कवी केशवसुत

कवी केशवसुत 

३६६ keshavsut

कवी केशवसुत हे मराठी कवितेचे युगप्रवर्तक आहेत. त्यांनी एकोणिसाव्या शतकाचा मनोधर्म जाणला होता, आत्मसातही केला होता. म्हणूनच ते कवितेचे युगपरिवर्तन करू शकले. ‘नव्या शिपायाचा’ बाणा पत्करून त्यांच्या कवितेने व्यक्तिस्वातंत्र्याची, समतेची, क्रांतीची, नव्या मनूची “तुतारी” फुंकली. आधुनिक मराठी कवितेत केशवसुतांचा मान पहिला का आहे, तर त्यांनी रूढी-परंपराग्रस्त जग उलथून टाकण्याचा, समानतेची वागणूक देण्याचा आपल्या कवितेचा युगधर्मच आहे असे मानले. केशवसुतांनी इंग्रजी कवितांचे अवलोकन करून कवितेविषयी नवी दृष्टी स्वीकारली व ती मराठीमध्ये रूजवली.

नांगरल्याविण भुई बरी
असे कितितरी! पण शेतकरी-
सनदी तेथें कोण वदा
हजारांतुनी एकदा!

या झपूर्झा कवितेत केशवसुत म्हणतात, हजारो लोकांतून एखादाच प्रतिभावंत निर्माण होतो. तसेच कवी केशवसुत हे काव्य विश्वाला अधिक प्रतिभा संपन्न करतात. ‘कविता आणि कवी’ या कवितेपासून ‘प्रतिभा’ या कवितेपर्यंत सतत बावीस वर्षे त्यांनी कविता लेखन केले आहे. काव्य, कला आणि प्रतिभा यांची स्वरूपे व कार्ये, सौंदर्यनिर्मितीच्या प्रयत्नांतले विविध अनुभव, विविध क्षेत्रांत होणारा प्रतिभावंतांच्या सामर्थ्याचा साक्षात्कार, या सर्वांवर दीड तपात त्यांनी कविता लिहिल्या. सृष्टी, तत्व आणि दिव्यदृष्टी, कल्पकता आणि कवी, दिवा आणि तारा, क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास, कवितेचे प्रयोजन, आम्ही कोण, प्रतिभा अशा विविध प्रकारच्या त्यांच्या कविता आहेत. झपूर्झा आणि हरपले श्रेय यांची मूळ प्रेरणा या ध्यासातच आहे. दिव्य ठिणगी, शब्दांनो, मागुते या, रूष्ट सुंदरीस व फिर्याद या आत्मपर कवितांतही केशवसुतांनी काव्यजीवनातले स्वतःचे अनुभव वर्णन केले आहेत. मात्र ते अधिक वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. काव्य किंवा कला यांच्या स्वरूपाचा अथवा प्रतिभेच्या कार्याचा विचार त्यात नाही.

“गाण्याने कविच्या प्रभाव तुमचा वर्धिष्णुता घेइल
हातीं घेउनियां निशाण कवि तो पाचारितो बांधवां
या, हो, या! झगडावयास सरस हो, मेळवा वाहवा!
आशा, प्रेम, तसेंच वीर्य कवनीं तो आपल्या गाइल”


नवी भर दि.०८-१०-२०२० : सतार ते तुतारी!
एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी
अशा शब्दांत क्रांतीचा मंत्र पोहोचवतानाच ‘सतारीचे स्वर दिड दा दिड दा’ असे मधुर गुंजन करणारे आधुनिक मराठी कवितेचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांचा आज जन्मदिन.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्यांच्या रसाळ व गेयबद्ध तरीही साध्या सोप्या शब्दांच्या कवितेने मराठी मनावर गारुड घातले, असे केशवसुत. त्यांना जेमतेम चाळशीचे आयुष्य लाभले. त्यांच्या १४० कविता सध्या उपलब्ध आहेत. मात्र इतक्या प्रतिभावान कवीचा एकही संग्रह त्यांच्या हयातीत प्रकाशित झाला नाही, हे दुर्दैव. त्यांच्या निधनानंतर ह ना आपटे यांनी ‘केशवसुतांची कविता’ हा संग्रह प्रकाशित केला.
मुळगुंद या निसर्गरम्य गावात जन्मलेले दामले यांचे शिक्षण काही वर्षे पुण्यात लोकमान्य टिळक व आगरकरांच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यामुळे त्यांच्यात राष्ट्रीय बाणा निर्माण झाला. तो त्यांच्या कवितेत उतरला.
त्यांच्या कवितेवर पाश्चिमात्य कवींचाही प्रभाव होता. मराठीबरोबरच संस्कृत व इंग्रजी भाषांमधील त्यांचे वाचन अफाट होते. त्यामुळेच कवितेच्या रचनेची नवी घाटणी त्यांनीच तयार केली. कविता वाचल्यानंतर ती गुणगुणता आली पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष होता.
नवा शिपाई, झपुर्झा अशा त्यांच्या कविता आजही मुखामुखात आहेत. मनात रेंगाळणाऱ्या त्यांच्या काही कविता मी आज दिवसभरात सादर करणार आहे.
मृत्यूच्या काही काळ आगोदर त्यानी लिहिलेली ही कविता त्यांच्या परिचित लेखन स्वभावापेक्षा वेगळी आहे. हा अभंग ही त्यांची शेवटचीच रचना:
तुझे नाम मुखी ध्यान तुझे डोळा
व्रुत्ती या चंचळा स्थिरावल्या॥
चिंता भय दुःखे अवघी दूर झाली
अनाथांचा वाली जवळी केला॥
भिकार या जगी इच्छित न मिळे काही
म्हणुनी तुझे पायी भिक्षां-देहि॥
केशवसुत म्हणे देवा दीन-नाथा
तुझे पायी माथा वाहियेला॥
असे केशवसुत! त्यांच्या स्फूर्तिदायी पण काव्यात्मक स्मृतींना श्रद्धांजली!
– भारतकुमार राऊत
——
.. आणि निनादली तुतारी!
स्फूर्तीचे कवी कै. कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांनी लिहिलेली ‘तुतारी’ ही स्फूर्तिदायी कविता.
केशवसुत यांचा जन्म कोकणात माळगुंदला झाला. मात्र त्यांचे शालेय शिक्षण काही वर्षे पुण्यात लोकमान्य टिळक व आगरकर यांनी चालवलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यामुळे राष्ट्रीय वृत्ती त्यांच्या अंगी बाणली. तीच त्यांच्या कवितेत उमटली.
त्यांच्या झपुर्झा, नवा शिपाई अशा कविता आजही गाजत आहेत. त्यातील सर्वात गाजत राहिलेली कविता ‘तुतारी’.

– – – – – – – –

कवी केशवसुत

Keshavsut-taluka-dapoli-CopyBy तालुका दापोली -October 7, 2018

केशवसुत यांचा जन्म मालगुंड गावी, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. त्यांच्या जन्मतारखेबाबत वाद असल्यामुळे १५ मार्च १८६६ व ७ ऑक्टोबर १८६६ अशा दोन तारखा समोर येतात. परंतु सामान्यपणे ७ ऑक्टोबर या दिनांकावर केशवसुतांची जयंती साजरी केली जाते. केशवसुतांचे कनिष्ठ बंधू सी.के.दामले यांनी प्रसिद्ध केलेल्या केशवसुतांच्या चरित्रात त्यांची जन्मतिथी ‘भाद्रपद कृष्ण १४ रविवार शके १७८८ सन १८६६ सांगितली आहे. कृष्णपक्षातील जन्म असल्यामुळे कृष्ण नाव ठेवले गेले, असा अंदाज ते वर्तवतात. कवि केशवसुतांचे वडिल ‘केशव विठ्ठल दामले’ उर्फ ‘केसोपंत’ हे सरकारच्या शाळाखात्यातील मराठीशाळेमध्ये शिक्षक होते. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांनी लवकर निवृत्ती घेतली व दापोली तालुक्यातील ‘विश्वनाथ नारायण मंडलिक’ यांचे खोतीगाव असलेल्या वळणे गावाची देखभाल पाहू लागले. या गावचा स्पष्ट नामनिर्देश केशवसुतांनी त्यांच्या ‘एक खेडे’ या कवितेत केला आहे. वळणे येथील घराबाबत सी.के.दामले लिहितात, घराभोवती वन्य फुलझाडे होती, फुलाच्या पखरणी घराभोवतालच्या अंगणा-परसात पडलेल्या असायच्या. केशवसुतांना इथला निसर्गरम्य परिसर फार प्रिय होता. विद्यार्थीदशेत असताना सुट्टीस घरी आले की, ते येथे बराच काळ घालवीत असत. ‘टिप फुले टिप माझे गडे ग‌ | फुलाची पखरण झिप” ही त्यांची कविता त्यांनी वळणे येथेच धाकट्या बहिणीकडून पाठ करवून घेतली होती. विद्यार्थीदशेनंतर मात्र अशा रमणीय ठिकाणी राहता येईल, अशी स्थिती त्यांना दुर्दैवाने प्राप्त झाली नाही. केशवसुतांना एकूण अकरा भावंडे होती. त्यामध्ये पाच बहिणी व सहा भाऊ. केशवसुत हे केसोपंतांचे पाचवे पुत्र. त्यांचे सुरुवातीचे चार-पाच इयत्तांचे शिक्षण मराठी शाळेमध्ये वडिलांच्या हाताखालीच झाले. पुढे बडोदा, वर्धा, नागपूर, पुणे येथे. नागपुरात असताना सुप्रसिद्ध कवि ‘नारायण वामन टिळक’ यांच्याशी त्यांची ओळख व मैत्री झाली. नारायण टिळकांच्या सहवासात येऊन त्यांच्या कवित्वशक्तीला चालना मिळाली. १८९०–१८९१ साली ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले. पुढे मॅट्रिकनंतर १८९६-१८९७ पर्यंत मुंबईत त्यांनी अनेक हंगामी नोकऱ्या केल्या. मुंबईत प्लेगची साथ पसरल्यानंतर ते मुंबई सोडून खानदेशला गेले. तिथे एखाद्या लहानश्या गावी म्युन्सिपालटीच्या शाळेत नोकरी मिळावी म्हणून त्यांनी खटपट केली व फैजपूर येथे प्रथम नोकरी धरली. त्यानंतर भडगाव येथील अँग्लो व्हर्नाक्युलर शाळेत ते असिस्टंट मास्तर म्हणून होते. १९०१-१९०२ पर्यंत ते खानदेशात राहिले. नंतर धारवाड येथे हायस्कूलात त्यांची नेमणूक झाली. १९०३ पासून पुढे ते त्याच ठिकाणी हायस्कूल मास्तर म्हणून होते. कविता करण्याचा त्यांचा हा छंद फारच अल्प वयापासून होता. वयाच्या १४-१५ वर्षापासून त्यांना चांगले श्लोक, आर्या रचता येत असत. काव्याबरोबर त्यांना चित्रे रेखाटण्याचाही छंद होता. पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचव्या-सहाव्या इयत्तेत असताना वर्गातील अभ्यासाकडे लक्ष न देता ते टिळक, आगरकर, इ. ची चित्रे वहीत रेखाटित असत. पुढे त्यांनी चित्रकलेचा नाद सोडला. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी एक नाटक व ग्रंथ लिहून दक्षिणाप्राइज कमिटीकडे पाठविला होता; परंतु त्याची विशेष दखल घेतली गेली नाही. पुढे त्यांनी काव्य हेच जीवनाचे ध्येय मानले आणि अनेक कविता रचल्या. आजही त्यांच्या जवळपास १३५ कविता उपलब्ध आहेत. १८८५ ते १९०५ हा केशवसुतांचा मुख्य काव्यरचना काल. हा काल त्यांनी पुणे, मुंबई, खानदेश येथे व्यतीत केला. मुंबईत असताना एक वेळ अशी आली होती की, मिशनरी शाळेत नोकरी करीत असल्यामुळे आणि मिशनरींच्या जास्त सहवासामुळे केशवसुत हिंदुधर्म सोडून ख्रिस्ती बनणार होते. त्यांचे मित्र ‘नारायण वामन टिळक’ याच सुमारास हिंदुधर्म सोडून ख्रिस्ती झाले होते. परंतु केशवसुतांच्या काही स्नेही मित्रांनी त्यांना या विचारापासून परावृत्त केले. ( त्यांच्या कवितेवर इंग्रजी प्रभाव पडण्यामागचे एक कारण कदाचित हे देखील असावे.) केशवसुतांच्या कवितेचे गुणदोषविवेचन विस्तृत रीतीने अनेक लेखकांनी केले; परंतु त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या कवितेविषयी कोणाही मोठ्या माणसाने चार स्तुतिपर उद्गार काढले नाहीत वा कोणी फारशी वाहवा केली नाही. अवघ्या ३९ वर्षाचे आयुष्य त्यांनी परिस्थितीशी अत्यंत झगडत काढले. अनेक प्रकारच्या काळज्यांमुळे त्यांचा स्वभाव फार एककल्ली, एकलकोंडा, मुग्ध व चिंताग्रस्त बनलेला. त्यांच्या कवितेमधून ‘निराशे’ संबंधी जे अनेक उद्गार निघालेले आहेत ते त्यांच्या स्वानुभवाचे द्योतक आहे. कदाचित त्यांच्या याच स्वभाववैशिष्ट्यामुळे त्यांनी उभ्या हयातीत त्यांचा एकही फोटो काढविला नाही. (अरविंद मासिकाच्या ५ व्या अंकामध्ये केशवसुतांचे म्हणून जे चित्र रेखाटले गेले, ते त्यांच्या चेहऱ्याशी थोडेसे साम्यदर्शक होते.) केशवसुतांचे निधन ७ नोव्हेंबर १९०५ रोजी झाले. मृत्युपश्चात त्यांच्या कवितेबद्दल गुणग्राहक व प्रशंसापर अनेक लेख लिहिले गेले. अनेक कविताकारांनी त्यांना गुरुस्थानी ठेवले. त्यांना आधुनिक काव्याचे जनक मानले गेले. त्यांच्या काव्यापासून प्रेरणा घेऊन पुढील काळात ‘आधुनिक मराठी काव्यात’ कितीतरी परिवर्तने व प्रयोग झाले. महाराष्ट्राच्या काव्य परंपरेत ‘केशवसुत’ हे नाव आता अजरामर आहे. महाराष्ट्र शासनातर्फे १९६६ मध्ये केशवसुतांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली व या समितीकडून केशवसुतांच्या काव्यसंग्रहाच्या हस्तलिखिताची यथामूल आवृत्ती १९६७ मध्ये प्रकाशित केली गेली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रयत्नातून केशवसुतांच्या जन्मगावी मालगुंड येथे स्मारक उभारण्यात आले व या स्मारकाचे उद्घाटन ८ मे १९९४ रोजी झाले. दापोलीतील वळणे गावीही त्यांचे स्मारक व्हावे म्हणून बरेच प्रयत्न झाले; परंतु तेथील त्यांच्या घरची वास्तू सध्या भग्नावस्थेत आहे.

Read more at: https://talukadapoli.com/personalities/keshavsut/

***********

नवी भर दि.०७-१०-२०१९ : 

केशवसुत

लेखक : माधव विद्वांस

काळोखाची रजनी होती,…………. हृदयी भरल्या होत्या खंती
अंधारातचि गढले सारे……………. लक्ष्य, न लक्षी वरचे तारे,
विमनस्कपणे स्वपदे उचलित,…… रस्त्यांतुनि मी होतो हिंडत
एका खिडकीतुनि सुर तदा………… पडले – दिड दा, दिड दा, दिड दा!
अश्या सुंदर कविता रचणारे केशवसुत यांची आज जयंती.(७ ऑक्टोबर १८६६ -७ नोव्हेंबर १९०५)
पूर्ण नाव कृष्णाची केशव दामले. काव्यरत्नावली ह्या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून ‘केशवसूत’ या टोपण-नावाचा स्वीकार केला. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड ह्या गावी. शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठिकाणी. शिक्षणकालातच १८८० मध्ये त्यांचा विवाह झाला. मॅट्रिकनंतर (१८८९) मुंबईला १८९७ पर्यंत निरनिराळ्या हंगामी नोकऱ्या केल्या. पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले. आरंभी भडगावच्या नगरपालिकेच्या शाळेत दुय्यम शिक्षकाची नोकरी केली. १९०१ पासून फैजपूरला मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९०४ मध्ये धारवाडच्या सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून बदली झाली. १९०५ साली हुबळीला गेले असताना प्लेगने त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागून आठच दिवसांनी त्यांची पत्नीही मरण पावली.
नवीन काव्याबरोबरच काव्यविषयक नवा दृष्टिकोन व नवी अभिरुची निर्माण करण्याची जबाबदारी नव्या कवींवर पडते. केशवसुतांनी अशा जबाबदारीने लिहिलेल्या कवितांपैकी, ‘स्फूर्ति’ (१८९६), ‘कवितेचे प्रयोजन’ (१८९९), ‘आम्ही कोण?’ (१९०१) आणि ‘प्रतिभा’ (१९०४) या महत्त्वाच्या आहेत. व्यापक मानवी जीवनाच्या संदर्भात कवी व कवित्व यांच्या कार्याची आदर्शवादी भूमिका केशवसुतांनी मांडलेली असल्यामुळे त्या भूमिकेत चिरंतन प्रेरकता जाणवते. त्यांच्या निसर्गविषयक कवितांवर वर्ड्‌स्वर्थ व एमर्सन यांच्या विचारांचा परिणाम झालेला दिसतो. सृष्टीतील सौदर्य काव्याला प्रेरक ठरते व तीत मानवी जीवनातील विषमतेचा अभाव असल्याने निसर्गसहवास सुखद ठरतो, अशा दृष्टीने केशवसुत निसर्गाकडे बघतात. ‘भृंग’ (१८९०), ‘पुष्पाप्रत’ (१८९२) व ‘फुलपांखरूं’ (१९००) या त्यांच्या काही महत्त्वाच्या निसर्गकविता होत. प्रेमविषयक आत्मनिवेदन करणाऱ्या कविताही केशवसुतांनी लिहिल्या. क्रांतिकारक सामाजिक विचार ओजस्वीपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या प्रसिद्ध कविता म्हणजे, ‘तुतारी’ (१८९३), ‘नवा शिपाई’ (१८९८) व ‘गोफण केली छान’ (१९०५) या होत. त्यांच्या सामाजिक विचारसरणीची मुख्य तत्त्वे स्वातंत्र्य, समता, बंधुता व विशाल मानवतावाद ही आहेत. विशेष म्हणजे पृथ्वीला ‘सुरलोकसाम्य’ प्राप्त करून देण्याचे एक महान स्वप्न त्यांच्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहिले होते. त्याचाही निर्देश त्यांच्या काही कवितांतून आढळतो. गूढ अनुभूती व तिची नावीन्यपूर्ण अभिव्यक्ती असलेली ‘झपूर्झा’ (१८९३) ही त्यांची कविता विशेष गाजली. त्यांच्या अन्य गूढगुंजनात्मक कवितांत ‘म्हातारी’ (१९०१) व ‘हरपले श्रेय’ (१९०५) यांचा समावेश होतो.(अधिक माहितीसाठी मराठी विश्वकोश )”
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
प्राशन करिता रंग जगाचे कणोकणी ते बदलू द्या !
अमुच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेल जग आम्हांस मद्यपि पर्वा कसली मग याची !

————————————————-

कवी केशवसुत ह्यांची प्रसिध्द ’तुतारी’ ही कविता –

तुतारी

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?

रुढी,जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने या सावध व्हा तर!

चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर,सोज्वळ गोड मोठे
अलिकडले सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे

धिक्कार अशा मूर्खांलागुनी
जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध! ऎका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा,चला तर!

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!

घातक भलत्या प्रतिबंधावर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्नतिचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!

पूर्वीपासुनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फ़ार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!

………………………..

सतारीचे बोल

 – केशवसुतांची कविता

काळोखाची रजनी होती
हदयी भरल्या होत्या खंती
अंधारातचि गढले सारे
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यातुन मी होतो हिंडत,
एका खिडकीतुनि सूर तदा
पडले…. दिड दा, दिड दा, दिड दा …..१

जड हृदयी जग जड हे याचा,
प्रत्यय होता प्रगटत साचा
जड ते खोटे हे मात्र कसें
ते न कळे, मज जडलेच पिसे
काय करावे, कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावे
मग मज कैसे रुचतील वदा
ध्वनि ते …. दिड दा, दिड दा, दिड दा …..२

सोसाट्याचे वादळ येते
तरि ते तेव्हा मज मानवते
भुते भोवती जरी आरडती
तरि ती खचितचि मज आवडती
कारण आतिल विषण्ण वृत्ती
बाह्य भैरवी धरिते प्रीती,
सहज कसे तिज करणार फिदा
रव ते …. दिड दा, दिड दा, दिड दा …..३

ऐकुनी तो मज जो त्वेष चढे
त्यासरशी त्या गवाक्षाकडे
मूठ वळुनि मी हात हिसकिला
पुटपुटलोही अपशब्दांला
महटले आटप आटप मूर्खा
सतार फोडुनि टाकिसी न का
पिरपिर कसली खुशालचंदा
करिसी …. दिड दा, दिड दा, दिड दा …..४

सरलो पुढता चार पावले
तो मज न कळे काय जाहले
रुष्ट जरी मी सतारीवरी
गति मम वळली तरि माघारी
ध्वनिजाली त्या जणू गुंतलो
असा स्ववशता विसरुन बसलो..
एका ओट्यावरी स्थिर तदा
ऐकत …. दिड दा, दिड दा, दिड दा …..५

तेथ कोपरे अंकी टेकुनि
करांजलीला मस्तक देउनि
बसलो, इतक्यामाजी करुणा…
रसपूर्ण गती माझ्या श्रवणा
आकर्षुनि घे, हदय निघाले
तन्मय झाले द्रवले, आले
लोचनातुनी तोय कितिकदा
ऐकत असता …. दिड दा, दिड दा …..६

स्कंधी माझ्या हात ठेवुनी
आश्वासी मज गमले कोणी,
म्हणे.. खेद का इतुका करिसी
जिवास का बा असा त्राससी
धीर धरी रे धीरा पोटी
असती मोठी फळे गोमटी
ऐक मनीच्या हरितील गदा
ध्वनि हे ….दिड दा, दिड दा, दिड दा …..७

आशाप्रेरक निघू लागले
सूर तधी मी डोळे पुशिले
वरती मग मी नजर फिरवली
नक्षत्रे तो अगणित दिसली
अस्तित्वाची त्यांच्या नव्हती
हा वेळवरी दादच मज ती
तम अल्प..द्युति बहु या शब्दा
वदती रव ते दिड दा, दिड दा …..८

वाद्यातुनि त्या निघती नंतर
उदात्ततेचे पोषक सुस्वर
तो मज गमले विभूति माझी
स्फुरत पसरली विश्वामाजी,
दिक्कालांसह अतित झालो,
उगमी विलयी अनंत उरलो
विसरुनि गेलो अखिला भेदां
ऐकता असता …. दिड दा, दिड दा …..९

प्रेमरसाचे गोड बोल ते
वाद्य लागता बोलायाते
भुललो देखुनि सकलहि सुंदर
सुरांगना तो नाचति भूवर
स्वर्ग धरेला चुंबायाला
खाली लवला… मजला गमला
अशा वितरिती अत्यानंदा
ध्वनि ते …. दिड दा, दिड दा, दिड दा …..१०

शांत वाजली गती शेवटी,
शांत धरित्री शांत निशा ती
शांतच वारे, शांतच तारे
शांतच हृदयी झाले सारे
असा सुखे मी सदना आलो
शांतीत अहा झोपी गेलो
बोल बोललो परी कितिकदा
स्वप्नी …. दिड दा, दिड दा, दिड दा …..११

नवी भर दि.०५-०१-२०२१: या कवितवर मीच पूर्वी लिहिलेला लेख

सतारीचे बोल . केशवसुत

मी आंतरजालावर स्वैर फिरत असतांना मला मिळालेले शिंपले आणि गारगोट्या मी या अनुदिनीवर साठवत आलो आहे. आज मी स्वतःच लिहिलेला एक बरा लेख मला सापडला. तो कवी आणि कविता या विषयावर असल्यामुळे मी इथे संकलित करायचे ठरवले.

शालेय जीवनात मराठी भाषा हा माझा आवडता विषय होता. वार्षिक परीक्षा संपून उन्हाळ्याची सुटी लागताच पुढल्या इयत्तेच्या पुस्तकांची जमवाजमव सुरू होत असे. त्यातले मराठी भाषेचे पाठ्यपुस्तक मी सर्वात आधी वाचायला घेत असे आणि त्यातले सगळे गद्यपद्य धडे वाचून टाकत असे. पुढल्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होईपर्यंत हे पुस्तक माझ्या ओळखीचे झालेले असे. आमच्या वर्गातल्या काही मुलांना कदाचित कवितांचा आशय समजत नसल्यामुळे त्या शिकायला कठीण वाटत असत किंवा आवडत नसत. मला मात्र काही कवितांमध्ये शब्दांच्याही पलीकडले, ओळींमधले (बिट्वीन द लाइन्स) बरेच काही असते असे जाणवायचे आणि ते समजून घ्यावे असे ही वाटायचे. लहानपणी नीट न समजलेली अशीच एक शंभर वर्षांपूर्वीची कविता पाच दशकानंतर अलीकडे पुन्हा माझ्या वाचनात आली. १८६६ ते १९०५ या कालखंडात होऊन गेलेल्या कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुत यांची सतारीचे बोल ही कविता आमच्या एका पाठ्यपुस्तकात होती. त्यात बहुधा मूळ कवितेतली ३-४ कडवीच घेतलेली असावीत, कारण इतकी लांबलचक कविता कधीही शिकल्याचे मला आठवत नाही. त्या काळात ती मलाही फारशी समजली नव्हती. सर्वसाधारण मुलांनी या कवितेचा घेतलेला शब्दशः अर्थ आधी पाहू.

काळोखाची रजनी होती ….. यात काय विशेष आहे? नेहमीच रात्री काळोख असतो. त्या काळात आमच्या गावात विजेचा झगझगाटही नसायचा. रात्र पडली की सगळीकडे अंधारगुडुप आणि चिडीचूप होऊन जात असे. “आपली रजनी तर प्रकाशला आवडते ना?” मागच्या बाकावरून एक कॉमेंट. बिचारी रजनी लाजून चूर.
हदयी भरल्या होत्या खंती ….. त्या कवीच्या मनात खंत वाटण्यासारख्या काही गोष्टी असतील. सगळ्यांनाच कसली ना कसली दुःखे असतात. याला बहुधा जास्त असतील.
अंधारातचि गढले सारे ……. मनातली खंत उजेडात तरी कशी दिसणार? अंधारात काही दिसत नाही हे सांगायला कशाला पाहिजे? अंधारात काय घडलं सर? एक वात्रट प्रश्न
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे ……. नाही तरी रोज रोज त्याच त्याच चांदण्या कोण पहातो?
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यातुन मी होतो हिंडत, ….. कशाला? ठेचकाळून पडशील ना.
एका खिडकीतुनि सूर तदा
पडले…. दिड दा, दिड दा, दिड दा …..१
आमच्या गावात कोणीच सतार हे वाद्य वाजवत नसल्याने कोणी ते पाहिलेही नव्हते, पण ते एक तंतुवाद्य आहे असे ऐकले होते. त्यामुळे त्यातून ट्याँव ट्याँव, ट्वंग ट्वंग असे आवाज निघत असावेत असे वाटत होते. दिड दा, दिड दा, दिड दा काही समजत नव्हते.
आपल्या कवितेची अशी चिरफाड झालेली पाहून “अरसिकेषु कवित्वनिवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख।” असे कोणाही कवीला त्रिवार म्हणावेसे वाटल्यास काही नवल नाही.

आता या कवितेकडे जरा गंभीरपणे पाहू.
काळोखाची रजनी होती
हदयी भरल्या होत्या खंती
अंधारातचि गढले सारे
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यातुन मी होतो हिंडत,
एका खिडकीतुनि सूर तदा
पडले…. दिड दा, दिड दा, दिड दा …..१
कवितेची ही फक्त सुरुवात आहे. यात कवीने वातावरणनिर्मिती केली आहे. कोणताही विचार मांडलेला नाही. काही कारणाने त्याच्या हृदयात काठोकाठ खंत भरली आहे, सगळीकडे अंधःकार दाटलेला दिसत आहे. बाहेरच्या जगात जमीनीवर अंधार असला तरी आभाळात तारे चमकत आहेत, याच्या मनात तेवढा अंधुक प्रकाशही नाही. तिथे फक्त विषण्णता आहे. अस्वस्थपणा त्याला एका जागी बसू देत नसल्यामुळे तो उगाचच येरझारा घालतो आहे. अचानक या उदास वातावरणाच्या विपरीत असे काही घडते, एका खिडकीमधून येणारे सतारीचे सुरेल बोल त्याच्या कानावर पडतात. दिड दा. दिड दा, दिड दा यात एक सुंदर अशी लय आहे, एक ठेका आहे.

आपले हृदय जर सुन्न झाले असेल तर सगळे जगच स्तब्ध झाल्यासारखे वाटते. पण हे जड जग तर खोटे आहे, “ब्रह्म सत्यम् जगन्मिथ्या” हे तत्वज्ञान कवीने दुस-या कडव्यात सांगितले आहे. (शाळकरी वयात ते काय समजणार होते?) अत्यंत निराशेमुळे आता आपला जीव द्यावा असे कवीला वाटत होते आणि साहजीकच अशा मनस्थितीत असतांना त्याला सुरेल सतारवादन ऐकावे असे वाटणार नाही.
जड हृदयी जग जड हे याचा,
प्रत्यय होता प्रगटत साचा
जड ते खोटे हे मात्र कसें
ते न कळे, मज जडलेच पिसे
काय करावे, कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावे
मग मज कैसे रुचतील वदा
ध्वनि ते …. दिड दा, दिड दा, दिड दा …..२

तिस-या कडव्यात याचाच अधिक विस्तार केला आहे. मनात भावनांचे इतके मोठे थैमान चाललेले असतांना बाहेर सोसाट्याचे वादळ झाले तरी या अवस्थेत कवीला ते सुसह्य वाटले असते. मनात उठणा-या भयानक चीत्कारांपुढे भुतांचा आरडाओरडासुद्धा त्याला सौम्य वाटला असता. अशा विषण्ण अवस्थेत भैरवी रागातले सतारीचे मंजुळ आणि प्रेमळ स्वर ऐकावेसे त्याला वाटले नाहीच, उलट त्यांचा तिटकारा आला.
सोसाट्याचे वादळ येते
तरि ते तेव्हा मज मानवते
भुते भोवती जरी आरडती
तरि ती खचितचि मज आवडती
कारण आतिल विषण्ण वृत्ती
बाह्य भैरवी धरिते प्रीती,
सहज कसे तिज करणार फिदा
रव ते …. दिड दा, दिड दा, दिड दा …..३

रागाने जळफळत तो त्या खिडकीकडे गेला, त्याने तिच्या दिशेने हवेतच एक ठोसा लगावला, आतल्या माणसाला दोन चार शिव्या हासडल्या. “अवेळी पिर पिर करणारी तुझी सतार फोडून टाक.” असेही तो पुटपुटला. आपण दुःखात बुडालेलो असतांना दुस-या कुणी मजेत रहावे हे कवीला सहन होत नव्हते. असे त्याने चौथ्या कडव्यात लिहिले आहे.
ऐकुनी तो मज जो त्वेष चढे
त्यासरशी त्या गवाक्षाकडे
मूठ वळुनि मी हात हिसकिला
पुटपुटलोही अपशब्दांला
म्हटले आटप आटप मूर्खा
सतार फोडुनि टाकिसी न का
पिरपिर कसली खुशालचंदा
करिसी …. दिड दा, दिड दा, दिड दा …..४

कवी त्या खिडकीकडे रागारागात जात असतांना एक चमत्कार झाला. कां कोणास ठाऊक? पण तो थबकला. त्या मधुर ध्वनीने काय जादू केली कोण जाणे? आपल्या मनातली अस्वस्थता विसरून ते सूर ऐकत बसावे असे त्याला वाटायला लागले. येरझारा थांबवून तो एका ओट्यावर बसून सतारीचे बोल ऐकत राहिला.
सरलो पुढता चार पावले
तो मज न कळे काय जाहले
रुष्ट जरी मी सतारीवरी
गति मम वळली तरि माघारी
ध्वनिजाली त्या जणू गुंतलो
असा स्ववशता विसरुन बसलो..
एका ओट्यावरी स्थिर तदा
ऐकत …. दिड दा, दिड दा, दिड दा …..५

मांडीवर कोपरे ठेवून त्याने आपले डोके दोन्ही तळहातात धरले. कानावर पडत असलेले सतारीचे करुण सूर त्याच्या हृदयाला जाऊन भिडले. ते ऐकतांना त्याच्या डोळ्यामधून घळघळा पाणी वाहू लागले.
तेथ कोपरे अंकी टेकुनि
करांजलीला मस्तक देउनि
बसलो, इतक्यामाजी करुणा…
रसपूर्ण गती माझ्या श्रवणा
आकर्षुनि घे, हदय निघाले
तन्मय झाले द्रवले, आले
लोचनातुनी तोय कितिकदा
ऐकत असता …. दिड दा, दिड दा …..६

कोणी तरी आपल्या खांद्यावर हात ठेऊन आपल्याला धीर देत आहे असा भास कवीला झाला. “असा त्रागा करून काय उपयोग आहे? थोडे धीराने घे. हे दिवस जातील, चांगले दिवस येतील.” असेच ते सतारीचे बोल आपल्याला सांगत आहेत असे त्याला वाटले.
स्कंधी माझ्या हात ठेवुनी
आश्वासी मज गमले कोणी,
म्हणे.. खेद का इतुका करिसी
जिवास का बा असा त्राससी
धीर धरी रे धीरा पोटी
असती मोठी फळे गोमटी
ऐक मनीच्या हरितील गदा
ध्वनि हे ….दिड दा, दिड दा, दिड दा …..७

मनात आशेचे किरण दिसू लागताच त्याची नजर वर आकाशाकडे गेली. आता त्याला “एक अंधेरा, लाख सितारे” याचा अनुभव आला. सतारीच्या बोलांमधून हे सत्य बाहेर पडत आहे असे त्याला वाटले.
आशाप्रेरक निघू लागले
सूर तधी मी डोळे पुशिले
वरती मग मी नजर फिरवली
नक्षत्रे तो अगणित दिसली
अस्तित्वाची त्यांच्या नव्हती
हा वेळवरी दादच मज ती
तम अल्प..द्युति बहु या शब्दा
वदती रव ते दिड दा, दिड दा …..८

सतार वादक तन्मयतेने सतार वाजवतच होता. ते सूर ऐकणा-या कवीच्या मनात त्याचे निरनिराळे प्रतिसाद उमटत होते. आधी भीषण वाटून नको झालेले सूर हवे हवेसे आणि आश्वासक वाटायला लागलेले होतेच, आता त्याला उदात्ततेची झालर लाभली. या विश्वात आपण एकटे नाही, अनादि काळापासून अनंत काळापर्यंत यात सगळीकडे भरून राहिलेल्या ब्रह्मतत्वाचाच आपण एक भाग आहोत हे त्याला उमगले. त्याच्या मनातला आपपरभाव गळून पडला.
वाद्यातुनि त्या निघती नंतर
उदात्ततेचे पोषक सुस्वर
तो मज गमले विभूति माझी
स्फुरत पसरली विश्वामाजी,
दिक्कालांसह अतित झालो,
उगमी विलयी अनंत उरलो
विसरुनि गेलो अखिला भेदां
ऐकता असता …. दिड दा, दिड दा …..९

“चिदानंदरूपः शिवोहम् शिवोहम्” याची जाणीव झाल्यानंतर कवीला आता सगळीकडे प्रेम आणि आनंद दिसू लागला. मनातला अंधार दूर होताच बाह्य जगातले सौंदर्य त्याला दिसायला लागले. ही सगळी किमया सतारीच्या त्या दिव्य स्वरांनी केली.
प्रेमरसाचे गोड बोल ते
वाद्य लागता बोलायाते
भुललो देखुनि सकलहि सुंदर
सुरांगना तो नाचति भूवर
स्वर्ग धरेला चुंबायाला
खाली लवला… मजला गमला
अशा वितरिती अत्यानंदा
ध्वनि ते …. दिड दा, दिड दा, दिड दा …..१०

वाजत असलेली ती सतारही अखेर शांत झाली. पण आता कवीच्य़ा मनातली वादळे शमली होती, ते शांत झाले होते. त्याचे हृदय शांत होताच धरती, तारे, वारे सगळे काही शांत झाले होते. तो शांतपणे घरी जाऊन झोपी गेला पण त्याच्या अंतर्मनात सतारीचे बोल घुमत राहिले.
शांत वाजली गती शेवटी,
शांत धरित्री शांत निशा ती
शांतच वारे, शांतच तारे
शांतच हृदयी झाले सारे
असा सुखे मी सदना आलो
शांतीत अहा झोपी गेलो
बोल बोललो परी कितिकदा
स्वप्नी …. दिड दा, दिड दा, दिड दा …..११

संपूर्ण नकारात्मकतेपासून सुरू झालेला मनाचा हा अलगद झालेला प्रवास केशवसुतांनी किती नाजुकपणे रंगवला आहे? सतारीचे बोल हे सकारात्मक ऊर्जेचे एक प्रतीक आहे. डोळ्यापुढे अंधार झाला तरी कानाचे दरवाजे उघडे असतात, त्यातून सकारात्मक जाणीवा होऊ शकतात. वैफल्य येऊ देऊ नये, काही तरी चांगले सापडेल याचा विचार करावा, त्याकडे संपूर्ण लक्ष द्यावे, मनातली जळमटे आपोआप दूर होतील असा संदेश कवी केशवसुतांच्या या कवितेमधून मिळतो.


नवी भर दि. १५-०२-२०२०

अढळ सौंदर्य

रोज तोच सूर्य उगवत असला आणि तीच झाडे, फुले, पाने, पक्षी दिसत असले तरी त्याचे सौंदर्य मोहकच असते. हीच तर सृष्टीच्या अढळ सौंदर्याची गंमत आहे. कवि केशवसुतांची एक अप्रसिद्ध कविता त्यांच्या हस्ताक्षरात .

Keshavsut

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

2 thoughts on “कवी केशवसुत”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s