पं.रामभाऊ मराठे आणि मंदारमाला नाटक

४ ऑक्टोबर २०१८ रोजी पं.राम मराठे यांची २९ वी पुण्यतिथी होऊन गेली. त्यांच्या स्मृतीला वंदन. त्या निमित्याने मला वॉट्सॅपवर मिळालेले त्यंची आठवण जागी ठेवणारे दोन लेख.
🙏🙏
पं. रामभाऊंबद्दल त्यांचे शिष्य पं. उल्हास कशाळकर यांनी सुंदर लेख लिहिला आहे. त्यातील काही संक्षिप्त भाग.

“पं. रामभाऊंची मैफल हा एक बहारदार अनुभव असे. घरंदाज गायकीचे संस्कार, स्वत:चा विचार आणि रसिकांना भरभरून देण्याची त्यांची इच्छा यामुळे त्यांच्या बैठकी दीर्घकाळ लक्षात राहत असत. मैफल साधारणत: रात्री १० वाजता सुरू होई. त्यांच्या रागाचा अंदाज बांधणे अशक्य असे. कधी अगदी प्रचलित राग छायानट, शुद्धकल्याण, कामोद तर कधी बिहागडा, नटबिहाग, नटकेदार सारख्या अप्रचलित रागाने सुरुवात असे. त्यानंतर ठुमरी बरेचदा मा. कृष्णरावांच्या वळणाची, त्यानंतर नाट्यगीत हे सर्वसाधारणपणे दीड ते दोन तासाचं झाल्यानंतर पहिले मध्यंतर होत असे. मध्यंतर चांगले अर्धा-पाऊण तास झाल्यावर कधी बागेश्री, कधी कानड्याचे नायकी किंवा कौशीकानडा असे राग. त्यानंतर रसिकांना वारंवार त्यांच्याकडून ऐकावेसे वाटणारे जोडराग, यात बसंतबहार, बसंती केदार, पंचम मालकंस असे काही. यानंतर आडाणा, सोहनीसारखे उत्तरांगातल्या रागांच्या १-२ बंदिशी किंवा एखादे नाट्यपद, भजन वगैरे. इथे दुसरे मध्यंतर. यानंतर खरे म्हणजे भैरवीच हवी कारण एव्हाना रसिक स्वरगंगेत अगदी चिंब भिजून जायचे, पण या नंतर थोडा चहा आणि भैरवी. ती जवळजवळ ४० ते ४५ मिनिटं! भैरवीमधील कितीतरी वेगवेगळ्या मूडच्या बंदिशींचा संग्रह रामभाऊंकडे होता. हे सर्व होईपर्यंत सकाळचे साडेचार आणि पाच वाजलेले असायचे.”

“रामभाऊंकडे रागांचा आणि बंदिशींचा प्रचंड खजिना होता. एकप्रकारे त्यांना “कोठीवाले’ गवई म्हणता येईल. तरीपण त्यांचे म्हणून एक वैशिष्टय म्हणावे असे म्हणजे जोडराग. त्यांना जोडरागाचे बादशहा म्हणावे इतके विविध प्रचलित अप्रचलित जोडराग रामभाऊ मैफलीत सादर करत. गळ्यावरील प्रचंड हुकूमत, रागाचा परिणाम करणारी विशिष्ट स्वरसंगती आणि अमर्याद कल्पनाशक्ती या जोरावर त्यांनी आपले जोडराग गायनाचे एक वेगळेच तंत्र विकसित केले. जौनभैरव, भैरवभटियार, जीवनकली, हिंडोलबहार, वसंतबहार, कौशीकानडा, बसंतीकेदार खटाचे वेगवेगळे प्रकार, जयंतमल्हार, पंचममालकंस, हिंडोली वगैरे कितीतरी. एखाद्या स्वराला केवळ एका वेगळ्या रागातील स्वराचा कण देऊन देखील त्या रागाची छाया निर्माण करून परत फिरून मूळ रागाचे दर्शन देण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती.”
————————————————–

मंदारमाला

———————————-
मंदारमाला हे साठच्या दशकात प्रचंड गाजलेले संगीत नाटक.  रामभाऊ तेव्हा ऐन भरात होते. त्यांचे आवेशयुक्त गाणे व अभिनय आजही स्मृतिपटलावर कोरला गेलेला आहे !
वेलणकरांनी मंदारमालाबद्दल लिहिलेला सुंदर लेख
नाटक मंदारमाला

२६ मार्च १९६३ साली आजच्या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते… हरी मेरो जीवन प्राण आधार… अशा “मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते.
“मंदारमाला‘चे १९६३च्या गुढीपाडव्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ‘भारत नाट्य प्रबोधन संघा’ने हे नाटक परत रंगभूमीवर आणले. दादर येथील रंगमंदिरात नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. पहिले शंभर प्रयोग ‘रंगमंदिर’तर्फे झाल्यावर नाट्यनिर्माते राजाराम शिंदे यांच्या ‘नाट्यमंदार’ने हे नाटक चालवायला घेतले आणि ४०० प्रयोगांचा पल्ला कधी ओलांडला हे रसिकांनाही समजले नाही. संपूर्ण देशभर प्रयोग झाले. अडीच-अडीच महिने सलग दौरे होत. कधीकधी नाटकाचे दिवसाला तीन-तीन प्रयोग होत. या नाटकाचे असे एकूण १२००हून अधिक हाऊसफुल्ल प्रयोग झाले. या नाटकाद्वारे विद्याधर गोखले यांनी मोठ्या आणि आळवून आळवून म्हणावयाच्या नाट्यपदांच्या परंपरेला छेद दिला. लागोपाठ पदे येणार नाहीत अशी नाटकाची सुरेख मांडणी त्यांनी केली.
चटपटीत संवादांदरम्यान ही रसाळ पदे गुंफली होती. पंडित मा.राम मराठे आणि मा.प्रसाद सावकार यांच्यातील ‘बसंत की बहार आयी’ ही अजरामर जुगलबंदी ऐकण्याला प्रेक्षक उत्सुक असत. त्यासाठी नाटक साडेचार तास चालले तरी ते चुळबूळ करीत नसत.
‘संगीत मंदारमाला’चं कथानक सतराव्या-अठराव्या शतकात राजपुतान्यातील असल्याचे गृहीत धरण्यात आलं आहे. आपल्याकडे जे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक, बंदीशकार, नायक, विद्वान पंडित होऊन गेले त्यांच्यापैकीच काहींच्या जीवनातील मोजक्या प्रसंगांना विद्याधर गोखले कल्पनेची अफलातून जोड दिली आणि ‘मंदार’ या कमालीचा स्त्रीद्वेष असलेल्या, जीवनाला विटलेल्या, मात्र सप्तसुरांच्या नादब्रह्मात कायम रमणार्या आणि संगीत भक्तीच्याच बळावर मनपरिवर्तन झालेल्या अवलिया वनवासी संगीतकाराचा जीवनप्रवास ‘संगीत मंदारमाला’च्या रूपानं रसिकांसमोर आला अन् इतिहास बनून गेला. ‘सोऽहम हर डमरू बाजे’ ही या नाटकातील तोडी रागावर आधारित बंदिश आजही लोकप्रिय आहे. नाटकातील इतर पदांमध्येही पं. राम मराठे यांनी अनेक राग-रागिण्यांचा वापर केला. ज्योतकंस, अहिरभैरव, गौडमल्हार, बसंत बहार, बैरागी भैरव, तोडी, मालकंस, बिहाग, हिंडोल, भैरवी असे अनेक राग रामभाऊंनी चपखलपणे वापरले. ‘बसंत की बहार आयी’ या जुगलबंदीतील ‘चक्रधार’ हा तर त्यांच्या सांगीतिक गणिताचा उत्तम नमुना होता.

मंदारमाला नाटकातील गाजलेली पदे

ही सर्व पदे आठवणीतली गाणी या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. https://www.aathavanitli-gani.com/Natak/Mandarmala

कोण अससि तू न कळे (राग जोगकंस, गायक राम मराठे)

जय शंकरा गंगाधरा (राग अहिर भैरव, गायक राम मराठे) https://www.youtube.com/watch?v=YKKtlZGQx6o

जयोस्तुते हे उषादेवते (राग देसकार, गायक राम मराठे)

तारिल हा तुज गिरिजाशंकर (राग हिंडोल, गायक राम मराठे)

तारे नहीं ये तो रात को (राग मिश्र खमाज, गायक प्रसाद सावकार)

बसंत की बहार आयी (राग बसंत आणि बहार, गायक राम मराठे आणि प्रसाद सावकार)

बुझावो दीप ए सजनी (राग मिश्र भैरवी, गायक प्रसाद सावकार)

हरी मेरो जीवनप्राण-अधार (राग मिश्र पिलू, गायक राम मराठे)
संजीव वेलणकर पुणे.

—————————————–

मी काॅलेजात असेपर्यंत नाट्यसंगीताची चेष्टा करत होतो. एका संगीतप्रेमी मित्राबरोबर मंदारमाला हे नाटक पाहिले आणि पं.राम मराठे यांच्या जयशंकरा या गाण्यावर मुग्ध झालो. त्यानंतर माझी नाट्यसंगीताची आवड वाढतच राहिली. ही गाणी उपलब्ध करून पन्नास वर्षे मागील जगात नेल्याबद्दल धन्यवाद…..  आनंद घारे

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s