महाराष्ट्र गीते

महाराष्ट्र दिन २

आज महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्याने काही जुनी महाराष्ट्रगीते सादर करीत आहे.

महाराष्ट्र गीत – १
बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गगनभेदी गिरीविण अणु नच जिथे उणे ।
आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे ।
अटकेवरी जेथिल तुरंगि जल पिणे ।
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ।
पौरुषास अटक गमे जेथ दुःसहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे ।
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे ।
रत्नां वा मौक्तिकांही मूल्य मुळी नुरे ।
रमणींची कूस जिथे नृमणीखनि ठरे ।
शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

नग्न खड्ग करि उघडे बघुनि मावळे ।
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे ।
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले ।
भासति शतगुणित जरी असति एकले ।
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

विक्रम वैराग्य एक जागि नांदती ।
जरीपटका भगवा झेंडाही डोलती ।
धर्म राजकारण समवेत चालती ।
शक्ति युक्ती एकवटुनि कार्य साधिती ।
पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो ।
स्फूर्ती दीप्ती धृतिही जेथ अंतरी ठसो ।
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो ।
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनी वसो ।
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

कवि – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
……….

महाराष्ट्र गीत – २

महाराष्ट्र दिन १
दुसऱ्या एका सुप्रसिद्ध महाराष्ट्रगीताची दोन कडवी खाली उद्धृत करीत आहे.

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ।
अंजन कांचन करवंदीच्या कांटेरी देशा ।
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा ।
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा ।
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी ।
जोडी इहपरलोकांसी, व्यवहारा परमार्गासी ।
वैभवासी, वैराग्यासी ।
जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।

अपर सिंधूच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा ।
सह्याद्रीच्या सख्या जिवलगा, महाराष्ट्र देशा ।
पाषाणाच्या देही धरिसी तू हिरव्या वेषा ।
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटीच्या रेषा ।
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची ।
मंगल वसती, जनस्थानींची श्रीरघुनाथांची ।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी ।
जोडी इहपरलोकांसी, व्यवहारा परमार्गासी, वैभवासी, वैराग्यासी ।
जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।

….. गोविंदाग्रज
………..

महाराष्ट्र गीत – ३

महाराष्ट्र दिन ४
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।।

रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी ।
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी ।
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ।।

भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा ।
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा ।
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा ।
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ।।

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी ।
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी ।
दरिद्र्याच्या उन्हात शिजला ।
निढळाच्या घामाने भिजला ।
देशगौरवासाठी झिजला ।
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ।।

——- राजा बढे
——————————

महाराष्ट्र दिन ३

मराठी भाषेसंबंधीची माधव ज्यूलियनांची संपूर्ण कविता खाली दिली आहे.

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे ।
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे ।।
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी ।
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ।।
जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी ।
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी; ।।।
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं, ।
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ।।
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं ।
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं।।
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी ।
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ।।
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां ।
प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा ।।
न घालू जरी वाङ्‌मयातील उंची हिरे मोतियांचे हिला दगिने ।
’मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ।।
मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली ।
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं ।।
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी ।
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ।।

माधव ज्यूलियन


माझा महाराष्ट्र

भव्य हिमालय तुमचाअमुचा, केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा
तुमच्याअमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला
धिक तुमचे स्वर्गहि साती
इथली चुंबिन मी माती
या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातुन अजुनी वाहतसे लाव्हा सगळा

कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच
जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच
जनीं जनार्दन बघणारा तो “एका” हृदयी एकवटे
जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खूण पटे
इंद्रायणिच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐशी; जवळिक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले
माझ्यासाठी भीमाकांठी भावभक्तिची पेठ खुले

रामायण तर तुमचेंमाझे भारत भारतवर्षाचें
छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचें
रजपुतांची विक्रमगाथा तुमच्यापरि मजला रुचते
हृदयाच्या हृदयांत; परंतू बाजी बाजीची सुचते
अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी
दत्ताजीचे शेवटचे तो शब्द अजुनि हृदयामाजीं
बच जायें तो और लढें
पाउल राहिल सदा पुढे
तुम्हांस तुमचें रुसवेफुगवे घ्या सगळा नाजुक नखरा
माझ्यासाठी; राहील गाठी; मरहट्याचा हट्ट खरा

तुमचें माझें ख्यालतराणे दोघेही ऐकू गझलां
होनाजीची सोनलावणी वेड लावते; परि मजला
मृदुंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अन मुरली
थाप डफाची कडकडतां परि बाही माझी फुरफुरली
कडाडणारा बोल खडा जो दरी-दरीमधुनी घुमला
उघडुनि माझ्या हृदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला
तटातटा तुटती बंद
भिंवईवर चढते धुंद
औट हात देहात अचानक वादळ घुसमटुनी जातें
उचंबळे हृदयात पुन्हा तें इतिहासशी दृढ नातें

कळे मला काळाचे पाउल द्रुतवेगानें पुढति पडे
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणीं अधिकचि उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझें बाहू पसरुन अवघ्या विश्वातें कवळी
विशाल दारें माझ्या घरची, खुशाल हीं राहोत खुली
मज गरीबाची कांबळवाकळ सकलांसाठी आंथरली
मात्र भाबडया हृदयांत
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करुनि झंझावात
कोटि कोटि छात्यांचा येथे कोट उभारू निमिषांत

— वसंत बापट (सेतू, १९५७)
**********************

महाराष्ट्र कवींची महाराष्ट्र गीते
दिनांक: 30 Apr 2019

मराठी कवि

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळात इंग्रजांशी चाललेल्या लढ्यात अनेक देशभक्तांनी आपले सर्वस्व पणाला लावले, त्यांच्या पराक्रमाला कवींच्या तेजस्वी शब्दांची जोड मिळाली. १८५७च्या लढ्यातला सेनापति अजीमुल्लाखानपासून स्वा. सावरकर, सेनापति बापट, पं. रामप्रसाद बिस्मिल असे अनेक देशभक्त स्वत: कवी होते.

“रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले” असे लिहिणारे गोविंद दरेकर हे शरीराने अपंग असले तरी मनाने कणखर होते. त्यांच्या शब्दांतून मनाचा तो कणखरपणा व्यक्त झाला आणि “राष्ट्रकवी गोविंद” या नावाने कवी गोविंद ओळखले जाऊ लागले. शिवरायांची स्तुती गाणारे कवी भूषणाचे शब्द, मातृभूमीचे स्तवन गाणारे बंकिमचंद्रांचे “वंदे मातरम” हे शब्द, अशी अनेक उदाहरणे आपल्याला उज्ज्वल इतिहासात दिसतील.

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. हळूहळू भाषावार प्रांतरचना झाली. वळवंटापासून बर्फाच्छादित प्रदेशापर्यंत खूप मोठी भौगोलिक विविधता असलेल्या या देशात संस्कृतिक परांपरही वेगवेगळ्या आहेत. जशी भाषा, तसा वेश, तशी संस्कृती अशा या भारताच्या मध्याच्या जवळ असणारा महाराष्ट्र सर्वार्थाने भारताचे गौरवस्थान ठरला आहे. संत नामदेवांनी महाराष्ट्रधर्म पंजाबमध्ये नेला. रामदासांनी काशीपासून बद्रीनाथपर्यंत मारूतींची स्थापना केली.

औरंगजेबाची सत्तेची धुंदी उतरवणारे छत्रपती शिवराय याच मराठी मातीतले. सतत परकीय आक्रमणांनी गांजलेल्या उत्तर भारतात दिल्लीच्या गाडीवर मराठ्यांचा झेंडा फडकावत शत्रूला अफगाण सीमेपर्यंत पळवून लावत अटकेवर भगवा फडकावला, तो याच महाराष्ट्रातल्या पेशव्यांनी.

परकीयांनी पेशवे, शिंदे, होळकर यांच्या तलवारीचा धसका घेतला. त्यामुळेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना होताना १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्रची निर्मिती झाली. ज्ञानेश्वरांपासून आजच्या काळापर्यंत अनेक मराठी कवींनी आपापल्या शब्दांमध्ये या महाराष्ट्रची थोरवी वर्णन केली आहे.

“माझा मराठीची बोल कवतिके” असे, म्हणणारे ज्ञानेश्वर, या महाराष्ट्रभूमीला “आनंदवनभुवनी” म्हणणारे समर्थ रामदास अशा संतांनी आपल्या मराठीबद्दल व महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त केले. गेल्या १०० वर्षांतील बालकवी, केशवसुत, बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, वसंत बापट, ग.दि. माडगूळकर, शाहीर अमर शेख, आण्णाभाऊ साठे अशा सर्वांनी थोर संतकवींचा वारसा पुढे नेला. महाराष्ट्राचे वर्णन करताना त्यांच्या शब्दांना धार आली, तर कधी पंढरीच्या चंद्रभागेच्या, इंद्रायणीच्या, गोदावरीच्या आठवणीने त्यांची मने भक्तिभावाने उचंबळून आली.

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा !
प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा ||
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ||

असे राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांनी वर्णन केले आहे.
तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर लिहितात –
गगनभेदी गिरीविण अण, नच जिथे उणे |
आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे |
अटकेवरी जेथिल तुरगि जल पिणे |
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ।
पौरुषास अटक गमे जेथे दु:सहा ||१||
बहुत असोत सुंदर संपन्न की महा |
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ||धृ||

भारताचा मानबिंदू हिमालय असला तरी आमचा सह्याद्रि त्यापेक्षा कमी नाही. हिमालयाच थरकाप उडवणार्‍या उंचीप्रमाणे आमचा हरिश्चंद्रगडाचा कोकणकडाही तेवढाच बेलाग आहे. कवी बापट लिहितात –
भव्य हिमालय तुमचा अमुचा,
केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा,
मनात पूजिन रायगडा
तुमच्या आमुच्या गंगायमुना,
केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ,
प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हाला,
बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त, बुद्ध विश्वाचे शास्ते,
तुकयाचा आधार मला

अशा या कवींमध्ये मराठी कवयित्रीसुद्धा मागे नाहीत. कवयित्रि पद्मा गोळे म्हणतात –

आम्ही महाराष्ट्रकन्या, मायमराठी अमुची
स्वर्गाहूनही आम्हाला माया मराठी भूमीची
मुक्ता, जना जागविति भोळ्या भक्तीने पहाटे
जिजा, लक्ष्मी, शिकविति आम्हा स्वातंत्र्याची गीते
आम्ही महाराष्ट्रकन्या, नका जाऊ कोणी वाटे ||
हिरव्या कोकणात आहे गुप्त तलवारीचे पाते
म्हणा कळ्या या जाईच्या परी मायभूमीसाठी
करू हातांची ढाल बाळ बांधूंनिया पाठी ||

अशी ही महाराष्ट्राची भूमी….जशी वीरांची तशीच संतांची. जसा मराठ्यांचा शौर्याचा भगवा झेंडा, तसाच पंढरीच्या वारकर्‍यांची भगवी पताकाच. तुकोबा म्हणतात –

“मऊ मेणाहूनही कठीन वज्रासही भेदू ऐसे अशी आम्हा मराठी माणसे”. ज्ञानेदेवांची “अमृतवाणी”, तुकोबांची “अभंगगाथा”, तुकोबांची “वज्रवाणी”, मोरोपंतांच्या नादमधूर “आर्या”, होनाजिबाळा, सगनभाऊ रामजोशी यांच्या “लावण्या”, प्रभाकरांसारख्या शाहीरचे मराठी “पोवडे” यांसारख्या कवींनी आपल्या महाराष्ट्राला कायम जागरूक ठेवले. अभंग गाताना तल्लीन होणारी मने शाहीरच्या डफावरच्या थापेने थाररून उठत. अशा या वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या कवींनी आपापल्या शब्दांत महाराष्ट्रची महती गायली.

कवी विंदा करंदीकर म्हणतात –

स्वतंत्रतेचा मंत्र ज्यांना गर्भामध्ये मिळे
तेच मराठी आम्ही, आम्ही सह्याद्रीचे सुळे
स्वराज्यातुनी पुढे चला रे, चला सुराज्याकडे

अशा हा शौर्याचा, भक्तीचा वारसा आपल्या सर्वांना देणारा महाराष्ट्र तुम्ही मुले या उद्याच्या महाराष्ट्रचे नवनिर्माते ठरणार आहात. ज्ञानाच्या, विज्ञानाच्या आधाराने तुम्हीच या महाराष्ट्राला भारताच्या गौरवस्थानी नेऊन ठेवणार आहात. कधी सोपानदेव चौधरी लिहितात –

उद्याचा नवा महाराष्ट्र ऐसा हवा
नव्या अंकुरसवे फुटाव्या तोडलेल्या शाखा, आणखी भराने
व्हावी उज्ज्वल इतिहासाची पाने
जावोत खोल मुळे लक्ष लक्ष
बहरावा असा महाराष्ट्र वृक्ष
या बहराला तेज चढावे मराठी मातीमधले !
याचे बी-बियाणे आहे तेजाचे
असा हा याचा विकास
भारताला प्रकाश व्हावा उद्याचा नवा महाराष्ट्र ऐसा व्हावा !

अशा थोर कवींच्या मनातला, महाराष्ट्र मुलांनो तुम्हाला उभा करायचाय. महाराष्ट्राला मिळालेला हा तेजस्वी वारसा तुम्हाला चालवायचाय. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या सैन्यदलात जनरल थोरात, एअर चीफ मार्शल ऋषिकेश मुळगावकर, जनरल अरुणकुमार वैद्य अशांनी सैन्यदलात शौर्य दाखवत महाराष्ट्रचे नाव उज्ज्वल केले. देशाच्या स्वातंत्र्यावर घाला घालणार्‍या चीन आक्रमणाच्या वेळी महाराष्ट्रचा सह्यकडा दिल्लीच्या मदतीला गेला. म्हणूनच सेनापती बापट म्हणतात –

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले l मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले ll
खरा वैरी पराधीनतेचा l महाराष्ट्र आधार या भारताचा ll १ ll
महाराष्ट्र तेजस्विता नाही मेली l
महाराष्ट्र तेजस्विता ही निजेली l
महाराष्ट्र तेजस्विता जगावाया l
चला या चला बंधुंनो ! या चला या ll २ ll

– मिलिंद सबनीस
शिक्षणविवेकवरून साभार.

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s