स्व.यशवंत देव यांना श्रद्धांजलि

WhatsApp Image 2018-11-04 at 16.53.03

🙏🙏
10/30/2018
अत्यंत दुःखद बातमी.
ज्येष्ठ कवी, संगीतकार आणि गायक यशवंत देव यांचे प्रकृती अस्वास्थ्याने , काल रात्री १.३० वाजता निधन झाले.
यशवंत देव उर्फ नाना, हे फार मोठे संगीतकार, गायक आणि कवी होते. त्याही पेक्षा ते एक सहृदयी माणूस होते. शब्दप्रधान गायकीचे जनक. अनेक शिष्य त्यांनी घडविले, अनेक ज्येष्ठ गायकांना मार्गदर्शन केले. त्यांना भेटणे हा निव्वळ अमृतानुभव असायचा. त्यांच्या कडून अनेक किस्से, गमती जमती ऐकायला मिळायच्या. आपल्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्यालाही ते नेहमी, सन्मानाने वागवायचे. त्यांच्या जाण्याने मराठी संगीत सृष्टीची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
भावपुर्ण श्रद्धांजली.
🙏🙏🙏
भाव तोच देव मानणारा भावगीतांचा देव, शब्दांचे सामर्थ्य जपणारा जयवंत देव,
आज देवाघरचा झाला !
आज शब्द मुके झाले व भाव हरपला.
तिन्ही लोकांना आनंदाने भरून टाकणारा यशवंत अनंतात विलीन झाला .
भावपूर्ण श्रद्धांजली
————————————

आशीर्वाद देणारे हात दूर जातायत!

– आशा भोसले

यशवंत देव यांच्याशी माझी खूप जुनी ओळख. अगदी 47-48 सालापासून… तेही या क्षेत्रात नवीन आणि मीही नवीन होते, अगदी तेव्हापासूनची. एचएमव्हीमध्ये काम करण्याचा तो काळ असेल. तेव्हापासून माझे ऋणानुबंध जुळले ते अगदी शेवटपर्यंत. त्यांनी मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. ते गाण्यातील बारकावे समजावून सांगायचे. मला म्हणायचं, ‘सा’ लावताना डोळे मिटू नकोस. हातवारे करू नकोस. मी हात हलवल्यावर म्हणायचे, हाताने तान घेतेस का? त्यांची समजवण्याची पद्धतही खूप वेगळी. एकदम स्वच्छ माणूस. चित्तपावनी ब्राह्मण, साधी मसाल्याची भाजी पण त्यांना चालायची नाही. त्यांना भेटल्यावर जणू मोगऱ्याच्या फुलाला भेटल्यासारखं वाटायचं.

देवांनी खूप शिकवलं. माझ्या गाण्यात आणखी काय सुधारणा हव्यात… आणखी कशाची भर टाकली पाहिजे…सतत सांगायचे. ते म्हणायचे, गाणं कधी संपत नसतं. गाणं कधी परिपूर्ण नसतं. त्यांच्यासोबत खूप गाणी केली. त्यातील ‘विसरशील तू खास मला दृष्टिआड होता’ हे गाणं मला फार आवडायचं. त्यांच्या कार्यक्रमात हे गाणं हमखास असायचे.
त्यांचा स्वभाव एकदम स्पष्टवक्ता. तोंडावर एक आणि पाठीमागे एक असं बोलणं त्यांना जमायचे नाही. त्यांचा एक किस्सा सांगते, एकदा मी त्यांना प्रश्न केला की तुम्हाला माझा आवाज जास्त आवडतो की लतादीदीचा? एका क्षणात देवसाहेबांनी उत्तर दिले, दीदींचा! त्यांच्या उत्तरामुळे मी भारावून गेले. देवसाहेब पुढे म्हणाले, नैसर्गिकता ही लतादीदींच्या गाण्याची ताकद आहे आणि हिंमत ही तुमच्या गाण्याची ताकद आहे. त्यांचे ते खरे बोलणे मला खूप आवडले होते.

देव यांच्या कुटुंबाशी माझे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. ते माझ्या घरी येताना खरवस घेऊन यायचे. मीही त्यांच्या घरी जेवणाचा डबा पाठवायचे. माझा एक डबा त्यांच्या घरी राहिलाय. त्यांची पत्नी म्हणाली होती, रिकामा कसा द्यायचा, काहीतरी देईन. त्यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा मी घरी सांत्वनासाठी गेले होते. त्यावेळी देवसाहेब म्हणाले, आता तो डबा तसाच राहू दे माझ्याकडे….
अशा खूप आठवणी आहेत.

देव म्हणजे उत्साहाचा अखंड झरा. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे नव्या पिढीने नुसते चिंतन जरी केले तरी कळेल गाणं काय असतं. त्यांच्या 91 व्या वाढदिवसाच्या एका कार्यक्रमाला आम्ही भेटलो होतो. जेव्हा कधी भेट व्हायची तेव्हा ते म्हणायचे, आपण गाणं करूया. वयाच्या नव्वदीतही जोमाने गायचे, शिकवायचे. माझ्या बंधूना म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना ते खूप मानायचे. बंधूंसाठी त्यांनी कविताही लिहिली आहे.

मधल्या काही दिवसांत देवसाहेबांची भेट घेता आली नाही. याची आता खंत वाटतेय. आपण आपल्या व्यापात असतो, वेळ मिळत नाही. मग कधीतरी अशी दुर्दैवी बातमी कानावर येते. मला वाटत राहतं की, सुरेश भटांना भेटायला हवं होतं. देवसाहेबांना भेटायला हवं होतं. अशी प्रेम करणारी माणसं निघून जाताहेत. आशीर्वाद देणारे हात आपल्यापासून दूर जात आहेत. आमच्यापेक्षा वयाने मोठी अशी दोनच माणसं संगीत क्षेत्रात राहिली आहेत. एक लतादीदी आणि दुसरे खय्याम साहेब. बस्स आणखी काय बोलू!
————————————

🌸🌿🌸🔆💞🔆🌸🌿🌸
यशवंत देव..
संगीत क्षेत्र आपल्या प्रतिभेने समृद्ध करणारे..संगीतात नवनवे गायक यावेत..सर्वसामान्यांना संगीतातील बारकावे समजावून सांगण्यासाठी अनेक गावात जाणारे हे यशवंत.

मानवी जीवन तत्त्वज्ञानाचा व्यापक अर्थ सांगणाऱ्या गाण्याला कसे स्वरबद्ध करावे हे गाण्यात दिसते, कारण प्रेम या शब्दाभोवतीच हे जीवन गुंफलेले आहे.

प्रेम हे अमर आहे. केवळ देह दिसतो तोपर्यंतच ते जाणवेल असे नाही. देह दिसत नसला तरीही हे प्रेम..गीत इथल्या निसर्गात जाणवेलच.
फुलांफुलांत ते हसत राहील. बाहेरच्या अस्वस्थ वातावरणाने कधी फुलपाखरु म्हणून दिसेल. या प्रेमगीताला तालासूराची गरज नाही. कारण अंतरंगातून प्रकटले आहे. हलणाऱ्या पाण्यात तरंगात जी उन्हे दिसतात,क्षितिज्यावरील आकाशातील निळी रेघ ही सारी त्या प्रेमाचीच साक्ष.
🌹🍃🔆🌸☘🌸🔆🍃🌹
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे

फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे।।

हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले

तसेच काहिसे मनी, तुला बघून वाटले

तृणांत फुलापाखरू तसे बसेल गीत हे ।।१।।

स्वयें मनात जागते, न सूर ताल मागते

अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते

उन्हें जळांत हालती तिथे दिसेल गीत हे ।।२।।
कुणास काय ठाउके, कसे कुठे उद्या असू

निळ्या नभांत रेखिली, नकोस भावना पुसू

तुझ्या मनीच राहिले, तुला कळेल गीत हे ।।३।।
☘🔆🌿💖🔆💖🌿🔆☘
गीत : शांता शेळके ✍

संगीत : यशवंत देव

स्वर : अरुण दाते

🎼🎶🎼🎶🎼 🎧
🌹🌻☘🔆🍃🌺🍃🔆☘🌻
——————————–

स्वर आले दुरुनी

जुळल्या सगळ्या त्या आठवणी।।

निर्जीव उसासे वाऱ्याचे

आकाश फिकटल्या ताऱ्यांचे

कुजबुजही नव्हती वेलींची

हितगुजही नव्हते पर्णांचे

ऐशा थकलेल्या उद्यानी ।। १।।
विरहार्त मनाचे स्मित सरले

गालावर आसू ओघळले

होता हृदयाची दो शकले

जखमेतून क्रंदन पाझरले

घाली फुंकर हलकेच कुणी ।।२।।
पडसाद कसा आला न कळे

अवसेत कधी का तम उजळे

संजीवन मिळता आशेचे

निमिषात पुन्हा जग सावरले

किमया असली का केली कुणी।।३।।

गीत – यशवंत देव

संगीत – प्रभाकर जोग

स्वर – सुधीर फडके
————————-

एका युगाचा अस्त

आज सकाळी उठल्या उठल्या मिळालेली बातमी मनाला विषण्ण करणारी होती. महाराष्ट्राचे लाडके आणि तितकेच आदरणीय असे ज्येष्ठ कवि, गायक आणि संगीतकार श्री यशवंच देव हे आता कायमचे आम्हाला सोडून देवाघरी गेले. इतक्या उंचीच्या या एकाच कलाकाराशी योगायोगाने माझी ओळख झाली होती आणि त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसून त्यांचे चार शब्द ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते. त्यांच्याबद्दलच्या माझ्या आठवणी मी या ठिकाणी शब्दबद्ध केल्या आहेत.
आमच्या देवसरांना विनम्र श्रद्धांजली आणि त्यांच्या आत्म्याला सद्गति लाभो अशी प्रार्थना.
https://anandghare2.wordpress.com/2016/03/27/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A5%AE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF/
————————————–

नवी भर दि. १२-०४-२०२१

अरे देवा, तुझी मुले अशी का रे भांडतात
कुणी एकत्र नांदती, कुणी दूर दहा हात

जात पात पाहुनिया सारा व्यापार ठरतो
मोठेपणा माणसाला का रे जन्मासवे येतो
कुणी लोळे वैभवात, कुणी पोळतो चिंतेत

नाथाघरचे भोजन, सारा गाव पंगतीला
दूध भात सर्वांमुखी आग्रहाने भरविला
थोर संतांच्या या कथा आम्हा साऱ्यांच्या मुखात

गीत व संगीत–यशवंत देव.
स्वर—सुधीर फडके

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s