शाळेतल्या कविता

मी १९५०-६० च्या दशकात मराठी शाळेत शिकत होतो. त्या काळात पुस्तकातल्या कविता तोंडपाठ करणे हा आमच्या अभ्यासक्रमातला अत्यावश्यक भाग होताच, तो मला खूप म्हणजे खूपच (तेंव्हा आम्ही त्याला भयंकर असे म्हणत होतो.) आवडतही होता. त्या काळात आम्ही कुणाच्याही घरी गेलो किंवा आमच्या घरी कोणी पाहुणे आले तर लहान मुलांना चालीवर कविता म्हणायला सांगत आणि त्याबद्दल पाठीवर शाबासकी आणि हातात एकादा पेढा किंवा लाडू मिळत असे. मी असे अगणित खाऊ मिळवले होते. कदाचित म्हणूनच त्यातल्या अनेक कविता अजूनपर्यंत माझ्या लक्षात राहिल्या आहेत किंवा लगेच आठवतात. त्यातल्या कांही कविता मला अलीकडे मिळाल्या त्या या ठिकाणी गोळा करून ठेवल्या आहेत.

संपादन दि. ११ -०९- २०१८, २३-१२-२०१८, ०३-०१-२०१९, ०५-०३-२०१९, १८-०७-२०२०, २३-०५-२०२१, ०७-०६-२०२२

या जुन्या तसेच नंतरच्या पिढीमधल्या मुलांना शिकवलेल्या कांही नव्या अशा सर्वच कवितांचे संकलन करणारे एक पुस्तक :  बालभारती मराठी कविता

 

——————————————————–

शाळेतल्या कविता अनुक्रमणिका

१. केशवसुत : आम्ही कोण, काठोकाठ भरू द्या पेला, तुतारी, सतारीचे बोल, आम्हीच नव्हतो
२. भा.रा.तांबे : पिवळे तांबुस ऊन, मधुघट, जन पळभर, रुद्रास आवाहन, तुझ्या गळा माझ्या गळा
३. ना.वा.टिळक : केवढे हे क्रौर्य
४. बालकवी ठोंबरे : श्रावणमासी, औदुंबर
५. केशवकुमार : आजीचे घड्याळ
६. ग.दि.माडगूळकर : नाच रे मोरा
७. भानूदास : पडू आजारी
८. वि.म.कुलकर्णी : आधी होते मी दिवटी
९. अनंत फंदी : बिकट वाट वहिवाट नसावी
१०. माधव ज्यूलियन : भ्रांत तुम्हा का पडे
११. बा.भ.बोरकर : दिव्यत्वाची जेथ प्रचीती
१२. बहिणाबाई चौधरी : मन वढाय वढाय, अरे खोप्यामाजी खोपा
१३. कुसुमाग्रज : जीर्ण पाचोळा
१४. यशवंत : आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी
१५. दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी : मोहरा इरेला पडला
१६. गोविंदाग्रज : राजहंस माझा निजला
१७. प्राथमिक वर्गातल्या कविता : देवा तुझे किती, पेरूची फोड, रुणुझुणू पाखरा, डराँव डराँव, पोपट, चांदोमामा, येरे येरे पावसा, बाळ बघा, गाडी आली, बाहुली, भैरूचे औत
१८. लक्ष्मीबाई टिळक  : मी तुझी मावशी

————————————————————–

आम्ही कोण

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया –
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!

शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!

आम्हांला वगळा – गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा – विकेल कवडीमोलावरी हे जिणे!

  कवि —- केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)


स्फूर्ती

काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या
प्राशन करिता रंग जगाचे कणोकणी ते बदलू द्या

अमुच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेल जग आम्हांस मद्यपि पर्वा कसली मग याची
जिव्हेची बंधने तर ढिली करा तीव्र या पेयाने,
यदुष्णतेने द्यावापृथ्वी द्रवुनि मिसळती वेगाने
होउनिया मग दंग मनी,
व्हावे ते आणा ध्यानी,
गा मग सुचतिल ती गाणी,
परिसुनी त्यांचे शब्द, रुढीचे द्यास झणी ते खवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या

सोमाचा रस वेदकाळच्या ऋषिवर्यांनी उकळीला
शेष तयाचा द्या तर लवकर पिपासु जे त्या आम्हाला
औचित्याच्या फोल विवेका, जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने
क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरी जाऊ
उडुरत्ने ती गरीब धरेला तेथुन फेकुनिया देऊ
अडवतील जर देव, तरी
झगडू त्यांच्याशी निकरी
हार न खाऊ रतीभरी
देवदानवा नरे निर्मीले हे मत लोकां कवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या

पद्यपंक्तीची तरफ आमुच्या की विधीने दिली असे,
टेकुनि ती जनताशीर्षावरी जग उलथुन या देउ कसे
बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे.
उडवुनि देऊनि जुलुमाचे या करु पहा तुकडे तुकडे
महादेव ! हरहर ! समराचा गर्जत तो वाऱ्यावरती
येउनि घुमतो अमुच्या कर्णी ..निजती ते ठारची मरती
उठा उठा बांधा कमरा
मारा किंवा लढत मरा
सत्वाचा उदयोस्तु करा
छंद फंद उच्छृंखल अमुचे स्तीमित जगाला ढवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या

कवी – केशवसुत


तुतारी

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकीन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजला आणुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?

रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!

चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्नतीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!

पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!

कवी – केशवसुत

—————————————————-

 सतारीचे बोल

काळोखाची रजनी होती,
हृदयी भरल्या होत्या खंती
अंधारातचि गढले सारे
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे,
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यांतुनि मी होतो हिंडत
एका खिडकीतुनि सुर तदा
पडले – दिड दा, दिड दा, दिड दा!

जड हृदयी जग जड हे याचा
प्रत्यय होता प्रगटत साचा
जड ते खोटे हे मात्र कसे
ते न कळे: मज जडलेच पिसे
काय करावे, कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावे!
मग मज कैसे रूचतील वदा
ध्वनि ते – दिड दा, दिड दा, दिड दा!

सोंसाट्याचे वादळ येते,
तरि ते तेव्हा मज मानवते
भुते भोवती जरी आरडती
तरि ती खचितचि मज आवडती
कारण आतिल विषण्ण वृत्ती
बाह्य भैरवी धरिते प्रीति
सहज कसे तिज करणार फिदा
रव ते – दिड दा, दिड दा, दिड दा!

  कवि —- केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)


आम्ही नव्हतो अमुचे बाप
उगाच का मग पश्चात्ताप
आसवे न आणू नयनी
मरून जाऊ एक दिनी

अमुचा प्याला दुःखाचा
डोळे मिटुनी प्यायाचा
तिच्या बुडाशी गाळ दिसे
अनुभव त्याचे नाव असे
फेकुन देवो कुणी तरी
अमृत होवो कुणा तरी

कवि : केशवसुत

——————————————-


सायंकाळची शोभा

पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर
झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी
हिरवेहिरवे गार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालिचे
सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे ईंद्रघनुष्याचे
अशी अचल फुलपाखरे, फुले साळिस जणू झुलती
साळीवर झोपली जणूं का पाळण्यांत झुलती.
झुळकन सुळकन ईकडून तिकडे किती दुसरी उडती!
हिरे माणकें पांचू फुटुनी पंखचि गरगरती!
पहा पांखरे चरोनि होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा?

— कवि : भा.रा.तांबे


रिकामे मधुघट

मधु मागशि माझ्या सख्या, परिं
मधुघटचि रिकामे पडति घरीं !….. ध्रु.

आजवरी कमळाच्या द्रोणी
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करिं रोष न सखया, दया करी…..१

नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गांठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणीं कशी तरी……२

तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवें तुज,
मधु पिळण्या परि रे बळ न करीं !……३

ढळला रे ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविति हृदया,
अता मधूचें नांव कासया?
लागले नेत्र रे पैलतिरीं……..४

मधु मागशि माझ्या सख्या, परी
मधुघटचि रिकामे पडति घरीं !

राजकवि भास्कर रामचंद्र तांबे


जन पळभर म्हणतिल

जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’ !
मी जाता राहिल कार्य काय ?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल,
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय ?

मेघ वर्षतिल, शेते पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय ?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल,
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जाता त्यांचे काय जाय ?

रामकृष्णही आले, गेले !
त्याविण जग का ओसचि पडले ?
कुणी सदोदित सूतक धरिले ?
मग काय अटकले मजशिवाय ?

अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ?

कवि  – भा. रा. तांबे


रुद्रास आवाहन

डमडमत डमरु ये, खण्‌खणत शूल ये,
शंख फुंकीत ये, येइ रुद्रा ।
प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा
क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा ।। ध्रु०।।

कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां ।। १ ।।

पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती,
झाड खट्‌खट् तुझें खड्‌ग क्षुद्रां ।। २ ।।

जळ तडागी सडे, बुडबुडे, तडतडे
‘शांति ही !’ बापुडे बडबडति जन-किडे !
धडधडा फोड तट ! रुद्र, ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा ।। ३ ।।

पूर्विं नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयिं अन्य गृहिं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा ।। ४ ।।

कवि  – भा. रा. तांबे


तुझ्या गळां, माझ्या गळां

तुझ्या गळां, माझ्या गळां
गुंफूं मोत्यांच्या माळा-“
“ताई, आणखि कोणाला ?”
“चल रे दादा चहाटळा !”

“तुज कंठी, मज अंगठी !”
“आणखि गोफ कोणाला ?”
“वेड लागलें दादाला !”
“मला कुणाचें ? ताईला !”

“तुज पगडी, मज चिरडी !”
“आणखि शेला कोणाला ?”
“दादा, सांगूं बाबांला ?”
“सांग तिकडच्या स्वारीला !”

“खुसूं खुसूं, गालिं हसूं”
“वरवर अपुले रुसूं रुसूं”
“चल निघ, येथे नको बसूं”
“घर तर माझें तसू तसू.”

“कशी कशी, आज अशी”
“गम्‍मत ताईची खाशी !”
“अता कट्टी फू दादाशीं”
“तर मग गट्टी कोणाशीं ?

कवि  – भा. रा. तांबे

—————————————————-

केवढे हे क्रौर्य

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

— रेव्ह. ना.वा.टिळक

———————————————————-

 श्रावणमासी

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;

मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तो उघडे;

तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे!

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा!

सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा!

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते

उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते!

फडफडा करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती;

सुंदरा हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती!

खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे,

मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे!

सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला

पारीजातही बघता भामारोष  मनीचा मावळला!

बालकवी (कै.त्र्यंबक बापूजी ठोंबरे) 

————————————————————————————————

 

औदुंबर

ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.

चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.

पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.

झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

बालकवी (कै.त्र्यंबक बापूजी ठोंबरे) आजीचे घड्याळ

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

“अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,”
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
“बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !”

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
“आली ओटिवरी उन्हे बघ!” म्हणे आजी, “दहा वाजले !
जा जा लौकर !” कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, “खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !”

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
“अर्धी रात्र कि रे” म्हणे उलटली, “गोष्टी पुरे ! जा पडा !’
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !

कवि – केशवकुमार (प्रल्हाद केशव अत्रे)

आजीचे घड्याळ


नाच रे मोरा

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच

ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी फुलव पिसारा नाच,
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच

झरझर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ करुन पुकारा नाच,
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच

थेंब थेंब तळयात नाचती रे टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत निळया सवंगडया नाच,
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच

पावसाची रिमझिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान कमानीखाली त्या नाच,
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच

गीतकार : ग. दि. माडगूळकर, गायिका : आशा भोसले,
संगीतकार : पु. ल. देशपांडे, चित्रपट : देवबाप्पा

———————————————————————————

 

संपादन २२-११-२०१८ : नव्या नोंदी

पडू आजारी

आजारपण

पडु आजारी, मौज हीच वाटे भारी ।।ध्रु।।

नकोच जाणे मग शाळेला,
काम कुणी सांगेल न मजला

मउ मउ गादी निजावयाला,
चैनच सारी, मौज हीच वाटे भारी ।।१।।

मिळेल सांजा, साबुदाणा,
खडिसाखर, मनुका, बेदाणा

संत्री, साखर, लिंबू आणा
जा बाजारी, मौज हीच वाटे भारी ।।२।।

भवती भावंडांचा मेळा,
दंगा थोडा जरि कुणि केला

मी कावुनि सांगेन तयाला,
‘जा बाहेरी’, मौज हीच वाटे भारी ।।३।।

कामे करतिल सारे माझी,
झटतिल ठेवाया मज राजी

बसेल गोष्टी सांगत आजी,
मज शेजारी, मौज हीच वाटे भारी ।।४।।

असले आजारीपण गोड,
असून कण्हती का जन मूढ ?

हे मजला उकलेना गूढ-
म्हणुन विचारी, मौज हीच वाटे भारी ।।५।।

गीत – भानुदास

संगीत – श्रीधर फडके
——————-

ज्योती

आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती ।
झाले इवली मग पणती,घराघरांतून मिणमिणती।
समई केले मला कुणी, देवापुढती नेवोनी ।
निघुनी आले बाहेर, सोडीत काळासा धूर।
काचेचा मग महाल तो, कुणी बांधुनी मज देतो ।
कंदील त्याला जन म्हणती, मीच तयांतिल परि ज्योती।
बत्तीचे ते रूप नवे, पुढे मिळाले मज बरवे।
वरात मजवाचून अडे, झगमगाट तो कसा पडे।
आता झाले मी बिजली, घरे, मंदिरे लखलखली ।
देवा ठाऊक काय पुढे, नवा बदल माझ्यात घडे।
एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलांला ।
कसलेही मज रूप मिळो, देह जळो अन्‌ जग उजळो।
 
कवि : वि.म.कुलकर्णी
—————————————-
 

संपादन २३-१२-२०१८ : नव्या नोंदी

फटका : बिकट वाट वहिवाट नसावी

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको
चल सालसपण धरुनी निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरूं नको
नास्तिकपणी तुं शिरुनि जनाचा बोल आपणा घेउ नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेपुढती पाहु नको
मायबापांवर रुसूं नको
दुर्मुखलेला असूं नको
व्यवहारमधी फसूं नको
कधी रिकामा बसू नको
परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करू नको ॥ १ ॥

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलूं नको
बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा, झटू नको
मी मोठा शाहणा, धनाढ्यही, गर्वभार हा वाहू नको
एकाहूनू चढ एक जगामंधि, थोरपणाला मिरवू नको
हिमायतीच्या बळे गरिबगुरीबाला तू गुरकावू नको
दो दिवसाची जाइल सत्ता, अपेश माथा घेउ नको
विडा पैजेचा उचलु नको
उणी कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागुं नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामीन राहू नको ॥ २ ॥

उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको
वरी खुशामत शाहण्याची परि मूर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजिभाकरी, तूपसाखरे चोरू नको
दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधीं विटू नको
असल्या गाठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नको
आता तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तूं टाकू नको
सुविचारा कातरू नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजना विस्मरू नको
सत्कीर्ती नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको ॥ ३ ॥

  • शाहीर कवि : अनंतफंदी

भ्रांत तुम्हां कां पडे?

हिंदपुत्रांनो, स्वतांला लेखिता कां बापडे? भ्रांत तुम्हां कां पडे?
वाघिणीचें दूध प्यालां, वाघबच्चे फाकडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।। धृ।।

हिंदभू वीरप्रसू जी वैभवाला पावली, कां आता खालावली?
धन्यता द्याया कुशीला अंग झाडा, व्हा खडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।१।.

पूर्वजांची थोरवी लाभे पुन्हा बोलून कां? झिंगुनी डोलूं नका;
लक्ष द्या चोहींकडे, द्या कालवैशिष्टयाकडे ! भ्रांत तुम्हां कां पडे? ।।२।।

जीर्ण त्या कैवल्यकुंडी घाण देखा माजली, डुंबता कां त्या जली?
ओज पूर्वीचे न तेथे, तीर्थ ते आता सडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।३।।

ज्ञानगंगा वाहते पूर्वेकडे, घाला उड्या, अंतरी मारा बुड्या;
संपली पूर्वाग्रहांची रात्र, झाले तांबडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।४।।

मोकळी ही खा हवा, चैतन्य अंगी खेळवा, आत्मशुद्धी मेळवा,
मुंडिती जे फक्त डोके तेच गोटे कोरडे! भ्रांत तुम्हां कां पडे? ।।५।।

श्रेष्ठता जन्मेच का ये? जातिदर्पाला त्यजा, हिंदुतेला भजा,
नेमका का भेद भासे? साम्य सारे का दडे? भ्रांत तुम्हां कां पडे? ।।६।।

ब्राम्हणत्वाची बढाई लाज ही वेदास हो! षड्रिपूंचे दास हो !
लोकसेवा, सत्यशुद्धी ही कराया व्हा सडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।७।।

कर्मयोगी एक व्हा रे, नायकी वा पायकी, दावुनी घ्या लायकी;
खानदानीतील नादाना, करी घे फावडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।८।।

जो करी कर्तव्य, घामेजूनि खाई भाकरी, धन्य त्याची चाकरी !
कर्मजा सिद्धी! न गीतावाक्य हे खोटे पडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।९।।

लेखणी बंदूक घ्या वा तागडी वा नांगर, हिंदवी व्हा चाकर;
एक रक्ताचेच आहो साक्ष देई आतडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।१०।।

एकनाथाची कशी आम्हास होई विस्मृती, जो दया मानी स्मृती.
जो कडे घे अंत्यजाचे पोर तान्हे शंबडे! भ्रांत तुम्हां कां पडे? ।।११।।

संकराची बंडखोरी उभारा या ध्वजा! उन्नती स्वातंत्र्यजा!
राजकी वा गावकी – सारी झुगारा जोखडे! भ्रांत तुम्हां कां पडे? ।।१२।।

भारताच्या राउळी बत्तीस कोटी देवता जागत्या, या पावता
मुक्तिसंगे स्वर्ग लाभे- कोण पाही वाकडे? भ्रांत तुम्हां कां पडे? ।।१३।।

पोट जाळायास देव्हारे पुजारी माजवी, ईश्वराला लाजवी
चूड घ्या अन्‌ चेतवा हे रूढ धर्माचे मढे! भ्रांत तुम्हां कां पडे? ।।१४।।

काय भिक्षेची प्रतिष्ठा? चैन चाले आयती, मुख्य दीक्षा काय ती?
कष्टती ते खस्त होती, पोळ साई-जोगडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।१५।।

’बुत्‌ शिकन्‌’ व्हा! ’बुत्फरोशी’ कासया बालाग्रही? भक्त व्हा सत्याग्रही!
मानिती वेड्यास साधु स्वार्थसाधू भाबडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।१६।।

आचरा शांतिक्षमा, निंदोत ते जे निंदती, संयमीला न क्षिती.
वैरबाधा खास दिव्य प्रेममंत्राने झडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।१७।।

ही अहिंसा प्रेमनीती वाटता नामर्दुमी क्षात्रता दावा तुम्ही,
सोडवा क्षेत्री लढूनी राज्यसत्तेचे लढे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।१८।।

दृष्टि राष्ट्राची हवी स्वार्थातही जी नेहमी, उन्नतीची घे हमी;
जो अहिंदी त्याजला ठेवा दुरी, चारा खडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।१९।।

बंधुला हाणावयाला पत्करुनी दास्यही, शत्रु आणावा गृही
दोष हा राष्ट्रघ्न अद्यापिही देशाला नडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।२०।।

तो असो जैचंद वा राघो भरारी वा कुणी, तो स्वराज्याचा खुनी!
हाकुनी धिक्कारुनी द्या त्यास सैतानाकडे! भ्रांत तुम्हां कां पडे? ।।२१।।

बंधुलाही गांजुनी जो शत्रुगेही मोकली मूळ साक्षात तो कली!
ना गणा त्याची प्रतिष्ठा, ते विषारी रोपडे! भ्रांत तुम्हां कां पडे? ।।२२।।

इच्छिता स्वातंत्र्य, द्या स्वातंत्र्य हे अन्यांसही, का न कोणा आस ही?
का गुलामांचे तुम्हा सुल्तान होणे आवडे? भ्रांत तुम्हां कां पडे? ।।२३।।

’जो बचेंगे तो लढेंगे’! शूर दत्ताजी वदे, स्वामिकार्यी जीव दे,
शौर्य हे दावाल का कल्ले मिशांचे आकडे? भ्रांत तुम्हां कां पडे? ।।२४।।

काळ राष्ट्रांच्या चढाओढींत लोटी खामखा, अंध ऐशाराम का?
स्वर्ग जिंका वा मही! ऐका रणीचे चौघडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।२५।।

कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला!
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।२६।।

जा गिरीच्या पैल जा! समृद्धि नांदे वैभवे तेथ सौंदर्यासवे;
मोकळीकीच्या मुदे उत्कर्ष तेथे बागडे! भ्रांत तुम्हां कां पडे? ।।२७।।

हिंदपुत्रांनो, हिताचे ते तुम्ही हाती धरा, एरव्ही माफी करा.
शब्द माझे बोबडे अन्‌ ज्ञान माझे तोकडे, चित्त माझे भाबडे. ।।२८।।

…….. कवि :  माधव ज्यूलियन ऊर्फ डॉ.माधव त्र्यंबक पटवर्धन


संपादन   ०३-०१-२०१९ : नव्या नोंदी

तेथे कर माझे जुळती

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येऊनिया जाती
जग ज्यांची न करी गणती ॥१॥

यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाही चिरा नाही पणती ॥२॥

जिथे विपत्ती जाळी उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥३॥

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांगी डोळे भरती ॥४॥

आणखी काही कडवी

हृन्मंदिरी संसृतिशरस्वागत, हसतचि करिती कुटूंब हितरत
गृहस्थ जे हरि उरात रिझवत, सदनी फ़ुलबागा रचिती ॥ १ ॥

ज्या प्रबला निज भावबलाने, करिती सदने हरिहरभुवने
देव-पतिना वाहुनि सुमने, पाजुनि केशव वाढविती ॥ २ ॥

शिरी कुणाच्या कुवचनवॄष्टी, वरिती कुणी अव्याहत लाठी
धरती कुणी घाणीची पाटी, जे नरवर इतरांसाठी ॥ ३ ॥

स्मिते जयांची चैतन्यफुले, शब्द जयांचे नव दीपकळे
कृतीत ज्यांच्या भविष्य उजळे, प्रेम विवेकी जे खुलती ॥ ४ ॥

                   …………. कवि: श्री. बा.भ. बोरकर


बहिणाबाई मन वढाय

मन

मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेलं गेलं आभायात

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर

मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतबि मावेन

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल

— बहिणाबाई चौधरी      

बहिणाबाई खोप्यामदी खोपा

नव्या   नोंदी  दि.१३-०३-२०१९


जीर्ण पाचोळा

आडवाटेला दूर एक माळ
तरु त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिपिंत जीवनाशी
निशा काळोखी दडवू द्या जगासी
सूर्य गगनातूनी ओतू द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरुवरची हसतात त्यास पाने
हसे मूठभर ते गवतही मजेने
वाटसरु वाट तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येई धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेई उडवूनी त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडल्या वरतून पर्णराशी

          – कवि कुसुमाग्रज   ऊर्फ वि.वा.शिरवाडकर

– नवी भर  दि. ०६-०७-२०१९

——————–

नवी भर दि. ०८-०१-२०२०

आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी  : कवी यशवंत, चित्रपट : श्यामची आई
https://www.youtube.com/watch?v=CU-ZFX_XdE0

आई म्हणोनि कोणी

नवी भर दि. १८-०७-२०२०

१५. मोहरा इरेला पडला – दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी

बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्ला असला
दुश्मन फिरंगी तिथला आटोपेना कोणाला
त्या सिंहाला पकडाया भारतीय चिमणा सजला
गोव्याचा टोपीवाला कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयाला बुद्धीचा डाव उडाला
मोहरा इरेला पडला ||१||

बोलावूनी सरदारांना तो समरधुरंधर बोले
शूरांनो वेढा द्याया चारमास होऊनी गेले
बेहीम्मत जे असतील परतोनी ते जातील
जा कळवा की दादाला मोहरा इरेला पडला ||२||

तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे
शीर तुटुनी त्या आघाते किल्ल्यात पडूद्या त्याते
ती निर्वाणीची वाणी डोळ्यास आणि पाणी
प्रत्येक वदे गहीवरुनी इर्षेस वीर हा चढला
मोहरा इरेला पडला ||३||

गोळ्यांच्या मार्याखाली चर खोदोनी रेतीत
उडविले सुरंगी बार तट लोळविला मातीत
गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारात
जो बांध तटाचा फुटला तो सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला बंदुकीस भाला भिडला
मोहरा इरेला पडला ||४||

मर्दच्या मराठी फौजा रणकीर्ती जणांच्या गाव्या
जणू घोंगावत मधमाश्या मोहोळाला बिलगाव्या
कडकडात वरुनी व्हावा सारखा अग्निवर्षावा
परी तो सिंहाचा छावा परतेना हिम्मतवाला
मोहरा इरेला पडला ||५||

वारावर करतची वार अनुसरले शूर पवार
शिंद्यांचा खांदा घोडा चालला जणू की तीर
बावटा धरुनी तोंडात भोसले चढे जोमात
आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला
मोहरा इरेला पडला ||६||

गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु कितक्यांच्या धड्पडल्या
धातीचे निधडे वीर चिंध्यापरी त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना क्षत्रुची पकड सुटेना
तो विजयश्रीचा चिमणा बेहोष होऊनी लढला
शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावर चढला
जयनादाने वसईचा दिग्प्रांत पहा दुमदुमला

तो समय आणि ती मूर्ती ठाके कवीनयनापुढती
मोहरा इरेला पडला ||७||

********

१६. राजहंस माझा निजला – गोविंदाग्रज

हें कोण बोललें बोला? ‘राजहंस माझा निजला!’

दुर्दैवनगाच्या शिखरीं। नवविधवा दुःखी आई!
तें हृदय कसें आईचें । मी उगाच सांगत नाहीं ।
जें आनंदेही रडतें । दु:खांत कसें तें होइ–

हें कुणी कुणां सांगावें!
आईच्या बाळा ठावें !
प्रेमाच्या गांवा जावें–
मग ऐकावें या बोला । ‘राजहंस माझा निजला!”

मांडीवर मेलें मूल । तो हृदया धक्का बसला ।
होउनी कळस शोकाचा । भ्रम तिच्या मानसीं बसला ।
मग हृदय बधिरची झलें । अति दुःख तिजवि चित्ताला ।

तें तिच्या जिवाचें फूल ।
मांडीवर होत मलूल!
तरि शोकें पडुनी भूल–
वाटतची होतें तिजला। ‘राजहंस माझा निजला!’

जन चार भोंवतीं जमले। मृत बाळा उचलायाला।
तो काळ नाथनिधनाचा। हतभागि मना आठवला।
तो प्रसंग पहिला तसला। हा दुसरा आतां असला!

तें चित्र दिसे चित्ताला!
हें चित्र दिसे डोळ्यांला!
निज चित्र चित्तनयनांला,
मग रडुने वदे ती सकलां। ‘राजहंस माझा निजला!’

करुं नका गलबला अगदीं। लागली झोंप मम बाळा!
आधींच झोंप त्या नाहीं। खेळाचा एकच चाळा!
जागतांच वाऱ्यासरसा। खेळाचा घेइल आळा!

वाजवूं नका पाऊल!
लागेल तया चाहूल!
झोंपेचा हलका फूल!
मग झोपायाचा कुठला! राजहंस माझा निजला!

हें दूध जरासा प्याला। आतांसा कोठें निजला!
डोळ्याला लागे डोळा। कां तोंच भोवतीं जमलां?
जा! नका उठवुं वेल्हाळा। मी ओळखतें हो सकलां!

तो हिराच तेव्हा नेला!
हिरकणीस आतां टपलां!
परि जिवापलिकडे याला–
लपवीन! एकच मजला! राजहंस माझा निजला!

कां असलें भलतें सलतें। बोलतां अमंगळ याला!
छबकड्यावरुनि माझ्या या। ओवाळुनि टाकिन सकलां!
घेतें मी पदराखालीं। पाहूंच नका लडिवाळा!

मी गरीब कितिही असलें।
जरि कपाळ माझें फ़ूटलें।
बोलणें तरी हें असलें–
खपणार नाहिं हो मजला! राजहंस माझा निजला!

हें असेच सांगुनि मागें। नेलात जिवाचा राजा।
दाखविलाहि फिरुनी नाहीं। नाहिंत का तुम्हां लाजा?
न्यावयास आतां आलां। राजहंस राजस माझा!

हा असा कसा दुष्टावा?
कोणत्या जन्हिंचा दावा?
का उगिच गळा कापावा–
पाहुनी गरिब कोणाला। राजहंस माझा निजला!

***********************

नवी भर दि.२३-०५-२०२१

१७. प्राथमिक वर्गातली गाणी

देवा तुझे किती, पेरूची फोड, रुणुझुणू पाखरा, डराँव डराँव, पोपट, चांदोमामा, येरे येरे पावसा, बाळ बघा, गाडी आली, बाहुली, भैरूचे औत.

माझ्या लहानपणी सचित्र पुस्तके नव्हती. ही गाणी थोड्या नंतरच्या काळातल्या पुस्तकातली आहेत.

देवा तुझे किती सुंदर आकाश
पेरूची फोड
रुणू झुणू पाखरा
डराँवडराँव
पोपट पोपट
चांदोमामा
ये रे ये रे पावसा
बाळ बघा बाळ
गाडी आली गाडी आली
बाहुली
भैरूचे औत

१८ लक्ष्मीबाई टिळक

मी तुझी मावशी तुला न्यावया आले

4 thoughts on “शाळेतल्या कविता”

    1. मन वढाय वढाय.

      कविता वाचताना शाळेतल्या बाकावर बसल्याचा भास झाला आणि मन भरून आले.

      खूप खूप धन्यवाद आणि असे अनेक खजीने शोधण्यासाठी शुभेच्छा ,!

  1. आपण संकलित कविता वाचून मन भूतकाळात गेले आणि शाळेत त्याच बाकड्यावर जाऊन मोहरले.. मराठीच्या शिक्षिका आठवल्या,ज्यांनी आमचे स्वप्नाळू भावविश्व समृद्ध केले.. अनेकानेक शुभेच्छा..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: