पुणे का आवडते ?

नवी भर : आवडते जुने पुणे  …..  दि.२८-०५-२०२० खाली पहा


 

पुणे शहराविषयीचे अनेक मजेदार लेख मी “पुणे मार्गदर्शक (मिस)गाईड” या भागात एकत्र केले आहेत. https://anandghare.wordpress.com/2018/12/02/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a1/
हा लेख जरा मोठा असल्यामुळे स्वतंत्रपणे प्रकाशित करत आहे. याच्या लेखकाचे नाव माहीत नाही, पण इतिहासकाळापासून अगदी आजच्या संगणकयुगापर्यंत बदलत गेलेल्या पुण्याची सगळी वैशिष्ट्ये त्याने गोळा केली आहेत.
……. वॉट्सअॅपवरून साभार

सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे,

पेशव्यांच्या ‘सर्व’ पराक्रमांचे पुणे..

लाल महालात ‘तोडलेल्या’ बोटांचे पुणे..

इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे..

‘कोटी’सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे..

नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणा-या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे पुणे..

“सौ. विमलाबाई गरवारे च्या पोरांचा गर्वच नाही तर माज आहे पुणे”

सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणा-या नू.म.वि., भावे स्कूल चे पुणे..

SP, FC, BVP, SIMBY, Modern, MIT आणि वाडिया चे पुणे..

आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून (की बांधून?) Two Wheeler वाल्या मुलींचे पुणे..

RTO कडून License to kill इश्यू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे..

Info Tech park चे पुणे..

Koregaon Park चे पुणे..

कॅम्पातल्या श्रूजबेरी वाल्या कयानींचे पुणे..

चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे..

वैशाली च्या yummy सांबार चे पुणे..

रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे..

तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे..

खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे..

JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे..

कॅड बी आणि कॅड एम चे पुणे..

सोडा शॉप चे पण पुणे..

अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे..

University मध्ये शिकणा-यांचे पुणे, आणि University च्या जंगलात ‘दिवे लावणा-यांचे पुणे..

कधी ही न थकणा-या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे (तिथली साधी डोक्याची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही)..

खवय्यांसाठी जीव देणा-या German Bakery चे पुणे, आणि चवी साठी जीव टाकणा-या खवय्यांचे पुणे..

बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg ‘थाळी’ वाले पुणे..

सदशिवातले बिनधास्त Nonveg वाले पुणे, आणि रमझान मधल्या त्या मोमीनपु-यातले रात्रीचे लजीज पुणे..

मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणा-या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे..

शिकणा-यांचे पुणे आणि चांगलेच शिकवणा-यांचे पण पुणे..

‘सरळ’ मार्गी प्रेमिकांच्या ‘Z’ bridge चे पुणे..

सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे..

ताजमहाल पाहून सुद्धा “बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च केलान” अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे..

फटकळ, खवचट, उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे..

‘इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही’ अशी ख्याती मिरवणारे पुणे !..

पेशवे पार्कातल्या पांढ-या मोरांचे आणि वाघांचे पुणे..

आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणा-या “फुलराणी” चे पुणे..

भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे..

पुरुषोत्तम आणि फिरोदियाच्या जल्लोषाचे पुणे..

bollywood ला acting ची अक्कल शिकवणा-या wisdom tree चे पुणे, आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणा-या ‘NFAI’ चे पुणे..

फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्व्हा, भानुविलास आणि नटराज चे पुणे..

आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे..

गोगलगायीशी स्पर्धा करणा-या PMPML चे पुणे..

प्रचंड बडबड करून समोरच्याला दमवणा-यांचे पुणे आणि
कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे..

लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे..

प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे..

Christmas ला MG Road ला हौसेने केक खाणारे पुणे..

भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे..

सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे..

Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे…

पहिला संपूर्ण भारतीय सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे..
आणि “आम्हाला कशाला लागतोय mobile ?” असे पण म्हणणारे पुणे..

जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Mercs, VolksWagon आणि Jaguar, Nano बनवणारे पुणे..

सकाळ संध्याकाळी फिरायला जाणा-या थकलेल्या पायांचे पुणे,

Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणा-यांचे पुणे..

पर्वती वर प्रॅक्टीस करून Everest ला गवसणी घालणारे पण पुणे..

पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे..

उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे,..

Sunday ला सकाळी पॅटीस, पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणा-यांचे पुणे,
कसबा आणि गुरूवारातल्या भावड्यांचे पुणे..

सदाशिव, नारायण, शनिवारातल्या भाऊंचे पुणे..

बारा महिने २४ तास online असणारे, पण दुकान मात्र दुपारी दोन-चार तास बंद ठेवणारे,
असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेवाद्वितीय पुणे !!💪😎े Share the post if you’re proud to be a punekar

*************************
नवी भर दि. २८-०५-२०२०
 पुणेकरांना नक्कीच आवडेल

आमचे जुने पुणे

(लेखकाचा शोध घेतला, पण तो काही भेटला नाही.)
६०- ७० वर्षांपूर्वीचे पुणे पाहीलात का?
लकडी पुलावर पूर्वी मांडी घालून बसलेली वीतभर उंचीची ‘सगुणा’ नावाची स्त्री ही बाया बापड्यांचे खास आकर्षण असे. त्यांनी विचारलेल्या अवखळ प्रश्नांना सगुणा बिनधास्त उत्तरे देऊन लीलया टोलवत असे!
१९४० चे दशक असावे ते. आज मागे वळून पाहिले तर पुण्याचे ते रस्ते, ती माणसे, ते पडके वाडे, ते टांगेवाले, त्या सायकली सगळे सगळे नामशेष झाले आहे. उरलेले अवशेषही संपण्याच्या मार्गावरच आहेत. पर्वती, चतुःशृंगी, शनवार वाडा हे पुण्याचे मानदंड. आजची शानदार सारस बाग त्या काळी पुण्यात नव्हती. खोल तळ्यात गणपती बुडालेला होता.
पेशवे पार्कचा ऐसपैस प्रदेश आणि तेथली गर्द झाडी थेट निसर्गाच्या कुशीतच माणसांना ओढून न्यायची. संभाजी पार्क त्यावेळी नव्याने आकाराला आले होते. सगळे पुणे संध्याकाळी आणि विशेषतः रविवारी संभाजी पार्ककडे चाललेले असायचे. गणेश पेठेतून जिमखान्यापर्यंत फक्त १० पैशांत आरामात जाता यायचे. त्या वेळी शनिवार वाड्याचे भव्य पटांगण व्याख्यात्यांना बोलावण्याची एक महत्त्वाची जागा होती. मस्तानी दरवाज्या जवळच्या पिंपळाच्या गर्द सावलीत जादूगार आपली जादू पेश करायचे.
ही जादू पाहण्यासाठी खूप गर्दी होत असे. बाहेरून आलेला पाव्हना जेवण्यासाठी हमखास विजयानंद थिएटर जवळ असणाऱ्या, आगगाडीसारख्या लांबच लांब पसरलेल्या ‘ गुजराथ लॉज ‘ मध्ये जात असे. डुल्या मारुती, जिलब्या मारुती, पत्र्या मारुती, भिकारदास मारुती अशा वैविध्यपूर्ण आणि पुणेकरांप्रमाणेच अस्सल नावे धारण करणारा हनुमान आपल्या जयंतीला साऱ्या पुण्यातच धुमाकूळ घालायचा.
तुळशी बाग, बेलबाग ही पुणेकरांची खास श्रद्धास्थाने. धुपारती, दीपारती होताना निर्माण होणारे येथील वातावरण पुणेकरांच्या भक्तीभावनेचेच प्रतीक असे. या ठिकाणी प्रसिद्ध ह.भ.प. कीर्तनकारांची सदाच चालणारी कीर्तने ऐकण्यासाठी घरातल्या आजीबाई हाताने फुलवाती वळता – वळता बुवांच्या सुश्राव्य कीर्तनातील मोक्याच्या जागांना दाद देताना टाळ्या वाजवण्यासाठी हातही जरा मोकळे ठेवीत.
तुळशीबाग म्हणजे लहान मुलांची खेळणी मिळण्याचे एक महत्त्वाचे ठिकाण होते. राम-लक्ष्मण- सीता यांच्यासमोर उभ्या असणाऱ्या मारुतीच्या उजव्या हाताला लांब सरळ रेषेत जमिनीवरच त्यावेळी बायका हारीने दुकाने मांडून बसलेल्या असत.
तसेच पुढे गेल्यावर नगाऱ्याची देवडी असे. त्या बोळकंडीतील अंधाऱ्या जागी दोन्ही कट्टयांवर काही माणसे चक्क झोपलेली असायची. त्या काळात चितळ्यांचे प्रस्थ पुण्यात नव्हते. काका हलवाई व दगडूशेठ हलवाई यांनीच पुणेकरांचे तोंड गोड करण्याचा मक्ता घेतलेला होता.
सोन्या मारुती चौकातील कन्हैय्यालाल सराफाची पेढी भलतीच जोशात होती. एस.पी.कॉलेज समोरचे जीवन रेस्टॉरंट कॉलेज विद्यार्थ्यांची जान होती. सामिष भोजनासाठी त्याकाळी लक्ष्मी रोडवर गोखले हॉल समोर ‘सातारकर हेल्थ होम’ हे भोजनगृह होते.
प्रसिद्ध पहिलवानांचे फोटो तेथे ओळीने लावलेले असत. त्यांचे पिळदार स्नायू, पिळदार पोटऱ्या दाखवणारी बलदंड शरीरे आम्हां तरुणांच्या डोळ्यांत भरत.
सामिष भोजनाचा हा परिणाम आहे, असे वाटून तेथे तगड्या शरीराचे तरुण यायचे, तसेच काडीपैलवानही मोठ्या आशेने जेवण्यासाठी यायचे !
डेक्कन जिमखान्यावरील कॅफे गुडलक व लकी ही दोन इराणी रेस्टॉरंट समाजातील उच्चभ्रूंचे अड्डेच समजले जात. त्याकाळी उडप्यांची मिरासदारी पुण्यात फारशी जाणवत नव्हती. सोन्या मारुती चौकात त्याकाळी जुनी दूधभट्टी होती. ती गवळी लोकांनी नुसती भरून जात असे. कोणत्याही कुलुपाची किल्ली हमखास बनवून देणारा ‘बाबूलाल किल्लीवाला’ याच रस्त्यावर आपले दुकान थाटून बसलेला होता. तेव्हाचे हे डुप्लिकेट किल्ल्या बनवून देणारे एकमेव दुकान पुण्यात होते.
त्या काळात पुण्यात उत्तम जिलब्या ‘मथुरा भवन’ मध्ये मिळत. पायातल्या चपला हमखास चोरीला जाण्याचे ठिकाण म्हणजे दगडू शेठ दत्तमंदिर! आजच्या इतके पुण्याचे ओद्योगिकीकरणं झालेले नव्हते.
पुणे हे विद्येचे माहेरघर व शिक्षणाचे केंद्रस्थान असल्याने लांबून- लांबून मुले शिकण्यास येत. त्या काळात आजच्यासारखा जीवनाचा भन्नाट वेग नव्हता. रस्त्यावरून व्यवस्थित चालता यायचे. झोपडपट्टया मोठ्या प्रमाणावर नव्हत्या. रस्त्यावरून जाताना भेटणारे ओळखीचे लोक थांबून मनापासून बोलत.
बोलता- बोलता मुलांच्या हातावर ढब्बू पैसा तरी ठेवत वा शेंगदाणे, खारे दाणे, खारका असा खाऊ मूठभर ठेवत. त्याकाळात सिमेंटच्या गगनचुंबी इमारती पुण्यात नव्हत्या.
आठवते तिथपर्यंत पर्वती, भांबुरडा, कोथरूड गावठाण, एरंडवणे ही त्या काळातली जंगले होती. हल्ली सारेच पुणे सिमेंटचे जंगल झालेले आहे! पोस्टमन, शाळेतला शिपाई आणि फार तर पोलीस हीच ड्रेसवाली मंडळी वेगळी अशी उठून दिसायची. सायकली मात्र अमाप दिसायच्या. कारण पुणेकरांचे जीवनच सायकलवर अवलंबून होते. पुणेरी टांगेवाले हे एक मासलेवाईक प्रकरण होते. त्यावेळी भल्या सकाळी मोराची पिसे लावलेली उंच टोपी घालून रामनामाचा गजर करीत येणारा ‘वासुदेव’ पुणेकरांच्या घरातीलच एक झालेला असे. तो सगळ्यांना नवलाख पायऱ्यांवरून थेट जेजुरीला घेऊन जायचा, चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करणाऱ्या वारकऱ्यांच्या घोळक्यात नेऊन पांडुरंगाचे दर्शन घडवायचा.
तेथून तुळजापूरच्या भवानी व कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पायांवर घालून आणायचा. ‘चाईला औखद, वाताला औखद’ म्हणणाऱ्या वैदू बायका पुण्यात घरोघर हिंडायच्या. जालीम जडीबुटी देणाऱ्या या बायकांची माजघरापर्यंत उठबस असे. भाकरीच्या तुकड्यावर सागरगोटे देणाऱ्याही काही बायका टोपलीला चहुबाजूंनी गोधडी सारखे कापड लावून तीत सागरगोटे, बांगड्या, करगोटे, खडे, अंगठया ठेवीत आणि ती टोपली डोक्यावर व काखोटीला मूल घेऊन पुण्याचे गल्ली बोळ तुडवीत असत. गर्दीचे पुण्याला वेडच असावं. तीन डोळ्यांचं पोरं लोकांना रस्त्यावर दाखवून त्यातून पैसा मिळवणारे लोक इथेच गोळा होत. मग त्या पोराला पाहायला ही झुंबड उडे.
त्या काळी पुण्यात वाहनांचे अपघात क्वचितच होत. त्यामुळे एखादा अपघात झाला तरीही ते दृश्य पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमे.
मला आठवते त्याप्रमाणे ताराचंद हॉस्पिटल जवळ, श्री समर्थ व्यायाम मंदिरा समोरच्या मोकळ्या पटांगणात गोल रिंगणातून सतत सायकल चालविण्याची शर्यत त्यावेळी एक चर्चेचा, आकर्षणाचा विषय झालेला होता. त्या फिरणाऱ्या सायकलवरच आंघोळ करणे, कपडे बदलणे इ गोष्टी तो इसम करीत असे!
सतत ७२ तास सायकल चालवण्याचा विक्रम पाहण्यासाठी लोक तोबा गर्दी करीत. जादूचे खेळ, डोंबाऱ्यांची कसरत, गारुड्यांचे नागाचे, दरवेशी लोकांचेअस्वलाचे व माकडवाल्यांचे भागाबाईचे खेळ कुठे ना कुठे चालत असत व लोक खूष होऊन पैसे फेकीत. मुठा नदीला पावसाळ्यात आलेला पूर पाहण्यासाठी होणारी गर्दी व या पुरात उड्या टाकून पोहणाऱ्या धाडसी तरुणांना पाहण्यासाठी व प्रोत्साहन देणाऱ्यांची गर्दी हा प्रसंगअविस्मरणीय असे.
लकडी पुलावर पूर्वी मांडी घालून बसलेली वीतभर उंचीची ‘सगुणा’ नावाची स्त्री ही बाया बापड्यांचे खास आकर्षण असे. त्यांनी विचारलेल्या अवखळ प्रश्नांना सगुणा बिनधास्त उत्तरे देऊन लीलया टोलवत असे!
लोकांची हसून-हसून मुरकुंडी वळे. मग तिला लोक प्रेमाने पैसे देत, खायला आणून देत. त्या काळात पुण्यातील उंच इमारत म्हणजे विश्रामबाग वाड्यासमोरील बँक ऑफ महाराष्ट्रची इमारत. त्यानंतर मग कॉर्पोरेशनची इमारत आणि तिसरी लकडी पुलाजवळील एल आय.सी.ची बिल्डिंग. पुण्याचे हे ६०-७० वर्षांपूर्वीचे रूप आजही माझ्या मनातून पुसले गेलेलं नाही.
पुण्यातील गल्ली-बोळ माझ्या पायांनी तुडवले गेले असल्याने व पुढे सायकल वरून आख्खे पुणे पालथे घातले असल्याने, मी ते विसरूच शकत नाही. तो माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे —श्री संजीव वेलणकर यांच्या face book page वरून साभार.लेखक अज्ञात🙏🏻
Comments
Sudhir Dandekar
सर्व निरिक्षणे खूपच छान शब्दांकन करून मांडल्यामुळे आपल्या आठवणी चलतचित्राप्रमाणे सर्व जिवंत झाल्या. खूपच सुखद. हे पाहून लेखकाने आपले नांव सांगितलं आम्हालाही त्यांच्याशी संपर्क साधायला आवडेल
फेसबुकावरून साभार दि. २८-०५-२०२०

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

3 thoughts on “पुणे का आवडते ?”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s