वीर हनुमान आणि दास हनुमान

आज श्रीहनुमानाचा जन्मोत्सव आहे. समर्थ रामदासांनी भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सौख्यकारी दुःखहारी अशा अनेक नावांनी या श्रीहनुमंताची स्तुति केली आहे. आज त्याच्या जन्मोत्सवानिमित्य माझे मित्र आणि एक वरिष्ठ सेवानिवृत्त सहकारी श्री. शरद पांडुरंग काळे यांनी लिहिलेला हा लेख साभार सादर करीत आहे.

आपल्या भारतीय परंपरेत ज्या ओजस्वी व्यक्तिरेखा आपल्याला सातत्याने प्रेरणा देत आहेत, त्यात हनुमान हे नाव अतिशय महत्वाचे आहे. वानरांच्या कुळात जन्म घेतलेल्या आणि बुद्धी, शारीरिक सामर्थ्य, धैर्य, निष्ठा आणि स्वयंशिस्त यांचा आदर्श असलेल्या हनुमानाने भारतीय संस्कृतीत देवस्थान मिळविले.ज्या सात चिरंजीव व्यक्तिरेखा आपल्या पुराणांमधून वर्णिलेल्या आहेत, त्यात हनुमान ही एक व्यक्तिरेखा आहे.

पुंजिकस्थला नावाची एक अप्सरा होती. ह्या अप्सरेने कपियोनीत वानरराज कुंजराच्या पोटी जन्म घेतला. ती मुळातच अप्सरा असल्यामुळे अतिशय सुंदर होती. पुढे ती वानरराज केसरीची पत्नी झाली. अप्सरा असल्यामुळे ती हवा तो देह धारण करू शकत होती. एक दिवस मानवी लावण्यावती स्त्रीच्या रुपात ती एका पर्वतशिखरावर भ्रमण करीत होती, तेंव्हा तिचे रूप पाहून पवनदेव तिच्यावर मोहित झाले. त्यांनी तिच्या सुंदर शरीराला आलिंगन देताच त्या जाणीवेने ती सावध झाली, व आपला पातिव्रत्य भंग करणारा कोण ते विचारू लागली. त्यावर पवनदेवांनी तिला सांगितले की मी अव्यक्त रूपाने मानस संकल्पाद्वारे तुझ्याशी समागम केला आहे, त्यामुळे तुझ्यावर पातिव्रत्य भंगाचा दोष येत नाही. माझ्या कृपेमुळे तुला एका बलवान आणि बुद्धिमान पुत्राची प्राप्ती होईल. त्या नंतर भगवान वायुदेवांच्या कृपेने वानरराज केसरी आणि अंजनी यांच्या पोटी चैत्र पौर्णिमेला सकाळी सहा वाजता हनुमान जन्माला आला.

बाल्यावस्थेत असतांना उगवत्या सूर्याला फळ समजून त्याचा घास घेण्यासाठी आकाशात त्याने झेप घेतली. तीनशे योजने अंतर पार करून अंतरिक्षात गेल्यावर, त्याच्या तीव्र गतीने आणि आवेशाने हबकलेल्या इंद्राने वज्र प्रहार करून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्या प्रहाराने हनुमानाच्या हनुवटीला जखम झाली. त्याच्या हनुवटीचा एक छोटा भाग उदयगिरी पर्वताच्या शिखरावर पडला. म्हणून त्याचे नाव हनुमान असे पडले. त्यावेळी झालेल्या जखमेचा व्रण आपल्याला हनुमानाच्या फोटोवर किंवा मूर्तीवर पाहायला मिळतो. इंद्राच्या वज्रप्रहाराने आपल्या पुत्राला जखम झाल्याचे पाहून पवनदेव खवळले व त्यांनी प्रवाहित होणे सोडून दिले. जगाच्या अस्तित्वाला त्यामुळे धोका निर्माण होत आहे, असे लक्षात येताच ब्रह्मदेवांनी मध्यस्थी करून हनुमानाला चिरंजीवित्व तर इंद्रदेवांनी इच्छा मरण बहाल केले. पण सृष्टीनियम मोडल्याबद्दल काहीतरी शिक्षा हवीच! म्हणून हनुमानाला त्याच्या प्रचंड शक्तीचा विसर पडेल, आणि जेंव्हा त्या शक्तीची नितांत गरज आहे, असा एखादा प्रसंग आलाच, तर त्याच्या स्मृतिपटलावर आलेले मळभ दूर होऊन, त्याला पुन्हा एकदा त्या शक्तीची जाणीव होईल, अशी म्हंटल तर शिक्षा आणि म्हंटल तर वरदान त्याला इंद्रदेवांनी दिले. सीता शोध मोहिमेवर गेल्यावर , समुद्रकाठी जांबुवंताने हनुमानाला ही कथा सांगून त्याच्या स्मृती जाग्या केल्या आणि मग समुद्र उल्लंघून हनुमानाने लंकेत अशोकवनात असलेल्या सीतेचा शोध लावला.

रामायण युद्धात हनुमानाने केलेला पराक्रम विदित आहेच. रावणाला आपल्या बळाची कल्पना देण्यासाठी लंका दहन करणे, राम लक्ष्मणाला नागपाशातून मुक्त करण्यासाठी पक्षीराज गरुडाला आणणे आणि लक्ष्मणाच्या बेशुद्ध अवस्थेवर संजीवनी औषध आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणणे या तीन गोष्टींचे, या युद्धातील महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे युद्धाचा नूर तर पालटलाच, पण वानरांच्या सैन्यात जो जोश निर्माण झाला, त्याचा इष्ट परिणाम होऊन त्यांची विजिगीषु प्रवृत्ती शतगुणित झाली व श्रीरामांना युद्धात विजय मिळण्यास मदत झाली.हनुमानाची शक्ती जशी प्रचंड होती, तशीच त्याची श्रीरामांवरची निष्ठा आणि भक्ती देखील अतुलनीय अशीच होती. आपण नेहेमी बघतो की माणसाला जेंव्हा त्याची श्रद्धा एखादे काम करण्यास उद्युक्त करते, तेंव्हा तो काहीतरी अलौकिक असे कार्य करून दाखवितो. अनेक क्षेत्रांमध्ये हे होत असतांना आपल्याला आजही दिसते. भक्ती आणि शक्ती या दोन्ही बाबींमुळे हनुमान हा दास आणि वीर अशा दोन्ही भूमिका अतिशय सहजतेने निभावतांना आपल्याला दिसत राहातो. जेंव्हा तो वीर हनुमान असतो, तेंव्हा त्याला कुणीही रोखू शकत नाही, आणि जेंव्हा तो दास हनुमान असतो, तेंव्हा आपल्या देवासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. ह्या दोन्ही गुणांची महती आजदेखील तसूभरही कमी झालेली नाही.

आंजनेय, बजरंग बली, दीनबांधव, कालनिधी, चिरंजीवी, महाधुत, मनोजवं, रामभक्त, पवनपुत्र, मारुती, रामदूत, संकट मोचन, सर्वरोगहारी, जितेंद्रिय, कपिश्वर, सुग्रीवसचिव, हनुमंत, केसरी नंदन आणि अशा कितीतरी नावांनी व विशेषणांनी अतिशय लोकप्रिय असलेला हा वीरबाहु, आपल्या हृदयात श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेचा सतत निवास असतो असे जे म्हणतो, त्यात अतिशयोक्ती नसते. त्याची श्रद्धास्थाने तेव्हढ्याच तोलाची असतात. महाभारतामध्ये देखील वीर हनुमान आपल्याला भेटत असतो. अर्जुनाच्या रथावर असलेल्या ध्वजेचा रक्षणकर्ता आणि भीमाचे गर्वहरण करणाऱ्या वृद्ध वानराच्या रुपात आल्याचे उल्लेख महाभारतात आहेत.

सोबत जो फोटो जोडला आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील १०५ फुटी हनुमान मूर्तीचा आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाड्याजवल असलेल्या परीताला आंजनेय मंदिरातील काँक्रीट ने बनविलेली हनुमान मूर्ती १३५ फूट उंचीची असून सन २००३ मध्ये ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. हिमाचल प्रदेशातील सोलन येथील मानवी भारती विद्यापीठातील एका मंदिरात १५५ फूट उंचीची हनुमान मूर्ती आहे. श्रीकाकुलम या आंध्र प्रदेशातील जिल्ह्यात असलेल्या मडपम या गावी प्रतिष्ठापना करण्यात आलेली १७१ फूट उंचीची हनुमान मूर्ती, आजच्या घडीला जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो या वेस्ट इंडिज मधील बेटावर कॅरापीचैमा येथील ८५ फूट उंच असलेली हनुमान मूर्ती ही भारताबाहेर असणाऱ्या हनुमान मूर्तींमध्ये सर्वात उंच मानली जाते.
रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत दारासिंग यांनी जो हनुमान साकार केला, तो जनमानसात अतिशय लोकप्रिय झाला. हनुमान म्हंटल्यानंतर आज ही दारासिंग यांचेच चित्र डोळ्यासमोर येते. त्यामुळे केवळ हनुमानाच्या पडद्यावरील भूमिकेमुळे दारासिंगांना देखील अमरत्व मिळाले आहे!जीव ओतून निभावलेली ही भूमिका करून दारासिंग यांनी स्वमेहनतीने हे यश कमाविले आहे.

श्री रामदास स्वामींनी लिहिलेले मारुती स्रोत मराठी घरांमध्ये अतिशय श्रद्धेने म्हंटले जाते त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. अतिशय स्फूर्तिदायक असे ते स्तोत्र आहे. आशय समजाऊन घेतला तर त्यातील गोडी अधिक वाढते. हनुमान चालिसा देखील अशीच स्फूर्तिदायक रचना आहे. आमच्या शाळेत तालीम होती आणि त्या तालमीत आम्ही हनुमान जयंतीला पहाटे पाच वाजता जमत होतो. सहा वाजता हनुमान जन्म साजरा होत असे. नगरकर सरांचे सुंदर भाषण लागोपाठ तीन वर्षे ऐकायला मिळाले होते. हनुमानवर माझी श्रद्धा तेंव्हा जडली, ती आजतागायत कायम आहे. दारासिंग यांनी आपल्या अजरामर भूमिकेत त्यात प्रचंड भर घातली. वीर हनुमान आणि दास हनुमान म्हणूनच आमचे जीवन आदर्श आहेत.
…….////……//////…. शरद काळे

  • * * * * * * * * * * * * * * * *

श्रीमारुतीरायावर मी लिहिलेले चार शब्द आणि त्यांच्या भव्य मूर्तींची चित्रे या स्थळावर दिली आहेत. . . . . आनंद घारे
https://anandghare2.wordpress.com/category/%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%80/

समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींच्या देवळांविषयी माहिती इथे पहावी.
https://anandghare.wordpress.com/2018/09/03/%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b3/

*************

मारुतीची प्रार्थना
मनोजवम् मारुततुल्य वेगम्।
जितेंद्रियम् बुद्धिमताम् वरिष्ठम् ।
वातात्मजम् वानरयूथमुख्यम् ।
श्रीरामदूतम् शरणम् प्रपद्ये ।।

मारुति स्तोत्र
भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।१।।
महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें ।
सौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका ।।२।।
दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा ।
पाताळ देवता हंता, भव्य सिंदूर लेपना ।।३।।
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ।।४।।
ध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें ।
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।५।।
ब्रह्मांड माईला नेणों, आवळें दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी त्राहिटिल्या बळें ।।६।।
पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्णकटीकासोटी, घंटा किंकिणी नागरा ।।७।।
ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ।।८।।
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।९।।
आणिता मागुता नेला, गेला आला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें, गतीस तूळणा नसे ।।१०।।
अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ।।११।।
ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ करू शके ।
तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।१२।।
आरक्त देखिलें डोळां, ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।।१३।।
धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां ।।१४।।
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही ।
नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।।१५।।
हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी।
दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ।।१६।।
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडण।
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।।१७।।

।। इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।

************

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s