कविवर्य ग्रेस

ग्रेस

कविवर्य ग्रेस यांचा जन्मदिवस नुकताच होऊन गेला. संत ज्ञानेश्वरांची ‘एक तरी ओवी अनुभवावी’ असे सांगितले जाते. त्याच चालीवर ग्रेस यांची ‘एक तरी कविता समजावी’ असे मला वाटायचे. त्यांच्या जन्मदिनानिमित्य या वर्षी मिळालेले आणि सात आठ वर्षांपूर्वी वाचून जमा केलेले काही लेख आणि त्यांच्या काही निवडक कविता इथे संग्रहित केल्या आहेत. त्यांच्या सर्व मूळ लेखकांचे मनःपूर्वक आभार.

ग्रेस यांच्या कवितांची समग्र माहिती या स्थळावर पहा.

Grace- Manik Sitaram Godghate (माणिक सीताराम गोडघाटे)

पं.हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांच्या दोन कवितांना अप्रतिम संगीत देऊन त्या खूप लोकप्रिय केल्या आहेत.
१. भय इथले संपत नाही
https://www.youtube.com/watch?v=x88r7JI4ljU
२. ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
https://www.youtube.com/watch?v=pM3eOOP786w

स्मरण महाकवीचे ….

१९६० नंतरच्या कालखंडात आपल्या अनवट काव्यशैलीने स्वतंत्र नाममुद्रा ज्या प्रतिभासंपन्न कवीने निर्माण केली ते कविवर्य ग्रेस अर्थात माणिक सीताराम गोडघाटे यांचा आज (१० मे) जन्मदिवस .

त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आता त्यांच्या लेखनातून खुणावत राहतात.१९५८ ते२०१२ असा प्रदीर्घ काळ ग्रेस यांच्या तरल कवितांनी व्यापला. उमलण्याचा वर घेऊन जन्माला आलेली ग्रेस यांच्या कवितेची अद्भुत सृष्टी, कोमेजून जाण्याच्या शापातून मुक्त झालेलीच दिसते.

‘मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदीपरी खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल…

ग्रेस यांच्या साहित्यविश्वाने अभिजात शाश्वत मराठी वाड्मयाचा परीघ रसिकांच्या अंतकरणात सतत विस्तारत ठेवला. लताबाईंचे गाणे आपण जसे आपल्या चित्तात किणकिणत राहतो तशी ग्रेस यांची कविता, आपण आपल्याशीच गुणगुणत राहतो. आत्मसंवेदनेच्या अत्यंत तरल पातळीवर बालकवी जसे आपल्या मनात रेंगाळत राहतात तोच उत्कट अनुभव साठोत्तरी कवितेत ग्रेस यांच्या कवितेने दिला.

‘सूर्य रोज अस्ताला जातो
कळेना मज काही
झोळीत कधीही माझ्या
अंधार उगवला नाही’.

हा दुःखाचा महाकवी होता .त्यांनीच म्हणून ठेवल्याप्रमाणे दगडाचेही फूल करण्याची किमया त्यांच्या शब्दाशब्दात अचूक होती. त्यांच्या कवितेने आपली स्वतंत्र वाट घडविली.

‘मन सैरभैर होताना
कंदील घरातील घ्यावा
संध्येच्या पारावरती
उजळून हळू ठेवावा
…. …. …..

उजळून निघायासाठी
जळतात जीवाने सगळे
जो वीज खुपसतो पोटी
तो एकच जलधर उजळे’

वेदना आणि संध्याकाळ यांचे नाते ओळखून कवी ग्रेस यांनी दुःखाचा असा सांभाळ केला.’ हाताचे करुनी फूल ,नेईन तुला वेगाने’ असे म्हणत रसिकमनाला अभिरुचीच्या अत्युच्च स्थानी घेऊन गेले. त्यांच्यातला माणूस, ललित लेखक , संपादक, प्राध्यापक ही रूपे एकात एक मिसळून गेलेली भासावीत अशीच होती.
त्यांच्या जयंतीनिमित्त हे स्मरणाचे चांदणे……

~~डॉ.वर्षा तोडमल
10/5/19


ग्रेस – विविध -‘विशाखा’ दिवाळी २०१२-विशेष पुरवणी-ग्रेस : जोगिया पुरुष- [ पांढरे हत्ती’]
उपरोक्त दिवाळी अंक पुरता वाचला नाही पण या अंकातील डॉ .प्रभा गणोरकर यांचा लेख ‘तू ‘ची अमूर्तता : संध्याकाळच्या कविता वाचण्यात आला. यात एका ठिकाणी त्या म्हणतात “७७ कवितांमधल्या सुमारे १७ -१८ कवितांचा समावेश केवळ आत्मनिष्ठ भावावस्था अशा गटात करता येईल . ‘हिमगंध’ पहाट, निर्मिती पार्श्वभूमी पाऊस अशा या कविता पाहाव्यात. त्यामध्ये ‘पांढरे हत्ती’ सारखी सुंदर निसर्ग कविता जी भावाsवस्थेशी , पाण्यात रंग कालवावा अशी मिसळून गेली आहे -अकस्मात सापडते ”
ग्रेस ची ‘ पांढरे हत्ती’ ही कविता सुंदर असल्याबद्दल शंका नाही पण ही आत्मनिष्ठ किवा निसर्ग कविता नसून ग्रेसने कमीतकमी १४ समाजोन्मुखी कविता लिहिल्या त्यातील एक आहे असे माझे मत आहे . मी पूर्वी या कवितेचे विश्लेषण Grace- A study and research centre for Marathi poet ‘ Grace’ on net वर ग्रेस – विशिष्ट कविता आणि कवितेची समीक्षा मध्ये केले आहे त्याची पुनरावृत्ती खाली करत आहे.
ही कविता धर्मांध आणि समाजकंटक व्यक्ती सामुहिकरीत्या सांप्रदायिक दंगे कसे भडकवतात आणि त्यात निष्पाप लोकांचा बळी कसा जातो याचे हृदयस्पर्शी वर्णन कविवर्य ग्रेस यांनी केले आहे. धर्मांध आणि समाजकंटक व्यक्तींसाठी त्यांनी ‘पांढरेशुभ्र हत्ती या प्रतीकाचा प्रयोग केला आहे. ‘पांढरा हत्ती’ हा वाक्प्रयोग बऱ्याच भाषेत केला जातो. त्याचे विवरण असे आहे.. The term derives from the story that the kings of Siam (now Thailand) were accustomed to make a present of one of these animals to courtiers who had rendered themselves obnoxious, in order to ruin the recipient by the cost of its maintenance According to one story, white elephants were sometimes given as a present to some enemy (often a lesser noble with whom the king was displeased). The unfortunate recipient, unable to make any profit from it, and obliged to take care of it, would suffer bankruptcy and ruin .थोडक्यात’ पांढरे हत्ती’ म्हणजे समाजास भार असणारे व्यक्ती आणि ‘ पांढरे शुभ्र’ हत्ती म्हणून कवीने त्यांच्या दुर्गुणात धर्मांधता ,अमानुषता, हिंसक प्रवृत्ती आदि चा ही समावेश केला आहे.’उतरत्या मशिदी ‘ या शब्दांचा प्रयोग अत्यंत कल्पकतेने केला आहे. ईश्वराचे दर्शन किवा स्मरण करण्यासाठी माणूस धार्मिक स्थानाच्या पायऱ्या वर चढत जातात परंतु हे शुभ्र हत्ती वर न जाता धर्माचा आणि धार्मिक स्थानांचा प्रयोग ईश्वर साधने करता नव्हे तर खालच्या स्तराची धर्मांधता पसरविण्यासाठी करतात. समाजात हे संक्रामक रोगाप्रमाणे पसरत जाते.

पांढरे हत्ती

पांढऱ्या शुभ्र हत्तींचा
रानातून कळप निघाला
संपूर्ण गर्द शोकाच्या
झाडातहि मिसळून गेला.
त्या गूढ उतरत्या मशिदी
पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडता
आभाळ लपेटुन बुडल्या.
पांढऱ्या शुभ्र हत्तींनी
मग डोंगर उचलून धरले
अन तसे काळजाखाली
अस्थींचे झुंबर फुटले .
मावळता रंग पिसाट
भयभीत उधळली हरिणे
मुद्रेवर अटळ कुणाच्या
अश्रूत उतरली किरणे.
पांढरे शुभ्र हत्ती मग
अंधारबनातून गेले
ते जिथे थांबले होते
ते वृक्ष पांढरे झाले.
आधीच सांप्रदायिक दंग्याच्या हिंसेने त्रस्त झालेल्या गावात धर्मांध आणि समाज कंटकांच्या टोळीने प्रवेश केला आणि तेथील रहिवासी आणखीनच त्रस्त झाले.तेथील उपासना स्थळे उपासनेकरता न राहून हिंसा प्रसार करण्याचे माध्यम झाल्या. त्या टोळीने इतके अमानुषिक अत्याचार आणि हिंसा केली की अनेक रहिवासी मृत्युमुखी पडले. टोळीचे काम पूर्ण झाल्यावर ती रवाना झाली आणि गावात काही हालचाल सुरु झाली. काहीजणांच्या चेहऱ्यावरचे भाव लुप्त झाले होते पण अश्रूच्या रूपाने दुःख बाहेर पडत होते. नंतर ती टोळी अशिक्षित आणि धार्मिक अज्ञान अंधकारात वावरणाऱ्या माणसांच्या गावात गेली आणि त्यांना ही आपली विचारसरणी अशी पटवून दिली की त्या अज्ञानी लोकांनीही धर्मांधतेचा आणि असहिष्णुतेचा मार्ग पत्करून समाजाचे विघटन करण्यास सुरुवात केली.


४९..वाटेपाशी: 

“रात्र थांबवुनी असेच उठावे
तुझ्यापाशी यावे क्षणासाठी!
डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेटी
आणि दिठी दिठी शब्द यावे!
तूही थेंब थेंब शब्दापाठी द्यावा
अर्थ ओला व्हावा माझ्यासाठी
आणि उजाडता पाठीवर ओझे
वाटेपाशी तुझे डोळे यावे!”

मला नेहमी असे वाटते की रोज रात्री अचानक मला जाग यावी आणि एका क्षणासाठी तरी तुला भेटण्यास यावे. काही न बोलताच आपली भेट एकमेकाच्या डोळ्यात पाहून व्हावी. माझे शब्द अश्रूंच्या रूपात बाहेर पडावे आणि त्याचे उत्तर तू अश्रूंच्या थेंबानेच द्यावे म्हणजे मला त्याचा अर्थ समजेल कारण मला शब्दांचे अर्थ समजत नाहीत..उजाडल्या नंतर माझ्या खडतर दैनंदिन जीवांची वाटचाल करतानाही तुझे मार्ग दाखवणारे डोळे माझ्या संगतीस असावे अशी माझी याचना आहे..

५४…तुझी बहार मंदशी तृषार्त जाग ये जरी…

“तुझी बहार मंदशी तृषार्त जाग ये जरी
वेदनेतली फुले नि चांदण्यातल्या सरी
तुझेच अंग चंदनात अंतराळ ओढते
पुरात आणखी बसे सजून ओल मागते”

सृजनात्मक प्रतिभा पूर्णतेकडे का जात नाही याची खंत त्यांना वारंवार जाणवती आहे. रात्री थोडीशी जरी जाग आली आली तरी वाटते की आपली सृजनात्मक प्रतिभा अजून अपूर्ण आहे. अजून तहान भागली नाही.चांदण्या रात्रीत अचानक पावसाच्या सरी आल्याच नाहीत त्यामुळे दुक्खाच्या फुलांच्या बहरीही आल्याच नाहीत.वांछित मनःशांती प्राप्त होण्यासाठी माझे आंतरिक मन अगदी सजून सवरून बसले आहे की माझी प्रतिभा आणखी कशी बहरेल.

५५.’तुझ्यात नभवाहिनी कुठून रक्त गंधावले

“’तुझ्यात नभवाहिनी कुठून रक्त गंधावले
अनाथ तुटल्या तिरी विझत सूर्य की मावळे ?
शरीर विणले कुणी अतूट फाटली वासना
तुझ्यात भिनल्यावरी फिरुनी चंद्र अर्धा उरे”

सृजन शक्ति ही आकाशाप्रमाणे अफाट असते आहे पण तिचा संचार रक्ताळून थांबला आहे. माझ्यासारख्या अनाथ आणि खंडित झालेल्या किनार्यावर सृजनाचा सूर्य नेहमीसाठी विझून गेला आहे की फक्त या रात्रीपुरताच मावळला आहे? विधात्याने मानव शरीराची निर्मिती करण्यात काही दोष ठेवला नाही पण माणसाच्या वासनांमुळे सृजनाची अफाट शक्ती प्राप्त होऊनही अपूर्णता राहणारच.

५६..”अज्ञेयाहून गूढ गूढ दिसती झाडातली वर्तुळे

अज्ञेयाहून गूढ गूढ दिसती झाडातली वर्तुळे
तू पाठीवर रंग आज विणले की द्राक्षवेलीतले
यात्रेच्या अपुर्‍या अभंग समयी पाठीत कैशा विजा ?
अश्रूही सरल्यावरी उमलसी तू एकटी स्वप्नजा …”

या कवितेत द्राक्षवेलीतल्या रंगांचा संदर्भ आला आहे. द्राक्षवेली सामान्यतः जांभळ्या रंगाच्या असतात आणि हा रंग चिंतन किवा ध्यानासाठी उपयुक्त समजला जातो.यावर तज्ञ लोकांचे विचार असे “:In human color psychology, purple is the color of people seeking spiritual fulfillment. Purple is a good color to use in meditation. It is said if you surround yourself with purple you will have peace of mind.” ग्रेसने कवितेत याचा उपयोग अत्यंत कल्पकतेने केला आहे.
आता मला झाडावर उगवलेल्या आकाशाकडे जाणार्‍या गोल गोलफांद्या विचारशक्तीच्या पलीकडील सृष्टी निर्मात्यापेक्षाही रहस्यमय वाटत आहेत आणि सृजनशीलतेच्या कल्पनेने पहुडलेला मी ध्यानमग्न झालो आहे .पण अचानक सृजनाची ही चिंतन यात्रा मध्येच का थांबली? माझे अश्रू थांबल्यावरही परत तू एकटीच मला दिसते आणि सृजनाचे सर्व भास नाहीसे होतात. पूर्णता कधीच लाभत नाही


ग्रेस – विशिष्ट कविता आणि कवितेची समीक्षा- जे सोसत नाही असले -श्रीनिवास हवालदार
पूर्वी प्रस्तुत केलेली कविता ” जे सोसत नाही असले “माझे मित्र श्री भालचंद्र लिमये यांच्या सुंदर सुलेखनासह पुनः प्रस्तुत करत आहे.

जे सोसत नाही ग्रेस

जे सोसत नाही असले

“जे सोसत नाही असले
तू दुःख मला का द्यावे
परदेशी अपुल्या घरचे
माणुस जसे भेटावे
मिटल्यावर डोळे मजला
स्मरतात निरंतर नाद
हाताने मागावे का
त्यांचे नवे पडसाद
अंधारच असतो मागे
अन पुढे सरकतो पारा
सूर्याच्या सक्तीनेही
कधी नष्ट न झाल्या तारा
हातात तुझ्या जे आले
ते मेघ न फूल न गाणे
स्वप्नातही स्पष्ट समजते
हे असे अवेळी फुलणे”
ग्रेस देवाला विचारतात की मला सहन होणार नाही असे दुःख मला तू का दिले आहेस? मी कुठेही गेलो तरी ते माझ्या मागेच असते. काही वेळा वातावरणात बदल व्हावा म्हणून माणूस परदेशी जातो परंतु तेथेही पूर्वीचे वातावरणात काहीच बदल होत नाही. झोपेतही मला निरंतर जुन्या अप्रिय आठवणी येतात आणि माझ्या हातानी ज्या नवीन कविता लिहिल्या जातात त्यातही त्याच आठवणी काहीशा नवीन रूपात प्रकट होतात. माझ्यामागे सतत अंधकार पाठलाग करत असतो.रात्र संपून सूर्याचा प्रकाश झाला तरी तो अंधार आणि ताऱ्यांचे अस्तित्व नष्ट करू शकत नाही. तसेच माझ्या जीवनातला अंधकार राहणारच. तुझ्या हातात माझ्या ज्या कविता येतात त्यात फुलांचा सुगंध किवा संगीताचे स्वर नाहीत नाही परंतु मेघाचे अश्रू आहेत. माझी मनस्थिती वेळी अवेळी नेहमी सारखीच असते. मला कविता अवेळीही का सुचतात हे मला स्वप्नातही कळते कारण दुःख दिवस रात्र माझा पाठलाग करत असते.
फोटो-
Calligraphic Expressions…. …. by B G Limaye च्या सौजन्याने
—————————————————–
ग्रेस – विशिष्ट कविता आणि कवितेची समीक्षा-‘पद्मबंध’ -श्रीनिवास हवालदार
‘ पद्मबंध’ ही कविवर्य ग्रेस यांची सर्व प्रथम कविता जी मी दिनांक १३ जून २०१२ ला माझे मित्र श्री भालचंद्र लिमये यांच्या अनुरोधानुसार त्यांच्या Face book time line वर विश्लेषण करून प्रस्तुत केली होती. ती त्यांच्या सुंदर सुलेखनासह पुनः प्रस्तुत करत आहे.

पद्मबंध ग्रेस

‘पद्मबंध’

सूर्य बुडे, ऊन ढळे
उचल पाय चल् ग ! बये !
चिखलावर कमळांचा
भार कधी टाकू नये….
घाटातुन घंटांचे
घोर नाद थरथरती;
पणतीला वाऱ्याचा
धाक कधी घालु नये…
ताऱ्यांची दीर्घ शीळ
संध्येची गगनहाक;
चंद्रावर चंद्राचा
अस्तउदय लादू नये!
संगनमत सरितांचे
लहरींचा बहरतोल;
पाण्यावर तृष्णेचा
पेच नवा ठेवु नये
माणसाने स्वतः च्या स्वार्थाकरता निसर्गाच्या क्रियाकलापात बाधा उत्पन्न करून स्वतःकरता संकटे कशी निर्माण करून घेतली आहेत याचा इशारा ग्रेस देत आहेत. कवितेचे वैशिष्ट्य हे की जी गोष्ट तथाकथित ‘प्रबुद्ध’ माणसाना कळत नाही ती एक हुशार ग्रामीण वडील किवा आई रस्ता चालताचालता आपल्या लहान मुलीस शिकवीत आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कविवर्यांनी सूर्यास्तापासून चंद्रोदयापर्यंतच्या अवधीत हे कुटुंब घरी पोहोचेपर्यंत ज्या घटना घडल्या त्यांचा उल्लेख पर्यावरणाच्या संदर्भात केला आहे. ‘घाटातुन घंटांचे घोर नाद थरथरती;’ हा उल्लेख संध्याकाळी शंकराच्या मंदिरात वाजणाऱ्या घोर घंटानादाचा आहे व तो शंकराच्या तांडव नृत्याने सृष्टीचा संहार होण्याचा द्योतक आहे .’ पद्मबंध’ हा कवितेचा शीर्षक कमळाला बांधून त्याची नैसर्गिक वाढ खुंटविण्याचा परिचायक आहे
अग मुली ! सूर्य मावळत आहे आणि उन संपून संध्याकाळ होत आहे. हळू हळू काय चालतेस आपल्याला घरी पोहोचायचे आहे.
बघ! तलावात ती कमळे दिसत आहेत.[त्यांच्या पाकळ्या संध्याकाळ झाल्यामुळे मिटण्यात आहेत] त्यांना चिखल आवडत नाही म्हणून ती आपली सुंदरता टिकवण्यासाठी चिखलाच्या बाहेर असतात. कमळांना संरक्षण देण्याचे काम चिखलाला सोपवले तर ती कोमजतीलच ….. आता संध्याकाळी शंकराच्या मंदिरातील वाजणाऱ्या घोर घंटा शंकराच्या तांडव नृत्याचा हेच सांगत आहेत की निसर्गाच्या विपरीत गेलात तर सृष्टी चा विनाश होईल……घरी पोचलो. अंधार झाला. पणती लाव पण तिला वाऱ्याचा धाक नको दाखवू की वारा आला तर तू विझून जाशील. ती इतकी भित्राळू आहे की नुसत्या धाकानेच विझून जाईल. आणि आपल्याला अंधारात बसावे लागेल.
….आता आकाशात तारे दिसायला लागले. तारे आणि संध्याकाळ दोघे ही ओरडून सांगत आहेत की चंद्र आपल्या आवडीप्रमाणे उगवेल आणि अस्त होईल त्याच्यावर बंधने लादू नका.
नद्या एकाच उदगमस्थाना पासून निघतात पण संगनमत करून निरनिराळ्या दिशात वाहत जातात किवा संगम स्थानावर एकमेकात मिसळूनही जातात. एकाच नदीत लहरींच्या प्रवाहांप्रमाणे पाणी कमी जास्त होते हे निसर्गानेच करून ठेवले आहे. त्यावर माणसाने आणखी बंधने लादून माणसास पिण्यासाठीही पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण करू नये.
फोटो-
Calligraphic Expressions…. …. by B G Limaye च्या सौजन्याने
———————————————————————-
चित्रलिपीचे साधक’- श्री भालचंद्र लिमये यांनी कविवर्य ग्रेस यांना वाहिलेली आदरांजली-
पुष्प चौथे :

4. ‘निरोप’

“मी खरेच दूर निघालो
तू येऊ नको न मागे
पाउस कुठेतरी वाजे
हृदयाचे तुटती धागे
शेतावर ढग अडलेला
घे त्याला मागून पाणी
झाडावर कोकीळ येता
घे मागून एक विराणी
या फुलपाखारांनाही
ते उरेल मरणावाचून
सगळ्याच ऋतूंना मिळते
दु:खाचे उत्कट दान..
भरपूर सोडली आहे
पडवीत निजेला जागा
अन दूर तुझ्याहून दूर
प्राचीन फुलांच्या बागा…
थिजलेल्या वेळूंमधला
लागटेल तुलाही वारा
पाउस थांबल्यावरही
ताऱ्यांच्या पडतील गारा..
उध्वस्त मंदिरे येतील
नजरेत तुझ्या दीप्तीने
खंडांतर करते पक्षी
दिसतील तुला तृप्तीने…
माझ्याहून गर्द मिठीचा
अंधार गळ्याला येईल
शिल्पास रूप देणाऱ्या
हातांचा विळखा होईल..
तळहातावरचा फोड
फुटणार अशा अनुरादे
वेदनेस नसते वीण
पडछाया तुडवीत जाणे
अंगाईत फक्त मुलांना तू सांग एवढे गाणे…!”
-ग्रेस
—————————————
चित्रलिपीचे साधक’- श्री भालचंद्र लिमये यांनी कविवर्य ग्रेस यांना वाहिलेली आदरांजली- पुष्प तिसरे:

काळीज धुक्याने उडते

काळीज धुक्याने उडते
तू चंद्र जमविले हाती
वाराही असल्यावेळी
वाहून आणतो माती
पाण्यावर व्याकुळ जमल्या
झाडांच्या मुद्रीत छाया
मावळत्या मंद उन्हाने
तू आज सजविली काया !
-ग्रेस
—————————————-

चित्रलिपीचे साधक’- श्री भालचंद्र लिमये यांनी कविवर्य ग्रेस यांना वाहिलेली आदरांजली- पुष्प दुसरे:

 दुःख घराला आले

” दुःख घराला आले
अंधार असा घनभारी
चन्द्रातुन चन्द्र बुडाले
स्मरणाचा उत्सव जागुन
जणु दुःख घराला आले

दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन

विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणु हृदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती

नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिःकाल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे”
-ग्रेस
———————————-

‘चित्रलिपीचे साधक’- श्री भालचंद्र लिमये यांनी कविवर्य ग्रेस यांना वाहिलेली आदरांजली -पुष्प पहिले-

आठवण….

या व्याकुळ संध्यासमयी
शब्दांचा जीव वितळतो .
डोळ्यात कुणाच्या क्षितिजे ..
मी अपुले हात उजळतो .

तू आठवणीतून माझ्या
कधी रंगीत वाट पसरशी,
अंधार व्रताची समई
कधी असते माझ्यापाशी …

पदराला बांधून स्वप्ने
तू एकट संध्यासमयी
तुकयाचा हातांमधला
मी अभंग उचलून घेई …

तू मला कुशीला घ्यावे
अंधार हळू ढवळावा ..
सन्यस्त सुखाचा कांठी
वळीवाचा पाउस यावा !
-ग्रेस
————————————-

वाण्येका समलंकरोति पुरुषं… च्या निमित्ताने पुनः एकदा “असे रंग आणि ढगांच्या किनारी“:

असे रंग ग्रेस

[फोटो श्री बी. जी . लिमये यांच्या सौजन्याने]

“असे रंग आणि ढगांच्या किनारी”:

ग्रेस यांना निळाईचे फार आकर्षण होते..त्यांनी आपल्या बऱ्याच कवितात निळे, निळी निळाई या शब्दांचा प्रयोग केला आहे परंतु या सर्व निळाईत उदासीनता आणि दु:खाची छाया नेहमीच पसरलेली दिसेल. ग्रेस साठी ‘निळे’ हे दु:ख आणि उदासीनतेचे प्रतीक आहे.. . ‘असे रंग आणि ढगांच्या किनारी’ या कवितेत निळ्या आकाशात प्रतिक्षण बदलणार्‍या ढगांच्या रंगांचे आणि चित्रविचित्र आकृतींचे अद्भुत वर्णन केले आहे.त्या आकृती कधी घाटमाथे, कधी राउळ ,कधी पाउलवाटा, कधी पाखरे या रुपात दिसतात पण त्याच्यातही उदासीनतेची छाया आहे.. .
असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू
निळ्या अस्तकालीन नारायणा
निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेउन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले
निळ्या आकाशातील प्रत्येक क्षणी बदलणार्‍या ढगात आणि विविध रंगात मला दुःखाच्या उन्हाचाच भास होत आहे. पहाडी घाटांवर वस्ती करणार्‍या लोकांचे जीवन बघून माझ्या डोळ्यांत पाणीच येते. त्यांच्या येण्याजाण्याच्या पाऊलवाटा मंदार वृक्षांच्या काट्यांप्रमाणे भरलेल्या आहेत. सर्वत्र पसरलेल्या धुक्याने त्यांचा संपर्क जगाशी तुटलाच आहे. हे अस्तकालीन सूर्यनारायणा ,तू अंधार दूर करून त्यांचे दुःख दूर कर अशी किती प्रार्थना करू ? संध्याकाळ झाली आणि नदी तलावाकडून थंड वारे येऊ लागले.चंद्र उदय होणार म्हणून संध्या डोलू लागली आहे संध्याकाळ झाल्यामुळे पक्ष्यांचे थवे थकून आपल्या घरट्यांकडे परतत आहेत .त्यांची आजची भूक भागली पण त्यांना उद्याच्या दुःखाची चिंता
———————————————————

ग्रेस- विशिष्ट कविता[Lyrics]-”

‘बदाम झाडे रिमझिम झेलित’

” बदाम झाडे रिमझिम झेलित
हिरव्या पानांवरचे पाणी;
हिरवे पोपट त्यात मिसळले
चोच तेवढी लाल विराणी ?
झाडांच्या पानांतुन एकट
लाल पान चोचीला धरते ;
भेद तेवढा मिटवित जाता
आतिल पिवळे पान थबकते !
भेदांच्या रंगातून झरती
रंगांधांची भिरभिर गावे ;
बदाम हिरवे चोचीत घेऊन
भुssर्र उडाले हिरवे रावे …
सुन्न बदामी चेहऱ्यावरती
चित्रव्यथेचि उरते धून;
साउल म्हणजे धम्मक पिवळे
उधळण ..उधळित हळदी उन …
—————————————————-

ग्रेस -साहित्यक आलोचना आणि समालोचना- अरबी गणवेषातली मराठी कविता [ संकलित]

माझ्या दिनांक ६ आणि ७ ऑक्टोबर २०१२ च्या “ग्रेस -साहित्यक आलोचना आणि समालोचना- अरबी गणवेषातली मराठी कविता यांचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध संकलित करून हा लेख प्रस्तुत करत आहे.
कविवर्य ग्रेस यांच्या दुर्बोधते बद्दल बरीच आलोचना झाली आहे. एका आलोचकाच्या लेखातले काही अंश आणि त्यानंतर माझे मत प्रस्तुत करत आहे .
“ग्रेसची कविता दुर्बोध होण्यामागे कारण असंय की त्याची कविता शब्दसौंदर्य आणि लयकारीशी नि:संशय इमान राखते पण तिच्या सर्व वेरीएशन्सचा मध्यवर्ती काव्यविषयाशी एकसंध संबंध राहत नाही.
म्हणजे यमन सुरू केल्यावर सर्व वेरीएशन्स यमन मधलीच हवीत; ताल आणि लय तीच ठेवून तुम्ही इतर रागातली वेरीएशन्स निदान तो राग संपेपर्यंत तरी घेऊ शकत नाही आणि तसं कुणी गायलं तर ते गाणं सौंदर्यपूर्ण असेल पण ऐकणाऱ्याला दुर्बोध होईल तसं ग्रेसच्या कवितेचं झालंय.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते
इथपर्यंत ग्रेस आपल्या बरोबर असतो,
हे झरे चंद्र सजणाचे, ही धरती भगवी माया,
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया
इथे त्याची प्रतिभा, रूपकं, त्यानं निर्माण केलेल्या प्रतिमा आणि त्याच्या जाणीवेची संवेदनाशीलता आपल्याला थक्क करते, पण
गात्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
इथे ‘तिच्या स्मरणाचं चांदणं’ आणि ‘गात्रात गुणगुणणारं दु:ख’ यांचा मेळ मोठ्या मुश्किलीनं मानावा लागतो पण तिथून पुढे ग्रेस अनाकलनीय होत जातो.
संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवति रिंगण, घालती निळाईत राने
किंवा
त्या वेळा नाजूक भोळ्या, वाऱ्याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
आणि
ते धुके अवेळी होते, की परतायाची घाई
मेंदूतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरूंची राई
इथे येईपर्यंत ग्रेसचा हात आपल्या हातातून पूर्णपणे सुटलेला असतो.
कवी उत्तराला बांधील नाही पण विषयाला आहे आणि ग्रेसला ते मान्य नाही.”
” ग्रेसची कविता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही किंवा कोणत्याही एका मूडची ती सलग मांडणी नाही आणि जर असलीच तर तिच्यात त्याचे अत्यंत व्यक्तीगत अनुभव आहेत त्यामुळे तुम्हाला त्याच्या कवितेचा आनंद घ्यायचा असेल तर कवितेची दुर्बोधता मंजूर करावी लागेल.’
माझ्या मते वरील आलोचनेचे उत्तर ग्रेस यांच्या अनेक निबंधात आणि interview त स्पष्ट केलेल्या काव्यनिर्मिती प्रक्रियेत आणि त्यांच्या गझल विषयी आपुलकीत सापडेल. .दिवसा अनुभवलेल्या विभिन्न काव्यानुभावाचे संकलन आणि त्यांना अपेक्षित मांडणी ते संध्याकाळी करावायचे परंतु यासाठी पारंपारिक आकृतीबंधाचा वापर न करता अरबी भाषेतील गझलेचा , सर्वच नाही पण काही फार्म स्वीकारला. गझलेच्या फार तांत्रिक बाबतीत न जाता ग्रेस यांनी जो फॉर्म स्वीकारला तो माझ्या मते खालील गोष्टी लक्षात ठेऊन :
नेहमीची कविता आणि गझल ह्यांत – १) अनेक कवितांची एकाच फॉर्ममध्ये बांधणी आणि मांडणी आणि २) प्रत्येक शेराचे स्वतःचे कविता म्हणून स्वतंत्र अस्तित्व, हे दोन महत्त्वाचे व मूलभूत फरक असतात.
गझलेमधील ह्या प्रत्येक ओळींच्या कवितेला आपण “शेर” म्हणतो. गझलेमधील प्रत्येक शेर हा आपल्या जागी एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली स्वतंत्र आणि सार्वभौम कविताच असते.
नेहमीची कविता सलग असते. तिची एक “थीम” असते आणि म्हणूनच ती उलगडत जाते. पण गझल उलगडत नसते. एकाच गझलेत विविध विषय हाताळले जाऊ शकतात. प्रत्येक शेराचा आशय स्वतंत्र असू शकतो किंवा एकच संवेदना, एकच भाव किंवा एकच मूड असलेले सर्व शेर असू शकतात.
जर आपण गझलेमधून कोणताही शेर बाहेर वेगळा काढून त्याचे चिंतन केले, तर मागचा पुढचा कोणताही संदर्भ किंवा संबंध नसूनही तो शेर म्हणजे एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली एक वेगळी कविताच असल्याचे आढळून येते. गझलेच्या फॉर्ममध्ये उलगडत जाणारी सलग कविता लिहिली जाऊ शकते, पण ती कविताच; गझल नव्हे. म्हणून गझलेचे खरे गमक हेच आहे की, प्रत्येक सुटा शेरसुद्धा स्वतंत्र कविताच असतो.
ग्रेस यांनी विषयाची सलग मांडणी करताना आणि न करतानाही गझलच्या विधेचा प्रयोग आपल्या कवितात केला आहे हे मान्य करावे लागेल. आलोचकानी ज्या कवितेचा उल्लेख केला आहे त्यासाठी ही वरील निकष लागू आहेत म्हणून ग्रेसचा हात आपल्या हातातून पूर्णपणे सुटलेला असण्याचा प्रश्न येत नाही.
आलोचकाच्या लेखात कवितेची तुलना संगीताशी करून म्हटले आहे की “यमन सुरू केल्यावर सर्व वेरीएशन्स यमन मधलीच हवीत; ताल आणि लय तीच ठेवून तुम्ही इतर रागातली वेरीएशन्स निदान तो राग संपेपर्यंत तरी घेऊ शकत नाही आणि तसं कुणी गायलं तर ते गाणं सौंदर्यपूर्ण असेल पण ऐकणाऱ्याला दुर्बोध होईल तसं ग्रेसच्या कवितेचं झालंय.”
कवितेची तुलना संगीताशी करणे दोन समानांतर रेषांचा मिलाफ करण्याप्रमाणे आहे. तरीही For the sake of argument only अशी तुलना केलीच तर मी हे म्हणेन की कवितेच्या क्षेत्रात ग्रेस ‘यमन’ नव्हे तर पुरती ‘ रागमालाच’ गात होते. एकाच प्रस्तुतीकरणात विभिन्न रागांचे रागातली वेरीएशन्स प्रस्तुत करण्याची किमया पंडित जितेंद्र अभिषेकी किवा विदुषी मालिनी राजूरकरांसारखे expert गायकच करू शकतात ! तुकाराम महाराज म्हणतात ना “तेथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.” तुकारामांनी जाती शब्दाचा उपयोग रूढ अर्थाने केला नाही हे सांगणे नकोच . एका परकीय भाषेची शैली आत्मसात करून शुद्ध आणि सौंदर्यपूर्ण मराठीत प्रयोग करणे हे ‘ येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.’
आलोचकांची दुसरी व्यथा “ग्रेसची कविता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही किंवा कोणत्याही एका मूडची ती सलग मांडणी नाही आणि जर असलीच तर तिच्यात त्याचे अत्यंत व्यक्तीगत अनुभव आहेत”. त्यांच्या कवितेत फक्त ‘अत्यंत व्यक्तीगत अनुभव’ असण्याची आलोचनाही तर्कसंगत नाही. त्यांच्या कवितेतली महाभारतातील, रामायणातील पात्रे, आई, सखीची मुलगी ,समाजातील पांढरेशुभ्र हत्ती’, कबीर, देवी, वारकरी ही सर्व समाजात वावरणारी पात्रे आहेत , ‘अत्यंत व्यक्तीगत अनुभव’ नव्हेत. ग्रेस यांच्या अशा समाजोन्मुखी कवितांची सूची खाली देत आहे.त्यांचे विश्लेषण Grace- A study and research centre for Marathi poet ‘ Grace’ on net वर पाहता येईल.
१..हले काचपात्रातली वेल साधी
२.. स्वप्न
३. पांढरेशुभ्र हत्ती
४.पाउसनांदीची पिंजण
५..बांग देणारा कबीर
६. सखीच्या मुलीला कसे काय द्यावे?
७. फ़ुलपाखरें
८. देखना कबीर
९. पद्मबंध
१०.कर्णधून
११. देवी
१२. पाऊस संध्येचा तिसरा अभिषेक
१३.. मी अशी बहरले होते
१४.मर्म
[गझल बद्दल चे तांत्रिक विवरण “गझल – विकिपीडिया’ च्या सौजन्याने]
———————————————

ती गेली तेव्हा रिमझिम,

ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता.
मेघात आडकली किरणे
हा सूर्य सोडवित होता.
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता.
ती आई होती म्हणूनी
घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध
पाचोळा उडवित होता
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता.
अंगणात गमले मजला
संपले बालपण माझे
खिडकीवर धूरकट तेव्हा
कंदील एकटा होता
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता.

 


नवी भर दि.१२-१२-२०१९

ज्याचे त्याने घ्यावे,ओंजळीत पाणी
कुणासाठी कोणी थांबू नये!
असे उणे नभ,…ज्यात तुझा धर्म
माझे मीही मर्म स्पर्शू नये”
-ग्रेस
—-
शब्दांनी हरवुनी जावे , क्षितिजांची मिटता ओळ,
मी सांज फुलांची वेळ, वृक्षांच्या कलत्या छाया
पाण्यावर चन्द्र फुलांची, मी निळीसावळी वेल.

गात्रांचे शिल्प निराळे, स्पर्शाचा तुटला गजरा,
मी गतजन्मीची भूल, तू बावरलेला वारा,
पायात धुळीचे लोळ, मी भातुकलिचा खेळ

त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती

देऊळ पलिकडे तरीही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब

संध्येतील कमळासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत पाने

ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतून ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई

– चंद्रमाधवीचे प्रदेश, ग्रेस

श्री.नरेंद्र शिंदे यांच्या वॉट्सअॅप पोस्टवरून साभार 

—————————

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

One thought on “कविवर्य ग्रेस”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s