शनिवारवाडा, पर्वती, तुळशीबाग, अप्पा बळवंत चौक, स्वारगेट वगैरे

पुणे शहराबद्दल इतर माहिती

पुणे आणि पुणेकर मार्गदर्शक

पुणे का आवडते ?

साठसत्तर वर्षांपूर्वीचे पुणे कसे होते याच्या काही मजेदार आठवणी आता या पानावर दिल्या आहेत.
https://anandghare.wordpress.com/2020/04/07/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a4%e0%a5%87/

या पानावर पहा :

१.अप्पा बळवंत चौक
२.स्वार गेट
३.पर्वतीवरील देवदेवेश्वर’ मंदिर
४.तुळशीबाग
५.पुण्यामधील देवळांची विचित्र नावे
६.मोदी गणपती
७. शनिवारवाडा
८. आर्यन थिएटर
९. सदाशिव पेठ 
१०.सारस बाग आणि तळ्यातला गणपती
११. पुण्यातील १७ पेठा

 

१.अप्पा बळवंत चौक

पुणे शहराचा नावाजलेला भाग असणारा , ‘ हार्ट ऑफ द सिटी ‘मध्ये मोडला जाणारा ”अप्पा बळवंत चौक” . आता इंग्रजीच्या भडिमारात व शॉर्टफॉर्मच्या जमान्यात हल्ली हा चौक A.B.C. म्हणून ओळखला जातो . पुस्तकांची आणि इतर गोष्टींची दुकाने , ग्रामदेवता जोगेश्वरी मंदिर व दगडूशेठ गणपती मंदिर , हुजूरपागा व नू.म.वि. या शाळा, प्रभात-रतन-वसंत ही चित्रपटगृहे , अनेक महत्वाचे रस्ते या चौकाजवळ असल्याने हा भाग सतत रहदारीचा व गजबजलेला असतो . पण मग या चौकाच्या नावामागची कथा काय ? हे अप्पा बळवंत कोण होते ? चला तर या नावामागे दडलंय काय… याचा शोध घ्यायचा हा छोटासा प्रयत्न .

तर हे अप्पा बळवंत म्हणजेच ‘कृष्णाजी बळवंत मेहेंदळे’ . त्यांचे वडील बळवंतराव गणपत मेहेंदळे हे पेशव्यांचे एक प्रमुख सेनापती होते . अत्यंत कुशल लढवय्ये असणाऱ्या बळवंतरावांनी त्यांच्या कारकिर्दीत पराक्रम गाजविला होता . पण दुर्दैवाने ते १७६० मध्ये पानिपत रणसंग्रामात मरण पावले. अब्दालीने त्यांचे शिर सदाशिवभाऊंना भेट म्हणून पाठवले होते . त्यांची पत्नीही तिथे सती गेल्या. तेव्हा या अवघ्या बारा वर्षांच्या अल्पवयीन कृष्णाजी उर्फ अप्पांची जबाबदारी पेशव्यांनी घेतली .

एके दिवशी सवाई माधवराव पेशवे पर्वतीहून शनिवारवाड्याकडे हत्तीवरून परतत होते . त्यांच्याबरोबर त्यावेळेस अंबारीत अप्पा बळवंत हे देखील होते . त्यावेळेस येताना पेशवे यांना भोवळ आली . आणि सवाई माधवराव पेशवे खाली पडणार तोच मागे बसलेल्या अप्पा बळवंतांनी प्रसंगावधान दाखवून त्यांना सावरले , या अपघातातून वाचविले . पेशवे खाली पडले असते तर मोठा अनर्थ झाला असता . आपल्यावरील संकट टळले म्हणून हा प्रसंग जेथे घडला , ती जागा अप्पा बळवंतांच्या नावाने ओळखली जाईल , असे सवाई माधवराव पेशवे यांनी जाहीर केले . तर ही आहे या चौकाच्या नावामागची आख्यायिका . १७९८ मध्ये अप्पा बळवंतांचे निधन झाले .

पुढे याच चौकात म्हणजे आत्ताच्या किबे लक्ष्मी थिएटर समोर सरदार बळवंत मेहेंदळ्यांनी इ.स. १७६१ च्या आधी ३ मजली ४ चौकी असा भव्य वाडा उभारला होता असे कळते . या वाड्यातील एक भुयार थेट शनिवारवाड्यापर्यंत होते. काही गुप्त बैठका घ्यायच्या असतील तर पेशवे या भुयारातून मेहेंदळ्यांकडे येत . भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना याच वाड्यात आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १८३२ म्हणजे ७ जुलै १९१० रोजी झाली . याप्रसंगी सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे व विश्वनाथ काशिनाथ राजवाडे हे दोघेच उपस्थित होते . काळाच्या ओघात येथे रस्ता रुंदीकरणात त्यांच्या वाड्याचा जवळपास सगळाच भाग त्यात गेला . परंतु आज अप्पा बळवंत हे नाव मात्र चौकाच्या निमित्ताने राहिले आहे .


**********

अप्पा बळवंतांच आडनाव?

अप्पा बळवंत चौक सर्वज्ञात ठिकाण. या अप्पा बळवंतांचं आडनाव काय?
कोणतंही पुस्तक पाहिजे असेल तर ते हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे अप्पा बळवंत चौक. गणपतीची आरती असो, देवीची आराधना करणारं श्रीसूक्त. शाळा, कॉलेज, अभियांत्रिकी विद्यालय, वैद्यकीय विद्यालय, या सर्वांची पुस्तकं असो, ती मिळणारच या चौकातल्या ओळीने बसलेल्या दुकानातूनच. जुन्या पुस्तकांची खरेदी-विक्रीही इथेच चालते. मोठाल्या पिशव्यातून पुस्तकं भरून ठेवून विक्रेते ग्राहक पटवतात. रस्ता अडवला म्हणून तक्रार करणारे अधिकारी आले तर, पुस्तकाच्या पिशव्या त्वरेने बाजूला नेतात. या पुस्तकपुराणा च्या नादात वर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर राहिलंच.

अप्पा बळवंत त्याचं आडनाव ‘मेहेंदळे’

🥊 ‘बळवंतराव मेहेंदळे’ हे होते पेशव्यांचे सेनापती. पानिपतच्या युध्दामध्ये ते मारले गेले. त्यांच्या पत्नी या ही त्या वेळी पानिपतला होत्या. पतीनिधनानंतर शोकाकुल झालेल्या पत्नीने पती बरोबर सहगमन करण्याचे ठरविले. त्या सती गेल्या. सती जाण्यापूर्वी त्यांनी आपला बारा वर्षांचा मुलगा अर्थात ‘अप्पा’ यांस पेशव्यांच्या स्वाधीन केलं पुण्यात अप्पा बळवंत यांचा प्रभात टॉकीज समोर मेहेंदळे वाडा आहे. आप्पा बळवंत हे पेशव्यांच्या अत्यंत विश्वासातले, ते सावलीप्रमाणे श्रीमंत भाऊसाहेब पेशव्यांच्या बरोबर असत. एकदा श्रीमंत पेशवे हत्तीवर अंबारीत बसून चालले होते, तळ्यातल्या गणपतीच्या दर्शनाला. शनिवार वाड्यापासून निघाल्यावर थोडे पुढे आल्यावर एक अपघात झाला. अंबारीतून श्रीमंत पेशवे खाली घसरून पडत होते, तेवढ्यात प्रसंगावधान राखून अंबारीत बसलेल्या आप्पा बळवंत यांनी श्रीमंतांचा अंगरखा धरून त्यांना पडताना वाचवलं. दुर्घटना टळली. हा प्रसंग ज्या चौकाजवळ घडला त्या चौकाला ‘अप्पा बळवंत’ यांचं नाव दिले गेले अप्पा बळवंत यांचे आडनाव काय हा प्रश्न मी पुण्यातल्या दोन मेहेंदळ्यांना विचारला, त्यांना त्याचं उत्तर सांगता आले नाही. ते काम मंदा खांडगे यांच्या लेखाने केले. दोनशे वर्षांपूर्वीचा ‘मेंहंदळ्यांचा वाडा’ अजूनही प्रभात टॉकीज समोर आहे. सध्या त्यांच्या आठव्या पिढीतील लोक त्याचं वास्तव्य करून आहेत. वाड्यातल्या भिंती इतक्या रुंद की त्यातूनच वरच्या मजल्यावर जायला जिना आहे. वाड्यात मध्यभागी अत्यंत थंड राहील अशी लोणच्याची खोली🍏! आता फ्लॅटचे स्क्वेअर फुटात दर ऐकणारे आपण ‘लोणच्याची खोली’ हे वाचून थक्क होतो. तिथं मोठमोठ्या रांजणात लोणची साठवायची म्हणजे वापरही तसा असणारच. कै.न.चिं. केळकर, कै. दत्तो वामन पोतदार,व अप्पा बाळवंतांच्या वंशामधील खंडेराव चिंतामणी मेहेंदळे यांनी ‘भारत इतिहास संशोधन मंदिराची’ स्थापना याच वाड्यात केली. या संस्थेच्या वस्तुसंग्रहालयात अप्पा बळवंत यांचा अंगरखा जतन करून ठेवला आहे. या वाड्यात एकुण जिने होते चौसष्ट. त्यातून एक वाट भुयारातून थेट शनिवारवाड्यात निघायची. गुप्त खलबतां साठी पेशवे शनिवार वाड्यातील या भुयारातून इथं येत. असा आहे या चौकाचा इतिहास.

सदरची पोस्ट ‘पुणं एक साठवण’ या प्राध्यापक श्याम भुर्के यांच्या पुस्तकातून घेतलेली आहे.

—————————–

२.स्वार गेट

‘स्वारगेट’ या नावामागे दडलंय काय???

पुण्यात राहून स्वारगेट माहित नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. पुण्यातल्या पुण्यात कुठे जायचे असेल किंवा पुण्याबाहेर जायचे असेल तर हे ठिकाण टाळणं अशक्यच.

खर तर स्वारगेटला पुण्याचे दळणवळणाचे केंद्रस्थान म्हटले पाहिजे. जसे हे ठिकाण आज महत्वाचे आहे तसेच ते पूर्वीही महत्वाचे होते. मुख्य गावापासून लांब असणारा हा परिसर होता. सध्याचे स्वारगेट भरवस्तीतच गणले जाते. त्यावेळेस स्वारगेटला काय होते ? हे नाव कसे पडले ? आज बघू “स्वारगेट” या नावामागे दडलयं काय…

पुण्यात प्रवेश करण्यासाठीचा एक पर्यायी मार्ग येथून जात असे. पुण्याची वस्ती वाढत होती, पेठा वसत होत्या. रस्ते बनत होते. त्यामुळे पूर्वी गावाबाहेर संरक्षणासाठी गस्त ठेवली जात असे. त्यासाठी घोडेस्वार तैनात असत. अशा ठिकाणांना नाक्याचे ठिकाण किंवा पहाऱ्याच्या चौक्या म्हणत असत. अशी ही महत्वपूर्ण ठिकाणं इंग्रजांच्या काळातही तशीच राहिली. कारण त्या ठिकाणांचे महत्व तसेच राहिले होते. इंग्रज अमलात कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले. आणि नाके किंवा चौकी असे न राहता त्याचे नाव ‘गेट’ असे झाले. म्हणून घोडेस्वार तैनात असलेले नाक्याचे ठिकाण पुढे “स्वारगेट” असे ओळखले जाऊ लागले. आजतागायत ते नाव तसेच राहिले आहे.

स्वारगेट चौक:
इ.स.१६६० साली शायिस्तेखान पुण्यात आला, तेव्हा त्याने कात्रज घाट उतरल्यावर पहिली मोठी गस्तीची चौकी स्वारगेट परिसरात उभारली होती. मोठ्या फौजफाट्यासह त्याने पुण्यात तळ ठोकला होता. पुढे सातारा ही राजधानी म्हणून छत्रपती शाहूमहाराजांनी वसवली होती. तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे. त्यामुळे या मोक्याच्या जागेवर पेशवाईत या चौकीचा उपयोग तपासणीसाठी, जकात वसूल करण्यासाठी सुद्धा होत असे. स्वारगेट सोडून रामोशीगेट, म्हसोबागेट, पुलगेट ही गेट आजही पुण्यात अस्तित्वात आहेत. पैकी रामोशीगेट येथे चौक्यांवर पहारेकरी म्हणून रामोशी समाजातील लोकांची नेमणूक केली जायची. त्यावरून तिथल्या जागेला ‘रामोशीगेट’ असे नाव मिळाले.

इ.स. १९४० मध्ये स्वारगेटहून पहिली बस धावली. त्याच्याआधी पुण्यात टांगे अस्तित्वात होते. आज हा परिसर स्वारगेट नावाने ओळखला जातो तरी येथील बसस्थानकाचे नाव ‘छत्रपती राजर्षि शाहू महाराज बसस्थानक’ असे आहे. स्वारगेट चौकाचे नाव ‘देशभक्त केशवराव जेधे चौक’ असे आहे. त्यांचा पूर्णाकृती पुतळ्यासह त्यांचा संक्षिप्त जीवनपट येथे लावला आहे. चौकातून गेलेल्या उड्डाणपुलास सुद्धा त्यांचेच नाव आहे. तरीही तो स्वारगेट चौक या पुण्यातल्या इतर ठिकाणांप्रमाणे जुन्या नावानेच ओळखला जातो. पण दुर्दैवाने आपल्याकडून अशा गोष्टी बघितल्या सुद्धा जात नाहीत. जुने नाव टिकले चांगली गोष्ट आहे पण निदान अशा गोष्टी आपल्याला माहित तरी पाहिजे.

पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे काम चालू झाले आहे. त्यात ‘पिंपरी चिंचवड ते स्वारगेट’ हा मार्ग पुणे मेट्रोच्या तीन मुख्य कॉरिडॉर पैकी एक कॉरिडॉर असणार आहे. ‘पुणे मेट्रो स्वारगेट मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’ लवकरच येथे उभे राहणार असल्याचे कळते. हे देशातले पहिलेवहिले मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब असणार आहे. मध्यंतरी स्वारगेटजवळ भुयारी मेट्रोचे काम चालू असताना २ भुयारी मार्ग सापडले. स्वारगेट ते सारसबाग या रस्त्यावर इ.स. १९१५ मध्ये स्वारगेट जलकेंद्र होते. सुमारे शंभरवर्षांपूर्वी पाण्याच्या व्यवस्थेसाठी ही भुयारं बांधली असतील.

स्वारगेटचे महत्व बसस्थानक आणि एस.टी. स्टॅन्डमुळे सध्याच्या काळात वाढलेले दिसते. कधिकाळचा गावाबाहेर असणाऱ्या या परिसराने आज संपूर्ण शहराला जोडले आहे. पूर्वीचे स्वारगेटचे महत्व, तिथला दरारा आता संपला आहे. ना घोडेस्वारांचे ठाणे उरले, ना पहारेकरांच्या चौक्या. एका बाजूला चौकात छोटी पोलीस चौकी आहे. ती रहदारीच्या, गजबजलेल्या या भागाचा भार सांभाळत उभी आहे.

स्वारांचा पहारा किंवा गेट या जागेवर पूर्वी होते त्यामुळे नाव ”स्वारगेट” पडले, हा इतिहास विस्मृतीत जाऊ नये म्हणून हा ब्लॉगमार्फत केलेला छोटासा प्रयत्न….🙏🙏🙏💐💐🌹

….. वॉट्सॅपवरून साभार  दि.२९-०५-२०१९

————————

३.पर्वतीवरील देवदेवेश्वर’ मंदिर

पर्वती

..नानासाहेब पेशव्यांनी उभारलेले ” पर्वती” टेकडीवरील मंदिर

२३ एप्रिल १७४९ साली नानासाहेबांनी ‘देवदेवेश्वर’ मंदिर बांधले व नाव दिले ‘पर्वती’. नानासाहेबांनी प्रतिष्ठा केलेल्या शंकराच्या पिंडिला ‘देवदेवेश्वर’ असे नाव दिले. देवस्थानचा उभारणीचा आरंभ जरी नानासाहेबांनी केला असला तरी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत पायऱ्या बांधल्या गेल्या.

या ठिकाणी २२ मार्च व २३ सप्टेंबरला सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण शिवपिंडीवर पडतात. हे पाहण्यासाठी काहीच अवधी असतो. मात्र, यावेळी चांगलीच गर्दी होते. मुख्य मंदिराच्या बाहेरील चारही कोपऱ्यांवर सूर्यनारायण, गणेश, पार्वती आणि जनार्दन विष्णू यांची छोटी मंदिरे आहेत.

थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांची कारकिर्द म्हणजे १७४०-१७६१ या कारकीर्दीत पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचे मध्यवर्ती केंद्र बनले होते. पेशव्यांनी पुणे शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याचा विकास व सुशोभीकरण करताना नानासाहेब पेशव्यांनी पर्वती देवस्थान व सारसबाग वसवली. या पाठोपाठच पुण्यातील अनेक पेठा, वाडे, मंदिरे, रस्ते, हौद यांचा विकास केला.

पूर्वी मंदिराच्या व्यवस्थेसाठी पेशव्यांच्या दरबारातूनच रकमेची व्यवस्था करण्यात येत असे. सवाई माधवरावांची मुंजही या मंदिरात झाल्याची नोंद इतिहासात सापडते. कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा आदी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. कार्तिक महिन्यातील त्रिपुरीपौर्णिमेचे दिवशी म्हणजे नोव्हेंबरमध्ये दर्शनासाठी येथे गर्दी होते. तसेच श्रावणात सोमवारी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते.

१७६१ला पानिपताच्या तिसऱ्या लढाईत मराठी साम्राज्याची प्रचंड हानी झाली. मुलगा विश्वासराव व भाऊसाहेब गेल्यामुळे खचून गेलेल्या नानासाहेबांनी जून १७६१ पर्वतीवर ‘‘भाऊ भाऊ…’’ करीत देह ठेवला. मंदिराच्या बाहेरील बाजूस नानासाहेब पेशवे यांची समाधी आहे. पर्वतीवर अनेक थोरांचे पाय लागले. नाना फडणवीस, भाऊसाहेब, माधवराव, महादजी शिंदे, रामशास्त्री, दुसरा बाजीराव, पेशवे घराण्यातील स्त्रिया येथे दर्शनासाठी नेहमीच येत असत. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी खडकी येथे सुरू असलेली ब्रिटीशांबरोबरची लढाई याच पर्वतीवरून पाहिल्याची नोंद आहे.

  – संतोष डी.पाटील

   …… फेसबुकवरून साभार   दि.१७-०६-२०१९

————————————

४.तुळशीबाग

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात सुप्रसिद्ध विश्रामबाग वाड्याच्या समोर असलेलं ठिकाण म्हणजेच ‘तुळशीबाग’! राममंदिरासाठी प्रसिद्ध तसंच सर्वांचंच आणि मुख्यत्वे स्त्रियांचं हे आवडतं ठिकाण. स्वयंपाकाची भांडी असोत की बाकी घरातल्या वस्तु असोत, सौंदर्य प्रसाधने असोत की दागिने असोत किंवा कपडे असोत. पुजा साहित्याचीही अनेक दुकाने, अगदी देवांच्या सुबक मुर्तींपासून पुजेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची दुकानं इथे आहेत. भरपुर मोठा भाग फिरलो आपण तुळशीबागेत! भुक लागली असेल नं?? चला की मग! इथे मस्त उपहार गृहे सुद्धा आहेत. अहो !! पण तुळशीबाग तुळशीबाग म्हणता आणि साधी एक तुळस नाही दाखवलीत हो तुम्ही! थट्टा करता काय??’

यासाठी थोडे मागे इतिहासात जाऊया!

पेशवाईतील गोष्ट! साताऱ्याजवळ पाडळी नावाचे एक गाव आहे. या गावात आप्पाजी खिरे नावाचे एक गृहस्थ राहत. हे त्या गावचे वतनदार होते. त्यांच्याकडे या गावचं कुलकर्णीपणाची जवाबदारी होती. अप्पाजींना नारायण नावाचा धाकटा मुलगा होता. तो कुटुंबात फार लाडका होता. साधारण १७०० च्या दरम्यानचा याचा जन्म! नारायण हा खुप हट्टी होता. यामुळे त्याच्या भविष्याबद्दल आई-वडिलांना फार चिंता वाटत होती. एकदा आई त्याला यावरुन काहीतरी बोलली म्हणुन हा नऊ दहा वर्षांचा मुलगा ‘आपलं नशीब मी स्वतः घडवुन दाखवीन’ या इर्षेने घरातुन एकटाच चालत चालत निघाला आणि पुण्यात आला. पुण्यात शहरभर हा फिरला आणि दिवस मावळेपर्यंत हा एकदम थकुन गेला होता. मग पुण्यातील आंबिल ओढ्याच्या काठी असलेल्या रामेश्वराच्या मंदिरात तो आला आणि महादेवाचे दर्शन घेऊन तिथेच एका कोपऱ्यात तो निजुन गेला. त्या मंदिरात दररोज सकाळी सुर्योदयाच्या वेळी गोविंदराव खासगीवाले देवदर्शनासाठी येत. त्या दिवशी आल्यावर त्यांनी नारायणाला कोपऱ्यात गाढ झोपलेलं पाहीलं. त्याला त्यांनी उठवलं आणि त्याची आस्थेने चौकशी केली. सगळं प्रकरण कळल्यावर त्यांनी त्याला आश्रय दिला. स्वतःकडे आपल्या शागिर्दांमध्ये नोकरीस ठेवले. त्याला ते लाडाने ‘नारो’ म्हणत आणि पुढं त्यांचं तेच नाव रूढ झालं. ब्राह्मण असल्यामुळे त्याचाकडे खासगीवाल्यांनी आपल्या रोजच्या पुजा अर्चेसाठी तुळशी, बेल, दुर्वा, फुले वगैरे आणण्याचं काम दिलं. आजची जी तुळशीबाग आहे ती त्या काळी पुण्याच्या बाहेर होती. एक एकर भर पसरलेल्या या जागेत त्या काळी खासगीवाल्यांची स्वतःच्या मालकीची तुळशीची बाग होती. विविध फुले वगैरे इथे त्यांनी वाढवली होती आणि तुळस ही तिथे जास्त प्रमाणात होती. म्हणुन त्याच नाव ‘तुळशीबाग’ असे पडले. या बागेतुन तेव्हा नारो तुळस फुले आणायचा. आपल्या कामातील मेहनतीच्या बळावर त्याने खासगीवाल्यांचा विश्वास संपादन केला. कामातील निष्ठा पाहुन पुढे खासगीवाल्यांनी आपल्या लाडक्या नारोला पेशव्यांच्या खासगीतील हिशोब वगैरे करण्यासाठी चाकरीत सामावुन घेतले. पुढे नानासाहेब पेशव्यांनी त्याची कामाची पद्धत, शिस्त, वागणुक आणि चोख हिशोब वगैरे पाहुन त्याला कोठी खात्याच्या कारकून पदावर नेमले. एकदम एवढी मोठी जवाबदारी अंगावर आल्याने त्याला गर्व झाला. एकदा दसऱ्याच्या दिवशी खासगीवाल्यांनी नारोला आपल्या घरी जेवायला बोलावले. पण इतरांसारखे आपल्याला चांदीची ताटे वगैरे न देता साध्या पंगतीत बसवले, यामुळे तो चिडुन उपाशी पोटीच तिथून उठुन निघुन आला. खासगीवाल्यांना हे कळल्यावर त्यांनी लगेच दोन माणसे नारोच्या मागावर पाठवुन त्याला धरुन आणण्यास सांगितलं. त्याला आणल्यावर संतापलेल्या खासगीवाल्यांनी नारोला कडक शब्द सुनावले. त्यामुळे नारोला आपली चुक समजली आणि तो वठणीवर आला. त्याचा गर्व गळुन गेला. नारोने मग खासगीवाल्यांची क्षमा मागितली. खासगीवाल्यांनीही त्याला माफ करुन छत्रपतींच्या दरबारी साताऱ्यास जमाखर्च लिहिण्यासाठी पाठवुन दिले. तिथेही त्याने छत्रपतींची मर्जी संपादन केली. छत्रपतींनी त्याला इंदापुर प्रांताचा मुकादम केले. ‘कामाचे मर्दाने लिहिणारा’ असा नारो आप्पाजींचा लौकीक झाला. १७४७ साली पेशव्यांनी पुन्हा या हुशार माणसाची पुणे दरबारी गरज असल्याचे सांगुन त्याला पुणे दरबारी पाठविण्याची विनंती छत्रपतींना केली. छत्रपतींनी ती विनंती मान्य केली आणि नारो आप्पाजीस पुणे दरबारी पाठविले. पुण्यात आल्यावर नारो आप्पाजीस पेशव्यांनी पुणे सुभ्याची दिवाणगिरीची जवाबदारी सोपविली. त्याचसोबत पेशव्यांच्या कोठी खात्याचे कारभारीपद देखील त्यांस दिले. १७४९ साली खासगीवाल्यांच्या तुळशीबागेची व्यवस्था नारो आप्पाजींवर सोपवली. १७५० साली त्यांची काम करण्याची पद्धत, मुत्सद्दीपणा वगैरे गुण पाहुन नारो आप्पाजीस पेशव्यांनी पुण्याचे सरसुभेदार केले. पुढे पुणे शहराचे मुख्य रचनाकार या नात्याने नानासाहेब पेशव्यांचे स्वप्नातील पुणे शहर निर्माण करण्यात नारो आप्पाजींनी खुप मोलाची मदत केली. यामुळे नारो आप्पाजींनी नानासाहेबांचा अजुनच विश्वास संपादन केला. श्रीमंती वाढली. वेळप्रसंगी अनेक गोष्टी त्याग करून आपल्या पेशव्यांसाठी स्वतःच्या तिजोरीतुन ते पैसा पुरवीत. १७५७ साली नानासाहेबांनी नारो अप्पाजींना पालखीची नेमणुक करून दिली.

१७५८ साली पुण्यात एक रामाचे मंदीर असावे असे नारो आप्पाजींच्या मनीं आले. यासाठी त्यांनी खासगीवाल्यांकडून एक एकरभर पसरलेली तुळशीबाग विकत घेतली. सर्व जागा तुळशी वगैरे काढुन मोकळी केली गेली. त्याला तटबंदी बांधली आणि पेशव्यांकडे राम मंदिर बांधण्याची परवानगी मागितली. नानासाहेबांनी ही मागणी मंजुर केली. माघ महिन्यात या मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. तुळशीबागेचे मालक झाल्यामुळे त्यांना ‘तुळशीबागवाले’ म्हणुन लोक संबोधु लागले आणि त्यांचे खिरे हे आडनाव लोप पावले.

पानिपताच्या पराजयाने खचुन नानासाहेबांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने हे बांधकाम थांबले. पुर्ण पुणे या दुहेरी दुःखात बुडाले होते. थोरले माधवराव पेशवे झाले आणि काही दिवसांनी स्वतः त्यांनी तुळशीबागवाल्यांना बोलावून राम मंदिराचे बांधकाम पुन्हा सुरु करण्याची आज्ञा दिली. १७६३ सालच्या अखेरीस मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम पुर्ण झाले आणि विधिपूर्वक समारंभाने मंदिरास उंबरा बसविण्यात आला. मंदिराला १४० फुट उंच शिखर बांधण्यात आले होते. त्याला नारो आप्पाजींनी सोन्याचा कळस बसविला. हे काम पुर्ण झाल्यावर थोरल्या माधवरावांनी तुळशीबागवाल्यांना वढू हे गाव इनाम दिले. मंदिराच्या रोजच्या खर्चासाठी सरखेल आंग्रे यांनी कुलाबा गाव इनाम दिला. १७६५ साली उमाजीबुवा पंढरपुरकर यांच्याकडुन रामरायाची सुंदर मुर्ती घडविण्यात आली आणि तिची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली. यानंतर राम मंदिराच्या आजुबाजुला अनेक छोटी मंदिरे बांधुन त्यात गणपती, विष्णु, त्र्यंबकेश्वर महादेव, विठ्ठल रखुमाई इत्यादी देवतांची स्थापना केली. रामापुढे दासमारूतीची स्थापना केली. या सर्व मुर्ती घडविण्यास ३५० – ४०० रुपये खर्च आला. मंदिराला एक मुख्य दरवाजा बांधण्यात आला. याचे संगीत दरवाजा असे नामकरण करण्यात आले. पहिल्या रामनवमी उत्सवास २००० रुपये खर्च आला.

१७६३ साली निजामाने पुणे उध्वस्त करु नये म्हणुन तुळशीबागवाल्यांनी निजामाला दीड लाख रुपये खंडणी देऊ केली. पण तरीही सूडाची भावना मनी घेऊन निजामाने पुणे पुर्ण जाळले. हि घटना स्वारीवर असलेल्या थो. माधवराव पेशव्यांना समजताच त्यांनी निजामाच्या राजधानीत घुसुन निजामाची पळता भुई थोडी केली. पुण्यात परतल्यावर पेशव्यांना पुण्याची अवस्था पहावली नाही. त्यांनी लगेच तुळशीबागवाले यांना ‘मुख्य नगर रचनाकार’ हे पद देऊन शहराच्या अवस्थेस सुधरवण्याची आज्ञा दिली. तुळशीबागवाल्यांनी काही वर्षातच अत्यंत खुबीने होते त्याही पेक्षा सुंदर रितीने पुणे शहर वसविले. थोरल्या माधवराव पेशव्यांवर त्यांचा विशेष जीव होता. त्यांचे थेऊर मुक्कामी निधन झाल्याने तुळशीबागवाले खुप खचून गेले होते. तशाच अवस्थेत ते खंबीर राहुन आपली सुभेदारी सांभाळीत. नारायणरावांच्या वधानंतरही पुण्याची तात्काळ नाकाबंदी करून गारद्यांपासून पुणे वाचविले. शनिवारवाड्यावर खडे पहारे ठेवले. श्रीमंत नारायणरावांच्या पत्नी गंगाबाईसाहेब यांना पुरंदर किल्ल्यावर सुखरूप हलवले. गंगाबाईंच्या नावे पेशवाईचा कारभार सुरु झाल्यावर त्यांच्या नावाची द्वाही पुर्ण पुण्यात तुळशीबागवाल्यांनी फिरवली. मार्च १७७५ साली वयाच्या ७५व्या वर्षी नारो आप्पाजी खिरे उर्फ़ तुळशीबागवाले यांचे पुण्यात देहावसान झाले.

तुळशीबागवाल्यांच्या मृत्युनंतरही तब्बल २० वर्षे राम मंदिराचे बांधकाम चालले. खरड्याच्या लढाईनंतर सवाई माधवराव पेशव्यांनी संगीत दरवाज्यावर नगारखाना बांधला आणि तिथे वर्षासने लाऊन नित्य सनई चौघडा झडू लागला. शनिवार तिसऱ्या प्रहरी थोरल्या बाजीराव पेशव्यांना पुणे इनाम मिळाले. याची आठवण म्हणुन दर शनिवारी दुपारी ३ वाजता साधारण अर्धा तास चौघडा वाजवण्याची प्रथा सवाई माधवरावांनी सुरु केली जी आजतागायत सुरु आहे. मंदिराच्या दक्षिणेला आणि पश्चिमेलाही प्रवेशद्वार पेशव्यांनी बांधुन घेतले. १७८९ मध्ये मंदिरातील देवांच्या दागदागिन्यांची चोरी झाली. तेव्हा सवाई माधवरावांनी दोन हजार चौदा रुपये बारा अणे इतक्या किमतीचे दागिने रामरायास अर्पण केले. मंदिराचा नित्य चौघडा १८९५ मध्ये सुरु झाला. एकुण ३५ वर्ष राम मंदिराचे बांधकाम चालु राहिले, ज्याला त्याकाळी १ लाख ३६ हजार ६६७ रुपये खर्च आला. श्रीमंत सवाई माधवराव इथे नेहमी दर्शनास येत. त्यांच्या कारकिर्दीत हे मंदिर फार प्रसिद्ध झाले. एका पोवाड्यात वर्णन आहे,

श्रीरामाच्या मुर्ती तुळशीबागेमध्ये कशा रमल्या।
ज्याला त्याला पावती श्रीमंतांच्या मनामध्ये भरल्या।।

अशी मंदिराची ख्याती होती. ह्या मंदिरात कीर्तन, प्रवचनकारांचा, पुराणिक, कथाकारांचा राबता असे. असे सांगितले जाते की, या मंदिरात जो कीर्तनकार, प्रवचनकार श्रोत्यांची वाहवा मिळावी तो सगळीकडेच श्रेष्ठ समजला जाई.

आता मंदिराच्या आजुबाजुला भरपुर दुकाने झाली आहेत. दर एकादशीला एखाद्या जत्रेसारखी तुळशीबागेबाहेर म्हणजेच या राम मंदिराबाहेर दुकाने बसत. तीच कालांतराने तिथे पन्नास साठ वर्षांपुर्वीपासून नित्य वसु लागली आणि आता या दुकानांनी प्रसिद्ध बाजारपेठेचे स्वरूप घेतले आहे. अगदी सगळीकडून पुण्यात कुणी आलं की तो तुळशीबागेत येतोच येतो. खरेदीसाठी!! पण इथुन पुढे आठवणीने खरेदी करण्या आधी या रामरायाच्या दर्शनासाठी नक्की जात जा.

पुण्याचे आद्य नगररचनाकार नारो आप्पाजी खिरे अर्थात तुळशीबागवाल्यांची ही तुळशीबाग! त्यांच्या कार्याची, प्रसंगी केलेल्या कष्टांची, त्यागाची आणि पेशव्यांप्रती, आपल्या राज्याप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेची जाणीव आपल्याला करुन देते. या थोर मुत्सद्याचे वर्णन एका श्लोकात खुबीने केले आहे….

जयाने स्वशौर्ये पुणें रक्षियेलें।
जयें पुण्यनगरी सह भूषविलें।
तशी मंदिरीं स्थापिलीं राममुर्ती।
अशी पंत नारो खिरे ख्यात किर्ती।।

….. वॉट्सॅपवरून साभार  दि.२८-०६-२०१९


५.पुण्यामधील देवळांची विचित्र नावे

 ….  आशुतोष बापट

नावे ठेवण्यात पुणेकरांचा हात कोणीही धरणार नाही. पुणेकरांनी आपल्या देवतांना आणि त्यांच्या मंदिरांना एकापेक्षा एक भन्नाट नावे ठेवलेली आढळतात. या नावांतून त्या त्या ठिकाणांच्या इतिहासाचा सहज उलगडा होतो. तिथे असलेला बाजार, वस्ती, तिथे घडलेल्या घटना यांचा या देवांशी संबंध लावून दिल्यामुळे पुण्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना ही नावे खूप उपयुक्त ठरतात. ‘‘नावात काय आहे?’’ असे कोणीतरी म्हटले होते, परंतु ‘‘नावातच सर्व इतिहास दडलेला आहे’’ असे ठामपणे फक्त पुणेकरच सांगू शकतात!

‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण पुणेकर सर्वार्थाने सार्थ करत असतात. काहीतरी आगळंवेगळं, आकर्षक आणि काहीसं विचित्र अशा अनेक गोष्टी पुण्यात पाहायला मिळतात. गोष्टीच कशाला, विचित्र व्यक्तींचीसुद्धा पुण्यात काही कमतरता नाही. कितीही चर्चेचा विषय होत असला तरीसुद्धा पुणेकरांनी आपले निराळेपण अगदी आजच्या काळातसुद्धा जपून ठेवले आहे. जशा पुणेरी पाटय़ा हा एक मोठा चर्चेचा विषय आहे तशीच पुण्यातल्या देवांना असलेली नावे हासुद्धा तितकाच मजेशीर विषय आहे.

कुठलीही व्यक्ती, संस्था, देवालये ही एका विशिष्ट नावाने ओळखली जाते, पण पुण्यात मात्र देवांना जी काही नावे ठेवलेली आहेत ती बघितली की, आपण थक्क होऊन जातो. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकीर्दीत पुण्याला शहराचा लौकिक प्राप्त झाला. पुण्याच्या जडणघडणीत नानासाहेब पेशव्यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांच्या काळात पुणे विस्तारत गेले. वस्ती वाढत गेली. विविध प्रांतांतून लोक येऊन पुण्यात वस्ती करू लागले. पुणे ही एक व्यापाराची मोठी पेठ तयार होत गेली आणि पुण्यात वेगवेगळ्या देवांची मंदिरे आणि देवस्थाने उभी राहू लागली. त्यांची ओळख करून घेताना, त्यांची नावे समजून घेताना मोठी मौज वाटते. पुण्यात सर्वात जास्त देवळे ही मारुतीची असावीत. त्या खालोखाल शंकर, गणपती, विष्णू, देवी आणि इतर देवतांची मंदिरे दिसतात.

शनिवारवाडय़ासमोरच्या पटांगणात बटाटय़ाचा बाजार भरत असे. त्यामुळे तिथे असलेला मारुती झाला ‘बटाटय़ा मारुती’. तसेच सराफांची दुकाने असलेल्या ठिकाणचा झाला ‘सोन्या मारुती’. आजच्या केईएम हॉस्पिटलसमोर पूर्वी पेशव्यांचा उंटांचा काफिला थांबायचा. तिथे उंटांचा तळ असायचा. त्यामुळे तिथला मारुती झाला ‘उंटाडय़ा मारुती’, तर स्मशानाकडे जाणारी अंत्ययात्रा खांदापालट करण्यासाठी जिथे थांबायची, त्या ठिकाणचा मारुती झाला ‘विसावा मारुती’. ‘डुल्या मारुतीची’ कथा काही औरच! पानिपत इथे मराठी सैन्याची कत्तल झाली म्हणून तो थरथर कापत होता, डुलत होता. तो झाला ‘डुल्या मारुती’. याबद्दल अजून एक वेगळी आख्यायिका सांगितली जाते. दुसऱया बाजीराव पेशवे यांनी पुणे सोडावे का यासाठी म्हणे या मारुतीला कौल लावला आणि या मारुतीने मान डोलवून त्याला मान्यता दिली. म्हणून हा झाला डुल्या मारुती ! भिकारदास शेठजींच्या जागेत आला म्हणून ‘भिकारदास मारुती’, तर गुरुवार पेठेत मृतदेह समोर ठेवून रडायची प्रथा होती म्हणून ‘रडय़ा मारुती’ आणि याचसोबत सुरू होते चमत्कारिक नावांची परंपरा. गवत्या मारुती, दंगल्या मारुती, धनगरांची वस्ती असलेल्या ठिकाणचा ‘लेंडय़ा मारुती’, भांग्या मारुती, बंदिवान मारुती, हलवायांची दुकाने असलेला भाग आणि त्यामुळे मारुतीच्या गळ्यात रोज जिलब्यांची माळ घातली जायची म्हणून तो झाला ‘जिलब्या मारुती’, तल्लीन मारुती, झेंडय़ा मारुती, पत्र्या मारुती. आजच्या फरासखाना इथे पूर्वी चापेकर बंधूंनी मारुतीच्या साक्षीने गोफण क्लब सुरू केला आणि तो मारुती झाला ‘गोफण्या मारुती’. दक्षिणमुखी मारुती आणि गावकोस मारुती असे अनेक मारुती आपल्या खास नावांनी प्रसिद्ध आहेत.

मारुतीबरोबरच इतरही देवस्थानांना असलेली चमत्कारिक नावे आपल्याला पुण्यात पाहायला मिळतात. एक आहे ‘दाढीवाला दत्त’! खरे तर दत्ताचा आणि दाढीचा इथे काहीच संबंध नाही. नारायण पेठेत दत्तात्रय घाणेकर यांनी १९११ मध्ये बाळप्पा महाराजांच्या प्रेरणेने एक दत्तमंदिर बांधले. त्याचे मूळ नाव श्रीपाद मंदिर, पण दत्तात्रय घाणेकरांना दाढी होती. त्यामुळे पुणेकरांनी या दत्ताचे नामकरण केले दाढीवाला दत्त. विजय टॉकीजजवळ आहे ‘सोटय़ा म्हसोबा’. म्हसोबा ही रक्षक देवता आहे. या देवाला नवस बोलत असत आणि तो पूर्ण झाला की, त्याला लाकडी सोटा वाहायची पद्धत होती. कदाचित रक्षक म्हणून त्याच्या हातात सोटा हवा ही भावना असू शकेल. या मंदिराच्या छताला हे भक्तांनी वाहिलेले सोटे टांगून ठेवत असत.

अजून एक वेगळे नाव असलेले मंदिर म्हणजे ‘उपाशी विठोबा’. इथे मात्र प्रथा काहीशी निराळी आणि भक्तिपूर्ण अशी आहे. जवळ जवळ तीन पिढय़ांच्या उपासाच्या व्रतामुळे या देवाला हे नाव पडले आहे. पेशवाईत गिरमे सराफांनी हे मंदिर बांधले. गिरमे उपास करताना लाह्यांचे पीठ आणि ताक असे एकत्र करून त्याचे सेवन करीत असत. त्यामुळे या विठोबाला ‘ताकपिठय़ा विठोबा’ असेही नाव पडले होते. पुढे गिरमे यांनी आपले उपासाचे व्रत नाना गोडबोले यांना सुपूर्त केले. नानांनी हे उपासाचे व्रत अंगिकारले आणि या विठ्ठलाची सेवा करू लागले. नाना गोडबोले हे उत्तम कीर्तनकार होते. पुढे त्यांनी आपल्या कीर्तन संचातील गंगाधरबुवा काळे यांच्याकडे आपले व्रत आणि हे मंदिर सुपूर्त केले. काळ्यांनी त्याच भक्तिभावाने हे व्रत अंगिकारले. सध्या साठे कुटुंबीयांकडे या मंदिराची व्यवस्था आहे. तीन पिढय़ांनी अंगिकारलेल्या उपासाच्या व्रतामुळे हा विठोबा मात्र ‘उपाशी विठोबा’ म्हणून प्रसिद्धीस पावला. असाच अजून एक विठोबा पुण्यात आहे तो म्हणजे ‘निवडुंग्या विठोबा’. नाना पेठेत असलेले मंदिर. वारीच्या वेळी संत तुकोबारायांची पालखी या मंदिरात उतरते. एका भक्ताला निवडुंगाच्या फडात ही मूर्ती मिळाली. पुढे गोसावींनी इथे मंदिर बांधले आणि तो झाला ‘निवडुंग्या विठोबा’. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उतरते तो आहे ‘पालखी विठोबा’. तद्वत पासोडय़ांचा बाजार जिथे भरायचा, तिथे आधी मंदिर झाले पासोडय़ा मारुतीचे आणि त्याच्या नंतर त्याच्या जवळ मंदिर झाले ते ‘पासोडय़ा विठोबाचे’. याशिवाय चोळखण आळीत असलेला ‘खणाळ्या म्हसोबा, नागाचे स्वतंत्र मंदिर आणि त्यात विराजमान असलेली दगडात कोरलेली नागाची जोडी म्हणून तो झाला ‘दगडी नागोबा’.

यांच्यात भर घालायला आलेली देवळे म्हणजे ‘गुडघेमोडी माता’, ‘शितळादेवी’, ‘भाजीराम मंदिर’, मातीपासून केलेला ‘माती गणपती’, ‘गुपचूप गणपती’, पेशवाईत नाना फडणवीसांचा सहकारी असलेल्या नागोजी गुंड याच्या घराजवळ असलेला गणपती झाला ‘गुंडाचा गणपती’. अजून दोन नावे अशीच आगळीवेगळी आहेत. एक आहे ‘बीजवर विष्णू’. खरे तर विष्णूचे एकच लग्न झालेले आहे ते लक्ष्मीशी. मग पुण्यात बीजवर विष्णू कसा काय आला? तर झाले असे की, विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तींपैकी लक्ष्मीची मूर्ती भग्न झाली. तिच्या जागी दुसरी मूर्ती आणून वसवली म्हणून हा देव झाला बीजवर विष्णू ! आणखी एक देवस्थान म्हणजे ‘खुन्या मुरलीधर’. सन १७९७ मध्ये गद्रे सावकारांनी हे मंदिर बांधले आणि त्याच्या रक्षणासाठी अरब शिपाई ठेवले. त्यांच्यात आणि इंग्रजी सैन्यात इथे लढाई झाली. त्यात ६० लोक मारले गेले. दुसरे असे की, चापेकर बंधूंनी रँड या ब्रिटिश अधिकाऱयाचा खून केला. त्यांच्या कटात आधी सामील असलेले द्रविड बंधू नंतर फितूर झाले आणि त्यांनी पोलिसांना सगळी माहिती दिली. हे द्रविड या मुरलीधर मंदिरासमोरच राहायचे. फितुरीची बातमी कळल्यावर या द्रविड बंधूंचा इथेच खून करण्यात आला. त्यामुळे हा मुरलीधर झाला ‘खुन्या मुरलीधर’.

अशी अजूनही अनेक नावे आणि देवळे पुण्यात पाहायला मिळतील. नावे ठेवण्यात पुणेकरांचा हात कोणीही धरणार नाही. तीन सोंडी असलेला म्हणून त्रिशुंड गणपती इथपर्यंत ठीक आहे, पण पुणेकरांनी आपल्या देवतांना आणि त्यांच्या मंदिरांना एकापेक्षा एक भन्नाट नावे ठेवलेली आढळतात. खरे तर ही नावे अत्यंत सोपी आणि सुटसुटीत अशीच ठेवलेली आहेत. या नावांतून त्या त्या ठिकाणांच्या इतिहासाचा सहज उलगडा होतो. तिथे असलेला बाजार, वस्ती, तिथे घडलेल्या घटना यांचा या देवांशी संबंध लावून दिल्यामुळे पुण्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना ही नावे खूप उपयुक्त ठरतात. ‘‘नावात काय आहे?’’ असे कोणीतरी म्हटले होते, परंतु ‘‘नावातच सर्व इतिहास दडलेला आहे’’ असे ठामपणे फक्त पुणेकरच सांगू शकतात!
– Anand: एक दशभुजा गणपतीही आहे.

….. वॉट्सॅपवरून साभार  दि.२१-०७-२०१९

६.मोदी गणपती

बोंबल्या गणपतीचा मोदी गणपती कसा झाला?

पेशव्यांची राजधानी पुणे म्हणजे भारताच ऑक्सफर्ड. पण इथ जेवढी इंजिनियरिंग कॉलेजसं आहेत, जेवढे स्पर्धापरीक्षाचे क्लासेस आहेत त्या सगळ्यापेक्षा जास्त इथ देवळ हायत. हां पास नापासचं टेन्शन असणाऱ्या आमच्या सारख्या पोरांना देऊळ हाताशी असलेलं बर असतंय. पण याचा अर्थ असं नाही की ही देवळ परीक्षा देणाऱ्यांसाठी बनली. पेशव्यांच्या काळापासून पुण्यात देवळं आहेत.

सदाशिव पेठ, नाना पेठ, शुक्रवार पेठ, गंज पेठ असे पुण्यात एकूण सतरा पेठा आहेत. १८१० साली केलेल्या नोंदीनुसार या सगळ्या पेठांमध्ये एकूण चारशेच्या वर मन्दिरे होती. यात गेल्या दोनशे वर्षात वाढच झाली. आताचा आकडा नक्की माहित नाही. पण पेशव्यांच्या काळातल्या देवळांचा थाटचं निराळा होता हे खरं!!

या पुण्याच्या देवांची नावेही एकदम पुणेरी वळणाप्रमाणे तिरकस आहेत. #पासोड्या मारुती, #सोट्या म्हसोबा, #खुन्या मुरलीधर, #उपाशी विठोबा , #डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, #जिलब्या मारुती, #पानमोड्या म्हसोबा अशी बरीच देवस्थाने आहेत. पण #पेशव्यांच्या पुण्याचं आराध्य दैवत आहे गणपती. हां गणपतीचीही नावे बरीच विचित्र आहेत, #दगडूशेठ हलवाई गणपती तर सगळ्यांना माहित असतो पण कसबा गणपती, #गुंडाचा गणपती, #गुपचूप गणपती, #चिमण्या गणपती, #हत्ती गणपती, #मद्रासी गणपती असे हजार प्रकारचे गणपतीचे आहेत.

पण आज आपण चर्चा करणार आहे #मोदी गणपती बद्दल.

होय खरंच. तुम्हाला वाटल निवडणुकीची आचारसंहिता संपल्या म्हणून बोल भिडू काय पण चेष्टा करालाय. पण नाही हे खरं आहे. चाणक्य शप्पथ. पुण्यात नारायण पेठेत जावा. तिथ पत्ता विचारत बसू नका कोण पण सांगणार नाही. सरळ गुगल मॅपमध्ये टाका आणि खालच्या अंगान वरच्या अंगान जाऊन डायरेक्ट #मोदी गणपतीच्या दर्शनाचा लाभ होईल.

तर आधीच सांगतो, आपल्या देशात २०१४ पासून देश बदलला, आपल्या कड अच्छे दिन आले असं म्हणतात पण त्याच्या आधीच म्हणजे #दोनशे वर्षापासून #मोदी गणपती #पुण्यात आहे.

गोष्ट आहे अठराव्या शतकातली….

पुण्यात तेव्हा दुसऱ्या बाजीरावचा कारभार सुरु होता. इंग्रजांनी मराठी सत्तेच्या भोवती विळखा घट्ट करायचं काम सुरु केलं होतं. त्यांचा एक रीजेन्ट तेव्हा पेशव्यांच्या सदरेवर असायचा. एकूण कामकाज कसे चालते यावर त्याचे बारीक लक्ष असायचे. खरे तर तिथे आलेल्या बेरकी इंग्रज अधिकाऱ्यांनी मराठी शिकून घेतलेली असायची. पण तरीही रोजच्या कामात मदतीला एखादा दुभाषी कम एजंट हवा असायचा. असाच एक एजंट होता त्याच नाव खुश्रू सेठ मोदी.

हा खुश्रू मोदी म्हणजे मुळचा गुजरातचा पारसी. पण महाखटपट्या माणूस. पेशव्यांच्या दरबारात राहून इंग्रज आणि बाजीराव या दोघांनाही खुश ठेवायची कला त्याला चांगलीच अवगत झाली होती. यामुळे दोन्ही कडची मलई खाऊन शेठजीने चांगलीचं माया गोळा केली होती. पेशव्यांनीही त्याला काही गावे इनाम दिली होती.

या खुश्रूसेठ मोदीने नारायणपेठेत भला मोठा वाडा आणि सुंदर बाग उभारली . जिला लोक मोदी बाग म्हणून ओळखायचे. माउंट स्टुअर्ट एलफिस्टन पुण्यात येई पर्यंत या खुश्रू मोदीने पुणे शहरात बराच धुमाकूळ घातला. पुढे कुठल्या तरी पुणेकराने त्याच्या वर विषप्रयोग करून मारले. कोणी म्हणतो त्याने आत्महत्या केली. असो.

याच काळात कोकणातल्या शिरगाव रत्नागिरी जिल्ह्यातून एक भट आडनाव असलेले गरीब ब्राम्हण कुटुंब कामाच्या शोधात पुण्याला आल होतं. पेशवाईमध्ये आपल्याला नक्की आश्रय मिळेल याची त्यांना खात्री होती. याचं भट घराण्यातल्या एका व्यक्तीला मोदी बागेजवळ एक स्वयंभू गणपतीची मूर्ती सापडली. भटांची सिद्धीविनायकावर खूप श्रद्धा होती. त्यांनी एक छोट देऊळ बांधून त्याची पूजा अर्चा सुरु केली.

पुढे कालांतराने भट घराण्याच्या सावकरीच्या व्यवसायाला उर्जितावस्था आली तसा त्यांनी आपल्या मन्दिराचाही जीर्णोद्धार केला. हे साल होत १८६८ . तेव्हा या सुंदर मंदिराला लाकडी सभामंडप बांधला गेला. इथल्या गर्भगृहावरचा कळस, देवळातली गोळवणकर पेंटरनी चितारलेली अप्रतिम चित्रे , श्रींची मूर्ती ही एकदा जाऊन बघण्या सारखीच आहेत.

बर या गणपतीच नाव मोदी गणपती कसे पडले?

या मोदीबागेच्या भागात बरेच मच्छीमार लोक मासे विकायला बसत . ही मंडळी कोकणातून आली असल्यामुळे भटांच्या गणपतीची भक्त होती. या मासेबाजाराचा कलकलाट म्हणा, किंवा बोंबील विकायला येणाऱ्या भक्तांचा गणपती म्हणा या गणपतीचे नाव बोंबल्या गणपती पडले. आजही पेठेत राहणारे जख्ख आजोबा या गणपतीला बोंबल्या गणपती म्हणूनच ओळखतात.

पुढे कालांतराने हा मच्छी बाजार बंद झाला. देवाला असली विचित्र नावे ठेवणारी पिढीही कमी झाली पण मोदी बाग अजूनही तशीच होती. याच बागेमुळे भटांच्या बोंबल्या गणपतीचे नामकरण मोदी गणपती असे झाले.

संदर्भ- ग्रँटडफ. व्हॉ. ३; पेशवाईची अखेर; पेशव्यांची बखर; भा. इ. मं. अहवाल १८३८; दुसरे बाजीराव यांची रोजनिशी

#पुणेरीडायरी #पुणेकर #मोदीगणपती #गणेशोत्सव

….. वॉट्सॅपवरून साभार  दि.०४-०९-२०१९


७. शनिवारवाडा

Shaniwarwada

….. वॉट्सॅपवरून साभार  दि.२७-०८-२०१९

Shaniwarwada

पुण्याचे वैभव असलेल्या शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाचे दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्‍टर हेन्‍री डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल ९० वर्षांनी वाड्याची दुरवस्था संपण्याचा योग आला. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली.
शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत.पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत ५१४०२ हिरे, ११३५२ माणके, २७६४३ पाचू, १७६०११ मोती, ४३५ नीलम, ४३२ वैडुर्य, ४१७ पुष्कराज, ७५ गोमेद, ४४४ पोवळी, ३७८ करड्या, १५६२ पिरोजा, १९१२ करिपोला (कोरल), ४९७ लसण्या असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. उरलेला खजिना बाजीरावानंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब याला मिळाला. कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर नानासाहेबांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात ३० लाख रुपयांची सोन्या-चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्येकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि ७० लाख रुपयांचे दागिने, जडजवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्या वेळी ब्रिटिशांना मिळाला होता.(विकिपीडिया )
एक यवन सरदाराने वाड्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे “”बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो. मात्र आत स्वर्गासारखा दिसतो .

श्री. माधव विद्वांस

….. फेसबुकवरून साभार  दि.१०-०१-२०२०
**************************************************************

८. आर्यन थिएटर

आज ७ फेब्रुवारी
आर्यन चित्रमंदिर’ हे पुण्यातील पहिले चित्रपटगृह. ७ फेब्रुवारी १९१५ रोजी गंगाधर नरहरी ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी लोकरंजनाचे नवीन साधन म्हणून ‘आर्यन’ चित्रपटगृहाची स्थापना केली. त्याचे संस्थापक होते, गंगाधर नरहरी ऊर्फ बापुसाहेब पाठक. ते चित्रपटगृह महात्मा फुले मंडई परिसरात लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर होते. महापालिकेने ते २२ सप्टेंबर १९८३ रोजी पाडले व तेथे पार्किंग स्टँड उभारले. कारण ती जागा महापालिकेची होती. त्याचा शतकमहोत्सवी समारंभ बापुसाहेबांचे चिरंजीव आनंदराव पाठक यांनी पुण्यातील फिल्म अर्काईव्हजच्या दालनात साजरा केला. ‘आर्यन’ १९१५ साली सुरू झाले, तेव्हा तेथे मूकपट दाखवले जात होते. मूकपटांतील दृश्यात जिवंतपणा यावा यासाठी पडद्यामागे बाजाची पेटी, तबला, घोड्याच्या पळतानाच्या टापांचा आवाज वाटावा म्हणून नारळाच्या रिकाम्या करवंट्या वाजवल्या जात. पेटी, तबला वाजवण्याचे काम करणा-या मुलांमध्ये राजा परांजपे यांचा समावेश होता. पुढे ते विख्यात दिग्दर्शक झाले. पुण्यात पहिले चित्रगृह उभारणा-या व पहिला मूकपट ‘डायमंड रिंग’, पहिला भारतीय बोलपट ‘आलम आरा’, पहिला मराठी बोलपट ‘संत तुकाराम अर्थात जय हरि विठ्ठल’. ‘संत तुकाराम’ आर्यनमध्ये दाखवणा-या गंगाधरपंतांचे स्मरणही केले जात नाही, त्याबद्दल आनंदरावांनी दु: ख व्यक्त केले. सिनेमा म्हणजे काय, अशी उत्सुकता असणा-या प्रोजेक्टरद्वारे चालतीबोलती चित्रे दाखवून ‘आर्यन‘ चित्रपटगृहाने लोकरंजनाचा इतिहास निर्माण केला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारा ‘आर्यन’मध्ये आपण स्वत: अनेक मूकपट व बोलपट पाहिले आहेत असे सांगितले.

महात्मा फुले मंडईत स्थापन झालेल्या त्या चित्रपटगृहाने मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळात सिंहाचा वाटा उचलला; तसेच अनेक मराठी चित्रपटांचे रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव व हीरकमहोत्सव साजरे केले. ते चित्रपटगृह मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी आधारवडच होते. ७ फेब्रुवारी १९२० रोजी बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला होता. ‘आर्यन’ला पन्नास वर्षें पूर्ण झाली तेव्हा सुवर्णमहोत्सवी समारंभ झोकात साजरा झाला होता. महापौर बी.डी. किल्लेदार समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. दैनिक ‘सकाळ’चे संपादक ना.भि. परुळेकर हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते अरुण सरनाईक, अनंत माने आदी कलावंतांचा सत्कार करण्यात आला. ‘आर्यन’ चित्रगृहास प्रथमपासून भेट देणा-यामध्ये लोकमान्य टिळक, रँग्लर परांजपे, ना.ह. आपटे, वसंतदादा पाटील, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, जयंतराव टिळक, इंदुताई टिळक, काकासाहेब गाडगीळ, मा. विठ्ठल, हिराबाई बडोदेकर, ग.दि. माडगुळकर, दादा कोंडके, उषा चव्हाण, जयश्री गडकर आदींचा समावेश आहे. आचार्य अत्रे यांनी लिहिलेला ब्रम्हचारी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यावर ‘आर्यन’मध्ये त्याने पन्नास आठवडे पूर्ण केले. तो विक्रमच आहे. ‘एक गाव, बारा भानगडी’ (92 आठवडे), ‘केला इशारा जाता जाता’ (75 आठवडे), ‘सवाल माझा ऐका’ (45 आठवडे), ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ (60 आठवडे), ‘एकटा जीव सदाशिव’ (25 आठवडे), ‘गनिमी कावा’ (23 आठवडे), ‘मोलकरीण’ (25 आठवडे) असे लोकप्रिय चित्रपट तेथे दाखवले गेले. हिंदी ‘बेटीबेटे’, ‘मैं चूप रहूंगी’ हे चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले. बापुसाहेब पाठक यांनी पुण्यानंतर सांगली, सोलापूर, बडोदा, पाचगणी येथे तेथील पहिली चित्रपटगृहे सुरू केली. ‘आर्यन’ हे खरे चित्रमंदिरच होते. तेथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा होत असे. मंडईतील फळभाजी विक्रेते रात्री तेथे चित्रपट पाहण्यास येत. मिरर स्क्रीन येथे आला, तेव्हा महामहोपाध्याय द.वा. पोतदार उद्घाटनास आले होते. राज कपूर, शत्रुघ्न सिन्हा यांनीही ‘आर्यन’च्या समारंभात भाग घेतला होता. बापुसाहेब पाठक यांचे ६ ऑक्टोबर १९७० रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव आनंदराव व बाबूराव यांनी व्यवस्था पाहिली.

पुणेकरांच्या आठवणींत आणि इतिहासात विशेष स्था्न मिळवलेले ते चित्रपटगृह काही वर्षांनंतर प्रेक्षकांपासून दूरावले. ‘आर्यन’ची जागा महापालिकेकडून भाडे कराराने घेण्यात आली होती. त्यांनी चित्रपटगृहाला टप्प्याटप्प्याने मुदतवाढ दिली; परंतु त्यानंतर मुदतवाढ द्यायची नाही, असा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला. चित्रपटगृह वाचवण्यासाठी आनंद पाठक यांनी तत्कालीन महापौर, आयुक्तांपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनेकांशी पत्रव्यवहार केला. परंतु उपयोग झाला नाही. अखेर चित्रपट क्षेत्रातील ती ऐतिहासिक वास्तू २२ सप्टेंबर १९८३ रोजी जमीनदोस्त करण्यात आली.

चित्रपटगृहाच्या शताब्दीनिमित्त आनंद पाठक यांनी ‘आर्यन’च्या आठवणींना उजाळा देणारे खास कॅलेंडर तयार केले. त्यानिमित्ताने चित्रपटगृहावर आधारित लघुपटही तयार करण्यात आला.
संजय दिनकर/ थिंक महाराष्ट्र
संकलनसं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

….. फेसबुकवरून साभार  दि.०७-०२-२०२०

———————————-

नवी भर दि. २७-०५-२०२०

९. सदाशिव पेठ

पुण्यातील सदाशिव पेठेचा इतिहास…
ही पेठ सदाशिवराव भाऊ यांच्या स्मरणार्थ वसवण्यात आली. पूर्वी इथे नायगाव नावाचे एक खेडे होते. सण 1769 च्या सुमारास आप्पाजी मुंढे यांनी माधवरावांच्या सांगण्यावरून येथे वसाहत निर्माण केली. सुरुवातीची 7 वर्षे येथे जकात माफ होती. ही जकात किमती वस्तूंवर माफ असल्याने व्यापारी, सावकार, सरदार यांनी याचा फायदा घेतला आणि पेठेत आपले वाडे बांधले. सन 1765 मध्ये येथे फक्त 87 घरे होती व सन 1818 मध्ये हीच संख्या 752 पर्यंत जाऊन पोहोचली.
पेठेत पाणी पुरवठा करण्याचे काम नाना फडणीस यांनी पार पाडले. आंबेगाव येथून नळाद्वारे पाणी आणून ते पेठेतील हौदात सोडले. त्यावेळी या योजनेला सुमारे 8 हजार रुपये इतका खर्च आला होता. सदाशिव पेठेचा विस्तार हा पुढे मोठ्या प्रमाणावर झाला. विश्रामबागवाडा, सेनापती गोखले यांचा वाडा तसे गद्रे सावकारांची बाग ही याच पेठेतली. गद्रे सावकारांच्या बागेच्या परिसरातच खुन्या मुरलीधराचे मंदिर आहे. सदाशिव पेठेत तब्बल 32 मंदिरे आहेत. मंदिरांच्या संख्येत या पेठेचा क्रमांक हा कसबा आणि शुक्रवार यांच्या खालोखाल लागतो. उपाशी विठोबा, चिमण्या गणपती, खुन्या मुरलीधर ही काही देवतांची अजब नावे सुद्धा याच पेठेतली.. मराठ्यांच्या इतिहासात मोठ्या प्रमाणावर भर घालणारी संस्था म्हणजे भारत इतिहास संशोधक मंडळ. ही संस्था सुद्धा याच पेठेत आहे याचा सदाशिव पेठकरांना अभिमान असला पाहिजे.
संदर्भ – पुण्याचे पेशवे, अ. रा. कुलकर्णी
– शंतनु परांजपे
पेशवे यांच्या फेसबुक पानावरून साभार दि.२७-०५-२०२०

*********

१०. सारसबागेतला (तळ्यातला) गणपती

सारसबागेतील गणपती मंदिराला आज २३७ वर्षे पूर्ण झाली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बांधलेले हे मंदिराला तळ्यातला गणपती या नावाने प्रसिद्ध आहे.
सारसबागेतील ‘तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक
समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे. नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे ‘विद्येचे माहेरघर’ मानले जाते.परंतु नवसाला पावणाऱ्या ‘तळ्यातला गणपती’ने पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अगदी आत्तापर्यंत हे ठिकाण “तळ्यातला गणपती” याच नावाने ओळखले जायचे.
पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होते. पुण्याची वाढती पाण्याची गरज पाहून श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी १७५४ साली आंबील ओढ्याच्या प्रवाह बदलून मोठे तळे बांधले. या तलावाचे काम १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. या तलावात ‘सारस पक्षी’ सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेचे काव्यात्मक ‘सारस बाग’ असे नामकरण केले. हैदरअलीवर स्वारी करायला जाण्यापूर्वी येथील तळ्यात श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या. त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. मंदिराची सर्व व्यवस्था देवदेवेश्वर संस्थान पाहते. सारसबाग हे उद्यान व तेथील गणपती पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे.
संजीव वेलणकर पुणे.

या ठिकाणाची मोहक छायाचित्रे या पानावर पहा : https://anandghare.wordpress.com/2021/02/14/%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87/
फेसबुकवरून साभार दि. ०४-०६-२०२१

११. पुण्यातील १७ पेठा

पुण्यात एकूण १७ पेठा आहेत. प्रत्येक पेठ आपली वेगळी ओळख घेऊन उभी आहे. प्रत्येक पेठ ही मराठे आणि पेशव्यांच्या काळात उभी केली होती. यापैकी सात पेठांची नांवे वारांवरुन ठेवली आहेत, तर उरलेल्या पेठांची नांवे त्या काळातील दरबारात काम करणाऱ्या कर्तबगार लोकांच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत.
१. कसबा पेठ
१४ व्या शतकात उभा केलेला हा पुण्यातील सर्वात जुना भाग. इथेच लालमहाल आणि पुण्याचे ग्रामदैवत असलेला मानाचा पहिला कसबा गणपती आहे. ही पेठ चालुक्यांच्या काळात उभी राहिली आहे.
२. सोमवार पेठ
त्रिशुंड म्हणजे तीन सोंडेचा गणपती असलेलं पेशवेकालीन गणपती मंदिर इथं आहे, पण पूर्वी याची शाहपुरा अशी ओळख होती आणि बँका अस्तित्वात येण्यापूर्वी पैसे उधार उसनवार द्यायचं काम इथं चालायचं. मजेचा भाग म्हणजे पैसा उसने देणारे लोक गोसावी म्हणून ओळखले जात.
३. मंगळवार पेठ
पूर्वी या भागाला शाईस्तेपुरा म्हणत. आता इथं वाहनांची खरेदी विक्री होते. येथे आठवड्यातील दोन दिवस जुन्या वस्तूंच्या खरेदी विक्रीचा बाजार भरतो.
४. बुधवार पेठ
पुण्यातील अतिशय गजबजून गेलेला भाग म्हणजे बुधवार पेठ. औरंगजेबाने या भागाचं नांव मोहिताबाद ठेवलं होतं, पण बाळाजी विश्वनाथ या पहिल्या पेशव्यांनी ही पेठ वसवून हिचं नाव ठेवलं बुधवार पेठ. श्रीमंत दगडूशेठ गणपती, लक्ष्मी रोड, सिटी पोस्ट इत्यादी ठिकाणे बुधवार पेठेत मोडतात. याच पेठेत देहविक्रय व्यवसाय चालतो. याच कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात बुधवार पेठ अधिक लोकप्रिय आहे.
५. गुरुवार पेठ
१७३० साली अस्तित्वात आलेली ही पेठ आधी विठ्ठल पेठ म्हणून ओळखली जायची. कारण इथं विठ्ठलाचं मंदिर होतं. हत्तीच्या झुंजीसाठी ही पेठ प्रसिद्ध होती.
६. शुक्रवार पेठ
पूर्वी ही पेठ विसापूर या नावाने ओळखली जायची, पण बाळाजी विश्वनाथ यांनी १७३४ मध्ये जीवाजीपंत खासगीवाले यांच्या मदतीने ही पेठ उभारली. आजही या पेठेत महात्मा फुले भाजी मंडई आहे.
७. शनिवार पेठ
प्रसिद्ध वास्तू शनिवारवाडा ही याच पेठेत आहे. मुस्लिम कारभारात हा भाग मूर्तूजाबाद या नांवाने ओळखला जायचा, पण पेशव्यांच्या काळात याचे नांव शनिवार पेठ करण्यात आले.
८. रविवार पेठ
मलकापूर हे नांव असलेला हा भाग नंतर रविवार पेठ म्हणून ओळखला जाऊ लागला. इथे सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी विक्री होते. तसंच इथं लक्ष्मीनारायण मंदिर आणि राम मंदिर प्रसिद्ध आहेत. आता प्लॅस्टिकची मोठी बाजारपेठ इथं आहे.
९. सदाशिव पेठ
पेशव्यांचे भाऊ आणि पानिपत युद्धाचे नायक सदाशिवराव भाऊ जे १७६१ साली युद्धात कामी आले, यांच्या स्मरणार्थ ही पेठ उभारली. इथे विश्रामबागवाडा, सारसबाग यासह अन्य अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
१०. नाना पेठ
पेशवाईतील अत्यंत मुत्सद्दी आणि हुशार अशा नाना फडणवीस यांच्या स्मरणार्थ निहाल पेठेचं नांव नाना पेठ असं केलं. होलसेल किराणा मालाची बाजारपेठ इथे आहे, तसंच ऑॅटोमोटीव्ह स्पेअर पार्ट्सचा मोठा व्यापार इथे चालतो. टू व्हीलरचे सर्व स्पेअर पार्टस या भागात मिळतात.
११. गणेश पेठ
सवाई माधवराव पेशव्यांनी ही पेठ १७५५ मध्ये उभारली. गणपतीच्या नांवाने गणेश पेठ असं या पेठेचं नांव ठेवलं.
१२. भवानी पेठ
१८६३ मध्ये भवानीमातेचं मंदिर इथं बांधलं गेलं. आणि त्यावरुनच या पेठेचं नांव भवानी पेठ असं ठेवलं. पूर्वी इथं बोरांची खूप झाडं होती. याला बोरवन असं म्हणत ,पण आता ही भवानी पेठ लाकडी, स्टील आणि हार्डवेअरची मोठी बाजारपेठ आहे.
१३. घोरपडे पेठ
पेशव्यांचे पराक्रमी सरदार घोरपडे यांच्या स्मरणार्थ ही पेठ बनवली आहे, पण आता हा भाग रहिवासी क्षेत्र आहे.
१४. नारायण पेठ
नारायणराव पेशवे यांनी १७७३ मध्ये ही पेठ उभारली. नारायण पेठेत गायकवाड वाडा या इमारतीत टिळकांनी आपलं केसरी हे मराठी वर्तमानपत्र सुरू केलं होतं. ही इमारत आता केसरी वाडा नावाने ओळखली जाते.
१५. गंज पेठ
सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात मुजफ्फरगंज हे एक व्यवसाय केंद्र होतं. नंतर याचं नांव गंज पेठ केलं. आता महात्मा फुले पेठ या नावाने ही पेठ ओळखली जाते.
१६. नवी पेठ
पुण्यातील सर्वात नवी पेठ म्हणजेच नवी सदाशिव पेठ ही ब्राह्मण पेठ उर्फ नवी पेठ. लाल बहादूर शास्त्री मार्गाशी जोडलेली ही पेठ ही सगळ्या पेठातील नवीन पेठ. म्हणून या पेठेचं नांव नवी पेठ.
१७. रास्ता पेठ
१७७६ मध्ये ही पेठ शिवपुरी म्हणून ओळखली जायची. पेशव्यांचे सरदार आनंदराव लक्ष्मणराव रास्ते यांच्या स्मरणार्थ रास्ता पेठ असं या पेठेचं नामकरण केलं…….

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

3 thoughts on “शनिवारवाडा, पर्वती, तुळशीबाग, अप्पा बळवंत चौक, स्वारगेट वगैरे”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s