महाराजांच्या प्रतिबिंब असलेले हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाने वाचलेच पाहिजे. महाराजांचे चरित्र लोकांच्या समोर शब्दांमधून ठेवतांना ते शब्द हिऱ्यासारखे लखलखीत असले पाहिजेत. शब्द तेच असतात, शब्दांचे अर्थ शतकानुशतके बदलत देखील नसतात, तरीदेखील ते कोण, कसे आणि कुणाबद्दल वापरले जातात त्यावर खूप काही अवलंबून असते. शब्दांची धार बोथट होत नसते. बाबासाहेबांच्या या कादंबरीच्या अठराव्या आवृतीतील साठ वर्षांपूर्वी असलेला शब्दांचा ताजेपणा आत्ता उमललेल्या गुलाबकळी इतकाच ताजा आहे. बाबासाहेबांनी या चरित्राच्या सुरुवातीला जे “आवातन” लिहिले आहे, त्याला तोड नाही! महाराष्ट्र शारदेला त्यांनी वापरलेली विशेषणे नवनवोन्मेषशालिनी, चातुर्यकलाकामिनी, अभिनववाङगविलसिनी, वीणावादिनी आणि विश्वामोहिनी किती सुंदर साद घालीत आहेत ते लक्षात येते. मला खात्री आहे की महाराष्ट्र शारदेने त्यांना नक्कीच आशीर्वाद दिला आहे. ही सर्व विशेषणे एका वाक्यात वापरून बाबासाहेबांनी आपल्या प्रतिभेच्या आविष्काराची जी झलक पेश केली आहे ती वाचून पु. लं. नी त्यांना झालेला हर्ष वर्णन केला आहे. हे आवतान किती सुंदर आहे हे समजण्यासाठी ज्यांनी ते वाचले नाही ते जरूर वाचावे असे मला कळकळीने सांगायचे आहे. ते आवतान म्हणजे बाबासाहेबांनी विविध देवदेवतांच्या समोर ठेवलेले निमंत्रण आहे. भाषावैभवाचा हा एक उत्तम नमुना आहे.
बाबासाहेबांनी १९५०-५१ मध्ये शिवचरित्राची काही प्रकरण एकता मासिकात प्रसिद्ध केली. ती प्रकरणे त्या मासिकाने छापली पण त्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया येईनात म्हणून त्यांनी संपादकांना त्यासंबंधी विचारणा केली आणि संपादकीय प्रतिक्रिया मागितली. त्यावेळी संपादकानी त्यांना सांगितले, आम्ही तरी कुठे वाचतोय तू काय लिहिले ते! तू लिहितोस म्हणून आम्ही छापतो एव्हढेच! त्यांचे उपाध्याय वासुदेवकाका कवि यांनी आग्रह करकरून बाबासाहेबांना शिवचरित्र लिहिण्यास प्रेरित केले होते. त्यांच्याच सूचनेवरून मग त्यांनी आपली लेखन शैली बदलली आणि मग मात्र कधीच मागे वळून पाहिले नाही. आपल्या शब्दभंडारातून अचूक शब्दांची निवड करीत त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पैलूंची ओळख अतिशय सुंदर पद्धतीने करून दिली. वज्राहुनी कठोर, मेणाहून मऊ, मातृभक्ती, स्वप्नद्रष्टे, स्फूर्तिदाते, उत्तम प्रशासक, हिंदवी स्वराज्य संस्थापक अशा विविध चित्रांमधून बाबासाहेबांनी जे शब्दचित्र आपल्यापुढे उभे केले आहे ते खरोखरीच अतिशय अप्रतिम आणि अतुलनीय आहे.
बाबासाहेबांचे भाषावैभव महाराष्ट्राला नवे नाही. त्यांच्या लिखाणातून आणि त्यांच्या तेजस्वी भाषणांमधून ते प्रत्ययाला येत असते. खणखणीत आवाज कसा असतो, बुलंद आवाज कसा असतो, काळजात धडकी भरविणारा आवाज कसा असतो, आईसमोर नम्रपणे बोलण्याचा आवाज कसा असतो, सवंगड्यांमध्ये वीरश्री निर्माण करणारा आवाज कसा असतो, बादशाही तख्तासमोर न झुकणारा आणि स्वराज्य अभिमानाचा आवाज कसा असतो या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर, बाबासाहेबांचा आवाज! बाबासाहेब, आपल्या वाणीला सहस्त्र मुजरे अर्पण.
सत्तरच्या दशकात श्रीमान बाबासाहेब पुरंदरे, श्री शिवाजीराव भोसले, पु ल देशपांडे, दुर्गाबाई भागवत, पु. भा. भावे यांच्यासारख्या दिग्गजांची भाषणे ज्यांनी ऐकली त्यांनी मराठी भाषेचे वैभव खऱ्या अर्थाने अनुभवले. सुधीर फडके आणि गदिमा ह्या जोडीने गीतरामायण त्याच साठ सत्तर दशकाच्या काळात सादर करून मराठी मुगुटात कोहिनूर हिरा माळलेला होता. कुसुमाग्रज, बोरकर, महानोर, शांताबाई शेळके यांच्या कविता त्यावेळी ऐन भरात होत्या. वसंतराव देशपांडे, श्रीराम लागू, काशीनाथ घाणेकर, राजा गोसावी, शांता जोग, भक्ती बर्वे यांनी मराठी रंगभूमीला एका वेगळ्याच उंचीवर नेले होते. दूरदर्शन किंवा इंटरनेट नसून देखील आयुष्य रंगबिरंगी होते ते या सर्व प्रभावी कलाकारांमुळे. मराठी भाषेचे वैभव वाढविण्याचे मोठे कार्य बाबासाहेबांनी केले आहे. शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान चरित्रातून येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीला स्फूर्ती मिळत राहणार आहे. बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण आणि पद्मविभूषण या किताबांनी सन्मानित केले गेले. लौकिकार्थाने जरी हे सन्मान महत्वाचे असले तरी बाबासाहेबांसारख्या तेज:पुंज हिऱ्याला कसल्याच कोंदणाची गरज नाही हे खरे. हा खरा स्वयंभू हिरा!
बाबासाहेबांचा इंग्रजी तारखेप्रमाणे २९ जुलै हा जन्मदिवस. त्यांनी या वर्षी १०० व्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांना देवाने आता आपल्यातून नेले आहे. ह्या इतिहास तपस्वीने जीवनाची इतिकर्तव्यता पूर्ण केली आणि निजधामी जातांना कृतकृत्यता अनुभवली ह्याचा आनंदच आहे. जाणाऱ्या माणसाचा विरह क्लेशदायक असतोच. बाबासाहेबांच्या असंख्य चाहत्यांना खेद होणे अगदी स्वाभाविक म्हणावे लागेल. पण बाबासाहेब त्यांच्या तेजस्वी आणि ओजस्वी स्वरांमधून अमर झाले आहेत. त्यांना विनम्र श्रद्धांजली।
शुभास्ते पंथान: सन्तु।
—–//////——/////——- शरद काळे

  • – – – – – – – – – – –

भरपावसात महाबळेश्वरातून प्रतापगडावर सायकलवरून जाणारे शिवशाहीर, इतिहासकार,नाटककार आणि लेखक,महाराष्ट्र भूषण,सगळ्यांचे लाडके बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. भावपुर्ण श्रद्धांजली . (जन्म जुलै २९, इ.स. १९२२ )
वरील प्रसंग “त्रिपदी ” या गो नि दांडेकर यांचे पुस्तकातील आहे . गो नि दां एकदा महाबळेश्वराहून पुण्यास जाणेसाठी एस टी ने पुण्यास येण्यासाठी गाडीत बसले होते . त्यावेळी दुपारी २ नंतर महाबलेश्वराहून प्रतापगडाकडे जाणारी गाडी तेंव्हा नवती . गो नि दांचे लक्ष बाहेर गेले तर एक ओळखीचा चेहरा सायकलवर दिसला .त्यांचे लक्षात आले ते बाबासाहेब आहेत ,त्यांनी त्यांना साद घातली त्या व वेळी बाबासाहेबांनी सांगितले ते प्रतापगडाला एक ऐतिहासिक दस्त सापडला आहे तो आणण्या साठी ते पावसात सायकलवर निघाले होते.
बाबासाहेबांचेवर अनेक जणांनी टिका केली पण त्यांनी घेतलेले कष्ट टीकाकारांनी घेऊन दाखवावेत.
विवेकानंद शिलास्मारकला कोटी रुपये देणगी कोठेही नाव न घालणेचे अटीवर दिली
इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा-वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषणक्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये.
’बेलभंडारा’ या नावाने बाबासाहेब पुरंदरे यांचे सचित्र चरित्र डॉ.सागर देशपांडे यांनी लिहून प्रसिद्ध केले आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांना डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने D .lit या मानद पदवीने सन्मानित केले आहे
यशवंतराव चव्हाण यांनी बाबासाहेबांची राजा शिवछत्रपति या पुस्तकाच्या २०० प्रती मागवून घेतल्या होत्या.


अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला. अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारहि तितकाच उग्र आहे! पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्रि!
त्याच्या आवडीनिवडी आणी खोडी पुरूषी आहेत, त्याचे खेळणे-खिदळणेहि पुरूषी आहे, त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही कारण सह्याद्रि हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळा कभिन्न. रामोशा सारखा.
पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो!
आडदांड सामर्थ्य हेच त्याचे सौंदर्य!
तरीपण कधीकाळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजूक लेणी घातली,
त्याच्या अटिव अन् पिळदार देहाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून मराठी मुलुखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या, त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला, मनगटात किल्ले कोटांचे कडीतोडे घातले…
सह्याद्रीला इतके नटवले सजवले तरीपण तो दिसायचा तसाच दिसतो! रामोशासारखा ! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा! सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की, तेथून खाली डोकावत नाही, डोळेच फिरतात!
मुसळधार पावसात तो न्हाऊ लागला की, त्याच्या खांद्यावरून धो धो धारा खालच्या काळदरीत कोसळू लागतात आणि मग जो आवाज घुमतो, तो ऐकावा. सह्याद्रीचे हसणे, खिदळणे ते! बेहोश खिदळत असतो.
पावसाळ्यात शतसहस्त्र धारांखाली सह्याद्रि सतत निथळत असतो. चार महिने त्याचे हे महास्नान चालू असते. काळ्यासावळ्या असंख्य मेघमाला, त्याच्या राकट गालावरून अन् भालावरून आपले नाजूक हात फिरवित, घागरी घागरींनी त्याच्या मस्तकावर धारा धरून त्याला स्नान घालीत असतात. हे त्याचे स्नानोदक खळखळ उड्या मारीत त्याच्या अंगावरून खाली येत असते. त्याच्या अंगावरची तालमीची तांबडी माती या महास्नानात धूऊन निघते. तरी सगळी साफ नाहीच. बरीचशी.दिवाळी संपली की सह्याद्रीचा हा स्नानसोहळा संपतो. त्या हसर्‍या मेघमाला सह्याद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात. त्याच्या आडव्या भरदार छातीवर तो हिरवा गर्द शेला फारच शोभतो. कांचनाच्या, शंखासुराच्या, सोनचाफ्याच्या व बिट्टीच्या पिवळ्या जर्द फुलांची भरजरी किनार त्या शेल्यावर खुलत असते. हा थाटाचा शेला सह्याद्रीला पांघरून त्या मेघमाला त्याचा निरोप घेतात. मात्र जातांना त्या त्याच्या कानांत हळूच कुजबुजतात, “आता पुढच्या ज्येष्ठांत मृगावर बसून माघारी येऊं हं ! तोपर्यंत वाट पाहा !” रिकामे झालेले कुंभ घेऊन मेघमाला निघून जातात.दाट दाट झाडी, खोल खोल दर्‍या, भयाण घळी, अति प्रचंड शिखरे, उंचच उंच सरळ सुळके, भयंकर तुटलेले ताठ कडे, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, भीषण अन् अवघड लवणे, घातली वाकणे, आडवळणी घाट, अडचणीच्या खिंडी, दुर्लंघ्य चढाव, आधारशून्य घसरडे उतार, फसव्या खोंगळ्या, लांबच लांब सोंडा, भयाण कपार्‍या, काळ्याकभिन्न दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा !
असे आहे सह्याद्रीचे रूप. सह्याद्रि बिकट, हेकट अन् हिरवट आहे. त्याच्या कुशी-खांद्यावर राहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे. वाघांतहि आहे. कारण तेहि मराठ्यांच्याइतकेच शूर आहेत !सह्याद्रीच्या असंख्य रांगा पसरलेल्या आहेत. उभ्या आणि आडव्याहि.
सह्याद्रीच्या पूर्वांगास पसरलेल्या डोंगरामधील गल्ल्या फार मोठमोठ्या आहेत. कृष्णा आणि प्रवरा यांच्या दरम्यान असलेल्या गल्ल्यांतच चोवीस मावळे बसली आहेत. दोन डोंगर रांगांच्या मधल्या खोर्‍याला म्हणतात मावळ. एकेका मावळांत पन्नास-पन्नास ते शंभर-शंभर अशी खेडी नांदत आहेत.प्रत्येक मावळामधून एक तरी अवखळ नदी वाहतेच. सह्याद्रीवरून खळखळणारे तीर्थवणी ओढ्या-नाल्यांना सामील होते. ओढेनाले ते या मावळगंगांच्या स्वाधीन करतात. सगळ्या मावळगंगा हे माहेरचे पाणी ओंजळीत घेऊन सासरी जातात. या नद्यांची नावे त्यांच्या माहेरपणच्या अल्लडपणाला शोभतील अशीच मोठी लाडिक आहेत. एकीचे नाव कानंदी, दुसरीचे नाव गुंजवणी, तिसरीचे कोयना. पण काही जणींची नावे त्यांच्या माहेरच्या मंडळींनी फारच लाडिक ठेवलेली आहेत. एकीला म्हणतात कुकडी, तर दुसरीला म्हणतात घोडी ! तिसरीला म्हणतात मुठा, तर चौथीला वेलवंडी ! काय ही नावे ठेवण्याची रीत ? चार चौघीत अशा नावांनी हाक मारली की, मुलींना लाजल्यासारखें नाही का होत ?कित्येक मावळांना या नद्यांचीच नांवे मिळाली आहेत. कानंदी जेथून वाहते ते कानद खोरे. मुठेचे मुठे खोरे. गुंजवणीचे गुंजणमावळ, पवनेचे पवन मावळ, आंद्रेचे आंदरमावळ आणि अशीच काही.मावळच्या नद्या फार लहान. इथून तितक्या. पण त्यांना थोरवी लाभली आहे, गंगा यमुनांची.
सह्याद्रि हा सहस्त्रगंगाधर आहे. मावळांत सह्याद्रीच्या उतरणीवर नाचणी उर्फ नागली पिकते. नाचणीची लाल लाल भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा हे मावळचे आवडते पक्वान्न आहे. हे पक्वान्न खाल्ले की बंड करायचे बळ येते! भात हे मावळचे राजस अन्न आहे. आंबेमोहोर भाताने मावळी जमीन घमघमत असते. अपार तांदूळ पिकतो. कांही मावळांत तर असा कसदार तांदूळ पिकतो की, शिजणार्‍या भाताच्या पेजेवर तुपाळ थर जमतो. खुशाल वात भिजवून ज्योत लावा. नाजूक व सोन्यासारखा उजेड पडेल. महाराष्ट्राच्या खडकाळ काळजातून अशी ही स्निग्ध प्रीत द्रवते. मावळे एकूण चोवीस आहेत. पुण्याखाली बारा आहेत व जुन्नर-शिवनेरीखाली बारा आहेत.
मोठा अवघड मुलूख आहे हा. इथे वावरावे वार्‍याने, मराठ्यांनी नि वाघांनीच.

  • बाबासाहेब पुरंदरे

शिवरायमय झालेलं एक ध्यासपर्व संपलं…
पण संपलं तरी कसं म्हणावं….ओजस्वी, लखलखते शब्द….महाराष्ट्र धर्माचा प्रखर अभिमान….. सह्याद्रीवर अलोट प्रेम….. इतिहासाचा गाढा अभ्यास…. या सगळ्या रूपात तुम्ही असणारच आहात महाराष्ट्राच्या, मराठी माणसांच्या मनामनात…. 🙏🙏🙏

प्रवास शतकाचा
 
श्रावण महिना होता. पावसाची एक मोठी सर येऊन गेली. लगेच ऊनही पडलं. वडिलांनी आपल्या मुलांच्या हातात थोडे पैसे दिले. पिशवी दिली आणि सांगितलं की, बाबासाहेब आज आपल्याकडे श्री सत्यनारायणाची पूजा आहे तर, त्यासाठी लागणारं साहित्य मंडईतून घेऊन ये. त्या वेळी त्या मुलाचं म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांचं वय होतं आठ वर्षे. पिशवी आणि पैसे घेऊन ते मंडईत जायला निघाले खरे; पण ते मंडईत गेलेच नाहीत. इकडे पूजेची वेळ झाली तरी, त्यांचा पत्ताच नव्हता. मग शोधाशोध सुरू झाली, तेव्हा मुठीत पैसे आणि एका हातात पिशवी धरलेले बाबासाहेब भारत इतिहास संशोधक मंडळात कुठलंस एक मोठं पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत असताना सापडले.
वडिलांच्या लक्षात आपल्या मुलाचा कल कोठे आहे हे आलं आणि मनोमन त्यांना समाधान वाटलं. पुढे त्यांनी बाबासाहेब आणि त्यांच्या दोन भावांना अशा आपल्या तिन्ही मुलांना सिंहगड, तोरणा वगैरे किल्ले दाखवले आणि त्या वेळी बाबासाहेबांना किल्लयांबद्दल आणि त्या किल्ल्यांच्या ‘राजा’बद्दल म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो अभिमान वाटला, जे प्रेम दाटून आले, ते आजपर्यंत तसंच टिकून आहे.
वयाची गेली 92 वर्षे त्या एका विचाराने ते झपाटून गेले आहेत. शिवाजी महाराजांचं, त्यांच्या इतिहासाचं, त्यांच्या पराक्रमाचं, शौर्याचं, त्यांना जणू वेडच लागलं आणि वेड लागल्याशिवाय इतिहास निर्माण होत नाही. इतिहास हा अत्तराच्या थेंबातून आणि गुलाबजलातून निर्माण होत नाही. तो घामाच्या आणि रक्ताच्या थेंबांतून निर्माण होते. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा वेड्यांचा इतिहास आहे आणि ते वेड ज्यांनी मला लावलं त्या माझ्या आई-वडिलांबद्दल आणि शिक्षकांबद्दल मी अपरंपार कृतज्ञ आहे,’ अशी भावना आजही बाबासाहेब व्यक्त करतात.
पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण अशा असंख्य पुरस्कारांनी गौरवांकित झालेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे आपल्या देशाला ललामभूत ठरले, परंतु या सगळ्या पुरस्कारांनी गौरव होण्यासाठी नव्हे तर, छत्रपतींचा गौरवशाली इतिहास सर्वसामान्यांना, आबालवृद्धांना नेमकेपणाने माहीत होण्यासाठी. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत.
शिवाजी महाराज ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या सर्व ठिकाणी स्वतः बाबासाहेबांना जाण्यात मोठी धन्यता वाटली. तिथे जाण्यासाठी त्यांनी लाखो मैल प्रवास केला. ते अनेकदा पायी चालत गेले, सायकलवरून गेले, उन्हा -तान्हात, पावसात भिजत गेले. जिथे जिथे काही पुरावे सापडतील ती सगळी ठिकाणे त्यांनी पालथी घातली.
बरेचसे पुरावे गोळा करता आले. असंख्य कागदपत्रे जमा झाली. त्यातली जवळपास सगळीच मोडी लिपीतील होती. बाबांनी ती समजावीत यासाठी मोडी लिपी अवगत केली. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी प्रा. त्र्यं. श शेजवलकर यांच्यासारख्या अनेक विद्वान संशोधकांच्या ग्रंथांचा अभ्यास केला. ग.ह. खरे यांना बाबा गुरूथानी मानतात आणि या सगळ्यातून त्यांनी स्वतः शिवचरित्र लेखनाला सुरवात केली.
सुरवातीला ते ‘एकता’ नावाच्या मासिकातून प्रसिद्ध होत होते. नंतर त्यांनी अधिक सोप्या भाषेत लिहायला सुरवात केली आणि पुढे ‘राजा शिवछत्रपती’ हा एक हजार पानांचा अतुलनीय ग्रंथ तयार झाला. त्या ग्रंथाला भरपूर पुरस्कार लाभले. साहित्यसम्राट आचार्य प्र.के.अत्रे आणि लोकोत्तर विनोदी लेखक पु.ल. देशपांडे यांच्यासारख्या दिग्गजांनी या ग्रंथाचं प्रचंड कौतुक केलं. आजतागायत या ग्रंथाच्या लाखो प्रती छापल्या गेल्या आणि विकल्या गेल्या आहेत. अजूनही या ग्रंथाला प्रचंड मागणी आहे!
बाबा केवळ पुस्तक लिहून थांबले नाहीत तर, त्यांनी महाराजांचा इतिहास आपल्या व्याख्यानांमधून श्रोत्यांना सांगितला आणि तो जिवंत केला.
लहानपणी त्यांनी खूप कीर्तने ऐकली आणि स्वतः केलीदेखील. त्यामुळे त्यांना व्याख्यान कसं द्यायचं याचा एक धडाच मिळाला. याशिवाय त्यांना एक सवय होती. ती म्हणजे नकला करण्याची. ते उत्तम नकला करतात. पूर्वी नाटक पाहून घरी आल्यावर त्यातील पात्रांच्या ते नकला करत. वडिलांनी एकदा ते पाहिलं आणि ते एकदम म्हणाले ‘बाबासाहेब, तुम्हाला नट व्हायचंय? तर, मग केशवराज दादांसारखं व्हा!’
बाबांनी एकदा तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची अगदी त्यांच्यासमोरच नक्कल केली. त्या वेळी सावरकर बाबांना जे म्हणाले त्यामुळे बाबांचं आयुष्य बदलूनच गेलं. सावरकरांना बाबांनी त्यांची केलेली नक्कल आवडली, पण ते म्हणाले ‘आयुष्यभर अशाच दुसर्‍यांच्या नकला करत राहणार आहेस का? स्वतः च काहीतरी कर.’ ते ऐकून बाबांनी मग नकला करणं सोडून दिलं.
बाबा व्याख्यानाच्या बाबतीत सावरकरांना गुरूस्थानी मानतात. बाबांनी आतापर्यंत सुमारे 12,000 व्याख्याने दिली आहेत. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही (काही ठिकाणी हिंदीतून) त्यांची व्याख्याने झाली. एवढंच नव्हे तर, भारताबाहेर – परदेशात – इंग्लंड, अमेरिकेतही त्यांची व्याख्याने झाली आहेत.
‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाच्या छपाईसाठी लागणारे पैसे खूप होते. बाबांनी ते पैसे मिळवण्यासाठी इतर नामवंत लेखकांची पुस्तके गावोगावी जाऊन विकली अगदी हातात कोथिंबीरची गड्डी घेऊन रस्त्यावर उभ राहून ओरडून विकतात… तसे विकली ! कुठल्याही श्रमाला त्यांनी कमी लेखले नाही.
भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, परंतु गोवा, दीव-दमण मात्र पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. त्यासाठी गोवा मुक्तीसंग्रामात बाबांनी सुप्रसिद्ध गायक कै. सुधीर फडके यांच्याबरोबर भाग घेतला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी म्हणजे 1974 मध्ये बाबांनी दादरच्या शिवाजी पार्कवर ‘शिवसृष्टी’ निर्माण केली. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा लोकांना ‘याचि देही, याचि डोळा’ पाहायला मिळाला. ती ‘शिवसृष्टी’ पाहण्यासाठी देश-विदेशातील असंख्य रसिक आले होते .
याच सुमारास भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्वर-संगीताने नटलेली आणि नामवंत कवींच्या कवनांनी साकारलेली ‘शिवकल्याण राजा’ ही ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. त्यामध्ये बाबांनी केलेलं निवेदन प्रचंड गाजलं. ही ध्वनीमुद्रिका आज 47-48 वर्षे झाली तरी अजूनही लोकप्रिय आहे.
‘राजा शिवछत्रपती’ हा एक मोठा ग्रंथ तर त्यांनी लिहिलाच, पण त्याबरोबर आणखीही काही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांची एकूण संख्या 25 आहे. त्यातली काही पेशवाईत घडलेल्या घटनांच्या वर्णनाची पुस्तके आहेत. ‘महाराज’ हे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करणारे पुस्तक खूप गाजले. त्या पुस्तकात अर्ध्या पानात मोठे चित्र आहे व त्याखाली त्या चित्रातील प्रसंग बाबांनी त्यांच्या सुंदर शब्दांत वर्णन केला आहे. त्याचबरोबर ‘शेलारखिंड’ ही शिवकालावर आधारित कादंबरीही खूप लोकप्रिय ठरली. त्यावर ‘सर्जा’ या नावाचा चित्रपटही निघाला.
बाबा आपल्या या सर्व काळात लेखन, व्याख्यान यामध्ये सतत व्यग्र असत. आम्हा घरच्यांनाही ते फारसे भेटायचे नाहीत. सारखा त्यांचा प्रवास सुरू असे. एकदा ते रोमला गेले असताना त्यांनी एक प्रयोग नाटकाचा प्रयोग पहिला. आणि त्यांच्या मनात विचार सुरू झाला की, असा प्रयोग आपल्याला भारतात करायला हवा. ते त्या विचाराने अगदी झपाटूनच गेले आणि त्यातून ‘जाणता राजा’ हे महानाट्य निर्माण झालं. एका वेळी 200 कलाकार रंगमंचावर हे नाट्य सादर करतात, याशिवाय हत्ती, घोडे, उंट यांसारखे प्राणीही यात काम करतात.
या नाटकाचा हिंदी, इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आणि त्यांचे प्रयोग सबंध भारतभर इतकेच नव्हे तर, अमेरिकेतही झाले. प्रयोगांची संख्या 1200 एवढी झाली असेल. बाबा असे कीर्तिमान होत गेले तरी, वडीलमाणसांबद्दल, भावे स्कूल या त्यांच्या शाळेतील शिक्षकांबद्दल असलेला त्यांचा आदर किंचितही कमी झालेला नाही.
आज वयाच्या 100 व्या वर्षांत त्यांनी पदार्पण केले आहे; तरीही आपल्या तल्लख स्मरणशक्तीमुळे त्या सर्वांची, त्यंानी दिलेल्या शिकवणुकीची बाबांना आठवण आहे, हे विशेष!
बाबांच्या आयुष्याच्या प्रवासाची ही घोडदौड या वयातही थांबलेली नाही. पूर्वी घोड्यावर बसून ते प्रवास करत होते. ते थकल्याचे कधीच जाणवले नाही. ते कधीच निराश होत नाहीत. याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा हे त्यांच्या जगण्याचं कारण आहे. छत्रपतींच्या इतिहासाचा ध्यास त्यांनी घेतला आणि आयुष्यभर तो त्यांचा श्वासच झाला. शिवशाहीर ‘बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे’ म्हणजे आमचे बाबा आमच्या घराण्याचा इतिहास आहे, वर्तमान आहे आणि पिढ्यान्पिढ्यांसाठी कमावून ठेवलेलं नाव आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
पुण्यातील कात्रज रस्त्यावर 13 एकर जागेमध्ये ‘शिवसृष्टी’ उभारण्याचं काम त्यांच्या कल्पनेतून साकार होत आहे. त्यासाठी खूप धन आणि वेळेची आवशक्यता आहे. त्यासाठी बाबांना आणखी काही वर्षांचं आयुष्य लाभायलाच हवं. त्यांच्या ग्रंथविक्रीतून, व्याख्यानातून जे धन त्यांना समाजाकडून मिळालं, ते सगळं त्यांनी निरनिराळ्या शैक्षणिक, आरोग्य अशा विविध प्रकारच्या संस्थांना उदारहस्ते देऊन टाकलं.
शेवटी एकच म्हणावसं वाटतं की, बाबांनी शिवचरित्र नुसतं लिहलं, नुसती व्याख्यानं दिली असं नव्हे तर, ते शिवचरित्र जगले आहेत. त्यांचाबद्दल कितीही लिहिलं तरी, अपुरं वाटावं असं त्यांचं कर्तुत्व आहे. ते आदर्श आहे, अनुकरणीय आहे, त्यांच्या कार्यातून ते अजरामर झालेले आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास,
‘तृप्त मी शिवशक्तीच्या गानात झालो शारदे,
मागणे काहीच नाही, एवढे वरदान दे,
रक्त दे, मज खेद दे,
तुज अर्घ्य देण्या अश्रू दे !

  • डॉ. चित्रलेखा पुरंदरे 

https://www.shikshanvivek.com/Encyc/2021/11/15/pravas-shatakacha.htmlइतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा-वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषणक्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये.
’बेलभंडारा’ या नावाने बाबासाहेब पुरंदरे यांचे सचित्र चरित्र डॉ.सागर देशपांडे यांनी लिहून प्रसिद्ध केले आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांना डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने D .lit या मानद पदवीने सन्मानित केले आहे

वादात सापडलेले शाहीर

बाबासाहेब पुरंदरे: शिवचरित्र लोकांपर्यंत नेताना वादात सापडलेले ‘शाहीर’

तुषार कुलकर्णी बीबीसी मराठी प्रतिनिधी 26 जानेवारी 2019
बाबासाहेब पुरंदरे

(बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे निधन झालं. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला त्यावेळी हा लेख लिहिण्यात आला होता. तो पुन्हा शेअर करत आहोत.)

बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. 8.30 त्याचं पार्थिव त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. 10.30 वाजता त्यांची अंत्ययात्रा सुरू होणार आहे आणि वैकुंठ स्मशानभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

‘जर 125 वर्षांचं आयुष्य मिळालं तर शिवचरित्र ब्रह्मांडाच्या पलीकडे घेऊन जाईल,’ असा म्हणणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना भारत सरकारनं पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला. हा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल वाटणारा आनंद शब्दांत न सांगता येण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बाबासाहेब पुरंदरे यांना गेली अनेक दशके महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही शिवचरित्र नेण्याचे श्रेय त्यांना दिलं जातं. पण अनेक प्रसंगी त्यांना विरोध झाला आहे, त्यांच्या कामावर टीकाही झाली आहे.

बाबासाहेब पुरंदरे आणि शिवचरित्राचं नातं अतूट आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक आणि संशोधक असले तरी ते स्वतःला इतिहासकार म्हणवून घेत नाहीत. त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटणारे लोक त्यांना “शिवशाहीर” म्हणतात, पण त्यापुढे जाऊन ते म्हणतात की “मला काही म्हटलं नाही तरी चालेल. पण शिवचरित्र वाचा.”

“शिवभक्ती ही आपल्याला संस्कारातून आणि रक्तातूनच मिळाली आहे,” असं बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांचे चरित्रकार सागर देशपांडे यांना सांगितलं होतं. डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर ‘बेलभंडारा’ हे पुस्तक लिहिलं आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी लेखकाला सांगितलेल्या आठवणी तसंच पुरंदरेंच्या सहकाऱ्यांशी आणि नातेवाईकांशी बोलून देशपांडे यांनी हे चरित्र लिहिलं आहे.

बळवंत मोरोपंत पुरंदरेंचा जन्म 29 जुलै 1922ला झाला. सुरुवातीला त्यांच्या पुस्तकांवर हेच नाव असायचं, पण अवघा महाराष्ट्र त्यांना बाबासाहेब पुरंदरे याच नावाने ओळखतो.

लहानपणी वाढदिवसाला एखादं खेळणं, खाऊ किंवा फार फार तर आवडतं पुस्तक भेट म्हणून मिळावं, म्हणून अनेक जण हट्ट करतात. पण पुरंदरेंनी आपल्या आठव्या वाढदिवसाला वेगळाच हट्ट आपल्या वडिलांकडे केला. तो म्हणजे सिंहगड पाहायचा आहे.

या हट्टाला काय उत्तर द्यावं, त्यांच्या वडिलांना कळेना. पण त्यांनी त्यांचा हट्ट पुरवला. त्यांनी आपल्या वडिलांकडून शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरेंच्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्या कथा त्यांच्यासमोर जिवंत झाल्या, अशी आठवण ‘बेलभंडारा’मध्ये आहे.

एका मुलाखतीमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शाळेत त्यांनी भाषण दिलं होतं. त्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्यांच्या शिक्षकांनी त्यांना छातीशी धरलं आणि म्हटलं, “खूप अभ्यास कर आणि खूप मोठा हो.”

“तेव्हापासून आतापर्यंत त्यांचा संदेश आपण आपल्या मनावर कोरला आहे,” असं बाबासाहेब सांगतात. त्यांनी आतापर्यंत शिवचरित्राबरोबरच 50 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत.

पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असला तरी त्यांना विरोध करणाऱ्यांनी ‘महाराष्ट्र वैचारिकदृष्ट्या पेटवू’ असा इशारा दिला आहे

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका व्हीडिओद्वारे बाबासाहेब पुरंदरे यांच्या सन्मानाचा विरोध केला आहे. “या निर्णयामुळे शिवभक्तांच्या भळभळत्या जखमांवर सरकारनं मीठ चोळलं आहे. दर दोन चार वर्षांनी इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्यांचा सन्मान केला जातो,” असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आपण ‘महाराष्ट्र वैचारिकदृष्ट्या पेटवू’, असंही आव्हाड या व्हीडिओमध्ये म्हणाले आहेत.

‘सर्वांत लोकप्रिय संशोधक’
पुण्याचे इतिहासकार मंदार लवाटे सांगतात, “सात दशकांहून अधिक काळ त्यांनी शिवचरित्र लोकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं आहे. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात आले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांचं इतिहास संशोधनाचं कार्य अव्याहतपणे सुरू आहे.

“बाबासाहेब पुरंदरे हे संशोधक आहेत, यात संशयच नाही, पण त्याच बरोबर त्यांनी इतिहास सामान्यांना वाचता येईल, अशा भाषेत लिहिला. इतका अभ्यास आणि विशिष्ट भाषाशैली असलेली काही मोजकी उदाहरणं आहेत या क्षेत्रात होऊन गेली. जसं की सेतूमाधवराव पगडी किंवा य. न. केळकर. त्यांच्याप्रमाणेच पुरंदरे देखील आहेत.”

“त्यांच्या इतका लोकप्रिय संशोधक किंवा इतिहासकार मी तरी पाहिला नाही. पानटपरीवर सुद्धा त्यांचे फोटो लावलेले मी पाहिले आहेत. जितका लोक त्यांचा आदर करतात तितका आदर ते लोकांचा करतात. लहान मुलाला देखील ते आहो-जाहो करतात. कधी कुणाला नावं ठेवत नाही, फक्त लोकच त्यांच्यावर प्रेम करतात असं नाही त्यांचं देखील तितकंच प्रेम समाजावर आहे,” असं लवाटे सांगतात.

‘त्यांचं व्याख्यान ऐकून मी शिवमय झाले होते’
कथाकथन, व्याख्यान, नाटक, ‘जाणता राजा’ हे महानाट्य, पुस्तकं, विविध मालिकांसाठी संहिता लेखनात मार्गदर्शन अशा विविध माध्यमांतून त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र घराघरात पोहोचवलं. त्यांच्या व्याख्यानांना हजर राहणारे लोक त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात. “मी तेव्हा 23-24 वर्षांची असेल जेव्हा मी त्यांच्याकडून रायगडवर शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकलं. ऐकताना मी मंत्रमुग्ध होऊन गेले. ते अत्यंत पोटतिडकीनं सांगतात. ते चरित्र ऐकून मी शिवमय होऊन गेले,” असा अनुभव नाट्य दिग्दर्शक पद्मश्री राव सांगतात.

“शिवचरित्र प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं, त्यासाठी ते वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करतात. 97 व्या वर्षांतही ते तरुणांना लाजवेल या उत्साहाने काम करतात. आता जरी तुम्ही त्यांच्या घरी गेला तर ते वाचत बसलेले तुम्हाला आढळतील. त्यांना नवीन शिकण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर जे आपल्याला समजलं ते इतरांना समजावं, नवीन अभ्यासक, नवीन इतिहासकार तयार व्हावे असं त्यांना खूप वाटतं. त्यामुळे ते तरुणांना प्रोत्साहन देतात, त्यांना मदत करतात आणि त्यापेक्षा अधिक म्हणजे ते त्यांच्या कार्याला आशीर्वाद देतात,” असंही राव यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

राव या ‘शिवरुद्राचं दिग्विजयी तांडव’ या नाटकाच्या दिग्दर्शक आहेत. “ज्या वेळी या नाटकाची संहिता आम्ही पुरंदरेंना दाखवली तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, की हे नाटक लवकरच रंगमंचावर यायला हवं. त्यांनी जे प्रोत्साहन आणि आशीर्वाद दिले ते फार महत्त्वाचे वाटतं,” राव सांगतात.

इतिहास संशोधनाची पद्धत
‘गणगोत’मध्ये पु. ल. देशपांडे त्यांच्याविषयी लिहितात, “इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे; पण त्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधान करायचे नाहीत, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे.”

त्यांच्या इतिहास संशोधनाच्या पद्धतीबद्दल मंदार लवाटे सांगतात “त्यांची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे. शिवाजी महाराजांसंदर्भात कुठेही आलेला बारीक तपशील त्यांच्या लक्षात राहतात. त्यांच्या अभ्यासात सातत्य आहे. ते ‘हार्ड कोअर’ संशोधक आहेत पण शास्त्रीय पद्धतीने ते लिहिलं तर ते मोजक्या अभ्यासकापुरतंच मर्यादित राहतं असं त्यांना वाटतं म्हणून ते त्यांचा अभ्यास रंजक पद्धतीने मांडतात.”

महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद
2015 मध्ये महाराष्ट्र शासनाचा महराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना मिळू नये अशी मागणी देखील काही संघटनांनी केली होती.

‘दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हा असत्य इतिहास बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडला’, हा त्यांच्यावरील मुख्य आक्षेप त्यावेळी होता. “बाबासाहेब पुरंदरे यांनी दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, अशी भूमिका कुठेच घेतलेली नाही,” असं भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य पांडुरंग बलकवडे सांगतात.

त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर काही राजकीय पक्ष देखील समोरासमोर आले होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या निवडीवर विरोध दर्शवला होता तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुरंदरे यांचं समर्थन केलं होतं.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या 10 लाख रकमेपैकी फक्त 10 पैसे स्वतःकडे ठेऊन त्यात 15 लाख स्वतःचे घालून ती रक्कम पुरंदरे यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मदत म्हणून दिली होती.

‘सरकारचा निर्णय संशयास्पद’

बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्याचा निर्णय म्हणजे ‘निवडणुकीच्या काळात जाणीवपूर्वक केलेलं कार्य आहे,’ असं मत संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे.

बीबीसी मराठीकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, “लोक चिडले पाहिजेत, वाद निर्माण झाले पाहिजेत असा हेतू हा पुरस्कार देण्यामागे असावा. राजाशिवछत्रपती हा इतिहास नसून ती कादंबरी आहे. इतिहासाची उपलब्ध पुस्तकं असताना त्यांनी राजाशिवछत्रपतीसाठी त्यांचा वापर केला नाही. ‘राधामाधवविलासचंपू’, ‘बुधभूषण’, ‘शिवभारत’, ‘जेधेशकावली’ यांसारखी पुस्तकं आणि इतर पत्रव्यवहार उपलब्ध असूनही त्यांचा वापर या पुस्तकासाठी केला नाही. तसंच जेम्स लेनच्या लिखाणासाठी पूरक असं वातावरण त्यांनी तयार केले.

“जेम्स लेन आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे प्रकरण झाल्यावर त्यांनी आजवर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळेच आम्ही विरोध करत आहोत. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्यावेळेस राज्यभरात आम्ही 28 शिवसन्मान परिषदा घेतल्या होत्या. परंतु इतकं होऊनही पुन्हा त्यांना पुरस्कार देणं म्हणजे विशिष्ट विचारसरणीला पाठिंबा दिल्यासारखं मला वाटतं,” असं गायकवाड म्हणाले.

त्यांना स्वतःला काय वाटतं?
बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे इतर लोकांनी वाद केलेले आपल्याला दिसतील. पण ते स्वतःहून कोणत्या वादात अडकले, असं दिसत नाही. त्यांच्यात एक अलिप्तपणा आहे. स्वतःच्या कार्याकडे ते एका वेगळ्या दृष्टीने पाहतात असं वाटतं.

ते स्वतःच्या कार्याबद्दल ‘बेलभंडारा’मध्ये सांगतात, “मी जे काही केलं ते टीपकागदाप्रमाणे आहे. माझी स्वतःची बुद्धिमत्ता वा प्रतिभा मला स्वतःला कुठेच जाणवत नाही. जुन्या कागदपत्रातील आणि मावळी खेड्यापाड्यातील लोकांची भाषा मी जरा आलटून पालटून लिहिली आहे. लिहिलं आहे ते सत्यच आहे. पण माझं काय आहे? मी टीपकागद आहे. हा माझा विनय नाही प्रामाणिकपणा आहे.”

पद्मविभूषण मिळाल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे उत्तर दिलं, “छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकाळ यांचा शोध घेण्यासाठी सबंध आयुष्य वेचलेल्या एका विद्यार्थ्यांचा हा गौरव आहे. ज्या शिवचरित्रासाठी मी रानोमाळ हिंडलो, दऱ्याखोऱ्या भटकलो, कागदपत्रे गोळा केली, त्याचे अर्थ लावले त्या प्रदीर्घ अभ्यासाचा हा गौरव आहे. शिवचरित्राचा हा गौरव आहे.”


बाबासाहेब! 😢
काय म्हणतात अश्यावेळी? अनेक आठवणी आहेत. हात किंचित उंचावून तुम्ही ‘बाळ!’ इतकंच म्हणायचात. आपण चूक केलीये की कौतुकास्पद काही हे तेवढ्यातच कळून जायचे.
एवढ्या प्रचंड रंगमंचावरच्या एका कोपऱ्यात एका नृत्याच्या प्रवेशात एक गोष्ट राहून गेली. प्रवेश संपवून रंगमंचाच्या मागे उतरते आहे तोच तुम्हीही धावत तिथे पोचला होतात. ‘बाळ! गजरा राह्यला!’ एवढे तीनच शब्द. त्यादिवशी खरंतर आपण सगळेच शोकाकुल होतो, तुमच्या अंगाखांद्यावर वाढलेला विकी निघून गेला होता पुढे. पण त्यामुळे प्रयोगात कसूर होता कामा नये हे तेवढ्या एका कृतीत तुम्ही शिकवलेत. आजही मला बारीक सारीक गोष्टी नजरेआड करता येत नाहीत हे तुम्हीच शिकवलेले.
जाणता राजात रंगमंचावर जे घडायचं त्यापेक्षा ते घडवण्यासाठी मागे जे सर्व माणसाचं मिळून एका लयीत, एकाच शरीराचा सगळे जण भाग असल्यासारखं जे चालायचं ते मला अदभुत वाटायचं. सगळ्यांना एकत्र जोडून ठेवणारी ऊर्जा तुम्ही होतातच पण अश्या प्रयोगाचे स्वप्न बघणे हेच काहीतरी वेगळे होते.
रोजच्या प्रयोगाच्या आधी, तयार व्हायला सुरुवात करायच्या पूर्वी एक मिटिंग असायची. आदल्या दिवशीच्या प्रयोगाबद्दल काही सांगायचात. बारीक सारीक गोष्टी पक्क्या लक्षात असायच्या तुम्हाला आणि चुका, कौतुक दोन्ही आवर्जून सांगायचात. कौतुक जरा काकणभर जास्तच. आजच्या प्रयोगाच्या सूचना असायच्या. इतका मोठा माणूस रोज ठरवून तेवढा वेळ आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी देतो हे 17-18 वर्षाच्या मला फारच भन्नाट वाटायचं.
जाणता राजामुळे विक्रम गायकवाड ते निनाद बेडेकर अशी अनेक माणसे भेटली. करिअरची दिशा ते इतिहासाबद्दल प्रेम हे तिथेच मिळालं.
पुढे एका ठराविक विचारसरणीपासून मी खूप दूर निघून आले. पण तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रेम कधी कमी झाले नाही, होणार नाही.
तुमचे नाव आले की आजही मला तो आशिर्वादासाठी थोडासा उंचावलेला हात आणि अतिशय मृदू आवाजात ‘बाळ!’ म्हणणे हेच आठवते. ती शिदोरी आयुष्यभर पुरेल.

मानाचा मुजरा 🙏🙏🙏🌹🌹
आदरणीय बाबासाहेब …
तुमची व्याख्यानं ,पुस्तक वाचतचं आम्ही शाळा शिकलो ..शिवाजी महाराज आम्हांला तुमच्या व्याख्यानातूनच जास्त कळले.
व्याख्यानाला उभं राहताना सुरवातीलाच
“कोणीही विणकामाच्या सुया घेऊन स्वेटर विणत विणत व्याख्यानाला बसू नये हि विनंती …”अशी विनंती तुम्ही आवर्जुन करत असतं.
तसंच तुमचा सुरवात व शेवट करतानाचा तो त्रिवार मुजरा,तुमच्या मागे स्टेजवर तो लिहण्याचा फळा ,खडू ..त्यावर नकाशाद्वारे महाराज कुठल्या रस्त्याने गनिमी कावा करत आग्र्याहून सुटका करून घेतली व रंगीत खडूंनी महाराजांचे मुक्काम ,मार्ग अधोरेखित करत ,शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी कवि भूषण महाराजांच्या दरबारात जाऊन आपली कविता सादर करतात ती रचना तुमच्या तोंडून अत्यंत जोशपूर्ण ऐकतांना अंगावर शहारे यायचे ..
इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर,
रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर,
ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,
‘भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,
त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥
सेर शिवराज है
सेर शिवराज है
हे तुमच्या तोंडून ऐकतांना तर साक्षात असं वाटायचं सेर डरकाळ्या फोडत स्टेजवर महाराजांना मुजरा करतोय की काय न अंगावर सरसरून काटा यायचा .
‘श्रीमानयोगी ‘हा ग्रंथ मी तुमची व्याख्यानं ऐकून शालेय जीवनातच संपूर्ण वाचून काढला .
न माझ्या पुस्तकांच्या कपाटात अजुनही तो ग्रंथ तितक्याच दिमाखात उभा आहे.🙏
बाबासाहेब तुम्ही आमच्या मनातला ‘सिवा’ जिवंत ठेवला ..🙏
आमच्या मानाचे स्थान ,महाराष्ट्राचा अभिमान तुम्ही सतत जागृत ठेवला.🙏
जिजाऊ महारांजांच आपल्या महाराष्ट्रावरचं बरंचसं ऋण तुम्ही फेडलतं ..🙏
आजच्या आर्यन खानाचे सुटका झाल्यानंतरचे ढोल वाजवून स्वागत करणाऱ्या वाह्यात गोष्टींना विरोध करण्याचं सामर्थ्य तुम्हीच दिलंत …🙏🌹
खूप मोठे उपकार आहेत तुमचे आमच्यावर ..इतके अभिरूचीपूर्ण बालपण आम्हांला तुमच्यामुळे मिळालं …
आमची पिढी घडवण्यात तुमचा खूप मोठा वाटा आहेत…
शिवाजी महाराजांच वेड लावलतं तुम्ही आम्हांला बाबासाहेब 🙏🌹
‘जाणता राजा ‘हे तुमचं महानाट्य म्हणजे आम्हां शिवप्रेमींसाठी एक सुंदर पर्वणी होती..
‘दार उघड बये दार उघड’ म्हणत गागाभट्टांचा ते तुळजा भवानीला आर्त साद घालत , साक्षात जिवंत हत्ती ,घोडे स्टेजवर धावत ..व सरतेशेवटी राज्याभिषेकाचा नयनरम्य ,अद्भूत सोहळ्याचं नाट्य बघताना एक अलौकिक आनंद व रोमांच उभ राहत असे .
👏🏻👏🏻👏🏻🙏🙏
साहित्य प्रसारचे कुलकर्णी काका हे आमचे परिचित होते त्यांचे तुमचे घनिष्ट संबंध होते .त्यांच्यामार्फत तुम्हांला भेटण्याची खूप इच्छा होती …राहून गेलं ..😞
पण तुमच्या व्याख्यानातून न पुस्तकांतून तुम्ही सतत भेटत राहिलात न राहाल ..🙏
शिवासारखा राजा परत होणे जसं शक्य नाही तसंच आदरणीय बाबासाहेब पुरंदऱ्यांसारखा ‘ इतिहासकार साहित्यिक शिवप्रेमी मावळा ‘ह्या महाराष्ट्राला पुनःश्च लाभणे पण शक्य नाही ..🙏
प्रौढ़प्रताप, पुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक, हिन्दवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलभूषण, सिन्हासनाधिश्वर, राजा धिराज, महाराज, योगिराज, श्रीमंत, श्री छत्रपति शिवाजी महाराज की, जय..! जय भवानी, जय शिवाजी… 🙏🙏

भावपूर्ण श्रध्दांजली !!🙏🙏🌹😞

Aarti Mahajan

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: