गणपतीच्या आरत्या

 

आरती१

नवी भर दि.११-०९-२०१९ 

गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो त्यात फ़क्त 3 कड़वी म्हटली जातात, पण मूळ रामदास स्वामी लिखित आरती ७ कडव्यांची आहे. ती खालीलप्रमाणे आहे

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिरविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ जय ० ॥ ७ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥

!!गणपती बाप्पा मोरया!!

**************************************

गणेशोत्सवांमध्ये आरत्यांना खूप महत्व असते. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरातले सगळे सदस्य आणि त्यांचे आप्तेष्ट, शेजारी पाजारी वगैरे एकत्र जमून सामूहिकरीत्या आरत्या म्हणतात. आमच्या वसाहतीमध्ये माझ्या मित्रांचे टोळके रोज संध्याकाळी, खरे तर रात्री,  एकत्रपणे एकामागोमाग एक करून सगळ्यांच्या घरी जाऊन चढाओढीने आरत्या म्हणत आणि प्रसादभक्षण करत असत. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये वसाहतीतले खूप लोक आरतीच्या वेळी हजेरी लावतात. त्याच्या पाठोपाठ मनोरंजनाचे किंवा खाण्यापिण्याचे कार्यक्रम ठेवलेले असतात.

गणपतीच्या तीन आरत्या खाली दिल्या आहेत.

गणपतीची आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पुरवी प्रेम कृपा जायची |
सर्वांग सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ||१ ||

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मन:कामना पुरती, जय देव जय देव || धृ ||

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा |
चन्दनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरेजडीत मुगुट शोभे तो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || २ ||

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मन:कामना पुरती ||

लंबोदर पीतांबर फणीवरबंधना |
सरळ तोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना |

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मन:कामना पुरती || ३ ||

……………………………………………

श्री गणपतीची आरती

नाना परिमल दुर्वा शेंदूर शमीपत्रे |
लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे |
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे |
अष्टही सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रे || १ ||

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती || जय || धृ ||

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती |
त्यांची सकलही पापे विघ्नेही हरती |
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती |
सर्वही पावुनी अंती भवसागर तरती || जयदेव || २ ||

शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी |
कीर्ती तयांची राहे जोवरी शशि – तरणी |
त्रेलोक्यी ते विजयी अद्भुत हे करणी |
गोसावीनंदन रत नाम स्मरणी | जयदेव जय || ३ ||

……………………………………………

श्री गणपतीची आरती (हिंदी)

शेंदूर लाल चढायो अच्छा गज मुखको |
दोंदिल लाल विराजे सुत गौरीहरको |
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको |
महिमा काहे न जाय लागत हूँ पदको || १ ||

जय जय जी गणराज विद्यासुखदाता |
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता || धृ ||

अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी |
विघ्नविनाशक मंगल मूरत अधिकारी |
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबी तेरी |
गंडस्थलमदमस्तक झुले शशिबिहारी || २ ||

जय जय जी गणराज विद्यासुखदाता |
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ||

भावभगतसे कोई शरणागत आवे |
संतत संपत सबही भरपूर पावे |
ऐसे तुम महाराज मोको अति भावे |
गोसावीवंदन निशिदिन गुण गावे || ३ ||

जय जय जी गणराज विद्यासुखदाता ||
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ||
…………………………………………..

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

श्री.शिरसाट यांनी सुखकर्ता दुखहर्ता या आरतीसंबंधी नवी माहिती जमा करून आपल्या फेसबुकाच्या फलकावर दिली आहे. ती वॉट्सअॅपवरून मला जशी मिळाली तशी खाली दिली आहे.  या आरतीमधल्या एकेका ओळीचा अर्थ लावून त्यातून श्री.शिरसाट यांनी कांही वेगळे निष्कर्ष काढले आहेत.  त्याचप्रमाणे समर्थ रामदासानी छत्रपति शिवाजी महाराज यांच्याकडून धनधान्य वगैरे घेऊन एक मोठा गणेशोत्सव साजरा केला होता अशी नवी माहिती दिली आहे.

सुखकर्ता दुखहर्ता संबंधित नवीन माहिती

सुखकर्ता दुखहर्ता ही आरती समर्थ रामदास स्वामींनी किती साली रचली ? यात रामदास स्वामींनी “वार्ता विघ्नाची” म्हणजे नक्की कुठल्या विघ्नाचा उल्लेख केला आहे ? “संकटी पावावे निर्वाणी रक्षावे” म्हणजे नक्की कुणाच्या रक्षणाची प्रार्थना त्यांनी गणपती कडे केली आहे ?

१६५८, “वार्ता विघ्नाची” : अफझलखानाच्या स्वारीचे स्वराज्यावरील विघ्न, “संकटी पावावे निर्वाणी रक्षावे” : आमच्या शिवाजी राजांना या संकटामध्ये पाव आणि त्यांचे रक्षण कर

सुखकर्ता दुःखहर्ता……ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच.

देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.

समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !!

सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !!

समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले. दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते.

घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती.

या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो.

वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची !

हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे.

शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!४ ते माघ शु.!! ५ गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे.

या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली . त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो .

समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !!

आकारा आकरी खंडी कोठी पाठविली ! हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया!!

११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे.

श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे. पहा…..

दास रामाचा वाट पाहे सदना !

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !!

शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी १८ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले.

हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला.

आज महाराष्ट्रात प्राचीन सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे पुरावे सापडतात ते हया उत्सवानंतरचे आहेत. हा उत्सव सुंदरमठ रामदास पठारावर पुन्हा नव्याने पाच दिवसाचा सुरू झाला असून या उत्सवातून प्रेरणा घेऊन श्री क्षेत्र शेंदूरमळई हे गुरुकुल येथेही हा उत्सव सुरू झाला आहे. आपण आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवात ही माहिती जरूर पुरवावी.वरील संशोधन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी केले असून हया माहितीचे सर्व अधिकार राखीव आहेत. या माहितीचा संबंध कोणत्याही जात, धर्म ,पंथ ,सांप्रदाय ,पक्ष ,संघटना यांच्याशी नाही.

श्री. वसंत शिरसाट, यांच्या फेसबुक वॉल वरुन

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

घालीन लोटांगण

आरत्या म्हणून झाल्यानंतर ‘घालीन लोटांगण’ पासून सुरुवात करून ‘कृष्ण कृष्ण हरे हरे’ पर्यंत पांच रचना एकापाठोपाठ एक करून घडाघडा म्हणण्याची पद्धत आहे. त्याबद्दल संशोधन करून श्री.रवी अभ्यंकर यांनी जी माहिती पुरवली आहे ती वॉट्सअॅपद्वारे मला जशी मिळाली तशी खाली दिली आहे.

ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन 👉

घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला ‘त्वमेव माता…’ ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ?

या माझ्या प्रश्नावर माझा मित्र रवी अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती पुरवली ती पुढे देत आहे.

रविला भेटलो की ‘लोटांगण’ नाही घातले तरी ‘प्रेमे आलिंगीन’ नक्की !!!

– रवी उवाच 👉

विकास,

‘घालीन लोटांगण’ हे कॉकटेल काव्य आहे, ह्यातली पाच कडवी कुठल्या तरी भक्ताने इथून तिथून जमवून त्यांचं मिश्रण केलं आहे.

(१) पहिलं कडवं ‘घालीन लोटांगण’ हे तू लिहिल्याप्रमाणे नामदेवांचं आहे. त्याला बिचाऱ्याला कल्पना नसेल पुढे त्याच्या काव्याला किती ठिगळं लागणार आहेत त्याची.

(२) दुसरं कडवं ‘त्वमेव माता च पिता त्वमेव’ हे गणपती किंवा कुठल्या देवाला उद्देशून नसून तो गुरुस्तोत्राचा भाग आहे. शंकराचार्यांनी श्रीगुरुस्तोत्रं लिहिलं, ज्यात आपल्याला माहिती असलेला ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्रविष्णु’ श्लोक समाविष्ट आहे.

(३) तिसरं कडवं ‘कायेन वाचा’ हे श्रीमद्भागवतपुराणातलं आहे. एकूण अठरा पुराणांपैकी हे एक, व्यासांनी लिहिलेलं. कायेन वाचा हा श्लोक स्कंध ११, अध्याय २ ह्यामध्ये ३६ वा श्लोक आहे.

(४) चौथं कडवं ‘अच्युतम केशवं’ हे ‘अच्युताष्टकम्’ ह्या शंकराचार्यांच्या काव्यातून घेतलं आहे. मजा म्हणजे काव्याचं नाव जरी ‘अच्युताष्टकम्’ आहे तरी त्यात नऊ श्लोक आहेत.

(५) पाचवं आणि शेवटचं कडवं ‘हरे राम हरे राम’ सर्वात सोपं. ते ‘कलिसन्तरण’ ह्या उपनिषदातलं आहे. ह्या उपनिषदाची सुरुवात ‘ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यंकरवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।’ आपल्या सर्वांनाच माहिती आहे.

तर अशी ही प्रार्थना जी आपण गणपतीसमोर म्हणतो, त्यातलं एकही कडवं गणपतीला उद्देशून नाही.

— रवी अभ्यंकर

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मंत्र पुष्पांजली

गणपतीची आरती झाल्यावर मंत्र पुष्पांजली म्हणण्याची प्रथा आहे. ही मंत्र पुष्पांजली म्हणताना, आरतीसारख्या टाळ्या वाजवीत नाहीत तर हात जोडून प्रार्थना केली जाते. कित्येक ठिकाणी हातात फुले किंवा अक्षता ठेवल्या जातात. मंत्र पुष्पांजली संपली की ते सगळे गणेशाला समर्पित केले जाते. मात्र या मंत्र पुष्पांजलीचा अर्थ काय याची बऱ्याच लोकांना फारशी माहिती नसते

मंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती खालीलप्रमाणे – या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल. प्रत्येकाचा अर्थ पुढे दिला आहे.

श्लोक १ : यज्ञेन यज्ञमयजन्त देवा: स्तानि धर्माणि प्रथमानि आसन् तेह नाकं महिमान: सचन्तयत्र पूर्वे साध्या:संति देव:

अर्थ : देवांनी यज्ञाच्या द्वारे यज्ञरूप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.

श्लोक २ : ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने। नमोवयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामकामाय मह्यम् । कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम:

अर्थ : आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकूल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वर कुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची) पूर्ति प्रदान करो.

श्लोक ३ : (प्रथमार्ध) ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं।

अर्थ : आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.

श्लोक ३ : (द्वितियार्ध) समन्तपर्यायीस्यात् सार्वभौम: सार्वायुष: आंतादापरार्धात्। पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकराळ इति।

अर्थ : आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंध दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्षपर्यंत सुरक्षित राहो.

श्लोक ४ : तदप्येष: श्लोकोभिगीतो। मरुत: परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे। आविक्षितस्य कामप्रेर्वश्विदेवा: सभासद इति॥

अर्थ : या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हंटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.

एकदंताय विद्महे | वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दंती प्रचोदयात् ||
आम्ही त्या एकदंताला जाणतो. त्या वक्रतुण्डाचे ध्यान करतो. म्हणून तो गणेश आम्हाला स्फूर्ती देवो.

मंत्रपुष्पांजलिम् समर्पयामि ।
मी ही मंतरलेल्या फुलांची ओंजळ समर्पण करतो.

संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्यांची जाणीव प्रत्येकाला करून देणारी ही विश्वप्रार्थना. अंतिम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील, पंथोपंथ विविध असतील, परंतु सर्वाचा उद्देश एक, सर्व मतपंथांच्या विषयी समादर, सर्व मतपंथाच्या प्रगतीच्या सर्वाना समान संधी असलेले, सर्वहितकारी राज्य तेव्हाच शक्य आहे जेव्हा संपूर्ण मानवजातीमध्ये सहिष्णू समरस एकात्मतेची भावना असेल.

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

3 thoughts on “गणपतीच्या आरत्या”

  1. समर्थ रामदास स्वामींनी अशा प्रकारे आरती लिहील्याचे आज पर्यंत माझ्या वाचनात नाही.

    कृपया संदर्भ द्या.

    1. आंतरजालावर भटकतांना मिळालेले शिंपले आणि गारगोट्या यांचाच हा संग्रह आहे. आता त्यात वॉट्सअॅपची भर पडली आहे. ज्या रचना मला विश्वासार्ह्य तसेच संग्राह्य वाटल्या त्या मी इथे दिल्या आहेत. त्यावर आणखी सखोल सशोधन करण्याची कुवत माझ्याकडे नाही. त्यामुळे त्यांचे समर्थनही मी करत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s