महात्मा ज्योतिबा फुले

सत्याच्या शोधातसत्याच्या शोधात..!
विद्येविना मती गेली। मतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
हे एकमेव ब्रीदसूत्र ऊराशी बाळगून हयातभर केवळ गांजलेल्या, पीडलेल्या व नाकारल्या गेलेल्या समाजाच्या उन्नतीसाठीच झटणाऱ्या महात्मा जोतिराव फुले यांनी विधवा-विवाह, अस्पृश्यता विरोध, बाल विवाहांना विरोध, क्रमिक शिक्षण अशा अनेक चळवळी केवळ स्वबळावर हाती घेतल्या व समाजाच्या सक्रिय पाठिंब्यावर त्या यशस्वी करूनही दाखवल्या. त्यांनी हाती घेतलेल्या सर्व कार्यांमध्ये उजवे ठरते, ते त्यांचे सत्यशोधक चळवळी'च्या स्थापनेचे कार्य. या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला आज १४७ वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्धापन दिनानिमित्त महात्मा फुले व त्यांच्या सर्वसत्यशोधक’ कार्यकर्त्यांना अभिवादन!
आज सत्यशोधक चळवळीचे काहीच अस्तित्व कुठेही जाणवत नसले, तरी १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव सर्वत्र जाणवत होता. महाराष्ट्रात सत्यशोधक समाज स्थापन करून तो हयातभर नेटाने चालवण्यामागे व त्यांची वाढ करण्यामागे महात्मा फुलेंचा निश्चित हेतू होता. त्यांनी प्रयत्नपूर्वक व नेटाने ही चळवळ त्या दिशेनेच पुढे नेली. त्यांचे हे कार्य महत्त्वपूर्ण आहे.
तेव्हा व नंतरही अनेक तथाकथित विद्वान व समाजशास्त्रज्ञांनी सत्यशोधक चळवळीची टिंगल करताना ते फुलेंनी ब्राह्मण समाजाविरुद्ध उगारलेले शस्त्र आहे, असे अशी टिंगल केली. ब्राह्मणेतरांमध्ये सत्यशोधकांविरुद्ध रोष निर्माण व्हावा, हेच या मागचे सूत्र होते. वास्तविक महात्मा फुलेंच्या मनात ब्राह्मण विरोध नव्हता, मात्र ते ब्राह्मणवादाच्या विरुद्ध निश्चितच होते. तसे ते आपल्या भाषणांतून व लिखाणातून वारंवार व्यक्तही करत.
महाराष्ट्रात व देशात सत्यशोधक समाजासारख्या राजकारणेतर संस्था जन्माला आल्या होत्या. ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज यासारख्या संस्थांकडे चांगले मनुष्यबळ व अर्थबळही होते. तरीही महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज टिकून राहिला व एका शतकाच्या काळात वाढतच गेला. याचे कारण १९व्या शतकाच्या उत्तरार्धात एका बाजूला सर अलेक डग्लस ह्यूम यांनी काही नेटिव्ह उच्चशिक्षीत नेत्यांच्या सहाय्याने राष्ट्रीय सभेची स्थापना केल्यापासूनच दुसरीकडे राजकारणबाह्य अशा सामाजिक-सांस्कृतिक संघटनेची गरज जाणवू लागली होती. राष्ट्रीय सभेत दादाभाई नवरोजी, न्या. महादेव गोविंद रानडे यांच्यासारखे उच्चविद्याविभूषित नेते होते. दुसरीकडे पुण्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर प्रभृतींनी राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका बाजूला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करत असताना दुसऱ्या बाजूला आपल्या राजकीय विचारांच्या प्रसारासाठी मराठीत केसरी' व इंग्रजीतमराठा’ या वृत्तनियतकालिकांची सुरुवात केली होती. बंगालमध्ये राजा राम मोहन रॉय यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक व शैक्षणिक चळवळी सुरू होऊन सतीच्या दुष्ट प्रथेसारख्या दुष्ट प्रथांना सक्रिय विरोध चालू झाला होता.
महात्मा फुलेंनीही महाराष्ट्रात बहुजन समाजाला व त्या काळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातील मुलांसाठी शाळा काढल्याच, शिवाय मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्नपूर्वक वेगळी शाळा काढून मुलींना सुशिक्षीत करण्याचा चंग बांधला होता. त्याचवेळी त्यांनी बालविवाहांविरुद्धही मोहिम उघडली. अशा तऱ्हेने सारा समाजच राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी तयार होत असताना या कार्यात माझा ब्राह्मणेतर बहुजन समाज कुठे आहे, हा प्रश्न जोतिबांच्या मनात होताच. या समाजाचे पुनरुत्थान करायचे, तर या समाजाला आधी आपले हक्क व स्थान यांची जाणीव करून द्यायला हवी, हे महात्मा फुलेंनी जाणले. व या चळवळीचे एक आयुध म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करायचे ठरवले.
जोतिबा फुलेंच्या मते तत्कालिन पंडित व तथाकथित धर्ममार्तंड सत्य' म्हणून पोथी-पुराणांचा आधार घेत जे काही सांगत व शिकवत होते, ते सारे समाजातील गांजलेल्यांचे अधिक शोषण करण्यासाठी मांडलेले थोतांड होते. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्याविरुद्धच बंड उभे केले. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला.
देवाविषयी किंवा निसर्गावषयी ‘निर्मिकहा शब्द वापरला, त्यावरुन सत्यशोधक समाज व अर्थातच महात्मा ज्योतीबा फुले आस्तिक होते, हे स्पष्ट होते. महात्मा फुले यांनी तत्कालिन कनिष्ठ मानल्या गेलेल्या वर्गातील लोकांसाठीगुलामगिरी’ हा उपदेशपर ग्रंथ लिहून झाल्यानंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला.
ज्योतिबा फुले हे क्रांतिकारी नेते असल्याने त्यांच्या वृत्तीशी सुसंगत व धोरणाला पोषक असे तत्त्वज्ञान व व्यासपीठ निर्माण करणे त्यांना अत्यंत गरजेची वाटली. सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान मानताना एकेश्वरवाद, ईश्वर, भक्ती व व्यक्तीचे श्रेष्ठत्व त्याचप्रमाणे ग्रंथप्रामाण्यवादाला विरोध `सत्य हेच परम’ मानवी सद्गुणांची जोपासना अशाप्रकारे वैचारिक आणि प्राथमिक भूमिका घेऊन सत्यशोधक समाजाने आपले तत्वज्ञान मांडले. ईश्वराची भक्ती ही निरपेक्ष भावनेने असावी त्यामध्ये मध्यस्थाची अथवा भिक्षूची आवश्यकता नाही, याचं प्रतिपादन सत्यशोधक समाजाने केलं.
त्याचप्रमाणे व्यक्ती ही जन्माने श्रेष्ठ नसून ती गुणकर्माने श्रेष्ठ याचं स्पष्टीकरणही सत्यशोधक समाजाने दिले. पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म या गोष्टींना त्यांनी थारा दिला नाही तर सत्य हेच परब्रह्म आहे अशा प्रकारचा विचार सत्यशोधक समाजाने मांडला मानवाच्या अंगी असलेल्या सद्गुणांची जोपासना व्हावी हा विचार दृढ करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केला.
हे विचार मनाला व बुद्धीला आवाहन करणारे व आव्हान देणारेही होते. त्यामुळेच महात्मा फुलेंची लोकप्रियता वाढू लागली. पुरोहिताशिवाय अंत्यसंस्कार, श्राद्ध, विवाहादी धार्मिक कार्ये करता येतात, हा विचार क्रांतिकारक होता. पण पुरोहितांच्या दंडेलीला कंटाळलेल्या समाजातील मोठ्या गटाने हा विचार मानला. २०व्या शतकाच्या सुरुवातीलाच मुंबई, पुणेच नव्हे, तर नासिक, औरंगाबाद अशा शहरांतही पुरोहितांच्या पौराहित्याशिवाय विवाह पार पडू लागले. विवाह प्रसंगी म्हटली जाणारी मंगलाष्टके हमखास संस्कृत मध्ये असत. त्यांचा साधा अर्थही कुणाला कळत नसे. म्हणून फुलेंनी स्वत:च मराठीत मंगलाष्टके रचली. ती खूपच लोकप्रिय झाली. आजही सत्यशोधक चळवळ मानणाऱ्या कुटुंबांत हीच मंगलाष्टके गायली जातात.
‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या विचारांना प्रस्तृ़त केले आहे मानवता धर्माची शिकवण सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला गेला. सामाजिक परिवर्तनाची दिशा सत्यशोधक समाजाने समाजातील दीनदलित उपेक्षीत समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला.
सत्यशोधक समाजातर्फे ‘दीनबंधू’ नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. या नियतकालिकाचे संपादक ‘कृष्णराव भालेराव होते.
‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्थी ।।’ हे या समाजाचे घोषवाक्य होते. अशा तऱ्हेने सर्व बाजूंनी विकसित होत समाजाला सांस्कृतिक क्रांतीकडे घेऊन जाणाऱ्या सत्यशोधक समाजामध्येच दुफळीची कीड लागली. गट-तट निर्माण झाले व पुढे ही चळवळ केवळ इतिहासाच्या पुस्तकांपुरतीच उरली. जे ब्रह्मो समाजाचे, प्रार्थना समाजाचे झाले, त्याच वाटेने जात सत्यशोधक चळवळ अखेर अस्तंगत झाली, हे महाराष्ट्राचे दुर्दैव!

भारतकुमार राऊत

. . . . . . . . . . फेसबुकवरून साभार दि.२३-०९-२०२०

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

One thought on “महात्मा ज्योतिबा फुले”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s