एकोणिसाव्या शतकातल्या थोर व्यक्ती

एकोणिसाव्या शतकातल्या महाराष्ट्रात अनेक मोठ्या विभूति होऊन गेल्या. त्यांनी साहित्य, समाजजीवन, राजकारण अशा विविध क्षेत्रातल्या पुढील काळातल्या सुधारणांचा पाया घातला असे म्हणता येईल. मी लहानपणी त्यांची फक्त नावेच ऐकली किंवा वाचली होती, पुढच्या पिढ्यांनी ती कधी ऐकलीही नसतील. अशा काही विद्वानांची थोडक्यात माहिती मी या ब्लॉगवर संग्रहित करीत आलो आहेच. आणखी काही व्यक्तींची माहिती मी मुख्यत्वे श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकाच्या भिंतीवरून या लेखात संग्रहित केली आहे.

या पानावर पहा :

१. बाळशास्त्री जांभेकर
२. केरूनाना छत्रे
३. पुण्याचे चाफेकर बंधू
४. रियासतकार सरदेसाई
५. पं.कृष्णशास्त्री चिपळूणकर
६. डॉ.भाऊ दाजी लाड
७. श्री.गोपाळ गणेश आगरकर
८. लेखक रामचंद्र गुंजीकर
९. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे
१०. जमशेदजी टाटा
११. सर जमशेटजी जीजीभॉय

१२. रावबहाद्दूर डॉ.वि.रा.घोले

नामदार गोपाळ कृष्ण गोखले, आद्य नाटककार विष्णुदास भावे, देवल, किर्लोस्कर, महात्मा फुले, तर्खडकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, ह.ना.आपटे, केशवसुत, जगन्नाथ शंकरशेट, लहूजी उस्ताद आणि डॉ,रखमाबाई यांची माहिती मी पूर्वी वेगळी दिली आहे ती या दुव्यांवर पहावी.

नामदार गोपाळ कृष्ण गोखले
https://anandghare.wordpress.com/2021/05/10/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%96%e0%a4%b2%e0%a5%87/

आद्य नाटककार विष्णुदास भावे, देवल, किर्लोस्कर
https://anandghare.wordpress.com/2019/01/21/%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%ad/

महात्मा ज्योतिबा फुले
https://anandghare.wordpress.com/2020/09/23/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%87/

दादोबा पांडुरंग तर्खडकर
https://anandghare.wordpress.com/2019/04/30/%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%a5%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5/

विष्णुशास्त्री चिपळूणकर
https://anandghare.wordpress.com/2019/03/17/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a5%82%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%b0/

आद्य कादंबरीकार हरी नारायण आपटे
https://anandghare.wordpress.com/2021/03/03/%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be/

कवी केशवसुत
https://anandghare.wordpress.com/2019/01/25/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a4/

मुंबईचे शिल्पकार नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ
https://anandghare.wordpress.com/2020/12/12/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%b0/

आद्य क्रांतिकारकांचे गुरु लहूजी वस्ताद
https://anandghare.wordpress.com/2020/02/18/%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0/

डॉक्टर रखमाबाई भिकाजी राऊत
https://anandghare.wordpress.com/2019/12/10/%e0%a4%a1%e0%a5%89%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0-%e0%a4%b0%e0%a4%96%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88/

मुंबईला ‘धक्का’ देणारा भाऊ लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य
https://anandghare.wordpress.com/2018/08/15/%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%8a-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3/


१. बाळशास्त्री जांभेकर

हे बहुधा सर्वात जुने असावेत. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर आणि १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या आधीच्या काळात त्यांनी आपले कार्य केले आहे.

मराठी वृत्तपत्रव्यवसायाचे जनक आणि पहिल्या आंग्लशिक्षित पिढीतील अग्रगण्य विद्वान बाळशास्त्री जांभेकर, यांची आज पुण्यतिथी . त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी. गंगाधरशास्त्री ह्या व्युत्पन्न पित्याच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मुंबईस येऊन सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. अनेक भारतीय व परदेशी भाषांचा त्यांनी परिचय करून घेतला होता. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे ‘नेटिव्ह सेक्रेटरी’, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफसर, शाळा तपासनीस, अध्यापनशाळेचे (नॉर्मल स्कूल) संचालक अशा अनेक मानाच्या जागांवर त्यांनी काम केले. त्यांना ‘जस्टिस ऑफ द पीस’ ही करण्यात आले होते (१८४०).
दर्पण हे वृत्तपत्र १८३२ मध्ये काढून मराठी वृत्तपत्रव्यवसायाचा त्यांनी पाया घातला. दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक त्यांनीच १८४० मध्ये काढले. लोकशिक्षण व ज्ञानप्रसार हेच हेतू या उपक्रमांमागे होते.
भूगोल, व्याकरण, गणित, इतिहासादी विषयांवर त्यांनी ग्रंथरचना केली. काही पाठांतरे नोंदवून त्यांनी ज्ञानेश्वरीचे संपादन केले. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या कार्यात भाग घेणारे ते पहिले एतद्देशीय विद्वान होत. या संस्थेच्या त्रैमासिकात भारतीय शिलालेख व ताम्रपट यांसंबंधी त्यांचे संशोधनात्मक निबंध येत असत.
त्यांचे विचार प्रगमनशील होते. ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली. अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत त्यांचे निधन झाले.

२. केरूनाना छत्रे


यांना भारतातल्या विज्ञानाचे पुनरुज्जीवन केल्याचे श्रेय देता येईल. ते बाळशास्त्रींचे शिष्य होते

गणित, खगोल आणि पदार्थविज्ञानासारख्या अवघड विषयातच नव्हे तर सृष्टिशास्त्र, पंचांग शुद्धीकरण आणि हवामानशास्त्रातही पारंगत असणाऱ्या केरुनाना छत्रे आज पुण्यस्मरण . त्यांच्याविषयी लिहिताना ‘टाइम्स’नं म्हटलं होतं, ‘‘प्रो. छत्रे यांना युरोपात पद्धतशीर शिक्षण मिळालं असतं तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून गाजले असते.’’ केरुनांनांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा हा लेख त्या निमित्ताने..लोकसत्ता मधील स. पां. देशपांडे यांचा लेख तुमच्यासाठी

१९ व्या शतकात जन्म घेऊन आपल्या कर्तबगारीनं कीर्तिमान झालेल्या प्रभावळीत प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे निस्सीम उपासक विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना छत्रे यांचं नाव घेणं भाग आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लो. टिळक, सुधारकाग्रणी आगरकर यांचे गुरू असलेल्या केरुनानांचा जन्म अलिबाग तालुक्यातल्या नागाव येथे झाला. आई-वडिलांना बालपणीच अंतरल्यानं त्यांना शिक्षणासाठी मुंबईस चुलत्याकडं यावं लागलं. त्यांच्यामुळंच केरुनानांना वाचनाची गोडी व कोणत्याही प्रश्नाकडं वस्तुनिष्ठ दृष्टीनं पाहण्याची सवय लागली.
उत्तरायुष्यात केरुनानांनी गणितात संपादन केलेल्या लौकिकाची चाहूल त्यांच्या विद्यार्थी जीवनातच दिसू लागली होती. विशेषत: गणित, खगोल आणि पदार्थविज्ञानासारख्या कठीण शास्त्रात त्यांना पुढं जी गती प्राप्त झाली, त्याचे मूळ त्यांना एल्फिन्स्टन इन्स्टिटय़ूटमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर व प्रो. आर्लिबार या व्यासंगी गुरूंकडून मिळालेल्या मूलभूत ज्ञानात सापडते. त्याच्या जोरावर केरुनानांनी प्रगल्भ ग्रंथांचे परिशीलन करून या विषयांवर घट्ट पकड बसण्याएवढे त्यातले प्रगत ज्ञान प्राप्त केले. याच्या जोडीला त्यांची असाधारण बुद्धिमत्ता लक्षात घेतली की, पुढे त्यांनी दाखवलेले अध्यापन कौशल्य आणि सरकारदरबारी त्यांना मिळालेल्या मानाच्या जागा यांचे आश्चर्य वाटत नाही.
मुंबईस कुलाबा दांडीवर अंतरिक्ष चमत्कार व लोहचुंबक यांचे अनुभव घेण्यासाठी इ.स. १८४० मध्ये प्रो. आर्लिबार यांनी एक वेधशाळा काढली. तिथे केरुनानांची असिस्टंटच्या जागी नेमणूक करण्यात आली. अवघ्या १५ व्या वर्षी द.म. ५० रु. पगारावर मिळालेल्या या नोकरीत नानांनी पुढली १० र्वष जागरुकपणे हवामानशास्त्राचे प्रशिक्षणच घेतलं, असं म्हणता येईल. पुढील आयुष्यात कोणतंही तत्त्व अथवा संकल्पना सिद्ध होऊन पडताळा आल्याशिवाय ते स्वीकारीत नसत, याचं मूळ या नोकरीत आढळतं.
इ.स. १८५१ पासून मात्र पुणे कॉलेजचे नॉर्मल स्कूल, व्हर्नेक्युलर कॉलेज (पुढे ट्रेनिंग कॉलेज म्हणत, ते) आणि अहमदनगरच्या इंग्रजी शाळेचे हेडमास्तर अशा सरकारी संस्थांतून त्यांच्या बदल्या झाल्या. या प्रत्येक ठिकाणी गणित, सृष्टिशास्त्र व पदार्थविज्ञान हेच विषय ते जरुरीप्रमाणे इंग्रजी व मराठीत सराईतपणे शिकवीत असत. दरम्यान, त्यांनी इंजिनीअरिंग कॉलेजातसुद्धा सृष्टिशास्त्रावर व्याख्याने दिल्याची नोंद सापडते. मात्र १८६५ पासून सेवानिवृत्तीपर्यंत केरुनाना पुण्याच्या डेक्कन कॉलेजात स्थिरपणे होते. प्रोफेसर व शेवटी हंगामी प्राचार्य म्हणून जागोजागी जबाबदारीची पदे सांभाळूनसुद्धा आपल्या अध्यापनात कधी त्यांनी हयगय केली नाही की खंड पडू दिला नाही. मुलांना समजेल अशा सोप्या रीतीने शिकविण्याची त्यांची हातोटी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी वाखाणलेली आहे. गणिताशिवाय विद्यार्थ्यांना इतर शास्त्रांचे थोडेबहुत ज्ञान देण्यावर त्यांचा कटाक्ष असे. विद्यार्थ्यांने केव्हाही- कुठेही शंका विचारली तरी ते हसत-खेळत हरप्रयत्नाने तिची उकल करीत असत.
चिपळूणकर- आगरकर या केरुनानांच्या नामवंत शिष्यांच्या चरित्रात व ते दिवंगत झाल्यावर खुद्द आगरकरांनी लिहिलेल्या मृत्युलेखात त्यांचे विद्याव्यासंग, अध्यापन कौशल्य, स्वभावातील सौजन्य तसेच गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आसरा देणे, प्रसंगी फी-पुस्तकांची त्यांची नड भागवणे, या गुणांचे प्रामुख्याने उल्लेखआलेले आहेत. त्यांनी केलेल्या आर्थिक मदतींचे ठळक उदाहरण म्हणजे, पहिल्या वर्षांच्या परीक्षेची फी भरायला आगरकरांजवळ पैसे नव्हते म्हणून एक नाटक लिहून ते, ती उभी करणार असल्याचं कळल्यावर केरुनानांनी नाटकाचे कागद काढून घेऊन त्यांची फी भरून टाकली!
मेजर कँडीच्या मराठीतून शाळेय पुस्तकं तयार करण्याच्या उपक्रमात केरुनानांनी सुबोध भाषेत लिहिलेली पुस्तकं लोकप्रिय झाली. अंकगणितात मूलभूत क्रियांबरोबर कर्जव्यवहार, रोखे, सुतार व गवंडी यांच्या कामाची आकारणी इत्यादी व्यावहारिक उदाहरणे घातली आहेत. तर पदार्थविज्ञानात आजूबाजूच्या सृष्टीत घडणारे व्यापार, निसर्ग चमत्कार व पदार्थाचे गुणधर्म यांच्या परिचयाबरोबर प्रयोगासाठी लागणाऱ्या वस्तू व त्यांच्या किमती पुस्तकाच्या परिशिष्टात दिल्या आहेत. कधी कधी या पुस्तकात त्यांनी संवादाचे माध्यमही वापरले आहे.
शास्त्रीय ज्ञान स्वभाषेत व्यक्त करण्यासाठी मुंबईत स्थापन (१८४८) झालेल्या, ‘ज्ञान प्रसारक सभे’च्या व्यासपीठावरून केरोपंतांनी ‘हवा’, भरतीओहोटी, कालज्ञान, सूर्यावरील डाग आणि पर्जन्यवृष्टी यांचा संबंध असे विविध विषयांवर १७ निबंध वाचले. त्यापैकी भरती-ओहोटीच्या निबंधात, भरती अंतराच्या घनाच्या प्रमाणात कमी होते असे कलनाच्या मदतीने त्यांनी दाखवलं आहे.
केरुनानांनी लक्ष घातलेला आणखी एक विषय म्हणजे पंचांग शुद्धीकरणाचा. आपल्या सूक्ष्म अभ्यासाने त्यांच्या असं लक्षात आलं की, परंपरागत पंचांगात केलेलं अशुद्ध गणित व घेतलेली ग्रहस्थितींची स्थूलमाने या चुकांमुळं ऋतुकाल तसंच पंचांगात दाखवलेल्या ग्रहस्थितीचा प्रत्यक्षातल्या ग्रहस्थितीशी मेळ बसत नाही (या ठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे की, वेधशाळेतील नोकरीमुळे ग्रहांचे वेध घेण्याची कला त्यांना अवगत होती.) तेव्हा ही विसंगती दूर करण्यासाठी त्यांनी पंचांग सुधारण्याचे जे प्रयत्न केले त्याच्या तपशिलात न जाता एवढं म्हणणं पुरेसं ठरेल की, केरुनानांनी या कामी बरेच दिवस आपला बहुमोल वेळ खर्च केला. पण त्यांच्या हयातीत हा उद्योग पूर्णत्वास गेला नाही. मात्र लो. टिळकांसारख्या त्यांच्या नामवंत शिष्यानं राजकारणाच्या धकाधकीतही गुरुऋण जाणून व स्वत:स त्यात असलेला रस म्हणूनही ही चळवळ पुढं नेली.
केरुनानांच्या पुरोगामी विचारसरणीचे द्योतक म्हणजे स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेस त्यांचा पाठिंबा होता. शिवाय ते मुलींच्या शाळेच्या व्यवस्थापक मंडळावर होते, श्रीमती रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेने भरणाऱ्या स्त्रियांच्या सभांना हजर राहून त्यांचे शिक्षण करत. स्त्रियांना जड विषयांऐवजी गृहजीवनोपयोगी शिक्षण देण्याच्या मताचे ते होते.
मात्र गहन विषयांच्या व्यासंगात गढलेल्या केरुनानांना शास्त्रीय संगीत, संगीत नाटके व स्वत: पियानो वाजवण्याची आवड होती. शिवाय किर्लोस्कर नाटकमंडळीत त्यांचा पायरव होता. फार काय नाटकांच्या तालमींना हजर राहून ते मोरोबा वाघोलीकर आणि बाळकोबा नाटेकर या गायक नटांना गाण्याच्या अतिरेकानं नाटकाचा रसभंग होतो, असा सल्ला देत असत. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊन अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपले ‘सौभद्र’ हे नाटक त्यांना अर्पण केलेलं आहे.
केरुनाना दिवंगत झाल्यावर, टाइम्स ऑफ इंडियाने वाहिलेल्या श्रद्धांजलीत, ‘‘जर प्रो. छत्रे यांना युरोपात पद्धतशीर शिक्षण मिळालं असतं तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून गाजले असते’’ असं म्हटलं होतं. त्यावरून त्यांचा मोठेपणा ध्यानात येईल. असा हा थोर व्यासंगी पुरुष १९ मार्च १८८४ रोजी दिवंगत झाला. त्यांच्या सव्वाशेच्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली.
स. पां. देशपांडे”


३. पुण्याचे चाफेकर बंधू


बाळकृष्णचाफेकरस्मृतीदिन. त्यांनी वासुदेव चाफेकर आणि दामोदर चाफेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.आज बाळकृष्ण चापेकर यांचे आज पुण्यस्मरण
पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. रँडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्याचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली.
रँडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव यावेळी साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडचेवर जवळून गोळ्या झाडल्या. रँड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.
चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर, तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चापेकर बंधू शहीद झाले.”

. . . . . . . . . . . .

गोंद्या आला रे…..
आज २२ जुन , शौर्य दिवस
सन १८९७ , पुण्यात प्लेग ने धुमाकूळ घातला होता. तत्कालीन जुलमी इंग्रज अधिकारी “वाॅल्टर चार्ल्स रँड” याने प्रतिबंधक उपायाच्या नावाखाली पुण्यातील जनतेचा, विशेषतः माताभगिंनीं चा छळ चालवला होता
” कुत्रा पिसाळला कि त्याला ठार मारले जाते “
त्या प्रमाणे रँड नावाच्या या पिसाळलेल्या कुत्र्याला दामोदर हरि चाफेकर आणि त्यांचे बंधू बाळकृष्ण, वासुदेव यांनी अतिशय शुरपणे व नियोजन बध्द रितीने आणि गोंद्या आला रे हि घोषणा देत आजच्याच दिवशी म्हणजे २२ जुन १८९७ रोजी गणेश खिंड रोड येथे (सध्याचे सेंट्रल माॅल,ई-स्केवर थिएटर च्या पुढे ) गोळ्या घालून ठार केले
देशाच्या स्वातंत्र लढय़ातील इतिहासात एकाच घरातील तीन सख्खे भाऊ फासावर …जाण्याचे एकमेव उदाहरण म्हणजे क्रां. चाफेकर बंधू
त्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


४. रियासतकार सरदेसाई


मराठा साम्राज्याच्या इतिहासाविषयीची आठ खंडांत ”मराठी रियासत”, तीन खंडांत ”मुसलमानी रियासत” व दोन खंडांत ”ब्रिटिश रियासत” या ग्रंथरचना करणारे रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची आज जयंती
त्यांचा जन्म १७ मे, इ.स. १८६५;रोजी गोविल, रत्नागिरी जिल्हा, येथे झाला ते मराठी इतिहासकार व लेखक होते. मराठा साम्राज्याच्या इतिहासाविषयीची आठ खंडांत ”मराठी रियासत”, तीन खंडांत ”मुसलमानी रियासत” व दोन खंडांत ”ब्रिटिश रियासत” या ग्रंथरचनांतून यांनी महाराष्ट्राचा सुमारे हजार वर्षांचा इतिहास मांडला.
१८८९ मध्ये बडोदेकर संस्थानिक श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडे ‘रीडर’ म्हणून नोकरीस होते.
महाराजांना वर्तमानपत्रे, पुस्तके वाचून दाखवणे आणि राजवाड्यातील राजपुत्र-राजकन्यांना शिकवणे ही कामे त्यांना करावी लागत. मुलांना इतिहास शिकवण्यासाठी काढलेल्या टिपणांतूनच पुढे मुसलमानी, मराठी आणि ब्रिटिश रियासतींचा मिळून ‘हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासा’ची निर्मिती झाली. रियासतकारांनी १८९८ साली सर्वप्रथम मुसलमानी रियासतींचे प्रकाशन केले. सुरुवातीच्या बारा वर्षांच्या नोकरीच्या कालखंडापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत रियासतींचे लेखन चालू होते. पाच तपांच्या तपश्चर्येतून मुसलमानी, मराठी आणि ब्रिटिश रियासतींच्या स्वरूपात गो. स. सरदेसाई यांनी इ.स. १००० ते १८५७ पर्यंत सुमारे साडेआठशे वर्षांचा अखंड हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास सिद्ध केला. त्यासाठी ऐतिहासिक साधने तपासली. त्यांचे संशोधन केले. वरचेवर उपलब्ध होणार्‍या नव्या साधनांची शहानिशा करून त्याची विश्वासार्हता वाढवली. जरूर तिथे गुंतागुंतीच्या घटनांचे विश्लेषण करून त्या अधिक स्पष्ट केल्या. आणि काही मतभेदांच्या प्रकरणांवर स्वतंत्र बुद्धीने भाष्यही केले.
भारतीय केंद्रशासनाने इतिहासविषयक साहित्यातील योगदानासाठी यांना इ.स. १९५७ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले.”


५. पं.कृष्णशास्त्री चिपळूणकर

अरबी सुरम्य कथांचे मराठीत पहिल्यांदा भाषांतर करणारे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे आज पुण्यस्मरण (२० मे १८७८)
मराठी ग्रंथकार आणि रसिक विद्वान. जन्म पुणे येथे. निबंधमालाकार विष्णुशास्त्र्यांचे वडील. पुण्याच्या पाठशाळेत कृष्णशास्त्र्यांनी संस्कृताचे अध्ययन केले. अलंकार, न्याय आणि धर्म ह्या तीन शास्त्रांचा त्यांचा गाढा व्यासंग होता. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून त्यांचे गुरूजी मोरशास्त्री साठे हे त्यांना ‘बृहस्पती’ म्हणत. संस्कृताचे अध्ययन पूर्ण केल्यावर ‘पूना कॉलेज’ मधून त्यांनी इंग्रजीचे उत्तम ज्ञान संपादन केले. अर्थशास्त्र, मानसशास्त्र इ. विषयांचाही त्यांनी अभ्यास केला. १८५२ मध्ये अनुवादक म्हणून ते सरकारी नोकरीत शिरले. पुढे पुण्याच्या पाठशाळेत साहाय्यक प्राध्यापक दक्षिणा प्राइझ कमिटीचे चिटणीस, ‘पूना ट्रेनिंग कॉलेज’ चे प्राचार्य, रिपोर्टर ऑन द नेटिव्ह प्रेस इ.पदांवर त्यांनी कामे केली. ‘पूना ट्रेनिंग कॉलेज’ मध्ये असताना मराठी शालापत्रक ह्या नियतकालिकाचे त्यांनी काही वर्षे संपादन केले. ख्रिस्ती धर्मप्रचारास विरोध करण्यासाठी काढलेल्या विचार लहरी ह्या पाक्षिकाचेही ते संपादक होते.
विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या सहकार्याने त्यांनी अनुवादिलेल्या आरबी भाषेतील सुरस व चमत्कारीक गोष्टींनी मराठीतील मनोरंजक कथावाङ्‌मयाचा पाया घातला. शास्त्रीय विषयांवरील लेखनही सुगम करून दाखविण्याची त्यांची हातोटी अनेकविद्या-मूल तत्त्व संग्रहात (१८६१) प्रत्ययास येते, तसेच मराठी व्याकरणावरील त्यांचे निबंध त्यांच्या सूक्ष्म, चिकित्सक दृष्टीची साक्ष देतात.**अभिवादन (माहिती विश्वाकोशातून )
त्यांची साहित्य संपदा
विचारलहरी (1852)—-सॉक्रेटिसचे चरित्र (1852)—अर्थशास्त्र परिभाषा (1855)—-संस्कृतभाषेचे लघु व्याकरण (1859)—-पद्यरत्नावली (1865)
अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी

६. भाऊ दाजी लाड

ज्यांनी राणीच्या बागेला भेट दिली असेल त्यांनी सुरुवातीला भाऊ दाजी लाड संग्रहालय असा बोर्ड तरी पाहिला असेल. पण मला राणीच्या बागेतले प्राणी आणि पक्षी पहायची घाई असल्यामुळे मी आत जाऊन ते म्यूजियम पाहिले नाही. इतर लोकांचेही तसेच होत असेल. इंग्रजांच्या काळात समाजाची सेवा करणाऱ्या अग्रगण्य लोकांमध्ये भाऊ दाजी लाड यांचे नावही घेतले जाते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्य लिहिलेला हा लेख श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुक फलकावरून साभार


अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाचे संस्थापक , कुष्टारोगावर औषधाचा शोध घेणारे, पहिले भारतीय डॉ.रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड यांचे आज पुण्यस्मरण ३१मे १८७४
लाडांचा जन्म ७ सप्टेंबर १८२२ रोजी गोव्यात मांद्रे गावी, एका सामान्य सारस्वत कुटुंबात झाला. लाडांचे वडील मातीच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार होते. बालपणी लहानग्या रामकृष्णाची बुद्धिबळातील चमक पाहून एका इंग्रज गृहस्थांनी रामकृष्णाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्यासाठी राजी केले. इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी लाड मुंबईतल्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशन विद्यालयात दाखल झाले. शालेय अभ्यासातही चमक दाखवत त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या. या काळातच लाडांचे वडील वारले. वडिलांपश्चात त्यांनी आपल्या आईची व धाकटा भाऊ नारायण यांची जबाबदारी वाहिली. नारायण दाजी लाडदेखील शिकून पुढे डॉक्टर बनले.त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले.
सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षणव अंधश्रद्धा निर्मूलन यांविषयीच्या उपक्रमांना त्यांनी पाठबळ पुरवले. मुंबईतील प्रशासकीय, राजकीय सुधारणांमध्येही त्यांनी स्वारस्याने सहभाग घेतला. १८६९ व १८७१ सालीं अशा दोन वेळा ते मुंबईच्या नगरपालपदासाठी निवडले गेले.
राणी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाच्या कार्यकारिणीचे भाऊ दाजी लाड सह-सरचिटणीस होते. या वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली तरीही आर्थिक अडचणींमुळे काही वर्षे त्याचे काम थांबले होते. त्यावेळी भाऊंनी सह-सरचिटणीस म्हणून वस्तुसंग्रहालयासाठी 1 लाख 16 हजार 141 रुपयांचा मोठा निधी उभा केला आणि या संग्रहालयाचे काम पूर्ण होऊन ते सामान्यांसाठी खुले करण्यात आले. पूर्वीच्या सेंट्रल इकॉनॉमिक म्युझियम‘चेच रूपांतरराणी व्हिक्टोरिया‘ आणि `अल्बर्ट वस्तुसंग्रहालया‘त करण्यात आले आणि या व्हिक्टोरिया वस्तुसंग्रहालयाचे त्यांच्या योगदानाची दखल घेऊन स्वातंत्र्यानंतर १९७५ला या वस्तुसंग्रहालयाला डॉ. भाऊ दाजी लाड यांचे नाव दिले गेले.
अभिवादन – श्री.माधव विद्वांस
भाऊंचा व संग्रहातील एका सुंदर मूर्तीचा फोटो

नवी भर दि.७-९-२०२१ : हा लेखही श्री माधव विद्वांस यांच्याच फेसबुक फळ्यावरून घेतला आहे. त्यामुळे यात थोडी पुनरुक्ति आहे.

डॉरामकृष्ण विठ्ठललाड ऊर्फ भाऊ दाजी लाड यांची आज जयंती.त्यानिमित्त माझा दैनिक प्रभात पुणे दिनांक ७ सप्टेंबर २०२१ मधील लेख. त्यांचे मूळ गाव पार्से म्हणून ते लाड-पार्सेकर नावानेही ओळखले जात असत. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १८२२ रोजी आजोळी गोव्यातील मांद्रे/मांजरे गावी, एका सामान्य सारस्वत कुटुंबात झाला. वर्ष १८३२ मधे व्यवसायानिमित्त लाड कुटुंब मुंबईला गेले तिथे त्यांचे वडील मातीच्या बाहुल्या करून विकत असत.बालपणी लहानग्या रामकृष्णाची बुद्धिबळातील चमक पाहून एका इंग्रज गृहस्थांनी रामकृष्णाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्यासाठी राजी केले.इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी लाड मुंबईतल्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशन विद्यालयात दाखल झाले. शालेय अभ्यासातही चमक दाखवत त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या.या काळातच त्यांचे पितृछत्र हरपले पण वडिलांचे पश्चात त्यांनी आपल्या आईची व धाकटा भाऊ नारायण यांची जबाबदारी पार पाडली.शिकून पुढे ते एल्फिन्स्टन विद्यालयात शिक्षक व ग्रंथपाल म्हणून काम करत होते.त्यावेळी वर्ष, १८४५ मधे नव्यानेच स्थापन झालेल्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी सोडून प्रवेश घेतला व डॉक्टर बनले. मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाप्रसंगी नामदार न्यायमूर्ती व्हाइस चॅन्सलर जेम्स गिब्ज यांनी ‘डॉ.भाऊ दाजींचा आदर्श नवीन पदवीधारकांनी ठेवावा,’ असे सांगितले.एल्फिन्स्टन विद्यालयात असताना राजस्थान व गुजरात या भागांतल्या बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषांत एक निबंध लिहिला.तो उत्कृष्ट ठरून त्यांना त्या वेळेचे ६०० रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले.वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांना परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याबद्दल फिशर शिष्यवृत्ती मिळाली होती, पण त्यांनी ती योग्य व्यक्तीला त्या पैशांचा फायदा व्हावा म्हणून नाकारली.त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले.
सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमांतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षणव अंधश्रद्धा निर्मूलन यांविषयीच्या उपक्रमांचेमधे त्यांनी सक्रिय भाग घेतला. मुंबईतील प्रशासकीय, राजकीय कार्यक्रमातही त्यांनी स्वारस्याने सहभाग घेतला.वर्ष १८६९ व १८७१ मधे ते मुंबईच्या नगरपालपदासाठी निवडले गेले.
भायखळा येथील ‘राणीचा बाग’ म्हणजे आत्ताची ‘वीर जिजामाता उद्यान’ स्थापन करण्यात भाऊंचा पुढाकार होता.त्या वेळेला बागेमध्ये ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्यूझियम’ या नावाचे वस्तुसंग्रहालय तयार करण्यासाठी भाऊंनी निधी जमविण्यासाठी भरपूर कष्ट घेतले.भाऊंनी कष्ट करून ऐतिहासिक चित्रांचा, नाण्यांचा, ताम्रपटांचा, शस्त्रांचा मोठा संग्रतयार केला होता.यामधे हस्तलिखितांमध्ये मध्ययुगीन काळातला शहानामा, सिकंदरनामा, हातिमताई, दिवाण मोगल, मोगलकालीन इतिहास यांवरील पर्शियन भाषेतील हस्तलिखिते आहेत.तसेच उपनिषद सूत्र, आचाङ्सूत्र, निरयावलिम, भगवतीसूत्र या हस्तलिखितांचाही समावेश आहे.संग्रहालयातून इतिहास शिकता व जाणता येतो असे भाऊ म्हणत.खजिना आजही भाऊ दाजी लाड संग्रहालयात पहाता येतो.संस्कृतच्या प्रसाराने मराठीचा उत्कर्ष होईल, असे ते म्हणत असत.स्वातंत्र्यानंतर भाऊंच्या स्मृतिशताब्दी वर्षात, १९७४ साली त्या #संग्रहालयाचे नामकरण ‘डॉ.भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय’, असे करण्यात आते उत्तम वक्ते हॊते.,मराठी, गुजराती, इंग्रजी या तीनही भाषांमधून ते व्याख्याने देत असत.ते नाट्यप्रेमी व नाट्यकलेचे आश्रयदाते होते म्हणून आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी भाऊंना पहिल्या दर्जाचा रसिक म्हणून मान दिला.दुर्दैवाने भाऊंना अखेरच्या आयुष्यात विपन्नावस्थेतच ३१मे १८७४ रोजी त्याचे निधन झाले.


विकासपीडियावरील माहिती

भाऊ दाजी लाड
भाऊ दाजी लाड : (१८२२ – ३१ मे १८७४). महाराष्ट्रातील एक प्राच्यविद्या पंडित, समाजसेवाक व कुशल धन्वतंरी. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. त्यांच्या वडीलांना दाजी म्हणत व मित्र परिवारात ते भाऊ या नावाने परिचित होते. त्यामुळे पुढे भाऊ दाजी हे नाव रूढ झाले. त्यांचा जन्म आजोळी गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला. वडील पार्से (गोवा) येथे शेती तसेच कारकुनीचे काम करीत. व्यवसायानिमित्त लाड कुटुंब मुंबईला गेले (१८३२). तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करून विकत असत. भाऊदाजींचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले. पुढे एल्फिन्स्टन विद्यालय व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. खाजगीरित्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१८४३). या सुमारास त्यांचा पार्वतीबाई या मुलीबरोबर विवाह झाला. त्यांना विठ्ठल व व्दारकानाथ हे दोन मुलगे होते. व्दारकानाथ तारूण्यातच निधन पावला. वडीलांनी संन्यास घेऊन एलेफंटा (घारापुरी) येथे वास्तव्य केले.

भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषांत एक निबंध लिहिला. निबंधस्पर्धेत त्यांना ६०० रूपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली. डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथात यातील मजकूर उद्‌धृत केला आहे.

मुंबईत १८४५ मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. तेव्हा भाऊंनी शिक्षकाची नोकरी सोडून त्यात नाव घातले. फॅरिश शिष्यवृत्ती मिळविली आणि वैद्यकशास्त्रात पदवी घेतली (१८५१). कॉलेजमध्ये असताना त्यांनी ग्रंथपालाचेही काम केले. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. अचूक निदान व शस्त्रक्रियेतील हातोटी (कौशल्य) यांमुळे त्यांना लोकप्रियता लाभली व पैसाही मिळू लागला. त्यांनी कुष्ठरोगावर खष्ठ नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून तयार केलेले एक देशी औषध शोधून काढले. खष्ठ (कवटी) म्हणजेच चौलमुग्रा हा सदापर्णी वृक्ष असावा. त्यांच्या बियांपासून तयार केलेले तेल कुष्ठरोगावर गुणकारी आहे. बाँबे ॲसोसिएशनचे ते चिटणीस झाले. पुढे दादाभाई नवरोजींनी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया ॲसोसिएशन नावाची संस्था काढली. तिच्या मुंबई शाखेचे भाऊ अध्यक्ष झाले. सामाजिक सुधारणांबरोबर त्यांनी औद्योगिक सुधारणांकडेही लक्ष दिले. मुंबईत कागद व कापूस यांच्या गिरण्या काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला. १८५४ मध्ये ते वेस्टर्न इंडियन कॅनल अँड इरिगेशन या कंपनीचे संचालक झाले.

जुन्या रूढी व परंपरा यांना डावलून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अनेक वर्षे आर्थिक झीज सोसली. स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होत (१८६३-७३). या संस्थेतर्फे मुलींच्या तीन शाळा चालविल्या जात. विधवाविवाहाच्या चळवळीलाही त्यांनी सक्रिय पाठींबा दिला. लोहार चाळीतील कन्याशाळेला ते दरमहा आर्थिक साहाय्य देत. याच शाळेला पुढे ‘भाऊ दाजी गर्ल्स स्कूल’ हे नाव देण्यात आले. जातीव्यवस्थेचे निर्मूलन करावे आणि अंधश्रध्देला फाटा द्यावा, या मताचे ते होते. त्यांचे सार्वजनिक कार्य लक्षात घेऊन सरकारने त्यांची शेरीफ पदावर नियुक्ती केली (१८६४-६९).

वनस्पती व प्राचीन इतिहास यांच्या संशोधनात त्यांनी विशेष लक्ष घातले. राणीचा बाग (जिजामाता बाग), ॲल्बर्ट म्यूझीयम, नेटिव्ह जनरल लायब्ररी, पेटीट इस्टिट्युट इ. संस्था स्थापन करण्यात ते अग्रेसर होते. जिजामाता बागेत त्यांच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालयही उभारले आहे. भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मिळ चित्रे, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले. मुकुंदराज, हेमाद्री, सायण, हेमचंद्र इ. व्यक्तींचे तसेच कालीदासाचा कालनिर्णय आणि शिलालेख व ताम्रपट यांवरील त्यांचे शोधनिबंध अभ्यासपूर्ण होते. माक्स म्यूलर व रा. गो. भांडारकर यांनी या शोधनिबंधांविषयी गौरवोद्‌गार काढले आहेत. कालीदासाचे कुमारसंभव व मेरूतुंगाचार्याचा प्रबंध चिंतामणि हे ग्रंथ त्यांनी संपादित केले. तथापि त्यांनी लिहिलेला एकही स्वतंत्र ग्रंथ नाही. त्यांच्या मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शीर्षकाने त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिध्द केले. तसेच रायटिंग्ज अँड स्पिचिस ऑफ डॉ. भाऊदाजी या शीर्षकाने त्र्यं. गो. माईणकर यांनी त्यांचे समग्र लेखन संपादित करून प्रसिध्द केले (१९७४).

त्यांच्यावर १८६५ मध्ये आर्थिक संकट आले. त्यातून ते अखेरपर्यंत सावरले नाहीत. परिणामत: त्यांचे उर्वरित आयुष्य दु:ख, दैन्य व वैफल्य यांनी ग्रासले गेले. त्यातच पक्षाघाताने त्यांचा मुबईमध्ये अंत झाला. त्यांच्या स्मरणार्थ संस्कृत विषयात बी. ए. ला पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला भाऊ दाजी हे पारितोषिक देण्यात येते.

****************

७. श्री.गोपाळ गणेश आगरकर

आठवणीतील पुणे: विज्ञान व बुध्दीप्रामाण्यवादाचे पुरस्कर्ते, समतेचे खंदे समर्थक गोपाळ गणेश आगरकर यांचा आज स्मृतिदिन. पुणे ही त्यांची कर्मभूमी. ते पुण्यात ज्या घरांमध्ये रहात होते. त्या घरातील आठवणी वास्तूंविषयीचे हे टिपण :

फर्ग्युसन महाविद्यालयातील बंगल्यात समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर राहत होते, त्या वेळची गोष्ट आहे. ‘सुधारक’ या त्यांच्या वृत्तपत्रातून आगरकर सडेतोडपणे लिहीत. सुधारकाचा हा कर्ता आहे तरी कसा? हे पाहण्याच्या इराद्यानं एक गृहस्थ आगरकरांना पाहायला आले. आगरकरांनी फाटकाजवळच लिहिण्या-वाचण्याची स्वतंत्र खोली बांधली होती. हे गृहस्थ या खोलीत डोकावताच त्यांना काजळीची बारबंदी घातलेला, पंचा नेसलेला, दुसर्‍या पंचाने हापशी बांधलेला आणि चिलीम ओढत बसलेला एक मध्यमवयीन माणूस दिसला. ‘‘सुधारकाचे संपादक आगरकर कोठे आहेत?’’ असे या गृहस्थाने विचारताच हा माणूस म्हणाला, ‘‘आपले त्यांच्याशी काय काम आहे?’’ ‘‘काही विशेष नाही. त्यांची कीर्ती ऐकून त्यांना पाहायला आलो आहे.’’
मध्यमवयीन माणसाने ते ऐकले. चिलीम बाजूला ठेवली आणि ‘‘सुधारकाचा संपादक आगरकर तो मीच,’’ असे त्या गृहस्थाला सांगितले. तसे तो म्हणाला, ‘‘‘उगीच अशी थट्टा का करता?’’ ‘‘मी आपली थट्टा करीत नाही. खरोखरच मीच तो आगरकर,’’ असे आगरकरांनी सांगताच ‘‘स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत, असे सांगणारे आगरकर इतक्या साध्या राहणीचे असतील असे मला वाटले नाही,’’ अशी प्रतिक्रिया त्या गृहस्थाने व्यक्त केली.
कर्ते सुधारक म्हणून ज्यांची महाराष्ट्रात कीर्ती पसरली, ते गोपाळराव आगरकर मूळचे पुणेकर नव्हतेच. कर्‍हाडजवळील टेंभू या गावी त्यांचे पूर्वज राहत असत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंगरी या गावातून त्यांचे पणजोबा वच्चाजीपंत हे टेंभूमध्ये स्थायिक झाले. त्यांचे आजोबा विष्णुपंत वडिलोपार्जित साधनसंपत्तीवरच गुजराण करीत. वडील गणेश हे फारसे उत्साही नव्हते. १८५६मध्ये गोपाळचा जन्म त्याच्या आजोळी कर्‍हाड येथे झाला. कर्‍हाडमध्ये शालेय शिक्षण घेतल्यावर १८७२मध्ये अकोला येथे ते मामाकडे शिक्षणासाठी गेले. तेथे अडचणी उभ्या राहिल्याने विष्णू मोरेश्वर महाजनी या शिक्षकाची चिठ्ठी घेऊन ते पुण्यात आले; परंतु पुण्यात काही दाद मिळेना म्हणून पुन्हा अकोल्याला माघारी फिरले. तेथे वडिलधार्‍यांनी उपदेश केल्यावर १८७२मध्ये ते पुन्हा पुण्याला आले. ते अखेरपर्यंत पुणेकर म्हणूनच राहिले.
त्यांची अंगयष्टी उंच, सडपातळ व काटक होती. डोळे पाणीदार होते. शेंडी मोठी होती, पण डोक्यावर घेरा मोठा नव्हता. स्वभाव मनमिळाऊ, भारदस्त मिशा, लहानपणी स्वभाव हूड होता. वडील माणसांचा मान ठेवण्यात ढिलाई होती. काळी पगडी, पांढरा अंगरखा, क्वचित जनातीचा काळा अंगरखा, शुभ्र काठांचे उपरणे, हातात दीड इंच व्यासाचा महाबळेश्वरी सोटा व पायात ब्राह्मणी चढाऊ जोडा, असा त्यांचा पोषाख असायचा. मुंबईचा टाइम्स, मराठा, केसरी व ज्ञानप्रकाश यांचे वाचन असायचे.
आगरकर हे हयातभर दुसर्‍याच्याच वास्तूत राहिले. स्वराज्य आणि सुधारणा या दोन ध्येयांसाठी झटणार्‍या या ज्ञानवंताचा वैचारिक आणि कृतिशील इतिहास सर्वज्ञात आहे. कर्‍हाडजवळील टेंभू या गावी त्यांचा जन्म झाला असला, तरी त्यांचे कर्तृत्व खर्‍या अर्थाने पुण्यातच फुलत गेले. विद्यार्थिदशेत असताना ते डेक्कन कॉलेजमधील वसतिगृहात राहिले. त्यानंतर शनिवार पेठेतील तांब्यांचा वाडा, भाटवडेकरांचा आणि मेहेंदळे बागेतील मेहेंदळे यांचा बंगला आणि शेवटी फर्ग्युसन महाविद्यालयातील प्राचार्यांचे घर इत्यादी ठिकाणी ते राहिले, असे संदर्भ वाचायला मिळतात.
त्यापैकी डेक्कन कॉलेज, तांबे वाडा आणि फर्ग्युसन महाविद्यालय येथील आगरकरांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या वास्तूंच्या खाणाखुणा शंभर वर्षांनतंर आजही तेथे पाहायला मिळतात. दुर्दैवाने या वास्तूंकडे कोणाही संशोधकाने याकडे म्हणावे तितकेसे लक्ष दिल्याचे दिसत नाही.
मनात आणले असते, तर आगरकरांना पुण्यात स्वतःचे घर बांधणे सहज शक्य होते. असे असूनही या
महापुरुषाने त्याकडे दुर्लक्ष का केले असावे? हे स्पष्ट करणारी एक घटना त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्रात वाचायला मिळाली. डेक्कन कॉलेजमध्ये त्यांना फेलोशिप मिळाली होती. आर्थिक विंवचना कमी झाल्याने त्यांनी स्वतःचे लक्ष लोककल्याणावर केंद्रित केले. त्या वेळी आईला लिहिलेल्या पत्रात आगरकरांनी याबाबत स्पष्ट विचार तरुण वयातच मांडले आहेत. ते म्हणतात, ‘‘मुलगा मोठाल्या परीक्षा देत आहे, त्यामुळे त्याला मोठ्या पगाराच्या नोकर्‍या मिळतील आणि तो आपले पांग फेडेल, असे मनोरथ आई तू करीत असशील; परंतु विशेष संपत्तीची हाव न धरता फक्त पोटापुरत्या पैशांवर संतोष मानून सर्व काळ परहितार्थ घालविण्याचे मी ठरवीत आहे.’’
स्वतःच्या घराबाबत आगरकरांनी याच विचाराला पुढे वाहून घेतले. डेक्कन कॉलेजमध्ये ते १८७३ ते १८७६ अशी चार वर्षे राहिले. तिथेच त्यांची लोकमान्य टिळकांशी मैत्री जमली. देशाची स्थिती आणि
स्वतःचे कर्तव्य याबाबत दोघांचेही विचार त्या वेळी समान होते. त्यामुळे बंडगार्डनचा हा परिसर दोघांच्याही जीवनात पुण्यक्षेत्रासारखा ठरला होता. आज तेथे लोकमान्यांची खोली स्वतंत्रपणे जतन करून ठेवली गेली आहे. अकोल्यातून आगरकर पुन्हा पुण्यात आले, तेव्हा खिशात अवघे पन्नास रुपये घेऊन ते डेक्कन कॉलेजमध्ये दाखल झाले. या वास्तूमध्ये पैशांअभावी त्यांच्या हालअपेष्टा सुरू झाल्या. तेव्हा वक्तृत्वोत्तेजक सभेत जाहिरात वाचून त्यांनी एका स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत त्यांना चाळीस रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले. याच वास्तूमध्ये डेक्कन कॉलेजच्या गॅदरिंगनिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली. ‘एकत्र हिंदू कुटुंबापासून फायदे व तोटे’ हा त्याचा विषय होता. आगरकरांनी त्यातही पन्नास रुपयांचे पहिले बक्षीस मिळविले. या काळात त्यांना शिष्यवृत्ती मिळाली; परंतु आर्थिक दारिद्र्य इतके होते, की एकच सदरा ते रात्री धुऊन पुन्हा दुसर्‍या दिवशी वापरावी लागे. डेक्कन कॉलेजच्या या वास्तूने आगरकरांचे हाल आणि अभ्यासू वृत्ती दोन्ही अनुभवले.
एम.ए.च्या परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते म्हणून आगरकरांनी नाटक लिहायचे ठरविले. केरूनाना छत्रे यांना जेव्हा हे कळाले, तेव्हा त्यांनीच त्यांची फी भरली. प्रि. डॉ. सेलवी यांनी फेलो म्हणून निवड केल्यावर त्यांना पोटापुरता पैसा मिळू लागला व सुधारकांचा वैचारिक प्रवास याच वास्तूत खर्‍या अर्थाने सुरू झाला. डेक्कन कॉलेजच्या वास्तूने पुढे टिळक आणि आगरकर यांच्या अनेक आठवणी जतन केल्या. तेथे टिळकांचा पुतळाही आहे. वामन शिवराम आपटे, टिळक आणि आगरकर शेजारी-शेजारी राहत होते, असे अभ्यासक सांगतात; परंतु आगरकरांची निश्चित खोली कोणती, याचा शोध घेण्याचा प्रयत्न मात्र अद्याप झालेला नाही. भावी आयुष्याच्या अनेक योजना आगरकरांनी तेथील सादिलबुवाच्या टेकडीवर आखल्या. चांदण्या रात्रीत भटकंती करून टिळक व आगरकरांनी अनेक विषयांवर वादविवाद केले. राष्ट्रसेवेला सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा उभयतांनी याच वास्तूत केली. त्यामुळे या वास्तूचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे.
गोपाळराव जिथे-जिथे राहिले, तिथे-तिथे त्यांच्या राहणीमानाचे ठसे स्पष्टपणे उमटल्याचे संदर्भ मिळतात. काळी पगडी, पांढरा अंगरखा, शुभ्र काठाचे उपरणे, हातात महाबळेश्वरी सोटा आणि ब्राह्मणी चढाऊ जोडा, अशा त्यांच्या पेहरावाच्या या वास्तू साक्षीदार आहेत, डेक्कन कॉलेजमध्येच त्यांना आनुवंशिक अशा दम्याच्या विकाराने गाठले. त्याकडे दुर्लक्ष करीत ते सदैव कार्य करीत राहिले. या दम्याबाबत त्यांनी एक काव्यपंक्तीही त्या वेळी करून ठेवली आहे. ते म्हणतात –
‘‘मित्र दम्या रे वससी शरीरी ।
माझ्याच तू मानूनि सौख्य भारी ।
परंतु वाटे मज दुःख मोठे ।
मेल्यास मी जाशिल सांग कोठे ॥’’
स्वतःच्या घराचा असा ध्यास न घेतलेल्या या महापुरुषाचे बिर्‍हाड काही काळ शनिवार पेठेतील तांब्यांच्या वाड्यात होते. आज हा परिसर तांबे बोळ म्हणून ओळखला जातो. आजही हा वाडा अस्तित्वात आहे. मूळ मालकांनी त्याचा ट्रस्ट केला असून ते मुंबईला राहतात. आता तेथे ओनरशिपची योजना अस्तित्वात येत आहे. त्यामुळे हा वाडाही लवकरच स्मृतीच्या आड जाण्याची चिन्हे आहेत. पूर्वी हा परिसर घोडके बोळ म्हणून परिचित होता. पानशेतच्या प्रलयात या वाड्याचे दोन मजले पाण्यात होते. त्यानंतर त्याची पडझड होत राहिली. आज धोक्याचे घर म्हणून ही वास्तू ओळखली जाते. आगरकरांची ही साक्ष आता विनाशाच्या मार्गावर आहे.
टिळक, आगरकर, गोखले, श्रीधरपंत करंदीकर, शंकरराव लवाटे अशा मोठमोठ्या व्यक्ती या वाड्यात राहत होत्या, अशा आठवणी वामन मल्हार जोशी यांनी लिहून ठेवल्या आहेत. टिळक आणि आगरकर इथेही शेजारी-शेजारीच राहत होते. त्यापैकी आगरकर आधी राहायला आले आणि टिळक नंतर राहायला आले, असे संदर्भही मिळतात. नैतिक जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करणार्‍या गोपाळरावांच्या विचारांचा विवेकवाद हा पाया होता, हे स्पष्ट करणारी एक घटना वाचायला मिळते. आगरकरांचे रावसाहेब मेहेंदळे नावाचे एक स्नेही होते. त्यांच्या काही वस्तू आगरकरांच्या घरात होत्या. गोपाळरावांकडे त्या काळात चोरी झाली. त्यांनी सिटी पोलीस इन्स्पेक्टर स्मिथ यांच्याकडे तक्रार केली; परंतु वस्तू मिळाल्याच नाहीत. तेव्हा नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी या वस्तूंचे १५० रुपये मेेहेंदळे यांना दिले.
आगरकरांवर जे नाटक लिहिले गेले आहे, त्यातील संदर्भानुसार आगरकरांच्या काळात तांबे वाड्यावरच प्रतीकात्मक प्रेतयात्रा आली होती. त्या दिवशी आगरकर पुण्यात नव्हते असेही म्हटले जात असले, तरी प्रेतयात्रा आणणार्‍या गोपाळ जोशींचे परिवर्तन याच वाड्यात झाल्याचे नाटकात दाखविले आहे. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अशा सर्वच बाबतींत अत्यंत आधुनिक विचारांचा पुरस्कार करणार्‍या या द्रष्ट्या पुरुषाच्या घरगुती जीवनावरील एक प्रसंग नमूद करण्यासारखा आहे. एकदा दसर्‍याच्या सणाला त्यांनी विष्णू मोरेश्वर महाजनींना घरी जेवायला बोलावले होते. महाजनी हे आगरकरांचे गुरुवर्य होते. त्या वेळी ‘सुधारक’मध्ये गोपाळरावांनी बायकांनी जाकीट घालायला पाहिजे, असे लिहिले होते. आगरकरांच्या पत्नी, यशोदाबाई जेव्हा जेवणाचे आमंत्रण द्यायला गेल्या, तेव्हा सौ. महाजनी म्हणाल्या, ‘‘मी जाकीट घालून यायचे का?’’ तेव्हा ‘‘पुराणातली वांगी पुराणात,’’ असे उत्तर यशोदाबाईंनी दिले. आगरकर पत्नीवर आपली मते लादत नसत, हे स्पष्ट करणारी ही घटना. यशोदाबाईंचे पूजापाठ, व्रतवैकल्ये, कुलाचार यांच्या आड ते आले नाहीत; परंतु त्यातील दांभिकपणा मात्र ते पत्नीला पटवून देत असत. या वास्तू अशा लहानसहान गोष्टींच्या साक्षीदार आहेत.
डेक्कन कॉलेज, केसरी, सुधारक, डेक्कन एज्युकेशन सोसायटी असा आगरकरांचा प्रवास सर्वज्ञात आहे. टिळकपक्ष-आगरकरपक्ष, संमतीबिलाचा वाद, पंचहौद मिशन, चहाचे वादळ, रमाबाईंचे शारदासदन प्रकरण, होळकरांच्या देणगीचा वाद यांतील या दोन पक्षांतील वादांचे तपशील उपलब्ध आहेत.
वास्तूबाबत बेफिकीर राहिलेल्या आगरकरांच्या जीवनाची शेवटची चार वर्षे फर्ग्यसन महाविद्यालयात गेली, तेव्हा तेथे दोन खोल्यांचे छोटेखानी घर अस्तित्वात होते. त्या वेळचे स्वयंपाकघर, धुराडे, गोलाकार रचनेचे दरवाजे, दगडी बांधकाम याच्या खुणा आजही अस्तित्वात आहेत. लाकडी जाळीच्या खिडक्या आणि चुन्याच्या भिंती असलेल्या या वास्तूचे पुढे नूतनीकरण झाले. सहा खोल्या वाढविल्याने त्याचे बंगल्यात रूपांतर झाले.
‘सुधारक’ पत्रात आगरकरांनी अनेक धार्मिक बाबींवर कठोर टीका केली होती. त्याचा परिणाम असा झाला, की काही माथेफिरूंनी ‘आम्ही तुमचा खून करू’ अशी धमकीची पत्रे आगरकरांना पाठविली. त्या वेळी आगरकरांचे सहसंपादक गोपाळराव गोखले होते. दोघेही भाटवडेकरांच्या वाड्यात राहत होते. आगरकर चतुःशृंगीकडे फिरायला निघाले, तेव्हा याच वाड्यात गोखले त्यांना म्हणाले, ‘‘निदान काही दिवस तरी तुम्ही संध्याकाळी फिरायला जायचे सोडून द्या. तुम्ही परताल तेव्हा अंधार असेल. काही माथेफिरूंनी मनात आणले तर..?’’ यावर ‘‘हे काय भलतेच सांगता तुम्ही मला!’’ असे उत्तर देऊन आगरकर म्हणाले, ‘‘अहो या
माथेफिरूंच्या धमक्यांना भिऊन जर मी फिरायला जाणे बंद करू लागलो, तर उद्या सुधारकी पद्धतीने लिहायचेसुद्धा सोडून द्यावे लागेल मला.’’ नंतर आगरकर चतुःशृंगीकडे फिरायला निघून गेले.
फर्गसन महाविद्यालयातील आगरकरांच्या घरात प्रा. वि. मा. बाचल राहत होते. आगरकरांची स्मृती म्हणून ही वास्तू जतन करण्यासारखी आहे; परंतु डेक्कन एज्युकेशन सोसायटी त्याबाबत उदासीन आहे. या वास्तूमध्येच टिळक-आगरकरांची शेवटची भेट झाली, या बाबतीत कुणाचेही मतभेद नाहीत. ‘‘टिळकांशी वाकुडपणा ठेवून मला शांत मरण यायचे नाही. हे मरायच्या आधी टिळक अगोदर आमच्याकडे आले, भेटले, बसले, कितीतरी वेळ बोलले आणि मगच गेले. इच्छेप्रमाणे टिळकांशी मैत्री करूनच हे गेले,’’ अशी आठवण यशोदाबाईंनी लिहून ठेवली आहे.
दम्याच्या विकारातच त्यांना यकृताचा त्रास जाणवू लागला. तो दिवस १७ जून १८९५ हा होता. शनिवारी आगरकरांनी रेचक घेतल्यामुळे त्यांची शक्ती क्षीण झाली. रविवारी रात्री ते उठले व शौचास जाऊन आल्यावर, ‘‘मी आता निजतो, तुम्हीही निजा’’ असे यशोदाबाईंना म्हणाले. या वेळी ते निजले ते कायमचेच. आगरकरांचा असा क्लेशदायक अंत या वास्तूने पाहिला. सध्याच्या व्हरांड्यात शिरल्यावर उजव्या बाजूकडील खोलीत त्यांचा अंत झाला. त्या दिवशी ‘सुधाकर’ या पत्राचा ७व्या वर्षाचा ३६वा अंक सकाळी बाहेर पडला होता.
या वास्तूतील टिळक व आगरकरांच्या शेवटच्या भेटीबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या जातात. टिळक आले तेव्हा आगरकर भिंतीकडे पाठ करून बोलले, असेही एक मत आहे. आगरकरांचे स्नेही सीतारामपंत देवधर यांच्या आठवणीत, ‘‘मनात वास्तविक तेढ असून बाह्यात्कारी मात्र प्रेमाचा आव आणू पाहणार्‍या भाषणापासून आजारी माणसाला त्रास होतो, हे काही खोटे नाही. कारण तुम्ही येण्यापूर्वी टिळक नक्राश्रू गाळीत बसले होते. त्यांना पाहताच अनेक अनिष्ट प्रसंगांचे स्मरण होऊन मन अस्वस्थ झाले व ‘‘हे येथून केव्हा एकदाचे जातात असे होऊन गेले,’’ असे आगरकर देवधरांना म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. या बाबतही दोन पक्षांच्या दोन बाजू आहेत; परंतु या दोन्ही महान राष्ट्रपुरुषांची संस्मरणीय अखेरची भेट ज्ञानवंतांच्या या वास्तूने पाहिली आहे. अलीकडेच माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, समाजवादी विचारांचे अग्रणी एस. एम. जोशी यांचे पाय या वास्तूला लागले. या सर्व वास्तूंमध्ये राहताना आपल्या पश्चात मुलाबाळांची काय व्यवस्था व्हावी, याचे आगरकरांनी नियोजन करून ठेवले होते. फर्ग्यनसमधील त्यांच्या घरात गोपाळराव गोखले यांना आगरकरांच्या मृत्यूनंतर एक पुरुचुंडी सापडली. त्यात वीस रुपये ठेवलेले होते व ‘माझ्या प्रेतदहनार्थी’ असे त्यावर लिहिलेले होते. संपत्तीची हाव न ठेवता पोटापुरता पैसा मिळविण्यात संतोष मानणार्‍या गोपाळरावांची लोककल्याणासाठीच जगण्याची वृत्ती त्यातून प्रतीत होते. अशा घटनांच्या साक्षीदार असणार्‍या या वास्तूंनी हा लोकनेता जवळून पाहिला.
निवासस्थान : २९०, ओंकारेश्वर देवळाचा चौक, शनिवार पेठ, पुणे ३०.
लेखक :
विकास वाळुंजकर
ज्येष्ठ पत्रकार
. . . . . मी श्री.विकास वाळुंजकर, श्री.सुधीर दांडेकर आणि फेसबुक यांचा आभारी आहे. थोर समाजसुधारक आगरकरांची अधिक माहिती इथे वाचावी. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B

८. लेखक रामचंद्र गुंजीकर

मोचनगड ही मराठीतील पहिली ऎतिहासिक कादंबरी लिहिणारे लेखक रामचंद्र गुंजीकर यांचे आज पुण्यस्मरण (३० एप्रिल १८४३ — १८ जून १९०१)
गुंजीकरांची मोचनगड ही मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी. शिवकालाच्या पार्श्वभूमीवर काल्पनिक पात्रे व प्रसंग निर्माण करून लिहिलेली ही कादंबरी आहे. शिवाजी महाराज ह्या कादंबरीत अगदी अखेरीअखेरीस येतात. कादंबरीच्या उद्दिष्टांविषयी गुंजीकरांच्या निश्चित कल्पना होत्या, असे दिसते. त्यांच्याशी प्रामाणिक राहून त्यांनी शिवकालीन इतिहासाची काटेकोर जाण ठेवली व शिवकालाचे जिवंत वातावरण निर्माण केले. ऐतिहासिक कादंबरीचा एक उत्कृष्ट आदर्श म्हणून अ. का. प्रियोळकरांसारख्या चिकित्सक विद्वानांनी ह्या कादंबरीला मान्यता दिली आहे.

संस्कृत आणि इंग्रजी ह्यांच्या जोडीला उर्दू, कन्नड, गुजराती आणि बंगाली ह्या भाषाही त्यांना येत होत्या. विद्याप्रसारास वाहिलेला मराठी ज्ञानप्रसारक बंद पडल्यानंतर निर्माण झालेली पोकळी विविधज्ञानविस्तार (१८६७) हे दर्जेदार मासिक काढून त्यांनी भरून काढली. ते संपादक म्हणून स्वतःचे नाव मात्र त्यावर घालीत नसत. भाषिकसंशोधन, व्याकरण, ललितवाङ्‌मय इ. विषयांवरील उत्तमोत्तम लेख त्यांनी त्यातून प्रसिद्ध केले आणि महाराष्ट्रातील ज्ञानलालसा व वाङ्‌मयीन अभिरुची ह्यांच्या वर्धनविकासात महत्त्वाचा वाटा उचलला.

मराठी भाषा आणि व्याकरण ह्यांविषयी त्यांनी स्वतः लिहिलेले लेखही उल्लेखनीय आहेत. विशेषतः मराठी व्याकरणासंबंधी त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे महत्त्व सर्वमान्य आहे. सात वर्षांनी विविधज्ञानविस्तारातून ते बाहेर पडले. १८७१ मध्ये निघालेल्या दंभहारक ह्या मासिकाचेही ते अप्रकट संपादक होते. त्यातही त्यांनी लेखन केले. मोचनगड (१८७१) व गोदावरी (अपूर्ण) ह्या कादंबऱ्या, अभिज्ञानशाकुंतलाचे मराठी भाषांतर (१८७०), रोमकेतु – विजया (विविधज्ञान विस्तारात प्रसिद्ध — १८७० — ७२, रोमिओ अँड ज्यूलिएट ह्या शेक्सपिअरच्या नाटकाचे मराठी भाषांतर), कन्नडपरिज्ञान… (१९०९) हे व्याकरणशुद्ध कानडी भाषेचे ज्ञान मराठीतून देण्यासाठी लिहिलेले पुस्तक इ. लेखन त्यांनी केले आहे. शिवाय लाघवी लिपी किंवा अतित्वरेने लिहिण्याची युक्ति (१८७४) हे पुस्तक लिहून मराठीतून लघुलेखनाची ओळख करून दिली.

*********************

९. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे

इतिहासाचार्य वि.का.राजवाडे

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे (जन्म : २४ जून १८६३; मृत्यू : ३१ डिसेंबर १९२६) हे मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.
जीवन : वि. का. राजवाडे यांचा जन्म महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील वरसई येथे झाला.
बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले.
१८९८ साली त्यांनी लिहिलेल्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.
३१ डिसेंबर १९२६ रोजी राजवाडे यांचे निधन झाले.

राजवाडे म्हणायचे – ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेलाो नाही.

राजवाड्यांचा दरारा
महाराष्ट्राच्या विचारविश्वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. नंतरही इतिहाससंशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्‍य न्‌ वाक्य ब्रह्मवाक्‍य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्‍वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले.

राजवाड्यांचे लेखन आणि प्रस्तावना
राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचे संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधनसामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता.

राजवाडे यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाची प्रस्तावना मूळ पुस्तकापेक्षा अधिक वाचनीय आहे. असेच त्यांच्या बहुतेक पुस्तकांबद्दल म्हणता येईल.

प्रतिभाशक्ती आणि आत्मविश्वास
राजवाडे बुद्धिमान तर होतेच; पण त्यांना प्रतिभाशक्तीचीही देणगी लाभली होती. जबरदस्त आत्मविश्‍वास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यामुळं साधा अंदाज किंवा कयाससुद्धा ते अशा पद्धतीने व अशा आक्रमकपणाने मांडत, की जणू काही तो त्रिकालाबाधित सत्य असलेला महासिद्धान्तच आहे.

वि.का.राजवाडे यांचे इतिहासातिल कार्य
मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार* विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे. काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची जी सांगड तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते.

इतिहासलेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ असे शीर्षक असणारे २२ खंड त्यांनी संपादित केले.
त्यांच्या मते इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धेयांच्याच हकिकती नव्हेत’’, असे त्यांचे मत होते.
अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.
विकीपीडियावरून साभार
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87

. . . . . . . . . . . . . . . . .

मराठीतून इतिहास भाषाशास्त्र व्युत्पत्ती व्याकरण इ. बहुविध विषयांवर व्यांसगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्‍चयी आणि निष्ठावान असे महाराष्ट्रीय विद्वान. इतिहाससंशोधक म्हणून विशेषेकरून ते मान्यता पावलेले इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांची जयंती (२४ जून)
मराठ्यांच्या इतिहासाचा म्हणजे प्रथम मुख्यतः राजकीय इतिहासाचा शोध घेत घेत ते त्यांच्या प्राचीन साहित्याकडेही वळले. जुन्या मराठी साहित्याचा अर्थ उलगडण्यासाठी तत्कालीन मराठी भाषेचे ज्ञान अपरिहार्य ठरले. ह्यांतून ते शब्दाच्या उगमांकडे -व्युत्पत्तिशास्त्राकडे व भाषेतील स्थित्यंतरांच्या अनेकविध प्रश्नांकडे वळले. महाराष्ट्रातील व्यक्तींची उपनामे, ग्रामनामे वगैंरेची मुळे ते शोधू लागले आणि ती बहुशः संस्कृतोद्भव आहेत, अशा निष्कर्षाप्रतही ते पोहोचले. त्यासाठी संस्कृत भाषेचा आणि वैदिक भाषेचाही सखोल विचार करणे आवश्यक झाले आणि त्या दृष्टींनीही त्यांनी संशोधन करून काही प्रंबधही सिद्ध करून ठेवले. त्यांपैकी काही त्यांच्या हयातीत तर काही त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. राजवाड्यांचे ह्या क्षेत्रातील कार्य गौरवास्पद असले, तरी त्यांचे भाषाव्युत्पत्तिविषयक निबंध सदोष असल्याचे काही भाषाशास्त्रज्ञांनी दाखवून दिले. ह्या एवढ्या गहन विषयात शिरणाऱ्या राजवाड्यांनी ललित साहित्याचे वाचन आणि रसग्रहणही सुंदर रीतीने केले, हे त्यांच्या ‘कांदबरी’ ह्या दर्जेदारसमीक्षात्मक लेखावरून कळून चुकते.
माधव विद्वांस

फेसबुकवरून साभार . . दि.२४-०६-२०२१

——————-

Kundan Daulatrao Bacchav
इतिहास-संशोधक इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे (12 जुलै 1864 – 31 डिसेंबर 1926) यांनी संपादित केलेले ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ ह्या ग्रंथाचे 22 खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. धुळ्याला राजवाडे संशोधन मंडळ या संस्थेत त्यांच्या संशोधनाविषयी अनेक साधने जतन केली आहेत. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या संग्रहाच्या जतनाची व्यवस्था त्यांचे शिष्य तसेच धुळ्याचे सुप्रसिद्ध वकील तात्यासाहेब तथा भास्कर वामन भट यांनी अथक प्रयत्न करुन केली. राजवाडे यांचे स्मारक म्हणून राजवाडे संशोधन मंदिर तात्काळ उभारण्याचा निर्णय झाला.
दिनांक 27 डिसेंबर 1929 रोजी राजवाडे संशोधन मंदिराची कोनशिला बसविण्यात आली आणि दिनांक 5 जानेवारी 1932 रोजी राजवाडे मंदिराचे उद्घाटन सौ. महाराणी इंदिराबाई होळकर (माँसाहेब) यांच्या हस्ते झाले. राजवाडे यांनी गोळा केलेल्या असंख्य दुर्मिळ प्राचीन संस्कृत प्राकृत हस्तलिखित ग्रंथ व ऐतिहासिक कागदपत्राच्या मोठ्या 10 पेट्यांना येथे संग्रहात ठेवण्यात आले. राजवाडे मंडळाच्या दैनंदिन खर्चाच्या सोयीसाठी त्यांनी राजवाडे बँक उभी केली.
राजवाडे यांच्या अमोल ठेव्यांचे दर्शन व्हावे म्हणून वस्तुसंग्रहालयासाठी पैसा उभा केला. संशोधक हे त्रैमासिक सन 1932 पासून सुरु केले. सुमारे 25 हजार पुस्तकांचे ग्रंथालय उभारले.
या ऐतिहासिक ठेव्याचे डिजिटलायजेन करण्यासाठी फार मोठा खर्च येणार होता. त्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्याकडून 10 लाख तर नेहरू केंद्रातर्फे पाच लाख अर्थसहाय्य मिळाले आणि हे कार्य पार पाडले. आणि पवारसाहेबांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन 25 नोव्हेंबर 2014 रोजी झाले.
बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर राजवाडे यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले. 1898 साली त्यांनी लिहिलेल्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. 7 जुलै 1910 रोजी पुण्याला भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.
राजवाडे म्हणायचे – ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीसाठी हपापलेला नाही. महाराष्ट्राच्या विचारविश्‍वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दबदबा होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले होते. नंतरही इतिहाससंशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या.

तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्‍य न्‌ वाक्य ब्रह्मवाक्‍य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्‍वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले. राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचं संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या.
राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधनसामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता. राजवाडे यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाची प्रस्तावना मूळ पुस्तकापेक्षा अधिक वाचनीय आहे. असेच त्यांच्या बहुतेक पुस्तकांबद्दल म्हणता येईल. त्यांंच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
💐💐💐👏👏👏

फेसबुकवरून साभार दि.२४-०६-२०२१

💐💐💐👏👏👏

१०. जमशेदजी टाटा

जमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ – १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.
त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना “भारतीय उद्योगाचे जनक” म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते.

सुरुवातीचे जीवन
जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. त्यांचे वडील नसरवानजी व आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते. कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली. जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले. आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांची बुद्धिमत्ता पाहून कॉलेजच्या प्रिन्सिपॉलांनी त्यांची डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत केली. जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू हिच्याशी विवाह केला.
१८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. १८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला.

व्यवसाय
१८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली.
त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचे उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते.

टाटा स्टील
झारखंडमधील साचि गावात टाटांचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला गेला. येथील रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असे ठेवले गेले. आता झारखंडमधील जमशेदपूर या नावाने ओळखले जाणारे हे एक मोठे शहर आहे. टाटा स्टील (पूर्वी टिस्को – टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड) ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २,८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली.

टाटांनी स्थापन केलेल्या अन्य संस्था
बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स : विज्ञान आणि अभियांत्रिकी यांमधील संशोधन आणि शिक्षणासाठी प्रख्यात भारतीय संस्था.
टाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी (नवीन नाव – टाटा पॉवर कंपनी) : ८००० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज कंपनी.

व्यक्तिगत जीवन
टाटांनी हिराबाई दाबू यांच्याशी विवाह केला. त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाऱ्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा त्यांना शापुरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते. नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले.

मृत्यू
१९०० साली व्यवसायानिमित्त जर्मनीला गेले असताना ते खूप आजारी पडले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहैम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर इंग्लंडमधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले

. . . . विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून साभार

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील टाटांचा पुतळा

Hurun Research and EdelGive Foundation या संस्थेने २०२१ मधे सादर केलेल्या रिपोर्ट नुसार जगात गेल्या १०० वर्षात ज्या लोकांनी आपल्या कमाईचा सर्वाधिक वाटा लोक कल्याणासाठी दिला अश्या यादीत भारताचे ‘जमशेदची टाटा’ यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. त्यांनी केलेल्या लोक कल्याण कामासाठी दिलेल्या कमाईची अंदाजित किंमत आज जवळपास १०२.४ बिलियन (१ बिलियन म्हणजे १०० कोटी) अमेरीकन डॉलर च्या घरात आहे.

Indian business doyen Jamsetji Tata has emerged as the world’s largest philanthropist in the last 100 years, donating $102 billion, as per a report prepared by Hurun Research and EdelGive Foundation. Jamsetji Tata is ahead of others like Bill Gates and his now-estranged wife Melinda who have donated $74.6 billion, Warren Buffet ($37.4 billion), George Soros ($34.8 billion) and John D Rockefeller ($26.8 billion), the list showed.

*********************

११. सर जमशेटजी जीजीभॉय

जमसेटजी जीजीभॉय यांचा जन्म मुंबईत झाला. सोळा वर्षाच्या वयातच ते कलकत्तामार्गे चीनला गेले. नंतर त्यांनी चीनच्या अनेक सफरी केल्या आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या सहाय्याने भारत, इंग्लंड आणि चीन या देशांमध्ये कापूस आणि अफूचा व्यापार इतका वाढवला की त्यामधून त्या काळात कोट्यावधीची कमाई केली. त्यांची स्वतःची जहाजे होती. इंग्रज सरकारतर्फे त्यांना ‘सर’ हा बहुमान मिळाला.
गरीबीमध्ये जन्माला येऊन श्रीमंत झालेल्या जमशेटजींनी अगदी सढळ हाताने दानधर्म केला आणि गरीबांसाठी मुंबईतले पहिले मोठे हॉस्पिटल बांधले, तसेच अनेक ठिकाणी शाळा, धर्मशाळा, विहिरी, तलाव, रस्ते, पूल वगैरे बांधले. मुंबई शहराच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे. अधिक माहिती इथे.
https://en.wikipedia.org/wiki/Jamsetjee_Jejeebhoy

जमशेदजी जीजीभाय (Jamsetjee Jejeebhoy) (जन्म : मुंबई, १५ जुलै, इ.स. १७८३; मृत्यू : मुंबई, १४ एप्रिल इ.स. १८५९) हे दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध असलेले मुंबईतील एक पारशी उद्योगपती होते. त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक लोककल्याणकारी कामे केली. चीन सोबत त्यांनी कापूस आणि अफूच्या व्यापारात मोठा पैसा मिळवला.

लोकहितकारी कामे
माहीम बेट वांद्ऱ्याला जोडणारा ‘माहीम कॉजवे’ जमसेटजींच्या पत्नी अवाबाई यांनी दीड कोटी रुपयांची मदत केली म्हणून १८४५ साली बांधून झाला. जमसेटजींच्या एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीमुळे मुंबईचे ‘जे. जे. हॉस्पिटल’ उभे राहिले. राणीबागेतील ‘डॉ.भाऊ दाजी लाड म्युझियम’ची इमारत जमसेटजी जीजीभाय यांच्या उदार देणगीतून उभी राहिली. जमसेटजींनी दिलेल्या दीड लाख रुपयांच्या देणगीतून १८३१ साली उभी राहिलेली बेलासिस रोड येथील धर्मशाळा आजही कार्यरत आहे. जमसेटजींच्या मोठमोठ्या देणग्यांमधून उभ्या राहिलेल्या सार्वजनिक आणि धर्मादाय संस्थांची संख्या १२६ हून अधिक आहे. त्यामध्ये सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्‌स, सर जे.जे.स्कूल ऑफ आर्किटेक्चर, सर जे.जे. स्कूल ऑफ कमर्शियल आर्ट यांचाही समावेश होतो. जीजीभायनी सुरत, नवसारी, मुंबई आणि पुण्यात रुग्णालये, शाळा, अग्यारी स्थापन करून विहिरी तसेच तलाव खोदले. त्यांनी पांजरापोळ या संस्थेस गुरांच्या पैदाशीसाठी ८०,००० रुपयांची देणगी दिली. मुंबईतल्या ठाकुरद्वार येथे जमसेटजींनी गुरांच्या मोफत चरणीसाठी २०,००० रुपये देऊन समुद्रकाठाजवळ जमीन घेतली. पुढे याच ठिकाणी ‘चर्नी रोड’ हे रेल्वे स्थानक झाले.

पारसी नाटकांसाठी नाट्यगृह
मुंबईमध्ये पारसी नाटकांची सुरुवात जमसेटजी जीजीभाय यांनी केली. त्यासाठी त्यांनी सन १७७६ साली बांधलेले बॉम्बे थिएटर आणि ग्रॅन्ट रोड थिएटर येथून सुरुवात केली. १८५३ साली बहुधा ऑक्टोबर महिन्यात पहिल्या पारसी नाटकाची निर्मिती झाली. सुरुवातीला नवशिक्यांनी सुरू केलेली ही नाट्य चळवळ थोड्याच काळात व्यावसायिक झाली.

पुरस्कार आणि सन्मान
जमशेटजींच्या या समाजहितकारी कार्याची पावती म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना ‘नाइटहूड’ व ‘बॅरोनेट’चा बहुमान दिला.. हा मान मिळालेले जमशेटजी हे पहिले भारतीय होत.
जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात जमशेटजी जीजीभॉय यांचा भव्य पुतळा उभारला आहे. तो पुतळा आजही वंद्य मानला जातो.
. . . . . विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जे जे हॉस्पिटल दीडशे वर्षांपूर्वीचा देखावा

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट हे नाव कलाशिक्षणामध्ये आदरानं घेतलं जातं. मुंबईला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात या संस्थेचा मोलाचा वाटा आहे. या संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्रात स्वतःचं निश्चित असं स्थान निर्माण केलं आहे.
मुंबईत वकील, डॉक्टर असे व्यावसायिक तयार होऊ शकतात, तर चित्रकार, शिल्पकार का निर्माण होऊ नयेत? इतर क्षेत्रात आघाडीवर असणारी मुंबई कलाक्षेत्रात इतकी मागे का, असा विचार गांभीर्याने मांडून वाचकांचं लक्ष वेधून घेणारा लेख तत्कालीन इंग्रजी वृत्तपत्र ‘द टेलिग्राफ ऑफ कुरिअन’मध्ये ३ डिसेंबर १८५२ रोजी प्रकाशित झाला होता. कलाशिक्षणाच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या जमशेटजी जीजीभाई आणि जगन्नाथ शंकरशेठ यांनी कलाशाळा सुरू करण्यासाठी पुढे यावं असं त्या लेखात सूचित केलं होतं.
पत्रव्यवहार, सल्लामसलती, समित्या असे बरेच काही होऊन अखेर २ मार्च १८५७ रोजी मुंबईत कला व औद्योगिक शाळेचे उद्धाटन झाले. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री असे नाव असलेल्या या शाळेत दुसऱ्या दिवसापासून एलेमेन्टरी ड्रॉईंग व डिझाईनचा वर्ग एलफिस्टन शाळेत सुरू झाला. पुढे ब्रिटिश चित्रकार जोसेफ ए. क्रो यांची कलाशाळेचे अधिक्षक म्हणून ऑगस्ट १८५७ मध्ये नेमणूक झाली. मुंबईच्या कला व औद्योगिक शाळेच्या अभ्यासक्रमाची मदत घेऊन अलंकारिक रेखाटन, मॉडेलिंग आणि कास्टिंग, कुंभारकला, लाकडी कोरीव काम, लिथोग्राफी, फोटोग्राफी इत्यादि विषयांबरोबरच डिझाईन आणि रेखाटन या प्राथमिक विषयांनाही प्राधान्य देण्यात आले.
शाळेला स्वतंत्र जागा हवी असल्याची जाणीव सरकारला आणि जमशेटजींना झाली. बाबुला टँक व एस्प्लनेड मैदान यांच्या जवळची जागा देण्याची शिफारस सरकारने केली व कलाशाळेच्या व्यवस्थापक समितीने ती मान्य केली. सुरुवातीला नवीन इमारतीचा आराखडा तत्कालीन प्रसिध्द ब्रिटीश वास्तुकार विल्यम बर्ग यांनी तयार केला होता. त्यांच्या आराखडयात जॉर्ज व्टिग मोलेसी यांनी बदल करून बर्ग, स्मिथ आणि जोन्स यांनी सध्याचा आराखडा तयार केला. त्यात फ्रेंच गॉथिक पध्दतीच्या कमानी, भरपूर उजेड व हवा असलेला स्टुडिओ(हॉल) असलेली दुमजली इमारत साकारली. जॉन फुल्लर यांच्या देखरेखीखाली व खान बहाद्दूर मंचरजी कावसजी मर्झबान यांच्या सहकार्याने तीन वर्षांत डॉ. दादाभाई नौरोजी मार्गावरील (पूर्वीचा हॉर्न बी रोड) सध्याची इमारत बांधण्यात आली आणि १८७८ साली सदर इमारतीत कलाशाळा सुरू करण्यात आली. यासाठी दोन लाख रुपये खर्च आला. त्यातले दीड लाख रुस्तमजी जमशेटजी जीजीभाई यांनी दिले व ब्रिटीश सरकारने १२ हजार रुपये अनुदान दिले होते. मुंबई कला शाळेचे आधीचे नाव ‘द सर जमशेटजी जीजीभाई स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री’असे होते. परंतु या नावातला ‘इंडस्ट्री’ हा शब्द १८७३ साली गाळण्यात आला.

*****************************

१२. रावबहाद्दूर डॉ. विश्राम रामजी घोले

मी पुण्यात इंजिनियरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये रहात होतो त्या काळात जंगली महाराज रोडवरून फिरत असतांना ‘रावबहाद्दूर घोले रोड’ या एका मोठ्या रस्त्याची पाटी नेहमी पहात होतो आणि हे कोण महान गृहस्थ होते असा विचार करत होतो. त्या काळात तरी मला त्यांच्याबद्दल माहिती असणारा कुणी भेटला नव्हता. पन्नास वर्षांनंतर फेसबुकवर श्री.माधव विद्वांस यांचा लेख मिळाला. त्यांचे मनःपूर्वक आभार.

महात्मा फुले यांचे सहकारी नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर डॉ विश्राम रामजी घोले यांचे आज पुण्यस्मरण (१०-०९-२०२१)
अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरात प्रत्यक्ष युद्धभूमीवर काम करणारे निष्णात शल्यविशारद.
पुण्यातल्या जहालांचे आणि मवाळांचे, ब्राह्मणांचे आणि ब्राह्मणेतरांचे मित्र.
शेती उद्योग, वैद्यक, शिक्षण…अनेक क्षेत्रांतल्या विधायक उपक्रमांचे साथी.
नगरपालिकेचे दीर्घकाळचे जागरूक सेवाभावी सभासद. राजहंस प्रकाशना मार्फत “डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार”हे त्यांचे चरित्रावर आधारित अरुणा ढोरे यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे
सागर खरपुडे यांचे ब्लॉगवर कोकणातील यादवांचा संचार हे घोले व तत्सम यादवकुलीन घराण्यांची छान माहिती दिली आहे
खालील माहिती विकिपीडिया मधून
डॉ. विश्राम घोले (इ.स. १८३३ – इ.स. १९००) हे पुण्यातील एक निष्णात शल्यविशारद आणि उदारमतवादी समाजसुधारक होते.
यादव गवळी समाजातून आलेले डॉ. घोले यांना गव्हर्नरच्या दरबारात फर्स्ट कलास सरदाराचा म्हणजे संस्थानिकांच्या बरोबरीचा दर्जा होता. त्यांची लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, जोतिबा फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, कृष्णशास्त्री-विष्णूशास्त्री चिपळूणकर अशा पुण्यातल्या अनेक सुधारकांशी मैत्री होती.
विश्राम रामजींना वडील सोजीर असल्याने शिक्षणाची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करुन ते सर्जन झाले. गोर्‍या पलटणीत १८५७च्या धामधुमीतही डॉकटर म्हणून ते भारतभर फिरले आणि मानमरातब प्राप्‍त करून १८७४ साली पुण्यात स्थायिक झाले.
स्त्री-शिक्षण, मागास जातीतील सुधारणा, शेती व उद्योग या क्षेत्रांतही डॉ. विश्राम रामजी घोले या बुद्धिमान आणि कर्तबगार व्यक्तीचे कार्य होते. १८५७ सालच्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात डॉ. घोले यांनी एक सर्जन म्हणून निःपक्षपातीपणे कामगिरी बजावली होती. नंतरच्या काळात, बिटिश अधिकारी तसेच पारशी-मारवाडी समाजातले श्रीमंत पेशंट, तत्कालीन समाजसुधारक व राजकीय चळवळीतले नेते आणि सामान्यजन अशा त्या ऐन इंग्रजी अमदानीतल्या सर्व थरांतील रुग्णांचे ते डॉकटर होते.
विश्राम रामजींची भूमिका समन्वयवादी होती. ‘ज्ञानप्रकाश’च्या संपादक मंडळातही त्यांचे मित्र होते. आणि सत्यशोधक समाजाच्या व्यास-पीठावरही त्यांचा वावर होता. विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि जोतिबा फुले यांच्यातील वैमनस्य विकोपाला जाऊनही या दोघांशी विश्राम रामजींचे सख्य होते.
पुण्यात बाहुलीचा हौद म्हणून जे ठिकाण होते त्या हौदाच्या मध्यावर विश्राम रामजींची थोरली मुलगी काशीबाई ऊर्फ बाहुली हिचे शिल्प होते. वयाच्या नवव्या वर्षी, १८७७ मध्ये काशीबाई मरण पावली. तिला डॉ. घोले यांनी इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. घोले यांच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती व महिलांचा याला प्रखर विरोध होता. जातीतील प्रमुख लोकांनी घोले यांनी मुलीला शिकवू नये असा सल्ला अनेक वेळा दिला व तसे न केल्यास जातीतून बहिष्कृत करण्याची धमकीही दिली. काही नतद्रष्ट नातेवाईक व्यक्तींनी काशीबाईला काचांचा लाडू खायला घातल्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन ती मृत्युमुखी पडली.
मात्र या घटनेनंतरही विश्राम रामजींनी माघार घेतली नाही. आपली दुसरी मुलगी गंगूबाई हिला त्यांनी जिद्दीने शिकवले. केवळ तिचे शिक्षणच केले नाही तर तिचे लग्नही लहानपणी न लावता वयाची सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच केले.
१८७५ सालच्या दुष्काळानंतर विश्राम रामजींनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आपले लक्ष केंद्रित केले. शेतीविषयक अनेक प्रयोग त्यांनी केले. शेतकरी मासिकाच्या स्थापनेतही त्यांनी पुढाकार घेतला आणि आर्थिक कारणांमुळे हे मासिक बंद पडू नये, याची सुरुवातीच्या काळात त्यांनी काळजी घेतली.
विश्राम रामजींची कन्या गंगूबाईचा विवाह डॉ. रघुनाथराव खेडकर यांच्याशी झाला. रघुनाथरावही एक निष्णात सर्जन होते. इंग्लंडमध्ये प्रॅक्टिस करताकरता त्यांनी वेदान्त धर्माचे अध्ययन आणि अध्यापन चालू ठेवले होते.
घोले यांनी आपल्या दिवंगत मुलीच्या स्मरणार्थ पुण्यात बाहुलीचा हौद बांधला आणि तो सर्व जातिधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला.

श्री. माधव विद्वांस आणि फेसबुक यांचे मनःपूर्वक आभार दि. १०-०९-२०२१


लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s