कवयित्री इंदिरा संत

कवयित्री इंदिरा संत याचा नुकताच जन्मदिवस येऊन गेला. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्याने त्यांची संक्षिप्त ओळख

indira sant kubja

“अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ। अशा अवेळी पैलतीरावर आज घुमे का पांवा मंजुळ।।”
अशी सुंदर गाणी रचणाऱ्या इंदिरा संत (जानेवारी ४, १९१४, इंडी – जुलै १३, २०००, पुणे)

पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संत यांचा जन्म जानेवारी ४, १९१४ रोजी कर्नाटकातील इंडी या गावी झाला. त्या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला.
इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह ‘सहवास’ या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता ‘मृण्मयी’ नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे.

त्यांची गाजलेली गीते
अजून नाही जागी राधा ———- आली बघ गाई गाई ——उंच उंच माझा झोका ———-कधि कुठे न भेटणार —— दारा बांधता तोरण —– नकोनको रे पावसा ———पुस्तकातली खूण कराया ——– बाळ उतरे अंगणी ——-बांधले मी बांधले इंद्राचे तोरण ——– रक्तामध्ये ओढ मातिची

त्यांची काव्य संपदा (कवितासंग्रह)
गर्भरेशीम १९८२-निराकार-बाहुल्या १९७२-मरवा-मृगजळ १९५७-मेंदी १९५५-रंगबावरी १९६४-वंशकुसुम-शेला १९५१

त्यांच्या निवडक कविता

१.)  आली बघ गाई गाई

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध, घोटाळली ताटव्यात

आली बघ गाई गाई, चांदण्यांचे पायी चाळ
लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल ?

आली बघ गाई गाई, लावी करांगुली गाली
म्हणुन का हसलीस उमटली गोड खळी

आली बघ गाई गाई, लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले डोळे माझ्या लाडकीचे ?”

२. नको नको रे पावसा  (माझे आवडते काव्य)
नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;

नको नाचू तडातडा
असा कौलारावरून :
तांबे-सतेली-पातेली
आणू भांडी मी कोठून?

नको करू झोंबाझोंबी :
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येऊ
झेपावत दारातून :
माझे नेसूचे जुनेर
नको टाकू भिजवून;

किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना :
वाटेवरई माझा सखा
त्याला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत;
विजेबाई, कडाडून
मागे फिरव पांथस्थ;

आणि पावसा, राजसा
नीट आण सांभाळून :
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;

नको घालू रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली.
.——————————-
आणि माझे आवडते गाणे
३.अजून नाही जागी राधा –

गायिका : सुमन कल्याणपूर
https://www.youtube.com/watch?v=IQdcKFt0cGM

अजून नाही जागी राधा

अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ

मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भनभन
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन

विश्वच अवघे ओठ लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यामधुनी थेंब सुखाचे….
हे माझ्यास्तव…. हे माझ्यास्तव

__इंदिरा संत


नवी भर दि.६-१-२०२०

इंदिरा संत

सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांचा आज जन्मदिवस….4 जानेवारी

इंदिरा संत यांची कविता पहिली की आपण एक वेगळ्याच विश्वात जातो , तिथे फक्त शब्द असतात आणि मनाला मिळणारी अनुभूती. इंदिरा संत यांचा जन्म ४ जानेवारी १९१४ साली कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील इंडी शहरात झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम कॉलेज मध्ये तसेच पुण्याच्या फर्ग्युसन कॉलजमध्ये झाले.तेथे त्यांची भेट श्री. नारायण संत यांच्याशी झाली. पुढे त्यांनी त्यांच्याशी विवाह केला.
इंदिरा संत यांच्या कवितेतून स्त्री जीवनाचे अनेक पैलू दिसतात अगदी स्त्रीच्या प्रेमापासून ते तिच्या सोसण्यापर्यंतचे. इंदिरा संत याचे शेला, मेंदी, मृगजळ, मरवा ,निवारा असे अनेक काव्यसंग्रह प्रसिदध प्रसिद्ध आहेत. त्यांनी ऐकून २५ पुस्तके लिहिली. १९४६ साली त्यांचे पती नारायण संत यांचे निधन झाले. त्यानंतरच्या अनेक कवितात पतीवियोगाचे दुःख प्रतिबिबित झालेले दिसते. इंदिरा संत यांचा स्वभाव शांत , हळवा आणि चिंतनशील होता. त्यांना मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत हार पत्करावी लागली कारण त्यांच्याकडे निवडणूक जिंकण्याचे चातुर्य नव्हते की त्यासाठी जे काही लागते ते नव्हते. त्यांचा हा पराभव त्यावेळी महाराष्ट्राच्या जिव्हारी लागला होता. त्यांची कविता , त्यांचे लेखनच यासाठी महत्वाचे आहे अशी त्यांचे भाबडी समजूत होती. मला आठवतंय मी त्यांना नाशिकला जनस्थान पुरस्काराच्यावेळी भेटलो होतो तेव्हा त्यांना बघीतल्यावर समईमधील एक वात मंदपणे तेवत आहे. एक वेगळाच ऑरा म्हणतात तसा त्याच्या चेहऱ्याभोवती जाणवला. आज इतक्या वर्षांनंतरही मी ते तेज विसरू शकत नाही.
इंदिरा संत यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार , महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच कुसुमाग्रजाचा जनस्थान पुरस्कार लाभला होता. आजही इंदिरा संत यांची कविता वाचली जाते , अभ्यासली जाते. त्यांचे मराठी कवितेत स्थान उच्च दर्जाचे आहे.
अशा या इंदिरा संत यांचे १२ जुलै २००० साली निधन झाले.

सतीश चाफेकर

लोकमत

शिळोप्याची ओसरी या फेसबुकवरील स्थळावरून साभार

अधिक माहिती इथे https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4


नवी भर दि. १४-०२-२०२० 

तेव्हा कुठे होते व्हॅलेंटाईन डे पण कवयित्री इंदिरा संतांची कविता किती सुंदर आहे ते पहा…

नको पाठवू

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून

शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !

पाठवीशी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमधेच मिळते
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते

कवयित्री – इंदिरा संत

………….. वॉट्सअॅपवरून साभार दि.१४-०२-२०२०

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

One thought on “कवयित्री इंदिरा संत”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s