लोककवि मनमोहन नातू

आजच्या पिढीला कदाचित मनमोहन नातू हे नाव माहीत नसेल, पण त्यांनी लिहिलेली अनेक गीते माझ्या लहानपणच्या काळातले लोक गुणगुणत असत. माझे मित्र अविनाश नेने यांच्या सौजन्याने त्यांचे वॉट्सअॅपवरील लेख इथे संग्रहित केले आहेत.

Avinash Nene: आज ७ मे
उत्कट भावगीतकार आणि बंडखोर कवी म्हणून जनसामान्यांच्या मनावर मोहिनी घालणारे लोककवी मनमोहन नातू यांचा स्मृतिदिन.
जन्म. ११ नोव्हेंबर १९११ कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव या गावी
मनमोहन यांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण लोककवी मनमोहन या नावानेच ते महाराष्ट्राला माहीत आहेत. शब्दांच्या गोडव्याने गीताला मधाळ करणारा हा कवी. सहज साधे शब्द, मनाला आनंद देणारी आणि जीभेवर रेंगाळत ठेवणारी त्यांची गाणी आजही ऐकायला ताजीतवानी वाटतात. मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला हे त्यांचं अतिशय गाजलेलं गाणं आजही नववधूला लाजवते. मनमोहन नातू यांनी लिहिलेले हे गीत, वाटवे यांची चाल आणि शब्द.
‘मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला..’
नववधूला स्त्रीसुलभ भावनेमुळे मैत्रिणींच्या गराडय़ात पतीचे नाव घेताना वाटणारा लज्जायुक्त संकोच या गीतात आढळतो. ही संकोचाची भावना कवी मनमोहनांच्या शब्दांत पुरेपूर दिसून येते. या गीतातल्या नानाविध प्रश्नांतून ती अभिव्यक्त झाली आहे. ही नववधू शालीन आहे. सुसंस्कृत घरातली आहे. हे गाणे म्हणजे तिने मैत्रिणींशी केलेले हितगूजच आहे..
‘मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला
नका विचारू स्वारी कशी?
दिसे कशी अन् हासे कशी?
कसं पाडलं मला फशी?
कशी जाहले राजीखुशी?
नजीक येता मुहूर्तवेळा, काय बोललो पहिल्या भेटी
कसे रंगले स्वप्न पहाटी? कशी रंगली लाली ओठी?
कसा जाहला जीव खुळा? मैत्रिणींनो..
अर्थ उलगडे समरसतेचा, सुटे उखाणा संसाराचा
छंद लागला मजला त्यांचा,
धुंद बने बुलबुल जिवाचा
घरी यायची झाली वेळां, मैत्रिणींनो..’
राधे तुझा सैल आंबाडा, बापूजींची प्राणज्योती… ह्या त्यांच्या गाजलेल्या रचना. अतिशय साधं रहाणीमान असलेला हा कवी आपल्या कवितेत मनातील प्रतिबिब उभं करत असे. ते लिहितात, राजकीय पुरुषांची कीर्ती, मुळीच मजला मत्सर नाही । आज हुमायुन बाबरापेक्षा, गलिब हृदये वेधित राही । युगायुगांचे सहप्रवासी, अफुच्या गोळ्या, उद्धार, शिवशिल्पांजली हे त्यांच्या नावावर असलेले काव्यसंग्रह. मनमोहन यांचे पुस्तक वा पुस्तिकारूपाने प्रसिद्ध झालेले अनेक काव्यसंग्रह आहेत. त्यातले ‘ताई तेलीण’, ‘सुनीतगंगा’, ‘कॉलेजियन’, ‘शंखध्वनी’, ‘अफूच्या गोळ्या’, ‘दर्यातील खसखस’, ‘कुहू-कुहू’, ‘शिव शिल्पांजली’ हे संग्रह प्रसिद्ध आहेत. ‘दर्यातील खसखस’ या पुस्तकाचे प्रकाशक आर. बी. समुद्र लिहितात- ‘उदयोन्मुख कविपंचकात मनमोहन या तरुण व प्रतिभासंपन्न कवीचे स्थान फार वरचे आहे. आपल्या प्रखर बुद्धीने आणि विशिष्ट मनोवृत्तीने काव्यरचना करून त्यांनी प्रचलित काव्यपद्धतीला विजेचे धक्के दिले आहेत. त्यांच्याइतकी सुंदर प्रेमगीते मराठीत दुसऱ्या कोणत्याही कवीला लिहिता आली नाहीत.’ कवी ज. के. उपाध्ये यांना गुरुस्थानी मानणाऱ्या कवी मनमोहनांची कविता स्वतंत्र होती. त्यांच्या कविता तर उत्तम होत्याच; परंतु ध्वनिमुद्रिकांमधील भावगीतांतून त्यांना जास्त नाव मिळालं. वाटवे यांनी त्यांच्या काही कविता स्वरबद्ध केल्या आणि ती गाणी लोकप्रिय झाली. सर्व विषयांना आपल्या कवितेत स्पर्श करणारे लोककवी पत्नीच्या निधनानंतर आपल्या भावना शब्दबद्ध करताना म्हणतात. वृंदावनातील तुळस जळाली, मागे उरल्या दगडविटा,
त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे,
‘कलेवर कवीचे जाळू नका हो,
जन्मभर तो जळतच होता.
फुले तयावर माळू नका हो,
जन्मभर होत फुलतच होता’
यात ते स्वतःबद्दलच्या भावना हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त करताना ते दिसतात. मनमोहन नातू यांचे ७ मे १९९१ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे मनमोहन नातू यांना आदरांजली.
सं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
——————————–
Avinash Nene: कवी मनमोहन
यांची केवळ आणि केवळ अप्रतिम अशी कविता,
सावरकरांवर लिहिलेली पाठवत आहे। 👇

मी कागद झाले आहे

मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी|
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी ||१||

माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी|
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||२||

जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||३||

आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही|
मग विनायकाने त्यांची आळवणीही केली नाही ||४||

पापण्यात जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले|
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||५||

की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|”
शाई न वाळली अजुनी परंतू अभंग नदीच्या बाही ||६||

दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली|
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली ||७||

— लोककवी मनमोहन नातू.

Avinash Nene: कैदयामधला कैदी* ही रचना किती मार्मिक आहे ना,
आकाश म्हणतेय आकाशाच्या दृष्टीने, ह्या पृथ्वी तलावरील सर्वच कैदी, बंधनात असलेले, त्यात सावरकर पृथ्वी वरील आणखी एका कैदेत।
सर्वच कविता अप्रतिम आहे।

Avinash Nene: ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली

स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात एकांतवासात असताना त्यांची काव्यप्रतिभा बहरली. त्या उर्मीतच त्यांना “कमला” सारखी खंडकाव्येही स्फुरली. या कविता शब्दबध्द करण्यासाठी त्यांनी बारीबाबाकडे कागद व टाकाची मागणी केली. त्या अक्कलशून्य, बिनडोक व उलट्या काळजाच्या बारीबाबाने ती मागणी मान्य केली नाही.

सावरकरांची काव्यप्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देईना.

त्यांनी त्यांच्या कोठडीच्या छोट्याशा गवाक्षातून दिसणार्‍या आकाशाला विनंती केली की तू माझ्यासाठी कागद व्हायला तयार आहेस का? त्या घमेंडखोर आकाशाने उत्तर दिले:

तुझी लायकी आहे का माझ्याशी बरोबरी करायची? मी मुक्ततेचे प्रतिक आहे.

मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी|
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी?

माझ्यावर गरूडासारखे आकाशाचे राजे राज्य करतात आणि तू तर एक कैदी आहेस, तू माझ्यापर्यंत कविता लिहिण्यासाठी कसा पोहोचणार?

माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी|
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||

आभाळाने सावरकरांना हिणवले, “तुझ्या पायात तर जड साखळदंड आहेत. मला विचारण्यापेक्षा तुझ्याजवळ असलेल्या जमिनीलाच का नाही विचारत? ती कदाचित तयार होईल तुझ्यासाठी कागद होण्यास.”

जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||

पण ती अंदमानातील कालकोठडीची जमीनही कदाचित इंग्रजांची बटिक झाली होती. तिनेही या स्वातंत्र्यसूर्याच्या विनंतीस मान दिला नाही.

आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही|
मग विनायकाने त्यांची आळवणीही केली नाही ||

यानंतर सावरकरांनी त्यांच्या बाण्यानुसार त्यांच्याकडे मदतीची याचना केली नाही.

अश्या वेळी या प्रतिभावान स्वातंत्र्यसूर्याची अवस्था कशी झाली असेल? सर्व जगावर संताप झाला. आकाश व जमीन यांचा प्रचंड राग आला. यामुळे डोळ्यात अश्रू आले, पण संतापामुळे त्यांच्या ठिणग्या झाल्या. हनुमानाने लंका जाळली तद्वत सर्व जग जळेल इतका संताप त्या डोळ्यातून व्यक्त झाला.

पापण्यात जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले|
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||

मनात विचारांचे काहूर उठले. माझ्या कवितेचा हा प्रपात झेलालयला कोण तयार आहे? स्वर्गातून पृथ्वीवर गंगौघ येत आहे. कोण तयार आहे हा भार झेलायला? जर हिमालयासारखा कणखर व बलदंड आधार तयार नसेल तर ही गंगा या पृथ्वीवर येईल का?

की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|
शाई न वाळली अजुनी परंतू अभंग नदीच्या बाही ||

तुकाराम महाराजांच्या गाथेचे प्रक्तन जसे इंद्रायणीच्या डोहात बुडणे होते, तसे तर माझ्या काव्याचे नाही ना?

पण अश्या वेळी अचानक एक चमत्कार झाला. त्या कालकोठडीच्या दगडाच्या भिंती पुढे सरसावल्या आणि म्हणाल्या:

दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली|
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली |

यापुढील इतिहास आपणास ठावूक आहेच।

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील ही अप्रतिम कविता लोककवी मनमोहन नातू यांची आहे.
************************

श्री.माधव विद्वांस यांनी १४ विद्या ६४ कला या समबहावर लिहिलेला हा लेख
Madhav Vidwans14vidya_64kala

#कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा,.आपण गाणी ऐकली असतात पण त्याचे गीतकार कोण आपल्याला माहीत नसते. हे गीत लिहिणारे मनमोहन नातू ऊर्फ गोपाळ नरहर नातू यांचे आज पुण्यस्मरण (जन्म ११ नोव्हेंबर, इ.स. १९११ निधन ७ मे, इ.स. १९९१) हे एक मराठी कवी होते. लोककवी मनमोहन या नावाने ते अधिक प्रसिद्ध होते. मीनाक्षी दादरकर हेही त्यांचे एक टोपणनाव होते. त्यांनी अंदाजे ५,००० मंगलाष्टकेही लिहिली, भविष्यही लिहिले आणि याशिवाय त्यांनी कादंबऱ्या आणि लघुकथाही लिहिल्या. डॉन ब्रॅडमनवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केली आहे. त्यांच्या आठवणी सांगणारे आठवणीतील मनमोहन (लेखिका : संध्या देवरुखकर) हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनातर्फे २८-६-२०११ ला प्रकाशित झाले. या पुस्तकात भा.द. खेर, रमेश मंत्री, रॉय किणीकर, प्रा.शंकर वैद्य, शं.ना. नवरे वगैरेंनी वेळोवेळी मनमोहन नातूंवर लिहिलेले लेख आहेत. जयवंत दळवी यांनी घेतलेल्या मनमोहन यांच्या मुलाखतीचाही या पुस्तकात समावेश केलेला आहे. जयवंत दळवी यांनी नातूंचे वर्णन चंद्र-सूर्याची बटणे खमिसाला लावणारा माणूस असे केले आहे.(विकिपीडिया)

मनमोहन नातूंच्या गाजलेल्या कविता
आमुचे नाव आसू गं—-आरसा फोडलात तुम्ही, आता वेणी घाला माझी—-कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा—जेव्हा पदराला ढळत्या, पदाराला तू दिलास झटका, लांब सडक तिपेडी, तुला वेणीचा मारला फटका—-ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती—-मी मुक्तांमधला मुक्त आणि तू, कैद्यांमधला कैदी । माझे नि तुझे व्हायचे कधी ते, सूर कसे संवादी ॥|—–मैत्रिणिंनो सांगू नका नाव घ्यायला—विश्वाशी मीं वैर धरिले, कान्हा कोणासाठी? दुनियेशी मीं दावा धरिला, लाला कोणासाठी?—शव हे कविचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता । फुलेही त्यावर उधळू नका हो,—जन्मभरी तो फुलतच होता—–हळूहळू बोल कृष्णा हळूहळू बोल.—ती पहा, ती पहा, बापुजींची प्राणज्योती—-तारकांच्या सुमनमाला देव त्यांना वाहती
मनमोहन नातू यांचे गद्य लेखन
छत्रपती संभाजी (कादंबरी, १९७०)—संभवामि युगे युगे (संभाजीवरील कादंबरी, १९७०)—तोरणा—प्रतापगड—आग्ऱ्याहून सुटका—सूर्य असा मावळला—छत्रपती राजाराम—छत्रपती शाहू
******************************************
ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती
झुंजला राजासवें हा, रंगला रंकासवें हा
पेटता देहेहि आता दिव्यता दावून जाती
चंदनाचे खोड लाजे हा झिजे त्याहूनही
आज कोटी लोचनींच्या अश्रुमाला सांडताती
पृथ्वीच्या अक्षाशी लाली, पृथ्वीच्या रेखांशि लाली
चार गोळ्या ज्या उडाल्या दशदिशांना कापताती
नाव ज्याचे ऐकुनिया थरकली सिंहासने
ना जरी तलवार हाती हा अहिंसेचा पुजारी
सत्य मानी देव आणि झुंजला खोट्यासवे हा
मृत्युच्या अंतीम वेळी नाम रामाचे मुखी
सिंधु गंगा आणि यमुना धन्य झाली अस्थिंनी
राख तुझी भारताच्या तिलक झाली रे ललाटी
*********************

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s