प्रसिद्ध कवींच्या काव्यरचना

या ब्लॉगकडे लक्ष द्यायला मला गेले वर्षभर वेळ न मिळाल्याने माझे इकडे दुर्लक्ष झाले होते. तरीही वाचकांनी या स्थळाला भेटी दिल्या आणि वाचनांची संख्या ५०,००० चा आकडा पार करून पुढे नेली. यासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार.
हा आनंद साजरा करण्यासाठी मी चार प्रसिद्ध कवींच्या मला आवडलेल्या चार काव्यरचना आज देत आहे. त्यातली पहिली कविता मी शाळेत असतांना शिकलेली आहे आणि इतर तीन कविता माझ्या वाचनात अलीकडेच आलेल्या आहेत.    दि.२५-११-२०१४

त्या चार कवितांमध्ये आता वेळोवेळी भर घालीत आलो आहे. याशिवाय प्रसिद्ध कवींच्या कविता आणि माहिती या स्थळांवर दिली आहे. दि.२०-०६-२०१९

हे एक फारच लहानसे संकलन आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी याची व्याप्ती वाढवत जाऊन कवी आणि कविता या नावाने एक वेगळे पृष्ठ उघडले आहे. त्या पानावर सगळ्या कवितांचे दुवे आणि सगळ्या कवींची माहिती साठवली आहे. दि.०२-०९-२०२१   . . .   https://anandghare.wordpress.com/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be/

काही प्रसिद्ध कवींच्या विषयीचे लेख या स्थळांवर दिले आहेत.

कवी केशवसुत
कवीवर्य विंदा करंदीकरांना आदरांजली
कवयित्री इंदिरा संत
कविवर्य ग्रेस
कविवर्य मंगेश पाडगावकर आणि त्यांची गीते 

कविवर्य सुरेश भट

१. सतारीचे बोल – केशवसुतांची कविता

काळोखाची रजनी होती
हदयी भरल्या होत्या खंती
अंधारातचि गढले सारे
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यातुन मी होतो हिंडत,
एका खिडकीतुनि सूर तदा
पडले…. दिड दा, दिड दा, दिड दा …..१

जड हृदयी जग जड हे याचा,
प्रत्यय होता प्रगटत साचा
जड ते खोटे हे मात्र कसें
ते न कळे, मज जडलेच पिसे
काय करावे, कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावे
मग मज कैसे रुचतील वदा
ध्वनि ते …. दिड दा, दिड दा, दिड दा …..२

सोसाट्याचे वादळ येते
तरि ते तेव्हा मज मानवते
भुते भोवती जरी आरडती
तरि ती खचितचि मज आवडती
कारण आतिल विषण्ण वृत्ती
बाह्य भैरवी धरिते प्रीती,
सहज कसे तिज करणार फिदा
रव ते …. दिड दा, दिड दा, दिड दा …..३

ऐकुनी तो मज जो त्वेष चढे
त्यासरशी त्या गवाक्षाकडे
मूठ वळुनि मी हात हिसकिला
पुटपुटलोही अपशब्दांला
महटले आटप आटप मूर्खा
सतार फोडुनि टाकिसी न का
पिरपिर कसली खुशालचंदा
करिसी …. दिड दा, दिड दा, दिड दा …..४

सरलो पुढता चार पावले
तो मज न कळे काय जाहले
रुष्ट जरी मी सतारीवरी
गति मम वळली तरि माघारी
ध्वनिजाली त्या जणू गुंतलो
असा स्ववशता विसरुन बसलो..
एका ओट्यावरी स्थिर तदा
ऐकत …. दिड दा, दिड दा, दिड दा …..५

तेथ कोपरे अंकी टेकुनि
करांजलीला मस्तक देउनि
बसलो, इतक्यामाजी करुणा…
रसपूर्ण गती माझ्या श्रवणा
आकर्षुनि घे, हदय निघाले
तन्मय झाले द्रवले, आले
लोचनातुनी तोय कितिकदा
ऐकत असता …. दिड दा, दिड दा …..६

स्कंधी माझ्या हात ठेवुनी
आश्वासी मज गमले कोणी,
म्हणे.. खेद का इतुका करिसी
जिवास का बा असा त्राससी
धीर धरी रे धीरा पोटी
असती मोठी फळे गोमटी
ऐक मनीच्या हरितील गदा
ध्वनि हे ….दिड दा, दिड दा, दिड दा …..७

आशाप्रेरक निघू लागले
सूर तधी मी डोळे पुशिले
वरती मग मी नजर फिरवली
नक्षत्रे तो अगणित दिसली
अस्तित्वाची त्यांच्या नव्हती
हा वेळवरी दादच मज ती
तम अल्प..द्युति बहु या शब्दा
वदती रव ते दिड दा, दिड दा …..८

वाद्यातुनि त्या निघती नंतर
उदात्ततेचे पोषक सुस्वर
तो मज गमले विभूति माझी
स्फुरत पसरली विश्वामाजी,
दिक्कालांसह अतित झालो,
उगमी विलयी अनंत उरलो
विसरुनि गेलो अखिला भेदां
ऐकता असता …. दिड दा, दिड दा …..९

प्रेमरसाचे गोड बोल ते
वाद्य लागता बोलायाते
भुललो देखुनि सकलहि सुंदर
सुरांगना तो नाचति भूवर
स्वर्ग धरेला चुंबायाला
खाली लवला… मजला गमला
अशा वितरिती अत्यानंदा
ध्वनि ते …. दिड दा, दिड दा, दिड दा …..१०

शांत वाजली गती शेवटी,
शांत धरित्री शांत निशा ती
शांतच वारे, शांतच तारे
शांतच हृदयी झाले सारे
असा सुखे मी सदना आलो
शांतीत अहा झोपी गेलो
बोल बोललो परी कितिकदा
स्वप्नी …. दिड दा, दिड दा, दिड दा …..११

—————————————-

२. सिंहस्थ – कुसुमाग्रजांची कविता

व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर |
संताचे पुकार वांझ झाले ||
रस्तोरस्ती साठे बैराग्यांचा ढीग |
दंभ शिगोशीग तुडुंबला ||
बँड वाजविती सैंया पिया धून |
गजाचे आसन महंतासि ||
भाले खडग हाती नाचती गोसावी |
वाट या पुसावी अध्यात्माची ?
कोणी एक उभा एका पायावरी |
कोणास पथारी कंटकाची ||
असे जपीतपी प्रेक्षकांची आस |
रुपयांची रास पडे पुढे ||
जटा कौपिनाची क्रीडा साहे जळ |
त्यात होत तुंबळ भाविकांची ||
क्रमांकात होता गफलत काही |
जुंपली लढाई गोसाव्यांची ||
साधु नाहतात साधु जेवतात |
साधु विष्ठतात रस्त्यावरी ||
येथे येती ट्रक तूपसाखरेचे |
टॅकर दुधाचे रिक्त होती ||
यांच्या लंगोटीला झालर मोत्याची |
चिलिम सोन्याची ज्यांच्यापाशी ||
येथे शंभराला लाभतो प्रवेश |
तेथे लक्षाधीश फक्त जातो ||
अशी झाली सारी कौतुकाची मात |
गांजाची आयात टनावारी ||
तुका म्हणे ऐसे मायेचे मईंद |
त्यापाशी गोविंद नाही नाही ||
————————

Talaghar Kusumagraj

    .…. नवी भर दि.२२-०५-२०१९

नदीबाई

नदीबाई माय माझी डोंगरात घर
लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर

नदीबाई आई माझी निळे निळे पाणी
मंद लहरीत गाते ममतेची गाणी

नदीमाय जल सा-या तान्हेल्यांना देई
कोणी असो कसा असो भेदभाव नाही

शेतमळे मायेमुळे येती बहरास
थाळीमध्ये माझ्या भाजी-भाकरीचा घास

श्रावणात आषाढात येतो तिला पूर
पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर

माय सांगे, थांबू नका पुढे पुढे चला
थांबत्याला पराजय चालत्याला जय

कवी – कुसुमाग्रज

.…. नवी भर दि.२०-०६-२०१९

——————————

देव आहे की नाही

परमेश्वर नाही,
घोकत मन मम बसले
मी एक रात्री,
त्या नक्षत्रांना पुसले

परी तुम्ही चिरंतन
विश्वातील प्रवासी
का चरण केधवा
तुम्हास त्याचे दिसले

स्मित करून म्हणल्या
मला चांदण्या काही
तो नित्य प्रवासी
फिरत सदोदित राही

उठतात तमावर
त्याची पाऊलचिन्हे
त्यांनाच पुससी तू,
आहे तो की नाही

कवी – कुसुमाग्रज

.…. नवी भर दि.३०-०७-२०१९


३.  धीर थोडासा हवा ! – विं. दा. करंदीकरांची कविता

कालौघ जावा लागतो अवतार घेण्याला नवा
विष्णूस त्या ! मग आपण धीर थोडासा हवा.
अंधार दाटे भोवतीं ; हाती असे इवला दिवा;
सारे दिवे पेटावया धीर थोडासा हवा.
मानू नको यांना मुके ; हे न अजुनी बोलके ;
बोलते होतील तेही; धीर थोडासा हवा.
शेत रुजले, वाढलेंही; डोलते वाऱ्यावरी,
पीकही येईल हाती; धीर थोडासा हवा.
स्वर लाभला; गुरुही भला; चाले रियाझही चांगला;
जाहीर मैफल जिंकण्या, धीर थोडासा हवा.
‘या गुणांचे चीज नाही’– तक्रार दुबळी व्यर्थ ही;
चीज होण्या वेळ लागे; धीर थोडासा हवा.
घाई कुणा ? वा केवढी ? काल ना पर्वा करी;
कालाबरोबर नांदण्या, धीर थोडासा हवा.
———————————————

४. जगत मी आलो असा – सुरेश भटांची कविता

जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही ।
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही ।।
जन्मभर अश्रूस माझ्या शिकवले नाना बहाणे ।
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही ।।
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो ।
पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही ।।
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी ।
एकदा हसलो जरासा मग पुन्हा हसलोच नाही ।।
वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले ति-हाइत ।
सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही ।।
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा ।
लोक मज दिसले अचानक मी कुठे दिसलोच नाही ।।

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s