कविवर्य मंगेश पाडगावकर आणि त्यांची गीते

मंगेश पाडगावकर

माझे आवडते कवि मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिन या महिन्यात येऊन गेला. त्यावेळी श्री माधव विद्वांस यांनी  फेसबुकवर लिहिलेला एक माहितीपूर्ण लेख मी त्यांच्या सौजन्याने इथे संग्रहित करीत आहे.

तसेच मीच १०-१२ वर्षांपूर्वी लिहिलेला ‘पाडगावकरांची गीते’ हा लेखसुद्धा खाली दिला आहे.
—————————————————

Madhav Vidwans
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !
अश्या मनाला भावणाऱ्या कविता करणारे मंगेश पाडगावकर यांची आज जयंती
अभिष्टचिंतन
(१० मार्च १९२९- ३० डिसेंबर २०१५). मराठी कवी. जन्म वेंगुर्ल्याचा. प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. उच्च शिक्षण मुंबईत झाले. मराठी आणि संस्क़त हे विषय घेऊन ते. बी. ए. आणि एम्.ए. ह्या परीक्षा पहिल्या वर्गांत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले (१९५६, १९५८). ह्या दोन परीक्षांतील यशाबद्दल त्यांना अनुक्रमे ‘तर्खडकर सुवर्णपदक’ आणि ‘न. चिं केळकर सुवर्णपदक’ देण्यात आले. एम्.ए. होण्यापूर्वींच मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक (१९५१-५२), साधना साप्ताहिकात सहसंपादक (१९५३-५५) असा नोकऱ्या त्यांनी केल्या होल्या. १९५७ मध्ये आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर ‘असिस्टंट प्रोड्यूसर’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९६० ते ६२ ह्या काळात मुंबईच्या ‘सोमैया कॉलेज’ आणि ‘मिठीबाई कॉलेज’ मध्ये मराठीचे प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर ‘प्रोड्यूसर’ म्हणून ते काही काळ होते (१९६४-७०). १९७० पासून ‘युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस’, मुंबई येथे मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून ते काम करू लागले. १९७६-७९ ह्या वर्षांसाठी मुंबई पिद्यापीठात मराठीचे मानसेवी प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. १९५० मध्ये रेव्हरंड भास्कर कृष्ण उजगरे ह्यांची कन्या यशोदा हिच्याशी त्यांचा आंतरधर्मीय विवाह झाला.
धारानृत्य (१९५०) हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. त्यातील कवितेवर बोरकरांच्या कवितेचे संस्कार स्पष्टपणे जाणवतात. त्यानंतरच्या काव्यसंग्रहात जिप्सी (१९५२), छोरी (१९५४), उत्सव (१९६२), विदूषक (१९६६) व सलाम (१९७८) ह्यांचा समावेश होतो. त्यांच्या कवितेचे स्वतंत्र पृथगात्म रूप त्यांतून व्यक्त होत गेले. मीरा बाईच्या काही हिंदी गीतांचा त्यांनी केलेला मराठी पद्यानुवाद मीरा ह्या नावाने प्रसिद्ध झाला आहे (१९६५). इंग्रजीतील लिम्‌रिकच्या धर्तीवर मराठीत त्यांनी काही वात्रटिकाही (१९६४) लिहिल्या आहेत. भोलानाथ (१९६३) आणि बबलगम (१९६७) हे त्यांच्या बालगीतांचे संग्रह. जिप्सी, छोरी व भोलानाथ ह्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळालेली आहेत.
पाडगावकरांनी लिहिलेले सुंदर, काव्यात्म ललित निबंध निंबोणीच्या झाडामागे (१९५३) ह्या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक अमेरिकन साहित्यकृतींचे मराठी अनुवाद त्यांनी केलेले आहेत. तसेच जे. कृष्णमूर्तींची काही भाषणे त्यांनी अनुवादिली आहेत. त्यांनी संपादिलेल्या ग्रंथांत बोरकरांची कविता (१९६०), युगात्मा (१९७०), महात्मा गांधीवरील ललितलेखनाचा संग्रह), संहिता (१९७५), विंदा करंदीकर ह्यांची निवडक कविता) ह्यांचा अंतर्भाव होतो.
बहुतेक सर्व आधुनिक कवींप्रमाणे पाडगावकरांची कविप्रकृतीही स्वच्छंदतावादी आहे. तीत समाजाभिमुखतेचीही एक धारा मिसळलेली आहे. पाडगावकरांची गणना प्रमुख नवकवींत होत असली, तरी नवकवितेत अनेकदा आढळणारी कटुता, वैफल्य, रचनेचे तेढेपण इत्यादींपासून ही कविता अलिप्त आहे. पाडगावकरांच्या रम्यत्वाने वेडावून जाणाऱ्या वृत्तीला सौंदर्याचा प्रथम आणि सर्वंकष प्रत्यय येतो, तो विविधरूपधारी निसर्गातून. निसर्गाची लसलसती, गूढरम्य विलसिते त्यांच्या सौंदर्यवृत्तीबरोबरच अध्यात्मवृत्तीचेही संतर्पण करतात; त्यांना अंतर्मुख बनवितात; त्यांच्या सर्जनशीलतेला आवाहन करतात. निसर्गाच्या जोडीने पाडगावकरांच्या कवितेत प्रेमभावनेच्याही अनेक गहिऱ्या छटा आविष्कृत झाल्या आहेत. प्रेमभावनेच्या उत्कट आविष्काराच्या दृष्टीने पाडगावकरांचे शर्मिष्ठा (१९५५) हे नाट्यकाव्य महत्त्वाचे. पाडगावकरांच्या ठिकाणच्या व्यापक सामाजिक जाणिवांमुळे भोगाइतकेच त्यागाचे, जीवनातील सुरूपतेप्रमाणेच कुरूपतेचेही दर्शन त्यांची कविता घडविते. पाडगावकरांची अलीकडील कविता उपहासउपरोधाने भरलेली दिसते. सलाम हा काव्यसंग्रह त्या दृष्टिने उल्लेखनीय आहे.

                                                                 – श्री.माधव विद्वांस

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !
काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा
तरीसुद्धा,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !
मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करता येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात तरी
प्रेम करता येतं !
सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !
आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !
बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !
कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !
प्रेमबीम झूट असतं
म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी
प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का?
प्रेमाशिवाय अडलं का?”
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”
तिच्यासोबत पावसात
कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं
खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी
तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
कवी – मंगेश पाडगावकर”

मंगेश पाडगावकर कविता

नवी भर दि.१०-०८-२०२१


मंगेश पाडगांवकरांची गीते

आज माझे सर्वात जास्त आवडते कवि, कविवर्य मंगेश पाडगावकरांचा जन्मदिन आहे. त्यांची केलेली काव्यवाचने मी अनेक वेळा ऐकून त्यांच्या प्रतिभेला दाद दिली आहे. त्यांनी लिहिलेल्या काही अद्भुत ओळींचे एक लहानसे संकलन मी इथे केले होते.

कविवर्य मंगेश पाडगांवकर यांना पद्मभूषण हा बहुमान जाहीर झाला आहे. त्यांनी ऐंशीव्या वर्षात पदार्पण केले होते तेंव्हा त्यानिमित्याने त्यांना सादर प्रणाम आणि त्यांनीच एका कवितेत लिहिल्याप्रमाणे ‘सलाम’ करून त्यांच्या काही गीतांमधल्या अजरामर ओळी मी एका कार्यक्रमात सादर केल्या होत्या. त्या आज या स्थळावर देत आहे.

माझ्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची एक दृष्टी दिली. त्यांच्या या कवितांनी किती दिलेला संदेश पहा.

माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे !
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमीर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे !
—————————-
या ओठांनी चुंबुनि घेइन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
—————————-

कधी कधी ते जीवन जगण्याची स्पष्ट दिशा दाखवतात.

झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इषारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप आसून उशाशी
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी
—————————-
वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी
सौदा इथे सुखाचा पटवून चोख घ्यावा
व्यवहार सांगती हा, ही माणसे शहाणी
कळणार हाय नाही दुनिया तुला मला ही
मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी
—————————

मनातला आनंद कसा व्यक्त करावा हे या शब्दात पहा.

अर्थ नवा गीतास मिळाला
छंद नवा अन्‌ ताल निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले ?
शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले
—————————
क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे
विरघळून चंद्र आज रक्तातुन वाहे
आज फुले प्राणातुन केशरी दिवा
रोजचाच चंद्र आज भासतो नवा
—————————-
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेशा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
—————————-
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
———————-

तर वेदना कशी सहन करावी हे या शब्दात दिले आहे.

निःशब्द आसवांनी समजाविले मनाला
की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला
माझ्याच मी मनाशी हे गीत गायिले
मी बोलले न काही नुसतेच पाहिले
हृदयात दाटलेले हृदयात राहिले
——————-
जन्ममृत्युचे लंघुनि कुंपण
स्थलकालाच्या अतीत उमलुन
प्रवासिनी मी चिरकालाची
अनाघ्रात ही उरले
मी चंचल हो‍उन आले
भरतीच्या लाटांपरि उधळित
जीवन स्वैर निघाले
——————-

दुःखाने खचून न जाता जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोण ते देतात.

काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी ?
भान राधिके नुरे ऐकताच बासरी
बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा
सर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा
येथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा
————————
दुःख नको तुटताना
अश्रु नको वळताना
मी मिटता लोचन हे उमलशील तू उरी
शब्द शब्द जपून ठेव बकुळिच्या फुलापरी
————————

कांही गीतात ते बोलता बोलता जीवनातली कांही सत्ये सहजपणे सांगतात.

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ?
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे !
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
————————-
कधी बहर, कधी शिशिर, परंतू दोन्ही एक बहाणे
डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे
————————–

त्यांनी दिलेल्या कांही प्रतिमा मनाला भिडतात.

तुला ते आठवेल का सारे ?
दवात भिजल्या जुईपरी हे मन हळवे झाले रे
—————————-
वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
ताऱ्यांत वाचतो अन्‌ या प्रीतिची कहाणी
पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची
—————————-
मोर केशरांचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहु दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे
———————–

त्यांची ही ओळ माझ्या डोळ्यात पाणी आणते.

हात एक तो हळु थरथरला
पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी अजून जळती वाती
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
————————–

ऐंशी वर्षाच्या वयातला त्यांचा उत्साह पाहून म्हणावेसे वाटते.

दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
मोजावी नभाची खोली
घालावी शपथ ओली
श्वासात चांदणे भरायचे

थरारे कोवळी तार
सोसेना सुरांचा भार
फुलांनी जखमी करायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
————————-

ही अगदी थोडी प्रातिनिधिक उदाहरणे झाली. पाडगांवकरांच्या गीतांचा खजिना अपरंपार आहे.

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

One thought on “कविवर्य मंगेश पाडगावकर आणि त्यांची गीते”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s