कविवर्य सुरेश भट आणि त्यांच्या कविता

सुरेश_भट

अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं. त्यातील रंगनाथचा एक मुलगा श्रीधर डॉक्टर झाला. पण तो बहिरा होता आणि दुसरा मुलगा वेडा होता. श्रीधरचं लग्न झालं. बायको शांता ही अतिशय मनमिळाऊ होती. तिला कवितांची खूप आवड. रंगनाथ-शांताला लग्नानंतर १५ एप्रिल १९३२ रोजी मुलगा झाला. उभयंतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नाव ठेवलं सुरेश! हळूहळू सुरेश मोठा होत होता. पण तो अडीज वर्षांचा झाल्यावर त्याला पोलिओची बाधा झाली व त्यात त्याचा उजवा पाय अधू झाला. श्रीधर स्वत: डॉक्टर असूनही काहीही करू शकले नाहीत कारण त्याकाळी पोलिओवर रामबाण उपायाची लस वा औषधच उपलब्ध नव्हती.

अधू पायामुळे सुरेश शालेय जीवनात कुठलेही मैदानी खेळ खेळू शकला नाही. शालेय शिक्षण संपता संपता मॅट्रिकला पण नापास झाला. डॉ. श्रीधर हताश झाले व नकळत सुरेशला घरात दुय्यम दर्जाची वागणूक सुरू झाली. मग दुसर्‍यांदा मॅट्रिकला बसून पास झाला, तर पुढे इंटरमिजिएटला पण नापास झाला. तिथेही परत परीक्षेला बसून पास झाला तर बी.ए. ला चक्क दोनदा नापास झाला. तिसर्‍यांदा परीक्षेला बसून तिसर्‍या श्रेणीत पास झाला व मग पोटासाठी खेड्यापाड्यातील शिक्षकाची नोकरी धरली. पण तीही एकामागून एक सुटतच होती. पण एक गोष्ट मात्र सुरेशकडे कायम टिकून होती ती म्हणजे जिद्द आणि आईकडून आलेली कवितांची आवड. कुठेतरी आत कविता रुजली व फुलत होती. समकालीन मित्रांचे सुखेनैव संसार फुलत असताना लोखंडी पेटीवर वही ठेऊन कंदीलाच्या पिवळ्या प्रकाशात सुरेश तळपत होता. असेच एकदा अमरावतीला सुरेश गेला असताना प्रा. मधुकर केचे त्याला स्टेशनवर भेटले व स्वत: यशस्वी वाटेवर आरूढ असल्याने उपहासाने सुरेशला म्हणाले, कवी म्हणून तू संपलास. आता फक्त मास्तरकीच कर. पण सुरेश मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, ते अजून ठरायचंय!

१९६१ साली सुरेश २९ वर्षांचा असताना नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. रूपगंधा व त्याला दिलीप चित्रे यांच्यासोबत विभागून राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक मिळाले आणि पहिलं पारितोषिक कुसुमाग्रजांना. यानंतर मात्र दांभिक नातेवाईक, हिणवणारे समकालीन सुरेशला ओळख देऊ लागले. यानंतर पुढचा काव्यसंग्रह मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित व्हायला १३ वर्षांचा काळ जावा लागला व त्यातही सुरेशने ‘रंग माझा वेगळा’ हे दाखवून देत केशवसुत पारितोषिक पटकावले. बीएला दोनदा नापास झालेल्या सुरेशचा ‘रंग माझा वेगळा’ नंतर ३ विद्यापिठांत एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला गेला. १९८३ साली सुरेशने स्वत:च प्रकाशक व्हायचं ठरवलं व एल्गार हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला.

शिक्षणात गती नसलेल्या सुरेशने आईकडून काव्याप्रमाणेच संगीताची आवड पण उचलली होती. मैदानी खेळ पायाच्या अधूपणाने न खेळू शकणार्‍या मुलाला डॉ. श्रीधर यांनी बाजाची पेटी आणून दिली. पुढे त्याची संगीतातील आवड व प्रगती बघून संगीतातील शिक्षणासाठी प्रल्हादपंतांकरवी घरी त्याला संगीत शिकवणी सुरु केली.

पुढे शालेय जीवन संपता संपता पायातील कमजोरीवर मात करण्यासाठी सुरेश जिद्दीने व्यायाम करू लागला. वेळ बराच लागला पण दंडबैठका—डिप्स यासारख्या व्यायामामुळे तो हाडापेराने मजबूत झाला. नंतर नंतर तर पायात पण चांगलीच शक्ती आल्याने सुरेश सायकल पण चालवू लागला. वडिलांनी मग त्याला रॅले कंपनीची सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी आणून दिली.

अभ्यासात गती नसलेला सुरेश आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप, पेरिस्कोपसारख्या हस्तकलेच्या वस्तू बनवण्यात वाकबगार होता. तसंच तो काचा कुटून पतंगाचा मांजा बनवी. सुरेशला बेचकी छान बनवता येई व त्यातही त्याचा नेम अचूक असे. या व्यायामाचा फायदा पुढे जेव्हा सुरेशने काव्यगायनाच्या मैफिली करायला सुरुवात केली तेव्हा मांडी घालून तासन् तास बसण्यासाठी झाला. सुरेशने केवळ शारीरिकच नव्हे तर शैक्षणिक कमतरतेमुळे त्याला दिल्या गेलेल्या दुय्यम वागणुकीला आपल्या जिद्दीच्या बळावर मात केली आणि तथाकथित साहित्यिकांना व दांभिकांना आपल्या कवितांद्वारे चोख उत्तर दिले.

कधीतरी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना सुरेशचा काव्यसंग्रह एका खोपटवजा दुकानात सापडला. तो वाचून प्रभावित होऊन त्यांनी सुरेशला शोधून काढलं आणि त्याच्या अनेक गाण्यांना चाली लावून अजरामर केलं. ‘मालवून टाक दीप’ ते पार ‘केंव्हातरी पहाटे’पर्यंत मंडळी अशा या तळपत्या सूर्याचा — सुरेशचा म्हणजेच कवीवर्य सुरेश भट यांचा  (दि.१४ मार्च) आज स्मृतिदिन आणि म्हणून हे सगळं आठवण्याचं व सांगण्याचं कारण.

रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार यानंतर भटसाहेबांनी गझलेची बाराखडी, काफिला, झंझावात, रसवंतीचा मुजरा, सप्तरंग, निवडक सुरेश भट आणि हिंडणारा सूर्य ही पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यांना मानाचा सप्रेम मुजरा! त्यांच्याबाबत बोलायचं तर ओठी असं येतं :

कंठी स्वरेश होता, शब्दी सुरेश होता
उलटवून हरती बाजी, तो जगला नरेश होता

या लेखाचा लेखक अज्ञात, वॉट्सॅपवरून साभार

………………………………………….

विकीपीडियावर मिळालेली अधिक माहिती

जन्म नाव सुरेश श्रीधर भट , टोपणनाव गझलसम्राट
जन्म एप्रिल १५, १९३२, अमरावती, महाराष्ट्र
मृत्यू मार्च १४ ,२००३, नागपूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय , धर्म – बौद्ध धर्म
कार्यक्षेत्र काव्य, साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी, साहित्य प्रकार – कविता,गझल़
प्रसिद्ध साहित्यकृती रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, सप्तरंग
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील – श्रीधर रंगनाथ भट, आई – शांता श्रीधर भट, अपत्ये – विशाखा, हर्षवर्धन, चित्तरंजन
संकेतस्थळ https://www.sureshbhat.in

सुरेश भट आणि संगीत
शालेय जीवनात त्यांना संगीताची गोडी आईने लावली होती. त्या स्वतः हार्मोनिअम वाजवत. त्यांनी मैदानी खेळ खेळण्यास जाऊ न शकणा-या आपल्या लाडक्या मुलाला बाजाची पेटी आणली होती. भट यांचे वडील- श्रीधरपंतही संगीतप्रेमी होते. त्यांनी एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन आणला होताच; मुलाची आवड पाहून आठवड्यातून ते एक तरी ध्वनिमुद्रिका विकत आणत. ही संगीत आवड सुरेश भट यांना शाळेच्या बँडपथकात घेऊन गेली. तिथे ते बासरी वाजवीत. संगीतातील गती पाहून श्रीधरपंतांनी सुरेशला रीतसर संगीत शिक्षण द्यायचे ठरविले आणि प्रल्हादबुवा घरी येऊ लागले. आजारी असताना सुरेश भट तासन् तास अंथरुणावर बासरी वाजवत बसलेले असायचे. सुरेश भट स्वतः उत्तम गायक होते. त्यांचा गायनाचा एक कार्यक्रम अमरावतीत २०-२-१९८४ रोजी झाला होता. त्यावेळी साथीसाठी पेटीवर हृदयनाथ मंगेशकर होते. अंथरुणावर बसून आणि पडून त्यांनी गुलाबराव महाराज यांचा ‘गानसोपान’ हा ग्रंथ आणि विष्णू नारायण भातखंडेकृत ‘संगीत खंड’, असे अनेक ग्रंथ सुरेश भट यांनी त्याच काळात वाचले होते. त्यांनी ‘गानसोपान’ची अनेक पारायणे केली होती. १९५२ ला त्यांना तबला शिकावासा वाटल्यावर तो ही ते शिकले. पुढे ते ढोलकीही वाजवीत.

शरीरसाधना आणि खेळ
भटांचा एक पाय कमजोर झाल्यावर त्यांनी व्यायामावर जोर देऊन बाकीचे शरीर मजबूत बनवले. याचा उपयोग त्यांना गाण्यातही झाला. ते तासन् तास मैफली करू शकत. ते दंड-बैठका काढतच पण डबलबारवर १०० ते १५० डिप्स मारत. त्यामुळे इतकी शक्ती पायात आली की ते सायकल चालवू लागले. वडिलांनी त्यांना मिलर कंपनीचा डायनोमा असलेली रॅले कंपनीची सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी दिली होती. १९६५ मध्ये जेव्हा अमरावती रेल्वेस्थानकावर उड्डाणपूल झाला तेव्हा अमरावतीतील सायकल रिक्षावाले त्यावर उतरून ती चढण चढत. पण सुरेश भट आपला भाऊ दिलीप याला डबलसीट घेऊन एका दमात ती चढण चढत. ते हुतूतू, व्हॉलीबॉलही खेळत. ते आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप (शोभादर्शक) आणि पेरिस्कोप (परिदर्शक) सुद्धा बनवीत. काचा कुटून पतंगाचा मांजा बनविण्यात ते वाकबगार होते. सुरेश भट यांना गुलेर (बेचकी किंवा गलोल) बनविता येई. त्यांचा नेम अचूक असे. ते पाहून श्रीधरपंतांनी त्यांच्यासाठी खास अमेरिकन स्लिंग शॉट बंदूक आणली होती. ती वापरून भट चिमणी, कबुतर घायाळ करीत. ते भालाफेकही करीत. भालाफेकीचा सराव घराजवळच्या निंबाच्या झाडावर चाले; तर तलवारबाजीचा प्रा. बाबा मोटे यांच्याबरोबर. एका घावात दोन तुकडे करण्यात सुरेश भट ‘एक्सपर्ट’ होते.

शिक्षण आणि काव्यलेखन
सुरेश भटांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए. ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यावर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.

त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.

धर्मांतर
सुरेश भट यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. भाऊ लोखंडे यांच्या उपस्थितीत भन्ते सुरई ससाई यांनी त्यांना धम्मदीक्षा दिली होती. सुरेश भट नास्तिक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे श्रद्धास्थान होते. बौद्ध धर्म हा ईश्वराचे अस्तित्व नाकारणारा व बाबासाहेबांचा धर्म आहे. यामुळे त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला, असे मत त्यांच्या मुलगा चित्तरंजन भट यांचे आहे.

कौटुंबिक
सुरेश भट यांना एक मुलगी विशाखा व दोन मुलगे हर्षवर्धन व चित्तरंजन होती. त्यापैकी हर्षवर्धन याचा अपघातात मृत्यू झाला होता.
हृदयविकाराच्या झटक्याने १४ मार्च २००३ रोजी त्यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले.

काव्यसंग्रह
एल्गार, काफला, झंझावात, रंग माझा वेगळा (१९७४), रसवंतीचा मुजरा, रूपगंधा, सप्‍तरंग, सुरेश भट – निवडक कविता
हिंडणारा सूर्य (गद्य)
सुरेश भट यांच्यावरील पुस्तके
अन उदेला एक तारा वेगळा (प्रकाशन वर्ष २०११) : डॉ. राम पंडित, गझलसम्राट सुरेश भट आणि … (प्रदीप निफाडकर)

********************

नवी भर दि.१५-०४-२०२०

आज १५ एप्रिल
आज मराठीतील ‘गझल सम्राट’ सुरेश भट यांचा जन्मदिन.
जन्म. १५ एप्रिल १९३२
मा.सुरेश भट हे मराठी गझल विश्वातील एक अजरामर नाव. त्यांच्याशिवाय मराठी गझल हा विषयच पूर्ण होत नाही. मराठी गझल आणि मा.सुरेश भट हे समीकरण झालेलं होते. गझल मराठी माणसांपर्यंत पोहचवली ती मा.सुरेश भट यांनी. गझलचे सादरीकरणाचे वेगवेगळे कार्यक्रम करून त्यांनी गझलचा प्रसार आणि प्रचार केला. ‘लाभले आम्हास भाग्य’ ही त्यांची गझल अनेक लोक म्हणतात, ऎकतात. मा.सुरेश भटांनी यांनी उर्दू भाषेतील शेर शायरी, गझल यांचा आयुष्यभर मनापासून आभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला.हा त्यांचा प्रयास त्यांना ‘गझल सम्राट’ हा मनाचा किताब देवून गेला. विदर्भातील अमरावती या शहरात सुरेश भटांचा जन्म झाला. तिथेच ते लहानाचे मोठे झाले. वडील डॉक्टर असल्याने घरची परिस्थीती बरी होती. आणि त्यांच्या आईला कवितेची खूप आवड होती. यातूनच सुरेश भटांना कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता. त्यांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यानंतर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. पण ते काही लिहित होते ती गझल आहे हे त्यांनाही माहिती नव्हते. त्यांना उर्दू भाषेचाही चांगलाच अभ्यास होता. सुरेश भट हे जरी विदर्भातील असले तरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात त्यांची ओळख होती. मा.हॄदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांना शोधून काढले आणि भटांच्या कविता, गझल त्यांनी संगीतबद्ध केल्या. मराठीतील अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये त्यांच्या गझल घेण्यात आल्या. मा.सुरेश भटांनी एकूण पाच गझलसंग्रह लिहिले त्यात ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’, ‘सप्तरंग’ यांचा समावेश आहे. वेगवेगळे रस, रंग असणारी मराठी गझल त्यांनी रेखाटली. फक्त श्रृंगार, प्रेम, विरह इतकच नाहीतर त्यांनी आपल्या गझलमधून समाजाचे दु:ख मांडले, राजकीय लोकांचा भ्रष्टाचार मांडला. बदलता समाज, बदलती माणूसकी मांडली. त्यांच्या अनेक गझल बी.ए.च्या अभ्यासक्रमात घेण्यात आल्या. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य गझलसम्राट म्हणजे मा.सुरेश भट असे वर्णन मा.सुरेश भट यांचे करता येईल. आज त्यांच्यमुळे मराठी गझलला मानाचे स्थान मिळाले आहे. त्यांच्या गझल संग्रहांना आजही मोठी मागणी आहे. त्यांची गझल ही कोणत्याही एका वर्गाची नव्हती. अनेक साहित्यिकांनी गझलला मान्य केले नव्हते पण सुरेश भट लढले आणि त्यांनी गझलला अधिकॄत सन्मान मिळवून दिला. सुरेश भटांनी गझल फक्त त्यांच्यापुरतील मर्यादीत न ठेवता अनेकांना ती शिकवली. आज महाराष्ट्रात त्यांच्याकडून गझल शिकलेले कित्येक गझलकार आहेत. मा.सुरेश भट हे फक्त गझलकारच नाही तर एक तडफदार पत्रकार देखील होते त्यांनी त्यांचे एक साप्ताहिक देखील सुरू केले होते. ज्यातून त्यांना परखड लिखाण केले. समाजातील प्रत्येक घटनेवर त्यांचं चौकस लक्ष असायचं. त्यावर ते बेधडकपणे लिहायचे. त्यांची व्यक्तीमत्व कलंदर व्यक्तीमत्व होतं असं अनेकदा बोललं जायचं. आणि त्यात तथ्यही आहे. इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर देखील त्यांनी कधीही पैशांना महत्व दिले नाही. त्यांनी फक्त गझलचा प्रसार केला. ते लिहित गेले. त्यांनी भरभरून लोकांना दिले. त्यांच्या शिष्यांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. जो येईल त्याला ते शिकवायचे. त्यांच्या झोळीत ते काहीच शिल्लक ठेवत नव्हते. सर्व लुटवून टाकायचे. मा.सुरेश भटांनी गझलकारांना गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून ‘गझलेची बाराखडी’ नावाची एक पुस्तिका लिहिली होती. वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे. नवोदित कवींना गझल कळावी म्हणून ते ही पुस्तिका त्यांना स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत असत. सुरेश भटांनी गझलसाठी आपलं जीवन वाहून टाकलं होतं. आज मराठी गझल लिहिणारे, गाणारे कित्येक गझलकार तयार झाले आहेत. पण सुरेश भटांनी जे पेरलं होतं ते पुन्हा उगवेल याची जरा शंकाच आहे. त्यांनी अनेकांना एकत्र आणून गझलचा प्रसार केला होता. पण आता परिस्थीती जरा वेगळी आहे. सुरूवातीच्या काळात मराठी गझल एकीकडे आणि मराठी कविता एकीकडे असे होते. आज मराठी गझल लिहिणा-यांमध्येच कित्येक ग्रुप तयार झाले आहेत. मी मोठा की तो मोठा ह्या गोष्टी आता पुढे यायला लागल्या आहेत. त्यामुळे सुरेश भटांनी ज्या उद्देशाने गझलला जीवन अर्पण केले होते, तो उद्देश आजच्या पिढीतील गझलाकारांमधून हरवल्याचे चिन्ह दिसत आहेत. पण तरीही एक गोष्ट मात्र, नक्की की सुरेश भटांप्रमाणे गझलेचे तंत्र जपणारा सुद्धा एक वर्ग आहे हे महत्वाचं. मा.सुरेश भट यांनी मराठी गझलच्या विश्वात अमूल्य असं काम केले होते. त्यांच्या गझल व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, भिमराव पांचाळे यांसारख्या अनेक मोठ्या गायकांनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. मा.सुरेश भट यांना दोन मुले. त्यापैकी चितरंजन हे सुद्धा वडीलांच्याच पावलावर पाऊल देत एक उत्तम गझलकार म्हणून प्रसिद्ध आहेत. मा. सुरेश भट यांचे १४ मार्च २००३ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.सुरेश भट यांना आदरांजली.
सं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
मा.सुरेश भट नक्षत्रांचे देणे
https://www.youtube.com/watch?v=DygZQRv4JD8 (ही चित्रफीत कदाचित उपलब्ध नाही)
रंग माझा वेगळा
https://www.youtube.com/watch?v=r8LGpFQKkpQ
https://www.youtube.com/watch?v=y1j3nP1E6cc&list=PL99D9CC5EA52821B8&index=7

************************ दि.१५-०४-२०२०

 15 April 1932 जन्मदिन – कै.सुरेश भट

गुंतुनी गुंत्यांत साऱ्या…!

जगत मी आलो असा की,
मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की,
मग पुन्हा जुळलोच नाही!
अशा दर्दभऱ्या ओळी रचून वाचकाला मंत्रमुग्ध करणारे मराठीतील कमालीचे प्रतिभावान गझल व गीतकार सुरेश भट यांचा आज जन्मदिन! त्यांच्यासारखा अवलिया आणि कलंदर कवी विरळाच.

फाटक्या पदरात माझ्या
का तुझे मावेल अंबर?
दानही करशील तू
पण मी असा आहे कलंदर!
अशी स्वत:ची आगळी ओळख करून देणारा हा कवी वैदर्भीय हिंदी वळणाच्या भूमीत जन्माला आला खरा, पण त्यांनी आपल्या कविता, गझला आणि गीतांतून मराठी शब्दशारदेच्या पदरात भरभरून दान घातले.

विदर्भात 1932 मध्ये आजच्या दिवशी सुरेश भटांचा जन्म झाला. त्यांचे वडिल डॉक्टर होते. पण सुरेश भटांचा कल साहित्याच्या अभ्यासाचा होता. त्यांनी लहानपणीच कविता व गझलांचा अभ्यास सुरू केला व तशा रचनाही केल्या. त्यांच्या रचनांची एक चोपडी योगायोगाने ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या हाती लागली आणि तिथून सुरेश भट नावाच्या कवीचा जाहीर प्रवास सुरू झाला.

अनेक उर्दू गझलकारांचा, विशेषत: मिर्झा गालीब यांचा भटांच्या मनावर खोलवर प्रभाव होता. पण त्यांच्या रचनांची नक्कल मात्र त्यांनी केली नाही. त्यामुळेच भटांची गझल अस्सल मराठी वळणानेच चालत राहिली.

भर उन्हात आले,
काही पावसात आले।
मला शब्द भेटायला
गात गात आले।।
असे त्यांनी आपल्या काव्याच्या उगमाचे इंगीत सांगितले.

भटांच्या कविततेत प्रेमविव्हल शब्द होते, तसेच विराण्याही होत्या. एरवी रुईच्या कापसासारखे मुलायम वाटणारे त्यांचे शब्द कधी तलवारीसारखे धारदारही बनत.
उष:काल होता होता
काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या
पेटवा मशाली।
हे शब्द त्यांना स्फुरले, त्याच्या आधीच्या रात्री देशात आणीबाणीची घोषणा झालेली होती, हा केवळ योगायोग नव्हे.

भटांच्या मनाला विव्हल करणाऱ्या विराणी हे त्यांच्या गझल रचनांचे एक खास वैशिष्ट्य.
केव्हा तरी पहाटे
उलटून रात्र गेली
मिटले चुकुनि डोळे
हरवून रात्र गेली
ही विराणी; किंवा
देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगावर भुलण्याचे वय निघून गेले
ही कविता !
प्रतिभेतील भावना नेमक्या शब्दबद्ध करण्याच्या त्यांच्या सामर्थ्याचे दर्शन घडवतात.

गझल व कवितांबरोबरच भटांनी आणखीही काव्यप्रकार समर्थपणे हाताळले.
चल ऊठ रे मुकुंदा
झाली पहाट झाली।
बाहेर चांदण्याला
हलकेच जाग आली।।
ही त्यांची भूपाळी ऐकून महाराष्ट्राला नवा होनाजी सापडला, असे त्यांचे कौतुक झाले.

भटाच्या रचना वाचणे व त्यांची गीते ऐकणे हा तर आनंद होताच, पण त्यांच्या कविता त्यांच्याच तोंडून ऐकण्यात रात्र रात्र जागवण्याचा अनुभव अलौकिक होता. नागपूरला अनेक वेळा भटांच्या निवडक मित्रांच्या बैठकांना उपस्थित राहून त्यांनी स्वत:च गयलेली त्यांची गीते व गझला ऐकण्याचे भाग्य मला लाभले, हे मोठे नशीब.

स्वत:च्या कविता व गझला गाता गाता भट भावुक होत व त्यांच्या डोळ्यातील अश्रू अलगद त्यांच्या गोबऱ्या गालांवरून खाली ओघळत. सारी मैफल अशा वेळी सुन्न होई.

पुत्रवियोगाने दु:खी झालेल्या व आतून पार कोसळलेल्या भटांनी म्हटलेली कविता कधीच विसरता येणार नाही. ते गायले:
जन्मभर अश्रूंस माझ्या
शिकविले नाना बहाणे,
सोंग पण फसव्या जिण्याचे
शेवटी शिकलोच नाही।
या ओळी पेश केल्यावर ढसढसा रडणारे भट मी पाहिले आहेत.

पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली।
हे अप्रतीम प्रेमकाव्य रचणाऱ्या भटांनी
‘आज गोकुळात रंग
खेळतो हरी,
राधिके जरा जपुन जा
तुझ्या घरी’
ही लाडिक व खट्याळ गवळणही पेश केली.

हे सारे खरे असले, तरी भट मराठी रसिकांच्या नित्य स्मरणात राहतील ते त्यांच्या `रंग माझा वेगळा’ या कवितेमुळे. आपल्या जगण्याचे व जीवनाचे सारच त्यांनी या कवितेत विशद केले.

रंगुनी रंगांत साऱ्या
रंग माझा वेगळा।
गुंतुनी गुंत्यात साऱ्या
पाय माझा वेगळा।।

कोण जाणे कुठुनी ह्या
सावल्या आल्या पुढे;
मी असा कसा की लागती
सावल्यांच्याही झळा।।

राहती माझ्या सवे
ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दु:ख ज्याला
माझा लागला लळा।।

कोणत्या काळी कळेना
मी जगाया लागलो;
अन् कुठे आयुष्य गेले
कापुनी माझा गळा?

सांगती ‘तात्पर्य’ माझे
सारख्या खोट्या दिशा;
चालणारा पांगळा अन्
पाहणारा आंधळा।।

माणसांच्या मध्यरात्री
हिंडणारा सूर्य मी;
माझियासाठी न माझा
पेटण्याचा सोहळा।।

सुरेश भटांच्या प्रतिभेस श्रद्धांजली!

– भारतकुमार राऊत

नवी भर दि.१६-०४-२०२१

. . . . . . . . . . . . .

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या  .. या गाण्याची कथा

सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सौ. जयश्री गडकर एका चित्रपटाची निर्मिती करत होत्या…!

त्या चित्रपटासाठी त्यांना एक खास.., वजनदार असे गाणे हवे होते..!

त्यांनी त्या साठी कै. श्री. सुरेश भटांना विचारले…!

श्री. सुरेश भट म्हणजे एकदम तब्बेतीचे ✍️🎼 कवी..,एक मस्त.., कलंदर व्यक्तीमत्व.., सिनेमाच्या 🎼गाण्यांचा रतीब घालणारे…!

ऑर्डर प्रमाणे बुंदी पाडून देणारे कोणी ‘नाना’ नव्हते ते…!

सौ. जयश्रीताईंची विनंती मानून श्री.सुरेश भट असे एखादे गीत ✍️लिहिण्यास तयार झाले..!

“माझी मुंबईत राहण्या खाण्याची सोय करा.., म्हणजे मी मुंबईत येऊन तुम्हाला गाणे ✍️लिहून देईन..!”

सौ. जयश्रीताई त्याला तयार झाल्या…., कविवर्य मुंबईत दाखल झाले..!

सौ. जयश्रीताई.., चित्रपटाचे कथा आणि पटकथाकार, संगीतकार आणि सुरेशभाऊ यांच्यात काही बैठका झाल्या..!

आता जयश्रीताई गाणे कधी हातात पडते याची वाट पाहू लागल्या..!

पण सुरेशभाऊंकडून काही गाणे लिहून होईना..!

काही दिवस थांबून जयश्री ताईंनी सुरेश भाऊंना आठवण करुन दिली..!

“हो जाये गा.., मिल जायेगा..!”

सुरेशभाऊंचे उत्तर आले…!

बाईंनी विचार केला मोठे कवी आहेत…, थांबू काही दिवस…, पण असेच आणखी काही दिवस गेले…, गाणे काही भेटेना…!

ईकडे त्या गाण्यासाठी चित्रीकरण खोळंबले..!

स्टुडिओच्या तारखांबद्दल प्रश्न निर्माण व्हायला लागले..!

सौ. जयश्रीताईंचा धीर सुटला.., आता सुरेश भाऊंना तगादे चालू झाले…!

पण…,

“हो जाये गा…, मिल जायेगा..!”

हेच उत्तर मिळत राहिले…!

इकडे गाणे न मिळाल्याने कामे खोळंबली होती… तर तिकडे सुरेश भाऊंचा लॉज व जेवणा खाण्याच्या खर्चाचे बिल दिवसागणीक वाढत होते..!

अखेर बाईंनी सुरेश भाऊंना स्पष्ट सांगितले…!

“सुरेश भाऊ आता आपल्याला जास्त वाट पाहता येणार नाही.., नाही गाणे सुचत तर राहू दे…!

पुन्हा कधी तरी बोलवू आम्ही आपल्याला….!

आम्ही पुढच्या दोन दिवसाचे लॉजचे सगळे बिल भरले आहे..!

पण याहून जास्त आपल्याला तिथे राहाता येणार नाही..!

तेव्हा…,”

“ठीक आहे, जशी तुमची मर्जी..!”

सुरेशभाऊ शांतपणे म्हणाले..!

दुसरे दिवशी त्या लॉजच्या मालकांचा सौ. जयश्री ताईंना फोन आला..!

“आपले ते नागपूर चे गेस्ट.., अगदी आत्ताच खोली खाली करुन गेले…!

गडबडीत दिसले.., दादर ला नागपूरची ट्रेन पकडायची आहे असे काही तरी म्हणत होते…!”

बाईंना आश्चर्य वाटले.., कविवर्य रागावले का काय…?

असे न सांगताच…,

न कळवताच कसे मुंबई सोडून निघाले…?
छे.. छे..,आपल्या बोलण्याने दुखावला वाटतो हा मानी गृहस्थ..!

असे व्हायला नको होते.., त्यांनी तडक दादर स्टेशन गाठले..! नागपूरची गाडी उभी होती.., सुरेशभाऊ निवांत खिडकीची जागा पटकावून बसले होते..!

बाईंनी त्यांना विचारले…, त्यांची माफी मागितली.., सुरेशभाऊ नुसतेच हसले…, गाडी सुटणार तेव्हढ्यात सुरेश भाऊंनी एक कागद जयश्री ताईंच्या हातात ठेवला..!

“हे घ्या आपले गाणे..! आपली व्यावहारिक अडचण मला समजते जयश्रीताई.., पण त्याचे काय आहे…, काव्य ही एक दैवी देणगी आहे..! प्रतिभेचा हुंकार आहे.., याला काळ.., काम.., वेगाची बंधने लागू पडत नसतात.., सुचले तर आत्ता लगेच नाही तर जेव्हा सुचेल तेव्हा असे हे काम असते…!

आज भल्या पहाटेच हे गाणे सुचले मला.., हातासरशी ✍️लिहून टाकले…!”

“याच्या मानधनाचा चेक आपल्याला पाठवून देते…, लगेचच…!”

“ताई…, त्याची काहीच गरज नाही…! आपण माझी मुंबईत जी बडदास्त ठेवलीत तीच मला पावली..! बाकी गाणे म्हणाल तर ते सरस्वतीचे वरदान आहे.., परमेश्वरी देन आहे.., त्याचे मोल मी काय करणार आणि तुम्ही काय देणार’..?’

“अहो पण..?”

“तुम्ही आता काही बोलू नका…, उलट मीच तुमची क्षमा मागितली पाहिजे.!”

एव्हढ्यात गाडी हलली…,

सौ. जयश्रीताईंना पुढचे काही बोलता आले नाही…!

घरी परत आल्यावर सौ. जयश्रीताईंनी ते गाणे वाचले मात्र त्यांच्या डोळ्यातून अक्षरश: अश्रूंच्या धारा लागल्या..!

काही कारणामुळे सौ. जयश्रीताईंना ते गाणे त्यांच्या त्या चित्रपटात वापरता आले नाही..!

ते तसेच त्यांच्यापाशी पडून राहिले… पुढे काही वर्षांनी जेव्हा श्री. जब्बार पटेल एक चित्रपट निर्माण करत होते.. तेव्हा त्या चित्रपटाचे संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांना अगदी असेच गाणे हवे होते, कोठून तरी त्यांना त्या सुरेश भटांच्या गाण्याबद्दल कळले…,

त्यांनी सुरेशभाऊंना विचारले…?

“वो गाना…?

वो तो अब “जयश्रीताई जीं” की अमानत हैं…!

उन्हीसे बात किजीये..!”

सौ. जयश्रीताईंनी त्या गाण्यासाठी तसे म्हटले तर बराच खर्च केला होता पण…,

“हे गाणे तर परमेश्वरी कृपाप्रसाद आहे..!

मी याचे पैसे नाही वसूल करणार.., उलट पं. हृदयनाथजींसारख्या संगीतकारा कडे हे गाणे जाते आहे.., त्याचे खरोखरीचे चीज होईल.., 💎हिर्‍याला कोंदण लाभेल..!”

असे म्हणत ते गाणे पं. हृदयनाथजींकडे हवाली केले..!

अर्थातच पं. हृदयनाथजींनी त्या 💎हिर्‍याला साजेसे असे सुरेख कोंदण दिले.., आणि ते गाणे मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अजरामर केले..,

ते हेच गाणे होते…!

*********

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या..,
तुझेच मी गीत गात आहे..!
अजुन ही वाटते मला की.,
अजुन ही चांद रात आहे..!

कळे ना मी पाहते कुणाला..?
कळे ना हा चेहरा कुणाचा..?
पुन्हा पुन्हा भास होत आहे..,
तुझे हसू आरशात आहे..!

सख्या तुला भेटतील माझे..,
तुझ्या घरी सूर ओळखीचे..!
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा..,
अबोल हा पारिजात आहे..!

उगीच स्वप्नांत सावल्यांची..,
कशास केलीस आर्जवे तू..?

दिलेस का प्रेम तू कुणाला..?
तुझ्याच जे अंतरात आहे..!

**********

गीत -: सुरेश भट..
स्वर -: लता मंगेशकर..
संगीत -: पं. हृदयनाथ मंगेशकर

. . . .  नवी भर दि. १६-०४-२०२१


नवी भर दि.०५-०१-२०२१

मी कुणाला कळलोच नाही

मित्र कोण आणि शत्रू कोण
गणित साधे कळले नाही..
नाही भेटला कोण असा
ज्याने मला छळले नाही…
सुगंध सारा वाटीत गेलो
मी कधीच दरवळलो नाही..
ऋतू नाही असा कोणता
ज्यात मी होरपळलो नाही..
केला सामना वादळाशी
त्याच्या पासून पळालो नाही..
सामोरा गेलो संकटाना
त्यांना पाहून वळलो नाही..
पचऊन टाकले दु:ख सारे
कधीच मी हळहळलो नाही..
आले जीवनी सुख जरी
कधीच मी हुरळलो नाही..
कधी ना सोडली कास सत्याची
खोट्यात कधीच मळलो नाही…
रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण
मी कुणाला कळलोच नाही…!
मी कुणाला कळलोच नाही…!

‌‌‌कवी सुरेश भट
🙏🙏🙏🙏🙏🙏

जगत मी आलो असा

 सुरेश भटांची कविता

जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही ।
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही ।।
जन्मभर अश्रूस माझ्या शिकवले नाना बहाणे ।
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही ।।
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो ।
पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही ।।
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी ।
एकदा हसलो जरासा मग पुन्हा हसलोच नाही ।।
वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले ति-हाइत ।
सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही ।।
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा ।
लोक मज दिसले अचानक मी कुठे दिसलोच नाही ।।


नवी भर दि. १८-०९-२०१९

कापूर

मी असा त्या बासरीचा सूर होतो!
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो!

प्रीतही आली फुलांच्या पावलांनी
हाय, मी चिंध्यांत माझ्या चूर होतो!

राहिल्या आजन्म चिंतामुक्त चिंता…
मी घरोब्याचे जुने काहूर होतो!

तू किती केलास भेटीचा अचंबा..
भूतकाळाचा जणू मी धूर होतो!

मी न साधी चौकशी केली घनांची
ऐन वैशाखातला मी पूर होतो!

कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ?
जीवनाला मीच नामंजूर होतो!

तेवते आहेस तू पूजेत कोठे?
एकदा मीही तुझा कापूर होतो!

सुरेश भटांची गझल


कोण जाणे कोण हे जवळून गेले?

कोण जाणे कोण हे जवळून गेले?
चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले!

जिंकला होता जरी मी डाव तेव्हा,
दान जे पडले मला उधळून गेले!

भेटण्यासाठी कुणी आलेच नाही…
लोक आलेले मला चघळून गेले!

हे खरे की, मी जरा चुकलोच तेव्हा,
लोकही वाटेल ते बरळून गेले!

लागली चाहूल एकांती कुणाची?
कोण माझ्या लोचनी तरळून गेले?

काय माझ्या मालकीचे अर्थ होते?
शब्द माझे भाबडे हुरळून गेले!

या दुपारी मी कुणाला हाक मारु?
ओळखीचे चेहरे वितळून गेले!

कोणता कैदी इथे कैदेत आहे?
रंग भिंतींचे कसे उजळून गेले!

पाठमोरा मी जरी झालो,तरीही
सूर्य येणारे मला कवळून गेले!


नवी भर दि. ०९-१२-२०१९

आशा भोसले यांना सुरेश भट यांनी लिहिलेले काव्यमय पत्र

आशाताईस सुरेश भट


नवी भर दि. १९-१२-२०१९     …… वॉट्सॅपवरून साभार

सुरेश भटांचे शेर. अ ते ज्ञ

सगळी ‘अ”_ पासून ‘ज्ञ’ पर्यंत अक्षरे आहेत.
(अ)
अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?
…सुरेश भट.
*
(आ)
आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली
…सुरेश भट.
*
(इ)
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
….सुरेश भट.
*
(ई)
‘ईश्वरी इच्छा’च होती कालचा दंगा
माणसांनी माणसांना मारले कोठे?
…सुरेश भट
*
(उ)
उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली
सुरेश भट.
*

(ए)
एक मी निःशब्द किंकाळीच होतो
ऐकण्यासाठी सुना बाजार होता
सुरेश भट.
*
(ऐ)
ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले
सुरेश भट.
*
(ओ)
ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला यार हो
सुरेश भट.
*

(क)
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली
सुरेश भट.
*
(ख)
खरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले?
तुझा सुगंध कसा ये न आढळून मला?
सुरेश भट.
*
(ग)
‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.’
सुरेश भट.
*
(घ)
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते
सुरेश भट.
*
(च)
चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!
सुरेश भट.
*
(छ)
छाकटे दुर्वास का निवृत्त झाले?
शापितांनी काय छाकट्यांचे करावे?
सुरेश भट.
(ज)
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही!
सुरेश भट.
*
(झ)
झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी
मातीत पावलांचे काही ठसेच होते!
सुरेश भट.
*
(ट)
टाकली हातातली मी सर्व पाने
कोण जाणे, हारलो की जिंकलो मी
सुरेश भट.
(ठ)
ठेवले मी तयार ओठांना
एकदा तू पुकार ओठांना
सुरेश भट.

(त)
तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही
सुरेश भट.
*
(द)
दिसूनही दार तो तिथे थांबलाच नाही
खरेच दात्याहुनी भिकारी हुशार होता
सुरेश भट.

*
(थ)
थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणाऱ्या कसलीच खंत नाही….
सुरेश भट.
*
(ध)
धन्य ही श्रद्धांजली जी वाहिली मारेकऱ्यांनी,
संत हो आता बळीचा न्यायनिर्वाळा कशाला ?

(न)
नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा
*
(प)
पाठमोरा मी जरी झालो, तरीही
सूर्य येणारे मला कवळून गेले!
*
(फ)
फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते
*
(ब)
बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!
*
(भ)
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
एव्हढे मी भोगिले की मज हसावे लागले

*
(म)
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो… कुठेतरी दैव नेत होते !
*
(य)
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते…
*
(र)
रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे…
*
(ल)
लागले न झाडांना दोनचार शिंतोडे
नाचही सुरू झाला जंगलात मोरांचा….
*
(व)
वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?…
*
(श)
शब्द म्हणाले सर्व भावना निघून गेल्या
हाय कधी अर्थाला मी सापडलो नाही….
*
(स)
सकाळी तू उन्हापाशी कसा केलास कांगावा,
तरीही खूण चंद्राची तुझ्या ओठांवरी होती….

(ह)
हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा….

(ज्ञ)
ज्ञानदेव लिहूनी गेले ओळ ओळ भाळी
निमित्तास माझे गाणे निमित्तास टाळी….

🌹 सुरेश भट 🌹

नवी भर दि.२४-०६-२०२१

सुरेश भटांची गझल : आकाश उजळले होते

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

(एल्गार)

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

One thought on “कविवर्य सुरेश भट आणि त्यांच्या कविता”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s