पुराणातल्या गोष्टी

 

दैत्यांचे गुरु शुक्राचार्य, तिरुपतीचा वेंकटरमणा गोविंदा आणि हयग्रीव अवतार यांच्यासंबंधींच्या आख्यायिका पुराणातील  गोष्टी या स्थळावर सविस्तर दिल्या आहेत . दि. १०-१२-२०२१.  https://anandghare.wordpress.com/2021/05/04/%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0/

सात चिरंजीव व्यक्ती

१. विभीषण
२. कृप
३. परशुराम
४. हनुमान
५ व्यास
६.अश्वत्थामा
७. बलि
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमान्श्च विभीषणः ।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविताः।।

यातील चार चिरंजीवींची माहिती खाली दिली आहे. (नवी भर दि.०६-०५-२०२२)


गोष्टीची गंमत
**************
कुंभकर्ण

कुंभकर्ण

सहा सहा महिने म्हणे कुंभकर्ण झोपून असायचा…!!!

खूप खूप वर्षांपूर्वी एका आजीने चिमुकल्या नातवंडांना कुंभकर्णाचे एक गुपित सांगितले…

म्हणाली..

स्वर्गातले इंद्रपद म्हणजे मज्जाच मज्जा…सारी सुखं हात जोडून समोर उभी…ऐश्वर्य असे की कुणीच असे पाहिले नसावे..

कुंभकर्णाने तपश्चर्या आरंभली… घोर तपस्या …

इंद्रपद डळमळू लागलं..प्रत्यक्ष इंद्र घाबरून गेला…म्हणे, माझी गादी आता जाणार ह्या कुंभकर्णाला..

देवी सरस्वतीने हे ऐकले…म्हणाली घाबरू नका महाराज, मी स्वतः कुंभकर्णाच्या जिव्हाग्री जाऊन बसते…

मुलांनो, जिव्हाग्री बसते म्हणजे कळलं का..? ह्याचा अर्थ, कुंभकर्ण जे जे बोलेल ते माझ्याच प्रभावाने बोलेल…

झालं…कुंभकर्णाची तपस्या फळाला आली…भगवंताने त्याला विचारले..”बोल काय हवे तुला…?”

कुंभकर्ण म्हणाला…देवा मला ना “निद्रपद हवंय…!!!”

बघा मुलांनो सरस्वती जिव्हाग्री बसली म्हणून “इंद्रपद” म्हणायच्या ऐवजी कुंभकर्ण म्हणाला “निद्रपद…”

“तथास्तु…” भगवंत म्हणाले..!!!

निद्रपद म्हणजे निद्रेचे ऐश्वर्य असणारे पद…!!!

तेव्हापासून कुंभकर्ण सहा सहा महिने नुसता निद्राधीन असायचा…!!!

मधुसूदन थत्ते
निवेदन: सौ. पद्मजा थत्ते.
१३-०१-२०१९

या कुंभकर्णाच्या विशाल देहाबद्दल खूप गंमती सांगितल्या जायच्या. त्याच्या श्वासाबरोबर हत्ती, घोडे, उंट नाकातून आत शिरायचे आणि उछ्वासाबरोबर ते बाहेर यायचे, त्याला शिंक आली तर ते दूर सात समुद्रापलीकडे जाऊन पडायचे, तो घोरायला लागला की राजवाडा थरथरायला लागायचा. वगैरे वगैरे ….. दिल बहलानेके वास्ते खयाल अच्छा था। …. मी आपल्या संस्कृतीची कुचेष्टा वगैरे करत नाही आहे. हे सगळे मी लहानपणी ऐकले आहे आणि माझ्याहून लहान मुलांना रंगवून सांगितले आहे. गंमत हा सुद्धा आपल्या संस्कृतीचा भाग होता आणि माझ्या मते आहे. पण हे सगळे खरे खरे आहे असे मानणारे ते मान्य करणार नाहीत.

दि.१५-०१-२०१९

अंगद शिष्टाई

रावणाबरोबर युद्ध सुरू करायच्या आधी शिष्टाचाराचे पालन करण्यासाठी रामाचा दूत म्हणून वालीपुत्र अंगद रावणाकडे गेला. त्याला बसायला आसनही दिले नाही म्हणू त्याने आपल्या शेपटीचे भले मोठे वेटोळे केले आणि रावणाच्या सिंहासनापेक्षाही अधिक उंच अशा त्या आसनावर तो बसला. आपल्या शक्तीची चुणुक दाखवण्यासाठी अंगदाने आपला एक पाय जमीनीवर घट्ट रोवला. रावणाच्या दरबारातला कोणताही वीर त्या पायाला हलवू शकला नाही.

Ravana Angad

. . . . . .  .

श्रीकृष्ण, सत्यभामा आणि पारिजातक

पारिजातक

दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापाने देवराज इंद्र शक्तीहीन आणि मलूल झाले होते. स्वर्गातील सारे वैभव लयाला गेले. त्यामुळे सर्व देव दुःखी झाले. हे संकट दूर करण्यासाठी त्यांनी भगवान श्री विष्णूंना गळ घातली. भगवान विष्णूंनी असुरांच्या मदतीने देवांनी सागर मंथन करून त्यातून चिरतारुण्याचे वरदान देऊ शकणारे अमृत मिळविण्याचा सल्ला देवांना दिला. असुरांच्या राजाने आपला स्वार्थ लक्षात घेत मदत देण्याची तयारी दाखविली. मेरू पर्वताची रवी आणि वासुकी सर्पाचा दोर करून सागराचे मंथन सुरू झाले. त्यावेळी मेरू पर्वत स्थिर राहात नव्हता, म्हणून श्री विष्णूंनी कूर्म अवतार घेऊन सागरतळाशी जाऊन त्याला आधार दिला. मंथन पुन्हा सुरु झाले. प्रथम त्यातून हलाहल विष बाहेर आले. त्या विषाने सर्व जण होरपळू लागले. भगवान शंकरांनी ते प्राशन केल्यामुळे ती समस्यादेखील सुटली. त्या विषाने श्री शंकरांचा गळा निळा झाला, म्हणून त्यांना नीलकंठ नाव प्राप्त झाले. त्या नंतर सागर मंथन पुढे सुरू झाले आणि त्यातून चौदा रत्ने बाहेर आली. त्यात कल्पवृक्ष, पारिजातक, कामधेनू, ऐरावत हत्ती, उच्चै:श्रवा घोडा, चंद्र, वारुणी, शंख, धन्वंतरी, माता लक्ष्मी, कल्पद्रुम, कौस्तुभ मणी, रंभा आणि शेवटी अमृत ह्यांचा समावेश होता. अमृताची वाटणी करण्यासाठी भगवान श्रीविष्णूंनी मोहिनी अवतार घेऊन फक्त देवांना ते कसे मिळेल याची तजवीज केली! पारिजातक आणि कल्पवृक्ष नंदनवनाची शोभा वाढवू लागले.

पुढे नारदांनी द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांच्या भेटीला जातांना पारिजातकाची फुले नेली होती. भगवान श्रीकृष्णांनी ती फुले रुख्मिणीला दिली! त्यामुळे सत्यभामा राणीचा तिळपापड झाला! तिने हट्ट करून पारिजातक वृक्षच भगवान श्रीकृष्णांना मागितला. राजा इंद्राशी लढाई करून श्रीकृष्णांनी तो आणला व सत्यभामेच्या महालासमोर लावला. पुढे जेंव्हा तो बहरला, तेंव्हा त्याची सुवासिक सुंदर फुले रुख्मिणीच्या दारासमोर पडू लागली! नारदऋषी अशा काही प्रसंगाची वाटच पहात होते. त्वरित त्यांनी सत्यभामा राणी साहेबांच्या महाली भेट देऊन तिला चिडवीले, “वृक्ष तर भगवान श्रीकृष्णांनी तुझ्या दारी लावला! पण त्याचे इंगित तुला कळले का? जाऊन बघून ये, आणि तुझ्या नवऱ्याला विचार, “फुले का पडती शेजारी?” कळ तर लावली आणि भांडण पुढे सुरूच राहिले!

. . .  डॉ.शरद काळे यांच्या लेखावरून साभार  दि. ०६-०६-२०२२

********************************************

सप्त चिरंजीव

श्री.अभिजित खेडकर यांनी फेसबुकवर लिहिलेल्या अभ्यासपूर्ण लेखमालिकेतील काही लेख त्यांच्या अनुमतीने या पानावर संग्रहित केले आहेत. मूळ लेखांचे दुवेही प्रत्येक लेखासोबत दिले आहेत. श्री. खेडकर यांचे मनःपूर्वक आभार.

१.सप्त चिरंजीव – प्रस्तावना

नमस्कार मित्रांनो,
भारतीय प्राचीन इतिहासातल्या अनेक गूढ संकल्पना आणि गोष्टींच गूढ आजही हजारो वर्षांनंतर तसेच कायम आहे. पुराणांमध्ये वर्णन केलेले दशावतार, त्यातही अजून न झालेला आणि हे कलियुग संपवणारा कल्की अवतार, समुद्र मंथनातून देवांनी प्राप्त केलेलं आणि दानवांना अप्राप्य झालेलं अमृत, त्याच तोडीची विलक्षण संजीवनी आणि सोमवल्ली वनस्पती, आणि जगातल्या कुठल्याही अन्य प्राचीन संस्कृतीत नसलेले, मृत्यू वर विजय मिळवून अमरत्वाच वरदान मिळालेले सप्त चिरंजीव…
‘अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।।’
या श्लोकात वर्णन केल्यानुसार अश्वत्थामा, बळीराजा, व्यास महर्षी, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे ते सात चिरंजीव आहेत. खरंतर, आपण सगळ्यांनी या सप्त चिरंजीवांबद्दल लहानपणा पासून ऐकलय, वाचलय. तरीही यांच्या बद्दलचे अनेक प्रश्न जे आपल्या सगळ्यांच्या मनात कधी न कधी तरी रुंजी घालून गेले असतील जसे, ह्या चिरंजीवांचं अस्तित्व नेमकं कशासाठी आहे? चिरंजीव सातच का? खरच, कुणाला असं अमर होता येतं का? यांना असा चिरंजीवी होण्याचं वरदान म्हणा, शाप म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा नेमका कुणी दिला? आणि जर हे चिरंजीव खरंच अस्तिवात असलेच तर आत्ता या काळात नेमके कुठे असतील, काय करत असतील?
ह्या सातही व्यक्ती एका काळातल्याही नाहीत. अश्वत्थामा, व्यास, कृपाचार्य हे महाभारत काळातले, बिभीषण आणि हनुमान रामायण काळातले, परशुराम रामायण पूर्व काळातले रामांच्या आधीचे अवतार आणि बळी तर वामन अवतारातला. बिभीषण आणि बळी तर चक्क असुर कुळातले, तरीही त्यांना हे वरदान मिळालं. परशुराम हे एकाचवेळी अवतारही होते आणि चिरंजीवीही. अश्वत्थाम्याला चिरंजीवीत्वाचा श्राप देणारे कृष्ण हे अवतार असून त्यांना मात्र मृत्यू आहे. अश्वत्थामा सोडून उर्वरित सहा जणांना चिरंजीवीत्व हे वरदान आहे, अश्वत्थाम्याला मात्र त्याने केलेल्या अक्षम्य पातकाचा परिणाम म्हणून मिळालेल्या मस्तकावरच्या सतत भळभळत्या जखमेमुळे हा श्राप आहे. परशुराम सोडले तर बाकीचे सगळे चिरंजीव त्या त्या काळातल्या कथेतले मुख्य नायकही नाहीत, काही जण तर बळी आणि अश्वत्थाम्या सारखे चक्क खलनायक हीआहेत.
या सगळ्यांना फक्त चिरंजीवीत्वाचं वरदान आहे, चिरतारुण्याचं नाही. मग प्रश्न उरतो कि असं गलितगात्र शरीर घेऊन वर्षानुवर्ष जिवंत रहाण्याचं नेमकं औचित्य तरी काय असेल, आणि उद्देश तरी काय असेल. कल्की पुराणात याचा उल्लेख सापडतो, कि जेव्हा कल्की अवतार होतो तेव्हा कल्की ला भेटण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी हे सर्व चिरंजीव शम्भल ग्रामी येतात. असेही म्हंटले जाते कि या सातही जणांचा उद्देश कल्की अवताराला सहाय्य करणे, आणि कलियुगाचा अंत करून पुन्हा सत्युगाची स्थापना करणे असा आहे. या सगळ्याचं चिरंजीवीत्व हे अनादी काळापर्यंत नाही तर कलियुगाच्या अंतापर्यंत आहे, त्या नंतर त्यांच्या अस्तित्वाच प्रयोजन संपेल.
या पुढच्या सात भागात आपण एकेक चिरंजीवाची चर्चा करणार आहोत. त्या प्रत्येकाचा इतिहास तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच, पण त्यांच्या बद्दल असलेल्या वेगवेगळ्या किवंदती, आख्यायिका, भारतात आणि भारताबाहेरही त्यांच्या अस्तित्वाचे दाखले देणारे स्थान, घटना आणि कथांची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात.
मी हि लेखमाला लिहितोय याचा अर्थ मला सगळ्याच गोष्टी परिपूर्णपणे माहिती आहेत असं अजिबात नाही, पण आपल्या सगळ्यांना या विषयात माहिती असलेल्या अनेक गोष्टी, संदर्भ कॉमेंट आणि लिंक च्या स्वरुपात नक्की पाठवा, कारण त्या जाणून घ्यायची माझीही खूप मनापासून इच्छा आहे. प्रत्येक शनिवारी या लेखमालेतला एक एक भाग प्रकाशित करण्याचा प्रयत्न असेल.
आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या आणि शुभेच्छांच्या अपेक्षेत…
आपला,
©अभिजीत खेडकर.

सप्त चिरंजीव – प्रस्तावना https://www.facebook.com/ekalabhi/posts/3028702153894310

सप्त चिरंजीव १ – महाबली

सप्त चिरंजीवांच्या श्लोकात उल्लेख आल्याप्रमाणे प्रथम नाव अश्वथाम्याचं येतं, परंतू जन्म कालक्रमानुसार पुराणकाळातील बळी किंवा महाबली याचा या यादीत पहिला क्रमांक लागतो.
बळी हा विष्णुभक्त प्रल्हादाचा पुत्र विरोचन याचा मुलगा. दक्ष प्रजापतीच्या दोन कन्या दिती आणि आदिती यांचा विवाह कश्यप ऋषींशी झाला. दिती पासून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोन पुत्र झाले, त्यांच्या वंशाला दैत्य (दितीपासून झालेले) असे संबोधले गेले, तर आदिती चा पुत्र इंद्र उत्पन्न झाला, त्याच्या वंशाला देव संबोधले गेले. नृसिहांनी हिरण्यकश्यपू चा वध केल्यावर त्याचा पुत्र प्रल्हाद दैत्यांचा राजा झाला. प्रल्हादाचा पुत्र विरोचन याला बळी हा पुत्र झाला.
देवांचे गुरु बृहस्पती आणि दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांच्या परस्पर विरोधी तत्वज्ञानाचा परिपाक म्हणून देव आणि असुर यांच्यात झालेल्या देवासुर संग्रामात अनेक वेळा दैत्यांना पराभव पत्करावा लागला. समुद्र मन्थनातून निघालेल्या अनेक शक्तींच्या सहाय्याने इंद्राने बळीचा वध केला. देव अमृत मिळवून अमर झाले, पण शुक्राचार्यांनी आपल्या मंत्रबलाच्या सामर्थ्याने बळी ला पुन्हा जिवंत केले. बळीने ब्रम्हांची तपश्चर्या करून स्वतःला अधिक सामर्थ्यशाली बनवले. गुरु शुक्राचार्यांच्या सल्ल्यानुसार त्याने शंभर अश्वमेध यज्ञ पूर्ण करायचा संकल्प सोडून तिन्ही लोकांवर, म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यावर आपले राज्य स्थापित केले.
आपल्या सामर्थ्याच्या बळावर नव्याण्णव अश्वमेध यज्ञ पूर्ण करून शेवटच्या शंभराव्या यज्ञाची तयारी करीत असतांना विष्णूंनी वामन अवतार घेऊन त्याच्याकडून तीन पद भूमी दान मागितली. शंभराव्या यज्ञपूर्ती नंतर खरंतर त्याचं त्रैलोक्याचं राज्य अखंड काळापर्यंत अबाधित राहीलं असतं. परंतू दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवायचं नाही या भूमिकेमुळे म्हणा किंवा माझ्या दारी प्रत्यक्ष विष्णूला याचक म्हणून यावं लागलं या अहंकारामुळे म्हणा, त्याने शुक्राचार्यांच्या विरोधाकडे साफ दुर्लक्ष करून वामनाची मागणी पूर्ण केली. एका पदात स्वर्ग, दुसऱ्यात पृथ्वीचं राज्य देवांसाठी दान देऊन, तिसरं पाउल ठेवायला जागाच उरली नाही म्हणून स्वतःच्या मस्तकावर पाउल ठेऊन घेत स्वतः पाताळाचं राज्य स्वीकारलं. विष्णूंनी त्याच्या भक्तीवर आणि दानीवृत्तीवर प्रसन्न होऊन त्याला चिरंजीवित्वाचं वरदान दिलं आणि त्याच्या विनंती नुसार स्वतः त्याच्या पातालसाम्राज्याचे रक्षक म्हणून बळी चे द्वारपाल ही भूमिका स्वीकारली. हि कथा आपणा सर्वांनी लहानपणापासून ऐकलीये, वाचलीये.
या बळी चे म्हणजेच महाबली चे राज्य पूर्वे पासून पूर्ण दक्षिण भारतापर्यंत पसरलेले होते. दक्षिण भारतात त्याला महाबली चा अपभ्रंश म्हणून मावेली असेही संबोधिले जाते. दरवर्षी केरळ मध्ये ओणम हा उत्सव याच महाबलीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. आपलं पाताळाचं राज्य सोडून महाबली आपल्या या प्रजेला दर्शन देण्यासाठी ओणम च्या वेळी खास केरळ मध्ये येतो अशी वदंता आहे. बळीला त्याची पत्नी वेदवल्ली हिच्या पासून सहा पुत्र होते, ज्यांच्या सहित तो या प्रदेशावर राज्य करत होता. त्यांची नावे अंग, वंग, कलिंग, सुम्ह, पौंड्र आणि आंध्र. यांच्याच नावाने पुढे त्यांची राज्ये बंगाल पासून ते आंध्रप्रदेशा पर्यंत वसवली गेली. यांच्या सोबतच बाणासुर नावाचाही एक पुत्र बळी ला होता असेही मानतात. या बाणासुराने आपल्या पित्याचा अपमान सहन न होऊन वामनाला विरोध केला, तेव्हा वामनाच्या रुपात असलेल्या विष्णूंनी त्याला पुढच्या मन्वंतरात पुढचा इंद्र हा बळी हाच असेल असेही वचन दिले.
महाबली हा स्वतः एक उत्कृष्ट कवीही होता. त्याने श्री विष्णूच्या स्तुतीपर लिहिलेले “हरीनाम माला स्तोत्र” हे अजूनही सुपरिचित आहे. पंडित जसराज यांनी गायलेले “ओम नमो नारायणा” हे सुप्रसिध्द भजन याच स्तोत्रातील आहे.
वामनाने जेव्हा बळी ला पाताळ लोकात जाण्याची आज्ञा केली तेव्हा तो त्याच्या जहाजात बसून दक्षिणपूर्व आशिया च्या बेटांना भेट देत ऑस्ट्रेलिया मार्गे पाताळात अर्थात दक्षिण अमेरिकेत पोहचला आणि तेथे पोहोचून त्याने आपल्या राज्याची स्थापना केली. या मार्गाचे वर्णन वाल्मिकी रामायणात किष्किंधा कांडात वाचायला मिळते. जेव्हा सुग्रीव सीतेला शोधण्यासाठी जे वानर सैन्य पाठवतो त्यात त्यांना तो या मार्गाचे सविस्तर वर्णन सांगतो. या वर्णनात पेरू देशातील अँडीज पर्वतावरचा हजारो फुट कोरलेला त्रिशुळाच्या आकाराचा तालवृक्ष, न्यूझीलंड मधील सुदर्शन नावाने वर्णन केलेला अतिशय रम्य असा पुकाकी तलाव, पॅसिफिक महासागरातल्या उकळत्या ज्वालामुखींच म्हणजेच रिंग ऑफ फायर च वर्णन अगदी तंतोतंत मिळत.
दक्षिण अमेरिकेतल्या अतिशय प्राचीन माया संस्कृतीचा मुळ पुरुष मयासुराने बळी साठी तेथे नवीन वसाहत वसवली. बळीचा राजमहाल हा तीन पुरांचा म्हणजेच तीन मोठ्या महालांचा बांधला, त्या मुळे त्याला त्रिभूवनांक म्हणजे तीन भुवनांचा स्वामी संबोधलं गेलं. तोच भाग आजही बोल्विया प्रांतात तियाहुनान्को (Tiahuanaco किंवा Tiwanaku ) या नावाने प्रसिध्द आहे. बळीने वेगवेळी सात नवी नगरे तेथील प्रजेसाठी वसवली त्याला नवतल (नवीन नगर) हे नाव रूढ झालं असं मानलं जात.
याच पेरू देशात वसणारी इंका हि अतिशय प्राचीन संस्कृती. त्या संस्कृती चा उद्गाता मानला जाणाऱ्या विराकोचा (Viracocha) ह्याची मूर्ती याच तीयाहुनान्को भागात कालासासाया (Temple of Kalasasaya) या मुक्त आकाशाखाली असलेल्या मंदिरात बघायला मिळते. इंका च्या प्राचीन साहित्यात उल्लेख केल्याप्रमाणे विराकोचा हा पॅसिफीक समुद्र ओलांडून लांब नौकांमधून हजारो वर्षांपूर्वी पेरू च्या समुद्र किनाऱ्यावर आला. त्याने त्या ठिकाणी मातीपासून प्रजेची निर्मिती केली. त्या प्रजेला कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान ह्या सारख्या अनेक गोष्टीत पारंगत बनवलं, एक प्रगल्भ संस्कृती उभी केली आणि काही कालावाधी नंतर पुन्हा कधीही परत न येण्यासाठी समुद्रावर चालत, ज्या दिशेकडून आला होता, त्याच दिशेने निघून गेला, अशी आख्यायिका त्याच्या बद्दल सांगितली जाते. या विराकोचाने आकाश (Hanan pacha), आंतरिक पृथ्वी अर्थात पाताळ (Uku pacha) आणि बाह्य पृथ्वी (Cay pacha) यावर प्रभुत्व मिळवलं होतं अस इन्काज मानतात.
ह्या विराकोचाचं बरचसं वर्णन महाबलीच्या कथेशी मिळतं-जुळतं आहे आणि विराकोचा हे नावही महाबली च्या पित्याशी म्हणजेच विरोचनाशी साधर्म्य दाखवणारं आहे. विराकोचा ज्या लांब बोटीतून पेरू च्या समुद्र किनाऱ्यावर पोहचला, तश्याच लांब बोटीतून आजही ओणम च्या सणाच्या वेळी केरळ मध्ये नौकानयनाची स्पर्धा हजारो वर्षांपासून आयोजित केली जात असते. अर्नामली भागात पंपा नदीत होणारी हि स्पर्धा ओणम च्या परंपरेचा एक खास भाग आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या एका भाषणात म्हटल्या प्रमाणे पाश्चात्य जनता हि विरोचानाची वंशज आहे हे वाक्यही या साधर्म्याला पुष्टी देतं. (Source: Talks with Vivekananda: Publisher- Advaita Ashram, Mayavati, Himalayas, January 1939.)
अर्थात या सगळ्या महाबली बद्दलच्या आख्यायिका असल्या तरी आधुनिक काळात कुणालाही महाबलीचं दर्शन झाल्याचा उल्लेख मात्र अजिबात सापडत नाही. “इडा पिडा टळो, बळीचे राज्य पुन्हा येवो” या जनभावनेच्या इच्छेतून, दिवाळीतल्या बलीप्रतिपदेच्या पूजनातून आणि ओणमच्या सणातून महाबली अजूनही आपल चिरंजीवित्व राखून आहे, हे तितकच खरं.
©अभिजीत खेडकर.
माहिती संदर्भ – गुगल, विकिपीडिया, फोटो सौजन्य – गुगल.

सप्त चिरंजीव -भाग १ – महाबली https://www.facebook.com/ekalabhi/posts/3043922089038983

**********************************

सप्त चिरंजीव २ भगवान परशुराम

नमस्कार,
जन्म क्रमानुसार सप्त चिरंजीवांमध्ये दुसरा क्रमांक येतो तो भगवान परशुराम यांचा. परशुराम हे एकमेव असे आहेत कि ज्यांचे नाव दशावतारांमध्ये आहे आणि सप्त चिरंजीवांमध्ये देखील आहे. परशुरामांचा कर्म कालखंड हा सर्वात मोठा कालखंड समजला जातो. रामायण कालखंडाच्या, राम अवताराच्या आधी त्यांचा जन्म आणि बऱ्याचश्या प्रमुख जीवित कार्याचा उल्लेख येतो. तर रामायण काळात रामांकडून शिवधनुष्य भंगाच्या प्रसंगाच्या वेळी आणि महाभारत काळात भीष्म, द्रोण आणि कर्ण यांचे शस्त्रगुरु म्हणूनही त्यांचा उल्लेख येतो. ब्रम्ह्वैवर्त पुराणात एक कथा आहे, त्यानुसार परशुराम एकदा भगवान शंकरांना भेटायला कैलासावर गेले, परंतू शंकरांची आज्ञा नसल्यामुळे द्वारावर रक्षक म्हणून उभे असलेल्या गणेशांनी त्यांना अडविले, त्यावरून त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. या युद्धात गणेशांचा एक दात तुटला, तेव्हापासून त्यांना एकदंत असे नाव पडले.
परशुराम हे ऋषी जमदग्नी आणि त्यांची पत्नी रेणुका ह्यांचे पाचवे पुत्र. जन्माने ब्राम्हण कुळातील असले तरी, कर्माने क्षत्रिय म्हणून ओळखले जातात. शस्त्र आणि शास्त्र या दोहिंवरही समान अधिकार आणि प्राविण्य प्राप्त केल्याने,
“अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।”
अर्थात चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) – म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो (तो परशुराम). असे त्यांचे यथार्थ वर्णन केले जाते.
परशुरामांच्या जन्मस्थानाबद्दल अनेक प्रवाद आहेत. माथुर चतुर्वेदी ब्राम्हणांच्या इतिहासाचे लेखक, श्रीबाल मुकुंद चतुर्वेदी यांच्या अनुसार भगवान परशुरामांचा जन्म ई. पू.5142 . वैशाख शुक्ल तृतीयेच्या म्हणजेच अक्षयतृतीयेच्या रात्री प्रथम प्रहरी झाला. परशुरामांचा जन्मसमय सतयुग आणि त्रेतायुगाचा संधिकाल मानला जातो. भृगुक्षेत्रा चे संशोधक साहित्यकार शिवकुमार सिंह कौशिकेय यांच्या अनुसार परशुरामांचा जन्म उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यातील खैराडीह या गावात झाला होता. त्यांच्या शोध कार्यानुसार उत्तर प्रदेश राज्याच्या बलिया जिल्ह्याच्या शासकीय राजपत्रातही याची सचित्र माहिती दिली आहे. एका मान्यतेनुसार त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदौर जवळ महू गावातील जानापाव पर्वतावर झाला असे मानले जाते. दुसऱ्या एका मान्यतेनुसार परशुरामांचा जन्म छत्तीसगढ़ च्या सरगुजा जिल्ह्यातील घनदाट जंगलात असलेल्या कलचा गावातील प्राचीन महालाच्या, शतमहाल नावाच्या खंडहरात झाल्याचे सांगितले जाते. तो महाल हा जमदग्नी ऋषींच्या पत्नीचा, रेणुकेचा होता असे मानले जाते. हा सारा भाग प्राचीन दंडकारण्याचा भाग मानला जातो.
परशुरामांची आपल्याला ओळख आहे ती प्रामुख्याने, त्यांनी पित्याच्या आज्ञेवरून स्वतःच्या मातेचा आणि चारही भावांचा एक क्षण हि विचार न करता केलेला वध किंवा पिता प्रसन्न झाल्यावर माते सहित सर्व भावांना पुन्हा जिवंत करण्याच मिळवलेल वरदान, हैहयराज सहस्त्रबाहू कार्तवीर्य अर्जुनाशी जबरदस्तीने कामधेनु पळवून नेल्यामुळे आणि आपल्या पित्याची जमदग्नी ऋषींची त्याने केलेली हत्या यामुळे त्याच्याशी केलेले युद्ध आणि त्याचा केलेला वध, सत्तांध झालेल्या अनेक क्षत्रिय राजांच्या अन्यायाला विरोध करण्यासाठी आपल्या क्षत्रीयकुलोत्पन्न मातेच्या; रेणुकेच्या आदेशावरून एकवीस वेळा नि:क्षत्रिय केलेली पृथ्वी या घटनांमुळे. परंतु परशुरामांच कार्य केवळ एवढचं नाहीये.
परशुरामांना केरळ मधील सुप्रसिध्द भारतीय युद्धकला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्लारीपत्तू (म्हणजेच जुडो कराटे चा मूळ भारतीय अवतार) या प्रकाराचे संस्थापक जनक म्हणूनही ओळखले जाते. प्रामुख्याने मलबार क्षेत्रात ओळखल्या जाणार्या उत्तरी कल्लारीपत्तू चे संस्थापक परशुरामांना आणि कन्याकुमारी क्षेत्रात अभ्यास केल्या जाणाऱ्या दक्षिणी कल्लारीपत्तू चे संस्थापक अगस्त्य ऋषींना मानले जाते. कल्लारीपत्तू चे मुळ उद्गाता साक्षात भगवान शिव मानले जातात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अगस्ती आणि परशुराम यांनी या कलेचा विकास केला.
एका मान्यतेनुसार परशुरामांनी ऋषी अगस्तींची पत्नी लोपामुद्रा, ऋषी अत्री पत्नी अनुसूया आणि आपला एक शिष्य अकृतवण यांच्या सहकार्याने संपूर्ण भारतखंडात नारीजागृती अभियानाचेही कार्य उभे केल्याची माहिती मिळते.
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी वरील कोकण पासून ते थेट केरळ पर्यंतची अपरांत भूमी ही परशुरामांनी आपल्या परिश्रमाने आणि अद्भुत अश्या भूमीअभियांत्रीकी च्या ज्ञानाने समुद्र चारशे योजन मागे हटवून अर्थात समुद्रात भर घालून (Land Reclamation) त्या काळात अक्षरशः काही हजारो वर्षांपूर्वी निर्माण केली आणि वस्तीयोग्य बनवली. हि सारी भूमी आज परशुराम भूमी म्हणून ओळखली जाते, आणि परशुरामांना सप्तकोकणचे देव म्हणून मानले जाते.
अरुणाचल प्रदेशातील लोहित स्थानी ज्या ठिकाणी ब्रम्हपुत्र नदी भारतात प्रवेश करते, तेथे एक तलाव “परशुराम कुंड” नावाने प्रसिध्द आहे. असे मानतात कि मातेची हत्या केल्या नंतर त्यांच्या हातातील परशु त्यांच्या हातातच चिटकून राहिला. तेव्हा त्यांच्या पित्याने, जमदग्नी ऋषींनी त्यांना सांगितले कि तसाच जाऊन भारतातील प्रत्येक कुंडात स्नान कर, ज्या ठिकाणी तुझ्या हातातील परशु गळून पडेल, तेव्हा तू मातृहत्येच्या पातकातून मुक्त होशील. परशुराम सारा भारत फिरून जेव्हा या ठिकाणी आले, तेव्हा त्यांचा परशु मुक्त झाला, तेव्हापासून या स्थानाला परशुराम कुंड म्हणून मान्यता आहे. दर मकरसंक्रांती च्या दिवशी येथे मोठा मेळा भरतो. या कुंडात स्नान केल्याने पापमुक्ती होते असे मानले जाते. परशुरामांनी आपल्या पित्याची आज्ञा मानून आपल्या मातेची, रेणुकादेवीची हत्या केली. परंतु पुन्हा आपल्या पित्याला प्रसन्न करून घेत त्यांनी मातेचे आणि भावांचे प्राण परत मिळवले, यावरून प्रसन्न होऊन पिता जमदग्नी ऋषींनी त्यांना इच्छामृत्यू अर्थात चिरंजीवित्वाचा वर दिला.
असं म्हणतात कि परशुरामांनी अनेक विद्या आपल्या बालपणीच अवगत केल्या होत्या. त्यात विशेष म्हणजे त्यांना पशु-पक्षांची हि भाषा येत होती. कुठलेही हिंस्त्र पशु सुद्धा त्यांच्या सहवासात आल्यावर त्यांचे मित्र बनून जात असत.
परशुरामांच्या काही जणांना होणाऱ्या साक्षात्कारांच्या कथा आजही भारतात काही ठिकाणी ऐकायला मिळतात.
चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फूट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामांच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम किंवा लोटे परशुराम असे म्हणतात. परशुरामांच्या इथल्या मंदिराच्या रचनेमध्ये मोगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहेत,उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे. असे सांगतात कि एकदा या बेगमेची तारवे समुद्रात बुडाली होती. या बेगमेला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहिती होते. तिने नवस बोलला की, तारवे परत आल्यास देऊळ बांधीन. त्यानंतर तिची तारवे खरोखरच सुखरूपपणे किनाऱ्याला लागली. परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला.
दुसरं एक स्थान टांगीनाथ धाम. झारखंड राज्यातील गुमला शहरापासून ७५ कि.मी.आणि रांची शहरापासून १५० कि.मी.अंतरावर वसलेल्या घनदाट जंगलाच्या मधोमध आहे. भगवान रामांशी भेट झाल्यानंतर परशुरामांनी आपले अमोघ धनुष्य पुढील अवतार कार्यासाठी श्रीरामांना देऊन ते स्वतः बिहार च्या या क्षेत्रात आले आणि जमिनीत आपला परशु गाडून तपश्चर्येला बसले. येथेच आजही भार्गवरामांचा हा परशु जमिनीत गाडलेला आहे. परशुला झारखंडच्या स्थानिक भाषेत टांगी म्हटलं जातं. ह्यावरूनच ह्या जागेचं नाव टांगीनाथ असं पडलं. त्या जागी श्री परशुरामांचे पदचिन्ह सुद्धा अजून दिसतात.
येथे असलेल्या परशु बद्दल सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे हजारो वर्ष सतत हवा आणि पाणी ह्यांच्या संपर्कात राहून ही त्या परशुला अजून ही गंज चढलेला नाही आहे त्या अवस्थेत अजूनही सुस्थितीत आहे. दुसरं आश्चर्य म्हणजे जमिनीत गाडला गेलेला परशु किती खोलवर आहे ह्याची अजूनही निश्चीती नाही, पण हा परशु अंदाजे १७ फुट असावा असे अनुमान आहे.
असं सांगितल जातं की एकदा ह्या परिसरात राहणाऱ्या व लोहार काम करणाऱ्या समाजातील काही लोकांनी लोखंड मिळवण्याच्या हेतूने परशु ला कापण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते अपयशी ठरले. उलट तसा प्रयत्न करणाऱ्यांचा एक एक करून मृत्यू होऊ लागला. ह्यामुळे भयभीत झालेल्या त्या जमातीने जसा तो परिसर सोडला तसा आजही त्या परिसराच्या १५ कि.मी च्या घेऱ्यात अजून ही लोहार जातीचे लोक राहत नाही. सन १९८९ मध्ये पुरातत्व विभागाद्वारे केलेल्या खोदकामात सोने चांदीचे आभुषणांसह अनेक मौल्यवान व पुरातन वस्तू आढळून आल्या उदा.हिरे जडीत मुकुट चांदीचे अर्धगोलाकार शिक्के, कानात घालण्यात येणारी सोन्याची बाळी, तांब्याचा डबा ज्यात काळी तीळ आणि तांदूळ होते. ह्या सगळ्या गोष्टी आजही डमुरी येथील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
सन १९४४ साली अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे गादीपुरुष श्री गजानन महाराज हे आपल्या तक्तपोथावर बसलेले असतांना सकाळी त्यांच्या समोर साक्षात भगवान परशुराम प्रकट झाले. श्री गजानन महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे साक्षात त्रिमित स्वरुपात परंतू वेगळ्याच मितीत अन्य कुणालाही न दिसता महाराजांसमोर प्रकट झाले. शेजारीच पहुडलेल्या चार अर्धग्लानीत असलेल्या, गलितगात्र झालेल्या चार श्वानांकडे निर्देश करून म्हणाले कि, “सध्याच्या काळात चारही वेदांची स्थिती अशी दीन झाली आहे, आपण याचा पुनरुद्धार करावा.” अशी आज्ञा देऊन पुन्हा अंतर्ध्यान पावले. महाराजांनी तीच गुरुदक्षिणा मानून श्रुतींचे पुनरुज्जीवन करण्याची प्रतिज्ञा घेऊन अक्कलकोट येथे वेद विद्या अनुसंधानाचे आणि अग्निहोत्र प्रसाराचे कार्य सुरु केले. नोव्हेंबर, 2017 मध्ये आणि सलग दुसऱ्या वर्षी नोव्हेंबर, 2018 मध्ये ही येथील मंदिरात एका रात्रीत अचानक काही पावले उमटल्याचे सकाळी मंदिर उघडल्यानंतर पुजार्यांच्या लक्षात आले. यात काही पावलांचे ठसे प्राण्यांचे आणि काही ठसे मानवाच्या पावलांच्या ठश्यांसारखे, परंतू नेहमीपेक्षा मोठ्या आकाराचे असल्याचे दिसून आले. हे भगवान परशुरामांच्या पाऊलांचे ठसे असावेत असे मानले जाते.
भगवान परशुरामांचा उल्लेख हा कल्की पुराणातही आलेला आढळतो. त्यात आलेल्या वर्णनानुसार जेव्हा कलियुगाच्या शेवटी शम्भल नावाच्या ग्रामांत कल्की अवतार होईल तेव्हा भगवान कल्कींना शस्त्र आणि शास्त्र दीक्षा देण्याची जबाबदारी भगवान परशूरामांवर असेल. पुराणानुसार सध्या ते महेंद्रगिरी पर्वतावर ध्यानस्थ आहेत. यातही दोन प्रवाद आढळतात, एक महेंद्रगिरी समुद्रसपाटी पासून सुमारे पाच हजार फुट उंचावर ओरिसा राज्यातील गजपती जिल्ह्यातील पराखेमुंडी या स्थानी आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. दुसरा महेंद्रगिरी आहे कोकणात, चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फूट उंचीचा डोंगर आहे. त्यालाही महेंद्रगिरी म्हणूनच ओळखले जाते आणि परशुराम सध्या तेथे तपस्या करीत आहेत असेही मानले जाते.
अतिशय मोठा कार्य कालखंड असलेले भगवान परशुराम आजही साऱ्या समाजाला वंदनीय आणि प्रेरणादायी असेच आहेत.
©अभिजीत खेडकर.
माहिती स्त्रोत – गुगल, विकिपीडिया,
श्रीरामयशोगाथा – लेखक बाबूरावजी पारखे,
देव भार्गवराम – लेखक एस. के. कुलकर्णी.
फोटो स्त्रोत = गुगल.

********

युगद्रष्टा

“आचार्य, भगवान परशूराम आलेत आपल्याला भेटायला.” कुटीच्या द्वारापाशीच थबकत सुधन्वाने ध्यानातून जागे होत असलेल्या महर्षी कश्यपांना प्रणाम करत सूचना दिली.
“भार्गव? या वेळी? असा अचानक?, कुठे आहे?” त्यांनी सुधन्वाला विचारलं.
“अतिथीशाळेत आपली प्रतीक्षा करतायेत प्रहरभरापासून, आपल्या ध्यानात विघ्न आणू नये अशी आज्ञा होती त्यांची.”
“ठीक आहे, पाठव त्यांना आत.” कश्यपांनी सांगितलं.
अश्वमेध यज्ञाच्या सांगतेला जवळपास दोन मास उलटून गेले होते, एका महाकाय आयोजनाच्या व्यस्ततेतून आश्रमवासी आताच कुठे मुक्त होऊन पुन्हा आपल्या नेहमीच्या दिनचर्येला लागले होते. देशोदेशींचे आलेले विप्रगण, त्यांची शिष्यमंडळी, काही क्षत्रिय भूपाल, त्यांचे सेनानायक, राजवंशी परिवार सारे आता स्वगृही परतले होते. गेली अनेक वर्ष परशूरामांनी चाललेल्या नि:क्षत्रिय वसुंधरेच्या अभियानाचा परिपाक म्हणून आयोजिलेला अतिभव्य असा अश्वमेध यज्ञ, स्वतः परशूरामांनी दीक्षित होऊन कश्यपांना या यज्ञाचे अध्वर्यु होण्याची केलेली विनंती. आपल्या प्रिय शिष्याने केलेल्या विनंतीला मान देऊन कश्यपांनी यज्ञाचं अध्वर्युपद स्वीकारलं. परशूरामांचं सार्वभौमित्व खऱ्या अर्थाने सिध्द करणाराचं तो यज्ञ होता. अन्यायी, उन्मत्त आणि अहंकारी झालेले सगळे क्षत्रिय राजे पराभूत झाले होते किंवा कोणतीही दयामाया न दाखवता यमसदनास धाडले गेले होते. जे जे सत्शील आणि प्रजाहितदक्ष क्षत्रिय होते त्यांना अभय देण्यात आलं होत. परशूरामांच्या परशूचा दरारा साऱ्या भूमंडळात निनादात होता. यज्ञात आवर्जून उपस्थित राहिलेल्या साऱ्यांच्याच चेहऱ्यावर आता शांतीचं, स्थैर्याचं आणि सुरक्षितपणाचं समाधान विलसत असल्याचं कश्यपांना दिसत होत. आणि यज्ञाच्या शेवटच्या दिवशी परशूरामांनी तो अकस्मात घेतलेला निर्णय कश्यपांसहित साऱ्यांनाच अचंबित करणारा होता. यज्ञ दक्षिणेच्या रूपाने परशूरामांनी जिंकलेलं पृथ्वीचं संपूर्ण राज्य आपल्या गुरूंना कश्यपांना दान केलं होतं.
“प्रणाम गुरुवर.” कुटीत आलेल्या परशूरामांच्या आवाजाने कश्यपांची तंद्री भंग झाली.
“ये भार्गवा, आयुष्यमान भव. आज अचानक कस येण झालं?” प्रणामासाठी खाली वाकलेल्या परशूरामांच्या बाहूंना धरून उभे करत कश्यपांनी विचारलं.
“गेल्या दोन मासांपासून मन अस्वस्थ आहे गुरुदेव.” परशूरामांनी कातर स्वरात आपली व्यथा व्यक्त केली.
“बैस वत्सा, नि:शंकपणे सांग, काय वाटतय तूला.” कश्यपांनी आपल्या जवळ बसवून घेत स्नेह्भरल्या नजरेने परशूरामांना आश्वस्त केलं.
गुरूंच्या सान्निध्यात परशूरामांना आता आपलं मन मोकळ करण्याचं धैर्य आलं. इतके दिवस, इतकी वर्ष मनातले विचार कुणाशी व्यक्त करावे याचा उलगडाचं होत नव्हता. माता पित्यांनी केलेल्या निजधामाच्या प्रयाणा नंतर गुरु हेच एकमेव आधार समजून परशूराम आज त्यांच्या भेटीला आले होते.
“गुरुवर, गेली अनेक वर्ष ब्राम्हणकुळात जन्म घेतलेला असतांनाही अन्याय आणि अनाचाराच्या विरुध्द शस्त्र हातात घ्यावं लागलं. योग्य कारणासाठी असली तरी अपरिमित अशी हिंसा माझ्या हातून घडली. पित्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी प्रत्यक्ष प्रिय अश्या मातेचीही हत्या या हातून झाली. पित्याच्या वरदानाने माता पुन्हा जीवित झाली, तरीही मातृहत्येचं पातक माझ्या हातून घडलं याचा सल आयुष्यभर मला बोचत राहील.” मातेच्या आठवणीने परशुरामांच्या डोळ्यात पाणी तरारलं.
“शांत हो भार्गवा, जे विधीलिखीत आहे त्याला कोणीही बदलू शकत नाही. या साऱ्याला तू केवळ एक निमित्तमात्र आहेस, हे आता मी तुला समजावून सांगायचं का?” कश्यपांनी त्यांच्या डोळ्यात बघत शांत स्वरात विचारलं.
“शेवटच्या संहारानंतर ऋचिक ऋषींच्या आज्ञेनं मी देवेंद्रा समोर माझं शस्त्र खाली ठेऊन हिंसेचा पूर्णपणे त्याग केला. मला कसलाही मोह ठेवायचा नव्हता म्हणून मी जिंकलेली सारी भूमी आपल्या चरणी दान केली. आपण ती सुयोग्य अश्या ब्रम्हवृन्दांना आणि सदाचारी क्षत्रिय भूपालांना वितरण करून तिची सुयोग्य अशी व्यवस्थाही लावलीत. परंतु आता एक भयंकर रितेपण मनात भरून आहे.” परशूरामांनी आपली व्यथा गुरुंसमोर व्यक्त केली.
“तुझी व्यथा अगदी योग्य आहे वत्सा.” कश्यपांनी कौतुकभरल्या नजरेनं आपल्या शिष्याकडे बघितलं.
“गुरुवर, माझ्या जीवितकार्याची सांगता झाली हे तर मानायला माझं मन तयार नाही. परंतु ऋचिकांना दिलेल्या वचनानुसार मी कुणावरही शस्त्र उचलणार नाही, आता या पुढील आयुष्य तपश्चर्येत आणि शस्त्रदीक्षेत व्यतीत करावं अशी इच्छा आहे. परंतू एक वेगळीच समस्या माझ्या मनात आहे गुरुदेव….” आपल्या मनातल्या अमूर्त विचारांना शब्दात कसं मांडाव हे न समजल्या मुळे परशूरामांनी आपलं वाक्य अर्धवट सोडलं.
“आपण एकदा दान केलेल्या भूमीवर आता कसं राहायचं हेच ना?” कश्यपांनी मिस्कीलपणे स्मितहास्य करीत परशूरामांना विचारलं.
“आपण त्रिकालज्ञानी आहात गुरुवर.” परशुरामांनी सिस्मित होऊन गुरूंना प्रणाम केला.
“आपला अपमर्द करण्याचा हेतू अजिबात नाही गुरुवर, परंतु आयुष्यभर स्वाभिमानाने जीवन व्यतीत केल्यावर दुसऱ्याचं स्वामित्व असलेल्या भूमीवर राहण मनाला खरंच पटत नाही गुरुदेव. परंतु मग जाणार तरी कुठे, करणार तरी काय, हीच व्यथा स्वस्थ बसू देत नाहीये मला.” परशूरामांनी आपल्या मनातली खळबळ अखेर व्यक्त केली.
“तू मला यज्ञात भूमी दान केली नसतीस, तरी मी ती तुला दान करायला लावली असती पुत्रा.” कश्यपांनी प्रथमच परशूरामांसाठी हे संबोधन वापरल्या मुळे परशूराम अधिकच भारावले.
“असं का गुरुवर?” त्यांनी कश्यपांना आश्चर्याने विचारलं.
” कारण तुला इथेच थांबून राहायचं नाहीये वत्सा, तुझं जीवितकार्य अजून खूप खूप मोठ आहे. आणि त्या साठी मी तुझा गुरु तुला आज्ञा देतोय कि तू आता या दान दिलेल्या भूमीवर रहायच नाहीस.” कश्यपांनी दृढ शब्दात परशुरामांना आज्ञा केली.
“मग मी करायचं तरी काय गुरुदेव, कुठं जायचं?’ परशूरामांनी विचारलं.
“त्याचा निर्णय तूच घ्यायचायेस वत्सा, तुझी नवीन भूमी वसव, एक नवीन भूमी, नवीन विश्व, तुझ्या कल्पनेप्रमाणे. येणाऱ्या अनेक युगात तुला खूप महत्वाची भूमिका पार पडायची आहे, शस्त्रदीक्षेची, नारी जागृतीची, येणाऱ्या युगातील अनेक वीरांना-अवतारांना तुझी आवश्यकता आहे, तू युगद्रष्टा आहेस भार्गवा, जा यशस्वी भव.” कश्यपांनी हात उंचावत आशीर्वाद दिले.
गुरूंची वाणी ऐकतच परशूरामांच्या डोळ्यासमोर पुढची योजना साकार होत होती, पित्याच्या अंत्यविधी निमित्त संपूर्ण जंबूद्विपात केलेली पायपीट आणि त्या दरम्यान मनावर कोरला गेलेला सारा परिसर…बस्स..दिशा ठरली, दक्षिण पश्चिम सागर किनारा…एक नवीन भूमी वसवायची…असंख्य योजना त्याच्या डोक्यात घोळू लागल्या होत्याच.
परशूराम उठून उभे राहिले, कश्यपांना दंडवत प्रणाम करून म्हणाले, “गुरुवर, आपण अगदी सुयोग्य मार्ग दाखवलात. खरोखरच आपण माझे सर्वस्व आहात, नाहीतर मी असाच विचारगर्तेत किती काळ खितपत राहिलो असतो माहित नाही. आपल्या आज्ञेने माझा जीवनमार्ग प्रशस्त केलात. प्रणाम. येतो, आज्ञा असावी.” तत्काळ पाठ फिरवून परशूराम आपल्या नव्या दिशेने चालू लागले.
कश्यपांच्या डोळ्यातले कढत अश्रू गालावरून खाली केव्हा ओघळले त्यांनाही कळलं नाही. त्यांचा आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच होता. आपल्या प्रिय शिष्याच्या पावलागणिक लहान होत जाणाऱ्या पाठमोऱ्या प्रतिमेकडे अभिमानाने पाहत ते तसेच उभे राहिले, त्यांच्या मनातली परशूरामांची प्रतिमा मात्र अधिकच मोठी मोठी होत होती.
©अभिजीत खेडकर,
०३ नोव्हेंबर, २०१८

************************************

सप्त चिरंजीव ३ – हनुमान

हनुमान हे सप्त चिरंजीवांमधले तिसरे चिरंजीव. या पूर्वीचे म्हणजे महाबली आणि परशुराम यांचा जन्म त्रेतायुगाच्या आधीचा, कदाचित सत्ययुगातला मानला जातो. तर हनुमानांचा जन्म त्रेतायुगातला. असे मानले जाते की हनुमानांचा जन्म त्रेतायुगाच्या शेवटच्या खंडात चैत्र पौर्णिमेला मंगळवारी सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी झाला, अर्थात आजपासून 1 करोड, 85 लाख, 58 हजार, 112 वर्षांपूर्वी.
हनुमानांच्या जन्म स्थानांबद्दलही अनेक प्रवाद आहेत. बहुतांश ठिकाणी झारखंड मधील गुमला जिल्ह्यातील आंजन नावाच्या एका छोट्या डोंगरावरील एका गुहेत हनुमान जन्म झाला असे मानले जाते, तर काही ठिकाणी दक्षिण गुजरात मधील डांग जिल्ह्यात अंजनीकुंड नावाच्या डोंगरावर एका गुहेत झाला असेही मानले जाते. हनुमानाचे जन्मस्थान म्हणून कर्नाटकातील हम्पी च्या जवळ कोप्पल जिल्ह्यातील अंजनेरी हे सर्वात प्रसिद्ध आहे. हाच परिसर म्हणजे रामायण काळातील किष्किंधा राज्य होते असेही मानले जाते. इतकेच काय, हनुमान जन्मस्थान म्हणून आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्रंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी टेकडीवर आहे असेही मानले जाते. हनुमानांचे जन्मस्थान सर्व भारतभर चर्चित असले तरी त्यांचा जन्म अंजनेरी नावाच्या पहाडावरील गुहेत झाला ही एक समान गोष्ट मात्र सर्व ठिकाणी आढळते.
हनुमान, आञ्ज्नेय, मारुति, बजरंगबली, केसरीनंदन, महावीर, संकटमोचन अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असलेल्या हनुमानाचे पिता वालीच्या साम्राज्यातील एक युथपती केसरी आणि माता अंजनी असले तरी, हनुमान पवनदेवांचे अंश मानले जातात, म्हणून हनुमान हे पवनपुत्र म्हणूनही ओळखले जातात. लहानपणीच सूर्याला नवीन फळ समजून त्याला पकडण्यासाठी उड्डाण केल्यावर इंद्राने आपल्या वज्राने केलेल्या प्रहारामुळे हनुवटीला झालेल्या इजेमुळे त्यांना हनुमान हे नामानिधान प्राप्त झाले. हनुमान हे रुद्राचे अकरावे अवतार मानले जातात. हनुमान वालीच्या सैन्यातील युथपती(वानर युथ मुख्यम) असले तरी, सुग्रीवाच्या अत्यंत विश्वासातील मित्रच होते. पुढे वाली आणि सुग्रीवाच्या संघर्षात त्यांनी सुग्रीवाची साथ दिली आणि नंतर श्रीरामांसोबत सीतेच्या शोधकार्यात आणि नंतरच्या युद्धात सक्रिय सहभागी झाले. शक्ति, बुद्धि आणि भक्ति यांचा अभूतपूर्वक संगम म्हणून हनुमानांचे उदाहरण दिले जाते.
हनुमान हे कपि कुळातील मानले जातात, कपि म्हणजे एप्स प्रजातीचे वानर. बर्‍याच जणांच्या मते हनुमान, सुग्रीव वगैरे वानर नसून मानववंशी होते आणि वानर हे त्यांच्या जातीचे प्रतीक चिन्ह किंवा विशेषनाम होते असे मानले जाते. हनुमानांचा उल्लेख अनेक संप्रदायांच्या कथांमध्ये, वेगवेगळ्या स्वरुपात आढळून येतो. विशेष म्हणजे रामायण काळाच्या ही आधी ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलामधील ८६ व्या सुक्तात एका वृषकपीचा उल्लेख इन्द्र आणि इंद्राणी यांच्या संवादा मध्ये येतो. लोक आपला यज्ञातील हवीर्भाग इंद्राला देण्याच्या ऐवजी वृषकपी या नर-वानर किंवा वृषभ-वानरला देत आहेत अशी तक्रार इंद्राणी इंद्राकडे करते असा उल्लेख आहे. अर्थात हा हनुमानांचा थेट उल्लेख नसला तरी, वैदिक काळात कुठल्या वानर रूपातील मानवाला पूजले जाण्याची ही एक विशेष गोष्ट समजली जाते. भागवत आणि स्कंद पुराणांमधे ही हनुमानाचा उल्लेख रुद्राचा अवतार म्हणून येतो. शिव पुराणात तर शिव आणि मोहिनी यांचा पुत्र म्हणून हनुमानांचा उल्लेख आहे. रामायणानंतर महाभारत काळात वनपर्वात हनुमान-भीम भेटीत भीमाच्या मार्गात शेपटी आडवी पसरून त्याचे गर्वहरण करतांनाही हनुमानांचा उल्लेख येतो. महाभारत युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर हनुमान विराजमान आहेत असेही आढळते.
बुद्धांच्या जातक कथेत ही हनुमानाचे उल्लेख आहेत. विशेषत: तिबेट, पश्चिम चीन, मध्य आशिया या भागात प्रचलित असलेल्या जातक रामायणात हनुमान रामांची पत्रे सीतेला पोहचवतात आणि विवाहाची आंगठी ही देतात असा उल्लेख आढळतो. जैन मुनि विमलसूरींनी लिहीलेल्या जैन रामायणात हनुमानांचा उल्लेख विद्याधर म्हणून केलेला आहे, विशेष म्हणजे यात हनुमान हे विवाहित दाखवले आहेत. खर-दूषणाची बहीण चंद्रणखा हिची मुलगी अनंगकुसुमा हिच्याशी त्यांचा विवाह झालेला दाखवला आहे. यात हनुमानाच्या शंभरहून अधिक पत्नी असल्याचा उल्लेख आहे. सिक्ख संप्रदायात हरदाराम भल्ला यांनी रचलेल्या “हनुमान नाटक” यात हनुमानांच्या कार्याचा उल्लेख येतो. यात हनुमानांना सिद्धा म्हणून संबोधले गेले आहे. खालसा पंथाच्या स्थापनेमागे हनुमानांची प्रेरणा असल्याचे ही मानले जाते. गुरु ग्रंथ साहिब च्या ६९१ व्या पानावर हनुमान स्तुति ही वाचायला मिळते,
“संतसंगति रामु रिदै बसाई ॥१॥ रहाउ ॥ हनूमान सरि गरुड़ समानां ॥“
हनुमानाच मंदिर नाही, असे भारतात कदाचित एकही गाव नसेल, परंतू अनेक देशांमध्ये देखील हनुमानाची मंदिरे, मूर्ति आपल्याला बघायला मिळतात. इंडोंनेशिया, कंबोडिया, थायलंड, बाली, श्रीलंका अशा दक्षिण आशियाई देशांमध्ये विविध रूपात, आकारात हनुमानच्या मूर्ति बघायला मिळतात, इतकच नाही तर, तिथल्या वेगवेगळ्या लोककथा, नाटक, गाणी या सगळ्यात ही हनुमान, राम, सीता या सगळ्यांचा उल्लेख आढळतो.
हनुमानांना चिरंजीव होण्याचं वरदान सीतामातेने दिल्याचा उल्लेख रामायणात आढळतो. अशोक वाटीकेत सीतेच्या शोधासाठी जेव्हा हनुमान पोहचतात तेव्हा श्रीरामांची मुद्रिका सीतेला ओळखीसाठी देतात, तेव्हाच त्यांच्यावर प्रसन्न होऊन सीतामाता त्यांना कलियुगापर्यंत चिरंजीवी होण्याचे वरदान देते. उत्तर रामायणात राम, सीता, लक्ष्मण यांची अवतार समाप्ती म्हणून त्यांचे मृत्यूचे वर्णन आलेले असतांना हनुमानाच्या मृत्युचा कुठेही उल्लेख नाही, त्यामुळे ते अमर किंवा चिरंजीव समजले जातात. रामांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व ठिकाणी संचार करून रामनामाचा प्रसार करणे हे हनुमानांनी आपले जीवितकार्य मानले आहे असे मानतात. त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी रामकथेचे वाचन होत असेल त्या ठिकाणी सूक्ष्मरूपाने हनुमान उपस्थित असतातच असे संपूर्ण भारतात मानले जाते.
महाभारत काळाच्या नंतर ही अनेक ठिकाणी हनुमान प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दिसल्याचे अनेक उल्लेख ही बघायला मिळतात. जेव्हा संत तुलसीदासजी रामचरित मानस या ग्रंथाची रचना करीत होते, तो काळ देशावर मुस्लिम आक्रमकांचा होता. १६ व्या शतकात चित्रकूट च्या गंगा घाटावर प्रत्यक्ष हनुमानांनी त्यांना दर्शन दिले आणि श्रीरामांचे ही बालरूपात दर्शन घडवले अशी कथा सांगतात. एकदा मुस्लिम बादशाहाने तुलसीदासांना बंदी बनवले आणि चमत्कार दाखवायला सांगीतले तेव्हा तुलसीदास त्याला म्हणाले की त्यांच्या जवळ रामनामा शिवाय कोणताही चमत्कार नाही. त्यांनी हनुमानाची स्तुति आळवण्यास सुरुवात केली, आणि तक्षणी शेकडो वानर तेथे जमा झाले, बादशहाला अखेर तुलसीदासांना मुक्त करावे लागले.
अर्वाचीन काळात १९४० साली थिएडर मॉर्ड नावाचा संशोधक मध्य अमेरिकेच्या मस्क्यूशिया च्या जवळील होन्डुरास च्या वर्षावनांच्या घनदाट जंगलात फिरत असतांना त्यांना शुद्ध संगमरवरी दगडात बांधलेले ३२,००० स्क्वेअर फुट परिसरात पसरलेले मोठे बांधकाम सापडले. मॉर्ड च्या संशोधनानुसार त्यांनी त्या परिसराला व्हाईट सिटी किंवा लॉस्ट सिटी ऑफ मंकी गॉड असे नाव दिले. त्या भागात एक जंगली जमात राहत होती, जिचा देवता एक विशालकाय वानर रूपातील मानव होता. तेथील रहिवासींच्या मानण्यानुसार त्यांच्या त्या देवतेची, ज्याला ते मंकी गॉड म्हणत होते, तिची विशाल मूर्ति अजूनही जमिनीखाली पुरलेली आहे. तेथील सर्व बांधकाम, सापडलेल्या वस्तु, इत्यादींवर माया संस्कृतीची छाप असल्याचे ही निष्पन्न झाले आहे. (https://news.nationalgeographic.com/…/150302-honduras…/)
रामायण काळातल्या उल्लेखानुसार राम रावण युद्धात अहिरावण राम व लक्ष्मणाला बेशुद्ध करून पाताललोकात घेऊन गेला, तेव्हा हनुमान त्यांच्या शोधात पाताललोकात जाऊन पोहचले तेथे त्यांची भेट त्यांचाच पुत्र मकरध्वजाशी झाली, जो अहिरावणाच्या राज्याचा रक्षक म्हणून काम करीत होता. मकरध्वजाचा जन्म हा हनुमानांच्या घामाचा बिन्दु एका मासोळीने ग्रहण केल्यामुळे झाला होता, आणि त्याला अहिरावण नंतर पाताललोकात घेऊन गेला होता. हनुमानाने अहिरावणाचा वध केल्यानंतर पाताललोकाचे राज्य मकरध्वजाला दिले, मयासुराने त्याच्यासाठी मोठा महाल तेथे बांधला असे मानले जाते. भारताच्या बरोबर विरुद्ध दिशेला मध्य अमेरिकेचा भाग येतो, त्यावरून पूर्वीचा पाताललोक म्हणजे मध्य अमेरिका असे मानले तर, मॉर्ड ला सापडलेल्या व्हाईट सिटी चा आणि विशाल मंकी गॉड चा संदर्भ मकरध्वजाच्या कथेशी जोडला जाऊ शकतो.
उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील घनदाट जंगलात पिलुआ महावीर हनुमान नावाचे एक अद्भुत मंदिर आहे. त्या मंदिरातील हनुमानाची मूर्ती ही जमिनीवर झोपलेल्या अवस्थेत आहे. तेथील प्रतापनेर चे राजा हुक्म तेजप्रतापसिंह यांना स्वप्नात हि मूर्ती दिसली, त्यांनी ती आपल्या राजवाड्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतू त्यांना अपयश आले. त्यामुळे तेव्हापासून ती मूर्ती तशीच पहुडलेल्या अवस्थेत आहे. चौहान वंशाचे शेवटचे वंशज हुकम देवप्रताप यांच्या कालखंडात तेथे भव्य मंदिर बांधण्यात आले. असे मानतात कि या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली नाहीये, आणि बालरूपात असलेली हि मूर्ती जिवंत अवस्थेत आहे असे मानले जाते. हि मूर्ती श्वास घेते, आणि भोजनही करते. या मूर्तीच्या तोंडाच्या जागेवर एक मोठे नैसर्गिक छिद्र आहे. भक्तांनी आणलेला प्रसाद, दुध वैगेरे या मुखात टाकले तर ते सरळ जमिनीच्या आत जाते, आजपर्यंत अक्षरशः हजारो टन प्रसाद मूर्तीच्या तोंडातून आत टाकला गेला असेल, परंतू अजूनही या मूर्तीचे तोंड भरलेले नाही. हा सारा प्रसाद कोठे जातो हे अद्यापही न उलगडलेले कोडे आहे. चमत्कारी हनुमान म्हणून संपूर्ण परिसरात या मंदिराची प्रसिद्धी आहे.
असेच अजून एक चमत्कारिक हनुमान मंदिर देवभूमी उत्तराखंड मध्ये असलेले कैचीधाम मंदिर आहे. हे मंदिर हनुमानावर प्रगाढ श्रद्धा असलेले नीम करौली बाबा या संतांनी १९६२ साली क्षिप्रा नावाच्या एका छोट्या डोंगरावर बांधले आहे. मंदिरात एकदा भंडारा सुरु असतांना अचानक तूप संपले, तेव्हा नीम करौली बाबांनी शेजारच्या नदीतून तुपपात्रात पाणी भरून आणायला सांगितले. आश्चर्य म्हणजे त्या सगळ्या पाण्याचे तूप बनले. असे अनेक चमत्कार या मंदिरात घडलेले सांगितले जातात. यामुळेच या मंदिरात विदेशी भक्तांची हि मोठी गर्दी असते. विशेष म्हणजे स्टीव्ह जॉब्स, ज्युलिया रॉबर्टस या सारखे चर्चेत असलेल्या व्यक्तीहि या हनुमानाचे भक्त आहेत. फेसबुक विकावे कि नाही अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या मार्क जुबेरबर्क ला हि स्टीव्ह जॉब्स ने या हनुमानाचे दर्शन करण्याचा सल्ला दिला होता, आणि २०१५ मध्ये मार्क या मंदिरात दर्शनाला आला, आणि या हनुमानाचा निस्सीम भक्त झाला.
हनुमानाच्या अस्तित्वाचे दाखले असे देशभरात मिळत असतातच, परंतू थेट रावणाच्या लंकेतही एक अविश्वसनीय अशी घटना बघायला मिळते. असे म्हणतात कि राम, लक्षमण आणि सीतेच्या अवतार कार्याच्या समाप्ती नंतर हनुमान बिभीषणाला भेटायला लंकेत गेले. लंकेतील पिदूर पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात राहणाऱ्या मातंग जमातीच्या टोळीतील समाजासोबत हनुमानांनी अनेक काळ व्यतीत केला. त्यांनी केलेल्या सेवेवर प्रसन्न होऊन मी दर एक्केचाळीस वर्षांनी तुम्हाला भेटायला येत जाईन असे वचन हनुमानानी त्यांना दिले. हा मातंग समाज अजूनही सर्वांपासून दूर, आदिम अवस्थेत जगतो आहे. त्यांची बोली, राहणीमान अजूनही बाहेरच्या जगाशी अस्पर्शित आहे. सेतू एशिया नावाची श्रीलंकेतली एक अध्यामिक संस्था या समाजाच्या संपर्कात आहे. त्यांच्या माहितीनुसार हजारो वर्षांपूर्वी दिलेले वचन पाळण्यासाठी हनुमान अजूनही बरोबर ४१ वर्षांनी त्यांना भेटायला येतात. त्यांच्यासोबत राहतात. त्यांनी दिलेला उपदेश आणि त्यांच्या भेटीचा उल्लेख ‘हनु पुस्तिका’ नावाच्या एका मोठ्या भुर्जपत्राच्या बाडावर त्यांच्या अगम्य लिपीत लिहून ठेवला जातो. हनुमांनांनी त्यांना एक विशिष्ठ मंत्र दिलेला आहे, तो पूर्ण श्रद्धेने जपल्यावर हनुमान प्रत्यक्ष प्रकट होतात, आणि त्यांना त्यांच्या संकटातून मुक्त करतात अशी त्यांची श्रद्धा आहे.
“कालतंतु कारेचरन्ति एनर मरिष्णु , निर्मुक्तेर कालेत्वम अमरिष्णु।“ हा मंत्र प्रत्यक्ष हनुमांनांनी त्यांना दिलेला आहे असे ते मानतात. त्यांच्या पुस्तिकेच्या नोंदीवरून गेल्या २७ मे, २०१४ रोजी हनुमान येऊन गेल्याचे सांगितले जाते. आता पुन्हा ४१ वर्षांनी म्हणजे, २०५५ साली येतील असे मानले जाते. सेतू एशिया नावाच्या वेबसाईट वर हि सगळी माहिती सविस्तर पणे होती असे अनेक वर्तमान पत्र, वेबसाईट वर आढळते, परंतू सध्या तरी हि वेबसाईट बंद असल्याचे दिसून येते.
संपूर्ण भारतात, जगभरात अजूनही अनेक भक्त हनुमानांना बघितल्याचे, साक्षात्कार झाल्याचे दाखले देत असतात. या लेखमालेच्या प्रस्तावनेच्या पहिल्या पोस्ट मध्येही एक वाचकांनी आपला अनुभव लिहिलेला आहे. सध्या तरी हनुमान हे हिमालयातील गंधमादन पर्वतावर तपास्यारत आहेत, आणि रामभक्तीचा प्रसार करीत आहेत अशी सर्वसामान्य समजूत आहे.
©अभिजीत खेडकर.
माहिती स्त्रोत – गुगल, विकिपीडिया,
फोटो स्त्रोत = गुगल.
होन्डुरास येथे सापडलेल्या लोस्ट सिटी ऑफ मंकी गोड च्या माहितीच्या व्हिडिओ ची लिंक –
https://youtu.be/zgwSAMaEQ98

सप्त चिरंजीव – भाग ३ – हनुमान
https://www.facebook.com/ekalabhi/posts/3079543662143492

******

*************************************

सप्त चिरंजीव – ४ बिभीषण

सप्त चिरंजीवांच्या यादीतला असुर कुळातला महाबली च्या नंतरचा बिभीषण हा दूसरा चिरंजीवी. रामायण काळातच अर्थात त्रेतायुगातील हनुमानाच्या सोबतचा हा एकमेव चिरंजीव. काही मान्यतेनुसार त्रेतायुगातच जांबवंताला ही चिरंजीव मानले गेले आहे, या लेखात आपण बिभीषणाचा विचार करणार आहोत.
बिभीषण हा रावणाचा लहान भाऊ. ब्रम्हश्री पुलत्स्य यांचा मुलगा विश्रवा आणि त्याची पत्नी कैकसी यांना झालेली चार अपत्ये, रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा. विश्रवा हे जन्माने ब्राम्हण कुलातले, तर कैकसी ही असुर सुमालीची पुत्री. तिने विश्रावांशी प्रेम विवाह केला. परंतु विश्रवांनी कैकसी ला संगितले की तिने ज्या मुहूर्तावर त्यांच्याशी विवाह केला होता, ती अशुभ घटिका अर्थात संध्याकाळ ची वेळ आणि मुहूर्त होता, त्यामुळे त्यांच्या पासून होणारे संतान हे कुरूप, बेडभ आणि तमोगुणी स्वभावाचे जन्माला येतील, परंतु तिने केलेल्या प्रामाणिक पतीसेवेमुळे शेवटचा पुत्र मात्र सत्वगुणी आणि सुकुमार असा जन्माला येईल. त्यानुसार शेवटचा बिभीषण हा असुर कुळात जन्म घेऊनही या तिघांपेक्षा वेगळा असा सत्याचरणी, सत्वगुणी आणि सुकुमार असा निघाला. विश्रवांची दुसरी पत्नी ऋषी भारद्वाजांची पुत्री इलाविडा (वाल्मिकी रामायणात हिचा उल्लेख देववर्णीनी असा आहे) हिच्यापासून त्यांना एक पुत्र झाला, तो वैश्रवण कुबेर.
कैकसी आपल्या पुत्रांसोबत आपल्या पित्याच्या अर्थात सुमालीच्या राज्यात पाताळात जाऊन राहू लागली. कुबेराला ब्रम्हांनी इंद्र, वरुण आणि यम यांच्यासोबत चौथा लोकपाल घोषित केलं आणि त्याला पूर्वीच्या काळी माली, सुमाली आणि माल्यवान या राक्षसांनी सोडून दिलेल्या, विश्वकर्म्याने स्थापित केलेल्या सुवर्णनगरी लंकेचे राज्य दिले. आपल्या मातुलगृही मोठ्या होणार्‍या रावणाच्या मनात त्याच्या आईने कैकसीने तिला आणि तिच्या वडिलांना विष्णुंसोबतच्या झालेल्या युद्धात पराभूत होऊन लंकेचे वैभवसंपन्न राज्य सोडून पाताललोकात कसे येऊन राहावे लागले आणि त्याचाच सावत्र भाऊ कुबेर कसे लंकेचे राज्य उपभोगतोय हे भरवायला सुरुवात केली. तरुण रावणाने आपल्या दोन्ही भावांसोबत लंकेचे राज्य मिळवण्यासाठी गोकर्णक्षेत्री जाऊन उग्र तप:श्चर्या करायला सुरुवात केली.
तिघांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन ब्रम्हा जेव्हा वरदान देण्यासाठी अवतरीत झाले तेव्हा रावणाने अमर होण्याचा वर मागितला, परंतु ब्रम्हांनी असा वर देण्यास नकार दिल्याने त्याने कोणत्याही देव, गंधर्व, असुर, गरुड आणि सर्पाकडून मृत्यू येऊ नये आणि हवे तेव्हा हवे ते रूप घेण्याचे वरदान मिळवले. कुंभकर्णाने असेच काही वरदान मागितले तर सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून त्यावेळी त्याच्या जिव्हेवर सरस्वती येऊन बसली आणि तिच्या प्रभावाखाली त्याने मला अनेक वर्ष निद्रा मिळावी असे वरदान मागितले. शेवटी बिभीषणाची पाळी आल्यावर त्याने माझी वृत्ती सदैव धर्माचरणी रहावी, कुणीही न शिकविता ब्रम्हास्त्राचे ज्ञान प्राप्त व्हावे आणि माझ्याकडून नेहेमी धर्मपालन व्हावे असे वरदान मागितले. असुरकुळात जन्म घेऊनही धर्माचरणी होण्याची आकांक्षा ठेवणार्‍या बिभीषणावर प्रसन्न होऊन ब्रम्हांनी त्याला चिरंजीवित्वाचा वर दिला. त्यानंतर रावणाने कुबेराला लंकेतून हाकलून देऊन लंकेचे राज्य हस्तगत केले आणि आपल्या परीवारसह आणि राक्षसकुलासह लंकेत जाऊन स्थायिक झाला.
कालांतराने रावणाने मय दानवाची पुत्री मंदोदरी हिच्याशी, कुंभकर्णाने महाबलीची नात वज्रज्वाला हिच्याशी तर बिभीषणाने गंधर्वराज शैलुश याची मानससरोवराच्या काठावर जन्माला आलेली पुत्री सरमा हिच्याशी विवाह केला. लंकेचे राज्य हस्तगत केल्यावर रावण आपल्याला मिळालेल्या वरा मुळे अधिकच उद्दाम होऊन देवलोक, यमलोक, वरुणलोक, यक्षलोक यांच्यावर आक्रमण करून विश्वविजयी होऊ लागला. या युद्धात सगळ्यांना पराभूत करून अनेक स्त्रियांना जबरदस्ती लंकेत त्याच्या भोगासाठी घेऊन आला, तेव्हा त्याचा पहिला विरोध बिभीषणानेच केला, वाल्मिकी रामायणात त्याने रावणाला अतिशय स्पष्टपणे दिलेली दुषणे वर्णन केलेली आहेत. सुरुवातीपासूनच प्रत्यक्ष रावणाला विरोध करूनही रावणाच्या राजसभेत त्याला अतिशय महत्वाचे पद आणि अधिकार होते, यावरून त्याची क्षमता आणि लंकेतले असलेले स्थान लक्षात येते. रावणाने सीतेला हरण करून आणल्यावर हि फक्त मंदोदरी आणि बिभीषण हे दोघेच त्याला विरोध करतांना दिसतात. बिभीषणाला सरमेपासून एक पुत्री असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी मिळतो. वेगवेगळ्या रामायणात तिचे नाव कला, अनला आणि नंदा असे वेगवेगळे आढळते. तर कंब रामायण, उडिया भाषेतील बलरामदास रामायण, जावनीज भाषेतील काकवीन रामायण ई. ठिकाणी चक्क सीतेला अशोकवाटिकेत धीर देणारी त्रिजटा राक्षसीण हीच बिभीषणाची मुलगी असल्याचे उल्लेख आहेत. वाल्मिकी रामायणात मात्र बिभिषणाच्या कुठल्याच पुत्र अथवा पुत्रीच्या नावाचा उल्लेख नाही. त्यामुळेच बिभीषणाचा उत्तराधिकारी कोण हा प्रश्न अनुत्तरीतच रहातो.
राम-रावण युद्धापूर्वी रावणाकडून अपमानित होऊन बिभीषण आपल्या चार सहकार्यांसोबत रामांना जाऊन मिळाला. त्यावेळी सुग्रीव आणि इतर वानर योद्धे त्याबद्दल शंका घेतात, त्यावर राम त्यांना बिभीषण युद्धानंतर लंकेच्या सत्ताप्राप्तीची कामना बाळगून आपल्याकडे आला असेल आणि तसे असेल तर शत्रुपक्षात फुट पडली आहे, ते आपल्या पथ्यावरच पडेल असे समर्थन करताना आढळतात. त्याची कामना दृढ करण्यासाठी त्याचा लगेच समुद्र्जलाने लंकेचा राजा म्हणून अभिषेकही करतात. त्यानंतर इंद्रजीत, कुंभकर्ण, रावण यांच्या वधासाठी त्याच्या सल्ल्याचा चांगला उपयोग राम करून घेतात. रावण वधानंतर राम राज्याभिषेकाच्या वेळी बिभीषणही अयोध्येत उपस्थित होता असेही वर्णन वाल्मिकी रामायणात आहे. राज्याभिषेक सोहळ्यातून परत लंकेस जातांना रामांनी रावणाचे पुष्पक विमान बिभीषणाला दिले. परंतू लंकेच्या रस्त्यातच दक्षिण भारतात श्रीरंगम येथे बिभीषण पूजेसाठी थांबलेला असताना ते विमान तेथेच राहिले. बिभीषण ते लंकेला नेऊ शकला नाही. त्यावेळी भगवान विष्णु बिभीषणासमोर प्रकट झाले आणि त्यांनी रंगनाथस्वामी या स्वरूपात तेथेच राहण्याची इच्छा प्रकट केली, तेव्हापासून या मंदिरात नित्य दर्शनाला बिभीषण तेथे येत असतो असे मानतात.
बिभीषणाचा उल्लेख रामायणानंतर थेट महाभारत काळात ही येतो. सभापर्वाच्या तिसाव्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे धर्मराज युधिष्ठिराने जेव्हा राजसूय यज्ञ केला तेव्हा दक्षिण भारताच्या विजय अभियानावर यज्ञाच्या घोड्यासोबत सहदेव गेलेला असताना, त्याची भेट दक्षिण टोकावर असलेल्या लंकेत बिभीषणाशी झाली, आणि बिभीषणाने तेव्हा सहदेवाचे स्वागत करून त्याला भरपूर धन-दक्षिणा दिल्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. अर्थात तोपर्यंत लंकेचे राज्य तोच सांभाळत होता असे मानले जाते.
लंकेचे राज्य स्वीकारल्यानंतर त्याने रावणाची पत्नी मंदोदरी हिच्याशी विवाह केला, अर्थात यात लंकेचे राज्य निट चालावे, गृह्कलह टाळला जावा म्हणून केलेला हा राजकीय विवाह होता असे मानले जाते. यक्षांची अलकामांडवा येथे असलेली राजधानी बिभीषणाने केलानी नदीच्या तीरावर असलेल्या केलानिया या ठिकाणी हलवल्याचा उल्लेख सिंहली लेखक आदिगर विक्रमसिंघे यांच्या रावण कथेत आढळतो. रावण वधानंतर बिभीषणाचा राज्याभिषेक लक्ष्मणाने याच केलानी नदीच्या काठावर केला असे मानले जाते. बिभीषणाचा मोठा सुंदर महाल अजूनही या ठिकाणी सुस्थितीत आहे. त्याच्या भिंतीवर राज्याभिषेकची शिल्पे ही कोरलेली आहेत. तसा हा महाल किंवा मंदिर अनेक वेळा फोडण्यात आले, काहीवेळा द्रविडियन लोकांनी तर काहीवेळा पोर्तुगीजांनी. सध्याचे मंदिर हे १९६७ मध्ये राजा किर्ति श्रीराजसिंघे यांच्या कालावधीत पुनर्निर्मित केले गेलेले आहे. भगवान बुद्ध ई. पू. ५४३ मध्ये आपल्या काही शिष्यांसोबत केलानिया येथे आले होते, त्यांनी याच ठिकाणी आपला उपदेश केला होता. त्या नंतर श्रीलंकेत बौद्ध संप्रदाय वाढीस लागला. हिंदू परंपरेत असणार्‍या चार लोकपालांच्या धर्तीवर बौद्ध धर्मात ही चार “साथरा वरं देवयो” (sathara waram deviyo) अर्थात चार रक्षक देवता मानले जातात. श्रीलंकेतील बौद्ध संप्रदायाने मूळ बिभीषणाचे “विभिशणा” नामांतर करून त्याला या चार महत्वाच्या देवतांमध्ये स्थान देऊन टाकले आहे.
श्रीलंकेप्रमाणे भारतातही बिभीषणाची मंदिरे बघायला मिळतात. युद्धापूर्वी जेथे रामांनी बिभीषणाचा पट्टाभिषेक केला होता, ते स्थान रामेश्वर पासून धनुष्कोडी च्या रस्त्यावर रामेश्वर पासून सुमारे १३ किलोमीटर अंतरावर आहे. याच जागेवर सुमारे एक हजार वर्षांपूर्वी बांधलेले कोदंडरामस्वामी मंदिर आहे. या मंदिरात राम लक्ष्मण हनुमान यांच्या मूर्त्यांसोबत बिभीषणाची रामाला प्रणाम करणारी ही प्राचीन मूर्ति आहे. मंदिराच्या भिंतीवर राम रावण युद्धाची आणि बिभीषणाच्या पट्टाभिषेक प्रसंगांची चित्रे काढलेली आहेत. १९६४ सालच्या सुनामी वादळात संपूर्ण नष्ट झालेल्या धनुष्कोडी परिसरात सुरक्षित राहिलेले हे एकमेव मंदिर आहे. शिकागो यात्रेवरून आल्यावर स्वामी विवेकानंदांनी ही या मंदिराचे दर्शन घेतले होते असे म्हणतात.
संपूर्ण भारतात असलेले बिभीषणाचे एकमेव मंदिर राजस्थान च्या कोटा जिल्ह्यातील कैथून येथे आहे. असे म्हणतात की रामांच्या राज्याभिषेकानंतर बिभीषणाच्या मनात हनुमान आणि शंकराच्या मूर्ति सोबत भारत भ्रमणाची इच्छा जागृत झाली. तेव्हा त्याने खांद्यावर एक कावड घेऊन एका कावडीत शंकरांची मूर्ति आणि एका कावडीत हनुमान यांना बसवून दरमजल करत निघाला. रस्त्यात कावड कुठेही जमिनीला टेकू द्यायची नाही असे त्याने ठरवले होते, परंतू कैथून येथे आल्यावर नेमके कावडीचे एक टोक रंगबाडी बालाजी येथे तर दुसरे टोक चारचौमा येथे टेकले गेले. त्यामुळे त्याची यात्रा तेथेच समाप्त झाली. म्हणून कैथून येथे बिभीषणाचे, रंगबाडीला हनुमानाचे आणि चारचौमा येथे शंकराचे मंदिर बांधण्यात आले. कैथून चे बिभीषण मंदिर जवळपास चौथ्या शतकातील आहे असे मानले जाते. प्रचंड परिसर असलेल्या या मंदिरात बिभीषणाच्या विशाल मूर्तिची रोज पुजाअर्चा होत असते. दर मार्च महिन्यात येथे मोठी यात्रा ही भरते.
सध्याच्या आधुनिक काळातही एक चमत्कारिक संदर्भ बिभीषणाच्या बाबतीत बघायला मिळतो तो थेट मध्य प्रदेशातल्या मुरैना जिल्ह्यातील ईश्वरा महादेव मंदिरात. हे मंदिर मुरैना जिल्ह्यातील कैलारस तालुक्यातील पहाडगड या दुर्गम जंगलात आहे. सुमारे पंचवीस किलोमीटर बिकट रस्त्याने आत गेल्यावर एका गुफेत एक शंकराची पिंड आहे. या पिंडीची दररोज ची पूजाअर्चा आणि साफसफाई स्थानीय पुजारी करतात, परंतू संध्याकाळी स्वछता करून गेल्यावर पहाटे तीन ते पाच वाजेच्या दरम्यान दररोज न चुकता पिंडीवर तांदळाचे दाणे, बेलपत्र, फुले यांनी कुणी अज्ञात व्यक्तीने पुजा केलेली आढळते. गेल्या अनेक वर्षांपासून ही पहाटेची विशेष पुजा कोण करून जात, हे अद्याप कुणीही बघू शकलेलं नाही. ही शिवपिण्ड चिरंजीवी बिभीषणाने स्थापित केलेली आहे आणि तोच दररोज ही पुजा करून जातो असे मानले जाते. अनेक टी.व्ही. चॅनल च्या पत्रकारांनी आपले कॅमेरे तेथे रात्रभर लाऊन ठेवले, परंतू कुणाच्याही कॅमेर्‍यात अद्यापपर्यंत पुजा कोणी केली याचे रेकॉर्डिंग होऊच शकले नाही.
श्रीलंकेचा ज्ञात इतिहास हा साधारण २५०० वर्षांपूर्वीचाच सापडतो. तरीही बिभीषण (किंवा त्याचे वंशज) लंकेत ई. पू. १०१ पर्यंत राज्य करीत होता असे मत श्रीलंकेतील एक संशोधक प्रा. नलिनी डिसिल्व्हा मांडतात. गेल्या २०,००० वर्षात समुद्री प्रलय, उल्कापात यामुळे लंकेचे अनेकवेळा नुकसान झाल्याचे उल्लेख भूगर्भशास्त्रात आहेत. त्यामुळे ई.पू. ३००० ते ५००० हा कालखंड अंधार युग मानला जातो. या काळातला बराचसा इतिहास आणि भौगोलिक स्थाने हि त्यामुळे अज्ञातातच आहेत. असे असूनही लंकेत आणि भारतातही रामायण काळापासून चिरपरिचित असलेला बिभीषण असुर कुळातला असूनही अनेक ठिकाणी पूजनीय आहे. बिभीषणाचे स्थान तसे त्याच्या काळात सामान्य राहिले परंतू तरीही आपल्या धर्माचरणाच्या मार्गामुळे ब्रम्हाकडून मिळालेलं चिरंजीवित्व आणि रामांनी कलियुगाच्या अंतापर्यंत धर्मप्रसाराचा दिलेला आशीर्वाद यामुळे तो अजूनही चर्चेत असतो.
©अभिजीत खेडकर.
माहिती स्त्रोत – गुगल, विकिपीडिया, वाल्मिकी रामायण, पद्म पुराण, महाभारत-सभापर्व, विनायक चिंतनिका – ले. विनायक पलुस्कर, Buddhism in Sri Lanka- A Short History by H.R. Perera.
फोटो स्त्रोत = गुगल.
मुरैना येथील ईश्वरा महादेव मंदिरातील रेकॉर्डिंग ची लिंक –
https://m.youtube.com/watch?feature=youtu.be&v=KwurvHvmCsc

सप्त चिरंजीव ४ – बिभीषण https://www.facebook.com/100002636644896/posts/3097724493658742/

महाविष्णूचे अवतार

कूर्मावतार

वैशाख पौर्णिमेचे माहात्म्य . कूर्मजयंती
.
ज्या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा (कूर्म) अवतार घेतला त्या दिवसाची आठवण करून देणारा हा दिवस आहे. कूर्म वा ‘कच्छप अवतार’ हा श्रीविष्णूंच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो. देव आणि दानवांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागरात मंथन केले होते. मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी केली होती. आपापसातले मतभेद विसरून देव-दैत्यांनी मंदार पर्वत जोर लावून उखडला आणि समुद्रात उभा करायचा प्रयत्‍न केला. परंतु पर्वत पाण्यात बुडायला लागला. शेवटी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप, म्हणजे कूर्मावतार धारण केला आणि समुद्रात जाऊन मंदार पर्वताला खालून आधार दिला. कूर्माच्या पाठीवर मंदार पर्वताची रवी फिरू लागली आणि समुद्रमंथन शक्य झाले. ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेला कूर्म जयंती साजरी होते.

नृसिंह अवतार

नरसिंह आणि प्रह्लाद

आज भगवान नृसिंहजयंति आहे. भक्त प्रह्लादाची गोष्ट प्रत्येक मुलाला माहीत असते, पण महाराष्ट्रात मी कुठे नरसिंहाचे देऊळ पाहिले नाही. आमच्या कर्नाटकातल्या जमखंडी गावाजवळ शूरपाली नावाच्या खेड्यात नरसिंहाचे देऊळ आहे, पण मी तिथल्या उत्सवाला कधी गेलो नव्हतो. मी २००८मध्ये मैसूरला काही दिवस राहिलो होतो तिथे हा उत्सव साजरा केला जात असलेला पहिल्यांदा पाहिला.

नरसिंह – शूरपाली

नृसिंह स्वामी – मैसूर

श्रीसमर्थरामदास कृत नृसिंहपंचक

नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें
प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें
खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें
तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हीजाळें।।

झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी
लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी
हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी
कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।

कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं
घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं
तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं
धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।

भरभरित भरारी भर्भराटे भरारी
थरथरित थरारी थर्रथराटे थरारी
तरतरित तरारी तर्तराटे तरारी
चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।।

रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी।
गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी।
न धरित जन मानें लोक गेलें निदानें।
हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।।

जय श्रीराम
🙏🏻🙏🏻🙏

One thought on “पुराणातल्या गोष्टी”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: