बालकवी ठोंबरे, त्यांच्या कविता, श्रावणमासी आणि विडंबन

बालकवी ठोंबरे यांची माहिती, श्रावणमासी या कवितेचे रसग्रहण, ती पूर्ण कविता आणि तिची काही विडंबने या लेखात संग्रहित केली आहेत.

ही लेखमालिका पहा : कवि, कविता आणि विडंबने

नवी भर दि.०५-०५-२०२१ :

बालकवी

बालकवींना जाऊन शंभर वर्षे होऊन गेली असली तरी आजही त्यांची आठवण किती ताजी आहे हे आज मला मिळालेल्या या लेखांवरून दिसते. बालकवींच्या स्मृतीला सादर नमन. सर्व मूळ लेखकांचे मनःपूर्वक आभार

आज ५ मे… “बालकवी” त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा स्मृतिदिन…..
‘बालकवी’ आणि ‘त्र्यंबक बापूजी ठोंबरे’ या दोन नावांनी आपलं भावविश्व समृद्ध केलंय.. अगदी लहानपणापासून… शाळेच्या पाठयपुस्तकातून ‘फुलराणी’, ‘श्रावणमासी’ने आपल्या आयुष्यात आलेला हा कवी..
सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे,
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे…
आपल्या बालपणात हे आनंदगाणं फुलवणारा हा बालकवी…
झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर…
ही आर्द्रता आपल्या मनात रुजवणारा कवी….
ऐहिकाच्या ऐलतटावरुन आपला हा बालकवी पैलतडी निघून गेल्याला शतक लोटलं… तरीही आपणां सगळ्यांचं भावविश्व आजही व्यापून राहिलाय तो… आपल्या कवितांनी वाचकांच्या मनात अवघा निसर्ग फुलवणाऱ्या कवीनं वयाची तिशीही पार न करता वेगळ्याच धुंदीत वेगळ्याच मितीमध्ये निघून जावं, याला काय म्हणावं ?
ही चाफ्याची दोन फुले दो हाती
क्षण या वरती क्षण त्या वरती मी पाही…. कायमचं निघून जाण्यापूर्वी ठोंबरेंनी पार्वतीच्या हातात चाफ्याची फुलं ठेवून जाणं, हा कशाचा संकेत ? रुळावरुन चालताना गाडीची शिट्टीही ऐकू न येणं, कुठल्या जगात होते ठोंबरे? कुठल्या विचारात होते ? पार्वतीच्या ? एकदा ठरवूनही भेट हुकलेल्या रमाईच्या ? की त्या गूढ औदुंबराच्या ? काही प्रश्न अनुत्तरीत असतात, किंबहुना त्यांचं अनुत्तरीत राहणंच योग्य ठरावं.. उत्तरं सापडून का उगाच त्रास…
“ठोंबरे” ही सदानंद रेगे यांची कविता… एका समर्थ कवीनं दुसऱ्या समर्थ कवीवर तेवढ्याच समर्थपणे लिहिणं म्हणजे एक वेगळाच अनुभव… रेंगेची ही “ठोंबरे” वाचताना तळामुळातून खळबळून निघणं म्हणजे काय, याचा नव्याने साक्षात्कार झाला. आपल्याला जसं बालकवीच्या आयुष्यातून बाहेर नाही पडता येत, तसं या “ठोंबरे”मधूनही… आपल्या पिढीचं आयुष्य समृद्ध करणाऱ्या या कवीला भावपूर्ण अभिवादन !

चलाथोडे_बालपणात_जाऊया —-
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे —-या कवितेचे रचनाकार
मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो असे
त्र्यंबक_बापूजी_ठोंबरे यांचे आज पुण्यस्मरण ५ मे १९१८.
१९०७ च्या जळगाव येथील कवी संमेलनात त्यांना ’बालकवी’ ही पदवी मिळाली. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबऱ्यांना बालकवी ही पदवी दिली.बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत.
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे || धृ.||
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे || १ ||
सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे || २ ||
नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे || ३ ||
वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे || ४ ||
स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे || ५ ||
“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे।।
“वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!
“झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तो उघडे ।
तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ।।
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा ।
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा!
“बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।।
“फडफड करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती ।
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ।।
खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे ।
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे ।।”
अभिवादन “
**************************************************

निसर्गकवी बालकवी (Balkavi)
विनया खडपेकर22/05/2019
-बालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या आत्मचरित्रात तशी नोंद आहे. काहींनी तो दिनांक 5 मे असा नोंदला आहे. तिथी मात्र चैत्र वद्य नवमी हीच आहे.

बालकवी यांचे नाव त्र्यंबक बापूजी ठोमरे. त्यांचे मूळ आडनाव ठोंबरे असे होते. ते त्यांनी आणि त्यांच्या बंधूंनी उच्यारसौकर्यासाठी ठोमरे असे करून घेतले. त्यांचा जन्म खानदेशात धरणगाव येथे 13 ऑगस्ट 1890 या दिवशी झाला. त्यांच्या आईचे माहेर धरणगाव. ठोमरे कुटुंब मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे. बालकवी हे भावंडांतील मधील. त्यांची मोठी बहीण मनुताई (जिजी) आणि भाऊ अमृत. त्यांच्याहून धाकटी बहीण कोकिला, धाकटा भाऊ भास्कर. त्यांचे वडील पोलिस खात्यातील नोकरीसाठी खानदेशात गेले. वडिलांची बदली वारंवार होत असे आणि कुटुंब बदलीच्या गावी जात असे. बालकवी यांच्या आई गोदुताई यांना मराठी वाचता येत असे. त्या पोथ्या वाचत असत. गोदुताईंची आई दळताना भक्तीपर ओव्या स्वत: रचून म्हणत असे. बालकवी यांच्या मोठ्या बहिणीने-जिजीनेही ‘पांडवप्रताप’, ‘रामविजय’, ‘भक्तलीलामृत’ हौसेने वाचून काढले होते. जिजीचे शिक्षक पती प्रल्हादपंत भावे यांनी तिला ‘नवनीत’ वाचण्यास दिले. ते तिला इतके आवडले, की तिने त्याची पारायणे केली. बालकवी यांनीही जिजीबरोबर नवनीत वाचले. मोरोपंतांचे ‘आर्याभारत’ वाचले. बालकवींनी जिजीबरोबर भेंड्या लावण्यासाठी कविता पाठ केल्या. त्यांना आद्य अक्षराच्या कविता न आठवल्यास ते स्वत: ऐनवेळी कविता रचून म्हणत.

बालकवी कविता लहान वयात म्हणजे बाराव्या-तेराव्या वर्षी लिहू लागले. त्यांना लहानपणी विटीदांडू, आट्यापाट्या या खेळांची आवड नव्हती. त्यांना मित्रांबरोबर दूर फिरण्यास जाणे आवडे. ते रात्री दिवे लागल्यावर बोटांच्या सावल्यांमधून कुत्रा, घोडा, उंट, मनुष्य असे आकार भिंतीवर उमटवत. त्यांचे शिक्षण एरंडोल, धुळे, बडोदा, अहमदनगर, पुणे येथे झाले. पण ते मॅट्रिक झाले नाहीत. त्या काळात वंगभंग चळवळ, स्वदेशी, स्वातंत्र्य हे शब्द चोहीकडे उसळत होते. बालकवीही त्या देशभक्तीने भारलेले होते. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षी ‘रावसाहेबी’ ही कविता पोकळ साहेबी करणाऱ्यांवर लिहिली होती. त्यांनी त्याच वयात ‘चहा’, ‘कपबशी’ अशाही, साहेबी संस्कृतीवर टिप्पणी करणाऱ्या काही कविता रचल्या होत्या. जिजींनी त्यांच्या आठवणींत बालकवींनी राजमाता जिजाईवर आणि पन्हाळगडावर कविता रचल्याचेही सांगितले आहे. बालकवींचा भाऊ अमृतराव जहाल राजकारणात काही काळ उतरला होता. त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला होता; त्याचा बालकवींनाही त्रास झाला.

वनवासी कवी यांना त्र्यंबक (बालकवी) आवडला. ते कीर्तनकार होते. ते त्याला घेऊन उज्जैन-देवासकडे निघाले. पण त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्र्यंबक अवघ्या दोन महिन्यांत वडिलांकडे परतला. पण त्र्यंबकमधील कवी त्या प्रतिकूल परिस्थितीतही जागा राहिला. जळगावमध्ये कविसंमेलन 1907 मध्ये झाले. त्या संमेलनाला रेव्हरंड टिळक, विष्णू मोरेश्वर महाजनी इत्यादी तेवीस प्रमुख कवी उपस्थित होते. अध्यक्षपदी कवी कर्नल डॉ. कीर्तिकर होते. रेव्हरंड टिळक यांचे ‘चित्रकाव्य’ या विषयावरील भाषण संपता संपता बालकवी उभे राहिले व त्यांनी स्वत:च्या कविता म्हणण्यास सुरुवात केली. कवितेची सुरुवातच ‘अल्पमती मी बालक, नेणे काव्यशास्त्रव्युत्पत्ती। कविवर्यांनो मदिय बोबडे बोल धरा परि चित्तीं’॥ अशी केली. त्याच्या कविता ऐकताना सभा तल्लीन झाली. रे. टिळक यांनी शाब्बास म्हणून त्यांची पाठ थोपटली. त्यांना ‘बालकवी’ अशी पदवी दिली. त्याचा पागोटे व जरीकाठी उपरणे देऊन गौरव केला. तेव्हापासून ठोमरे ‘बालकवी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या वडिलांचे निधन नंतर वर्षभरातच झाले. घरची सर्व जबाबदारी बालकवींवर पडली. त्यांनी अहमदनगर, पुणे महाबळेश्वर येथे शिक्षकाची नोकरी केली, शिकवण्या केल्या. पण त्याबरोबर त्यांचे काव्यलेखन सतत बहरत गेले. त्यांची कविता आरंभी ‘आत्मज आपण भरतभूमिचे असुनि काय बा केले।’, ‘ठोकोनी दंडा पिटोनी मांड्या, जपान पुढती येई।’ अशा प्रकारची वृत्तबद्ध, काहीशी कृत्रिम होती. ती पुढे मृदुशब्दी, प्रवाही होत गेली. त्यांना निसर्ग-कवितेत स्वत:चा सूर सापडला. त्यांचा चाहता मित्र-परिवार खूप वाढत गेला. त्यांमध्ये गुरूतुल्य ना. वा. आणि लक्ष्मीबाई टिळक यांचे कुटुंब होते; गोविंदाग्रज यांच्यासारखे (रा ग. गडकरी) गाजत असलेले नाटककार-कवीही होते. बालकवींच्या कौटुंबिक जीवनात मात्र सतत कलह होता. त्यांचे बंधू अमृतराव आणि त्यांची पत्नी यांचे वागणे दिवसेंदिवस अधिक बेजबाबदार होत गेले. बालकवी यांची आई, अमृतराव व त्यांची पत्नी या सर्वानी मिळून बालकवींचे मन पत्नी पार्वतीबाईंबद्दल कलुषित केले. त्यामुळे बालकवी घराबाहेर हसूनखेळून सगळ्यात मिसळत. मात्र त्यांनी पत्नीला घरात नीट वागवले नाही; वेळप्रसंगी मारहाण ही केली. अमृतरावांचे आणि बालकवींचे कौटुंबिक कारणावरून भांडण झाले. ते मन शांत होण्यासाठी कविमित्र सोनाळकर यांना भेटण्यास जावे, म्हणून भादली स्टेशनकडे चालत निघाले. ते गाडी पकडण्यासाठी रूळांमधून चालत-पळत जात असताना, मालगाडीखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला.

बालकवी यांच्या पद्यरचना लोकांपर्यंत पोचल्या, पण त्यांनी काही गद्य लेखनही केलेले होते. त्यांचा ‘आधुनिक मराठी कविता : तिचे स्वरूप’ हा लेख 23 जानेवारी 1912 च्या ‘केसरी’मध्ये प्रसिद्ध झाला होता. बालकवींनी मिस डब्ल्यू. एम. हेन यांनी संग्रहित केलेल्या इंग्रजी गोष्टींच्या आधारे सोळा गोष्टी लिहिल्या होत्या. त्या छोट्या बोधकथेच्या वळणाच्या गोष्टी होत्या. ‘बाँबे ट्रॅफर’ आणि ‘बुक सोसायटी’ने त्या ‘सृष्ट चमत्कार’ या नावाने प्रसिद्ध केल्या होत्या. त्यांचा पत्रव्यवहार बहरला होता.

बालकवी यांची सहा पत्रे ‘विश्रब्ध शारदा’ या पुस्तकात वाचण्यास मिळतात. त्यांतील चार सोनाळकर यांना लिहिलेली आहेत आणि दोन ना. वा. टिळक यांचा मुलगा देवदत्त. त्याला लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतिचित्रे’मध्ये दिसणारे बालकवी हसरे, खोडकर आहेत. पार्वतीबाईंच्या आत्मचरित्रात दिसणारे बालकवी कठोर, करड्या स्वभावाचे पारंपरिक नवरा आहेत. पत्रांत दिसणारे बालकवी भावुक आहेत. त्यांनी 12 जून 1915 या दिवशी सोनाळकर यांना लिहिले, ‘…माझे मन तर पाणी टाकून विझवलेल्या विस्तवाप्रमाणे झाले आहे. खाली कोळसे व वर मात्र थोडीशी कल्पनेची धग ह्याशिवाय काही राहिले नाही. सर्वत्र सामसूम. प्रेतकळा आलेली आहे, पण असे सर्वांचे होऊ नये. कोणी तरी काही तरी करा…आत्मा, ईश्वर, ब्रह्म, माया, पूर्वजन्म सगळी स्वप्ने आहेत. ती बालमनाचे समाधान करू शकतील. त्यांचा त्यांच्यावर विश्वास बसेल, पण निदान माझा तरी त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. नाइलाज आहे. …असो लिहिताना भलतीकडे वाहवलो. पत्र पाठवा, उद्योगाला लागा.’ त्यांनी देवदत्त टिळक यांना लिहिलेल्या पत्राच्या शेवटी सही करताना लिहिले आहे : ‘पत्र संपले. हृदय भरलेलेच आहे.’ –त्र्यंबक

बालकवी यांच्या अनेक कवितांमधूनही ही उदासीनता, भावनोत्कटता प्रत्ययाला येते. तरी बालकवी यांच्या ‘श्रावणमासी’, ‘फुलराणी’, ‘निर्झरास’ या कविता मराठी मनात ठसल्या आहेत. त्यांच्या कवितेतील आकाश, चद्र-चांदण्या, निर्झर, हिमशिखरे, पुले, हरणे, बगळे, ऊन-पाऊस, इंद्रधनुष्य सारे काही वाचकाला सर्वकाल सुखावते. त्या कवितांना विलक्षण चित्रमयता आहे. दृश्ये डोळ्यांसमोर सहज उभी राहतात. कुसुमाग्रज यांनी बालकवी यांच्यावर रचलेली छोटीशी कविता त्यांच्या मन:सृष्टीवर भाष्य करते : हे अमर विहंगम! गगनाचा रहिवासी! त्या नीलसागरावरचा चतुर खलाशी! प्रिय सखा पुलांचा, ओढ्यांचा सांगाती ! त्यांच्यास्तव धुंडुनि ताराकण आकाशीं ! आणसी धरेवर अक्षर या धनराशी!
– विनया खडपेकर

vinayakhadpekar@gmail.com
——————————————————————————————————–

स्मृतिचित्रे या पुस्तकात बालकवी यांचा आलेला उल्लेख
‘बालकवी यांच्या आठवणी’ हे लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतिचित्रे’ या पुस्तकातील एक स्वतंत्र प्रकरण आहे. जळगावमध्ये झालेल्या 1907 मधील पहिल्या मराठी कविसंमेलनात उत्स्फूर्तपणे कविता करणाऱ्या मुलाला रेव्हरंड ना.वा. टिळक यांनी पाहिले व त्याला ‘बालकवी’ ही पदवी दिली. टिळक यांना त्यांचे शिक्षण झाले पाहिजे अशी काळजी वाटत होती. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली बालकवी यांना ठेवले. बालकवी अशक्त होते म्हणून टिळक यांनी त्यांच्याकरता कॉर्डलिव्हर ऑइल आणले. बालकवी यांनी लक्ष्मीबाई यांना आईच्या जागी मानले होते. बालकवींना विषमज्वर हा आजार झाला, त्यावेळी त्यांना दोघांनीही फुलांप्रमाणे जपले. बालकवी यांची खरी आई म्हणाली, ‘तुम्हीच त्याला नवा जन्म दिला आहे.’ बालकवी यांनी कविता केली, की ती लक्ष्मीबाई यांनी लगेच ऐकली पाहिजे असा बालकवींचा हट्ट असे. त्या कामात असल्या व त्यांनी कविता ऐकली नाही, की बालकवी त्या कवितेचा कागद फाडूनच टाकायचे.

लक्ष्मीबाई म्हणतात, ‘बालकवी घरात आल्याचा काळ कवितांचाच काळ होता.’ लक्ष्मीबाई यांनी बालकवी यांच्या मनावर कोणाचा कधी अपमान करू नये हा संस्कार केला. बालकवी यांचा स्वभाव चंचल होता; सतत बदलत असे. ते लक्ष्मीबाई यांच्याकडे असताना, आनंदी, खेळकर असत. पण तेथून बाहेर पडल्यावर त्यांची वृत्ती खिन्न आणि निराश अशी होई. टिळक पती-पत्नी त्यांच्यावर इतके प्रेम करतात म्हणजे त्यांना बालकवींना ख्रिस्ती बनवायचे आहे असे बालकवी यांच्या मनात आले. तेव्हा, लक्ष्मीबाई यांनी सांगितले, ‘जे प्रेम एखाद्या हेतूने केले जाते ते प्रेमच नव्हे. आमचे प्रेम म्हणजे नाटक आहे असे तुला वाटते का’? हा प्रश्न विचारल्यावर बालकवी यांना त्यांची चूक कळली. त्यांना दुसऱ्यांच्या कवितांचा आदर वाटे. त्यांनी एकदा टिळकांची ‘वनवासी फूल’ ही कविता विद्यार्थ्यांना उत्तम शिकवली होती. लक्ष्मीबाई यांनी घरातील खेळ, छोटी छोटी भांडणे अशा बालकवी यांच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्या म्हणतात, ‘त्यांच्या घरात माणसे खूप आली, पण बालकवींप्रमाणे कोणीच नाही! ते प्रेमळ, मनमिळावऊ व निष्कपट होते.’

– नितेश शिंदे

info@thinkmaharashtra.com
—-

बालकवी… प्रिय सखा फुलांचा… ओढ्यांचा सांगाती!
Swati Mahalank

बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे! बालसुलभ कुतुहलानं निसर्गघटितांकडे पाहणारा आणि निसर्गातल्या लोभस सौंदर्यानं बेभान होणारा शब्दसूरलहरींचा प्रवासी! त्यांच्या काव्यप्रवासाचा रसास्वाद घेणारा हा लेख त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रसिद्ध करत आहोत.
……..
बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे! बालसुलभ कुतुहलानं निसर्गघटितांकडे पाहणारा आणि निसर्गातल्या लोभस सौंदर्यानं बेभान होणारा शब्दसूरलहरींचा प्रवासी! जळगावातल्या धरणगाव इथं १३ ऑगस्ट १८९० रोजी बालकवींचा जन्म झाला. खरं तर ठोंबरे कुटुंब मूळचं कोपरगावचं; पण बापूराव नोकरीनिमित्त धरणगावला स्थायिक झाले. बापूराव आणि गोदूताईंच्या पाच अपत्यांमध्ये जिजी थोरल्या आणि बालकवी ऊर्फ भाऊराव मधले! वडिलांची पोलीस खात्यातील बदलीची नोकरी. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची आबाळ झाली. त्यांची वडील बहीण जिजी हिनं आरंभीचे संस्कृताचे धडे त्यांना दिले. कवितेची गोडीही तिनंच लावली. जिजींना स्वतःला कवितेची, वाचनाची विलक्षण आवड होती. आर्याभारत, भक्तलीलामृत, रामविजय, पांडवप्रताप यांचं वाचन बालकवींनी सर्वप्रथम केलं ते जिजींबरोबर! संस्कृतप्रचुर शब्दरचना, पंडिती कवितेचा थाट बालकवींच्या काव्यात आढळतो तो यामुळेच! कवितेचा वारसा बालकवींना लाभला तो आजीकडून! त्यांची आजी फार सुरेख ओव्या रचायची; पण बालकवींच्या काव्यप्रेमाला खतपाणी मिळालं ते मात्र जिजींकडून! जिजी ऊर्फ लक्ष्मीबाई आणि त्यांचे यजमान प्रल्हादपंत भावे यांचं बालकवींवर अपत्यवत प्रेम होतं. बालकवींच्या पहिल्या काव्याचं पहिलं कौतुक या दाम्पत्याकडूनच झालं. सुरुवातीला मंगलकार्यासाठी पद्य लिहिणाऱ्या, ‘वनवासी’ नामक हरदासाच्या कीर्तनासाठी पदं लिहिणाऱ्या या कवीनं मोरोपंतांच्या प्रभावानं आर्यासुद्धा रचल्या. वयाच्या तेराव्या वर्षी नवापूर इथं असताना त्यांनी पहिली कविता लिहिली आणि निसर्गावरच्या उत्कट प्रेमानं ओथंबलेल्या या कवितेमुळे मराठी काव्यप्रांतात एक नवं युग सुरू झालं. पुढे रामचंद्र कृष्ण वैद्य ऊर्फ वनवासी या हरदासाबरोबर उज्जयिनीला गेल्यावर त्यांच्यासाठीही बालकवींनी अनेक कविता लिहिल्या. पुढच्या तीन-चार वर्षात त्यांची कविता अधिकाधिक विकसित होत गेली आणि जळगाव इथं भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात म्हणजे १९०७मध्ये संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना ‘बालकवी’ ही उपाधी दिली आणि त्यानंतर ‘बालकवी’ नावाची अक्षय कांचनमुद्रा मराठी काव्यप्रांतात उमटून राहिली.

या कविसंमेलनानंतर दीड महिन्याने बालकवी नगरला रेव्हरंड टिळकांकडे राहायला गेले. टिळकांनी त्यांना अमेरिकन मिशन हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात दाखल केले. रेव्हरंड टिळक आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे विद्वान आणि रसिक दाम्पत्य! त्यांनी बालकवींवर मुलासारखं प्रेम केलं. त्यांच्या घरी अनेक मासिकं, पुस्तकं यायची. विविध क्षेत्रांतली मान्यवर मंडळी यायची. त्यांचं घर म्हणजे सरस्वतीचा खुला दरबार होता. त्या वातावरणात बालकवी रमून गेले. त्यांची काव्यकलिका उमलली ती रेव्हरंड टिळकांच्या घरी आणि खऱ्या अर्थानं बहरली ती पुण्याला गोविंदाग्रजांच्या सहवासात! त्या वेळी नगरमध्ये सुचलेल्या त्यांच्या अनेक कविता आनंद, मनोरंजन, खेळगडी, बालबोधमेवा या तत्कालीन मासिकात प्रसिद्ध झाल्या आणि बालकवी कवी म्हणून नावारूपाला येऊ लागले. या साऱ्या काळात लक्ष्मीबाई टिळकांच्या मायेची ऊब आणि ज्ञानाचा स्पर्श त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवीत होती. बालकवींच्या आयुष्याला वळण देणाऱ्या, त्यांच्यावर मुलासारखं निस्सीम प्रेम करणाऱ्या दोन ‘लक्ष्मी’ त्यांच्या जीवनात आल्या. एक म्हणजे थोरली बहीण जिजी ऊर्फ लक्ष्मीबाई भावे आणि दुसऱ्या साहित्यलक्ष्मी लक्ष्मीबाई टिळक. या दोन्ही लक्ष्मींनी बालकवींना घडवले, वाढवले. तिसरी लक्ष्मी म्हणजे संपत्ती. ती मात्र अखेरपर्यंत त्यांच्यापासून फटकूनच राहिली.

बालकवींना आपल्या कवित्वाची जाणीव ज्या काळात झाली त्याच्या सुमारे वीस वर्षे अगोदर केशवसुतांनी आपली पहिली कविता लिहिली. केशवसुत हे आधुनिक मराठी कवितेचे जनक. त्यांचा प्रभाव नंतरच्या काळातील ज्या कवींवर पडला त्यामध्ये रेव्हरंड टिळक, गोविंदाग्रज यांच्याप्रमाणेच बालकवीही होते. रेव्हरंड टिळकांनी काव्य आणि तत्त्वज्ञानाचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. गोविंदाग्रजांनी प्रेमकवितांचा मार्ग स्वीकारला. बालकवींना मात्र निसर्गकवितेचा प्रवाह आपल्या काव्यप्रकृतीला अधिक साजेसा वाटला. त्यांनी तोच जवळ केला, फुलवला आणि आपल्या अनोख्या प्रतिभेचे रंग त्याला देत त्यातून मराठी कवितेला वेगळंच रूपसौंदर्य प्रदान केलं. या लावण्यमयी कवितेनं रसिक आणि समीक्षक यांना नेहमीच भुरळ घातली आणि बालकवी हे मराठी कवितेला पडलेलं एक मधुर स्वप्न ठरलं.

बालकवींची कविता खऱ्या अर्थानं बहरली ती निसर्गातल्या दिव्य आणि मंगल सौंदर्यामुळेच! त्यांची कविता म्हणजे जणू निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे तालासुरात सजलेले सहजोद्गारच! निसर्ग हा दिव्यत्वाने भरलेला आहे. त्यात मानवी जीवनात नसलेली पूर्णता आढळते, अशी श्रद्धा त्यांच्या मनात होती. निसर्गामध्ये आनंद, प्रेम, सौंदर्य, चैतन्य, औदार्य आणि निःस्वार्थ सहजीवन दडलेलं आहे. मानवी जीवनातल्या अशाश्वतेचा लवलेशही निसर्गात नाही या एकाच गोष्टीमुळे त्यांचं मन निसर्गाशी एकरूप होऊन गेलं. निसर्गातल्या सौंदर्याप्रमाणेच त्यातून होणारा चैतन्यतत्त्वाचा साक्षात्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला परीसस्पर्श करून गेला. बालकवींना सृष्टीमध्ये आनंद व प्रेमाचे सौंदर्य भांडार गवसले. त्या सौंदर्याच्या अवलोकनानं दिव्य आणि निरागस आनंद प्राप्त होतो. या शाश्वत जगातले दुःखपूर्ण, स्वार्थी, हिणकस विचार आणि विकार मनात डोकावत नाहीत. अलौकिक शांती, तृप्ती प्राप्त होते आणि याच तृप्तीत एक उत्कट आनंदगीत बालकवी लिहून जातात.
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे।

बालकवींनी सृष्टीला ईश्वर मानले नाही, तर त्या जागी सृष्टिदेवता, सौंदर्यदेवता पाहिली. ती पाहताना त्यांच्या मनात प्रणयभावना उपजली आणि या तरुण, सुंदरी सृष्टीला मानवी स्वरूपात रममाण झालेली कल्पितानाच त्यांच्या अनेक कवितांनी जन्म घेतला. त्यांच्या एकूण काव्यसंभारात ३५ ते ४० कविता या निव्वळ निसर्गकविता आहेत. आनंदी आनंद, अरुण, निर्झरास, मधुयामिनी, श्रावणमास, मेघांचा कापूस, पक्ष्यांचे गाणे, ते डोंगर सुंदर दूरदूरचे बाई, संध्यातारक, आनंदी पक्षी या साऱ्या कवितांमधून आनंद जणू ओसंडून वाहतो.

नवयुवती उषासुंदरी दारी येऊन जणू आपल्या राजस हस्तांनी रम्य रंगवल्लिका रेखते आहे. दिवस आणि यामिनी परस्परांचे चुंबन घेतात आणि त्यांच्या अनुरागाच्या छटाच जणू पहाटे गगनात उमटतात. अरुणोदयाचा काल हा प्रेमकालच बनून जातो. बालकवी लिहितात –

परस्परांना दिशा म्हणाल्या प्रेमळ वचनांनी
विरहकाल संपला गा गडे प्रेमाची गाणी।
आम्ही गवळणी हृदयरसांनी पूजू प्रेमाला
प्रेमकाल हा! म्हणोत कोणी अरुणोदय याला।

बालकवींचं हे जणू उषासूक्तच आहे! स्वर्ग अणि भूमीचं ऐक्य घडवून आणणारा, मांगल्याचे पाट चराचरात प्रवाहित करणारा अरुण कविमनाला साद घालतो –

वाग्देवीने सहज गुंफिलेली बालकवींची रुचिर, सुंदर गाणी आजही मनाला भुरळ पाडतात. निसर्गाशी त्यांची असलेली एकरूपता हाच त्या गीतांचा आत्मा आहे. बालकवींच्या कवितेत सृष्टीचे रेखीव, रंगीत आरेखन वा यथातथ्य छायाचित्र नसते, तर त्यांच्या संस्कारक्षम मनावर उमटलेले सृष्टीचे लोभस प्रतिबिंब असते. नव्या निसर्गाचा शब्दरूप आविष्कार असतो. बालकवींचे निरीक्षण सूक्ष्म आहे अन् त्यांच्या संवेदनांचे विश्व रसरशीत, समृद्ध आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेत केवळ रंगांची मुक्तहस्तानं केलेली उधळणच असते असं नाही, तर त्यात नादांचे झरे वळणं घेतात, गंधांचे उच्छ्वास शब्दांवर तरंगत राहतात. स्वरसंवेदना आणि रंगसंवेदना यांची बालकवींच्या मनाला तरल जाण आहे.

बालकवींचं एक अत्यंत लोकप्रिय गीत म्हणजे ‘श्रावणमास!’ हे गीत म्हणजे मराठी रसिकांच्या मनातलं कोरीव लेणं आहे. या गीतातली चित्रदर्शी शैली, रंगसंवेदना आणि ओघवत्या नादमय शब्दांची नक्षी रसिकांना थेट श्रावण महिन्याचा राजस अनुभव देते आणि श्रावणातल्या सरसरणाऱ्या शिरव्यात चिंब थरारून टाकते. बालकवी म्हणतात –

श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे॥
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे॥

स्पर्श आणि रंगसंवेदनांचं विलक्षण आकर्षण हे बालकवींच्या अनेक कवितांचं वैशिष्ट्य. ‘मेघांचा कापूस’ कवितेतलं वर्णन याची नेमकी अनुभूती देणारं ठरावं. बालकवी म्हणतात –

फिकट निळीने रंगविलेला कापूस मेघांचा
कुणी फिरवला हळुवार त्यावरी हात कुसुंब्याचा
त्यातही हसली मंदपणे ती चंद्रकला राणी
कडेकडेच्या मेघांवर ये मोत्याचे पाणी।

बालवींनी निसर्गाचं वैविध्यपूर्ण रंगचित्र चितारलं. आजूबाजूचा निसर्ग त्यांच्या कविमनात प्रतिबिंबित झाला आणि त्यांच्या प्रतिभासौंदर्याचा अलौकिक रंग लेवून काव्यरूपानं शब्दबद्ध झाला. ही एक विलक्षण किमया आहे. ती किमया अनुभवताना रसिक मनोमन हरखून जतो. हरित तृणांची मखमल, जांभळी वनमाला, पिवळी शेते, पाचूची हिरवी राने, फिकट जांभळा मेघांचा कापूस, लाल गुलालाची मूठ, गंगेच्या शुभ्र जलाचा स्रोत, सोन्याहून पिवळे ऊन असा रंगांच्या सुंदरतेचा जलसा त्यांच्या कवितेत उभा राहतो. तो रसिकाला अशीच रम्य सौंदर्यानुभूती देतो. रंगात रंगलेल्या त्यांच्या कविता या राजस हस्तांनी रेखाटलेल्या रंगवल्लिका बनून जातात. दृक् संवेदनांची अशी शेकडो चित्रं बालकवींच्या कवितेत आहेत. सूर, रंगचित्रांच्या सोबतीला मधुर नादचित्रंही आहेत. ‘गीतस्वरांनी सृष्टी भरली’ ही अनुभूती कवीला येते ती यामधूनच! गंध आणि स्पर्श प्रतिमांचा सुयोग्य वापर या कवितांना परीसस्पर्श करून जातो. औदुंबर, मेघांचा कापूस ही तर रंगांच्या जादूची आणि स्वरांच्या किमयेची पैजा जिंकणारी उदाहरणं म्हणून खुशाल पुढे करावीत.

बालकवींच्या सर्वोत्कृष्ट कवितांपैकी एक कविता म्हणजे ‘औदुंबर.’ अवघ्या आठ ओळीत साकारलेलं जणू एखादं लँडस्केपच! मोजक्या शब्दांत व्यक्त झालेलं कवितेचं वास्तववादी, हुबेहूब छायाचित्र! ‘औदुंबर’ ही कविता आजतागायत आपल्या गूढरम्य सौंदर्यानं रसिकांना अन् समीक्षकांनाही विशेष आवाहन करीत आली आहे. या चिमुकल्या कवितेतलं चित्र इतकं नाजूक आहे, की क्षणभर शब्द रंगात भिजून गेल्याचा भास होतो. पहिल्या सात ओळींतल्या रंगकामानंतर शेवटच्या ओळीत एकाएकी डोळ्यांपुढे उभं केलेलं स्थिर चित्र अंगावर रोमांच आणतं. या कवितेमधून रसिकाच्या मनावर होणारा पहिला परिणाम हा परिपूर्ण, सुंदर निसर्गदृश्य पाहिल्याचा असतो. औदुंबरात कुणाला विरक्त, संन्यासी योगी दिसतो, तर कुणाला तो कालपुरुषाचे प्रतीक वाटतो. ‘औदुंबर’ ही एक स्वच्छ, नितळ, पारदर्शक कविता आहे, हे मात्र नक्की! बालकवी म्हणतात –

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातुन

एकूणच ‘औदुंबर’ एक मनोरम निसर्गचित्र आहे. जसं दिसलं, तसं चितारलेलं ते एक हुबेहूब वास्तववादी दृश्य आहे. बालकवींच्या नित्याच्या कल्पनासृष्टीच्या वर्णनात हे वास्तववादी चित्र फारच खुलून दिसतं. त्यातलं रंगसौंदर्य अतुलनीय आहे. रंगांचं आकर्षण हे बालकवींचं वैशिष्ट्य फार कमी कवींमध्ये दिसतं. ‘औदुंबर’ तर रंगछटांनी अक्षरशः न्हाऊन निघाली आहे. रंग, नाद आणि रेखा यांची गोंडस रंगसंगती फुलवणारा बालकवींसारखा कवी एखादाच! त्यांनी सारे रंग टिपले तेही विलक्षण संवेदनक्षमतेनं आणि हळुवारपणे! रेषांच्या संगतीला नवं परिमाण देणारी रंगसंगती निसर्गाचा संवेदनामय अनुभव देऊन जाते. शेवटच्या ओळीतलं सहा शब्दांतलं चित्र तर केवळ अपूर्व आहे. रेषासौंदर्य, लयसौंदर्य यांचं प्रत्यंतर देणारं आठ ओळींच्या चिमुकल्या कवितेतलं स्वयंपूर्ण निसर्गचित्र म्हणूनच मनोरम्य ठरतं आणि वर्षानुवर्षं रसिकांच्या मनात आपली सुवर्णमुद्रा उमटवीत अधिराज्य गाजवीत राहतं, हे निश्चित! 

स्त्री-पुरुष प्रेमासंबंधी बालकवींनी मोजक्याच कविता लिहिल्या. ‘प्रीति हवी तर’ कवितेत त्यांनी प्रेमोत्सुक स्थितीचं जोरदार वर्णन केलं आहे. प्रेमाचा आनंद गगनात मावेनासा झाला, की ते डोळ्यांतून ओसंडून वाहू लागतं. प्रेमावाचून जगही सुनंसुनं असते. अशी प्रेमाची उत्कटता ‘प्रेमाचे गाणे’मध्ये अनुभवायला मिळते. बालकवी म्हणतात –

प्रेम कुठे? ते रानभरी प्रेम खेळते फुलावरी
प्रेम जिथे ती वनराई स्वर्ग तिथे बहरूनी येई
ये तर गगनी
जगी हिंडुनी
आणू शोधुनी
प्रेम फिरे स्वच्छंदाने
प्रेमावाचुनी सर्व जुने जग भासे बापुडवाणे॥

प्रेमासंबंधीच्या अशा मोजक्याच कवितांमध्ये उन्मादक वृत्तीची परिसीमा म्हटली जाणारी, मुग्ध प्रणयाचा मोहक संवाद असलेली नि रसिकांच्या ओठांवर खेळणारी कविता – ‘गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी!’ भावनेतली कोमलता, वर्णनातली चित्रात्मकता, शब्दांचं मार्दव आणि संवादातला मोकळेपणा यांमुळे ही कविता एक उत्कृष्ट प्रेमगीत ठरली आहे. त्यामुळेच अपूर्ण कविता असूनही ती रसिकांना मात्र पूर्णपणे प्रेमरसात भिजवते.

‘बालकवी’ आणि ‘फुलराणी’ हे तर अतूट नातं सांगणारं शब्दशिल्पच आहे. निसर्गाशी असलेली एकरूपता हा बालकवींच्या बहुतांश कवितांचा स्थायीभाव आहे. त्यांची निसर्गाविषयीची सहृदयता सर्वव्यापक आणि सर्वस्पर्शी आहे. निसर्गाच्या विशिष्ट आविष्कारापेक्षा किंवा दर्शनापेक्षा त्यातल्या सौंदर्याचं मूलभूत तत्त्वच त्यांना आकर्षित करीत होतं. म्हणूनच त्यांचा निसर्ग कोणत्याही एका दृश्याशी, स्थळाशी व वस्तूशी बांधलेला नाही. तो सर्वसमावेशक आहे. शिव आणि मांगल्यामध्ये रममाण होणारा आहे. ‘फुलराणी’मधलं निसर्गदर्शनही असंच आहे.

बालकवींचं एकूण जीवन दुःखमय होतं असं त्यांच्या चरित्रावरून, तसंच काही कवितांमधूनही जाणवतं. जे जीवनात नाही, ते निसर्गाघटितांमध्ये शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सृष्टीतलं अनुपम सौंदर्य हेच त्यांच्या दुःखावरचं औषध होतं. शिवसुंदराचा ध्यास ही त्यांची प्रवृत्ती होती. बालकवींची बालसुलभ निरागसता आणि निसर्गातल्या पारोपकारी, निरपेक्ष प्रेमाचा साक्षात्कार यातूनच त्यांनी ‘फुलराणी’ला शब्दांनी गोंजारलं. ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे’ हे कविवर्य केशवसुतांचं वचन बालकवींच्या बाबतीत शब्दशः आणि शभर टक्के खरं ठरलं. हिरव्यागर्द ताजेपणात सजलेली, कथाकहाणीतील अद्भुताचा गोडवा ल्यालेली आणि विलक्षण चित्रमय शैलीचं प्रत्यंतर देणारी ही फुलराणी … बालकवी म्हणतात –

हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती!

बालकवींचं व्यक्तिगत जीवन दुःखमय होतं, असं त्यांच्या अनेक कवितांमधून जाणवतं. त्यातूनच या जगापासून मनानं दूर जाण्याची त्यांची वृत्ती वाढत गेली. आपण दुःखांनी भरलेल्या जगात नांदत आहोत याची त्यांना सतत जाणीव आहे. मानवी जीवनात अनेक प्रकारच्या उणिवा असून, ते कधीच परिपूर्ण होऊ शकणार नाही, याचं शल्यही त्यांच्या मनात आहे. ही भावना, त्यातून येणारी विषण्णता त्यांचं मन जाळीत आहे. जग पराकाष्ठेचं स्वार्थी आहे. त्यामध्ये दीनदुबळ्यांचे हाल होतात, ते भरडले जातात. या विचारानं येणारी अस्वस्थता आनंदगीतातही उमटल्यावाचून राहात नाही. ‘आनंदी आनंद गडे’ या कवितेत शेवटी बालकवी म्हणतात –

स्वार्थाच्या- बाजारात किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो? सोडुनि स्वार्थी तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे ॥

कवीला नैराश्यानं घेरलं आहे. त्यातूनच प्रलयकाळाची, भयाण काळोखाची, पर्यायाने मृत्यूची ओढ लागली आहे, असं अनेक कवितांमधून जाणवते. एका कवितेत ते म्हणतात –

बोलवितात । विक्राळ यमाचे दूत
गिरिशिखरावर ‘आ’ पसरोनी
काळ्या अंधारात दडोनी
किंवा पडक्या बुरुजावरूनी,
शब्द येतात। ‘चल नको बसू जगतात’॥

खोल खोल भेसूर दरडीत
पडक्या घोर जुन्या विहिरीत
उगवुनि पिंपळ वर येतात
ते म्हणतात। ‘चल जगात दुसऱ्या शांत’॥

आत्यंतिक आनंद आणि अती दुःख ही दोन्ही बालकवींच्या व्यक्तिमत्त्वाची अविभाज्य अंगं होती, हे त्यांच्या अशा अनेक कवितांमधून स्पष्ट होतं. डॉ. व. दि. कुलकर्णी म्हणतात, ‘दुःखी, निराश मनोवृत्ती हा केवळ प्रौढतेचा शाप होता, असे वाटत नाही. जगाने बालकवींना छळले असे दिसत नाही. अर्थविवंचना सर्वच कवींच्या मागे होती. त्याचा हिशेब मांडण्यात हशील नाही. बालकवींच्या मनोभूमीतच या दुःखाची मूलबीजे आहेत असे वाटते. पार्थिवतेची तुसे त्यांच्या मनाला पहिल्यापासूनच बोचत असावीत. त्यांना अध्यात्म पचले नाही आणि ऐहिक रुचले नाही. त्यांच्या ‘हृदयाची गुंतगुंत’ त्यामुळेच झाली. हर्ष आणि शोक हे त्यांच्या कवितेचे दोन स्थायीभाव. हे दोनही कधी पृथक्पणे, विशुद्धतेने येतात, तर कधी पाठीस लावून येतात; पण हे भाव येतात ते उत्कट रूप घेऊन येतात. दोनही सूर आळविणारे हृदय एकच आहे. स्वर्गीय प्रेमाने उचंबळून येणाऱ्या आणि पार्थिव दुःखाने जागच्या जागी थिजून जाणाऱ्या या एकाच हृदयाच्या दोन बाजू आहेत.’

…पण बालकवींच्या निराशामय काव्यप्रवासापेक्षाही लक्षात राहते, ठळकपणाने उठून दिसते ती तारुण्याच्या दिशेने वळलेली त्यांची चैतन्यमय बालसुलभ वृत्ती. त्यांच्या कवितेत दिसणारा भावनांचा ताजेपणा, उत्फुल्लता, कुतूहलनिश्रित दृष्टी, रंगांचं आणि आकृतींचं आकर्षण, स्पर्शसंवेदनेतली उत्कटता, सुख-दुःख, हर्ष-शोक, अंधार-प्रकाश अशा टोकाच्या वृत्तींचं घडणारं दर्शन, प्रणयभावनेतली कोवळीक, उत्तान शृंगाराचं वावडं हे त्यांच्या याच बालसुलभ वृत्तीचे निदर्शक. या सर्वच वृत्ती त्यांच्या कवितेतून प्रामाणिकपणे अभिव्यक्त होतात. त्यामुळेच त्यांची कविता भावनेची सच्ची अनुभूती देते.

सौंदर्याचा ध्यास, त्याची अतीव लालसा बालकवींच्या मनात आहे; पण त्या लालसेमध्ये कामुकतेचा लवलेश नाही. शृंगाराचा गंध नाही. निसर्गसौंदर्याचं वर्णन करताना स्त्री सौंदर्याचं उन्मादक दर्शन घडविल्याखेरीज कालिदास पुढेच जात नाही. किट्स् आणि स्पेन्सरच्या लेखनातही कामुकतेची भडक दृश्यं डोकावतातच; पण बालकवींच्या कवितेला मात्र या विचारांचा पुसटसा स्पर्शही झालेला नाही. त्यांच्या मनातल्या सौंदर्याला पवित्रतेची उंची आहे, भावनेतल्या सच्चेपणाची खोली आहे. त्यामुळेच त्यांच्या जीवनातल्या एका अप्रकाशित अध्यायातही – रमाईच्या बाबतीतही त्यांच्या वर्तनातला हा शिवसुंदराचा ध्यास प्रतीत झाल्याशिवाय राहात नाही.

रमाई ही एक सत्शील, भोळीभाबडी, पण रूपवान विधवा रसिका. आपले मित्र आप्पासाहेब सोनाळकर यांच्याकडून तिची वर्णनं ऐकून बालकवींच्या मनातलं तिच्या रूपाविषयीचं आकर्षण जागं होतं. त्या मनोमन कल्पिलेल्या सौंदर्यस्मृती म्हणजे त्यांच्या अनेक कवितांची प्रेरणा. तिला भेटण्याची अनिवार ओढ त्यांच्या मनात असते; पण आप्पासाहेब ही भेट टाळत राहतात. अनेक दिवसांनी एकदा अचानकपणे रमाईचं ओझरतं दर्शन होतं आणि बालकवींना कविता स्फुरते, ‘गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी!’ मनाला विलक्षण हुरहूर लावून रमाई निघून जाते. या सौंदर्याचा विचार करता करता त्यांच्यासमोर अनेक प्रश्नी उभे ठाकतात. ही रमाई कोण? तिचं आपलं नातं काय? या नात्याला काही नाव द्यायचं असलं तर? तिच्याविषयीची ही अनिवार ओढ आपल्या मनात का? नेमकं काय वाटतंय आपल्याला? एक ना दोन, असंख्य प्रश्नच…. आणि कालांतरानं त्यांना मनोमन जाणवतं, हिचं आपलं नातं एकच – मायलेकरांचं – अंतर्बाह्य शुद्ध, सात्त्विक असून प्रेरणादायी ठरणारं, आणि मग बालकवी लिहितात -देवे तुम्हा दिली आई। तेसी ब्रह्मांडी रमाई।

बालकवींच्या मानसिक प्रवासावर आधारलेलं एक अभ्यासपूर्ण नाटक म्हणजे ‘तू तर चाफेकळी.’ या नाट्यनिर्मितीबाबत लिहिताना ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर म्हणतात, ‘बालकवींच्या पत्रातील ‘निसर्गजननींच्या विलक्षण अनुभवाने ‘देवे तुम्हा दिली आई, तैसी ब्रह्मांडी रमाई’ या ओळींचा वेगळाच अर्थ मला लागला. त्यामुळे बालकवी – रमाई संबंधांचे गूढच मला उकलले असे नाही, तर बालकवींच्या व्यक्तिमत्त्वाला एक कणा प्राप्त झाला. एका श्रेष्ठ कविमनाचा ठाव घेण्यासाठीचा प्रवास अनोळखी रानावनातून सुरू झाला. मग हा नेहमीचा ‘दोन पुरुष – एक स्त्री’चा त्रिकोण राहिला नाही, तर ते कवितेच्या जन्माचे, कविमनावर होणाऱ्या ‘संस्कारांचे’ आणि त्याच्या धडपडीचेही नाटक झाले.’

बालकवींच्या काव्याला बहर आला, त्याआधी २०-२५ वर्षे महाराष्ट्रात फार मोठी वैचारिक क्रांती सुरू झाली होती. केशवसुतांनी विशाल मानवतेचे ध्येय उरी बाळगत बंडाची ‘तुतारी’ फुंकली होती. लौकिक जीवनातल्या साध्या विषयातही मोठा आशय पाहणारी, वैयक्तिकतेचा आविष्कार हेच आपलं वैशिष्ट्य बनविणारी नवी कविता मराठीत रूढ होत होती. त्याच वेळी सामाजिक प्रश्नां नाही कवितेचं व्यासपीठ मिळत होतं. रेव्हरंड टिळकांनी जीवनातल्या विसंगतीचं चित्रण, प्रवृत्ती श्रेष्ठ की निवृत्ती याबाबतचं विवेचन ‘वनवासी फूल’मध्ये केलं होतं. जाती-धर्मभेदाविरुद्ध आवाज उठवला होता. पहिल्या महायुद्धाची धामधूम चालू होती; मात्र या कुठल्याच वादळांचं प्रतिबिंब बालकवींच्या काव्यात उमटलं नाही. ‘धर्मवीर’ या कवितेचा अपवाद वगळता ते या विषयांपासून अलिप्तच राहिले.

प्रासादिकता हा त्यांच्या कवितेचा खरा आत्मा. त्यांच्या कवितेतला लडिवाळ खेळकरपणा मनाला भुरळ पाडतो. त्यांच्या कवितेत संस्कृत शब्दांचं प्रमाण मोठं आहे; पण ते पांडित्यप्रचुर नाहीत. त्यांची भाषाशैली चित्रमय स्वरूप लाभलेली, नाट्यमुद्रा असणारी आहे. आंतरलय, बाह्यलय, सुकुमारता, लावण्य, कल्पनांचं सहजपण, रचनेचं सहजपण व वर्णमाधुर्य हे या कवितेचे विशेष. भाषेचं हे रसायन निद्रिस्त, मलूल शब्दांना नवी जाग आणतं. त्याला साहाय्यभूत ठरतं. नादमाधुर्याला अनुप्रासात्मक ठसकेबाज शब्दांनी लयीची जोड मिळते. ती चांदण्यासारखी सर्व कवितेवर पसरलेली आढळते. सौंदर्याचा उपासक असलेला हा आत्ममग्न कवी आपलं जेमतेम २८ वर्षांचं आयुष्य अमूर्त सौंदर्याचा साक्षात्कार आणि अतींद्रिय प्रेमाची लालसा उरी बाळगून जगला. जळगावजवळच्या भादली स्टेशनवर रेल्वे रूळ ओलांडताना त्यांचं अपघाती निधन (पाच मे १९१८) झालं.

जेमतेम २८ वर्षांचं आयुष्य… त्यातला काव्यलेखनाचा काळ उणापुरा १०-११ वर्षांचा… एकूण कविता १६३… पण त्यातल्या कितीतरी सुभग… साजिऱ्या… रसिकांच्या मनात रुंजी घालत राहणाऱ्या… आत्यंतिक निरागस आनंद अन् विषण्णतेचा भयाण काळोख, दोन्हीही भरभरून देणाऱ्या… आणि कविताविश्वरच्या मर्यादाही जाणवाव्यात इतक्या ठसठशीत… निसर्गकवितांमधून त्यांनी सादर केलेली मानवी भावनांचा आरोप केलेली निसर्गदृश्यं, अंतर्हृदयाला काळोखून टाकणाऱ्या उदासीनतेचं त्यांनी केलेलं भावार्त चित्रण आणि सुकुमारतेचं रूपलावण्य लाभलेली भाषाशैली हे बालकवींच्या कवितेचं खरंखुरं संचित. त्याच्या सामर्थ्यावर या कविता रसिकांना आपल्या माधुरीनं मोहवित राहतात आणि आठवतं ते कविवर्य कुसुमाग्रजांनी बालकवींचं रेखाटलेलं शब्दचित्र…

हे अमर विहंगम! गगनाचा रहिवासी
त्या नीलसागरावरचा चतुर खलाशी
प्रिय सखा फुलांचा ओढ्यांचा सांगाती
त्यांच्यास्तव धुंडुनी ताराकण आकाशी
आणसी धरेवर अक्षर या धनराशी!

– स्वाती महाळंक
संपर्क : ८८८८१ ०२२०७ (लेखिका पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आहेत.)
—- – – – – – 

त्र्यंबक बापूजी ठोंबरे© मुकुंद कुलकर्णी

बालकवी

इ.स. 1918 साली आजच्याच दिवशी सर्वश्रेष्ठ निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी यांची प्राणज्योत मालवली . वयाच्या केवळ अठ्ठावीसाव्या वर्षी त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला , आणि मराठी वाङमय एका सर्वश्रेष्ठ कवीला मुकले .

मध्य रेल्वेच्या भादली स्टेशनवर संध्याकाळी सहाच्या सुमारास रेल्वे अपघातात बालकवींचा मृत्यू झाला . बालकवींचा मृत्यू हा अपघात की आत्महत्या यावर खूप चर्चा झाली . त्यांच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला आणि मराठी साहित्य पोरकं झालं . मराठी साहित्य व रसिकांसाठी तो काळाने उगवलेला एक सूड होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .

दि. 13 ऑगस्ट 1890 रोजी बालकवींचा जन्म जळगाव जिल्ह्यात धरणगाव येथे झाला . वयाच्या तेराव्या वर्षी नवापूर इथे असताना बालकवींनी पहिली कविता लिहिली . या कवितेला त्यांनी शीर्षक दिले नव्हते . इ.स.1907 मध्ये जळगाव येथे भरलेल्या पहिल्या मराठी कवी संमेलनात बालकवींनी केलेल्या काव्यवाचनाने प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना बालकवी हे नाव देऊन त्यांचा गौरव केला . वडिलांच्या मृत्यूनंतर संसाराची जबाबदारी बालकवींवर येऊन पडली . तेव्हापासून नोकरीसाठी आणि पैशासाठी बालकवींची खटपट सुरू झाली . आई गोदूताई यांच्या पुढाकाराने बालकवींचा विवाह नाशिकच्या पार्वतीबाई जोशी यांच्याशी करून देण्यात आला .

इ.स.1909 च्या दरम्यान शिक्षणासाठी काही काळ बडोद्यात असलेल्या बालकवींची तिथेच रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्याशी गाठ पडली . बालकवींची हालाखीची परिस्थिती पाहून टिळकांनी त्यांना अहमदनगरला आपल्या घरी राहण्यासाठी आणले . टिळकांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांनी आपल्या स्मृतीचित्रे या गाजलेल्या आत्मचरित्रात , ” ठोमरे हा बालकवी होता , पण तो कवीपेक्षा बालच अधिक होता ! ” असा अनाकलनीय अभिप्राय नोंदवला आहे .

फुलराणी , औदुंबर , श्रावण मासी हर्ष मानसी , आनंदी आनंद गडे या त्यांच्या अतिशय गाजलेल्या कविता . या कवितांवरून त्यांच्या अलौकिक प्रतिभेची साक्ष पटते . मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून बालकवींची कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती . बालकवींच्या बहुतेक कवितात निसर्ग मध्यवर्ती असला तरी रुढ अर्थाने निसर्ग वर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही . आपले जीवन विषयक तत्त्वज्ञान आपल्या कवितांमधून ते मांडतात . निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कवीमनाचे ते सहजोद्गार आहेत . फुलराणी या कवितेतील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतीकथा जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे . ‘ अरुण ‘ मध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरवणारे जाळे विणले आहे . निसर्गातील विविध गोष्टी तिथे सजीव होतात , रसिकही त्यांच्याशी एकरूप होतात . वर्णनात प्रतिकाची गहिरी सूचना दडलेली असते . मर्ढेकर , अगदी अलीकडच्या ग्रेस आणि ना.धों.महानोर यांच्यासारख्या भिन्न प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा प्रभाव जाणवतो .

विषयांचे बंधन नसलेली , निसर्गाच्या अत्यंत कोमल आणि अत्यंत रौद्ररुपाचे वर्णन करणारी , अज्ञेयवाद , गूढगुंजन , रात्रीचा भयाणपणा , अतिमानुष , मरणाची उत्कंठा , स्वप्नाळू वृत्ती , दुर्दम्य आशावाद यांचे वर्णन वास्तववादाचा अवलंब न करता कल्पनावादाने करणे हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य होते . बालकवींची तंद्री आनंदी होती तोपर्यंत त्यांची कविता ‘ अलवार कोवळे अंग , जशि काय फुलांची मूस ‘ होती . पण जेव्हा ही तंद्री कोळपली तेव्हा त्यांची कविता
‘ उदासीनता ‘ च झाली . ‘ शून्य मनाच्या घुमटात , दिव्यरुपिणी सृष्टी ‘ भीषण रुप धारण करू लागली .

निसर्गाचा सगळ्यात सुंदर महिना म्हणजे श्रावण . थोडा पाऊस थोडे उन्ह . सगळीकडे हिरवेगार . सर्व सृष्टी अल्हाददायक . बालकवींना याच श्रावणाचा विलक्षण मोह होता . त्यातूनच त्यांची ‘ श्रावण मासी हर्ष मानसी ‘ ही कविता कागदावर उतरली . बालकवींची निसर्ग कविता पाठ नाही , पन्नास वर्षांपूर्वी महाराष्ट्रात असे घर शोधूनही सापडले नसते . फुलराणी , निर्झर या सर्व कविता म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याची उधळण . ‘ तू तर चाफेकळी ‘ ही कविता म्हणजे बालकवींच्या निसर्ग सौंदर्याला आलेले प्रेमाचे फूलच . मराठी रसिकांच्या मनामनात आणि हळुवार कप्प्यात बालकवींविषयी एक मोठी जागा आहे .

औदुंबर ही कविता अजूनही आपल्या गूढतेचे रहस्य स्वतःत दडवून आहे . अनेकांनी त्यांच्या कवितेवर पीएचडी केली यातच त्यांच्या कवितेची वैश्विकता दडलेली आहे .

बालकवींची कविताः तीन संदर्भ या पुस्तकातून प्राध्यापक रमेश तेंडूलकरांनी बालकवींच्या कवितेचे जे साक्षेपी रसग्रहण केले आहे त्याला तोड नाही . बालकवींच्या आत्माविष्काराचे स्वरूपच मूलतः भिन्न आहे . भोगणारा जीव आणि सृजनशील मन यांच्या द्वंद्वातून कलाकृती परिपूर्णतेकडे जात रहाते , आणि व्यक्तीत्व व भावना असणाऱ्या कलामनालाच ह्या द्वंद्वातून सुटका करून घेणे म्हणजे काय हे कळू शकते ह्या टी एस इलिएटच्या ‘ ट्रॕडिशनल अँड इंडिव्हिज्युअल टॕलन्ट ‘ ह्या प्रसिद्ध लेखातील अवतरणांचे उपयोजन त्यांनी बालकवींची कविता खुलवताना केले आहे . समीक्षेपेक्षाही जास्त सौंदर्याभिमुखता आणि शब्दाशब्दावर विचार करणारी त्यांची नजाकतच या पुस्तकाच्या पानापानात दिसून येते . ‘ फिकट निळीने रंगविलेला कापुस मेघांचा ‘ ही बालकवींची ओळ वाचताना त्यांना लॉर्ड बायरनची ‘ वन शेड मोअर , वन शेड द लेस – हॕड हाफ इम्पेअर्ड द नेमलेस ग्रेस ‘ ही ओळ आठवते . ‘ यक्षिणी , देवता कुणी , कपारींतुनी घोर घुमतील ‘ ही ओळ अनुभवताना त्यांना शेक्सपिअरच्या मॕक बेथ या नाटकातील ” फेअर इज फाऊल अँड फाऊल इज फेअर हॉव अ थ्रू द फॉग अँड फिल्दी एअर ” हे चेटकिणीचे उद्गार आठवतात .

स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग – द वूड्स आर लव्हली डार्क अँड डीप , बट आय हॕव प्रॉमिसेस टू किप , अँड माईल्स टू गो बिफोर आय स्लीप तसेच बर्चेस – आय वुड लाईक टू गो अवे फ्रॉम अर्थ अ व्हाईल . अँड देन कम बॕक टू इट अँड बिगिन ओव्हर . अशा आशयघन कविता लिहिणा-या रॉबर्ट फ्रॉस्ट या जगप्रसिद्ध अमेरिकन निसर्ग कवी आणि बालकवी यांची जातकुळी एकच वाटते .

अशा या सर्वश्रेष्ठ निसर्गकवीला आज पुण्यतिथीदिवशी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या गूढरम्य औदुंबर कवितेने .

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातुन

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेत मळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे

पायवाट पांढरी तयांतुनि अडवितिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे

झांकळून जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर

मुकुंद कुलकर्णी ©

  • – – – – – – – – – – – – – 
    त्र्यंबक बापूजी ठोंबरे
    https://mr.wikipedia.org/s/2w4
    विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

त्र्यंबक बापूजी ठोंबरे
जन्म १३ ऑगस्ट १८९०
धरणगाव, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ५ मे १९१८ जळगाव, महाराष्ट्र, भारतरेल्वे रूळ ओलांडताना (जळगावजवळ असलेलं लहान रेल्वे स्टेशन भादली येथे)अपघाती निधन झाले.
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
वडील बापूजी ठोंबरे
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (जन्म : धरणगाव, १३ ऑगस्ट १८९०; मृत्यू : जळगाव, ५ मे १९१८) हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबऱ्यांना बालकवी ही उपाधी दिली.

बालकवींची काव्यकारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती. मराठी लेखक आणि कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्याबरोबर त्यांनी बालपणातील काही काळ घालवला . रेव्ह.ना.वा. टिळक यांनी त्र्यंबकमधील प्रतिभा ओळखून त्यांना आपल्या घरी आणले. लक्ष्मीबाई टिळक यांचे बालकवींबरोबर मातृत्वाचे संबंध होते. बालकवी जेव्हा टायफॉईडने आजारी होते तेव्हा रेव्ह. टिळकांनी व लक्ष्मीबाईंनी चाळीस दिवस त्यांची काळजी घेतली. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रात बालकवींच्या काही आठवणींचा उल्लेख केला आहे.[१]

काव्यपरिचय
बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही किंवा अचेतन वस्तूवर चेतनारोप नाही. ‘फुलराणी’तील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे. ‘अरुण’मध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरविणारे जाळे विणले आहे; पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हेत. त्या घटनेत भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी तिथे सजीव होतात. इतकेच नव्हे तर कवितेच्या किमयेने रसिकही त्यांच्याशी एकरूप होतात. त्यांमागील दिव्य आणि मंगल यांच्या कवितेत अलौकिकाचा स्पर्श होतो. साध्या वर्णनात प्रतिकाची गहिरी सूचना लपलेली असते.
मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. अगदी अलीकडच्या ग्रेस आणि ना.धों. महानोर यांसारख्या परस्परांहून भिन्न प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा प्रभाव जाणवेल.

रोमांचवादी संप्रदायाची तत्त्वे
विषयांचे बंधन नको, निसर्गाचे वर्णन, अज्ञेयवाद आणि गूढगुंजन, ओसाड जागेचे व रात्रीच्या भयाणपणाचे तन्मयतेने वर्णन, अतिमानुष व्यक्तींचे वर्णन, मरणाची उत्कंठा, स्वप्नाळू वृत्ती, दर्पयुक्त आशावाद, आत्मकेंद्रितता, समाजाविरुद्ध बंडखोरी, वस्तुजाताचे वर्णन करीत असताना वास्तववादाचा अवलंब न करता कल्पनावादाचा (आयडिअलिझम) अवलंब करणे.

उदासीनता
बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत.

जोपर्यंत बालकवींची तंद्री आनंदी होती तोपर्यंत त्यांची कविता म्हणजे ‘अलवार कोवळे अंग, जशि काय फुलांची मूस’ होती, पण जेव्हा ही तंद्री कोळपल्यासारखी झाली तेव्हा त्यांची कविता ‘उदासीनता’च झाली. ‘शून्य मनाच्या घुमटा’त ‘दिव्यरूपिणी सृष्टी’ भीषण रूप धारण करू लागली. काळाच्या ‘भोवऱ्या’त पडून ‘जीवित केवळ करुणासंकुल’ झाले, मनाचा पारवा ‘खिन्न नीरस एकांतगीत’ गाऊ लागला. ‘अस्मान’ ‘धरणी’ला मिळून ‘रात्रिचा’ ‘अवकाळ प्रहर’ ‘घोर’पणे ‘घुमा’यला लागला. ‘भरले घर ओके’ ‘मायेच्या हलकल्लोळा’त ‘मायेच्या हिरव्या राव्या’ला दुखवून ‘जडता पसरलेला’ जीव ‘देहाचे पंजर’ टाकून उडून गेला. ‘यमाचे दूत’ बोलावू लागले.

बालकवींच्या प्रसिद्ध कविता
आनंदी आनंद गडे
औदुंबर
फुलराणी
श्रावणमास
बालकवींच्या कविता असलेली पुस्तके
फुलराणी : बालकवींच्या निवडक कविता (कुसुमाग्रज- वि.वा. शिरवाडकर). ह्या संग्रहात ५७ कविता आहेत.
बालकवींच्या निवडक कविता (संपादक – ना.धों. महानोर). या संग्रहात ३१ कविता आहेत. शिवाय बालकवींनी लिहिलेली त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रेही आहेत.
बालकवींच्या बालकथा (आत्मकथन)
बालकवींच्या बालकविता (कवितासंग्रह, या संग्रहात २६ कविता आहेत)
बालविहग (कवितासंग्रह, संपादक – अनुराधा पोतदार, या संग्रहात एकूण ७५ कविता आहेत.)
समग्र बालकवी (संपादक – नंदा आपटे)

***************************************

नवी भर दि. ०७-१०-२०२० : आनंदीआनंद गडे


बालकवी ठोंबरे

बालकवी
इंग्रजी माध्यमात शिकलेल्या लोकांना बालकवी हे नांव कदाचित खास परिचयाचे नसेल. त्यांचे पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे. ते खानदेशातले होते. खानदेश हा प्रदेश सुपीक जमीनीचा म्हणून ओळखला जातो. तिथे कापसाचे उत्पादन होते असे शाळेत शिकल्यासारखे आठवते. आजकाल त्या भागातून रेल्वेने जातांना अनेक ठिकाणी केळीच्या बागा दिसतात. त्र्यंबक बापूजी ठोंबरे खानदेशातच लहानाचे मोठे झाले. त्यांना बालपणापासूनच कविता रचण्याची आवड होती आणि तिथल्या रम्य निसर्गापासून त्यासाठी त्यांना स्फूर्ती मिळत होती.

सन १९०७ मध्ये जळगांवला महाराष्ट्रातले पहिले कविसंमेलन भरले होते. तो बोलपटांचा जमाना नसल्यामुळे गीतकार हा पेशा अजून जन्माला आलेला नव्हता. मुद्रण, प्रकाशन, वितरण वगैरेचा फारसा विकास झालेला नसल्यामुळे कवितासंग्रह काढून ते विकून त्यातून खूप पैसे मिळण्याची शक्यता कमीच होती. त्या काळी प्रसिध्द होत असलेल्या वाङ्मयिन नियतकालिकांमध्ये त्या कविता छापून येत असत. त्यामुळे कविता करणे ही एक मनातली हौस किंवा आंतरिक ऊर्मी असे आणि सुस्थितीत असलेले त्या काळातले प्राध्यापक, अधिकारी, न्यायाधीश, दिवाण, रावसाहेब, रावबहाद्दूर अशी प्रतिष्ठित मंडळीच कवी म्हणून ओळखले जात असत. खानदेशातल्याच अशिक्षित बहिणाबाईंनी अप्रतिम काव्यरचना केली होती, पण त्यांच्या हयातीत त्यांना प्रसिध्दी मिळाली नाही. तत्कालीन समाजातल्या मान्यवर मंडळींनीच जळगावच्या त्या कविसंमेलनात भाग घेतला असणार. त्या काळात टेलीफोन, ई-मेल वगैरे कांही नव्हते. पत्रोपत्रीच सगळे ठरवून माहितीतल्या कवींना आमंत्रणे केली असतील आणि जीआयपी रेल्वेच्या ज्या एक दोन गाड्या त्या काळी धांवत असतील त्यातून ही मंडळी जळगावला जाऊन पोचली असतील. तरीसुध्दा पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, इंदूर वगैरे दूर अंतरावरील ठिकाणांहून शास्त्री, पंडित, कवी आणि रसिक श्रोते मंडळी आली होती. जवळपास राहणाऱ्या स्थानिक लोकांनी गर्दी केली होतीच.

एकंदर २३ कवी या संमेलनात आपले काव्यवाचन आणि गायन करणार होते. त्यातच एक १७ वर्षाचा मुलगा अचानक मंचावर चढला आणि त्याने थेट सभेचे अध्यत्र कर्नल डॉ.कीर्तीकर यांचेजवळ जाऊन त्यांना आपले मनोगत तिथल्या तिथे रचलेल्या चार ओळीतून ऐकवले. ते ऐकून सर्वानुमते त्यालाही मंचावर येऊन आपल्या कविता सादर करायची अनुमती दिली गेली. त्याने म्हणजे त्र्यंबकने सर्व रसिक श्रोत्यांना आपल्या शीघ्रकवित्वाने स्तिमित केले. रीतीप्रमाणे त्याचाही सत्कार झाला तेंव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अध्यक्षांनी त्याला बालकवी ही उपाधी दिली आणि त्यानंतर ते त्याच नांवाने ओळखले जाऊ लागले.
त्यानंतर त्यांनी अनेक सुंदर रचना केल्या. त्यांनी मुख्यतः निसर्गसौंदर्याचे वर्णन आपल्या काव्यांमध्ये केले होते.
हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे ।
त्या सुंदर मखमालीवरती, फुलराणी ही खेळत होती ।।
या गाण्याचा समावेश ती फुलराणी या नाटकात अतिशय सुंदर रीतीने केला आहे. तर
गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी । काय हरवले सांग साजणी या यमुनेच्या जळी ।।
हे गाणे मत्स्यगंधा या नाटकात चपखलपणे बसवले आहे.

बालकवींच्या कवितांमध्ये निसर्गसौंदर्याची अत्यंत रसिकतेने केलेली वर्णने आहेतच, त्यांत नेहमी एक सकारात्मक जीवनदृष्टीचा विचार असतो. माझे गाणे या कवितेत ते लिहितात,
ही प्रेमाची, ही शांतीची, विश्वमंगलाची,
सौभाग्याची तार तशी ही, ही जगदैक्याची.
“निरध्वनी हे, मूक गान हे” यास म्हणो कोणी,
नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी.
सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले,
माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले ।।

बालकवी असेही सांगतात,
सुंदरतेच्या सुमनावरले दंव चुंबुनि घ्यावे,
चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे ।।

जगात जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद पसरलेला आहे हे सांगतांनाच ते पुढे लिहितात,
स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे, आनंदी आनंद गडे ।।

बालकवींच्या गाण्यात सौंदर्य होते, तत्वज्ञान होते, त्यातल्या शब्दांना नादमाधुर्य असायचे. त्यामुळे चांगल्या संगीतकारांच्या हातात पडल्यावर त्यांना अवीट गोडी प्राप्त झाली. सुमारे शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या कवितांनी माझ्या लहानपणी म्हणजे साठ वर्षांपूर्वी माझ्या मनावर मोहिनी घातली होती. तीस चाळीस वर्षांपूर्वी त्यातली कांही गाणी स्वरबध्द केली गेली आणि इतक्या वर्षांनंतर आजसुध्दा ती ऐकली किंवा गायिली जात आहेत, यावरून त्यांचे काव्य कसे अजरामर आहे याची कल्पना येईल. ती प्रसिद्ध गाणी आहेत : आनंदी आनंद गडे, गर्द सभोती रान साजणी, जगाचे बंध कोणाला, माझे गाणे वगैरे. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे । आणि माझे गाणे, एकच गाणे, नित्याचे गाणे । या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका लोकप्रिय आहेत.

अशा या बालकवींना आणखी आयुष्य लाभले असते तर त्यांनी आणखी किती अद्भुत काव्यरचना लिहून ठेवल्या असत्या कोणास ठाऊक, पण मराठी सारस्वतांच्या दुर्दैवाने त्यांना अल्पायुष्यातच, वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी काळाने ओढून नेले.

नवी भर : आनंदीआनंद गडे

आनंदीआनंदगडे

आनंदीआनंद गडे

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे

नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे

वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे

स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरलाइकडे, तिकडे, चोहिकडे

– बालकवी ठोंबरे

*****

श्रावणमासी ……..    रसग्रहण

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!
आषाढात सुरू झालेल्या पावसाचा वेळी अवेळी होणारा धिंगाणा आता कमी झालेला असतो. उन्हाबरोबर त्याचा पाठशिवणीचा खेळ चाललेला असतो. कधी लख्ख ऊन पडले असतांना मध्येच पावसाची सर येऊन जाते तर पिशवीतली छत्री बाहेर काढून ती उघडेपर्यंत ती ओसरून पुन्हा ढगांमधून उन्हाच्या तिरिपी दिसायला लागतात. ना थंड ना ऊष्म अशा या सौम्य वातावरणात मन प्रसन्न होतेच. आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पाहून ते अधिकच उल्हसित होते.
बालकवी ठोंबरे यांच्या या प्रसिध्द कवितेत त्यांनी श्रावणातल्या या निसर्गाच्या विलोभनीय रूपाबद्दल जे लिहिले आहे त्याला तोड नाही. त्यांनी दिलेल्या कांही अनुपम उपमा खाली दिलेल्या पंक्तींमध्ये पहायला मिळतात.

वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!
आकाशातल्या हवेत पाण्याचे तुषार असतील तर त्यातला प्रत्येक सूक्ष्म कण स्फटिकाप्रमाणे काम करतो आणि त्यावर पडलेल्या सूर्याच्या किरणांचे पृथक्करण करून त्यांचे असंख्य रंगांमध्ये परावर्तन करतो. आकाशात सूर्य तळपत असला आणि समोरच्या बाजूला दमट हवा असेल तर आपल्याला त्यातून सप्तरंगी सूर्यधनुष्य दिसते. हे त्याच्या मागे असलेले सायन्स झाले. एकमेकात बेमालूमपणे गुंतलेल्या सात रंगांचा ङा गोफ विणला आहे असे बालकवींच्या कवीमनाला वाटते आणि श्रावणराजाच्या आगमनाने आनंदून जाऊन सृष्टीदेवीने आभाळाच्या मांडवावर हे मंगल तोरण बांधले आहे असा भास त्यांच्या संवेदनशील मनाला होतो.
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते!
बगळ्यांची माळ अंबरात उडत असतांना ती म्हणजे स्वर्गातल्या तल्पवृक्षाच्या फुलांची माळ आहे किंवा आकाशातल्या चांदण्या, ग्रह, तारे वगैरे रांगेने जमीनीवर उतरत आहेत असे बालकवींना वाटते.
पुराणातल्या एका आख्यानाचा दाखला देऊन ते म्हणतात,
सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला
पारीजातही बघता भामारोष मनीचा मावळला!
सोनचाफा फुलला, केवडा दरवळला आणि त्यांच्या सोबतीने पारिजातकांनेसुध्दा बहरून फुलांचा सडा पाडला, पण बालकवींची सत्यभामा “फुले कां पडती शेजारी” असे म्हणत रुष्ट किंवा खिन्न होत नाही. उलट त्या नाजुक फुलांच्या मंद सुगंधाने तिच्या मनात असलेली अढी मावळते.
असे हे श्रावणाचे रूप कोणाकोणाला मोहवत असेल?
खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे,
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे!
देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयात,
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावणमहिन्याचे गीत
हिरव्या गार कुरणातून मनसोक्त चरत फिरतांना गायी आणि त्यांची खिल्लारे मौजमस्ती करतातच. त्यांना सांभाळणारे गुराखी आनंदाने गाणी गातात आणि आपल्या अलगुजाच्या मधुर आवाजातून श्रावणराजाच्या महात्म्याचे गुणगान करतात. श्रावण महिन्यात अनेक सण येतात. त्या निमित्याने देवदर्शनाला निघालेल्या स्त्रियांच्या प्रफुल्लित चेहेऱ्यावरच श्रावण महिन्याचे गीत स्पष्ट दिसते.

——————————————————

श्रावणमासी …….. कविता

१. स्व.बालकवी (कै.त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची सुप्रसिध्द कविता

श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे ।।धृ।।
वरती बघता इंद्रधनूचा, गोफ दुहेरी विणलासे ।
मंगल तोरण काय बांधिले, नभोमंडपी कुणी भासे ।।१।।
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा ती उघडे ।
तरु शिखरावर उंच घरांवर, पिवळे पिवळे ऊन पडे ।।२।।
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा!
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा! ।।३।।
बलाकमाला उडता भासे, कल्पसुमांची माळच ते ।
उतरून येती अवनीवरती, ग्रहगोलची की एक मते ।।४।।
फडफड करुनी भिजले अपुले, पंख पाखरे सावरती ।
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी, निज बालांसह बागडती ।।५।।
खिल्लारेही चरती रानी, गोपही गाणी गात फिरे ।
मंजुळ पावा गात तयाचा, श्रावण महिमा एक सुरे ।।६।।
सुवर्ण चंपक फुलला विपिनि, रम्य केवडा दरवळला ।
पारिजात हि बघता भामारोष मनीचा मावळला ।।७।।
सुंदर परडी घेऊन हाती, पुरोपकंठी शुद्ध मती ।
सुंदर बाला त्या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती ।।८।।
देव दर्शना निघती ललना, हर्ष माईना हृदयात ।
वदनी त्यांच्या ऐकून घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत ।।९।।


ही कविता लिहून सुमारे शंभर वर्षे उलटून गेली असली तरी आजही तिचे विडंबन करावे असे कुणाकुणाला वाटते यातच तिचे अजरामर असणे आहे.

२. श्री.अविनाश ओगले यांनी केलेले विडंबन  (विनोदी)

श्रावणमासी, विरस मानसी, हळहळ दाटे चोहिकडे
क्षणात येते मनात पाप, क्षणात पश्चाताप घडे.
भवती बघता भाविक नवरे पत्नी भयाने मौनव्रती
“श्रावण-श्रावण” जपता जपता गलितगात्र हे महारथी
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! ती आठवे
“सध्या श्रावण!” हळूच पाउल घराकडे अपुल्याच वळे.
उठती बसती कामे करती, अंगी नाही त्राण पहा
सर्व जगावर हाय! पसरले विषण्णतेचे रुप महा.
“गलास” साधा फुटता भासे, न पिता ही कशी चढे?
श्रावण म्हणूनी त्राण न हाती, हातामधुनी खाली पडे.
बडबड करुनी उगीच आपुले, दिवस जुने ते आठवती
सुंदर साकी, मैफल, मस्ती, मनात अपुल्या साठवती.
उदास गझला पडता कानी, पाउल शोधत वाट फिरे
परि आठवता श्रावणमहिमा, मुकाट मंदिरात शिरे.
वाट असे ही जरी नित्याची कोण बेवडा अडखळला?
दारी आपुल्या अचूक येऊनी कोण नेमका गोंधळला?
पुरण नकोसे, वरण नकोसे, उतरेना कंठी बासमती
मटणाच्या त्या रश्श्यावाचून कुंठित होई येथ मती.
शून्यामध्ये लावून डोळे बसून राहे तासन्‌तास
वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावा, भुका-तहाना श्रावणमास.

(हालकवी) -अविनाश ओगले

बालकवींची क्षमा मागून आणि श्री.ओगले यांच्या सौजन्याने.

——————————–

३. आणखी एक विडंबन (उदास)… कवि अज्ञात

श्रावणमासी खेद मानसी   हिरवळ गेली कुणीकडे?
शहरें भरली इमारतींनी   डांबर फरश्या चहुकडे।।
मनु बदलला अणु फोडला    निसर्गातही बदल घडे
श्रावणमासी तो मौजेचा   पाऊस आता कुठे पडे ? ।।
राने तुटली, कुरणे हटली    उजाड हे डोंगरमाथे
सुंदर हरणी हिरव्या कुरणी    कुठे कशी मग बागडते ? ।।
सुवर्ण चंपक अजुनी फुलतो   रम्य केवडा दरवळतो
नगरनिवासीजन हौसेस्तव   बाजारी विकला जातो ।।
थकून भागून घरी परतती   ललना सायंसमयाला
हर्ष न उरतो ह्रदयी त्यांच्या   देवदर्शना निघण्याला ।।
प्रदुषणाने जीवन अवघे   होऊनी गेले संत्रस्त
कुठे कुणाच्या वदनी वाचू    श्रावण महिन्याचे हे गीत ।।

   . . . . . . . . . . .  व्हॉट्स अॅपवरून  दि.२७-०६-२०१९

४. आणखी एक विडंबन (आनंदी)… कवि अज्ञात

! गोडधोडाची चंगळ दाटे !
श्रावण आला हर्ष होतसे …………… सुकाळ सणांचा चोहीकडे
गोडधोडाची चंगळ दाटे …………… जिभेवरती पाण्याचा पूर पडे
तळणीचाहि वास खमंग …………… पुरणपोळीचा योग घडे
नटुनी थटुनी फिरण्यासाठी …… …. वनितानाहि मोह पडे
नात्याचेही बंध जपण्या …………… पुनवेस रेशमी राखी जुडे
कोळी बांधवांची श्रीफळ पूजा……… सागरास घालती आर्त साकडे
भिजल्या मातीत अंकुर येता………. कवितांचे येथे कारंजे उडे
रचना ………… माधव विव्दांस……””””””

. . . . . . . .  फेसबुकवरून  दि.९-०८-२०२१


या लेखाचे संपादन दि, ०७-११-२०१९ : बालकवींची माहिती आणि श्रावणमासी कवितेचे रसग्रहण यांची भर.

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

One thought on “बालकवी ठोंबरे, त्यांच्या कविता, श्रावणमासी आणि विडंबन”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s