पत्ते खेळायची गंमत

आधीच्या काळात जगभरात बहुतेक सगळीकडे राजेमहाराजांचे राज्य होते, पण विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे माझ्या लहानपणच्या काळापर्यंत सगळीकडे लोकशाही, हुकुमशाही, साम्यवाद वगैरे प्रकारच्या राजवटी आल्या होत्या. इंग्लंडसारख्या काही देशांमध्ये नावापुरते किंवा शोभेसाठी राजे, राण्या वगैरे उरल्या होत्या, पण त्यांच्या हातात सत्ता राहिली नव्हती. पण त्या काळात आपल्याकडे मात्र घरोघरी चार राजे आणि चार राण्या असायच्याच, इस्पिक, बदाम, चौकट आणि किलवरच्या ! तेंव्हा पत्त्याचा जोड ही एक घरातली आवश्यक वस्तू असायची आणि फावल्या वेळात पत्ते खेळणे हा लहानमोठ्या सगळ्यांचा आवडता विरंगुळा होता. मी तर अगदी मला कळायला लागल्यापासून भिकार-सावकार, पास्तींदोन, ३०४, बदाम७, झब्बू, रमी, चॅलेंज, पेनल्टी, नाठेठोम वगैरे खेळ खेळतच लहानाचा मोठा झालो. कॉलेजमध्ये गेल्यावर ब्रिजचा सॉफिस्टिकेटेड उच्चभ्रू खेळही शिकलो. लग्न झाल्यावर माझ्या सासुरवाडी मंडळींचे खूप मोठे कुटुंब होते. दिवाळीसारख्या काळात भरपूर पाहुणे मंडळी येत. तेंव्हा दहाबाराजण मिळून बिझिकचा डाव मांडला जात असे.

त्याच्या आधी म्हणजे मी नोकरीला लागलो तेंव्हा त्या टीव्हीच्या आधीच्या काळात आमच्या ट्रेनिंग स्कूलच्या हॉस्टेलमध्येसुद्धा पत्ते कुटणे हा टाइमपासचा पॉप्युलर मार्ग होता. बदाम सात किंवा झब्बू वगैरे खेळ तेंव्हा जरा बालिश वाटायला लागले होते. ब्रिज खेळण्यासाठी चार सराईत खेळाडू हवेत आणि एका वेळी फक्त चारजणच तो खेळू शकत. त्यापेक्षा रमी हा खेळ कितीही कमीजास्त मुले येऊन जाऊन खेळू शकत असल्यामुळे तोच जास्त खेळला जात असे.

“द्यूतामध्ये पांडव हरले” वरून झालेल्या महाभारतापासून बोध घेत “कध्धी कध्धी जुगार खेळू नये” हे माझ्या बालमनावर इतके ठसवले गेले होते की मी तोपर्यंत कधी एक पैसा जुगारावर लावला नव्हता. त्यामुळे पैसे लावून रमी खेळायला मी तयार होत नव्हतो, पण आमच्या ग्रुपमधल्या लीडरच्या मते जगात कोणीही आणि कधीही फुकट रमी खेळत नसतो. तसे केले तर खेळणारे लक्ष देणार नाहीत, कुणीच पॅक करणार नाही, सगळेजण खेळत राहतील, त्यामुळे कुणालाच हवी असलेली पाने मिळणार नाहीत आणि खेळ कंटाळवाणा होईल. त्याचे म्हणणे बरोबर वाटत असले तरी तोच सर्वात चलाख आणि हुशार असल्यामुळे तो नेहमी आपल्याला लुटेल असे वाटून काही मित्रांनी माझी बाजू घेतली. शेवटी अशी तडजोड करण्यात आली की अगदी कमी स्टेकवर खेळायचे आणि कुणीही तिथल्या तिथे रोख पैसे द्यायचे घ्यायचे नाहीत. सगळा हिशोब मांडून ठेवायचा आणि हरलेल्या पैशांची जितकी टोटल होईल तितके पैसे सगळ्यांनी मिळून हॉटेलात जाऊन खाण्यापिण्यात खर्च करायचे. यात जिंकलेल्या मुलांना फुकट खायला मिळत असले तरी हरलेल्यांना त्याचे विशेष दुःख होत नसे. गंमत म्हणजे मी सहसा हरत नव्हतो. त्यानंतर आमच्या कित्येक संध्याकाळी आणि रात्री रमी खेळण्यात आणि खाण्यापिण्यात रंगल्या.

घरोघरी टेलिव्हिजन आल्यानंतर रिकामा वेळ घालवायचे ते पहिल्या क्रमांकाचे साधन झाले, त्यासाठी एकत्र बसून पत्ते कुटायची गरज उरली नाही किंवा ती आवड राहिली नाही.. लहान लहान विभक्त कुटुंबे झाल्यामुळे घराघरात ईन मीन तीन माणसे शिल्लक राहिली. वाडा किंवा चाळ संस्कृती लयाला गेल्यामुळे शेजारी पाजारीही जमेनासे झाले. या सगळ्यांमुळे सामुदायिक पत्ते खेळणे मागे मागे पडत गेले. इंटरनेट आणि मोबाईल क्रांतीनंतर तर घरातली माणसेही एकेकांपासून दूर दूर रहायला लागली. लहान मुलेही मोबाईल किंवा टॅब्लेटवरच्या गेम्समध्ये रमायला लागली. त्यामुळे घराघरातून पत्ते कटाप होत गेले. मात्र काँप्यूटरवर एकट्यानेच खेळायचे फ्रीसेल आणि सॉलिटेअरसारखे अनेक पत्त्यांचे खेळही निघाले आणि त्यांच्या निमित्याने पत्त्यातले राजा राणी गोटू नेहमी माझ्याडोळ्यांसमोर येत असतात.

नोकरीत असतांना काही वर्षे आम्ही रोज अणुशक्तीनगरपासून कुलाब्यापर्यंत बसने जात होतो. तेंव्हा मात्र पुढच्या बाजूला चार चार जणांचे दोन ग्रुप ब्रिज खेळायचे आणि मागच्या बाजूची आठदहा मुले पपलू खेळायची. अर्थातच पपलूवर पैसे लावले जात आणि त्याचा हिशोब मांडून ठेवला जात असे. ब्रिज मात्र कसलीही कन्व्हेन्शन्स किंवा कसलाही विधिनिषेध न बाळगता, पैसे न लावता बिनधास आणि मोकळेपणाने खेळला जाई. त्यात नेहमी तावातावाने ओव्हरबिडिंग केले जायचे आणि ते अशक्य कॉन्ट्रॅक्ट बुडले की सगळेजण त्याचा दोष आपापल्या पार्टनरवर ढकलायचे. आमच्या बाजूला बसलेले दोघेतीघेही लक्ष देऊन आमचा खेळ पहात असत आणि कुणाचे कुठे चुकले हे सांगायला तत्पर असत. त्यामुळे प्रत्यक्ष खेळापेक्षा नंतर झालेली त्याची चिरफाडच जास्त रंगायची. पण त्या वादावादीतही एक प्रकारची मजा येत असे आणि मुंबईच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत करायचा प्रवास कंटाळवाणा होत नसे.

तर माझ्या अशा असंख्य आठवणी या पत्त्याच्या खेळाशी जोडलेल्या आहेत. अशा या पत्त्यांबद्दल मला मिळालेले तीन मनोरंजक लेख मी एकत्र केले आहेत. श्री.द्वारकानाथ संझगिरी आणि इतर अनामिक लेखकांचे मनःपूर्वक आभार. . . . . . . . आनंद घारे

पत्त्याच्या खेळाचा मनोरंजक असा इतिहास इथे पहा.
https://vishwakosh.marathi.gov.in/20405/


१. पत्ते आणि वर्ष

१. तुम्हाला माहित आहे का पत्ते कॅलेंडरशी संबंधित आहेत.
☞ एका वर्षात 52 आठवडे असतात. पत्ते सुद्धा 52 असतात.
☞ एका वर्षात चार हंगाम असतात (Winter हिवाळा, Spring वसंत, Summer उन्हाळा, Autumn शरद). पत्त्यात सुद्धा 4 सुट (इस्पिक, बदाम, किलवर, चौकट) असतात.
☞ प्रत्येक हंगामात 13 आठवडे असतात. प्रत्येक सूट मध्ये 13 पत्ते असतात (1,2,3,4,5,6,7,8,9,10,11 गुलाम, 12राणी, 13 बादशाह)
☞ वर्षात 12 महिने असतात. पत्त्यात 12 चित्रांचे पत्ते असतात.(गुलाम, राणी, बादशाह)
लाल पत्ते दिवस, तर काळे पत्ते रात्र दर्शवितात.
☞ 1+2+3+4+5+6+7+8+9+10+11+12+13 = 91 याला 4 ने गुणल्यास
91×4 = 364 आणि जोकरचा एक मिळवल्यास 365. एक वर्षाचे दिवस होतात.
☞ काय हा फक्त योगायोग आहे की सखोल बुद्धिमत्ता.
☞ आणखी थोडे गमतीशीर
One, Two, Three, Four, Five, Six, Seven, Eight, Nine, Ten, Jack, Queen, King यातील अक्षरांची संख्या मोजा ती येते 52.
⇥ इस्पिक – नांगरणी /कर्तव्य दर्शविते.
⇥ बदाम – पीक /प्रेम दर्शविते.
⇥ कीलवर – भरभराट /वाढ दर्शविते.
⇥ चौकट – पीक काढणे /संपत्ती दर्शविते.
☞ कधी कधी 2 जोकर असतात ते लीप वर्ष दर्शवितात.

तर पत्ते हा फक्त खेळ नसून त्यामागे एक सखोल तत्वज्ञान आहे.🙏


२. पत्ते हरवले

एकेकाळी पत्ते हा कौटुंबिक खेळ होता. आठवड्यातून एकदा तरी पत्ते होत. आता शेवटचे पत्ते कधी खेळले आठवत नाही. माझ्या ताना पिही निपाजा ह्या पुस्तकातील ७, ८ वर्षापूर्वीचा यासंबंधीचा लेख मी वाचकांसाठी पुन्हा सादर करत आहे.
. . . द्वारकानाथ संझगिरी

परवा कपाट लावताना माझं लक्ष एका पत्त्यांच्या कॅटकडे गेलं. माझ्या लग्नाच्या सुटाएवढा मला तो जुनाट वाटला. सुटाकडे पाहून तो मुलासाठी त्याच्या लग्नात उपयोगी होईल का, असा विचार माझ्या मनात येतो. त्या सुटाने माझ्या शरीराची साथ वीस वर्षांपूर्वीच सोडली. शरीराच्या महत्त्वाकांक्षेच्या कक्षा वाढल्या; त्या सुटाला झेपल्या नाहीत. तो खरा बोहारणीकडे जाऊन बार्टर सिस्टिमने भांडं घरात यायचं; पण त्याचे पैसे माझ्या सासर्‍यांनी दिले असल्यामुळे त्याला कपाटात मानाचं स्थान होतं.

पण तेच नशीब त्या पत्त्याच्या कॅटचं नव्हतं. तो कॅट, झुरळांसाठी ठेवलेल्या डांबरगोळ्या चघळत एखादा म्हातारा कुत्रा कोपर्‍यात पडून राहावा तसा पडून राहिला होता. पण माझ्यासाठी तो माझ्या बालपणीच्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग होता. मीच तो काढून टेबलावर ठेवला. तो किंचित जीर्ण झाला होता. त्या कॅटवरची गोरी बाई वयोमानाप्रमाणे ‘पिवळी’ पडली होती. पण बावन्नच्या बावन्न पत्ते त्या कॅटमध्ये होते. हिंदी चित्रपटाच्या निर्मात्याकडे जुळी मुलं आली की हरवतात, तसं पेन, रुमाल, महत्त्वाच्या व्यक्तीचा पत्ता किंवा फोन नंबर, रेल्वे तिकीट, क्वचित प्रसंगी मोबाइल वगैरे गोष्टी माझ्याकडे हरवण्यासाठी येतात. ‘इथे वस्तू हरवून मिळतील’ अशी पाटी माझ्या पाठीवर लावायला हरकत नाही. पण त्या कॅटमधला एकही पत्ता मी हरवला नव्हता. मर्सिडिजमधून जाणार्‍या माणसाने फियाटकडे पाहावं, तसं माझ्या मुलाने त्या पत्त्यांच्या कॅटकडे पाहिलं. माझ्यासाठी ती मर्सिडिज होती.

गोष्टींची पुस्तकं आणि पत्त्यांचा कॅट हे माझे लहानपणीचे सखेसोबती! गोष्टी कशा, तर पोपटात जीव असलेला राक्षस किंवा हट्टी राजकन्या. सरळ सुस्वभावी राजकन्या मला कधीच भेटली नाही. मी माझ्या मुलाला अशी पुस्तकं आणून दिल्याचं स्मरत नाही. तो टी.व्ही. आणि कॉम्प्युटरशी एकरूप झालेल्या पिढीतला. त्याला या फॅन्टसीची गरजच काय होती?

पण ही पिढी आणखी एका आनंदाला मुकली असं मला वाटतं. पत्ते खेळण्याच्या! गड्डा-झब्बू, बदामसत्ती, लॅडीस, चॅलेंज हे शब्द त्यांच्यासाठी स्पॅनिश भाषेएवढे परके आहेत. मी हे शब्द अभ्यासाबरोबर शिकलो. दबकत दबकत ‘रमी’ची माडी चढलो. लॅडीस खेळताना मला उगाच महिलांच्या डब्यात शिरल्यासारखं वाटायचं. खरंतर लेडीज आणि लॅडीस यांचा काहीही संबंध नसावा. लॅडीस खेळताना हातात इस्पीक एक्का आल्यावर कुंबळेला त्याचा चेंडू वळल्यावर किंवा रामदास आठवलेला केंद्रात मंत्रिपद मिळाल्यावर होणार नाही, एवढा आनंद मला व्हायचा. बदाम-इस्पीकला मान होता; चौकट-किलवरला तितकासा नव्हता. पण पत्त्यांमध्ये ही जातिव्यवस्था का रुजली, हे मला कधीच कळलं नाही. गड्डा-छब्बू देताना पठाणाचं कर्ज फेडल्याचं समाधान वाटायचं. ‘चॅलेंज’ हा खेळ मी अत्यंत बावळट चेहर्‍याने खेळायचो. मूलतः माझा चेहरा बावळट असल्यामुळे चेहरा बावळट ठेवताना मला सलमानला अभिनय करताना पडतात, तसे कष्ट कधीच पडले नाहीत. चॅलेंज खेळात बनवाबनवी महत्त्वाची. चार एक्के म्हणत मी चार दुर्‍या बेमालूमपणे लावायचो आणि पुन्हा चार एक्के लावताना आता लावलेले खरे आहेत, असा भाव चेहर्‍यावर असायचा. या बाबतीत माझ्यात आणि शिबू सोरेनमध्ये साम्य आहे. त्याच वॉरंट निघूनही चेहर्‍यावर भाव स्वातंत्र्याच्या चळवळीत तुरुंगवास भोगल्यासारखा. उद्या तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याच्या चेहर्‍यावर भाव असतील चारधामची यात्रा करून आल्यासारखे. त्यामुळेच ‘चॅलेंज’ खेळातली माझी गती पाहून, हा मुलगा मोठेपणी मंत्री होईल, असं भाकीत अनेकांनी केलं होतं. माझ्या दुर्दैवाने ही खोटं बोलण्याची कला मला फक्त पत्त्यांमध्ये अवगत होती. एरवी तिकीट खिशात असूनही समोर चेकर आला, की माझा चेहरा खिशात तिकीट नसल्यासारखा होतो.

प्रवासाला निघालोय आणि पत्त्यांचा कॅट नाही, ही गोष्ट अशक्य होती. प्रवासाला जाताना मी एकदा तिकीट विसरलोय, खायचा डबा विसरलोय; पण पत्त्यांचा कॅट नाही. सुट्टीत जेवणं संपली, बिछाने घातले, की पत्ते सुरू. त्या वेळी माणशी एक खाट, हा हिशेब नव्हता. बिछाने हे घालायला लागायचे. घरातली सर्व मंडळी एकत्र यायची. माझ्या आजोबांचा घरात दरारा. सुना घाबरून असत. पण काकी माझ्या आजोबांच्या धाकाला न जुमानता झब्बू द्यायची. त्या वेळी सुनांना सासर्‍याचा दरारा वाटे. आताचे सासरे सुनांनी ताटात टाकलं ते गिळतात.

पत्ते हा सामाजिक बांधीलकी जपणारा खेळ आहे. मग ते गाडीतले प्रवासी असोत किंवा मुंबईच्या चाळीतले रहिवासी. आमच्या चाळीत पत्त्यांनी कितीतरी भांडकुदळ कुटुंबं एकत्र आणली. सौ. भोसले आणि सौ. दामलेंचं नळावरचं भांडण ठरलेलं. भोसले हे स्वतःला शिवाजी महाराजांच्या वंशातले असं समजायचे आणि तसं सांगायचे. पण एकदा चाळीत चोर शिरला तेव्हा त्याच्या हातात सुरा असेल असं समजून ते सार्वजनिक संडासात शिरले होते. ‘भीतीने काही झालंच तर होणारी गैरसोय टाळावी,’ या हेतूने ते तिथे शिरले, अशी मल्लिनाथी सौ. दामलेंनी तेव्हा केली होती. दामलेंच्या शौर्यकथाही चाळीला ठाऊक होत्या. एकदा ट्रेनने बाहेरगावी जाताना त्यांचा लहान मुलगा स्टेशनवर राहिला, तेव्हा डब्यातल्या लोकांनी ओरडून सांगितलं, ‘‘साखळी खेचा, खेचा.’’ त्यांचा हात साखळीजवळ जाईना. शेवटी सौ. दामल्यांनी पुढे सरसावून साखळी ओढली आणि म्हणाल्या, ‘‘हे संडासाची साखळी खेचत नाहीत, इथली कुठली खेचणार?’’ दोघांच्या भांडणात हे सर्व निघायचं.

पण भोसलेंच्या घरी रविवारी दुपारी मटणाचं जेवण झालं, की अळवाचं फदफदं आणि आंबट वरणाचे भुरके मारून दामले रमीच्या डावासाठी येत. सौ. भोसले या सर्वांना प्रेमाने चहा करून देत. मुंबईत कुठल्याही चाळीत शनिवार संध्याकाळ आणि रविवार दुपार ही रमी खेळण्यासाठी राखीव असायची. त्यांच्या मांडीला मांडी लावून मी थरथरत्या हाताने रमी शिकलो. पैसा पॉइंटने रमी खेळणं हेसुद्धा त्या वेळी रोमहर्षक वाटायचं. मला आठवतंय, पहिल्यांदा रमीत जिंकून मी पाच रुपये कमावले तेव्हा स्कॉलरशिप मिळाल्याचा आनंद माझ्या चेहर्‍यावर होता. माझ्या पहिल्या कमाईत मी सावंतांच्या शेवंताला मोगर्‍याचा गजरासुद्धा घेऊन दिला होता. ती गुडलक म्हणून माझ्या बाजूला बसायची. पुढे नोकरी लागल्यावर ऑफिसला जाताना स्टाफबसमध्ये मेंडीकोट आणि थोडं जमायला लागल्यावर ब्रिजचा डाव जमत असे. ऑफिसात पहिला चहा घेता घेता सुद्धा चर्चा असायची, ‘‘तू कशी चूक केलीस, गुलामाऐवजी राणी टाकायला हवी होतीस’’ किंवा ‘‘तू नोट्रम्च्या भानगडीत पडायलाच नको होतंस,’’ वगैरे गोष्टींची! पत्त्यांतलं डोकं फक्त आपल्यालाच आहे, ही प्रत्येकाची ठाम समजूत होती.

नंतर मी किंचित सुखवस्तू झालो. ट्रेनचा प्रवास संपून आधी स्कूटर आणि मग कार आली. चाळ जाऊन बंद दरवाजाचा फ्लॅट आला. भांडणं संपली होती. शेवंता दामल्यांच्या सुधीरचा हात धरून निघून गेली होती. पत्तेही नकळत निघून गेले होते. त्यांची जागा इतर गोष्टींनी घेतली. माझ्या मुलानेही कधी पत्त्यांचा हट्ट धरला नाही. गोट्या, गोष्टींची पुस्तकं, पतंग, पत्ते, मॅटिनी त्यांच्या आयुष्यात कधी आलेच नाहीत. टी.व्ही., कॉम्प्युटर, डिस्कोने त्यांची जागा घेतली. कधीतरी चिरंजीव कॉम्प्युटरवर पत्त्यांचा डाव मांडून एकटाच खेळताना दिसतो. पण पत्ते ही काही प्रेयसीप्रमाणे एकांतात आस्वाद घ्यायची गोष्ट नाही. ती चारचौघांत खेळून आस्वाद घ्यायची गोष्ट आहे. पण सोडलेली सिगरेट पुन्हा कधीतरी ओढावीशी वाटते, जुन्या प्रेयसीला पुन्हा भेटावंसं वाटतं, तशी पुन्हा एकदा पत्त्यांची मैफल जमवावीशी वाटते. पण कशी जमणार? दामले देवाघरी गेले. त्यांच्याशी भांडायला भोसले त्यांच्या पाठोपाठ गेले. शेजारी बसायला शेवंताही नाही. पत्ते कपाटात आहेत. त्यांतले गुलाम, राजाराणी नाहीत. काय करायचं खेळून?

( ताना पिहिनी पाजा ह्या मॅजेस्टिक प्रकाशनाच्या पुस्तकातून)


३. पत्त्यांचा डाव आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ

“शंकरलीला” या पुस्तकातील उतारा.

दुर्री – म्हणजे पृथ्वी व आकाश.
तिर्री – म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश.
चौकी – म्हणजे चार वेद.
पंजी – म्हणजे पंचप्राण.
छक्की – म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, लोभ व मत्सर हे सहा विकार.
सत्ती – म्हणजे सात सागर.
अठ्ठी – म्हणजे आठ सिद्धी.
नववी – म्हणजे नऊ ग्रह.
दश्शी – म्हणजे दहा इंद्रिये = पाच कर्मेंद्रिये + पाच ज्ञानेंद्रिये.
गुलाम – म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या वासना, इच्छा. माणूस त्यांचाच गुलाम होऊन जातो.
राणी – म्हणजे माया.
राजा – म्हणजे या सर्वांवर स्वार होऊन त्याना चालवणारा.
एक्का – म्हणजे विवेक. माणसाची सारासार बुद्धी. या सर्व खेळाला स्वाधीन ठेवणारा तो “विवेक”.
दश्शीवर दबाव असतो गुलामाचा. वासनाच इंद्रियांना नाचवते. वासना उत्पन्न होते मायेमुळे. तिच्या नादाने वाहावत जाते ते माणसाचे मन. माणूस. तो राजा, पण या राजालाही मुठीत ठेऊ शकतो तो विवेक.
सर्वात महत्वाचं म्हणजे – “हुकुमाचा एक्का म्हणजे सद्गुरू”
🙏धन्यवाद🙏

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s