भावपूर्ण श्रद्धांजलि
बारा वर्षांपूर्वी मी चाचपडतच मनोगतवर प्रवेश केला होता. तेंव्हा तिथे छोटा डॉन, पिवळा डँबिस. ३.१४विक्षिप्त अशांसारखी दादा मंडळी होती आणि त्यांच्याबरोबर एक विसोबा खेचर होता. त्याचे कधी अत्यंत खुसखुशित तर कधी सडेतोड किंवा घणाघाती लिखाण मला खूप आवडायचे. संगीतावर लिहितांना तो खूप समरस होऊन त्यातले बारकावे समजाऊनही सांगत असे. मनोगतवर त्याचा रोजचा वावर होता आणि निरनिराळ्या लोकांनी टाकलेल्या पोस्टांवरसुद्धा तो तुफान फटकेबाजी करत असे, कुणाची टोपी उडव, कुणाच्या पंच्याला हात घाल वगैरे त्याचे उपक्रम सगळेजण मोकळेपणाने घेत असत कारण त्यात निखळ विनोद असायचा, कुजकटपणा किंवा द्वेश नसायचा. थोड्याच अवधीत मी त्याचा फॅन झालो होतो.
त्याच्या पुढाकारतूनच एकदा मनोगतचा कट्टा जमवायचे ठरले. ही मंडळी आहेत तरी कोण याची मला उत्सुकता असल्याने मीही त्याला हजेरी लावली. ठाण्यातल्या एका प्रशस्त घरात आम्ही २०-२२ जण जमलो होतो. तिथे मला कळले की या अवलियाचे खरे नाव तात्या अभ्यंकर असे आहे. आमच्या वयात २०-२५ वर्षांचा फरक असला तरी आमचे बरे सूत जमले. तो तर त्या कट्ट्याचा संयोजक, सूत्रसंचालक आणि प्रमुख पाहुणा वगैरे सबकुछ होता. त्याने आपल्या बोलण्यामधून सर्वांना हसत खेळत ठेवलेच, थोडा बिहाग राग ही गाऊन दाखवला. तो कट्टा म्हणजे माझ्यासाठी एक विलक्षण आणि संस्मरणीय अनुभव होता.
तात्याचे बिंधास वागणे किंवा अनिर्बंध लेखन कदाचित मनोगतमधल्या काही विद्वानांना मानवले नसेल. तात्याने मिसळपाव हे नवे संकेतस्थळ काढले आणि हे ‘हॉटेल’ उत्तम चालवले. फेसबुकवर शिळोप्याची ओसरी काढली आणि तीही छान चालवली. माझी जुनी ओळख लक्षात ठेऊन त्याने दोन्ही ठिकाणी मला निमंत्रण दिले. वॉट्सॅप आल्यानंतर वाढलेल्या माझ्या इतर व्यापांमुळे मी अलीकडे तिकडे फारसा जाऊ शकत नाही. तात्यासुद्धा काही वेळा कित्येक दिवस अदृष्य होत असे. त्यामुळे अलीकडल्या काळात माझी त्याच्याशी आंतर्जालावर गाठ पडली नव्हती आणि आज अचानक त्याच्या अकाली निधनाची धक्कादायक बातमी आली. ईश्वर त्याच्या आत्म्याला सद्गति देवो अशी प्रार्थना.
—-
तात्याच्या या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. शिळोप्याची ओसरी या स्थळावर शोकसंदेशांचा पूर आला. त्यातले तात्याच्या जीवनावर आणि लेखनावर प्रकाश टाकणारे काही संदेश या ठिकाणी संकलित केले आहेत.
त्याच्या आधी तात्याच्या स्वतःच्या लेखनाची किंचित चुणुक दाखवणारे दोन लहानसे लेख / संदेश दिले आहेत.
स्मृती ठेउनी जाती – भाग १६ – तात्या अभ्यंकर http://anandghan.blogspot.com/2019/05/blog-post_17.html
नवी भर दि.०९-०५-२०२२ : स्व.तात्या अभ्यंकर यांनी लिहिलेला एक लेख मला वॉट्सॅपवर मिळाला तो खाली देत आहे.
एक खूप वेगळा लेख…..थेट हृदयाला पीळ पाडणारा !
माझी कामाठीपुर्यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक..! –
कै. तात्या अभ्यंकर
१९९१-९२चा सुमार. मी तेव्हा नौकरी करत होतो.. फोरासरोडवरील झमझम नावाच्या सरकारमान्य देशी दारूच्या बारमध्ये..क्यॅशियर कम म्यॅनेजर होतो मी..आजूबाजूला सारी वेश्यावस्ती, दारुवाले, मटकेवाले, पोलिस, गुंड.. यांचंच सारं राज्य.. आयुष्यात एके से एक अनुभव आले त्या दुनियेत. कधी सुखावणारे, कधी दुखावणारे, कधी विचार करायला लावणारे, काही चित्र, काही विचित्र, काही नैसर्गिक, काही अनैसर्गिक..अस्वस्थ करणारे..आजूबाजूला अनेक प्रसंग रोजच्या रोज घडत होते.. स्वाभाविक, अस्वाभाविक..पण प्रत्येक प्रसंग एक अनुभव देऊन गेला..
बारमध्ये असंख्य प्रकारची माणसं येत.. रोजचे नियमित-अनियमित बेवडे हजेरी लावायचेच.. त्याशिवाय रोज एखादी ‘काय अभ्यंकर, सगळं ठीक ना? काय लफडा नाय ना?” असं विचारणारी नागपाडा पोलिस स्टेशनच्या कदम हवालदाराची किंवा त्याच्या सायबाची फेरी.. मग कुठे बरणी उघडून फुकट चकली खा, चा पी असं चालायचं.. कधी हलकट मन्सूर किंवा अल्लाजान वेश्यांकरता भूर्जी, आम्लेट, मटन सुका, खिमपाव असं काहीबाही पार्सल न्यायला यायचे.. कधी अफूबाज, चरसी डब्बल ढक्कन यायचा.. कधी बोलबोलता सहज सुरा-वस्तरा चालवणारे हसनभाय, ठाकूरशेठ सारखे गुंड चक्कर काटून जायचे.. “क्यो बे तात्या, गांडू आज गल्ला भोत जमा हो गया है तेरा.. साला आजकल बंबैकी पब्लिकभी भोत बेवडा हो गएली है..साला, एक हज्जार रुप्या उधार दे ना.” असं म्हणून मला दमात घ्यायचे..
कधी त्या वस्तीत धंदा करणारे हिजडे यायचे.. उगीच कुठे ठंडा, किंवा अंडापाव, असंच काहीबाही पर्सल न्यायला यायचे.. ‘ए तात्या… म्येरा पार्सल द्येव ना जल्दि.. कितना मोटा है तू..’ अश्या काहितरी कॉमेन्टस करत माझ्या गल्ल्याशी घुटमळत.. मी त्रासाने हाकलून द्यायला लागलो की काडकन टाळी वाजवून ‘सौ किलो..!’ असं मला मिश्किलपणे चिडवायचे! अक्षरश: नाना प्रकरची मंडळी यायची त्या झमझम बारमध्ये आणि केन्द्रस्थानी तात्या अभ्यंकर!
गणपतीचे दिवस होते.. रस्ता क्रॉस केल्यावर आमच्या बारच्या समोरच्याच कामाठीपुर्यातल्या कोणत्याश्या (११ व्या की १२ व्या? गल्ली नंबर आता आठवत नाही..) गल्लीत हिजड्यांचाही गणपती बसायचा. हो, हिजड्यांचा गणपती! वाचकांपैकी बर्याच वाचकांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल. परंतु मुंबैच्या कामाठीपुर्यात अगदी हिजड्यांचाही गणपती बसतो.. साग्रसंगीत त्याची पूजा केली जाते.. कामाठीपुर्यात काही तेलुगू, मल्लू भाषा बोलणारे, तर काही उत्तरप्रदेशी हिजडे आहेत ते दरसाल गणपती बसवतात.. बरेचसे मुस्लिम हिजडेही त्यात आवर्जून सहभाग घेतात..
झमझम बारचा म्यॅनेजर म्हणून मला आणि आमच्या बारच्या सार्या नौकर मंडळींना त्या हिजड्यांचं सन्मानपूर्वक बोलावणं असायचं.. ‘तात्यासेठ, गनेशजीको बिठाया है.. ‘दरसन देखने आनेका.. खाना खाने आनेका..’ असं आग्रहाचं बोलावणं असायचं..! अल्लाजान मला घेऊन जायचा त्या गणेशोत्सवात..
संध्याकाळचे सात वाजले असतील.. मी गल्ल्यावर होतो..पूजाबत्ती करत होतो. तेवढ्यात अल्लाजान मला बोलवायला आला.. “गनेशके दरसन को चलनेका ना तात्यासेठ?”
मी दिवाबत्ती केली.. अर्जून वेटरला गल्ल्याकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि हिजड्यांच्या गणपतीच्या दर्शनाला अल्लाजानसोबत निघालो. कामाठीपुर्याच्या त्या गल्लीत गेलो.. खास दक्षिणेकडची वाटावी अशी गणेशमूर्ती होती.. नानाविध फुलं, मिठाई, फळफळावळ, थोडे भडक परंतु सुंदर डेकोरेशन केलेला हिजड्यांचा नानाविध अलंकारांनी नटलेला ‘अय्यप्पा-गणेश’ स्थानापन्न झाला होता.. एका म्हातार्या, स्थूल व टक्कल पडलेल्या हिजड्यानं माझं स्वागत केलं.. तो त्यांचा म्होरक्या होता. बसायला खुर्ची दिली.. झमझम बारचा म्यॅनेजर तात्याशेठ! म्हणून मोठ्या ऐटीत माझी उठबस त्या मंडळींनी केली.. अगदी अगत्याने, आपुलकीने..!
हिजड्यांबद्दल काय काय समज असतात आपले? परंतु ती देखील तुमच्याआमच्यासारखी माणसंच असतात.. आपल्यासारख्याच भावभावना, आवडीनिवडी, रागलोभ असतात त्यांचे.. ते हिजडे कोण, कुठले, या चर्चेत मला शिरायचं नाही. ते धंदा करतात एवढं मला माहित्ये. चक्क शरीरविक्रयाचा धंदा.. पोटाची खळगी भरणे हा मुख्य उद्देश. आणि असतातच की त्यांच्याकडेही जाणारी आणि आपली वासना शांत करणारी गिहाईकं! कोण चूक, कोण बरोबर हे ठरवणारे आपण कोण?
मला सांगा – एखाद्या सिने कलाकाराने म्हणा, किंवा अन्य कुणा सेलिब्रिटीने म्हणा, दगडूशेठला किंवा लालबागच्या राजाला भेट दिल्यानंतर त्याचं होणारं आगतस्वागत आणि कामाठीपुर्यातल्या हिजड्यांच्या गणेशोत्सवाला तिथल्याच एका देशीदारूच्या बारच्या तात्या अभ्यंकराने भेट दिल्यावर हिजड्यांनी त्याच आपुलकीनं त्याचं केलेलं आगतस्वागत, यात डावंउजवं कसं ठरवायचं?
लौकरच एक अतिशय स्वच्छ प्लेट आली माझ्या पुढ्यात. वेफर्स, उतम मिठाई, केळी, चिकू, सफरचंद इत्यादी फळांच्या कापलेल्या फोडी, दोनचार उत्तम मावा-बर्फी, काजुकतलीचे तुकडे..!
तो म्हातारा हिजडा मोठ्या आपुलकीनं आणि प्रेमानं मला म्हणाला..
“मालिक, थोडा नाष्टा करो..”
“बादमे तुम्हे हमारा गणेशका पूजा करना है. और बादमे खाना भी खानेका..!”
बापरे..! ‘मला यांच्या गणपतीची पुजा करायच्ये?’ मला काही खुलासा होईना.. ‘बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं..’ अस ठरवून मी समोरच्या बर्फीचा एक तुकडा तोंडात टाकला.. सुरेखच होती बर्फी.. अगदी ताजी!
समोरच्या डिशमधलं थोडंफार खाल्लं मी. जरा वेळ तसाच तिथे बसून राहिलो. ‘आता दर्शन घ्यायचं आणि निघायचं’ असा मनाशी विचार केला आणि उठलो.. तोच तो मगासचा टकल्या हिजडा आणि इतर दोघेचौघे हिजडे पुढे सरसावले. त्यापैकी एकाच्या हातात मोठासा स्वच्छ नॅपकीन!
“आओ तात्यासेठ, अब न्हानेका और पूजा करनेका..!”
न्हानेका और पूजा करनेका? मला काहीच समजेना. अल्लाजान होताच माझ्यासोबत. तो त्यांच्यातलाच.. त्याच्याशी बोलताना मला कळलं की आज मी त्यांचा पेश्शल पाहुणा आहे आणि मला पूजा करायच्ये किंवा सांगायच्ये!
ही कुठली पद्धत? कुणाला विचारून? मला क्षणभर काय करावं ते कळेचना! ‘सगळं झुगारून निघून जावं का इथून?’ हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. पण माझ्या आजुबाजूला जमलेल्या, माझी इज्जत करणार्या त्या हिजड्यांच्या चेहर्यावर मला खूप आनंद दिसत होता, उत्साह दिसत होता..
‘देखे क्या होता है.. जो भी होगा, देख लेंगे..’ या माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार मी ती मंडळी म्हणतील ते करायचं ठरवलं. अधिक माहिती विचारता अल्लाजानकडून मला असं समजलं की मी एक पांढरपेशा उच्चभ्रू आहे असा त्यांचा समज आहे आणि माझ्या हातून आज त्यांच्या गणपतीची पूजा व्हावी अशी त्या मंडळातल्या हिजड्यांची इच्छा आहे आणि तशी पद्धतही आहे..!
साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू?!
त्या गल्लीच्या मागल्या बाजूसच एका चाळवजा इमारतीत वेश्यायवसाय चालतो.. मला त्या लहानश्या खुराड्यातील तेवढ्याच लहानश्या मोरीवजा बाथरुमात नेण्यात आले.. त्या घरची मावशी अन् आजूबाजूच्या वेश्या यांनी मला वाट करून दिली.. एरवी बाराही महिने फक्त पोटातल्या भुकेच्या डोंबाचा अन् पर्यायाने केवळ वासनेचाच वावर असणार त्या खोलीत.. परंतु त्या दिवशी मला तसं काही जाणवलं नाही.. सण-उत्सवाचा, गणपतीच्या वातावरणाचा परिणाम? भोवती त्या वेश्यांची दोन-चार कच्चीबच्ची घुटमळत होती. कुणाच्या हातात गणपतीच्या पुढ्यातलं केळं तर कुणाच्या हाताता आराशीमधली चुकून सुटलेली रंगेबेरेंगी नकली फुलांची माळ, कुणाच्या हातात साखरफुटाणे तर कुणाच्या हातात कुठुनशी आलेली एखादी झांज! मला क्षणभर अभिमान वाटला तो माझ्या उत्साही व उत्सवप्रिय मुंबापुरीचा! काय काय दडवते ही नगरी आपल्या पोटात!
सोबत तो टकला हिजडा होता. त्यानं माझ्या हातात एक नवीन साबणाची वडी आणि स्वच्छ टॉवेल ठेवला..
मी स्नान करून, टॉवेल नेसून बाहेर आलो.. आसपासच्या वेश्यांचं तोंड चुकवून अंगात शर्टप्यान्ट चढवली.. त्या टकल्या हिजड्याचं मात्र मला खरंच खूप कौतुक वाटत होतं.. तो मोरीच्या बाहेरच थांबला होता.. ‘हा आज आपला पाहुणा आहे आणि याला काय हवं नको ते आपण पाहिलं पाहिजे.’ एवढी एकच तळमळ दिसत होती त्याच्या चेहर्यावर..! उच्चभ्रू समजातल्या सो कॉल्ड हॉस्पिटॅलिटीचा त्यानं कोणताही कोर्स केलेला नव्हता..!
तेवढ्या पाच मिनिटात त्या मावशीने चा करून माझ्या पुढ्यात कप धरला.. कोण ही मावशी? ८-१० वेश्यांचं खुराड सांभाळणारी.. तिनं मी अंघोळीहून येईस्तोवर माझ्याकरता चा देखील टाकाला?!
कपडे घातल्यावर त्या टकल्यानं ते अय्यप्पाचं पवित्र मानलं गेलेलं कुठलंसं वस्त्र उपरण्यासारखं माझ्या खांद्यावर घातलं.. आम्ही त्या खोलीतून बाहेर गणपतीपाशी आलो आणि मी मुख्य गाभार्यात शिरलो..
“तात्यासेठ, ये लक्ष्मी है.. इसको बोलो पूजा कैसे करनेका, क्या करनेका..!”
त्यांच्यातला एक लक्ष्मी नावाचा एक तरूण रूपवान हिजडा छानशी साडीबिडी नेसून तिथंच पूजा करायला म्हणून उभा होता.. माझं सहजच समोरच्या तयारीकडे लक्ष गेलं.. फुलं, अक्षता, अष्टगंध, समया, उदबत्त्या.. सगळी तयारी अगदी अपटूडेट होती.. ते सगळं पाहिल्यावर मी स्वत:ला विसरलो.. आपण एक सुशिक्षित सुसंस्कृत पांढरपेशे आहोत आणि मुंबैच्या कामाठीपुर्यात उभे आहोत ही गोष्ट मी विसरून गेलो. माझं मन एकदम प्रसन्न झालं..
सुसंस्कृत, सुसंस्कृत म्हणजे तरी काय हो? नस्ता एक बोजड शब्द आहे झा़लं.. त्या क्षणी माझ्या आजुबाजूचे ते सारे हिजडे सुसंस्कुत नव्हते काय?!
“प्रारंभी विनती करू गणपती..”
दशग्रंथी तात्या अभ्यंकराने पूजा सांगायला सुरवात केली.. तशी त्या पार्थिवाची प्राणप्रतिष्ठा वगैरे पहिल्या दिवशीच झाली असणार.. मी सांगत होतो ती केवळ संध्याकाळची धूपार्ती!
‘प्रणम्य शिरसा देवं’, ‘शांताकारं भुजगशयनं.’, गणपती अथर्वशीर्ष…’ च्यामारी येत होते नव्हते ते सारे श्लोक तिथे बिनधास्तपणे आणि मोकळ्या मनाने म्हटले! अगदी गेला बाजार शिवमहिन्म स्तोत्रातल्याही सताठ ओळी मला येत होत्या त्याही म्हटल्या –
महिन्मपारंते परमविदुषो यद्यसदृषि
स्तुतिर्ब्रह्मादिनाम् अपितदवसंनास्त्वयिगिरा:
अथावाच्य..
आता आठवत नाही पुढलं काही.. पण कधी काळी ल्हानपणी मामांकडून शिवमहिन्माची संथा घेतली होती ती आता कामी येत होती. आपल्याला काय हो, शंकर तर शंकर.. तो तर बाप्पाचा बापुसच की!
ओल्या बोंबलाच्या कालवणाने चलबिचल होणारा मी, अगदी पूर्णपणे एका भिक्षुकाच्या भूमिकेत शिरलो होतो… सहीसही ती भूमिका वठवत होतो.. ‘काय साला विद्वान दशग्रंथी ब्राह्मण आज आपल्याला लाभला आहे!’ असे भाबडे कृतज्ञतेचे भाव आजुबाजूच्या हिजड्यांच्या चेहर्यावर मला दिसत होते.. त्यांचा तो म्होरक्या टकला हिजडा तर अक्षरश: कृतकृत्य होऊन रडायचाच बाकी होता.. श्रद्धा, श्रद्धा म्हणजे दुसरं तरी काय असतं हो?!
‘गंधाक्षतपुष्पं समर्पयमि..’ असं म्हणून लक्ष्मीला गंध, अक्षता व फुलं वाहायला सांगितलं..
“अबे भोसडीके उस्मान गांडू.. वो फुल उधर नजदिक रख ना..!”
फुलाचं तबक थोडं दूर होतं ते रागारागाने एका हिजड्याने कुणा उस्मानला नीट गणपतीच्या जवळ ठेवायला सांगितलं..!
गणेशपुजन सुरू असतांनाच, “अबे भोसडीके उस्मान गांडू”?
पावित्र्याच्या अन् शुचिर्भूततेच्या व्याख्या प्रत्येकाच्या, किंबहुना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात..!
“धूपं समर्पयामि, दीपं सर्पमर्पयामि..” दशग्रंथी अभ्यंकर सुरूच होते! आणि माझ्या सूचनांनुसार लक्ष्मी सगळं काही अगदी यथासांग, मनोभावे करत होती..की होता?!
सरते शेवटी पूजा आटपली, आरती झाली.. मला पुन्हा एकदा आतल्या एका खोलीत नेण्यात आलं.. त्या मंडळातले सारे कमिटी हिजडे अगदी कृतकृत्य होऊन माझ्याभोवती जमले होते..
‘अब मुझे जाना होगा..देर हो गई है..’ असं मी म्हटल्यावर थोडं तरी काही खाऊन गेलंच पाहिजे असा मला त्या टकल्यासकट इतर हिजड्यांनी आग्रह केला.. पाचच मिनिटात कुणीतरी गरमागरम पुर्या, छोले, गाजरहलवा असा मेनू असलेलं ताट माझ्या पुढ्यात घेऊन आला..
अखेर दशग्रंथी विद्वान तात्या अभ्यंकर अल्लाजनसोबत तेथून निघाले.. एक वेगळाच अनुभव घेतला होता मी.. गणपतीकडे त्या यजमान हिजड्यांकरता काय मागणार होतो मी? ‘यांचा शरीरविक्रयाचा धंदा चांगला होऊ दे’ – हे मागणार होतो? आणि मुळात त्यांच्याकरता देवाकडे काही मागणारा मी कोण? माझीच झोळी दुबळी होती.. त्यांच्या झोळीत माप टाकायला गणपती समर्थ होता..!
निघण्यापूर्वी त्या टकल्या हिजड्यानं माझ्या हातात एक पाकिट आणि हातात एक पिशवी ठेवली आणि मला नमस्कार करू लागला.. वास्तविक मलाच त्याच्या पाया पडावसं वाटत होतं..वयानं खूप मोठा होता तो माझ्यापेक्षा…!
तेथून निघालो. पाकिटात शंभराची एक कोरी नोट होती.. सोबत ही पिशवी कसली?
‘आमच्याकडे जाताना भिक्षुकाला शिधा द्यायची पद्धत आहे..’ अल्लाजानने माहिती पुरवली..
मी पिशवी उघडून पाहिली तो आतमध्ये एका पुढीत थोडे तांदूळ, दुसर्या पुडीत थोडी तूरडाळ..आणि दोनचार कांदेबटाटे होते.. डाळ-तांदुळाचा तो शिधा पाहून मला क्षणभर हसूच आलं..
‘अरे हे काय? डाळ-तांदुळाचा शिधा?’ मी अलाजानला विचारलं..
“डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!”
अल्लाजानच्या तोंडून सहजच निघालेलं ते वाक्य बी ए, एम ए, पीएचडी… सार्या विद्यांना व्यापून त्यांच्या पल्याड जाणारं होतं, गेलं होतं.. !
मला आजही त्या शिध्यातले डाळतांदूळ पुरत आहेत..!
– तात्या अभ्यंकर.
***************************************************
Chandrashekhar Abhyankar
Admin · February 24, 2016
सर्व नवीन सभासदांना सूचनावजा नम्र विनंती —
इथे कृपया राजकीय स्वरूपाच्या आणि मन विषण्ण करणा-या सामाजिक स्वरूपाच्या पोस्ट नकोत..
फक्त साहित्य, संस्कृती, कला, प्रवासवर्णन, शिल्प, फोटोग्राफी, नृत्य, नाटक, संगीत, चित्रपट, ललित लेखन, कविता, गजल, चारोळी.. इत्यादी विषयावर कृपया इथे लिहा..
whats app किंवा इतर forwards, copy/paste देखील इथे चालणार नाहीत..इथे फक्त तुमचे स्वत:चे लेखन करा..
धन्यवाद..
— (समूह प्रशासक) तात्या..
…
Chandrashekhar Abhyankar
Admin · August 14, 2017
रामायण-महाभारत वर्षानुवर्ष आहे आणि पुढील हजारो वर्ष राहील.. असे लाखो तात्या येतील आणि जातील..त्यामुळे तात्या काय लिहितो याला शाटाइतकंही महत्व नाही..
तरीदेखील य:कश्चित तात्याच्या लेखनामुळे इतकं हळवं होऊन त्याला व्यक्तिगतरित्या झोडायची का गरज भासते हे समजत नाही..
माझं काय करायचं, मला सुबुद्धी द्यायची की दुर्बुद्धी द्यायची की खोल दरीत लोटून द्यायचं हे किसन्याला ठरवू दे की! तो समर्थ आहे..
सबब, इतकं हळवं असू नये.. श्रद्धा या चट्टान की तरह भक्कम असाव्यात..तात्याच्या चार ओळीने त्या इतक्याही हलता कामा नयेत की तात्याला व्यक्तिगतरित्या झोडायची वेळ यावी! हा हा 🙂
असो..
बरं आता एक छान पोस्ट..तुम्हा सगळ्यांना आवडेल अशी आशा करतो..
———————————————
एकदा एका गावात एक गरीब बाई आणि तिचा सात-आठ वर्षाचा मुलगा असे राहत असतात. आई दिवसभर भंगार वेचायला जायची आणि मुलगा दिवसभर थोडी दूर असलेल्या शाळेत जायचा.. संध्याकाळी दोघं भेटायचे..
एके दिवशी मुलगा आईला म्हणतो, “आई मी उद्यापासून शाळेत जाणार नाही. वाटेत तो जरा वेळ जंगलाचा रस्ता लागतो ना, तेव्हा मला भीती वाटते..”
त्यावर आई म्हणते..”अरे एवढंच ना? उद्या शाळेत जाताना जंगलाचा रस्ता सुरू झाला की फक्त ‘मामा..’ अशी हाक मार. लगेच तुझा मामा येईल आणि तुला सोबत करेल..”
दुस-या दिवशी नेहमीप्रमाणे आई भंगार वेचायला बाहेर पडते आणि मुलगा शाळेत जायला निघतो. संध्याकाळी दोघे भेटतात..
आई विचारते, “काय रे? आज पण भीती वाटली का? मामाला हाक मारलीस? मामा आला होता का?”
मुलगा खुश होऊन म्हणतो, ” हो भीती वाटली म्हणून मी ‘मामा..’ अशी हाक मारली तर लगेच मामा आला आणि त्याने मला सोबत केली, खाऊही दिला..
आई, खरंच खूप छान आहे गं मामा.. हातात बासरी, डोक्याला छान मोरपीस!”
———————————————
श्रद्धा अशा त्या गरीब बाईसारख्या भक्कम असाव्यात. की मी नाही, माझ्या मुलाने जरी तुला हाक मारली तरी तुला आलं पाहिजे..!
तेव्हा तात्या काय लिहितो याला महत्व नाही. तुमच्या श्रद्धा ठाम हव्यात..
खुळे कुठले!
ह्या ह्या..
तात्या अभ्यंकर. 🙂
——————————————
Sonali Mukherjee (तात्यांची नातेवाईक)
मी ऑस्ट्रेलियालाच आहे. फोन वरून जेवढे समजले आहे तेवढे सांगत्येय.
आईला सकाळी तोंड धुवायला पाणी देऊन, चहा देऊन तो गेला. शेवटपर्यंत आईचं सगळं केलंन. फक्त शेवट आईचा नव्हता, त्याचा होता हे दुर्दैव.
काल त्याच्या छातीत दुखत होतं. काकडी सालासकट खाल्ली म्हणून घास बसला वगैरे काहीतरी कारण झाले. ऍसिडिटी आहे असे समजून त्याने जेलुसील वगैरे गोळ्या खाल्ल्या. सकाळी उठून चहा केला आईला दिला. खुर्चीत बसला होता. आईने विचारले, “आता बरे आहे का?” त्यावर हात वर करून “थांब, सांगतो” असे म्हणाला. तो हात खाली पडला. त्यानंतर काही बोलेना.
तिला उठता येत नाही. तिने आरडा ओरडा करून शेजाऱ्यांना बोलावण्याचा सपाटा लावला. दाराला कडी असल्यामुळे दार उघडता येईना. पोलीस व फायरब्रिगेड बोलवावे लागले. हार्ट अटॅकच असावा. अजून प्रोसिजर सुरु आहे. आता सगळे नातेवाईक आले आहेत.
ती बिचारी माझा श्रावण बाळ गेला असा टाहो फोडत्येय. जाताना देखील मला चहा देऊन गेला असे म्हणत्येय.
जिवंत असताना त्याने ज्या काही चुका केल्या असतील त्यासाठी आपण सगळ्यांनी (माझ्या सकट)चिक्कार शिव्या घातल्या आहेत. मी तर त्याच्या तोंडावर बोलले आहे मात्र आईच्या बाबतीतल्या वागण्यासाठी त्याला शंभर मार्क दिले. खूप वाईट झालं. एक पर्व संपलं!
यावर पुढील चौकश्याना मला कदाचित उत्तर द्यायला नाही जमणार. माफ करा.
—————————
डॉ. अमेय गोखले
काही जणांची वागण्याची तऱ्हाच अशी असते , की त्यांच्या हाती मद्याचा प्याला देखील खुलतो ; आणि काही जण दूध सुद्धा ताडी प्यायल्या सारखे पितात… काहीकाही हस्तस्पर्शच असे असतात , त्यांच्या हाती कणेर सुद्धा गुलाबसरखी वाटू लागते…
किंवा
घरातल्या लहान पोरानं शर्ट वर करून घरभर नागवं फिरल्यावर आपल्याला त्यात अश्लील वाटत नाही. जगाच्या दृष्टीने सगळी अशुद्धी केलेला माणूस , माझ्या लेखी मात्र देवटाक्याच्या पाण्याइतका शुद्ध होता…
——-
फेसबुकवरची वल्ली – चंद्रशेखर अभ्यंकर उर्फ तात्याची प्रत्येक पोस्ट वाचल्यावर मला नेहमी पुलंच्या त्या रावसाहेबांची आठवण व्हायची. बेळगावकर आणि मुंबईकर इतकाच काय तो त्यांच्यात फरक ! पण बोलणं तसंच थेट , मनात ठेवून वगैरे काही नाही. प्रसंगी कोणाला शाब्दिक फटके देईल , पण मनात कटुता नसायची. प्रसंगी त्याच्या पोस्ट्स मध्ये शिव्या आल्या , तरी त्यात अश्लीलपणा किंवा वासना जाणवत नव्हती. म्हणूनच , अशा पोस्टवरही स्त्रीवर्गाकडून आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला नाही… नॉनव्हेज खातो , दारू पितो , यात त्याला कधी वावगं वाटलं नाही , आणि समोरचा काय म्हणेल याचा विचारही त्याने केला नाही. ‘माझी वॉल – माझी मर्जी’ असा माज करावा तो तात्यानेच. एखाद्याचं मत नाही पटलं , तर त्याची कमेंट अगदी सांगून डिलीट करायचा… अतीच झालं , तर थेट अंफ्रेंड करून टाकायचा…
या तात्याची आणि माझी प्रत्यक्षात भेट कधीच नाही. आमची फेसबुकवर कधी मैत्री झाली , ते मला नेमकं आठवत नाही… पण त्याच्या लेखन शैलीच्या अनेक फॅन्स पैकी मीही एक झालो होतो , यात वाद नाही… आणि त्यालाही दुसऱ्याची कदर होती. माझ्या कवितांवर , लिहिण्यावर त्याची आवर्जून दाद असायची. त्याच्या ‘मालकीच्या’ काही फेसबुक ग्रुप्समध्येही मला त्याने घेतलं होतं ! ☺️
सोशल मिडियावर न चुकता मराठीतुन लिहिणाऱ्यांमध्ये तात्या अनभिषिक्त सम्राट होता. ‘आपण काय मुंबय नाय बघितली काय?’ किंवा ‘साली आमच्या बामणांमधेच एकी नाय’ , वगैरे सरळसोट लिखाण ; वाचणाऱ्याला तो आपल्याच मनातलं लिहितोय असं वाटणारं ! म्हणूनच तात्या या सोशल मीडियात लोकप्रिय होता. त्याच्या पोस्ट सगळीकडे फिरायच्या… कधी नावासकट ,कधी नावाशिवाय…
तात्या इथला ट्रेंड सेटर होता. खवैय्या तात्या , गाण्यातला तात्या , चित्पावन तात्या , देशभक्त तात्या , स्पष्टवक्ता तात्या अशी विशेषणं स्वतःच्या नावाआधी लावण्याचा ट्रेंड तात्यानेच व्हायरल केला. राजकारण्यांना , कार्यकर्त्यांना एखादा टोमणा मारून शेवटी #खिक् असं लिहायचा आणि मजा बघत बसायचा ! तात्याचं महाभारत , रद्दीवाला , रानडे काका , रिसबुड वहिनी अशा काल्पनिक ; तर मारिया , ट्रम्प , मोदी-शहा वगैरे फेमस कॅरॅक्टरना घेऊन तात्याने केलेलं लिखाण अफलातून असायचं ! तसंच आपण लिहावंसं कित्येकांना वाटलं नसतं , तरच नवल.
कधी अण्णा किंवा बाबूजींची महती सांगेल , कधी शुद्ध यमन गाऊन व्हिडीओ पोस्ट करेल , कधी राजकारणावर कोपरखळ्या मारेल ; किती आणि काय सांगावं ? #हरहुन्नरी : हर हुनर जीसमे मौजूद हो , असा होता तात्या…
———-
गेले बरेच महिने इथे तात्याच्या पोस्ट्स दिसत नव्हत्या. मी तर २-४ वेळा तात्याच्या प्रोफाईला सुद्धा जाऊन पाहिलं. अनफ्रेंड तर केलं नव्हतं , पण अलीकडे काही पोस्ट केलेल्याच नव्हत्या ! नाही म्हणायला बरोब्बर वर्षभरापूर्वी तात्याचा मला फोन आला होता… आर्थिक मदतीसाठी… अकाऊंट डीटेल्स दिल्या , नंतर थँक्सही म्हणाला…
तात्या नक्की कशामुळे आर्थिक विवंचनेत होता ? अशा अनेक जणांकडून पैसे घ्यायची वेळ त्याच्यावर का आली ? पुढे काय झालं ? हे सगळे प्रश्न आता फिजुल आहेत.
काल तात्या हे जग सोडून गेला. आणि सोशल नेटवर्किंग विश्वातला एक अध्याय संपला. लिहू नये असं वाटत होतं , पण न लिहून राहवलंही नसतं !
🙏🏼 मृतत्म्याला सद्गती लाभो 😢🙏🏼
Ajinkya Rahalkar
Yesterday at 3:33 PM
फेसबुकवरच्या लिखाणाला काही किंमत नसते हे मत ज्यांच्यामुळे बदललं गेलं ते ‘तात्या अभ्यंकर’ आज सकाळी गेले… अवलिया माणूस..पण प्रचंड बुद्धिमत्ता, प्रतिभा असून तिचा उपयोग योग्य ठिकाणी न केल्याने म्हणा किंवा नशिबाने साथ सोडल्याने म्हणा आयुष्यातूनच उठले… त्यांच्यावर थोडा काल्पनिक पण बराच खरा दोन वर्षांपूर्वी हा लेख डॉ. कैलास गायकवाड यांनी लिहिला होता तो मी सेव्ह करून ठेवलेला.. तोच पोस्ट करावासा वाटतोय…
तात्या अभ्यंकरांना भावपूर्ण श्रद्धांजली…!
तात्या ..
तोंडाचा मोठा आ वासत तात्याने जांभई दिली. अंगावरचे पांघरुण झुगारुन दिले. बेडवर बसल्याबसल्याच आळोखेपिळोखे देत पाठीतून दोनदा कट कट असा आवाज काढला. काय करावे आज? असा विचार करत उठतच होता तितक्यात .. ,” उठलास का रे “? ‘’ आज तरी वेळेवर आंघोळ कर रे बाबा ‘’ असा आईचा आतल्या खोलीतून क्षीण पण करारी आवाज आला. बेडच्या बाजूला पडलेला आणि पोर्याने खिडकीतून फेकलेला ‘’ लोकसत्ता’’ उचलत ….’’ उठलोय गं ….. आलोच पाच मिंटात ‘’ असे म्हणून तात्या टॉयलेटात शिरला. दोन मिनिटात मथळे चाळत …. स्वत:शी काहीबाही पुटपुटत पोट मोकळं केलं. आरशावरचा ब्रश उचलला …. कोलगेट कॅल्सीगार्ड ब्रशवर पिळून खसाखसा दातावर फिरवला. गर्रर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र गुट असा अगम्य आवाज काढत चूळ भरली. कपडे उतरवले. गीझरचं पाणी बादलीत जमवून भसाभसा दोन तांबे डोक्यावरुन घेतले. दोन तीन ठिकाणी फाटलेल्या टॉवेलने खसाखसा डोकं पुसत तात्या बाहेर आला तेव्हा म्हातारीने अर्धा कप चहा समोर आदळला होता.
‘’ घे…. रात्रीच्या उरलेल्या दुधातनं बनवलाय. …. दूधवाल्याने दूध घातलं नाही आज. म्हणे राहिलेली चार म्हैन्याची उधारी आधी टाका… मग देतो दूध. ‘’
‘’ हं … बघतो आज काहीतरी त्याच्या पैशांचं’’ …. असं रोजच्यासारखंच वेळ मारुन नेत तात्यानं अर्धा कप चहा इतक्या शिताफीनं फुरकला की क्षणभर कपालाही काय झाल्याचं कळलं नाही.
‘’लाईट बिल भरायचं राहिलंय …… तळमजल्यावरच्या पेंडशांचं मीटर कापून नेलं काल एमेसीबी वाल्यांनी. पेंडशेंच्या कारट्यानं फारीनातनं पैशे धाडले नाहीत वाटतनीत अजून ‘’
म्हातारी अजून काहीबाही बडबडत पैशाचेच विषय काढेल त्या आधीच निघावं म्हणून तात्याने घाईघाईत पॅंट चढवली. कालच्याच शर्टच्या बाह्यांचा वास घेतला. ठीक आहे असं मनातच म्हणत घातला देखील. ‘’ आलोच गं जाउन ….. चार वाजेपर्यंत येतो ….. दूधवाल्याचे आणि लायटीच्या बिलाचं बघतो आजच. ‘’ असं आश्वासनवजा दोन शब्द फेकून तात्या जिन्यावरन उतरला देखिल.
साला आज काय खरं नाय… आज दोन चार हजार काढलेच पाहिजेत कुठून तरी. नाहीतर उद्या चहासुद्धा नाय भेटायचा आणि काळोखात झोपावं लागेल . झपझप पावले टाकत तात्याचं विचारचक्र फिरत होतं . नाका ओलांडला आणि नव्यानेच झालेली प्रतिभा अॅव्हेन्यू बिल्डिंग लागली. आयसीआयसीआय बॅंकेची आंबेडकर चौक शाखा तळमजल्यावर दिमाखात विसावली होती. बाजुलाच सदानंद हॉटेल गजबजलं होतं . डोसे, वडे , इडली आणि उपम्याचा दरवळ सुटला होता. चाकरमानी, कॉलेजातले पोट्टे पोट्टी , कसकसले एक्झिक्युटीव्ह पोटपूजा करुन बाहेर पडत होते तर काही लगबगीनं आत शिरत कॉर्नर टेबल खाली आहे का म्हणत कटाक्ष टाकत होते.
तात्याला यात स्वारस्य नव्हतं . त्याच्या द्रुष्टीने महत्वाचा होता हॉटेलबाहेरचा टपरीवाला. वेगवेगळ्या जर्द्याच्या माळा लोंबकळत ठेवलेल्या कळकट दिसणार्या पण अत्यंत स्वच्छ असलेल्या टपरीवरच्या मुरुगनला तात्याने हाळी दिली. ‘’ मुरुगन … निकाल अपना छोटा फोरस्क्वेअर ‘’ …. मुरुगनने पटदिशी सिग्रेट समोर धरताच तात्याने अख्खं पाकिट जवळजवळ हिसकवलंच . ‘’ अरे पाकिट मंगताय रे….. एक से मेरा क्या होगा… आणि आपल्याच जोकवर तात्या “ ह्या ह्या ‘’ असं हसला. मुरुगनच्या नजरेत जाणवलेल्या नाराजीला जाणूनबुजून इग्नोर मारत त्यानं इलेक्ट्रीक लायटरवर सिगरेट शिलगावून दोन जोरकस झुरके मारले. तो कडवट धूर छातीभर भरून घेतला. डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या तेव्हा कुठं जिवाला जरा हायसं वाटलं . मुरुगन दुसर्या गिर्हायकांत रमल्याचे बघून तात्यानं हळूच कल्टी मारली. प्रतिभा अॅव्हेन्यूच्या जिन्याकडे पावलं टाकत तो निघाला …… समोरुन मिनिस्कर्ट घालून उतरणार्या पोरीकडे अंमळ तिरकस बघत दुसर्या मजल्यावर पोचला.
‘’ साईप्रसाद कॉम्प्यु-टेक ‘’ अशा नियॉन साईन लावलेल्या ऑफीसात शिरला. काचेचा दरवाजा ढकलताच आतमधे प्रकाश दिसला. प्रकाश ह्या ऑफीसात आणि बाजुच्या सी ए च्या ऑफीसात असा टु इन वन शिपाई होता. चार वाजेपर्यंत साईप्रसाद आणि चारनंतर ‘’ पी . पी. घैसास इनवेस्टमेंट्स ‘’ ह्या ऑफीसात असं भारीतलं नियोजन होतं त्याचं .
‘’ तात्या ….. तू आज कस्काय आलास? अरे आज सनीसायेब तुझ्या घरी त्यांचा जुना पीसी इनस्टॉल करायला हर्ड्याला पाठवणार आहेत ना ? . इति प्रकाश …
यातला सनीसायेब म्हणजे ऑफीस ओनर सुनील शिंदे आणि हर्ड्या म्हणजे ऑफीसात कामाला असलेला हार्डवेअर इंजिनिअर . कॉम्प्युटर रिपेअर करणार्या पोर्याचं काहीही नाव असलं तरी प्रकाश त्याला हर्ड्याच म्हणायचा.
‘’ अरे हो. विसरलोच ‘’ . सालं हे तात्याच्या डोक्यातनंच निघून गेलं होतं . साईप्रसाद कॉम्प्युटेकमध्ये तात्या रोज फुकटात नेट वापरायला येतो आणि एक पीसी अडवून ठेवतो म्हणून सुनीलने त्याचा चांगल्यातला जुना पीसी तात्याला घरी बसवून देण्याचं ठरवलं होतं. सुनीलच्या ऑफीसात पीसी, टॅबलेट , लॅपटॉप रिपेअर, असेम्बल्ड कॉम्प्युटर विक्री याबरोबरच ब्रॉडबॅंड कनेक्शन्ससंदर्भातली कामं चालायची. चार पाच पोरं कामाला होती. प्रकाश शिपायाचं अडेलपडेल ते काम करायचा. तात्या सुनीलच्या बापाचा क्लासमेट . सुनीलचा बाप तिगस्ता साली अॅक्सीडंटमधे वारला तेव्हा तात्याने सुनीलला फार मदत केली होती. पोलीस पंचनामा , सिव्हिलमधे स्वत: येउन लवकर पीएम करुन घेतलं होतं . तेरावं होईपर्यंत तात्याने सुनीलला अगदी घरातल्या माणसासारखा आधार दिला होता. सुनील म्हणूनच तात्याप्रती आदर बाळगून होता.
पण तात्याची हॉटेलातली पार्टनरशीप तुटल्यापासून आणि पार्टनरने फसवल्यापासून तो अगदी कफल्लक झाला होता. इन्शुरन्सची काही फुटकळ कामे करुन कसाबसा चार रुपड्या पदरात पाडून घ्यायचा आणि महिना ढकलायचा. त्यात हे फेस्बुकचं आणि व्हॉटस अॅपचं वेड लागलेलं. तात्या 24 तास ऑनलाईन असायचा . त्याच्या लेखणीत जादू होती. रोज दिसणारे / दिसलेली व्यक्तीचित्रं तो समरसून रेखाटायचा . त्याच्या पोस्ट्सवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाउस पडायचा. रोजचा पेपर टाकणारा, भंगार विकत घेणारा , चौथ्या मजल्यावरच्या सरमळकरांकडे येणारी नखरेल मोलकरीण , तळमजल्यावरचे पेंडसेकाका अशा अनेक व्यक्तीरेखा तात्याने जिवंत केल्या होत्या. फेसबुकावर त्याचे 14/15 ग्रुप्स होते . एका ग्रुपवर साहित्यविषयक लिखाण , दुसर्या ग्रुपवर दाक्षिणात्य अभिनेते अभिनेत्री यांचे फोटो शेअर करणे , तिसरा शिवसेनेसंबंधी आस्था असलेल्या जुन्या जाणत्या लोकांचा ग्रुप , चौथ्या ठिकाणी लोकल शाखाप्रमुख , नगरसेवक काही पत्रकार आणि काही सो कॉल्ड समाजसेवक अशांचा चालू घडामोडींवर वादविवाद घालणारा ग्रुप अशी निरनिराळ्या ग्रुपांची विभागणी करुन तात्या अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने त्यांचं अॅडमिनपद चालवत होता. वादविवाद ग्रुपवर तात्याचा शब्द प्रमाण होता. रोज मेंबरं कुण्या एकाला जात/ धर्म/ पक्ष/ भक्त आणि फुरोगामी अशा कुठल्या ना कुठल्या विषयावर उचकून द्यायचे आणि दुसर्या बाजूला तात्याला जुंपायचे. सकाळपासून रात्र होईपर्यंत कमेंटवर कमेंटा यायच्या … कुणी विकिपिडियाचे दाखले द्यायचा तर कुणी कुठलासा व्हिडिओ/ फोटो अपलोड करुन आपण सांगतो ते पुराव्यानिषीशी अशी छाती काढत आपलंच खरं करु पहायचा. पण तात्या या सार्यांच्या पुढचा होता. त्याचा युक्तीवाद, त्याची भाषा, त्याचे बर्याच राजकारण्यांशी असलेले संबंध याला तोड नव्हती. कित्येक सेलेब्रिटी नट नट्यांसोबतचे त्याचे फोटोज पाहून भलेभले तोंडात बोटे घालत . अचूक वेळी अचूक फोटो टाकत, बारामतीकरांचे , नागपुरकरांचे जुने ऐतिहासिक किस्से सांगत तो पोस्टला असे काही वळण द्यायचा की समोरचा फुरोगामी, धर्ममार्तंड , पत्रकार यांना पळता भुई थोडी व्हायची. वाद सुरु इतरजण करायचे….. पण अंतिम शब्द त्याचाच असायचा.
असेच थोड्याफार फरकाने त्याचे व्हॉट्स अॅप गृपही होते. तिथेही हाच प्रकार चालायचा. बर्याच गृप्स्ना त्याने को अॅडमिन ठेवले होते. पण तिथेही त्याचा राडा सुरुच असायचा. मग कुणाला गृपमधून नारळ देणे… कुणाला जहाल हब्दात पायरी दाखवणे ह्या बाबी नित्याच्याच होत्या. तात्या नेट्वरच्या आभासी जगाचा एकूणच अनभिषिक्त सम्राट होता. म्हणूनच तात्या येता जाता प्रकाश, मुरुगन सारख्या भाबड्या लोकांकडे बर्याचदा कुत्सितपणे पहात ‘’ लेको …. फेसबुकावर या म्हणजे कळेल तुम्हाला … तात्या क्या चीज है’’ असं पुटपुटायचा. पण ती मुरुगनसारख्याच्या पल्ले पडणारी बाब नव्हती .
अकरा साडेअकराला आलेल्या तात्याचा दिवस जो सुरु व्हायचा तो असाच वादळी पोस्टसनी . मग त्या पोस्टना रीप्लाय देणे, कुणाला कसल्या बातमीची लिंक देणं …. फेसबुकाची नवीन नोटिफिकेशन्स वारंवार चेक करत रहाणं … मधेच आवडत्या नटाचा एक फोटो पोस्ट करुन त्याचा स्वत:ची संबंधित एखादा किस्सा टाकणं ….. असं करत करत दोन अडीच वाजले की तो उपकार केल्यासारखा लॉगआउट करत उठायचा . खाली येतायेता एक सिग्रेट फुकायचा. नाट्यगृहाच्या गल्लीत भाजीमार्केट मधल्या माथाड्यांच्या स्टॉलकडे वळायचा . येथे वीस रुपयात मूदभर भात आणि त्यावर चमचाभर वरण मिळायचं . भाजी हवी असेल तर पंचवीस आणि सोबत लोणचं पापड पाहिजे असेल तर पस्तीस रुपये असा रेट असायचा. चव अगदी घरगुती असायची . खिशात पैसे असतील त्यानुसार तात्या दुपारचे जेवण आटपायचा . त्रुप्तीचा ढेकर देत बडीशेब चघळत जो निघायचा तो मघाचा अपुरा राहिलेला वाद पुढे चालवायला पुन्हा एकदा ‘’ साईप्रसाद कॉम्प्युटेक’’च्या दिशेला.
आजही झपझप पावले टाकत पीसीजवळ पोचला तेव्हा ऑफीसात सुनील आला होता. ‘’ तात्या, माझा जुना लीनोव्होचा मॉनिटर आणि पीसी पाठवलाय तुमच्या घरी इनस्टॉल करायला. रिझवान गेलाय … पण त्याचा फोन होता की तुमच्याकडे लाईट नाही म्हणून….. ‘’ सुनील बोलला आणि तात्याच्या मनात पाल चुकचुकली….. ‘’ च्यायला मीटर नेला की काय कापून एमेसीबी वाल्यांनी’’? जाउ दे… घरी गेल्यावर बघू असं म्हणत तात्याने परत फेसबुकला लॉग इन केलं. ‘’ काइंडली सी हीयर’’ असा व्हाट्सअॅपवरचा मेसेज पाहोन त्याने लगोलग ती पोस्ट उघडली.
फेरीवाल्यांना मारण्यात काय हशील ? अशा तात्याच्या पोस्टला ‘’ फेरीवाल्यांना चोपून काढले पाहिजेत “ अशा प्रकारच्या कमेंट्स आल्या होत्या. बर्याच जणांनी तात्याच्या पोस्टला समर्थन दिलं होतं तर तितक्याच किंबहुना जास्त लोकांनी त्या विरोधात लिहिलं होतं. फेरीवाल्यांना चोपून काढले पाहिजेत या एकाच्या कमेंटला 34 लाइक आले होते …. आही जणांनी फेरीवाल्यांना चोपत असतानाचे फोटो पोस्टून आनंद घेतला होता आणि बरेच जण फुटपाथ , रेल्वे स्टेशन मोकळे व्हायलाच हवे अशा प्रकारचं ठासून बोलत होती.
तात्याने पवित्रा घेतला. एक दीर्घ पोस्ट टाकण्याइतका मसाला त्याच्याजवळ होताच. फेरीवाले कोण आहेत? ते काय काय वस्तूंची विक्री करतात ? त्यामागचे अर्थकारण अर्थकारण काय ? मध्यमवर्गीय त्या सामानावर कसा अवलंबून आहे ? हेच सामान त्या मॉलमध्ये गेलं तर आपल्याला केवढ्याला पडेल ? पथविक्रेता संरक्षण अधिनियम …. त्या नियमाची व्याप्ती ….. त्या तुलनेने त्यांचे न झालेले सर्वेक्षण …… दुकान आणि गाळेवाल्यांनी केलेले अतिक्रमण … त्याकडे कोर्ट, लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी केलेले दुर्लक्ष , रोज त्यांचा जप्त होणारा माल , त्यांचे होणारे नुकसान …. काही समर्पक आकडेवारी असा जबरी रिप्लाय तात्याने भराभरा टाईप केला. दोन तीन टायपो लीलया करेक्ट केले…. एक दोनदा वरुन खाली नजर टाकली आणि एंटर मारुन पोस्ट केला.
पोस्ट करायची खोटी ….. काहींनी न वाचताच भराभरा लाइक केले. पाच मिनिटात त्या कमेंटला 34 लाइक झाले. फेरीवाल्यांना चोपून काढले पाहिजे असा सूर असणार्यानेही …. ‘’ ह्या बाबी खरंच मला माहीत नव्हत्या ‘’ असे म्हणत …. आपल्या भूमिकेचा लोकांनी पुनर्विचार केला पाहिजे असे मत पोस्ट केले. तात्या तुम्हारा जवाब नही अशा अर्थाच्या ढीगभर कमेंट्स आल्या. आपल्या लेखनशैलीवर तात्या मनोमन सुखावला ….. तात्या नक्की करतोय तरी काय असे नाराजीयुक्त आश्चर्याने पहात सुनीलने चहाचा ग्लास तात्याकडे सरकवला आनी तिकडे पाहण्याचीही तसदी न घेता त्याने उचलून चहा भुरकायला सुरुवात केली.
वाद आता हळूहळू शांत होत होता. विरोध करणार्यांचा विरोध तात्याच्या अभ्यासू कमेंटनंतर गळून पडला होता. चित्रपट अभिनेते, काही जुने किस्से , गेल्या वर्षीच्या काही उकरुन काढलेल्या पोस्ट्सला आलेले फुटकळ लाइक्स आदि नोटिफिकेशन्स पहात हळूहळू सात वाजले. च्यायला आज पण नगदनारायणाचा बंदोबस्त झाला नाही असे स्वत:शीच पुटपुटत तात्याने लॉगआउट केले. येतो रे सनी … असे म्हणत सुनीलचे काय उत्तर येईल याची वाटही न पहाता तात्या भरभर जिने उतरला. उद्या त्या डोंबिवलीकराला 5/10 हजाराची इनवेस्टमेंट करायलाच लावतो असे स्वताशीच म्हणत त्याने नाका पार केला. पेंडशांच्या काळोख झालेल्या फ्लॅटकडे बघत दुडक्या चालीने आपल्या घरात शिरला. काहीसा घाबरतच त्याने प्रवेश केला. लाईटच्या बोर्डवर पेटलेला चूटा रेड बल्ब पाहून त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. चला….. लाइट कापली नाही अजून…. उद्या भरुच कसेही बिल….. खुशीतच त्याने एक जुन्या गाण्याची शीळ घातली. शीळ ऐकून आतमध्ये म्हातारीने हालचाल केली. ‘’ आलास का रे…. जरा आत ये. दुपारी दुसर्या मजल्यावरच्या माईने पोहे दिले होते. एक वाटीभर मी खाल्ले …. अजून एक वाटी आहेत. तू खातोस का ? नसेल खायचे तर दे मला…. जरा भूक लागल्यागत वाटतंय बघ. ‘’ म्हातारी बोलली आणि तात्याला गलबलून आलं ….. त्याचा बिझिनेस ऐन बहरात होता तेव्हा जे हवं ते खाणारी म्हातारी आता पोहे खातेय …. त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
‘’ हे घे पोहे’’ म्हणत त्याने सगळे पोहे वाटीत आणून तिच्यासमोर ठेवले. थांब मी तुला चहा करतो फक्कडसा म्हणत तो स्वैंपाकघरात शिरला. ‘’ चहा कसला कपाळ? अरे दूध कुठं टाकलंय आज त्या मेल्याने?” म्हातारी करवादली… ‘’ दूधवाल्याचे पैसे नाही दिले आणि हा कॉम्प्युटर आणला मोठा ‘’ असे म्हणत तिने हॉलमधल्या टेबलवर इनस्टॉल केलेल्या पीसीकडे बोट केले. कसकसल्या वायरी आणि इंटरनेट म्हणे लावून दिले असे तो शिंदेंकडचा पोर्या सांगत होता. तात्याने पीसीकडे पाह्यलं जरा हसला आणि पैशाच्या आठवणीनं त्याच्या चेहर्यावर परत चिंतेचं जाळं पसरलं …..
काहीशा विमनस्क अवस्थेतच तो बाथरुमात शिरला. नळ सोडून खसाखसा चूळ भरली. थंड पाण्याचे हबकारे चेहर्यावर मारले. मघा ओले झालेले डोळे पुन्हा ओले केले. बाजुच्या हॅंडटॉवेलला हात पुसून तोंड बाकी शर्टच्या बाहीनेच पुसत तो बेडजवळ आला. सकाळच्या लोकसत्तेची पुरवणी घेत तो बेडवर पहुडला. खिशात हात घालून पाहिलं…. तर शंभरची एक नोट आणि दहाच्या काही नोटा काही नाणी एवढंच खिशात होतं. तीन महिन्याआधी एक दुकान भाड्याने चढवलं होतं त्याचे दोन महिन्याची दलाली म्हणून तीस हजार मिळाले होते. तेव्हापासून काही पैसा हातात आला नव्हता. काय करावं ….. असं डोकं गच्च धरुन तो नुसताच छतावर गरगर फिरणार्या पंख्याकडे बघत राहिला.
बाथरुमात साबण नाही… पेस्ट संपलीये….. वाण्याची, दूधवाल्याची उधारी राहिली आहे. लाईट बिल भागवायचं आहे. पैसे नाही दिले तर पेपरवाला लोकसत्तासुद्धा बंद करेल दोन चार दिवसांत . विचार करकरुन त्याला ग्लानी आली.
तितक्यात त्याच्या फोनवर ती टिपिकल रिंगटोन वाजली. अंमळ अनिच्छेनेच त्याने फोन उचलला . हॅलो तात्या ….. पलीकडे चिरपरिचित आवाजाचा गोखले होता. गोखले हा तात्याच्या लेखणीचा डाय हार्ड फॅन होता. ‘’ अरे पुन्हा म्हात्रेने कमेंट केलीय ….. आधी तुझ्या मताशी सहमती दाखवून वाद संपवला सुद्धा होता …. पण आता परत त्याने एक फोटो पोस्ट केलाय. काही परप्रांतीय फेरीवाल्यांनी आपल्या एका स्थानिक नेत्याचं डोकं फोडलंय म्हणे. तो विचारतोय….. बघ तात्या….. अजून तू फेरीवाल्यांचीच बाजू घेणार का? आता म्हणे आर या पार…. कोणत्याच स्टेशनवर फेरीवाल्यांना बसू देणार नाही असे बोलतोय तो…… प्लीज लिही ना त्यावर ….. मी लिहित होतो…. पण मला कुठं जमणार आहे तुझ्यासारखं लिहायला? तात्या तो तात्याच…… ‘’
इतर कुठला दिवस असता तर तात्याने मोबाईलचा डाटा ऑन करुन हळूच ‘’ यावर उद्या सविस्तर लिहितो’’ अशी कमेंट त्याने केली असती….. पण आज त्याच्या घरी पीसी इनस्टॉल झाला होता. लोकसत्तेची पुरवणी भिरकावून तो उठला आणि पीसीचे बटन ऑन केले. पीसी बूट होईपर्यंत त्याला धीर नव्हता …. एकदाचा बूट झाला आणि शिंदेने जोडलेल्या ब्रॉडबॅंडला ऑटो कनेक्ट झाला. गुगल क्रोमच्या ब्राउझरमध्ये गुगलचे ओपन झालेले होमपेज पाहून त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अॅड्रेसबार मध्ये फेसबुक.कॉम टाईप करायला हार्डली त्याला दोन सेकंद लागले. युझर आयडी पासवर्ड कधी एकदा टाकतो असे त्याला झाले होते. डु यू वॉंट क्रोम टु रीमेंबर धिस पासवर्डला सराईतपणे येस करुन तो लॉगीन झाला.
फेसबुकची त्याची वॉल आता त्याच्या समोर होती. आलेल्या शंभरेक नोटिफिकेशन्समधली म्हात्रेची ती नोटिफिकेशन त्याने अचूकपणे ओळखली आणि क्लिक केली. स्थानिक नेत्याच्या डोक्याला झालेल्या मारहाणीचा फोटो न्याहाळत त्याने शब्दांची जुळवाजुळव केली आणि आता याला कसे उत्तर द्यायचे याचे आडाखे बांधले. शर्टाच्या बाह्या मागे करत खुर्चीच्या मागे एक उशी ठेवून त्याने कीबोर्ड जवळ ओढला आणि बडवायला सुरुवात केली.
स्वत:च्या आयुष्यातील सार्या विवंचना मागे ठेवत जगाच्या विवंचनेवर भाष्य करणारा हा त्याचा प्रवास उद्या पहाटेपर्यंत त्याचा असाच सुरु रहाणार होता……
Chandrashekhar Abhyankar __/\__
डॉ. कैलास गायकवाड
…
Padma Dabke आभासी जगतातल्या अनभिषिक्त सम्राटाला आपले दैनंदिन जीवन चालवणे अवघड व्हावे इतका अतिरेक या आभासी जगाने निर्माण होतो हे वास्तव दाखवून गेलेल्या या अवलियाला श्रद्धांजली वाहणाऱ्याने काही धडा घ्यायला हवा.
Nilesh Shinde तात्याला इतकं ओळखणारे तात्याला ना काम देत होते ना पैसा आणि तात्याही मानी होता, कुणी वाईट बोललं की तो आयुष्यातून ब्लॉक च.
————————-
Sandeep Punekar
फेसबुकच्या आभासी जगात आपल्या असामान्य लेखणीने भीमण्णा, लतादिदी, बाबुजीं, किशोर, पंचमदा अख्तरीबाई यांच्या मधुर गाण्यांच्या आठवणी रंगवत, पुण्याच्या बादशाही लाॅजच्या जेवणाची रसभरीत वर्णनं सांगत, मधुबाला, वहिदा रेहमान आणि मारिया शारपोवा (शिरापोहा) यांच्या सौंदर्याचं भरभरुन वर्णनं करत, चित्पावन असुन बच्चुभाईची वाडीतल्या वेश्या आणि अतीसामान्यांची दुःखं याविषयी लिहित, पुलं आणि वपुंचं साहित्य कोळुन प्यालेला, शिवसेना आणि बाळासाहेबांच्या आठवणींनी गर्वाने छाती फुगवत, रसिक, लेखक, गायक, बल्लवाचार्य, खवय्या,भक्तीमार्गी साधक आयुष्याकडे पहाण्याचा आणि ते समृद्धपणे जगण्याचा दृष्टीकोन शिकवत तात्या अभ्यंकर अकाली अनंताच्या प्रवासाकडे रवाना झाला.
———————–
Satish Lahane
Sameer gaikwad यांच्या Wall वरुन तात्या अभ्यंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
‘रेड लाईट डायरीज’चं विश्व शब्दबद्ध करण्याची प्रेरणा देणारा माझा मित्र तात्या अभ्यंकर आज अनंताच्या प्रवासास निघून गेला…
ज्या फेसबुकनं त्याला नावलौकिक दिला त्यानंच बदनामी दिली.
त्याचं दिलखुलास मनमौजी बेभान जगणं कुठल्याही फंद्यात गुंतणं शक्य नव्हतं.
भीमसेन जोशी ते बाबूजी आणि फोरास रोड ते गंगूबाई हनगल असा त्याचा अस्ताव्यस्त कॅनव्हास होता.
त्यानं आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. अनेकांनी त्याला फसवलं. नंतर त्याला अनेकांचं देणं झालं. त्यात तो झुरु लागला.
मोरपीसाची लेखणी असूनही व्यसनांच्या आहारी गेला.
तात्याची वृद्ध आजारी आई हा त्याचा वीक पॉईंट होता. तो कट्टर बाळासाहेब ठाकरेप्रेमी होता.
अखेरच्या काळात त्याचा सेलफोन नॉट रिचेबल होता.
पानाफुलावर प्रेम करणारा तात्या रशियन टेनिस सम्राज्ञी मारिया शारापोवा हिचा भक्त होता.
स्त्री सौंदर्यावर खुलून लिहिणारया तात्याच्या लिखाणात वासनेचा लवलेश नसे.
तो अस्सल गजलप्रेमी होता.
इथल्या अनेक बोरुबहाद्दर कारकुनी छाप व लेखणाची बुंदी पाडणारया लेखकाहून तो कैकपटीने सरस होता. त्याचं चीज कधी झालं नाही. किंबहुना तो ही या बाबतीत बेफिकीर होता. तसा तर तो जिंदगीभर बेफिकीर होता. पण माणूस अस्सल बावनकशी जिंदादिल होता..
मधुबालेचा आजन्म अविवाहित चाहता होता.
पोस्टच्या अखेरीस त्याच्या नावाची दिलखुलास टॅगलाईन असे.
कुणाचीही टोपी उडवण्यात माहिर असलेला तात्या स्वतःचीच खिल्ली उडवण्यात एक्सपर्ट होता.
त्याचं जाणं हूरहूर लावून गेलं.
इनबॉक्समध्ये डोकावणारा, लिखाणावर प्रेम करणारा, चुकांची दुरुस्ती करणारा मित्र मी गमावलाय.
काही महिन्यांपूर्वी त्याला हवे असलेले पैसे द्यावेत असे वाटले होते. पण तितके तर माझ्याकडेही नव्हते.
मित्रा तुझी निकड भागवू शकलो नाही याचं आता शल्य वाटतं.
कोणत्या तोंडाने तुला श्रद्धांजली वाहू?
इथे फेसबुकवर तुला श्रद्धांजली वाहणारयांचा पूर येईल. तितक्याच लोकांनी तुला मदत केली असती तर तू वाचला असतास का? पुढे जाऊन तुझ्या सवयी तु बदलल्या असत्या का?
अनेक प्रश्न मागे ठेवून जाताना माझ्या मनाला अपराधीपणाची सल लावून तू निघून गेलास.
माझ्या गावाकडे येऊन आषाढातल्या पावसात भिजत गाणी म्हणायचं तुझं स्वप्न इतक्या अकाली विरुन जाईल असं वाटलं नव्हतं..
निदान तुझा उर्वरित प्रवास तरी सुखाचा होवो..
– समीर गायकवाड.
————————
Jaidev Paranjape
तात्या तसा मला दुरूनच माहिती होता… तरी त्याच्या बहुरंगी व्यक्तिमत्वाची पूर्ण कल्पना त्याच्या व्यक्त होण्यातून यायची. कधीही भेटलेला नसताना, तात्या माझा मित्र आहे असं म्हणायला भाग पाडायची… तो गेला हे खरंच वाईट झालं. एकदा तरी भेट व्हायला हवी होती. सूर आणि शेअर्स या बाबतीत तात्याचा हात धरू शकणारा मिळणं अवघड आहे. अशी एकाने मला त्याची ओळख दिली होती. इहलोकातली ही ओळख तो ईश्वर लोकात बरोबर घेउन गेला असावा असं मी मानतो. त्याला सूर-शांती लाभो…! 🙏
——–
—————-
Namita Bhide इतक्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वची परिस्थितीच्या विचित्र भोवऱ्यामुळे अकाली exit …शोकांतिका म्हणायची का?
तो माझा नातलग असल्याने त्याला मी खूपच चांगली ओळखते. शापित गंधर्व ही उपाधी योग्य ठरेल शेखर साठी
———-
Nilesh Shinde पैश्यासाठी झगडणाराही तात्या होता हे मात्र बर्याच लोकांपासून गुलदस्त्यात होते. त्यांच्या विवंचना काही केल्या संपत नव्हत्या
आणि आता हा प्रवास अर्धवट ठेवून आजारी आईच्या काळजीत तडफडत असलेल्या एक आत्मा एवढाच उरलाय
—————-
Shivprasad Vengurlekar
तात्या गेलें! बाझवत जाऊदे तुमची दुनिया म्हणत त्यांनी शेवटचा श्वास घेतला असेल!
तात्या व्यसनी होते का माहीत नाही पण मला आणि नक्कीच माझ्या सारख्या अनेक फेसबुकींना त्यांनी व्यसन लावलं त्यांच्या पोस्टीं, कमेंट आणि ती व्यक्तिचित्रे यांचं ते व्यसन!
गेले काही महिने तात्यांनी फे बु वरील आपलं लिखाण बंद करून आम्हाला तडपवत ठेवलं, एकही दिवस तात्यांच्या त्या भन्नाट लिखाणाच्या आठवणीशिवाय गेला नाही!
दोनच दिवसांपूर्वी आमच्या चिरंजीवानी तात्यांची आठवण काढली, मी ही अनेक वेळा तात्यांना मेसेज टाकले पण एकदाही उत्तरं नाही😢
तात्यांना एकदाही प्रत्यक्ष न भेटता फक्त फे बु वरील मैत्री असूनसुद्धा आपल्या रोजच्या जिवनातील एक घनिष्ठ संबंध असलेला मित्राला आपण कायमचे मुकलो ही हळहळ …
विलक्षण अश्या या व्यक्तिमत्त्वाला मनाचा मुजरा!
(तात्यांच्या पश्चात त्यांच्या मातोश्रीवर कोसळलेल्या दुःखाची जाणीव अस्वस्थ करतेय, फे बु मित्रमंडळींनी एकत्र येऊन काही विचार विनिमय करावा, अंत्यविधी संबंधी काही कळल्यास त्वरित कळवावे)
——————-
Milind Joshi
तात्या अभ्यंकर… सामान्य पणे जीवन जगणारा असामान्य कलाकार… काळाच्या पडद्याआड…
ते जितके चांगले गायक होते तितकेच उत्कृष्ट लेखकही होते. अनेकदा आम्ही फोनवर बोललो होतो. ठाण्याला गेल्यावर त्यांची भेट घ्यायची होती पण ती इच्छा मात्र आता कधीही पूर्ण होणार नाही याची खंत कायम मनात राहील….
भावपूर्ण श्रद्धांजली…
Mahesh Kedar त्यांची प्रकृती बर्याच दिवसांपासुन खराब होती…निदान ६ महीने झाले ते पुर्ण अलिप्त होते…नेमका काय विषय होता हे मात्र माहीत नाही.
Aditya Sathe shared a link.
ग्रुपवर आलं की पहिल्या प्रथम दिसणार वाक्य, “सर्व नवीन सभासदांना सूचना…” आता मुकं झालं यावर विश्वास ठेवणे जरा कठीण आहे. तात्या आणि माझी प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही पण खूप आधीपासून त्यांच्या लिखाणाचा मी चाहता… त्यांच्याबद्दल २०१३ मध्ये एक खूपच छोटा लेख मी माझ्या ब्लॉग वर लिहिला होता, तो इथे पुन्हा शेअर करतोय..
तात्या
तात्या, परखड रोखठोक पण काळजाच्या जवळच्या गोष्टी निघाल्या की तितकाच हळवा होणारा. आपले अंतरंग काहीही हातचे नं राखता आपल्या लिखाणातून मांडणारा. वास्तविक तात्याला कधीच प्रत्यक्षात भेटायचा योग आला नाही. फेसबुकावर ओळख झाली तीच मुळात एका उत्तम लेखामुळे. त्या क्षणापासून असा एकाही लेख तात्यानी लिहिला नसेल जो मी वाचला नाहीये. (जुने लेख सोडून द्या तात्या…). माझ्या भावविश्वात आढळ कोपरा निर्माण केलाय तात्या.
आज स्पष्ट कबुल करतो; मला तात्याचा हेवा वाटतो. आपण जळतो साला त्याच्या नशिबावर. जळतो त्याच्या मोजक्या शब्दात व्यक्तिचित्र उभा करायच्या हातोटीवर (थोड्या क्लुप्त्या मला पण सांगा की तात्या). जळतो त्याला लाभलेल्या थोरामोठ्यांच्या सहवासाबद्दल, त्यांच्याकडून मिळालेल्या कौतुकाबद्दल, आशिर्वादाबद्दल वाचतो तेव्हा तर पार जाळून कोळसाच होतो.
तात्या, एकच मागणं आहे. हात मस्तकी ठेवून आशीर्वाद द्यावा. दिग्गजांच्या पायी मस्तक ठेवल्याचं समाधान मिळेल. पु लंनी रावसाहेब आत्ता लिहिलं असतं तर मी नक्की म्हटला असतं रावसाहेब म्हणजे आपणच. “शौक करायच्या जागी शौक करायचा. उघड करायचा. शिवराळ बोलना पण कधीही अश्लील किंवा अश्लाघ्य नं वाटणारे.” त्या भाषेशिवाय तात्या अभ्यंकर मनाला मान्यच होत नाही.
तात्या.. असेच लिहिते राहा. बस आता लवकर दर्शनाचा योग येऊ दे.
——————-
Sachin Joshi
17 hrs
प्रिय तात्या,
२०१५-१६ च्या सुमारास कुणीतरी तुमची एक झकास पोस्ट शेअर केली होती. लगेच तुमच्या भिंतीवर जाऊन तुमच्या पोस्टी चाळल्या. सगळ्याच पोस्टी अगदी मनाला भिडणाऱ्या, वास्तववादी. आपसूकच तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट टाकली. तुम्ही लगेचच ती स्वीकारली. तेव्हापासून तुमच्या सगळ्या विषयावरील लिखाणाची मेजवानी सुरू झाली. राजकारण, सिनेमा, शास्त्रीय संगीत, पौराणिक, खेळ, भ्रमंती, खाद्य आशा सर्वच विषयांवर तुमची चौफेर फटकेबाजी चालायची. तुम्ही इतर काही समूहांवर मला ऍड केल्याने सर्व विषयांवरील सरस लेख वाचनात येऊ लागले तसेच नवीन मित्र मिळाले. वैयक्तिक ओळखीसहित समाज माध्यमावर कमावलेला एवढा अफाट मित्रवर्ग क्वचितच कुणाचा असेल. ही किमया साधणारे तात्या, तुम्ही एक अवलिया होतात.
खरे सांगायचे तर फेसबुकवर लिहायची व प्रासंगिक प्रतिक्रिया देण्याची प्रेरणा मला तुमच्याकडून मिळाली. तुम्ही तुमच्या पोस्टवरील प्रत्येक प्रतिक्रियेवर विशेष टिप्पणी अथवा लाईक करून दखल घ्यायचे हे विशेष. एका सिनेतारकाच्या लहान मुलावर तुम्ही टाकलेल्या एका पोस्टला मला आक्षेप होता. तुम्हाला मी तसे वैयक्तिक मेसेज करून कळवले तर तुम्ही पुढच्या क्षणाला ती पोस्ट डिलीट केली.
कुणाची प्रतिक्रिया आवडली तर त्या व्यक्तीला टॅग करून त्या प्रतिक्रियेवर स्वतंत्र पोस्ट करणारा तात्या… खाद्यपदार्थांचे, जेवणाच्या ताटाचे फोटो टाकून “या गरीबाघरी जेवायला” म्हणणारा दिलदार तात्या… विविध ज्ञात अज्ञात हिरोईन्सचे फोटो टाकून त्यांच्या बद्दल माहिती सांगून “तात्यासारखा अभ्यास शिका” म्हणणारा मिश्किल तात्या… विविध नट्यांचे फोटो टाकुन “होय, माझे तुझ्यावर प्रेम आहे” असे म्हणणारा, खोट्या सभ्यतेचा आव न आणणारा सौंदर्यप्रेमी तात्या… एसटी, शाळेतली मुले दिसली की हळवा होणारा, आठवणीत रमणारा तात्या… आपल्या आवडत्या नेत्यावर, पक्षावर, नट-नट्यांवर अंधपणे प्रेम न करता चूक वाटले की टीका करणारा, राग व्यक्त करणारा तात्या.. आता फक्त माझ्या आठवणीत राहणार…
तुमचा बाबू रद्दीवाला, रानडे काका, रिसबुड वहिनी ही काल्पनिक पात्र डोळयासमोर उभी राहायची.. आता त्यांना पुनरुज्जीत फक्त तुमच्या जुन्या पोस्टी करणार..
कर्णभक्त तात्यांचं महाभारत हे काहीसं विवादित असलं तरी त्यातल्या पात्रांची आजच्या वास्तवाशी घातलेली सांगड मनोरंजन करायची… ती पात्र आता इतिहासातच विरली जाणार..
तुमची मानलेली मावशी (सोनिया गांधी), मावसभाऊ राहुड्या व मामा (शरद पवार), तात्यांचे बाळासाहेब, दिघे साहेब, तात्यांचा स्पॉट नाना (अमित शहा), तात्यांचे मोदिशेठ हे सगळे आता तुमच्या नकळतपणे चिमटा काढणाऱ्या पोस्टिंना मुकणार..
कोकणस्थांच्या फुशारक्या आणि देशस्थांची उणीदुणी तितक्याच मिश्कीलपणे व खेळकरपणे कोण काढणार..?
मधेच अचानक बाबूजी, अण्णा (भीमसेन जोशी) यांच्या आठवणींच्या भावुक पोस्टी कोण टाकणार..?
फोरासरोडच्या पडद्यामागील जीवन कसे डोळ्यासमोर उभे राहणार? “साला आमी काय मुंबई बघितली नाय काय”? अशी मिजास कोण मिरवणार?
उत्तर प्रदेशवर मनापासून प्रेम करणाऱ्या तात्यांच्या लेखाखाली “भदोहीचा तात्या” असं कधी वाचायला मिळणार?
एक ना अनेक प्रश्न आज दिवसभर मनात घोळत आहेत, मात्र “माझी भिंत माझी मर्जी” असा हुकूमशाही थाट असलेली तुमची फेसबुकची भिंत तुमच्या या आभासी दुनियेतील तुमच्या राजेपणाची, कलोपासकतेची, रसिकतेची, उत्कृष्ठ लेखकाची कायम साक्ष देत राहील.
शेवटी प्रांजळपणे सांगतो, काही कारणास्तव तुम्हाला मी कसली मदत नाकारली असेल तर त्याबद्दल मनात शल्य बोचत राहील.. माहीत नाही त्याने काही बदलले असते का, पण त्याबद्दल तुम्ही जिथे असाल तिथून मला माफ कराल याची खात्री आहे, एवढे दिलदार आमचे तात्या नक्कीच आहेत.. तुमच्या वा आईंसाठीच्या एखाद्या उपक्रमात मी नक्कीच सहभागी असेल अशी ग्वाही देतो.. तुमच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..🙏🏻😞💐
तुमचाच
– सचिन
——————–
Sachin Vijapure
मला वाटतं सगळ्यांनी तात्या च्या सहवासाचा लाभ घेतला , त्याच्या बरोबरचा वेळ अगदी enjoy केला मग जर तो जरा जास्त आहारी गेला तर त्याला त्यातून बाहेर काढायची पण थोडी जबाबदारी आपल्यावर येते. आपण सगळ्यांनी त्याच्यावर खूप प्रेम केले मग आपली काहीच जबाबदारी नाही का ??? का त्याच्या जवळच्या लोकांनी लक्ष नाही दिले . तुम्हाला तात्या फक्त मनोरंजन आणि बोध घेण्या साठी पाहिजे होता का . 😦 …! खूप खूप चटका लावणारं आहे हे . त्यांच्या मातोश्री चा विचार करून मन अजुनच हेलावत . तात्यांनी मना पासून प्रेम केले आई व्वर . निदान तिच्या साठी तरी अस न्हवत व्हायला हवे .
काय इतका त्रास होता तात्याला ? का एवढं आहारी गेला .? काहीतरी शल्य असल्या शिवाय माणूस असा बेभान नाही वागणार उगाच . तात्या बेदरकार होता पण बेजबाबदार होता अस नाही वाटत .!
——–
शैलेश त्र्यंबक सहस्त्रबुद्धे
ईतकेच मला जाताना जाताना
सरणारवर कळले होते.
मरणाने केली सुटका
जगण्याने छळले होते…..😢😢😢
कधीही न कळलेला तात्या …. भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢
————-
Amol Mohan Soma
जोडलेल्या हातांकडे
तुझ्या, कानाडोळा केला
का, कशी लिहू आता
अरे, श्रद्धांजली तूला..
तात्या….. सुटलास रे….!
— अ. सो.
————
Swati Phadnis
20 hrs
भावपूर्ण श्रद्धांजली!
.
जाणारा जात नाही रिकामा
जाणाऱ्या माणसाला बरोबर काहीच नेता येत नाही
हे खरे आहे
खरे नाही त्याचे सारे मागे ठेवणे
आणि एकट्याने अगदी रिकामे निघून जाणे
जाताना आपल्या अदृश्य हातांनी
उचलतो तो कधी आपल्या जिवलगांची नीज
उचलतो कुणाची स्वस्थता
सहज ओढून नेतो जीवनाचे दिलासे
आणि संघर्षांचे धैर्य
पायांखालच्या जमिनीचा
विश्वासच कधी हिरावतो कायमकरता
उगवता उगवता राहून जाते
त्याच्या श्वासाच्या वाऱ्यावाचून बरेच काही
त्याच्या स्नेहाच्या ओलीविना
काही ठायीच सुकून जाते
कधी तो नेतो चोरून संबंधांची अर्थपूर्णता
आणि थंड वास्तवामधली सृजनाची धुगधुगी
कधी कधी तर तो बरोबर नेतो
मुक्या बीजांमधले संभव
आणि जन्मांचे शकूनही घेऊन जातो
जाणाऱ्या माणसाला बरोबर काहीच नेता येत नाही
हे खरे नाही
डॉ. अरूणा ढेरे !!
————
Milind Joshi
आज सकाळी तात्या अभ्यंकर गेल्याची बातमी समजली आणि धक्काच बसला. खरे तर त्या व्यक्तीशी माझे फक्त २/३ वेळेस फोनवर बोलणे झाले होते. तसेच ४/५ वेळेस चाटमध्ये आम्ही बोललो होतो. यापेक्षा जास्त संभाषण नव्हतेच. पण तरीही त्यांचे जाणे मनाला एक प्रकारची रुखरुख लावून गेले.
जे फेसबुकवर खूप जास्त सक्रीय असतील त्यांना तात्या माहित नाही असे अभावानेच दिसेल. त्यांच्या लिखाणाची शैली जबरदस्त होती. आम्ही जरी एकमेकांना प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी तात्या माझे फेसबुकवरील गुरु म्हणता येतील. कारण त्यांच्या हलक्याफुलक्या फेसबुक पोस्ट वाचूनच मीही फेसबुकवर वेगवेगळे प्रसंग चितारू लागलो. व्यक्तिचित्रण कसे असावे हेही मी त्यांच्या पोस्टवरूनच शिकलो. इतकेच काय तर आजकाल मी माझ्या पोस्टच्या खाली जे ‘–आठवणीत रमणारा मिलिंद’, ‘–भक्त मिलिंद’, ‘–सामाजिक मिलिंद’ अशी बिरुदे स्वतःला चिटकवून घेतो ती देखील त्यांचीच स्टाईल.
देवाने या माणसाला दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळे मुबलक प्रमाणात दिले होते. साक्षात भारतरत्न भीमसेन जोशी यांचे शिष्यत्व, मोठमोठ्या कलाकारांचा सहवास, अप्रतिम आवाज, रागदारीचे उत्तम ज्ञान, लिखाणाची अतिशय सुंदर शैली, सोशल मिडीयावर भरपूर वाचक, नर्मविनोदी स्वभाव, बेदरकार वृत्ती, मनात येईल ते बिनधास्त बोलण्याची हिंमत, सोशल मिडीयावर मिळणारी भरपूर प्रसिद्धी… आणि त्याच बरोबर दारूचे व्यसन.
मग कोणत्या दोन गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या? एक म्हणजे सहनशीलता. कुणी ‘अरे’ म्हटल्यावर तात्या ‘कारे’ म्हणणारच. समोरच्या व्यक्तीची भीडभाड या माणसाने कधीच ठेवली नाही. अर्थात ज्याच्या पाठीवर मोठमोठ्या व्यक्तींनी प्रेमाची थाप दिली आहे त्याला सोशल मिडीयावरील सेलेब्रिटीची काय तमा असणार? आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. व्यसनाधीनता आणि पैशाची आवक कमी असल्यामुळे आपोआपच कर्जबाजारी पणाही वाढला तर त्यात नवल ते काय?
आज सकाळी पोलिसांना तात्यांच्या फ्लॅट मध्ये त्यांचे पार्थिव खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत मिळाले. शेजारच्या खोलीत त्यांची ८४ वर्षांची आई झोपलेली होती. तिला कुणाचा आधार असल्याशिवाय काहीही करता येत नाही. आणि आज तिचा तो आधारही कायमचा संपला. त्या माउलीला हा आघात कितपत सहन होईल हा प्रश्नच आहे. समजा तो जरी तिने पचवला तरी त्यानंतर तिचे पुढचे जीवन कसे असेल हाही एक प्रश्नच आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. पुढील तपासात शवविच्छेदनानंतर खरे कारण समजू शकेल. पण मला वाटते कर्जबाजारी पणा आणि पुढे कसे होईल या गोष्टीचा मनावर येणारा ताण त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असावा.
तात्यांचे अकाली जाणेही मला काही गोष्टी शिकवून गेले.
१. काहीही झाले तरी दारूला स्पर्श करायचा नाही. कधीकाळी इतरांच्या आग्रहाखातर घेतली जाणारी दारू कालांतराने व्यसन बनते. याच दारूपायी असामान्य कलाकाराचे असामान्यत्व झाकोळले जाते. त्याच्या अंगी असलेले सगळे चांगले गुण ‘शून्य’ ठरतात आणि अगदी हलाखीची परिस्थिती सामोरी येते. मग समाजात ना मान उरतो ना मित्रगण. प्रत्येक जण तोंडदेखले कितीही चांगले बोलले तरी त्याच्यापासून दूर राहण्याचाच प्रयत्न करतात.
२. कला असो वा बुद्धिमत्ता त्याचा अभिमान बाळगण्यापेक्षा त्याचा उपयोग करून घेता येणे जास्त महत्वाचे असते. पैसा जरी सर्वकाही नसला तरीही पैशाशिवाय जगणे खूपच अवघड आहे तसेच एखाद्याकडून मदत घेणे हा तात्पुरता उपाय असून स्वतः पैसा कमविणे हाच समाधानी जगण्याचा एकमेव मार्ग आहे.
३. फेसबुक किंवा Whats App वरील वाचक हे फक्त दोन मिनिटाचे मानसिक समाधान देतात. त्यासाठी आपला अमूल्य वेळ फक्त त्यावरच खर्च करणे आपल्या विनाशास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे आधी पोटापाण्याचा उद्योग करून पुरेशी तजवीज झाल्यानंतरच सोशल मिडीयावर सक्रीय होणे जास्त शहाणपणाचे ठरते.
— डोळे उघडलेला मिलिंद…
———————–
Vikas Mahamuni is with Chandrashekhar Abhyankar.
आज ओस पडलेली ओसरी तात्यामय झाली खरी पण तात्यांचे जाणे ही अंर्तमुख करून जाणारी घटना आहे.
गायकवाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये व्यक्त केले की सर्व जण(यात मीपण आलोय) श्रद्धांजली वाहतील पण ज्यावेळी मदतीचा हात पुढे करायला हवा होता तेव्हा माघार घेतील.
तात्या तुझ्याच शैलीत बोलायचे झाले तर सरणावरती असताना सर्व गुणगान करतील आणी जेव्हा मदतीचा हात पुढे करायला लागेल तेव्हा दूरवर पळतील…
खरंच अंर्तमुख करून गेली तात्यांची एक्झीट…
तात्या अभ्यंकर तुमच्या #आठवणी #विचार निरंतर स्मरणात राहतील…
बाकी श्रद्धांजली वगैरे काही नाही कारण ही शिळोप्याच्या ओसरीवर तात्यानू तुझे विचार सदैव ओसंडून वाहतील….
सकाळी बातमी कळली तेव्हापासून विषण्ण मनस्थितीत असलेला तात्याचा चाहता.
——————
Vinay Joshi
17 hrs
फेसबुकवर थोडंफार जे लिहायला शिकलो ते तात्या ऊर्फ चंद्रशेखर अभ्यंकर यांच्यामुळे.
त्यांच्या बेधडक लिखाणाचा मी फॅन होतो आहे आणि राहीन.
प्रत्यक्ष कधीच भेट झाली नाही. पण तरीही खूप वर्षांची ओळख असल्यासारखे फोनवर बोलायचो.
तुमचं राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक मार्मिक लिखाण आता कधीच वाचायला मिळणार नाही याचं दुःख वाटतंय तात्या.
तुमच्या पोस्टवरच्या अनेकांच्या कमेंट्सना तुम्ही दिलेले रिप्लाय वाचून हसण्याची काही शिकण्याची संधी अशी अकाली हिरावून घेऊन तुम्ही निघून गेलात.
मी अविवाहित आहे पण ब्रह्मचारी नाही असं बिनदिक्कत सांगण्याची हिम्मत तुमच्यात होती.
पंडित भीमसेन जोशी, किशोर कुमार, मधुबाला आणि अनेक दिग्गजांचे किस्से तुमच्या मनाच्या कप्प्यात होते आणि तुम्ही सढळ हस्ते ते वाटलेत आणि आमचं अनुभव विश्व वाढवलंत.
फोरासरोड ते फिल्मीस्तान अनेक अनेक विषयांवर विविधांगी पोस्ट लिहिल्यात. बिनधास्त कोणताही आडपडदा न ठेवता लिहिल्यात.
किती किती लिहू तुमच्यावर. शब्द कमी पडतील.
बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि फेसबुकच्या अभासी जगातला एक अवलिया तात्या.
वयानी मोठे असलात तरी माझा मित्र तात्या.
धक्का लावून गेलात.
जिथे असाल तिथे सुखी रहा.
भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रीराम. 💐🙏
तात्यांचा अभासी जगातला शिष्य आणि मित्र,
#विजो
विनय जोशी.
——————–
सुयोगा जठार
शिवराळ भाषा वापरूनही कधी अश्लील वाटलं नाही, असं लेखन की दैवी देणगी असल्यासारखे.. कोणताही विषय वर्ज्य नाही.. मातृभक्त, लोकप्रिय आणि पारदर्शक तात्या! आता कधीच वाचता येणार नाही! प्रत्यक्ष भेटले नसूनही खूप वाईट वाटले! 😢😢
मनाला चटका लावून गेले “तात्या”! 😢
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
—————–
Amit Joshi
आज “तो” गेला, एक fb वर गृप सुरू केला होता “शिळोप्याची ओसरी” आधी हे काय भलत नाव म्हणून हसलो नंतर गृप join केला , त्यातला तुमचा पोस्ट वाचत राहायचो, आवडत्या लेखकाचं पुस्तकाची आतुरतेने वाट बघतात तसा तुमच्या लिखाणाची वाट पाहायचो, तुमचं लिखानाला कधीच सीमा नव्हत्या सांगितलं खेळ राजकारण
एक दिवस अचानक तुमच्या पोस्ट येणं बंद झालं हे लक्षात आले आधी गृप बाहेर आहे का पाहिलं नंतर कळलं की तुमचं लिखाणच बंद झालं तस गृपची वर्दळ पण कमी झाली मध्ये मध्ये पोस्ट पण असायची की तुमच लिखाण आता तुमच्याच गृप वर नसत, तुमच्या बद्दल फारशी माहिती कळलीच नाही,
आणि आज ती बातमी कळली, तुमच्या बद्दल आणि तुमच्या स्वभाव बद्दल लोकांना किती प्रेम होतं ते आज दिवसभर वाचत आहे, तुमच्या आयुष्यात आलेल्या अडचणी आणि त्याबद्दल च्या चर्चा मला नेहमीच दुययम राहतील
माणूस म्हणून तुम्ही खरच खूप ग्रेट आहेत
पण एक अनुभव मात्र मला देऊन गेलात
“पैसा असला की सगळे आपले आणि नसला की सगळे दुरावले”
तात्या तुम्हाला मनापासुन श्रध्दांजली
🙏🏻
—————-
Mandar Kulkarni
कशाला त्या xxx च्या नादी लागतोस रे? भले ते असतील सेनेचे त्यांना मी अजिबात उभे करत नाही.बाकी भाजपात देवेंद्र आणि नरेंद्र सोडला तर xx कोणी कामाचे नाही. बाकी ते जाऊ दे माझ्या बाटलीचे काय? अस हक्काने विचारणारा, त्याच्या घरी गेल्यावर स्वतःच्या हाताने केलेला लाडू खायला देणारा, बायको गाते म्हंटल्यावर घेऊन आला का नाहीस असा रागवणारा, त्याला बाटली दिल्यावर अरे इतकी महागाची सवय नको लाऊस तू एकदा येणार वर्षातून फक्त….तात्या का गेलास सोडून? एकदा तरी बोलला असतास मनमोकळा…अरे नारायणाने दिलेला पैसा त्याच्याकडेच जातो ह्यावर माझा विश्वास होता आणि आहे..तुझ्यासाठी आम्हीच कमी पडलो तात्या…..
—–
Yogeshwar Kasture is with विनू ऊर्फ अजय कारुळकर
एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व तात्या🙏❤
शेवट तात्यांनी त्यांच्या लेखांचे पुस्तक लिहीलेच नाही।
भावपूर्ण श्रद्धांजलि 😔
निशब्द!
—–
Madhav Bhokarikar is with Chandrashekhar Abhyankar.
Yesterday at 3:06 PM
‘तात्या अभ्यंकर’ म्हणण्याइतका त्यांचा व माझा परिचय कधीच नव्हता. नाहीतरी या फेसबुकवरच्या परिचयाबद्दल काय सांगणार ? त्यांचा बाबू रद्दीवाला, रानडे काका, रिसबूड वहिनी या पात्रातून आपल्याला सांगत रहायचे, काही ना काही, अतिशय मार्मिकपणे !
त्यांच्या या लिखाणाच्या भलेपणाला झाकून टाकणाऱ्या, त्यांच्याबद्दलच्या काही बुऱ्या पोस्टपण वाचण्यात आल्या. मी ऐकलेली दोन-तीन वाक्ये, मला जीवनाचे कायम सार व मानवी स्वभाव सांगत असतात.
‘दुपारच्या बारा वाजेची वेळ मोठी वाईट असते.’
‘बुभुक्षित: किं न करोति पापम् ?’
‘गरिबीला मान-अपमान, बुद्धी काही नसते.’
त्यांनी कै. बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्या एका गीताची मला आठवण करून देवून, अगदी पार शालेय वयात लोटले होते. — चाहिये आशीष माधव
— आणि वकिलीचा व्यवसाय असल्याने, ज्यांना मी आपला वाटतो, ते मला अगदी मनमोकळेपणाने सल्ला विचारतात, आणि मी सांगतो. — बस ! त्यांचा प्रत्यक्ष फोनवर अडचणीत असलेला आवाज एकदा ऐकला, मी धीर दिल्यावर, त्यांच्या आवाजात झालेला बदल ऐकला, आणि समाधान वाटले ! एका अडचणीतील माणसाला धीर देण्याचे !
इथं फेसबुकवर ते कधीचेच दिसत नाही. —- आणि आता यापुढे दिसण्याची पण शक्यता नाही.
—————
Nilesh Shinde
तात्याला जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा त्याला मदत करु नका असे सांगणारेच आज श्रद्धांजली वाहतायत
काळाचा महिमा थोर आहे
तात्याय तस्मै नमः
————-
Mandar Kulkarni भारतात येतांना ड्युटी फ्री मध्ये गेलो की तात्यांची आठवण असायची. त्याला आवडते म्हणून रेड लेबल घेऊन जायचो. नक्की ये म्हणणारा, इनबॉक्स मध्ये येऊन आई आजारी आहे रे असे सांगणारा तात्या चटका लावून गेला
——
Chandravilas Durve
भावपूर्ण श्रद्धांजली💐
बरेच दिवस फेसबुक वर दिसत नव्हते. मी मेसेज केला आणि थोड्याच वेळात मला उत्तर आले.
नंतर मी फोन केला. आठवणीने फोन केला म्हणून भारावले होते. पण काही तरी प्रचंड दडपण होते. अडचणी होत्या. मी काही तरी मार्ग निघू शकेल आणि कसा निघेल ह्याची कल्पना दिली. मध्यंतरी दोनदा ठाण्यात येऊनही भेट होऊ शकली नाही.
काळाकडेच फक्त उत्तर होते!
💐
—————-
Vaibhav Kulkarni
Yesterday at 2:38 PM
साधारण पणे 5 एक वर्षांपूर्वी तात्या नामक व्यक्तीची ओळख ही फ़ेसबुक च्या माध्यमानातून माझी झाली सुरवातीला तात्या चे आंबट गोड पोस्ट खूप आवडू लागले, शब्दांचा राजा माणूस असलेला तात्या यांनी रेड लाईट या विषयांवरचे लेखन असो किंवा लाडू ची गोष्ट अगदी सहजपणे अलगत मनाला स्पर्श करून जात होती.
त्यात्या हा फक्त लेखनसम्राटचं नव्हता तर तो गायन सम्राट सुद्धा होता.
पंडित भीमसेन जोशी यांच्या आशीर्वाद लाभलेला व किराणा घराण्याचा दुर्लक्षित राहिलेला शापित गंधर्व होता तो
पंडितजींचा व अटलजिचा व बाळासाहेब यांचा अगदी निस्सीम भक्त होता तो अगदी म्हणजे त्यांच्या घरासमोरून जाताना सुद्धा पायातील वहाण सुद्धा हातावर घेऊन पुढे जायचा.
राजकारणातील थोर समीक्षक च होता तो प्रत्येक वेळी साधक बाधक चर्चा घडवून आपलं मतं स्पष्टपणे मांडायचा.
अमित शहा यांचे नाना हे नामकरण तात्यानी चं केले असावे .
अश्या या अजातशत्रू माणसाचे माझे खटके उडाले तर महाराष्ट्र मधील विधानसभेच्या वेळी सेना भाजपा वेगळे लढत होते आणि तात्या हाडाचा शिवसैनिक त्यामुळे काही काळ अबोला राहिला.
सुमारे दीड एक वर्षांपूर्वी मी मुंबई ला स्थायिक झाल्यावर खूप वेळा विचार येत होता की तात्यांना भेटावे घरी जाऊन.
व एक दिवस माझ्या मोबाईल वर फोन आला तात्याचा आणि त्याचा आवाज कापरलेले चिंतातुर होता ते म्हणाले आई ची तब्बेत खूप खलावली आहे काही पैश्याची मदत करता येते का बघ एक महिन्यात परत देतो.
मी पण लगेच होकार दिला व त्यांनी अकाऊंट नंबर पाठविला.
मी मित्र मंडळी यांच्या काढून मदत घेऊन त्यांना देवी इच्छुत होतो पण खूप जणांनी मला सांगितले की तू प्रत्येक्ष भेटून त्यांना पैसे दे व आई ची तब्बेतीची चौकशी कर.
तात्याना तसा निरोप दिला की मी येतोय भेटायला तर ते चाचपडले व म्हणाले मला वेळ नाहीये तू लगेच पैसे पाठव.
मला काहीच कळले नाही मग त्यांच्या जाणकार लोकांकडून माहिती घेतली तर कळले की त्यांच्या आईचे वय झाले आहे व दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत.
त्यानंतर खूप दिवस काही तात्यांशी संपर्क आला नाही पण एकदा मसेज आला की तुला राजकीय चर्चेत सहभागी होण्याचो इच्छा आहे का?
असेल तर सांग माझ्या स्मूहात सामील करतो फक्त अट हीच आहे की मला सध्या किरणामल भरायला पैसे नाहीत 500 रुपये दे।
मी लगेच होकार देऊन पैसे दिले व त्यांनी मला समूहात सामील करून घेतले त्यामुळे आज तुम्हा सगळ्या महानुभाव ची ओळख झाली व साधक बाधक चर्चा करायला मिळाली अधून मधून फोन यायचा त्याच की एक स्कीम आहे बघ घेतो का वगैरे?
पण घरगुती कारणास्तव मी व्यस्त असल्यामुळे त्यांना सांगितलं की मी यातून बाहेर आलो को करेन मदत आणि ते म्हणाले की अनुलुप विलोम चा कार्यक्रम करू पण आज ही बातमी या समूहावर समजलो अगदीं पोटात गोळा आला व आपला घरातली कोणी तरी गेला असे दुःख झाले..
देव त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हीच मनोकामना 💐💐
©वैभव कुलकर्णी
—————-
Mahesh Bhagwat
नुसत्या फेसबुक वर झालेली ओळख.पण मनाला भावलेला अवलिया.
कलासक्त संगीतवेडा, माणूसवेडा, खवय्या, मातृभक्त, बिनधास्त आणि बेडर, जातीयवादास कडाडून विरोध करणारा. आणि एक चांगला संवेदनशील लेखन करणारा लेखक हरपला. आमची शिळोप्याची ओसरी पोरकी झाली. आमचा प्रिय तात्या आम्हाला सोडून गेला.🙏💐💐💐
——–
Bala Zodge मला तर अजूनही खरं वाटत नाही.
मुंबईच्या कामाठीपुर्यापासून ते ठाणा चेकनाक्यापर्यंत याला खडानखडा माहिती होती.
शिवाय प्रत्येक गोष्टीचे ज्ञान
एकदम दिलखुलास
Mahesh Bhagwat Bala Zodge होय,तुम्हाला प्रेमाने आमचा बाळा असे संबोधणारा. विश्वंभर चौधरी यांना मिस्कीलपणे विचारणारा की काय हो विसुभाऊ ह्या चॅनेलवाल्यांकडून बोलण्याचे किती रुपये मिळतात तुम्हाला. अतिशय लोपटाळू, प्रेमळ,दिलखुलास व्यक्तिमत्व होते.
तुमच्या चारोळ्या ते आवर्जून शेयर करत.
———-
Shrinivas Phadke
Yesterday at 1:22 PM
तात्या अभ्यंकर यांच्या मुळे फेसबुकवर लिहायला लागलो. राजकीय तात्या आणि शिळोप्याच्या ओसरी या दोन्ही ग्रुपवर मोकळे वातावरण होते. तात्या स्वतः मार्मिक भाषेत पोस्ट, नर्म विनोदी चुटके किंवा मल्लिनाथी करीत त्यामुळे तात्यांना विनोदाचे चांगले अंग होते .संगीत हा त्यांचा प्रांत होता त्यांचे गुरु भीमसेन जोशी आणि अनेक गायकांच्या रुह्य आणि लक्षात राहणाऱ्या आठवणी ते सांगत.त्यांच्याच भाषेत त्यांचा अनुभवाचा कॅनव्हास खूप मोठा होता त्यात लालबत्ती पासून खासदार नगरसेवक हे सर्व होते .
तात्या गेल्याची बातमी आली आणि ती खोटी ठरावी असे खूप वाटत होते त्यांनी तात्याची बडबड असा WA ग्रुप काढला होता त्या साठी त्यांनी मला फोन दिला होता तो फिरवून पलीकडून तात्यांचा आवाज येईल या आशेने मी सकाळपासून फोन लावत होतो प्रथम तो कोणी उचलला नाही आणि आता बंद झाला आणि ही वाईट बातमी खरी ठरली
ईश्वर तात्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या मातोश्रींना पुत्रशोक सहन करण्याचे सामर्थ्य .
————–
नरेंद्र गोळे
मनोगत डॉट कॉमवर आंतरजालीय, अनिर्बंध सत्वर प्रतिसाद चर्चा, देवनागरीत प्रथमच शक्य झाली होती. त्याचा आनंद आम्ही सारेच घेत होतो. क्वचित स्वातंत्र्याचा गैरवापरही व्यक्तिगत टीकेकरता होऊ लागला. मग तेथील प्रशासक श्री. महेश वेलणकर ह्यांनी प्रत्येक नोंदीवर प्रकाशनपूर्व निर्बंध घातले. त्याचा निषेध करण्यासाठी मग मनोगत कट्टा झाला. आयोजकांत एक होते तात्या. मी त्यांना म्हटले की प्रशासकांवर टीका करण्यापेक्षा ’मनोगता’ला उत्तर देण्याकरता तुम्ही ’जनोगत’ काढा आणि चालवून दाखवा ना! त्याला तात्यांनी मिसळपाव डॉट कॉम काढून उत्तर दिले. त्या सर्व जालसंजीवित आठवणींचा गुच्छच ह्या फोटोत दडलेला आहे. मात्र तात्या आज नाहीत. काल होते. आज नाहीत. तात्यांना ईश्वर सद्गती देवो.
Satish Lahane
अभिराम दीक्षित यांच्या Wall वरुन
तात्या वारला
चंद्रशेखर अभ्यंकर असं भारदस्त नाव धारण केलेला हा आडमाप माणूस – वयाने आणि आकाराने माझ्यापेक्षा बराच मोठा होता . मोठा असूनही त्याला कधी अहोजाहो केलं नाही . तो वारला हे भिडेखातर लिहितोय – तात्या मेला अस लिहिलं पाहिजे .
काही वर्षापूर्वी भारतात होतो तेव्हा तात्याच्या अनेक भेटी व्हायच्या . सोशल मीडियातून मला भरगच्च मित्र मिळाले . पुढे वेगवेगळ्या कारणांनी सगळेच दुरावले – त्यातला तात्या प्रमुख ! फेसबुक आणि ऑर्कुट लोकप्रिय व्हायच्या आधी – मिसळ पाव हा नव्या मराठी लेखकांचा अड्डा होता . तात्या त्यातला मुख्य माणूस . तो फोरास रोड च्या वेश्यावस्ती पासून सुधीर फडकेंच्या गाण्यापर्यंत कशावरही लिहायचा . मी अति पुरोगामी लिखाण सुरु केले की ढुंगण वर करून झोपलेल्या नागड्या बाळाचा फोटो टाकायचा – वर म्हणायचा हे आस्तिक नास्तिक विज्ञान वगैरे – वाद विवाद संपेपर्यंत तात्या ढुंगण वर करून झोपला आहे .
तात्या शिवसैनिक होता . आमची मैत्री झाली ते आम्ही दोघंही शिवसेना असल्याने . तात्या शिवसैनिक होता हे कौतुक नाही , मी पण होतो, मुंबई ठाण्यातली निम्मी मराठी माणसं शिवसैनिकच असतात . संघ भाजप विरुद्ध मनापासून दंड ठोकणारा तो शिवसैनिक होता . तात्या ची शिवसैनिक गिरी समजण्यासाठी मुंबईचा कनिष्ठ मध्यम वर्गीय गरीब मराठी माणूस समजून घेतला पाहिजे . मुबईतला भाजपा गुजराथी मारवाडी श्रीमंतांचा पक्ष आहे . डाळीच्या भावाची चिंता असलेला मराठी माणूस मुंबई भाजपात नाही . मागे डाळीचे भाव वाढले तेव्हा कचकून शिव्या खाल्ल्या मोदीने तात्याच्या . पुढे तो स्वतःला काँग्रेसवाला म्हणायचा कधी बहुजनसमाजमावादी चित्पावन म्हणायचा !
तात्या अभ्यंकर चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण . तात्याच्या जातीचा उल्लेख करण्यामागे एक महत्वाचं कारण आहे . लेखाच्या शेवटी ते देणार आहे . आटपाट नगरात एक गरीब ब्राम्हण राहत होता अशा गोष्टी आपण लहानपणापासून वाचल्या आहेत . 1990 नंतर जागतिकीकरणाच्या अर्थव्यवस्थेत आटपाट नगराच्या कथा गेल्या . मुंबई पुण्यातले गरीब ब्राम्हण सुद्धा गेले . शिकले इंग्लिश बोलले ते बाहेर गेले . काळाच्या मागे राहिलेले , न शिकलेले अडाणी मूंबईतून बाहेर फेकले गेले . मुंबई अडाणी अंबानींची झाली . थोडक्यात उद्याच्या अन्नाची चिंता असलेला ब्राम्हण शिल्लक राहिला नाही . तात्या राहिला .
त्याच वडिलोपार्जित लहान घर ठाण्यात होतं त्यात राहिला . हिशोबनीस म्हणून फोरास रोडच्या बार मध्ये कामं केली . दोन पेग नी घसा ओला करत कोणत्याही बार मध्ये बाबूजींचं , माडगूळकरांचं – गीत रामायण गात राहिला . तात्याच्या आवाजात भारदस्त पणा होता . प्रेम वासना गाणं दारू वेश्यावस्ती या सगळ्यावर लिहिताना आणि बोलताना त्याच्या व्यक्तिमत्वातला भारदस्त पणा दिसत असे . तात्या वेश्या वस्तीत फिरायचा . पण त्याचं पुरुष म्हणून स्खलन झालं नाही आणि प्रेमाची किंमत त्याच्या लेखी कमी झाली नाही . उलट वाढली .
एक काळ असा होता की , बरेचसे गरीब ब्राम्हण ट्रॅफिक लायसन्स आणि एलआयसी चे एजन्ट असायचे . तात्या ते होताच . शिवाय तो शेअर मार्केट चा पण एजन्ट होता . इंट्रा डे शेअर मार्केट हा जुगार आहे . पैसे छापायचे मशीन कोणी विकत नसतो . बौद्धिक आणि शारीरिक कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत हे अर्थशास्त्र कळण्याची बौद्धिक कुवत त्याच्यात निश्चित नव्हती . निष्पाप आणि निर्मळ नसला तरी तो जाणून हलकट निश्चित नव्हता . तो त्या शेअर मार्केट च्या दुष्टचक्रात गेला . मग लोकांकडून पैसे उधार घेणं आलं . दुप्पट करतो आलं . त्याच्या नावाने पेपरात नोटिसाही आल्या . पण तात्याने अनेकांचे पैसे बुडवले तसे अनेकांना दुप्पट करून सुद्धा दिले होते .
तात्याची पिसं काढता येतील – ते सोप्प आहे . त्याचं गरीब ब्राम्हण असणं मात्र समजून घेणं अनेकांना अवघड आहे . तात्या अविवाहित होता . त्याचा जबरा प्रेमभंग सामाजिक कारणामुळे झाला असावा . तितकं मोकळं आणि खरं तो नेहमी बोलेल याची खात्री नाही . तो दुःखी नव्हता पण त्याच्या अडाणचोट रांगड्या वृत्तीत एक एक घाबरलेला आणि हरलेला माणूस होता .
माझी तात्याशी पहिली भेट 2013 साली झाली असावी . त्याच्या आधी फक्त इंटरनेट वर ओळख होती . मला त्याचं लिखाण भारी वाटलं होत . कोणी दुढाचार्य चष्मांवाला, शर्ट इन केलेला अभ्यंकर मला अपेक्षित होता . जे पाहिलं – तो सरळच पेशन्ट होता शर्टाच्या गुंड्या खालीवर लावल्या होत्या . तोंडात गुटखा तंबाकू खाऊन पांढरे घट्टे पडले होते . वजन जास्त . ब्लड प्रेशर मुळे हाताला किंचित कंप होता.
पहिल्याच भेटीत त्याने माझ्याकडे पैसे मागितले . शेअर मार्केट मध्ये लावून डबल करतो बोलला . त्याची बुडणाऱ्या पैशाबद्दलची कीर्ती आधीच ऐकली होती . गरिबी सुद्धा माहीत होती . पैसे बुडणार हे निश्चित होतं . पण त्याची नड पण समजत होती . जितके मागितले तितके दिले . पण एक अट घातली दुप्पट कर पण परत देऊ नको . त्यानंतर तात्याने मला कधी पैसे मागितले नाहीत .
त्याची बार मधली गाणी ऐकली . भीमसेन जोशी आणि बाबूजींचे किस्से ऐकले . तात्या थोरामोठयाच्या संगतीत राहिला . पण मोठा झाला नाही लहान मुलासारखाच राहिला . तात्याची एक आई आहे . तात्या मेला तो त्या आईच्या साक्षीने . आई खूप म्हातारी आहे . तात्याने तिची वर्षानु वर्ष सेवा केली आहे . तात्या तिचं सगळं नित्यनेमाने प्रेमाने करायचा . लहान मुलासारखाच आई आई बोलायचा .
तात्याने लग्न केले नाही , स्त्री प्रेमासाठी तो आसुसला होता . विषय काढला लग्नाचा तर म्हणायचा लग्न करून सुद्धा तुम्ही तसेच भोंगळे रहाणार लेको ! तात्या मेला तेव्हा त्याची आई जिवंत होती . आईने माझा श्रावणबाळ म्हणून हंबरडा फोडला . आईला हलता सुद्धा येत नाही . एक गरीब ब्राम्हण मेला . त्याच्या आईचं बघायला कोणी नाही .
…………
Amit Joshi तात्या वाईट अजिबात नव्हते, लोकांचे पैसे बुडाले ही असतील त्याच वाईट पण तात्या वाईट अजिबात नव्हता
———-
Suresh Kalekar तात्या अभ्यंकर फेसबुकवरील एक जिंदादिल रसिक व्यक्तिमत्व होते .. पंडित भीमसेन जोशी चे शिष्यत्व लाभलेले पुल कुमारजी यांचे प्रेम लाभलेले. स्वर भास्करांचे स्वरसाक्षर शिष्य.. छान गळा लाभलेले..
विनोद शैली प्रसन्न करून जाई.. फोरास रोड ते राजकीय दंगल कोणताच विषय वर्ज्य नसे.. हाडाचे शिवसैनिक असल्याने बाळासाहेब दैवत मानत..
दारूचे व्यसन हा मोठा ड्राॅ बॅक होता.. ताणावर दारू हे औषध मानणारे जे लोक असतात त्यातले ते होते..
ठराविक पैसे येत राहतील असे काही साधन नव्हते.. पैशाची चणचण असे..
तात्या सोबत मी कनेक्ट होतो.. भेट झाली नाही पण फोन होत.. फोनवर मला काका संबोधत .. पोस्टीवर कमेंट प्रतिकमेंट होत..
..
अंथरूणावर एकाच जागी खिळलेल्या आईची प्रचंड काळजी होती सेवा ही करत होते ते.. मातोश्री साठी ते सदैव तळमळत असत.. तिच्या आजारपणासाठी माझ्या कडून घेतलेली रक्कम वर्षभरात परतही केली.. . पुण्यात संगीत प्रेमी लोकांचा सक्रीय ग्रुप करण्याचा त्यांचा मानस होता पण ते जमले नाही.. पुण्यात तुम्हाला मी बादशाहीत जेवण देणार हे ते आवर्जून म्हणत पण त्यांना व मला ती वेळ साधता आली नाही.. दुर्दैव दुसरे काय.. रानडे काका सबनीस काकू मारिया शारापोव्हा चे काल्पनिक अफेअर ही विनोद शैली प्रसन्न करून जाई.. एक अवलिया माणूस होता तात्या.. .. सहा महिन्यात बरेच निष्क्रिय होते ते.. राजकीय तात्या व शिळोप्याची ओसरी हे फेसबुकवर ग्रुप होते त्यांचे.. मला वाटते हळूहळू त्यांचे जन कनेक्शन कमी होत गेले.. मागे पडत चालले होते..
काल अचानक हृदय विकाराच्या झटक्याने गेले ..
भावपूर्ण आदरांजली
त्यांच्या आईची मात्र खरंच काळजी वाटते..
****************************************************
स्व.तात्या अभ्यंकर यांनी सुरू करून नावारूपाला आणलेल्या मिसळपाव या संस्थळावरील सदस्यांना तर त्यांचे दुःख आवरत नव्हते. त्यांनी दिलेल्या शंभरावर श्रद्धांजलींपैकी काही प्रातिनिधिक श्रद्धांजलि खाली संग्रहित केल्या आहेत. त्या लिहिणाऱ्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार.
मिसळपाववरील प्रतिक्रिया
विजुभाऊ in काथ्याकूट
15 May 2019 – 12:09 pm
गाभा:
इथे असलेल्या नव्या सदस्याना कदाचित ठाऊक नसेल मिसळ पाव हे संस्थळ तात्या अभ्यंकर या कलंदर माणसाने सुरू केले.
संगीत साहित्य खादाडी अशा अनेक विषयाम्मधे उत्तम गती असलेला तात्या एक भन्नाट व्यक्तिमत्व होता . होता म्हणताना वाइट वाटतेय.
मिपच्या रुपाने आपल्या सर्वांना व्यक्त होण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ तात्याने दिले .
तात्या आणि त्याच्या मुशाफिरीवर खूप काही लिहून होईल.
बोलायला वागायला बिंदास असणारा तात्या गाण्यातला दर्दी होता. त्याने खूप ऐकले होते. तो स्वतः गायचा.
तात्या ने मिपावरचा वावर बंद केला त्यालाही बरीच वर्षे झाली. फेसबुकावर त्याने शिळोप्याची ओसरी नामक पेज सुरू केले होते तो तेथे लेखन करायचा
मिपावर विसोबा खेचर या नावाने लिहीलेल्या त्याच्या संगीतविषयक चित्रपट विषयक लेखांची जंत्री देता येईल .
https://www.misalpav.com/node/10995 देवगंधर्वांचं ‘पिया कर..’, थोडं गोविंदरावांचं आणि थोडं नारायणरावांचं ‘मधुकर वन वन’
https://www.misalpav.com/node/2455 बसंतचं लग्न ( ही आख्खी लेखमाला आहे)
तात्याची रौषनी तर मला कित्येक संस्थळावर वाचायला मिळाली.
https://www.misalpav.com/node/1901 गोपाला मेरी करुना
https://www.misalpav.com/node/1346 काही ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे!
https://www.misalpav.com/node/20610
https://www.misalpav.com/node/805 आज़ जाने की जि़द ना करो…
कालच तात्याच्या रौषनी धाग्यावर तात्या भेटणार नाही असे कोणाला तरी म्हणालो आणि आज तात्या गेल्याची बातमी येते हे धक्कादायक आहे.
तात्या ने मिपाला आणि मिपाकराना खूप काही दिलंय.
या धाग्यावर तात्या तुम्हाला भेटला त्या च्या काही चांगल्या आठवणी शेअर कराव्यात ही विनंती.
इश्वर मृतात्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना _/\_
——-
भावपूर्ण आदरांजली.
15 May 2019 – 12:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सकाळी दहाच्या सुमारास वाट्सपवर मेसेजेस यायला सुरुवात झाली आणि धक्काच बसला. मराठी संस्थळं मुक्त असली पाहिजे, लिहिण्या बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे या ध्येय-धोरणातून मिपाची ज्यांनी स्थापना केली ते तात्या अभ्यंकर, उर्फ चंद्रशेखर अभ्यंकर एक उमदं व्यक्तिमत्व. शास्त्रीय संगीत, ती घराणी, व्यक्तिचित्र, खुसखुशीत लेखन, प्रतिसाद, वाद यासोबत उत्तम लेखन करणारा मिपाकर आज गेला. अतिशय दु:ख होत आहे.
भावपूर्ण आदरांजली.
-दिलीप बिरुटे
————–
ओह गूडनेस, माझा तात्यांचा
15 May 2019 – 1:15 pm | माहितगार
ओह गूडनेस, माझा तात्यांचा परिचय ऑनलाईनच म्हणजे मनोगत संस्थळावरचा, मनोगतच्या लेखकांनी मराठी विकिपीडियावर सुद्धा लेखन करावे असे आवाहन करणारा आणि विकिपीडियाचे फायदे नमुद करणारा लेख मनोगतावर लिहिला . चर्चे दरम्यान विकिपीडियावर भरपूर टिकाही झाली आणि मी त्यास शक्य ती उत्तरे दिली. आक्षेप नोंदवणारी बहुतेक मंडळी नंतर थोडे थोडे का होईना मराठी विकिपीडियावर लेखन करून गेली. जोरदार आक्षेप नोंदवणार्यांमध्ये मला तात्या आघाडीवर होते ते आठवते. मी त्यांना उत्तर दिले आणि नंतर त्यांनी मराठी विकिपीडियावर येऊन लेखन केले.
माझी तात्यांबद्दलची तेव्हाची प्रतिमा प्र.के.अत्रेंसारखा शब्दांचा वापर करताना भीडभाड न बाळगणारा माणूस अशी होती. त्यांना मराठी विकिपीडियावर लिहिताना पाहताना खरे सांगायचे तर मनातून धास्तावलो होतो कारण त्यांनी त्यांची -ज्ञानकोशाच्या संकेतात न बसणारी- शब्द संपत्ती इतर ठिकाणच्या संकेतस्थळाप्रमाणे मराठी विकिपीडियावर मोकळी केली असती तर असा विचार मला नाही म्हणाले तरी जरासा चिंतीत करून गेला. पण माझी ती चिंता अनाठायी होती हे काही महिन्यातच मला उमगून गेले. मराठी विकिपीडियावर त्यांनी अदमासे २०० ते २५० संपादने केली असावीत मुख्यत्वे शास्त्रीय संगितातील राग आणि काही शास्त्रीय गायक यांच्या बद्दलच्या लेखांची सुरवात त्यांनी केली.
त्यांनी दुसरा ऑनलाइन संपर्क केला ते मला मराठी विकिपीडियाबद्दल मराठी विकिपीडियाच्या कक्षेत न बसणारी चर्चा करण्यासाठी मिपाचे व्यासपीठ वापरावे अशी गळ दोन तीनदा तरी घातली असेल. विकिपीडियाला कमी सेंसॉरशीपवाल्या सपोर्टची गरज भासते तसे मला तात्यांच्या संस्थळावर चर्चा करण्याचा विचार मनातून भावला कारण काही झाले तरी मनोगता प्रमाणे तात्या सेंसॉरशीपची तलवार चालवणार नाहीत हा विश्वास होता. पण मी मिपावर बर्याच उशीराने लिहिता झालो तो पर्यंत मिपाचे हस्तांतर झाले होते . तात्या करतील त्या पेक्षा सेंसॉरशीपची एक लेयर शक्यता अधिक राहीली तरी खूप जाच करणारी नसल्याने टिकून राहू शकलो आहे. पण मिपावर या या आग्रहाचा त्यांचा संवाद झाला तसा पुन्हा झाला नाही. एक आश्वासक व्यक्तिमत्व काळाच्या आड गेलेल ऐकुन मनाला हुरहूर लागते ती तशी लागली.
शोकसभा आयोजीत होत असल्यास या धाग्यावर कळवावे हि नम्र विनंती.
तात्या अभ्यंकर अर्थात विसोबा खेचर यांच्या मराठी विकिपीडियावरील योगदानाचा दुवा
—————-
तात्या गेले ही बातमी वाचुन
15 May 2019 – 2:22 pm | स्मिता श्रीपाद
तात्या गेले ही बातमी वाचुन खुप धक्का बसला.
पूर्वी च्या मिपा वर तात्यांचा मुक्त वावर होता. गेल्या काही वर्षात ते इथे नव्हते.
मिपा मालक अशीच माझ्या मनात त्यांची तेव्हापासुन प्रतिमा होती.
रोज मिपा च्या मुखपृष्ठावर सुंदर सुंदर ललनांचे फोटो टाकायचे तात्या एकेकाळी :-)… आणि बहुतेक सोबत एका पदार्थाचेही..नीटसं आठवत नाही.
मिपा एकदम happening वाटायचं तेव्हा…रोज ऑफिस मधे आलं की पहिलं मिपा वर जाउन बघायचे मी की आज काय नवीन.
तात्यांसोबतच प्राजु, स्वाती दिनेश, अपर्णा ताई, रेवती, चतुरंग ही सगळी मंडळी एकदम खुप खुप जुन्या ओळखीची वाटायची.
तात्यांचा साहित्य, संगीत, खादाडी सगळेकडे मुक्त संचार होता.सगळ्या लेखांवर त्यांची आवर्जुन प्रतिक्रीया असायची.त्यांचे लेखच नव्हे तर प्रतिक्रीया वाचायला पण मला मजा यायची.
आणि प्रतिक्रीया वाचुन तात्या स्वभावाने किती मोकळे ढाकळे असतील याचा अंदाज यायचा.
माझ्या आठवणीप्रमाणे “फोटो बघुन खपलो आहे, वारलो आहे ई ई” अशी कमेंट पाककृती च्या लेखावर द्यायची सुरुवात बहुतेक तात्यांनीच केली असावी.
स्वाती दिनेश च्या सासरेबुवांनी एक लेखमाला इथे लिहिली होती. त्यांच्या संपूर्ण आयुष्यातल्या आठवणी, आत्मचरीत्रपर लेखन होतं ते.
ते लिहिणारी व्यक्ती स्वाती दिनेश चे सासरे आहेत हे शेवटच्या भागात कळलं होतं सगळ्यांना.
” आज मिसळपाव संकेतस्थळ सुरु केल्याचं सार्थक झालं” अशा आशयाची तात्यांची त्यावर काहितरी कमेंट होती त्यावर.
कौतुक करायचं तर दिलखुलास आणि शिव्या पण मोकळेपणाने द्यायच्या अशी माणसं खुप कमी असतात.
तात्या, तुमच्या आत्म्यास शांती लाभो. __/\__
———–
धक्कादायक
15 May 2019 – 4:46 pm | विकास
आत्ता आमच्या सकाळी काही मित्रांच्या मेसेजेस मुळे ही बातमी वाचली आणि क्षणभर विश्वास बसला नाही.
तात्याला पहिल्यांदा मनोगत संस्थळावर पाहिले होते. तिथल्या शिस्तीच्या विरोधात तो त्याच्या स्वभावाप्रमाणे विरोध करायचा. तिथूनच काही जणांनी उपक्रम हे संस्थळ चालू केले. तेथे पण तो सक्रीय होता. पण परत शिस्तीचे वावडे असल्याने आणि तसेच त्याच्या डोक्यात खरेच मोकळीढाकळी वेबसाईट चालू करायचे आले आणि तशी त्याने मिसळपाव करून दाखवली. तात्याचे या संदर्भातील जे गुण होते ते खरेच एखाद्या entrepreneur ला शोभतील असे होते. त्याने नुसतेच स्थळ चालू केले नाही तर माणसेपण ओढून आणली, मैत्री केली… मराठी संस्थळ अशा पद्धतीने नावारूपाला आणणारा कदाचित तो एकोहम असावा. आणि त्या साठी तो कायम लक्षात राहील.
तात्याला भावपूर्ण श्रद्धांजली.
————————-
तात्याला अप्रत्यक्षरीत्या
15 May 2019 – 7:02 pm | माझीही शॅम्पेन
तात्याला अप्रत्यक्षरीत्या भेटलो होतो म्हणजे तो माझ्या लग्नाला बायको कडून आला होता , हेहि मला बऱ्याच कळालं , एक हरहुन्नरी ,वादळी माणूस , लेखन कौशल्यात कोणीही हात धरू शकणार नाही , एकदा / दोनदा आपण नक्की भेटूया एवढ्यावरन पुढे सरकलोच नाही. पुढे अनेक वादविवाद पुढे आल्यावर भेटावं असं वाटलं नाही , पंडित भीमसेन (अण्णा ) ह्यच्या बद्दल भरभरून लिहायचा , अण्णा गेल्यावर सैरभैर होऊन लेख लिहिला होता.
इतक्या लहान वयात आंतरजालावर लोकप्रिय असणारे व्यक्तिमत्व हरपणे हे निश्चित दुःखदायक आहे
——————-
या आभासी जगात , आभासी जागेत ,
15 May 2019 – 7:25 pm | खिलजि
या आभासी जगात , आभासी जागेत , मराठीचे स्थान बळकट करणारे , मिपाचे संस्थापक कै. तात्या अभ्यंकर यांना विनम्र श्रद्धांजली … त्यांना बघितलं नाही पण एक मात्र नक्की त्यांनी आपल्यासारख्या बर्याच जणांना एक अशी अनमोल जागा निर्माण करून दिलीय कि त्याला या आभासी जगात कुठेच तोड नाही आहे . मिपा जसेजसे वृद्धिंगत होत जाईल , तशी तशी त्यांची महती दिगंत होत जाईल . हे लवकरात लवकर व्हावे , हि शंभू महादेवाकडे प्रार्थना …
————
भावपूर्ण श्रद्धांजली
15 May 2019 – 7:32 pm | बाबा योगिराज
तात्याला मी फक्त मिपावरील लेखनसाहित्यामुळेच ओळखत होतो. मध्यंतरी फार काही कानावर आलं होतं, पण मला तात्याच लिखाण फार आवडायचं म्हणून मी त्याकडे कधी लक्ष दिलं नाही. सुरवातीला मी तात्याला भेटायचा एक दोन वेळेस प्रयत्न केला होता परंतु भेट काही घडली नाही.
कुणासाठी तो कसाही असो माझ्यासाठी तरी तो माझा आवडता लेखक होता. आणि काहीही घडलेलं असलं तरी आपल्या सगळ्यांना मिपाच्या माध्यमातून एकत्र आणणारा होता. तात्याच अकस्मात आणि अश्या पद्धतीने निघून जाण फार धक्कादायक आहे.
तात्या मिसळपाव साठी खरच धन्यवाद. तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
ओंम शांती शांती शांती: _____/\____
तुझ्या लेखनाचा पंखा
बाबा योगीराज.
——————–
अरेरे
15 May 2019 – 8:09 pm | अभ्या..
खरोखर वाईट बातमी,
मी मिपावर आलो तेंव्हा तात्या सक्रीय नव्हते पण त्यांचे खूप लेखन आणि प्रतिसाद वाचलेले होते. निकम्मा तम्मा तात्या किंवा बाझवलाभेंचो सारख्या शिव्या देऊन सतीसभौ(मोकलाया फेम) समोर आपली शुध्दलेखनाची हार मानणारे प्रतिसाद, अनुष्का शेट्टीचे फोटो टाकून “हिच्यावर आमचा भारी जीव” असे प्रतिसाद, थिंकमहाराष्ट्रच्या चर्चेनंतर साडेतीन टक्क्याचे ब्रॉडबॅन्ड बूड हलवून ड्रिंकमहाराष्ट्र करायला पळणारे तात्या, मिपासदस्यांशी कौटुंबिक पातळीवर गप्पाटप्पा हाणणारे रंगेल, कलंदर, संगीताचे दर्दी तात्या अशीच इमेज डोळ्यासमोर होती. मध्यंतरी काही कालावधीपुरते ते परत मिपावर लिहिते झालेली. त्यावेळी एकदा माझ्याशी संपर्कही केलेला(त्यांना माझा नंबर कुणी दिला हे अजुनही कळले नाही, आता तर बिलकुल कळणार नाही) होता. थोड्याश्या कौतुकाच्या आणि इतर गप्पानंतर सम्पर्क धंडावला. त्यानंतर तीनचार वर्षानी डायरेक्ट काल विजुभौचा रोषनीवर प्रतिसाद पाहुनच आठवण होते तो हि बातमी. विजुभउंना काय दिसले की काय स्वप्नात असे विचारावे वाटलेले पण सकाळी व्हाटसपावर सॅड न्युज कळली.
अशा आत्म्यांना शांती देवो असे आम्ही पामर काय म्हणणार. त्यांच्या दैवतासमान आण्णांच्या संगीताचा, खादाडीचा ते तृप्त मनाने आस्वाद घेत मनसोक्त बैठका रंगवोत इतकीच इच्छा.
इत्यलम
——
श्रद्धांजली
15 May 2019 – 9:47 pm | डॉ.प्रसाद दाढे
मिसळपावमुळे म्हणजे खरं तर तात्यांमुळे माझ्यासारखे अनेक जण ‘लिहिते’ झाले. इथे अनेक समविचारी मित्र मिळाले. रामदास, बिपीन, विजुभाऊ, भडकमकरमास्तर, चतुरंग, पिवळा डॅमबिस, केशवसुमार, धमु, प्रभाकर पेठकर आणि अर्थात स्वतः तात्या अश्या अनेक दिग्गजांनी मारलेले चौकार, षटकार आणि त्यावरच्या एकेकाच्या अफलातून प्रतिक्रिया हा सगळा एक सोहळा होता.
तात्या फॉर्ममध्ये होते तेव्हाचे धमाल किस्से इथल्या जुन्या मंडळींच्या आठवणीत आहेतच. त्या आठवणीच आता सोबत राहतील
——
अरेरे
15 May 2019 – 10:45 pm | पिवळा डांबिस
अतिशय दु:ख्खद बातमी. मृतात्म्यास आदरांजली…
तात्याच्या लिखाणामुळेच तर मी मिपावर आलो. वर डॉ. दाढेंनी म्हंटल्याप्रमाणे सुरवातीच्या काळात एक इरसाल ग्रूप जमला होता.
तात्याशी चर्चा, थट्टामस्करी आणि हो, वादही भरपूर घातले.
कुणाचं काही चांगलं लिखाण अतिशय आवडलं की तो ख-प-लो, असं म्हणून त्याचा स्वतःचा हार घातलेला फोटो प्रतिसादात द्यायचा.
इतक्या लवकर ते खरं ठरेल असं अजिबात वाटलं नव्हतं…
कुणी मिपाकर गेल्याचं कळलं तर दु:ख्ख होतंच पण त्यात जर ती व्यक्ती माझ्यापेक्षा वयाने लहान असेल तर जास्त यातना होतात..
असो. ईश्वरेच्छा.
———-
अतिशय धक्कादायक बातमी!
17 May 2019 – 8:47 am | कानडाऊ योगेशु
अतिशय धक्कादायक बातमी!
खादाडी सदर व त्यासोबत एखाद्या सुंदर ललनेचा फोटो व सोबतची “ही आमची अनुष्का हीच्यावर आमचा फार जीव”
किंवा
फाट्यावर मारण्यात येत आहे.
चपला घाला आणि त्वरीत चालु लागा.
आणि ते सर्वात लोकप्रिय बाझवला भेंचोद
अश्यासारखे इतर शालजोडीतले खास तात्यांचेच असे ट्रेडमार्क्स होते.
व्यक्तिश: परिचय नसला तरी नेहेमी ओळख असल्यासारखेच वाटायचे.
तात्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
—–
तात्या …..
17 May 2019 – 9:28 am | चौकटराजा
खरे तर मी बराचसा तात्यासारखा आहे असे वाटतेय …. यमन , भीमसेन बालगंधर्व , शिव्या ,,,,मुक्त स्वभाव हे माझयाकडे आहे. मला ही व्यक्ती माझया पेक्षा १६ वर्षाने लहान आहे हे आज कळत आहे. माझा स्वभाव कितीही दिलखुलास असला तरी आपण होऊन परिचय करून घेण्याचा मात्र नाही. त्यामुळे मी विसोबा खेचर या आय डी शी परिचय करून घेतलाच नाही. मला इथे हे काही विद्वान , रसिक ,वात्रट मित्र भेटले त्याचे श्रेय नीलकांत व पर्यायाने तात्यांना जाते. सबब एक मिपावाला म्हणून अपरिचित आप्त गेल्याचे मला दुःख आहे. आत्मा बीत्मा मी काही मानत नसल्याने “सदगती ” वगैरे सोडा , जिवंतपणी अभ्यंकर यांनी जे कार्य केले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे !
———-
भावपूर्ण श्रद्धांजली
17 May 2019 – 9:56 am | सुधीर
२००२ मध्ये याहू चॅट आणि चॅट रूमची एक क्रेझ होती. मी कधी कधी याहू चॅट रूम्स मध्ये चॅट करायचो. पण कधीतरी २००७ मध्ये काही मराठीतले ब्लॉग्ज नजरेस पडले, तिथूनच मग मनोगत आणि मायबोली या संकेतस्थळाविषयी कळलं. मायबोलीचा पसारा जास्त होता. पण मनोगत खूपच आकर्षक वाटलं. का कुणास ठावूक मायबोलीचा इंटरफेस तितकासा आवडला नाही. मग मायबोली पेक्षा उपक्रम जास्त आवडू लागलं. कारण तिथे “त्यामानाने” फारशी बंधनं नव्हती. लोक खूप चांगल्या विषयावर चर्चा करायचे. मी वाचनमात्रच असायचो, पण चर्चा वाचायचो. बर्याच आयडींचा छाप होता. काहींची विद्वत्ता आवडायची. तर काहींचा व्यासंग. त्यातला एक आयडी आठवतो. तो आयडी होता सर्कीट. आणि काहींची काळजाला हात घालणारी पुलं सारखी शैली, अर्थात ती व्यक्ती होती, तात्या अभ्यंकर. तात्या आणि सर्कीटचा याराना त्यावेळेच्या सदस्यांना आठवत असेल. रोशनी सारखे लेख अर्थात उपक्रमच्या एकंदर चौकटीत बसत नव्हते. रोशनी मध्ये उत्सुकता होती आणि तात्यांची बंडखोरी वृत्ती तेव्हा आवडली होती. निलकांत-तात्यांनी मिळून रातोरात नवं संकेतस्थळ उभं केलं ते होतं ‘मिसळपाव’. मी पहिल्यादिवशीच आयडी घेतला. लेख सोडा, पण प्रतिसाद तरी लिहिन का? हे माहीत नव्हतं. पण मी या संकेतस्थळाच्या पहिल्या दिवशीच आयडी बनवला. तात्याशी प्रत्यक्षात कधी संबंध आला नाही पण तात्यांच्या मिसळपावने मला अभिव्यक्त व्हायला शिकवलं हेही तितकच खर. आणि तात्यांमुळे मला थोडीफार मराठी गाणी, नाट्यसंगीत आवडू लागलं. तात्यांना शेअर बाजार पण खूप आवडायचा. आणि त्यावेळेस मला शेअर बाजाराविषयी फक्त आकर्षण होतं. संकेस्थळावर पडीक असणं परवडनारं नव्हतं, त्यामुळे पुढे संकेतस्थळावर अधनं मधनं येणं व्हायचं. मधले काही संदर्भ लागले नाहीत पण काही व्यवहारांमध्ये इतर सदश्यांशी आलेल्या कटूतेमुळे “कदाचित” तात्या मिपा सोडून गेले असावेत असा अंदाज मी बांधला. तात्या त्यांच्या ‘वल्ली’ चितारताना काहीसा उदास शेवट लिहायचे. तात्यांच्या स्वतःच्या कथानकाचा शेवट सुद्धा असा चटका लावून जाणारा असेल असं वाटलं नाही.
————-
धक्कादायक !
17 May 2019 – 11:01 am | आवडाबाई
तात्या गेले, धक्का बसला.
मिसळपाव सुरू केले तेव्हा मनोगतवर संदेश करून इकडचे सदस्यत्व घेण्याचा आग्रह केला होता.
बंडखोर आहेत हे तर दिसतच होते, पण किती बंडखोर आहेत हे इथे आल्यावरच कळले. कधी त्यांचे म्हणणे पटायचे, अनेकदा नाही. शिवराळपणा जास्त झाला की कित्येक आठवडे मग फिरकायचे नाही इकडे. पण शेवटी यावेच लागायचे, काहीतरी छान लेखन तेवढ्यात मिस झाले असेल ह्याची जवळ जवळ खात्री असायची.
काहीतरी वेगळाच बिनधास्तपणा होता इथे. असो.
तात्यांचे वय एवढे कमी असेल ह्याची कल्पना नव्हती. त्यांच्या आईंबद्दल वाचून तर दु:खाला काळजीची किनार लागली. (त्यांच्यासाठी काही आर्थिक मदत गोळा होत असेल तर नक्की आवडेल भर घालायला.)
तात्यांना श्रद्धांजली .
————-
जो भी था जैसे भी था , तात्या शख्स दिल का अमीर था !
17 May 2019 – 1:08 pm | वाहीदा
मैं क्या कई लोग तात्या को रुबरु जानते थे ..उनसे कई बार मुलाकात भी हुई २००८ – २००९ के दरमीयान !वोह दौर हि कुछ और था नायाब दौर ! तात्याके वजह से कईयोंके कलम, तीर – कमान की तरह तरकश से बाहर निकाले जाते और लफ्जोंमे पिरोए जातें.. उन्होंने कईयों को लिखना सिखाया और कईयोंको अच्छा पढना | तात्याने लिखे लेख पढना एक मेजवानी हुआ करती .. तात्या मेजबान और हम सब मेहमान 🙂 और उन्ही के वजह से मिसलपाव याने आला दर्जे की मेजवानी !! कई लेखकों की एक से एक नायाब तहरीर हमें पढने मिलती और उससे भी ज्यादा उसपर आए हुए एक से एक कमेंट्स याने प्रतिसाद पढना याने Intellectual मेजवानी !
खैर, तात्या जिंदगी के उतार और चढाव बहोत देख चुके थे उस वजह से अज़ीम बनना मुश्किल था लेकीन अजी़ज़ जरुर थे.. उन्हें नसीब ने साथ नहीं दिया शायद उस वजह से दिलफरेबी भी हो गएं लेकीन दिलकश जरुर बनें रहे . माली हालात Financial Situation के वजह से गमगीन थे लेकीन फिर भी लिखते बहोत हि बढिया थे ..आला किस्म की उनकी कलम बहोत हि बढिया तरीके से चलती उस कलम को सलाम !! खुदा ने उन्हें कई फन (कलाओं) से नवाजा अगर वक्त साथ देता तो न जाने उडान भर के किस बुलंदी पे चले जाते | उन्होंने अपने अम्मी की काफी खिदमत की और जिसे अपने अम्मी के खिदमत का मौका मिला उसे खुदा ने और ज्यादा तकलीफ नहीं दी ..खुदा की मर्जी , अपने तरफ जल्द हि बुला लिया . अगर जिंदगी ने इतना बुरा बर्ताव न किया होता तो शायद Financial मामुले में दिल-फरेबी नहीं बनते |
अब खुदा से एक हि गुजारीश, ऐ खुदा, तात्याने जो कुछ जाने – अनजाने गुनाह किए उन सारे गुनाहोंको बक्श दें और उनके बुजुर्ग अम्मी को हौ हिम्मत दें के वोह इस गम बर्दाश्त कर सकें आमीन !! Allah Does not Burden a Soul with more than it can bear : Al-Quran 2:286
अल्लाह, तुम तो गफ्फुरो रहीम हो . तात्या की रुहपर रहमत नाजील फरमा , उनकी रुह को सुकून दें ! अल्लाह उनकी बुजुर्ग अम्मी जो अब भी इस दुनिया में है उनकी हिफाजत फरमा . आमीन !!
~ तात्या के खातीर १० साल बाद मिसलपाव पे कदम रखनेवाली ‘वाहीदा’
(विजू भाऊ तुम्हारे लिए वही प्रतिसाद यहां पर भी लिख रही हुं .. अब कलम टुटती हुई सी लग रही है जो लिखता था वोह चला गया …)
मिसलपाव के उस खुशनुमा माहौल की ताबीर को सलाम !
17 May 2019 – 1:17 pm | वाहीदा
उस खुशनुमा माहौल को सलाम ! उस खुशनुमा नूर की शुरुवात जिसने की उनकी रुह को , तात्या की रुह को सलाम !!
उनकी रुह फरेबी नहीं थी वोह बेचारे वक्त के मारे थे. अगर वक्त ने सही वक्तपे करवट ली होती तो वोह दौर आज भी बरकरार होता.
खैर अब जो भी था जैसा भी था तात्या शख्स दिल का अमीर था यह बात तो हम नहीं नकार सकतें | उन्ही के वजह से हमारी कई आला writer हस्तीयों के articles से मुलाकात हो पायी जैसे के आप , रामदास काका , प्रभूसर , बिपीन कार्यकर्ते, पिवळा डैंबिस , प्राजू, राज जैन , राजेंद्र बापट कितनोंकी किताबें छपी और कितनोंकी सोशल मिडीयापे एक नई पहेचान बन के उभरें. कितने तो आजभी यु-टुब्स पे एक नए इतमाद confidence से घुम रहे हैं ..यह बिल्कुल तात्या की और मिसलपाव कि हि देन हैं. we can never forget what Tatya and ‘Misalpav’ has given all of us indirectly.
~ वाहीदा
—–
अरेरे
17 May 2019 – 1:22 pm | टीपीके
फारच वाईट झाले.
२००८ ला मी भारताबाहेर गेलो. दिवाळी मध्ये मटा वाचताना ऑनलाईन दिवाळी अंकांचा लेख वाचनात आला, त्यात मराठी आंतरजाल याची ओळख झाली. मला वाटते पहिल्याच वर्षी मिपाने दिवाळी अंक काढला होता.
पहिली काही वर्षे तात्यांचा वावर जबरजस्त होता, त्यांचे लिखाण, प्रतिक्रिया , व्यक्त होणे जानवण्या इतके मोकळे होते, आणि विषयांची व्याप्ती तर फार होती. मला वाटते रामदास यांच्या नंतर इतके अनुभव असणारे मराठी आंतरजालावर फार कमी लोक असतील.
झाले ते वाईट झाले, तात्यांना श्रद्धांजली
———–
रंगपेटी
17 May 2019 – 10:38 pm | vcdatrange
फेसबुकवर सुपर अॅक्टीव असणार्या अपेक्षित मंडळींचे तात्यावरचे मृत्युलेख वाचुन आठवण झाली ती अश्याच एका शापित गंधर्वाची.
संगमनेरातल्या नव्याने वयात येवु घातलेल्या सर्वांना जणु चंद्रशेखर चौकात हजेरी लावल्याशिवाय मिसरुड फुटत नाही , याकारणे आमची पहिली ओळख झाली. .इनमिन काही महिने सुरु झालेल्या आयुर्वेद कॉलेजला अॅडमिशन घेवुन संगमनेरला आला होता. पण त्या थोड्या काळातही तो लक्षात राहिला. पुण्यात शिकायला आल्यावर हा आमचा सिनियर. सु शिच्या दुनियादारीचा अंमल डोक्यात होताचं, त्यात नेमकं सदाशिवातच वर्दळ असल्याने टुकारगिरी या समवाय संबंधाने आमचं लगेचच सूत जुळलं. हडपसरहुन जीप घेवुन यायचा हा. या गाडीतल्या टेपरेकॉर्डरवर मल्लिका शेखचं ‘ तू तलम अग्निचं पातं’ हजार वेळा तरी ऐकलं असेल. . जे काही करायचा ते जीव ओतुन. . आमच्या क्लासचे सर्वजण भर पावसात भुशी डॅमला गेलो होतो. हा आमच्या आधी मोटारसायकलवर तिथे हजर. . .
मध्येच अभ्यासाचं भूत संचारलं , मग आयुर्वेदाचा अभ्यास , मास्तरशी घसट , तीही इतकी मास्तरच्या नव्या कोर्या आयकॉनची चावी याच्याकडेच असायची. . . मग अध्यात्म . . . वारी . . सगळं सगळं.
खुनशीवर सदा शिवातच भलं थोरलं चकाचक क्लिनिक टाकलं. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणार्या क्लिनिकल मिटिंगला मान्यवर लेक्चरर म्हणून शेवटचा कधीतरी भेटला. .
अन् मग अदृश्य झाला. . कायमचा।
———–
चान्स कायमचाच हुकला रे!
18 May 2019 – 7:16 pm | सुनील
त्याला दोन गोष्टींचा फार शौक! एक म्हणजे गाणे आणि दुसरे खाणे!!
हे दोन्ही शौक पूर्ण करणारे शहर म्हणजे लखनौ. त्याचे आवडते. लखनौच्या रसभरीत आठवणी त्याच्याच तोंडून ऐकाव्यात. अशीच लखनौची एक खासियत म्हणजे हलीम!
दहा वर्षे झाली ह्या गोष्टीला आता.
एकदा घरी हलीम करण्याचा घाट घातला होता. आणि अगदी योगायोगाने म्हणा वा अन्य काही, पण तात्या घरी आला. ग्लेन कुळातील कुठलीशी स्कॉच घरी होतीच. आग्रह झाला.
परंतु, हलीम हा अगदी निगुतीने करण्याचा पदार्थ! तिथे घाई-गडबड करून चालत नाही. पदार्थच बिघडतो. आणि इथे त्याला फार काळ थांबता येणार नव्हते. जाणे भागच होते. आणि तसा तो निघालादेखिल. पण, एकदा अगदी ठरवून, हलीम-स्कॉचचा बेत करायचा, हे पक्के ठरवूनच!
दुसर्या दिवशी मिपावर फोटो चढवला आणि त्याची प्रतिक्रिया आली – अरे, कालचा चान्स हुकला रे!
दहा वर्षे झाली. तो चान्स नंतर कधी आला नाही आणि आता तर येणारही नाही!!!
——–
तात्या गेला!
19 May 2019 – 7:59 am | चतुरंग
परवा बातमी ऐकून धक्का बसला. मनस्वी, हरहुन्नरी आणि बेधडक तात्याची आणि माझी वैयक्तिक भेट कधी झाली नाही. फोनवरती दोन चारदा बोलणे झाले तेवढेच.
जालावरती मराठीतून मुक्त विचार मांडता यावेत या एका बंडखोर विचारातून आणि जिद्दीतून मिसळपाव संकेतस्थळाची उभारणी तात्याने केली हे त्याचे सर्वात मोठे काम असावे आणि याचसाठी तो कायम स्मरणात राहील. तात्याला असे अकाली मरण यायला नको होते अशी चुटपुट लागून राहिली आहे.
मराठी संकेतस्थळांच्या इतिहासात मिसळपावची झणझणीत तर्री देणार्या तात्याला मनःपूर्वक श्रद्धांजली! __/\__
-चतुरंग
————-
माझ्या आठवणीतला तात्या
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
17 May 2019 – 10:46 pm
“आम्ही तात्याला पहिला नाही”अशा काही प्रतिक्रिया पाहिल्या आणि वाटलं, तात्याचे चार फोटू टाकावेत.
मात्र जे फोटो डोळ्यापुढे होते, ते संगणकात नव्हते हे जाणवले आणि स्व्तःवरच चरफडलो.
२००५ च्या सुमारास शिवाजी पार्कवर भरलेल्या पहिल्या वहिल्या कट्ट्यात टिपलेले “असा घ्यायचा शास्त्रिय संगिताचा आस्वाद”यावर तात्या रंगात येऊन बोलत असतानाचे फोटो…..
मधे एकदा अचानक पुण्याला जायची लहर आली. मी, तात्या, जयन्तराव कुलकर्णी, बहुधा माधव कुलकर्णी पण होते. काही पुणेकर मंडळी थेट तिथेच मैफिलीत सामिल झाली, रात्री बरोबर मैफल रंगत गेली. गप्पा रंगत गेल्या, मध्यरात्रीनंतर डावा हात कानावर घेऊन उजवा हात वर करत यमन गाताना टिपलेला तात्याचा फोटो आणि तात्याचा फोटो मोबाईलवर टिपत असताना काढलेला पेठकर साहेबांचा फोटो
तात्यानच गोळा केलेल्यांत सामावून रॉयल चॅलेंज मध्ये जमलेल्या धमाल गप्पांचा फोटो
बदललेले संगणक, बॅक अप घेताना गोची होऊन अनेक फोटो गेले. अखेर शोधता शोधता एका ठाणे कट्ट्याचे फोटो सापडले. मोठा जोरदार कट्टा झाला होता. तात्या, जयन्तराव कुलकर्णी, माधव कुलकर्णी, अत्यानंद, कुमार जावडेकर, अजब, शंतनु, केशव सुमार, नरेन्द्र गोळे, आनंद घारे, डॉ विलास पवार, डॉ मिलिंद फणसे, छाया राजे, चित्तरंजन भट या व अशा अनेक थोरा मोठ्यांनी हजेरी लावली होती. त्या वेळचे हे फोटो (त्यातला एक फोटो खाली दिला आहे.)
तात्याचा आनंदी चेहरा आणि आग्रही आवाज, बोलण्यातली लगबग अजूनही आठवते. माझ्यावर तात्याचा का कुणास टाऊक पण जीव होता. एकदा रात्री रामदासांचा’फोन, ‘साक्षी, उत्सवला बसलोय तात्या आठवण काढतोय, पाठोपाठ तात्याचा आवाज, अरे बाबा ये लवकर. ‘तात्या, अरे आता तुमचा कार्यक्रम संपत आला असेल’माझी एक शंका. लगेच उत्तर ‘अरे, नाही बाबा तू ये, आम्ही आहोत’. आता हजेरी लावण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. तिथे पोचताच तात्याच्या चेहर्यावर दिसलेला आनंद डोळ्यापुढे आहे.
‘आयला झक मारली आणि पिऊन स्कूटर चालवली. ***** नेमका पकड्लो गेलो, *** ऐकायला तयार नाहीत रे, साल्यांनी रात्रभर पोलिस स्टेशनला रखडवलं, सकाळी कोर्टात हजर केलं, साला ******* एकदाचा जज ‘कबूल’म्हणून दंड भरून सुटलो. आता कानाला खडा, पिऊन गाडीला हात लावणार नाही असं साभिनय सांगणार्या तात्या.
एक दिवस अचानक कचेरीत तात्याचा फोन, ‘अरे साक्षी आपला नंदन आलाय, आत्ता त्याला घेऊन मामलेदारला आलोय’
‘मनोगत’चं गंभीर वातावरण न भावलेल्या तात्याने एक दिवस मिपा चालू केलं. काही कारणास्तव मी तेव्हा सदस्यत्व घेतलं नव्हतं. आणि एक दिवस तात्याचा रात्री फोन, ‘अरे हे काय रे? तू माझा गाववाला आणि मिपावर नाहीस असं म्हणत माझी हजेरी. मी येतो म्हणालो. तात्यानं सांगितलं, तुझा आयडी राखून ठेवला आहे, पासवर्ड मेल केला आहे, दाखल हो. मी उलट फोन मारला, ‘तात्या, पासवर्ड ची गोची दिसते रे लॉग इन होत नाही. क्षणांत तात्याने उलट फोन केला, पासवर्ड चंद्रशेखर, आता सरळ दाखल हो. आणि नुसता येऊ नको, मला उद्या एक मस्त लेख हवा. मी सदस्य झालो आणि ‘माझी नवी मैत्रीण हा लेख टाकला. तेव्हा खुष झालेला तात्या
क्रांतिकारकांवरचा माझा एखादा लेख आवडल्यावर ‘मिपाला श्रीमंत करणारा’लेख असे तोंड्भरुन कौतुक करणारा तात्या.
मध्यंतरी बरच काही घडून गेलं. माझा मिपावरचा वावरही कमी झाला होता. मिपावर एकदा दाखल झाल्यावर बरीच गड्बड होऊन गेल्याचं वाचनात आलं. काही पत्ताच लागत नव्हता. मग काही ओळखीच्या सदस्यांकडून काही समजलं. त्यालाही अनेक दिवस झाले. अचानक एका दोन जानेवारीला तात्याची खूप आठवण झाली. मी, रामदास, संतोष आमची फोनाफोनी झाली. अखेर राम्दासांनी तात्याला राजी केलं. रात्री नऊच्या सुमारास मी, रामदास, संतोष (बहुतेक आणखी एकजण असावा, आता आठवत नाही) महेश लंच होम्वर जमलो. तात्याला वाढदिवसा निमित्त मच्छी खायला घालायची होती, दोन घोट घ्यायचे होते. तात्या येतो की नाही अशी धाकधुक होती. पण तो आला. सगळे जेवलो, तात्या अस्वस्थ होताअसं वाटलं आणि ते साहजिक होतं. सात आठ वर्षं झाली असावित या गोष्टिला. ती अखेरची भेट.
पुन्हा कधीही तात्या भेटला नाही आणि फोनही लागला नाही. परवा अचानक तात्या गेल्याचं समजलं. तात्याच्या सगळ्या गाठी भेटी डोळ्यापुढे उभ्या राहिल्या.
————–
मी कोंडून घेतलंय स्वतःला
18 May 2019 – 4:02 pm | खिलजि
मी कोंडून घेतलंय स्वतःला
जागा हळूहळू कमी होत चाललीय
एवढी कि आता फक्त तिथे कसाबसा उभा राहतोय
त्या एवढयाश्या जागेवरूनच अवतीभवती पाहतोय
मी आणि माझा मेंदू , मेंदू आणि मी
एक अविरत चाललेली लढाई
विचारांची त्सुनामी , भावनांचे वादळ
अवहेलनांचा पाऊस आणि बरेच काही
कुठेतरी दूर एक आशेचा किरण दिसतोय
इथे मात्र मिट्ट काळोख आणि त्या तेवढ्याच जागेवर उभा राहणारा मी
गुदमरतोय जीव माझा , पण मोकळीक कुठेच दिसत नाही
आधी मेंदूची लढाई सुरु होती
आता श्वासांच्या सैनिकांनी त्यामध्ये उडी घेतली
किती मोजू आणि किती घेऊ आणि का घेऊ ?
तरीही घेतोय , कारण …कारण…
माझ्या नाकाला ती सवय लागलीय
आणि त्या हळव्या हृदयालासुद्धा
ज्याला स्पंदनाशिवाय जगणे मान्यच नाही
एक फक्त एक जीवघेणी कळ
आणि हेलावून जाणारी , आरडाओरडा करणारी वृद्ध आई
बस्स …. मग मिट्ट काळोख आणि काळोख , दुसरं काही नाही …..
कुणी आहेत का मिपाकर , जे सांगू शकतील , त्यांच्या पश्चात त्यांच्या आईचे कसे काय होणार आहे . काही कुणी ठरवत असेल तर उत्तम . धागा काढून सहमती घ्यावी सर्वांची ..
————
मनोगतवरील सदस्यांची श्रद्धांजलि
तात्या अभ्यंकर यांचे निधन!
प्रेषक जयन्ता५२ (बुध., १५/०५/२०१९ – १३:०३)
फेसबुकवर तात्या अभ्यंकर यांचे आज निधन झाल्याची बातमी कळली.
नंतर इतर मित्रांकडूनही कळले. मटा मध्ये छोटीशी बातमी आल्याचे समजते.
अनेक आठवणींनी मन भरून आले आहे.
भावपूर्ण श्रध्दांजली!
जयन्ता५२
तात्या : प्रे. सन्जोप राव (गुरु., १६/०५/२०१९ – ०६:२२).
‘मनोगत’ च्या सुरवातीच्या काळात तात्याशी ओळख झाली. ते दिवस बरे होते. वादावादी, खडाजंगी चालत असे, पण एकूण मजा होती. तात्या एकदा एकटा आणि एकदा सर्किटला घेऊन असा माझ्या घरी आला होता. नंतर तो पिरंगुटचा प्रसिद्ध कट्टा झाला. त्यानंतर बरेच काही कडू गोड झाले.
आणि आज तो गेला.
अदिती, श्रावण मोडक आणि तात्या
आज उदास वाटते आहे.
इतकेच.
असेच काहीसे : प्रे. नंदन (शुक्र., १७/०५/२०१९ – १४:२९).
असेच म्हणतो. दहा-बारा वर्षांपूर्वीचे मनोगतावरचे ते स्नेही आणि काव्यशास्त्रविनोदचर्चांचे दिवस आठवले.
श्रद्धांजली : प्रे. अभिजित पापळकर (गुरु., १६/०५/२०१९ – १५:१९).
तात्या हे आनंदी व्यक्ती होते. त्यांचे संगीताचे ज्ञान खोल होते. त्यांना श्रद्धांजली.
अभिजित पापळकर
जालसम्राट : प्रे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (गुरु., १६/०५/२०१९ – १५:३३).
मनोगतमुळेच तात्याची ओळख झाली. मनोगतवर नवीन होतो तेव्हा तात्याने नेहमीच पाठराखण केली. तात्याचा लेखनाचा फ़्यान इथेच झालो. लेखन अनुमतीची प्रतीक्षा आणि शुद्लेखन इथे तेव्हा कौतुकाचे आणि वादाचे विषय होते. पुढे तात्यांचे बोट पकडून उपक्रमवर आणि मग मिपाच्या स्थापनेत सोबत होतो. मध्यात बरंच काही घडून गेलं, संवाद कमी होत गेला. मागील वर्षी जानेवारीत फुटकळ हाय हॅलो झालं. सर,कसे आहात ही शेवटची चौकशी. फेबुवर शिळोप्याच्या ओसरीवर ते प्रशासक होते. प्रशासक या शब्दावर मनोगतमुळेच प्रेम. असो.
मनोगतमुळे तात्याची ओळख झाली, आभार. तात्याला भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली : प्रे. रन्गा (शुक्र., १७/०५/२०१९ – ०१:३५).
तात्यांच्या लेखनाचा मी चाहता आहे व राहीन. मराठी आंतरजालावर तुलनेत उशिरा सक्रिय झाल्यामुळे तात्यांबरोबरचा संवाद जुजबी पातळीवर राहिला.
तात्यांच्या अकाली निधनाने मराठी आंतरजालावर न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रद्धांजली : प्रे. कुमार जावडेकर (शनि., १८/०५/२०१९ – १३:१७).
खूप सुंदर आठवणी आहेत तात्यांच्या. त्यांचे प्रतिसाद अगदी मनमोकळे असायचे आणि त्यांतून त्यांचं ज्ञान, विशेषतः संगीतप्रेम दिसून यायचं.
शिवाजी पार्कला त्यांनी सुंदर महफिल रंगवली होती एका मनोगत कट्ट्यात.
भावपूर्ण श्रद्धांजली.
– कुमार
तात्यांचे काही व्हिडिओज आणि गाणी
15 May 2019 – 9:11 pm | मनो
तात्या ओळख
https://youtu.be/R0aRJcLp_Z4
यमनकल्याण
https://youtu.be/UYt5vnxQpHw
सागरा प्राण तळमळला
https://youtu.be/tG06flT0N_8
राग बिहाग
https://youtu.be/toWTWN-GO5o
सोन्याचा पिंजरा
https://youtu.be/eQ-m1NKVucg
दैवजात दुःखे भरता
https://youtu.be/CMh1YdWtibc
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो
————–