गीताअध्यायसार

माझे एक ज्येष्ठ आप्त श्री.मधुसूदन थत्ते यांनी त्यांच्या फेसबुकाच्या पानावर एक नवी लेखमाला सुरू केली आहे. त्यात ते दररोज श्रीमद्भगवद्गीतेच्या एकेका अध्यायाचा सारांश सुलभ भाषेत देतात. हे सगळे भाग मी या पानावर साठवण्याचे ठरवले आहे. त्यांच्या अनुमतिनेच मी हा उपक्रम सुरू केला आहे. आज यातले पहिले सहा अध्याय दिले आहेत. पुढील अध्यायांवरील निरूपण जसजसे मला उपलब्ध होईल तसतसे ते दिले जात राहील. दि. १०-०४-२०२०.          सर्व १८ अध्यायांवरील निरूपण देऊन ही मालिका पूर्ण केली आहे. दि.२२-०४-२०२०

कृपया हे संकलनसुद्धा पहा : भगवद्गीतेमधील तत्वज्ञान – भगवद्गीतासार
https://anandghare.wordpress.com/2019/02/13/%e0%a4%ad%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8/

#गीताअध्यायसार

श्री.मधुसूदन थत्ते

(मला भावलेलं भग्वद्गीतेचं मोजक्या शब्दातील सार एक एक अध्याय घेत घेत आणि संदर्भासहित)
भगवद्गीता …अध्याय १: अर्जुन विषाद योग
********************

गीताअध्यायसार 1
कोण अर्जुन…कोण कौरव…आणि, हो, कोण पांडव…?
असं पहा तुमच्या-माझ्या मनात सतत संघर्ष चालू असतो..नकारात्मक विचार जे संख्येने पुष्कळ असतात (कौरव) आणि सकारात्मक विचार जे संख्येने फार कमी असतात (पांडव).
मग कृष्ण तरी कोण..?
ह्यात कृष्ण तुमच्यातला विशुद्ध असा “मी” आहे हे मानले तर…?
आणि अर्जुन..? तो तर संभ्रमात पडलेला “मी” असे मानूया..
त्या विशुद्ध अशा “मी” ला म्हणजे अंतर्मनाला म्हणजे आपल्यातल्या कृष्णाला जेव्हा संभ्रमात पडलेला “मी” दिसून येतो तेव्हा त्या सतत चाललेल्या नकार-सकार संघर्षाच्या ऐन युद्धात विशुद्ध मी जीवनाचे अखंड तत्वज्ञान सांगतो…
किती वेगाने..?
तो वेग आपण नाही समजू शकत..
मनाने मनाला जागे करण्याचा वेग. आणि हा संदेश नंतर गीतेच्या सातशे श्लोकात आणि पुढे ज्ञानेश्वरीच्या काही हजार ओव्यात सांगितला गेला आणि तरीही आपल्याला तो शंभर टक्के समजलेला नाही…अजून त्यावर ग्रंथ लिहिले जात आहेत..
पहिल्या अध्यायार्चे हे मला भावलेले सार आहे
संदर्भ: The Holy Gita by Swami Chinmayanand. (Page 10-11)
मधुसूदन थत्ते
०५-०४-२०२०
——————–
#गीताअध्यायसार
अध्याय २ “Yoga of Knowledge”

गीताअध्यायसार २
मित्रांनो,
आज गीतेच्या दुस-या अध्यायात काय आहे ह्याचा अति-संक्षिप्त आढावा घेऊ.
ह्या अध्यायाला “Yoga of Knowledge” असे म्हटले जाते.
सांख्य योग्य अशा जरा कठीण नावाचा पदर उचलून आत डोकावले की हळू हळू कळते की गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे रत्नाची खाण आहे..
होय……ती रत्ने ज्यांचा आपण अधून मधून प्रसंगानुरूप उल्लेख करतो..
ज्ञानयुक्त बुद्धीचा वापर न केल्याने अर्जुन स्वधर्म आणि स्वकर्म करण्यामागची खरी भूमिका समजून घेत नव्हता…
श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनात काही अटळ सत्ये कशी उतरवली हे ह्या अध्यायात पाहून घ्या..
एक एक सत्य उलगडताना वेगवेगळी अर्थपूर्ण शब्दरत्ने वापरली..
कुठली रत्ने..?
अरे, ही सुभाषिताच्या रूपात विखुरलेली रत्ने आज..हजारो वर्षांनंतर आपण वापरतो की.. …!!!!
कोणी देह सोडून गेला की आपोआप मनात येते..
“वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देही ॥ (२२)”
(शरीर हे तर आत्म्याचे एक वस्त्र फक्त)
**************************
आत्मा कुठे मरतो..तो असा आहे ज्याला कोणीच नाश करू शकत नाही.
“नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ (२३)”
**************************
आपण म्हणतो आपण आपले कर्तव्य करावे..result कडे लक्ष्य असू नये…
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ (४७)”
**************************
वासनेच्या आसक्तीने क्रोध होतो…आणि मग ..संमोह..मग स्मृतिनाश..मग बुद्धिनाश ..आणि अखेर प्रणश्यति…!! (मरणच…)
“ध्यायतो विषयान्पुंस: सङ्गस्तेषूपजायते |
सङ्गात्सञ्जायते काम: कामात्क्रोधोऽभिजायते || 62||
क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम: |
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति || 63||”
**************************
पाहिलेत..एक एक शब्द-रत्न किती मौल्यवान आहे ते…तुम्ही नक्की ह्या ना त्या रूपात ही रत्ने वापरली आहेत नाही का..?
हीच ती ज्ञानयुक्त बुद्धी जिचे हे वर दिलेले आणि आणखी अनेक असे दागिने आपण ह्या दुस-या अध्यायात बघतो…!!!
मधुसूदन थत्ते
०६-०४-२०२०
————————

#गीताअध्यायसार
अध्याय ३ कर्मयोग

अर्जुन विषाद आणि सांख्य (ज्ञान) योग ह्यांचे सार आपण पाहिले…
कृष्णाने सा-या जगताला विचारात घेतले आहे..
ज्ञानी असणे-होणे आणि सिद्ध मुनीप्रमाणे निष्क्रिय साधना किंवा तप करणे आणि परमात्म्याशी एकरूप होणे आपल्याला कसे जमावे..?
पक्षी उंच उडून उंच अशा आम्रवृक्षाचे फळ लीलया खायला जाईल पण माणूस..? त्याला त्या फळासाठी झाडावर चढावे लागेल..फांदी गाठावी लागेल आणि जरा धोका पत्करून मगच हाती ते उंच फळ त्याला मिळेल नाही का…? (सोबतचे चित्र पाहावे)…
हाच फरक ज्ञानयोगी आणि कर्मयोगी ह्यांचात समजावा.
आपल्याला विहित कर्म करत करत परमात्म्याचे दर्शन होईल..
ह्या अध्यायाच्या ५व्या श्लोकात म्हटले आहे..”मनुष्य एक क्षणही कर्माशिवाय राहू शकत नाही.
विहित..? म्हणजे तरी काय…?
म्हणजे नित्य आणि नैमित्यिक कर्मे करावी आणि काम्य आणि निषिद्ध कर्मे त्यागावी..
Better said than done नाही का…?
कर्मनिष्ठ काय काय करतो…?
प्रथम स्वधर्माने सुनिश्चित केलेली कर्तव्ये करणे…आणि हे करतांना इंद्रिय-निग्रह आणि काम-क्रोधाला विसरणे
आपल्या धर्मात पंचकर्मे सांगितली आहेत…वेदकाळी सांगितली त्यामुळे आजच्या संदर्भात आपली आपण सुयोग्य बदल करून करावी.
अशी ही त्या काळाची काय काय कर्मे सांगितली…?
१……देव-यज्ञ: ……..रोज अग्नीला समिधा देणे..(आज आपण अग्निहोत्र करावे)
२……पितृ यज्ञ: …….. गत पूर्वजांना जल-आणि भाताचा घास द्यावा (घराबाहेर घास ठेवला की कावळा तो घेऊन जात असतो…….. (सोबतचे चित्र पाहावे)……
.
३……भूत यज्ञ: ……..अग्नीत शिजलेले अन्न अर्पावें (अग्नी..? आजकाल शेगड्या नसतात..मग..? यासाठी चित्राहुती घालाव्या ही आपली माझी suggestion… )
४……मनुष्य यज्ञ: …….. दारी अतिथी आला तर त्याला भोजन द्यावे…न आला तर रोज कोण्या गरिबाला अन्न द्यावे.
५……ब्रह्म यज्ञ: ……..ज्ञान दान करीत राहावे
हा अध्यायच काय, लोकमान्यांनी गीता रहस्य ग्रंथाचे पर्यायी नावच मुळी “कर्मयोग शास्त्र” असे ठेवले आहे…!!!!
मधुसूदन थत्ते
संदर्भ: सुबोध ज्ञानेश्वरी (य. गो. जोशी)
07-04-2020
————————–

अध्याय ४
**********
गीताअध्यायसार ४
अर्जुनाला ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला…
काम आणि क्रोध माणसाला पांगळे बनवते…पण कर्माला ज्ञानाचे डोळे लाभले तर …? मग विवेक सुचतो आणि विहित कर्म निष्काम होऊन जाते…
हाच तर निष्काम कर्म योग किंवा ज्ञानकर्मसन्यास योग ज्याच्या साठी देवाने हा चौथा अध्याय सांगितला…!!!
“मी सूर्याला हा निष्काम कर्म योग प्रथम सांगितला…” कृष्ण म्हणाला..
मनुष्यस्वभाव व्यासांनी कसा ओळखला पहा..श्रेष्ठतम मनुष्य म्हणजे अर्जुन प्रत्यक्ष भगवंतावर शंका घेतो..म्हणतो,
“देवा तू तर आत्ताचा…आणि सूर्य तुझ्या कितीतरी आधीचा..मग तू सूर्याला प्रथम कसे काय सांगितलंस…?”
भाबडा प्रश्न …!!!
भगवंत म्हणतात…
“तुझा प्रश्न रास्त आहे…तो सूर्य माझ्याच मायेतून जन्माला आला..
तुझे तसे माझे आजवर अनेक जन्म होऊन गेले आहेत पण तुला आपल्या गत-जन्माची स्मृती राहिली नाही…!!!”
निष्काम कर्म…!! अर्जुनाला कर्माचे प्रकार तरी काय हे हवे होते..
कर्म…अकर्म..विक्रम…गोंधळच व्हावा..!!!
आणि इथेच वर्ण—आश्रम..हे शब्द पुढे आले ज्यांच्यावर आजही ह्या २१व्या शतकात वाद चालू आहेत.
कृष्णाने सांगितले…वेदांनी प्रत्येक वर्णाला, आश्रमाला, जी जी विहित कर्मे सांगितली आहेत ती ती निष्ठेने आचरत राहणे ह्यालाच म्हणतात विकर्म..!!!
आणि…
आपण हेही ओळखायला हवे की कोणती कर्मे निषिद्ध आहेत आणि ह्या निषिद्ध क्रमांना अकर्म म्हणावे.
असा निष्काम कर्म योगी नित्य संसारात असतो पण असूनही नसतोच..
पाण्यात सूर्य-प्रतिबिंब अगदी सूर्य वाटते..असते का ते सूर्य..? तसा हा योगी संसारात असतो पण असत नाही..
ह्यानंतर ह्या अध्यायात यज्ञाचे काही प्रकार सांगितले आहेत..
यज्ञ…? म्हणजे होम..अग्नी..वेदी..वेदाचार्य…?
नव्हे…
संयम यज्ञ……….काम-क्रोधावर विवेक
द्रव्य यज्ञ……….दान करणे
तपोयज्ञ……….साधना..तप….ध्येयासाठी परिश्रम
वागयज्ञ……….वेदपठण…नित्याची मौखिक साधना..
आणि सर्वोत्तम यज्ञ हा ज्ञानयज्ञ…..यज्ञदान !!!
मित्रांनो…हा चौथा अध्याय म्हणजे गीतारूपी शांतरससागराची एक समृद्ध अशी लाटच आहे नाही का…?
मधुसूदन थत्ते
०८-०४-२०२०
संदर्भ: गीतासागर (शंकर अभ्यंकर) आणि सुबोध ज्ञानेश्वरी (य. गो. जोशी)

#गीताअध्यायसार
अध्याय ५ कर्मसंन्यास योग

गीताअध्यायसार ५
अर्जुन कृष्णाला म्हणाला
“एकदा म्हणतोस कर्मसंन्यास मोक्षासाठी श्रेष्ठ आणि मग म्हणतोस निष्काम कर्मही तेच फळ देते…अरे, नक्की काय करावे…? कर्मत्याग की कर्मयोग ..? ”
भगवंत ह्या अध्यायात ह्या प्रश्नाचेच उत्तर देतात.
ज्ञानी होऊन कर्म आचरायचे…बुद्धीची एक हद्द असते. ती तर्कांपुरती मर्यादित असते. कार्यकारण संबंधापुरती असते..त्या सीमेपलीकडे ती जाऊ शकत नाही आणि तिथे जायला प्रज्ञा आवश्यक असते..
प्रज्ञाचक्षू मिळवावे लागतात ज्यायोगे अंतरंगाचे दर्शन होते…मी म्हणजे हा देह ह्या भावनेपलीकडे ज्ञानी जातो आणि दैनंदिन सारी कर्मे अन्य कोणासारखीही करत असतो पण त्याचे मन त्यात अडकून राहात नाही जसा कमलदलावर जलाचा थेंब …
निरासक्त असूनही सर्व विहित कर्मे करत जायचे …काम,क्रोध, मंद, मत्सर, लोभ, मोह…ह्याचा स्पर्शही ज्ञानी मनाला होत नाही.
असे होता येते का…?
जरा काही उदाहरणे मनात आणा…
भक्त हनुमान…राजा जनक…पूर्ण वैराग्य असलेला शुक…जितेंद्रिय विवेकानंद… संत एकनाथ….संत रामदास
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि |
योगिन: कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये || 11||
(निष्काम कर्मयोगी ममत्व बुद्धी रहित केवळ इंद्रियांनी, मनाने, बुद्धीने आसक्तीला त्यागून अंत:कारणाच्या शुद्धीसाठी कर्मे करीत असतात.)
केवळ २९ श्लोकाच्या ह्या अध्यायाचे वैशिष्ठय पहा..
प्रारंभी कर्मयोग आणि ज्ञानयोग ह्यांचे निरूपण, निष्काम कर्मयोगाची थोरवी सांगितली, आणि अध्यायाच्या शेवटी राजयोगाला स्पर्श करत अखेरच्या श्लोकात भक्तियोगाचे माहात्म्य सुद्धा वर्णिले आहे…!!!
अर्जुनाला हा जो राजयोग स्पर्श दिसला त्याचे अति संक्षिप्त वर्णन……. (श्वास-नियंत्रणाने प्राण आणि अपान वायू ह्यांच्या नियमनाने सुषुना नाडीतून चेतना जागृत करायची)……. ऐकून त्याची जिज्ञासा जागी झाल्याचे कृष्णाच्या लक्षात आले.
भगवंताने मग अर्जुनाला सांगितले..
“हो, ह्याच उपक्रमाबद्दल मी तुला पुढल्या अध्यायात विस्तृत सांगणार आहे…!!!”
मधुसूदन थत्ते
संदर्भ: गीता सागर: श्री शंकर अभ्यंकर
०९-०४-२०२०
——————-

#गीताअध्यायसार
*****************
अध्याय ६

एक वेदिक मंत्र आहे…”तत्वमसि—तत त्वम असि ”
काही गीतेचे अभ्यासक असे मानतात की १८ अध्याय हे सहा…सहा…सहा असे ह्या प्रत्येक शब्दाचे प्रतीकरूप आहे. स्वामी चिन्मयानंद असेच मानत आले आणि अध्याय १ ते सहा हा गट त्वम शब्दाचे प्रतीकरूप आहे असे ते म्हणतात.
५व्या अध्यायात आपण पाहिले की कर्मसंन्यास आणि निष्काम कर्म वेगवेगळे असूनही कसे एकच उद्दिष्ट ठेवतात…मोक्षाचे….!!
निष्काम कर्म…म्हणायला सोपे पण आपण तर वासनांचे श्रेष्ठतम गुलाम….गुलामाने मालकाला कसे जिंकावे…?
आणि हेच ह्या सहाव्या अध्यायात विस्तृतपणे सांगितले आहे…
ह्यातला पाचवा श्लोक तर काही शाळांमध्ये “ब्रीद-वाक्य” मानला गेला आहे..
“उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् |
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: || 5||”
भगवंत म्हणतात तुम्हीच तुमचे मित्र आणि तुम्हीच तुमचे शत्रू..पहा..कोण व्हायचे तुम्हाला…
जर मित्र असाल तर स्वतः स्वतःचा सर्वांगीण उद्धार करायचे काम (अगदी विद्यार्थी दशेच्या सुरुवातीपासून) हाती घ्या
हे सोपे नाही मेडिटेशनच्या सहाय्याने (ध्यान-धारणा..इत्यादी अष्टांग योगाच्या पाय-या एक एक चढत जायला हवे…) हे सुलभ होते आणि सहाव्या अध्यायाचे हेच उद्दिष्ट आहे.
स्वामी चिन्मयानंद फार सुंदर सांगतात…इंग्रजीत आहे पण सोपे आहे..
“This chapter promises to give us all the means by which we can give up our known weaknesses and grow positively into a healthier and more potent life of virtue and strength. This technique is called meditation, which in one form or another, is the common method advocated and advised in all religions, by all prophets, at all times, in the history of man”
आज आपण “कुंडलिनी” ह्या संकल्पनेबद्दल हे काहीसे “मला कसे जमावे ?” ह्या कॅटेगरीचे मानतो…
मूलाधार ते सहस्रदल अशी सहा चक्रे आपल्याही शरीरात आहेत का..?
आपणही त्या कुंडलिनी नामक अनंत शक्तीला जागे करून हळू हळू प्रयत्नांनी वर वर आणत मस्तकात पोहोचवू शकू का…?
म्हणतात की विवेकानंदांची कुंडलिनी रामकृष्णांच्या एका स्पर्शाने जागृत झाली….
आपल्यालाही भेटतील का असे कुणी….?
हो, मित्रांनो आपल्यालाही भेटतील असे ..
पण कोण…?
तुम्ही स्वतःच….
ही आपली प्रत्येकाची क्षमता आहे हेच हा अध्याय सांगतो…
हां.. लक्षात असावे…हा मार्ग योग्य गुरुविना सापडत नाही…गुरुविना प्रयत्न केल्यास धोका होऊ शकतो…
म्हणूनच “त्वम” ह्या सहा अध्यायाच्या शेवटच्या ह्या अध्यायात “त्वम” ला महत्व आहे..
मधुसूदन थत्ते
१०-०४-२०२०
संदर्भ The Holy Geeta” by Swami Chinmayanand.

***************************************

#गीताअध्यायसार
अध्याय ७

मित्रांनो, पाचव्या अध्यायात आपण पाहिले की बुद्धीची एक हद्द असते. ती तर्कांपुरती मर्यादित असते. कार्यकारण संबंधापुरती असते..त्या सीमेपलीकडे ती जाऊ शकत नाही आणि तिथे जायला प्रज्ञा आवश्यक असते..
मनुष्याची क्षमता:……….बुद्धी आणि प्रज्ञा
परमात्म्याची रूपे :……. सगुण आणि निर्गुण
अनुभव:…………………..व्यक्त गोष्टीचा आणि अव्यक्त गोष्टीचा
भगवंताचे रूप:…………. अपरा प्रकृती (हे दृश्य विश्व्) आणि परा प्रकृती (विश्वाचा आधार असे चैतन्य)
मित्रांनो, इथेच कळून आले विज्ञान (अपरा प्रकृती) कुठवर आणि मग ज्ञान (परा प्रकृती) कुठपासून…
हा सातवा अध्याय ह्याच ज्ञान-विज्ञानाच्या विवेचनासाठी आहे.
बुद्धी काय तपासून बघते..?…ज्ञात कार्य-कारण…नाही का…?
मग अज्ञात असे कार्यकारण असू शकते का…?
एखादे चिमुकले बाळ, हाती एक खेळणे घेऊन मनाशीच हसते…आपण नेहेमी हे पाहत असतो…त्या बाळाशी कोणीही बोलताना दिसत नाही..एकटेच असते…तरीही हसते…का…? …
हेच ते अज्ञात कार्य-कारण…!! (सोबतचे चित्र पहा)
सत्व, रज, तम ह्या त्रिगुणांनी जेवढे जेवढे पदार्थ आणि प्राणिमात्र निर्माण झाले आहेत ते सगळे मायेपासून…ह्या परमात्म्याच्या छायेपासून निर्माण झाले आहेत पण त्यात परमात्मतत्वाचा स्पर्श नाही..आपली सावली हलताना दिसते पण त्या सावलीत आपण असतो का..?
ह्या मायेचाही वेध ह्या अध्यायात तुम्ही पाहाल.
आपला ग्रुप भक्तीचा आहे..आपण प्रत्येक जण भक्त आहोत..
कसे भक्त..?
म्हणजे काय..? भक्त कसे असतात तसे भक्त…!!!
नाही..चार प्रकार असतात भक्तांचे..
१……आर्त भक्त : आत्मसुख शोधत बसणारे
२……जिज्ञासू : आत्मसुखापलीकडे हे विश्व् कोणी निर्माण केले ह्याचा विचार करणारे
३……अर्थार्थी : जीवनात खूप तऱ्हेची सुखे मिळावी म्हणून परमात्म्याचा शोध घेणारी
४……ज्ञानी : सुख-दु:ख, व्यक्त-अव्यक्त इत्यादी द्वैत ख-या ज्ञानाच्या प्रकाशामुळे ह्यांच्या मनातून नाहीशी झालेली असतात.
मग आपण कोण ह्यातले..? प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे…
शक्य आहे की आपल्यापैकी बहुतेक सारे “जिज्ञासू” ठरावे..
सोबतच्या चित्रात दूर क्षितिजावर निरखून पाहणारे आजोबा कदाचित हेच ठरवत असावेत…? मी ह्यातला कोण…??
अर्जुनाला मात्र “ज्ञानी” भक्त करायचा संकल्प कृष्णाने केला होता…त्यासाठीच ही गीतेची सातवी पायरी…ज्ञान-विज्ञान योग…!!!
मधुसूदन थत्ते
११-०४-२०२०
संदर्भ: गीतासागर : श्री शंकर अभ्यंकर आणि सुबोध ज्ञानेश्व्री : य. गो. जोशी.

***********************
#गीताअध्यायसार
अध्याय ८


मित्रांनो, काय अक्षर असावे हे ॐ ?
काय दिव्यता आहे त्यात…काय प्रभाव आहे हा…? हे अक्षर पण आहे आणि अ-क्षर पण आहे…!!!
ॐकार हे अखंड अविनाशी ब्रह्माचे अक्षर आहे…आणि ह्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन कृष्णाला विचारतो..
“देवा, तत ब्रह्म किम…?”…अध्यात्म काय ? ..कर्म काय ?…अधिभूत आणि अधिदैव म्हणजे काय…?
“अहं ब्रह्मास्मि ” म्हणणारा प्रत्येक जण ज्ञानी होऊ शकतो…भगवंतांनी सहाव्या आणि सातव्या अध्यायात हे विशद केले आहे.
ह्या आठव्या अध्यायात त्याच ब्रह्माची पूर्ण ओळख दिली आहे. अक्षर-ब्रह्म हेच तर अध्यायाचे नाव आहे.
ब्रह्म….जे ह्या शरीरात आहे…
अनंत छिद्रे असलेल्या शरीरात आहे आणि तरीही गळून पडत नाही…
अनंत अशा विश्वात ते भरून आहे जन्मणा-या प्रत्येक जीवात आहे..घडणा-या प्रत्येक पदार्थात आहे..
आणि
सजीव-निर्जीव नाश पावले तरी ते नाश पावत नाही ..ते ब्रह्म…आणि अशा ब्रह्माच्या अखंडत्वाचा “स्वभाव” म्हणजे अध्यात्म…!!!
साबणाच्या पाण्याचे फुगे हवेत सोडणारा मुलगा (सोबतचा फोटो पहा) आणि नानाविध वस्तुमात्र विश्वात सोडणार ब्रह्म सारखेच कारण जसे फुगे क्षणिक तसे मायेने निर्माण झालेले हे विश्व् पण ब्रह्माच्या मोजपट्टीवर क्षणिकच..
फुगे सोडणारा मुलगा आपल्याला दिसतो ब्रह्म दिसत नाही कारण ब्रह्म हे निराकार आणि अनित्य असे आहे…!!!
शरीरात वावरणारा परमात्म्याचा अंश ते अधिदैव…
अन्ते मति: सा गति:
मनुष्याला शरीर सोडतेवेळी ज्याचे समरण होते त्याच स्वरूपात तो मिळून जातो..
असं पहा, मातीची घागर नदीतळाला गेली, लाटांनी फुटली…आतले पाणी बाहेर आले…पाणी पाण्यात मिसळले…
ह्याप्रमाणे विचार अंती मनात आला की आत्मा परमात्म्याला मिळाला नाही का..? हे फार सोपे तत्व इथे सांगितले आहे
ह्या अध्यायाच्या निरूपणात ज्ञानदेवांनी अतिशय बोलकी उदाहरणे दिली आहेत…जरूर वाचा..मन एका वेगळ्या आनंदाचा अनुभव घेते.
मधुसूदन थत्ते
१२-०४-2020
संदर्भ: सुबोध ज्ञानेश्वरी (य. गो. जोशी) आणि गीतासागर (श्री शंकर अभ्यंकर)

*****************

@गीताअध्यायसार
अध्याय ९…राजविद्या राजगुह्य योग
अध्यायाचे नाव जरा कठीणच नाही का..? पण ह्यालाच आत्मविद्या किंवा आत्मज्ञान म्हटले आणि पुढे म्हटले की हे ज्ञान गुह्यतम आहे ..एक श्रेष्ठ असे गुपित आहे तर जरा जवळचे शब्द वाटतात ..!!
आणखी आजच्या भाषेत सोपे करायचे म्हणजे म्हणूया…It is the theory of self perfection and also explains the logic behind it…
अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवन्त अर्जुनाला म्हणतात ..
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे |
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् || 1||
अर्जुना तुला मी आता असे गुह्यतम सत्य सांगतो ज्यामुळे जीवनातल्या दु:खांपासून कसे मुक्त व्हावे हे तुला समजेल. (You shall be free from all limitations of finite existence)
सहाव्या अध्यायात शरीराची क्षमता कशी अफाट आहे हे सांगून सातव्या आणि आठव्या अध्यायात ती क्षमता गाठण्यासाठी मनाची तयारी सांगितली आणि ह्या नवव्या अध्यायात शरीराची biology नाही की मनाची psychology नाही.. तर आत्मज्ञानाचे शास्त्र सांगितले आहे.
काय धर्म म्हणायचा ह्या आत्म्याचा…?
अग्नीचा धर्म काय…? …”HEAT “
बर्फाचा धर्म काय ..?…”COLD “
आत्म्याचा धर्म काय…? .
.
प्रपंचात राहून “दूध-पाणी” ओळखून वेगळे करणे..धान्य-कोंडा वेगळा करणे..
आपण किती गुरफटून जातो ह्या नित्याच्या दिनक्रमात…!!! खुपसा कोंडा मनात तयार होतो..
एकदा एक शास्त्रपारंगत मुलगा आपल्या वयस्क चुलता-चुलतीला अद्वातद्वा बोलतो..विद्वान खरा पण कसे वागावे न समजलेला मुलगा..उधळतो “कोंडा” (सोबतचे चित्र पहा )
चुलती संतापते..पण चुलता मनात आणि ओठावर गोड स्मित ठेवतो…
पत्नीला म्हणतो सोडून दे ते शब्द…क्षणिक अज्ञान आहे ते त्याचे..जाईल कालांतराने…(आणि ते तसे गेलेही नंतर)
तेव्हा असा मनात कोंडा का जपावा..?
शब्द-ज्ञान आणि खरेखुरे ज्ञान हा फरक अंतर्मुख झाल्यावर कळतो. चिंतनाने कळतो, मननाने कळतो..
कोंडा कसा ओळखावा..? किंवा कोंड्याचा अभाव कसा ओळखावा..?
भाषाशुद्धी आहे का..(अपशब्द, कटू शब्द आहेत का)
परनिंदा, परदारा, परधन ह्याच्या अभिलाषेचा लवलेशही नाही ना..?
आचरणात सत्य-सदाचार आहे का..?
दया-क्षमा दिसून येते का..?
दानधर्म केला जातो का..?
अहंकार लोपलेला आहे का..?
मित्रांनो ह्या कोंड्यापलीकडे जावे, पहावे, व्हावे हेच तर ते राजगुह्य…!!!
मधुसूदन थत्ते
१३-०४-२०२०
संदर्भ: सुबोध ज्ञानेश्ववरी (य. गो. जोशी) आणि “The Holy Geeta” by Swami Chinmayanand
****************************

#गीताअध्यायसार
अध्याय १० विभूती योग

गीताअध्यायसार १०

विभूती…? म्हणजे काय..कोण..?
माहात्म्य, तेज, दिव्यता, भव्यता, ऐश्वर्य, अलौकिक शक्ती ….म्हणजे विभूती…
भगवंताच्या अनंत विभूती आहेत.
ज्या परमात्म तत्त्वापासून निर्माण झालेले हे विश्व आहे त्यातल्या कोणालाही ते परम तत्व पूर्णपणे कळलेले नाही…
पर्वत शिखरातून निर्माण झालेल्या नदीला पर्वत शिखर काय आहे हे परत जाऊन बघता येईल का…?
अर्जुनाने अखेर विचारले, कृष्णा, तुझ्या स्वरूपाला तूच जाणतोस. तुझ्या स्वरूपाचे ज्ञान तूच जर आम्हाला करून दिलेस तरच ते आम्हाला कळेल नाही का..?
निर्जन अशा अरण्यात एखादे छोटेसे मंदिर असावे, त्यात एक पणती तेवती असावी.. रात्रभर ती उजळत असावी, पूर्व दिशेला झुंजू मुंजु व्हावे…दिनमणी हळू हळू वर यावा…ज्योतीचा प्रभाव कमी कमी व्हावा…
तेज..एकच..पणतीच्या ज्योतीचे जे रात्रीच्या अंधारात तेवते राहिले आणि दिनकराचे जे विश्वाला प्रकाशमान करते झाले…
हे देवा, ते तेज म्हणजे तुझी विभूती का…?
परमात्मा श्रीकृष्णांनी एकवार चारही दिशांना आपली दृष्टी टाकली आणि ते बोलू लागले …
“आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् |
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी || 21|”
तेज:पुंज किरणे असलेला सूर्य ही माझीच विभूती आहे…
आणि इथपासून त्यांनी खालील श्लोकापर्यंत आपल्या मुख्य मुख्य विभूती अर्जुनाला विशद केल्या
“दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् |
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् || 38||”
मौन म्हणजे माझी विभूती, ज्ञान म्हणजे माझी विभूती…
ह्या अठरा श्लोकात त्यांनी ज्या विभूती मांडल्या त्या एकवार प्रत्येकाने पहाव्या..
विष्णुरूप आदित्य, ॐ , मेरू पर्वत, देवसेनानी षडानन, हिमालय, अश्वत्थ (पिंपळ), उचै:श्रवा अश्व, ऐरावत, कामधेनू, सर्पराज वासुकी, नागराज शेष, यम, प्रल्हाद, सिंह, गरुड, प्रभू राम, मकर, ऋतुराज वसंत,
मित्रांनो, भगवन्त आपल्या किती जवळ आहे ह्या विभूतींद्वारे तुम्हीच पहा…
ह्यातल्या आज प्रत्यक्ष अनुभवाला येणा-या , दिसणा-या विभूती (अश्वत्थ, सिह, गरुड, मकर, हिमालय आणि सर्वांचा प्यारा वसंत ऋतू ) नित्याच्या झाल्या म्हणून taken for granted झाल्या आहेत नाही का…?
मधुसूदन थत्ते
१४-०४-२०२०
संदर्भ: गीता सागर: श्री शंकर अभ्यंकर आणि सुबोध गीता य. गो. जोशी.

————————
#गीताअध्यायसार
अध्याय ११

कुंभाराची मडकी…!!! कुठलेही उचला..म्हणाल ना..”अरे ही तर माती…मूळ रूप मातीच की…!!!”
आणि मग कोण्या मातीच्या ढिगा-याकडे पाहून एखादा गाढा तत्ववेत्ता म्हणेल “अरे, मला तर ह्या मातीत सारी मडकी सामावलेली दिसतात…!!!”
माझ्यासारखा अति सामान्य माणूस हे ऐकून म्हणेल..ह्या तत्ववेत्त्याची दृष्टी काही वेगळीच असावी…!!!
वेगळी..? दिव्य..?
शास्त्रीय दृष्ट्या ……..मी, हे पुस्तक, हे टेबल, ही भिंत, हे झाड, हे सर्व त्या त्या अणू-रेणू ची अभिव्यक्ती आहे..
मग आणखी खोल जा..परमाणू आले..त्याच्याही आत जा..अखेर
म्हणाल..”अरे ही तर मूळ energy ”
आईन्स्टाईन म्हणाले मॅटर आणि शक्ती एकच ..फॉर्मुला दिला त्यांनी E=m*(c*c)
मित्रांनो, भगवान व्यासांची प्रतिभा हेच वेगळ्या शब्दात सांगत होती की काय…? त्यांनाही E=m*(c*c) गवसले होते नाही का..?
हा अकरावा अध्याय सर्वोच्च तत्वज्ञान सांगणारा म्हणून सर्वमान्य आहे.
दहाव्या अध्यायात कृष्ण अर्जुनाला म्हणतो माझ्या अनंत विभूती आहेत..सर्व विश्वात मीच व्यापून आहे…नमुना म्हणून त्याने फक्त काही विभूतींचा उल्लेख केला.
सर्व मडकी माझीच रूपे असे मातीने म्हणावे…
सर्व मॅटर ही energy ची रूपे हे आईन्स्टाईनने म्हणावे …!!!
भगवंतांचे हे विश्व् रूप… कोणी कोणी ह्यापूर्वी हे विश्व् रूप पहिले असावे..?
विष्णू पत्नी लक्ष्मीने ? सनकादि ऋषींनी ? भगवंताचे वाहन गरुड…त्याने ?
ह्या सा-यांना कृष्णाचे मोहक श्यामसुंदर रूपच दिसले ना… ??
त्या दिव्य रूपात सारे विश्व् सामावले आहे असे पहायचे..? काहीतरीच काय..
त्याचे दर्शन व्हावे ही उकंठा अर्जुनाच्या मनात आहे पण कृष्णाला कसे हे सांगावे…?
मनात अर्जुन म्हणतो..
“हे देवा, तुझ्याच मायेपासून हे विश्व् निर्माण होते आणि तुझ्यातच हे लय पावते..हे कसे..समजत नाही बुवा..पण हे तुला कसे विचारू..?”
अर्जुनाचे मन कृष्णाने जाणले..”तुला ह्या डोळ्यांनी (चर्म चक्षु) ते माझे रूप दिसणार नाही..त्यासाठी दिव्य दृष्टी मी तुला काही क्षणापुरती देईन..
“ही पहा माझी विविध रूपाची विश्व् मुखे..(सोबतचे चित्र पाहावे) ..
काही तामस, काही स्नेहपूर्ण, काही पवित्र. काही अगडबंब काही क्षुद्र, काही उदास तर काही दुष्ट …काही कामविकारी, काही कोपिष्ट ..
अर्जुना, एकदा यशोदामाईला कळले मी माती खाल्ली..ती रागावली…म्हणाली, उघड बघू तोंड…अन मी तोंड उघडताच अशी घाबरली…अरे तिला सारी भिन्न भिन्न विश्वे त्यात दिसली…!!! (सोबतचे चित्र पहा).
हे कौरव…सारेच्या सारे माझ्या मुखात अंती जाणार आहेत…तुझे शत्रू ना ? मानवतेचे शत्रू ना..? बघ कसे माझ्या मुखात जातील ते…!!! (सोबतचे चित्र पहा)
हा सारा चमत्कार पाहून अर्जुन भांबावला..घाबरला..
“भगवंता,,हे काय पाहतो आहे रे मी…? हे तुझे विश्व् रूप..काळ रूप आवरून घे बघ..नाही बघवत माझ्याने…
मला ते तुझे चतुर्भुज, सुदर्शन असे कनवाळू रूप पुनः पाहू दे..
भगवन्त हसले. त्यांनी तात्काळ आपल्या विश्व् रूपाचे अमर्याद वस्त्र आवरते घेतले..
अर्जुनापुढे हसतमुख गोपाळ उभा राहिला…त्याचा प्रिय सखा पुनरपि आपल्या मोहक रूपात दिसू लागला…!!!
मधुसूदन थत्ते
१५-०४-२०२०
संदर्भ: The Holy Geeta” by Swami Chinmayanand आणि सुबोध ज्ञानेश्व्री ..य . गो . जोशी .

*****************************

#गीताअध्यायसार
अध्याय १२ भक्तियोग

गीताअध्यायसार १२
आपण पहिले की तत-त्वम-असि ह्या तीन शब्दाचे प्रतिनिधित्व गीतेचे सहा-सहा-सहा असे अठरा अध्याय करतात आणि पहिले सहा “त्वम” साठी योजले आहेत.
सातव्यापासून “तत” सुरु झाले आणि त्यात सांगितले की व्यक्ताची (सगुणाची) उपासना भक्तियोगी करतात तर ज्ञानयोगी हे अव्यक्ताची (निर्गुणाची) उपासना करतात.
अकराव्या अध्यायात अर्जुनाचे डोळे दिपविणारे आपले विश्व् रूप दाखवल्यावर शेवटी कृष्णाने असे सांगितले की हे अलौकिक रूप सहजी कोणीही पाहू शकेल पण त्यासाठी एकाग्र मनाची भक्ती हवी…
अर्जुनातला योद्धा भगवंतांनी आधीच जागा केला होता..त्यात विश्व् रूप-झलक दाखवली आणि अखेर आवाहन केले…”कोणीही हे रूप सहजी पाहू शकेल”
अर्जुनाला ही संधी होती.
त्याने ह्या १२व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच प्रश्न केला..”मग, देवा, ह्यात श्रेष्ठ कोण…सगुण उपासक की निर्गुण…??”
भक्ती दोन प्रकारची असते…शरणात्मक आणि मननात्मक. एक भक्तियुक्त ज्ञान आणि दुसरे ज्ञानयुक्त भक्ती. पहिला जरासा गौण तर दुसरा श्रेष्ठ..ज्यात सर्वकर्मफलत्याग सुचवला आहे. आणि ह्याच त्यागाने निरंतर शांती मिळते.
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते |
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् || 12||
अर्जुना, एकदा सर्वकर्मफलत्याग सवयीचा झाला की पिकलेली फळे जशी आपोआप झाडावरून खाली पडावी तशी सर्व कर्मफळे आपोआप झडून जातात.
“तुला मर्म न समजता अभ्यास जमेल की निर्गुणाचे ज्ञान झाल्यावर मी समजेन…की ज्ञानयुक्त भक्ती ज्यात सर्वकर्मफलत्याग सुचवला आहे…?
ह्यानंतर कृष्णाने भक्तांचे विविध उच्च असे प्रकार वर्णिले आहेत जे “मला आवडतात” असे वेळोवेळी म्हटले आहे..
“यो मद्भक्त: स मे प्रिय:”…..!!!!!!
मानवी जीवन विकास कसा..?
प्रथम अभ्यास, त्याच्या वरची पायरी ज्ञान, ज्ञानाच्या वर ध्यान, त्यानंतर कर्मफलत्याग आणि सर्वात वरची पायरी शांती…!!!
मित्रांनो, आपल्यापैकी कोण कुठल्या पायरीवर आहे हे ज्याने त्याने ठरवावे.
सोबतच्या चित्रात माणसे तर भक्तीत लीन दिसत आहेत पण पोपट, मांजर आणि कुत्रा पण ज्ञानेश्वरीचे बोल ऐकत कसे शांत-चित्त आहेत ते पाहावे.
मधुसूदन थत्ते
१६-०४-२०२०
संदर्भ: The Holy Geeta by Swami chinmayanand; गीतासागर: शंकर अभ्यंकर आणि सुबोध गीता: य. गो. जोशी.

*****************

अध्याय १३ क्षेत्र-क्षेत्रज्ञ विभाग योग.

ह्या आधी आपण “परा…अपरा”…”क्षर…अक्षर” असे असे देह आणि आत्मा असे भिन्नत्व पाहिले.
शेतक-याला आपले शेत पवित्र वाटते आणि तो त्याची त्याच भावनेने मशागत करत असतो.
आपला देह हे क्षेत्र (मटेरियल बॉडी) आणि आपल्यात नित्य असणारे चैतन्य (vibrant spark of life ) हे क्षेत्रज्ञ असे मानले तर त्या शेतक-याप्रमाणे आपण देहाचे पावित्र्य राखले पाहिजे, टिकवले पाहिजे, वाढवले पाहिजे हा विचार किती सुंदर आहे पहा..
अनेकांनी एक चित्र पहिले असेल (सोबतचे चित्र पहा) यमदूत काय करताना दिसतायत त्यात..? क्षेत्रापासून क्षेत्रज्ञ काढून नेत आहेत…”हे क्षेत्र आता निःसत्व झाले…दुसरे नवे घ्यायची वेळ आली !!!”
पण यमदूत नकोच…याची देही आत्म्याने परमात्म्याला जाऊन मिळावे… ..कसे..??
हेच ह्या तेराव्या अध्यायात सांगितले आहे…
स्वामी चिन्मयानंद काय म्हणतात पहा
(The Holy Geeta, page 798)
“A careful study of the chapter ( तेराव्या अध्याय) will open up enough secret windows on to the vast amphitheatre of spiritual insight within ourselves”
[ह्या अध्यायाच्या अभ्यासाने आपण आपल्यात अंतर्भूत अशा परमतत्वाला ओळखण्यासाठी जी अनेक गुप्त द्वारे आहेत ती एक एक उघडू शकतो]
otherwise , मी किंवा अन्य सामान्य माणसे काय करतो…? “अमुक हवे म्हणून देवपूजा करतो. नागपंचमीला सर्प पूजा, (सोबत चित्र पहा) गणपती पूजा, नवरात्रीत दुर्गा पूजा …मला हे दे…ते दे…अन ह्यात अध्यात्मविद्येचे वावडे असते…..!!!
पण दागिने अनेक असले तरी सुवर्ण एकच ना…परमात्मा त्या सुवर्णात पाहावा..ओळखावे त्या सुवर्णाला..
तुला, मला, ह्याला, त्याला असे कुणालाही अंतर्भूत अशा परमतत्वाला जाणणे जमणार नाही अन त्यासाठीच सहावा, सातवा असे अध्याय शरीर आणि मन तयार करण्यासाठी भगवंतांनी सांगितले आहेत…
कठीण आहे नाही का…८:५३ ची लोकल पकडायची अन कामावर जायचे की हे सारे करत बसायचे…?
पण लक्षात घ्या भगवदगीतेत .८:५३ ची लोकल पकडायची अन कामावर जायचे आणि अध्यात्म पण आत्मसात करायचे कसे…तेच तर सांगितले आहे..!!!
मधुसूदन थत्ते
१७-०४-२०२०
संदर्भ: The Holy Geeta by स्वामी चिन्मयानंद आणि सुबोध ज्ञानेश्वरी: य. गो. जोशी…

********************************
#गीताअध्यायसार
अध्याय १४…गुणत्रयविभागयोग

गीताअध्यायसार १४
सत्वं रजस्तम इति गुणा: प्रकृतिसम्भवा: |
निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् || 5||
ह्या श्लोकात कृष्णाने अर्जुनाला प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तीन गुण विशद केले.
“तो किती सात्विक दिसला सर्वार्थाने..!!!”
“शी..किती तमोगुणी…”
“हा व्यापारी रजोगुणयुक्त असावा…”
(सोबतचे चित्र पहा)
मित्रांनो काय आहे हे सत्व-रज-तम—?
नियती सत्व रज तम ह्या तीन कवड्यांनी माणसाला म्हणते खेळ…घे दान..
गंमत अशी की ह्या कवड्या कशा पाडाव्या हे ज्ञानही नियती देते…कुणी ते ज्ञान वापरते, कुणी वापरत नाही…अन मी, हा. तो, आणखी पलीकडचा तो…आम्ही खेळतो अन दान मात्र पडते ते घ्यावे लागते…
आजमितीला, ह्या वयात मी स्वतःला सात्विक म्हणू शकत नाही तसं तामसिक पण म्हणत नाही…ह्यापैकी एक निवडायचे तर रजोगुणी निवडीन मी…
मी का आणखी वर जात नाही..? ह्याला कारणही मीच आहे..
शुक-नलिका न्यायातला तो पोपट आहे मी…
पारध्याने एक फिरती नळी टांगली..पोपट बसला तीवर अन नळी फिरली..
“पडेन की काय” असे वाटून पोपटाने अधिक घट्ट नळी धरली, फड फड करू लागला..फिरत राही…..आणि पकड अधिक घट्ट होत गेली…(सोबतचे चित्र पहा)
शेवटी पकडला त्याला पारध्याने..!!!
ही नळी माझ्यासाठी लोभ, मोह,मद, मत्सर इत्यादी भाव विशेष आहेत..धरून ठेवले मी घट्ट…!!!
“अरे पण जरा ती नळी सोडून बघ..सुटशील की आकाशात भरारी मारायला…!!!” हे ज्याचे त्याला लक्षात यावे नाही का…?
मित्रांनो हा तसा लहानच आहे अध्याय पण मार्मिक आहे..
मिळाला कधी वेळ आणि झाली मनीषा वाचायची तर जरूर वाचा आणि मनन करा.
मधुसूदन थत्ते
१८-०४-२०२०
संदर्भ: सुबोध ज्ञानेश्वरी: य. गो. जोशी आणि गीतासागर: शंकर अभ्यंकर
**********************************

अध्याय १५ ..पुरुषोत्तम योग

गीताअध्यायसार १५

“गीता वाचता का कधीकधी”…विचारा कोणालाही…निम्मे तरी म्हणतील..”हो पंधरावा अध्याय पाठ आहे माझा…!!!”
मग सुरु होतो तो…
ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् |
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् || 1||
त्याच्या मनात नक्की येत असते………..
“हा असा उलटा अश्वत्थ कसा भगवंत सुरुवातीलाच म्हणतात…? आधार तरी काय ह्याला…? मुळे वर आणि अनंत फांद्या खाली अस्ताव्यस्त पसरत चालल्या आहेत..ना फळ ना फूल पण वाढ बघा कशी प्रचंड…!!!”
ह्या पहिल्या श्लोकात अश्वत्थ वृक्षाची उपमा ह्या मायारूपी विश्वाच्या पसा-याला कृष्णाने दिली आहे…
स्वामी चिन्मयानंद म्हणतात:
“आद्य शंकराचार्यानीं फार सुरेख सांगितले आहे: श्व म्हणजे उद्या; स्थ म्हणजे जे टिकून राहावे (शाश्वत) ते …आणि तो सुरुवातीचा अ आहे तो सांगतो हे जे आज आहे ते उद्या नसणार…अश्वत्थ ever changing अशी स्थिती…!!!”
वृक्ष का म्हटले..?
स्वामी चिन्मयानंद म्हणतात: “meaning of the Sanskrit term vruksh is “that which can be cut down”
काय कट डाउन करायचे…? लोभ, मोह, आसक्ती…attachment …हे सारे दृढ निश्चयाने आपापल्या संसारातले छाटून टाका..
अश्वत्थमेनं सुविरूढमूल
मसङ्गशस्त्रेण दृढेन छित्वा || 3|
तसा हा अध्याय सोपाही नाही आणि अर्थाच्या दृष्टीने फार गहन आहे..
एकच श्लोक पहा…आपल्याशी इतका निगडित आहे हे भगवंतांनी सांगितले तेव्हा आपण आपल्या शरीराकडे एक पवित्र मंदिर म्हणून पाहू लागलो…
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित: |
प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् || 14||
“मी तुझ्यातला वैश्वानर (अग्नी) आहे प्राण-अपान ह्याच्या योगे तू खातोस ते अन्न मी पचवत असतो..”…!!!
मित्रांनो…हा अध्याय पाठ केला नसेल तर करा..त्याचा अर्थ नीट ध्यानी घ्या आणि “असङ्गशस्त्रेण दृढेन छित्वा”…काय छित्वा..?…आपले सारे attachment लोभ, मोह, आसक्ती.
मधुसूदन थत्ते
१९-०४-२०२०
संदर्भ: The Holy Geeta by Swami Chinmayanand
———————

#गीताअध्यायसार
अध्याय १६…………द्वैवासूरसंपाद्विभागयोग

गीताअध्यायसार १६

चार म्हातारे कोप-यावर बसून गप्पा करत होते.
“अहो, त्या industrialist च्या संपत्तीचा अंदाज त्यालाही नसावा एवढा तो धनिक आहे”
संपत्ती…? कशाला म्हणावे संपत्ती…? धनाला…?
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे जीवन असणा-या एका पुण्यशील व्यक्तीशेजारी मनात अनंत विचार घेऊन बसलो होतो….गोंधळ होता विचारांचा..
जुजबी बोलणे झाले आमचे अन नंतर काही वेळ न बोलता मी त्यांच्याजवळ बसून होतो. तुरटी टाकलेल्या पाण्याने निवळ व्हावे असे मला माझे मन वाटू लागले…
हा असतो पुण्यप्रभाव…हे असते सात्विकतेचे रेडिएशन..आणि ही खरी संपत्ती.
गीतेच्या सोळाव्या अध्यायात असे होण्यासाठी काही “दैवी गुण संपत्ती” वर्णिली आहे.
देव आणि असुर…युगानुयुगे हे द्वैत चालू आहे…आजही चालू आहे…आजचे असुर कोण..??
हो, बरोबर ओळखलंत…
आणि असुर हे उघड उघड असुर म्हणून जसे असतात तसे संभावित असुरही असतात…वरकरणी दैवी वृत्तीचा खोटा वेष घेऊन मनोमन मात्र असुरी विचार ठेवतात (सोबतचे चित्र पहा).
देवांनी दैवी संपत्ती जोपासली तर असुरांनी असुरी संपत्ती कायम ठेवली …
ह्या गुणांची वा दुर्गुणांची यादी जरा मोठीच आहे …
भयाचा अभाव, स्वच्छ अंत:करण, सात्विक असे दान, इंद्रिय निग्रह, यज्ञरूपी उत्तम कर्म करत राहणे, प्रिय भाषण, कोणालाही दु:ख होईल असे भाषण नसणे, “मी कर्ता” ह्या अभिमानाचा त्याग….
you name it and it is there असे हे सत्गुण देवाने ह्या अध्यायात सांगितले..
त्याचबरोबर…
दांभिकता, घमेंड, वृथा अभिमान, क्रोध, कठोर भाषण, अज्ञान…असे असुरी गुण पण देवाने सांगितले आहेत…
कुणी म्हणेल..”अहो हे महाभारत काळी ठीक होतं..आज इतके सात्विक होत राहिले तर हिमालयातच जावे लागेल वास्तव्याला…”
मी म्हणेन
“कशाला हिमालय..? श्रुती स्मृती काय सांगून गेल्या…?
कालसापेक्ष असे गुणिजनांनी बदल करत करत आपल्यापर्यंत ही वेदवचने आणून ठेवली आहेत त्याप्रमाणे आणि तितके सात्विक तर होता येईल..?
मला भेटलेले आणि इथेच वर नमूद केलेलं ते सज्जन नाही का…
‘हा असतो पुण्यप्रभाव…हे असते सात्विकतेचे रेडिएशन..’ असे मी म्हटलेच ना..?”
मधुसूदन थत्ते
२०-०४-२०२०
संदर्भ: गीतासागर: शंकर अभ्यंकर आणि सुबोध गीता: य. गो. जोशी

*****************

#गीताअध्यायसार
अध्याय १७ ……श्रद्धात्रयविभागयोग

आपण १४व्या अध्यायात सत्व-रज-तम हे तीन गुण आणि त्यानुसार मनुष्य-स्वभाव ओझरता पाहिला..
फेसबुक वर काही समूह श्रद्धा ह्या एकमेव उद्दिष्टाला वाहिलेले आहेत (जसा अनुभूती समूह)..
वेद, ब्रह्मसूत्रे इत्यादी शास्त्र वेदकालापासून आपल्यापर्यंत पोहोचली आहेत…
शास्त्रशुद्ध आचरण कसे हे त्यापासून आपण जाणू शकतो.. मोक्षप्राप्तीसाठी हेच तर अवलंबायचे…
कुणी म्हणेल…
“हे सारं ठीक आहे पण आजच्या जगात वेद, ब्रह्मसूत्रे फारसे कुणीच अभ्यासत नाहीत मग काय आज मोक्ष ही संकल्पना विसरायची…?”
काय निव्वळ श्रद्धा असणे मोक्षप्राप्तीला पुरणार नाही ?? काय शास्त्रांचे अध्ययन हे must आहे…?
हाच प्रश्न अर्जुनाने कृष्णाला विचारला (तो इंग्रजी शब्द must सोडून) अन त्याचे उत्तर म्हणजे हा १७वा अध्याय..!!!
पण वर लिहिलेले…. “१४व्या अध्यायात सत्व-रज-तम हे तीन गुण” ………ह्याचा काय संबंध…?
तेच तर सार आहे.
कशी आहे तुमची श्रद्धा..?
तुम्ही सात्विक तर तुमची श्रद्धा सात्विक
तुम्ही राजसिक तर तुमची श्रद्धा राजसिक
तुम्ही तामसिक तर तुमची श्रद्धा तामसिक
तुमचा आहार सात्विक तर तुमची श्रद्धा सात्विक
तुमचा आहार राजसिक तर तुमची श्रद्धा राजसिक
तुमचा आहार तामसिक तर तुमची श्रद्धा तामसिक
तुमचा यज्ञ (तुमचा जीवन धर्म…तुमचे नित्य कर्म); तुमचे तप (साधना)…तुमचे दान
जे आहाराबद्दल वर सांगितले तेच ह्या यज्ञ, तप आणि दानाबद्दल…
……..सात्विक पती देवासमोर श्रद्धेने बसला आहे…त्याने समई तेजविली आहे…त्याची पत्नी ते पहाते अन त्या समईवर स्वतःचा लामण दिवा तेजविते…संबंध घरभर ती सात्विक श्रद्धा ज्योतींचे तेजरूप घेऊन कायम असते…
हे एक रूपक.
…… एखादा पंडित काही वेदतत्वे सांगत आहे … तामसिक ब्राह्मण समोर बसून ऐकण्याचे ढोंग करत आहे…पंडित बघत नाही हे पाहून शेंडी उपटून त्याला वेडावून दाखवत आहे…संबंध घरभर ती तामसिक श्रद्धा जणू त्या ब्राह्मणाला आणि त्याच्या कुटुंबियांना वेडावून दाखवत आहे….
हे एक रूपक.
किती रोखठोक विश्लेषण आहे ह्या भगवद्गीतेत…!!!
श्रद्धा आहे म्हणून मी श्रद्धामूलक समूहावर आहे हे खरे…पण..
कशी आहे “मम श्रद्धा?” सात्विक, राजसिक की तामसिक…?
ह्याचे सोपे उत्तर म्हणजे…
जसा माझा आहार-विहार-चाल-चलन-चरित्र तस्साच मी
…सात्विक…किंवा….राजसिक….किंवा तामसिक…!!!
मधुसूदन थत्ते
२१-०४-२०२०
संदर्भ: सुबोध ज्ञानेश्वरी: य. गो. जोशी.

*****************************
#गीताअध्यायसार
अध्याय १८
मित्रांनो स्वामी चिन्मयानंदांचे हे इंग्रजी वाक्य खूप काही सांगून जाते..
“Geeta is liquid poetry expounding solid philosophy .” (गंगेचा ओघ असलेली आणि हिमालयाप्रमाणे दृढ तत्वज्ञान देणारी गीता ही एक सरिता आहे…!!!)
गेले १७ दिवस आपण ह्या गंगेचे एक एक तीर्थ क्षेत्र अतिशय ओझरते असे पाहण्याचा प्रयत्न केला..पटते का तुम्हाला ह्या वाक्याची सत्यता…??
स्वामीजी पुढे म्हणतात..
“…science describes life while philosophy EXPLAINS life…..if the second chapter is summary of Geeta in anticipation, the 18th one is a report in retrospect…!! “
दुसरा अध्याय येणा-या अध्यायात काय अपेक्षित आहे हे संक्षिप्त रूपात देतो तर १८व्या अध्यायात आधीच्या १७ अध्यायांची summary आहे…सारांश आहे…अखेरचे सिंहावलोकन आहे.
संबंध humanity कृष्णाने तीन प्रकारात दाखवली आहे…
सात्विक, राजसिक आणि तामसिक.
आणि त्यानुसार त्यागयुक्त ज्ञानी, सत्कर्म-प्रवण कर्मी आणि काय-वाचा-मने सुखाचा अनुभव घेणारे विवेकी असे माणसांचे प्रकार दाखवतांना अज्ञानी, आळशी आणि उतावीळ असणारे कायम दु:खीही कसे ह्या भूतलावर संचारत असतात हे ही दाखवले.
संन्यास आणि त्याग …काय श्रेष्ठ…? संन्यास म्हणजे सारे काही सोडून तप करायला निघून जाणे आणि त्याग म्हणजे कर्मफलत्याग..कर्तव्य नक्कीच करत रहायचे पण “मी केले” ही भावना सोडायची आणि त्या त्या कर्तव्याच्या फळाची आशा करायची नाही…
अर्जुनाने हेच तर नेमके विचारले…”संन्यास आणि त्याग …काय श्रेष्ठ…? “
सन्न्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुम् |
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन || 1||
आणि ह्या १८व्या अध्यायात ह्याचे उत्तर कृष्णाने दिले आहे.
मोटारीत पुष्कळ मीटर्स असतात डॅश बोर्ड वर …ती मला सांगतात..पेट्रोल कमी झाले..इंजिन तापले…बॅटरी संपत आली…
आता असं पहा..आपल्या नित्य-जीवनात अशी काही इंडिकेटर्स असतात का…? शारीरिक आणि मानसिक…!!!
ज्याची त्याला कळत असतात आणि तदनुसार योग्य पाऊल टाकायला हवे हे कळत असते…मग हे जे माणसांचे तीन प्रकार वर सांगितले ते प्रत्येकी ह्या शारीरिक आणि मानसिक इंडिकेटर्स प्रमाणे कृती करणारे पण असतात आणि न करणारे पण असतात..
ह्यात मी कुठे बसतो हे आपले आपण ठरवायला हवे, नाही का…?
कधी काळी मी असे निवांत बसून माझ्या गतायुष्याबद्दल मनन केले आहे का…? (सोबतचे चित्र बघा)
ह्या जीवनाला दिशा देणा-या गीतेला ज्या खांबापाशी बसून रसाळ अशा मराठीत ज्ञानदेव सांगत होते त्या खांबाचे मी दर्शन घेतले आहे का..? (सोबतचे चित्र बघा)
मित्रांनो, गेले १८ दिवस मी माझ्या अल्प समजुतीप्रमाणे मला कळलेले हे प्रत्येक अध्यायाचे सार तुम्हाला देत राहिलो..
चुकलो असेनही कुठे…पण तुम्ही सांभाळून घेतलेत…मी कृतज्ञ आहे…!!!
मधुसूदन थत्ते
२२-०४-२०२०
संदर्भ: The Holy Geeta by Swami Chinmayanand आणि सुबोध ज्ञानेश्वरी: य. गो. जोशी.

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

3 thoughts on “गीताअध्यायसार”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s