कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या कविता

 

Bakibab-Borkar-197x280

आज ३० नोव्हेंबर,  बाकीबाव बोरकरांचा १०९ वा जन्मदिवस

तुला कसे कळत नाही?
फुलत्या वेलीस वय नाही!
क्षितिज ज्याचे थांबले नाही,
त्याला कसलेच भय नाही,
त्याला कसलाच क्षय नाही….

असाच काहीसा अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली बोरकरांची लख्ख आरस्पानी कविता. लयीत उलगडणारी आणि शब्दचित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी, अशी. कवितेची जातकुळीच अर्थगर्भित. चित्रवाही शब्दकळेचे लेणे ल्यालेली. आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाला तितक्याच समरसतेने आपलंसं करुन, अनुभवून आपल्या अवधूती मस्तीत धुंद होताना, त्या अनुभवांचा मुक्त उद्घोष करणारी, शुद्ध अभिजात अशी ही कविता. आत्मनिष्ठ. बोरकरांनीच म्हटल्याप्रमाणे, त्यांनी कधी कविता केल्या नाहीत, बोरकरांना कविता झाल्या. त्यांचे शब्दही शब्दवतीचा साज धारण करुन आलेले आणि चराचराच्या रंगागंधांमध्ये न्हाऊन निघालेले. भोवतालच्या सृष्टीला हाक घालणारे, पण ती कशी? नुसतीच नव्हे, तर नादवेडात रंगून आणि गंधाटून!
( यशोधरा यांच्या लेखनातील उतारा )

माझे मित्र श्री.अविनाश नेने यांच्याकडून वॉट्सअॅपवर मिळालेली माहिती साभार दि.३०-११-२०१९

विकीपीडियावरील माहिती :

1200px-बाळकृष्ण_भगवंत_बोरकर

बा.भ. बोरकर ( बालकृष्ण भगवंत बोरकर, टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (नोव्हेंबर ३०, इ.स. १९१० – जुलै ८, इ.स. १९८४) हे मराठी भाषेतील आणि कोंकणी भाषेतील पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते.बा.भ.बोरकर हे मराठी साहित्य प्रेमी व एक उत्कृष्ट कवी देखील होते. बा.भ,बोरकर हे गोमंतकाचं भुषण असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जीवनकाल
बोरकरांचा जन्म गोमंतकातील कुडचडे या पावन भूमीत ३० नोव्हेंबर इ.स. १९१० या दिवशी झाला. प्रापंचिक अडचणींमुळे त्यांना मॅट्रिकच्या पुढे शिकता आले नाही. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकी पेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात ‘प्रतिभा’ या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. मराठी बरोबरच त्यांनी कोंकणी भाषेतही लेखन केलेले आहे. इ.स. १९३४ साली त्यांना बडोद्यातील वाङ्‌मय परिषदेच्या अधिवेशनात उत्कृष्ट कवितालेखन व काव्यगायन (‘तेथे कर माझे जुळती’) यांबद्दल सुवर्णपदक मिळाले. इ.स. १९४६ साली त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामात उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्‌मयविभागाचे संचालक म्हणून काम केले आणि तेथूनच वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले.
——————

बा. भ. बोरकरांच्या कविता

तेथे कर माझे जुळती

दिव्यत्वाची जेथ प्रतीती
तेथे कर माझे जुळती

गाळुनिया भाळींचे मोती
हरीकृपेचे मळे उगविती
जलदांपरी येउनिया जाती
जग ज्यांची न करी गणती
तेथे कर माझे जुळती.

यज्ञीं ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती
तेथे कर माझे जुळती.

जिथे विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती
तेथे कर माझे जुळती.

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांति शिरी तम चवर्या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती
तेथे कर माझे जुळती.

चित्रपट : पुत्र व्हावा ऐसा (१९६१)
आशा भोसले / वसंत प्रभु / बा. भ. बोरकर
—–

त्या दिसा वडाकडेन 

त्या दिसा वडाकडेन गडद तिनसाना
मंद मंद वाजत आयली तुझी गो पैंजणा

मौन पडले सगल्या राना
शिरशिरुन थांबली पाना
कवळी जाग आयली तणा झेमता झेमताना

पैसूल्यान वाजली घाट
दाटलो न्हयचो कंठ काठ
सावळ्यानी घमघमाट सुटलो त्याखीणा

फुलल्यो वैर चंद्र ज्योती
रंगध्रानी लागल्यो वाती
नवलांची जावक लागली शकुन लक्षणा

गळ्या सुखा, दोळ्या दुखा
लकलकली जावन थीका
नकळतान एक जाली आमी दोगाय जणा

वड फळांच्या अक्षदांत
कितलो वेळ न्हायत न्हायत
हुकलो कितलो चंद्रलोक इंद्रनंदना

तांतले काय नुल्ले आज
सगल्या जिणे आयल्या सांज
तरीय अकस्मात तुजी वाजती पैंजणा

कानसूलानी भोवती भोवर
आंगर दाट फुलता चवर
पट्टी केन्ना सपना तीच घट्ती जागरना

त्या दिसा वडाकडेन गडद तिनसना
मंद मंद वाजत आयली तुझी गो पैंजणा

– बा. भ. बोरकर : एक आनंदयात्रा कवितेची – पु. ल. देशपांडे आणि सुनिता देशपांडे
अंदाजे १९८४/८५ साली बोरकरांच्या कवितांवर या दोघांनी कार्यक्रम केला होता.
————-

बोरकर तू गेल्यावर

नाही पुण्याची मोजणी

नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी

कशाचा न लागभाग
कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग

आम्हां नाही नामरूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळानिळा धूप

पूजेतल्या पानाफुलां
मृत्यु सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा

– बा. भ. बोरकर / जितेंद्र अभिषेकी / पु.ल.देशपांडे
—-

सरिंवर सरी आल्या गं

सरिंवर सरी आल्या गं
सचैल गोपी न्हाल्या गं ।
मल्हाराची जळात धून
वीज नाचते अधुनमधून
वनात गेला मोर भिजून
गोपी खिळल्या पदी थिजून
घुमतो पांवा सांग कुठून?
कृष्ण कसा उमटे न अजून?
वेली ऋतुमती झाल्या ग
सरिंवर सरी आल्या ग…
सरिंवर सरी आल्या ग…
सरिंवर सरी आल्या ग…

बोरकर - पावसात
—-

अनंता तुला कोण पाहूं शके?

अनंता तुला कोण पाहूं शके?
तुला गातसां वेद झाले मुके.
मतीमंद अंधा कसा तू दिसे?
तुझी रूपतृष्णा मनाला असे.

अनंता तुला कोण पाहूं शके?

तुझा ठाव कोठें कळेना जरी, x 2
गमे मानसा चातुरी माधुरी.
तरूवल्लरींना भुकी मी पुसें,
“तुम्हां निर्मिता देव कोठें वसे?”

फुलें सृष्टिचीं मानसा रंजिती,
घरी सोयरीं गुंगविती मती,
सुखें भिन्न हीं, येथ प्राणी चुके
कुठें चिन्मया ऐक्य लाभूं शके?

अनंता तुला कोण पाहूं शके?

तुझे विश्व ब्रह्मांड, ही निस्तुला-
कृती गावया रे कळेना मला.
भुकी बालका माय देवा चुके,
तया पाजुनी कोण तोषूं शके?

अनंता तुला कोण पाहूं शके?

नवीं भावपुष्पें तुला वाहिलीं,
तशी अर्पिली भक्तिबाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू! कल्पना जल्पना त्या हरो.

अनंता तुला कोण पाहूं शके?
तुला गातसां वेद झाले मुके.
अनंता तुला… अनंता तुला…

गीत : बा. भ. बोरकर
संगीत व स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी
————-

बोरकर - कांचनसंध्या

 

जीवन त्यांना कळले हो…

जीवन त्यांना कळले हो…

मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो

जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो

चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो

सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो

आपत्काली अन दीनांवर घन होऊनी जे वळले हो

दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो

पुण्य जयांच्या उजवडाने फुलले अन परिमळले हो

सायासावीन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो

उरीच ज्या आढळले हो!

गीत : बा. भ. बोरकर
संगीत व स्वर : सलील कुलकर्णी
————

बोरकर -प्रतिएक

झिणि झिणी वाजे बीन

झिणि झिणी वाजे बीन
सख्या रे, अनुदिन चीज नविन

कधी अर्थावीण सुभग तराणा
कधी मंत्रांचा भास दिवाणा
सूर सुना कधी केविलवाणा, शरणागत अतिलीन

कधी खटका, कधी रुसवा लटका
छेडी कधी प्राणांतिक घटका
कधी जीवाचा तोडून लचका
घेते फिरत कठीन

सौभाग्ये या सुरात तारा
त्यातून अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रविण
_____

गीतकार :बा. भ. बोरकर
गायक :आशा भोसले
संगीतकार :श्रीधर फडके
————–

कवितांची निवड श्री अविनाश नेने

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

3 thoughts on “कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या कविता”

  1. आपल्या मुळे अमृत फुलांचा (कविता) सहज आस्वाद घेता आला खुप धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s