कृष्ण – सहा कविता आणि दोन लेख

जन्माष्टमीच्या निमित्ताने वाचलेल्या काही सुंदर कविता खाली दिल्या आहेत. या सर्व रचना मला फेसबुक किंवा वॉट्सअॅपवर मिळाल्या आहेत. त्या लिहिणाऱ्या सर्व साहित्यिकांचे मनःपूर्वक आभार.  दि.२४-०९-२०१९ . . . . त्यानंतर यात लेख आणि कविता यांची भर घालत राहिलो आहे. 

श्रीकृष्णाशी संबंधित खालील पानेही पहावीत.

मी योगी कर्माचा
https://anandghare.wordpress.com/2018/08/28/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be/

रुक्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेले पत्र हे जगातले पहिले प्रेमपत्र असेल. श्रीकृष्णरुक्मिणीच्या लग्नातल्या मेजवानीचे वर्णन काय करावे?
https://anandghare.wordpress.com/2019/02/19/%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%86/

श्रीकृष्णजयंति आणि काही लोकप्रिय गाणी
https://anandghare2.wordpress.com/category/%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3/


१. कै. दुर्गा भागवतांनी लिहिलेली ही कविता
🌿 कृष्णा,

तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत…

खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!

तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?

तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा ‘सखा’ झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. ‘बाईचा मित्र’ ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, ‘तो’ स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.

पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला ‘नटनागर गिरिधारी’ म्हणत साद घातली.

एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.

गीतेत ‘यदा यदा हि धर्मस्य’ म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये!

आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.

कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!

दुर्गा भागवत.
———–

२. कृष्ण भेटायलाच पाहिजे….

(कवीचे नाव मला समजले नाही.)

कृष्ण भेटायलाच पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायलाच पाहिजे.
मनातलं बोलायला, लिहिलेलं वाचायला, रेखाटलेलं दाखवायला,
अन् कधी गायलेलं ऐकवायला हक्काचा सवंगडी पाहिजे
आणि म्हणूनच प्रत्येकाला एक कृष्ण भेटायलाच पाहिजे
मुळात नात्यांच्या पलिकडचे भावबंध जोडणारा…..
एक हक्काचा सवंगडी पाहिजे…..
लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांचीही वयं वाढत असतात
त्या नात्यांचे काळाप्रमाणे अर्थ बदलंत असतात
तस्संच….ते…पूर्वीचं…निर्व्याज, अबोध नातं पुन्हा जमायला पाहिजे
आणि याकरताच आयुष्यात कृष्ण भेटायला पाहिजे……
“तो” कृष्ण “ती” ही असु शकते. आपल्या मनातलं सारं जाणणारी ती असते
कधीही आपलं खोलवर मन रीतं करता आलं पाहिजे
असा हक्का , विश्वासाचा कृष्ण भेटला पाहिजे……..
आपल्या आजुबाजुला तो सापडेलंच असं नाही
जोडीदारामध्ये तो गवसेलंच असंही नाही
कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे
मात्र कधी मनाचा पेंद्या झाला नाही पाहिजे….
सुंदर विचारांची रम्य मुरली छेडणारा पाहिजे
आयुष्यात प्रत्येकाला कृष्ण भेटला पाहिजे……
खरंच त्या मुरलीधराकडे मुरली होती का?
की अनेकांच्या मनात रुंजणारी त्याची ती अश्वस्त मैत्री होती का?
त्याच्या अस्तित्वाने अनेक मनांतून उमटत असाव्या आनंदलहरी
आणि त्यांचीच ऐकु येत असावी रुंजणारी मुरली
अनेकांच्या मनामधे मुरणारा तो मुरलीमनोहर प्रत्येकाला भेटायला पाहिजे
आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायला पाहिजे..

वॉट्सअॅप , मिसळपाव आणि यू ट्यूब  वरून साभार
https://www.reverbnation.com/voiceartist9/song/26518574—

 

३. सावळबाधा

अलवार वाजवित वेणू
तो स्वप्नफुलांवर आला
अन रंग सावळा माझ्या
डोळ्यांवर सोडून गेला. .
क्षितिजावर निळसर रेघा
गोंदून जराश्या हलक्या
सांजेचे लेऊन पंख
तो कृष्ण किनारी आला. . .
मी तिथेच होते तेंव्हा
थांबले मंदिरापाशी
तो सोनखुणांचे पाऊल
वाळूवर उमटत आला. . .
भरजरी शुभ्र वस्त्रांवर
नाजूक कशिदा त्याच्या
हातात कडे सोन्याचे
मनमोहन लेऊन आला. .
बैसला जरा बाजूला
मंदिरी पायरीपाशी
डोळ्यात पाहुनी माझ्या
डोळ्यात हरवुनी गेला. . .
हातात घेऊन हात
मज म्हणे, सखे जाऊया. !
मी लाजून हसता गाली
गालांवर उमटत गेला. . .
मज झाली सावळबाधा
मी झाले ना रे राधा. . ?
तो ऋतू जीवघेणा पण,
स्पर्शात शहारून गेला. . .
ती शामनिळाई ल्याली
वेगळीच होती सांज
तो कातरवेळी ऐसा
मोरपीस फिरवून गेला. . .
मी ओढून घ्यावा म्हणून
जाताना माझ्यासाठी
कालिंदीच्या काठावर
तो शेला विसरून गेला. . .

🌺 इंदिरा संत. ??? सावळबाधा – पूजा भडांगे (शब्दचांदणे) ??? . . . . . . . ही कविता प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांची आहे असे वॉट्सॅपवर कोणी लिहिले आहे तर ती पूजा भडांगे यांची आहे असे त्यांनीच आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे असे गूगलमधून शोध घेतांना दिसले. . . . नवी भर दि. १४-०८-२०२१

***************************

४ कृष्ण

नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव,,,
प्रत्येक शब्द हा जोडाक्षर,,,
जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण,,
पण एकदा समजला की जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा,,
जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर कृष्ण समजून घ्यावा,,
दशावतारी भगवंताचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण,,
सातवा अवतार प्रभू राम,,
राम ही अक्षरे सुद्धा सरळ अन त्याचं वागणं ही सरळ,,मर्यादेत,,
म्हणून मर्यादा पुरुषोत्तम,,,
रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही,,
तरीही काही जणांनी त्याच्यात दोष शोधले,त्याच्यावर टीका केली,,,
मग पुढच्या अवतारात प्रभू ने सर्व मर्यादा ओलांडल्या,,
करा काय करायचं ते,,,😃😃😃
जीवनात आचरण रामसारखं असावं अन समजून कृष्ण घ्यावा,,
कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत पडू नये,,
कृष्ण म्हणजे श्रीमदभगवद्गीता,,,
जीवनाचं सार,,,
प्रभू रामाने जसा भर दुपारी मध्यानी अवतार घेतला तसा कृष्णाने पार मध्यरात्री अवतार घेतला,,
जन्म झाल्याबरोबर त्याला ते ठिकाण सोडून गोकुळात जावं लागलं,,
गोकुळात कृष्ण फक्त वयाच्या आठव्या वर्षापर्यंत राहिला,,,
म्हणजे राधा राणी फक्त तोवर कृष्णासोबत होती, कृष्ण 8 वर्षाचा होऊ पर्यंत,,,
जे राधा आणि कृष्णविषयी चुकीची चर्चा करतात त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा 8 वर्षाच्या बालकाचे कसल्या पद्धतीचे प्रेम संबंध असतील राधिकेशी,,,
ईतका कमी सहवास लाभून सुद्धा राधेचं नांव कृष्णाशी कायमचं जोडलं गेलं,,
किंबहुना तीचं प्रेम इतकं नितळ,निस्सीम,निर्मळ होतं की तिचं नांव कायमचं कृष्णाच्या आधी लागलं,,
कृष्ण-राधे कोई ना केहता, केहते राधे-शाम,,,
जनम जनम के फेर मिटाता एक राधा का नाम,,
असं हे राधा आणि कृष्णाचं प्रेम,,
किंबहुना प्रेमाचं दुसरं नांव म्हणजेच राधा व कृष्ण,,
कृष्णाला 16 हजार 108 बायका,,
त्याचा ही इतिहास,,
ज्यांना त्याने मुक्त केलं त्या म्हणू लागल्या आता आम्ही आमच्या घरी जाऊ शकणार नाही तेव्हा त्याचा स्वीकार केला,,
अन नुसता स्वीकारच नाही केला त्या प्रत्येकी सोबत त्याच्या सुख दुःखात सहभागी होता,,,
आज काही महाभाग म्हणतात कृष्णाने इतक्या बायका केल्या तर आम्हाला काय हरकत आहे,,
अरे त्याने आग लागलेली 50 गावे गिळून टाकली होती,,,
तू जळता एखादा कोळसा गिळून दाखव की आधी मग कृष्णाची बरोबरी कर,,,
मी आधीच म्हटल्याप्रमाणे कृष्ण आचरणात नाही समजण्यात खरी मजा,,
त्या साठी गीता समजून घेणं महत्वाचं,,
गीते मध्ये काय नाही??
तर गीतेत सर्व आहे,,
जीवनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यात मिळेल,,,
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जीवन शास्त्र कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलं,,,
यावरून अर्जुनाची सुद्धा योग्यता किती मोठी आहे हे समजतं,,
अर्जुन या भूतलावर असा एकमेव मानव झाला जो या नाशवंत देहासह स्वर्गात 5 वर्षे राहिला व शस्त्र चालवण्याचं शिक्षण घेतलं,,
या देशासह स्वर्गात जाता येत नाही पण अर्जुन एकमेव जो 5 वर्षे तिथे राहिला,,
म्हणजे अर्जुनाची योग्यता काय आहे ते समजतं,,
त्या अर्जुनाच्या डोळ्यांवर आलेलं मोह,माया याचं पटल दूर करण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली,,,
गीता समजण्यासाठी अर्जुन किती तयार आहे हे आधी कृष्णाने आधीचे 9 अध्याय पाहिलं,,
त्याची तयारी करून घेतली ,,,
मग पुढे खरा गूढार्थ सांगितला,,,
विश्वरूप दाखवतांना सुद्धा त्याला
आधी दिव्य दृष्टी दिली,,,
त्याची तयारी करून घेतली,,
मग त्याला दाखवलं की सर्व काही करणारा मीच आहे,,
तू फक्त निमित्तमात्र आहेस,,,
असा हा कृष्ण,,
त्याच्या विषयी किती सांगावं अन किती नको,,,
तो जितका अनुभवू तितका तो जास्त भावतो,,जास्त आवडतो,,
त्याला जितकं समजून घेऊ तितकं कमीच,,,
त्याच तत्वज्ञान म्हणजे संपूर्ण जीवनाचं सार,,,
ते समजून घेतलं की जीवन समजलं,,
जीवन सफल झालं,,
मनुष्य जीवनमुक्त झाला,,
अशा या कृष्णाला वंदन,,
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेव,
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ,
मुकुंद विष्णू भगवन नमस्ते!!!
…..जय श्री राधे कृष्णा…..
श्री कृष्णाला समजून घेण्यासाठी आपणाला श्री कृष्ण परमात्मा बुद्धी प्रदान करो हीच प्रार्थना,,,

कुरुक्षेत्रात युध्दभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरा-समोर आले तेव्हा,
कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या! दिशेने सोडले.

प्रत्येकाला वाटले- आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार… 😳
तितक्यात,
श्रीकृष्णाने आपल्या पायाचा भार रथावर दिला. रथ थोडा खाली खचला.
व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले.

नंतर, सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा, युध्द विराम होत असे. तेव्हा, पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे.

जेव्हा, पूर्ण युध्द संपले व पांडवांचा विजय झाला. तेव्हा, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, “आधी तू रथाच्या खाली उतर.”
त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला.

त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्यांचे लगाम घोड्यांच्या अंगावर टाकले घोडे बाजूला काढले व नंतर च स्वतः रथाच्या खाली उतरला.

दोघेही थोडे पावले चालून गेली तोच, रथाने धड धड करत प्रचंड पेट घेतला.🔥
जमलेले सर्व जण आश्चर्या ने ते दृश्य पाहत होते. 😳😳

तेव्हा अर्जुन म्हणाला, आपण रथातून उतरल्या उतल्या रथ आपोआप कसा काय पेटला
“अरे श्रीकृष्णा हा काय प्रकार आहे? “🤔

तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, 😇

“युध्दात जितके शस्त्र-अस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते, ते माझ्या मुळे तुला स्पर्श ही करू शकले नाहीत.
ते सर्व अस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भवती फिरत राहिले व आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली.. तेव्हा, ह्या अस्त्रांचा परिणाम आता तु पाहत आहेस.”

त्याच प्रमाणे मानवी देह आहे.

जोपर्यन्त परमेश्वरानेआपले जीवनरुपी लगाम पकडले आहेत तो पर्यंत आपल्या देहात प्राण ,आनंद ,सुख , ऐश्वर्य नांदत आहे. पण जेव्हा तो आपणास सोडतो.. तेव्हा आपलीही अवस्था त्या रथासारखीच होते .😥😥😥

।।जय श्रीकृष्ण।।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

मला खूप आवडले म्हणून तुम्हाला पाठवले !
🙏🏻💐💐 💐💐


नवी भर : एक विस्तृत लेख आणि कविता . . .  दि.३०-०७-२०२१

५. कृष्ण म्हणजे काय, कोण, का???

नमस्कार मित्रांनो …………कृष्णाची माहिती नक्की वाचा आणि शेअर करा. अन्यथा एका वेगळ्या विषयाला मुकाल. मी लिहिलेल्या गाण्याचा आनंद सुद्धा घ्या. अतिशय महत्वाची पोस्ट आहे ही मित्रांनो ……..कंटाळा करू नका.

आज थोडे कृष्णा विषयी. सोबत मी लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले कृष्णाचे वर्णन करणारे एक सुंदर गाणे देतो आहे. तुम्ही हे गाणे “आज गोकुळात रंग खेळतो हरी” या चालीवर म्हणू शकाल. जिथे स्वल्प विराम आहे तिथे थोडे थांबायचे आहे. या गाण्यात संध्येमध्ये विष्णूची म्हणजेच कृष्णाची जी २४ नावे घेतली जातात ती गुंफली आहेत. अर्थातच हे गाणे गुणगुणले तर संध्येचे थोडे पुण्य अवश्य मिळेल. कृष्णाची इतर नावे सुद्धा यात आहेतच.

मथुरेच्या आजूबाजूच्या भागाला “व्रज” भूमी म्हणतात. हे नाव मोठ्या अभिमानाने तुमचा फुटबॉलप्रेमी देश “ब्राजील” मिरवतो आहे. “व्रजन्ति गावो यस्मिन्निति व्रज: ! अर्थात जिथे गायी चरतात, फिरतात तो व्रज प्रदेश होय. याच्या आसपासच्या प्रदेशातल्या काही लोकांची आडनावे पाहिलीत तर “कुशवाहा”, “चरवाहा” म्हणजे गायींना चारणारे अशी आडनावे आहे. लालूप्रसाद किंवा रामविलास पासवान यांच्या पक्षातील लोकांची आडनावे पहा म्हणजे लक्षात येईल मित्रांनो.

कृष्ण या शब्दाचा एक अर्थ आहे. काळा किंवा सावळा. कृष्ण शब्दाचा अर्थ आहे आकर्षित करणारा. {कर्षयती किंवा {आ} कर्षणम करोति इति म्हणजे आकर्षित करणारा असा तो.} वासुदेव हे कृष्णाचे नाव आहे. वासु+देव. वास: म्हणजे एका स्थितीत रहाणे. {पहा उपवास म्हणजे उप= च्या जवळ आणि वास म्हणजे रहाणे] विश्वाच्या तिन्ही स्थितींचे नियमन करणारा देव म्हणजे वासुदेव. हा कृष्ण वसुदेव आणि देवकीचा पुत्र आहे. सामवेदात असे म्हंटले आहे की आहत आणि अनाहत नाद जिथे एकाच गतीत वाहतात या एकत्रित प्रवासाला “वासुदेव” असे म्हणतात. जीवसृष्टीला एक योग्य स्थिती प्राप्त व्हावी म्हणून जो कार्य करतो तो वासुदेव असे अथर्ववेदात सांगितले आहे. गांधर्ववेद म्हणतो की ध्वनी आणि प्रकाश यांच्या संमिलीत, एकत्रित अवस्थेला वासुदेव म्हणतात. कृष्णाचा जन्म अष्टमीला झाला तर रामाचा नवमीला. अष्टमी म्हणजे आठ हा क्षयांक म्हणजे कमी कमी होत जाणारा आकडा आहे. आणि कृष्णासारखाच फसवणारा आकडा आहे. ८ चा पाढा म्हणून बघा. ८ दुने १६ = ७, ८ त्रिक २४ = ६ …….पहा ८ पेक्षा कमी होत चालली संख्या. मायेचा आकडा आहे हा आठ. माया या आठ आकड्यासारखी फसवी असते. आठ हा कर्माचा कारक क्रमांक आहे. तर नवमी म्हणजे नऊ हा पूर्णांक आहे. आपण नऊ हा आकडा ज्यात मिळवू किंवा गुणाकार करू तितकीच त्याची बेरीज येते. म्हणजे ९ + ७ = १६ = ७, ९ + ८ = १७ = ८ …… किंवा …..९ दुणे १८ = ९, ९ त्रिक २७ = ९. नऊ हा पूर्ण ब्रह्माचा कारक आकडा आहे.

सांदिपनी हे कृष्णाचे गुरु. यांच्या आश्रमात कृष्ण ६४ दिवसात १४ विद्या आणि ६४ कला शिकला. इथे कृष्ण, सुदामा आणि इतर सर्व जातीपातींचे शिष्य एकत्रच शिक्षण घेत होते. कृष्ण हा क्षत्रिय राजाचा पुत्र म्हणून किंवा सुदामा हा ब्राह्मण म्हणून त्यांना कोणत्याही कामात सवलत किंवा सूट नव्हती. लाकडे जंगलातून तोडून लाकडाच्या मोळ्या आणण्यापासून ते शेती राखणे, गुरे चारणे, गुरु आणि गुरुपत्नी यांची सेवा करणे वगैरे ही सर्व कामे सगळ्यांना करावी लागत असत.

बलराम हा कृष्णाचा भाऊ. हल किंवा नांगर हे त्याचे शस्त्र. म्हणून त्याला हलधर सुद्धा म्हंटले जाते. हा शेषनाग होय. म्हणजे विष्णू हे चुंबकीय किंवा आकाश तत्व, ब्रह्मा [ब्रह्म नव्हे तर ब्रह्मदेव] हे विद्त्युत तत्व म्हणजे वीज किंवा वायुतत्व ……आणि या दोन नंतर “शेष” राहिलेले म्हणजे उरलेले जे तत्व आहे ते “गुरुत्वाकर्षण” हे जे तत्व आहे ते म्हणजे महेश. या बद्दल मी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहीन. मागे मी यावर पोस्ट टाकली होती. तर हे गुरुत्वाकर्षण म्हणजे हा बलराम होय.

कृष्णाचा मामा कंस. उग्रसेन राजा एकदा लढाईला गेलेला असताना एका राक्षसाने त्याची राणी पवनकुमारी हिच्या बरोबर संभोग करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ती त्याला म्हणाली की “ आपल्या संबंधातून मला होणारा पुत्र जर विश्वाचा सम्राट होणार असेल तर माझी ना नाही”. राक्षसाने होकार दिल्यावर जे व्हायचे ते झाले आणि कंसाचा जन्म झाला. हा अर्थातच राक्षसाचा पुत्र असल्याने सात्विक वृत्तीचा नव्हताच. त्यामुळे त्याने राजा उग्रसेनाला कैदेत टाकले. वसुदेव-देवकीला सुद्धा त्याला मारणारा पुत्र होणार असल्याने तुरुंगात टाकले. कंस म्हणजे मर्यादा. कंस म्हणजे विशिष्ट वृत्तीचा, तत्वाचा किंवा गोष्टीचा आधिक्य किंवा अतिरेक. कंस म्हणजे बंदिस्तपणा. कंस म्हणजे संकुचितपणा. अशा या सामर्थ्याला मर्यादा असलेल्या “कंसमामाचा” त्याच्याच भाच्याकडून म्हणजे कृष्णाकडून पराभव होऊन तो मारला गेला.

रुक्मिणी ही कृष्णाची पट्टराणी होय. म्हणजे प्रमुख राणी. सत्यभामा, जांबवंती [स्यमंतक मण्याच्या निमित्ताने कृष्णाला जांबुवंत याच्याकडून प्राप्त झालेली त्याची मुलगी. होय …..हा तोच जांबुवंत ज्याने रामेश्वर येथे श्री हनुमंत याला त्याच्या सामर्थ्याची आठवण करून देऊन तू समुद्र उल्लंघून जाऊ शकतोस असे सांगितले होते. युद्धात श्रीरामाला मदत केली होती. ], कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा. आठ हा आकडा अष्टधा प्रकृती दाखवतो. आकाश, वायू, अग्नी, जल आणि भूमी ही ५ महाभूते, मन, चित्त आणि बुद्धी ही ती अष्टधा प्रकृती होय.

नरकासुर कोण? तर “रक” म्हणजे अवस्था. “स”रक”णे म्हणजे असलेल्या या अवस्थेतून हालणे. “न”रक” म्हणजे एकाच अवस्थेत अडकून राहणे. तुंबून रहाणे. आपल्या शरीरातील १६००० नाड्या [रक्त वाहिन्या नव्हे तर हे आपल्या श्वासासारखे आपल्या शरीरातील सूक्ष्म प्रवाह मार्ग आहेत. आणि त्यांचा उगम नाभीतून होतो असे भारतीय योगशास्त्र सांगते. तर कृष्ण या अवस्थेत एक योगी आपल्या शरीरातील या १६००० नाड्या शुद्ध करतो. त्यांना घाणीच्या तुरुंगातून बाहेर काढतो.

“राधा” म्हणजे “धारा”. उपासनेची अखंड, न थांबणारी धारा म्हणजे “राधा” होय. मधल्या काळात पुराणे सांगणाऱ्या लोकांनी त्याच्या अर्थाची वाट लावून जसे कृष्णाला गोपिंमध्ये सतत रमणारा दाखवला तसेच राधेला सुद्धा कृष्णावर हल्लीच्या “पिक्चर” सारखे प्रेम करताना दाखवले. कृष्ण गोकुळातून कायमचा बाहेर पडला तेव्हा तो काहीतरी ७-८ वर्षांचा होता. आणि राधा ही लग्न झालेली एक स्त्री होती. मग त्यांचे प्रेम वैषयिक असेल का? पण विचारच करायचा नाही म्हंटले की मग सारेच संपले. मग साहजिकच हिंदू धर्म विरोधकांना बोलायला, हिंदू धर्माची चेष्टा करायला कोलीतच मिळते. जसे दत्तगुरुंच्या मातेला ब्रह्मा, विष्णू आणि महशस हे “नग्न”पणे म्हणजे “न + अग्न” अर्थात अग्नीवर न शिजवलेले अन्न वाढायला सांगतात तर त्याचा अर्थ या पुराणिकांनी किंवा भागवत कथाकारांनी पार नग्नपणे वाढायला सांगितले असा लावला. हल्ली सुद्धा जे यती, तापसी, योगी, किंवा व्रतस्थ ब्राह्मण असतात ते शिजवलेल्या अन्नाचा दोष लागतो म्हणून न शिजवलेले कोरडे अन्न ज्याला शिधा म्हणतात ते द्यायला सांगतात.

गोप म्हणजे इंद्रीयांमधील “गोप”निय योगइच्छा तर “गोपि”का” म्हणजे या गोपांना कार्य करण्याची शक्ती देणारी “योगशक्ती” बर का महाराजा. इंद्र म्हणजे आपल्याच अंगातील, शरीरातील, इंद्रीयांतील लपून बसलेली वासना. आणि हाच तो “इंद्र” वेद आणि पुराणात लैंगिक किंवा इतर अनेक प्रकारचे गोंधळ घालताना दाखवला आहे. वेदात आणि पुराणात एकच शब्द अनेक अर्थांनी किंवा अनेक शब्द एकाच अर्थाने वापरलेले आहेत.

“मुरली” म्हणजे आपल्या अंतरात जी खोल “मुरलेली” असलेली ईशशक्ती आहे ती शरीराद्वारे प्रकट करणे होय. आपल्या शरीराला नवी छिद्रे असतात. या नवछिद्रांची बासरी, किंवा वेणू, किंवा पावा किंवा मुरली हा कृष्ण अवस्थेतला योगी वाजवत असतो. कोणती असतात ही छिद्रे? दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, मुख, गुदद्वार, आणि डोक्याचे ब्रह्मरंध्र [पाठभेद- इथे काहीजण शरीराच्या त्वचेवरील छिद्रे हा नववा पाठभेद म्हणून मानतात] ही नऊ रंध्रे किंवा छिद्रे या बासरीची छिद्रे आहेत. बांसरी म्हणजे बांसुरी आहे. म्हणजे बांस [वंश म्हणजे बांबू या शब्दावरून बांस हा हिंदी शब्द आला आहे. ] म्हणजे वेळू किंवा बांबूच्या नळीतून निघालेले किंवा काढले जाणारे सूर किंवा जी यातून सूर बाहेर काढते ती ……ती पोकळ असते. तिला प्राण म्हणजे वायू आपण फुंकावा लागतो.

कृष्ण हा द्वापार युगाचे प्रतिक आहे. द्वापार युगात वासना वाढली होती. आणि ती याच्यापुढे कलियुगात वाढतच जाणार होती. म्हणून कृष्ण हा पायावर पाय दुमडून बासरी वाजवत उभा असताना दाखवला जातो. म्हणजे लोकांनी वासनेवर संयम ठेवावा. सावळा विठ्ठल म्हणजे कृष्णच होय. या विठ्ठलाच्या रुपात शिव आणि विष्णू या देवतांचे एकत्रीकरण केलेले आहे.

सुदर्शन चक्र हे कृष्णाचे शस्त्र होते. सुदर्शन म्हणजे सु- चांगले + दर्शन = चांगले दर्शन. सव्य म्हणजे क्लोकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने डावीकडून उजवीकडे या प्रदक्षिण चक्राकार गतीमुळे हे विश्व निर्माण होते. ही गती अपसव्य म्हणजे उलट झाली तर हे विश्व नष्ट होते. चक्र हा शब्द चृ: म्हणजे हालचाल करणे आणि कृ: म्हणजे करणे या दोन शब्दांपासून बनलेला आहे. म्हणजेच चक्र हे हालचाल करते. हे एकच शस्त्र असे आहे की ते सतत गतिमान रहाते. स्थिर रहात नाही. सुदर्शन चक्र कृष्णाच्या करंगळीवर आणि विष्णूच्या तर्जनीवर असते. पण ते फेकायचे असेल तर मात्र कृष्ण सुद्धा ते तर्जनीने म्हणजे पहिल्या बोटाने फेकत असे. Bumrang हे उलटते आणि परत येते तसे पण सुदर्शन चक्र सुरक्षितपणे शत्रूचा नाश करून फेकणाऱ्या व्यक्तीकडे परत येते. फेकणाऱ्या व्यक्तीचा हे चक्र फेकल्यावर सुद्धा पूर्ण ताबा किंवा नियंत्रण असते. यमुना किंवा शून्य मार्गातून ते जात असल्याने जसे आपल्या शरीरातील मज्जातंतूंनी पाठवलेल्या संदेशांना अजिबात वेळ लागत नाही तसा चक्राला कुठेही जायला वेळ लागत नाही. याचा आवाज तर होतच नाही पण याला अडथळा आला तर या चक्राची गती वाढते. याला ह्रंस गती असेही म्हणतात.

घोडा आणि कृष्ण हे दोनच पूर्णपुरुष म्हणवले जातात. त्याचे “एक कारण” म्हणजे या दोघांनाही स्तनाग्रे नसतात.

कृष्णाची भक्ती ही अत्यंत अवघड आहे. राधा आणि मीराची भक्ती बघा. या दोघींना खूप खूप त्रास सहन करावा लागला. मीरेला तर विष प्यावे लागले. कारण निळा रंग हा अत्यंत मारक रंग आहे. निळ्या रंगाचा जास्त वापर झाल्यास मनावर मालिन्य येते. दारिद्र्य येते. मन आक्रसते. आळस येऊ लागतो. उत्साह संपतो. म्हणून आपल्या पूजेत लाल, पांढरा, पिवळा आणि हिरवा हेच रंग प्राचुर्याने किंवा जास्त प्रमाणात असतात. हे रंग सौभाग्य, आनंद, संपत्ती हे सारे काही देणारे आहेत. पिवळा रंग हा शाळेत वर्गात भिंतीला लावल्याने मुलांचे अभ्यासात मन लागते. वस्तू हलकी वाटते. म्हणून मोठमोठे JCB, रोड रोलर्स यांना पिवळा रंग लावलेला असतो. नाहीतर त्यांच्या वजनाने ते आपल्याला बघणे सुद्धा सहन झाले नसते. पिवळा रंग हा धन, संपत्ती देणारा रंग आहे. याचे अधिक्य झाले तर उष्णता, पित्त वाढते. लाल रंग हा उत्साह देतो पण जास्त झाला तर डोकेदुखी, राग, संताप येणे, भीती वाटते हे त्रास होतात. [ राग आणि भीती या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. राग आला की असे काही कृत्य घडते की नंतर भीती वाटावी असे होते आणि जास्त काळ भीती वाटली की नंतर संताप येतो. ]. हिरवा रंग हा सर्व रोग नष्ट करणारा आहे. सर्व सुखे देणारा आहे. हिरव्या रंगाची वेव्हलेंग्थ ही लाल आणि निळ्या या रंगांच्या दोन टोकांमधील अगदी मधोमध असलेली वेव्हलेंग्थ आहे. पण अतिरेक झाला तर शिथिलता येते. पांढरा रंग हा स्वच्छतेचा कारक रंग आहे. त्याचा अतिरेक झाला तर आपण काहीतरी लपवतो आहोत, आपल्यावर डाग आहे हे तो दाखवतो. पुढारी बघा ………

आज पासून साधारणपणे ५१३० वर्षांपूर्वी कृष्णाने एका पारध्याचा बाण अंगठ्याला लागण्याचे निमित्त करून देह सोडला. महाभारताच्या वेळेस कृष्णाचे वय साधारणपणे ८३-८४ वर्षे होते तर भीष्माचार्य हे १२५ ते १३० वर्षांचे होते. अर्जुनाचे वय सुद्धा कृष्णाच्या वयाच्या आसपासचे होते. रामायण साधारणपणे साडेसात हजार ते दहा वर्षांपूर्वी झालेले आहे. वेद त्याच्याही खूप आधीचे आहेत ……….

आपण करत असलेली उपासना वाईट गोष्टींचा नाश व्हावा म्हणून वापरली जावी असे वाटत असेल तर उपासना संपल्यावर “श्रीकृष्णार्पणमस्तु” असे म्हणावे. जर आपली उपासना सकारात्मक, विधायक कार्यात वापरली जावी अशी इच्छा असेल तर “श्रीब्रह्मार्पणमस्तु” असे म्हणावे.

!! श्रीब्रह्मार्पणमस्तु !!
इति लेखनसीमा

हे गाणे माझे ………….

माझ्या आईचे नाव सुनीता तर कृष्ण सखा उद्धव याचे नाव माझ्या वडिलांना म्हणजे नानांना ठेवले गेले होते. सुनीत हा एक छंद आहे.

रास खेळण्यास जाऊ, कृष्णाच्या घरी,
टिपऱ्या घेऊ संगे, कन्हैयाची बासरी !! धृ !!

वाळा घुंगुराचा त्याच्या पायी वाजतो,
चोरुनी दही, हरी, तो दूर धावतो,
नंद यशोदेस सांगू, कुंभ भंगतो,
या सयांनो शोधू या, मुकुंद मुरारी !! १ !! टिपऱ्या घेऊ संगे कन्हैयाची बासरी …….

भरजरी पोशाख, मुक्ताहार घातला,
गोकुळाचा ईश, नारायण शोभला,
चक्रधारीचा मनास ध्यास लागला,
मोरपीस लावू त्याच्या, जाउनी शिरी !! २ !! टिपऱ्या घेऊ संगे कन्हैयाची बासरी…….

राक्षसांस तो क्षणात धूळ चारितो,
संकटांचे जे प्रसंग, त्यांस वारितो,
चिंता, क्लेश, दैन्य, दु:ख, दूर सारितो,
हात गोविंदाचा घेऊ आपल्या करी !! ३ !! टिपऱ्या घेऊ संगे कन्हैयाची बासरी…….

कोणी म्हणती दामोदर, विष्णू माधवा,
पुरुषोत्तम, अधोक्षज, आणि केशवा,
अच्युता रे, वामना रे, पद्मनाभ वा,
गोड नाम, छान रूप, बिंबले उरी !! ४ !! टिपऱ्या घेऊ संगे कन्हैयाची बासरी…….

झाला नरसिंह, वासुदेव तोच हा,
संकर्षण, त्रिविक्रम, भासतो अहा,
जनार्दन हृदयी मधुसूदना पहा,
हृषिकेश, संकर्षण, प्रद्युम्न तरी !! ५ !! टिपऱ्या घेऊ संगे कन्हैयाची बासरी…….

जो उपेंद्र, अनिरुद्ध, तोच जाहला,
वसुदेव देवकीच्या पोटी जन्मला,
अश्विनाचा मास, कृष्ण मधुर हासला,
वेणुनाद आला कानी, भरली शिरशिरी !! ६ !! टिपऱ्या घेऊ संगे कन्हैयाची बासरी…….

कंस मारिला जयाने, कालयवन ही,
शिशुपाल, अघबक ते, कालिया अहि,
सखा पांडवांचा कौरवात रे दुही,
शिकवे गीतासार, भरला जो चराचरी !! ७ !! टिपऱ्या घेऊ संगे कन्हैयाची बासरी…….

ग्रीष्म, वर्षा, शरद ऋतू, शिशिर उद्धवा,
“हेमंतास” वसंतास, कृष्णची हवा,
“सुनीतात” गाऊ राग यमन, मारवा,
राम तोच, माया ब्रह्म, गोपी अंतरी !! ८ !! टिपऱ्या घेऊ संगे कन्हैयाची बासरी…….

वंद्य देवतांस, तरी पुजतो गुरु,
मित्र सुदाम्याचा, त्याची संगती धरू,
सागरात या भवाच्या, सहजची तरू,
“कला”दास झाली विद्या वर्षती सरी !! ९ !! टिपऱ्या घेऊ संगे कन्हैयाची बासरी…….

आपला मित्र,

Dr. “हेमंत” सहस्रबुद्धे उर्फ कलादास…
************************************

६. नवी भर दि. ११-०८-२०२०

Krishna S Kale

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

७. कवीवर्य कुसुमाग्रजांच्या या प्रसिद्ध कवितेत कृष्णाच्या नावाचा उल्लेखही नाही, पण सगळे दाखले कृष्णाच्याच जीवनातले दिले आहेत.

premkunavarkaravasmall

🙏🏻💐💐 💐💐

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s