नाटककार विष्णुदास भावे, देवल, किर्लोस्कर इत्यादि

जुने नाट्याचार्य

संपादन: दि.६-११-२०१९: नवी भर: मराठी रंगभूमी दिन, दि.१३-११-२०१९ नवी भर : गोविंद बल्लाळ देवल, दि.०२-०४-२०२० आणि  ३१-१०-२०२० अण्णासाहेब किर्लोस्कर, दि. ६-११-२०२० : मराठी रंगभूमी दिन,  दि.०३-०६-२०२१ :वीर वामनराव जोशी , श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ,  दि. ३०-०६-२०२१ : बाळ कोल्हटकर

——————————————-

१. कै.विष्णुदास भावे यांचा अल्प परिचय

माझे मित्र श्री अविनाश नेने यांच्या सौजन्याने.

*५ नोव्हेंबर..मराठी रंगभूमी दिन.*
*मराठी रंगभूमी खर्‍या अर्थाने इ.स.१८४३ मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे कै. विष्णुदास भावे ह्यांनी दि ५ नोव्हे.१८४३ साली सांगली येथे ” सीता स्वयंवर ” ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचिला.. मराठीतील हे पहिले गद्यपद्यमिश्रित नाटक जन्मास आले.*

नृत्य, गायन, अभिनय, देव, गंधर्व, अप्सरा, ऋषी, विदूषक इ.नी युक्त अशी ही पौराणिक नाटके सर्वसामान्यांची करमणूक करू लागली. मराठी संगीत नाटकांनी तर मराठी माणसाच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण केले..
साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीस सुरु झालेली मराठी नाट्यपरंपरा तेव्हापेक्षा कितीतरी पटीने अधिक जोशात जोपासली जात आहे. दररोज नवनवीन नाटके रंगभूमीवर येत आहेत, यापुढेही येत राहतील. आजपर्यंत अनेक नाटके मराठी रंगभूमीवर आली. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, निव्वळ करमणूकप्रधान, रहस्यमय असे वेगवेगळे विषय आणि प्रकार मराठी रंगभूमीने हाताळले.
१७४ वर्षाची ही रंगभूमीची परंपरा..आजही २१ व्या शतकातल्या गतिमान युगात, जोपासली जात आहे. ह्या १७४ वर्षातील सर्व ज्ञात, अज्ञात कलावंत, तंत्रज्ञ आणि सहायक ज्यांनी ही परंपरा अखंड चालू ठेवली आणि मराठी रसिकांच्या मनात रुजवली त्या सर्वांचं अभिनंदन !
—————–

*सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉल’मध्ये सीता स्वयंवर या मराठी नाटकाचा नोव्हेंबर ५, १८४३ रोजी पहिला खेळ झाला. मराठी रंगभूमीचा हा जन्मदिवस मानला जातो. त्या निमित्ताने विष्णुदास भावे यांचा हा परिचय .*

*विष्णुदास अमृतराव भावे (१८१९ – ९ ऑगस्ट ९, १९०१) हे मराठी नाटककार होते. ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात.*

विष्णुदास भाव्यांचा जन्म सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असणार्‍या अमृतराव भावे व त्यांच्या पत्‍नी यांच्या पोटी झाला. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाल करवून घेता येऊ शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या विष्णुदास भावे यांनी बनवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहुल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. परंतु तत्पूर्वी, कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी ‘खेळ’ करीत, त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली. १८४३ साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉल’मध्ये नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला. पुढे नाट्यलेखन व निर्मिती करून विष्णुदास भावे यांनी अनेक ठिकाणी प्रयोग केले. ९ मार्च १८५३ रोजी मुंबईला ‘ग्रांट रोड थिएटर’ येथे ‘इंद्रजित वध’ पहिला नाट्यप्रयोग केला. यानंतर विष्णुदास भावे यांनी १८६१ पर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्या नाटकांचे प्रयोग केले. मात्र १८६२ मध्ये त्‍यांनी आपला नाट्यव्यवसाय काही कारणाने बंद केला.

विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.

कारकीर्द – नाटके
नाटक वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
इंद्रजित वध १८५३ मराठी लेखन, दिग्दर्शन
राजा गोपीचंद १८५४ हिंदी लेखन, दिग्दर्शन
सीता स्वयंवर १८४३ मराठी लेखन, गीतलेखन, दिग्दर्शन
राजा गोपीचंद १८५४ हिंदी लेखन, दिग्दर्शन

………… विकीपीडियावरून


नवी भर दि. ०६-११-२०१९ : श्री.सुधीर काळे यांच्या फेसबुक पानावरून साभार.

२. मराठी रंगभूमी दिन : ५ नोव्हेंबर १८४३

विष्णूदास भावे
मराठी रंगभूमीचे जनक कै. श्री. विष्णूदास भावे यांनी ’सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. (५ नोव्हेंबर १८४३) सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉल’ मधे हा प्रयोग झाला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस ’मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

विष्णुदास भावे ह्यांचे संपूर्ण नाव विष्‍णु अमृत भावे. सांगली संस्थानाचे अधिपती श्रीमंत चितांमणराव ऊर्फ आप्पासाहेब पटवर्धन ह्यांच्या खाजगीकडे ते नोकर होते. कथा-कविता लिहिण्याचा नाद विष्णूदासांना होता. १८४२ मध्ये कर्नाटकातून ‘भागवत’ नावाची एक नाटकमंडळी सांगलीत आली होती. तिचे खेळ पाहिल्यानंतर तशा प्रकारचे नाट्यप्रयोग काही सुधारणा करून मराठीत केले, तर त्यांचे चांगले स्वागत होईल, अशी कल्पना आप्पासाहेबांच्या मनात आली व हे काम त्यांनी विष्णुदासांवर सोपविले. त्यानुसार विष्णुदासांनी १८४३ मध्ये सीतास्वयंवर ह्या स्वतःच रचिलेल्या नाटकाचा यशस्वी प्रयोग करून दाखविला. त्यानंतर रामायणातील विषयांवर दहा नाटके लिहून त्यांचे प्रयोग त्यांनी सांगली संस्थानात केले. तेही लोकप्रिय झाले. सूत्रधाराकडून मंगलाचरण, नंतर वनचरवेषधारी विदूषकाचा प्रवेश, त्याचे आणि सूत्रधाराचे विनोदी संभाषण, विघ्‍नहर्त्या गजाननाचे स्‍तवन, सरस्‍वतीस्‍तवन, गजानन व सरस्वती ह्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नाटकास प्रारंभ, अशी विष्‍णुदासांच्या नाट्यप्रयोगांची पद्धती होती. नाटकाच्या आरंभापासून त्याची अखेर होईपर्यंत सूत्रधारास काम असे. सादर होणाऱ्या नाट्यप्रसंगांचे वर्णन सूत्रधाराने पद्यातून केल्यानंतर संबंधित पात्रे रंगभूमीवर येवून आपापली भाषणे करीत. सर्वच भाषणे आधी लिहीलेली नसत. नट स्वयंस्फूर्तीनेही तेथल्या तेथे प्रसंगोचित भाषणे करीत. नृत्य-गायनाला ह्या नाटकांतून बराच वाव दिला जाई. नाटकातील प्रवेशाला ‘कचेरी’ असे नाव दिलेले होते. भावे ह्यांनी पुढे महाभारतातील कथानकांवरही नाटके लिहिली. विष्णुदास नाटकांत पखवाजाची साथ प्रमुख असे. नाट्यप्रसंगाला अनुकूल असे कोमल, गंभीर वा तीव्र असे बोल पखवाजावर वाजविले जात असत. ह्या पखवाजाच्या आवाजावरून ह्या नाटकांना ‘ तागडथोम नाटके ‘ असे म्हटले जाई. तसेच त्यांतील राक्षसांच्या ‘अलल् डुर्र’ अशा डरकाळीमुळे ‘ अलल् डुर्र ‘ नाटके असे त्यांना संबोधिले जात असे. चिंतामणराव पटवर्धनांचे निधन झाल्यावर (१८५१) विष्णुदासांना सांगली संस्थानाकडून मदत मिळेनाशी झाली. त्यामुळे त्यांना नाट्यप्रयोगासाठी गावोगावी दौरे काढावे लागले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इ. सर्व काही विष्णुदास स्वतःच असत. १८६१ पर्यंत ते नाट्यव्यवसायात होते. व्यवसायनिवृत्तीनंतरचे आयुष्य त्यांनी सांगली येथेच घालविले. तेथेच प्लेगचे त्यांचे निधन झाले.

भावे ह्यांची नाटके बरीचशी पद्यमय होती आणि त्यांचील पद्यरचनेचे, प्राचीन मराठी आख्यानकरचनेशी निकटचे नाते होते. त्यांच्या नाटकांसाठी त्यांनी विविध छंदात केलेल्या पद्यरचनांचा उल्लेख ‘ नाट्याख्याने ‘ असाही करण्यात येतो. विष्णुदासी नाटकांचा मुख्य भाषारूप आधार म्हणजे ही पदेच होत. भावे ह्यांची पन्नासांहून अधिक नाट्याख्याने नाट्यकवितासंग्रह (१८८५) ह्या नावाने प्रसिद्ध झालेली आहेत. विष्णुदासांच्या ह्या नाट्याख्यानांना स्वरसाज चढविताना विविध रागरागिण्यांचा आणि त्यांच्या मिश्रणांचा विष्णुदासांनी प्रभावीपणे उपयोग करून घेतला होता. विष्णुदासांच्या नंतरच्या ५०-६० वर्षांत मराठी पौराणिक नाटके लिहिणाऱ्यांना विष्णुदासांनी निर्माण केलेला पौराणिक नाटकाचा साचा उपयोगी पडला. इतकेच नव्हे, तर विष्णुदासकृत पदांचा उपयोगही काही नाटककारांनी आपल्या नाटकांतून केल्याचे दिसते. नाट्यप्रयोगाची एक निश्चित संकल्पना समोर ठेवून नाटक सादर करणारी पहिली नाटकमंडळी महाराष्ट्रात विष्णुदासांनी उभी केली.

संदर्भ :
१. मराठी वाङ्‍मयाचा इतिहास, खंड ४ था : संपादक – श्री. रा. श्री. जोग
२. मराठी नाटककार आणि नाट्यवाङ्‍मय : ले. श्री. ना. बनहट्टी
३. आद्य महाराष्ट्र नाटककार विष्णुदास – विष्णु अमृत भावे – (चरित्र) : श्री. वा. ग. भावे.

स्रोत : मराठी विश्वकोश

*****

नवी भर दि.०६-११-२०२० :-

🎭सर्वांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🎭

आज ५ नोव्हेंबर..मराठी रंगभूमी दिन.
मराठी रंगभूमी खऱ्या अर्थाने इ.स.१८४३ मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे कै. विष्णुदास भावे ह्यांनी दि ५ नोव्हे.१८४३ साली सांगली येथे ” सीता स्वयंवर ” ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचिला…
मराठीतील हे पहिले गद्य पद्यमिश्रित नाटक जन्मास आले. नृत्य, गायन, अभिनय, देव, गंधर्व, अप्सरा, ऋषी, विदूषक इ.नी युक्त अशी ही पौराणिक नाटके सर्वसामान्यांची करमणूक करू लागली. मराठी संगीत नाटकांनी तर मराठी माणसाच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण केले…
साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीस सुरु झालेली मराठी नाट्यपरंपरा तेव्हापेक्षा कितीतरी पटीने अधिक जोशात जोपासली जात आहे. दररोज नवनवीन नाटके रंगभूमीवर येत आहेत, यापुढेही येत राहतील. आजपर्यंत अनेक नाटके मराठी रंगभूमीवर आली. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, निव्वळ करमणूकप्रधान, रहस्यमय असे वेगवेगळे विषय आणि प्रकार मराठी रंगभूमीने हाताळले…
१७० वर्षाची ही रंगभूमीची परंपरा…
आजही २१ व्या शतकातल्या गतिमान युगात जोपासली जात आहे. ह्या १७० वर्षातील सर्व ज्ञात, अज्ञात कलावंत, तंत्रज्ञ आणि सहायक ज्यांनी ही परंपरा अखंड चालू ठेवली आणि मराठी रसिकांच्या मनात रुजवली त्या सर्वाना आमचा सलाम…

🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

मराठी रंगभूमी आज १७७वर्षांची झाली
१८४२ मध्ये कर्नाटकातून ‘भागवत’ नावाची एक नाटकमंडळी सांगलीत आली होती. तिचे खेळ पाहिल्यानंतर तशा प्रकारचे नाट्यप्रयोग काही सुधारणा करून मराठीत केले, तर त्यांचे चांगले स्वागत होईल, अशी कल्पना सांगली संस्थानाचे अधिपती श्रीमंत चितांमणराव ऊर्फआप्पासाहेबांच्या मनात आली व हे काम त्यांनी विष्णुदास भावे यांचेवर सोपविले.
त्यांची आज्ञा प्रमाण मानून५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये मराठीतील पहिले नाटक `सीता स्वयंवर’नाटकाचा जन्म झाला. त्यासाठी त्यांनी कानडी नाट्यपरंपरेत आवश्यक तेथे बदल केले. भाव्यांनी स्वत:च नवीन पदाची रचना केली. `सीता स्वयंवर आणि अहिल्योध्दार ` आख्यान श्रीमंतांपुढे सादर केले. हेच मराठीतील पहिले नाटक मानण्यात येते. इथेच मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानुसार विष्णुदासांनी १८४३ मध्ये सीतास्वयंवर ह्या स्वतःच रचिलेल्या नाटकाचा यशस्वी प्रयोग करून दाखविला. त्यानंतर रामायणातील विषयांवर दहा नाटके लिहून त्यांचे प्रयोग त्यांनी सांगली संस्थानात केले. तेही लोकप्रिय झाले. सूत्रधाराकडून मंगलाचरण, नंतर वनचरवेषधारी विदूषकाचा प्रवेश, त्याचे आणि सूत्रधाराचे विनोदी संभाषण, विघ्‍नहर्त्या गजाननाचे स्‍तवन, सरस्‍वतीस्‍तवन, गजानन व सरस्वती ह्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नाटकास प्रारंभ, अशी विष्‍णुदासांच्या नाट्यप्रयोगांची पद्धती होती. नाटकाच्या आरंभापासून त्याची अखेर होईपर्यंत सूत्रधारास काम असे. सादर होणाऱ्या नाट्यप्रसंगांचे वर्णन सूत्रधाराने पद्यातून केल्यानंतर संबंधित पात्रे रंगभूमीवर येवून आपापली भाषणे करीत. सर्वच भाषणे आधी लिहीलेली नसत. नट स्वयंस्फूर्तीनेही तेथल्या तेथे प्रसंगोचित भाषणे करीत. नृत्य-गायनाला ह्या नाटकांतून बराच वाव दिला जाई. नाटकातील प्रवेशाला ‘कचेरी’ असे नाव दिलेले होते. भावे ह्यांनी पुढेमहाभारतातील कथानकांवरही नाटके लिहिली. विष्णुदास नाटकांत पखवाजाची साथ प्रमुख असे. नाट्यप्रसंगाला अनुकूल असे कोमल, गंभीर वा तीव्र असे बोल पखवाजावर वाजविले जात असत. ह्या पखवाजाच्या आवाजावरून ह्या नाटकांना ‘ तागडथोम नाटके ‘ असे म्हटले जाई. तसेच त्यांतील राक्षसांच्या ‘अलल् डुर्र’ अशा डरकाळीमुळे ‘ अलल् डुर्र ‘ नाटके असे त्यांना संबोधिले जात असे.

(काव्यवेणा ब्लॉगमधील सायली पिलनकर यांचे लेखातून )

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकाच्या भिंतीवरून साभार दि.६-११-२०२०

*****


३.मा.गोविंद बल्लाळ देवल

आज १३ नोव्हेंबर
आज महान मराठी नाटककार मा.गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्मदिन.
जन्म. रोजी १३ नोव्हेंबर १८५५ सांगलीजवळील हरिपूर येथे.
मा.गोविंद बल्लाळ देवल यांना लहानपणापसून नाटकाचा नाद होता गोविंदरावांना कविता करण्याचा नाद असल्यामुळें साहजिकच त्यावेळीं बेळगांवीं शिक्षक असणा-या अण्णासाहेब किर्लोस्करांशीं त्यांचा चांगला परिचय झाला. बेळगाव येथे असतांनाच देवल यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत जाण्यास सुरूवात केली होती. त्यांना त्या नाटक कंपनीत भूमिकाही मिळत गेल्या तसेच किर्लोस्कर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही देवल काम करू लागले. १८८५ साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतरही देवल त्याच संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करीत राहिले. मूळ स्वभाव नाटककाराचा असल्याने देवल यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. १९१३ साली देवल बालगंधर्व यांच्या गंधर्व नाटक मंडळीत गेले. तेव्हांच त्यांचा उत्तम नट म्हणून लौकिक झाला. कांहीं दिवस सरकारी नोकरी केल्यानंतर ती कायमची सोडून ते नाटयवाङ्मयांत भर घालूं लागले. किर्लोस्करांच्या खालोखाल नाटयकवि म्हणून यांचें नांव पुढें येऊन ब-याच नाटक मंडळ्यांनां यांच्या नाटकांवर गबर होतां आलें. देवलानीं एकंदर संगीत व गद्य मिळून सात नाटकें लिहिलीं आहेत. दुर्गा , मृच्छकटिक , विक्रमोर्वशीय, झुंजारराव, शापसंभ्रम, संगीत शारदा, आणि संशयकल्लोळ. पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे. यांपैकीं पहिलीं तीन संस्कृत नाटकांचीं व शेवटची इंग्रजी नाटकांचीं रूपांतरें होत. शारदा नाटक काय तें एकच त्यांचें स्वत:चें व तत्कालीन समाजांत क्रांति करून सोडणारें नाटक होतें जरठ तरुणी विवाह हा या नाटकाचा सामाजिक विषय असून नाटककारानें आपल्या कवित्वानें तो उत्कृष्ठ रंगविला आहे. त्यामुळें बराच काळ महाराष्ट्रीयांच्या मनावर याचा पगडा बसला होता. मा.गोविंद बल्लाळ देवल यांचे १४ जून १९१६ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे. मा.गोविंद बल्लाळ देवल यांना आदरांजली.
सं|जी|व वे|ल|ण|क|र.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

………..
श्री देवल यांनी लिहिलेली काही सुप्रसिद्ध गाणी
मज गमे ऐसा जनक तो  https://www.youtube.com/watch?v=ugGYSlSPk7w
मजवरी तयांचें प्रेम     https://www.youtube.com/watch?v=PRNdLvq59y8
मूर्तिमंत भीति उभी    https://www.youtube.com/watch?v=Hrel166Hay8

म्हातारा इतुका न     https://www.youtube.com/watch?v=BZl2JWzfemM
चिन्मया सकल हृदया   https://www.youtube.com/watch?v=1kZe6GaM-Bk
मृगनयना रसिक मोहिनी   https://www.youtube.com/watch?v=6c-Scm5YWEY
हा नाद सोड सोड    https://www.youtube.com/watch?v=78BUT5ig-cE

दि.१३-११-२०१९ वॉट्सअॅपवरून साभार

गोविंद बल्लाळ देवल

रजनिनाथ हा नभीं उगवला ।——-राजपथीं जणुं दीपचि गमला ॥
अशी सुंदर रचना करून त्याला संगीत देणारे तसेच
दुर्गा***** मृच्छकटिक******विक्रमोर्वशीय *****, झुंजारराव******, शापसंभ्रम******, संगीत शारदा*******आणि संशयकल्लोळ अशी सुंदर नाट्यसंपदा घडविणारे कै गोविंद बल्लाळ देवल, यांचे आज पुण्यस्मरण
मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे.अत्यंत प्रयोगक्षम नाट्यकृतींचे लेखन आणि स्वाभाविक अभिनयशिक्षण या द्विविध प्रकारे रंगभूमीची सेवा करणारे कै गोविंद बल्लाळ देवल,यांचे नाव नाट्यक्षेत्रात अजरामर राहील
*************त्यांचे बालपण सांगली जिल्ह्यात गेले आणि शालेय शिक्षण बेळगाव येथे झाले आणि तेथेच ते प्रख्यात नाटककार व अभिनेते बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संपर्कात आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर (१८७९) देवल त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करीत. बेळगाव येथे असतांनाच देवल यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत जाण्यास सुरूवात केली होती. त्यांना त्या नाटक कंपनीत भूमिकाही मिळत गेल्या तसेच किर्लोस्कर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही देवल काम करू लागले. १८८५ साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतरही देवल त्याच संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करीत राहिले. काही वर्षांनी (१८९४) मग देवल पुणे येथील शेतकी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. मूळ स्वभाव नाटककाराचा असल्याने देवल यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. १९१३ साली देवल बाल गंधर्व यांच्या गंधर्व नाटक मंडळीत गेले.
*********** देवल हे सामाजिक मतप्रणालीच्या दृष्टीने रानडेपंथीय सुधारक होते. त्यांनी शारदेत जरठकुमारीविवाह आणि कन्याविक्रय या सामाजिक समस्या प्रभावीपणे मांडल्या. शारदा ही जरी सर्वस्वी निर्दोष कलाकृती नसली, तरी अस्सल वातावरण, जिवंत स्वभावचित्रण, सुटसुटीत व मार्मिक संवाद, प्रासादिक पद्यरचना आणि सहजसुंदर विनोद या बाबतींत ती बिनतोड ठरावी. संशयकल्लोळ या हटकून रंगणाऱ्या सुखात्मिकेवरुन देवलांच्या असाधारण रूपांतरकौशल्याची साक्ष पटते.
***********देवलांनी इंग्रजीवरून तीन, संस्कृतवरून तीन व एक स्वतंत्र अशी एकूण सात नाटके रचली. टॉमस सदर्नकृत द फेट्ल मॅरेजवरुन गॅरिकने तयार केलेल्या इझाबेला या रंगावृत्तीच्या आधारे दुर्गा (१८८६), शेक्सपिअरकृत ऑथेल्लोची रंगावृत्ती झुंझारराव (१८९०) व मर्फी आणि मोल्येर यांच्या अनुक्रमे ऑल इन द राँग आणि गॉनारेल या नाटकांवरुन फाल्गुनराव अथवा तसबिरीचा घोटाळा (१८९३) ही त्यांची परकीय नाट्यकृतींची रूपांतरे होत. पुढे फाल्गुनराव…चे गंधर्व नाटक मंडळीसाठी केलेले संगीत रूपांतर संशयकल्लोळ (१९१६) हे कमालीचे लोकप्रिय ठरले. मृच्छकटिक (१८८९), विक्रमोर्वशीय (१८८९) व बाणाच्या कादंबरीवर आधारलेले शापसंभ्रम (दुसरी आवृ. १९००) ही त्यांची संस्कृताधारे रचलेली नाटके. त्यांच्या दुर्गा नाटकाला राजाराम कॉलेजचे, तर शापसंभ्रमला इंदूरच्या महाराजांचे पारितोषिक मिळाले होते. पण या दोन्ही नाटकांपेक्षा त्यांच्या मृच्छकटिक, झुंझारराव आणि संशयकल्लोळ यांना प्रायोगिक यश विशेष लाभले. तथापि यांहीपेक्षा त्यांचे सं. शारदा (१८९९) हे नाटक साहित्यिक आणि प्रायोगिक या दोन्ही दृष्टींनी अद्वितीय ठरले. शारदेसारखी अस्सल सामाजिक नाट्यकृती तत्पूर्वी मराठी रंगभूमीवर आलेली नसल्याने मराठी सामाजिक रंगभूमीचा पाया घालण्याचे श्रेय देवलांना मिळते.!!अभिवादन !!!

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुक वॉलवरून साभार दि. १५-०६-२०२०

************************************


४. अण्णासाहेब किर्लोस्कर

जन्मदिन (३१ मार्च,१८४३ )

मराठी जनमानसात संगीत नाटकाचे प्रेम, खर्‍या अर्थाने रुजवण्याचे श्रेय बलवंत पांडुरंग अर्थात अण्णासाहेब किर्लोस्करांकडेच जाते.

१८७३ साली अण्णासाहेबांनी ‘शांकरदिग्विजय’ या नावाचे एक गद्य नाटक प्रसिद्ध केले. १८८० साली पुणे मुक्कामी किर्लोस्करांनी ‘इंद्रसभा’ नावाचे पारसी नाटक – उर्दू भाषेतील – पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी एका बैठकीत ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला.

१३ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्याच्या तंबाखू आळीत दसर्‍याच्या मुहूर्तावर ‘शाकुंतला’च्या पहिल्या तीन अंकांची रंगीत तालीम झाली. आणि रविवार ३१ ऑक्टोबर १८८० रोजी बुधवार पेठेतील भांग्या मारुतीसमोरच्या तांबेकरांच्या वाड्यात असलेल्या आनंदोद्भव नाटकगृहाच्या गच्च भरलेल्या तिन्ही मजल्यांसमोर शाकुंतलाचा पहिला प्रयोग झाला. व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली.

भारतीय नाट्यशास्त्राचा पाया भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राच्या ग्रंथात सापडतो. रंगमंचावरील नेपथ्य, संगीत, नृत्य, वेषभूषा, रंगभूषा, अभिनय, दिग्दर्शन इथपासून रंगमंच जिथे असतो त्या रंगमंदिराचे बांधकाम कसे करावे, त्यासाठी भूमीची निवड, बांधकाम साहित्य, आकारमान इथपर्यंत नाटकाचे संपूर्ण नियम, पथ्ये भरताच्या नाट्यशास्त्रात सापडतात. त्यामुळेच नाट्यशास्त्राला पाचवा वेद मानलं जातं. भरताच्या नाट्यशास्त्राप्रमाणे जेव्हा इतिहासकाळात नाटके होत असत, तेव्हा वातावरणनिर्मितीसाठी सुरुवातीला धृवागीतं वाजवली जात असत – ती वाद्यांवर वाजवली जात. त्यांत दोन प्रकार होते – निःशब्द धृवागीत आणि सशब्द धृवागीत. प्रथम निःशब्द धृवागीत वाजवले जात असे, जेणेकरून लोकांना कळावे, की आज इथे काहीतरी नाटक आहे. निःशब्द धृवागीताने एकप्रकारे सुरांचे गूढ असे वातावरण निर्माण होत असे. पण नाटक म्हणजे शेवटी शब्दसृष्टी. त्यामुळे निःशब्द धृवागीतानंतर सशब्द धृवागीत होत असे. त्यालाच आपण आज नांदी म्हणतो .

नाट्यशास्त्राप्रमाणे नांदी हा एक पडद्यामागे होणारा विधी असे. त्यानुसार ‘संगीत शाकुंतल’ नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला स्वतः अण्णासाहेब सूत्रधार, बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोलीकर आणि शेवडे या पारिपार्श्वकांसह पडद्यामागे नांदी म्हणण्याकरता सज्ज झाले. ‘पंचतुंड नररुंडमालधर’ ही नांदी म्हणण्यास सुरुवात करणार, तोवर जणू पडदा ओढणार्‍यास तेवढाही विलंब सहन न होऊन त्याने एकदम पडदा वर उचलला. आणि पडद्यामागे नांदी म्हणून नटेश्वराला फुले अर्पण करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्याचा संकेत असा अचानकपणे बदलून गेला.

ती ही ‘संगीत शाकुंतला’ची नांदी.
(राग : खमाज,)

पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधी नमितो ॥
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥ ध्रु.

कालिदास कविराज विरचित हें, गाणी शाकुंतल रचितों
जाणुनिया अवसान नसोनि महकृत्यभर शिरिं घेतो

ईशवराचा लेश मिळे तरि मूढ यत्न शेवटि जातो
या न्याये बलवत्कवि निजवाक्यपुष्पिं रसिकार्चन करितो

नांदीनंतर सूचकपद असे. शाकुंतलाच्या नांदीच्या सूचकपदाची झलक ही अशी.
अष्टमुर्ती परमेश सदाशिव तुम्हां शिव देवो
यदृपाविण विश्वचि हा भास हृदयी ठसवो
सूचकपदातून नाटकाचं साधारण कथानक हे नटेश्वराच्या आयुष्यावर बेतून सांगितले जायचे. जणू काही नटेश्वराच्या जीवनामध्ये या घटना घडल्या आहेत, असे समजून त्याला उद्देशून हे सूचकपद म्हणायचे कारण ती असायची त्या नाटकाच्या एकूण कथासूत्राची सुरुवात. नाटकाचा मूळ उद्देश हा मनोरंजनाचा असल्याने नाटकाचे कथानक सूचकपदातून सांगितल्याने काही रसभंग होत नसे. उलट जमलेल्या लोकांना आज आपण कुठल्या कथानकावरचे नाटक पाहण्यासाठी जमलो आहोत, हे कळल्याने नाटकाचा आणि पदांचा आनंद लुटायला मदतच होत असे. जसे एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायक माहितीतलाच राग सादर करणार असेल, तरी त्या-त्या दिवशीचा रसाविष्कार वेगळा असतो, तसेच कथानक आधी माहीत असले, तरी त्या दिवशी नाटक आणि मुख्य म्हणजे पदे कशी होतील याची उत्सुकता प्रेक्षकांत असेच.

नांदी आणि नाटकातील इतरही पदे निरनिराळ्या राग-रागिण्यांवर आधारित असत. यमन, भूप, ललत, जोगिया, पिलू, आसावरी, भैरवी यांसारखे प्रचलित आणि लोकप्रिय राग तर वापरले गेले.

शाकुंतल नाटकांमधील पदे आजही आवडीने ऐकली जातात त्या पैकी थोडी
१)मना तळमळसी ,
२)लाविली थंड उटी

संगीत सौभद्र मधल्या पदांची यादी फारच मोठी आहे म्हणून नमुन्या दाखल काही गाणी .
१)नच सुंदरी करू कोपा
२)नभ मेघांनी आक्रमिले
३)पाण्डुनृपती जनक जया
४) राधाधर मधू मिलिंद
५)लग्नाला जातो मी
६)प्रिये पहा ( पूर्वीच्या काळी ह्या गाण्याच्या वेळी खरोखर पहाट होत असे)
१५० वर्षांपूर्वी लोकरंजन करण्यासाठी पाऊल उचलणाऱ्या अण्णासाहेब किर्लोस्करांच्या स्मृतीला प्रणाम.
प्रसाद जोग.सांगली.
९४२२०४११५०

नवी भर दि.०२-०४-२०२० वॉट्सअॅपवरून साभार

——- 

संगीत नाटकाचा कर्ता

मराठी संगीत नाटकाची १९ व्या शतकात पायाभरणी करणारे ज्येष्ठ नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा आज १३५ वा स्मृतिदिन.
त्यांनी १८८० मध्ये ‘संगीत शाकुंतल’ हे त्यांनी लिहिलेले संगीत नाटक रंगभूमीवर आणले व मराठी संगीत रंगभूमीच्या दैदिप्यमान इतिहासाचा पहिला अध्याय लिहिला.
बलवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म कानडी भाषक धारवाड जिल्ह्यातला. त्यांचे वास्तव्यही बहुतांश काळ तिथेच होते. मात्र तरीही त्यांनी नाट्यलेखन मात्र मराठीत केले.
कालिदासाच्या ‘अभिज्ञात शाकुंतलम्’ या मूळ संस्कृत नाटकावरून किर्लोस्कर यांनी ‘संगीत शाकुंतल’ हे नाटक लिहिले. या नाटकात पदे होती. रंगमंचावर नट ती स्वत: गाऊ लागली. स्वत: किर्लोस्कर नाटकात भूमिका करून नाट्यपदेही गात. प्रेक्षकांना हा प्रकार फार भावला व त्यांनी हे नाटक डोक्यावर घेतले.
अण्णासाहेबांनी तीनच वर्षांत १८८३मध्ये त्यांनी ‘संगीत सौभद्र’ लिहिले व रंगमंचावर आणले. त्यांनी नंतर ‘संगीत रामराज्यवियोग’ हे आणखी एक संगीत नाटक लिहायला घेतले पण ते पूर्ण होण्यापूर्वीच २ नोव्हेंबर १८८५ रोजी मृत्यूने त्यांना गाठले.
मराठी संगीत नाटकाचा कर्ता वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी आयुष्याच्या रंगमंचावरून कायमची एक्झिट घेऊन निघून गेला.

भारतकुमार राऊत

प्रिये #पहा #रात्रीचा #समय #सरुनि येत उषःकाल हा ॥–अशी सुंदर नाट्यगीते रचणारे गीतकार – अण्णासाहेब किर्लोस्कर ( बळवंत पांडुरंग किर्लोस्कर ) यांचे आज पुण्यस्मरण २ नोव्हेंबर १८८५
यांचा जन्म सन १८४३ त मार्चच्या ३१ तारखेस धारवाड जिल्ह्यांतील गुर्लासूर येथें झाला. लहापणींच हे हनुमानजयंतीसारख्या उत्सवाच्या वेळीं खेळगडी जमवून नाटकें करीत. आण्णाचें बारा वर्षांपर्यंतचें शिक्षण मराठी व कानडी भाषेंतून घरींच करून घेण्यांत आलें होतें. त्यानंतर इंग्रजी दोन इयत्ता कोल्हापुरास पूर्ण झाल्या. चौदाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला
कविता करण्याचा नाद त्यांनां लहानपणापासून जडला. अण्णांचे वडील उत्तम संस्कृतज्ञ असल्यानें अण्णांनीं त्यांजवळ संस्कृत रघुवंश व शाकुंतल वाचलें होतें. हरिदासांस कथेला उपयोगी अशीं पदें ते करून देत.
घरीं बसल्या बसल्या त्यांनीं “शिवाजी” वर ५०० आर्या रचून त्या “दक्षिणाप्राइज कमीटी” कडे परीक्षणार्थ पाठवून दिल्या. कमीटीचा त्यांवर उत्तम अभिप्राय मात्र मिळाला; बक्षिस लाभलें नाहीं.
शाळेच्या नोकरीला कंटाळून, त्यांनीं पोलीसखात्यांत जमादारीचा नोकरी धरली, पण लवकरच तीहि सोडून रेव्हेन्यू कमिशनरच्या ऑफिसांत ते गेले. या ऑफिसांत असतां १८८० मध्यें तें फिरतीबरोबर पुण्यास आले व तेथें त्यांनां पारशी कंपनीचें उर्दू नाटक पहाण्यास मिळालें. त्यांतील ऑपेरापद्धतीचें नृत्य, गायन, अभिनय, देखावे वगैरे पाहून आपल्या भाषेंत असेंच एक नाटक वठवावें असें त्यांच्या मनानें घेतलें व त्याप्रमाणें त्यांनीं शाकुंतलाचें मराठी भाषांतर करण्यास सुरुवात केली. याच सुमारास पुढें प्रसिद्धीस आलेली मोरोबा वाघोलीकर, बाळकोबा नाटेकर, नाना शेवडे यांसारखी मंडळी त्यांनीं आपल्यांत ओढली व शांकुतल नाटकाची चार अंकी रंगीत तालिम १३ आक्टोबर १८८० या मुहूर्तावर केली. लवकरच हा प्रयोग नाटकगृहांत झाला व उत्पन्नहि चांगलें आलें. सुरुवातीला यश आलेलें पाहून आण्णांनीं सर्व शाकुंतलाचें पूर्ण भाषांतर करून संपूर्ण नाटकाची तालीम करून दाखविली.(अधिकमाहीतीसाठी महाराष्ट्रीय ज्ञानकोश यशवंतराव प्रतिष्ठान )
अण्णासाहेब किर्लोस्कर यांची गीत व संगीत संपदा
राधाधरमधुमिलिंद —वद जाउं कुणाला शरण—– अर्जुन तर संन्यासि हो‍उनी—अति कोपयुक्‍त होय परि — अरसिक किती हा शेला —- आवडती वस्तू लोभानें —-काय मला भूल पडलि — किती सांगुं तुला मज—–कोण तुजसम सांग —-कांते फार तुला मजसाठीं—-गर्गगुरुतें घेतलें वश— जाई परतोनी बाळा — जेव्हां जेव्हां वाढायातें —-ज्यावरिं मीं विश्वास ठेविला—- तस्कराहातीं द्विजगोधन —-दिसलि पुनरपी गुप्‍त जाहली —- नच सुंदरि करूं कोपा —- नभ मेघांनीं आक्रमिलें — नमुनि ईशचरणा —नाहीं झाले षण्मास मला—- नीरक्षीरालिंगनरूपी स्‍नान— नेमियलें मज शत्रुजयाला— परक्याचें धन कन्या— परम सुवासिक पुष्पें—पार्था तुज देउन वचनें — पावना वामना या मना—पुष्पपरागसुगंधित शीतल—-पंचतुंड नररुंडमालधर —पांडुकुमारा पार्थ नरवरा— पांडुनृपति जनक जया — प्रिया सुभद्रा घोर वनीं—प्रिये पहा रात्रीचा समय —बघुनि सुभद्रेला —बलसागर तुम्हि वीरशिरोमणि —बहुत छळियलें नाथा —-बहुत दिन नच भेटलों — भूमि जल तेज पवमान —- मन माझे भडकुनि गेले —मना तळमळसि— मन्‍नेत्र गुंतले लुब्ध—माझी मातुलकन्यका—- माझ्या मनिचे हितगुज सारे —-माझ्यासाठीं तीनें अन्‍न–मालिनिकणवाही हा वारा —मी कुमार तीहि कुमारी—-मोडुनि दंडा फेंकुन देइन — लग्‍नाला जातों मी—लाल शालजोडी जरतारी — लाविली थंड उटी —- वदनीं घर्मजलालावसंतीं बघुनि मेनकेला —वाटे सर्वथा मुक्‍त झालों —-व्यर्थ मीं जन्मलें थोर —-शशिकुलभूषण सदया —-शांत दांत कालिका ही —सखये अनसूये थांब —- साध्य नसे मुनिकन्या— होतों द्वारकाभुवनी”


“प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि येत उषःकाल हा ॥
थंडगार वात सुटत । दीपतेज मंद होत ।———दिग्वदनें स्वच्छ करित । अरुण पसरि निज महा ॥
पक्षि मधुर शब्द करिति । गुंजारव मधुप वरिति ।——–विरलपर्ण शाखि होति । विकसन ये जलरुहा ॥
सुखदुःखा विसरुनियां । गेलें जें विश्व लया ।———-स्थिति निज ती सेवाया । उठलें कीं तेंची अहा ॥

माधव विद्वांस

५.वीर वामनराव जोशी

परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला । हे लोकप्रिय नाट्यगीत लिहीणारे वीर वामनराव जोशी.
शिक्षण अर्धवट सोडून ज्यांनी देशसेवेचा विडा उचलला व स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली त्या विदर्भवीर थोर देशभक्त, झुंजार पुढारी, कुशल संघटक, महाराष्ट्राचे नामांकित वक्ते, नामवंत नाटककार “वीर वामनराव’ जोशी यांचे आज पुण्यस्मरण (०३ जून) . वामनरावांच्या पंधराव्या वर्षी त्यांचे वडील वारले आणि पुढील आयुष्यात त्यांना विविध संकटांशी झगडावे लागले. तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षक अशी बहुविधता होती. म्हणूनच नाना क्षेत्रातील नाना प्रकारचे लोक त्यांच्या भोवती असायचे. राजकारणाच्या रणधुमाळीत ते अहर्निश उभे होते. त्यामुळे ललित लेखनासाठी फारशी फुरसत त्यांना मिळत नव्हती. तरीही वृत्तपत्रलेखन आणि नाट्यलेखन या दोन्हीमध्ये त्यांचा नावलौकिक मोठा होता.
यामध्ये पैसा तो कितीसा मिळणार? पण स्वत:च्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही हाती आलेला पैसा ते गरजूंना देत असत. १९१२ साली त्यांनी केशवराव भोसलेंच्या ललितकलादर्शसाठी ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक लिहिले. त्या नाटकाने काही काळ मराठी रंगभूमी दणाणून सोडली. ‘मी नवबाल जोगीण बनले’ हे त्यातील गाणे फार लोकप्रिय झाले होते. त्यानंतर १२ वर्षांनी १९२५ साली त्यांनी ‘रणदुंदुभी’ हे नाटक लिहिले. मास्टर दीनानाथांच्या बलवंत संगीत नाटक मंडळीने ते रंगभूमीवर आणले. हे नाटक खूपच गाजले. या नाटकातील ‘परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला’ हे गाणे तर १९३०च्या चळवळीने खेड्यापाड्यांपर्यंत पोचविले होते. वीररसप्रधानता हे वामनरावांच्या नाटकाचे वैशिष्ट्य आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रासादीक पदरचना.
वीर वामनरावांच्या त्यागी वृत्तीची आठवण म्हणजे ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाने ललितकलादर्शला अपेक्षेबाहेर मिळवून दिलेल्या यशाची जाणीव ठेवून केशवराव भोसल्यांनी वामनरावांकडे ४०० रु. अधिक पाठविले. पण दारिद्य्रातही कर्णाचा दिलदारपणा बाळगणार्‍या वामनरावांनी त्यातील काही रुपये केशवरावांना परत केले तर काही पुण्याच्या अनाथ बालिकाश्रमाला दिले. ‘रणदुंदुभी’ नाटकाचे कानडीमध्ये रूपांतर केलेल्या दाक्षिणात्य नाटककंपनीने कृतज्ञतेने १००० रु.चा चेक पाठविला तोही गोव्याच्या राष्ट्रीय शाळेच्या मदतीसाठी त्याच दिवशी दिला. इतकेच काय पण केंद्र सरकारने कृतज्ञतेने देऊ केलेली चार हजार रुपयांची देणगीही त्यांनी स्वीकारली नाही. रणदुंदुभीनंतर ‘धर्मसिंहासन’, ‘शीलसंन्यास’ आणि ‘झोटिंग पातशाही’ अशी तीन नाटके ही लिहीली.
लेखन शुभदा दादरकर (कै. विद्याधर गोखले यांच्या कन्या ) यांचा लेख


परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला ।
सजिवपणी घडती सारे । मरण-भोग त्याला ॥
असुनि खास मालक घरचा । म्हणति चोर त्याला ॥
सौख्य-भोग इतरा सारे । कष्ट मात्र त्याला ॥
मातृभूमि त्याची त्याला । होत बंदिशाला ॥

– श्री.माधव विद्वांस आणि फेसबुकचे आभार

विकीपीडियावरील माहिती
वीर वामनराव जोशी (वामन गोपाळ जोशी) (जन्म : अमरावती, १८ मार्च १८८१; मृत्यू : अमरावती, ३ जून १९५६) हेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक असून मराठी नाटककार, कवी आणि पत्रकार होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘राष्ट्रमत’ ह्या वृत्तपत्रात देशभक्त गंगाधरराव देशपांडे ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून काम केले. लोकजागृतीसाठी त्यांनी ‘स्वतंत्र हिंदुस्थान’ हे साप्ताहिक चालवले होते. त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती.

वीर वामनराव जोशी यांनी इ.स. १९२० ते १९४२ या काळात अनेकवेळा तुरुंगवास भोगला. महात्मा गांधींच्या चळवळीतही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती.

प्रकाशित साहित्य
नाटके : ढोटुंग पादशाही, धर्मसिंहासन, रणदुंदुभि (पहिला प्रयोग, बलवंत संगीत नाटक मंडळी ने १७-२-१९२७ रोजी केला होता).
राक्षसी महत्त्वाकांक्षा (पहिला प्रयोग, ललित कलादर्श ने २०-९-१९१३रोजी केला होता)., शीलसंन्यास
अन्य पुस्तके : चंद्रपूरची महाकाली, राष्ट्रपिता महात्मा गांधी
गाजलेली नाट्यगीते :
आपदा राज-पदा भयदा (संगीत रणदुंदुभि)
जगी हा खास वेड्यांचा पसारा (संगीत रणदुंदुभि)
दिव्य स्वातंत्र्य रवि (संगीत रणदुंदुभि)
परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला (संगीत रणदुंदुभि)
वितरि प्रखर तेजोबल (संगीत रणदुंदुभि)

६.श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

सुपरिचित कवी, विनोदी लेखक, नाटककार, कवी व समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा आज स्मृती दिन त्यानिमित्त दैनिक प्रभात पुणे दिनांक १ जून २०२१ पुणे मधील माझा लेख त्यांचा जन्म नागपूर येथे दिनांक २९ जून १८७१ रोजी झाला.त्यांचे वडील शिक्षक होते.कोल्हटकर कुटुंब मूळचे रत्नागिरी जवळील नेवरे येथील होते.त्यांचे पणजोबा गोविंदभट वाई येथे येऊन राहिले.त्यांना हरिपंत व महादेवशास्त्री ही दोन मुले, हरिपंत हे श्रीकृष्ण यांचे आजोबा. कोल्हटकरांच्या घराण्यात नाटक आणि लेखन जणू मुरलेलेच होते.हरिपंतांचे बंधू महादेवशास्त्री हे “अथेल्लो”चे भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध होते.हरिपंतांचे पुत्र कृष्ण हे श्रीपाद कोल्हटकरांचे वडील.कृष्णराव नोकरीनिमित्ताने अमरावतीस येऊन राहिले.श्रीपाद यांना वयाच्या ९ व्या वर्षी तोंडाला लकवा आला व मान आणि जीभ यावर परिणाम झाला होता.त्यामुळे त्यांचे शिक्षणाचे १ वर्ष वाया गेले याची त्यांना खंत होती.त्यांच्या शारीरिक विकलांगतेची थट्टा होऊ लागल्याने ते काहीसे एकलकोंडे झाले होते.मात्र त्यांचे याच काळात वाचन सुरु झाले.ते पाचवीत असताना संगीत शाकुंतल या नाटकाची चर्चा होऊ लागली होती,व त्यांना नाटक लिहावेसे वाटू लागले.त्यांनी एक “ सुखमालिका “नावाचे ५ अंकी नाटक लिहूनही काढले.
श्रीपाद कृष्ण यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अकोला येथे झाले नंतर पुणे डेक्कन कॉलेज अधे त्यांनी प्रवेश घेतला, दरम्यान त्यांचे वयाच्या १५ व्या वर्षी खामगावचे वकील वामनराव जोशी यांच्या कन्येशी विवाह झाला.त्यावेळी मुलीच्या वडिलांनी मुलाला व मुलाच्या वडिलांनी मुलीला पहिले नव्हते.
पुणे तेथे शिकत असतांना त्यांना शिवराम महादेव परांजपे, वि. का.राजवाडे, एस. एस. देव यांच्यासारखे शिक्षक लाभले.१८८७ साली कोल्हटकरांनी एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले व ते अकोला येथे वकिली व्यवसाय करू लागले,याच वेळी वकिली बरोबरच कोल्हटकरांच्या स्वतंत्र लेखनालाही बहरआला. वर्ष १८९१ मध्ये कोल्हटकरांनी पहिल्यांदा संस्कृत नाटक मृच्छकटिकमध्ये अभिनय केला.त्यांनी आपल्या वाङ्म्यसेवेचा आरंभ संगीत विक्रमशशिकला नाटकावरील टीकालेखाने (१८९३) केला.त्यांचा ‘साक्षीदार’ हा विनोदी लेख वर्ष १९०२ मधे ऑगस्ट-सप्टेंबरच्या ‘विविधज्ञानविस्तार’च्या अंकात प्रसिद्ध झाला.न्यायालयातील साक्षीदारांच्या उलटतपासणीतून निर्माण झालेले विनोद त्यांनी मांडले आहेत. तीन पात्रांचा समावेश असणाऱ्या या विनोदी कथासंग्रहात सुदामा, बंडुनाना आणि पांडुतात्या अश्या तीन व्यक्ति रेखांचे माध्यमातून त्यांनी तत्कालीन धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनातील विसंगतींवर त्यांनी बोट ठेवले. त्यांच्या अशा १८ लेखांचा ‘सुदाम्याचे पोहे ’ हा संग्रह १९१० साली प्रसिद्ध झाला. त्यात पुढे आणखी १४ लेखांची भर घालून १९२३ साली ‘सुदाम्याचे पोहे अर्थात साहित्यबत्तिशी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले ‘‘वर्ष १९१३ मधे ‘ ज्योतिर्गणित ’ हा ज्योतिषशास्त्रावरील विवेचक ग्रंथही कोल्हटकरांनी लिहिला.त्यांनी त्यांचे आत्मचरित्राची लिहिले आहे.त्यामध्ये त्यांनी त्यांच्या काव्य नाट्य व इतर लेखनासंबंधी लिहिले आहे.त्यांच्या साहित्यसेवेबद्दल त्यांना १९२२ साली पुण्यास भरलेल्या कविसंमेलनाचे अध्यक्षपद व १९२७ साली महाराष्ट्र साहित्यसंमेलनाच्या बाराव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात आले.वर्ष १९२० मधे सांगली येथे भरलेल्या तृतीय ज्योतिष संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.१ जून १९३४ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

  • श्री.माधव विद्वांस आणि फेसबुकचे आभार
    . . . . . . . .

  • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

जन्म : २९ जून १८७१
मृत्यू : १ जून १९३४
मराठी नाटककार, विनोदकार व वाङ्‍मयसमीक्षक. जन्म विदर्भातील बुलढाण्यास. अकोला, पुणे आणि मुंबई येथे बी.ए., एल्एल्. बी. पर्यंतचे शिक्षण. व्यवसाय वकिलीचा. त्यांनी आपल्या वाङ्‍मयसेवेचा आरंभ संगीत विक्रमशशिकला नाटकावरील टीकालेखाने (१८९३) केला. संगीत वीरतनय (१८९६) हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी मूकनायक (आवृ. तिसरी, १९२२, प्रथम प्रयोग १९०१), गुप्तमंजूष (१९०३), मतिविकार (१९०७), प्रेमशोधन (१९११), वधूपरीक्षा (१९१४), सहचारिणी (१९१८), जन्मरहस्य (१९१८), परिवर्तन (आवृ. दुसरी, १९२३), शिवपावित्र्य (१९२४), श्रमसाफल्य (१९२९) आणि मायाविवाह (१९४६) ही नाटके लिहिली. उपर्युक्त बारा नाटकांपैकी पहिली आठच रंगभूमीवर आली. ‘साक्षीदार’ हा त्यांचा पहिला विनोदी लेख विविधज्ञानविस्तारात प्रसिद्ध झाला (१९०२). सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे (१९१०) हा त्यांच्या विनोदी लेखांचा संग्रह. त्याची तिसरी आवृत्ती सुदाम्याचे पोहे- अर्थात साहित्य बत्तिशी ह्या नावाने प्रसिद्ध झाली (१९२३). त्यांचे समीक्षालेख, अध्यक्षीय भाषणे, निबंध कोल्हटकरांचा लेखसंग्रह (१९३२) ह्या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. दुटप्पी की दुहेरी (१९२५) आणि श्यामसुंदर (१९२५) ह्या दोन कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांनी काही लघुकथाही लिहिल्या आहेत. गीतोपायन (१९२३) हा त्यांचा कवितासंग्रह. ‘बहु असोत सुंदर संपन्न’ ह्या सुप्रसिद्ध महाराष्ट्रगीताचे ते जनक आहेत. साधारणपणे १९२० पर्यंतच्या त्यांच्या जीवनाचा आढावा त्यांनी आपल्या आत्मवृत्तात (१९३५) घेतला आहे. भारतीय ज्योतिर्गणित (१९१३) ह्या ग्रंथातून त्यांच्या ज्योतिर्गणितविषयक व्यासंगाचा प्रत्यय येतो.

कोल्हटकरांचे नाव घेतले जाते ते मुख्यत: नाटककार, विनोदकार आणि वाङ्‍मयसमीक्षक म्हणून. त्यांची नाटके जरी त्यांच्या हयातीतच रंगभूमीवर नाहीशी झाली, तरी त्यांचा मराठी नाट्यलेखनावर झालेला परिणाम दुर्लक्षणीय नाही. त्यांच्या पदरचनेने ज्याप्रमाणे रंगभूमीवरील संगीताला वेगळे आकर्षक वळण लावले, त्याचप्रमाणे त्यांच्या संवादलेखनाने मराठी नाटकांतील संवादांमध्ये खटकेबाजपणा आणि कोटित्व आणले. आपल्या असाधारण कल्पकतेच्या साहाय्याने नाट्यसंवादांतून आणि विनोदी लेखांतून त्यांनी जी विरुद्धकल्पना–न्यासात्मक चमकदार वाक्यरचना–रूढ केली, तिला त्यांच्या हयातीत गडकऱ्यांनी व त्यानंतर प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे इत्यादींनी सुरूप प्राप्त करून दिले. त्यांचे सुदाम्याचे पोहे… हे पुस्तक हा मराठीचा बहुमोल वाङ्‍मय ठेवा आहे. त्यात संगृहीत झालेल्या त्यांच्या उपहासगर्भ व विनोदी लेखनाने एका अभिनव वाङ्‍मयप्रकाराला आणि लेखनपरंपरेला जन्म दिला. गडकरी, चिं.वि. जोशी, अत्रे, पु.ल. देशपांडे इ. विनोदी लेखक याच परंपरेतील. कोल्हटकरांचे सुदाम्याचे पोहे… मधील लेखन असामान्य कल्पनाविलास व कोटित्व यांच्याबरोबच समाजचिंतनातून जन्माला आलेल्या सामाजिक सुधारणांविषयीच्या पुरोगामी भूमिकेतून स्फुरलेले असल्यामुळे ते जितके रंजक तितकेच विचारप्रवर्तक ठरले. सुदाम्याचे पोहे… मध्ये संगृहीत झालेल्या लेखांची संख्या बत्तीसच असली, तरी त्यांतून प्रकट होणाऱ्या उपहासविषयांची व्याप्ती फार मोठी आहे. धर्मव्यवहार, सार्वजनिक जीवनव्यवहार, वाङ्‍मयव्यवहार ह्या आणि महाराष्ट्र समाजजीवनाच्या इतर अनेक व्यवहारांचे कोल्हटकरांनी त्यामध्ये विनोदगर्भ व उपहासगर्भ परीक्षण केले आहे. कोल्हटकरांचे वाङ्‍मयसमीक्षात्मक लेखन प्रत्येक प्रश्नाचा खोलवर जाऊन शास्त्रशुद्धपणे विचार करण्याच्या त्यांच्या वृत्तीचे निदर्शक आहे. ह्या वृत्तीतून ते समग्र लेखन झालेले असल्यामुळे तद्वारा कोल्हटकरांनी मराठी वाङ्‍मयविचाराला भरभक्कम असे तात्त्विक अधिष्ठान प्राप्त करून दिले. पुस्तकपरीक्षणे, ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना, साहित्य संमेलनांतील भाषणे व खास लिहिलेले अभ्यासलेख यांमधून त्यांनी जे मूलभूत स्वरूपाचे वाङ्‍मयीन प्रश्न वेळोवेळी उपस्थित केले व त्यांची जी शास्त्रीय काटेकोरपणे चर्चा केली, त्यामुळे मराठी वाङ्‍मयविचाराला योग्य दिशा मिळाली. त्यांच्या असाधारण कल्पकतेला व्यासंगाची, शास्त्रीय दृष्टीची, शिस्तप्रियतेची व परिश्रमशीलतेची सतत जोड मिळाल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत भारदस्त व प्रभावी ठरले आणि म्हणूनच विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत कोल्हटकर ही केवळ एक व्यक्ती न राहता ती संस्था बनली.
त्यांनी केलेल्या साहित्यसेवेबद्दल त्यांना १९२२ साली पुण्यास भरलेल्या द्वितीय कविसंमेलनाचे अध्यक्षपद व १९२७ साली पुण्यासच भरलेल्या महाराष्ट्र साहित्यसंमेलनाच्या बाराव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात आले. सांगली येथे भरलेल्या तृतीय ज्योतिष संमेलनाचेही (१९२०) ते अध्यक्ष होते. पुणे येथे ते निधन पावले.
संदर्भ : १. कुळकर्णी, वा. ल. श्रीपाद कृष्ण : वाङ्‍मयदर्शन, मुंबई, १९५९.
२. खानोलकर, गं. दे. साहित्य-सिंह श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (जीवन गाथा), मुंबई, १९७२.
लेखक : वा.ल.कुळकर्णी
स्त्रोत : मराठी विश्वकोश …… विकासपीडियावरून साभार

दि.०३-०६-२०२१

७. बाळ कोल्हटकर

नऊ अक्षरांचा नाटककार
ताई-भाऊंची कौटुंबिक जिव्हाळ्याची नाटके लिहून व सादर करून मराठी घराघरात व मनामनात पोहोचलेले प्रतिभावंत नाटककार व कवी बाळ कोल्हटकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या प्रतिभेला श्रद्धांजली!
ज्या काळात मराठीत तमाशापट व आचार्य अत्रे, मामा वरेरकर, अशा दिग्गजांच्याच नाटकांची चलती होती, त्या ६०च्या दशकाच्या सुरुवातीस बाळकृष्ण हरी कोल्हटकर या नव्या दमाच्या नाटककाराने शहरी मध्यमवर्गीय कौटुंबिक कथानके रंगभूमीवर आणली.
हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला व मराठी कुटुंबे एकत्रितपणे जाऊन नाटके पाहू लागली. कोल्हटकरांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘दुरितांचे तिमीर जावो’, ‘वेगळं व्हायचंय मला’, अशा नाटकांनी तर गर्दीचे विक्रम रचले.
बाळकृष्ण हरी कोल्हटकर यांचा जन्म साताऱ्यात २५ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. घरच्या आर्थिक ओढाताणीमुळे कोल्हटकरांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते.
त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी ‘जोहार’ नावाचे नाटक लिहिले. १९४७ सालापर्यंत त्यांनी रेल्वेत नोकरी केली. मात्र त्यानंतर कमाईबाबत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. काही प्रसंगी खायची पंचाईत अनुभवलेल्या कोल्हटकरांनी या काळात नाटके व चित्रपटांच्या संहिता लिहिण्याचे काम चालूच ठेवले.
कौटुंबिक जिव्हाळ्याच्या त्यांच्या नाटकांवर समीक्षक टीका करून त्यांची खिल्ली उडवत. पण कोल्हटकरांना सामान्य रसिकांची नस कळली होती.
शहरी मध्यमवर्गीय नाटकांबरोबरच कोल्हटकरांनी काही पौराणिक व ऐतिहासिक विषयही हाताळले. ‘देव दीनाघरी धावला’ (पौराणिक), ‘सीमेवरून परत जा’, ‘शिवराय कवि भूषण’ (ऐतिहासिक) ही नाटकेही गाजली.
कोल्हटकर उत्तम कवी होते. त्यामुळे त्यांच्या नाटकांत पदेही असत. ‘आई तुझी आठवण येते,’ व ‘निघाले आज तिकडच्या घरी’ ही गाणी नाट्यगृहांत प्रेक्षकांना हमखास रडवीत. माणिक वर्मांनी त्यांच्या शब्दांचे सोने केले.
पंडित कुमार गंधर्व व वाणी जयराम यांच्या आवाजातील ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी’ हे प्रेमद्वंद्वगीत अजरामर झाले. कुमारजींच्याच आवाजातील भूपाळी ‘ऊठी ऊठी गोपाळा’ आजही सकाळी ऐकू येते.
कोल्हटकरांच्या नाटकांच्या शीर्षकांचे एक वैशिष्टय हे की त्यांच्या ३१ पैकी बहुतेक नाटकांची शीर्षके नऊ अक्षरी आहेत. ‘एखाद्याचं नशीब’, ‘आकाशगंगा’ अशी शीर्षके विरळाच.
कोल्हटकरांचे आजच्या दिवशी १९९४ साली निधन झाले. इतकी मोठी नाट्यसंपदा व रसिकप्रियता लाभूनही त्यांना फारसे मान-सन्मान मात्र मिळाले नाहीत, याचे वाईट वाटते.
कोल्हटकर म्हटले की त्यांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ मधील शीघ्र कविता स्मरतात. त्यातलीच अजूनही आठवणारी कविता अशी:
काळ कावळा रांजण भरतो
खड्यामागुनि पडे खडा
पाप धावते पुण्यामागुनी
तरीही किनारा भेटेना
हे पाप नको, हे पुण्य नको
हा जीव नको, जगणेच नको
या सर्वांतून मोक्ष मागतो
अष्टांगांची करुनि घडी
वाहतो ही दुर्वांची जुडी
भारतकुमार राऊत

******************************

वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकाने व “मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला ” या गीताने मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेणारे कै बाळ कोल्हटकर
बाळ कोल्हटकरांचा जन्म २५ सप्टेंबर रोजी सातारा येथे झाला. शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले. ते नाटककार, कवी , अभिनेते, दिग्दर्शक होते. यांनी लिहिलेल्या दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब, सीमेवरुन परत जा, लहानपणा देगा देवा, देव दीनाघरी घावला, देणार्‍याचे हात हजार, उघडलं स्वर्गाचे दार इत्यादि नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली.
लहानपणापासून नाटकांची अतिशय आवड. तसेच लेखनाचीही आवड होती. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी “जोहार” हे आपले पहिले नाटक लिहिले.
इ.स. १९४७ सालापर्यंत त्यांनी रेल्वेत नोकरी केली. मात्र त्यानंतर पेशाच्या बाबत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. काही प्रसंगी खायची पंचाईत अनुभवलेल्या कोल्हटकरांनी या काळात नाटके व चित्रपटांच्या संहिता लिहिण्याचे काम चालूच ठेवले.
त्यांची गाजलेली गीते : आई तुझी आठवण येते, आली दिवाळी दिवाळी , उठि उठि गोपाला, गजाननाला वंदन करूनी, तू जपून टाक पाऊल जरा, निघाले आज तिकडच्या घरी, हा शब्द नवा, ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी

मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाला
पूर्व दिशेला गुलाल उधळुन, ज्ञानदीप लाविला
गोरस अर्पुनि, अवघे गोधन गेले यमुनेला
धूप दीप नैवेद्य असा हा षडोपचार चालला
रांगोळ्यानी सडे सजविले, रस्त्यारस्त्यातून
सान पाउली वाजति पैंजण छुन छुन्न छुन छुन
कुठे मंदिरी ऐकू येते, टाळांची किणकिण
एकतानता कुठे लाविते एकतारिची धून
निसर्गमानव तुझ्या स्वागता असा सिद्ध जाहला
राजद्वारी घडे चौघडा शुभ:काल जाहला
सागरतीरी ऋषीमुनींचा वेदघोष चालला
वन वेळूंचे वाजवि मुरली छान सूर लागला
तरूशिखरावर कोकिलकविने पंचम स्वर लाविला

माधव विद्वांस

फेसबुकवरून साभार . . दि.३०-०६-२०२१

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

One thought on “नाटककार विष्णुदास भावे, देवल, किर्लोस्कर इत्यादि”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s