नामदार गोपाळ कृष्ण गोखले

मी शाळेत शिकत असतांनाच्या काळात न्या.रानडे, नामदार गोखले, लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर वगैरे अनेक नावे नुसती ऐकली होती. तेंव्हा मी आमच्या गावाबाहेरचे जग पाहिले नसल्यामुळे ही सगळी मंडळी एकाच काळात पुण्यातल्या एकाद्या वाड्यात किंवा गल्लीत रहात असावी अशी माझी खुळचट कल्पना होती. मोठेपणी लोकमान्य टिळक सोडले तर इतर कुणाविषयी फारसे काही कानावर आलेही नाही.

यांच्यातले न्यायमूर्ती रानडे हे तर सरकारी कोर्टात जज होते म्हणजे थेट सरकारी नोकरच होते. ते यांच्यात सर्वात जुने होते. त्यांना गुरुस्थानी मानणारे नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे काँग्रेसमधील मवाळ किंवा नेमस्त लोकांचे पुढारी होते. दयाळू इंग्रज सरकारला अर्जविनंत्या करून जनतेच्या भल्यासाठी त्यांच्याकडून काही सवलती मिळवाव्यात, जनतेच्या उपयोगाची काही कामे करवून घ्यावीत असे प्रयत्न ते करत असत. याचा अर्थ तेही एका दृष्टीने सरकारशी सहकार्य करत असत आणि सरकारने नेमलेल्या समित्यांवर काम करत असत. लोकमान्य टिळक जहाल पंथाचे होते म्हणजे तेही हातात तलवार किंवा बंदूक घेऊन प्रत्यक्ष लढाई करत नव्हते, पण “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” यासारखे अग्रलेख लिहून सरकारला कागदावरच खडसावत असत. त्यासाठी त्यांच्यावर खटला भरला गेला आणि त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. तेंव्हा त्यांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” ही प्रसिद्ध घोषणा न्यायालयामध्येच केली होती. शिवाय त्यांनी गणेशोत्सवासारख्या माध्यमामधून लोकांना एकत्र आणून त्यांच्यात जनजागृति केली होते हे एक फार मोठे काम केले होते. या सगळ्या कारणांमुळे मला लहानपणी तरी नामदार गोखल्यांविषयी तितकासा आदर वाटत नव्हता.

काही लोक गोपाळ कृष्ण गोखल्यांना महात्मा गांधी यांचे गुरु मानतात. तसे गांधीजींनी कुठे लिहून ठेवले आहे का किंवा त्यांच्या चरित्रांमध्ये तसा उल्लेख आहे का हे मला माहीत नाही. गोखले हे व्यवसायाने प्राध्यापक होते, पण गांधीजी कधीच त्यांच्या वर्गात शिकत नव्हते. ते गांधीजींपेक्षा फक्त तीनच वर्षांनी मोठे होते आणि गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परत आल्यानंतर थोड्याच काळाने गोखल्यांचे अकाली निधन झाले. त्यांना एकमेकांचा फारसा सहवास मिळाला असावा असे मला वाटत नाही. पण “इंग्रजांशी लढतांना हिंसेचा मार्ग उपयोगाचा नाही” एवढे गोखल्यांचे तत्व मात्र गांधीजींनी जन्मभर पाळले. गांधीजींनी देशाच्या राजकारणात उतरायच्या आधी देशभर हिंडून त्या काळातल्या सामान्य जनतेची परिस्थिती प्रत्यक्ष पाहून घ्यावी असे गोखल्यांनी त्यांना सांगितले आणि त्यानुसार गांधीजींनी देशभर भ्रमंति केली असे म्हणतात. गोखले हे जन्मभर काँग्रेसमध्ये कार्यरत होते आणि गांधीजींनीही भारतात येताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला यात काहीतरी दुवा नक्कीच असणार.

गोपाळ कृष्ण गोखले यांनी इंग्रज सरकारशी सामोपचाराचे धोरण ठेवले असले तरी त्याांनी कधीही सरकारी नोकरी केली नाही आणि सरकारकडून पगार घेतला नाही. याविषयीचा एक लेख खाली दिला आहे. या लेखाचे लेखक संकेत कुलकर्णी आणि माझे मित्र सुधीर काळे यांचा मी आभारी आहे. . . . आनंद घारे

गोपाळ कृष्ण गोखले यांचेविषयी विकिपिडियावरील माहिती इथे
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87

  • – – – – – — — – – — — – –

आज ९ मे. प्रत्यक्ष गांधी ज्यांना ‘महात्मा’ म्हणायचे आणि राजकीय गुरू मानायचे – ज्यांनी १९०१ साली गांधींना आफ्रिका सोडून कायमचे पुन्हा भारतात यायचा आणि संपूर्ण भारत स्वत: फिरून पहायचा सल्ला दिला होता – ज्यांना प्रत्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांनी आपला मानसपुत्र मानलं होतं – त्या गोपाळ कृष्ण गोखल्यांची आज १५५ वी जयंती.
गोपाळ कृष्ण गोखल्यांचे जन्मगाव रत्नागिरीतले कोतळूक. जन्म १८६६ चा. कोल्हापुरात राजाराम कॉलेज आणि नंतर मुंबईत एलफिन्स्टन कॉलेजात शिक्षण. ते संपलं १८८४ मध्ये आणि त्यांनी डेक्कन एज्युकेशन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी पत्करली. ती सुरु असतानाच गोखले कॉंग्रेसमध्ये आले १८८९ मध्ये. थोड्याच कालावधीत कॉंग्रेसमधील मवाळ गटाचे नेतृत्व गोखल्यांकडे आले. इंग्रजांच्या न्यायप्रियतेवर गोखल्यांचा विश्वास होता. इंग्रज सरकारशी सामोपचाराने वागून भारतीयांसाठी जास्तीत जास्त हक्क आणि राज्यकारभारात स्वायत्तता मिळवायला हवी हे त्यांचे मत होते. पण हे सगळे करत असताना इंग्रज सरकारची कोणत्याही प्रकारची पगारी नोकरी करणे किंवा इंग्रज सरकारचा कसलाही मिंधेपणा पत्करणे त्यांना मान्य नव्हते. ह्या मताशी ते आयुष्यभर एकनिष्ठ राहिले.
१९१२ साली त्यांची नेमणूक पब्लिक सर्विसेसच्या रॉयल कमिशनवर झाली असतानाची गोष्ट. कमिशनच्या नियमानुसार गोखल्यांना कळविण्यात आलं की कमिशनचं काम सुरु असताना जेव्हा ते भारतात असतील तेव्हा त्यांना महिना १५०० रुपये पगार अधिक रोजचे १५ रुपये अलाऊन्स मिळेल. जेव्हा ते इंग्लंडमध्ये असतील तेव्हा त्यांना महिन्याचे १०० पौंड पगार अधिक रोजचे १ पौंड १ शिलिंग अलाऊन्स मिळेल.
तेव्हा गोखल्यांनी सरकारला खास पत्र लिहून विचारलं की हा जो पगार दिला जातोय तो नुसते कमिशनचे काम सुरु असताना दिला जाणारा तात्पुरता भत्ता आहे की त्यांना सरकारचे पगारी नोकर बनवून त्यांना हा पगार सुरु केलेला आहे? जर ते सरकारी नोकर म्हणून गणले जात असतील तर तो पगार स्वीकारण्याची त्यांची अजिबात इच्छा नाही. सरकारनेही पगारी नोकराची वागणूक दिलेली त्यांना अजिबात मान्य नाही.
हे पैशांचे आकडे १९१२-१३ चे आहेत बरं का! ही भरपूर रक्कम होती त्यावेळी. आणि ही जरी सरकारी नोकरी मानली तरी ती संधीही सहजासहजी कोणालाही मिळणारी नव्हती. पण सरकारी नोकर बनून पगार घेतला तर आपण सरकारचे मिंधे बनू आणि आपल्याला बरोबरीच्या नात्याने सरकारशी चर्चा विचारविनिमय करता येणार नाही किंवा योग्य मागण्यांसाठी सरकारवर दबाव टाकता येणार नाही – ह्या फक्त एकाच भावनेतून रॉयल कमिशनवर आमंत्रित ‘मवाळ’ गोखले सरकारला ठणकावून सांगत आहेत की सरकार हे पैसे जर पगार म्हणून देत असेल तर त्यांना ते नकोत. ह्याऊप्पर सरकारचा पगारी नोकर बनणे त्यांना अजिबात मान्य नाही!
सोबत ब्रिटीश लायब्ररीत जपून ठेवलेल्या ह्या गोखल्यांनी लिहिलेल्या पत्राचा फोटो देतोय. नक्की वाचून पहा. खाली गोखल्यांची सहीही आहे – जी सहसा पहायला मिळत नाही.
आज जयंतीनिमित्त गोपाळ कृष्ण गोखल्यांना सादर प्रणाम!

– संकेत कुलकर्णी (लंडन)

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

One thought on “नामदार गोपाळ कृष्ण गोखले”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s