कवीवर्य विंदा करंदीकरांना आदरांजली

हे पान मी मार्च २०१०मध्ये उघडले होते. आज त्यात आणखी काही कवितांची भर टाकली आहे.                 दि.१८-०३-२०१९, १२-०६-२०२०, २१-०६-२०२०, ०२-०७-२०२०, १२-०४-२०२१, २३-०८-२०२१

—————————————————

प्रिय विंदा …

मी लहान होतो तेव्हा …
तुम्ही घेऊन आलात स्वप्नांचं एक जग
केवळ माझ्यासाठी !

जगातलं उत्तमोत्तम वेचून आणलेत माझ्यासाठी
आणि माझ्या कुमारबुद्धीला झेपेल, पचेल असे ते सर्व करून
त्याचे घास भरवलेत मला !

मी मोठा होत गेलो तसे
माझ्या हृदयात बसून
तुम्हीच कविता शिकवलीत मला !
प्रेम शिकवलेत, सौंदर्याचे पाठ गिरवून घेतलेत !

अजून मोठा झालो तेव्हा तर
मला मनात धूसर जाणवणारे सारेच
तुम्ही चपखल शब्दांत स्पष्ट म्हटलेत !

माझी भाषा,
माझे जगणे,
माझे बघणे,
सारे काही
हे असे तुमचेच !
तुम्ही घडवलेत !

इतक्या दुरूनही
कुणासाठी इतके बरेच काही करता येते ..
हे तुम्ही मला शिकवलेत !

तुम्ही माझे किंवा मी तुमचा कोण
कोणास ठावे ?
पण एक नक्की ..
आज माझ्या डोळ्यात
माझ्या बापासाठी आली होती
तीच आसवे !

(प्रदीप वैद्य यांच्या ब्लॉगवरून )  …………    मार्च २०१०

chukalee_geet२

धीर थोडासा हवा !

– विं. दा. करंदीकरांची एक कविता

कालौघ जावा लागतो अवतार घेण्याला नवा
विष्णूस त्या ! मग आपण धीर थोडासा हवा.
अंधार दाटे भोवतीं ; हाती असे इवला दिवा;
सारे दिवे पेटावया धीर थोडासा हवा.
मानू नको यांना मुके ; हे न अजुनी बोलके ;
बोलते होतील तेही; धीर थोडासा हवा.
शेत रुजले, वाढलेंही; डोलते वाऱ्यावरी,
पीकही येईल हाती; धीर थोडासा हवा.
स्वर लाभला; गुरुही भला; चाले रियाझही चांगला;
जाहीर मैफल जिंकण्या, धीर थोडासा हवा.
‘या गुणांचे चीज नाही’– तक्रार दुबळी व्यर्थ ही;
चीज होण्या वेळ लागे; धीर थोडासा हवा.
घाई कुणा ? वा केवढी ? काल ना पर्वा करी;
कालाबरोबर नांदण्या, धीर थोडासा हवा.
———————————————

दि.१८-०३-२०१९

देणाऱ्याने देत जावे .. आणि एक दिवस देणाऱ्याचे हांत घ्यावेत असो सांगणाऱ्या कविवर्य विंदा करंदीकर यांच्या दोन कविता खाली दिल्या आहेत. त्यांच्या चांगल्या चांगल्या कविता इथे वाचा.
http://marathikavitasangrah.in/category/vinda-karandikar

‘उपयोग काय त्याचा ?’

शब्दांत भाव नाही,     ना वेध अनुभवाचा ;      रचना सुरेख झाली !                                                              उपयोग काय त्याचा ?

व्याहीच पत्रिकेचा       घालीत घोळ बसले;      नवरी पळून गेली !                                                               उपयोग काय त्याचा ?

सुगरण रांधणारी,       सुग्रास अन्न झाले ;     अरसिक जेवणारे,                                                                   उपयोग काय त्याचा ?

जमली महान सेना,    शस्त्रे सुसज्ज झाली ;      नेता कचखाऊ निघाला,                                                        उपयोग काय त्याचा ?

ऐश्वर्य प्राप्त झाले,   झाली दिगंत कीर्ती ;    स्नेही न एक लाभे !                                                                     उपयोग काय त्याचा ?

सर्वांस स्वास्थ्य आले,    सगळीकडे सुबत्ता ;     स्वातंत्र्य फक्त नुरले !                                                           उपयोग काय त्याचा ?

केले गुरु अनेक,   यात्रा कित्त्येक केल्या ;   शांती न प्राप्त होता,                                                                   उपयोग काय त्याचा ?

__विंदा करंदीकर


नवी भर दि.०२-०७-२०२०

 (मूळ कविता)

पंढरपूरच्या वेशीपाशी
आहे एक छोटी शाळा;
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा ॥
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे
अट्टल
मास्तर म्हणतात करणार काय?
न जाणो असेल विठ्ठल ॥

विंदा करंदीकर
✍️ == ===
-संस्कृत अनुवाद-
पंढरपूरस्य सीमायाम् अस्ति कश्चित् विद्यालयः l
गौरवर्णीया: सर्वे छात्रा एकः बालः घननीलः II
विपरितलीला विपरितचेष्टा
असत् क्रीडने अतीव कुशलः I
किं करणीयं वदति शिक्षकः
भवति कदाचित् अयं विठ्ठलः ll

वीणाताई गोडबोले
मुंबई

नवी भर दि.२०-०८-२०२१

—————————–

सब घोडे बारा टक्के!

जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट; कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा (तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी) ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता; पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार; याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी; कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के; सब घोडे बारा टक्के!

__विंदा करंदीकर


——-   विं. दा. करंदीकरांची माझी खूप आवडती कविता

देणार्‍याने देत जावे

देणार्‍याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे

हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भिमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे.
—————————————–  दि.१८-०३-२०१९

……………………………….

त्याला तयारी पाहिजे

केले कुणास्तव ते किती,    हे कधी मोजू नये;
होणार त्याची विस्मृती;    त्याला तयारी पाहिजे.

डोक्यावरी जे घेऊनी    आज येथे नाचती,
घेतील ते पायातळी;    त्याला तयारी पाहिजे.

सत्यास साक्षी ठेवुनी     वागेल तो, बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही!    त्याला तयारी पाहिजे.

पाण्यामध्ये पडलास ना?     पाणी कसेही ते असो-
आता टळेना पोहणे;         त्याला तयारी पाहिजे.

~विंदा करंदीकर

ही कविता पचवली की आयुष्य जमलंच ! 😊

– दि.२६-०३-२०१९

————————————

एवढे लक्षात ठेवा –

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा…..
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा॥
ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा।।
जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा॥
चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥
विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा॥
दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा॥
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा॥
कवी: विंदा करंदीकर
[’निर्वाणीचे गझल’ पैकी एक गझल. संदर्भ लोकसत्ता]

नवी भर दि.१२-०६-२०२०

————————————-

विंदा करंदीकर यांची एक भन्नाट कविता

त्याला इलाज नाही
धिक्करिली तरीही सटवीस लाज नाही
श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही
देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले
त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही
लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही
तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका
कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही
ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही
विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही
बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही
असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी
अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही
ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा
निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही
वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा
श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही

वी भर दि. २१-०६-२०२० फेसबुकवरून साभार

. . . . . . . . . .

प्यालों किती तरीही…

विंदा करंदीकर.१९६५.
प्यालों किती तरीही, प्याले न मोजितो मी
आहे पिता-पिवविता, तो एक, मानतो मी
अवकाश हाच प्याला अन् काळ हीच मदिरा
थेंबात सांडलेल्या,ग्रहगोल पाहतो मी
कक्षेवरी उगा का, कलते वसुंधरा ही?
झुकली अशी कशाने, तें एक जाणतो मी
पापांत पुण्य मिसळी, सत्यात भेसळी असत्य,
जो कॉकटेलकर्ता, त्यालाच मानतो मी
जी बाटलीत आहे,आहेच ती बुचात;
हें सत्य नास्तिकांच्या,डोक्यांत हाणतों मी
द्राक्षांत आजच्या या, मदिरा असे उद्यांची
आशा चिरंतनाची, इतकीच ताणतो मी
विंदा करंदीकर.१९६५.
होळी आणि धुलीवंदनाच्या,बेधुंद शुभेच्छा !!
🍻🍾🌈 नवी भर दि. १२-०४-२०२१ . . . ही कविता मला वॉट्सॅपवरून मिळाली आहे. ती विंदांनीच लिहिली आहे की नाही याची मलाही खात्री नाही. कदाचित त्यांच्या नावावर खपवली गेली असण्याची शक्यता आहे.

. . . . . .

नवी भर दि.२३-०८-२०२१

धिक्कारिली तरीही सटवीस लाज नाही———श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही
एक झुरळ रेडिओत गेले;—–गवयी होऊन बाहेर आले.
एक उंदीर तबल्यात दडला;—–तबलजी होऊन बाहेर पडला.
त्या दोघांचे गाणे झाले—तिकीट काढूनमांजर आले!
अश्या विनोदी –विद्रोही –बाल –प्रेम कवितांचे कवी ,गीतकार ,निबंधकार ,लेखक .!!विंदा करंदीकर यांची आज जयंती !!! २३ ऑगस्ट १९१८!!
मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले
कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले.
केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले.
त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला.
त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही.
उंटावरचा शहाणा ,आटपाट नाग होते ,भीमाचे जेवण ,राणीची बाग ,दोन परी ,खुर्ची आणि स्टूल ,या लहान मुलान्चेसाठीच्या कविता ,तसेच देणाऱ्याने देत जावे ,तुकोबा आणि शेक्सपियर ,पछाडलेला अश्या अनेक कविता
तसेच स्पर्शाची सावली ,आकाशाचा अर्थ ,परंपरा आणि नवत्व असे निबंधही त्यांनी लिहिले.
**विंदा –वसंत बापट –पाडगावकर यांचे कविता वाचन फारच सुरेख असायचे वाई येथे किसनवीर महाविद्यालयात १९७५ साली या तिघांचेही काव्य वाचन ऐकणेस मिळाले
काव्यसंग्रह : स्वेदगंगा –मृद्‌गंध –धृपद –जातक ८—विरूपिका –अष्टदर्शने
संकलित काव्यसंग्रह : संहिता (संपादन – मंगेश पाडगावकर)–आदिमाया (संपादन – विजया राजाध्यक्ष) यावचन
बालकविता संग्रह : राणीची बाग –एकदा काय झाले —सशाचे कान —एटू लोकांचा देश –परी ग परी —अजबखाना–सर्कसवाला –पिशीमावशी आणि तिची भुतावळ –अडम्‌ तडम् –टॉप –सात एके सात —बागुलबोवा
त्यांची आठवणीतील गाणी :
अर्धीच रात्र वेडी —- असेच होते म्हणायचे तर —– मागु नको सख्या जे —

सर्वस्व तुजला वाहुनी
सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी
घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया?
अंधार होतो बोलका वेड्यापिशा स्वप्‍नांतुनी
माझ्या सभोंती घालते माझ्या जगाची भिंत मी
ठरते परि ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी
संसार मी करिते मुका दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती आज्ञा तुझी ती मानुनी
वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन्‌ प्राक्तनावर रेलते छाती तुझी ती मानुनी
विनम्र अभिवादन “”

श्री. माधव विद्वांस आणि फेसबुक यांचे आभार . . दि.२३-०८-२०२१

. . . . . . . .

विंदांच्या आणखी काही कविता . . वॉट्सॅपवरून साभार

उंटावरचा एक शहाणा
सोन्याच्या घालून वहाणा
भीक मागतो दारोदारी
म्हणतो, ‘सगळे कंजुष भारी”

उंटावरचा एक शहाणा
उंटावरून शेळ्या हाकी
आतेला म्हणतो मामी
अन मामीला म्हणतो काकी

उंटावरचा एक शहाणा
म्हणतो बांधीन असाच वाडा
दारामधून शिरे न कुत्रा
खिडकीमधून येईल घोडा

…..
जग बघण्यासाठी .. केलेन डोळे
देवाचे मन .. साधेभोळे…

पण डोळे चावट असले
एकमेकांनाच बघत बसले..

देवाने केला विचार थोडा
बांधलान मधोमध नाकाचा घोडा…

…..

कधी वाटते वाटते
तुला द्यावे असे काही
ज्यात लपेल आकाश
लोपतील दिशा दाही

असे काही तुला द्यावे
भाबडे नि साधे भोळे
राधेचेही पडो दृष्ट
द्रौपदीचे दिपो डोळे

माझे नसून मी द्यावे
तुझे व्हावे दिल्यावीण
पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे
जन्म टाकाया गहाण….

विंदा करंदीकर….

**************************


लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

One thought on “कवीवर्य विंदा करंदीकरांना आदरांजली”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s