गणेशोत्सव २०२१

श्रीगजाननाची स्थापना करून या वर्षाच्या गणेशोत्सवाची सुरुवात केली आहेच.

या कालावधीत मला मिळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण लेखांचे संकलन मी या पानावर करणार आहे. जसजसे लेख आणि चित्रे मिळत जातील तसतशी ती या पानावर देत जाईन . मला यातले बहुतेक लेख व चित्रे फेसबुक किंवा वॉट्सॅपवर मिळणार आहेत. सर्व मूळ लेखकांचे मनापासून आभार मानून त्यानी आपली अनुमति द्यावी अशी विनंति आधीच करत आहे. दि.१०-०९-२०२१

गणपतीची ११ संस्कृत स्तोत्रे आणि गणेश पुराणाचे मराठीतून संक्षिप्त ओवीबद्ध रूपांतर इथे : https://anandghan.blogspot.com/2021/07/blog-post_15.html

माझा हा जुना संग्रह अवश्य पहा : गणेशोत्सव २०१९ : https://anandghare.wordpress.com/2019/09/08/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%af/

🔆ॐ गं गणपतये नमः🔆

‼ श्री गणेश पंचरत्न स्तोत्र ‼

मुदाकरात्त मोदकं सदा विमुक्तिसाधकम् ।
कलाधरावतंसकं विलासि लोकरक्षकम् ।
अनायकैक नायकं विनाशितेभदैत्यकम् ।
नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् ॥

नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरम् ।
नमत्सुरारि निर्जरं नताधिकापदुद्धरम् ।
सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं ।
महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् ॥

समस्त लोकसंकरं निरस्तदैत्यकुंजरम् ।
दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् ॥
कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करम् ।
मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् ॥

अकिंचनार्तिमार्जनं चिरन्तनोक्ति भाजनम् ।
पुरारिपूर्व नन्दनं सुरारि गर्वचर्वणम् ॥
प्रपंच नाशभीषणं धनंजयादि भूषणम् ।
कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् ॥

नितान्तकान्तदन्तकान्ति मन्तकान्तकात्मजम् ।
अचिन्त्य रुपमन्तहीन मन्तरायकृन्तनम् ।
ह्रदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनाम् ।
तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् ॥

फलश्रुती

महागणेश पंचरत्नम् आदरेण योन्वहम् ।
प्रजल्पति प्रभातके ह्रदि स्मरन् गणेश्वरम् ॥
अरोगितामदोषतां सुसाहितीं सुपुत्रताम् ।
समाहितायु रष्टभूतिमभ्युपैति सोचिरात् ॥

🌹🌿🔆🌸🙏🌸🔆🌿🌹

दुर्वांचे महत्व का? आणि २१ दुर्वा का?

दुर्वा हा शब्द = दु: + अवम. दु: म्हणजे दूरचा – अर्थात परमात्मा, अवम = जवळ येऊ दे. थोडक्यात आत्मा आणि परमात्मा दोन्ही एकत्र येऊ देत अशी प्रार्थना म्हणजे दुर्वा.
संपूर्ण मी, माझ्या तिन्ही देहासकट( देह्त्रय = स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर) तुला अर्पण करतो अशा भावनेने ३ तृणाची दुर्वा वाहायची.
२१ वेळा का? मांडुक्य उपनिषदात आपल्या शरीराचे भाग सांगितले आहेत. ते म्हणजे ५ ज्ञानेंद्रिये (कान, डोळे, जीभ, त्वचा, नाक ), ५ कर्मेंद्रिये (हात,पाय इ.) ५ प्राण(प्राण, अपान, समान, उदान, व्यान), मन, बुद्धी(बुद्धीचे २ भाग – मेधा(स्मरणशक्ती), प्रज्ञा (विवेकबुद्धी), अहंकार, चित्त. या सर्व २० भागांनी आणि आत्मा – अशा सर्व २१ गोष्टी म्हणजे संपूर्ण मी ! असा पूर्ण मी तुझ्याशी एकरूप होऊ दे म्हणून २१ दुर्वा वाहतात.
एक मराठीतील भक्तीगीत – अष्टांगाची करुनी घडी, वाहतो ही दुर्वांची जुडी – त्यात दूर्वांची जुडी म्हणजे पूर्ण आपण हा अर्थ सहजतेने सांगितला आहे.

– नीलिमा कुलकर्णी, रेस्टन, वर्जिनिया

. . . . . . . . . . .

🤔 बाप्पाचा प्रत्येक अवयव आपल्याला काय शिकवितो?

गणपती बाप्पाचा प्रत्येक अवयव म्हणजे शिक्षकच. ज्यापासून आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. चला तर, जाणून घेऊया, बाप्पाचा प्रत्येक अवयव आपल्याला काय-काय शिकवितो?
▪️ शीर : बाप्पाचे मस्तक हत्तीचे असून हत्ती हा सर्व प्राण्यांपैकी सर्वात बुद्धिमान आहे. याचा अर्थ असा की आयुष्यात उंची गाठण्यासाठी बुद्धिमान व्हायला हवे.
▪️ मोठे कान : बाप्पाचे कान सूपासारखे असतात आणि सूपाची खासियत म्हणजे टरफल फेकून अन्न (सत्व) ठेवणे. याचा अर्थ असा आहे की आपण सर्वांचे ऐकतो, पण त्यातून चांगल्या गोष्टींचे सार घ्या आणि बाकीचे सोडून द्या.
▪️ छोटे डोळे : हे व्यक्तीला जीवनात सूक्ष्म दृष्टी ठेवण्यासाठी प्रेरणा देतात. तथापि ते दीर्घदृष्टीचेही सूचक आहेत.
▪️ लांब सोंड : हे आपल्याला दूरदृष्टी ठेवण्यास शिकवतो. याचा अर्थ असा की आपण दूरच्या विचाराने चालले पाहिजे आणि कोणत्याही धोक्याची अगोदरच जाणीव करून घेण्याचा किंवा त्याचा अंदाज घेण्याची गुणवत्ता असावी.
▪️ लांब पोट : बाप्पाला लंबोदर असेही म्हणतात. त्याच्या पोटाचा मोठा आकार म्हणजे प्रत्येकाच्या ऐकलेल्या गोष्टी आपल्या पोटात ठेवाव्यात.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .


गणेश चतुर्थी विशेष

गणों के ईश का नाम गणेश है। गणेशजी शिरोभाग में निवास करते हैं।नेत्र, श्रोत्र, नासिका, त्वचा, जिह्वा-ये सब इन्द्रियगण हैं। जो इनका स्वामी है, जो इनको अपने काबू में रखने वाला है, उसको गणेश बोलते हैं। वेदों में जो मन्त्र अाते हैं-‘गणानां त्वा गणपतिं गुं हवामहे’; निसुषीद गणपति गणेषु’; इत्यादि, उनसे यह सिद्ध होता है कि गणेश प्रज्ञा के देवता हैं, और भी जहाँ-जहाँ गणपति की चर्चा आती है, वहाँ-वहाँ यह सिद्ध होता है कि गणेश बुद्धि के देवता हैं।अपनी प्रज्ञा की शुद्धि के लिये प्रज्ञा के अधिपति गणेशजी की वन्दना करनी चाहिये।

गणेशजी को यह वरदान प्राप्त है कि किसी भी कार्य के प्रारम्भ में उनकी वन्दना करने से वह कार्य निर्विघ्न रूप से सिद्ध हो जाता है।

नारायण! कोई भी काम प्रारम्भ करना हो, तो उसकी निर्विघ्नता से पूर्ति और अभिवृद्धि के लिये सबसे पहले गणेशजी की वन्दना करनी चाहिये। ‘गोस्वामी तुलसीदासजी महाराज’ अपने अमृतमय-रसमय ग्रन्थ ‘श्रीरामचरित मानस’ की रचना करते समय सबसे पहले वर्ण, अर्थ, रस, छन्द और मंगल के मालिक वाणी और विनायक का वन्दन करते हुये कहते हैं-

 वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि।
 मड़्गलानां च कर्त्तारौ वन्दे वाणीविनायकौ।।

स्वामी अखण्डानन्द सरस्वती, वृन्दावन


🌹गणेशाचा अभंग🌹

उत्सवा कारणे येई प्रथमेश
लाडका गणेश घरोघरी ll
होई आगमन वाजत गाजत
रांगोळी दारात रेखियली ll
भावपूर्ण सारे भक्तीमय वारे
सजली मखरे बाप्पासाठी ll
घातले मंडप लागली तोरणे
आले हो पाहुणे गणराज ll
तोच उध्दारक चैतन्य प्रेरक
तोच संजीवक सर्वांसाठी ll
सुखाचा कारक दीनांचा तारक
करु या मोदक नैवेद्यासी ll
रुपाचे लावण्य विलसली प्रभा
आनंदाचा गाभा गवसला ll
देवा गणराया लाभो तुझी साथ
पाठीवरी हात असू द्यावा ll
🙏🙏🙏🙏

शांता लागू.. पणजी गोवा. . . . . वॉट्सॅपवरून साभार

************************************

परदेशांमधील गणपतीच्या मूर्ती

जगातली गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती

गणपतीच्या उंचीच्या बाबतीत बोलायचं झालं, तर जगातली गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती भारतात नाही, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
थायलंडच्या ख्लॉन्ग ख्वान्ग शहरामध्ये जगातली सगळ्यात मोठी गणपतीची मूर्ती आहे. या शहरामध्ये गणेश इंटरनॅशनल पार्क बनवण्यात आलं आहे, तिकडेच ही ३९ मीटर उंच गणपतीची कांस्याची मूर्ती आहे.
गणपतीच्या मूर्तीच्या डोक्यावर कमळाचं फूल आणि त्यामध्ये ओम लिहिलं आहे. या मूर्तीला कांस्याच्या ८५४ वेगवेगळ्या भागांपासून बनवण्यात आलं आहे. गणपतीच्या मूर्तीसह हे पार्क बनवायला २००८ ते २०१२ अशी ४ वर्ष लागली. थायलंडमध्ये जी ४ फळं पवित्र मानली जातात, त्या फळांना गणपतीच्या हातात ठेवण्यात आलं आहे. यामध्ये फणस, आंबा, ऊस आणि केळ्याचा समावेश आहे.
थायलंडमध्ये आंब्याला समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. गणपतीच्या पोटावर सापाने वेटोळे घातले आहेत, तर बाप्पाच्या सोंडेमध्ये लाडू आणि पायाखाली उंदीर आहे. थायलंडमध्येही गणपतीला ज्ञान आणि बुद्धीमत्तेची देवता म्हणून मानलं जातं.
थायलंडमध्ये गणपतीची ही मूर्ती नेमकी बनवली कोणी याचा किस्साही रंजक आहे. थायलंडमधली अयोध्या म्हणजेच अयुथ्या साम्राज्याबाबत विस्ताराने वाचलं असता, याचे दाखले मिळतात. या साम्राज्यामध्ये चाचोएंगशाओ नावाचं शहर १५४९ मध्ये वसवण्यात आलं होतं. याच शहराची चाचोएंगशाओ असोसिएशन ही संस्था धार्मिक आणि सामाजिक कार्य करायला नेहमीच पुढे असते. या असोसिएशनचे अध्यक्ष पोल जेन समाचाई वानीशेनी यांनी जगातली गणपतीची सगळ्यात मोठी मूर्ती बनवायचं ठरवलं. यानंतर त्यांनी जागा शोधायला सुरूवात केली.
संस्थेला ख्लॉन्ग ख्वान्ग शहरात ४० हजार वर्ग मीटर जागा निश्चित करण्यात आली. ही जमीन सुपीक आणि कृषीप्रधान क्षेत्र असल्यामुळे ही जागा गणपतीची मूर्ती स्थापन करण्यासाठी निवडण्यात आली. सगळ्यात आधी या जागेवर इंटरनॅशनल गणेश पार्क बनवण्यात आलं. यानंतर मग मूर्ती बसवण्यात आली.
चाचोएंगशाओ असोसिएशनने इकडे एक सेंट्रल म्युझियमही बनवलं आहे. स्थानिक इतिहासाचं संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी हे म्युझियम बनवण्यात आलं. या भागामध्ये कित्येक शतकांपासून हिंदू संस्कृतीही नांदत आहे.
मागच्या काही वर्षांपासून थायलंडच्या बँक पॅकांग नदीच्या आसपासचं क्षेत्र सगळ्यात मोठं पर्यटन क्षेत्र झालं आहे. त्यामुळे तिथले लोक आंतरराष्ट्रीय देवाची सगळ्यात मोठी मूर्ती तिकडेच असावी, अशी मागणी करत होते. अखेर गणपतीची मूर्ती बसवण्यावर सगळ्यांची सहमती झाली.
गणपतीची जगातली सगळ्यात मोठी मूर्ती तिथले प्रख्यात मूर्तीकार पिटक चर्लेमलाओ यांनी तयार केली आहे.

गणपतीची ही मूर्ती जगातली सगळ्यात उंच असून अजूनपर्यंत कोणीही यापेक्षा उंच मूर्ती असल्याचा दावा केला नसल्याचं असोसिएशनने सांगितलं आहे.

*****

वैश्विक गणेश यात्रा / १ … उगवत्या सूर्याच्या देशात…

जपान. उगवत्या सूर्याचा देश. प्राचीन सांस्कृतिक परंपरा असलेला समृध्द आणि सुसंस्कृत देश.
अश्या ह्या जपान मध्ये आपल्या विघ्नहर्त्या गजाननाची एकूण २४३ मंदिरं आहेत. ही सर्व मंदिरं सुमारे चारशे ते चौदाशे वर्षांपूर्वी बांधलेली आहेत. जपान्यांचं कौतुक असं, की त्यांनी ही सर्व मंदिरं नुसती जपलीच नाहीत, तर ती नांदती ठेवली. या सर्व मंदिरांमध्ये रोजची पूजा-अर्चा व्यवस्थित होईल, अशी एक पध्दती विकसित केली. त्यामुळे टोकियो मधील ‘असाकुसा’ चे ‘मात्सूचियामा शोदन मंदिर’, जे सन ६०१ मध्ये बांधल्या गेलं होतं, ते आजही तसंच आहे. यातील श्री गणेशाची मूर्ती ही १४२० वर्ष जूनी आहे.
जपान मध्ये गणपती ला साधारण पणे ३ – ४ नावांनी ओळखतात. ‘बिनायक-तेन’ हे त्यातील एक नाव. जपानीत ‘तेन’ म्हणजे देव, ईश्वर. ‘गनबाची’, ‘गनवा’, ‘गणहत्ती’ ही नावं सुध्दा चालतात. पण जपान मध्ये गणपती साठी सर्वात प्रचलित असलेलं नाव आहे – ‘कांगितेन’. जपान मध्ये गणेशाचं आगमन झालं ते प्रामुख्याने बौध्द भिक्षुंच्या माध्यमातून. ओडिशा च्या बौध्द भिक्षुन्नी ‘तांत्रिक बौध्द धर्मात’ गती घेतली होती. ते प्रथम चीन मध्ये गेले आणि नंतर तेथून जपान मध्ये. साधारण दीड हजार वर्षांपूर्वी, जपानी लोकांना, ‘गणपति’ ह्या देवतेची ओळख झाली.
आपल्या भारता सारखंच, जपान मध्ये सुध्दा गणेशाला ‘विघ्नहर्ता’ समजलं जातं. पण यात थोडा फरक आहे. जपानी मान्यतेनुसार गणपती ही देवता, पहिले एखाद्या कामात अडथळे निर्माण करते आणि मग मात्र पूर्ण ताकतीनिशी, ह्या सर्व अडथळ्यांचं निवारण करून मांगल्य निर्माण करते.

ऐतिहासिक हिरोशिमा शहाराजवळ ‘इत्सुकूशिमा’ द्वीपावर गणेशाचे एक अत्यंत प्राचीन मंदिर आहे – ‘दाईशो – इन’. असं म्हणतात, हे मंदिर सन ८०६ मध्ये बांधण्यात आलं. पण हे त्या ही पेक्षा जुनं असावं. गंमत म्हणजे, आपल्या गणेशाचा जपानी अवतार, ‘मोदक’ फारसा खात नाही. त्याची आवडती गोष्ट म्हणजे ‘मुळा’. होय. मुळा… अनेक प्राचीन मूर्तींमध्ये गणेशाच्या हातात, शस्त्रांसोबत ‘मुळा’ दाखविलेला आहे. मात्र मोदकाचेही एक विशिष्ट स्थान जपान मध्ये आहे. भारतीय मोदकाचा अवतार, ‘कांगिदन’ या नावाने जपान मध्ये प्रचलित आहे. ह्या गोड ‘ब्लिस बन’ चा नैवेद्य, गणपती ला दाखवला जातो. असं म्हणतात, जपान मध्ये ‘इदो (तोकुगावा) काळात, म्हणजे सतराव्या शतकापासून, एकोणीसाव्या शतकाच्या काळात, ‘कांगितेन’ ची हजारो मंदिरं होती. भक्तगण मोठ्या संख्येने गणेशाच्या जपानी अवताराची पूजा करायला यायचे. सध्या मात्र २४३ मंदिरं सुस्थितीत आहेत.

जपान मध्ये दोन तोंडांच्या गणपतीचे सुध्दा प्रचलन आहे. त्याला ‘सशीन कांगितेन’ म्हटलं जातं. आपल्या पुराणात जी ‘नंदिकेश्वराची’ कल्पना आहे, तीच ही देवता. जुन्या मूर्तींवर, चित्रांवर, वस्तूंवर ह्या ‘सशीन कांगितेन’ चा ठसा आहे. दक्षिण जपान च्या ओसाका शहराच्या बाहेर असलेलं, गणेशाचं ‘होझांजी मंदिर’ हे जपान मधील श्री गणेशाच्या, सर्वाधिक भक्त संख्या असलेल्या मंदिरांपैकी एक आहे. तुलनेने अलिकडच्या, म्हणजेच सतराव्या शतकात बांधलेल्या ह्या मंदिरा बद्दल, जपान्यांच्या मनात प्रचंड श्रध्दा आहे.
जपान मध्ये गणेशाची काही मंदिरं अगदी अलीकडे, म्हणजे गेल्या पन्नास वर्षात बांधलेली आहेत. त्यातील चिबा शहराच्या साकुरा भागात असलेलं ‘गणेश मंदिर’, प्रसिध्द असून याच नावाने ओळखलं जातं.

एकुणात काय, तर सूर्याचं सर्वप्रथम दर्शन घेणार्‍या ह्या देशात, गणेश भक्तीची परंपरा फार प्राचीन आणि सनातन आहे. आणि आता तर गणेश भक्तांची संख्याही वाढते आहे.

प्रशांत पोळ . . . . वैश्विक_गणेश #GlobalGanesh

बाप्पा इंडोनेशियातील

भारताबाहेर अनेक देशात गणपती बसविले जातात .तसेच गणपतीवर श्रद्धाही आहे. इंडोनेशियातील माउंट ब्रोमो येथे असलेल्या जागृत ज्वालामुखीचे विवराजवळच ७०० वर्षांपूर्वी या गणपतीची स्थापना झाल्याचे सांगितले जाते. इंडोनेशियातील चलनी नोटेवरही गणपतीचे चित्र आहे.


समर्थ रामदास स्वामी स्थापित शिवकालीन श्रीगणेशोत्सव !


सुखकर्ता दुःखहर्ता……ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हटली जाते. ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे. गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे. भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे. प्रचलीत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.
“समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !! सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !!” समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले. दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती. या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो. वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ! हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!४ ते माघ शु.!! ५ गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे. या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली . त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो . समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !! आकारा आकरी खंडी कोठी पाठविली ! हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया!! ११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे. पहा….. दास रामाचा वाट पाहे सदना ! संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !! शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी १८ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला.

  • प्रसन्न खरे
    (माहिती आंतरजालावरून संग्रहित)

दगडूशेट हलवाई गणपती

पुण्यातील अत्यंत प्रासादिक दगडूशेठ गणपतीच्या इतिहास …पुण्यातील जुन्या काळातील नामवंत मल्ल.
पैलवान दगडूशेठ किसनशेठ हालवाई .
संस्थापक – जगोबादादा तालीम व दगडू शेठ हलवाई गणपती.

सन १८५६ साली जन्मलेल्या दगडूशेठ हलवाई यांना कुस्तीचा प्रचंड छंद होता. त्याकाळी जगोबादादा हे मल्लविद्येचे उपासक पुण्यात होते, किसनशेठ हलवाई हे व्यापारी व्यक्तिमत्व, मिठाई चा मोठा व्यापार त्यांनी भारतभर विस्तारला होता, पण अर्थार्जनाबरोबर शरीर संपदा उत्तम हवी अशी त्यांची धारणा असायची. स्वतः सतत प्रवास करण्याने त्यांना व्यायाम करणे जमत नसे मात्र आपल्या मुलाने मोठे पैलवान व्हावे अशी त्यांची खूप इच्छा होती.
जगोबादादा यांना त्यांनी त्याकाळी स्वतःच्या जागेत पत्र्याचे शेड बांधून तालीम उभी करून दिली.
जगोबादादा हे खूप नामांकित मल्ल होते ते त्यांच्या डाव पेचावर, अनेक मल्ल त्यांनी या तालमीत घडवले, याच तालमितील मल्ल पुढे पुढे स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा सहभागी झाले.

किसनशेठ हलवाई यांचे चिरंजीव दगडूशेठ हलवाई हे वडिलांप्रमाणेच दानतदार व्यक्तिमत्व. वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी जगोबादादा यांचेकडे कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरवात केली. दगडूशेठ हे स्वतः गणपती चे परमभक्त होते.पुणे म्हणजे जिजाऊ मासाहेबांची स्थापन केलेले शहर. शहराची स्थापनाच गणपती च्या अधिष्ठानाने झाली असल्याने बहुतांशी लोक गणपती चे परमभक्त होते. दगडू शेठ हलवाई यांच्या घराजवळ सुद्धा एक छोटे गणपती चे मंदिर होते.

दरम्यान दगडू शेठ हलवाई यांची कुस्ती ठरली त्याकाळचे प्राख्यात मल्ल पुंजीराम काची या बलाढ्य मल्लासोबत. कुस्तीच्या दिवशी जगोबादादा यांनी गणपतीला नवस करून दगडूशेठ याच्या विजयासाठी निर्जळी उपवास केला होता. कुस्तीचा दिवस उगवला व ठरल्या प्रमाणे तुफानी लढत झाली व दगडूशेठ यांनी काची पैलवान वर मात केली आणि पुण्यातून विजयी मिरवणूक निघाली. या विजयामुळे महाराष्ट्रभर दगडूशेठ यांचे नाव झाले,त्यांच्या विजयाचे श्रेय त्यांनी त्यांचे वस्ताद जगोबादादा व गणपती यांना दिले व त्याकाळी लाखो रु.खर्चुन जगोबादादा यांना कायम स्वरूपी पक्की तालीम व “श्रीमंत दगडूशेठ हलवाई” हे गणपती चे मंदीर उभा करून लोकांना अर्पण केले.
जगोबादादा हे आजन्म ब्रम्हचारी राहिले व लाल मातीची सेवा करत राहिले व त्यांनी शेवटचा श्वास सुद्धा तालमीतच घेतला.

पुढे दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर हे पुण्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्र नव्हे तर जगभर प्रसिद्ध झाले…एका छोट्याश्या मंदिरातील गणपती ला आज इतके भव्य रूप येईल हे त्याकाळी हलवाई पैलवानांना वाटले देखील नसावे.

माणसे जन्माला येतात व मरून जातात,सृष्टीचे हे चक्र कधीच थांबत नाही,पण त्यांनी उभी केलेली चळवळ,रुजवलेले विचार आणि अग्निसारखे धगधगते जगलेले जीवन कधीच मृत्यू मारू शकत नाही,त्यापैकी एक म्हणजे कै. पै.दगडूशेठ हलवाई होय. आज पुण्यातील मल्लविद्येच्या वैभवाचा श्रीगणेशा करणारे दगडूशेठ हलवाई यांचे विसमरण होऊ नये.

|| श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती || पुणे

सन १८९३ श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिध्द मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वत: व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही व्यथीत झाले.

दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री.माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की,आपण काही काळजी करू नका, आपण श्री दत्त महाराज व श्री गणपतीची मुर्ती तयार करा व त्याची रोज पुजा करा व ही दोन दैवते आपल्या।मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी श्री दत्त महाराजांची एक संगमरवरी व श्री.गणपतीची मातीची मुर्ती बनविली व ती गणपती बाप्पाची मुर्ती म्हणजेच आपली पहिली मुर्ती आहे. ही पहिली मुर्ती आज सुध्दा आपण शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पुजा चालू आहे.
ह्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे,भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यासह सर्व थरातील लोकांनी एकत्र येऊन या समारंभाची मंगलज्योत प्रदिप्त केली. तिच्या मंद पण तेजस्वी प्रकाशात आसमंत उजळून निघाले.
भक्तिची धूप आणि श्रध्देची निरांजन लावून ही जी पुजा त्यांनी केली त्यास सर्व थोर लोकांनी मनोमन आशीर्वाद दिले आणि अशा रितीने ही मंगल परंपरा सुरू झाली.

सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मुर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतू त्यांनी निर्माण केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी, तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती कै. श्री. दगडूशेठ हलवाई बाहूलीचा हौद, सार्वजनिक गणपती म्हणून प्रचलित होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरूण मंडळ करीत होते. सध्या ही मुर्ती आपल्या बाबुराव गोडसे कोंढवा येथील पिताश्री वृध्दाश्रमातील मंदिरात आहे.

सन १८९६ साली केलेल्या मुर्तीची थोडी जीर्ण अवस्था झाली होती व सन १९६७ साली आपल्या गणपती बाप्पाच्या अमृत महोत्सव साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सुवर्णयुग तरूण मंडळाच्या प्रमुख म्हणजेच सर्वश्री प्रताप गोडसे, दिंगबर रासने, रघुनाथ केदारी, शंकर सुर्यवंशी, चंद्रकांत दरोडे, उमाजी केदारी, प्रल्हादशेठ शर्मा, रमाकांत मारणे, वसंत कोद्रे, कांता रासने, दत्तात्रय केदारी, उल्हास शेडगे, उत्तम गावडे यांनी बऱ्याच कार्यकर्त्यांनी नविन गणपतीची मुर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिध्द शिल्पकार श्री.शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मुर्ती आकृती म्हणून करून घेतली व श्री.बाळासाहेब परांजपे यांनी प्रोजेक्टर वरून मोठया पडद्यावर कार्यकर्त्यांना दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मुर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर प्रत्यक्ष मोठया मुर्तींचे काम सुरू झाले. संपूर्ण मुर्ती तयार झाल्यानंतर श्री.शिल्पी यांनी त्याकाळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली. श्री. गणेश यंत्राची पुजा केली व त्यानंतर ज्याठिकाणी मातीची मुर्ती तयार केली, त्या ठिकाणी येऊन विधीवत धार्मिक गणेश याग केला व ते सिध्द श्रीयंत्र मंगलमुर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. या मंगलमुर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पुजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले.

आजतागायत हे सर्व अत्यंत निठेने व प्रामाणिकपणे सुरू आहे व त्यामुळे आपणा सर्वांना त्या गणपती बाप्पाचे आर्शिवाद लाभले आहेत. अशा प्रकारे सध्या आपल्या गणपती मंदिरात असलेली श्रींची सर्वांग सुंदर,नवसाला पावणारी व त्याकाळी सुमारे ११२५/- (एक हजार एकशे पंचवीस रूपये) ही मुर्ती बनविण्याचा खर्च आला होता.
🙏©️®️🙏

गणपती बाप्पा मोरया । पुढच्या वर्षी लवकर या ।

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s